डुलकी पुराण |

   परवाच्या पेपरात एक बातमी वाचण्यात आली. मनमाड कडून येवला येथे प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी वाहतूक करणाऱ्या कारला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. येवल्याच्या निजधाम पुलाजवळ गाडी नाल्यात गेल्याने  झालेल्या अपघातात बारा प्रवासी जबर जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

     डोनाल्ड ट्रम्प महाशय अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून त्यांनी अनेक लहान मोठ्या निर्णयांचा सपाटा लावला आहे . जगातील काही  राष्ट्रांकडून आयात होणाऱ्या मालावर जबरदस्त आयात कर लावण्यापासून ते अमेरिकेच्या सरकारी ऑफिसातील  झोप घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सध्याचा कानून बदलण्याचा फेर निर्णय घेण्याचा निर्णय, त्यातील एक!! सरकारी ऑफिसात अजिबात झोपायचे नाही असे आज पावेतो अमेरिकन सरकारचे म्हणणे आहे. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला जनरल सर्व्हिसेस अॅन्ड अॅडमिनिस्ट्रेशनने प्रसिद्ध केलेल्या एका सूचनेत म्हटलं होतं, “एजन्सीच्या एखाद्या अधिकाऱ्याने परवानगी दिल्या नंतर कार्यालयामध्ये झोपण्याची कर्मचाऱ्यास परवानगी राहील ..”

नेमकं काय घडल्यामुळे अशी सूचना देण्यात आली हे अजून स्पष्ट नाही कारण यावर काहीही प्रतिक्रिया द्यायला या कार्यालयाने नकार दिलाय. पण कर्मचाऱ्यांनी झोप काढण्यावर एखाद्या सरकारने पावलं उचलण्याची गोष्ट मजेशीर आहे एवढे निश्चित!! 

बेन अॅण्ड जेरीज या आईस्क्रीम कंपनीने कर्मचाऱ्यांना आराम करता यावा यासाठी ‘नॅप रूम्स’ तयार केलेल्या आहेत. 10×10 च्या या खोल्या फारशा आरामदायी नसल्या तरी यामध्ये झोपायला एक साधं आणि पातळ ब्लँकेट आहे. या खोल्यांना ‘द विंची रूम’ म्हटलं जातं.

हे सगळं सुरू असताना उत्तर अमेरिकेत्या काही कंपन्यांनी या ‘डुलकी काढण्या’चाच व्यवसाय सुरू केलाय.

कॅनडामध्ये नुकताच ‘नॅप इट अप’ नावाचा पहिला ‘नॅपिंग स्टुडिओ’ सुरू झाला आहे..

‘मेट्रोनॅप्स’ कंपनीने ही संकल्पना एक पाऊल पुढे नेलीय. या कंपनीच्या आकर्षक दिसणाऱ्या पॉड्समध्ये लोकांना आरामात रेलून झोपता येतं.

24 तास सुरू राहणारे हॉस्पिट्लस, कंपन्या, विमानतळांसारख्या ठिकाणी असे पॉड्स लोकप्रिय होत आहेत.

     कामाच्या ठिकाणी डुलकीचे मार्केटिंग करणाऱ्या या कंपन्यांना सुरुवातीला लोकांनी वेड्यात काढले होते .आता त्यांची उपयुक्तता एवढी झाली आहे  यांच्या मालकांनाच  डुलकी घ्यायला वेळ नाही !!

      हे डुलकी पुराण एवढे लांबवण्याचे कारणही तसेच! माझ्या एका रात्रीच्या कार प्रवासात ड्रायव्हरच्या  सेकंदाच्या डुलकी मुळे आम्ही रस्त्याच्या डावीकडील खोल  दरीतच कोसळणार होतो पण… पण वाचलो. !!त्याची ही चित्तरकथा..

