सामाजिक योगदानात, माझा खारीचा वाटा!

  ‘ कै. पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर, प्रवेश द्वार. मागे  कै. तात्यासाहेब चुरी स्मारक विद्यार्थि वस्तीगृह, दादर.

“दुर्लभं मानवे जन्मः..” असे म्हटले जाते. या मानवी जन्मात अनेक प्रकारच्या ऋणांची फेड करावयाची असते. त्यातील एक म्हणजे समाजॠण! ज्या समाजाने आपल्याला सामावून घेतले, मदत व मार्गदर्शन केले, ते ऋण अंशतः तरी फेडणे हे आपले कर्तव्य असते. तसे करताना मी काहीतरी विशेष केले अशी भावना नसावी. आमच्या सो क्ष समाजोन्नती संघाच्या स्थापनेला 100 वर्षे होऊन गेली आहेत. संघ स्थापनेपपासून ते आजच्या या ऊर्जेतावस्थेपर्यंत ज्या समाज बांधवांनी व धुळे नांदणी मोठे योगदान दिले, त्यांच्या कार्याचा आठव करतांना मी स्वतःला विचारतो, “मी समाजाला काय दिले? सर्वांकडून काही ना काही घेतच आलो पण अगदी निरपेक्षपणे मी काय दिले”.

   त्या माझ्याच प्रश्नाला माझ्या मनाने दिलेले उत्तर म्हणजे या लेखाचा हा प्रपंच! माझ मन मला सांगते, ‘तू समाजासाठी फार भव्य दिव्य वा विशेष केले नाही हे सत्य! मात्र जे काही अल्प स्वल्प दिलेस ते निरपेक्षपणे, कृतज्ञतेच्या भावनेतून दिले हेही तितकेच सत्य आहे! त्याचा लेखाजोगा माझ्या समाज बांधवांनी करावयाचा आहे.

   मी या समाजाचा एक घटक म्हणून अगदी विद्यार्थी दशेपासून ते पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत समाजाचे ऋण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात घेतच राहिलो. सोक्ष संघाकडून शैक्षणिक मदत, पुढे दादरच्या पूज्य तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वस्तीगृहात निवास, तेथे अनेक ज्येष्ठांचे मिळालेले मार्गदर्शन व अनमोल आशीर्वाद! शिक्षण संपतानाच विश्वस्तांनी दिलेली समाज मंदिर व्यवस्थापक, वसतिगृह रेक्टर, अशी सुंदर संधी!

  या संधीमुळेच मी आमच्या सोक्ष संघाच्या सामाजिक कार्याशी जोडला गेलो .1965 ते 1971, स्मारक मंदिर व्यवस्थापक- वसतिगृह रेक्टर, सन1998 साली वस्तीगृह माजी विद्यार्थी संघाची स्थापना, व सन 2002 त 2014 बारा वर्षे विश्वस्त-कार्यकारी विश्वस्त अशा रीतीने सुमारे पन्नास वर्षे मी या सामाजिक संस्थेच्या परिवारातील एक सदस्य म्हणून माझे योगदान देत राहिलो .माझ्यासाठी हा खूप आनंदाचा व अभिमानाचा असा काळ होता. त्या आठवणी कुठेतरी जपून ठेवाव्यात, या उद्देशाने जसे आठवेल तसे मी त्या गतकाळाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. विस्मृतीमुळे किंवा अनावधानाने काही उनिवा निर्माण झाल्यास तो माझा दोष समजून समाज बांधवांनी वाचकांनी मला क्षमा करावी ही प्रथमच विनंती!

    सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना व त्यातील माझे योगदान हा पुढे स्वतंत्र लेख आहे.! 

    समाजकार्याचे बीज अगदी विद्यार्थी वयात माझ्या मनात पेरून आमच्या तत्कालीन जेष्ठांनी अशा कामाची गोडी व आवड मनात निर्माण केली त्यातूनच  पुढे, पू. तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वस्तीगृह माजी विद्यार्थी संघाची स्थापना,(मा वि संघ),

 ’ सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ व अगदी योग्य वयांतच संघ फंड ट्रस्टच्या विश्वस्त व कार्यकारी विश्वस्त म्हणून समाज बांधवांनी केलेला बहुमान असा सर्व इतिहास कालौघात लुप्त होण्याआधी, कोठेतरी नमूद करून ठेवावा ,भावी पिढ्यांनी त्यापासून थोडी प्रेरणा घ्यावी हाच या लेखाचा उद्देश आहे!सर्व संबंधितांच्या नावाचा उल्लेख करता येणार नाही ,याचा अर्थ त्यांच्या कामाचे महत्त्व कमी लेखतो असे नव्हे. केवळ लेखन सीमेच्या मर्यादेनुसार तसे करावे लागते आहे!

 •   कै.पू अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व्यवस्थापक व पू.तात्यासाहेब चुरी स्मारक विद्यार्थि वस्तीगृह-रेक्टर.

    1961 साली पूज्य कै अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचे  काम पूर्ण झाले. तळमजल्यावर लग्नाचा हॉल ,सभागृह व पहिल्या मजल्यावर विद्यार्थी वसतीगृह सुरू करण्यांत आले. जेमतेम वीस पंचवीस मुलांची सोय होती. पहिले रेक्टर म्हणून श्री मधुकर ठाकूर (सध्या अमेरिकेत डॉ.मॅथ्थू ठाकूर), हे काम पाहत होते. मी 1963-1965 ही दोन वर्षे वसतीगृहाचा विद्यार्थी होतो. यु डी सी टी ,आजची आय सी टी, मध्ये बी एससी( टेक), पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला होता…त्याच दिवशी मी आमच्या  सो क्ष संघाच्या कार्याशी जोडला गेलो.

     दोन वर्षांनी 1965 साली  बी एस्सी (टेक) हा अभ्यासक्रम पहिल्या वर्गात पास होऊन पूर्ण केला. पुढेही मला एम एस्सी (टेक)या मास्टर्स पदवीचा अभ्यास करावयाचा होता. वसतिगृहात राहणे अनिवार्य होते. कर्मधर्म संयोगाने त्याच वर्षाच्या जून महिन्यात श्री.मधुकर ठाकूर यांना इंग्लंडमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी स्मारक मंदिर व वसतीगृह रेक्टरचे काम सोडण्याचे ठरविले. वास्तविक त्या महत्त्वाच्या जागेसाठी त्यावेळी माझ्यापेक्षा सीनियर असलेले काही विद्यार्थी वसतीगृहात होते. मात्र मला कल्पना नसताना सो क्ष संघ व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मलाच ते काम देण्याचे ठरविले. आजही मला त्यांच्या त्या निर्णयाचे आकलन झालेले नाही. मात्र माझ्यासाठी निश्चितपणे ते एक नवे आव्हान होते, व कोणतेही आव्हान स्वीकारणे हा माझा स्वभावच आहे! मी ते काम स्वीकारले.

     स्मारक मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन,सभागृह हॉल चा आर्थिक व्यवहार, हॉलच्या सभागृहाचे बुकिंग व दैनंदिन कामावर लक्ष,गिऱ्हाईकांशी संबंधित बाबी हाताळणे,तसेच वसतीगृह विद्यार्थ्यांचे संपूर्ण व्यवस्थापन इत्यादी सर्व कामे रेक्टरलाच करावी लागत कोणताही कर्मचारी व्यवस्थापक वा कारकून म्हणून नेमला गेला नव्हता. स्मारक मंदिराच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी फक्त एक गोरखा होता. माझा अभ्यास सांभाळून हे सर्व काम विनावेतन करावयाचे होते.. पुढे चार वर्षांनी तेथे श्री भाऊराव पाटील यांची स्मारक मंदिर व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली व आजतागायत ही दोन कामे स्वतंत्ररीत्या होत आहेत. हे सर्व थोडे विस्तृतपणे सांगण्याचे कारण त्यावेळी ची प्रत्यक्ष परिस्थिती वाचकांना कळावी एवढाच आहे!

  माझ्या या अभ्यासक्रमाला निश्चित कालमर्यादा नव्हती.हे प्रबंध लेखनाचे(By research andThesis writing),काम होते व त्यावेळी साधारणतः तीन ते चार वर्षापर्यंत कालावधी लागे. डॉ. जे जी काणे यांसारख्या जगातील एका तेल विज्ञान शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हे काम करावयाचे होते. वस्तीगृहाचे व सभागृहाचे आर्थिक व्यवहारही तत्कालीन कार्यकारी विश्वस्त श्री चिंतामणराव वर्तक यांसारख्या एका मुरब्बी व शिस्तप्रिय नेत्याच्या देखरेखी खाली करावयाचे होते..श्री. चिंतामणराव वर्तक यांसारख्या एका शिस्तप्रिय आर्थिक नियोजनात निपुण अशा कार्यकारी विश्वस्तांना रिपोर्ट करून करावयाचे होते . तारेवरची कसरत होती. पण मी कामाला सुरुवात केली.

     माझ्या अभ्यासक्रमासाठी युजीसी( युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन),कडून स्कॉलरशिप मिळत होती. ती प्रत्येक महिन्याला मिळत नसल्याने दैनिक खर्चासाठी ओढाताण होई.म्हणून मी वर्तक स्मारक मंदिरासमोरील एका नाईट हायस्कूलमध्ये रात्री दहा ते अकरा ,एक तासभर शिकवणी करीत असे. त्यामुळे सकाळी सहा वाजता सुरू होणारा माझा दिवस रात्री अकरा वाजता संपूर्ण होई.वस्तीगृहातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या खोलीला भेट देऊन झाल्यानंतर मी माझ्या खोलीत दाखल होई.कधी जेमतेम चार-पाच तासाची झोप मिळे.

    माझे वसतिगृह रेक्टरचे काम अर्थातच सोपे नव्हते .कारण एक दोन सिनीयर विद्यार्थी माझ्या  नेमणुकीवर असंतुष्ट होते.साहजिकच होते,कारण त्यांची संधी हुकली असे त्यांना वाटत होते. अधून मधून करून ते वस्तीगृहाच्या शिस्तीला बाधा आणून ऊलट माझ्या बद्दल वरिष्ठांना तक्रार करीत. मात्र  वस्तीगृहातील इतर जेष्ठ मित्रांची व विश्वस्त चिंतामणराव व मामासाहेब ठाकूर यांची साथ मिळाल्याने मी ते काम निभावून नेऊ शकलो.

    पुढे सन 1966 साली पू.तात्यासाहेब चुरी या संघस्थापनेतील धुरीणांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ, वस्तीगृहाचे विस्तारीकरण करून वर एक मजला वाढविण्याचे ठरले. मात्र डॉ.पद्मश्री हरिश्चंद्र पाटील यांचे अधिपत्याखाली स्मारक समितीने अल्प अवधीत भरपूर निधी गोळा केल्याने 1968 साली स्मारक मंदिरावर एक मजल्या ऐवजी अधिक दोन मजले वाढवून संपूर्ण तीन मजली वस्तीगृहाला,”पू. तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वस्तीगृह”,असे नामकरण करण्यांत आले. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांचे हस्ते उद्घाटनाचा सोहळा पार पडला .ही आम्हा विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी संधी होती. त्यामुळे आम्हाला वस्तीगृहात अनेकह  सुविधा निर्माण करता आल्या. सुमारे 75 विद्यार्थ्यांची सोय आता वसतिगृहात होऊ लागली.बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. . व्यवस्थापक व रेक्टर या दुहेरी जबाबदारीतून मलाही या संपूर्ण प्रक्रियेत योगदान देता आले. व उद्घाटन सोहळ्यात भागही घेता आला. मात्र आता काम ही वाढले होते.

   त्याच वर्षापासून आम्ही वस्तीगृहातील काही मुख्य उणीवा दूर केल्या.आता वसतिगृहांत सुंदर पौष्टिक भोजन देणारे भोजनालय सुरू झाले, वाचनालय ,अतिथी निवास, छोटी व्यायाम शाळा सुरू झाली.

