जो दुसऱ्यावरी विसंबला..” दुबई!

जो दुसऱ्यावरी विश्वासला| त्याचा कार्यभाग बुडाला ||

जो आपणचि कष्टत गेला| तोचि भला || दासबोध १९-९-१६

  समर्थ रामदासांच्या वरील सुविचाराचे आजच्या आधुनिक जीवनात अनेक वेळा प्रत्यय येतो.

उद्योगातील नीतिमत्तेचे महत्त्व सांगताना,

   सामर्थ्य आहे चळवळीचे,जो जो करील तयाचे.

   परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे !

   हा उपदेश, किंवा ,आपल्या स्वतःच्या उद्योगाची स्वप्न पाहणाऱ्यांना( Start ups),

 सर्वसामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन आयुष्यात व आयुष्यातील विविध क्षेत्रात ज्या अडचणी, कठीण प्रसंग येतात त्यावेळी त्त्यावर मात कशी करावी आणि जीवन सुखासमाधानात कसे जगावे याचा कानमंत्र देणारा समर्थांचा दासबोध म्हणजे आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचा आद्य गुरु आहे!

  ज्ञानेश्वर व रामदास हे दोन महान मराठी तत्त्ववेत्ते संत. दोघांचेही वांग्मय मी जेवढे जमेल, समजेल तसे वाचले. त्यांचे नेहमीच अप्रूप  वाटत आले आहे.

    ज्ञानेश्वरी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगते, दासबोध ते तत्त्वज्ञान व्यवहारात कसे उपयोगात आणावे याचे सोदाहरण विवेचन करतो.

    समर्थांच्या वरील वचनाची मला आज आठवण येण्याचे कारण 1989 साली घडलेला तो प्रसंग. मी आमच्या माजगाव फॅक्टरीचl प्रमुख (CHIEF MANAGER),म्हणून काम पहात होतो. जगातील पहिल्या 500 (Fortune 500) कंपन्यापैकी, भारतातील दोन नंबरची कंपनी अशी आमच्या त्या पेट्रोलियम कंपनीची ओळख होती,आजही आहे .

   ऊत्पादन(Production), साठवण(Storege n Ware Housing), वितरण (Logistics), दर्जा नियंत्रण(Quality Control), संशोधन(R&D), यांत्रिक देखभाल(Maintenance), अशा पेट्रोलियम उद्योगातील प्रत्येक विभागाचा अंतर्भाव एकाच परिसरात असलेली ही सबंध भारतातील त्यावेळी एकमेव फॅक्टरी होती. इतर पेट्रोलियम कंपन्यांचे हे विभाग वेगवेगळ्या जागी पसरलेले असत. कामगारांच्या विविध समस्यांचा प्रभाव कमी करून सुरळीत व्यवस्थापन व्यवस्थेसाठी इतर कंपन्या तसे करीत. मात्र पूर्वापार चालू असलेल्या परंपरामुळे आमच्या कंपनीत सर्व विभाग एका ठिकाणी  होते. त्यामुळे आमच्या ग्राहकांचे हित पाहिले होते, ”वन विंडो क्लिअरन्स” पद्धत! तर कंपनी व स्थानिक अधिकारी वर्गासाठी तोटेही होते. कामगार युनियने निर्माण केलेल्या अनेक औद्योगिक समस्यांना वेळोवेळी तोंड द्यावे लागे. त्यामुळे येथील चीफ मॅनेजरला सतत  डोक्यावर टांगती तलवार ठेवून काम करावे लागे. याच फॅक्टरीत साधा ऑफिसर ते चीफ मॅनेजर या सर्वोच्च पदापर्यंत अनेक जबाबदारीची कामे केल्याने मला येथील सर्व आव्हाने स्वीकारण्यात एक आनंद होई व समाधानही मिळे!

