भूगर्भातील सफर -खेत्री

    हिंदुस्तान कॉपर लिमिटेड ,तांबे तयार करणाऱ्या भारतीय कंपनीचा भव्य परिसर, खेत्री, राजस्थान.

   “सांप्रदायिकता, कट्टरता आणि धर्मांधता यांनी या सुंदर पृथ्वीला फार पूर्वीपासून ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे सर्व मानव जात आज हिंसाचाराने भरली आहे, वारंवार मानवी रक्ताने भिजवली जाते आहे व मानवी  संस्कृती नष्ट होते आहे. जगातील सर्व राष्ट्रे आज निराशेच्या गर्तेत  जात आहेत. जर हे भयानक राक्षस नसते तर संपूर्ण मानवी समाज आता पेक्षाही कितीतरी जास्त प्रगत व आनंदी असता!” – स्वामी विवेकानंद

    माझे राजस्थानात खेत्रीला जाण्याचे जेव्हा ठरले तेव्हा मला प्रथम आठवण झाली ती स्वामी विवेकानंदांची! स्वामीजी आठवले की आठवण होते त्यांचे 1893 साली शिकागो च्या प्रसिद्ध आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये जागतिक धर्म परिषदेतील अजरामर भाषण! वर व्यक्त केलेले विचार हे त्या भाषणातीलच आहेत.

 खेत्रीचे महाराज अजित सिंग यांच्या प्रोत्साहनाने व आर्थिक सहाय्यानेच स्वामीजी त्या जागतिक धर्म परिषदेस अमेरिकेत जाऊ शकले. खेत्रीच्या हिंदुस्तान काॅप्पर माईन मधील कंपनीने सोपविलेले काम तर करावयाचेच पण त्याचबरोबर महाराज अजित सिंग व स्वामी विवेकानंद यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली महाराजांची वास्तु पहावयाचीच असा निश्चय केला. 

 खेत्री महाराज अजित सिंग आणि परिव्राजक स्वामी विवेकानंद. 

    स्वामीजी शिकागोच्या परिषदेत गेले नसते तर जगाला स्वामी विवेकानंद मिळाले नसते आणि खेत्रीचे महाराज अजित सिंग बहादुर यांनी स्वामींच्या शिकागो – अमेरिका भेटीसाठी जे सर्व  केले, ते केले नसते, तर स्वामीजी शिकागो परिषदेत जाऊ शकले नसते. एवढा परस्पर निकट संबंध या दोन महान व्यक्तिमत्त्वांमध्ये आहे!!

   स्वामी विवेकानंद वाचल्यापासून मला खेत्री संस्थान माहीत होते. कधीतरी तेथे जाण्याचा योग यावा अशी मनापासून इच्छा होती. कंपनीच्या कामासाठी मला तेथे जावे लागणार हे कळल्यापासून मी खूपच आनंदित झालो होतो. या खेत्रीला विवेकानंदांनी तीन भेटी दिल्या. पहिल्या भेटीत तब्बल 80 दिवस तेथे वास्तव्य केले. खेत्रीच्या या छोट्या शहराचे सर्व रस्ते व वातावरण स्वामींच्या वास्तव्याने पावन झाले आहे. ती पुनीत माती कपाळी लावण्याचे भाग्य मला मिळणार होते!

     राजस्थानच्या धुळीच्या वादळांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ढाल म्हणून पगडी घालण्याची विनंती स्वामींना खेत्री महाराजांनीच केली. एक भगवा झगा देखील दिला – जो पुढे स्वामी विवेकानंदांचा पारंपारिक पोशाख बनला. ‘विवेकानंद’ हे नाव महाराज अजित सिंग यांनी त्यांना दिले! जगात उत्तम मैत्रीची जी दुर्मिळ उदाहरणे आहेत त्यात खेत्रीचे महाराज अजितसिंग व भारतीय सनातन परंपरेचे अध्वर्यू स्वामी विवेकानंद एक आहे!

