गौड बंगाल

                                            लेखांक 5

‘गौडबंगाल‘ या शब्दाचा संबंध जादूटोणा, तंत्रमंत्र, गारुड यांच्याशी संबंधित आहे. एखाद्या गोष्टीवर खूप विचार केल्यानंतरही अर्थ लागत नाही तेव्हा आपण हे काय गौडबंगाल आहे, असे म्हणतो. एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाने सहजपणे नकळत धोक्यात आणणारी गोष्ट आपण करून जातो आणि मग विचार करतो…अरे त्याने माझ्यावर असे कोणते गारुड केले … साधा विचारही मी त्यावेळी का केला नाही …मला भुरळ घातली होती का??

  जादूटोणा करण्याची विद्या बंगाल-आसाम या भागात पूर्वी खूप प्रचलित होती.अजूनही काही प्रमाणात अशी विद्या तेथे आहे असे म्हणतात!

     आपल्या नेहमीच्या आयुष्यात कधीतरी अशा समजणाऱ्या कार्यकारण भाव न कळणाऱ्या गोष्टी घडत असतात. आपण त्यावेळी  ”काय गौडबंगाल आहे कळत नाही..” एवढे बोलून विसरून जातो. मात्र कधी कधी अशा गोष्टीचा उलगडा आयुष्यात पुढेही करण्याचा प्रयत्न करीत असतो.

अशीच ही एक गोष्ट.. बांगलादेशमध्ये घडली म्हणून ‘गौडबंगाली‘!!

   साधारणतः 1980 – 90 च्या दशकातील ही गोष्ट आहे .मी त्यावेळी कंपनीच्या  ‘आंतरराष्ट्रीय व्यापार‘ या विभागात प्रमुख म्हणून काम करीत होतो.

   व्यवसायानिमित्त आम्हाला बांगलादेशला भेट द्यावी लागली. त्या भेटीदरम्यान घडलेला हा प्रसंग .

   1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय सैन्याच्या अतुल पराक्रमामुळे  पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा उडाला व पूर्व बंगाल हा ‘बांगलादेश’ या नावाने नवीन देश जन्माला आला.

वंगबंधू बांगलादेशचे पहिले पंतप्रधान, शेख मुजिबूर रहमान.

शेख मुजिबूर रेहमान  या तत्कालीन भारत समर्थक नेत्याच्या हाती नवीन देशाची सूत्रे सोपवून भारताने एक नवा इतिहास निर्माण केला. 

    1990 साली भारताच्या आर्थिक धोरणात अमुलाग्र बदल केले गेले .निर्यात व्यापारविषयक धोरण बदलले. सरकारी कंपन्यांना देखील आपला  माल निर्यात करण्याची संधी मिळाली. या उपलब्ध संधीचा फायदा घेऊन आपणास कोणत्या प्रॉडक्ट्सची निर्यात जगात करता येईल याचा अभ्यास करण्याचे आमच्या वरिष्ठ मॅनेजमेंटने ठरविले.

 प्रथमतः आपल्या सीमेनजीक असलेले बांगलादेश, सिलोन, नेपाळ-भूतान या देशातील निर्यातीचा अभ्यास करण्याचे ठरले . त्यानुसार अजून पावेतो अस्तित्वात नसलेला ‘आंतरराष्ट्रीय व्यापार’(International Trade) हा नवीन विभाग आमच्या कंपनीत सुरू झाला .मी त्या विभागाचा प्रमुख असल्याने निर्यात वाढविण्याची जबाबदारी आमच्या टीमवर आली.

     बांगला देशात ‘ईस्टर्न रिफायनरीज लिमिटेड ‘ (ERL) ही सरकारी रिफायनरी असून तिचे त्यावेळी एकूण उत्पादन त्या देशाच्या एकूण  पेट्रोलियम पदार्थ (POL)मागणीची केवळ 40% पूर्तता करते असे चित्र होते. सुमारे 60 टक्के पेट्रोलियम पदार्थ (POL) या देशात चीन, मलेशिया, इंडोनेशिया, कोरिया, भारत या देशाकडून आयात केले जात होते.  भारतातून निर्यात होणाऱ्या सुमारे 15 टक्के मालात आमच्या कंपनीचा काही हिस्सा असावा, या दृष्टिकोनातून अभ्यास (Survey) सुरू होता .

    बांगलादेश पेट्रोलियम कार्पोरेशन(BPC) ही या देशाची प्रमुख पेट्रोलियम कंपनी असून आयात निर्यातीची सर्व धोरणे कंपनी ठरविते. BPC ही  देशाची पेट्रोलियम विषयक धोरणे  ठरविणारी सर्वोच्च सरकारी आस्थापन आहे. त्यावर बांगलादेश सरकारचे नियंत्रण आहे .यमुना ऑइल, पद्मा ऑइल व मेघना ऑइल कंपनी या बांगलादेश पेट्रोलियमच्या वितरण (Marketing) करणाऱ्या तीन प्रमुख  सरकारी  कंपन्या आहेत. त्या शिवायही या काही इतर प्रायव्हेट ऑइल कंपन्या बांगलादेशात कार्यरत आहेत .

