अमेरिकन युनिव्हर्सिटीची शेती

इलीनॉइस स्टेट युनिव्हर्सिटीची (ILSU) शेती

अमेरिकेत आल्यापासून येथील एखादे  विश्वविद्यालय पहावे; विशेषतः शेती विभाग व त्या अंतर्गत होणारे संशोधन कोणत्या प्रकारचे आहे, हे अनुभवण्याचा योग यावा, हि इच्छा होती. आणि काही दिवसांपूर्वी असा योग आला. स्प्रिंगफील्ड येथील अब्राहम लिकनचे स्मारक पाहण्यास जात असताना, रस्त्यावर ‘इलिनॉइस स्टेट युनिव्हर्सिटी फार्मस (Illionis State University Farm)’ अशी मोठी पाटी दिसली. रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभी असलेली मका, सोयाबीनची गर्द हिरवी शेती दिसली. युनिव्हर्सिटीची शेती जर एवढी उत्तम असेल, तर वैयक्तिक रित्या केलेली एखाद्या उद्यमशील अमेरिकन शेतकऱ्याची शेती किती सुंदर असेल! असा ही एक विचार मनांत आला. त्यावेळी ठरवले की निदान अमेरिकेतील ह्या एका जुन्या जाणत्या विद्यापिठाची शेते पहावित व नक्की कशा प्रकारे येथे काम चालते, ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा. भारतातील शेती व शेतकऱ्यांची दयनियता स्वतः पाहिली असल्याने व याबाबत रोज काहीतरी अघटित वाचावयास मिळत असल्याने, या भेटीची आवश्यकता जास्तच भासत होती. शेवटी हा योग जुळून आला.

        श्री. संजेश चौधरीनी (आमचे जावई), ईंटरनेट (Internet) च्या माध्यमातून युनिव्हर्सिटी फार्मसच्या मॅनेजरशी संपर्क साधून भेटीचा उद्देश सांगितला व वेळ मागून घेतली. त्याप्रमाणे २ ऑगस्टला आम्ही सकाळे, शिकागोहून सुमारे दिडशे मैलावरील लेक्झीग्टंन (Lexington, IL)येथील शेती पाहण्यास गेलो. इलिनॉईस राज्याचे हे विद्यापीठ असून १८५६ साली याची स्थापना झाली आहे. म्हणजे आजमितीस ही संस्था सुमारे १५० वर्षे कार्यरत आहे. या राज्याची ही पहिलीच युनिव्हर्सिटी, आमच्या हाताशी असलेली सर्व साधनसंपत्ती व शक्ती ही विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, माजी विद्यार्थी व पाहुणे या सर्वांसाठी एक उद्यमशील व साह्यकारी संकुल निर्माण करण्यासाठी वापरावी हा आमचा उद्देश आहे. अशा प्रकारची एक पाटी या स्कूलच्या आवारात लावली आहे. विद्यापीठात आर्टस, सायन्स, व्यापार शिक्षण यासारख्या नेहमीच्या विभागाबरोबर शेती या विभागावर जोर असून या विषयांतील अत्याधुनिक ज्ञान, प्राप्त करण्याच्या उद्देशाने अग्रीकल्चर बिझनेस, ऍग्रीकल्चर इंडस्ट्री, मॅनेजमेंट, सायन्स यासारख्या शेतीच्या उपशाखेमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय आहे. आम्ही भेट देत असलेले शेतीसंकुल, हे शेती विभागाचा एक उपविभाग असून शेतीमधील मुख्यतः दोन विषयावर संशोधन करण्यासाठी उपयोगात आणतात. पशु अभ्यास शास्त्र  व पीक शास्त्र (Live stock study and Agriculture crop science) हे ते विषय होत. एकंदर ६५० एकर जमिनीपैकी, २७५ एकर जमिनीवर मक्याची लागवड तर १७५ एकरावर सोयाबीन असून, बाकीची जागा जनावरांवरील (गाई, मेंढ्या, व डुकरे) संशोधनासाठी प्रयोग शाळा व निरिक्षण गृह बनविण्यासाठी वापरली आहे. एक विद्यापीठ एवढया प्रचंड प्रमाणात पसारा उभारून जमिनीचे एवढे मोठे क्षेत्र लागवडीसाठी वापरते ही गोष्ट आमच्या सारख्या भारतातील खेड्यातील शेती पाहिलेल्यांस अचंबीत करते!

         श्री. रस डियागो (Mr. Russ Diageo) नावाच्या शेती पदवीधराकडे फार्म मॅनेजरची जबाबदारी असून आम्हांस त्याचे सहाय्यक श्री. बॉब क्रॉफर्ड यांनी सर्व माहिती प्रत्यक्ष फिरुन दिली. सहा फूट उंचीच्या वजनदार असणाऱ्या या दिलखुलास गृहस्थाने सुमारे दीड तास चालत आम्हाला सर्व फार्म व तेथील कामकाजाची जाणकारी करुन दिली. त्यांचे बरोबर त्यांनी दिलेल्या माहिती वरुन व आमच्या प्रश्नाला त्यांनी दिलेल्या उत्तरावरून खालील काही वैशिष्ट पूर्ण गोष्टी आमच्या ध्यानात आल्या.

