“कायदा पाळा”… केनिया सफारी!.

“कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला.”
माधव जुलियनांची ही कविता बालपणी ऐकताना ससा आणि कासव यांच्या गोष्टीची आठवण होई. नियम पाळणारा कासव जरी मंदगती होता तरी नियम न पाळणाऱ्या जलद गती सशापेक्षा तो पुढे गेला आणि शर्यत जिंकली!
कायदा हा मोडण्यासाठीच असतो, अशी मानसिकता असेल तर निश्चितपणे ती गंभीर बाब ठरते व कुठेतरी कधीतरी त्याचा जबर फटका बसल्याशिवाय राहत नाही.
आर्थिक, सामाजिक, राजकीय वा तांत्रिक प्रगती मधील गती ही कायदेशीर नसेल तर ती कधीही अधोगतीस कारणीभूत होते, संकटात आणू शकते. एवढेच कशाला जनावरांसाठी राखीव असलेल्या सफारी पार्कमध्ये माणसांनी जनावरांचा कायदा मोडला, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई तर होईलच पण जनावर देखील तुम्हाला अद्दल शिकविण्यास मागेपुढे पाहणार नाही. आणि त्यांची अद्दल म्हणजे मरणाशी गाठ !!
आम्हाला केनियातील सफारी पार्क मध्ये आलेला हा अनुभव असाच अकल्पित व अतर्क्य!!
ते 1996-97 साल होते. आम्हाला कंपनीचा निर्यात उद्योग वाढविण्यासाठी चार देशांची सफर करण्याची परवानगी मिळाली होती. प्रथम केनिया तेथून इंडोनेशिया, व्हिएतनाम व शेवटी बँकाॅक करून मुंबईत यावयाचे होते. या सफरीचा विस्तृत वृत्तांत मी माझ्या ब्लॉगवर (dwraut.com) ”चार देश,चार प्रकार!” या लेखात विस्तृतपणे दिला आहे.
सलग चार देशांच्या या विदेश प्रवासांत एक दोन प्रसंग असे आले जे वेळीच निस्तरले गेले नसते तर खतरनाक ठरू शकले असते.. संपूर्ण प्रवासाचा विचका होऊ शकला असता! पण.. दैव बलवत्तर व नशिबाची साथ म्हणून सटकलो !त्यातील एका प्रसंगाची ही सत्यकथा.
केनीया देश आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडे हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर आहे. नैरोबी ही देशाची राजधानी.जगामध्ये केनिया देश हा तेथील सुंदर समुद्रकिनारे, निसर्ग रम्य लँडस्केप, विशाल वन्य जीवन अभयारण्ये, विविध वनस्पती; प्राणी, सांस्कृतिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. देशाला केनिया हे नाव त्याच नावाच्या एका पर्वतावरून पडले आहे.कृषी उद्योग हा येथील मुख्य उद्योग असला तरी केनीया जगाला कापड कॉफी तंबाखू चहा व क्रूड पेट्रोलियम ऑइल निर्यात करतो.
पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या केनियाला आम्ही काय देणार? हो केनियाकडे क्रूड ऑइल असले तरी रिफायनरी नसल्याने त्यांच्याकडे शुद्ध पेट्रोलियम पदार्थ तयार होत नाहीत. विशेषतः वंगण-तेले येथे आयात होतात व त्यासाठीच आमची केनिया वारी होती !
विशेष म्हणजे आमच्या अभ्यास सर्वेक्षणात(Survey Report), आम्हाला भारतातील कोणतीच पेट्रो कंपनी तेथे निर्यात करीत नव्हती असे आढळून आले . निर्यातीत आपण आघाडी घ्यावी अशी आमची उमेद होती. विशेषतः वंगणे निर्यातीची चांगली संधी असल्याचे दिसून आले. नेहमीप्रमाणे सरकारी नियमावलींची पूर्तता करून केनियात इच्छुकांच्या मुलाखती व प्रत्यक्ष पाहणीसाठी निघालो होतो. माझे मित्र महेश दामले माझ्याबरोबर यावेळी होते .
