मी मोठी आई बोलते, भाग १४ – पुन्हा बोर्डी.. आप्पांची धुळे प्रशिक्षणासाठी निवड.
मोठीआई आता आमच्यात नाही. पण मोठीआईची १०४ वर्षाची कहाणी तिच्याच शब्दात लिहिली होती, अनेकांच्या विनंतीनुसार त्याचे लेखांक चालू ठेवीत आहे.

ऊमरोळी सोडून आम्ही बोर्डीला आलो. एक सुंदर पर्व संपले. ते 1948 साल होते. दिगू सहा वर्षाचा झाला होता व त्याला मराठी शाळेत दाखल करणे जरुरी होते. बोर्डीला आप्पांची तब्येत बिघडू लागली ती मुख्यत्वे दोन गोष्टीमुळे – एक बोर्डीची हवा व दुसरे आमच्या शेजाऱ्यांचा मनस्ताप. आप्पा खूप हळव्या स्वभावाचे होते. त्यामुळे शारीरिक कष्टापेक्षा मानसिक तणाव त्यांना सहन होत नसे. विशेषतः हिवाळ्यात, थंडीचा त्यांना त्रास होई.
शाळेतील वर्ग घेणे ही जमत नसे. शाळेत रजा होत व स्वभाव ही चिडचिडा होई.
.….आणि पुन्हा एक मोठे स्थित्यंतर आले.. आप्पांना 1948. साली धुळ्याच्या शेती प्रशिक्षणासाठी जाण्याचा सहकारी हुकूम आला.
शाळेच्या मुख्याध्यापक गुरुजींना आप्पांबद्दल खूप आस्था वाटे. त्यांनाही आप्पांची शिस्त व कामातील तत्परता याची जाणीव होती. ‘सरकारी नियम कधीही मोडावयाचा नाही’ हे आप्पांचे तत्व त्यांना माहीत होते. त्यामुळे “तुम्ही जाऊ नका. दुसऱ्या शिक्षकांना पाठवीतो.” असे त्यांनी सांगितले. ही विनंती आप्पा स्विकारणार नाहीत याची त्यांना खात्री होती. तरीही त्यांनी, आप्पांना “जावयाचे नसल्यास जाऊ नका..” अशी विनंती केली. त्याचा उपयोग झाला नाही. हेडमास्तर जोशी गुरुजींची बहीण हिरा व बंधू बाळकृष्ण आप्पांच्याकडे शिकवणीसाठी येत. आप्पा नेहमीप्रमाणे त्यांचे कडूनही कोणतीच फी आकारित नसत. ही मंडळी बेळगाव, निपाणी या भागातून आली होती. मुख्याध्यापक जोशीगुरुजी स्वतः पदवीधर होते. अविवाहित होते. त्याकाळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक पदवीधर असत. शिकवणी साठी आपल्या बंधू भगिनीला त्यांनी आप्पांच्याकडे पाठविले, यावरून आप्पांच्या शिकवणीच्या गुणवत्तेचा दर्जा लक्षात यावा!
आप्पांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी सरकारी आदेशाला कोणताच विरोध न दर्शविता धुळ्यात प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे ठरविले. हे प्रशिक्षण आप्पांच्यासाठी महत्त्वाचे होते. कारण ग्रामीण भागांतील प्राथमिक शाळेतील मुलांना शेती विषयातील मूलभूत शिक्षण देण्यासाठी सरकारने हे प्रशिक्षण शिक्षकांना द्यायचे ठरविले होते.
आमच्या डहाणू तालुक्यात शेती हाच व्यवसाय मुख्यत्वे करून असल्याने येथील मुलांना प्राथमिक शाळेत शेतीचे धडे देणे निश्चितच उपयोगी ठरणार होते. आप्पांनाही शेती विषय खूप आवडे. मूलतः शेतकरी असल्याने ती आवड रक्तातच होती. त्यामुळेच त्यांनी धुळ्यात जाण्याचे ठरविले. जोशी गुरुजींना माझी व्यथा कळत होती. त्यामुळे त्यांनी अगदी खाजगीतही आप्पांना ‘आपण धुळ्यात न गेलात तरी चालेल.’ असे सुचविले होते. आप्पांनी धुळ्यात जाण्याची तयारी सुरू केली.
