“मुद्दई लाख बुरा चाहे ..” कोइंबतूर!

  कोइंबतूर विमानतळ

    अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं ,

     सुरक्षितं दैवहतंविनश्यति।

    जीवत्यनाथोऽपि वने विसर्जितः,

      कृतप्रयत्नोऽपि गृहे न जीवति॥ 

   “ज्याला दैवाचे रक्षण आहे, त्याला मानवी रक्षण व्यवस्था नसली तरी तो संकटातून वाचतो. कडेकोट संरक्षण व्यवस्थेत असलेल्याला दैवातच नाश असेल तर तो चुकत नाही. वनात सोडून दिलेले असहाय अर्भक जगते तर घरातल्या सुरक्षित व्यवस्थेत असलेला स्वावलंबी मनुष्य, वेळ भरल्यावर स्वतःला वाचवू शकत नाही…”

   याच सुभाषिताचे मराठीतील एका वाक्यातील सार म्हणजे 

 “ देव तारी त्याला कोण मारी ?” व त्याचे उलट ‘देव मारी त्याला कोण तारी ?”

असे सांगता येईल. आपल्या दैनंदिन जीवनात याचा प्रत्यय देणारे अनेक प्रसंग आपण अनुभवीत असतो , पहात असतो. आपल्याला या सुभाषिताची सत्यता पटते.

         माझ्या आजवरच्या विविध प्रवासात इतरांच्या जीवनात आलेले  अनेक प्रसंग पाहीले  व काही मी स्वतःही  अनुभविले..!

  त्यातील ही एक घटना ..दक्षिण भारतातील चेन्नई राज्यात कोईंबतुर ला कंपनीच्या सरकारी कामासाठी जावे लागले. तेथे आलेला हा अद्भुत अनुभव !!

डीलर सिलेक्शन बोर्ड  तीन कंपन्यांचे लोगो.

    

कोइंबतूर म्हणजे आपल्या दक्षिण भारताचे मँचेस्टर!तेथे कापड धंदा खूप जोरात चालतो. आमच्या ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी तेथे दोन भेटी झाल्या होत्या. ही तिसरी भेट 1995 च्या सुमारास  ऑक्टोबर महिन्यात झाली असावी. मी त्यावेळी  डीएसबी (Dealer Selection Board) म्हणजे डीलर सिलेक्शन बोर्डावर आमच्या कंपनीचा प्रतिनिधी  म्हणून काम करत होतो. माझे नेहमीचे काम तर सांभाळावे लागे पण जेव्हा कधी या नेमणुका असतात तेव्हा मुलाखतीसाठी भारतात कोठेही जावे लागे.

    डीएसबी म्हणजे भारत सरकारने स्थापन केलेली एक केंद्रीय समिती असून त्यावर सरकारी कंपन्यांचे प्रतिनिधी डेप्युटेशनवर काम करीत असतात. मुख्य कार्यालय भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयात असून प्रत्येक राज्यात उपकार्यालये आहेत. राज्यातील पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, केरोसीन, डांबर ई. घाऊक पद्धतीने विकण्यासाठी हे वितरक नियमावयाचे असतात. रिटेल आउटलेट निवडीचे काम मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशानुसार उपकार्यालये करीत असतात. डीलर सिलेक्शन बोर्डाच्या निवड समितीत  त्या राज्यातील हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश अध्यक्ष म्हणून काम करतात . त्यांचे शिवाय तीन  सरकारी पेट्रोलियम कंपन्यांचे (इंडियन ऑइल कार्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन व भारत पेट्रोलियम कार्पोरेशन) प्रत्येकी एक असे तीन प्रतिनिधी असतात. प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी ज्या कंपनीची रिटेल आउटलेट ( पेट्रोल पंप) आहे त्या कंपनीचा एक प्रतिनिधी , बाकीच्या दोन मधून एक प्रतिनिधी व न्यायमूर्ती असे तीन जण असतात. कमिटी मुलाखती द्वारे तीन उमेदवारांना शॉर्टलिस्ट करते .त्यातून उमेदवाराने अर्जात  पुरविलेल्या माहितीचे प्रत्यक्ष अवलोकन करून एक उमेदवार कंपनीचा त्या भागातील डीलर म्हणून निवडला जातो. 

  ही अत्यंत महत्त्वाची तसेच संवेदनाक्षम अशी कमिटी होती. विशेषतः जास्तीत जास्त भ्रष्टाचार हा या नेमणुका करतानाच होत असल्याने कंपनी आपल्या निस्पृह प्रामाणिक व कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही अशा अधिकाऱ्यांची नेमणूक कमिटीवर करी.या समितीवर निवड होणे हा त्या अधिकाऱ्याचा गौरव समजण्यात येई.  कंपनीने त्याचेवर दाखविलेल्या विश्वासाचे ते प्रतीक असे.अशा निवडीत भ्रष्टाचार अपेक्षितच होता. कारण पेट्रोल पंपाची डीलरशिप म्हणजे त्यावेळीही आणि आजही दुभती कामधेनू आपल्या अंगणात असण्यासारखे होते. त्यासाठी हायकोर्ट दर्जाच्या माजी न्यायमूर्तीना अध्यक्ष म्हणून नेमले गेले होते. बोलू नये, पण आलेल्या अनुभवावरून, उडीदा माजी काळे-गोरे असतातच  मग न्यायमूर्ती मध्ये काळे  उडीद नसतील का? पुढील प्रसंगावरून त्याचा उलगडा व्हावा. निर्णय आपण घ्यावा? 

