ऑपरेशन सिंदूर

           हा सिंदूर नारीचा की, नयन तिसरा सांबाचा?

भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पण पाकिस्तान हा कधीच शांतता प्रिय देश राहिला नाही. भारताबरोबरचे पाकिस्तानचे संबंध कायम तणावाचे राहिले.पाकिस्तानातही देशांतर्गत यादवी आजही सुरू आहे. एका यादवीचा परिणाम बांगलादेशच्या निर्मितीत झाला. लोकशाही व्यवस्था ढासळलेला देश म्हणून पाकिस्तानकडे जगात पाहिले जाते. पाकिस्तानसोबत भारताची आतापर्यंत चार युद्धे झाली. प्रत्येक युद्धात काश्मीरचा मुद्दाच महत्त्वाचा राहिला आहे. 1971 सालच्या भारत पाकिस्तान युद्धात बांगलादेशची निर्मिती झाली. पाकिस्तानला  लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानचे सुमारे 92 हजार सैनिक भारताने युद्धबंदी म्हणून कैद केले. पाकिस्तानने सपशेल शरणागती पत्करली. युद्धबंदी करार मान्य करून, ”यापुढे भारताशी युद्ध करणार नाही..” अशी शपथ ही घेतली!

भारताने युद्धबंदी म्हणून ठेवलेले पाकिस्तानचे सैनिक सन्मानाने परत पाठवले! शरणागताला सन्मान देणे ही या देशाची पूर्वपार चालत आलेली परंपरा?भले त्यामुळे अनेकदा नुकसान ही झाले तरी आजही ती उच्च परंपरा आम्ही सोडलेली नाही!. त्यामुळेच भारत म्हणजे एक मूल्याधिष्ठित देश तर पाकिस्तान म्हणजे  एक गयागुजरा, कंगाल व भिकेचा कटोरा घेऊन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भिकेवर टिकून असलेला देश, अशीच या दोन शेजाऱ्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आहे!!

  पाकिस्तानला, ”मिया पडतो पडे पण तंगडी उंची” ही म्हण खऱ्या अर्थाने आज पाकिस्तानला लागू आहे. खरे तर दोन्ही तंगड्या भारताने आधीच मोडून ठेवल्या आहेत. उंची करायला तंगडी सुद्धा शिल्लक नाही. तरीही हा लंगड्या आता आपल्या मोडलेल्या तंगड्या सांभाळून ठेवण्यापेक्षा कुबड्या वर करून अजून हुशारी दाखवीत असतो. दहशतवाद्यांना” छू” करून भारतीय नागरिकांना सतत सतावित राहण्याचे कुकर्म सतत चालू आहे व ‘इस्लाम खतरे मे..’ची आवई मधून मधून उठवित असतो.! 

 असा दळभद्री अपशकुनी व ‘आपले नाक कापून भारताला अपशकुन करणार्या पाकिस्तानी राज्यकर्त्या इतकेच ज्यांनी या पाकिस्तान निर्मितीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावला ते भारतीय नेतेही तितकेच जबाबदार आहेत!’भारताला स्वातंत्र्य देताना भारतीय लोकांची गुणवत्ता ब्रिटिशांनी हेरली होती. भारत देश भविष्यात कधीही महासत्ता होऊ नये,त्याने ब्रिटिश महासत्ता व अंग्लो-अमेरिकन  देश यांचेशी स्पर्धा करू नये, या धोरणाने ब्रिटिशांनाही स्वतंत्र पाकिस्तानात हवा होता. आमच्या काही तत्कालीन  धुरीणांनी ब्रिटिशांच्या या  सापळ्यात अडकून त्यांची ती युक्ती सफल करण्यात हातभार लावला.  त्या वेळेपासूनच भारताचे दुर्दैवाचे फेरे सुरू आहेत.पाकीस्तान नावाचा देश अस्तित्वात असेपर्यंत केवळ आशियातच नव्हे तर सर्व जगात शांतता नांदणे शक्य नाही… केवळ अशक्य आहे!

