एक जबरदस्त अनुभव, भूतान-दौरा!
अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं सुरक्षितं, दैवहतम् विनश्यति|
जीवत्यनाथोपि वनेअपिरक्षितः, कृतप्रयत्नो अपि गृहे विनश्यति ||
ज्याला कोणाचेच रक्षण नाही त्याचे रक्षण दैव करते. मात्र जो आपल्याला खूप सुरक्षित समजतो, दुर्दैवाने त्याचाच नाश होतो!
“एक असहाय्य दुर्बल माणूस, नशीब बलवत्तर असेल तर घनदाट जंगलातही वाघ सिंहापासून सुरक्षित राहू शकेल. मात्र रक्षकांनी वेढलेला राजाही, नशिबाची साथ नसेल तर अरण्यात गायब होऊ शकतो” असे हे सुभाषित सांगते.
थोडक्यात काय तर माणसाला नशीबाची साथ पाहिजे, तो कोणत्याही संकटातून पार पडतो. मात्र ती साथ नसली तर त्याची कंबख्ती भरली म्हणून समजा!! कर्तृत्वाबरोबर नशिबाची साथही यशस्वी आयुष्यासाठी आवश्यक असते.
वरील संस्कृत सुभाषित आठवण्याचे सुमारे 25 वर्षांपूर्वी आम्ही केलेला भूतान देशाचा दौरा. आम्ही म्हणजे मी व माझे कंपनीतील सहकारी श्री महेश. अत्यंत उत्सुकतेने या प्रवासाची आम्ही तयारी केली होती. जाताना कोणताच अडथळा आला नाही. मात्र येताना ज्या संकटांच्या मालिका एका मागोमागे दुसरी, तिसरी अशा उभ्या ठाकल्या व “आता आपले खरे नाही,” अशी निर्वाणीची भावनाही काही वेळा निर्माण झाली, तेव्हां, केवळ बलवत्तर दैवाच्या साथीने त्या सर्व कसोट्यांतून बाहेर आलो. त्या थरारक भूतान प्रवासाचा हा प्रत्यक्ष लेखाजोगा!!
भारताच्या उत्तरेला हिमालयाच्या कुशीत बसलेले,अजूनही राजेशाही जपणारे हे छोटेसे राज्य. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेले व उंच सखल टेकड्या मधून जेमतेम आठ लाखाची लोकवस्ती असलेले हे चिमुकले राज्य. सबंध जगात एक वैशिष्ट्यपूर्ण असा हा देश ,कारण येथे पाश्चिमात्य संस्कृतीचा अजूनही स्पर्श झालेला नाही. बौद्ध धर्मीय लोक अजूनही पारंपारिक जुनेच रितिरिवाज पाळतात. अनेक प्राचीन मठ व बौद्ध भिख्खू यांचा निवास येथे आहे. अजूनही त्या जुन्या मठात कोणास प्रवेश नसल्याने,अनेक चमत्कारिक व अद्भुत कथां तेथे चर्चिल्या जातात. विशेष म्हणजे,”प्रति मानसी उत्पन्न”,(Per Capita Income) या निकषा ऐवजी,प्रति मानसी आनंद”, ((Per Capita Happiness),या मोजमापाने, देशाची दौलत व ऐश्वर्य मोजणारे हे आशियातले, पहिल्या नंबरचे, सर्वात आनंदी व जगातले सातव्या नंबरचे आनंदी राष्ट्र!!
उत्तरेकडील नेपाळ, बांगलादेश या देशांत हातपाय पसरल्यावर भूतान मध्येही आपण व्यापाराची संधी का घेऊ नये, या विचाराने आमच्या हिंदुस्तान पेट्रोलियमच्या व्यवस्थापनाने भूतान दौरा करण्यास, नेहमीप्रमाणे मला व सहकारी श्री महेश दामले यांना संधी दिली. या देशात आमचे प्रॉडक्ट्स पाठविणे तेवढे सोपे का नाही याची आम्हाला कल्पना होती. कारण भारताची सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी” इंडियन ऑइल कार्पोरेशन”, त्या देशात भक्कमपणे आपले पाय रोऊन उभी आहे व त्यांचा पुरवठा, सीमेलगत असलेल्या त्यांच्या फॅक्टरीतून होत असल्याने, दळणवळण खर्च निश्चितच कमी होतो. मात्र आमचाही कारखाना बांगलादेशमध्ये थोड्याच अवधीत तयार होत असल्याने, आम्हालाही ती संधी घेण्यास वाव होता. त्या दृष्टीने ही चाचपणी करावयाची होती.व्यापारा संबंधात प्रबंध करण्यासाठी,नेहमीचा शिरस्ता,जाहिराती देणे, अर्जमागविणे, उमेदवारांच्या मुलाखती,इत्यादी करण्याची गरज नव्हती. कारण,” भूतान ऑइल कार्पोरेशन”, ही देशाची एकमेव राष्ट्रीय कंपनी, भूतानराजघराण्याच्या मालकीची असून केवळ त्यांची मुलाखतीसाठी परवानगी मिळविणे व त्यांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष भेटून त्यांना आमचा आराखडा सादर करणे, हेच काम होते. त्याबाबतीत आम्ही त्यांच्याशी सरळ संपर्क केला. आमच्या कलकत्ता येथील प्रादेशिक कार्यालयानेही त्यात मदत केली. भूतान ऑइल कार्पोरेशन कडून सकारात्मक प्रतिसाद आल्यानंतर, तेथे जाऊन चर्चा करण्याचे ठरले. कलकत्ता ऑफिसमधील प्रबंधक ही आमचे बरोबर भूतान मध्ये हजर होणार होते.