  भारताकडून  निर्यात होणारा सर्वच माल  इंडियन ऑइल कार्पोरेशन या भारताच्या एक क्रमांकाच्या पेट्रोलियम कंपनीकडूनच होत होता. पहिल्या दिवसापासून ही कंपनी सरकारी मालकीची असून काही विशेष अधिकारामुळे त्यांना ही निर्यातीची संधी मिळाली होती. पूर्वी आमची Esso कंपनी देखील बांगलादेशला निर्यात करीत होती. मात्र पुढे राष्ट्रीयकरणाच्या कालखंडात सर्व निर्यात बंद झाली. नवीन मुक्त व्यापार(Free Trade) धोरणाचा फायदा घेत  निर्यात वाढविणे असाच आमच्या मॅनेजमेंटचा निर्धार होता. त्यासाठीच स्वतंत्र आंतरराष्ट्रीय व्यापार (International Trade) हा नवीन विभाग कंपनीने सुरू केला होता.

  माझे मित्र महेश  दामले, भारतातील विक्री व्यवस्थापन पहात  होते .आम्ही दोघांनी बांगलादेश ,नेपाळ व श्रीलंका या तीन देशात निर्यात सुरू करण्याच्या दृष्टीने एक सर्व्हे करून एक निष्कर्ष अहवाल(Survey Report) वरिष्ठ मॅनेजमेंटला सादर केला होता. तो मान्य झाल्यावरच आम्ही पुढची तयारी सुरू केली होती.

आता आम्हाला  सर्व  पूर्व तयारी करून या तीनही देशात प्रत्यक्ष निर्यात करून दाखवावयाची होती. आम्हा उभयतावर  ही मोठी संधी होती तशीच  जबाबदारीही  होती! 

      भारतातील सरकारी कंपनीला जर परदेशात निर्यात करून तेथे आपले डीलर- डिस्ट्रीब्यूटर जाळे (Marketing Network)  उभे करावयाचे असल्यास काही निश्चित  निकष आपल्या  केंद्रीय पेट्रोलियम खात्याने ठरविले आहेत.  त्यानुसार प्रथम आम्ही आमच्या भारताच्या बांगलादेशमधील वकिलातीशी पत्रव्यवहार करून आमचा निर्यात व तद्अनुषंगाने वितरक नेमण्याचा मानस कळविला. त्याकरिता त्यांना जरुरीची सर्व माहिती  पाठविली. त्यांचे अनुकूल मत मिळाल्यानंतर , दिल्ली येथील बांगलादेशच्या वकिलातीस भेट देऊन नेमके कोणते पेट्रोलियम प्रॉडक्ट्स  भारतातून बांगलादेशला पाठवू शकतो यांचा तपशील मिळविला. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या दृष्टीने आमचे पदार्थ येथे विकणे कितपत फायद्याचे ठरेल याचाही तपशील मिळविला . निर्यातीच्या दृष्टीने भारत व बांगलादेशातील काही व्यापार विषयक करारांचाही (Trade Treaty)अभ्यास अशावेळी करावा लागतो जेणेकरून आपल्या निर्यात मालास  करातून काही सवलती मिळतात.

  त्यानंतर भारतातील व बांगलादेशातील  काही प्रमुख वर्तमानपत्रात ’ वितरक नेमणे बाबत’ जाहिरात दिली. आम्हास चांगला प्रतिसाद मिळून सुमारे 15 अर्ज आमच्याकडे आले. त्यातून काही महत्त्वाच्या निकषांच्या चाळणीतून जे दहा अर्ज पात्र ठरले त्यांची बांगलादेशात जाऊन मुलाखत घेण्याचे ठरविले .बांगलादेशची राजधानी ढाका येथे प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलाविले.  वेळ, तारीख सर्व निश्चित झाल्यावर आम्ही परदेश प्रवासाची तयारी केली.

    आमच्या कंपनीला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पूर्वानुभव नसल्याने , कायदा व टॅक्स डिपार्टमेंटने (Law and Tax Dept)  याबाबतीत आम्हाला खूप सहाय्य केले. बांगलादेश, नेपाळ व श्रीलंका या तीन देशासाठी वेगळे वेगळे डीलरशिप करार, मसुदे तयार झाले. भारताचे या तीन शेजारी  देशांशी वेगवेगळे व्यापार धोरण (Trade Treaty) आहे त्यामुळे त्या सवलतींचा फायदा घेणे आवश्यक होते.

           ढाक्का येथे आलेल्या 15 इच्छुक उमेदवारांपैकी आम्हाला केवळ दोन वितरक नेमावयाचे होते .

आम्ही चार दिवसांचा बांगलादेश भेटीचा कार्यक्रम ठरविला. पहिल्या दिवशी  मुंबई ते कलकत्ता व कलकत्ता ते ढाका असा प्रवास करून संध्याकाळी ढाक्क्यात पोचणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व इच्छुक उमेदवारांना ढाक्क्यात  मुलाखतीसाठी बोलविले होते. त्याच दिवशी  दुपारी इच्छुकांच्या ढाक्यातील कार्यालयांची पाहणी करावयाची होती. तिसऱ्या दिवशी भल्या पहाटे  ढाक्का ते चितगांव असा प्रवास करून तेथील दोन उमेदवारांच्या कार्यालयांना भेट द्यावयाची होती. संध्याकाळी ढाक्क्यास परतून चौथे दिवशी या राजधानी शहरातील एक-दोन प्रेक्षणीय स्थळे पाहून  ढाक्का-कलकत्ता-मुंबई असा परतीचा प्रवास होता. चारही दिवस असा भरगच्च कार्यक्रम असल्याने कुठे दिरंगाई करून चालणार नव्हते.