   पाकिस्तानातील मुस्लिम जनतेला, मुसलमान या जमातीला मी येथे दोष देत नाही. जगाच्या इतर भागातही मुसलमान बहुल देश खूप आहेत.त्या देशात व आजूबाजूच्या प्रदेशात शांतता आहे.देशांतर्गत जनतेला वा शेजाऱ्यांना तेथे उपद्रव  नाही. मात्र या पाकिस्तान देशाचे आज पर्यंतचे नेतृत्व व सेनादल यांनी आपापसातील यादवी बरोबरच शेजारी भारतही दहशतीच्या सावलीखाली कसा राहील हेच पाहिले. पाकिस्तान चेअस्तित्व केवळ दहशतवाद्यांची निर्मिती, आर्थिक, शस्त्र सहाय्य करून  त्यांना भारता विरुद्ध फितवून भारतात घातपात घडवून भारतात सदैव अस्थिरता कशी राहील हेच आपले ध्येय ठेवले. दुर्दैवाने आमचा दुसरा शेजारी चीनने देखील पाकला संपूर्ण साथ दिली..  काही वर्षे अमेरिकेची साथ पाकिस्तानला होती कारण अमेरिकेचाही त्यात राजकीय फायदा होता. आता अमेरिका पाक पासून थोडी दूर गेली आहे असे वाटते. 

     “ऋण काढून सण करणे” अशी म्हण आपल्यात आहे.मात्र या पाकिस्तानची रीत  पाहिल्यावर ऋण घेऊन दान करणे व तेही कुपात्री दान करणे असाच प्रत्यय येतो. दुर्दैवाने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था) देखील या देशाचे लाड पुरवीत हजारो करोड डॉलरचे कर्ज यांना देऊन  एक प्रकारे दहशतवादाला मदत करते असेच खेदाने म्हणावे लागेल. भारत पाक शस्त्र संधी झाल्यावर नुकतेच हे कर्ज पाकला दिले गेले.

    पाकिस्तान या देशामुळे संपूर्ण जगात कधीही शांतता नांदू शकणार नाही हे आता हळूहळू सर्वांना कळू लागले आहे .खूप उशीर झाला आहे. परंतु ,Better late than never.

 या म्हणीप्रमाणे आता तरी जागतिक सत्तांनी एकत्र येऊन भारताचे हात मजबूत करून या सडक्या मेंदूच्या विकृत देशापासून सबंध मानव जातीला वाचविणे गरजेचे आहे .मला वाटते हळूहळू ही जाणीव जागतिक महासत्तांना होत आहे. मात्र  काहींचे राजकीय व आर्थिक हितसंबंध पाकिस्तानशी अजूनही गुंतलेले असल्याने उघडपणे ते तसे करू शकणार नाहीत. चीन सारख्या देशांला भारत हा आपला न आशियातील व जागतिक स्पर्धेतही प्रतिस्पर्धी वाटत असल्याने तो देश पाकिस्तानचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेत आहे. हे दुर्दैव आहे. शेवटी. Birds of the same feather… हे खरे आहे!!

 याच न्यायाने आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणताही देश आपले मित्र किंवा आपले शत्रू निवडतात !!

हेच ते सहापैकी तीन हरामजादे दहशतवादी .त्यांचा खात्मा ऑपरेशन सिंदूर मध्ये झाला

   राजकारण काहीही असो. 14 एप्रिल 2025 रोजी पहेलगामला पर्यटनासाठी गेलेल्या भारताच्या 26 निरपराध निःशस्त्र 

देशवासीयांची जात विचारून, केवळ हिंदू म्हणून हत्या केली गेली.. आमच्या आया-बहिणींच्या भालीचे कुंकू त्यांच्या नजरेसमोर पुसले गेले. ज्या अतिरेक्यांनी हे कृत्य केले ते व त्यांना आश्रय देणारे पाकिस्तानी राज्यकर्ते यांना त्यांचा हिसाब चुकता करण्यासाठी सुरू झालेला संग्राम म्हणजेच “ऑपरेशन सिंदुर”!! ‘

     “जोपर्यंत आमच्या शेजारील देशातून उगम पावणारा दहशतवाद संपूर्ण नष्ट होत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन सिंदूर सुरू राहील” 

अशी स्पष्ट घोषणा भारताच्या पंतप्रधानांनी केली आहे . 