 ह्या सर्व संकुलाची ( ६०० एकर जमिनीवरील मका, सोयाबीनची लागवड, इमारती, प्रयोग शाळा, प्राण्याचे अन्न तयार करण्याची यंत्र सामग्री व मलमूत्रापासून कंपोस्ट खत तयार करण्याची व्यवस्था) व्यवस्था श्री. डेयंगो सहीत फक्त आठ कर्मचारी पाहतात. मॅनेजर स्वतः या शहारापासून दूर असलेल्या वस्तीत, आपल्या कुटुबांसहित राहतात. 

येथे पैदा होणाऱ्या जनावराच्या (गाई, डुकरे, मेंढ्या) विक्रीमधून तसेच इतर कंपन्यांनी (ज्यांना इथे प्रयोग करण्यासाठी मुभा दिली जाते) दिलेल्या मोबदल्यातून एकूण ४२०,००० डॉलर्स एवढे वार्षिक उत्पन्न मिळते.

एवढा मोठा पसारा, प्रचंड उलाढाल व जबाबदारीची कामे असूनही, केवळ आठ कर्मचाऱ्याच्या देखरेखीखाली हे सर्व होत असताना येथे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वर्षांस केवळ १% आहे. म्हणजे जनावरांची निगा ही उत्तम प्रकारे घेतली जाते.

प्रयोगासाठी येथे सुमारे १०० गायी, १०० डुकरे, ७५ मेंढ्या पाळलेल्या आहेत. निरनिराळ्या वयोगटातील ही जनावरे असतात. विशेषतः थंडीच्या दिवसात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) येथील जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. जेव्हा टाक्या /नळातील पिण्याचे पाणी गोठून जाते, तसेच जनावरे उबदार वातावरणात राहतील हे पाहावे लागते. 

जनावरांना लागणारे सर्व प्रकारचे खाद्य येथे तयार होणाऱ्या सोयाबीन, मक्याच्या दाण्यापासून व गवंतापासून तयार करतात व त्यासाठी येथे मिश्रण करणारी यंत्रे व साठवून ठेवणाऱ्या टाक्या हे अन्न  त्यातून जनावरांच्या गोठयापर्यंत वाहून नेणारी यंत्रणा स्वयंचलित आहे. 

जनावरांवरील संशोधन हे खालील प्रकारे आहे – 

  • गाईचे बाबतीत त्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा, त्यांची वाढ व दुधाचे प्रमाण यावरील परिणाम 
  • मेंढयांच्या  बाबतीत देखील त्यांची वाढ व वजन वाढविण्यासाठी योग्य खुराक.
  • डुकरांचे बाबतीत त्यांचे वजन लवकरात लवकर वाढविण्यासाठी योग्य खुराक.
  • तसेच देण्यात येणाऱ्या अन्नाचा त्या त्या हवामाना नुसार जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबध. 

पिकांचे बाबतीत – 

  • मका व सोयाबीन यांची मेंढ्या, गाई, डुकरे, यांचे खाद्य म्हणून कसा विकास करता येईल तसेच ह्या पिकांचे उत्पादन प्राप्त परिस्थितीत कसे जास्तीत जास्त घेता येईल या द्रुष्टीने बियाणे, खते, व किटकनाशके यांचा अभ्यास.

येथे पिकांना पाण्यासाठी म्हणून कोणतीच वेगळी व्यवस्था नाही. सहशे एकरात पिके घेतांना केवळ निसर्गातून मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यावर ती वाढतात.

जमिनीचे काही प्लाटस् हे अमेरिकेतील शेती उत्पादनाशी संबंधीत कंपन्यांना (पायोनीअर, कॅनपी, होरायझन इ.कंपन्यांचे बोर्ड दिसले) त्यांचे विकास कामासाठी व त्यांनी तयार केलेल्या बी, बीयाणे, खते, किटकनाशके यांचा परिणाम पडताळून पाहण्यासाठी दिले जातात व त्याबदल्यात योग्य तो मोबदला ह्या कंपन्या, विद्यापीठास देतात. 

विशेषतः डुकरांवर होणाऱ्या संशोधनावर येथे विशेष भर असे. अमेरिकेत डुकरांचे मांस हे एक मुख्य अन्न असल्याने डुक्कर पालन हा मोठया प्रमाणावरील व्यवसाय येथे आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत व कमी परंतु सकस अन्न देऊन त्यांचे वजन कसे वाढविता येईल? यावरील हे संशोधन आहे. याची पेटंट्स घेऊन मग त्याचा आर्थिक  फायदा विद्यापठास होतो.