   1980 सालातील तो थंडीचा मौसम होता. मला हिंदुस्तान कॉपर कारपोरेशन या आमच्या मोठ्या कस्टमर साठी, भारतात प्रथमच तयार केलेले एक वंगण चाचणी साठी द्यावयाचे होते. हे एक गंजविरोधक वंगण (Corrossion Inhibitor) होते. HCL प्रयोगशाळेत तपासणी करून त्यावर दीर्घ मुदतीची परीक्षा(Performancd Test) सुरू करावयाची होती. ती दोन महिने चालणार होती. माझे वरिष्ठ श्री सुंदरम साहेब व मी दोघांनी येथे जाण्याची तयारी केली. आमचे दिल्ली ऑफिसातील मार्केटिंग विभागाचे प्रमुख श्री काळेसाहेब दिल्लीहून आम्हाला खेत्रीला घेऊन जाणार होते.

    भूगर्भातून तांब्याचे खनिज(Chalco Pyrrite) काढणे त्याची सफाई करणे व त्यापासून शुद्ध तांबे तयार करणे तसेच त्या खनिजात अतिअल्प प्रमाणात असलेले सोने ही तेथे वेगळे केले जात असे. जगातील एकूण तांब्यापैकी भारत एक अग्रेसर तांबे निर्माण करणारा देश असून हिंदुस्तान कॉपर कॉर्पोरेशन(HCK), हा सरकारी उद्योग राजस्थानच्या झुनझुनु जिल्ह्यातील खेत्री या शहरी आहे.

   खनिज बाहेर काढण्यासाठी जमिनीच्या आत सुमारे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत आत जावे लागते, जेथे हे साठे दडले आहेत. पाच ते सहा फूट व्यासाच्या, जमिनीला 90 अंशात असणाऱ्या विवरातून खोल जावे लागते. जाण्यासाठी वर खाली करणाऱ्या लिफ्टची सोय आहे. पुढे या उभ्या विवराला खनिजाच्या उपलब्धतेनुसार  जमिनीस समांतर बोगदे केले जातात. तेथून खनिज काढून लिफ्ट मधून वर खेचले जाते. जमिनीखाली सुमारे 4500 फूट खाली खोदकाम चालू होते. खनिजाच्या उपलब्धते नुसार विवर ही खोल होत जाते. बोगद्यातील खनिज गोळा करून ते लिफ्ट मधून वर आणले जाते व पुढे त्याचे शुद्धीकरण होते.

  तांब्याची काही महत्त्वाची खनिजे.

  या खाणीत उतरण्यासाठी जो जमिनीला केलेला खोल बोगदा असतो त्यातून एक लिफ्ट खाली वर होत असते. एवढ्या खोल जाणाऱ्या लिफ्ट साठी जे धातूचे दोर असतात (Wire Ropes), ते दोन किंवा अधिक धातूंच्या मिश्रणाने बनविलेल्या तारांपासून तयार केले जाते .जसा आपला काथ्याचा दोर लहान लहान  दोर्या गुंफून तयार करतात, तसेच पातळ तारांचे लहान दोर बनवून त्यांचे पासून मोठा दोर बनविला जातो. त्याची जतन करणे खूप महत्त्वाचे असते. त्याला थोडा जरी गंज लागला तरी त्याची वजन पेलण्याची क्षमता कमी होऊ शकते त्यामुळे कदाचित मोठा अपघात होऊ शकतो. असे अनेक अपघात पूर्वी होऊन गेले असल्याने खाणीमध्ये सर्वात जास्त सुरक्षितता या दोरांसाठी घेतली जाते. आम्ही बनविलेले हे गंजविरोधक द्रावण दोराला उष्णता, सूर्यप्रकाश,पाऊस वातावरणातील आम्लता  अशा अनेक शत्रूपासून बचाव होण्यासाठी(Anti Corrossive), आवश्यक असते.