 अतिरेकी व त्यांना आश्रय देणारे, शस्त्रसामुग्री पुरविणारे सुद्धा आमचे शत्रू म्हणून त्यांना ठोकून काढू. आज भारताचा आता अंतिम निष्य आहे .

  “इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा..”

  भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील एक नवे पर्व सुरु झाले आहे! शस्त्र संधी झाली असली तरी आमच्यासाठी ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही, अशी स्पष्ट कबुली आमच्या तिन्ही सशस्त्र दलांनी शत्रूला दिली आहे !

“जाये जान भलेही जाये, विश्वविजय करके दिखलाये!!”

आमच्या  सनातन हिंदु संस्कृतीने कुंकवाची सांगड स्त्रीच्या सौभाग्याशी घातलेली आहे. कपाळावर अभिमानाने कुंकू धारण करणारी आमची विवाहिता हिंदू स्त्री स्वतःला ‘सौभाग्यवती’ म्हणविते. तिच्यासाठी  भालप्रदेशी असलेला तो लहान टिळा म्हणजे तिचे भाग्य  शालीनता,  संस्कृती स्वाभिमान आणि तिच्या स्वामित्वाची खूण!  स्त्रीच्या भाल प्रदेशावरील एका छोट्या तिलकातून  एवढी शक्ती सामर्थ्य व तेज प्रदान करणारा  सनातन हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म सबंध जगात नाही. . हा  सिंदूर म्हणजे आमच्या सनातन धर्माची ओळख . आमच्या पुरुषार्थाची खूण. आपला धर्म व स्वत्व  जिवंत ठेवण्याचे काम हिंदू स्त्रियांनी या कुंकवाच्या माध्यमातून हजारो वर्षे केले. ज्या ज्या वेळी त्यांना या कुंकवाचे शत्रूपासून  रक्षण करणे अशक्य झाले त्या वेळी शत्रूच्या हाती लागण्यापेक्षा स्वहाताने रचलेल्या पेटत्या चितेत जोहार करणे त्यांनी पसंत केले. तसे इतिहासात दाखले आहेत..’

‘माझे कुंकू भ्रष्ट होण्यापेक्षा या  देहाची राख रांगोळी झालेली बरी”,हे वीरांगनांचे ब्रीद वाक्य होते. आजही भारतीय नारी ते विसरलेले नाही! 

   आमच्या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाती-पाती  प्रांत-पंथाच्या सर्व सीमा ओलांडून स्त्रियांच्या कपाळी विराजमान असलेल्या या एवढ्याशा कुंकुवा ने हिंदुत्वाला व ते मानणाऱ्या सर्व लोकांना एकत्र जोडण्याचे काम गेली वर्षानुवर्षे केलेले आहे!

    कामानिमित्त मी या देशात व परदेशात खूप फिरलो, कपाळी कुंकूम तिलक धारण करून तो अभिमानाने मिळवणाऱ्या आमच्या हिंदू ललना  पाहिल्यानंतर ऊर अभिमानाने भरून येत असे.कधी टिकली तर कधी संपूर्ण भालप्रदेश माखून टाकलेला आडवा पट्टा.. कुंकू म्हणजे आमच्या सनातन धर्माची शान आमचा मानबिंदु!! हे कुंकू  आमच्या भारतीय स्त्रीचा मानबिंदू आहे ..शंकराचा तिसरा नेत्र जणू

    पहलगाम मध्ये काही धर्म वेड्यांनी आमच्या नि: शस्त्र बांधवावर निर्र्घुण हल्ला केला.  26 बळी घेतले. प्रत्येकाचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या.आमच्या आया बहिणींच्या माथ्यावरील सौभाग्य पुसले .हा भालीचा सिंदूर पुसला आणि त्याखाली दडलेला तो  तिसरा नेत्र आता उघडला आहे.. त्यातून निघणाऱ्या सुडाच्या अग्नीज्वालांतून आता शत्रूचा विनाश निश्चित आहे. ऑपरेशन सिंदू म्हणजेच शत्रूचा बदला घेण्यासाठी उघडलेला शंकराचा तिसरा डोळा.. आता फक्त शत्रूचा विनाश आणि विनाश ठरलेला च्या हातांनी आमच्या माता भगिनींच्या माथीचा सिंदूर पुसला त्या हाताची खांडोळी आणि त्या रक्ताने लावला जाईल  अभागी भारतीय नाऱीच्या माझ्यावरील पवित्र सिंदूर, पवित्र तिलक !!