   त्या दिवसांत आमच्या सरकारी कंपनी चे फ्रान्सची प्रमुख पेट्रोलियम कंपनी (ELF Aquitaine) बरोबर सामंजस्य करार होऊन (Tieup) त्यानुसार ELFकंपनीची वंगणे त्यांच्या फॉर्मुल्यानुसार भारतातील आमच्या कारखान्यात बनवून ती त्याच्या ब्रँड नावाने भारतातील आमच्या मार्केटिंग नेटवर्क मार्फत विकावी असे ठरले होते. त्याआधी ELF  ची फ्रान्स व बेल्जियम देशांतील उत्पादन यंत्रणा ,दर्जा नियंत्रण व्यवस्था, संशोधन प्रयोगशाळा, पॅरिस मधील कार्पोरेट ऑफिस इत्यादीचा प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहणी करण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली कंपनीच्या तीन सहकाऱ्यांची निवड झाली होती. आम्ही चौघांनी भारतात परत आल्यावर एल्फ च्या वंगण निर्मिती व विक्रीसाठी येथे पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आमची जबाबदारी होती. भारत सरकार व फ्रेंच सरकार अशा राष्ट्रीय पातळीवर हा करार असल्याने त्याची अंमलबजावणी यशस्वी पणे करणे ही आमची व पर्यायाने आमच्या कंपनीच्या  मॅनेजमेंट ची होती.

  पॅरिस येथील कंपनीचे मुख्य कार्यालय व  बेल्जियम मधील प्रोडक्शन विभाग.

    मी स्वतः प्रोडक्शन विभागाचा प्रमुख; श्री लाहेरी वितरण विभागाचे प्रमुख, श्री भास्करन माझे फॅक्टरीतील सहकारी व वंगण निर्माण विभागाचे प्रमुख, तर श्री कृष्णमूर्ती हे क्वालिटी कंट्रोल विभागाचे प्रमुख अशा चार जणांची टीम पॅरिस( फ्रान्स) व अँटवर्प (बेल्जियम) ला भेट  देऊन तेथील एल्फ कंपनीची विविध आस्थापने पाहून भारतात पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात जबाबदारी घेणार होतो. एक मोठी संधी मिळते आहे म्हणून आनंद तर एका आंतरराष्ट्रीय करारानुसार भारत सरकारने सोपविलेली जबाबदारी यशस्वी करून दाखवणे याचे आव्हान होते!!

  पॅरिस येथील कंपनीचे मुख्य कार्यालय व  बेल्जियम मधील प्रोडक्शन विभाग. डावीकडून: सर्वश्री भास्करन, दिगंबर राऊत, कृष्णमूर्ती, बी बी लाहिरी पॅरिस मधील ELF PETRO.कार्यालयात..

    माझाच नव्हे तर आम्हा चौघांचाही हा आयुष्यातील  पहिलाच परदेश  प्रवास होता. या प्रवासाचा साध्यंत इतिहास माझ्या ब्लॉगवर dwraut.com ”माझी  परदेशवारी’(1989)”, या लेखात विस्तृतपणे लिहिलेला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी एअर इंडियाच्या ताफ्यात नुकत्याच सामील झालेल्या जम्बोजेट (Double Decker) विमानाने हा पहिला आंतरदेशीय प्रवास आम्ही करणार होतो. 

   फ्रान्स देशात, पॅरिस राजधानी शहरात ,पहिला परदेश प्रवास मी करतोआहे, याचे त्यावेळी तर खूप अप्रुप  होतेच पण आजही आहे, कारण फ्रान्स देशाची महतीच तशी आहे!! 

   फ्रान्स  जगातील पर्यटकांचे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे .येथे नैसर्गिक सौंदर्याच्या खाणी आहेत. प्रसिद्ध आयफेल टॉवर व सर्वत्र इतिहासाच्या पाऊल खुणा ऊमटलेल्या दिसतात. वेगवेगळ्या युगांतील विविध वास्तुकला नमुने फ्रान्समध्येच पहावयास मिळतील. फ्रेंच जेवण म्हणजे तोंडाला पाणी सुटणे ..!फ्रान्सच्या उत्कृष्ट वाईन्स या मद्यप्रेमींना डोलायला लावतात! येथील सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ पाडतात .सर्वात महत्त्वाचे म्हणजे युनोस्कोची 49 पुरातन स्थळे फ्रान्समध्ये आहेत! जगातील सर्जनशील लोकांसाठी फ्रान्स देश व तेथील संस्कृती हा प्रेरणेचा अंतहीन स्त्रोत आहे!!

 “ देता अनंत हस्ते,घेशील किती दो करांनी?”

   अक्षरशः अशी अवस्था पर्यटकाची होते.

   पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर व नक्षीदार इमारती!

    आजवरच्या देशा-प्रदेशातील प्रवासात जे अतर्क्य-अनाकलनीय प्रसंग घडले त्यातील एक प्रसंग या पहिल्या परदेश प्रवासातही घडला, म्हणून त्या प्रवासाची आज पुन्हा आठवण !