    सुमारे एक वर्ष आधी आम्हाला ते विशिष्ट वंगण बनवून देण्याची सूचना आली. अनेक संदर्भ शोधून व परदेशात तयार होणाऱ्या अशा वंगणांची पेटंटस् तपासून मी आमच्या प्रयोगशाळेत एक वंगण तयार केले होते. त्याचीच परीक्षा आम्हाला खेत्रीत घ्यावयाची होती.  मी आमच्या प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या साधनानुसार चाचण्या घेतल्या होत्या त्या समाधानकारक वाटल्या म्हणून आम्ही तेथे जाणार होतो. त्यांच्या तंत्रज्ञां कडून परीक्षा करून त्यांनी स्वीकृती दिल्यावर आमचा पुरवठा सुरू होणार होता  तसे झाले तर आम्हाला एका परदेशी आयात वंगणा ऐवजी बदली वंगण (Import Substitute), तयार केल्याचे  श्रेय मिळणार होते. खूपच आव्हानात्मक व देशाच्या परदेशी चलनाची बचत करणारे काम आम्ही करीत होतो.

   मुंबईहून विमानाने  दिल्लीस गेलो. आमच्या कंपनीच्या गेस्ट हाऊस मध्ये रात्री मुक्काम केला. थंडीचा जोर जबरदस्त होता. एका रात्रीचा प्रश्न होता. आमच्या दिल्ली कार्यालयातील श्री काळे साहेब सकाळी आम्हाला येथून खेत्रीस घेऊन जाणार होते. सकाळी काळे साहेब गेस्ट हाऊस वर आले व त्यांनी आम्ही थंडीपासून बचावासाठी कोणती सोय केली आहे याची चौकशी केली? आम्ही एका स्वेटरशिवाय दुसरे काहीच घेतले नव्हते काळे साहेबांनी काहीही प्रतिक्रिया न देता आपली गाडी सरळ दिल्लीतील आपल्या घरी जाऊन दोन मोठे पाय घोळ स्वेटर्स ते घेऊन आले व आम्ही निघालो त्यांनी तसे का केले याची त्यावेळी कल्पना आली नाही मात्र खेत्री तील थंडी अनुभविल्यावर त्याचे महत्त्व कळले. आम्ही भोजन समई घेतलीत आल्याने प्रथमतः त्यांच्या गेस्ट हाऊस मध्ये जेवण घेतले व पुढे त्यांच्या प्रयोगशाळेत आमच्या वंगणाच्या काही प्राथमिक चाचण्या करण्यासाठी आलो. येथील या रासायनिक चाचण्या (PhysicoChemical Tests) अगदी व्यवस्थित आल्या .आम्ही सुटकेचा निश्वास टाकला .एक महत्त्वाची पायरी पार केली होती .

   संध्याकाळी खेत्री शहरात फिरून थोडे शहर दर्शन केले. वेळ थोडा असल्याने विशेषतः मला ‘फतेह विलास पॅलेस ‘,राजवाडा पाहावयाचा होता. सध्या या राजवाड्याचे रूपांतर रामकृष्ण मिशन सेंटर मध्ये केले आहे. विवेकानंद व खेत्रीचे महाराज अजित सिंग यांच्या स्मृती जपण्यासाठी संरक्षित ठेवलेल्या अनेक वस्तू पहावयास मिळाल्या.विशेषतः प्रत्येक वेळी स्वामीजी ज्या  खोलीत राहत ती खोली ‘प्रार्थना रूम’, म्हणून मंदिर स्वरूपात जतन केली आहे. आत जाता येत नाही. लांबूनच नमस्कार केला.राजवाडाही फिरून पाहिला. भाविकांना राहण्यासाठी निवासस्थानाची सोय आहे. एकूण सर्व परिसर अत्यंत पवित्र असा वाटतो. त्या महायोग्याच्या सह निवासाची स्पंदने आजही भाविकाला जाणवतात.

