श्रद्धा-सबुरी!

लेखांक 3

                    नाशिक-मुंबई घाट रस्ता

नशिबात असेल तेच घडते, आपल्या प्रारब्धानुसार घटना घडतात, असा सर्वसाधारण समज आहे. काही अंशी ते सत्यही आहे. तरी आपण प्रयत्नवादी असावे. सर्व नशिबावर सोडून देणे योग्य नाही.जे काही करणार आहोत त्यातील संभाव्य धोके ओळखून त्यानुसार थोडी सजगता असावी. मानवी जीवनात संकटाशी सामना करावा लागला नाही असा कोणी मनुष्य नाही. दैनंदिन जीवनात उपासनेची जोड असली तर मानसिक बळ मिळते. संकटे आली तरी त्यांची तीव्रता कमी होते, असेही अनुभव कित्येकांना आले आहेत.

     मला वाटते श्रद्धा व सबुरी ही शिर्डीच्या श्री साईबाबांची शिकवण  तेच सांगते. मनात श्रद्धा,भक्ति ठेवा, शांत निश्चिंत रहा, तुमच्या संकटांचे निवारण भगवंत करेल!

    माझ्या एका प्रवासात आलेला हा अनुभव मला तेच सांगून गेला..

   मला आठवते त्याप्रमाणे 1990 च्या सुमारास  हे घडले. मी त्यावेळी आमच्या उत्पादन खात्यात निर्मिती प्रमुख (Production In charge), म्हणून काम करीत होतो. आमच्या कंपनीसाठी लागणारी विविध प्रकारची पॅकेजिंग साधने, कागदी बॉक्सेस, पत्र्याचे डबे, पत्र्याचे ड्रम, प्लास्टिक डबे व बॅरल्स  इत्यादींच्या खरेदीसाठी कंपनीच्या खरेदी खात्याला(Purchase Dept.) शिफारशी करण्याचे काम आमच्याकडे होते. भारतातील अनेक पॅकेजिंग मटेरियल निर्माते आमच्या कडे ते बनवीत असलेल्या विविध वेस्टनांची खरेदी आम्ही करावी म्हणून नोंदणी-रजिस्ट्रेशन करीत. त्याप्रमाणे आम्ही त्या त्या निर्मात्याच्या फॅक्टरी ला भेट देऊन काही निकषावर कसोट्या (specifications and tests) घेऊन तशी शिफारस खरेदी खात्याला करित असू.

   त्याच सुमारास आमच्या कंपनीशी अमेरिकेतील एस्सो कंपनीची काही वंगणे विकण्याबद्दलकरार(Tie Up)  झाले होते. त्या करारानुसार एस्सो वंगणे आमच्या माजगाव मधील कारखान्यात त्यांच्या फॉर्मुल्यानुसार तयार करून, ‘Esso Branded’ नावाने, आमच्या मार्केटिंग साखळी मार्फत भारतात विकावी अशा प्रकारचा हा करार होता .

    त्यासाठी आम्ही एस्सोच्या सिंगापूर येथील कारखान्याला भेट देऊन त्यांच्या निर्माण ,पॅकिंग, वितरण (Manufacturing Packaging and Distribution)व्यवस्थेची पाहणी करून आलो होतो. माझाही त्या शिष्टमंडळात समावेश होता. तेथे आम्हाला खूप शिकण्यास  मिळाले. आमची सध्याची कंपनी मूळ एस्सो कंपनी  पासूनच, राष्ट्रीय करणानंतर निर्माण झाली होती. त्यामुळे आम्हाला त्यांच्या अनेक प्रथा प्रक्रियांचे ज्ञान होते. आमची निर्माण यंत्रणा व फॉर्म्युले त्यांच्या अमेरिकन निकषाप्रमाणेच बनविले होते.

