अदभुत भूतान

                 भूतान देशाची राजधानी थिंपू. निसर्ग सौंदर्याचा एक अनुभव!

    राजा भर्तृहरीने आपल्या नितीशतकात एका सुभाषितात म्हटले आहे

   “ चातकाच्या मुखात स्वाती नक्षत्रातील वर्षाधारेचे थेंब पडत नाहीत तर त्यात मेघांचा काय दोष?

   दिवसा घुबडाला दिसूच शकत नाही त्याला सूर्य तरी काय करणार?

   निवlडुंगाला कधीच पाने येत  नाहीत, त्या साठी  वसंत ऋतूला  दोष देऊन काय उपयोग?

    तुमचे नशीबच खराब असेल तर दैव तरी काय करणार?”

       भूतान हा पृथ्वीवरील स्वर्ग! आशिया खंडातील आपला शेजारी. जगाचे नंदनवन स्विझर्लंड पाहता आला नाही त्याने भूतानला जावे. हिमालयाच्या कुशीत हिरव्याकंच वृक्षराजीच्या सावलीत व रजत गिरीशिखरांच्या शितल सानिध्याने जीवनाची दाहकता विसरून आनंदोत्सव करणारा हा आपला शेजारी एक अद्भुत देश आहे!

    प्रदूषण वाढवत निसर्गाला दूषित करणारे घातक रासायनिक कारखाने येथे नाहीत . त्यामुळेच तेल शुद्धीकरण कारखाने (OIL REFINERY) नाहीत. म्हणून  सर्व पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आयात होतात.आमच्या कंपनीतर्फे तसे काही प्रॉडक्ट्स विशेषतः (POL) लुब्र्रीकन्ट्स  तेथे निर्यात करता आल्यास त्याचा अंदाज घ्यावा म्हणून मी व श्री. महेश यांना भूतांनला जावे लागले. 

     ‘एक जबरदस्त अनुभव’ या लेखात मी त्या सफारीचे विस्तृत वर्णन केले आहे. ‘अनाकलनीय अतर्क्य ’ या मालिकेतील आजच्या या लेखात फक्त एका रात्रीचा तो अनुभव येथे सांगण्याचा मानस आहे .

   भूतान-भारत या परतीच्या प्रवासात हा अनुभव आला. आजही त्या दिवसाची आठवण झाली की अंगाचा थरकाप होतो. थिंपू या राजधानी पासून सुरू झालेला परतीचा प्रवास जेव्हा सुरू केला तेव्हा अशी किंचितही कल्पना नव्हती, हा प्रवास किती जबरदस्त अनुभव देणार आहे!

     तसे कळते तर अर्थातच आम्ही तो प्रवास सुरू केलाच नसता ? पण भविष्य आधी कळले तर वर्तमानात मजा काय? भविष्य अगम्य आहे म्हणूनच तर वर्तमानात  रंगत आहे?

     आमचा भूतान मधील सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे आटोपला. राजे दोरजी साहेबांची ही भेट झाली. आमचे कामही फत्ते केले. त्यामुळे आधी ठरल्याप्रमाणे थिंपू विमानतळावर जाऊन थिंपू-दिल्ली विमान पकडून मुंबईस परतावयाचे होते. येताना नगाधिराज हिमालय व त्याचे उत्तुंग  एव्हरेस्ट शिखर यांचे झालेले दर्शन आता पुन्हा होणार या कल्पनेनेच अंगात उत्साह संचरला  होता. मनात मांडे खात असतानाच विमानतळावर निघायच्या वेळी सकाळी दहाच्या सुमारास विमान कंपनीकडून तो निरोप आला …

   …’पारो-दिल्ली-विमान आज खराब हवेमुळे रद्द केलेले आहे..  विमान कंपनीच्या आफिसात जाऊन पैसे परत घ्या .‘

  या संदेशामुळे  मनात मांड्याऐवजी आता गडबड गुंडा निर्माण झाला.