चर्चेसाठी मुख्य तीन मुद्द्यावर आम्हास टिपण करावयाचे होते.एक,आम्ही कोणते प्रॉडक्ट्स भूतान ऑइल ला देऊ शकतो. दोन, हे प्रोडक्स कोणत्या मार्गाने भूतान मध्ये येणार. नंबर तीन इंडियन ऑइल पेक्षा आमचे प्रॉडक्ट्स,गुणवत्ता व दर या तुलनेत कसे आहेत?
या तिन्ही गोष्टीचा साकल्याने विचार करून, भूतान ऑइल, “आम्हास बिजनेस द्यावयाचा की नाही, व द्यावयाचा असेल तर तो किती”,हे ठरविणार होते?.
भूतान ऑईल कडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्यानंतर,आमचे जाण्याचे तपशील ठरू लागले. मुंबई ते थिंपू,(भूतानची राजधानी व भूतान ऑइल कार्पोरेशनचे मुख्यालय) प्रवास दोन प्रकारे करता येतो. एक, मुंबई -दिल्ली व दिल्ली-पारो( भूतान मधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ) व पुढे पारो- थिंपू कारने.
दुसरा, मुंबई-कलकत्ता-बागडोग्रा विमानाने, पुढे बागडोग्रा ते थिंपू कार ने,असे दोन मार्ग आमच्या विचारार्थ होते .
आम्ही मुंबई- दिल्ली-पारो,पारो-थिंपू,व तसेच परत , अशा प्रवासास प्राधान्य दिले.
असा प्रवास मार्ग आम्ही खूप विचारांती व आमच्या कलकत्ता रिजनल ऑफिस मधील सहकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार ठरविला. कारण बागडोग्रा-थिंपू हा कार ने करावयाचा प्रवास,खूप लांबचा, वेळ खाणारा ,व मुख्य म्हणजे धोकादायक होता.
दिल्ली-पारो विमान प्रवासाचे बाबतीत,एक तर तिकिटाची कमतरता व दुसरे म्हणजे तिकीट मिळाले तरी विमान नक्की ऊडेलच याची शाश्वती नाही.
तरी देखील आम्ही तो मार्ग निवडण्याचे कारण , या प्रवासात नयनरम्य हिमालयीन शिखरांचे ,विशेषतः सर्वोच्च एव्हरेस्ट शिखराचे दर्शन विमानातून होते.
डोंगराच्या कुशीत लपलेल्या अद्भुत पारो विमानतळाचा इथे फोटो दिला आहे
आम्हाला मुंबई-दिल्ली विमान तिकिटे सहज मिळाली मात्र त्याच दिवशीची कनेक्टिंग दिल्ली-पारो (ड्रक एअरलाइन्स ),तिकिटे मिळेनात. शेवटी, ‘वेटिंगलिस्ट’, चे तिकीट घेऊन आम्ही दिल्ली विमानतळावर हजर झालो. शेवटच्या घटकेपर्यंत तिकीटे पक्की(Confirm) होईनात. शेवटच्या घटकेला आमचे तिकीट पक्के झाल्याचे कळले व विमान सुटण्याच्या काही मिनिटे अगोदर आम्ही विमानात जाऊन बसलो. ही ” ड्रक एअरलाइन्स”, भूतान राजघराण्याच्या मालकीचीच होती. तिच्या या ढिसाळ कारभाराची ही फक्त झलक होती, खरा हिसका आम्हाला पुढेच कळणार होता!!
दिल्ली-पारो असा विमान प्रवास करून भूतानला जाणे हे माझे खूप दिवसाचे स्वप्न होते.कारण हा प्रवास केवळ अद्वितीय,एकमेव असा आहे.या प्रवासात नगाधिराज हिमालयाच्या माउंट एवरेस्ट या शिखराचे आकाशातून दर्शन घेता येते. पारो विमानतळ जगातील एक अत्यंत धोकेबाज विमानतळ गणला जातो.या विमानतळावर विमान उतरविण्यासाठी,जगातील फार थोड्या वैमानिकांना परवानगी आहे, कारण सुमारे सात हजार फूट उंचीवर असलेला ह्या विमानतळा चे बाजूला, सुमारे 18000 फूट उंचीची भव्य पर्वत शिखरे आहेत. लँडिंग करताना , विमानतळ अगदी थोड्या अतरावर येईपर्यंत, वरून वैमानिकाला धावपट्टी दिसतच नाही. विमानाचे पंख दोन्ही बाजूच्या उंच डोंगरकड्यांना लागू नये याची जबरदस्त काळजी घ्यावी लागते. लँडिंग साठी कोणतीच आधुनिक यांत्रिक व्यवस्था येथे उपयोगी नाही. केवळ वैमानिकाचे कौशल्य व त्यादिवशी मिळणारी, लहरी हवामानाची साथ,यावर,”हॅप्पी लँडिंग”, अवलंबून असते!
भारतातील व जगातील अनेक विमानतळावर मी उतरलो असलो, तरी पारो विमानतळावरील लँडिंग हा एक थरार होता व तो मला अनुभवयाचा होता! एक स्वप्न,साकार होण्याचा क्षण आला होता!!