   भारत सरकारकडून केली जाणारी ही नेमणूक सन्मानाची होती तशीच अत्यंत जोखमीची होती. कारण डीलरशीप नाकारली गेलेल्या काही विघातक वृत्तीच्या उमेदवारांनी  सरकारी अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी घातपात केल्याची उदाहरणे देखील घडली होती त्यामुळे खूप खूप सावधगिरीने ही काम करावे लागे. 

     या नेमणुकीमुळे मला भारतातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ न्यायमूर्तींच्या सहवासात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे भाग्य मिळाले. त्यांचा येथे उल्लेख करून त्यांच्या निस्पृहतेचा  गौरव करणे हे मी माझे कर्तव्य समजतो.

   त्यातील काही ठळक नावे म्हणजे न्या. काझी ,न्या. शहा (मुंबई हायकोर्ट),न्या.सावंत (औरंगाबाद), न्या. पांडेय (इलाहाबाद,), न्या. खेहर( चंदिगड) ही  आज आठवत असलेली नावे!

    प्रत्येक न्यायमूर्तीची काम करण्याची पद्धत, त्यांची धार्मिक; सामाजिक बैठक, आम्हा दोन सरकारी अधिकाऱ्यांना सलगी देण्याची रीत सारेच  वेगळे होते. कोर्टामध्ये न्याय देताना दिसणारे न्यायमूर्ती व एक  वरिष्ठ सहकारी म्हणून काम करताना दिसणारे न्यायमूर्ती ही दोन वेगळी रूपे असतात. जवळीकीमुळे न्यायमूर्ती एक माणूस म्हणून ही किती श्रेष्ठ असू शकतात याची त्यावेळी जाणीव होते. 

    आमच्या भारतीय न्यायसंस्थेला खूप जुनी वैचारिक व निस्पृह न्यायमूर्तींची परंपरा आहे.  आजही असे न्यायमूर्ती पहावयास मिळतात. मी त्यांना पाहिले. त्या वैभवशाली  परंपरेला वृद्धिंगत करणारी ही मंडळी होती. प्रत्येक वेळी मला त्यांचेकडून खूप काही शिकता आले. पुढेही मी कमिटीत नसताना या श्रेष्ठानशी माझा संपर्क राहिला .थोडे विषयांतर करूनही मला भेटलेल्या या न्यायदेवतांच्या आठवणी थोडक्यात सांगतो.

संत ज्ञानेश्वरांनी जेथे बसून ज्ञानेश्वरी सांगितली तो  हा परमपवित्र पैस खांब ,नेवासे.

   औरंगाबादचे न्या. सावंत साधे सरळ दिलखुलास गृहस्थ होते. काम संपल्यावर एके दिवशी सकाळी फराळ करण्यासाठी घरी आम्हाला बोलविले. आपल्या कुटुंबाशी ओळख करून दिली. नेवासे एथील प्रसिद्ध पावन, पैस मंदिरात मला घेऊन गेले. त्या अतिपावन पत्थराचा स्पर्श आम्हाला घडविला . याच दगडाच्या आसनावर बसून ज्ञानोबांनी अजरामर ज्ञानेश्वरी सांगितली. जगाच्या दृष्टीने तो एक दगड पण त्यावर मी  माथा टेकवीला.. जणू आपल्याला आज प्रत्यक्ष महाराजांचा परिसस्पर्ष  झाला आहे,अशा कल्पनेने अंग अंग रोमांचित झाले!

    न्यायमूर्ती काझी हे धर्माने मुस्लिम.  पहिल्या दिवशी सकाळी त्यांना भेटण्यासाठी आम्ही हॉटेलच्या खोलीवर  गेलो .. दार उघडून पाहिलेले दृश्य अचंबित करणारे होते..? ..काझीसाहेब खाली बसून गीतेचे पठण करीत होते. समोर श्रीकृष्णाची मूर्ती होती. एक मुस्लिम धर्मीय माणूस म्हणजे कुराण पढणारा आणि दिवसातून तीन वेळा नमाज अदा करणारा कट्टर अशीच आपली कल्पना असते. ते दृश्य बाबांना आम्ही तर अचंबित झालो .ते  म्हणाले,

  ”गीतेने जो न्याय शिकविला, तो माझ्या विधी महाविद्यालयात शिकून कायद्याच्या परीक्षा पास होऊन ही समजला नाही. गीता हीच माझी  गुरु. म्हणून तिचे सकाळी पठण..”

   न्यायमूर्तीनी आम्हाला संस्कृतातील गीतेच्या काहीओळी धडाधड म्हणून दाखविल्या!  खूप मोठा माणूस !!