मिळालेल्या दोन दिवसात आम्ही संपूर्ण आखीव कार्यक्रम पूर्ण केला. दोन उमेदवारांची नावे केनिया व टांझानिया मधील आमच्या कंपनीचे डीलर म्हणून निश्चित केली. श्री खग्राम व श्री शहा हे येथील भारतीय वंशाचे गेल्या काही पिढ्यापासून व्यापार करणारे उद्योगपती होते व आमच्या दृष्टीने आम्हाला ते योग्य वाटले.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळी विमान पकडण्याआधी आम्हाला केनिया दर्शना करावयाचे होते दोन दिवस भरगच्च कार्यक्रमामुळे कोठेच बाहेर जाता आले नव्हते. तेव्हा सकाळी येथील जगप्रसिद्ध सफारी पार्क म्हणजे केनीया सफारी पार्क’पहावे असे आम्हाला सांगण्यात आले होते.
महेश यांचे मित्र श्री साठे नैरोबी मध्ये नोकरीच्या निमित्ताने रहात होते. त्यांनाही हे अभयारण्य पुन्हा पाहण्याची इच्छा होती. श्री व सौ.साठे ही आम्हाला या भ्रमंतीत साथ देणार होते.
या पार्कमध्ये जाण्यासाठी खास अशा मजबूत बांधणीच्या व पर्यटकाला संपूर्ण संरक्षण देणाऱ्या जीप्स असतात. साध्या नेहमीच्या वापरातल्या जीप्स चालत नाहीत. नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्याकडूनच त्या घ्याव्या लागतात. सफारी पार्क कार्यालयात जाऊन अर्ज,शपथ पत्रक व पैसे मोजून दिल्यावर या जीप्स मिळतात. जीपचा ड्रायव्हर हा ड्रायव्हर कम गाईड असे दुहेरी काम करतो. हे काम मिळण्या साठी एक सरकारी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.
या पार्कमध्ये वन्यजीव हे संपूर्णपणे मुक्त असून पर्यटकांना बंदिस्त जीपमध्ये ऊभे राहून फक्त ठराविक मार्गावरूनच गाडी चालविण्याची परवानगी असते. मोकळे असलेले हत्ती,वाघ ,सिंह ,वनरेडे, गेंडे, जिराफ इत्यादी वन्यप्राणी गाडीवर हल्ला करून पर्यटकावर ईजा होऊ शकते. जीवितहानी होऊ शकते. असे अनेक अपघात पूर्वी झालेले आहेत. त्याकरिताच पर्यटकाकडून एक शपथपत्र घेतले जाते..
“सफारी पार्क मध्ये फिरताना मला कोणताही अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असेल..” असे स्पष्ट शब्दात लिहून घेतात.
आमचा ड्रायव्हर एक काळा माणूस होता. अनुभवी व माहितगार वाटला. मात्र अतिउत्साही होता, हे कळले तेव्हा उशीर झाला होता. त्याने काय केले हे पुढे सांगतोच.
या नॅशनल पार्क मध्ये अनेक परदेशी नागरिक आपले तंबू महिनोन महिने ठोकून असतात. त्यांना हव्या असलेल्या वन्य प्राण्यांच्या विशिष्ट हालचाली वा जीवनशैली संदर्भात व्हिडिओ घेण्यासाठी तसे करावे लागते. अशा दुर्मिळ व्हिडिओ साठी नॅशनल जिओग्राफी सारख्या जगप्रसिद्ध मासिका कडून भरपूर मोबदलाही मिळतो. .
आमच्या सुदैवाने सकाळी नऊ वाजे पासून दोन-तीन तासातच अनेक वन्य प्राणी पहावयास मिळाले .जिराफ, हायना ,झेब्रे ,जंगली हत्ती, गवे, रानडुकरे, जंगली रेडे असे विविध प्राणी आपल्या नैसर्गिक वृत्तीने,जणू ‘आम्ही या जंगलाचे मालक आहोत’, अशा तोऱ्यात फिरत होते . रस्त्यावरून फिरणाऱ्या जीप कडे ढुंकूनही पहात नव्हते जीपमध्ये कॅमेरे व दुर्बिणी घेऊन ऊभे असलेलो आम्ही त्यांच्या प्रत्येक कृती डोळेभरून पहात होतो.. अनेक प्रकारचे पक्षीही या विस्तीर्ण जंगलात आढळले… भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर कोठे आढळला नाही!
दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी या जंगलात हत्तींची बेसुमार हत्या करून काही अमानुष व धनलोभी लोकांनी हस्तिदंताचा चोरटा व्यापार सुरू केला होता. सरकारी अधिकारी त्यात शामील होते. त्यामुळे ती संरक्षण व्यवस्था आमुलाग्र बदलून स्थानिक वन अधिकाऱ्यांना घरी बसविले .खास ब्रिटिश सुरक्षा रक्षकांची पथके येथे नियुक्त केली आहेत. आमच्या ड्रायव्हरने जंगलाच्या एका बाजूला एक मोठा राखेचा ढीगारा दाखविला. काही महिन्यापूर्वीच जप्त केलेल्या हस्तिदंताची ती राखरांगोळी होती. खूप वाईट वाटले. कारण एवढा लाख मोलाचा मौल्यवान खजिना जाळून टाकण्यात आला होता. माणसाची हवस वन्यजीवांच्या जीवावर उठते ती अशी!
आमच्या सुदैवाने त्यादिवशी भरपूर वन्यजीव प्राणी दिसले. विशेष म्हणजे एक सिंहाचे कुटुंब सकाळच्या उन्हात विश्रांती घेताना पाहून खूपच गंमत वाटली ड्रायव्हरने येथे गाडी थोडा वेळ थांबवली आणि त्यानंतर जे घडले ते केवळ अद्भुत!! आपल्या पिल्लांनी मोठ्या रान रेड्याची शिकार कशी करावी याचे प्रात्यक्षिक सिंह व सिंहिणीने त्या दिवशी कसे दिले ते पाहिले. खूपच रोमांचक असा तो प्रसंग होता. त्या प्रसंगावर मुंबई आकाशवाणीवर माझी मुलाखत ही झाली होती. असा अनुभव आयुष्यात क्वचित मिळणारा जीवनानुभव असतो. त्यादिवशी आम्हा सर्वांना ते भाग्य मिळाले.
आनंदात आम्ही पुढे जात होतो. दुपारी जेवणाची वेळ झाली तेव्हा आम्ही ड्रायव्हरला बाहेर चलण्यास सांगितले. जेवण घेऊन हॉटेलवर जाण्याचा विचार होता. संध्याकाळी केनिया-इंडोनेशिया विमानाची तयारी करावयाची होती. आमच्या ड्रायव्हरने मोडक्या तोडक्या इंग्रजीत आम्हाला, ’जोपर्यंत तुम्ही आमच्या आफ्रिकेचा एकशिंगी गेंडा पाहात नाही तोपर्यंत तुम्ही काहीच पाहिले नाही, थोडे थांबा आपण पुढे जाऊ आणि निश्चितच गेंडा आपल्याच पहावयास मिळेल‘ अशी लालूच दाखविली आणि आम्ही त्याला भुललो! आफ्रिकन गेंडा पाहण्याच्या मोहात एका मोठ्या संकटात सापडलो, तेव्हा खूप उशीर झाला होता!
संकटे येत नाहीत. आपणच त्यांना आमंत्रण देतो.अति लोभ, मोह व सारासार विचाराचाची वानवा यामुळेच आपणास पश्चाताप करावा लागतो.खरे तर आम्ही अनेक पशु पक्षी प्राणी पाहिले होते. या नॅशनल पार्कचा खूप आनंद घेतला होता. भोजनाची वेळ ही झाली होती व आम्हाला संध्याकाळच्या विमानाची तयारी, बांधा-बांध करावयाची होती. आम्ही ड्रायव्हरची सूचना अमान्य करून सरळ बाहेर पडावयास हवे होते.पण शेवटी, “वही होगा जो नसीब मे लिखा है.. “ आणि तसेच झाले.
आम्ही पुढे पुढे जात होतो.. आणि खरेच एका ठिकाणी गाडी थांबली .आम्हाला काहीच कळेना. दोन्ही बाजूला गेंडा तर कुठे दिसत नव्हता. ड्रायव्हरने रस्त्याच्या उजवीकडे आम्हाला एक लहान डबके दाखविले. त्या डबक्यातून एक शिंग वर आलेले दिसले. गेंडा दिसत नव्हता.गेंडे महाराज चिखलाने भरलेल्या डबक्यात “ स्पा” घेत असावेत!! आम्ही थांबलो . फक्त एखाद्या काठीचे टोक वाटावे असे शिंग बाहेर आले होते .हालचाल काहीही नव्हती. नेहमीच्या सरावामुळे ड्रायव्हरने ते गेंड्याचेच शिंग आहे व आत चिखलाखाली गेंडा उभा आहे हे जाणले असावे! आम्ही ड्रायव्हरला म्हटले. “वेळ घालवू नको पुढे चल येथे ..”