ह्या खेत्रीची आणि स्वामी विवेकानंदांची सुरवातीच्या काळातील एक कथा सांगितली जाते. ती अशी: स्वामी विवेकानंदानी सन्यस्त मार्ग स्वीकारून भारत यात्रा केली. भारत यात्रा करत असताना ते खेत्रीला आले. खेत्रीच्या महाराजांनी राजवाड्यात त्यांच्यासाठी एक सत्कार समारंभ आयोजित केला. राजेसाहेबांचा समारंभ – मग थाटमाट काय विचारता? संध्याकाळी मेजवानी, मनोरंजन नृत्य आणि गायन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी एका प्रसिद्ध नर्तकीला आमंत्रित करण्यात आले होते. स्वामीजींना या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली. स्वामीजी आले पण त्यांनी नाचगाण्याच्या कार्यक्रमात एक संन्यासी उपस्थित राहणे अयोग्य असल्याचे सांगून नकार दिला. नर्तकीने हे पहिले. स्वामीजी तेथून निघताना पाहून ती खूप दुःखी झाली. ती वाटले कि “मी इतकी पापी, अपात्र आहे का कि संन्यासी माझ्या उपस्थितीत काही काळ बसू शकत नाहीत?” लगेच तंबोरा घेऊन तिने तिच्या मनातील हि भावना व्यक्त करताना संत सुरदासांचे हे भक्तीगीत वेदनादर्शक आवाजात गायले, ‘‘‘प्रभुजी मोरे अवगुण चित न धरो, समदर्शी है नाम तिहारो…।’’ “हे प्रभू माझे दुर्गुण माफ करा” समदर्शी म्हणजे काय?आई ज्या प्रमाणे आपली लेकरे कशीही असली तरी त्यांच्यावर माया करते, त्याप्रमाणे चराचरावर माता पित्याप्रमाणे प्रेम करणे. गाण्याचा अर्थ असा की प्रभूची सर्व लेकरे प्रभूसाठी एकच नाही काय? गीतात पुढे म्हटले आहे पूजेच्या ताटात आणि क्रूर कसायाच्या हातातही लोखंड असते. पण परीस दोघांनाही कोणताही भेदभाव न करता शुद्ध सोन्यात बदलतो. भव्य नद्या आणि छोट्या अशुद्ध नाल्यांमध्ये, दोन्ही मध्ये पाणी असते. पण मोठ्या नद्या पवित्र मानल्या जातात. शेवटी जेव्हा दोन्ही सागराला मिळतात, एकत्र येतात, तेव्हा ते महासागराचे रूप धारण करतात. त्या प्रमाणे हे प्रभो, तुमच्या भव्य रूपामध्ये मला आश्रय द्या. माझे अवगुण माफ करा!
जेव्हा भजनाचे बोल स्वामीजींच्या कानावर पोहोचले तेव्हा त्यांना नर्तकाच्या वेदना समजल्या. स्वामीजींचे मन इतके मोठे की त्यांनी नर्तकीची माफी मागितली. जगातील सर्व व्यक्ती, घटना आणि परिस्थितीकडे समदृष्टीने पाहणे हे महान संतांचे लक्षण आहे. काही चरित्रकारांच्या मतानुसार या घटनेनंतर स्वामीजींच्या डोळ्यात समदर्शी भावना दृढ झाली.

परत HCL च्या गेस्ट हाऊस आलो. थंडी होती. स्वेटर घालून हीटर चालू केले तेव्हा कुठे झोप लागली. आमच्या काळे साहेबांचे मनोमन आभार मानले.

     पुढे दुसऱ्या दिवशी ‘परफॉर्मन्स टेस्ट’, या नावाची दीर्घ मुदतीची टेस्ट सुरू केली.या चाचणीत एका चौकोनी काचेच्या चेंबरमध्ये खाणीत वापरल्या जाणाऱ्या तारांच्या दोराचा  तुकडा वंगणात बुडवून हूक च्या साह्याने टांगुन ठेवतात.त्यावर महिनाभर गरम हवा, क्षारयुक्त  आणि ऍसिड युक्त पाणी असे तीन फवारे अंतरा अंतराने सतत मारले जातात . तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस ठेवलेले असते . हे सर्व काम यंत्रा द्वारे नियमित केलेले असते. वंगणाच्या त्या थरामुळे या सर्वापासून दोराला संरक्षण दिले जाते की नाही हे मुदतीनंतर पाहिले जाते. त्याच्याही काही कसोट्या आहेत. जोरावर आलेला गंज व त्याची झालेली ही दोन मुख्य परिमाणे आहेत. ती टेस्ट ही आम्ही चालू केली. टेस्ट झाल्यानंतर गरज भासल्यास आम्हाला पुन्हा यावे लागणार होते. व एच सी एल च्या अधिकाऱ्यांचे समाधान झाल्यास पुन्हा येण्याची गरज नव्हती. काही कार्मिक बाजूंचा विचार होऊन वंगणाचा भाव, डिलिव्हरी टर्म्स, इत्यादी ठरल्यानंतर नियमितपुरवठा सुरू होणार होता. ती आमच्या कंपनीसाठी व देशासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट होती.