  न्या. पांडेय हे देखील एक दिलखुलास दिलदार  व्यक्तिमत्व. अलाहाबाद हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती.  अलाहाबादला मुलाखतीसाठी गेलो असताना आमचे अध्यक्ष. मी महाराष्ट्रातून आलो आहे हे ऐकून मला संपूर्ण ईलाहाबाद दर्शन आपल्या गाडीतून करविले. एके दिवशी सकाळी  स्वतःबरोबर खास छोट्या बोटीत बसवून अलाहाबादच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमावर घेऊन गेले.  स्वतःही स्नान केले मलाही स्नान घडविले.आज कुंभस्नान करणाऱ्या भाविकांची दृश्ये पाहताना मला एका निस्पृह न्यायमूर्ती बरोबर  पवित्र त्रिवेणी संगमात मिळालेले ते स्नान भाग्य मी कसे विसरू ?

  दिल्लीला भेटलेले न्या. खेहर सुद्धा भारतीय न्यायव्यवस्थेच्या महान परंपरेतील न्यायमूर्ती. काम संपल्यावर संध्याकाळी त्यांच्या क्लब मध्ये घेऊन जात व आम्हाला सुंदर सामिष भोजन खिलवित.

   आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मंडळींनी उमेदवार निवडीच्या कामात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ केली नाही.

   ‘तुम्ही  तज्ञ आहात, तुम्ही सांगाल त्याच उमेदवारांना मी पहिले तीन क्रमांक देईन’ असे म्हणत.

   न्यायमूर्ती म्हणून ते श्रेष्ठ होतेच पण एक माणूस म्हणूनही खूप मोठे होते! कोर्टात न्यायदेवतेचा डगला घालून बसलेला न्यायाधीश  डगला  उतरून ठेवल्यावर कसा असावा याची ती मूर्तीमंत उदाहरणे होती!!

 सामान्यतः न्यायमूर्ती म्हणून जे एक भय वाटते ते त्यांच्या जवळ गेल्यानंतर अजिबात निघून गेले. त्यांच्या सानिध्यातील तो माणूसकीचा सुगंध आजही आठवणीतून मला जाणवत असतो. त्याची थोडी झलक पेश केली.

  एवढे विषयांतर करण्याचे कारण त्या शानदार हिऱ्यांच्या खाणीत काही गारगोटेही भेटले. चमकणाऱ्या तार्‍यात धूमकेतूही दिसला.. !

 तोच हा एक अनुभव!

   अय्यप्पन मंदिर कोईंबतुर. प्राचीन शिल्पकलेचा नमुना

     हा प्रसंग चेन्नई राज्यातील कोईंबतुर येथे घडला. आमच्या कंपनीला त्या विभागात एक डीलरशीप द्यावयाची होती. आमच्या कंपनीतर्फे मी व दुसऱ्या कंपनीचे श्री. रविकांत झा हे अधिकारी कोईमतूरच्या ‘हॉटेल अलंकार’मध्ये आदले दिवशी आलो होतो. निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून केरळ हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती होते. त्यांचे नाव मी प्रसिद्ध करू इच्छित नाही. ते महानुभाव आमच्याच हॉटेलात उतरले होते. मुलाखती त्याच हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्ये होणार होत्या.

    कोइंबतूर हे तामिळनाडूमधील खूप पुरातन शहर असून त्याची निर्मिती  तिसऱ्या शतकातील आहे .या भागावर राष्ट्रकूट ,होयसाळ, चोला इत्यादी प्रसिद्ध राज वंशांनी राज्य केले. त्यामुळे शहराला एक भारदस्तपणा आहे. जुन्या शिल्पकलेचा दाखला प्रस्तृत करणारी अनेक सुंदर मंदिरे आहेत.कोयंबतुरला   दक्षिण भारताचे मँचेस्टर असे म्हणतात. कारण येथील कापूस पीक उत्पादन व दमट हवा यामुळे वस्त्रोद्योगाचे अनेक कारखाने येथे आहेत.  झपाट्याने औद्योगीकरण सुरू असलेले  ते शहर आहे. जवळच उटी हे थंड हवेचे ठिकाण असल्याने एक पर्यटन स्थळ म्हणूनही अनेक प्रवासी येथे भेटी देतात.

     दक्षिणेचे मँचेस्टर ..एक सूतगिरणी.

    दुर्दैवाने त्यावेळी आमच्या भारत सरकारच्या पेट्रोलियम खात्याचे मंत्री हे दाक्षिणात्य होते.  त्यांचा हट्टीपणा व पैशाची लालसा यामुळे पुढे सांगत असलेला प्रसंग उद्भवला होता. मंत्र्यांना आपल्या नात्यातील एका  कार्यकर्त्याला कोईमतूर मधील हा पेट्रोल पंप बहाल करावयाचा होता. त्याप्रमाणे फिल्डिंग लावली गेली होती. आपल्या मर्जीतील न्यायमूर्तींना त्यांनी तशा सूचना केल्या होत्या. निवड प्रक्रिया केवळ देखावा करावयाचा होता. … कमिटीत एक सभासद डी डब्ल्यू राऊत आहे हे त्यांना माहीत नव्हते!!