    बुधवारी 7मे 2025, रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. या ऑपरेशन अंतर्गत एकूण ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला गेला. ही कारवाई योग्य रणनितीनुसार पार पडली. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हता, पण दहशतवादी ठिकाणांवर वेचून हल्ला केला . भारताने अनेक दहशतवाद्यांच्या वसाहती नष्ट केल्या. दहशतवादी मारले. या प्रत्युत्तरातून भारताने स्पष्ट संदेश दिला की, दहशतवाद्यांना तर  सोडणार नाही पण दहशतवाद्यांना आश्रय देणारेही सोडणार नाही. भारत फक्त आता इशारा देत नाही तर कारवाई देखील करतो, हा संदेश संपूर्ण जगाला गेला आहे.

    भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत कारवाई केली. या कारवाईचा कोणत्याही नागरी स्थानावर किंवा सामन्य नागरिकांवर परिणाम झाला नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्ट केलं की, ही कारवाई फक्त दहशतवादाविरुद्ध होती. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला नाही. पण पाकिस्तानमध्ये या हल्ल्यानंतर खळबळ उडाली आहे. अनेक दहशतवादी अड्डे रिकामी करण्यात आले आहेत. सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताने २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि २०१८ बालाकोट एअरस्ट्राईक केला होता. भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे.

 पाकिस्तानने भारताच्या सीमेलगत गोळीबार व ड्रोन हल्ले सुरू केल्यामुळे भारताला ही प्रत्त्युत्तर द्यावे लागले.   उरी, कुपवाडा, तंगधारमध्ये दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला.भारत पाकिस्तानवर सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला.होशियापूरमध्ये पाकिस्तानची मिसाईल पाडण्यात आली. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा स्फोट झाला. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीझाला.या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले.कारवाई सुरू झाल्यानंतर तीन दिवसात शस्त्रसंधी झाली .मात्र यानंतरही पाकिस्तानकडून होणारी आगळीक थांबलेली दिसत नाही. ज्यानंतर आता भारताने जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. 

ऑपरेशन सिंदूर याचा अर्थ सांगताना एका वरिष्ठ पत्रकाराने फार सुंदर विश्लेषण केले आहे.

    ‘Sindoor’ शब्दाचे इंग्रजी रूपांतर करताना ते म्हणतात 

   Strategic Initiative for Neutralizing Destructive Opponents with Overwhelming Retaliation

या इंग्रजी वाक्यातील प्रत्येक शब्दातील सुरुवातीचे अक्षर घेऊन तयार होणारा शब्द सिंदूर आहे शब्दांचे संक्षिप्त नाव आहे..SINDOOR!

याचे मराठीत भाषांतर करू गेल्यास ते होईल.  

     “विनाशकारी दुश्मनांचा शोध घेऊन त्यांना संपूर्ण निष्प्रभ नेस्तनाबूद करण्यासाठी आखलेली रणनीती!”

       हे बलिदान व्यर्थ जाणार नाही!

    ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकल्यावर परवाच्या पहेलगाम मधील बेलगाम हल्ल्यात ठार झालेल्या आपल्या  मृतपतीच्या कलेवरा शेजारी  बसलेली नवपरिणिता आठवली. काही आठवड्यापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मधुचंद्रासाठी हे दोघे काश्मीरला आले होते. ज्या पतीच्या नावाने केवळ काही दिवसांपूर्वी भाली सिंदूर लावला त्याचे  कलेवर मांडीवर घेऊन आक्रोश करण्याची पाळी तिच्यावर आली. भावी जीवनाची सर्व स्वप्ने ऊध्वस्त झाली.. काहीही अपराध नसताना.. केवळ ती एक हिंदू स्त्री होती म्हणून ..!!ज्या नराधमाने तिचे कुंकु पुसले त्याच्याच रक्ताचा सिंदूर तिच्या माथी लावला जाईल तिच्या प्रमाणेच त्या दिवशी विधवा झालेल्या इतरही अभागी स्त्रियांच्या माथी दुर्जनांच्या रक्ताचे टिळे लागतील आणि त्याच दिवशी ऑपरेशन सिंदूर समाप्त होईल !! आमच्या पंतप्रधानांचा व आमच्या शूर वीरसैनिकांचा तो निश्चय आहे. म्हणून हे ऑपरेशन सिंदूर!! 