      ठरल्या प्रमाणे आम्ही मुंबईहून निघून कलकत्त्यास आलो. आमच्या कंपनीचे ट्रान्झीट हाऊस डमडम विमानतळावर असल्याने कलकत्ता कार्यालयातील दोन सहकारी तेथे आले होते .भोजन करून दुपारचे 

कलकत्ता-ढाका (बिमान बांगलादेश एयरलाईन्स) विमान  पकडले. तासाभरात बांगलादेशच्या ‘शाह जलाल’ (ढाका) या विमानतळावर उतरलो . आंतरराष्ट्रीय वाहतूक करणारा हा बांगलादेशचा एकमेव विमानतळ आहे. विमानतळ खूपच छान   वाटला . मुंबईचा विमानतळ पाहिल्यानंतर येथे मोठे काय पहावयास मिळणार ही अपेक्षा होती ती खोटी ठरली!

  शाहा जलाल, आंतरराष्ट्रीय विमानतळ, ढाका.

    या विमानतळावर आम्हास एक सरप्राईज मिळाले.   आमचे एक इच्छुक उमेदवार मेजर जनरल( निवृत्त)  अब्बास हे प्रत्यक्ष आम्हास भेटण्यासाठी आपली स्वतःची गाडी घेऊन विमानासमोर उभे होते . विमानतळावरील या भागात (Tarmac)केवळ कर्मचाऱ्यांनाच प्रवेश असतो. त्यामुळे हे गृहस्थ येथे कसे याचे आम्हाला आश्चर्य वाटले.एवढेच नव्हे तर जनरल साहेबांनी आमचे बोर्डिंग पासेस आपल्या ड्रायव्हरला देऊन त्याला आमचे सामान  आणण्यास सांगितले. आम्हाला आपल्या आलिशान कारमध्ये बसण्यास सांगून स्वतः गाडी चालवीत विमानतळा बाहेर काढले .

    आम्हाला खूप आश्चर्य वाटले. त्याचा उलगडा त्यांनीच केला. जनरल साहेब बांगला देशातील लष्करात मेजर जनरल म्हणून निवृत्त झाल्यावर बांगलादेशचे राजदूत म्हणून दक्षिण अमेरिकेतील एका देशात काम करीत होते. नुकतेच तेथूनही निवृत्त झाले असल्याने त्यांना काही विशेष राजनैतिक अधिकार मिळाले होते . त्याचाच वापर करीत त्यांनी आम्हाला हा सन्मान दिला होता!

     जनरल साहेब आम्हा दोघांना ढाका क्लबमध्ये घेऊन आले. आमचे सामानही आमच्या मागेच आले. राहण्याची व उमेदवारांच्या इंटरव्ह्यूसाठी हीच जागा ठरली होती. या क्लबमध्ये  शिरतानाच त्याच्या भव्य, अलिशान स्वरूपाचे दर्शन झाले. हा क्लब  सामान्य तर नव्हे पण श्रीमंत लोकांकरिताही नाही. केवळ काही मोजक्या उच्चपदस्थ ,जेष्ठ राजकारणी व खानदानी श्रीमंतासाठीच आहे हे लक्षात आले.  अतिशय भारदस्त व आलिशान असा हा क्लब आहे. आम्हाला आमच्या रूममध्ये सोडून जनरल साहेब स्वागत कक्षात बसले. आतील सर्व रचना, बर्मा टीकवूडचे  फर्निचर, खाली पसरलेले उंची गालीचे, भिंतीवरील सुंदर पेंटिंग्ज, तसेच चांदीची कटलरी ,फ्रिजमध्ये उंची वाईन्स …हे सर्व आम्हाला थक्क करणारे होते! आम्हाला उगाच संकोचल्यासारखे वाटत होते. एवढ्या थाटाची सवयही नव्हती व जरुरीही नव्हती .फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षाही कितीतरी अधिक पटीने हे सर्व होते. आयुष्यातला हा देखील एक वेगळा अनुभव होता !

     ढाका क्लब ,आतील खानदानी व्यवस्था.

आम्ही फ्रेश होऊन लॉबीत आलो. जनरल साहेबांना पसंतीची पावती दिली.  एवढे कशासाठी असा प्रश्न केला ? ते हसायला लागले वर आम्हालाच प्रश्न केला,” आणि काही  संध्याकाळची सोय करू काय ? त्यांच्या बोलण्याचा रोख  कळून, दोन्ही हात जोडून त्यांना फक्त धन्यवाद दिले , नमस्कार केला!