  हाच तो वाय- रोप,धातूचा दोर, ज्यावर वंगणाचा थर देऊन चाचण्या केल्या जातात.

     भरपूर वेळ होता. हिंदुस्तान कॉपर कंपनीच्या त्या सर्व  परिसराची बाहेरूनच पाहणी केली. वातावरण खरेच प्रदूषित होते. खनिज वितळवून त्यापासून शुद्ध तांबे करण्याची प्रक्रिया चालू असताना खूपच धूर चिमणीतून येत होता. त्याचा गंध व वातावरणात मिसळलेले खनिजाचे बारीक सूक्ष्म कण यामुळे तसे होत असावे.मी नाकाला रुमाल धरूनच परिसर पाहत होतो. या खेत्री भेटी आधी कंपनीच्या कामाशिवाय दोन उद्दिष्टे मनात ठेवली होती.  खेत्रीचा फतेह विलास राजवाडा पाहून झाला होता. आता  या खाणीत ऊतरून शक्य झाले तर भूगर्भाचे दर्शन घेण्याची इच्छा अजून बाकी होती. जमिनीला काटकोनात केलेल्या बोगद्यातून लिफ्ट वर जा करत होती तिथे मी थांबलो. तेथील कामगारांची आत जाण्याची व बाहेर येण्याची व्यवस्था पाहत राहिलो.माझे साहेब श्री सुंदरम व येथील अधिकारी मला पुढे चालण्यास सांगत होते. मात्र मला येथे राहण्यात गंमत वाटत होती. ”आपल्याला या बोगद्यातून आत शिरता येईल का ,तशी परवानगी देतील का..?”, असे विचार उभ्या-उभ्या मनात येत होते. तसे करता आले तर आयुष्यातील तो एक वेगळा अनुभव असेल व या भेटीत ते साध्य झाले तर मी भाग्यवानच ठरणार होतो ..पण ते कसे जमावे ? येथे सर्वत्र लावलेल्या सूचना बोर्डावरून अधिकृत कामगार व सुरक्षा अधिकाऱ्याशिवाय येथील  इतर अधिकाऱ्यांनाही आत जायची परवानगी मिळत नव्हती. मग माझी कथा काय?माझे वरिष्ठ अशी सुंदरम साहेब यांनीच पहिल्यांदा याबाबतीत  माझी इच्छा धुडकावून लावली होती. मात्र मी त्यांना पुन्हा विनंती केल्याने त्यांनी आमच्या सोबतच्या अधिकाऱ्यास माझ्या वतीने रदबदली केली. त्यानेही स्पष्ट शब्दात, ‘ही परवानगी आमचे फक्त सुरक्षाचीफ देऊ शकतात इतर कोणीही नाही’ असे सांगितले.  त्यांना भेटावयाचे ठरले. सुदैवाने त्या दिवशी ते त्यांच्या कचेरीत हजर होते. आम्ही त्यांना भेटलो. त्यादिवशी माझे ‘स्टार्स’ फारचांगले असले पाहिजेत. त्यांनी काही अटी घालून मला परवानगी दिली… माझ्या संपूर्ण वेश बदलून त्यांचा सुरक्षा वेश अंगावर चढवणे ,सर्व सुरक्षा कवचे अंगावर बाळगणे, फक्त दहा मिनिटे खाणीत रहाणे  व महत्त्वाचे म्हणजे एक करार पत्र लिहून देणे, ज्यात  “मला कोणताही अपाय झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर राहील..” असे लेखी लिहून देणे, अशी होती. मी ती खुशीने मान्य केली.

