देवा घरचे ज्ञात कुणाला?…
लेखांक 4

खेळ कुणाला दैवाचा कळला? हे त्रिवार सत्य आहे. कोणाला कोणत्या प्रसंगी त्याचा प्रत्यय येईल काहीच कळत नाही. आयुष्याचा हा खेळ खेळताना प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. उद्या काय घडणार आहे हे जर आपल्याला आज कळले असते तर उद्याला कसे तोंड द्यावे याचे आपण व्यवस्थित प्लॅनिंग करू शकले असतो. पण तसे कधीच घडत नाही काही कळत नाही व कधीच कोणाला कळणारही नाही. हीच तर आहे आयुष्याची खरी रंगत! भविष्य अदृश्य आहे म्हणून त्याची वाट पाहण्यात उत्सुकता आहे. जीवनात आशा नावाची एक सुखद भावना आहे.
घटना घडून जाते क्षणात ,आपण विचार करीत राहतो, आयुष्यभर…अरे हे कसे घडले? का घडले? असे घडले नसते तर.. तसे घडले असते तर…?
एखाद्या बिकट प्रसंगांतून आपण सही सलामत सुटलो तर त्याचा आनंद पुढे आठवणीतून घेत राहतो, ईतरांना देत राहतो… देवाचे आभार मानतो व काही विपरीत घडले तर नशिबाला दोष देत राहतो…
माझ्या देश परदेशातील अनेक प्रवासांत खाली देत असलेला एक जबरदस्त अनुभव! नियतीचा खेळ…
मध्य प्रदेशातील भोपाळ शहरास एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने ही भेट झाली. जवळच असलेल्या खजुराहोच्या प्राचीन प्रेक्षणीय मंदिरास भेट देण्याचा मोह अनावर झाला. भोपाळ-खजुराहो मार्गावर भिंड-मोरेनाच्या जंगल वाटेतून प्रवास करावा लागला. या प्रदेशाला ‘बिहड’ म्हणतात .वळणा वळणाच्या उंच सखल दऱ्याखोऱ्यातून जाणारा रस्ता म्हणजे बिहड . त्याकाळी तरी हे जंगल दरोडेखोरांचे नंदनवन होते . एक रात्र त्या बिहडात, घनघोर जंगलात राहण्याचा प्रसंग आला.ती रात्र वैऱ्याची होती, कसोटीची होती.. सुदैवानेच आम्ही बचावलो सही सलामत बाहेर आलो.. म्हणून तर हे लिहू शकलो!
तो 1974-75 कालखंड होता .आता नक्की दिवस महिने आठवत नाही. पावसाळ्याचे दिवस होते हे नक्की! मी एस्सो (ESSO )कंपनीच्या संशोधन विभागात काम करीत होतो. देशभर पसरलेल्या आमच्या ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करणे, सभा, संमेलनास हजेरी लावणे तसेच कंपनीच्या भारतभर पसरलेल्या रिजनल, झोनल ऑफिसना कामानिमित्त भेट देणे इत्यादींच्या निमित्ताने देशभर फिरत असे.
भारतीय मानक संस्था (आय एस आय) या सरकारी आस्थापनाशी आमचा नेहमीच जवळून संबंध येत असे. आमच्या पेट्रोलियम पदार्थांची मानके (Specifications) ठरविण्यासाठी वारंवार त्यांच्या दिल्ली ऑफिसात जावे लागे. भारत सरकारच्या या संस्थेत माझी काही उपसमित्यावर नेमणूक झाली होती. समितीच्या सभा बैठकांना दिल्ली व भारतातील इतर शहरात जावे लागे.
हा प्रसंग आम्ही भोपाळ येथील आय एस आय च्या एका वार्षिक स्नेहसंमेलनासाठी (Annual Conference) गेलो होतो तेव्हा घडलेला आहे . दरवर्षी भारतातील एखाद्या शहरी या कॉन्फरन्सेस होत असतात. ISI सभासद, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, उपकरण निर्माते(Equipment Manufacturers)प्रयोगशाळा व मोटर गाड्यांचे इंजिन निर्माते(OEMs)अधिकारी अशा चर्चासत्रात सहभागी होतात. आपापल्या क्षेत्रातील मानांकने, त्यासाठी करावयाच्या चाचण्या, लागणारी उपकरणे इत्यादी बाबत ज्या समस्या येतात त्यांची देवाणघेवाण करून कोणत्या सुधारणा करता येतील व अंतिमतः ग्राहकांना दर्जेदार माल कसा उपलब्ध करून देता येईल या उद्देशाने हे सर्व केले जाते. दिवसा काम होते व रात्री करमणूक पार्टी. कामासोबत करमणूक ही असल्याने वेगवेगळ्या कंपन्यांचे भारताच्या विविध भागातून आलेले हे प्रतिनिधी आपली व्यावसायिक मैत्री दृढ करतात.