शिवाय आमचे नेहमीचे उपक्रम सहजीवन वार्षिकाचे प्रकाशन वार्षिक सहल व इतर कार्यक्रम चालूच होते. विशेषतः भोजनाची व सकाळच्या नाश्त्याची सोय झाल्याने विद्यार्थ्यांना आता अभ्यासासाठी खूप वेळ मिळू लागला व त्यांचे प्रकृती स्वास्थ्य ही वाढले .विद्यार्थ्या समवेत काम करताना, विद्यार्थी-हेडमास्तर अशी भावना नसे. ते आमचे एक विस्तारित कुटुंबच होते व त्यामुळे  एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून मी माझे काम बजावीत असे. माझ्या प्रत्येक विनंतीला तत्कालीन मुख्य विश्वस्त भाऊसाहेब व त्यांचे सहकारी यांनी कोणतेही आर्थिक तरतूद करतांना  हात मागे घेतला नाही. आजचे हे विद्यार्थी विद्यार्थी आमचे भावी नेते आहेत या भावनेने त्यांनी ही सर्व व्यवस्थापन केले.

    माझ्या येथील स्मारक मंदिर व वसतीगृह व्यवस्थापक-रेक्टर  कार्यकालांत स्मारक मंदिराचा सुरक्षारक्षक पदम बहादुर गुरखा याचा उल्लेख केल्याशिवाय मला हा लेख पूर्ण करता येणार नाही. पगार घेऊन काम करणारा तोच एकमेव कर्मचारी त्यावेळी होता.  सुदैवाने त्याच्यासारखा स्वामिनिष्ठ, प्रामाणिक, व कडवा सेवक मिळाल्यानेच दोन्ही कामे यशस्वीपणे करता आली.त्याचे बद्दल विस्तृत माहिती  मी  कै. चिंतामणराव वर्तक यांचे वरील लेखात दिली आहे.

वर- 1965 66 साली  मी वस्तीगृह रेक्टर असताना विद्यार्थी मित्रांसमवेत.   खाली- 1964-65 साली श्री मधुकर ठाकूर रेक्टर असताना आम्ही विद्यार्थी.

   सन1968 च्या सुरुवातीस माझे एम एस्सी(टेक), प्रबंधाचे काम पूर्ण झाले. युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे सर्व सोपस्कार करून डॉक्टर काणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध लिहून मी तो मुंबई विद्यापीठास सुपूर्त केला. माझे यु डी सि टी मध्ये जाणे बंद झाले. नोकरीच्या शोधात लागलो सुदैवाने माझे गुरु आचार्य चित्रे-भिसे यांच्या आशीर्वादामुळे विक्रोळी येथील गोदरेज कंपनीत नोकरी ही मिळाली. हातात पदवी परीक्षेचे सर्टिफिकेट नव्हते तरी मी कामाला सुरुवात केली होती. मात्र निवासस्थान म्हणून स्मारक मंदिरातच राहत होतो. माझी मुंबॢईत राहण्याची सोय होत नव्हती.

 1970 साली संघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन बोर्डीत झाले.त्यावेळी आम्ही काही तरुण माझी विद्यार्थ्यांनी “माजी विद्यार्थी मंडळ”,नावाची एक संघटना सुरू केली होती. अधिवेशनात संघ व्यवस्थापनाने आम्हा विद्यार्थ्यांना एक तासाचा अवधी देऊन तरुणांचे विचार ऐकण्यासाठी एक परिसंवाद घडवून आणला होता. त्या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी मांडलेले विचार ऐकून संघ व्यवस्थापनाने त्याची नोंद घेतली होती. “ आपले समाजाप्रती योगदान करण्यासाठी एक स्वतंत्र परंतु मुख्य प्रवाहांशी समांतर असे व्यासपीठ निर्माण करावे असे युवकांनी ठरवले. मात्र तो विचार प्रत्यक्षात येण्यास पुढे बराच कालावधी गेला.

   त्याच सुमारास 1970 च्या अखेरीस माझे लग्न जमले.मार्च 1971 मध्ये लग्नाचा मुहूर्त ठरला. त्यामुळे 1971 च्या फेब्रुवारी महिन्यात मी स्मारक मंदिर व पूज्य तात्यासाहेब विद्यार्थी वसती गृहाचा निरोप घेतला. दोन वर्षे विद्यार्थी सहा वर्षे व्यवस्थापक- रेक्टर अशा आठ वर्षाच्या दीर्घ वास्तव्यानंतर मी या पावन वास्तूचा दुःखी अंतःकरणाने निरोप घेतला. सामाजिक कार्याचा वसा व अनुभव पाठीशी घेऊन आयुष्यातील एका सफल कालखंडाची इतिश्री झाली.

 •   पू.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी-वस्तीगृह माजी विद्यार्थी संघ:( मा वि संघ).

      माजी विद्यार्थी संघ स्थापनेचा विचार जरी 1971 मध्ये झाला होता तरी संघ स्थापण्यास पुढे 27 वर्षे गेली.1998 साली  मा वि संघाची रीतसर स्थापना झाली. मधल्या काळात आम्ही शांत नव्हतो. पैशाच्या जमवाजवी साठी ‘वाजे पाऊल आपुले’, या कै.विश्राम बेडेकर लिखित नाटकाचा प्रयोग आमच्यातील हौशी तरुणांनी केला व त्यातून बऱ्यापैकी रक्कम जमा झाली.तसेच ‘क्षात्रसेतू’,मासिक पत्र सुरू झाले होते. सन 1984 साली  सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात काही मित्र सहभागी  होते. कसेही असो मात्र प्रत्यक्ष संघ स्थापना विलंब झाला हे निश्चित!

   1971 साली मी स्मारक मंदिर सोडले.  सर्वच सहकारी आपापल्या संसारात व व्यवसाय उद्योगात व्यस्त होतो. कारण आम्हा सर्वांच्या जीवनाच्या तो महत्त्वाचा कालखंड होता. 

   मा वि संघाच्या स्थापनेसाठी ज्या माजी विद्यार्थी मित्रांनी अपार कष्ट घेऊन हे हे काम यशस्वी होण्याचा ध्यास घेतला होता त्यातील काही नावांचा मला मुद्दाम ऊलेख केलाच पाहिजे.

    सर्वश्री ,रवींद्रनाथ ठाकूर, शिरगाव-विरार,नरोत्तम वर्तक,के माहीम-अंधेरी, डाॅ.गजानन वर्तक,के.माहीम-अंधेरी, डॉ. भार्गवराम ठाकूर – शिरगाव , सदानंद राऊत, चिंचणी,-बांद्रा, प्रमोद वर्तक,कोरे-विलेपार्ले,  मधुकर के. वर्तक माहीम,-बोरीवली,रमेश सावे,बोर्डी,-अंधेरी,   भालचंद्र पाटील बोर्डी-चेंबूर, प्रभाकर ठाकूर, के.माहीम-बोरीवली,  श्रीनिवास चुरी, बोर्डी-बांद्रा, डॉ. सदानंद कवळी आगाशी-भाईंदर,संदीप भालचंद्र वर्तक,विरार, नरोत्तम कृष्णाजी चुरी,शिरगाव-बोरीवली, प्रकाश हरी राऊत,बोर्डी,-पार्ले,  हरिहर आत्माराम ठाकूर ,दातिवरे -बोरीवली,.नरेंद्र डी वर्तक,केळवे,मनोहर व कमळाकर कृ चौधरी माकूणसार-बोरिवली, श्रीकांत राऊत, बोर्डी -बोरीवली,  .दिनकर बा. वर्तक कोरे,हरिश्चंद्र मुकुंद चौधरी केळवे-बोरीवली, प्रकाश हिराजी सावे बोर्डी ,या मंडळींची नावे प्रामुख्याने आठवतात .विस्मृतीमुळे काही नावे राहिली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.

    ज्या समाज बंधू भगिनींनी या संस्थेच्या निर्मितीस मूर्तस्वरूप येण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले त्यात, सौ. सुशीला राऊत,  बोर्डी, श्री रमेश चौधरी मुंबई , डॉ. देवराव-डाॅ.नीला पाटील, चिंचणी,बोरीवली, सतीश नाना वर्तक,वसई , कमळाकर पी म्हात्रे,वसई , हेमंत चौधरी (वसई), यांचा उल्लेख कृतज्ञतापूर्वक मुद्दाम करतो.

     सो क्ष संघाच्या तत्कालीन अध्यक्षा श्रीमती तारामाई वर्तक यांनीही आमच्याय योजनेस पाठिंबा देऊन संपूर्ण सहकार्य केले त्यांनाही  उल्लेख करतो. 

  कोणत्याही संस्थेला उद्दिष्ट पूर्तीसाठी आर्थिक निधीची मोठी गरज असते. आम्ही निधी संकलनाच्या मागे लागलो. Charity begins at home,या उक्ती प्रमाणे  आम्ही प्रत्येक  संस्थापक सदस्यांनी 4000 रुपये देणगी  व 1000 रुपये आजीव सभासद वर्गणी असे प्रत्येकी 5000 रुपये जमा केले . माजी विद्यार्थी मित्रांना एक हजार रुपये भरून आजीव सदस्य होण्याचे आवाहन केले. मा वि नसले तरी हितचिंतक म्हणून कोणत्याही  समाज बांधवाने रुपये पंधराशे एकरकमी भरून हितचिंतक-सभासद होण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे व्यवसायिक व स्वतःचे उद्योग असणाऱ्या समाज बांधवांना व माजी विद्यार्थ्यांना भरीव स्वरूपात स्मरणार्थ देणग्या देण्याची विनंती केली .आमच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळून उत्तम प्रकारे निधी संकलन होऊ लागले.

    मला सांगायला खरंच खूप आनंद वाटतो, की खालील दानशूर समाजहितैषी मंडळींनी आम्हा तरूण कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून आम्हाला  अगदी सुरुवातीच्या काळात भरघोस  देणग्या घेऊन आमचा ऊत्साह वाढविला.

 •     श्री.मोरेश्वर मोरे दीनानाथ सावे,(माजी खासदार) चिंचणी,औरंगाबाद रु.250,000.
 •     श्री अशोक भालचंद्र पाटील, (बोर्डी,)  पुणे रू.150,000.माजी विद्यार्थी. उद्योजक
 •     श्री नरेश जनार्दन राऊत,बोर्डी (मुंबई),रू. 150,000 .माजी विद्यार्थी. उद्योजक
 • .    श्री दयानंद दामोदर पाटील. विरार.रू.100,000.ऊद्योजक
 •      श्री पुरुषोत्तम अनंत कवळी आगाशी रू.100,000 ऊद्योजक. 

पुढेही जेव्हा आम्हाला निधीची मदत भासली या मित्रांनी पुन्हा आर्थिक मदत केली.आज,घडीला ,त्यांनी दिलेली एकूण मदत ही खालीलप्रमाणे आहे.

 •      श्री नरेश भाई राऊत, …एकूण रुपये पाच लाख .
 •      श्री अशोकभाई पाटील, ….. एकूण रुपये साडेचार लाख .
 •      श्री पुरुषोत्तमभाई कवळी, एकूण रुपये साडेतीन लाख .

  इतर देणगीदारांची नामावली पुढे येईल.

     त्या काळातील या देणग्यांचे मोल आज करता येणार नाही.

   मा वी संघाच्या अगदी प्राथमिक अवस्थेत भरघोस  देणग्या देऊन कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवणारे दानशूर समाज बंधु
वर (डावीकडे): खासदार मोरेश्वर सावे औरंगाबाद .  वर (उजवीकडे): नरेश भाई राऊत बोर्डी.
खाली (डावीकडे): श्री अशोक भाई पाटील पुणे, मध्ये: श्री पुरुषोत्तम भाई कवळी आगाशी: उजवीकडे श्री दयानंद नाना पाटील विरार.

       निधीसंकलन हे खूप जरुरीचे व प्राधान्य असलेले काम जोरात सुरू होते होते. दिनांक 24 सप्टेंबर 2000 रोजी, ‘जाऊबाई जोरात’, या त्यावेळी खूप गाजत असलेल्या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मा वि संघातर्फे सादर करण्यात आला. स्मरणिकेचे प्रकाशन करून, जाहिरातीच्या माध्यमातूनही निधी जमाविण्यांत आला. या दोन्ही उपक्रमातून संघाला भरघोस अर्थसहाय्य प्राप्त झाले. मिळालेल्या देणग्यांतून बॅकेत ठेवलेल्या ठेवीवरील व्याज, हेच आमचे सर्व उपक्रम राबवण्यासाठी भांडवल होते.  सुरवातीला दहा लाख रुपये भांडवल जमा झाले होते व तीच आमची मुख्य पुंजी होती. केवळ दोन वर्षात ही प्रगती होती.आमच्या प्रत्यक्ष कार्याला आता सुरुवात होत होती.

