“जैसे मार्गेची चालता” हनोई-व्हिएतनाम. 

     सुकार्तो विमानतळ, हनोई-व्हिएतनाम. 

   एक वैभवा थोर भोगीतो ,

   धुळीमध्ये तो अन्य लोळतो,

   काय असेही स्थिती बरोबर?

   स्त्रीवर्गाला दास्यी दडपूनी,

  दासी पुत्रची मानव होतो.

स्त्रीला अज्ञानात ठेवितो, परिणामी दुर्दशेष जातो,

काय म्हणावे या मूर्खाला?

 नरेच केला हीन किती नर…?

   आद्यकवी केशवसुतांची ही ऊर्जस्वला कविता न्याय समता बंधुता इत्यादी सामाजिक विषयांचे प्रबोधन करणारी चिरतरुण कविता आहे. 

 “या जगात एक मनुष्य वैभवात लोळतो तर दुसरा धुळीत पडून दारिद्र्याचे चटके अनुभवतो. स्त्रीला आपली दासी म्हणून वागविताना स्वतः दासीपुत्र होण्यात माणसाला शरम वाटत नाही. नारीला अज्ञानाच्या अंधकारात लोटणारा स्वतः देखील विनाश पावतो. काय म्हणावे या मूर्खपणाला? या जगात माणसानेच माणसाला किती हीनत केले आहे!”

   गत कित्येक शतकामध्ये स्त्री वर्गावर झालेल्या अन्यायाचे वर्णन करताना केशवसुतांनी अत्यंत कठोरपणे पुरुषप्रधान समाजावर असे शाब्दिक घाव घालून सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अनेक वर्षे झाली आहेत. तरीही आजची नारीजाती अत्याचारमुक्त झाली, असे कोणीही म्हणणार नाही!!

    स्त्री  एक उपभोग्य वस्तू ,तिचा उपयोग व उपभोग आपण हवा त्या प्रकारे घ्यावा, अशीच आजही पैशाच्या मस्तीत असलेल्या अनेक  नरपुंगवांची भावना आहे !

   हे सर्व आठवण्याचे कारण आमच्या  केनिया- इंडोनेशिया-व्हिएतनाम-बँकाक या चार देशांच्या उद्योग भ्रमंतीत  व्हिएतनाममध्ये घडलेला तो प्रसंग!!

    केनियात काम छान झाले होते. केनिया अभयारण्याच्या सफारीत एक चांगला धडा शिकलो होतो. पुढे इंडोनेशियातही भ्रष्टाचाराची झलक दिसली. लक्ष दिले नाही.

  पुढे व्हिएतनाममध्ये व्यवसाय वृद्धीसाठी, कामिनी-कांचनाची भुरळ घालून येनकेन प्रकारेण आपले इप्सीत साध्य कसे साध्य करता येईल, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला! त्याचीच ही थोडक्यात झलक!!

   आजवरच्या अनेक व्यावसायिक प्रवासांत कुठे अचानक आलेली नैसर्गिक आपत्ती ,कुठे विश्वासघातामुळे उद्भवलेले धोके, तर कुठे स्वतःच्याच फाजील आत्मविश्वासामुळे निर्माण झालेली आपदा.. अशा अनुभवापेक्षा व्हिएतनाम देशात आलेला हा अनुभव अगदीच वेगळा …अनैतिक व अनपेक्षित!! ध्यानी-मनी-स्वप्नी नसताना अचानक कोणीतरी मोहाचे मुलायम जाळे आमच्यावर फेकून  आम्हाला त्यात गुंतवू पहात होते !!..

  कसे ते सांगण्याआधी या आशिया खंडातल्या व्हिएतनाम देशाविषयी थोडे.

सुस्थितीतील हिंदू मंदिरे हनोई,व्हिएतनाम. 