     एस्सोची  वंगणे त्यांच्याच ब्रँडनेमखाली आम्ही विकणार असल्याने, बनविण्यात येणारी कागदी-वेस्टने, टीनचे लहान डबे, प्लास्टिक डबे तसेच ड्रम इत्यादी त्यांच्या नावानेच तयार करावयाचे होते.अर्थातच त्यासाठी आमच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे टेंडर्स मागवून, तीन उत्पादक भारतातून निवडले होते.आमच्या प्रथेप्रमाणे प्रत्यक्ष त्यांच्या कारखान्यास जाऊन पाहणी करावयाची होती. एस्सो कंपनीचे सिंगापूर फॅक्टरीतील दोन  तज्ञ मुंबईत आमच्या ऑफिसमध्ये आले होते. त्याचेसह आम्ही निवडलेल्या सप्लायर्सच्या कारखान्यांना भेट देणार होतो. हे सप्लायर्स हैदराबाद दिल्ली व मुंबई-नाशिक येथील होते. मुंबई-नाशिक येथील सामग्री  मुंबई कारखान्यासाठी, दिल्ली येथील  दिल्ली कारखान्यासाठी, तर हैदराबाद येथील आमच्या मद्रास कारखान्यासाठी पुरविला जाणार होता.

   एस्सो कंपनीचे अधिकारी सुमारे पंधरा दिवस मुंबईत मुक्काम करून होते. दिल्ली व हैदराबाद येथील कंपन्यांना भेट देऊन त्यांचे प्रॉडक्ट्स पास  झाले होते आणि तिसरा कारखाना नाशिक-अंबड येथे होता. नाशिक मुंबई प्रवासादरम्यान घडलेला हा प्रसंग आहे.

     सकाळी आठ वाजताचे सुमारास आम्ही मुंबईहून कारने निघालो. कंपनीच्या मालकांनी  आपली नवीन फियाट गाडी ड्रायव्हरसह आमच्यासाठी दिली होती. मी (Production Dept) खरेदी खात्याचे (Purchase Dept.) एक अधिकारी व दोन सिंगापूरचे अधिकारी असे चौघेजण प्रवासी होतो. मी पुढे बसलो होतो.तिघेजण मागे  बसले होते. हा बसण्याचा क्रम सांगण्याचा हेतू पुढे कळेलच.

     कारखान्यात पत्र्याचे डबे बनविण्यात येत आहेत.

    मुंबई नाशिक प्रवास अगदी सुरळीत झाला. वाटेत बारा वाजण्याच्या  सुमारास एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण घेतले. नाशिक – अंबड येथे फॅक्टरीला भेट देऊन तेथील उत्पादन पाहिले. आमच्या निकषाप्रमाणे, कच्चामाल व अंतिम उत्पादन, (Raw Material and Finished Products), काही परिक्षा चाचण्या घेतल्या. आमच्या निरीक्षणांचा अहवाल तयार करून दोन्ही बाजूकडील लोकांच्या सह्या घेऊन थोडा आराम केला. परतीच्या प्रवासाचा विचार करू लागलो. त्यावेळेस सुमारे दोन वाजले होते. 

     आता परतीचा प्रवास करून मुंबईस निघावयाचे होते. म्हणजे संध्याकाळी आम्ही मुंबईत पोहोचलो असतो. शिर्डी जवळच असल्याने मला श्री. साईबाबांचे दर्शन घ्यावे असे मनापासून वाटत होते. त्याआधीही अनेकदा शिर्डीस जाऊन बाबांचे दर्शन घेतले होते. तरीही का कोणास ठाऊक त्यादिवशी माझे मन मला, ’एवढ्या दूर आला आहेस तर बाबांचे दर्शन घेऊनच निघ.’ असे सांगत होते. अशा आतील संवेदनेला मी शक्यतो सकारात्मक प्रतिसाद देतो. सर्व सहकारी “यस- नो..” करीत होते. अमेरिकन गृहस्थांनी साईबाबा दर्शनासाठी आग्रह धरला. त्यांनी अमेरिकेत, शिर्डी व  बाबांचे महात्म्य कधीतरी ऐकले असावे. शेवटी सर्वांनी शिर्डीला बाबांचे दर्शन घेऊन तेथून मुंबईच्या परतीच्या प्रवासास निघावे असे  ठरले. 