    संघटनेसाठी देणग्या मागताना देणगीदारांना,आयकर खात्याकडून करात सूट मिळावी ही अपेक्षा असते. इन्कम टॅक्स खात्याकडून असा दाखला मिळविण्यात आमचे तत्कालीन खजिनदार श्री प्रभाकर ठाकूर यांनी खूप मेहनत घेऊन ते काम यशस्वी केले व एक मोठा पल्ला पार केला. 

     संघटनेची घटना तयार करून त्याप्रमाणे माजी विद्यार्थी संघाची मुख्य व ठळक उद्दिष्टे खालीलप्रमाणे ठरविण्यांत आली.

 • वसतिगृहाच्या माजी व आजी विद्यार्थ्यांमध्ये सतत संपर्क ठेवून स्नेह वृद्धिंगत  करणे .
 • आजी व माजी विद्यार्थ्यांमध्ये देशांतर्गत वा परदेशी शिक्षणासाठी हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे .
 • व्यवसाय व शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांकरता  कार्यशाळा चालविणे.
 • वाचनालय, पुस्तकालय ,ग्रंथालय ,संगणक मार्गदर्शन अभ्यास केंद्र , सांस्कृतिक केंद्र इ. मार्फत समाजातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जाणीव करून देणे.

विद्यार्थ्यांना द्यावयाची आर्थिक मदत, तीन विभागात द्यावी असे ठरविले.

 • पहिला टप्पा: इयत्ता पाचवी ते दहावी, असा शालेय गटाचा होता. मदत वार्षिक सुमारे 3000रू प्रत्येकी, एवढी होती(.ही शिष्यवृत्ती पुढे इ.ग्रुप मार्फत देण्यात आली.)
 • दुसरा टप्पा अकरावी, बारावी शालेय विद्यार्थ्यांसाठी होता. वार्षिक मदत, 5000रू.प्रत्येकी.

     शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मदत ही ना-परतफेडीच्या तत्त्वावर होती. 

 • तिसऱ्या टप्प्यात बारावीनंतरच्या व्यावसायिक, पदवी शिक्षणाकरिता हुशार मुला-मुलींना शिष्यवृत्त्या व शैक्षणिक मदत यासाठी होती.शिष्यवृत्तीची रक्कम वार्षिक रुपये 10,000,प्रत्येकी, एवढी होती. एकदा निवड झाल्यास संपूर्ण शिक्षण कालावधी पूर्ण होईपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळणार होती.
 • परदेशी उच्च शिक्षणासाठीची शिष्यवृत्त्यी  विद्यार्थ्याला एकरकमी ,रुपये 25,000 इतकी देण्याचे ठरविले. परदेश प्रवास खर्चासाठी सहाय्यभूत होण्यासाठी ही शिष्यवृत्ती होती. तिसऱ्या व परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती बिनव्याजी परतफेड, तत्त्वावर होती.

शिष्यवृत्ती देताना माजी विद्यार्थी संघ सभासद व हितचिंतक यांच्या पाल्यांना प्राधान्य दिले जाईल,हे धोरण ठरविले.

  शिष्यवृत्ती कालात अभ्यासाबरोबरच आपली वर्तणूक व प्रत्येक वर्षी उत्तम गुणांनी पास होण्याची अट होती. आपला अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत, शिष्यवृत्ती मिळणार होती.

   मा वि संघाचा स्थानिक शाखाप्रतीनिधी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असे व त्यांच्या प्रगतीचा आलेख अध्यक्षांस वारंवार देत असे.शिक्षणक्रम झाल्यावर विद्यार्थ्यांकडून पैशाच्या परतफेडीच्या  वेळी हे प्रतिनिधी मदत करीत.

   कालांतराने देणगीदारांना हप्त्याने देणगी देण्याची सवलत देण्यात आली जेणेकरून देणगीची रक्कम वाढावी, विद्यार्थ्यांनाही जास्त आर्थिक लाभ व्हावा व देणगीदारास पैसे देताना सुविधा व्हावी असा हेतू होता..

     थोड्याच कालावधीत ,माजी विद्यार्थी संघातीलच कांही तरुण मित्रांनी ‘वाडवळ ई ग्रुप’ नावाचा एक गट स्वतंत्रपणे स्थापन केला. विशेषतः जे तरुण, तरूणी देशात व परदेशात आहेत त्यांच्या उच्च शिक्षणाचा व अनुभवाचा लाभ गरजू विद्यार्थ्यांना मिळावा व समाज ऋणाच्या जाणिवेतून गरीब हुशार होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक लाभही देता यावा हा मुख्य उद्देश या ई ग्रुप समोर होता .या जाणीवेतून ‘शालेय विद्यार्थी दत्तक योजना’, जन्माला आली.’,या योजनेमार्फत इयत्ता पहिली ते बारावी या शैक्षणिक कालावधीतील निवडलेल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना दरवर्षी उत्तीर्ण झाल्यास पुस्तकांची,शालेय युनिफॉर्मची व शाळेची फी असा खर्च योजनेमार्फत केला जाणार होता. सर्व मदत ‘ना परतफेड’, तत्त्वावर होती. प्रत्यक्ष वाटपाचे काम मा वि संघच करणार होता.या ‘वाडवळ ई ग्रुप’  संकल्पनेमध्ये व स्थापनेमध्ये ,प्राथमिक अवस्थे पासून ते अगदी स्थापना होईपर्यंत,कामाचे  श्रेय श्री. अमित ऊल्हास सावे , कु. नीलांबरी रमेश सावे, कु. योगेश राऊत. यांना द्यावे लागेल. विशेष म्हणजे, अमित त्यावेळी लंडनमध्ये व्यवसायानिमित्त होते तर नीलांबरी अमेरीकेत  ऊच्चशिक्षणासाठी गेली होती .तेथून सर्वांशी संपर्क साधून या दोघांनी,एका चांगल्या संघटनेच्या कामासाठी आपल्या बहुमूल्य वेळ देऊन हे काम केले. योगेश त्यावेळी भारतातच होते आणि अमेरिकेत जाईपर्यंत त्यांनी हे काम मोठ्या धडाडीने केले .नंतर या ग्रुप मध्ये सामील झालेले इतर  सदस्य म्हणजे ,कु. स्वप्नाली राऊत , श्री.विवेक राऊत  श्री.सुहास राऊत, श्री योगेश व श्रुती  पाटील होत.आमच्या माजी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते श्रीनिवास चुरी ,व रमेश सावे यांचे मार्गदर्शन त्यांना सतत मिळत होते.  सध्या आय टी आय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील दत्तक योजनेची मदत मिळत असते असे मला समजले.

       आर्थिक मदत वाटपाचे काम सुरू झाले होते.दुसरे महत्त्वाचे काम, शैक्षणिक शिबिरांतून विद्यार्थी मार्गदर्शन, हे काम देखील  आम्ही अगदी पहिल्या वर्षीच सुरू केले. अशा शिबिरातून विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा त्याचप्रमाणे व्यवसाय मार्गदर्शन(Vocational Guidance) केले झाई. देहेरी, बोरीगाव घोलवड या शाखां साठी पहिले शिबिर बोर्डी  येथे झाले.  केळवे-माहीम शिरगाव या भागातील विद्यार्थ्यांसाठी दुसरे शिबिर के. माहीम येथे भरविण्यात आले.दोन्ही शिबिरांना उत्तम प्रतिसाद मिळाला. संगणक तंत्रज्ञान त्याच सुमारास उपलब्ध झाले असल्याने, त्याबाबतीमधील  मार्गदर्शन ही करण्यात येत असे .या शिबिराचे यश पाहून इतरही सर्व शाखांनी अशी शिबिरे त्यांच्या शाखेत भरवण्याची मागणी केली. मार्गदर्शन शिबिरे, परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी  उपलब्ध होती. या शिबिरात बुद्धिमान चाचणी परीक्षाही(IQ) घेतली जात असे. त्या काळातील एक नामवंत व्यवसाय मार्गदर्शन तज्ञ श्री बाळ सडवेलकर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या शिबिरांस उपस्थिती लावली.  अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या सल्ल्याचा भावी आयुष्यात उपयोग झाला. या सर्व नियोजनात आमचे सहकारी मित्र श्री भालचंद्र पाटील व श्री सदानंद राऊत यांनी खूप योगदान दिले आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे आजही ही शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे चालू असून ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनहोत असते. .

     पुढच्या काळात श्री.प्रभाकर ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीत, शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरा बरोबरच तरुण पदवीधरांना,’ पब्लिक सर्विस कमिशन’, तसेच राज्यस्तरावरील व केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी ‘खास मार्गदर्शन वर्ग’, तज्ञा मार्फत सुरू केले. डाॅ. देवराव पाटील व डॉ .सौ. नीला देवराव पाटील या उभयतांनी संबंधित क्षेत्रातील तज्ञांना आमंत्रित करण्याबाबत खूपच काम केले. विद्यार्थ्यांना नोकरी ,स्पर्धा ,मुलाखती परीक्षेत यशस्वी होण्याचे बाबतीत मदत झाली.

   हे सर्व उपक्रम चालू असतानाच परस्पर संपर्कासाठी सर्वांनी वर्षातून एकदा तरी एखाद्या शाखेत एकत्र जमावे असा सर्वांचा आग्रह होता त्यासाठी एका वार्षिक मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरले. अशा मेळाव्यामुळे सभासदांना त्यांच्या परिवाराला व एकंदरीतच समाज बांधवांना वर्षातून एकदा तरी एकत्र आणून असलेला परिचय दृढ व्हावा हा हेतू होता.  त्याचबरोबर  गतवर्षात ज्या सभासदांनी व समाज बांधवांनी  विशेष कर्तुत्व गाजविले असेल त्यांचा सत्कारही करावा व त्यांचे कडून प्रबोधन व्हावे अशी भावना होती.

    मा वि संघाचा पहिला मेळावा 17 जानेवारी 1999 रोजी बोर्डी शाखेत घेण्यात आला. पहिलाच मेळावा असल्याने सर्वांनाच खूप उत्साह होता. उपस्थिती लक्षणीय होती. डॉ.जयंतराव पाटील, त्यावेळी भारताच्या नियोजन मंडळाचे  सदस्य, यांनी आपला बहुमोल वेळ खर्च करून या मेळाव्यास उद्घाटक म्हणून येऊन मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ.सौ नीला पाटील ,श्रीमती सुशीला दीदी राऊत ,श्री विजयानंद दामोदर पाटील श्री रघुनाथ का सावे कर्नल प्रताप सावे, या हितचिंतकांनी देखील आपले विचार मांडून मा वि संघाला मार्गदर्शन केले .आमचे सहकारी व मा विद्यार्थी  सर्वश्री नरेश राऊत ,मनोहर चौधरी रामचंद्र सावे,प्रभाकर सावे, डॉ. हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या बहुमोल कामाची माहिती सर्वांना करून देण्यात आली. बोर्डी गावाचे अध्वर्यु  श्री मदनराव सावे उर्फ मदन मामा,व कृष्णराव राऊत उर्फ बापू यांनी  हा मेळावा  यशस्वी होण्यात खूपच बहुमोल सहकार्य दिले. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आमच्या तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहाचे पहिले रेक्टर डॉ. मधुकर उर्फ मॅथ्यू  ठाकूर यांनी अमेरिकेहून खास संदेश पाठवून आम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या.  मदतीचे आश्वासन  दिले होते. डॉ.ठाकूर आज जगात ‘न्यूक्लियर मेडिसिन’, या विषयातील मोठे नाव आहे.

   23 एप्रिल 2000 रोजी माजी विद्यार्थी संघाचा दुसरा मेळावा चिंचणी शाखेत संपन्न झाला. उद्घाटक म्हणून अॅड्. महादेव मो राऊत यांना निमंत्रित केले होते. त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्नल सदाशिव वर्तक यांची उपस्थिती ही लक्षणीय होती. दोघांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव सांगत माजी विद्यार्थ्यांना खूपच बहुमोल प्रबोधन केले. या मेळाव्यात सौ मंदा भास्कर सावे (सामाजिक), कु गौतम मधुकर सावे, कुमारी प्रीती श्रीकांत राऊत, कु. महेंद्र राजेंद्र वर्तक (शैक्षणिक ),कुमारी गंधाली मधुकर वर्तक (साहित्य),  व भरत पद्मण  राऊत (व्यवसाय), यांचा आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बाबत सत्कार करण्यात आला.