  भारताने जगाला ,विशेषतः दहशतवादी नराधमांना व त्यांना आश्रय देणाऱ्या ‘पापीस्तानला’ निक्षून सांगितले आहे….  

     “कुंकवाचा रंग लाल असतो आणि रक्ताचाही रंग लाल, म्हणून तुमच्या पाशवी कृत्त्याचा बदला तुमच्या रक्तानेच घेतला जाईल….त्या अधम रक्ताचा टिळा ज्या दिवशी आमच्या या  दुर्दैवी माया भगिनींच्या मस्तकावर लागेल  तेव्हाच हे ऑपरेशन सिंदूर पूर्ण होईल! 

   ज्याने कोणी या संग्रामाला हे नाव दिले त्याचे खरोखर कौतुक वाटते.कारण आमच्या सनातन संस्कृतीशी असलेले  कुंकवाचे नाते व सामर्थ्य याचे दर्शन आता जगाला होणार आहे…!

    “हिमाचलाचे हिरकमंडित शीरभूषण भरदार,,वक्षावर गंगा यमुनांचे रूळती मौतिक हार, आणि  कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार..” अशा आमच्या भारतमातेच्या ललाटीचे कुंकुम पुसण्याचे धारिष्ट करणाऱ्या अधमांच्या रक्ताचा तिलक या ऑपरेशन-कुंकुम मुळे तिला लागणारआहे!!

आर्मी नेव्ही एअरफोर्स यांचे प्रवक्ते पत्रकार परिषदेत पाकच्या दुष्कृत्यांचे पुरावे देताना.

    परवा झालेल्या एका पत्रकार परिषदेत भारताने सर्व पुरावे देऊन निर्विवादपणे दाखवून दिले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर चा विजेता भारत आहे.तीन दिवसांतील  पहिल्या दिवशी आम्ही पाकिस्तान मधील दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प उध्वस्त केले आणि तिसऱ्या दिवशी फक्त नव्वद मिनिटांमध्ये पाकिस्तानच्या 11 एअर फोर्स बेसेस वर यशस्वी हल्ले केले. त्यातील एका एअर बेसवर पाकिस्तानचे अणुयुद्धाचे कमांड सेंटर होते. भारताने हल्ला चढविला त्याच वेळेला पाकिस्तानच्या या भागात भूकंपाचा जोरदार धक्काही बसला.त्यामुळे भारताने नकळत पाकिस्तानच्या ‘न्यूक्लिअर स्टॉक पाईल’वर तर हल्ला केला नाही ना ,अशी शंका येते?या हल्ल्यानंतरच अतिशय जलद गतीने चक्रे फिरली आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्यासाठी अमेरिकेची मदत मागितली. शस्त्रसंधी झाला. नक्की काय झाले ते अजून गुलदस्त्यातच आहे?

   या शस्त्र-संधीमुळे काही नाखूष होते.

  “ युद्ध सुरू केलेच आहे तर पाकिस्तानला संपवून टाका; पी ओ के ताब्यात घ्या आणि मग युद्ध थांबवा…”

 असे त्यांचे म्हणणे.  काहीनी, 

“युद्ध थांबले, बरे झाले. यापुढे युद्ध नको. हा देश बुद्धाचा आहे युद्धाचा नाही..”,  अशी टिप्पणी केली.

     युद्धामुळे नरसंहार होतो, उद्योगधंदे नष्ट होतात, अर्थव्यवस्था बिघडते व वातावरणाचा समतोल जातो हे सर्व खरे असले तरी शेवटी  राष्ट्राच्या अस्तित्वाचा व अस्मितेचा प्रश्न येतो तेव्हा  शत्रूचा नि:पात करणे हाच एकमेव पर्याय असतो. हा देश जसा बुद्धांचा तसाच राम-कृष्ण आणि शिवाजीं महाराजांचाही  आहे, हेही  विसरता कामा नये !!