विमाना सुटल्या सुटल्याच वैमानिकानेे दोन सूचना स्पष्टपणे दिल्या. एक तर सर्वांनी पट्टे नीट बांधून ठेवा.शिखरांचे दर्शन घेण्यासाठी आपली जागा सोडू नये. दोन ,दोन्ही बाजूकडील प्रवाशांना व्यवस्थित शिखर दर्शन देण्यासाठी, विमान दोन घिरट्या शिखरांभोवती घेईल. हे खूप महत्त्वाचे होते. कारण ऊत्साहाच्या भरात काही प्रवासी आपली जागा सोडून, विरुद्ध बाजूच्या खिडकीकडे धाव घेतात व विमान छोटे असल्याने, तोल(Equilibrium), सांभाळणे कठीण जाते, गंभीर अपघात होऊ शकतो.
थोड्याच वेळात नगाधिराज हिमालयाची बर्फाच्छादित धवल शिखरांची रांग दिसू लागली. सुदैवाने मी डावीकडेच असल्याने तेथूनच ही सुंदर शोभा मी पाहू शकत होतो.वैमानिकाने त्यांची नावे सांगण्यास सुरुवात केली ..नंदादेवी, धौलागिरी, गौरीशंकर, सागरमाथा,कांचनगंगा,अन्नपूर्णा,वगैरे, मात्र एव्हरेस्ट ची ओळख देण्याची गरज नव्हती.. त्या सर्वांमध्ये उंच, सरळ बाणासारखा आकाशात घुसलेला एक सर्वोच्च डोंगर माथा,म्हणजेच एव्हरेस्ट होते! मी ज्या बाजूच्या खिडकीकडे बसलो होतो सुदैवाने तेथूनच ही सर्व शिखरे प्रथमतः दिसू लागली .. माझी नजर एव्हरेस्टच्या त्या सर्वोच्च टोकावरून हलेच ना … जणू मी विमानात स्वार नसून पृथ्वीच्या त्या सर्वोच्च टोकावर भारताचा तिरंगा घेऊन उभा होतो ..त्या अवर्णनीय आनंदात दंग असतानाच विमानाने फेरी घेत बाजू बदलली.. संध्याकाळीची वेळ असल्याने तांबूस सूर्य किरणे त्या बर्फील्या रजत वर्णावर, सोनेरी रंगाचे सुवर्ण शिंपण करीत होती, विविध रंगांचे उधळण तेथे चालू होते,निळ्याशार पार्श्वभूमीवर, हिमशीखरावर, जणू विधात्याची रंगपंचमी चालू होती.ती किमया पाहून माणूस अंतर्मुख न होता तरच नवल .सर्व विमानात स्तब्ध शांतता होती. त्यावेळी काय दिसले, काय वाटले हे सांगण्यास माझ्याकडे शब्द नाहीत! मात्र वर्णन नाही करता आले तरी त्या दिवशी, जे नयनसुख व आत्मसमाधान मिळाले त्याला कोणती तोड नाही.आयुष्यातून कधीतरीच असे दैवी योग माणसाच्या वाट्याला येतात.
कधीतरी कालिदासाच्या कुमार संभवातील या दोन ओळी मी वाचल्या होत्या व त्या विश्वकवीने दोन ओळीत जे नगाधिराजाचे महात्म्य व वैभव वर्णन केले आहे, तेच सांगून माझ्या भावनांना वाट करून देतो.
अस्त्युत्तरस्याम् दिशीदेवतात्मा, हिमालयो नाम नगाधिराजःl
पूर्वपरौतोयनिधी वगाह्य, स्थितः पृथ्विव्या ईवमानदंडःll
भारत देशाच्या उत्तर दिशेला ,देवतांना आत्मस्वरूप असलेला ,नगाधिराज हिमालय आहे. पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याची व्याप्ती असून दोन्ही बाजूला असलेल्या प्रशांत सागरामध्ये तो अवगाहन करतो.तो पृथ्वीचा मानदंड म्हणून मिरविला जातो…
खरोखरीच त्या दिवशी पर्वतराजाचे अवकाशातून झालेले ते दर्शन अंगावर रोमांच उठवून गेले, भावनांचा कल्लोळ उधळून गेले ,आपोआप हात जोडले गेले, निसर्गाचे कौतुक पाहून डोळेही ओले झाले..
विमानाच्या दोन घिरट्या पूर्ण झाल्या होत्या व विमान पुन्हा पारो ज्या दिशेने मार्गस्थ झाले होते..
अगदी थोड्याच वेळात लँडिंग होणार अशी घोषणा झाली. मात्र पारो विमानतळाचा मागमूस ही विमानातून लागत नव्हता.खाली पाहिले तर केवळ डोंगर आणि दर् या दिसत होत्या .धावपट्टीचा पत्ता नव्हता. विमान उंची सोडून खाली खाली येत असल्याचे जाणवले… आणि अहो आश्चर्य ..उतरायच्या काही मिनिटे आधी,विमान एका डोंगर माथ्याच्या पलीकडे गेल्याबरोबर, पारो विमानतळाचे दर्शन झाले. आता विमान दोन ऊंच डोंगरकड्या मधून असलेल्या दरीतून, पुढे जात होते .एखाद्या छोट्या ,वळणा वळणाच्या नदीतून, हुशार नावाड्याने आपली नाव कौशल्याने वल्हवित न्यावे,त्याप्रमाणे वैमानिक हे छोटे विमान जणू वल्हवीत होता. खरेच ,ऐकल्याप्रमाणे, हे काम अत्यंत जोखमीचे व तेवढेच कौशल्याचेही होते.जराशी चूक आणि विमाना बरोबर प्रवाशांचाही,सोक्षमोक्ष ठरलेला! विमानाने जमिनीला स्पर्श केला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून वैमानिकाच्या
कौशल्याचेअभिनंदनकेले. आभारमानले. एकाआगळा,जगावेगळा ,थरारक विमान प्रवास ,यशस्वीरित्या संपविल्याचे समाधान, प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.. आमच्यासाठी असे अनेक थरार पुढे वाढून ठेवले होते, त्याची कल्पना त्यावेळी आली नाही?