त्याचे आमच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. हात स्टिरिंग वर पाय ब्रेक वर व नजर त्या टोकाकडे..
त्याला काय वाटले कोणास ठाऊक? आपली नजर न हलविता, काहीही न बोलता, कोणाची काही परवानगी न घेता सरळ त्याने गाडी डावीकडील रस्ता सोडून, क्षणार्धात कोणाला काही समजण्याच्या आत, डबक्या पासून चार-पाच फूट अंतरावर उभी केली. त्याच क्षणी एक गगनभेदी डरकाळी ऐकू आली. तोपर्यंत आपल्या मस्तीत असलेला तो गेंडा एकदम सजग झाला..आपले बोजड भारी शरीर एका क्षणात त्याने डबक्या बाहेर काढून आमच्या गाडीकडे धाव घेतली.. मान खाली, शिंग वर करून तो आमच्या गाडीला शिंगावर घेऊन आभाळात फेकण्याच्या उद्देशानेच डबक्या बाहेर आला होता. आमच्या दिशेने मुसंडी मारली होती …पण आम्हा सर्वांचे नशीब बलवत्तर म्हणून ड्रायव्हर महाशयांनीही तेवढायाच सफाईने आमची गाडी झटकन उजवीकडे घेऊन रस्त्यावर आणली होती व पलायन केले होते. गेंड्याची ताकद व चपळता त्यांना माहीत होती. नशीब गेंडा रस्त्यावर आला नाही.. त्याने नियम मोडला नाही ..मी मागे पाहिले तेव्हा गेंडा आमच्या गाडीकडे पहात उभा होता .. “खबरदार माझ्या वाट्याला पुन्हा याल तर.. चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या ..”
“चला सुटलो एकदाचे..” सर्वांनीच सुटकेचा विश्वास टाकला. ड्रायव्हरला गेंडा दाखवला म्हणून शाबासकी द्यावी की जीवाशी खेळ केला म्हणून मराठीतून शिव्या घालाव्यात कळेना, गप्पच राहिलो! कोणीच काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.
… संकट अजून संपले नव्हते. ब्रिटिश सुरक्षा रक्षक त्या अभयारण्यात तेथे 24 तास खडा पहारा देत होते… आम्हालाही ते माहीत होते पण मोहामुळे आम्ही ते विसरलो होतो.. पण त्यांच्या यंत्रणेने आम्हाला बरोबर पकडले होते…फक्त पुढील काही मिनिटातच आमच्या गाडी समोरून, सायरनचा आवाज करीत, प्रकाश दिव्यांचा झोत फेकीत, समोरून एक हिरव्या रंगाची जीप आली …
वन-वे रस्त्यावर समोरून सुरक्षा रक्षकांची गाडी येणे म्हणजे ती गाडी नव्हे, ते अक्राळ विक्राळ संकट घोंगावत समोर येत होते. गाडीने आम्हाला आडवे घालून सफेद युनिफॉर्म मधील अर्धी पॅन्ट, डोक्यावर साहेब टोपी, हातात उघडे पिस्तूल दाखवत एक गोरा उतरला…
ड्रायव्हरला धमकावीत त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स हातात घेतले. आमच्याशी प्रेमाने बोलत, सर,सर ,प्लीज करित आमचेही पासपोर्ट मागितले .. तेव्हाच आमच्या ही छातीत धडधड सुरू झाली.., परदेशात आपले पासपोर्ट पोलीस च्या हातात जाणे म्हणजे आपले भवितव्य स्पष्ट होते! काय होत आहे समजत नव्हते. आमचे मित्र साठे साहेब यांना पुढे काय होणार याची कल्पना आली असावी. सौ.साठे तर डोळ्याला पदर लावून डोळे पुसु लागल्या. आम्हा दोघांना तोपर्यंत परिस्थितीचे गांभीर्य कळले नव्हते. अज्ञानात आनंद होता. आम्हाला अजून भावी संकटाची कल्पना तेवढी आली नव्हती. पण आमच्या ड्रायव्हरला ती कल्पना आली होती. आपल्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत तो एकच वाक्य म्हणत होता.. “I am finished..I am finished..”मी मेलो..