        खाणीत अनेक प्रकारे अपघात होत असतात. वरील जमिनीचा स्तर जमिनीचा खाली कोसळणे, लिफ्टचा दोर तुटणे, आतील ऑक्सिजन वायूचा पुरवठा कमी होणे, खाणीत ज्वालाग्रही वायु तयार होऊन खोदकाम करणाऱ्या ठिणगीमुळे आग लागणे अशा विविध प्रकारे अपघात होऊ शकतात.  सर्वात जास्त अपघात हे जमिनीवरील उघड्या भोकातून खाली वर होणाऱ्या लिफ्ट मध्येच झाले होते. लिफ्ट खाली तीन- चार हजार फूट असताना  डोक्यावर  लहान दगड जरी पडला तरी त्याचा कपाळ मोक्ष होऊन माणसे मेली होती. लिफ्ट वर असलेले धातूचे आच्छादन तोडूनही दगड आत शिरू शकतो.एवढ्या खोलीवर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण अमाप असल्याने असे अपघात होतात. वरून अथवा बाजूच्या खणलेल्या पृष्ठभागावरून अचानक दगड खाली पडू शकतो व अपघात होतात. . 

अशा प्रकारचे विजेरी असलेले शिरस्त्राण परिधान करून आत शिरावे लागते.

     त्याप्रमाणे माझी नेहमीची वेशभूषा बदलून मी आता एका नव्या रंगमंचावर भूमिका बजावण्यासाठी तयार झालो होतो. त्यांचा खास युनिफॉर्म मला देण्यात आला. सेफ्टी बूट ही चढविण्यात आले. मी आत जाण्यास सज्ज झालो.

   आत जाणाऱ्या लिफ्ट मध्ये प्रवेश मिळाला लीफ्ट सुरू झाली. हळूहळू हळू मी भूगर्भात जाऊ लागलो.फार फार तर वीस पंचवीस फूट खोल विहिरीत पोहोण्यासाठी उतरलो होतो.त्यापेक्षा जास्त खोल जाण्याचा अनुभव कधीच नव्हता.किती खोल आलो हे पाहण्यासाठी वर बघणे अजिबात मना होते .त्यामुळे अंदाजानेच खोलीची अंदाज घेत होतो.  पंधरा-वीस मिनिटांनी लिफ्ट थांबली . येथे डावी व उजवीकडे जमिनीला समांतर दोन पोकळ्या दिसत होत्या. माझ्याबरोबर एक सुरक्षा रक्षक ही होता. त्याने मला उजवी बाजू कडील पोकळीत शिरण्यास सांगितले. पाय ठेवण्याचा खाणीचा पृष्ठभाग व लिफ्ट यात सुमारे दोन फुटाचे अंतर होते. त्या दोन फूट खोलीतून खाली दिसणारे दृश्य भयानक होते. माझी बोबडी वळली.पूर्ण अंधार मध्येच थोडा प्रकाश दिसत होता . लिफ्ट मधून जमिनीवर पाय टाकणे, हा विचारच भयंकर वाटत होता ..सहन होत नव्हता… पाय सरकला खालची जमीन थोडी सरकली …काय होईल …अरे बापरे जाऊ द्या… परत वर जाऊया असाही विचार मनांत  आला !मन घट्ट केले .संधी मिळाली आहे तर खाणीत शिरलेच पाहिजे असा विचार करून देवाचे नाव घेत पुढे पाऊल टाकले .अर्थातच सुरक्षा रक्षकाने मला हात दिला होता. त्यामुळे धीर आला.

     एकदा आत शिरल्यावर जमिनीच्या समांतर बोगद्यातून पुढे जाऊ लागलो. इथपर्यंत आल्याचे श्रेय मिळाले .जणू काही पाचूच्या खाणीत आपण शिरलो आहोत असेच वाटत होते. तांब्याचे खनिज साधारणता फिकट निळ्या- हिरव्या रंगाचे असते. कामगारांसाठी सोडलेल्या प्रकाशात ते अशी निळाई निर्माण करते ..खूपच सुंदर, डोळ्यांना रिझविणारे असे ते दृश्य वाटत  होते. लहानपणी अलीबाबाची गुहा व त्यातील खजिन्याची गोष्ट वाचली होती ..आपण अलीबाबाच्या गुहेत तरआलो नाही ना..? असेही क्षणभर वाटून गेले.