    तिसरा मेळावा पालघर येथे, केळवे-माहीम शाखेतर्फे घेण्यात आला.हा मेळावा एप्रिल 2001 मध्ये संपन्न झाला.  आमच्या सो क्ष संघ फंड ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त श्री चिंतामणराव वर्तक हे प्रमुख पाहुणे होते. समाजसेवक श्री.नारायण का राऊत हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.दोघांनीही आमच्या  शैक्षणिक उपक्रमांची  प्रशस्ती करून आम्हाला आशीर्वाद दिले. केळवे-माहीम परिसरांतील काही वयोवृद्ध नागरिकांचा व हुशार विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. 

      वार्षिक संमेलन क्षणचित्रे. (वर): वर्तमान अध्यक्ष श्री प्रमोद भाई पाटील मुख्य पाहुण्यासमवेत. खाली (डावीकडे): श्री दिगंबर राऊत भाषण करताना, बसलेले श्री रंजन पाटील उपाध्यक्ष ,श्री पुरुषोत्तम राऊत प्रमुख पाहुणे, श्री प्रमोद भाई पाटील अध्यक्ष. खाली (उजवीकडे) :मदत प्राप्त विद्यार्थीनी आपल्या सद्भावना प्रकट करताना.

     गेली सुमारे 25 वर्षे प्रत्येक वर्षी हा वार्षिक मेळावा वेगवेगळ्या शाखेत भरविला जातो. सर्व माजी विद्यार्थी मित्र सहकुटुंब एकत्र येतात. जुन्या आठवणी जागवतात व सहभोजनाचा आनंद लुटून  पुढील वर्षी एकत्र येण्यासाठी एकमेकांचा निरोप घेतात. मेळावा आमच्या  सो क्ष समाजात एक आकर्षणाचा चर्चेचा विषय झाला आहे.  पुढील सर्व मेळाव्यांची माहिती देणे येथे अप्रस्तुत होईल म्हणून ती दिली नाही.

     शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे दरवर्षी चालू होतीच .मात्र बदलत्या काळानुसार खेड्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी सायन्स व गणित या तीन विषयात विशेष मार्गदर्शनाची गरज आहे असे आढळून आल्याने या तीन विषयासाठी  विशेष  मार्गदर्शन शिबिरे सुरू करण्यात आली. मा वि संघातर्फे दरवर्षी दोन दिवसांचे शिबिर विविध शाखेंत भरविले जाते . सुमारे 300 ते 400 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असतो. या मुळे अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांना कठीण वाटणाऱ्या या विषयांत उत्तम यश मिळत आहे.  महाविद्यालयीन जीवनात त्यांना याचा फायदा होत आहे.

     संघ स्थापन झाला .कायदेशीर पूर्तता झाल्या .आर्थिक निधीची  जमवाजमव  केली. शिष्यवृत्या दत्तकयोजना ,शैक्षणिक उपक्रम,मार्गदर्शन शिबिरे,  वार्षिक मिळावे सर्व कार्यक्रम उद्दिष्टा प्रमाणे होऊ लागले.मात्र एक खंत सर्वच सहकाऱ्यांच्या मनात सतत असे.ती म्हणजे,संघाला आपले स्वतःचे कार्यालय नव्हते! अनेक वर्षे संघाचे ऑफिस म्हणजे कोणा पदाधिकाऱ्याचे निवासस्थान,होते!सर्व  सभा चर्चा  आलटून पालटून कोणाच्यातरी निवासस्थानी होतं. अगदी सुरुवातीपासून आमचे संस्थापक सदस्य श्री रमेश सावे यांचे अधेरीतील घर हाच आमचा कार्यालयीन पत्ता होता. अनेक सभा चर्चा तेथेच झाल्या. त्याचबरोबर श्री नरोत्तम वर्तक ,श्रीनिवासचुरी,  श्री सदानंद राऊत श्री प्रभाकर ठाकूर व माझ्या निवासस्थानाचा ही वापर होई. श्रीनिवास चुरी  यांचे निवासस्थानी देखील काही काळ आमचे दप्तर होते. श्री प्रभाकर ठाकूर यांच्या अध्यक्षीय कालखंडात त्यांनी पुढाकार घेऊन सन 2018 मध्ये आमचे स्वप्न साकार केले.आज विरार पूर्व, येथे  मा वि संघाचे सुसज्ज,ऐसपैस कार्यालय तयार झाले आहे.विरारचे विकासक किशोर उर्फ रघुवीर ठाकूर यांनी आमच्या कार्याला सदिच्छा म्हणून अतिशय माफक दरात ही जागा दिली आहे. संघ त्यांचा सदैव ऋणी राहील.

 विरार येथील संघाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे श्री पुरुषोत्तम भाई कवळी .सोबत श्री प्रभाकर ठाकूर अध्यक्ष, डॉक्टर मधुकर राऊत श्री सुहास राऊत.

      आता कार्यालयीन उपलब्धता झाल्यामुळे, खालील उपक्रम हाती घ्यावे असा मा वि  संघाचा मानस आहे ,

 1. व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन याबाबत नियमित वर्ग.
 2. बँका, सरकारी उपक्रम, केंद्रीय लोकसेवा आयोग,महाराष्ट्र लोकसेवा आयोग, इत्यादी स्पर्धात्मक परीक्षा बाबत वार्षिक नियोजन. 
 3. संगणक विषयक प्राथमिक व उच्चस्तरीय तंत्रज्ञान वर्ग सुरू करून त्यासाठी समाजातील तज्ञ ,उद्योजक व तंत्रज्ञ यांच्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना देणे.
 4. परदेशस्थ  विद्यार्थ्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा संपर्क घडवून संवादाद्वारे त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करणे

    पैकी काही उपक्रम सुरू झालेले असून इतर उपक्रम सुरू करण्याच्या बाबतीत प्रयत्न चालू आहेत असे कळते.

   आमचा संघ स्थापन झाल्या वर्षापासून आज सुमारे 25 वर्षे एक विशेष उल्लेखनीय उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. समाजातील एका गतधवा भगिनीला, आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एकशिवण यंत्र / घरघंटी भेट देऊन अनाथ कुटुंबाला व्यवसाय उपलब्ध करून देणे.एक संस्थापक सदस्य व पार्ले महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक प्रकाश राऊत व सौ सुजाता प्रकाश राऊत यांच्या सौजन्यामुळे आम्हाला ते शक्य झाले. या उभयतांच्या दातृत्वाला  तोड नाही. अनेक गतधवा भगिनी कृतज्ञतेने त्यांची जाणीव ठेवतील ही अपेक्षा आहे. 

                        प्राध्यापक प्रकाश राऊत व सौ सुजाता राऊत, घरघंटीचे दान करताना एका वार्षिक समारंभात.

     माजी विद्यार्थी संघाने आजतागायत सुमारे 75 लाख रुपयाचे वाटप शिष्यवृत्तीच्या रूपात विद्यार्थ्यांना केले आहे. ही रक्कम निश्चितच मोठी असून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल झाले आहे. तरीही अजून ही रक्कम अपुरी पडत असून आमचे हात सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाहीत ही खंत आहे.

   मा वि संघाची मदत घेऊन आपल्या आयुष्यात मोठी मजल मारणाऱ्या काही लाभार्थींचा मुद्दामच उल्लेख करतो.डॉ. सलील वसंत राऊत,बोर्डी  हे आमच्या परदेश शिक्षण शिष्यवृत्तीचे पहिले लाभार्थी. त्यांनी भारतात एम बी बी एस ही वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर ,अमेरिकेत नामवंत विद्यापीठात एम एस व पीएच डी या दोन पदव्या सन्मानपूर्वक मिळवल्या.सध्या भारतात ते एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करीत आहेत.डाॅ,सलील यांनी मा वि संघाला दिलेल्या सदिच्छा पुढे  देणार आहे. डॉ.मानस सावे तारापूर यांना वैद्यकीय शिक्षण (एम.डी),घेण्यासाठी  आर्थिक सहाय्य दिले गेले .ते आज मुंबईत एक प्रख्यात मधुमेह तज्ञ म्हणून व्यवसाय करीत आहेत. अलीकडच्या काळात वसईच्या डॉ.युग्मा म्हात्रे यांनी माजी विद्यार्थी संघाच्या मदतीचा उपयोग करून एक सेवाभावी डॉक्टर म्हणून वसईत काम सुरू केले आहे.

    ही काही नमुन्या दाखल घेतलेली नावे आहेत. गेल्या कित्येक वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी संघाची आर्थिक मदत व शैक्षणिक मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल यशस्वीपणे सुरू केली आहे.

   मदतीची रक्कम व लाभार्थी  विद्यार्थ्यांची संख्या वाढवत ठेवण्याचा माजी विद्यार्थी संघाचा  मनोदय आहे .त्यासाठी सर्व समाज बांधवांनी संघाला मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती ही मी या निमित्ताने करीत आहे  करणे जरुरी आहे.

डॉ.सलील राऊत यांचे मनोगत त्यांच्याच शब्दात..

    “I would like to take this opportunity to thank the Maaji Vidyarthi Sangh for bestowing an award on me, for students going to foreign shores to pursue their education. As one of the first awardees, it gives me great pleasure to say that it was a source of encouragement to pursue my education in a foreign land filled with many unknowns. It has been about 25 long years and I have since returned to India to pursue a professional career in Medical affairs after completing a Ph.D. in Neurobiology and a mini-MBA Biopharma management. I wish them the very best in their future endeavors and hope that they continue to encourage many more students to fulfill their potential.”

हे मनोगत खूप बोलके असून एका प्रथीतयश  विद्यार्थ्याच्या  शैक्षणिक वाटचालीत,अल्प स्वरूपात का असेना, आम्ही मदतरूप ठरलो याचा आम्हालाही सार्थ अभिमान आहे!

विरार येथील संघाचे कार्यालय विकत  घेण्यासाठीही अनेकांनी उपकृत केले आहे. त्यातील काही ठळक नावांचा उल्लेख करणे माझे कर्तव्य समजतो.        

नावरु.लाख. 
1अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्ट, वान्द्रे 6
2डाॅ. मधुकर राऊत, विरार, चिंचणी5.2
3श्री.प्रभाकर ठाकूर,बोरीवली, केळवे4.05
4श्री.प्रकाश पाटील, बोरीवली, विरार 2.7
5अविनाश म्हात्रे बोरीवली, वसई. 2.40
6 श्री दिलीप भाई करेलीया, मुंबई 1.85
7श्री मनोहर चौधरी बोरीवली, माकूणसार,2.20
8श्री अजय ठाकूर. के. माहीम  1.0
9श्री नरेश भाई राऊत.  बोरीवली,बोर्डी   0.51
10श्री प्रफुल्ल का.म्हात्रे,रामबाग  0.51
11श्री विकास वर्तक.विरार0.50

     या सर्व समाज बांधवांनी योग्य वेळी दिलेल्या अमूल्य मदतीमुळे माजी विद्यार्थी संघाची ही घोडदौड आज पर्यंत वेगाने चालू आहे. माजी विद्यार्थी संघ, आज आपल्या स्वतःच्या शानदार अशा, विरार मधील ऑफिसात स्थानापन्न झालेला आहे. 

समाज बांधवांकडून मदत  घेत असतानाच 2007 साली जेव्हा सो क्ष संग फंड ट्रस्ट ने तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतीगृहातील   सोयीं सुविधांचे  नूतनीकरण केले ,तेव्हा माजी विद्यार्थी संघाने ट्रस्टला रू.17000 देणगी दिली आहे हेही नमूद करण्यास मला आनंद होतो.