पहिल्या दिवशी दुपारी सुरू होणारी ही कॉन्फरन्स दुसऱ्या दिवशी चहापानानंतर समाप्त होते.
1974-75 च्या सुमारास मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात झालेल्या त्या संमेलनास आमच्या कंपनीतर्फे मी व माझे वरिष्ठ श्री. भिडेसाहेब (यांच्या विषयी मी एक स्वतंत्र लेख लिहिला आहे) हजर होतो. माझ्या कंपनीतील हुद्याप्रमाणे (Grade), मला रेल्वेने जाणे भाग होते. भिडे साहेबांना विमानाने जाण्याची मुभा होती.भिडे साहेब इतर सर्वसामान्य वरिष्ठाप्रमाणे नव्हते. ते एक वेगळे व दिलदार व्यक्तिमत्व होते. लाखातून एक मिळणारा बाॅस!!
या कॉन्फरन्सला जाण्याआधी मी विमान प्रवास कधीच केला नव्हता, हे त्यांना माहीत होते. ते लक्षात घेऊनच, वरिष्ठांची खास परवानगी घेऊन मलाही, विशेष बाब म्हणून, विमान प्रवास करण्याची मुभा मिळवून दिली होती! मी विमानात बसण्याआधीच हवेत तरंगू लागलो होतो ! हा माझा आयुष्यातील पहिलाच विमान प्रवास होता!
आजही साहेबांच्या मनाच्या मोठेपणाचे अनेक प्रसंग आठवले की असे वरिष्ठ आपल्याला व्यवसाय-नोकरीच्या ठिकाणी मिळणे म्हणजे सदभाग्य,दैवयोग असे मला प्रामाणिकपणे वाटते.
आजवर देशांत व परदेशांतही अनेक विमान प्रवास झाले. भारतातील अगदी थोडे अपवाद वगळता,प्रत्येक विमानतळावर मी उतरलो आहे.तरी आयुष्यातला पहिला विमान प्रवास मी कधीच विसरणार नाही.आपले मानवी आयुष्यच तसे आहे..प्रत्येक ‘पहिल्या गोष्टीची’ आठवण माणसासाठी मोठी साठवण असते !
ही पहिली विमान सफर मुद्दाम लक्षात राहण्यास दुसरीही काही कारणे होती. खास सवलत मिळून कंपनीच्या खर्चाने मी प्रवास करीत होतो, आता उपयोगात नसलेली ‘फाॅक्कर फ्रेंडशिप’ सारख्या 25-30 प्रवासी क्षमता असलेल्या विमानाने ती ट्रीप केली होती आणि पहिल्यांदाच एका स्टार हॉटेलमध्ये राहण्याचे भाग्यही त्या प्रवासानंतर मिळाले.होती. .आणि पुढे जे काही रामायण घडले तेही याच प्रवासा दरम्यान …!
म्हणून ही सफर संस्मरणीय ठरली आहे!!
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी परदेशी तर सोडा पण आंतरदेशीय विमान प्रवास करणे मोठे कौतुकाचे व प्रतिष्ठेचे होते. फार थोडे लोक विमानाने प्रवास करीत. बहुतेक विमाने ‘फाॅक्कर फ्रेंडशिप’जातीची असत. या विमानाचे वेगळेपण म्हणजे ती छोटी, कमी उंचीवर उडणारी, थोड्या वाऱ्याच्या झोतानेही हलणारी अशी होतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असत.प्रवाशांची संख्या कमी असल्याने सर्व प्रवाशां साठी एकच हवाई सुंदरी असे व ती आस्थेवाईकपणे प्रवाशांची चौकशी करीत असे !
विमान प्रवासात खऱ्या अर्थाने आनंद घेण्याचे ते दिवस होते!