    व्हिएतनाम आग्नेय आशियाखंडातील एक छोटा देश.याची लोकसंख्या सुमारे दहा कोटी एवढी असून अनेक वर्षे चीनचे वर्चस्व असल्यामुळे  चिनी संस्कृती व बौद्ध धर्माचा पगडा येथे अधिक आहे. सुरुवातीच्या आठव्या शतकापर्यंत हिंदू च्या ‘चंप’ राजघराण्याने व्हिएतनामवर राज्य केले आहे. त्यामुळे हिंदू धर्मीयांची मंदिरे या देशात आजही तूरळकपणे का असेना पण आढळून येतात. या देशास सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून येथे अनेक सुंदर समुद्रकिनारे, संग्रहालय आणि बौद्ध पॅगोडे आहेत. हनोई ही या देशाची राजधानी आहे. हो ची मिन सिटी हे या देशाचे मोठे व्यापारी शहर आहे. 85 टक्के लोकसंख्या बौद्ध आहे. अमेरिकेशी पंगा घेऊन त्या देशाशी सतत वीस वर्षे युद्ध केल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था तळास गेली होती. मात्र एवढ्या मोठ्या महासत्तेशी झुंज देऊनही  व्हिएतनाम अमेरिकेला शरण गेला नाही.पुढे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी  देशाने उदार आर्थिक धोरण स्वीकारले. आज हा देश जगातील झपाट्याने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक झाला आहे. भारत व व्हिएतनाममधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध दुसऱ्या शतकापासून आहेत.अमेरिका युद्ध दरम्यान भारताने अमेरिकेच्या कारवाईचा तीव्र निषेध केला होता. 1992 मध्ये भारत आणि व्हिएतनामने तेल संशोधन व तंत्रज्ञान-हस्तांतरणा बाबतीत काही करारमदार केले होते.  त्यामुळेच तेथे व्यापार करण्याची मुभा आम्हाला मिळाली होती. नक्की कोणती ती संधी शोधण्यासाठी आम्ही हनोईमध्ये दाखल झालो होतो.

     त्या दिवसात एका बातमीने  भारतीयांचे,विशेषता मराठी भाषिकांचे लक्ष वेधून घेतले होते. व्हिएतनामचे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह यांनी सायगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. तसेच स्वतःच्या समाधीवर 

  “शिवाजी महाराजांचा एक मावळा येथे चीरविश्रांती घेत आहे…”,

  अशा ओळी कोरल्या आहेत, असे म्हटले जात होते. अमेरिका विरोधी युद्धाचे नेतृत्व हो  ची मिन्ह यांनी केले होते.  व्हिएतनामच्या अल्प सैन्याने अमेरिकेच्या प्रचंड सैन्याला तोंड देताना व विजयश्री मिळवितांना छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा उपयोग केला होता हे सर्वश्रुत होते.

   त्यामुळेच व्हिएतनामला भेट देताना मला खूप आनंद व उत्सुकता होती. दुर्दैवाने मी सायगाव (आत्ताचे हो ची मिन् सीटी) ला जाऊ न शकल्याने या गोष्टींची सत्यता पडताळू शकलो नाही. इतर गोष्टी काहीही असल्या तरी आमचे पूर्वज खूप आधी शेकडो वर्षांपूर्वी तेथे पोहोचले होते व त्यांनी आठव्या शतकापर्यंत तेथे राज्य केले, ही गोष्ट मला खूप अपूर्व वाटत होती. गतेतिहासाचे आज  शिल्लक असलेले अवशेष तेथे पाहावयाचे होते.

     इंडोनेशियाच्या जकार्ता आंतरराष्ट्रीय विमानतळावरून  आम्ही व्हिएतनामच्या हनोई विमानतळावर उतरलो. दुपार झाली होती. आमच्यासाठी रिझर्व केलेल्या ‘लेक व्ह्यू हॉटेल’मध्ये पोहोचलो. थोडे ताजेतवाने होऊन विसावलो होतो. विमानतळावर 100 अमेरिकन डॉलरचे व्हिएतनामी चलन डांग मध्ये विनिमय केला होता. गंमत वाटली. एक डाॅलरला  सुमारे 40 हजार  डॉंग मिळाले होते. म्हणजे शंभर डाॅलरच्या बदली मिळालेले सुमारे 40 लाख डॉंगच्या नोटा व नाणी कुठे व कशी ठेवायची हा प्रश्न झाला होता? काही वर्षांपूर्वीच व्हिएतनामध्ये झालेल्या अमेरिकन युद्धामुळे या देशाची अर्थव्यवस्था अगदीच रसातळाला गेली होती. त्यांचे चलन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाले होते. वीस हजार डांग मध्ये एक कप कॉफी व सँडविच येत होते!!