   विमान कंपनीच्या ऑफिसात जाऊन तिकिटाचे पैसे घेऊन येण्यात तासभर गेला.आता थिंपू ते बागडोगरा ( भारतातील विमानतळ) प्रवास करावयाचा होता. थिंपू ते फुलशिंग( भूतान देशातील भारत सरहद्दीवरील गाव) आणि फुलशिंग ते बागडोग्रा असे दोन टप्पे होते. हा प्रवास टॅक्सीने करावयाचा होता.

      खरे तर टॅक्सीने जाणारे प्रवासी सकाळीच निघतात. कारण सहा-सात तासाचा हा प्रवास शक्यतो दिवसा करावा हे सुरक्षिततेच्या दृष्टीने ठीक असते .गोंधळामुळे आम्हाला टॅक्सीने निघण्यास दुपारचा एक वाजला. आता बागडोगरा-दिल्ली विमान बदलून आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी 3.00वा करवून घेतले. रात्री बागडोग्रा शहरात  हॉटेलमध्ये राहण्याचेही ठरविले.

   थिंपू पासून भारतात येण्यासाठी असा घाट रस्ता आहे.

   या पूर्वेकडील भागात साधारणता चार वाजता संध्याकाळ होते. निघालो तेव्हा हवा चांगली होती .व्यवस्थित प्रवास सुरू झाला. थिंपू शहराबाहेर आलो. खेड्यातून प्रवास सुरू झाला. डाव्या बाजूला खोल दरी तर उजव्या बाजूला डोंगररांगा. खाली दरीत व सपाटीवरील भागात विरळ लोकवस्ती दिसत होती . घाटातील प्रवास खूपच धोकादायक असतो .टॅक्सी फक्त ‘मारुती नॅनो’ गाड्याच असतात. टॅक्सीत डावीकडे बसलो होतो. त्यामुळे खाली दरीत बघून भोवळ येत असे  म्हणून त्या बाजूला पाहिलेच नाही. 

 रस्त्यावर दुसरे वाहन समोरून आल्यास मोठी पंचाईत होते. विशेषतः भारतीय लष्कराच्या पेट्रोलियम पदार्थ घेऊन येणारे मोठे टँकर व गाड्या आल्यास फारच अडचण होते . मोठा टँकर डोंगराच्या बाजूला तर लहान गाडी खोल दरीच्या काठावर अशी पद्धत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धोका प्रवासी वाहनांनाच असतो.

   एका गावाबाहेर आम्हाला दरीच्या कडेला मोठी गर्दी दिसली. आमची गाडी जाणे मुश्किल होते. चौकशी केल्यावर कळले,

   ‘एक तासापूर्वी भरलेले गॅस सिलेंडर घेऊन येणारा मोठा ट्रक सर्व  सिलेंडर व ड्रायव्हर क्लीनर सह दरीत कोसळला आहे. खाली दरीत मोठी आग लागली आहे’

     आम्ही उतरून वरून खाली दरीत पाहिले. ज्वलनशील गॅस ने भडका घेतला होता. नुसत्या भयानक आगीच्या वर झेपावणाऱ्या ज्वालाच दिसत नव्हत्या तर स्फोटाचे आवाजही  खालून ऐकू येत होते. खोल दरीतून आवाजाबरोबर येणाऱ्या प्रतिध्वनीमुळे तो सर्व परिसरच भेसूर भासत होता. त्या दोन मानवी जीवांचा तर कोठे मागमूस  नव्हता. ते दृश्य पाहवत नव्हते. कल्पनाही  करता येत नव्हती. मला तर आमचे पुढील भवितव्य त्या दरीत दिसू लागले ..अंगावर काटा उभा राहिला.. !!

आधीच उशीर झाला होता.देवाचे नाव घेऊन पुढील प्रवासास निघणे  जरूर होते. निघालो..!