फॅक्टरीचे मालक नाशिकमध्येच मुक्काम करणार होते. आम्ही सर्वांनीच एक दिवस त्यांचे सोबत नाशिकमध्ये राहून संध्याकाळी एकत्र भोजन घ्यावे व दुसरे दिवशी सकाळी मुंबईस निघावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र सिंगापूरची मंडळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विमानाने  निघणार होती त्यामुळे मुंबईतच रात्रीचा मुक्काम बरा असा साहजिक त्यांचा बेत होता. मात्र शेवटी नियतीच्या मनात असते तेच होते..

  श्री साईनाथ देवालय परिसर व बाबांची पावन मूर्ती.

  शिर्डीस गेलो. बाबांचे दर्शन विनासायास झाले. मधला दिवस व दुपारची वेळ असल्याने गर्दी नव्हती. एक गोरा पाव्हणा असल्याने साहजिकच पुजाऱ्यांनी विशेष अगत्य दाखविले. पाहुण्यांने डॉलर मध्ये भरघोस देणगी दानपेटीत टाकली. दिलेला प्रसाद सर्वांनी घेतला. पुजाऱ्यांनी  गोर्‍या पाहुण्याला दिलेला बाबांच्या गळ्यातला हार पाहुण्यांनी माझ्या हातात दिला. म्हणाले, “Mr Raut, keep it with you”

मलाच त्यांनी तो हार दिला का याचे मला आश्चर्य वाटले व आनंदही झाला. शुभ संकेत वाटला…

    दुपारी  चारच्या सुमारास आम्ही शिर्डीहून निघालो. मी पुढे ड्रायव्हरचे डाव्या बाजूस बसलो होत. बाबांच्या प्रसादाचा हार मागील सीटवर काचेच्या खाली बोर्डवर ठेवला होता.

    प्रवास सुरू झाला. संध्याकाळ झाली नव्हती तरी नव्हेंबर महिन्याचे दिवस असल्याने संधी प्रकाश जाणवू लागला होता. दिवसभराचे काम, प्रवास त्यामुळे सगळेच थकले होते. निवांतपणे सीटवर डोके टेकऊन शांतपणे पडले होते. बाहेरील अंधुक प्रकाश व काचेच्या धुरकट रंगाच्या खिडक्या, त्यामुळे अंधार अधिकच जाणवत होता. शांतता  होती. सकाळी गाडीत भरपूर चर्चा झाली होती. आता मात्र सगळे शांत होते. संध्याकाळ व्हायला अजून उशीर होता. पाहुण्यांना त्यांच्या या भारत भेटीतील अनुभवाबाबत  काहीतरी विचारले. पाहुणेही थोडक्यात उत्तरे देत होते. सर्व कामे आता झाली, असा निश्वास टाकीत होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ही मंडळी सिंगापूरला परत जाणार होती. जेव्हा सुमारे दोन-तीन महिन्यानंतर ही उत्पादने आम्ही मुंबई कारखान्यात बनविणार होतो, त्यावेळी उत्पादने प्रत्यक्ष तयार होताना पाहणीसाठी, ही मंडळी  पुन्हा मुंबईत येणार होती. त्या दरम्यान आम्हाला आमचा प्लान्ट  त्यांच्या सूचना अनुसार सुसज्ज करावयाचा होता. आमच्या माजगाव कारखान्यात एस्सोच्या  सूचनेप्रमाणे ऊत्पादन विभागात काही बदलही होणार होते.