सासूबाईंची प्रकृतीही खूप नाजूक झाली होती. त्यामुळे आप्पांनी न जाणे सयुक्तिक ठरले असते. माझी तसेच इतर जवळच्या नातलगांचीही तशी इच्छा होती. पण कशाचाही परिणाम आप्पांच्या निर्णयावर होत नव्हता. आपल्या नोकरीबाबत व सरकारी हुकमाबाबत आप्पांचे विचार स्पष्ट होते. “सरकारी नियम मोडावयाचा नाही, कोणाकडेही आपल्या वैयक्तिक कामासाठी, फायद्यासाठी विनंती करावयाची नाही!’
आप्पा शेवटी धुळ्यात गेले पण येथे मोठे नाट्य घडले… .….
वयोमानानुसार सासूबाईंची प्रकृति खंगत चालली होती. त्यांचा कफ-खोकला जुना आजार वाढत होता. प्रकृती खूपच नाजूक झाली होती.. अन्न घेणे कमी झाले होते. अशक्तपणा आला होता. चालणे फिरणे बंद झाले होतेच पण बोलणेही थांबले होते. त्यांचे सर्व अंथरुणात करावे लागे. मीच ते सर्व करी. आप्पांनी जाण्याआधी मला तसे करण्याबद्दल स्पष्ट बजावले होते. सासुबाईंचा कोणताच भरोसा देता येत नव्हता. घरात अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. त्याही परमेश्वराला प्रार्थना करून सांगत ‘देवा माझी लवकर सुटका कर ..’
पण शेवटी देव करील तेच होते. सर्वांनाच सासूबाईची व त्यामुळे होणाऱ्या माझ्या धावपळीची कीव येई. अनेकांनी आप्पांना या परिस्थितीत, आईच्या भवितव्यासाठी तरी ट्रेनिंग रद्द करण्याचा सल्ला दिला. आप्पा आपल्या निर्णयावर ठाम होते…
आप्पांची कसोटी तर होतीच पण माझ्या सहनशक्तीचाही कसं लागणार होता, परमेश्वर माझी सत्वपरीक्षा घेत होता…! आप्पांची सुद्धा सत्वपरीक्षा होती. आईच्या अशा अवस्थेत धुळ्याला जाणे म्हणजे सर्वांचा रोष पत्करावा लागणार होता. स्वतःलाही यातना होणार होत्या. हे जगरहाटीच्या विरुद्ध होते. इतर कोणीही मनुष्य त्या परिस्थितीत आईजवळ राहिला असता. सरकारी हुकूम मोडला असता तरी कोणी दोष दिला नसता. पण आप्पांचा पिंड वेगळा होता. आपली जीवननिष्ठा की कौटुंबिक प्राधान्य अशा समस्या निर्माण झाल्या असता, आप्पांनी आपल्या तत्त्वनिष्ठेलाच हमेशा प्राधान्य दिले आहे. पुढेही काही उदाहरणे सांगेन. आप्पा धुळ्यास जाण्यास निघाले !!
त्या वेळची आपल्या आईची शारीरिक स्थिती पाहून, आपल्या धुळे मुक्कामात आईचे बरे वाईट होऊ शकते याची त्यांना कल्पना होती. तसे झाल्यास तिच्या अंतिमक्रियेसाठी आपण येऊ शकणार नाही हेही त्यांना माहीत होते….?
ज्येष्ठ बंधू दादा व बहिण अंगू यांना विश्वासात घेतले. आपली असहाय्यता प्रकट केली. दादांना आप्पांची अडचण कळत होती. त्यांनी आप्पांना कशीतरी परवानगी दिली. मात्र बहिण अंगूने जबरदस्त विरोध केला. आप्पांनी धुळ्यास जाऊ नये यावर ती ठाम होती.
तिलाही आप्पांनी खूप समजावेण्याचा व विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. लहान बहिणीचे भावावर खूपच प्रेम होते. त्यामुळेही, भावाने आईला या स्थितीत सोडून जाऊ नये, सर्वांचा रोष पत्करून लोकापवाद करु नये, अशीच तिची इच्छा असणार. ती एक साधी भोळी, अशिक्षित गृहिणी होती. आपला भाऊ तिला पूर्णपणे कळला नव्हता एवढे खरे! पण त्यामुळे बहिण भावंडात एक तेढ निर्माण झाली हे सत्य आहे.
“माझ्या अनुपस्थितीत, माझी पत्नी, अंत्यविधीच्या दिवशी व पुढील धार्मिक कार्यासाठी जे करावे लागेल त्याची संपूर्ण जबाबदारी घेईल..” असे नि:संदिग्ध आश्वासन आप्पांनी सर्वासमक्ष दिले.