    आता संध्याकाळ नव्हती तरी अंधार दाटू लागला होता. थोडे गार वारे अंगाला स्पर्श करू लागले. ड्रायव्हरच्या अनुभवाप्रमाणे पावसाची शक्यता निर्माण झाली.  खरेच थोड्याच वेळात रिमझिम पाऊस व जोराचा वारा सुरू झाला. आता या अंधाऱ्या व पावसाळी वातावरणात गाडी चालवणे मोठे दिव्य होते. अनुभवी चक्रधरासाठी ते नित्य कर्म होते.  तो शांत होता..दरी लगतच्या रस्त्याला कोणतेही कुंपण वा अडथळे नसल्याने थोडी चूक वा गाडीची घसरण म्हणजे खोल खाईत कपाळ मोक्ष ठरलेला होता! अजून  चार  तास तरी  प्रवास बाकी होता. .

  असेच सावकाशीने दरीच्या कडेने तासभर पुढे गेलो असू. असाच तीन तासाचा पुढील प्रवासही होऊन जाऊ दे अशीच प्रार्थना सुरू होती. मनावरील ताणही वाढत होता. काही तासापूर्वी पाहिलेले जळणाऱ्या ट्रकचे दृश्य डोळ्यासमोरून हलत नव्हते. पाऊस काही थांबत नव्हता.  पुढे पुढे तर तो वाढू लागला. साडेआठचा सुमार असेल खाली दरीत प्रकाश दिसू लागला दरीतील मानवी वस्तीची  ती निशाणी होती. आमच्या या अंधाऱ्या धोकादायक प्रवासातील ती आशेची किरणे  होती की

जगातील एका कोपऱ्याच्या दरीकंदरात माणसाच्या जिद्दीची ती खूण होती? थोड्याच वेळात ते कळले !

   थोडे पुढे गेलो. पाऊस वारा जोरात येऊ लागला…. तुफान वाऱ्याचा दरीतून चाललेला प्रवाह  घो घो असा आवाज करीत होता. पावसाचे गाडीच्या टपावर पडणारे थेंब त्याला आवाज करून जणू प्रतिसाद देत होते आणि….

दरडी कोसळून असे अपघात होतात. वाहतूक बंद होते.

 … आणि त्या अंधाऱ्या वातावरणाला आणि भयाण करणाऱ्या बेसूर तालात धडाम्… धाड ..असा तोफ गोळ्यासारखा आवाज ऐकू आला. आमची टॅक्सीही क्षणभर थरथरल्याचा भास झाला.. गाडीच्या समोरील काचेतून पुढे असणाऱ्या टॅक्सींच्या प्रकाशात अवकाशात उडालेला मातीचा धुरळा स्पष्ट दिसला…!!

    आम्हाला काय झाले कळेच ना ..

 “लँड स्लाईड हो गई है सर.. अभी हम ना आगे जा सकते ना पीछे..”…ड्रायव्हर.

     ते शब्द एखाद्या  तीक्ष्ण बाणासारखे काळजातून आरपार गेले.. आम्ही गलित गात्र होऊन एकमेकाकडे पाहत राहिलो.. ड्रायव्हरला की गोष्ट नवीन नव्हती. तो शांतपणे गाडीच्या चक्रावर डोके ठेवून पडून राहिला…

   काही वेळाने त्याने आम्हाला पर्याय दिले,

   “हवे तर माझ्याबरोबर गाडीत बसा.मागच्या गाड्या निघाल्यावर आपण मागे वळून निवारा शोधू .अथवा फक्त पैशाची पर्स घेऊन खाली उतरा. सामान, छत्रीही गाडीतच असू दे. सरळ मागे चालू लागा .ज्या ठिकाणी आपण दरीतील दिवे पाहिले तेथून एका निरुंद रस्त्यावरून खाली उतरा.एक लहान लाॅज दिसेल .तेथे थांबा. मी सामान घेऊन येथे येतो. ..”