       सुमारे सहाचे सुमारास आम्ही नाशिक शहराच्या बाहेर येऊन नाशिक मुंबई हायवेला लागलो. गाडी वेगात जाऊ लागली. नाशिकची द्राक्षे खाता खाता मागे बसलेल्या तिघांचा  डोळा लागला होता. मी मात्र का कोण जाणे जाणीवपूर्वक जागा होतो. गाडी-कार प्रवासात मी एक पथ्य नेहमी पाळले आहे. शक्यतोवर ड्रायव्हरच्या जवळ बसावे व ड्रायव्हरला झोप येणार नाही याची काळजी घेण्यासाठी मधून मधून गप्पा मारीत राहावे. मग प्रवास दिवसाचा असो वा रात्रीचा! ड्रायव्हर चांगला होता. रस्ता त्याच्या नेहमीचा होता. माझे त्याच्याशी अधून मधून संभाषण  चालू होते.

     हायवेवर पांडव गुंफांच्या जवळ घाट रस्ता लागतो. घाटातून गाडी जात असताना आजूबाजूचे सौंदर्य पाहत होतो. रस्ता चांगला होता. चढण होती. रस्त्याच्या डावीकडील बाजूस दरी  दिसत होती. वर जाणारा रस्ता, डावीकडे डोंगर, मध्ये थोडी दरी. त्यामुळे वर जाणाऱ्या वाहनाला काळजीपूर्वक हाकावे  लागते. थोडीशी चूक झाल्यास गाडी दरीत घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. समोरील येणारी वाहने वरून खाली येत असल्याने अर्थातच वेगात असतात, वर जाणारे वाहन कमी वेगात असते. मध्ये डिव्हायडर नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा थोडा जरी धक्का लागला तरी लहान गाडी वेगाने दरीत कोसळू शकते. समोरून येणारी वाहने, बाजूची दरी व धोक्याची वळणे सांभाळीत ड्रायव्हर सुरक्षितपणे गाडी चालवित होता.हा रस्ता तसा ड्रायव्हिंग साठी बिकटच आहे. मात्र ड्रायव्हरसाठी हा नेहमीचा रस्ता असल्याने त्याला आत्मविश्वास होता.  सर्व अवधाने सांभाळीत गाडी  चढण चढत होती. मी सर्व पाहत होतो. माझे लक्ष समोर, बाजूला होतेच. मागची मंडळी आता निद्रेच्या आधीन झाली होती. आमची गाडी डावीकडून आपल्या मार्गीकेतून व्यवस्थित पुढे जात होती. पुढे असलेले वळण दिसत होते. समोरून येणारा एक भरलेला ट्रक  पाहून माझ्या हृदयाचा एक ठोका चुकला..हा ट्रक  आपला मार्ग थोडा बदलून त्याच्या उजवीकडच्या बाजूने सरकला होता…डिव्हायडर नसल्याने त्या ट्रक ड्रायव्हरने आपल्यासमोरील ट्रकला मागे टाकण्यासाठी, ही चाल केली होती… आपला रस्ता सोडून आमच्या बाजूला येत होता.. मी पहात होतो.. ड्रायव्हरला आपली गाडी डावीकडे घे, असे ओरडून बोलावेसे वाटत होते परंतु ते शब्द तोंडातून येण्याच्या आतच आमच्या ड्रायव्हरने गाडी डावीकडे घेण्याचा प्रयत्न केलेला होता.. त्याला किंचित उशीर झाला होता.. आमच्या ड्रायव्हरला ते समजण्यास थोडा उशीर झाला.. पुढे वळण असल्याने  त्याला पुढचे दृश्य दिसले नव्हते..

आम्हाला काही समजण्याचे आधीच आमची किंचित डावीकडे आलेली गाडी वळणावर उभ्या असलेल्या ट्रकच्या  प्लॅटफॉर्म खाली गेली होती…हा ट्रक लोखंडी सळ्या व पट्ट्यांनी भरलेला असल्यामुळे आमच्या गाडीच्या विंडशिल्ड, पुढच्या काचेचा चक्काचुर झाला होता ..त्या लोखंडी धारदार सळ्या पुढे घुसून माझ्या छातीचा वेध घेण्या आधी केवळ दोन-तीन इंचावर थांबल्या होत्या….