  सगळे विचित्र होते. आपल्या देशात एवढा पैसा हाताळण्याची आपल्याला सवयी नसते. आपल्या देशावरही युद्धाची अनेक सावटे येऊन गेली.  आपला रुपया एवढा हवालदिल कधीच झाला नव्हता ! आमच्या अर्थधोरणाचे व धुरिणांचेचे त्यावेळी खूप कौतुक वाटले. मनोमन आभार मानले .

     येथे येण्याआधी व्हिएतनाम देशाची आर्थिक सामाजिक बाजू समजून घेण्यासाठी थोडे वाचले होते.  त्यावरूनही व्हितनाम-थायलंड देशाची सामाजिक, सांस्कृतिक,नैतिक घडी थोडी वेगळी वाटली होती.येथील नाईट लाईफ तसेच एकूणच सामजिक -वैयक्तिक जीवनातील नैतिक अधप्पतना  संबंधी वाचून कल्पना होती. अमेरिकन युद्धामुळे समाज जीवनात हे क्लेशकारक परिवर्तन आले होते.

   खरे तर या देशात कच्च्या पेट्रोल तेलाच्या खाणी आहेत. क्रूड ऑइल  भरपूर मिळते. दोन शुद्धीकरण कारखाने आहेत व त्यामुळे देशाची  इंधन गरज भागते. मात्र वंगणासाठी त्यांना आयातीवर अवलंबून राहावे लागते. वंगणाची आवक मोठ्या प्रमाणावर होते .आणि म्हणूनच आम्ही येथे आमचा माल विकण्यासाठी आलो होतो.

    आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भारतातून येतानाच या देशातील पुढील दोन दिवसाचा कार्यक्रम निश्चित झाला होता. आज संध्याकाळी आराम होता.दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखती याच हॉटेलात होणार होत्या. त्याची आखणी संध्याकाळी करावयाची होती.

   उद्या सकाळी मुलाखती झाल्यावर संध्याकाळी स्थानिक उमेदवारांच्या कार्यालयांची पाहणी व त्यांच्या व्यावसायिक जागा( फॅक्टरी ,गोडाऊन इत्यादी पहावयाच्या होत्या.  चार उमेदवार होते .दोन स्थानिक तर दोन इतरत्र शहरातून आले होते . तिसऱ्या दिवशी  दुपारपर्यंत हनोई दर्शन करून आम्ही संध्याकाळी बँकाक-थायलंडला रवाना होणार होतो ..

  विशाल सरोवराकाठीअसलेले पंचतारांकित लेक-व्ह्यु हाॅटेल. 

       ‘लेक-व्ह्यू हॉटेल’मध्ये आपापल्या खोल्यांत आम्ही स्थिरावत होतो. लेक-व्ह्यू ह्या सुंदर सरोवराकाठी  हे हॉटेल आहे. वीस लाख डांग एवढे व्हिएतनामी चलन दिवसाकाठी देऊन आम्हाला येथे राहायचे होते. आकडा लाखात आहे म्हणून सुरुवातीला घाबरलो. प्रत्यक्षात केवळ पन्नास डॉलर किमतीत या पंचतारांकित हॉटेलचा पाहुणचार घेतला. आपल्या देशाच्या चलना चे अवमूल्यन झाले की डॉलर मध्ये कमाई असणाऱ्यांची कशी चंगळ होते, याचे हे ज्वलंत उदाहरण!!

   माझ्या रूम मध्ये चहाचे घुटके घेत लोकल टेलिव्हिजन पाहत होतो. खोलीमधील टेलिफोनची घंटी वाजली.हॉटेलच्या रिसेप्शनिस्टनी निरोप दिला, “आपल्या दोघांना भेटण्यासाठी दोन मुली पुष्पगुच्छ घेऊन आल्या आहेत. एक मुलगी आपल्या खोलीत येऊ इच्छिते. पाठवू का?”