खूप मंडळी नाराज झाली. काहींनी कौतुकही केले. मात्र धाकटी बहीण आंगू आयुष्यभर राग धरून राहिली. सर्व भावंडावरही अबोला धरला. आमच्या एकुलत्या एक आत्याला आम्ही तेव्हापासून असे दुरावलो ते कायमचेच! दैवदुर्विलास, दुसरे काय म्हणणार?

ज्या दिवशी आप्पा धुळ्याला जाण्यासाठी निघाले तो दिवस व ती वेळ माझ्या कायमची स्मरणात आहे. मीच का, त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सर्व नातेवाईकांनी तो भावपूर्ण क्षण अनुभवला आहे. आप्पांनी आपल्या प्रिय जन्मदात्री मातेचा जिवंतपणी घेतलेला अखेरचा निरोप खूप हृदयस्पर्शी, सर्वांची मने हेलावणारा होता.
‘बा’ ला जमिनीवर झोपवले होते. केशवपन करण्यात आले होते. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे मरणासन्न व्यक्तीला लवकर व विना क्लेश मृत्यू यावा म्हणून एक धार्मिक विधी करीत. ब्राह्मणामार्फत ते केले जाई.तिचे संपूर्ण केशवपन करून जमिनीवर एका सतरंजीवर झोपविले गेले.. अन्न म्हणून दिवसातून तीन वेळा फक्त काही चमचे पाणी तोंडात टाकले जाई. उशाशी बसून काही प्रार्थना म्हटल्या जात. या विधीला त्यावेळी “धर्मादान” विधी असे म्हणत. अस्थिपंजर बा जमिनीवर डोळे मिटून पडली होती. आप्पांनी आपल्या मातेच्या चरणावर मस्तक ठेवले. तिचे हात आपल्या हातात घेऊन ते मस्तकी लावले. आशीर्वाद घेतले. बा ला सर्व दिसत होते .समजत होते .मात्र बोलू शकत नव्हती. आप्पाही आपल्या अश्रूपातातून आपल्या मनातील भावना व्यक्त करीत होते.आवाज खूप क्षीण झाला होता. बा चे डोळेही ओले झाले होते.… दोघेही डोळ्यातील भावनांनी बोलत होते आवाज थांबला होता . शब्दा वाचून दोघांनाही शब्दापलीकडील काहीतरी समजत होते..!!.
बा सांगत असेल ….. “आनंदात रहा.तुझ्या कर्तव्यनिष्ठेला माझे आशीर्वाद ! या पुढील जीवनासाठी तुला आशीर्वाद, आनंदाने निघ व आनंदातच रहा ..”
.आप्पानी बा चा हात डोक्यावर ठेवताना म्हटले असेल,
“…बा माफ कर. तुझ्या अंतिम क्षणी मी राहू शकणार नाही. पण माझ्या व्रताला मी जागलो. मला समजून घे.
हेच तुमची आमुची भेटी, येथूनया जन्म तुटी…”
आप्पांनी उभे राहून पुन्हा एकदा बा ला नमस्कार केला. कोणाशीही न बोलता मागे वळले. रमणचा टांगा अंगणात होता. त्यात जाऊन बसले. घोलवड स्टेशनवर व तिथून धुळ्यासाठी.

त्या वेळची आप्पांची मनस्थिती कोणी ओळखली असेल का? या मनस्थितीत त्यांना धुळ्यापर्यंतचा खूप दूरचा प्रवास करावयाचा होता .तोही एकट्यानेच. अगदी पहिल्यांदाच !!तो त्यांनी कसा केला असेल? आज आपण समजू शकत नाही. आप्पांनीही त्या दिवसाविषयी आम्हाला कधी सांगितले नाही. आप्पा शरीर प्रकृतीने नाजूक होते .पण मनाने खंबीर होते. आप्पांनी तो मोठा प्रवास केला खरा पण त्या संपूर्ण प्रवासात आपल्या मातेची आठवण आणि तिची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर येत असली पाहिजे. मी करतो ते बरोबर की चूक असा संदेहही कदाचित आला असेल? पण शेवटी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मी हा निर्णय घेतला आहे, माझी आई मला निश्चित त्याबद्दल माफ करील एवढी खात्री त्यांना असली पाहिजे. आपल्या शरीर प्रकृतीची त्यांना काळजी होती. काही झाले तर तेथे सांभाळून घेणारे कोण होते?