भारतीय प्रवाशांना विजाची गरज नसल्याने, आपला पासपोर्ट अथवा ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून सरळ विमानतळा बाहेर जाता येते.
या पारो विमानतळापासून थिंपू हे राजधानीचे शहर सुमारे 30 किलोमीटरवर असून रस्ते घाटाचे असल्यामुळे दोन तास तरी वेळ लागतो. संध्याकाळ होत आली होती. आम्ही आधीच टॅक्सी ठरविली असल्याने ड्रायव्हरचा शोध घेतला. टॅक्सीने पुढील प्रवासास आरंभ केला.
आमचे हॉटेल थिंपू या राजधानीच्या शहरात नक्की केले होते. तेथे पोहोचावयाचे होते. पारो विमानतळ ते राजधानी थिंपू,हा प्रवास देखील खूप रम्य व नेत्र सुखदायी आहे. आम्ही दिवसभराच्या श्रमाने थकलेलो असून सुद्धा, या प्रवासातील निसर्ग शोभा,डोंगरावरून कोसळणारे छोटे प्रपात, बाजूची सुंदर वनश्री व भूतान च्या प्राचीन इतिहासाचे साक्षीदार जुने बौद्ध मठ, लांबूनच पहात ,प्रवासाचा आनंद घेतला. वेळ कसा गेला ते कळलेही नाही. दोन्ही बाजूला दिसणारी बर्फाच्छादित शिखरे, बटाटे व इतर भाज्यांचे मळे ,तसेच बाजूच्या खेड्यातील गुबगुबीत चेहऱ्याची मुले व गोऱ्या पान रंगाचे,ऊंच,सुदृढ स्त्री-पुरुष पाहताना, या देशाला समृद्ध व आरोग्यदायी निसर्गाने किती महान वरदान दिले आहे याची कल्पना आली.
आमचे थिंपू मधील हॉटेल स्टार हॉटेल नव्हते. एका मध्यम उंचीच्या टेकडीवर ,आणि लता वृक्षांच्या सानिध्यात,आवश्यक तेवढ्या सुखसोयींनी युक्त असे होते. एसी तर नव्हतेच, पंखेही नव्हते. गार झुळझुळ वारा सतत वाहत असल्याने केवळ खिडक्यांवर असणाऱ्या जाळीदार पडद्यांनी आतील हवेचे तापमान सांभाळता येई. टेकडी खालूनच थिम्पू-ची नावाची नदी आपला निळाशार जलस्त्रोत घेऊन शांतपणे वाहत होती. गेल्या गेल्या मी बाहेरील बाल्कनीत बसून हे सर्व निसर्गाचे कौतुक पहात बसलो होतो. हॉटेलचा सेवक चहा, कॉफी विचारण्यासाठी आला तेव्हा भानावर आलो. गरम गरम पाण्याने आंघोळी आटोपून आम्ही दोघांनी सुंदर कॉफीचा आस्वाद घेतला.
संध्याकाळी भोजनाआधी बाजूच्या परिसरांत एक फेरी टाकली .भोजनासाठी हॉटेलमध्ये आलो. संध्याकाळचे भोजनही साधे होते. चपात्या ऐवजी तांदळाच्याच पांढरा शुभ्र भाकऱ्या ,सुंदर दाणेदार तांदळाचा भात, आणि बटाट्याची सुकी भाजी असा साधा बेत होता. बटाटे हे येथील मुख्य पीक असल्याने व या जमिनीला एक विशेष गुण असल्याने येथील बटाट्याची चव दुनियेतल्या इतर बटाट्यापेक्षा वेगळीच आहे! आजही त्या भाजीची चव माझ्या जिभेवर आहे. येथील स्थानिक लोक घराघरात बनविणारी,’भूतान वाईन’ हे एक खास पेय असून त्याचाही आस्वाद घेतला. खरेच ह्या गोष्टी भूतानची खासियत आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या,कलकत्ता रिजनल ऑफिस मधील दोन अधिकारी आमच्या हॉटेलमध्ये येऊन हजर झाले. त्यांचे बरोबर पुढील योजने ची चर्चा करीत असताना,भूतान ऑइल कंपनीचे प्रतिनिधी आम्हास, मुख्य कार्यालयात नेण्यासाठी, त्यांची कार घेऊन आले. त्यांचे बरोबर निघालो. कंपनीचे हे कार्यालय थिंपू या राजधानीच्या शहरात, आमच्या हॉटेलपासून सुमारे तीन किलोमीटरवर होते. तेथे जाऊन त्यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आमची ओळख करून देण्यात आली. त्या नंतर पुढील मुख्य कार्यक्रम ज्यासाठी आम्ही ही भेट आयोजित केली होती, सुरू झाला. कंपनीचे अध्यक्ष, मार्केटिंग,ऑपरेशन्स आर्थिक खात्याचे ,असे सुमारे सहा वरिष्ठ अधिकारी व आम्ही चौघे एवढेच या बैठकीस होते.आम्ही दोघांनी मुख्य कार्यालयातर्फे एक,’प्रेझेंटेशन’ दिले. कोणते प्रॉडक्ट्स एच पी सी देऊ इच्छिते व त्यांचे गुणधर्म(PRODUCTS and PROPERTIES) व सध्या वापरात असलेल्या प्रॉडक्टशी, तौलनीक दृष्ट्या तपशील, (Comparative Studies)या दृष्टीने ही माहिती होती.. आमच्या कलकत्ता मार्केटिंग ऑफिसने ,याच प्रॉडक्टस् चे सध्याचे भाव, ढाका( बांगलादेश), प्लांट सुरू झाल्यानंतर होणारी खर्चाची बचत,(Cost cutting ) याबद्दल विस्तृत निवेदन आपल्या प्रेझेंटेशन मध्ये दिले. प्रश्नोत्तरे झाली. त्यांच्या शंकांचे निरसन झाले. आणि तत्वतः आमच्या प्रस्तावास मान्यता घेऊन हा महत्त्वाचा विषय संपविला.