ह्या सर्व संशोधन कामापेक्षा वेगळे संशोधन येथे आम्हास पहावयास मिळाले. ह्या कामाचा विद्यापीठाच्या आर्थिक फायद्यांशी कोठे संबंध नव्हता, तर सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून हे काम या लोकांनी येथे घेतले आहे. जनावरांच्या मलमूत्रा पासून होणारे खत व त्याची विल्हेवाट लावताना प्रचंड दुर्गंधी येत असते. पूर्वी शहराची वाढ ही मर्यादीत होती, अशा फार्म पासून शहरे दूरवर होती. मात्र आता हळूहळू ती खेड्याकडे म्हणजे अशा कँप्सकडे येऊ लागली आहेत, तेव्हा या वाढत्या लोकवस्तीला या डंपिंगचा व खत प्रक्रियेचा कोणताही उपसर्ग पोहोचू नये, याकरीता या उत्सर्जीत पदार्थांतून काही खनिज द्रव्ये वेगळी केल्याने त्यातील दुर्गंधी निघून जाते व कोणतेही प्रदुषण बाजूच्या लोक वस्तीत होत नाही. तेव्हा पुढे होणाऱ्या शहराच्या विकासाचा व आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन अशा प्रकारच्या संशोधनाची गरज त्यांना वाटली आहे. त्यात त्यांना यशही मिळते आहे, हे त्यांनी आम्हाला दाखविलेल्या गंध रहीत कंपोस्टच्या काही नमुन्यावरुन दिसून आले. आपल्या कडे गोराई व भांडूप मधील डंपींग ग्राऊंड्सची व त्यामुळे पेटलेल्या आंदोलनांची आम्हास यावेळी आठवण झाली!

मॅनेजर साहेबांचे आभार मानून त्यांचा निरोप घेताना त्यांनी आम्हास जवळच असलेल्या ‘जॉन डीअर’ ह्या उपकरण निर्मितीच्या कंपनीच्या सर्व्हिस स्टेशनला ही भेट देण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही तेथे गेलो. आम्ही भारतातून आलो असून शेतीदेखील करतो हे ऐकून तेथील व्यवस्थापकास खूप आंनद झालेला दिसला! तुम्ही किती एकराची करता ते सांगा म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हांस मी उपकरणांची माहिती देतो असे त्यांनी सांगितले! आम्ही घाबरत घाबरतच ५० ते १०० एकर शेती आमचे कडील सर्व साधारण शेतकरी करीत असतो असे सांगितले! तो मोठ्याने हसत म्हणाला – तुम्ही आहात कोठे ? अमेरिकेत १५०० ते ५००० एकर ही सरासरी शेती शेतकऱ्यामागे आहे! आम्ही उडालोच, पण तरी देखील त्याने आम्हास नाराज नकरता संबध परिसर, तेथे ठेवलेली वेगवेगळी अवजारे व येणाऱ्या शेतकऱ्यास कशी सेवा पुरवली जाते, याचे प्रात्यक्षिक दाखविले. शेत नांगरणी, बियाणे, पेरणी, फवारणी, मशागत, शेतकापणी तसेच वेगवेगळ्या आकाराची ‘हिरवळ कापणी’ची यंत्रे होती. दिवसात २०० ते ३०० एकर जमिनीत बियाणे पेरणारी तसेच तेवढ्याच क्षेत्रातील पिके एका दिवसात कापून जमीन साफ करणारी महाकाय यंत्रे तेथे होती.

 यावरुन येथील शेतीच्या यांत्रिकीकरणाची कल्पना यावी! महासत्ता व महाश्रीमंत असलेल्या या अमेरिका देशाचे सर्व काही ‘महा’ हे येथेही पटते!

 लेक्झीग्टंनहून ही भेट पूर्ण करुन शिकागोला परत येतांना डोक्यांत विचारचक्र फिरत होते. भारतातील शेती विद्यापीठे तेथील संशोधनाची यादी, त्यांना उपलब्ध असलेला निधी त्या संशोधनाचा आमच्या खेडवळ शेतकऱ्याला मिळणार लाभ आणि दिवसागणिक महाराष्ट्रातीलच नव्हे तर साऱ्या भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोठे तरी तार्किक संगती लावून बघत होतो. संशोधनासाठी उपलब्ध होणारा अफाट निधी हे निश्चितच येथील उच्च दर्जाच्या संशोधनाचे गमक आहे, परंतु ह्या निधीसाठी ही विद्यापीठे सरकारवर अवलंबून नाहीत. प्रत्येक संस्था ही स्वबळावरच  उभी असते, व (सरकारी निधी व्यतिरिक्त) ती तशी राहील अशी व्यस्थापनाची खबरदारी असते. तसेच सरकारी संस्था असो वा खाजगी उद्योग असो, तेथे त्यांच्या एकूण उत्पन्नाचा (turnover) ४-५% रक्कम ही संशोधनासाठी बाहेर काढली जाते. या उलट आपल्याकडे भारतीय व खाजगी कंपन्या सुध्दा फार तर उत्पन्नाचा एक टक्का पर्यंत संशोधन खर्च करतात! मला वाटते याच एका गोष्टीत खूप काही आले!