     साधारणता 1985-86 सालची ही गोष्ट असेल. त्यावेळी मी आमच्या कंपनीत टेक्निकल सर्विसेस(Technical Services) म्हणजे तांत्रिक-सेवा,या विभागात काम करीत होतो.  आमच्या कस्टमर्स ना प्रॉडक्ट वापरताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यात मदत करणे व त्यांचे निपटन करणे हे आमचे एक  काम. तसेच आमची विविध वंगणे वापरण्यासाठी योग्य ते ग्राहक शोधून  तेथे प्रॉडक्ट-ट्रायल  घेऊन आमच्या मार्केटिंग विभागातर्फ त्यांना  वंगणे पुरवठा करणे हे दुसरे काम . एखाद्या ग्राहकाने विनंती केल्यास त्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यासाठी वंगणांचा कमीत कमी वापर कसा करावा, याचाही अभ्यास(Product  Survey), आम्ही करत असू. या कामी आमच्या भारतातील  प्रादेशिक मार्केटिंग विभागाकडून माहिती व सूचना येत असत.त्यानुसार आम्ही त्या विशिष्ट कारखान्यात जाऊन त्यांच्या  तांत्रिक विभागातील लोकांसमोर चाचणी घेऊन ,आवश्यक असल्यास दोन-तीन दिवस तेथे राहून आमच्या वंगणाची क्षमता सिद्ध करून दाखवीत असू. या चाचण्या नेहमी दोन प्रकारच्या असतात. एक प्रयोग शाळेतील  उपकरणांनी करावयाच्या चाचण्या(Laboratory Tests) व दोन  कारखान्यातील ज्या विशिष्ट यंत्रात  वंगण  वापरले जाते त्या यंत्रातील पार्टस वंगणयुक्त करून चाचणी(Field Trial) सुरू करणे. ही चाचणी दीर्घ मुदतीची असते.

      मध्य प्रदेशातील रायपूर येथील आमच्या मार्केटिंग ऑफिसने आम्हाला भिलाई पोलाद  कारखान्यात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या एका  घनवंगणाची(Grease), माहिती पाठवून आपले कोणते वंगण तेथे देता येईल याची विचारणा केली होती . तसे  असल्यास येथे येऊन त्याची ट्रायल भिलाई कारखान्यात घ्यावी ,अशी सूचना केली होती..

      भिलाई स्टीलप्लांट ला अनेक वर्षे आम्ही काही वंगणे देत असू. मात्र त्यांच्या एकूण वापरात आमच्या वंगणांचा टक्का केवळ 15 ते 20 टक्के असावा. बाकीची वंगणे आमच्या प्रतिस्पर्धी कंपन्या देत असत. पोलाद कारखान्यात वंगणाचा खप काही टना त असतो.

  वर: ग्रीज वंगण. खाली: त्याचा रोलर बेरिंग मध्ये वापर.

   रायपूर येथील आमच्या ऑफिसने सुचविलेल्या वंगणाचे समानधर्मी ग्रीज  आम्ही शोधले.त्यावर काही चाचण्या घेतल्या.आमच्या प्रयोगशाळेत त्या आम्हाला योग्य वाटल्या. प्रत्यक्ष भिलाई कारखान्यात त्या ग्रीजच्या चाचणी परीक्षा व परफॉर्मन्स टेस्ट घेऊन तेथे गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भिलाई पोलाद कारखान्यास भेट देण्याचे पक्के केले .

या ट्रायल साठी आमच्या मुंबई ऑफिस मधून मी एकटाच जाणार होतो. रायपुर विभागाचे मार्केटिंग ऑफिसर श्री घोषाल व मॅनेजर श्री प्रसन्न कुमार हे रायपूरला मला भेटून माझे बरोबर पुढे भिलाईपर्यंत येणार होते. 

    मुंबई ते रायपूर विमानाने व पुढे रायपूर ते भिलाई टॅक्सीने तसेच  येतानाही तोच परतीचा मार्ग, असा तीन दिवसांचा होता.

  भिलाई पोलाद कारखान्याविषयी थोडे…भिलाई पोलाद कारखाना भारत सरकारने रशियाच्या मदतीने 1955 साली सुरू केला. सध्या भारताच्या छत्तीसगड या राज्यात हा कारखाना येतो  .छत्तीसगड मध्ये कोळसा, लोखंड, हिरे, सोने टीन,,बॉक्साईट,इत्यादी धातूंच्या  खाणी असल्याने सर्व कच्चामाल या कारखान्यास आजूबाजूच्या प्रदेशातून मिळतो. पूर्वी छत्तीसगड हा मध्य प्रदेशराज्याचा  एक भाग होता. सन 2000 पासून ते भारताचे एक स्वतंत्र राज्य गणले जाते.