मुंबई विमानतळावरून सुमारे आठ वाजता आम्ही निघालो.भोपाळ विमानतळावर सकाळी दहाच्या सुमारास उतरल्यावर आमच्या स्वागतासाठी आमचे तेथील रिजनल मॅनेजर श्री. मुखर्जी विमानतळावर आले होते. आमची राहण्याची सोय श्री मुखर्जी यांनी दोन ठिकाणी केली होती. भिडे साहेबांना त्यांच्या दर्जाप्रमाणे आलिशान स्टार हॉटेलमध्ये बुकिंग होते तर मला एका साधारण लॉज मध्ये राहायचे होते. तेथेही भिडे साहेबांनी आपला अधिकार वापरून माझ्या हॉटेलचे बुकिंग रद्द करविले व मलाही त्यांचे बरोबर आलिशान हॉटेलात घेऊन गेले . तेथे एक ज्यादा काॅट टाकून माझी सोय झाली होती. दोन रात्रींचा प्रश्न होता, मात्र आयुष्यात पहिल्यांदा तारांकित व्यवस्था कशी असते त्याचा उपभोग मी त्यावेळी घेतला ,पहिल्यांदाच!! एका अमेरिकन कंपनीने निवडलेले ते हॉटेल होते. भिडे साहेबांचे ते वागणे माझ्या हृदयाला स्पर्श करून गेले. खरे तर भिडे साहेबांची ख्याती ही कंपनीत रोखठोक बोलणारे व प्रसंगी आपल्या वरिष्ठांची ही पर्वा न करता आपल्याला योग्य वाटते ते सांगणारे ऑफिसर, अशी होती. त्यांचे जवळचे मित्र त्यांना भिडे ऐवजी’ भिडा’ असे म्हणत. त्याचा अर्थच होता, “आता जा आणि तुमच्या वरीष्ठांना भिडा, त्यांच्याशी वाग्युद्ध करा..”.माझे बाबत ते खूप प्रेमळपणे वागत. एक माणूस म्हणूनही ते खूप मोठे होते. दिलदार, मोठ्या मनाचा माणूस.आपल्या कामात देखील अत्यंत चोख व जाणकार. म्हणूनच त्यांच्या आठवणी आजही जीवंत आहेत.
हॉटेललात भोजन घेऊन दुपारी मी व भिडे साहेब कॉन्फरन्सच्या जागी गेलो. ते एक भव्य पटांगण होते. सुंदर कापडी मंडप तयार केला होता. केंद्रीय मंत्री उद्घाटनासाठी येणार होते ना?
ऑगस्ट महिन्याचे दिवस असावेत.. या दरम्यान भोपाळमध्ये तेवढा पाऊस नसतो . दुर्दैवाने त्या दिवशी सोसाट्याचे वारे व मधून मधून पाऊसही येत होता. सर्व पाहुणे मंडपात बसले होते व समोरच मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून आलेले श्री. सेठी हे तत्कालीन केंद्रीय मंत्री महोदय व इतर वरिष्ठ मंडळी विराजमान झाली होती .कॉन्फरन्स सुरू झाली.. ..अध्यक्ष मंत्री महोदयांचे भाषणास सुरुवात झाली आणि वारेही जोरात वाहू लागले ..मंडपाचे खांब गदगदा हलताना दिसू लागले ..सुदैवाने आम्ही दोघे,कोणत्यातरी आतील संवेदनेने, मंडपाच्या कडेस बसलो होतो …. वारे थांबेतना, कुजबुज सुरू होती, वाऱ्याच्या घों घों.. अशा आवाजामुळे मंत्रीमहोदयांच्या भाषणाकडे कोणाचे लक्ष नव्हते. वारेही थांबत नव्हते …बघता बघता …एक वाऱ्याचा जोरदार झोत आला आणि मंडपाचे बहुतेक सगळे खांब एकाच वेळी उन्मळून पडले..तो भव्य मंडप व कापडी आवरण खाली आले .खाली बसलेली मंडळी कापडी आवरणाखाली झाकली गेली. आम्ही कडेला असल्याने त्वरित बाहेर आलो . कापडाखाली झाकले गेलेल्या लोकांचे सुटकेसाठी विलक्षण केविलवाणे प्रयत्न चालू होते . ते तंबूचे कापड भिजल्याने आणिकच जड झाले होते .विशेषतः स्त्रिया व वृद्ध यांचे तर आकांत चालू होते .काही स्वयंसेवक मंडळी लोकांना हात देऊन बाजूला खेचत होती. खरेच ते सगळे दृश्य आठवले म्हणजे आजही अंगाचा थरकाप होतो … व हसूही येते!