दुपारचे जेवण त्यांचेच ऑफिसमध्ये घेतले. भोजनानंतर भूतानी कंपनीच्या रिटेल ‘आउटलेट’ म्हणजेच ज्याला पेट्रोल पंप म्हणतात तिथे जाऊन तेथील कामकाज व पद्धतीचे अवलोकन केले. पुन्हा मुख्य कार्यालयात येऊन सकाळी झालेल्या सभेचा वृत्तांत (मिनिट्स) तयार झाले होते, त्यावर दोन्ही बाजूकडील लोकांनी सह्या करून एक महत्त्वाचा दस्तऐवज घेऊन निघालो.
तिसरे दिवशी आमची मुलाखत भुतानचे राजे, जिग्मेदोरजी यांच्याशी होणार होती.ही एक औपचारिक मीटिंग होती. राजे साहेबांना फक्त भारतातून आलेल्या पाहुण्यांचे ओळख करून देणे व काय चर्चा झाली याचा सारांश देणे एवढाच भाग होता. त्यांच्याशी कामासंबंधी चर्चा होणार नव्हती.कलकत्ता ऑफिस मधील मित्रांना काही इतर महत्वाचे काम असल्याने सकाळीच आपल्या वाहनाने ते कलकत्त्याला रवाना झाले होते. आम्ही दोघे भूतान ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर राजे साहेबांच्या भेटीस गेलो. विशेष म्हणजे राजेसाहेब थिंपू पासून सात आठ किलोमीटर दूर असलेल्या एका लहान बंगल्यात, एकांतवासात राहत होते. “मोठ्या प्रसादात त्यांचे वास्तव्य का नाही?”, असे विचारल्यावर हे अधिकारी निःशब्द झाले. हळूच,”आम्हाला त्याबद्दल जास्त बोलता येणार नाही तसेच कृपा करून राजे साहेबांसमोर हा विषय काढू नका”, अशी सूचनाही केली गेली. ‘त’ वरून ताकभात’आम्ही ओळखला! राजे साहेबांच्या सुमारे चार की पाच राण्या असून त्यांचे आपापसात वाद व सर्वांचे राजे साहेबा बरोबर वाद,असे मोठे गुंतागुंतीचे राजकारण तेथे होते.या सगळ्या वादावादीला कंटाळून महाराज निवांतपणे एकटे राहत होते, असे नंतर कळले.
राजा असो अथवा रंक, शेवटी ‘नारीशक्ति’चा सन्मान प्रत्येकालाच करावा लागतो, तो नाही केला तर असा एकांतवास पदरी येतो, हाच सुखी संसाराचा साधा, सरळ नियम आहे. म्हटले आहे ना, “यत्रनार्ऱ्यस्तु पूज्यन्ते, रमंते तत्रदेवता”
काय दैव दुर्विलास ?ज्या भव्य प्रसादात राज नरेशांच्या अनेक पिढ्यांनी वास्तव्य केले व विलास उपभोगिले तो आता राजवाडा राहिला नसून केवळ “राणीवाडा”, झालेला असावा हा कालमहिमा! राजे साहेबांबरोबरील मिटींग दहा मिनिटात आटोपली.नमस्कार चमत्कार झाले व आम्ही परत निघालो. दुपारची वेळ आम्हाला फिरण्यासाठी, रिकामी होती . हॉटेलवर जाऊन विश्रांती घेण्यापेक्षा थोडे निसर्गदर्शन करण्याचे ठरविले.