    मी व ड्रायव्हर समोरील लोखंडी सळ्या व जाम झालेले दरवाजे यामुळे जागेवरून हलू शकत नव्हतो… आम्हा दोघांनाही कोणतीच इजा झालेली नव्हती .. सुखरूप होतो मात्र माझ्या हनुवटी खालून रक्ताची धार लागली होती .. माझे कपडे रक्ताने भरले होते… सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे साईबाबांच्या गळ्यातील हार मागच्या भागातून उडून माझ्या मांडीवर पडला आहे व त्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक होत होता… मी व ड्रायव्हर एकमेकांकडे पहात हे काय चालले आहे, काय झाले आहे, हे समजण्याच्या पलीकडे गेलो होतो …

   मागे बसलेले आमचे तीन सहकारी अगदी सुस्थितीत होते. मागील दरवाजे उघडून ते बाहेर पडले होते. पुढील आसनावरील आम्ही दोघे हालत नसल्याने आमचे पाय निश्चितच फ्रॅक्चर झाले आहेत अशी त्यांची कल्पना झाली असावी.

      आमच्या सहकाऱ्यांनी बाजूला रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हात करून काही लोकांना मदतीची विनंती केली होती, लोकांनीआमची गाडी ट्रकच्या खालून काढली व समोरील दरवाजे कसेतरी उघडले ..इंजिन नादुरुस्त झाल्यामुळे गाडी चालविणे शक्यच नव्हते.! माझ्या अंगावर पडलेले रक्त हे हननवटीला झालेल्या जखमेमुळे होते बाकी कोणतीही इजा झाली नव्हती, पाय शाबूत  होते, हे पाहून सहकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला! 

     यादरम्यान ड्रायव्हरने आपल्या मालकांना नाशिकला फोन करून झालेली हकीकत कळविली होती. अगदी थोड्या अवधीत सुसज्ज ॲम्बुलन्स डॉक्टरांचे सहित आली. मला घेऊन  हॉस्पिटल कडे रवाना झाली. त्यादरम्यान पोलीसांची गाडीही तेथे पोहोचली होती. सर्व सोपस्कार होणार होते. 

    मी हळूहळू भांबावलेल्या स्थितीतून बाहेर येत होतो. प्राथमिक तपासणी व काही प्रश्नोत्तरे होऊन मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले. गाडीची समोरील काच जोरदार धक्क्यामुळे फुटून उडालेल्या काही धारदार तुकड्यातील एक तुकडा माझ्या हनुवटीत खोलवर रुतला होता .त्यामुळे रक्ताची धार लागली होती . गंमत म्हणजे मला तेथे कोणताही दुखावा होत नव्हता. मात्र त्वरित काढणे आवश्यक होते. विधिवत लोकल अनेस्थेशिया देऊन काच-तुकडा काढण्यात आला. त्यावर मलम पट्टी करून तासाभरात मला मोकळे करण्यात आले.

   अर्थातच आता मुंबईस निघणे शक्य नव्हते. आम्ही नाशिक मध्ये मुक्काम केला. आमच्या वेंडरनी दुपारी केलेली नाशिक मध्ये राहण्याची विनंती मान्य केली असती तर कदाचित हा प्रसंग उद्भवला नसता. या वेळी सर्वजण मजेत भोजनाचा आस्वाद घेत असतो. पण.. होणारे कधी चुकत नसते हेच खरे!!

    दुसऱ्या दिवशी पहाटेस निघण्याचे ठरविले. सर्वांनी आपापल्या घरी फोन करून, ’ कामामुळे रात्री राहावे लागत आहे. उद्या सकाळी परत येऊ.‘ असे खोटेच सांगितले. नाशिकच्या घाटात कारला अपघात झाला म्हणजे काय झाले याची कल्पना घरच्यांना येते, खूप काळजी वाटते, म्हणून असे खोटे बोलावे लागले.