मंत्री महोदय तर कधीच तिथून निघून पसार झाले होते. मंडप रिकामी झाला होता .स्टेज रिकामी झाले होते. सुदैवाने थोड्या लोकांना काही किरकोळ दुखापती होऊन सर्व अरिष्ट निभावले. पहिल्या दिवशीच्या कामाचा बोजवारा उडाला होता. आम्ही भिजलेल्या अवस्थेत हॉटेलवर आलो. देवाचे आभार मानले .
दुसऱ्या दिवशीच्या पेपरात ही मोठी बातमी आली होती. आयोजकांवर भरपूर टीका झाली होती.
संध्याकाळी असलेल्या ‘रंगीन पार्टी’त संयोजकांनी खाण्यापिण्यासाठी भरपूर सोय करून झालेल्या चुकीची भरपाई करण्याचा प्रयत्न केला होता! ती संध्याकाळ खूप छान गेली.
दुसऱ्या दिवशी भिडे साहेबांनी त्यांचे मुंबईतील दोन मित्र श्री. पाटेकर व श्री. सेन, जे त्यांच्या कंपनीमार्फत कॉन्फरन्सला आले होते, यांच्याबरोबर जेवणानंतर खजुराहो लेणी पाहण्यासाठी निघण्याचे ठरविले होते. अर्थातच साहेब कॉन्फरन्सला दांडी मारणार तर मी तरी कशाला हजर राहू? मी देखील त्यांच्याबरोबर जाणार होतो. टॅक्सीत चारजण आरामशीर बसत होते.
भोपाळ-खजुराहो सुमारे चारशे किलोमीटरचा प्रवास टॅक्सीने चार साडेचार तासात होतो. आम्ही खजुराहोला संध्याकाळी साडेसहापर्यंत दिवसा पोहोचू असा अंदाज होता .
श्री. मुखर्जी येणार नव्हते कारण त्यांनी ही लेणी आधीच पाहिली होती. त्यांनी काही खास सूचना आम्हाला दिल्या होत्या. एक तर खजुराहो-भोपाळ हा रस्ता तेवढा ठीक नाही, शेवटचे बरेच अंतर गर्द रानातून व चंबळ खोऱ्यातून जात असून धोकादायक आहे .या वाटेवर रात्री प्रवास अजिबात करू नये, कारण डाकू व लुटारू यांचा वावर रात्री असल्याने लुटमार , हत्या होऊ शकते. थोड्या दिवसापूर्वीच असा एक डाका टाकून कारमधील लोकांना लुटले होते व मारहाण केली होती.
आम्ही वर्तमानपत्रात अधून मधून भिंड- मोरेना डाकूंच्या कथा ऐकत असू. विशेषतः तेथील कुपसिद्ध डाकू मानसिंग त्याच्या टोळ्यांनी त्या खोऱ्यात हाहाःकार उडविला होता. त्याला पोलिसांनी गोळ्या मारून ठार केले होते. त्या आधी त्याने एक दोन नव्हे तब्बल सुमारे दिडशे खून आणि कित्येक लोकांना लुटले होते. त्याच्या अनेक खऱ्या खोट्या दंतकथा भारतात प्रसिद्ध होत्या. आजही डाकू म्हटले की पहिले नाव मानसिंग हेच नजरेसमोर येते एवढी त्याची दहशत त्यावेळी होती. त्यानंतर त्याचा मुलगा पानसिंग तोमर याने ती सूत्रे हातात घेऊन धुमाकूळ घातला होता. हे डाकू पोलिसांच्या हाती लागत नव्हते, कारण त्यांना स्थानिक गरीब जनतेचा खूप पाठिंबा होता. सहानुभूती होती. ते चंबळचे ‘रॉबिन हूड’ होते. श्रीमंताकडून पैसे लुटत व गरिबांना पैसे वाटीत. मानसिंगच्या पत्नीवर व कुटुंबातील स्त्रियांवर गावातील काही सावकारांनी अत्याचार केले होते. त्याचा बदला म्हणून मानसिंगने हे खूनाचे सत्र सुरू केले होते. जो कोणी श्रीमंत प्रवासी, विशेषताः मोटर कारने प्रवास करणा-याना रात्री जंगलात गाठून त्यांच्याकडून पैसे जडजवाहिर लुटत व विरोध केला तर प्रसंगी त्यांचा खातमाही करीत.. आम्ही जोखीम घेतली होती हे खरे.