  लोक सर्व बाजूंनी बोलणार .काही नतद्रष्ट  तर या राष्ट्रीय आपत्तीच्या प्रसंगी देखील  राजकारण करून आपली पोळी  भाजूनघेणार? .त्यांना देशहित लोकहित याचे काहीही देणे घेणे नाही. बाहेरील शत्रूपेक्षा हा देशांतर्गत शत्रूच भारताला जास्त डोकेदुखी ठरतो आहे.

 सच्चा देशभक्त सामान्य भारतीय माणूस आहे.तो या लबाड लांडग्यांना बरोबर ओळखतो. अशा राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रसंगी आपले राजकीय व सामाजिक मतभेद  बाजूला सारून देशाच्या नेतृत्वा मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे,देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचे मनोबल खच्ची होईल असे काहीही न करणे हे भारतीय नागरिक बरोबर ओळखतो.  कधी ,शांततेकडे नेणारा एकमेव मार्ग म्हणजे युद्धच असते. इतिहास नेहमी जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो ,याची त्याला जाणीव आहे.

 सुदैवाने भारतीय नागरिक आज देशाच्या नेतृत्वा बरोबर असून आपल्या सैन्याचा त्याला भरोसा आहे. आमच्या वीर जवानांचे शौर्य त्याने मागेही पाहिले व आताही अनुभवत आहे भारतीय वीरांच्या विजयाचे पुरावे तो कधी मागत नाही! तो एवढेच म्हणतो ,

“जय जवान!”

   या ऑपरेशन-सिंदुरच्या केवळ तीन दिवसाच्या संग्रामात एक गोष्ट संपूर्ण जगाला दिसून आली.  शस्त्रास्त्रांच्या जागतिक बाजारावर प्रभुत्व असलेल्या अमेरिका नाटो व चीन या महासत्ता हादरल्या आहेत .

    शत्रूचे द्रोण व रॉकेटस् चा अचूक वेध घेणारी “आकाशतीर” प्रणाली.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केवळ दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले नाही, तर स्वदेशी संरक्षण क्षमतेचा प्रभावी वापर करत जगाला तांत्रिक प्रगती आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडविले. या कारवाईत भारतीय लष्कराने प्रगत हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीने लष्करी तळ, धोरणात्मक स्थळे आणि नागरी ठिकाणांचे यशस्वीरित्या संरक्षण केले.

८ मे रोजी पाकिस्तानने जम्मू, अमृतसर, पठाणकोट आणि जैसलमेरसारख्या शहरांना लक्ष्य करत ड्रोन स्वार्मद्वारे हल्ला चढवला. परंतु भारताच्या जागरूक आणि सज्ज हवाई संरक्षण यंत्रणेमुळे हे सर्व हल्ले निष्फळ ठरले.

पाकिस्तानी हल्ल्यांना रोखण्यासाठी भारताने रशियन बनावटीच्या S-400 सुदर्शन चक्र प्रणाली बरोबरच आपली स्वदेशी विकसित आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली वापरली. पश्चिम सीमेवर तैनात करण्यात आलेल्या आकाशतीर प्रणालीने आकाशात अभेद्य सुरक्षा कवच उभारले होते. विविध रडार स्रोतांमधून माहिती संकलित करून, आकाशतीर प्रणालीने प्रत्येक क्षेपणास्त्राना अचूक लक्ष्य करून नेस्तनाबूद केले.

 Bharat Electronics Limited (BEL) ने विकसित केलेली आकाशतीर प्रणाली ही एक अत्याधुनिक एअर डिफेन्स कंट्रोल अँड रिपोर्टिंग सिस्टीम (ADCRS) आहे. २०२४ पासून टप्प्याटप्प्याने लष्करात या प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. ही प्रणाली सीमावर्ती आणि रणांगण क्षेत्रातील कमी उंचीवरील हवाई हल्ल्यांवर लक्ष ठेवते, आणि विविध ग्राउंड रडार्सकडून मिळणारा डेटा एकत्र करून स्वयंचलित पद्धतीने निर्णय घेते. आकाशतीर प्रणालीच्या यशस्वी वापरामुळे भारताने केवळ युद्धभूमीवर वर्चस्व सिद्ध केले नाही, तर संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकले आहे. हा उपक्रम ‘मेक इन इंडिया’ धोरणाचे उत्तम उदाहरण ठरतो आहे.