     प्रभू रामचंद्रांनी  ज्या दंडकारण्यात आपला वनवासकाल व्यक्तित केला तो हा प्रदेश,दंडकारण्य अथवा  दक्षिणकोशल या नावाने  प्रसिद्ध होता. पूर्वी येथे सातवाहन राजांनी राज्य केले. अलीकडच्या काळात गोंड हिंदू आदिवासी संस्कृतीचे राजे येथे राज्य करत होते. 

     स्वातंत्र्य पूर्व काळातील छत्तीसगड राज्यातील बस्तर प्रदेशाचे नाव विश्वविख्यात आहे.  एक तर येथील आदिवासींच्या हस्तकलेच्या वस्तू व दुसरे बस्तर मधील दसरा उत्सव. यासाठी जगभरचे प्रवासी तेथे येतात. बस्तरचे आदिवासी राजे  कै.प्रवीरचंद्र भंजदेव यांची कहाणी व त्यांची झालेली हत्या हे खूप मोठे प्रकरण आहे. आपल्या राजाची अशी हत्या सहन होऊन तेथील आदिवासी भूमिपुत्रांनी मोठे आंदोलन त्या काळात सुरु केले होते .आज येथील सधन आदिवासींचे वैभव सहन न झाल्याने आजूबाजूच्या प्रदेशातील माओवाद्यांनी धुमाकूळ घातला असून परवाच आपल्या भारतीय सैनिकांनी 31 माओवाद्यांचा केलेला खात्मा ही बातमी आपण 8 फेब्रुवारी 2025 च्या पेपरात वाचली असेल.

    छत्तीसगड मध्ये भारतीय जवान व माओवाद्यांची चकमक.

  भिलाई कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारत सरकारचा हा एक परिपूर्ण-उद्योग असून येथे लोह-खनिज सफाई पासून ते पोलाद तयार करून त्याचे विविध उपयोगी भागात रूपांतर करणे,अशी सर्व यंत्रणा येथे आहे. विशेषतः भारतीय रेल्वेसाठी लागणारे रूळ, पटऱ्या व इतर पोलादी सामान हाच कारखाना पुरवीत असतो.भिलई व भारत सरकारचे इतर पोलाद कारखाने हे सेल,SAIL, (Steel Authority of India Ltd),),या भारत सरकार निर्मित मंडळाकडून नियंत्रित केले जातात..

पोलाद कारखान्यात खनिजे वितळविण्यासाठी ज्या उच्च तपमानाच्या भट्ट्या असतात,त्यांना ऊच्च तापमान सहन करणारी ग्रीजेस वंगणे लागतात.

     पोलाद कारखान्यांना द्रव स्वरूपातील वंगणे लागतातच तसेच घनस्वरूपातील वंगणे म्हणजे ग्रीजेस ही खूप 

लागतात . लोहाचे खनिज वितळवण्यासाठी व त्याचा रस तयार करण्यासाठी ज्या भट्ट्या (Futnaces),असतात त्यात सुमारे अकराशे-बाराशे डिग्री सेल्सियस एवढे तापमान असते. त्या अतिगरम भट्ट्यांना घर्षण विरहित करण्यासाठी जी ग्रीजेस् लागतात त्यांना हाई-टेंपरेचर ग्रीज असे म्हणतात. आम्हीही अशी वंगणे  बनवीत असू. आम्हाला भिलाई कारखान्याच्या मागणीनुसार आमचे  ग्रीस निवडण्यात वेळ लागला नाही. पोलाद कारखान्यासाठी जळण म्हणून कोळसा लागतो . या कोळशाचे रूपांतर कोल गॅस मध्ये करून त्याची प्रक्रिया खनिजातील  लोखंडाशी  करताना कार्बनमोनॉक्साईड नावाचा विषारी वायू तयार होतो. उत्सर्जित वायु बरोबर तो वातावरणात मिसळल्याने हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. पोलाद पाहिजे तर विषारी वायूही सहन करा अशी आज स्थिती आहे!

 मी दोन किलो ग्रीज सॅम्पल घेऊन मुंबईहून दुपारी  एकच्या सुमारास मुंबई विमानतळावरून निघालो.