    कोणतीही सार्वजनिक संस्था संस्था जेवढी आर्थिक बळावर उभी असते त्यापेक्षा अधिक, निष्ठावंत,कष्टाळू,प्रामाणिक सेवा  देणाऱ्या कार्यकर्त्यावर अवलंबून असते.सन 1998 पासून आजतागायत ज्या मित्रांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, कार्यवाह इत्यादी पदे भूषवीत  संस्थेला आजचे स्थान मिळवून दिले आहे त्या सर्वांचा उल्लेख येथे करीत नाही. त्यांना धन्यवाद देतो. मात्र सध्या ज्या व्यवस्थापनाखाली माजी विद्यार्थी संघ काम करतो आहे त्यांचा मात्र उल्लेख करतो,

  सन 2018 पासून श्री. प्रमोद ज पाटील अध्यक्ष, रंजन ज पाटील उपाध्यक्ष, अशोक ह राऊत कोषाध्यक्ष व नरेंद्र दा वर्तक कार्यवाह असे  कार्यकारी माजी विद्यार्थी संघाचा गाडा सुरळीतपणे  पुढे नेत आहेत. ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रात तज्ञ, नावाजलेली असून या संघाच्या कार्याशी गेली अनेक वर्ष संलग्न आहेत.

  माजी विद्यार्थी संघाच्या सल्लागार समितीमध्ये माझेही योगदान असते.

   सन्माननीय एन एन लोखंडे साहेब,  सहा लाख रुपयाची भरघोस देणगी देणारे दाते!

    ज्या श्री एन एन श्रीखंडे साहेबांनी आमचे मित्र श्री श्रीनिवास चुरी यांच्याशी असलेल्यां परिचयातून संघाला सहा लाख रुपयाची भरघोस देणगी दिली,त्याचे बद्दल दोन शब्द लिहिणे मी माझे कर्तव्य समजतो.

    मुंबई विद्यापीठाची बी ई सिविल, ही पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ बहुराष्ट्रीय कंपन्यांत नोकरी केली व पुढे आपली स्वतःची,’ श्रीखंडे कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड ‘,ही कंपनी स्थापन करून त्या कंपनीमार्फत जगभर मोठा व्यवसाय केला. नुकतेच ते या कंपनीचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर(CMD), म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.वयाची  नव्वदी पार केलेले श्रीखंड साहेब आजही अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांशी संबंधित असून, कार्यकारी मंडळावर सेवा देतात. आपल्या ‘अनिकेत मेमोरियल ट्रस्ट’,मार्फत अनेक गरजू संस्थांना सढळ हस्ते आर्थिक मदत करीत असतात. माजी विद्यार्थी संघातर्फे त्यांना भरपूर शुभेच्छा मनःपूर्वक आभार!

    माजी विद्यार्थी संघाच्या स्थापने आधीपासूनच ज्या  माजी विद्यार्थी मित्रांनी अतिशय तळमळीने व आस्थेने संघ स्थापना,  वृद्धी व पुढील वाटचालीत महत्त्वाचे योगदान दिले, मात्र आज  संघाचे  वैभव पाहण्यासाठी ते या जगात नाहीत, त्यांचा नामोल्लेख व आठवण करून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. ते आमचे कर्तव्य आहे.

   वर (डावीकडे), रवींद्रनाथ भास्करराव ठाकूर. (उजवीकडे), श्रीनिवास काशिनाथ चुरी.. खाली (डावीकडे) डॉ.गजानन वर्तक. खाली (उजवीकडे) प्रा. हरिहर आ ठाकूर.

       कै. रवींद्रनाथ भास्कर ठाकूर, शिरगाव-विरार.एम ए ,एल एल बी .महाराष्ट्र सरकारच्या आस्थापनात वरिष्ठ व्यवस्थापक पदावर काम केले.इंग्रजी भाषा व इंग्रजी लिखाणावर प्रभुत्व.रोखठोक बोलणे. जीवन मूल्ये कोणत्याही परिस्थितीत जपणारा एक भला माणूस.

       कै. श्रीनिवास का.चुरी. बी ई (मेकॅनिकल) ,वांद्रे-बोर्डी. एक हुशार विद्यार्थी. काही काळ बहुराष्ट्रीय कंपन्यांत नोकरी व पुढे स्वतःचा कन्सल्ट॔ट म्हणून उद्योग सुरू केला. आमच्या संघाचा चालता बोलता शब्दकोश होता. अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्ट ची  सहा लाख रुपयाची देणगी केवळ त्यांच्या परिचयातून मिळाली.

     कै. डॉ. गजानन वामन वर्तक के.माहीम-अंधेरी, एल सी इ एच. अंधेरी पूर्व येथे वैद्यकीय व्यावसायिक. सडेतोड व्यक्तिमत्व, मोठा लोकसंग्रह परंतु कोणत्याही पदाची अभिलाषा न बाळगता सहकार्य  दिले. संघाची घटना तयार करून ती सरकार दरबारी मंजुरी करून घेण्याचे काम त्यांचे होते.

    कै. हरिहर आत्माराम ठाकूर, दातिवरे-बोरिवली.M E (Mech), प्रथमवर्ग. V J T I या प्रसिद्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत. विद्यार्थी मार्गदर्शन शैक्षणिक शिबिरे या उपक्रमात पुढाकार असे .वसतिगृहाचे तिसरे रेक्टर. 

    कै. प्रकाश हिराजी सावे बोर्डी-विरार. शिक्षण कमी झाले तरी आपल्या कर्तृत्वाने भायखळा भाजी मार्केट मधील एक प्रथितयश व्यापारी होते. मितभाषी व कोणत्याही कामाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असत. घटना बनविण्याचे कामी डाॅ.  गजानन वर्तक यांना साथ दिली. 

   कै. नरोत्तम वर्तक,के माहीम-अंधेरी. बी एससी, मुंबई  महानगरपालिकेत अधिकारी. सो क्ष संघाचे चिटणीस म्हणूनही योगदान. एक उत्तम संघटक व कार्यकुशल सहकारी. त्यांच्या निवासस्थानी संघाच्या अनेक सभा चर्चा झाल्या आहेत. 

दुर्दैवाने प्रकाश व नरोत्तम भाई यांची छायाचित्रे उपलब्ध होऊ शकली नाहीत.

    वरील मित्रां खेरीज अजूनही कित्येक सहकाऱ्यांनी या कामात आपले योगदान सुरुवातीला दिले आहे .सर्वांचा नावाचा उल्लेख मी करू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी वाटते. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

    काही ऋणनिर्देश केल्याशिवाय हा लेख संपवू शकत नाही. सो क्ष संघाचे तत्कालीन सर्व  धुरीण, संघ फंड ट्रस्टचे सर्व विश्वस्त,  विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना सहकार्य देणारे चित्रकार हरीश राऊत, योग विद्या शिकविणारे डॉ. गजाननराव पाटील, आरोग्य तपासणी करून जाणारे डॉ.मोहन कृष्णा राऊत,तत्कालीन स्मारक मंदिर व्यवस्थापक पांडुरंग भाऊराव पाटील ,वस्तीगृह भोजनालयाचे व्यवस्थापन करणारे श्री सखाराम  पाटील व त्यांची टीम, भोजनालयात कुलर व दूरदर्शन संच भेट देऊन विद्यार्थ्यांचे सतत हित पाहणारे सहल सम्राट राजाभाऊ पाटील, विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवत अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावणारे  माजी अध्यक्ष पर्यटन सम्राट केसरीभाऊ पाटील,चालना संपादक अरविंद राऊत, विद्यार्थ्यांना अणुविज्ञानाचे रहस्य समजाविणारे शास्त्रज्ञ डॉ.देवराव वर्तक, आकाश दर्शन घडविणारे बाबुराव सावे, वेळ मिळेल तेव्हा विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणारे शांतारामजी पाटील ,अशा अनेक धुरणांचे हितचिंतकांचे व सुहृदांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून वंदन करतो!

      सुरुवातीला केवळ काही हजारांच्या  निधीतून  सुरुवात करीत केवळ सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन कार्याला सुरुवात करणारा संघ आज घडीला दरवर्षी सुमारे वीस विद्यार्थ्यांना विविध गटांत सहा लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिपचे वाटप करतो आहे.  सुरुवातीला काही लाखांचा असणारा राखीव निधी आज रुपये पाऊण कोटी पर्यंत गेलेला आहे. संघाचे स्वतःचे कार्यालय सुरू झालेले आहे. अजूनही मा वि संघाला मोठी मजल मारावयाची असून  त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे.एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षात सो क्ष संघाच्या नेतृत्वाकडे नजर टाकल्यास, माजी विद्यार्थी संघ ही आमच्या मुख्य केंद्रीय संस्थेला, सो क्ष संघाला पदाधिकारी पुरविणारी कार्यशाळा ठरली आहे. सो क्ष  संघ व ट्रस्ट  यांतील अनेक महत्त्वाचे पदे वसतीगृहाच्या माजी विद्यार्थीनी सांभाळली आहेत. आज 2024 सालचे संघ अध्यक्ष श्री नरेश भाई राऊत हे सुद्धा माजी  विद्यार्थी आहेत.

          समारोप करताना सर्व समाज बांधव सर्व माजी विद्यार्थी मित्र,  यांना नम्र विनंती करतो, या आमच्या माविसंघाच्या अगदी प्राथमिक अवस्थेतील रोपट्याला आपण खूप प्रेम जिव्हाळा दिला, तेच प्रेम व आस्था  भविष्यातही अशीच  असूदे ही विनंती .

   हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लाविले जी झाड .

    तरी आता अवधानामृते वाड, शिंपोनि कीजे!

   धन्यवाद.

 •  सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नति संघ फंड ट्रस्ट विश्वस्त व कार्यकारी विश्वस्त:

    ज्या कै.पू.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वस्तीगृहात  1963 साली विद्यार्थी म्हणून दाखल झालो, पुढे सन 1965 पासू1971पर्यंत सहा वर्षे स्मारकमंदिर व वसतीगृहाच्या व्यवस्थापक,रेक्टर म्हणून काम पाहताना कै. चिंतामणराव वर्तकां सारख्या एका कर्तव्यपरायण कार्यकारी विश्वस्तांचे हाताखाली काम करायची संधी मिळाली ,त्याच कार्यकारी विश्वस्ताच्या खुर्चीवर मीही एक दिवस विराजमान होईन ही तेव्हा स्वप्नातही कल्पना नव्हती.पण ते स्वप्नातही नसलेले सत्यात आले,ही  परमेश्वराने समाजाचा उतराई होण्याची मला दिलेली संधी होती. मला वाटते मी त्याचा उपयोग करून होता होईल तेवढे समाजॠण फेडण्याचा प्रयत्न केला.त्याचं कालखंडाची ही थोडक्यात माहिती.

     माझे मित्र व सो क्ष समाज संघाचे सध्याचे उपाध्यक्ष डॉ.नरेश सावे यांनी सुरुवातीलाच दिलेल्या त्यांच्या लेखात आमच्या संघाच्या सन 1929साली झालेल्या स्थापनेपासून ते आजतागायत  समाजाचा वाटचालीचा संक्षिप्त इतिहास दिला आहे. सुरुवातीच्या एका अडाणी अशिक्षित व्यसनाधीन समाजाचे आज एका सुशिक्षित सुसंस्कृत व कर्तबगार समाजात कसे रूपांतर झाले ते त्यांनी अगदी मोजक्या शब्दात मांडले आहे.  या लेखात आमच्या संघ फंड ट्रस्टचा थोडक्यात इतिहास व त्यात माझे योगदान याबद्दल  लिहिले आहे.

     सो क्ष स संघाचे पहिले विश्वस्त मंडळ सन 1939 साली स्थापन झाले. पहिले मुख्य विश्वस्त कै गोविंदराव उर्फ अण्णासाहेब वर्तक होते. कार्यकारी विश्वस्त म्हणून त्या मंडळात कै.तात्यासाहेब चुरी यांची निवड झाली होती.आत्माराम पंत सावे, बळवंतराव वर्तक,नारायणराव म्हात्रे ,ही मंडळी विश्वस्त म्हणून काम पाहत होती. अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर १९५३ साली हरीभाऊ गोविंदराव उर्फ भाऊसाहेब वर्तक मुख्य व कार्यकारी विश्वस्त म्हणून काम पाहू लागले .भाऊसाहेबांच्या निधनानंतर 1998 साली श्री चिंतामणराव वर्तक हे समाजाचे मुख्य विश्वस्त झाले. मामासाहेब ठाकूर हे त्यांचे कार्यकारी विश्वस्त होते. भाऊसाहेब व चिंतामणराव यांच्या कारकीर्दीत मी  विद्यार्थी वसतिगृहाचा रेक्टर म्हणून काम पाहत होतो.  चिंतामणराव व मामासाहेब ठाकूर यांच्या दुःखद निधनानंतर 2002 सालीदोन नवीन विश्वस्तांची निवड करण्यात आली. सुदैवाने त्यापैकी एक विश्वस्त म्हणून माझी तर दुसऱ्या जागी सौ विजयाताई वर्तक यांची निवड झाली. दामोदर सावे सर मुख्य विश्वस्त व डॉक्टर बळवंतराव पाटील हे कार्यकारी विश्वस्त श्री रमेश चौधरी विश्वस्त आमचे सहकारी होते.मला विश्वस्त म्हणून तीन वर्षांचा कालखंड मिळाला.