    खूप आश्चर्य वाटले. आत्ताच कुठे आम्ही  इथे येत आहोत. तेवढ्यात आम्ही येथे या हॉटेलमध्ये पोहोचल्याचे कोणाला कसे कळले? मुलाखती तर उद्या आहेत? मनात विचारांचे काहूर उठले. पटकन अनेक भले भुरे विचारही मनात आले. कोणीतरी आमच्यावर वॉच ठेवून आहे काय?…

   मुलाखती तर उद्या आहेत. आजच एवढी स्वागत करण्याची जरुरी काय?..तेही मुलींमार्फत… दोन मुली ..दोन पुष्पगुच्छ.. काहीच कळेना!! त्यातील एक मुलगी माझ्या रूममध्ये येऊ इच्छिते मग दुसरी मुलगी..?? 

  स्वागत कक्षातून पुन्हा विचारले ,”सर काय करू ?” उत्तर सुचत नव्हते. मनात गोंधळ वाढला होता.तरी पटकन सांगितले ,”थांबा. मी थोड्या वेळाने फोन करतो!”

   या आधीही मुलाखतीसाठी आम्ही विविध ठिकाणी देशात गेलो असताना रीतसर मुलाखतीचे दिवशी उमेदवार स्वतः, तर कधी त्यांच्या सौभाग्यवतीसह थोडेआधी येऊन ‘वेलकम’ करीत… परंतु हा प्रकार थोडा वेगळा वाटला!

        पेट्रो व्हिएतनाम कंपनीचा पेट्रोल पंप ,हनोई.

 व्यवसाय उद्योग धंद्यात येथे कनक-कामिनींचा होणारा सर्रास वापर वाचून माहित होता. हनोई विमानतळावरून  हॉटेलमध्ये येईपर्यंत नागरी वस्तीतील काही घरांवर ‘काही तासा पुरता’जोडीदारी मिळेल. ‘येथे खास व्हिएतनामी मसाज केली जाते’, अशा प्रकारचे बोर्ड ठळकपणे लावलेले दिसले होते.हॉटेलमध्ये टॅक्सीतून उतरतानाही नटून थटून दुतर्फा उभ्या असलेल्या मुलींचे घोळके पाहिले होते. मात्र याचा बोध झाला नव्हता, आता हळूहळू डोक्यात प्रकाश पडू लागला होता…!! त्यामुळेच पहिली तात्काळ प्रतिक्रिया

     “त्यांना आमचे खोलीत पाठवू नको..”, अशीच झाली!

   रात्री हनोई शहरात फेरफटका मारून येथीलनाईट-लाईफ ची झलक पाहिली!

   ही रित,ओ या व्हिएतनामी व सहकारी श्री. महेश यांनाही मी फोन करून रिसेप्शन मधून आलेल्या फोनबद्दल सांगितले. त्यांना ही तसाच फोन आला होता.

   “माझ्या खोलीत एक मुलगी ‘वेलकम’करण्यासाठी येऊ इच्छित होती. मी सुद्धा  भेटण्याचे नाकारले” असे ते म्हणाले’.   योगायोग गमतीशीर होता. आम्ही दोघांनी सुदैवाने एकच प्रतिक्रिया दिल्याने पुढचा गोंधळ टळला होता.

   आता हे वरून नाजूक वाटणारे पण कदाचित भयंकर होऊ शकणारे प्रकरण कसे हाताळावे याचा आम्ही विचार करू लागलो.

  “यदाकदाचित जर कोणाचे महत्त्वाचे काम असेल व त्यामुळे हे प्रतिनिधी पाठविले असतील तर ..? “

या विचाराने मनाची घालमेल ही झाली. त्याची खातरजमा होणेही आवश्यक होते.

  महेशने हे काम मला सोपविले. मी रिसेप्शन मध्ये जाऊन बोलणे करावे असे ठरले…

  मी स्वतः माझ्या खोलीतून स्वागत कक्षामध्ये आलो. तेथील कर्मचारी मुलीला कोण, ”मला भेटावयास कोण आले आहे?”,

 असे विचारले. तिने समोर कोचवर बसलेल्या दोन सुंदर मुलींकडे बोट दाखवले. दोघींनीही आपल्या हातात सुंदर पुष्पगुच्छ व पिशवीत काही तरी ठेवले होते. दोघीही माझ्याकडे पाहत होत्या. मी त्यांच्या समोरील कोचवर जाऊन बसलो. त्यांना थोडे इंग्रजी समजत होते. त्यामुळे इंग्रजीत झालेले संभाषण असे .. 