सुमारे एक वाजताच्या सुमारास भोजन करून भोपाळहून निघालो. दोन-तीन तासानंतर प्रसिद्ध सागर युनिव्हर्सिटीचा परिसर लागला. भिडे साहेबांनी एका मित्राच्या मुलाला तेथे भेटण्याचे कबूल केले होते. त्यामुळे आम्ही थोडा वेळ तेथे थांबलो. बाहेरूनच युनिव्हर्सिटीचा परिसर पाहिला. हा तासाभराचा वेळ पुढे किती किमती ठरला ते पुढे येईलच..
तो अर्धा पाऊण तास खूपच महत्त्वाचा ठरला. कारण पुढील रस्ता अगदीच खाचखळग्यांचा व बिकट होता. गाडी खूपच हळू जात होती. खजुराहोपासून सुमारे 30-35 किलोमीटरवर चक्क अंधार वाटू लागला. सायंकाळ झाली होती व निबीड अरण्यातील घनदाट वृक्षराजी भीतीदायक वाटत होती. पुढे सुदैवाने त्या निर्जन वाटेवर लहान झोपड्यांची वस्ती दिसली. वनवासी लोक होते. त्यांनी आम्हास रस्त्यात उभे राहून आडवा हात केला. आमची गाडी थांबविली..आम्ही घाबरलो होतो. मात्र त्यांचा चेहरा, अर्धनग्न अवस्था पाहून त्यांची दयाही आली. त्यांनी मोडक्या तोडक्या हिंदीत आम्हाला, पुढे प्रवास न करण्याची विनंती केली. कारण पुढे अरण्य आहे,रस्ताही खराब आहे व काही दिवसापूर्वी त्या भागात लुटमार झाल्याचे सांगितले. ‘एक किलोमीटर अंतरावर एक लहान लॉज आहे तिकडे आपण राहू शकता’ अशीही माहिती दिली. अर्थातच त्यांचा सल्ला मानणे शहाणपणाचे होते. लॉजवर गेलो. अगदीच साधारण अशी खानावळ टाईप हाॅटेल होते. येथे फक्त राहण्याची सोय होती. खास विनंती केली तेव्हा पोळी भाजी मिळाली .एक खाट व भिंतीतील एक छोटे कपाट एवढाच सरंजाम होता. बाथरूमची सोयही बाहेरच्या अंगणात होती. त्यातील धोका तेव्हा तरी जाणवला नाही..
निर्जन जंगलात तेवढी सोय मिळाली हे परमेश्वरी वरदान होते, हे दुसऱ्या दिवशी कळले..
थकलेलो असल्याने मिळाली ती भाजी पोळी खाऊन आम्ही कधी निद्राधीन झालो ते कळलेच नाही.
पहाटेच्या थोडे आधी दारावर टकटक झाली म्हणून मी दाराच्या फटीतून पाहिले…साहेबांना जाग आली असावी व तेच असतील अशी अपेक्षा होती. मात्र फटीतून पाहतो तो सुसज्ज गणवेशात हातात बंदूकधारी सशस्त्र पोलीस दादा उभे होते.
हिंदी भाषेत त्यांनी मला “खोलीची झडती घ्यावयाची आहे …”असे फर्माविले. मी अर्धवट झोपेत होतो पण त्यांना पाहून झोप उडून गेली होती झडती घेण्याची भानगड कशासाठी ,मी काय गुन्हा केला हे प्रश्न विचारण्याआधीच त्यांनी माझ्या परवानगीची वाट न पाहता ते खोलीत शिरले.. खोलीतील सर्व अवस्था न्याहाळून, खाटेखाली नजर टाकीत “ठीक है “ असा सुस्कारा टाकीत बाहेर आले.
मला काहीच कळत नव्हते.. आजूबाजूला नजर टाकली तर भिडे साहेब व सहकारीही त्याच संभ्रमित अवस्थेत उभे होते.. बाहेर नजर गेली तर सबंध परिसराला पोलिसांनी वेढले होते .. कोणालाही बाहेर जाण्याची मुभा नव्हती . हा काय प्रकार होता? काहीच कळत नव्हते… थोड्याच वेळात सर्व उलगडा झाला..
काहीतरी गंभीर बाब आहे एवढे समजले होते.तासाभराने झाडाझडती झाल्यावर पोलिसांनी वेढा उठविला व हॉटेल बाहेर जाण्याची परवानगी दिली. पोलीसांनी सांगितलेली हकीकत अशी ..