    निवृत्त झाल्यावर व्यवसाय करावा म्हणून जनरलनी बांगलादेश पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून आमच्या कंपनीची डीलरशीप घेण्याचे ठरविले होते. दिल्लीच्या राजनैतिक वर्तुळात त्यांचा चांगला दबदबा होता. त्यामुळे त्यांची शिफारस दिल्लीतून आमच्या  चेअरमन साहेबाकडे  आली होती .तरीही  त्यांच्या एकूण सर्व व्यवस्थेची आमच्या निकषाप्रमाणे पाहणी करणे आवश्यक होते. त्यांचे कार्यालय ,गोडाऊन व एकूण व्यवस्थापन आम्हाला  समाधानकारक वाटले. जनरल साहेबांचा जावई झहीद अमेरिकेत केमिकल इंजिनियर पदवीप्राप्त होता. त्याला या पेट्रोलियम व्यवसायाचा निश्चितच  अनुभव होता.  त्याच्याच मार्फत ही डीलरशिप त्यांना चालवावयाची होती. आम्हालाही एकूण सर्व अभ्यास केल्यानंतर एक योग्य डीलर कंपनीस मिळेल असेच वाटले . अशा देशात धंद्याच्या ज्ञानापेक्षा त्याचा राजकारणात किती प्रभाव आहे हेही बघावे लागते.

   हा फौजी भाई तसा खूप दिलदार व रोखठोक होता . 

   “मी जरी दिल्ली तून शिफारस घेतली असली तरी तुम्ही तुमचे काम करा, योग्य वाटल्यासच माझ्या नावाची निवड करा” हे सांगण्यास त्यांनी कमी केले नाही. त्यांनी या बाबतीत कोणताही दबाव आमच्यावर  टाकला नाही. .

 संध्याकाळी  बांगलादेश पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष, बांगलादेश पेट्रोलियम कार्पोरेशनचे काही पदाधिकारी, बांगलादेश सरकारातील काही राजकारणी उच्चपदस्थ सरकारी नोकर, अशा बड्या लोकांना जेवणासाठी बोलावून त्यांच्याबरोबर आम्ही डिनर घेतले. तो सर्व थाटमाट व उच्चपदस्थांची मांदियाळी  पाहून आम्हालाच लाजल्यासारखे होत होते .एक वेगळा अनुभव मिळत होता.

       दुसऱ्या दिवशी उमेदवारांच्या मुलाखतीसाठी याच क्लबची एक खोली मिळाली होती.  मुलाखतीसाठी बोलावलेले सर्व उमेदवार आले होते. जनरल साहेबांच्या कंपनीच्या वतीने त्यांचा जावई झहीर रीतसर मुलाखतीस आला होता. त्याला धंद्याचे ज्ञान होते मात्र प्रत्यक्ष हा वंगण विक्रीचा व्यवसाय त्याने केलेला नव्हता. गृहस्थ हुशार वाटला .त्यांच्यासह आणखीन चार नावे आम्ही शॉर्टलिस्ट केली.

     दुपारी मुलाखती संपल्या. संध्याकाळी थोडे ढाक्का दर्शन केले. ढाक्यातील वंगबंधू भवन, जेथे शेख मुजिबूर रहमान यांचा खून झाला होता. ते त्यांचे घर व तेथील म्युझियम पाहिला. येथेच एका देशभक्ताचे त्याच्याच देशवासीयांनी गोळ्या घालून रक्त सांडले होते .जगात सच्च्या देशभक्तीला हाच न्याय मिळतो का ? चष्मा, त्यांनी लिहिलेले काही कागद, राजकीय वैयक्तिक जीवनातील अनेक प्रसंगांची छायाचित्रे , वापरातील काही वस्तू तेथे ठेवल्या होत्या. का कुणास ठाऊक त्या वास्तुत फिरताना एक प्रकारचे औदासिन्य वाटत होते. 

    ढाकेश्वरी मातेचे प्रसिद्ध हिंदू मंदिर, ढाका.

  येथील प्रसिद्ध नागेश्वरी मंदिर हे एक हिंदू धर्मस्थान ते पाहावयाचेच होते. एका मुस्लिम बहुल देशात अजूनही इतक्या सुंदर मंदिराची जतन होते हे पाहून आश्चर्य वाटले. या शहरात रस्त्याने फिरता फिरता आजूबाजूची दृश्य पाहताना  मोठी गंमत वाटली. दोन्ही बाजूला अनेक प्रकारची दुकाने लागली होती. विशेषता हस्त कौशल्याच्या वस्तू, कपडे, विविध प्रकारच्या बांगड्या, मातीची भांडी ,नकली दागिने  इत्यादी वस्तू खूपच स्वस्त दरात मिळत होत्या .

बुरीगंगा या नदीकाठी हे शहर वसले आहे. नदीकाठी फिरून परिसर पाहिला मात्र तिला’ बुरी’ का म्हणतात ते कळले नाही. बुरीगंगा  हे नाव धारण करताना ‘जसा गाव तसे नाव’असेच गंगेला वाटले असेल काय?

    तिसऱ्या दिवशी आम्हाला चितगावला जावयाचे होते. एका इच्छुक उमेदवाराचे कार्यालय व फॅक्टरी या शहरात होती .चितगाव हे बांगलादेशचे मुख्य बंदर असून तेथे जाण्यासाठी सकाळीच  ढाका विमानतळावरून विमान पकडले. तासाभरातच चितगांवला पोहोचलो.