   त्यानंतर 2005 ते 2014 सालापर्यंत श्री प्रमोद चुरी मुख्य विश्वस्त व मी,दिगंबर राऊत कार्यकारी विश्वस्त होतो .

   2014ते 2023 श्री गोपीनाथ वर्तक /डॉ.सदानंद कवळी मुख्य विश्वस्त व डॉ.दीपक चौधरी कार्यकारी विश्वस्त हे मंडळ आले.

   1924 पासून डॉ. चौधरी मुख्य विश्वस्त व श्री सुरेश वर्तक कार्यकारी मंडळ श्री विलास बंधू चोरघे, सौ नमिता चुरी श्री अनिल सावे हे विश्वस्त मंडळ आहे.

   सो क्ष संघ फंड ट्रस्टच्या विश्वस्त मंडळांची सुरुवाती पासूनची थोडक्यात नामावली अशी आहे.

 श्री दामोदर हरी सावे यांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षाचा कालखंड, पुढे श्री प्रमोद चुरी  यांच्या कारकीर्दीत नऊ वर्षाचा कालखंड अशा एकूण बारा वर्षाचा कालावधीत मला जी संधी मिळाली त्या कालखंडात, विश्वस्त व कार्यकारी विश्वस्त म्हणून दिलेल्या योगदानाचा लेखाजोगा या देत आहे.

   या बारा वर्षाच्या कालखंडात माझे  सहकारी विश्वस्त श्री दामोदर सावेसर, श्री रमेश चौधरी सर, श्री सतीश नाना वर्तक, श्री प्रमोद चुरी, व कै भालचंद्र पाटील या काही सहकार्यावर मी विस्तृतपणे स्वतंत्र लेख लिहिल्याने त्या ठिकाणी आमच्या कार्याचा उल्लेख आलेला आहे . द्विरूक्ती टाळण्यासाठी मी फक्त इतरत्र न आलेली माहिती येथे देण्याचा प्रयत्न करीत आहे. 

   सन 2002 ते 2005 या कालखंडात पहिले वर्ष हे साधारणपणे विश्वस्त मंडळाच्या कामाचे स्वरूप व काही प्रश्नांचा अभ्यास करण्यातच गेले. श्री सावे सर व डॉ. पाटील दोघे  समाज कार्याशी दीर्घकाळ संबंधित असल्याने कामात विशेष  लक्ष घालीत. सावेसर केळव्याला राहत असल्याने, कार्यकारी विश्वस्त व मुंबईत स्थानिक असणारे  डॉ. पाटील कार्यालयात भेट देऊन दैनंदिन कारभार हाताळीत.विश्वस्त मंडळाकडे दादरचे तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृह,केळव्याचे आरोग्यधाम व विश्राम धाम यांचे संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी असते. डॉ. पाटील व डॉ. सदानंद कवळी, विश्रामधाम समिती प्रमुख ) वैद्यकीय व्यवसायाशी निगडित असल्याने अनेक वर्षे हा कारभार त्यांच्याकडे होता.  तेथे इतरांनी जास्त लक्ष देणे गरजेचे नव्हते.वसतीगृह चालविण्याचा अनुभव माझ्याकडे असल्याने त्या संबंधी काही प्रश्न हे मला सोपविले जात. त्या दिवसात वसतीगृहाची शिस्त  मागील काही वर्षातील अनास्थे मुळे बिघडली होती. काही बेशिस्तीचे प्रकार घडले होते.त्यामुळे वस्तीगृह व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून अधिक वेळ  लक्ष पुरवू शकणाऱ्या व शिक्षण क्षेत्राशी संबंधित अशा समाज बंधूंना समितीवर घेऊन हळूहळू शिस्त पूर्वपदावर आणली. 

     विद्यार्थिनी साठी मुंबईत कॉलेज अभ्यासाकरिता राहण्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. अनेक वर्षापासून हा प्रस्ताव प्रलंबित होता .नवीन वसतिगृह उभारणे आर्थिक दृष्ट्या शक्य होणार नव्हते .त्यामुळे आमच्या विश्वस्त मंडळाने त्याबाबतीत मुंबईत भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन ती सोय केली. सुमारे दहा ते पंधरा विद्यार्थिनी ची राहण्याची सोय होऊ शकली. मुलींसाठी प्रथमच अशी सोय मुंबईत करण्यात आमच्या विश्वस्त मंडळाने पुढाकार  घेतला .ते एक धाडसी पाऊल होते .

    दुसर्या एका महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालून आमच्या तत्कालीन विश्वस्त मंडळाने  पूर्ण पाठपुरावा केला.तो प्रश्न म्हणजे अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व सभागृहासाठी लग्न व इतर समारंभा करिता खानपानाच्या व्यवस्थेची ठेकेदारी.पूर्वी अशी ठेकेदारी  समाजातील इच्छुक व्यवसायिकांशी चर्चा करून एका व्यक्तीची निवड केली जाई.’असे करण्यात पारदर्शकता राहत नाही’, ,असा आक्षेप काही समाज बंधूंनी घेतल्यामुळे  निविदा पद्धती चा अवलंब करून निवड व्हावी असे आम्ही ठरविले.

 प्रथमच ही पद्धती अमलात आणावयाची असल्याने  सर्व प्रश्नांचा सांगोपांग विचार करून निविदा तयार करणे, नियम बनवणे, इतर संस्थांकडून माहिती घेणे, हे गुंतागुंतीचे काम होते .ते सर्व झाले व शेवटी दिलेल्या मुदतीत निविदा येण्याच्या काळात आमचा कालावधी संपला.श्री प्रमोद चुरी  यांच्या मुख्य विश्वस्त  काळातील  मंडळाने यापुढील  प्रक्रिया पूर्ण केली.  विश्वस्त मंडळ व  सो क्ष संघाला बराच आर्थिक फायदा होऊ लागला. ती हकीकत पुढे येईलच.

    त्यापुढील नऊ वर्षाचा कालखंड म्हणजे 2005ते  2014 या कालखंडात मला कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली. श्री. प्रमोद चुरी हे आमचे मुख्य विश्वस्त  श्री.विलास बंधू चोरघे ,विरार; श्री. सतीश वर्तक , श्री. शांतारामजी ठाकूर ,चटाळे असे आम्ही एकंदरीत पाच विश्वस्त या मंडळात होतो. दुर्दैवाने सन,2011 मध्ये श्री. सतीश वर्तक यांचे अकाली दुर्दैवी निधन झाल्याने त्या जागी श्री भालचंद्र पाटील ,वसई यांची निवड करण्यात आली. हा नऊ वर्षाचा कालखंड आमच्या सर्व विश्वस्तां साठीच नव्हे,  सर्व समाजासाठी  विशेषतः  विद्यार्थी वर्गासाठी, महत्त्वाचा ठरला. परंपरागत व्यवस्थेतील काही महत्त्वाचे बदल व कालानुरूप,काही आवश्यक सुधारणा ,अशा उपक्रमांचा पाठपुरावा करून सुदैवाने अनेक कामे करण्यात यशस्वी ठरलो. या सर्व नवीन उपक्रमासाठी अर्थातच आर्थिक निधीची  खूप गरज होती.समाज बांधवांकडून तो निधी जमवून, योजिलेले उपक्रम पूर्ण केले.शेवटी हे सर्व उपक्रमास आर्थिक सहाय्य देऊनही ,फंड ट्रस्ट निधी  वाढविला.

     सोमवंशी क्षत्रिय समाज संघ स्थापनेमागे मुख्य ध्येय समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक मदत करणे असा होता. व त्या धोरणानुसार अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना मदत दिली जात असे.  पहिल्यापासून जी रक्कम दिली जात होती त्यात  अनेक वर्षे पर्यंत बदल  झाला नव्हता.2005 साली विश्वस्त पदाची सूत्रे हातात घेते वेळी,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुमारे पाचशे रुपये प्रत्येकी अशी वार्षिक मदत मिळत असे. एकूण मदत सुमारे दोन लाख पर्यंत दिली जात असे. त्या कालच्या शिक्षणा खर्चानुसार ही खूपच अल्प अशी मदत होती. विद्यार्थ्यांची संख्याही वाढत होती.शिक्षणाचा खर्चही वाढत होता. त्यामुळे शिक्षण फंड वाढवून विद्यार्थ्यांना प्रत्येकी दिली जाणारी रक्कम ही कशी वाढवता येईल या अनुषंगाने आम्ही विचार करू लागलो. प्रत्यक्षात स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी व मुख्य विश्वस्त श्री प्रमोद चुरी  आम्ही दोघांनीही एक अभ्यास दौरा करावयाचे ठरविले.  स्थानिक शाखा चिटणीसांचे सहाय्याने,ज्यां विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत मिळत होती त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी व त्यांच्या पालकांशीवार्तालाप  करावा व प्रत्यक्षात स्थिती काय आहे ते पहावी असा आमचा हेतू होता. हे मोठे कठीण व वेळ खाऊ काम होते. अगदी उत्तरेस गुजरात राज्यालगत बोरीगाव-झाई शाखेपासून ते मुंबईतील विद्यार्थी-पालकांशी संपर्क साधून अभ्यास करावयाचा होता . व त्यानुसार आर्थिक मदतीचे धोरण व निकष ठरवावयाचे होते. आम्ही दोघांनी आठवड्यातील प्रत्येक शनिवार-रविवार या फिरती साठी दिला. व सुमारे चार  महिन्यात हा सर्व परिसर पिंजून काढून मदत घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थि-विद्यार्थिनीला पालकांना भेटलो. सत्य परिस्थितीची समजण्यास त्यामुळे खूप मदत झाली.

      प्रत्येक शाखेस भेट देताना आम्ही समाज बांधवांना विनंती करून देणग्या देण्याचेही आवाहन करीत असू.  त्या मार्गे ही बराच निधी जमा झाला. शिष्यवृत्ती संख्या वाढली ,ठेकेदारीच्या पद्धतीत बदल केल्यामुळे सभागृहाच्या  उत्पन्नातही भरीव वाढ झाली होती. त्यामुळे आम्ही एक नवीन आराखडा विद्यार्थी मदतीसाठी व शिष्यवृत्तीसाठी तयार करून विद्यार्थ्यांना द्यावयाची वार्षिक मदत व विद्यार्थ्यांची एकूण संख्या यात भरीव वाढ झाली.

     पूर्वी एकूण दोन लाख रुपये मदती ऐवजी आता सुमारे साडेआठ लाख रुपये मदत विद्यार्थ्यांना मिळू लागली. पहिल्या  प्राथमिक विभागात,ई. पाचवी ते नऊवी,  प्रत्येक विद्यार्थ्याला वार्षिक पाच हजार रुपये,दुसरा दहावी अकरावी बारावी माध्यमिक शालेय विभाग, त्यात प्रत्येकी दहा हजार रुपये व तिसऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम विभागासाठी, प्रत्येकी 15 हजार रुपये मदत मिळू लागली. शिष्यवृत्त्यी रक्कम सुरुवातीला एकूण रू.50,000 होती,समाज बांधवांनी दिलेल्या भरीव देणग्यां मुळे, ही रक्कम देखील सुमारे दोन लाख रुपये झाली .सर्वच थरांतील विद्यार्थ्यांना त्यामुळे खूप फायदा झाला. एकूण मदत वा शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही आता 400 च्या आसपास झाल्यामुळे विद्यार्थी गौरव समारंभ देखील मोठ्या थाटामाटात होऊ लागला आहे. आमच्याप्रत्यक्ष संपर्कामुळे अनेक प्रकारचे अनुभव मिळाले.त्यांचा निर्देश येथे करू इच्छित नाही.त्यामुळे विश्वस्त म्हणून आम्हाला समाजाचे जे आकलन होणे गरजेचे होते ते झाले,आमच्या कार्याची दिशा समाजाभिमुख होण्यास मदत झाली.