    आता डोक्यात ही अंधार होता. काय करावे सुचत नव्हते.  परमेश्वरावर भरोसा ठेवून आम्ही अंगावरील कपडे व पैशाचे पाकीट घेऊन टॅक्सीतून रस्त्यावर उतरलो. पाऊस चालूच होता. क्षणभरातच भिजून चिंब झालो. छत्री न घेणेच उचित होते. छत्री उघडता क्षणीच तिचे पॅराशुट झाले असते. आणि आम्ही अलगद हवेत तरंगत खोल दरीत उतरलो असतो .मागे उभ्या असलेल्या गाड्यांच्या प्रकाशात हळूहळू चालत त्या अरुंद रस्त्यावरून खाली दरीत उतरलो. लाॅजसमोर येऊन उभे राहिलो. लॉज म्हणजे एक लाकडाचे तुकडे जोडून बनविलेली  एक जुनाट वास्तू होती. लाकडी तुकड्यांच्याच भिंती व त्याच तुकड्यांनी बनविलेला  माळा! आम्हाला पाहून एक मध्यमवयीन बाई बाहेर आली.  मुंबईस चाललो आहोत हे ऐकून तिला  आमची दया आली.  तिने आम्हाला वरच्या मजल्यावरील  खास कक्षात जाऊन आराम करण्यास सांगितले .आमचे सामान आले नसल्याने आम्ही खालीच उभे राहतो असे तिला सांगितले. तेथील सर्व वास्तव पाहून आम्हाला धडकी भरली. ज्यांना लॉजमध्ये राहायचे नव्हते अशी  ड्रायव्हर मंडळी बाजूलाच एका झाडाच्या आश्रयाला छान पैकी धूम्रपान करीत रसपानाचा आस्वाद  घेत होती. त्यांना पावसाचीही पर्वा नव्हती.

असे होते आमचे ते भूतान व्हॅलीतील रिसॉर्ट.

    सुदैवाने अर्धा एक तासात आमचा सारथी टॅक्सी  घेऊन आला.  आमच्या बॅगा खाली उतरवून, “भोंगा झाला की मी येथेच येतो, आपण आराम करीत रहा. झोपू नका..” अशी सूचना देऊन आल्या आल्या पटकन निघूनही गेला. 

    आमच्या खोलीत सामानासहित आलो. ही स्पेशल खोली खरेच खूप खास होती ! बांबूच्या कट्टाचा दरवाजा व बांबूच्या चौकटीला लावलेला कंतानाचा पडदा!  पावसात तो फडफडत होता व पावसाच्या पाण्याचा बारीक शिडकावा अंगावर करून आम्हाला बसल्या बसल्या शॉवर बाथ ही देत होता. पाणीही आत येत होते. एकच पलंग. खाली ही सपाट पृष्ठभाग नव्हताच. लाकडातील फटीमधून खाली  भाजत असलेल्या मांसाचा धूर व दर्पाने  माझ्यासारख्या मांसाहारी गृहस्थाला नाक दाबून ठेवावे लागत होते, तर शुद्ध शाकाहारी महेशची काय हालत झाली होती ते त्यालाच माहित! बाजूच्या खोलीतही अनेक ड्रायव्हर मंडळी जमली होती. धुम्रपान-रसपान करीत खालून येणाऱ्या धुरात आपला धूर व आवाज मिसळून त्या वातावरणाला एक वेगळीच शिसारी आणीत होती!

  महेशला डायबिटीसचा त्रास असल्याने, सकाळपासून काहीच खाल्ले नसल्याने काहीतरी खाणे आवश्यक होते .त्याला थोडेसे गरगरल्यासारखे होऊ लागले होते. पोटात अन्न नाही ,खोलीत असा धुरळा. येथे योग्य खाणे मिळण्याची अशक्यता. मलाही काही सुचतं नव्हते काय करावे .या  अनोळखी प्रदेशात जेवण कुठे शोधायचे? पाऊस थांबला होता मात्र वारे जोरात होते. 