दुपारी तीन वाजता रायपूर विमानतळावर पोहोचलो..सहकारी श्री प्रसन्ना व घोषाल भेटले. त्यांचे बरोबर स्थानिक कार्यालयात जाऊन पुढील कार्यक्रमाबाबत गप्पा केल्या. मी आणलेल्या ग्रीजची त्यांनाही कल्पना दिली. त्यावर घेतलेल्या  चाचण्या व प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील कार्यक्षमता चाचणी (Performance Test) चे परिणाम त्यांना दाखविले. त्यांनीही हे ग्रीज भिलाईच्या पोलाद भट्टीत चालू शकेल असा विश्वास व्यक्त केला, तेव्हा बरे वाटले.  

   संध्याकाळी सात वाजता भोजन घेऊन निघायचे व थंड वातावरणात तास दीड तासाचा प्रवास करून भिलाईला पोहोचायचे असे आमचे मनसुबे होते .तेथे रात्री विश्रांती घेऊन दुसरे दिवशी आम्ही भिलाई कारखान्यात कामासाठी जाण्याचे ठरविले होते.

   प्रवास  मोठा नव्हता. मात्र त्यावेळी  रायपूर-भिलाई रस्ता तेवढा चांगला नव्हता.काही भाग जंगलातून व बस्तर या नक्षल चळवळग्रस्त प्रदेशा जवळून जात असल्याने थोडी धास्ती वाटत होती. त्यावेळी त्या जंगल भागात गोंड आदिवासींनी सरकार विरोधी चळवळ सुरू केली होती . त्यांचे राजे महाराज प्रवीरचंद्र भंजदेव यांची पोलिसांकडून हत्या झाली होती. त्याचा जबाब हे आदिवासी निदर्शक मागत होते. नक्षलवादी ही जोर  करत होते. भूमिपुत्र असलेल्या आदिवासींचे  खनिज संपत्तीमुळे आलेले चांगले दिवस नक्षलवाद्यांना पहावत नव्हते. मोठा राजकीय गुंता तेथे निर्माण झाला होता.

  प्रवास लांबचा नसल्याने  अंधार होण्याच्या आत तासाभरात आरामात भिलाईला पोचू या हिशोबाने सावकाश निघालो. दिवस लहान असल्याने सात वाजताही  अंधुक प्रकाश वाटत होता.

  आमच्या रायपूर मधील सहकार् सहकाऱ्यांनी  भाड्याची टॅक्सी ठरवली होती. मात्र त्यांच्या नेहमीच्या ट्रान्सपोर्ट कंपनीने यावेळी इतर ठिकाणी बुकिंग असल्याने, बदली कंपनीची गाडी व ड्रायव्हर दिला होता.

 मार्केटिंग ऑफिसच्या लोकांना नेहमीच गाडीने कामासाठी फिरावे लागते.  त्यांचा ट्रान्सपोर्टर ठरलेला असतो.ड्रायव्हरचे कौशल्य, गाडीची कंडीशन रस्त्याची माहिती हे नेहमीच्या ड्रायव्हरला माहीत असते . विश्वास ठेवता येतो. पण दुर्दैवाने यावेळी तसे न झाल्याने माझ्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकली… ड्रायव्हर चांगला असेल ना.. घाट रस्ता आहे ,या रस्त्याची माहिती असेल किंवा कसे ?…गाडीची सर्विसिंग व्यवस्थित झालेली असेकी कसे ?..अनेक शंका  अशावेळी मनात येतात .पण  इलाज नव्हता .आमच्या सहकाऱ्यांनीच त्याची खातर जमा केली असेल असे धरून चाललो .तसे प्रत्यक्ष विचारणे ही योग्य ठरले नसते.