आप्पांच्या आयुष्यात कित्येकदा त्यांना पुरते न ओळखणाऱ्या व्यक्तींकडून त्यांचे विषयी गैरसमज झाले आहेत. आप्पांवर अन्याय झाला आहे. तरी आप्पांनी आपल्या कर्तव्या पासून फारकत घेतली नाही. खंबीर राहिले. सद्गुरु व सत्कृत्ये यावरच त्यांची भिस्त असे..!
त्यांच्या या मूल्याधिष्ठित जीवनाचा प्रत्यय देणारी खूप उदाहरणे मला आठवतात. पुढे सांगेन…
आप्पा धुळ्याला गेल्यानंतर आठ दहा दिवसातच सासूबाईंचे निधन झाले. आप्पांना आम्ही पत्राने तसे कळविले. त्यानंतर आप्पांचे आलेले पत्र खूपच हृदयस्पर्शी होते. आप्पांचे पत्र असे होते ….
“ परगावी जाण्यासाठी निघताना घेतलेले माझ्या आईचे दर्शन हे अंतिम आहे याची माझ्या मनात जाणीव होती. तिच्या अंतिमयात्रेसाठी तेथून बोर्डीस येणे मला शक्य नव्हते. मी पुन्हा बोर्डीत येईन तेव्हा माझी आई नसणार या भावनेनेच मी त्या दिवशी तिचा निरोप घेतला. बा ने, न बोलता त्यादिवशी मला आशीर्वाद दिले ,अंतिम शुभेच्छा दिल्या. ’माझ्या प्रिय आईचे जिवंतपणीचे हे शेवटचे दर्शन’, ही भावना मला किती व्याकुळ करत होती. आजही मी माझ्या मनाचे समाधान करू शकत नाही. ते शल्य माझ्या मनी आयुष्यभर असेल. माझ्या बा ने मला, “प्रामाणिकपणे राहा. कष्टाची रोटी मिळव. एक ना एक दिवस तुला व तुझ्या मुलांना कष्टाचे फळ मिळेल.” हे धडे दिले आहेत. तिच्या अंतिम निरोपाचे दिवशी मी तिची शिकवण पाळली. माझी बा मला समजून घेईल यात शंका नाही…”.
आप्पांचे हे पत्र वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. त्यांचे मातृप्रेम व निष्ठेबद्दल कुणालाही आदरच वाटेल. त्यांना दोष कसा देऊ ?

माझी मनस्थितीसुद्धा त्यावेळी खूपच वेगळी होती. लोकांचे तिरकस बोलणे. नवरा जवळ नाही. लहान मुले ,त्यांचे शिक्षण,आर्थिक भार,तुटपुंजे उत्पन्न,यातून मार्ग काढावयाचा होता. दादा, बाय,अक्का, मावशी, नानी यांनी मला खूप सहकार्य दिले. समजून घेतले. म्हणूनच ती कसोटीची वेळ मी निभावून नेली. त्या दिवसात आमच्या गावातील वाणी गिरीधरकाका माझ्या मदतीला आला. ना नात्याचा ना गोत्याचा. अंत्यसंस्कार, धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व सामान त्याने मला उधारीने दिले. पैशाची मोठी काळजी त्याने दूर केली.
आप्पांच्या अशा तात्विक व सात्विक वागण्यामुळे माझी अनेकदा पंचाईत होई. आमचे काही लहान वादही होत. आप्पा माझ्यावर चिडत. मी ऐकून घेई. कधी माझाही अतिरेक होई. शेवटी संसाराचा गाडा आम्हा दोघांना पुढे न्यावयाचा होता. प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार मला करायचे होते. अशा अनेक कौटुंबिक समस्यांतून मी खूप शिकले. अप्रियता माझे पदरी येई कारण मी रोखठोक बोलत असे. अनेकांचा रोषही ओढवून घेतला. मी त्याची पर्वा केली नाही. माझ्या मुलांचे हीत आणि नवऱ्याचे स्वास्थ्य ही माझी पहिली गरज होती. आपल्या निष्ठा आणि व्यवहार याची कुठेतरी सांगड घालावी लागते, असेच मला वाटत असे. आजही वाटते.