थिंपू शहराबाहेर असलेल्या,’डोचुला पास’, या खिंडी च्या आजूबाजूचा प्रदेश पाहिला. येथून हिमालया पर्वत शिखरांचे दर्शन तर होतेच पण दरीमध्ये विविध प्रकारच्या सुगंधी फुलांची शोभा व त्यांच्या गंधाने मन प्रसन्न होते. विविध पक्षांची किलबिल कानावर येते. तेथील एकंदरीत वातावरण अतिशय चित्तवृत्ती प्रसन्न करणारे, निसर्गाचे एक वेगळे रूप पहावयास मिळते .या ‘डोचुला पास’,जवळच पाईन व सेडार वृक्षाची जंगले ही आहेत. पृथ्वीच्या पाठीवरील हा एक अत्यंत आगळा प्रदेश आहे याची जाणीव होते. पुढे मी स्वित्झर्लंड हा, पृथ्वीवरील नंदनवन समजला गेलेला, देश पाहिला. मात्र,”घर की मुर्गी दाल बराबर”, या म्हणीनुसार आपल्या शेजारच्या या देशाच्या सौंदर्याची कल्पना अजून जगाला नाही,याचे वाईटही वाटले व आनंदही झाला! आनंद अशासाठी की जोपर्यंत जगातील पर्यटकांची टोळधाड येथे येत नाही, तोपर्यंत या सौंदर्याचे निश्चितच रक्षण होईल. एकदा का येथे पर्यटका च्या झुंडी येऊ लागल्या की हे निसर्गदत्त सौंदर्य लोप होऊ लागेल. आफ्रिकेच्या जंगलात फिरताना जे विचार मनात आले तेच विचार येथेही येतात..”यांत्रिक प्रगती हवी तर निसर्गाचा प्रकोप ओढऊन घ्या, निसर्गाचे प्रेम हवे तर यंत्रांना दूर ठेवा…”
अर्थातच आमच्याकडे जास्त वेळ नव्हता, त्यामुळे आम्ही थिंपू ही व्यवस्थित पाहू शकलो नाही.संध्याकाळी येऊन हॉटेलवरच भोजन घेतले. सिक्कीम वाईन चा आस्वाद घेतला.उद्या निघण्याच्या ईराद्याने, सर्व हिशोब-किताब पुरे करून, सामानाची बांधा बांध करून ठेवली .आता उद्या सकाळी पुन्हा पारो विमानतळ गाठून पारो- दिल्ली विमान पकडावयाचे होते. मनातल्या या इराद्यांना,’नियतीचे वेगळे संकेत’, कळले नव्हते….
थिंपू,भूतान सोडण्याचा चौथा दिवस उजाडला. मात्र आमचे पारो-दिल्ली विमान तिकीटाचे,कन्फर्मेशन झालेले नव्हते.चिंतेत होतो. हवामानान थोडेसे वादळी व ढगाळ वाटत असल्याने,’विमान ऊडेल की नाही’,अशी अशुभ शंका मनात डोकावत होती. ब्रेकफास्ट झाल्या झाल्या सकाळी नऊचे सुमारास हे कन्फर्मेशन झाल्याचे कळले. खूप बरे वाटले. आता पुन्हा एकदा नगाधिराज हिमालय व त्यांच्या रजतशिखरांचे दर्शन होणार, म्हणून मनात मांडे खाऊ लागलो. दुपारी दोन वाजताचे हे विमान पकडण्यासाठी आम्हाला दहा वाजे पर्यंत निघणे जरुरी होते. आम्ही आता निश्चिंत झालो. हाॅटेल मार्फत टॅक्सीचा बंदोबस्त ही केला. ..पण हाय रे दैवा….निघण्याच्या थोडे आधी, विमान कंपनीकडून दुसरा निरोप आला… “आज खराब हवामान असल्याने, आजचे पारो- दिल्ली विमान रद्द झालेले आहे विमान कंपनीच्या कार्यालयात जाऊन आपल्या रद्द झालेल्या तिकीटाचे पैसे घेणे.” ..आमचे निघण्याचे पुनश्च,हिमशीखरे दर्शनाचे सर्व मनसुबे भुई सपाट झाले होते. पुढची सर्व संकटमालिका, डोळ्यासमोर येत होती. आता काय करावे? बरे दुसऱ्या दिवशीही विमान नक्की मिळेल, हवामान चांगले असेल, याचीही खात्री नव्हती. आमच्या भूतानी मित्रांना आम्ही विचारले, सल्ला घेतला. त्यांचे म्हणणे “तुम्ही लवकरात लवकर, येथून एक टॅक्सी पकडून, भारतात परत जावे. सुमारे आठ तासाचा, टॅक्सीने ,रोड प्रवास केल्यानंतर तुम्ही भारताच्या सीमेवर पोचू शकता. रात्री तेथेच मुक्काम करून, दुसऱ्या दिवशी सकाळी तेथून निघून, बागडोग्रा-कलकत्ता विमान मिळू शकते”.
आम्हाला लवकरात लवकर निघणे आवश्यक होते कारण आठ तासाच्या प्रवासामुळे शक्यतोवर रात्र होण्याचे आधी मुक्कामावर पोहोचणे ठीक झाले असते पूर्वेकडील भागात अंधार साधारणतः चार वाजताच पडू लागतो त्यात पावसाळी दिवस व वाट दुर्गम घाटांची असल्यामुळे कधीही भूस्खलन होऊन रस्ते बंद होण्याचीही शक्यता खूप असते.हे सर्व लक्षात घेऊन आम्ही शक्यतोवर लवकर निघण्याचे प्रयत्न केले. मात्र तिकिटाचे रिफंड मिळवण्यासाठी विमान कंपनीच्या ऑफिसात जाऊन ते काम करणे योग्य त्या टॅक्सी ची निवड करणे, भोजन, करताना दुपारी एक वाजला.आम्ही थिंपू चा निरोप घेतला,तो, मनात शंका- कुशंकांचे काहूर घेऊनच..