“मी मिस्टर राऊत. आपण कशासाठी आला आहात?”

  “आम्हाला मिस्टर राऊत व मि. दामले यांना भेटावयाचे आहे.”

  “कशासाठी भेटणार?”

“व्हितनाम लुब कंपनीच्या मालकांनी आम्हाला पाठविले आहे. मी आपले स्वागत करणार तर माझी  ही माझी मैत्रीण मिस्टर दामले यांचे स्वागत करणार!”

  “उद्या मुलाखतीचे वेळी आम्ही तुमच्या मालकांना भेटणारच आहोत “

“त्या आधी आमच्या देशाच्या परंपरेप्रमाणे आपले यथोचित वैयक्तिकरित्या स्वागत व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. आमच्या कंपनीचीही तशी परंपरा आहे.”

 “आपली परंपरा चांगली आहे. मात्र आमच्या कंपनीची अशी परंपरा नसल्याने आम्ही तसे स्वागत स्वीकारू शकत नाही. सॉरी.”

  जास्त संभाषण लांबवून अडचणीत येण्यापेक्षा इथून निघालेले बरे असे वाटून मी पुन्हा खोलीत जाण्यासाठी उभा राहिलो. तशा या दोघी ही उभ्या राहून कमरेत वाकून म्हणाल्या, “फक्त दोन मिनिटे आम्ही दोघी आपल्या खोल्यांमध्ये येतो. हा पुष्पगुच्छ व पिशवी आपणास देऊन निघून जातो.”

    “पिशवीत काय आहे?” मी विचारले.

“आमच्या देशाचे डांग (पैसे) आहेत.आपल्याला येथे शॉपिंगसाठी मदतीस येतील.”

    प्रकरण आणखीन गंभीर होऊ लागले होते. पैशाचीही लाच होती..

  दोघीही अगदीच काकुळतीला आल्यामुळे, “मी महेशना ही येथे बोलावतो. आपण  येथे पुष्पगुच्छ द्या. पिशवी घेऊन परत जा.” थोड्याशा कठोरपणेच बोललो. मलाही आता या सर्व प्रकारची घृणा वाटू लागली होती. 

  त्यांनी डोळ्यात पाणी आणून म्हटले, “सर आम्ही हे काम न केल्यास आमची बिदागी जाईल. मालक हे काम पुन्हा देणार नाहीत. पोटापाण्याचा प्रश्न आहे …प्लीज प्लीज.…”

  हे काय प्रकरण आहे ते पूर्ण समजून चुकलो होतो. स्वागतकक्षातील मुली आमच्याकडेच पाहत होत्या. त्यांना हे प्रकार नवीन नसावेत. माझे वागणे त्यांना खटकले असावे. ते दोन पुष्पगुच्छ त्यांच्या हातातून जवळजवळ हिसकावूनच घेतले. नमस्कार केला. मागे वळलो. जाताना रिसेप्शनिस्टला बजावले. “यांना अथवा अन्य कोणाला आमच्या खोलीत पाठवू नको..” 

  मी महेशच्या खोलीत गेलो. त्याला खाली घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यालाही खूप आश्चर्य व भीती देखील वाढली. परक्या मुलाखात असा विचित्र प्रसंग येणे व अनावधानाने कोणाची नाराजी ओढविणे हे जोखमीचे ठरू शकते. इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती होती.आम्ही आमच्या सत्सदविवेक बुद्धीला स्मरून योग्य तेच केले अशी आमची खात्री होती.

  जुन्या हिंदू राजवटीची व संस्कृतीची निशाणी, हिंदू मंदिरे,हनोई. 