  त्यावेळचे आमचे वरिष्ठ श्री किशन साहेब यांनी मोठ्या उदारपणे आम्हा चौघांना फ्रान्स-बेल्जियम  प्रवासाबरोबरच पॅरिस ते लंडन एक दिवसाची सफर व परतीच्या प्रवासात दुबई ला दोन दिवस थांबून बामरलाॅरी या आमच्या पुरवठादार कंपनीच्या कारखान्यात भेट अशा भरगच्च कार्यक्रम ठरवून दिला होता.लंडनला लुब्रीझाॅल या कंपनीचे संशोधन केंद्र पहावयाची संधी होती. तर दुबईत बामर-लॉरी चा धातूचे बॅरल्स व डबे बनविण्याचा कारखाना पाहावयाचा होता. श्री. किशन हे खरोखरच एक अत्यंत हुशार (आयआयटी कानपूर चे माजी विद्यार्थी)  दिलदार व पेट्रोलियम क्षेत्रातील एक तज्ञ व्यक्तिमत्व होते. पहिल्याच परदेशवारीत आम्हाला एकूण चार देशांचा प्रवास घडणार होता.

   श्री.किशन साहेबांच्या शिफारशीमुळेच आम्ही  मुंबई-दिल्ली -पॅरिस विमान प्रवास  ‘डबल डेकर’ जम्बो जेट विमानातून व एक्झिक्युटिव्ह क्लास मधून करणार होतो!! पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास ,तोही नव्या जम्बोजेटच्या दुसऱ्या मजल्यावरील एक्झिक्युटिव्ह क्लास मध्ये बसून.. आणि दर्शन घेणार होतो जगातिल चार महान देशातील भारदस्त शहरांचे.. पॅरिस ..लंडन.. अँटवर्प..दुबई…!!  आहाहा त्या पहिल्या प्रवासाच्या आठवणींनी आजही मन मोहरून जाते ..तर तेव्हा काय झाले असेल?..

हेच ते आम्हाला मुंबईहून पॅरिस नगरीत घेऊन जाणारे एअर इंडियाचे ‘महेंद्रवर्मन’, दोन मजली जम्बोजेट!!

  “आनंदी आनंद गडे ..”असेच आम्हा चौघांना झाले होते.

     पॅरिस मध्ये Elf चे केंद्रीय मार्केटिंग कार्यालय, पुढे अँटवर्प- बेल्जियम येथे कंपनीचा उत्पादन विभाग,लिऑन येथील कंपनीचे संशोधन कार्यालय व पॅरिस सोडण्यापूर्वी लंडन ला बोटीने जाऊन लुब्रीझाॅलचा  संशोधन विभाग पहावयाचा होता.येताना दुबईमध्ये बामर लॉरी या कंपनीचा कारखाना पाहून एक दिवस विश्रांती घेऊन दुबई-मुंबई प्रवास असा एकूण आठवड्याभराचा कार्यक्रम होता!

     मुंबई-पॅरिस ,पॅरिस- लिऑन, लिऑन-अँटवर्प,-पॅरिस- लंडन पॅरिस,,असे सर्व नियोजित कार्यक्रम आम्ही व्यवस्थित पार पाडले होते.   विमानाने, रस्त्याने ,बोटीने,  त्यावेळी फ्रान्सची जगातील सर्वात जलद रेल्वे TGVने अशी प्रवासाची विविध माध्यमे वापरीत आम्ही हे सर्व प्रवास आनंदात केले होते.जे तपशील आम्हाला Elf  कंपनीकडून मिळवावयाचे होते ते आम्ही मिळविले होते.आता मोठ्या आनंदाने व समाधानाने पॅरिस-दुबई-मुंबई आमच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा पूर्ण करावयाचा होता .

   पॅरिस-दुबई- परतीच्या प्रवासादरम्यान घडलेली ही घटना!!

   बामर लॉरी कारखाना पाहण्यापेक्षा त्यावेळचे व आजचेही जगातले प्रसिद्ध शॉपिंग सेंटर,विशेषतः सोने खरेदीसाठी, ख्यात असलेल्या दुबईस भेट देण्यात आम्हाला जास्त आनंद होता. 1989 आली आम्ही पाहिलेले दुबई शहर हे खरेच एक अफलातून व्यापारी केंद्र होते. आजची दुबई बदललेली आहे.