      आमच्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार इंटरव्ह्यूच्या दिवशी सकाळी  अध्यक्ष महोदय न्यायमूर्तींची ओळख करून  घेण्यासाठी त्यांच्या खोलीवर गेलो. त्याआधीच्या शिरस्त्यानुसार अध्यक्ष न्यायमूर्ती आम्हा दोन सदस्यांनाच संपूर्ण स्वातंत्र्य देत त्यामुळे वादाचा प्रश्न येत नसे… उत्कृष्ट उमेदवारच निवडला जाई.

  त्यादिवशी मात्र अचानक, डीलर नेमणूकीत कधीही न घडलेले नवल वर्तले..!!  अध्यक्ष न्यायमूर्ती आम्हा दोघांना म्हणाले,

   “ही तीन नावे लिहून घ्या. यांना आपणास शॉर्टलिस्ट करावयाचे आहे  त्यातील पहिल्या नंबरच्या उमेदवाराला डीलरशिप दिली गेली पाहिजे. पेट्रोलियम मंत्री महोदयांची तशी इच्छा आहे….”

   मी तर ते ऐकूनच उडालो. काय प्रतिक्रिया द्यावी कळेना. माझे दुसरे सहकारी मित्रही  गप्प होते. कारण डीलर आउटलेट त्यांच्या कंपनीची नव्हती. हा पेट्रोल पंप आमच्या कंपनी मार्फत दिला जाणार होता . तेथे उत्तम जाणकार  व्यक्ती नेमली जाईल हे पाहणे माझे कर्तव्य होते .

   माझ्या डोक्यात सणक गेली.. मला बोलणे जरूर होते.

   “सर, मला हे ठीक वाटत नाही” मी  म्हणालो.

न्यायमूर्तींना हे विधान अनपेक्षित होते. मंत्र्यांचे नाव घेतल्यावर कोण कशाला बोलेल, ही त्यांची स्वाभाविक अपेक्षा!

   हर तऱ्हेने ते मला त्यांनी सुचविलेल्या उमेदवारांनाच निवडण्याची पुन्हा पुन्हा विनंती करीत होते. पुढे तर त्यांची भाषा दहशतीची होऊ लागली. पेट्रोलियम मंत्र्यांची दहशत दाखवून मला म्हणाले ,

    “अरे बाबा कशाला असा अविचार करतोस तसे नाही केले तर तुझी  नोकरी पण जाऊ शकेल, याची कल्पना आहे काय?

न्यायमूर्तीचा आग्रह थांबेना तेव्हा मी त्यांना विनंती केली, “आपण इंटरव्यू सुरू करूया . शिफारस करीत असलेले उमेदवार कदाचित चांगलेही असतील. मग प्रश्नच येणार नाही ..”न्यायमूर्ती मानले!

    मुलाखती दहा वाजता सुरू झाल्या .सुमारे 25  उमेदवार होते. दोन दिवसांचे काम होते. सकाळचे सत्र व्यवस्थित पार पडले . अजून मंत्री पुरस्कृत उमेदवार आले नव्हते. दुपारच्या भोजनानंतर पहिल्यांदाच मंत्री महोदयांचा उमेदवार आला. मुलाखत झाली. सदगृस्थांना पेट्रोलियम व्यवसाय व विशेषतः रिटेल आउटलेट चा व्यवसाय कसा करतात याचे काहीही  ज्ञान नव्हते .केवळ “M”पाॅवरवर  त्यांना ही डीलरशिप हवी होती. त्यासाठी  जे करावे लागते ते केले होते. फिल्डिंग लावली होती. त्या उमेदवारांना निवडावे असे मलाअजिबात वाटत नव्हते .. आणि आता प्रश्न आला होता..!

      ती मुलाखत झाल्यानंतर न्यायमूर्ती महोदयांनी  आमच्या तिघांच्या मार्कांची पाहणी केली. श्री. झा यानी 40, मी 30 तर न्यायमूर्तींनी शंभर मार्क दिल्याने एकूण 170 गुण या उमेदवाराला मिळाले होते . या उलट या आधीच्या काही उमेदवारांना आम्ही प्रत्येकी  90 ,90 व अध्यक्षांनी शून्य देऊन ही एकूण180 मार्क झाले होते. विशेष म्हणजे अध्यक्षांनी इतरही सर्वच उमेदवारांना सरसकट फक्त दहा मार्ग दिले होते. या टाकाऊ उमेदवारास शंभर मार्क दिले होते. हा सरळ सरळ पक्षपात होता. पणआम्ही काहीच बोलू शकत नव्हतो.. 

  या देशाच्या हायकोर्टाचे  एक माजी न्यायमूर्ती हा न्याय करीत होते.. हे कोणत्या कादंबरीचे कथानक नसून प्रत्यक्ष वस्तू स्थिती होती.