सासूबाईंच्या निधनानंतर पुढील सर्व धार्मिक विधी सोपस्कार आम्ही केले. आक्का ,नानी तसेच आप्पांच्या काही मावस चुलत बहिणी दादा, बाय यांनी मला पूर्ण सहकार्य दिले, समजून घेतले.. आप्पांनी कबूल केल्याप्रमाणे पुढील सर्व अंतिम विधी आमच्या खर्चाने केले. बाराव्या तेराव्याचे जेवण, दक्षिणा, लोकांना देण्याच्या भेटवस्तू इत्यादी व्यवस्था केली. पिंडदान ,धार्मिक विधीसाठी आप्पा हजर राहू न शकल्याने दादांनी तो विधी केला. दिगूला शेजारी बसविले. सर्व कार्य व्यवस्थित पार पडले. दादांनी संपूर्ण कालखंडात दाखविलेला समजूतदारपणा मी विसरू शकत नाही.
आपल्या काही क्षुद्र अहंकारासाठी जीवनातील किती मोठ्या आनंदाला आपण पारखे होत असतो ? आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारी जवळची माणसे खूप थोडी असतात. कोणत्याही परिस्थितीत अशी माणसे आपल्यापासून दूर जाता कामा नये, अशी आपली भावना असावी. त्याचबरोबर आपली माणसे कधी चुकली, असे वाटत असेल ,तरी त्यांना मोठ्या मनाने माफ करण्याची ही आपली तयारी असली पाहिजे. माणसे जोडायला खूप वेळ जातो पण तोडायला एक साधी घटनाही कारणीभूत होते.कसोटी प्रसंगी आपल्या माणसांची खरी पारख होते. आपल्या माणसांना त्यांच्या चुकीबद्दल माफ करण्यातही एक आनंद व समाधान असते.. हे सुख पैशाने मिळत नाही. आप्पा आम्हाला हेच सांगत.

आप्पांच्या त्या धुळे वास्तव्यात एक गोष्ट बरी झाली. माझे एक चुलत बंधू हिराकांत पाटील त्यावेळी धुळ्याच्या प्रताप टेक्स्टाईल मिल चे मालक प्रताप शेठ, यांच्या बागायतीचा व इतर प्रॉपर्टीचा व्यवहार पाहत होते. त्यांना तेथे खूप मान होता. त्यांनी आप्पांच्या वास्तव्यात त्यांना खूप सहकार्य दिले. धुळ्याची कोरडी हवा व हिरा मामांचा सहवास यामुळे आप्पांचे तेथील वास्तव्य आनंदाचे झाले. माझे बंधू हिराकांत, स्वातंत्र्यसैनिक होते. उत्तम व्यायाम पटू होते व कारावास भोगला होता. स्वतः देखील एक चांगले शेतकरी होते. त्यामुळे धुळ्यात त्यांना ती मानाची नोकरी मिळाली होती. त्या काळात बोर्डीपासून एवढ्या दूर सहकुटुंब तेथे वास्तव्य करून नावलौकिक कमावणे एक मोठा बहुमान होता.
आप्पांच्या त्या प्रशिक्षण काळात माझी खूपच धावपळ झाली. दिगू, बाळू ,अरूणा लहान होते.मुलांना वडिलांची आठवण येई. उणीव भासे. मुलांची देखभाल करून शिवाय घरची कामे सांभाळण्यात माझी दमछाक होई. कधी विश्रांती हवी असली की मी त्यांना आक्काकडे आणून ठेवी. शेजारची उंबरमावशी( उंबरगाव बाजारात विक्रा करी म्हणून हे नाव), काशी काकू आक्काला मदत करायच्या. आक्का मुलांचे सर्व प्रेमाने करायची. तिने कधीही त्याचा कंटाळा केला नाही. पोरांना सांभाळायची. या सर्वांचे माझ्यावर खूप उपकार आहेत.
बहिण आंगूने त्या रागाच्या भरात, आप्पांशी बोलणे सोडले. मात्र तिलाही त्याचा खूप त्रास झाला असणार. विशेषतः भाऊबीजेला तिला आपल्या या भावाची नक्कीच आठवण झाली असेल? या दोन भावा बहिणींचे एकमेकावर खूप प्रेम होते. दर भाऊबीजेला आप्पा कोठेही असले तरी बोर्डीला येऊन आपल्या बहिणीच्या घरी ओवाळून घेत. पुढे ओवाळणी बंद झाली. मला आठवते पुढे भाऊबीजेच्या दिवशी आप्पा घरात न राहता शाळेतच काहीतरी काम काढून निघून जात. संध्याकाळी आम्हा मुलांच्या ओवाळण्याहोत. तो सोहळा कौतुकाने पहात. आम्ही कोणीच त्यादिवशी आप्पांशी जास्त बोलत नसू.