  दुबई चा प्रसिद्ध आलीशान व भव्य विमानतळ (.कोपऱ्यात)  विमानतळ, आतून.

  मी, श्री लाहीरी व श्री. कृष्णमूर्ती  यांनी भारतातून निघतानाच दुबईचा विजा घेऊन ठेवला होता. आमच्या तिकीट एजंटानीच आम्हाला तिकीटे व  सर्व देशांचे विजा तयार करून दिले होते. का कोण जाणे श्री भास्करन यांनी तिकीटे व इतर देशांचे विजा आमच्या ट्रॅव्हल एजंट कडून घेतले. मात्र दुबईचा विजा मुंबईत घेतला नाही. त्यांचे मेहुणे दुबईत कामाला असल्याने त्यांच्याकडून मला विमानतळावर तो विजा मिळेल अशी त्यांची व्यवस्था होती. आम्हालाही त्यावेळी त्यात काही वावगे वाटले नाही. त्याकाळी व आजही दुबईत विमानतळावर उतरल्यावर  कोणा नातेवाईक अथवा मित्रमार्फत घेतलेला विजा चालू शकतो. भास्करांचाही तोच विचार होता व कदाचित त्याला आपल्या नातेवाईकांनाही विमानतळावर भेटण्याची इच्छा असावी! पण म्हणतात ना…

   “…हा दैवाचा खेळ निराळा,नाही कुणाचा मेळ कुणा..”

 आणि .. दुःख शेवटी पदराला!!…

    दुबईला विमानतळावर उतरताना आम्ही किती आनंदात होतो. कंपनीने सोपविलेले काम पॅरिस, अँटवर्प, लंडन सर्व व्यवस्थित झाले होते. माहिती मिळवली होती. पुढील कामाची आखणी कशी करावी यावर चर्चा होत होत्या. पण दुबईच्या विमानतळावर, दैव भास्करच्या मार्फत आमची परीक्षा पाहण्यासाठी डबा धरून होते याची आम्हाला कुठे जाणीव?

   विमानतळावर नातेवाईका मार्फत विजा घेतलेल्यांची नावे अनाउन्स होत होती. लक्ष देऊन ऐकले पण भास्करच्या नावाची अनाउन्समेंट झाली नाही. शंकेची पहिली पाल चुकली. मात्र भास्करने विश्वासाने आम्हाला पुढे जाण्यास सांगितले व स्वतः तेथेच थांबून राहिला!

   आम्ही तिघे इमिग्रेशन काउंटर मधून विजा दाखवत विमानतळ पब्लिक एरिया मध्ये आलो. सामान घेण्यासाठी उभे राहिलो. सामान  पटकन आले. मात्र भास्करन आल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नसल्याने तेथेच कुठेतरी आसनस्थ झालो.

   तासभर पटकन निघून गेला. आम्हाला इमिग्रेशन मधून निरोप आला, “अजून भास्करन चा विजा आलेला नाही. यापुढे आम्ही फक्त अर्धा तास वाट पाहू. त्यानंतर  विजा न आल्यास पुढील कारवाई करण्यात येईल. आता ‘भूकंपा’चा धक्का जाणवला होता… आमच्या पायाखालची जमीन सरकली. आम्ही काय करायचे. ??

 एवढा वेळ एका वेगळ्याच मस्तीत व आनंदात तरंगत असणारे आम्ही जमिनीवर आलो होतो. पुढची कारवाई म्हणजे काय ते आम्हाला माहीत होते.. सरळ तुरुंगवास!!

   आम्ही विमानतळावरच सार्वजनिक जागेत बसून मनात भास्करच्या मेव्हण्यांचा व परमेश्वराचा धावा करीत होतो. भास्करचा विजा लवकर येऊ दे…..!

  त्याच्या मेहुण्यांना आम्ही कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे विमानतळावर प्रवेश करणारा प्रत्येक  माणूस आम्हाला मेहुणाच वाटे! खूप वाट पाहिली. अर्धा तास होऊन गेला. आता सर्व आशा संपल्या.. केवळ देवावर भरवसा! तेवढ्यात युनिफॉर्म मधील कस्टम ऑफिसर आला..त्याने नको असलेली वाईट बातमी आम्हाला दिली..

    “भास्करांना कस्टम कस्टडीत बंदिस्त केले आहे.!!”

  अजूनही तासाभराचा अवधी आम्हाला दिला होता. त्या दरम्यानही  विसा न आल्यास दोन पर्याय सांगितले गेले ..