 मी थोडा पुढे गेलो . आता भीड चेपली होती.ते मनाला भुरळ घालणारे दृश्य पहात पहात पुढेच जावे असे वाटत होते . मागच्या रक्षकाने मला वेळ झाल्याची सूचना दिली. मागे फिरलो. परत  लिफ्टमध्ये आलो..सुरक्षा रक्षकाने वाॅकीटाॅकी वरून संदेश दिला. व आमची लिफ्ट वर जाऊ लागली..  बाहेर आलो .जमिनीवर पाय ठेवला. परमेश्वराचे आभार मानले. आयुष्यात एक खूप वेगळा अनुभव मिळाल्याचे समाधान झाले. सुंदरम व काळेसाहेब वाट पाहत होते. त्यांनाही आनंद झाला माझे कौतुक केले.  आनंदाने मला मिठी मारली. शाबासकी दिली. तांब्याच्या खाणीत 4500 फूट उतरून मी पुन्हा सुरक्षित वर आलो होतो ना!तेन्सींग नोरकेने न तीस हजार फूट एव्हरेस्टवर जाऊन जो आनंद मिळविला तो मला जमिनीखाली साडेचार हजार फूट जाऊन मिळाला!!

खेत्री काॅप्पर माईन.. आतून दिसणारी नीळाई…

   आता खेत्री कॉपर माईन मधील आमचे काम पूर्ण झाले होते. निघताना सर्व संबंधितांचे विशेषतः  सुरक्षा चीफ यांचे आभार मानून आम्ही एच सी एल चा परिसर सोडला.  एक मोठे समाधान व कार्यपूर्तीचा अभिमान होता. जाताना  खेत्री-जयपूर-दिल्ली मार्गावर खेत्री चा जुना किल्ला  पाहिला. दुरूनच दर्शन घेतले.

  खेत्रीचा प्रसिद्ध किल्ला. आजही सुव्यवस्थेत आहे.

      दिल्ली विमानतळावर गेलो. संध्याकाळचे विमानाने मुंबईत परत आलो .काळे साहेबांचा निरोप घेतला .ते  आपल्या घरी गेले. कामाच्या दृष्टीने तर यशस्वी झाली होती पण त्याचबरोबर आयुष्यातला एक एक आगळा अनुभव पाठीशी होता .

   हा लेख संपवताना दुसरीही महत्त्वाची गोष्ट सांगणे जरुरी आहे. दोन महिने मुदतीची परफॉर्मन्स टेस्ट निकाल चांगले आले. आमचे वंगण परीक्षा उत्तीर्ण झाले.  यथावकाश त्याचा पुरवठा HCLला होऊ लागला…

    या कामगिरीबद्दल कंपनीने शाबासकी दिली. त्यापेक्षाही अधिक शाबासकी मला महाराज अजित सिंग व स्वामी विवेकानंद यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या वास्तूचे दर्शनाने मिळाली. 

   जगाला भरभरून प्रेम, सद्विचार व शुभाशीर्वादांचे भरभरून दान देणाऱ्या स्वामींनी काही मागितले ते फक्त अजित सिंगांकडे. स्वामीजी म्हणतात.

   मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एकमेव मित्र मानतो..अमेरिकन मित्र मला मदत करण्यासाठी शक्य ते सर्व करत असले तरी, मला नेहमीच त्यांच्याकडून भीक मागायला लाज वाटते. मला जगात एकाच व्यक्तीकडून आणि ती स्वतःहून भीक मागायला लाज वाटत नाही ती म्हणजे अजित सिंग महाराज आपण!!

       खेत्री भेटीत भूगर्भाचे दीड किलोमीटर आत जाऊन घेतलेले दर्शन व फतेह महालात झालेले  जगातील दोन महान मित्रांचे स्मरण ,दोन अद्भूत गोष्टी एका खेत्री भेटीत झाल्या एवढे खरे !! कसे घडून आले,सारेच अतर्क्य!!

  कवी कुसुमाग्रज म्हणून गेले आहेत ..

   “रात्रीच्या गर्भात उद्याचा असे ऊषःकाल…”

  मी सांगू शकतो,

“ पृथ्वीच्या गर्भात पाहिला निळा चमत्कार …”

 दोन दुर्मिळ योग खेत्री भेटीत जुळून आले …ते अनुभव  आपल्याशी शेअर करण्यास आनंद वाटला.

धन्यवाद।