    100% भारतीय बनावटीची यंत्रणा, ‘आकाशतीर’, ! ही यंत्रणा संरक्षण आणि आक्रमण दोन्हीसाठी अचूक लक्ष्यभेद करू शकते. हिच्या जबरदस्त कामगिरीमुळे शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेत महासत्तासमोर  भारताच्या रूपाने एक तगडा स्पर्धक उभा ठआहे. 

   या यंत्रणेचं वैशिष्ट्य म्हणजे हिचं तंत्रज्ञान, उत्पादन, सुटे भाग, कार्य-नियंत्रण प्रणाली या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ISRO, DRDO आणि BEL या सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी पेलली आहे. इस्रोच्या कार्टोसॅट  व रिसॅट या उपग्रहांच्या लाईव्ह फीडचा वापर करणारी ही यंत्रणा, ‘नाविक’ या भारतीय जीपीएस प्रणालीच्या सहाय्याने अचूक लक्ष्यभेद करते. भौगोलिक आणि हवामानविषयक माहिती, शत्रूच्या रडारचे सिग्नल्स, सॅटेलाईट इमेजरी या सगळ्या माहितीचे AI च्या सहाय्याने क्षणार्धात विश्लेषण करून ही प्रणाली आपले कार्य प्रभावीपणे पार पाडते. या यंत्रणेमुळे ‘नेक्स्ट जेन’ तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्र निर्मिती करण्याची आपली क्षमता भारताने निर्विवादपणे सिद्ध केली आहे. थोड्या दिवसात भारत या संरक्षण प्रणालीचा एक मोठा निर्यातदार म्हणूनही जगापुढे येणार आहे.

   “भारत AI तंत्रज्ञानात मागे आहे… चीनचे ड्रोन तंत्रज्ञान श्रेष्ठ आहे… भारताकडे मात्र ड्रोन तंत्रज्ञानच नाही…” इ. इ. बाष्कळ बडबड करणारे काही पप्पु व त्यांचे पप्पू-पूजक चेले हे या मगिरीमुळे अधिकच हास्यास्पद ठरले आहेतदेखील या ऑपरेशन सिंदूर चा मोठा फायदा म्हणावा लागेल!!

“मेक इन इंडिया”, चे प्रणेते भारताचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी.

   10 मे पासून भारताने आपल्या मित्र देशांच्या सल्ल्याचा मान राखून शस्त्रसंधी केली आहे. मात्र तरीही पाकिस्तानकडून  सीमेवर काही आगळीका  केल्या जात आहेत.भारताने पाकिस्तानला इशारा देताना म्हटले आहे ,

  “यापुढे जर पाकिस्तानने एक देश म्हणून अथवा दहशतवाद्या मार्फत काही कारवाया केल्या  त्याची शिक्षा म्हणून कदाचित पाकिस्तानचे अस्तित्वच धोक्यात येईल हे पाकिस्तानने ध्यानात  ठेवावे. “ 

पाकिस्तान याची योग्य ती नोंद घेईल व आपले वर्तन सुधारेल अशी आपण अपेक्षा करूया ..परंतु शेवटी काही सांगता येत नाही. कारण, जित्याची खोड…!

 ऑपरेशन-सिंदूरमधील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराला पहेलगाम हल्ल्यातील पाच प्रमुख दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. हे ऑपरेशन सिंदूरचे सर्वात मोठे यश मानले जाते. यातील अनेक दहशतवाद्यांना अमेरिकेनेही लक्ष्य केले होते. असेही म्हटले जात आहे की, ‘अमेरिकेने जे करण्यात अपयशी ठरले ते भारताने केले आहे’!!