आम्ही थांबलो ते ठिकाण छत्तरपूर या मुख्य शहरापासून दहा-पंधरा किलोमीटरवर निबीड जंगलात होते. त्या बिहडात मानसिंग डाकूचा उत्तराधिकारी पानसिंग तोमर व टोळीचा वावर होता. त्या विशिष्ट दिवशी,’ही टोळी परिसरात लपली आहे’ अशी खबर पोलिसांना खात्रीच्या खबऱ्याकडून मिळाली होती . पोलिसांच्या एका शस्त्रधारी पलटणीने रात्री जंगलात मुक्काम ठोकून विविध भागात टेहळणी सुरू केली होती. ‘शूट ॲट साईट ..’ म्हणजे “दिसेल त्याला गोळी घाला.” हाच त्यांना वरून आदेश होता.रात्री काही लोक संशयास्पद रितीने पळताना पाहून त्यांनी गोळीबार केला होता .आमच्याच लाॅजमधील एक प्रवासी पहाटे टॉयलेटला जाण्यासाठी तेथे बाहेरआल्याने पोलिसांनी संशयावरून त्या निष्पाप माणसालाही गोळी घातली होती. दोन गुंड व आमचा एक सहप्रवासी गारद झाले होते. त्यांची प्रेते लाॅजपासून थोड्याच अंतरावर झाकून ठेवली होती. पानसिंग न मिळाल्यामुळे सर्व आजूबाजूच्या वस्तीत, जंगलात, झाडाझडती सुरू केली होती. आमच्या लॉजवरही धाड पडली होती.
ते सर्व ऐकल्यावर आम्हा सर्वांच्या अंगावर शहारे आले….
काल संध्याकाळी घडलेला तो प्रसंग आठवला. रस्त्यामध्ये उभे राहून गावकऱ्यांनी थांबवलेली आमची गाडी.. लॉज मध्ये राहण्याचा आमचा निर्णय .. कर्म धर्म संयोगाने पहाटेच्या वेळी टॉयलेटसाठी किंवा आणखी कशासाठी बाहेर पडलो नाही हा योगायोग.. आता थोडेच अंतर राहिले आहे म्हणून गाडी पुढे दमटली असती अथवा ही लॉज मिळाली नसती, सवयीप्रमाणे पहाटे फिरावयास बाहेर पडलो असतो…. अनेक प्रश्नांनी डोक्यात थैमान घातले. शेवटी या मोठ्या गंडांतरांतून सुखरूप बाहेर आलो या जाणिवेने परमेश्वराचे सर्वांनीच मनःपूर्वक आभार मानले.. . . सारेच अतर्क्य होते.. मात्र सर्वांचे दैव बलवत्तर होते.
दुसऱ्या दिवशी आम्ही खजुराहोची अप्रतिम कोरीव लेणी असलेली मंदिरे पाहिली. पत्थरातले जिवंत काव्य आज हजारो वर्षानंतर ही तसेच चीरतरुण आहे. चंदेल राजवंशीय राजांनी या कोरीवलेण्यात जैन आणि हिंदू धर्मग्रंथातील अनेक प्रसंग जीवंत केले आहेत. लेणी पहात होतो पण मन कालच्या त्या भयानक रात्रीतच गुंतले होते. डोळ्यासमोर सफेद कापडात गुंडाळून ठेवलेले ते तीन मुडदे दिसत होते.. आमच्यासमोर एक अनुपम खजिना उलगडत होता ..तरी अस्वस्थता जात नव्हती . नजरेसमोर मैथून शिल्पे होती पण मन:चक्षुपुढे त्या निष्पाप सहप्रवाशाचे दुर्दैवी कुटुंब दिसत होते .आम्ही सहीसलामत बाहेर आलो होतो, ही दैवी कृपा होती.!
खजुराहोची जगप्रसिद्ध मंदिरे पाहण्यासाठी निघालो होतो आणि काय काय पहावे लागले.?
आयुष्यात असे अनेकदा घडत असते. आनंदाने उत्सुकतेने आपण एखादे काम करण्यास अथवा प्रवासास निघतो, आणि आलेले अनुभव पाहून, ”करायला गेलो काय आणि उलटे झाले पाय ..”
अशी स्थिती होते .अशी संकटे आयुष्यात येणार व त्यांचे आव्हान स्वीकारावे लागणार… कारण त्यामुळेच आयुष्याच्या प्रवासालाही एक गंमत येते, आत्मविश्वास वाढतो जो पुढील वाटचालीसाठी पथदर्शक असतो!