   दुसऱ्या दिवशी मुलाखती झाल्या. आम्हाला हवे असलेले दोन योग्य उमेदवार मिळाले. ‘ते’ उमेदवारी इंटरव्यूसाठी आले. त्यांचा चेहरा पडलेला होता.. त्यांचे मन त्यांना खात असावे.. आम्ही काल घडलेल्या प्रसंगा बाबत कोणत्याही उल्लेख न करता नाराजी व्यक्त केली नाही. फक्त ,”आपलं पाठविलेल्या पुष्पगुच्छ बद्दल धन्यवाद ..”एवढेच म्हणालो.

   मुलाखतीत या गृहस्थांना पेट्रोलियम व्यवसाय, विशेषतः वंगण विक्री व विविध वापराबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळेच त्यांनी आमच्या समोर दाणे टाकले होते. त्याच्या दुर्दैवाने व आमच्या सुदैवाने आम्ही मायाजालातून सुकळीतपणे बाहेर पडलो होतो.. खरडपट्टी काढून त्याला नाराज ही केले नव्हते. व्यवसायात आपल्याला अशी माणसे ओळखता आली पाहिजेत. त्यांच्या विविध युक्त्यांपासून दूर राहता आले पाहिजे. विशेषतः परदेशात त्यांनी कितीही चुका केल्या तरी त्यांना तसे न जाणवू देता आपले कार्य साधून घेता आले पाहीजे. त्या दृष्टीने आम्हाला बांगलादेशात आलेला अनुभव खूप काही शिकवून गेला होता.

    पुढे संध्याकाळी निवडलेल्या दोन उमेदवारांची कार्यालयेे, गोडाऊन,फॅक्टरी इत्यादी पाहिले.. या गृहस्थाच्या कार्यालयात आम्ही गेलो नाही..

डोंगर पठारावर  सुंदर प्रकारे नक्षीदार शेती केली जाते.

   दुसऱ्या लंच पर्यंत व्हिएतनाम दर्शन केले. काही जवळपास असलेली हिंदू मंदिरे, मुख्य बाजार सरोवराकाठी बसून सुंदर निसर्गाचा आनंद घेतला. शहरा बाहेर गेल्यावर आपल्या महाराष्ट्रातील गावाशी साम्य असणारे दृश्य दिसले. शेतकरी भाताची लागवड करीत होते. डोंगरकड्याला गेलेली नक्षीदार शेती लक्ष वेधून घेते. सर्व शेतीही हाताने होते. यांत्रिक शेती दिसली नाही.

  रात्रीच्या वेळी एक फेरफटका मारून हनोईचे गजबजलेले, उजळून निघालेले  रस्ते पाहिले. येथील नाईट लाईफची दुरून झलक मिळाली.

आमच्या भावी डीलर कडे आम्ही हॉटेल रिसेप्शन मध्ये झालेल्या त्या प्रसंगा विषयी  बोललो. आम्हाला त्यांच्याकडूनही या प्रकाराचा थोडा उलगडा करून हवा होता. त्याने आमचे अभिनंदन केले.

वेस्ट-लेक व  होवन कीम तलाव,हनोई. 

त्यांनी सांगितलेली त्यांनी दिलेली माहिती तर भयंकरच होती अंगावर काटाच उभा राहिला. ते म्हणाले 

   तुम्ही खरेच खूप मोठ्या संकटातून स्वतःला वाचविले आहे. या देशात परदेशी नागरिकाने आपल्या खोलीत कोणाही स्थानिक पुरुष अथवा स्त्रीला खोलीत घेणे हा गुन्हा आहे. या धंदेवाईक मुली तुमच्यावर भुरळ घालून तुमची पर्स  लंपास करतात. तुमचे आर्थिक नुकसान होतेच पण त्यात विजा-पासपोर्ट असल्यास मोठी आफत उद्भवते. या अशा बाजारू स्त्रियांचे एजंट आणि हॉटेलचे स्वागत कक्ष यांचेही साटे लोटे असतात. कधीतरी स्वागत कक्षातील मुलीच पोलिसांना फोन करून बोलावून घेतात. तुम्हाला रंगेहाथ पकडून देतात. परदेशी नागरिक हवालदिल होतो.  हे लोक सांगतील तसे करण्यास नाईलाजास्त तयार होतो. लुटला जातो…”

  खरंच मोठी भयंकर संवेदनाक्षम असा हा क्षण आमच्या आयुष्यात आला होता. आम्ही केवळ परदेशी नागरिकच नव्हतं तर आम्ही एका परदेशी सरकारी कंपनीचे अधिकारीही होतो. त्यामुळे आमची हालत काय झाली असती याची कल्पनाच करवत नाही!!