आंगूचा मोठा मुलगा मोरेश्वर अण्णा आप्पांशी अखेर पर्यंत चांगले संबंध ठेवून होता. आमच्या पार्लेच्या घरीही येऊन गेला. धाकटा मुलगा रमेश अजूनही आमच्या संपर्कात आहे. दिगुने त्याच्या नोकरीसाठी प्रयत्न केले होते. याची त्याला जाणीव आहे . मला भेटण्यासाठी अजून मधून घरी येतो. बरे वाटते.

आप्पांच्या धुळे प्रशिक्षण काळात घडलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिगूचा मराठी पहिलीत प्रवेश. त्याचे शिक्षण सुरू झाले. आप्पांना आपण त्यावेळी बोर्डीत नसणार याची कल्पना होती. त्यांनी आपले सहकारी, माझे चुलत बंधू हिराजी मामा यांना ती जबाबदारी सोपविली होती. दिगू लहानपणी खूपच खोडकर व भटक्या होता. त्याला शाळेत जाण्याची कल्पनाच आवडत नव्हती. मी त्याला खूप समजवीत असे. शाळेत किती मजा असते याबद्दल सांगत असे. त्याला ते पटत नसे. त्यामुळे तो शाळेत कसा जाईल याची मला शंकाच होती. आणि झालेही अगदी तसेच!

12 जून 1948 चा तो दिवस उगवला. शाळेचा पहिला दिवस. दिगूचे दप्तर युनिफॉर्म तयार ठेवले होते. हिराजी मामा त्याला घेऊन जाण्यासाठी नऊ-साडेनऊ वाजता आमच्या घरी आले. आम्ही पाहतो तर दिगूचा पत्ता नाही. त्याने सकाळीच कोठे पोबारा केला होता. आश्चर्य वाटले. भितीही वाटली. शेजाऱ्यांच्या घरात, आक्काकडे शोध घेतला. पत्ता लागला नाही.आम्हाला खूपच काळजी वाटू लागली. हिराजी मामाने त्यांचे दोन-तीन विद्यार्थी बोलावून आणले. बारशेत, सोनवाडी असा सर्वत्र शोध सुरू झाला. मुलांना तो शेतात एका झाडीत लपलेला दिसला. पकडून घेऊन आले. दिगू रडत होता. ’मला शाळेत पाठवू नका’, असा आक्रोश करीत होता. पण हिराजी मामांनी आपली टोणग्याची गाडी बोलाविली. दिगुला आपल्याबरोबर गाडीत बसविले.. ही वरात आमच्या घरापासून ते अग्यारी मराठी शाळेपर्यंत वाजत गाजत गेली. गाडीत रडणारा दिगु, त्याची समजूत घालणारे हिराजी मामा, आणि गंमत बघत पुढे मागे चाललेले विद्यार्थी… मला अजून ते दृश्य आठवते. आज वाईटही वाटते. पण हिराजी मामांनी केले ते योग्य होते. मराठी शाळेतील अंबुबाईनांही हिराजी मामांनी कल्पना दिली असावी. बाईंनी त्याला गाडीतून उतरवून जवळ घेतले. धीर दिला. समजूत घालून शाळेत दाखल करून घेतले. त्याची चुलत बहीण कमल देखील त्याचवेळी शाळेत दाखल झाली होती. त्यामुळे पुढे तो तिच्याबरोबर रोज शाळेत जाऊ लागला. त्यानंतर त्याने शाळेत जाण्यासाठी कधीच टाळाटाळ केली नाही. मात्र पहिल्या दिवशीचा तो प्रसंग आम्हा सर्वांच्या अजून ध्यानात आहे. हिराजी मामांनी केलेली मदत तर कधीच विसरणार नाही.
आप्पांचा धुळ्यातील प्रशिक्षण काल संपला. आप्पा बोर्डीत परत आले. ते 1949 साल असावे.
पुन्हा बोर्डीत आमचा एकत्र संसार सुरू झाला. त्यातील गमती जमती पुढील भागात सांगते.
शब्दांकन: दिगंबर राऊत