  हे इच्छुक गृहस्थ स्वतः आम्हाला  विमानतळावर भेटण्यासाठी आले होते . त्यांच्याबरोबरच आम्ही कारमधून सुमारे तासभराचा प्रवास केला. अनायासे चितगाव बंदराचेही दर्शन घेतले. मोठे बंदर आहे . तेथे उभ्या असलेल्या एका बोटीमधील एक सामान भरलेला कंटेनर चोरांनी फोडला होता, रिकामा केला होता. काही माल अस्ताव्यस्त पडला होता. ते दृश्य आम्हाला खूपच विचित्र वाटले. आमची मनस्थिती  जाणून या गृहस्थांनी आपली स्वतःची तारीफ करीत सांगितले मी इकडचा ‘दादा’ आहे, माझ्या मालाला कोणीही काही हात लावू शकणार नाही ,याची मी तुम्हाला खात्री देतो. बढाया मारल्या. स्वतःची स्तुती करून घेतली. आम्हाला ते बंदरावरील दृश्य व या माणसाची आत्मश्लाघा  कुठेतरी खटकली.आम्ही काहीच बोललो नाही .

       कर्णफुली नदीवरील विशाल चितगाव बंदर.

   चितगाव हे बांगलादेशचे प्रमुख बंदर कर्णफुली या नदीवर बांधले आहे. देशाचा सुमारे 70 टक्के आयात निर्यात व्यापार येथून चालतो .त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मालाची चोरी व फुकट जाणारे घनद्रव्य पदार्थ गोळा करणे हा येथे लोकांचा उद्योग झाला आहे. अनेक माणसे बंदराच्या अवतीभवतीच्या भागात फिरताना दिसतात. उघडी नागडी असलेली ही माणसे, त्यात विशेषतः लहान मुलांचा भरणा अधिक होता .सरळ गटारात उतरून त्या घाणीत पडलेले तेल वा इतर पदार्थ हाताने बादली वा लहान डब्यात भरताना आपल्या स्वतःच्या शरीराची व आरोग्याची कोणतीच पर्वा ही लहान मुले करीत नव्हती. .दृश्य अतिशय केविलवाणे वाटते .आपल्याकडे मुंबई बंदर व तेल कंपन्यांच्या साठवणीच्या भागातही अशी दृश्ये दिसतात. मात्र येथे पहिल्यासारखा अत्यंत दुर्दैवी प्रकार कोठे पहावयास मिळेल असे वाटत नाही .

   अतीव श्रीमंती व टोकाची गरीबी, म्हणजे ढाका शहर,असे वाटते. “नरेची केला हीन नर…” हेच खरे!!

     एका मोठ्या महालासमोर गाडी थांबवून हे गृहस्थ शेजारील  विशाल शेडमध्ये आम्हाला घेऊन गेले .उत्पादन व पॅकिंग करण्याचे काम तिथे चालले होते. येथून एक फेरी मारली सर्व व्यवस्थित वाटत होते. त्यांच्या एअर कंडिशन्ड केबिनमध्ये आम्ही बसलो. कोल्ड्रिंक मागविली व आमच्या विषयाला हात घातला .

  तेवढ्यात हे गृहस्थ म्हणाले, अशा महत्त्वाच्या गोष्टी येथे नको. माझ्या वाड्यात निवांत बसून आपण चर्चा करू.

   आम्ही निमुटपणे त्यांच्या मागे चालू लागलो. चला, यांचे वाडे आंतून कसे आहेत ते तर पहावयास मिळेल, असे त्यावेळी वाटले असावे. पुढे येणाऱ्या प्रसंगाची यत्किंचितही कल्पना नव्हती!

            हाच तो चितगाव माफियाचा भव्य महाल!

   त्यांच्या भव्य महालाच्या त्या तटबंदीला एक दरवाजा होता व त्याला कुलूप लावले होते त्यांचा सुरक्षा रक्षक तेथे हजर होता .त्याने कुलूप काढले.पुढे चालत गेल्यावर महालाच्या मुख्य दरवाजालाही कुलूप दिसले. तेथे मात्र आम्हाला आश्चर्य वाटले. राहत्या घराला कुलूप, गृहस्थ म्हणाले सगळी फॅमिली बाहेर फिरावयास गेल्यामुळे सध्या येथे कोणी राहत नाही.  पुढे गेलो. लिफ्ट होती. आम्ही कुतूहलाने महाल आतून कसा दिसतो ते पाहत होतो. भव्य आणि सुंदर रंगीत भिंतीने सजवलेला तो जुना राजेशाही महाल  होता . श्रीमंतीची लक्षणे  मौजूद होती. मात्र बरेच वर्षात तेथे कोणी रहात नसावे  असे वाटत होते?  लिफ्ट मधून आम्ही दुसऱ्या मजल्यावर गेलो. तेथे असलेली कुलूप बंद खोली या गृहस्थांनीच  आपल्या किल्लीने उघडली . मुख्य दरवाजा बंद ..घराचा दरवाजा बंद .. ज्या कचेरीत चर्चा करणार ती खोली ही कुलूपबंद… काही ठीक वाटत नव्हते . त्यावेळी कोणताही संशय आला नाही, आता कोणती खास बातचीत करणार आहेत, त्याची उत्कंठा लागली!