   भारत-पाकिस्तानने शस्त्रसंधीला मान्यता दिल्यानंतरही केवळ तीन तासांत रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील सीमाभागातील अनेक शहरे आणि गावांवर पाकिस्तानाने हल्ले केले. भारताने त्याला चोख प्रत्युत्तर देऊन ते परतवून लावले. भारताने आपल्या लष्कराला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पाकिस्तानचे हल्ले थांबले. मात्र, शस्त्रसंधी मोडून पाकिस्तानने विश्वासघात केल्याची भारताची भावना झाली आहे. काही दिवसापूर्वीचा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत युद्धबंदीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. भारतीय पंतप्रधानांनी त्यानंतर म्हटले आहे

  “पाकिस्तानने आम्हाला ॲटम बॉम्ब ची धमकी देऊन ब्लॅकमेल करू नये.यापुढे त्यांनी वा त्यांच्या साथीदारांनी भारताची काहीही आगळीक केली तर,कोठे कसे व कधी युद्ध करावयाचे हा भारताचा निर्णय असेल !!”

 मला वाटते यापेक्षा जास्त स्पष्ट शब्दात कोणत्या ही देशाचा पंतप्रधान आपल्या शत्रू राष्ट्राला  इशारा देऊ शकत नाही!

समझनेवालों को इशारा ही काफी होता है! पण, इशारा समझने वाला भी ऊतना होशियार चाहिये..

   भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्य दलांनी  संयुक्त पत्रकार परिषद घेतली व त्यात ऑपरेशन सिंदूर बद्दल सविस्तर माहिती दिली. पाकिस्तानच्या कारनाम्यांचे स्पष्ट पुरावे ही दिले.  पत्रकारांना सांगण्यात आले की;

“पाकिस्तानने युद्धबंदी तोडल्यास जोरदार प्रत्युत्तर मिळेल .तिथून गोळी आली तर येथून गोळा फेकला जाईल!”

    जम्मू-काश्मीर पोलिसांनी सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी परतण्याची घाई न करण्याचे आणि सुरक्षित ठिकाणीच राहण्याचे आवाहन केले आहे.  जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आवाहन केले की, जोपर्यंत परिसराची सफाई केली जात नाही आणि स्फोट न झालेले तोफगोळे काढून टाकले जात नाहीत तोपर्यंत लोकांनी त्यांच्या घरी परतू नये.

   पहलगाम हल्ल्याच्या दिवसापासून कालपर्यंत पाकिस्तानच्या गोळीबारात आमचे 5 सैनिक हुतात्मे झाले आहेत. 25 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जण

जखमी झाले आहेत. भारतीय हवाई दलाने  म्हटले की,

  “हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकपणे आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टाला सुसंगत राहून हे ऑपरेशन विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पार पाडले. हे ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने याबाबत योग्यवेळी सविस्तर माहिती दिली जाईल. नागरिकांनी खोटी आणि चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून तसेच खोटी माहिती पसराविणार्‍या पासून दूर राहावे.”

   संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक पुढील काही दिवसात  होणार आहे. या परिषदेसाठी भारत आपले पथक पाठविणार आहे. हे पथक पाकिस्तानच्या दशहतवाद्याचे पुरावे UNO त सादर करून पाकचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगाला दाखवून देणार  आहे. त्यानंतर जगातून मिळणारा प्रतिसाद ,पाकिस्तानची चाल, व भारतीयांची एकजूट यावर पुढची कारवाई काय करावी  हे देशाचे नेतृत्व ठरवेल. 

  या अग्निपरीक्षेतून एक नवा भारतही उदयाला येतो आहे. आत्मनिर्भर व शत्रुने आगळीक केली तर त्याच्या घरात घुसून त्याला ठेचणारा भारत!!

   मला तरी वाटते ऑपरेशन सिंदूर संपलेले नसून अजून फक्त ऑपरेशनच्या आधी दिला जाणारा ‘अनॅस्थेशिया’ दिला गेला आहे.मुख्य ऑपरेशन तर अजून बाकी आहे. लवकरच तेही पूर्ण होवो . भारता बरोबरच संपूर्ण जग या दहशतवाद्यांच्या अतिरेकी त्रासातून कायमचे मुक्त होवो.. 

    शांती समृद्धी समाधान व ज्ञान सर्व जगभर कायमस्वरूपी नांदो, आणि भुता परस्परे जडो मैत्र जिवांचे ..अशी ज्ञानदेवांच्या पसायदानातील प्रार्थना करून हा लेख संपवतो.

13 मे 2025.