    मी माझ्या सवयीप्रमाणे ड्रायव्हरच्या जवळील सीटवर पुढे बसलो होतो. माझे मित्र  कुमार व घोषाल  हे मागे बसले होते .बरीच चर्चा दुपारी केली असल्याने तसे बोलण्यासारखे विशेष नव्हते.स्थानिक ऑफिसर श्री.घोषाल यांना या परिसराची बरीच माहिती असल्याने आम्हाला ते विविध ऐतिहासिक माहिती पुरवत होते… या भागाला पूर्वी दंडकारण्य का म्हणत होते.. श्री रामप्रभूंच्या येथील वास्तव्यामुळे जनमानसातील प्रचलित लोककथा, दंतकथा.. परिसरावर नुकतेच राज्य करून गेलेले भंजदेव हे राजपूत राजघराणे, राजेप्रवीर चंद्र भंजदेव यांची नुकतीच झालेली हत्या, इत्यादीवर त्यांचे कथन आम्ही ऐकत होतो… घोषाल ना  इतिहासाजे चांगले ज्ञान होते,ते इतिहासाचे अभ्यासक होते.  वेळ मजेत जात होता. प्रवास थोडा असला तरी परिसरातील असुरक्षित वातावरण ,हिंसक घटना ,दुर्गम रस्ता याची काळजी यावी लागते. त्यांनी आमच्या ड्रायव्हरलाही तशा सूचना देऊन गाडी सावकाश व सुरक्षित चालविण्याची सूचना केली होती.

    प्रवास व्यवस्थित सुरू होता.सर्वजण जागेच होते. कारण थोड्याच अवधीत आम्ही भिलाईला पोचणार होतो. पुढे रस्ता अतिशय खराब होता. काही ठिकाणी रस्त्याचे काम  चालू होते. खाचखळग्यातून जाताना थोडे धक्केही बसत होते. प्रवासात असे होणारच, अशी भावना असल्याने कोणीही त्याबद्दल तक्रार करीत नव्हते. काही ठिकाणी  नेहमीचा रस्ता बंद असल्याने पर्यायी कच्चा रस्ता तयार केला होता. त्या रस्त्याच्या कडेला मातीचे व बारीक खडीचे ढीग रचून ठेवले होते.रस्त्यापलीकडे डावी बाजूस खोल दरी होती. अंधारी रात्र होती.त्यामुळे संध्याकाळ असूनही निर्जन वातावरण भयानक वाटू लागले होते.. दोन्ही बाजूस असलेल्या घनदाट वृक्षांची सावली काळोखाची तीव्रता अधिकच वाढवत होती. माझ्या मनावर  का कोण जाणे ,कुठेतरी भीती चे सावट पडले होते . नको ते विचारही त्यामुळे मनात येत होते  ..  निर्जन जंगलातील  एकांत, कच्चा रस्ता, अंधारातील  प्रवास , पहारेकर्या सारखे उभे असलेले ते खडीचे डोंगर ,बाजूला दरी आणि हा नवखा ड्रायव्हर… प्रवास प्रवासात काही विघ्न तर निर्माण होणार नाही ना ..?असे विचार मधून मधून येत होते … कधी एकदा हा दीड दोन तासाचा प्रवास संपून भिलाई शहर लागते असे वाटत होते..! घोषाल कडून ऐकलेल्या लुटारूंच्या कथा ऐकल्या मुळे ही भीती अस्वस्थ करीत होती.मनातल्या मनात देवाची  प्रार्थना ही चालू होती!! …

  मी माझ्या अनेक प्रवासात  विविध अनुभव घेतले आहेत!  ड्रायव्हरचे शेजारील सीटवर पुढे बसून ड्रायव्हरशी गप्पा मारत त्याला सजग सावधान ठेवण्याचा प्रयत्न मी करीत असतो. आज-काल कार मध्ये टेप रेकॉर्डर, मोबाईल फोन, लहान टेलिव्हिजन ही असतात , त्यावेळी हे असे काही नव्हते. दूरच्या प्रवासात काही वेळेनंतर  आपोआपच सर्वजण निद्राधीन होऊन जातात व ती शांतता कधी कधी धोकादायक ठरते.

    गार वारा वाहत होता. बाहेरील वातावरण ही शांत सुंदर होते .गाडी हळूहळू तरी तीस-पस्तीस किलोमीटर वेगाने जात असावी. कच्चा रस्ता व रस्त्यातील खड्ड्यामुळे वेग कमी होता. 