एक दोन प्रसंग केवळ आमच्या डोळ्यात अंजन घालणारे होते म्हणून त्यांचा थोडक्यात ऊल्लेख करतो

दातिवरे-कोरे परिसरातील एका शाखेला भेट देतेवेळी एका विद्यार्थिनीच्या घरी गेलो. पालक व शेजारी आले. चर्चा सुरू होती. मात्र स्कॉलरशिप मिळणारी विद्यार्थी लवकर येईना. अर्ध्या एक तासानंतर ही विद्यार्थिनी थोडीशी भांबावलेल्या परिस्थितीत येऊन बसली. सर्व माहिती व्यवस्थित दिली. खूप चुणचुणीत वाटली. मात्र आम्ही, ’उशीर का झाला?’, या प्रश्नाला समाधानकारपणे उत्तर देऊ शकली नाही. आई-वडिलांकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहत राहिली.. त्घरातून बाहेर पडताना शेजारच्या गृहस्थाने आम्हाला बाजूला घेऊन जी माहिती दिली ती खूप धक्कादायक होती… या मुलीकडे केवळ एकच ड्रेस होता. आम्ही आलो तेव्हा ती फाटक्या कपड्यात घरात  बसली होती. कारण कारण वापरातील ड्रेस धुवून वाळत घातला होता. मागच्या दाराने गुपचूप शेजारच्या घरी जाऊन मैत्रिणीचा ऊसना ड्रेस परिधान करून आली होती. त्यामुळे तिला उशीर झाला होता. विद्यार्थ्यांना मदतीची रक्कम ठरवितांना निश्चितच वेग्ळा विचार केला गेला पाहिजे, याची जाणीव झाली !

    माहीम-केळवे परिसरातील एका घरी गेलो. दोन बहिणी शिकत होत्या  मोठ्या बहिणीला शिष्यवृत्ती मिळत होती. मात्र तिच्या शिष्यवृत्तीवर लहान बहीणीची शिक्षणफी आणि इतर खर्च यावर खर्च होत होता. मोठ्या बहीणीला जास्त शिष्यवृत्ती असल्याने तिने शिष्यवृत्ती घेतली होती, कारण एका घरात दोन शिष्यवृत्त्या देऊ नये असा आमचा नियम होता. .मोठ्या बहिणीला जास्त शिक्षण न घेता हायस्कूल सोडून छोटी नोकरी करावयाची होती. गरीब होतकरू विद्यार्थ्यावर निश्चितच अन्याय होत होता.

 •       पू.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचे संपूर्ण दुरुस्तीकरण.

   आम्ही विश्वस्त मंडळाचे सूत्र हाती घेतले त्यावर्षी म्हणजे सन 2005 साली स्मारक  मंदिर निर्मितीस 45 वर्षे होऊन गेली होती.. दरम्यानच्या काळात आवश्यकतेनुसार लहान मोठ्या दुरुस्त्या,डागडुजी अशी किरकोळ कामे झाली होती. स्मारक मंदिराच्या संपूर्ण दुरुस्तीचे  काम एकत्रीतपणे असे झाले नव्हते.सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण स्मारक मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट’,करून आवश्यक त्या दुरुस्त्या एकाच वेळी करून घेणे जरूर झाले होते. आम्ही निविदा मागवून नावाजलेल्या कंपनीची निविदा पास , करून घेतली. ऑडिटच्या निष्कर्षानुसार वास्तूला त्वरित धोका नसला तरी मागील बाजूचे काही खांब, पाया व पश्चिमेकडील समुद्राच्या वाऱ्यामुळे त्या बाजूच्या भिंती ठिसूळ व नाजूक झाल्या होत्या.  हे काम करणे जरुरीचे व आवश्यक होते. अहवालांतील  शिफारशी प्रमाणे आम्ही सर्व कामे करून घेतली. सभागृहातील  सर्व फर्निचर ही नवीन करून घेतले.  दुरुस्त्या रंगरंगोटी ,सुशोभीकरण झाल्यानंतर, सभागृह वातानुकूलित करून घ्यावे अशाही सूचना आल्या. ते कामही करून घेतले.  वसईतील एक समाज बांधव श्री अशोक पाटील,यांनी हे काम करून दिले. मुख्य विश्वस्त श्री प्रमोद चुरी  हे स्वतः वातानुकूलन क्षेत्रातील एक तज्ञ असल्याने त्यांचेही मार्गदर्शन मिळाले.  सभागृहाच्या आकारात वाढ करून पण नाही वाढविले व आमच्या गिऱ्हाईकांना समाधान देऊ शकलो.

   सभागृहासमोरील असलेल्या बाल्कनीत दोन स्वतंत्र वातानुकूलित खोल्या निर्माण करून त्या  घरगुती समारंभास भाड्याने देता आल्या.एकंदरीत गेल्या 40, 45 वर्षात अपूर्ण राहिलेले दुरूस्त्या व नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने स्मारक मंदिरातील सुविधा व, सुरक्षा वाढली व उत्पन्नात वाढ झाली.

 •         पू.तात्यासाहेब चुरी  विद्यार्थी वसतीगृह सुविधा.

 पू.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृह १९६१ साली वीस पंचवीस विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या सोयीने निर्माण झाले. पुढे 1968मध्ये त्याचे विस्तारीकरण होऊन सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली गेली.मात्र अगदी पहिल्या वर्षा पासून जमिनीवरच बिछाना अंथरून, टेबल खुर्ची शिवाय अभ्यास करावा लागे. कपडे पुस्तके ठेवण्यासाठी कोणती सोय नव्हती. विद्यार्थ्यांना या मूलभूत सोयी देण्यासाठी  खोलीतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक छोटा लाकडी पलंग, त्यावर डनलाॅप गादी, टेबल खुर्ची,तसेच पुस्तके कपडे ठेवण्यासाठी कपाटाची सोय करून दिली. निश्चितपणे विद्यार्थ्यांना अभ्यासात त्याचा खूप फायदा होऊ लागला. हे सर्व काम निविदाद्वारेच करण्यात आले . आजच्या विद्यार्थ्यास त्याच्या अभ्यासासाठी इंटरनेटची सेवा आवश्यक झालेली आहे . इंटरनेट ची व्यवस्था ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे. 

      वसतिगृह भोजनालयात संध्याकाळच्या जेवणाची सोय होती.ठेकेदारांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे, सकाळच्या न्याहरीची सोय नव्हती.त्यांबाबत सविस्तर चर्चा करून ठेकेदारांनी सकाळच्या चहा  न्याहरीची सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली.ही एक मोठी अडचण दूर झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ मिळू लागला. 

     कै सौ इंदुताई व कै.पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विश्रामधाम निर्माण.

          विश्रामधाम  समोरील व मागील बाजू

   कै. भाऊसाहेबांच्या प्रयत्नामुळे समाजाला केळवे रोड येथील मोक्याची जागा विनाशुल्क मिळाली. त्यावेळी तेथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यसेवा  व विश्रामधाम(निवासी सेवा), निर्मिती व्हावी अशा सरकारी अटी होत्या. त्या अनुषंगाने आरोग्य सेवेचे काम सुरू झाले होते. मात्र विश्रामधामाचे काम मार्गी लागत नव्हते. तांत्रिक अडचणी होत्या . मुख्य म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘विना हरकत परवाना’, व आर्थिक निधीची सोय करणे ह्या  अडचणी होत्या.  हे काम जर लवकर झाले नाही तर सरकारी नियमानुसार ही जमीन सरकारला पुन्हा हस्तांतरित करण्याची नामुष्की ओढवली असती. हे जाणून आम्ही विश्वस्तांनी विश्रामधामाची निर्मिती करण्याच्या कामावर ज लक्ष केंद्रित केले.

   तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या व समाज भगिनी सौ नमिता ताई( सध्या संघ फंड ट्रस्टच्या विश्वस्त), उपाध्यक्ष श्री कमलाकर पाटील व आमचे सहकारी विश्वस्त विलास बंधू चोरघे यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी सुमारे एक वर्षाच्या सतत प्रयत्नानंतर मिळाली .मोठा अडसर दूर झाला. निधी उभारणीसाठीही आम्ही एक योजना तयार करून समाजातील भावी देणगीदारांची शाखा निहाय यादी तयार केली. विशेष व सर्वसाधारण देणगीदार अशी वर्गवारी केली.  प्रत्येक शाखेमध्ये शाखाचिटणीसांची मदत घेऊन प्रत्यक्ष संपर्क करण्याचे ठरविले.  निधी संकलनाची कामे करण्यासाठी वैयक्तिक संपर्क  खूप महत्त्वाचा असतो.या कामात देखील विश्वस्त विलास बंधू चोरघे यांनी नेतृत्व घेऊन या निधी संकलनाच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा जनसंपर्क व समाजातील त्यांचे विषयी आदर भावना याचा प्रत्यय आला. तत्कालीन समाजाध्यक्ष श्री सदानंद राऊत व त्यांचे सर्व कार्यकारी सदस्य यांनी मनःपूर्वक सहकार्य दिले. सर्व शाखात आम्ही प्रत्यक्षरीत्या गेलो. त्यामुळे देणगी जमा करण्याच्या कामास गती मिळाली निधीही वेळेत उपलब्ध झाला.

   सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी अल्पकाळात जमा झाला. संघफंड ट्रस्ट कडून एक कोटी रुपयाची भर घालण्यात आली.अशा रितीने  सुमारे अडीच कोटी रुपयांची सोय झाल्यावर  प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. 

    आर्किटेक्चर श्री दीपक ठाकूर यांचा प्लॅन व स्ट्रक्चरल इंजिनिअर श्री विनायक वर्तक के.माहीम यांचे दैनंदिन मार्गदर्शन, त्याचप्रमाणे अध्यक्ष श्री सदानंद राऊत व विलास बंधू चोरघे यांच्या नियमित देखरेखी खाली, बांधकाम कंत्राटदार श्री नयन घरत यांनी ठरविलेल्या वेळेत उत्तम वास्तू निर्माण केली. गौरवाची गोष्ट म्हणजे तत्कालीन केंद्रीय मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांचे हस्ते उद्घाटन सोहळा ठरविलेल्या दिवशी ,फेब्रुवारी 2013 मध्ये  मोठ्या दिमाखात पार पडला. आमच्या विश्वस्त  समितीचा कार्यकाल सन  2014 ला संपण्या आधी वर्षभर हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करून दिला.

    आज मितीस अनेक समाजातील सुमारे 25 वरिष्ठ नागरिक,बंधू व भगिनी  येथे आनंदाने आपली आयुष्याची संध्याकाळ घालवीत आहेत.  त्यांचे आशीर्वाद व समाधान निश्चितपणे आम्हाला खूप काही देऊन जाते!! श्री अशोक राऊत  हे सद्या विश्राम समितीचे प्रमुख आहेत.

 •      पू.अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम सुधारणा.

  आरोग्यधामाचे काम पूर्वीपासूनच सुरू होते. डॉ. बळवंतराव पाटील व डॉ.सदानंद कवळी या उभयतांनी अगदी सुरुवातीपासून आरोग्यधामाचे निर्माण व संचलन व्यवस्थित चालू ठेवले होते. मध्यंतरीच्या काळात डॉ.पाटील यांचे दुर्दैवी निधन झाले. पुढे डॉ.कवळीनादेखील कौटुंबिक कारणास्तव आरोग्यदामाचे काम सोडावे लागले.  श्री अरविंद वर्तक यांच्याकडे या आरोग्य कामाची सूत्रे आली. त्यांनी अतिशय निरलसपणे, तडफेने हे काम सुरू ठेवले . आरोग्यधामास आर्थिक निधी पुरवण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळावर असते. लोकांच्या वाढत्या मागणीनुसार सोई अपुऱ्या पडू लागल्या .यंत्रसामुग्री जुनी झाली होती. विशेषतः ऑपरेशन थिएटर, काही काळ बंद असल्याने तेथे पुन्हा निर्जंतुकीकरण करून सरकारी दाखला मिळवावयाचा होता. योग्य त्या सरकारी परवानग्या पुन्हा  घेऊन, ते महत्वाचे युनिट सुरू केले.