   खोलीत प्रवेश करून आम्हाला खुर्चीवर बसण्यास सांगण्यात आले. पाहुण्यांसाठी दोन खुर्च्या व यजमानासाठी एक खुर्ची टेबल एवढाच सरंजाम तेथे होता. खुर्चीत बसण्याआधी त्यांनी मागील भव्य खिडकी उघडली. मानवी वसाहतीच्या कोणत्याच खुणा येथे नव्हत्या … समोर उघडलेल्या खिडकीतून केवळ गर्द झाडी दिसत होती! मनात कुठेतरी एक शंकेची पाल चुकचुकली… . येथेच बसून बोलण्यासारखे काय महत्वाचे  होते . शेड मधील एअर कंडिशन्ड खोलीतही आपण बसू शकलो असतो.. ? पण त्यावेळी ते विचारणे अप्रस्तुत वाटले.. .. 

 यजमान आम्हाला काय सांगणार याची उत्सुकता लागली!

     गृहस्थांनी तळमजल्यावरील त्या शेडमध्ये चाललेल्या उत्पादनाबद्दल माहिती दिली. आपले ग्राहक किती मोठे आहेत व आपला उद्योग किती भरभराटीत आहे ते सांगितले, हा धंदा मला वाढवावयाचा असून त्यासाठी आपल्या कंपनीची  डीलरशिप पाहिजे हे सांगितले, मी बांगलादेशमधील किती महत्त्वाचा माणूस आहे, मला मोठे राजकारणी ,पुढारी, गुंड कसे घाबरतात, हेही सांगण्यास कमी केले नाही.. त्यावेळी मात्र आम्हाला आपण योग्य ठिकाणी आहोत काय … आम्हाला ही माहिती देण्याचे कारण काय हे कळेना ..आम्ही आमचे संभाषण मुख्य मूळ मुद्द्यावर आणण्यासाठी त्यांना,” आपण या भागात आमचे ऑइल किती विकू शकाल..”, असा प्रश्न केला. 

       आमच्या प्रश्नाचा रोख ओळखून त्यांनी उलट आम्हाला प्रतिप्रश्न केला,

  “इतर उमेदवारांनी आपणास विक्रीचा काय अंदाज  दिला  आहे तो मला सांगा. तुम्ही सांगाल तेवढे ऑइल मी आपणास विकून देऊ शकतो.. अशी आमच्या प्रश्नाला बगल दिली !

 आमच्या प्रश्नाचे हे उत्तर नव्हते. ती बेफिकिरी होती. याची  जाणीव झाली.. कुठेतरी आपण भलत्या जागी आलो आहोत काय असे क्षणभर वाटून गेले.

   “त्याच्याशी तुमचा संबंध नाही, आपला अंदाज कळल्यास तुम्हाला डीलरशिप देण्याचा विचार करता येईल.. !” आम्ही धीर धरून म्हटले.

…. त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करीत होतो.. काही क्षण स्तब्धतेत गेले …

   उत्तर देण्याऐवजी गृहस्थांनी आमची नजर टाळीत टेबलाचा उजवा ड्रॉवर उघडला… त्यातून एक गावठी पिस्तूल (कट्टा) बाहेर काढले… त्यावर  फुंकर मारत ते टेबलावर ठेवले …. हिंदी सिनेमातील एखाद्या व्हीलन ॲक्शन मारतो तसे.. 

 आम्हाला काही उलगडा होईना.. निरव  शांतता होती…

   ..पिस्तूल हातात घेऊन ते मागे वळले ..उघड्या खिडकीतून त्यांनी पिस्तुलाचा एक जिवंत बार काढला.. सळसळत गोळी कोठे गेली दिसले नाही, मात्र पिस्तुलाच्या उघड्या तोंडातून येणारा धूर दिसला व त्याचा गंध नाकापर्यंत पोहोचला..मी  पहिल्यांदाच  पिस्तुलातून जीवंत गोळी कशी जाते हे आयुष्यात प्रथम पाहिले! 

   आता आमच्या मेंदूत भराभर चक्रे फिरू लागली.. आपण कोणत्या परिस्थितीत आहोत ..या सर्वाचा अर्थ काय .. आता  काय केले पाहिजे?.. भविष्याची जाणीव झाली होती…. खूप उशीर झाला होता.. मात्र कसे कोण जाणे आम्ही दोघांनी एकमेकाकडे एका निश्चयी नजरेने पाहत पटकन  बोलून गेलो …

    “ओके ओके..… ठीक आहे . आम्ही तुमचा विचार करतो, तुम्हाला जमेल तेवढे ऑईल विका..!!”

   हेच उत्तर त्यांना हवे होते  माणूस बेरकी होता.. त्याने त्वरीत पुढील प्रश्न केला..

  “ मग एग्रीमेंट आत्ताच करूया…!”

हा प्रश्नही बरोबर होता. कारण आपल्या निवासस्थानातून बाहेर पडल्यावर ही मंडळी आपल्याला ठेंगा दाखवणार हे त्याला कळत होते.

    आमच्यासाठी  त्या ठिकाणी करारावर सही करणे धोकेदायक होते. आमच्या नोकरीवरही ते बेतले असते. पण वेळ तशी आली होती.. जीवापेक्षा नोकरी गमावणे ठीक वाटले..!! 