कोणताही टॅक्सीवाला येथे भूतान-भारत प्रवासासाठी चालत नाही. दिल्ली-पारो विमान चालविण्यासाठी जसे खास वैमानिक असतात, तसेच या प्रवासासाठी ही खास टॅक्सी वाले आहेत.एका बाजूस खोल दरी दुसऱ्या बाजूस उंच पर्वत आणि मधील चिंचोळ्या, वळणा वळणाच्या निसरड्या रस्त्यावरून गाडी चालवावी लागते. जेमतेम दोन गाड्या जाऊ शकणाऱ्या या रस्त्यावरून, समोरून येणाऱ्या मिलिटरीच्या गाड्यांना रस्ता करून देताना, टॅक्सी दरीच्या बाजूने ,व ट्रक डोंगराच्या बाजूने उभे करण्याचा शिरस्ता आहे. हे करतानाच बहुतेक अपघात होत असतात.येथे फक्त मारुती-व्हॅन याच गाड्या प्रवासात विशेष करून उपयोगात येतात. बाराशे रुपयात एक टॅक्सी ठरविली. हे गृहस्थ आम्हास भारताच्या सीमेवरील गावात सोडणार होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे रात्री 10 पर्यंत मुक्कामावर पोहोचू शकणार होतो. ठरलेले बाराशे रुपयाचे भाडे त्यांनी आमच्याकडून प्रथम घेऊन ठेवले,आम्हालाही त्यात काही वावगे वाटले नाही!
हाच तो अत्यंत धोकादायक,थिंपू-भारत सीमा, दुर्गम, घाट रस्ता.
टॅक्सी निघाली. त्या आधी आम्ही आमच्या कलकत्ता विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून ,आमचे पारो- दिल्ली विमान रद्द झाले असून, आम्ही बागडोगऱ्यास आज रात्री दहा पर्यंत पोहोचू.त्या दृष्टीने बागलोगरा-कलकत्ता व कलकत्ता-मुंबई अशी सकाळची, विमान तिकिटे काढण्याची विनंती केली होती. खरे तर आता आठ तास निवांतपणे बसून प्रवासाचा मजा घेण्यास काहीच हरकत नव्हती.मात्र ‘आतला आवाज’ कुठेतरी…पुढच्या खडतर प्रवासाची.. बिकट प्रसंगांची.. जाणीव करून देत होता.., एवढे खरे!!
थिंपू शहरा पर्यंतचा सुमारे दोन तासाचा प्रवास व्यवस्थित झाला. पुढे 3.0वा चे सुमारास आम्ही घाटावर आलो व अवघड प्रवास सुरू झाला. थोडा थोडा अंधारही जाणवू लागला. रस्त्यावरील एका गावात बरीच गर्दी जमलेली दिसली. मंडळींनी रस्ता अडविल्यामुळे गाडी थांबवावी लागली. कारण विचारले असता,”एक मोठा अपघात होऊन, भारतातून येत असलेला गॅस सिलेंडरचा ट्रक, ड्रायव्हर व क्लीनर सह, आत दरीत पडल्याचे”, सांगण्यात आले. आमच्या ड्रायव्हर बरोबर,आम्हीही टॅक्सीतून खाली उतरलो व दरीमध्ये डोकावण्यास गेलो. आतले भयंकर दृश्य पाहून अंगावर काटाच उभा राहिला. खालच्या खोल अक्राळ विक्राळ दरीतून ,अग्नीच्या ज्वालांचा धूर, व गॅस सिलेंडरच्या स्फोटांचे, कर्णकर्कश आवाज दरीत घुमून,वर येत होते. जळणारा ट्रकही दिसत होता.दोन दुर्दैवी माणसांचा कुठेच पत्ता नव्हता.त्यांचे काय झाले असेल याचा अंदाज बांधता येण्यासारखा होता. सर्वजण फक्त गंमत पहात होते.नाहीतरी,कोणी काय करू शकत होते? आम्ही कसेबसे गाडीत येऊन बसलो.प्रवास सुरू केला. मात्र ते दृश्य डोळ्यासमोरून जात नव्हते. आपण हे अनाठायी धाडस तर करीत नाही आहोत ना, हीच शंका वारंवार सतावत होती? परमेश्वराचे आठवण अशा वेळी होते.त्यालाच मनोमन नमस्कार करून, ‘देवा,आमचा प्रवास सुखाचा होऊ दे’ अशी प्रार्थना केली. आमचा ड्रायव्हर मात्र अगदी शांतपणे,..”ये रस्ते मे ऐसे छोटे बडे हादसे होते ही रहते है.. ” म्हणत निश्चिंतपणे गाडी चालवत होता!