  मालकीणबाईला  खाली जाऊन मी अडचण सांगितली. बाईंनी, सुमारे एक किलोमीटर मागे जाऊन मुख्य रस्त्यावरून खाली उतरून, गावात असलेल्या पेट्रोल पंप वाल्याकडे काही खावयास मिळू शकेल, अशी फार उपयुक्त माहिती दिली. पेट्रोल पंप म्हटलं की आम्हाला पेट्रोलियम कंपनीवाल्या अधिकाऱ्यांना अतिशय आनंद व विश्वास निर्माण होतो. ही मंडळी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत काहीही मदत करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. हा माझा आजवरचा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

    आम्ही आता पेट्रोल पंपाच्या शोधात निघालो. पाऊस नसला तरी वारा होता. खाचखळग्यांनी भरलेला अरुंद घाट रस्ता खूप धोकादायक झाला होता. अंधारात काही दिसत नव्हते. एक पाऊल चुकीचे आणि शेजारच्या खोल दरीत विसर्जन. तरी निघालो. महेशला काहीतरी खाणे अत्यंत आवश्यक होते. अथवा त्याहून ही बिकट प्रसंग उद्भवू शकला असता. त्या अनोळखी अंधाऱ्या रात्रीत आम्हाला वैद्यकीय सेवा मिळणे तर केवळ अशक्य होते! दैवाने अगदीच आमच्याशी कट्टी केली नव्हती.. थोडी साथ  दिली. भारतीय सुरक्षा सेनेतील एक जवान (बॉर्डर सेक्युरिटी फोर्स) आपली बॅटरी पाडीत टेहाळणीसाठी समोरून आला. आम्ही त्याला आमची परिस्थिती कधन केली. त्याला आमची दया आली, हे त्याच्या चेहऱ्यावर त्या अंधारातही आम्हाला दिसले. देवदूतांचे चेहरे तसे तेजस्वीच असतात !

  “माझ्या गाडी मागून या” असे सांगून तो पुढे निघाला. वीस एक मिनिटात त्या पेट्रोल पंपानजीक आणून त्याने आम्हाला सोडले.  पेट्रोल पंप बंद होता. शेजारील खोलीतून, आमचा आवाज ऐकून एक मध्यमवयीन गृहस्थ  बाहेर आले. त्या रात्री पावसात अवेळी आम्ही का आलो, हे त्यांना सांगितले. त्याची झोप उडाली. आम्हाला ऑफिसमध्ये बसवून त्यांनी आपला हिटर चालू केला. दोन टॉवेल आणून घेऊन आम्हाला अंग कोरडे करण्यास सांगितले. गार वारे व भिजलेले अंग यामुळे संपूर्ण अंगात हुडहुडी भरली होती. बारा तासात काही खाल्लेले नसल्याने अशक्तपणाही जाणवू लागला होता. त्या गृहस्थानी कोमट पाण्याचा जार आमच्या समोर ठेवून भरपूर पाणी पिण्यास सांगितले. खरेच अन्न तर जाऊ द्या पण आम्ही गेल्या कित्येक तासात टिपूस भर पाणीही प्यालेलो नव्हतो. डीहायड्रेशन झाले असते. ती देखील खूप मोठी जोखीम होती. थोडे बरे वाटू लागले होते.

   पाच एक मिनिटात आमच्या मित्रांनी आम्हाला दोन खायचे विडे आणून दिले. “तोंडात टाका,चाऊन खा”  म्हणाले.

   आम्हाला खायला अन्न हवे होते. आणि हे विडे कशाला ,काय आहे त्यात, तंबाखू असेल का, आम्हाला त्याची सवय नाही, चक्कर आली तर आम्हाला काही घात करायचा तर यांचा विचार नाही ना असे विचार पटकन येऊन गेले. पण असे विचार करण्याची ती वेळ नव्हती ..!!देवाचे नाव घेऊन तोंडात टाकून चघळू लागलो आणि ..?

  … आणि खरेच दहा मिनिटात आमच्या अंगात एकदम शक्तीचा संचार झाला. थंडी-पावसाने कंप पावणारे आम्ही घामेजून गेलो. त्या थंडीत अंगातून घामाच्या धारा आल्या…  जणू चमत्कार झाला. महेशला  तर खूप तरतरी आली. निराशा गेली.