   आणि कोणतेही आढेवेढे न घेता कोणत्याच प्रकारे चलाखी  न करता सरळ कराराचे ओरिजिनल कागद त्यांचे समोर ठेवले. त्यांनी सही केली. आम्ही दोघांनीही  कंपनी तर्फे  सह्या केल्या. मूळ प्रत कागद आमच्याकडे घेवून त्यांना दुसरी प्रत दिली. गृहस्थ ‘पहुॅची हुवी’ चीज होती . त्यांनी ओरिजिनल स्वतःसाठी ठेवली व प्रत आम्हाला दिली. आम्हीही  ती मुकाट्याने दिली. हे दुसरे संकट होते. खरे तर या करारावर सह्या करणे आमच्या डायरेक्टर साहेबांचा अधिकार असतो. आम्हाला नसलेला अधिकार आम्ही हातात घेतला होता. हे नियमबाह्य वर्तन होते…मूळ प्रत चोराला दिली होती. त्यावर जास्त विचार करणे त्यावेळी शक्यही नव्हते व आवश्यक ही नव्हते ! या भूत महालातून लवकरात लवकर कसे बाहेर जाता येईल याचाच विचार त्यावेळी मनात होता… तेथे काहीही होऊ शकत होते.

  आम्ही खुर्चीतून उठून  ‘खुदा हाफिज’  केला व मागे फिरतो तो यजमानांनी जेवणाचा आग्रह केला  म्हणाले,

   “आपण चितगाव मधील  एका उत्तम हॉटेलात लंच घेऊया . “

  आम्ही नम्रतापूर्वक नकार दिला. “परतीचे विमान पकडावयाचे आहे “असा बहाणा केला.

     मनात म्हटले ‘आपण केलेला पाहुणचार भरपूर आहे, त्याची आजन्म आठवण राहणार आहे.. परत जिवंत गेलो तर! “

    या बांगलादेशी पाहुणचारामुळे मुंबईत जाऊन सर्व निस्तरेपर्यंत आमची भूक-तहान हरवली होती !!

  गृहस्थ खरच धूर्त व बेरकी, इतका की आम्हाला विमानतळावर त्याच्या गाडी-ड्रायव्हर मार्फतच पाठविले.  आम्ही इतरत्र कोठे जाऊन या गोष्टीचा बभ्रा  करू नये वा पोलिसात जाऊन तक्रार करू नये ,असाच त्याचा विचार असावा त्यासाठी ही शेवटची  खबरदारी होती?

     आम्ही चितगाव विमानतळावर येऊन पोहोचलो. थंड एसी गाडीतून प्रवास व विमानतळावरील गारवा  तरी सारखा घाम निघत होता ..एका मोठ्या जीवघेण्या संकटातून बाहेर आलो होतो… याचे समाधान होते !

दुसऱ्या इच्छुक उमेदवाराचे कार्यालय व कारखाना आम्हास चितगावला पहावयाचा होता ते राहून गेले. जनरल साहेबांचे मत त्या उमेदवाराबाबत अनुकूल होते त्याचीही निवड केली.

     ढाका शहरातील एका रस्त्यावरील हे दृश्य

     फ्लाईटला बराच वेळ होता. आम्ही शांतपणे, त्वरित काय करावे याचा विचार केला. आमच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाशी संपर्क केला. आमचे वरीष्ठ व मार्केटिंग डायरेक्टर श्री. कपूर साहेब भले गृहस्थ होते. त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन आम्हाला कोणतीही दूषणे न देता शाबासकी दिली!

 “तुम्ही काळजी करू नका, काम आटोपून  मुंबईत या.. पुढील कारवाई करू. ढाक्यात गेल्यावर जनरल साहेबांना घडलेल्या प्रसंगाबद्दल माहिती द्या. तुम्हाला सुरक्षा पुरविण्याची विनंती करा” असा सल्ला दिला. त्यामुळे  खूप बरे वाटले. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला !! त्यावेळी साहेबांनी दिलेला धीर खूपच मोठी गोष्ट होती. आज त्याचे महत्त्व कळते!

     संध्याकाळी ढाक्क्यात पोहोचल्यावर प्रथम जनरल साहेबांना विनंती करून ढाका क्लबमध्ये बोलावून घेतले. अर्थातच संध्याकाळी त्यांच्याशी क्लबमध्येच भोजन घेतले. त्यांना चितगाव मधील सर्व घटनेची इत्यंभूत माहिती दिली. आमच्यावर बेतलेल्या प्रसंगामुळेआमच्याकडून झालेल्या चुकीची कबुली दिली. जनरलनी तुम्ही त्याप्रसंगी योग्य तेच केले असेच सांगितले. “ चितगांवला जाण्याआधी त्या गृहस्थाचे नाव मला कळले असते तर मी तुम्हाला तिथे पाठवले नसते..” असेही स्पष्ट केले. ‘तेलमाफिया’ म्हणून ते महाशय  परिसरात प्रसिद्ध होते.. मात्र आम्हाला ती कल्पना आली नव्हती म्हणून हे रामायण घडले होते! एका माफियाच्या तावडीतून आम्ही सही सलामत सुटलो होतो ते कळले!!