  एकतर त्याला डीपोर्ट करू (ज्या विमानतळावरून आलो तेथे परत पाठविणे) अथवा दुबई विमानतळावरील पोलीस कस्टडीत रवानगी व पुढे रीतसर खटला!. ..

     आता केवळ स्वस्थ बसून भागणार नव्हते. काहीतरी हालचाली कराव्या लागणार होत्या. आखलेले सर्व कार्यक्रम रद्द करून भास्करनला  सोडवणे हाच एकमेव कार्यक्रम आमचे समोर होता होता. आम्ही दुबई विमानतळा वरूनच हालचाली सुरू केल्या. 

दुबई चे सोनेरी चंदेरी रूप न्याहाळण्याची स्वप्ने आता भास्करच्या पुढील भवितव्याच्या विचारात विरघळून गेली होती.. …!!

 दुबई शहरातील सोन्याचा व्यापार करणारी दुकाने व शॉपिंग सेंटर!

    दुबई या छोट्या देशाचे आजही जगातील सर्व लोकांना आकर्षण आहे. विशेषतः 50,60 वर्षांपूर्वी खात्रीचे व जागतिक भावापेक्षा कमी किमतीत सोने घेण्यासाठी भारतातील धनीक दुबईची सफर करीत. विशेषतः भारतातील लोकांना तर दुबई भेट म्हणजे स्वप्नवत वाटे मीही दुबईला दोन दिवस थांबून येणार आहोत म्हटल्यावर आम्हालाही किती मित्रांनी नातेवाईकांनी प्रेमाचे निरोप पाठविले होते.

   आम्हीही दुबई विमानतळावर उतरेपर्यंत खूप स्वप्ने पहात होतो. जास्तीत जास्त किती सोने कशा रीतीने नेता येईल याचे प्लॅनिंग करत होतो? पण भास्करच्या या लोच्यामुळे आता काहीच सुचत नव्हते…

  दुबई हे जगातील  महत्त्वाचे व्यापार केंद्र आहे.या देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे तेलावर कधीच अवलंबून नव्हती. सुमारे पाच टक्के अर्थव्यवस्था ही तेल विक्रीवर अवलंबून असून पर्यटन, बँकिंग, स्थावर मालमत्ता ,इत्यादी बहुरंगी उद्योग या देशात चालतात. दुबईचा विमानतळही एक अत्यंत प्रशस्त व दिमाखदार असून सर्वात वर्दळीच्या विमानतळा पैकी एक आहे.  सुमारे 142 शहरांशी हा विमानतळ जोडला गेलेला आहे यावरून येथील ट्रॅफिकची कल्पना यावी.

      सकाळी दुबई विमानतळावर उतरून हॉटेलवर जाणे, तेथे थोडी विश्रांती घेऊन बामरलाॅरी कंपनीचा कारखाना पाहणे, त्यांचे बरोबर भोजन घेणे व दुपारच्या विश्रांतीनंतर जमेल तेवढे दुबई दर्शन करणे एवढी माफक कामे योजली होती. दुसऱ्या दिवशी  सकाळची वेळ  शॉपिंग व त्यानंतर विमानाने मुंबईस वापसी असा एकूण कार्यक्रम ठरला होता. 

     श्री भास्करन यांचे मेहुणे दुबईत कामाला होते व त्या देशात ‘on arrival ’ वीजा पध्दत  होती, त्यामुळे भास्करने दुबई वीजा भारतात घेतला नव्हता. मेहुणे दुबई विमानतळापासून 20-25 मिनिटांचे ड्रायव्हिंग अंतरावर राहत होते.आम्ही दुबई विमानतळावर पोहोचण्याआधीच त्यांनी तेथे हजर राहून भास्करची सोय करणे अपेक्षित होते.. पण…

     दुबई विमानतळावर उतरलो तेव्हा खरे तर भास्करनी आपल्या बहिणीला फोन केला होता. तिने यजमान एक तासा पूर्वीच घरून निघाले असल्याचे सांगितले होते. मग मध्ये काय झाले? कोणालाच माहीत नव्हते ! ते विजा घेऊन विमानतळावर आले नाही हे सत्य होते. त्यामुळे विमानतळावर आम्ही काळजीत, तिकडे यजमान कोठे गेले या विचाराने बहीण काळजीत, बंदीवासातील भास्करन आपले भवितव्य काय या विचाराने पागल. बामर लॉरी कंपनीचे आमचे यजमान, ”कोणत्या पाहुण्यांची येथे गाठ पडली..”  या संभ्रमात ..सगळाच आनंदी आनंद!!