   थोड्याच वेळात त्या गृहस्थाचा नोकर गरम पोळ्या व बटाटा भाजी घेऊन आला. आमच्यासमोर ठेवली. आम्ही त्या ‘पंचपक्वाना’ वर तुटून पडलो…

   आयुष्यातील अनेक प्रवासात, जगातल्या उत्तमोत्तम हॉटेलातील बल्लवाचा-याच्या हातून तयार झालेल्या जेवणाची चव चाखली आहे, पण त्या दिवशी  रात्री पेट्रोल पंपावर खाल्लेल्या पोळी-भाजीची चव आयुष्यात कुठेही मिळाली नव्हती. परमेश्वराने त्या रात्री खास आमच्यासाठी पाठवलेला तो अमृतमधुर असा खाना होता!! त्या जेवणाने केवळ भूकच भागविली नाही तर त्यादिवशी आम्हाला जीवनदान मिळाले! त्या नंतर महेशने आपली औषधे घेतली व तो एकदम खडखडीत बरा  झाला ही खूप मोठी गोष्ट होती!! खूप निश्चिंत झालो. 

     त्या भल्या माणसाने आम्हाला त्याच्या नोकरामार्फत पुन्हा आमच्या लॉजवर आणून सोडले. फोन नंबर नाव देऊन काही प्रॉब्लेम आल्यास मला कळवा असे आश्वासनही दिले .

   आम्ही लॉजवर आलो. झोपणे शक्यच नव्हते.’ ऑल क्लिअर भोंगा ‘ कधीही होऊ शकला असता. आणि खरच अर्ध्या तासात रात्री बारा साडेबाराच्या सुमारास भोंगा झाला. खाऊन पिऊन सुस्त पडलेले अतिथी एकदम जागृत झाले. गाड्यांचे, ट्रकचे आवाज आणि भोंग्यांनी परिसरात गजबजाट झाला. पुन्हा स्मशान शांतता. गाडीवानाकडे डोळे लावून बसलो होतो. पूर्ण निराशा. तो आलाच नाही. पैसे तर संपूर्ण घेतले होते. ते गेले तरी हरकत नव्हती. मात्र रात्री या दरीखोऱ्याच्या दुर्गम प्रदेशात दुसरी टॅक्सी  कधी आणि कशी शोधायची? बदलून घेतलेले दुपारचे विमान मिळणार का? पुन्हा अनेक नवीन प्रश्न ??

  पर्वतराजी व गर्दवनराईत  लपलेले ते असे छोटे सुंदर गाव!

    पुन्हा मालकीण बाईंचे पाय धरले. बाई खरंच सालस होती. तिने आम्हाला धीर दिला .

   “आज दुपारचे विमान मिळऊन देईन. काळजी करू नका. आता थोडी विश्रांती घ्या. चहा नाश्ता करून पाच वाजता येथून पंधरा-वीस मिनिटांवर असलेल्या गावाचा पत्ता सांगते तेथे जा. तेथे  टॅक्सी  मिळेल.”

   तसे झाले तर निदान आजचे विमान बदलण्याची वेळ येणार नव्हती.

     बाईंच्या सल्ल्याप्रमाणे परत मुख्य रस्त्यावर आलो. पंधरा-वीस मिनिटे चालल्यावर पुन्हा खाली दरीत उतरलो. छोटे गाव होते  गंमत म्हणजे रस्त्यावरून जातांना कोणीही माणूस दिसेना. हळूच दार किलकिले करून लोक आमच्याकडे पाहत होते .

  “हे दोन साहेब गावात कशासाठी आले आहेत. ?” याची त्यांना भीती वाटली असावी.