रक्षकाने आपल्या गाडी मागून येण्याची सूचना ड्रायव्हरला दिली. आता तो जे सांगेल ते करणे भाग होते. आम्ही त्याचे बंदीवान होतो. पासपोर्ट त्याच्या हातात होते. दहा एक मिनिटात आम्ही त्या पार्क बाहेर आलो. बाजूलाच एक छोटीसे ऑफिस होते. गाडी उभी केली. रक्षक महाराज आमच्या ड्रायव्हरला घेऊन त्या ऑफिसर शिरले. ऑफिसावर “पार्क कोर्ट” अशी इंग्रजीत पाटी होती. म्हणजे आता आम्ही कच्चे कैदी झालो होतो. ड्रायव्हर तर आतच गेला होता. आता आमची पाळी होती. काही वेळापूर्वी गाडी चालविताना तो सतत,
“ आय एम फिनिशड्, आय एम फिनिशड् हे एकच वाक्य का बोलत याची कल्पना आली .
साठे साहेब म्हणू लागले “ मलाही बहुतेक येथील गाशा गुंडाळून परत भारतात यावे लागेल असे दिसते!” आम्हालाही काळजी वाटू लागली. एक दिवस जरी इथेअधिक थांबावे लागले, तर आमचीही कंपनीतून गच्छंती होणार होती. करायला गेलो काय आणि झाले काय? गाडीत शब्द शांतता, कोणीच काही बोलत नव्हते. सौ. साठे तर पदराने सतत डोळे पुसत होत्या. अशाच वेळी परमेश्वर आठवतो. आतल्या मनात त्याचाच धावा सुरू होता. आणि तो रक्षक एकटा बाहेर आला.
त्याच्या हातात पासपोर्ट होते. आम्हाला आमचे पासपोर्ट परत देत मोठ्या डोळ्यात म्हणाला नेक्स्ट टाईम डोन्ट रिपीट सेट मिस्टेक्स. अरे बाबा नेक्स्ट टाईम युज कशाला आम्ही तुझ्या देशात आणि आलो तर जाऊ कशाला या पार्कमध्ये अशा ड्रायव्हरला घेऊन! त्याने आम्हाला तंबी दिली,” तुम्ही परदेशी आहात म्हणून तुम्हाला आम्ही माफी करीत आहोत. मात्र या ड्रायव्हरचे लायसन्स एक वर्षासाठी आम्ही जप्त केले आहे”. काहीच बोललो नाही. आमचे पासपोर्ट बॅगेत ठेवले त्याच्याकडे पाहत राहिलो कारण आम्हाला गाडीतून हॉटेलवर नेऊन ठेवणार फोन रक्षक साहेब स्वतः आमच्या गाडीत बसले त्यांनी आम्हाला हॉटेलवर सोडले. ऑल द बेस्ट हॅपी जर्नी म्हणून निरोप दिला व ती गाडी घेऊन पुन्हा कोर्ट कचेरी परिसरात निघून गेले. माहित नाही पुढे त्या ड्रायव्हरचे काय झाले गाडीचे काय झाले आम्ही कसेबसे विसरलो हे खरे होते. अर्थातच पुढे केनिया इंडोनेशियाला आलो पुढची कामे आटोपली तिथेही एक आलेला वेदनांमध्ये आलेला आहे का अनुभव पुढे सांगेन मात्र त्या दिवशी च्या भयानक मनस्थितीतून आम्ही गेलो की वेळ आठवली की आजही थरकाप होतो
त्यादिवशी आमचे दैव की दुर्दैव, जोरावर होते हे सांगता येत नाही? पण आफ्रिकन गेंड्याचे दर्शन झाले, ते करताना गुजरलेल्या भयानक संकटातून शेवटी आम्ही सही सलामत बाहेर आलो, म्हणून त्यावेळी आमचे नशीबच जोरावर होते असे म्हटले पाहिजे!!
एका महान संकटातून आमची बालंबाल सुटका झाली होती. या प्रसंगाने आम्ही सगळेच मोठा धडा शिकलो” पर मुलखात असताना कधीही, स्थानिक संस्कृती, लोकजीवन, कायदा कानून यांना बाधा होईल असे कृत्य करता कामा नये. अतिउत्साहाला आवर घालणे त्यासाठी आवश्यक आहे.
ब्रिटिश लोकांची न्याय निष्ठुरता आपल्या कर्तव्याशी कर्तव्यप्रती निष्ठा आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आम्ही ऐकून होतो या प्रसंगाने त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले त्या सुरक्षा रक्षकाने जरी आम्हाला अपमानित केले असले तरी ते त्याचे कर्तव्य होते. कर्तव्य प्रतीक असे निष्ठुर व्हावेच लागते त्यामुळेच आज त्या सफारी पारखात वन्यजीव आनंदाने सुखाने आपल्या नैसर्गिक परिसरात वावरत आहेत त्यांचे रक्षण होते आहे.