   पुन्हा इमिग्रेशन ऑफिसर भेटण्यास आले… आमच्या काळजाचा ठोका चुकला.. आता काय सांगणार?

  “ भास्करनला  डीपोर्ट  करून परत पॅरिसला पाठवू की येथील पोलीस कस्टडीत टाकू, कोणता पर्याय निवडता?”

   आमच्या दृष्टीने पॅरिसला परत पाठवणे जास्त सयुक्तीक होते. कारण तेथे ELFच्या  लोकांनी त्यांची ठीक व्यवस्था केली असती. दुबई पॅरिस प्रवास भाडे आम्हाला भरावे लागले असते. तरीही आम्ही पहिला पर्यायच सांगितला. सुदैवाने दुबई पॅरिस विमान अजून दोन तासानंतर  होते. तेवढ्या वेळात आम्ही बरेच काही करू शकणार होतो व भास्करना ‘सक्तमजुरी’ पासून वाचविण्याचा प्रयत्न करणार होतो!!

    एवढ्यात सुदैवाने भास्करच्या भगिनीचा मला फोन आला. भास्कर ने आमचा नंबर तिला दिला होता. ती इस्पितळातून बोलत होती. मेहुण्यांच्या गाडीला विमानतळावर येताना रस्त्यात जबर अपघात झाल्याने ते इस्पितळात भरती झाले होते. भास्करची बहीण त्याकरिता तेथे गेली होती. मेहुणे बेशुद्ध असल्याने नक्की काय झाले कळत नव्हते. आता भास्करला विजा मिळणे अशक्य होते. सर्व परिस्थिती लक्षात घेऊन त्या माऊलीला, ”आपण नवऱ्याची काळजी घ्या. आम्ही येथे काय ते बघून घेतो. भास्करची ही काळजी करू नका” असे आश्वासित केले. ”पुढील घटना आपणास कळवित राहू..” असेही आश्वासन दिले.

  आता विमानतळावर बसून सुमारे चार तास होऊन गेले होते. बामरलारी च्या अधिकाऱ्यांना आम्ही ऑफिसमध्ये जाण्यास सांगितले. तेही त्यांच्या परीने प्रयत्न करीत होते पण त्यांनाही यश येत नव्हते अत्यंत विमानासक परिस्थितीत त्यांनी दुबई विमानतळ सोडला, आपल्या कार्यालयात गेले. काय होते ते आम्हाला कळवित रहा असे म्हणाले ..!

    दैव अडचणी देते, काहीतरी अनाकलनीय घडते मात्र परमेश्वरी कृपाप्रसाद असल्यास  कुठेतरी मार्गही सापडतो !!

    विचार करता करता मला राज मल्होत्रा या आमच्या ESSO  कंपनीत निवृत्त होऊन दुबईतील एका मोठ्या कंपनीत अधिकाराच्या जागेवर काम करणाऱ्या मित्रांची आठवण झाली. राज निवृत्त झाल्यावर दुबईतील एका शेखच्या  मालकीच्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होते. ते निश्चित मदत करतील असे मला वाटले. मात्र त्यांच्या नंबर मिळवायचा कसा??

    श्री. राज मल्होत्रा हे आमचे ESSO कंपनी मधील जुने सहकारी. आमच्या मार्केटिंग ऑफिसातील एक दिलखुलास असे व्यक्तिमत्व व आमच्या किशन साहेबांचे खास मित्र असो मधून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या अनुभवाचे जोरावर त्यांनी दुबईत अशाच एका ऑइल कंपनीत नोकरी पत्करली होती व ते दुबईतच असतात अशी माझी माहिती होती त्यांचा नंबर मिळवायचा कसा?

    मी भारतात किशन साहेबांना आयएसडी कॉल लावला. त्यावेळी भारतात नुकतेच दहा-अकरा वाजले असतील. किशन साहेबांनीही पटकन फोन घेतला. त्यांना सर्व परिस्थिती कथन केली. पहिल्या प्रथम किशन साहेबांनी आपल्या अस्सल पंजाबीतील एक अस्खलित शिवी भास्करच्या नावे हासडली. म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका. मी राजला काय ते सांगतो. तो तुम्हाला विमानतळावर भेटायला येईल!