   हिमालयाच्या कुशीतील त्या छोट्या  गावात फिरताना मला एक वेगळा आनंद आणि समाधान वाटत होते. नाहीतर या गावात कधी येणार होतो? कशाला येथे येणार होतो? अतिशय स्वच्छ व हिमालयीन वनराजींनी सजलेले ते गाव होते. साध्या झोपड्या सुद्धा खूप श्रीमंतीने भरलेल्या होत्या . आरोग्य आणि तृप्तीची श्रीमंती!

  काही अंतरावर दोन ओम्नी गाड्या उभ्या दिसल्या. नक्कीच त्यांचे मालक तिथे असणार या कल्पनेने तिथे गेलो. अंदाज बरोबर होता. मालक  बाहेर आले. त्यांना सर्व इतिहास हिंदीतून समजावला. लाॅजवाल्या बाईचा रेफरन्स दिला. फुलसिंग हद्दी पर्यंत त्यांनी सांगितलेला दर मान्य केला. त्याच टॅक्सीत बसून पुन्हा लॉजवर आलो. येथून निघणे महत्त्वाचे होते. दुप्पट पैशाची काळजी करायची नव्हती!

     लॉजवर आलो. मॅडम बाई उभ्या होत्या. सामान  खाली आणले होते. टॅक्सी मिळणार ही त्यांना खात्री होती. सामान गाडीत टाकले. बाईंना त्यांचे बिल विचारले .म्हणाल्या,

   “तुम्ही भोजन तर सोडा, येथे झोपही घेतली नाही.चहाचे पैसे  माझ्या आठवणी साठी.. “

मोडक्या हिंदीत पण हृदयातील खऱ्या प्रेमाच्या ओलाव्याने भारलेले ते शब्द आम्हाला खूप काही सांगून गेले. भारताच्या अनेक खेड्यात राहणारी ही माणसे मनाने किती श्रीमंत! आमच्या शहरी राहणीत ही श्रीमंती कुठे मिळणार?

   आता आम्ही रस्त्याला लागणार तोच कालचा टॅक्सीवाला दत्त म्हणून आमच्यासमोर उभा! नवीन व जुन्या टॅक्सीवाल्यांची जुंपली. दोघेही, मी पाहुण्यांना नेणार म्हणत जोरजोरात भांडू लागले. वेळ जात होता व आम्ही काहीच करू शकत नव्हतो. दैवाच्या परिक्षा अजून संपल्या नव्हत्या. बाईंनी भांडण सोडवले. नव्या टॅक्सीवाल्याला आमच्या मार्फत शंभर रुपये देऊन समजाविले. जुन्या टॅक्सीवाल्याला सज्जड दम भरला. व त्याचे नाव पत्ता घेऊन, आम्हाला व्यवस्थित ठिकाणावर पोहोचविण्यास सांगितले.

   पूर्ण पैसे मिळाले असतानाही हा जुना टॅक्सीवाला आम्हाला नेण्याचा का अट्टाहास करतोय? नंतर कळले, सीमेपासून त्याला पूर्ण भाडे मिळणार होते! या गावातून परत थिंपूला गेल्यास त्याला रिकामे जावे लागले असते !

   “गणपती बाप्पा मोरया ..” म्हणत पुढच्या प्रवासाला लागलो. सुदैवाने भूतान हद्दीपर्यंत काही त्रास झाला नाही. तेथून भारत-भूतान सीमेवरील चौकीतून भारतात यावे लागते.

 भारताच्या सीमेवरील गावातून दुसरी टॅक्सी पकडून बागडोग्रा विमानतळाकडे कूच केले. विमान दुपारी 1.00 वाअसल्याने निश्चिंत झालो. चला सुटलो एकदाचे, असे मनात म्हटले खरे ..पण..!! संकटांची मालिका अजून कुठे संपली होती?