    “तुम्ही सही केलेल्या कागदपत्राबद्दल काहीच काळजी करू नका. येथील शासनामार्फत मी ते सर्व बेकायदा ठरवितो. तुमच्या मुंबईतील कार्यालयालाही त्याची तोशिष लागू देणार नाही.” अशी ग्वाही दिली  त्यामुळे आम्हाला खूप  धीर आला. आणि खरोखरच पुढे बांगलादेश पेट्रोलियम कार्पोरेशन मार्फत त्या गृहस्थाचा परवानाच रद्द करण्यात आल्याचे कळले.

    पुढे जनरल अब्बास व आम्ही  पसंद केलेले दुसरे एक डीलर ढाक्याहून मुंबईत आमच्या मार्केटिंग कार्यालयात आले. डायरेक्टर मार्केटिंग व या दोन डीलर्सनी स्वतंत्रपणे करार पत्रावर सह्या केल्या. मुंबईतील ‘ट्रायडेंट हॉटेला’त छोटा समारंभ झाला. त्याआधी संपूर्ण नेपाळ देशासाठी पहिली परदेशी डीलरशिप कंपनीने बहाल केली होती. बांगलादेशात  सुरू होणारी ही दुसरी डीलरशिप होती. आम्हा सर्वांसाठीच, भारतासाठी अभिमानाची गोष्ट होती. संध्याकाळी झालेल्या सहभोजनात अर्थातच आमचा चितगावमधील पराक्रम हाच विषय ‘साग्रसंगीत’ चर्चेचा विषय होता व त्या हास्यकलोळात आम्हीही सहभागी झालो!

   जीवनात व्यवहार करताना असे प्रसंग उद्भवू शकतात. त्यावेळी थोडे धीराने घ्यावे लागते. भल्यासाठी खोटे बोलावे लागते. धर्मराजानेही युद्धप्रसंगी पांडवांच्या भल्यासाठी समय सूचकता दाखवून, “अश्वत्थामा हता, नरोवा कुंजरोवा..” ही भूमिका घेतली होती ना ? 

आम्हाला वेदांनी शिकवले आहे ‘सत्यमेव जयते’. भारत सरकारचे हे बोधवाक्य आहे. सर्व भारतीय चलन आणि राष्ट्रीय कागदपत्रांच्या एका बाजूला “सत्यमेव जयते” हे शब्द कोरलेले आहेत. वेद, उपनिषदातील ह्या वाक्याचा ‘फक्त सत्याचाच विजय होतो’ असा शब्दार्थ होतो. लक्ष्यार्थ समजण्यासाठी मात्र परीक्षण आणि विचारमंथनाची गरज आहे. भारताचे महान तत्त्ववेत्ते, वेदांचे भाष्यकार आदि शंकराचार्य व्यावहारिक सत्य म्हणजे काय ह्या बाबत काही मार्गदर्शक तत्त्वे देतात.
‘प्रश्नोत्तर रत्नमाला’ ह्या त्यांच्या ग्रंथात आचार्यांनी ह्या प्रश्नाचे असे उत्तर दिले आहे
“कोणत्या प्रसंगी खोटे बोलणे देखील पापहीन आहे?”
“जे नीतिमत्तेचे रक्षण करण्यासाठी, प्रामाणिकपणा राखून उच्चारले जाते”.

मानवतेच्या भल्यासाठी आपल्याला खोटे बोलण्याची परवानगी आहे असे आपण म्हणतो तेव्हा त्यात कोणताही विरोधाभास नाही. आपल्या शास्त्रात हे समजावून देण्यासाठी एक सुंदर कथा सांगितली गेली आहे. ती अशी: कौशिक नावाच्या एका गृहस्थाने नेहमी सत्य बोलण्याचे व्रत घेतले. एके दिवशी दरोडेखोर जंगलात प्रवाशांच्या गटाचा पाठलाग करत होते. कौशिकला प्रवासी कुठे गेले हे माहित होते. जेव्हा दरोडेखोर पाठलाग करत आले तेव्हा त्यांनी त्यांची कौशिकला तेथे बसलेले पहिले. दरोडेखोर कौशिकाकडे आले आणि त्यांनी प्रवाशांना पाहिले आहे का असे विचारले. कौशिकाने हे दरोडेखोर प्रवाशांना लुटणार आहेत हे ओळखले पण तरीही त्याने आपले तोंड उघडले. प्रवासी कुठे लपले आहेत हे त्याने त्यांना सांगितले. दरोडेखोरांनी तेथे जाऊन प्रवाशांचा छळ करून लुटले. ही माहिती पुरवल्याबद्दल कौशिकला दुष्कर्म फळे भोगावी लागली – सत्य बोलल्याबद्दल मृत्यूनंतर कौशिकाला नरकात जावे लागले! अशी कथा आहे.

   आम्ही त्याप्रसंगी वागलो ते योग्य होते असे आजही वाटते!! 

 त्या पाहुण्याने  अशी कोणती भुरळ टाकली व गारुड केले ज्यामुळे आम्ही कोणताही सुरक्षा विचार न करताच, मुकाटपणे त्या गृहस्थाच्या पाठीमागे भूतमहालात प्रवेश करून चालत राहिलो व जीवघेणी आपत्ती ओढवून घेतली ….  हे गौडबंगाल मात्र आजही कळलेले नाही कधी कळेल असे वाटत नाही !

  समाप्त।

29।01।2025