  न्यायमूर्तींनी मला विशेषतः श्री झा यांना या उमेदवाराचे मार्क वीस-तीस तरी वाढविण्याची विनंती केली. जास्त आग्रह झा यांना होत होता. कारण मला तर त्यांनी ‘ओवाळून टाकले’ होते. यांनी देखील एकदा दिलेले मार्ग वाढविण्यास नकार दिला कारण त्यातील धोका त्यांनाही कळला होता .

  श्री. झा यांचे मी मनःपूर्वक आभार मानले. इंटरव्ह्यू थोडा वेळ बंद झाल्या.आम्ही अध्यक्षांचे प्रस्ताव स्विकारण्यास नकार दिल्याने अध्यक्षांनी आपल्या अधिकारात दुपारच्या सत्रातील इंटरव्ह्यू बंद  केल्या. एव्हाना बाहेरही खूप गोंधळ  चालू झाला होता. आम्ही खोलीत बसून राहिलो. अध्यक्ष खोलीबाहेर गेले.त्यांनी बाहेर जाऊन काय जादू केली कोण जाणे मात्र दहा-पंधरा मिनिटात बाहेरील सर्व आवाज बंद झाले होते…

  अर्थातच भाषेची अडचण असल्यामुळे आम्हा  दोघांना बाहेर  काय चालले आहे व न्यायमूर्ती कोणती जादूची कांडी फिरवून आल्यामुळे घोंगाट बंद झाला, कळत नव्हते  भीतीही  वाटू लागली होती.

   थोड्या वेळाने न्यायमूर्ती आमच्या खोलीत येऊन बसले. न्यायमूर्तींचा सेक्रेटरी मोबाईल फोन घेऊन खोलीत आला. फोन हातात घेऊन न्यायमूर्ती मला म्हणाले, “मिस्टर राऊत हा फोन दिल्लीहून पेट्रोलियम सेक्रेटरी यांचा आहे. आपण बोला…”

 मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. हे गृहस्थ बाहेर राहून काय करून आले होते ते आता कळू लागले होते.

    सेक्रेटरी महाशय  माझ्याशी इंग्रजीत बोलू लागले.. त्यांचा स्वर क्रुद्ध होता..

 ”मिस्टर राऊत, आपण काय करत आहात त्याचे भान आपणास आहे काय? आपण पुन्हा विचार करा. मला वाटते आपण न्यायमूर्तींना पूर्ण सहकार्य द्यावे व हा प्रश्न पुढे नेऊ नये.“ पुढे नेऊ नये ,या वाक्याचा मला अर्थ कळेना.

 आणि पुढे कोण मला जाब विचारणार आहे? प्रत्यक्ष मंत्री महोदय एवढ्या क्षुल्लक कामासाठी माझ्याशी बोलतील?

 फोन ठेवल्यावर पुढचे चित्र दिसू लागले होते.. एकतर अडाणी माणसाला डीलर म्हणून स्वीकारावे अथवा नोकरी गमावावी .. बापरे..मुंबईत काही दिवस नोकरीशिवाय राहावणे..माझी मुले लहान आहेत.. पत्नी नोकरी करीत नाही … चला न्यायमूर्तींच्या नावाला हो सांगत प्रश्न मिटवून मोकळे होऊया..पण नाही.. आप्पां चित्रे गुरुजी या माझ्या गुरुजींना काय वाटेल?… होऊन जाऊ दे .. व्हायचे ते होईल ,हाच विचार पक्का झाला होता..! 

फोन बंद झाला. न्यायमूर्तींच्या हातात दिला. खोलीत वर पहात गप्प बसून राहिलो. न्यायमूर्ती तो फोन घेऊन पुन्हा बाहेर गेले. सहकारी मि. झा देखील आता थोडेसे डळमळीत झाल्यासारखे वाटले. म्हणाले, “ राऊत आपण मार्क वाढवूया का? चालले आहे ते ठीक वाटत नाही .”

   मी स्पष्ट नकार दिला. म्हणालो, “आपण मला साथ द्या. मी संपूर्ण जबाबदारी माझ्यावर घेत आहे. मात्र तुम्हाला जे योग्य वाटेल ते करूशकता”

  काय करावे मी विचार करीत होतो. वाघाच्या गुहेत प्रत्यक्ष वाघाशीच पंगा घेतला होता. 

    तेवढ्यात न्यायमूर्ती महोदय तोच मोबाईल घेऊन परत माझ्या जवळ आले. म्हणाले,

  “ मिस्टर राऊत, मंत्री महोदय लंडनहून बोलत आहेत बोला…”

  मला काहीही बोलण्याची संधी न देता पलिकडून इंग्रजीतून बोलणे ऐकू आले..

   “ मिस्टर राऊत ,आपला निर्णय बदलावा, अशी मी फक्त एकदा आज्ञा करीत आहे. पेट्रोलियम मंत्री म्हणून ही ऑर्डर आहे असे समजा.  शेवटी निर्णय तुमचा…” फोन बंद!!