या वन्य प्राण्यांचे वनस्पतींचे पशुपक्ष्यांचे आणि एकूण सर्वच पर्यावरणाचे पर्यावरणाचे रक्षण ही आज काळाची गरज ठरली आहे हे सर्व वन्यजीव पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या संरक्षण साखळीतील महत्त्वाचा घटक आहेत.शिकार आणि तस्करीमुळे वन्यजीव (world wildlife day) नामशेष होत आहे. निसर्गाच्या समृद्ध परंपरेचा केंद्रबिंदू म्हणजे वन्यजीव.त्यांचे सुरक्षित वसतिस्थान म्हणजे जंगल. पण आता याच जंगलावर मानवाने अतिक्रमण केल्याने या वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा ही प्रश्न निर्माण होतो आहे.
भारतीय संस्कृती ही निसर्ग पूजक आहे. आपले अनेक सण उत्सव परंपरा आदीतून ते स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर आपली पुराणे, वेद,संत साहित्य यातून निसर्ग प्रेमाचे अनेक दाखले आपल्या पूर्वजांनी दिलेले आहेत.
केनीयाच्या अरण्य-सफारीत मिळालेला हा जबरदस्त अनुभव आम्ही कधीच विसरणार नाही. तसेच वन्यजीवन संरक्षणासाठी जे काही करता येईल तेही करण्याचा प्रयत्न करू ,असाच धडा आम्हाला त्या दिवशी मिळाला!!!
अविस्मरणीय, वाचताना ही अंगावर काटा आला
फार रोमांचकारी प्रसंग. सुंदर लेख. केनिया सफारी पार्कला प्रत्यक्ष भेट देण्याचा अनुभव मिळाला.
अशा प्रसंगातून बरेच शिकण्यासारखे आहे
अविस्मरणीय अनुभव. . ..
निसर्गाशी मैत्री करा तो तुम्हास आनंद देईल, निसर्गाशी छेडछाड कराल तर मात्र नियम तो तुम्हास शिकवेल. लेख वाचल्यावर ह्यापुढे कोणीही त्या सफारी चे नियम पाळून सहलीचा आनंद घेईल. एक अविस्मरणीय अनुभव बंधूनी घेतला एवढे मात्र नक्की.
निसर्ग जतन करणे हे धर्मात वर्णन केले आहे नियम पाळा पर्यावरणाचे रक्षण करा
नमस्कार
खूपच भयावह प्रसंग, दैव बलवत्तर म्हणूनच आपण सर्व सुखरूप परत आलात.
पृथ्वी वर सगळ्यात खतरनाक प्राणी कोण असेल तर तो एकच ” मनुष्य प्राणी” तुमच्या चालकाने हे अगदी खरे करून दाखवले.
लेखन नेहमी प्रमाणे सुंदर त्याला थोडी विनोदाची झालर आपल्या खालील वाक्यातून दिसली .
“उजवीकडे आम्हाला एक लहान डबके दाखविले. त्या डबक्यातून एक शिंग वर आलेले दिसले. गेंडा दिसत नव्हता.गेंडे महाराज चिखलाने भरलेल्या डबक्यात “ स्पा” घेत असावेत!! ????
एकंदरीत निसर्गाचा ह्रास हा मनुष्य प्राणीच करत आला आहे आणि ह्या बाबत आपल्या सर्वांना कोविड मधे वरून वॉर्निंग मिळाली आहे , आपण घरातील पिंजऱ्यात आणि प्राणी मुक्त पने बाहेर रस्त्यावर फिरताना आपण पहिले आहे. निसर्ग जपला नाही तर तो रौद्र रूप धारण करतो सध्या हे आपण हिमाचल, उत्तराखंड मध्ये बघतोय.
“पैशा साठी काही पण…” मुंबई च्या नरिमन पॉईंट चा समुद्रही ही लोक आत ढकलायला लागली आहेत एक दिवस तो उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही
वेळीच सावध होणे गरजेचे आहे हा लेख वाचताना हे प्रकर्षाने जाणवले , निसर्ग जपा, नियम पाळा, तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्यात हाच संदेश एक क्षणात एकशिंगी देऊन गेला.
धन्यवाद