  घरी आल्यावर माझे रक्ताने भरलेले कपडे पाहून सर्वांना धक्का बसला. मात्र आम्ही परत आलेलो पाहून सर्वांना हायसे वाटले! सर्व रामायण सविस्तरपणे सांगितले.

     आमचे परदेशी मित्र सिंगापूरला परत गेले. पुढे कित्येक दिवस त्यांच्या पत्रांतून आम्ही ज्या नाट्यमयरित्या त्या दिवशीच्या प्रसंगातून सहीसलामत सुटलो होतो त्याची आठवण करून देत होते. सर्वांनाच तो एक जबरदस्त मानसिक धक्का होता. शारीरिक इजा झाली नसली तरी ती आठवण सर्वांना कायमची राहिली. विशेषता आमचा अमेरिकन मित्र प्रत्येक पत्रात मला “थँक्स् गाॅड..” असे परमेश्वराचे आभार मानत मला ’पुढील प्रवासात काळजी घेत जा..’ असा सल्ला देत राहिला !! 

 हाच तो परिसर. त्याच प्रकारे झालेलाअपघात. जुन्या आठवणी चाळवल्या!

    हा लेख लिहित असताना परवाच पेपरात वाचलेल्या ताज्या बातमीचे कात्रण  मुद्दाम या लेखात देत आहे. नाशिक-मुंबई घाट रस्त्यावर त्याच पांडवलेण्याच्या परिसरात हा अपघात झाला. लोखंडी सळ्या भरलेला  ट्रक-टेम्पो यांची टक्कर होऊन छातीत सळ्या घुसून पाच लोकांचा दुर्दैवी अंत  झाला आहे .…!! 

  ही बातमी वाचताच मलाही क्षणात भूतकाळातील तो अपघातग्रस्त दिवस आठवला. मी गाडीत पुढे  बसलो आहे….समोरची काच फुटून शिरलेल्या लोखंडी सळ्या केवळ काही इंचावर थांबल्या  आहेत… साईनाथांच्या गळ्यातील हार माझ्या मांडीवर असून त्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक होतो आहे! मी हलू शकत नाही, बोलू शकत नाही त्यामुळे माझे बाहेर ऊभे असलेले मित्र मला हाका मारीत माझ्या चेतना अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मी पूर्णपणे शुद्धीत असून माझे मन मलाच समजवण्याचा प्रयत्न करत आहे…

  “ हो तू सुखरूप आहेस, तू व्यवस्थित आहेस..”!!

   आज तो दिवस आठवण मी मलाच विचारतो. “अरे त्या दिवशी शिर्डीला जाऊन बाबांनी बाबांचे दर्शन घेतले नसते तर? गाडीच्या ड्रायव्हरने ब्रेक लावण्यास सेकंद भर जरी उशीर केला असता तर? तो धारदार काचेचा तुकडा हनुवटी ऐवजी डोळ्यात शिरला असता तर? मलाही माझ्या सहप्रवाशाप्रमाणेच  पुढे बसून डुलकी लागली असती तर? या प्रश्नांची उत्तरे आजही मिळाली नाहीत!

    जीवावर बेतले होते पण हनुवटीवर निभावले!

  शेवटी श्रद्धा आणि सबुरी म्हणजे तरी काय? जी गोष्ट आपोआप होणार त्यासाठी विनाकारण कष्ट करू नका, अस्वस्थ होऊ नका, काही कर्मे श्रद्धेने करावीच लागतात ती करण्यासाठी वेळ लागेल धीर धरावा लागेल पण श्रद्धा सोडू नका… नियती समोर मानवी शक्ती खूपच अत्यल्प आहे! बाबांच्या “श्रद्धा-सबुरीवर” माझा विश्वास आता अधिक दृढ  झाला आहे!!