        भारताच्या हद्दीतून प्रवास सुरू केला, व्यवस्थित जात होतो . तासाभरात एका गावात भरपूर जमाव दिसला रस्ता बंद केला होता ड्रायव्हरने उतरून चौकशी केली तेव्हा त्या गावात रात्री नक्षलवाद्यांनी एक खून केल्यामुळे गावकऱ्यांनी रस्ता रोको करीत सरकारचा निषेध सुरू केला होता. आम्ही खाली उतरलो. म्होरक्याला, यांच्या नेत्याला विनंती केली, तिकिटे दाखविली पण  नही चलेगा नही चलेगा हेच चालू होते. आता येथेच तासभर गेला तर दुपारचे विमान मिळणे  कठीण होणार होते. पुन्हा तणाव. सुदैवाने हा ड्रायव्हर स्थानिक होता व त्याला आम्ही पूर्ण पैसे दिले नव्हते त्यानेच आम्हाला मार्ग सुचवला थोडा दूरचा रस्ता विमानतळाकडे जातो तिथून जाऊया म्हणाला, शंभर रुपये जास्त द्यावे लागतील. अर्थातच आम्ही तात्काळ मंजुरी देऊन त्या रस्त्याने निघालो. त्याच्या शेजारी त्याने या गावातील एका स्थानिक तरुणालाही बसविले. त्यालाही दोनशे रुपये द्या असे ठरवले. आम्ही परवापासून पैशाचे पाकीट उघडूनच ठेवले होते. लांबच्या रस्त्याने आम्ही साडेअकराच्या सुमारास बागडोंग्रा विमानतळावर आलो. गंगेत घोडे न्हाले. ड्रायव्हरचे पैसे, मुलाचे पैसे सगळ्यांना चुकते करून शिवाय चहापानासाठी बक्षीसी दिली.

       भूतान-भारत सरहद्द  व चेकपोस्ट .

   कलकत्ता-बागडोग्रा विमानाचा इंतजार करीत असताना मनात विचारांचे काहूर उठले होते. या विमानाला तर उशीर होणार नाही ना? नाहीतर कलकत्ता-मुंबई विमान प्रवास अडचणीत! दुधाने तोंड भाजले तर ताकही फुंकून प्यावे लागते असे म्हणतात ते उगीच नाही. परंतु तसे झाले नाही.  शेवटी एकदाचे रडत राऊतांचे ताबूत  मुंबईत रात्री उशिरा का असेना पण पोहोचले.!!

 खरेच परमेश्वर कोणाची कधी, कशी, कोठे परीक्षा घेईल काहीच सांगता येत नाही? प्रत्येक जण त्या कसोटीतून पार होईलच हे सुद्धा खरे नाही? आयुष्यातील  या सर्व अतर्क्य अनाकलनीय गोष्टी धोकादायक तरीही जीवनात रंगत भरणाऱ्या.

    “तुलसी’ जस भवितव्यता, तैसी मिलै सहाय।

     आपु न आवै ताहि पै, ताहि तहाँ लै जाय॥”

  संत तुलसीदासांचे हे म्हणणे खरेच खूप अर्थपूर्ण आहे.

  दुर्दैवाचा फेरा आला की माणसाची सरळ बुद्धीच विपरीत होते. तो स्वतःच संकटाच्या खाईत उतरतो. त्याप्रसंगी नको त्या गोष्टी करतो. त्याचे दुर्दैवच त्याला संकटापर्यंत घेऊन जाते. मात्र त्याच्यावर ईश्वर कृपा असली तर तो त्यातूनही बाहेर पडतो.

   भूतान प्रवासात हेच अनुभव आले.  आम्ही परतीचा प्रवास विमानानेच करण्याचे का ठरविले? बरे टॅक्सी करायची होती तर त्याच टॅक्सीवाल्याला का जवळ केला? वातावरणाचा लहरीपणा माहित असताना, परतीचा प्रवास विमानानेच करण्याचा अट्टाहास कशाला? अनेक प्रश्न आहेत. आता तो विचार करण्यात गरज नाही. व्हायचे ते घडून गेले. ज्याने संकटे आणली, त्यानेच त्यातून बाहेर काढले. ईश्वरीरूपात भेटलेल्या त्या तिबेटीयन बाईला मनोभावे वंदन!