  …आणि खरेच थोड्याच वेळात मला राजचा  फोन आला  ..

  “तुम्ही काळजी करू नका. मी विमानतळावर येत आहे”. राज आमच्या समोर प्रगट झाले.. येतानाच त्यांनी कोणती जादूची कांडी फिरविली होती आम्हाला कळले नाही. त्यांच्या आगमना पश्चात  पाचच मिनिटात सफेद युनिफॉर्म मधील तो ईमीग्रेशन ऑफिसर, ”राज मल्होत्रा कुठे आहेत…”, म्हणून चौकशी करीत आला …

    ‘मीच तो मल्होत्रा..’ म्हणून राजनी ओळख करून दिली. पुढच्या पाच मिनिटात ईमीग्रेशन ऑफिसरने शरमेने व अपमानाने लालीलाल झालेल्या भास्करला ( हो भास्कर गोऱ्या रंगाचा आहे ), आमच्या पुढे आणून उभे केले!!   

   राज नी येताना आपल्या कंपनीचे मालक शेख साहेबांचे नाव भास्करनचे गॅरेंटियर म्हणून दुबई कस्टमला कळविले होते व भास्कर ची तात्काळ सुटका झाली होती!! नावे सगळ्यांनाच असतात पण एकेका नावात किती जादू असते बघा!!

    “भास्करनची दुबई भेट!”, या नाटकाचा तिसरा अंक संपला होता. शेवट कॉमेडीत होऊन सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुटले होते ..

    अर्थातच विमानतळावर सामान घेऊन प्रथम विमानतळा नजीकत असलेल्या हॉटेलात आम्ही सामान ठेवले व राज बरोबरच आम्ही त्या इस्पितळात गेलो जेथे भास्करांचे मेहुणे उपचार घेत होते. मेहुणे आता शुद्धीवर आले होते. भास्करला ओळखले. आमच्याशीही व्यवस्थित बोलले. घाई गर्दीत त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीने ठोकले होते व त्यामुळे वैद्यकीय उपचार व पोलीस तपासण्या चक्रात ते सापडून भास्करच्या विजाचा बट्ट्याबोळ झाला होता. भास्करला दुबई विमानतळ काय चीज आहे त्याची जन्मभर आठवण राहणार होती. सुदैवाने सर्व दुष्टचक्रातून ते बाहेर आले होते ही सर्वांसाठी मोठी गोष्ट होती. 

    पुढे संध्याकाळी आम्ही राजना साग्रसंगीत पार्टी देण्याऐवजी राजने  मोठ्या मनाने आम्हाला एका पंचतारांकित हॉटेलात छान भोजन दिले. ती संध्याकाळ एक अनोखी ठरली. अविस्मरणीय ठरली. तो दिवस ही एक अद्भुत होता ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड असे म्हणतात ते या प्रसंगी खरे ठरले!

    भास्करन साहेबांना एक धडा तर शिकावयास मिळाला. पण त्यांचे बरोबर आम्हालाही खूप शिकावयास मिळाले. बुडत्याला वाचवावयास जावे तो वाचविणाराही त्याच्याबरोबर बुडतो असेच काहीसे झाले होते! पण या अचानक अगम्य घडलेल्या प्रसंगात  राजच्या रूपाने परमेश्वरी सहाय्य वेळेवर उपलब्ध मिळाले, पुढची मानहानी टळली होती.

    जगात अनेक  मोठी माणसे झाली. त्यांची चरित्रे  पाहिली तर एक गोष्ट  प्रकर्षाने दिसून येईल ती म्हणजे त्यांचे स्वावलंबन. गांधीजींनी स्वहस्ते अगदी पायखाने ही साफ केले. महान संशोधक आईन्स्टाईन आपली केशभूषा स्वतःच करी स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारतभ्रमण बहुतांशी पायी केले. पायी! स्वावलंबनात जीवनाचा खूप खोल अर्थ दडलेला आहे!

कष्टेवीण नाही, कष्टेवीण सारे निष्फळ!

त्यादिवशी राज मल्होत्रा जर दुबई विमानतळावर येऊ शकले नसते तर …काय प्रसंग ओढवला असता ?

कल्पनाच करवत नाही! संकट कसे आले तेही एक अगम्य व राज मल्होत्रा येऊन ते महान संकट कसे  निवारून गेले हेही अनाकलनीय!!..

26.02 2025.