  आरोग्यधामातील दंत विभाग, नेत्र विभाग, प्रसुती विभाग हे चांगले ऊत्पन्न देणारे असल्याने तेथील काही त्रुटी आम्ही  दूर करून ते व्यवस्थित चालू केले.त्यासाठी लागणारी नवीन यंत्रे व उपकरणे  घेतली. पॅथोलाॅजी डिपार्टमेंटचे कामही खूप मंदावले होते, नवीन टेक्निशियन ची नेमणूक  करुन ते काम पुन्हा सुरु केले. अशा रीतीने, काही खर्च झाला  तरी, उत्पन्नाची बाजू ही मजबूत झाली.श्री अरविंद वर्तक यांचे उत्तम व सक्षम व्यवस्थापन कौशल्य याप्रसंगी खूप कामाला आले . डॉ. सदानंद कवळी,डॉ.भार्गवराम ठाकूर व स्धानिक सेवाभावी मंडळी यांचे मार्गदर्शनाखाली, नियमितपणे आरोग्य शिबिरे भरविण्यात आली. त्याचा लाभ  परिसरातील अनेक गरजूंना होऊन त्यांचे धन्यवाद मिळाले. विशेष म्हणजे आरोग्यधामांमध्ये वैद्यकीय अधिकारी चोवीस तास उपलब्ध व्हावेत या दृष्टीने डॉ.सूर्यवंशी या, एका सेवाभावी  वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आणि त्यामुळे आरोग्यधामातील एक मोठी उणीव भरून निघाली. सद्या श्री पंकज म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प उत्तम रित्या चालू आहे.

 •        ट्रस्ट फंड.

ट्रस्टच्या घटनेनुसार विविध उपक्रमासाठी  ठेवींच्या रूपात फंड असतात. त्या विशिष्ट कामासाठी राखीव ठेवलेल्या ठेवीवरील व्याजातून संघ व ट्रस्ट आपले उपक्रम चालवितात .मात्र ट्रस्ट फंड हा एक कायम राखीव निधी(CORPUS), असून त्याचा वापर आणीबाणी मध्ये करावा असा नियम आहे. आमच्या कार्यकालाच्या सुरुवातीस काही लाखात असलेला हा निधी आम्ही दोन कोटी रुपयांचे वर नेला. निविदांतूनच ठेकेदारी दिल्यामुळे तसेच, हॉलचे सुशोभीकरण वातानुकूलिकरण मिळालेल्या दोन लहान  वाढीव खोल्या ,यामुळे उत्पन्नात वाढ झाली .

  त्यानंतर पुढील विश्वस्त मंडळांनी देखील एकूण उत्पन्न  सतत वाढतच नेले आहे.

 •    माजी विश्वस्तांचा सन्मानः

         आमच्या सो क्ष संघ व फंड ट्रस्टच्या आजवरच्या वाटचालीत एकअलिखित परंपरा  आहे .ती म्हणजे समाजाच्या कोणाही आजी अथवा माजी  विश्वस्थांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे तैलचित्राचे अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील सभागृहात अनावरण करून ते कायमचे प्रदर्शित करून ठेवले जाते. त्यांच्या स्मृतीला व योगदानाला दिलेली ती एक मानवंदना आहे.त्यानुसार गेल्या 100 वर्षातील प्रत्येक विश्वस्तांची प्रतिमा आमच्या पू अ.वर्तक स्मारक  मंदिरातील सभागृहात स्थानापन्न झालेली आहे.  काही कारणांमुळे मा. विश्वस्त खासदार कै. मोरेश्वर सावे व मा. विश्वस्त, नियोजन मंडळाचे माजी सदस्य, डॉ. कै. जयंतराव पाटील  यांच्य प्रतिमा सभागृहात त्यांच्या मृत्यूनंतर ही लागू शकल्या नव्हत्या. तसेच माजी उपाध्यक्ष कै. शांताराम अण्णा पाटील हे जरी विश्वस्त नसले तरी त्यांनी समाजासाठी दिलेले अत्यंत मौलिक योगदान लक्षात घेऊन त्यांच्याही प्रतिमेची स्थापना  सभागृहाच्या भिंतीवर व्हावी ही अनेक समाज बंधूंची इच्छा होती. त्याप्रमाणे या तीन महान लोकनेत्यांच्या तैल चित्रांचे, स्मारक मंदिर सभागृहात सन्मानपूर्वक प्रदर्शन करण्यात आले.या कामात आमचे सहकारी विश्वस्त श्री विलास बंधू यांचाच सिंहाचा वाटा होता हे नमूद करण्यास आम्हाला अभिमान वाटतो. निश्चितच ही गोष्ट त्या धुरीणांच्या कुटुंबीयांसच नव्हे तर आम्हा सर्व समाज बांधवास अत्यंत समाधानाची व अभिमानाची होती. अनेक वर्षानंतर का असेना आम्ही ते करू शकलो याचा आम्हालाही खूप आनंद होता.

(वरची रांग ):डावीकडून मुख्य विश्वस्त श्री प्रमोद चुरी, कार्यकारी विश्वस्त दिगंबर राऊत व विलास बंधू चोरघे. 
(खाली), डावीकडून, सतीश नाना वर्तक, भालचंद्र भा पाटील व शांतारामजी ठाकूर.

     मुख्य विश्वस्त श्री.प्रमोद चुरी हे एक स्कॉलरली व्यक्तिमत्व होते. विद्यार्थी कालात त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या बी ई.(इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल), या दोन्ही पदव्या V J T I ,या प्रसिद्ध तांत्रिक महाविद्यालयातून पहिल्या वर्गात पास केल्या होत्या. कोणताही उपक्रम हाती घेण्याआधी त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून त्याचा आराखडा करून  इतर विश्वस्तांशी चर्चा करून नियोजन करीत.  त्यानंतर संघाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांशी चर्चा होई. नंतरच तो प्रस्ताव आम्ही तिमाही व वार्षिक सभेत सर्वसाधारण सभासदापुढे मंजुरीसाठी सादर करीत असू. त्यामुळे त्या प्रस्तावास मंजुरी मिळवण्यास अडचण येत नसे. त्यांची कार्यपद्धती अशी अत्यंत सुलभ व स्पष्ट होती.  प्रकल्पाला एक वैचारिक बैठक मिळत असे.व आर्थिक नियोजन करणे सोपे जात असे. 

     विश्वस्त श्री विलास बंधू चोरघे यांचा आमच्या व इतरही समाजातील संपर्क दांडगा होता.त्यांचे राजकीय, सामाजिक कार्य विपुल असल्याने तीसुध्दा आम्हाला जमेची बाजू होती.  त्यामुळे कोणत्याह सरकारी दप्तरातील कामे सुलभ झाली. त्यांचे  फर्डे वकृत्व व रोखठोक स्वभाव यामुळे विनाकारण दीर्घ चर्चा न होता सर्व सभासदांची मान्यता मिळे.

    श्री. शांतारामजी ठाकूर  हे सुद्धा वरून कठोर वाटणारे पण प्रत्यक्षात अत्यंत प्रसन्न ,शांत तितकेच अभ्यासू असे व्यक्तिमत्व होते .एरवी कमी बोलत मात्र बोलण्याचा प्रसंग आल्यास अत्यंत मुद्देशीर ,आपल्या ओघवत्या भाषेत  मुद्दा मांडीत व पटवून देत.शांताराम नानांच्या पाठी अनेक शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनाचा अनुभव होता. स्वतः शेती व व्यावसायिकता ही जोपासली.

     सतीश नाना वर्तक हे आर्थिक,सामाजिक व राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. वसई विकास बँकेचे माजी अध्यक्ष, वसई विकास मंडळ, बहुजन विकास आघाडी तसेच वसईतील सर्व सांस्कृतिक संस्थांच्या कामात त्यांचे योगदान असे. दिलदार व प्रसन्न असे व्यक्तिमत्व होते .दुर्दैवाने कार्यकाल पूर्ण होण्याआधीच ते अकाली गेले. आमचा एक मोठा आधारस्तंभ निघून गेला.

    त्यांच्या जागी आलेले श्री. भालचंद्र पाटील हे देखील एक  अनुभवी ,जुने जाणते  व्यक्तिमत्व होते . समाजसेवेचा वारसा आपल्या पित्यापासून त्यांनी घेतला होता. सो क्ष संघ, वसई विकास महामंडळ,  वसई विकास सहकारी बँक  अशा विविध क्षेत्रांचा अनुभव होता, त्याचा आम्हास निर्णय घेते वेळी लाभ होई. कोणतीही चर्चा टोकाकडे जात असल्यास एखाद्या मिश्किल विनोदाने ते कटू प्रसंग सहज मिटवून टाकीत.

    अशी आम्हा सर्व विश्वस्तांची एक सुंदर टीम तयार झाली होती.  विविध क्षेत्रांतील कार्य व अनुभवामुळे एक कोणत्याही समस्येचा अथवा नियोजनाचा सर्वांगीण विचार होत असे.  त्यामुळेच थोड्या अवधीत खूप कामे यशस्वीपणे करता आली. मुख्य विश्वस्त व कार्यकारी विश्वस्त अशा आम्ही दोघांनी आर्थिक व्यवहार नेहमी पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक बाबतीमधील विशेषतः आर्थिक बाबीतील वादविवाद झाले नाहीत. आमच्या सर्व सहकारी विश्वस्तांनी मुख्य विश्वस्त व कार्यकारीविश्वस्तांवर  संपूर्ण विश्वास ठेवून आम्हाला कामात  स्वायत्तता दिल्याने आमचेही काम खूप सोपे झाले होते हे नमूद करण्यात मला आनंद होतो.

  आमच्या या कारकिर्दीत  विश्वस्तमंडळ कार्यालयाचे व्यवस्थापक श्री जयवंत वर्तक (सुरुवातीला दोन वर्षे ), व त्यानंतरची श्री.दिलीप पाटील (,आजपावेतो) यांच्या सेवेचा पूर्ण लाभ मिळाला सहकार्य मिळाले त्यांचेही आभार मानणे संयुक्तिक होईल.

    आज घडीला डॉ.दीपक चौधरी मुख्य विश्वस्त व श्री सुरेश वर्तक कार्यकारी विश्वस्त श्री विलास बंधू चोरघे विश्वस्त ,श्री अनिल सावे विश्वस्त, व सौ. नमिता चुरी विश्वस्त, ही टीम संघ फंड ट्रस्टचे काम अतिशय समर्थपणे पुढे नेत आहे. विशेषतः पू. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर पुनर्बांधणीचा प्रकल्प पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. हे शिवधनुष्य ते निश्चित पैलतील, अशी  आशा करतो. सर्वांच्या तर्फे शुभेच्छा देतो.

   संघाध्यक्ष श्री नरेशभाई राऊत यांचे हे स्वप्न असून सर्व संघ कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली एक दिलाने हे काम पुढे नेत आहेत.. 

     कार्यकर्ते, पदाधिकारी विश्वस्त येतात जातात मात्र समाजरूपी जगन्नाथाचा रथ सतत पुढे जात आहे. तो तसाच पुढे जात राहणे ही काळाची गरज आहे. आपलेही योगदान कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देणे ही प्रत्येक समाजबांधवाची जबाबदारी आहे,ही जाणीव मनात ठेवूया!

  आमच्या संपूर्ण कार्यकालात समाजातील व इतर समाजातील  अनैकांनी सहकार्य दिले  व मदत केली. त्यांचेही मनःपूर्वक आभार मानतो. आमचे त्या काळातील सहकारी, मात्र आज काळाच्या पडद्याआड जाऊन  स्मृती रूपात राहिलेले  प्रमोदभाई चुरी,सतीश नाना वर्तक, भालचंद्रभाई पाटील व शांतारामजी ठाकूर यांच्या मधुर स्मृतींना आदरांजली देऊन  मी हे लिखाण संपवितो.

दिगंबर वामन राऊत 

माजी कार्यकारी विश्वस्त संघ फंड,ट्रस्ट