  मी प्रवासाचा आनंद घेत होतो … न जाणे एवढ्यात काय झाले… आमची गाडी कसला तरी खर्र..खर्र..धप्प.. असा आवाज करीत जागीच थांबली आम्ही आमच्या सीटच्या मागील बाजूस कलंडलेलो आहोत ..गाडी रस्त्याला समांतर न दिसता ती 40- 45 अंश कोनात उभी आहे …डॅशबोर्ड वरील सामान अंगावर पडले आहे…  मागे जात असणारी गाडी ब्रेक लावून थांबवण्याचा प्रयत्नात ड्रायव्हर धडपडत आहे.. गाडीचे हेडलाईट आकाशाकडे गेल्याने भोवतालचा  अंधार अधिकच दाट झाला होता .. गाडीतील व बाहेरील काहीच दिसत नव्हते.. काय झाले काहीच कळेना, सर्व क्षणार्धात झाले होते !! हे सत्य आहे की झोपेतील स्वप्नात झालेला भास आहे हेही  समजेना …सर्वांनी एकमेकांना हाक मारल्यावर सर्वजण जागे आहेत एवढे तरी कळले… मला गाडीतून बाहेर येणे शक्यच नव्हते कारण मी पुढे बसल्याने जवळजवळ खाली डोके वर पाय अशी स्थिती झाली होती.. कमरेला पट्टा असल्याने सीटवरच होतो. कोसळलो नव्हतो. मी व्यवस्थित आहे याचेही बरे वाटले..!

  मागे बसलेल्या दोन सहकाऱ्यांनी कमरेला पट्टे बांधलेले नसल्याने व जास्त मागे कललेले नसल्याने त्यांनी गाडीचे मागील दोन दरवाजे उघडले व गाडी ला मागून आधार देत, हळूहळू गाडी रस्त्यावर व्यवस्थित उभी केली.आता  गाडीचा प्रकाश रस्त्यावर पडल्याने भोवतालक्षा परिसर व्यवस्थित दिसत होता… काय झाले होते ते चित्र हळू हळू स्पष्ट होऊ लागले ..कोणत्या जीवघेण्या संकटातून आम्ही वाचलो होतो ते कळले….!! ..

    त्या अंधाऱ्या रात्री गाडीचा प्रकाश हाच  निबिड निर्जना रानातील  ऊजेड होता.…आमची गाडी डावीकडे रचलेल्या एका दगडांच्या मोठ्या राशीवर धडकल्याने तिरपी झाली होती. मात्र पुढे न जाता थांबल्याने दरीत कोसळली नव्हती. ड्रायव्हरने तत्काळ ब्रेक मारल्याने  जास्त पुढे गेली नव्हती.. तशी गेली असती तर ती अंधाऱ्या दरीतच कोसळली असती… दुसरा दैवयोग म्हणजे दगडांच्या राशींतील फटी मधून गाडी  गेली असती तर थांबण्याचा प्रश्नच नव्हता ..सरळ कपाळमोक्षच होता… काय झाले असते याची कल्पना करवत नाही!!आजही  अंगावर काटे येतात तर  त्यावेळी काय वाटले असेल ..??

    कुठेही न खरचटता आम्ही स्वस्थ आहोत ही कल्पना सुखद होती. आम्ही एका गर्द जंगलात एकाकी आहोत या भितीपेक्षा धडधाकट राहिलो आहोत हा आनंद जास्त सुखद होता!. विचित्र मनस्थिती होती… 

 “जंगलातील त्या भयानकतेत मी एकटा नाही आम्ही  चार जण आहोत..”, ही कल्पनाच देखील  उमेद देऊन गेली. 

   प्रथम गाडीची चोहोबाजूने पाहणी केली. सुदैवाने गाडीला काही इजा झाली नव्हती. ड्रायव्हरला पाणी पाजून शांत केले. त्याला आपली चूक कळली होती. तो काहीच बोलत नव्हता. आपल्या चुकीची सफाई देखील त्याला द्यायची नव्हती. त्याला ओरडण्यात अथवा दोष देण्यात त्यावेळी तरी काही अर्थ नव्हता.. .शांतपणे विचारले, “क्या हुआ . ?”

त्याने हात जोडून माफी मागितली. “ साब मेरी गलती हुई..” म्हणाला ,”साहेब मी काल पासून सतत 24 तास ड्युटी करतो आहे. काल दुपारी घरी आलो. थोडीशी एक दोन तास झोप मिळाली. तेवढ्यात  मालकाकडून संध्याकाळी सहा वाजता, आपल्याला भिलाईस नेण्यासाठी मला सांगावा  आला. काय करू? ओव्हर टाईम मिळवण्यासाठी हे करावे लागले. इतर ड्रायव्हर रजेवर आहेत त्यामुळे क्वचित ओ टी ची अशी संधी मिळते. घरात कमावणारा मी एकटा. म्हातारे आई-वडील, बायको व दोन लहान मुले. अपुऱ्या पगारात सर्वांचे भागत नाही. दोन दिवस रात्रीची झोप नाही..