    हे सर्व प्रकरण आज आठवताना जगामधल्या सर्वच देशात जेथे जेथे युद्धाचा प्रादुर्भाव झाला तिथे स्त्रियांची दैना होत असते. युद्ध म्हणजे त्या समाजातील स्त्रियांना जिवंतपणे नरकयातना. अमेरिकेने युद्ध लादले ते वीस वर्षे चालले या युद्धाचे अनेक दूरागामी परिणाम केवळ नामच नव्हे पूर्ण आग्नेयआशियातील इतर देशावरही झाले. येथील स्त्रिया देखील बळी पडल्या त्या काळात अमेरिकेचा लष्करी तळ थायलंडमध्ये होता. अमेरिकी सैनिकासाठी मोठ्या प्रमाणात स्त्रिया वेश्या व्यवसायात ओढल्या गेल्या. पुढे ध्येय व्यापारामध्ये थायलंड व एकंदरीत आग्नेय आशिया हे महत्त्वाचे केंद्र बनले. तत्पूर्वी दुसऱ्या महायुद्धात जपानच्या आक्रमक भूमिकेने अनेक देश ताब्यात घेतले होते त्यांनी तेथील स्त्रियांवर लैंगिक गुलामगिरीत लाजली हे जग जाहीर आहे. पुढे बँकॉक हेच आमचे पुढील ग्रंथव्य स्थान होते. व आलेले अनुभव मी जे म्हणतोय तसेच होते

    म्हणजे केवळ सदबुद्धीने,माणुसकी म्हणून जरी आम्ही त्यांना खोलीत बोलविले असते तरीही किती महान अडचणी येऊ शकत होत्या.

   डोळ्यात पाणी आणून, फक्त दोन मिनिटांसाठी येऊ द्या ही मायावी विनवणी होती. नक्राश्रू होते!!

    माफिया लोकांचे असे उद्योग जगभर चालत असतात, हे खरे आहे. मात्र व्हितनाम देशात त्याला सीमा नाही. एखादा सरळ सच्चा अधिकारी कधीही येथे बरबाद होऊ शकतो. त्या प्रसंगाची आजही आठवण झाली म्हणजे अंगावर काटा येतो व  सर्व जग किती अतर्क्य अगम्य अनाकलनीय आहे याची जाणीव होते.

   आम्ही त्या दिवशी हनोईच्या त्या सुंदर हॉटेलातील स्वागत कक्षातून निष्कलंक निर्लेप पणे बाहेर आलो. कामे करून परत मातृभूमीस सन्मानाने परतलो. याचे श्रेय केवळ आणि केवळ त्या परमेश्वराला. त्यानेच प्रज्वलित केलेल्या त्या अंतरीच्या ज्ञानदीपामुळे!

  त्याकरिताच ज्ञानोबांनी म्हटले आहे ..

    “जैसे मार्गेची चालता, अपावो न पडे सर्वथा ,

    का दीपाधारे वर्तता, नाडळीजे।।’

अंधारात रस्त्याने चालू गेले तर अपाय होणारच. त्यात रस्त्याचा काय दोष? अपाय  होऊ नये वाटत असेल तर दिप प्रकाशात चालले पाहिजे. हा दीप म्हणजे ‘मनोदीप’.. अंतरीचा ज्ञानदिवा!!

    आपली नैमित्तिक व व्यावसायिक कर्तव्ये करताना जर कोणतीही अभिलाषा, लालसा अपेक्षा नसली तर कोणत्याही कठीण प्रसंगी ती दैवी शक्ती सद्बुद्धीचे ज्ञानदीप आपल्या अंतरंगात तत्क्षणीच जागवते, सावध करते. त्या शक्तीला मनोभावे प्रणाम.

दिगंबर राऊत 

13.03.2025.