प्रत्यक्ष मंत्री महोदयांशी पंगा .. ज्यांच्या दिल्लीतील केवळ एका फोनने मुंबईतील ऑफिसात आमचे  चेअरमनही थरथरतात, त्यांची  ऑर्डर मी चक्क धुडकावत आहे!

 वनराज सिंहाशी  वैर आणि तेही त्याच्या गुहेत!! प्रसंग कठीण होता …पण अशा गोष्टींना आयुष्यात यापूर्वी अनेक वेळा मी तोंड दिले होते.  

  सत्सदविवेक बुद्धीला स्मरून जेव्हा  काम होते तेव्हा विजय हा सद्बुद्धीचा होतो, असा अनुभव होता!

माझ्यासाठी When the going gets tough, the tough get going”… हा जुना अनुभवा होता! आता पुढे जे होईल ते पाहावयाचे होते.  न्यायमूर्ती महाशयांना, “मी माझा निर्णय बदलू इच्छित नाही ..”एवढे बोलून थांबलो .क्षणभर हॉलमध्ये स्तब्धता पसरली. न्यायमूर्तींनी  ”आजच्या इंटरव्यू संपल्या आहेत,” असे जाहीर करून ते तडातडा हॉल मधून बाहेर पडले. 

 आम्ही दोघेही काही वेळ शांतपणे बसून हॉल बाहेर पडलो. बाहेर पाहतो तो जमाव जरी शांत होता तरी काही नजरा द्वेषाने आमच्यावर रोखल्या होत्या.

 ‘ मिस्टर राऊत कोण हे त्यांना समजले असावे म्हणून कोणी पुढे आले नाही. आम्हीही तेथे जास्त न थांबता आमच्या  हॉटेलवर निघून आलो .

              अलंकार हॉटेल ,कोईंबतुर 

    मी व श्री. झा यांनी  माझ्या रूम मध्ये बसून चर्चा केली. न्यायमूर्ती व  मंत्री महोदय या दोघांचाही रोख माझ्यावरच होता. कारण  मंत्री महोदय केवळ माझ्याशीच बोलले होते. तेही फक्त ऑर्डर देण्यासाठी. या सर्व गोंधळाला मीच जबाबदार आहे, अशी जाणीव न्यायमूर्तींनी जमावाला व  पेट्रोलियम मंत्र्यांना करून दिली होती हे निश्चितच! “

“आता पुढील सर्व महाभारताला मीच जबाबदार राहीन, आपण काहीही काळजी करू नका..” असे श्री झा यांना मी आश्वासित केले. ते त्यांच्या खोलीत निघून गेले.

   अर्थातच प्रकरण प्रत्यक्ष मंत्र्यांपर्यंत  गेले होते. त्यांना लंडनहून खास फोन करावा लागला होता. एवढे करूनही  त्यांचे काम झाले नव्हते . सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मी माझे वरिष्ठ, निर्देशक श्री. कपूर साहेब यांच्याशी फोनवर बोललो. कपूर साहेब नेहमीच मला मार्गदर्शन व सहाय्य करीत. मात्र हे प्रकरण ऐकून तेही थोडेसे  गंभीर झालेले जाणवले .

   “तू मुंबईत आल्यावर आपण  बोलू “ असे ते म्हणाले.

  “सर, या सर्व प्रकरणाची जबाबदारी माझी असून त्याचे परिणाम स्विकारण्यास मी तयार आहे …”असे निक्षून सांगितले . 

   श्री .कपूर साहेबांना माझ्या कामाची व सचोटीची पूर्ण कल्पना होती आणि म्हणूनच त्यांनी या जागेसाठी माझी शिफारस मंत्रालयाला केली होती.. त्यांनाही आता हे अवघड जागेचे दुखणे झाले!

     मी थोडा विरंगुळा म्हणून टीव्ही लावून काही कार्यक्रम पाहत होतो  तेवढ्यात माझ्या खोलीतील फोन खणखणला… लॉबीतील रिसेप्शन मॅनेजरचा फोन होता.

      “सर आपल्याला भेटण्यासाठी तीन गृहस्थ आले आहेत  …त्यांना मी आपल्या रूममध्ये पाठवत नाही..”

   मी “का..” हे विचारण्याच्या आधीच  ते म्हणाले. “त्यांचा उद्देश मला ठीक वाटत नाही. कृपया दारावरच्या जाळीतूनच त्यांच्याशी बोला व त्यांना सॉरी सांगून परत पाठवून द्या  मी तुमच्याशी नंतर सावकाश बोलतो.. . “

 एका देवदूतानेच मला हा संदेश दिला होता जणू!