 पापी पेट के लिये करना पडता है….साब क्षमा चाहता हु..!!”

   त्याला जास्त काही बोलण्यात, दोष देण्यात अर्थ नव्हता.

   आमच्या घोषाल साहेबांनी गाडीचे स्टेरिंग हातात घेतले. ड्रायव्हरला पुढे बसवून मी व प्रसन्ना मागे बसलो. गाडी भिलाई गेस्ट हाऊस मध्ये आली. ड्रायव्हरला ही रात्री तेथे झोपण्यासाठी सोय केली. त्याच्या मालकाला फोन करून झालेली सर्व कहाणी थोडक्यात ऐकवली. तो खजिल झाला मात्र शेवटी ट्रान्सपोर्ट हा त्याचा  धंदा होता. त्याने ड्रायव्हरलाच दोष दिला… “ड्रायव्हर ने गाडी चलाने की उम्मीद दिखाइ. नही तो कोई दुसरे की हाथ मे गाडी सौपता!!”  त्याचे  शांतपणे व्यावसायिक उत्तरा!!

अशा खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून आमची गाडी जात होती!

     दुसऱ्या दिवशी भिलाई कारखान्याच्या प्रयोगशाळेत जाऊन ग्रीज च्या चाचण्या घेतल्या. ठीक आल्या. भोजनानंतर ‘परफॉर्मन्स टेस्ट’ सुरू केली .ती सुमारे महिनाभराची होती. पण प्रयोगशाळेतील चाचण्यावरून ती नक्की चांगली येईल याची खात्री  क्वालिटी कंट्रोल खात्याला आली. विशेष म्हणजे त्यावेळी या कारखान्याच्या प्रयोगशाळेचे प्रमुख श्री काळे नावाचे मराठी अधिकारी होते. म्हणूनच त्यांचे नाव मला आजही आठवत आहे. खूपच  हुशार व कार्यक्षम असे ते अधिकारी होते. अशा ठिकाणी आपला मराठी माणूस भेटला तर त्याचा खूप आनंद होतो. कामातही सहाय्य मिळते .

  काळे साहेबांना आम्ही कालची  घटना सांगितली. “तुम्ही केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलात..” त्या भागात गेल्या काही दिवसात झालेल्या अपघातांची यादीच त्यांनी आम्हाला सांगितली.  ”जाताना व्यवस्थित जा”, अशा शुभेच्छा देण्यासही ते विसरले नाहीत.

त्यांचा निरोप घेऊन संध्याकाळी परत रायपुरला आलो तेथून रात्री मुंबई गाठली.

    आमच्या अपेक्षे नुसार व काळे साहेबांनी भाकीत केल्याप्रमाणे आमचे,’ हाय टेम्परेचर ग्रीज’, भिलाई पोलाद कारखान्यात झालेल्या तात्कालिक व दीर्घ मुदतीच्या चाचण्यात पास झाले. पुढे आमच्या या वंगणाचा पुरवठा भिलाई ला व्यवस्थित होऊ लागला हे सांगणे न लगे!!

      याआधी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ‘डुलकी पुराण’ ऐकले होते. वाचले होते. हसण्यावारी नेले होते. पण आम्हाला प्रत्यक्ष आलेल्या या अनुभवामुळे त्याची भयानकता आता कळली होती.

   पुढेही प्रवास तर चालूच राहिला. मागे झालेल्या घटना व चुका यावरून शिकत गेलो.काळजी घेत राहिलो. तेवढेच आपल्या हाती असते. 

   जे काही होणार असते ते परमेश्वरी ईच्छेनुसार! आपण हिम्मत न हारता पुढे जात राहायचे.म्हणायचे . ..

   “जिंदगी एक बार मिलती है…”

  बिल्कुल गलत है!

सिर्फ मौत एक बार मिलती है,

 जिंदगी हर रोज मिलती है !!

  …बस जीना आना चाहिए!!

23 02.2025.