     मी फोन ठेवतो न ठेवतो तेवढ्यात दारावरची बेल वाजली .आता मी सावध होतो. संपूर्ण दरवाजा न उघडता फक्त वरची जाळीची खिडकी उघडली. . बाहेर पाहिले. एकाचे हातात पुष्पगुच्छ  दुसऱ्याचे हातात पिशवीत कोणतीतरी वस्तू असे दिसले. तिघांच्याही अवतारावरून ती सभ्य माणसे नाहीत, याचा मला अंदाज आला ..  मोडक्या तोडक्य  हिंदीतून मी त्यांना. “शुक्रिया उद्या आपण भेटू ,” तेही मोडक्या थोडक्यात इंग्रजी- हिंदीत,

“ फक्त दोन मिनिटांसाठी तरी आम्हाला खोलीत घ्या, पुष्पगुच्छ द्यायचा आहे ..”असे काहीतरी सांगून विनवण्या करीत होते. एकमेकांशी त्यांच्या भाषेत काहीतरी बोलत व खुणा करीत होते. त्यांची देहबोलीच मला अस्वस्थ करीत होती.

  त्यांना कसे तरी परतवून लावले .त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसली.

  थोड्या वेळाने मला पुन्हा त्या देवदुताचा फोन आला,

    “ सर आपण अजिबात बाहेर येऊ नका. आपले जेवणही मी स्वतः खोलीत घेऊन येतो. आपल्याशी काही महत्त्वाचे बोलतो ….”

     माझ्या  डोक्यात नको ती शंकेची व  भीषण वास्तवाची वादळे घोंगावू लागली… हा नक्की काय प्रकार चालला आहे ते समजेना…!! माझ्या महाराष्ट्रपासून, घरापासून, शेकडो मैल दूर आहे, एकटा आहे आणि हे कोणते संकट मी स्वतःहून ओढवून घेतले आहे.. प्रामाणिकपणा हा गुन्हा का ठरतो आहे.. ?

मला आता अस्वस्थ होऊ लागले! टीव्ही चालू होता. माझे मन भलतीकडेच होते. मनाच्या त्या गोंधळलेल्या  स्थितीत परत बेलचा आवाज ऐकू आला. मी जाळीतून पाहिले .मॅनेजर स्वतः माझी जेवणाची थाळी घेऊन उभे होते. मी दरवाजा उघडून त्यांना आंत घेतले. दरवाजा आतून बंद केला.

   त्याच्या घडून गेलेल्या अनुभवामुळे या चांगल्या माणसाचा ही मी संशय घेऊ लागलो… ह्याला तर त्या गुंडांनी फितविले नसेल ना?

     कसेबसे दोन घास पोटात ढकलीत होतो. जेवणात ही लक्ष नव्हते. मॅनेजर साहेब म्हणत होते..

    “ मि. राऊत, आता मी तुम्हाला जे सांगतोय ते निमुटपणे करा. मला कृपया प्रश्न विचारू नका .

  आपले उद्या संध्याकाळचे विमानाचे तिकीट मला द्या. माझ्या एजंट मार्फत बदलून तुम्हाला उद्या पहाटेच्या कोईमतूर-मुंबई असे तिकीट कसेही करून मिळवून देतो. गाडी ड्रायव्हर व एक सुरक्षा रक्षक देतो. आपण लवकरात लवकर हे हॉटेल कोइंबतूर शहर सोडले पाहिजे. “

  भल्या माणसाने हॉटेलचे बिला बद्दल काळजी करू नका, ते मी डीएसबी कडून करून घेईन, एवढे बोलून माझे दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे विमान तिकीट घेऊन, विमानतळावर पोहोचल्यावर मला या नंबर वर फोन करा असे सांगून तो मला माणूस लिहून गेला  

  रात्री वा कोणत्याही प्रसंगी खोलीचे दार उघडू नका. मी सकाळी येईन तेव्हाच दार उघडावे, हे सांगण्यास तो विसरला नव्हता. आता मला सर्व परिस्थितीची गंभीरता कळली होती!!

 हे सर्व काय व कसे घडत होते ,त्याचा शेवट काय होणार, काही काहीच कळत नव्हते. मात्र मी निश्चिंत होतो. उद्याच्या इंटरव्यू साठी मी जाऊ नये व त्या आधीच मुंबई गाठावी असाच निर्णय मी घेतला. नाहीतरी मंत्री महोदयांच्या मर्जीतून मी उतरलो होतो व आता वैयक्तिक सुरक्षितता ही जास्त महत्त्वाची होती!

   मी सामानाची बांधाबांध करून अंथरुणावर पडलो खरा, मात्र झोप कशी येणार? पाच वाजताचा अलार्म कधी होतो याकडे कान -डोळे लागले होते. बरोबर पाचला माझ्या दारात टकटक झाली. तोच देव माणूस माझ्या खोली समोर उभा होता. बिलावर सही केली. विमानाचे तिकीट हातात दिले. नोकरांने माझे सामान घेतले. आम्ही खाली आलो. गाडी तयार होती. मी मागे बसलो. पुढे ड्रायव्हर व एक रक्षक होता. पहाटेचा अजून अंधारच होता ..गाडी कोईंबतुर विमानतळाकडे निघाली.. परमेश्वर अंधारातून मला उजेडाकडे नेत होता!

     कोईमतुर विमानतळावर उतरून बोर्डिंग पास घेऊन सेक्युरिटी चेक करून शांतपणे बसलो. त्या भल्या माणसाला फोन लावला…

   “मंत्री महोदयांनी आपल्या लोकल गुंडा मार्फत तुम्हाला धडा शिकविण्याचा चंग बांधला आहे. त्यांचे साठी हे गुंड काही पण करण्यास तयार असतात. मी हे सर्व केले असे तुझ्या ऑफिस शिवाय कोणालाही सांगू नको. मि. झा यांना  मी सर्व कल्पना देईन. त्यांना धोका नाही. मुंबईस पोहोचल्यावर फोन कर ..”

एवढे सांगून त्या माणसाने मला शुभेच्छा दिल्या…त्या नंतर या देवदुताचे दर्शन मला आयुष्यात कधीही झाले नाही !!

    मी व्यवस्थित मुंबईस परत आलो. निश्चिंत झालो. नोकरी गेली तरी जीव शाबूत राहणार होता!

    मुंबई विमानतळावर उतरून सरळ घरी आलो. श्री. कपूर साहेबांना फोन करून दुपारी त्यांचे कार्यालयात गेलो. साहेबांनी मला नेहमीप्रमाणे धीर दिला. मात्र पेट्रोलियम मंत्री व सचिव यांच्यापर्यंत प्रकरण गेल्याने चेअरमन कडे याचा खुलासा मागणार, याची त्यांनाही खात्री होती. त्यांनी आमचे त्यावेळचे चेअरमनना झाले ते सर्व फोनवर कळविले. अर्थातच चेअरमनना दिल्लीवरून राऊत च्या ‘गद्दारी’ची बातमी कळलीच होती. माझ्यामुळे तो संपूर्ण मुलाखतीचा कार्यक्रम रद्द झाला होता व पुन्हा सर्व प्रक्रिया राबवावी लागणार होती. सहाजिकच त्यांना दिल्लीवरून जबरदस्त झाप पडली होती. श्री. कपूरही हवालदिल होते. आई जेव्हा अपत्याचा गळा घोटायला तयार होते, तेव्हा परमेश्वर तरी काय करणार.. अशी माझी स्थिती होती!

     आमच्या तत्कालीन चेअरमनने पुढील बारा वर्षे माझे प्रमोशन बंद ठेवले. नोकरीतून काढता येत नव्हते कारण त्यानंतर नियमाप्रमाणे चौकशी झाली असती. त्यांच्या दृष्टीने असलेला गुन्हा हा एक सरकारी अधिकारी म्हणून माझे कर्तव्य होते व ते मी सिद्ध केले असते .

  श्री. कपूर  यांनाही वरिष्ठांकडून मनस्ताप झाला. कपूर साहेब थोड्याच अवधीत सेवानिवृत्त झाले. पुढील सुमारे बारा वर्षे मला एखाद्या स्थितःप्रज्ञा सारखी काढावी लागली. तो इतिहास वेगळा! 

   राम गणेश गडकर्‍यांनी म्हटल्याप्रमाणे

   “ मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे “,

याच समाधानात मी  कंपनीतील उर्वरित काळ काढला. आजही मला माझ्या त्या प्रसंगी मी जसा वागलो व माझे कर्तव्य केले त्याचा जराही खेद होत नाही. न मिळालेल्या बढत्यांची खंत नाही!

  या सर्व घटनांवर मला जास्त मल्लिनाथी करावयाची नाही. ज्यांनी मला हे सर्व भोगणे प्राप्त केले, ती त्या त्या क्षेत्रातील अपवादात्मक माणसे होती. मला आयुष्यात एक चांगला धडाही शिकून गेली व अंती माझे भलेच करून गेली!

       आजही तो प्रसंग आठवला म्हणजे मला ते न्यायमूर्ती, मंत्री, गारदी आठवत नाहीत. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर येत नाहीत. मला आठवतो तो परमेश्वराने देवदुताच्या रूपाने पाठवलेला “अलंकार हॉटेल” च्या स्वागत कक्षाचा मॅनेजर. त्याचे नावही मला ज्ञात नाही. कधी वेळप्रसंगी त्याचे स्मरण होते. ”तो जेथे असेल तेथे  त्याचे भले होऊ दे” प्रार्थना मी परमेश्वरापाशी करतो.

 कोणतीही ओळखदेख नसताना एका खलनायक  मंत्र्याच्या गावातच त्याच्या नतद्रष्ट अनुयायांनी रचलेल्या दुष्टचक्रातून माझी सुटका करण्याची बुद्धी त्याला का झाली असावी? त्याने तसे केले नसते तर माझे काय होऊ झाले असते? त्या सत्कृत्या ष्बद्दल मी त्याला काय देणार होतो? हे सर्व प्रश्न आज व पुढेही अनुत्तरीत राहणार आहेत!  या प्रश्नांची उत्तरे जरी कधीच  मिळाली नाहीत तरी! 

जगात परमेश्वरी शक्ती आहे व “खलनिग्रहाय सद्रक्षणाय“, हे तिचे काम चालूच असते याचा प्रत्यय आला!

 “मुद्दई लाख बुरा चाहे,

 वही होगा, जो मंजुरे खुदा होगा।।”

   आणि शेवटी तसेच झाले.

समाप्त