आता संध्याकाळचा अंधुक प्रकाशही नाहीसा झाला होता. दाटअंधार पडला होता. समोरील दोन दिव्यांच्या प्रकाशात,आपला अनुभव व कौशल्याच्या जोरावर ड्रायव्हर गाडी नेत होता.खाली दरीत दिसणारे प्रकाशाचे ठिपके मानवी वस्तीची जाणीव करून देत होते. रस्त्यावर मानवी अस्तित्वाचा गंध नव्हता. ज्या तऱ्हेने गारवारे वाहू लागले होते, थोड्याच वेळात पाऊस येईल असा अंदाजही आला. या अंधारात, पावसात वळणा वळणावरून गाडी नेण्यापेक्षा कुठेतरी आपण थांबूया अशी सूचना आम्ही सारथ्याला केली. त्याच्यासाठी हे रोजचेच असल्याने त्याने आमची विनंती धुडकाउन लावत,वर” आप फिक्र मत करो. यहां कोई रहने लायक गाव भी नही”,म्हणत आपली गाडी पुढे चालू ठेवली.साडेसात चा सुमार झाला असेल. आणि जोरदार पावसालाही सुरुवात झाली. आता गाडीचा वेग ही कमी झाला होता. पुढे मागे ही काही गाड्या असल्याने तेवढ्याच, मानवी अस्तित्व व साथ सोबतीच्या खुणा होत्या,समाधान होते. पुढे जात राहण्याशिवाय गत्यंतर ही नव्हते…
दहा एक मिनिटे तसेच पुढे गेलो असू आणि एकदम… धडाम ..धू..म.. असा काहीतरी कोसळून पडण्याचा आवाज आला.. त्या अंधाऱ्या रात्रीतही, गाड्यांच्या प्रकाशामुळे समोर धुळीचे लोट आकाशात वर जात असलेले दिसले.. आमच्या गाडीच्या पुढे असलेल्या गाड्या उभ्या राहिल्या.. आमची ही गाडी उभी राहिली.. थोड्याच वेळात तेथे गाड्यांची एक भलीमोठी रांग निर्माण झाली.. ड्रायव्हर बाबांनी ती दुष्ट बातमी आम्हाला दिली… “साब ,आगे लँड स्लाईड हुआ है… अभी ट्रॅफिक बंद होगी…. कभी शुरू होगी पता नही…” हे निर्विकारपणे सांगताना,कोणतीच सहानुभूतीची,काळजीची भावना त्याच्या मनात नव्हती,कारण त्याच्यासाठी हे नेहमीचेच होते!! जे आम्हाला नको होते..,ज्याची भीती वाटत होती, तेच घडले होते ..आता दुर्दैवाचा खेळ सुरू होणार होता!!
प्रवास सुरू करताना आमच्या मनात जी अशुभ शंका डोकावत होती, ती आता प्रत्यक्षात उतरली होती.. आता काय करावयाचे.. अंधारी रात्र, घाटातील अनोळखी रस्ता, पाऊस-वाऱ्याचे थैमान..गाडी पुढे जाऊ शकत नाही ,मागे येऊ शकत नाही..ऊजवीकडील डोंगर माथ्यावरून येणारे जोराचे जल-प्रपात.. कोणताही संपर्क संपूर्ण तुटला होता.., जोराचा वारा व पाण्याचा मारा,आम्ही बसलेल्या गाडीलाही डावीकडील दरीत फेकून देतात की काय,अशी भीती आता मनात डोकावू लागली..ड्रायव्हर ही निःशब्द,..आम्ही ही चूप्प..किती वेळ येथे,असे बसणार ?…
आमच्या ड्रायव्हरनेच ती कोंडी फोडली. आता तो ड्रायव्हर नाही, आमचा बॉस झाला होता, सांगेल तसे करणे भाग होते. म्हणाला ,”साब अभी आप दोनो नीचे उतर के, जिस रास्ते से हम आये, वहीरास्ते पे ,आस्ते आस्ते पीछे चलते रहीये. जैसे ही पीछेवाली गाडी हटेगी, मै गाडी लेकर पीछे आता हुं. आप मेरी राह देखो”.”..तुमचे सर्व सामान तर गाडीत ठेवाच पण छत्रीही घेऊ नका, असे सांगावयास तो विसरला नाही. कारण त्या वारा-पावसात छत्री उघडणे म्हणजे, पॅराशुट वरून हवेत तरंगण्यासारखे होते. आम्ही गाडीचा नंबर लिहून घेतला, पैसे व ,’देवाचे नाव’, एवढेचबरोबर घेतले.आमच्या, महत्त्वाची कागदपत्रे,कपडे व काही सामानाने भरलेल्या बॅगा,आम्ही त्याचे हवाली केल्या… कारण आता फक्त ड्रायव्हर वर व देवावर भरोसा होता. देवाने ड्रायव्हरला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना होती. आमच्या हातात काहीच नव्हते. त्या परक्या मुलाखात, निर्जन भागात, भयाण वादळ रात्री, कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसताना जर कोणा नराधमाचे मनात आमच्या मोठ्या सूट केसेस व पैसे पाहून ,राक्षसी वासना निर्माण झाली असती, तर आम्ही काय करू शकणार होतो? तोही विचार मनात आला त्या थंडी पावसातही दरदरून घाम सुटला,, पण ,आम्ही एकच करत होतो.. मनातल्या मनात देवाचा धावा!! नक्कीच, त्यामुळे धीर वाटत होता..!!
ओल्या कपड्यांनीशी रस्त्यावर आलो.हळूहळू मागे चालू लागलो. मागे येणाऱ्या काही गाड्यांच्या प्रकाशामुळे रस्ता थोडाफार दिसत होता म्हणून बरे, नाही तर त्या निसर्ड्या रस्त्यावरून सरळ खाली कोसळण्याची भिती होती .काही अंतर चालून गेल्यावर एका दर्डीपाशी गाडीची वाट पाहत उभे राहिलो. पाऊस कोसळतच होता, अंग भिजले होते, गार वाऱ्यामुळे आता थंडीने कुडकुडणेही सुरू झाले होते. मानवी मनाची मोठी गंमत आहे जेव्हा शरीर कष्ट सोसण्याच्या पलीकडे जाते,तेव्हा मन उभारी घेऊन उठते. म्हणते, “संकटांनो,या,आता जे काही होईल त्याला तोंड देण्यास मी तयार आहे. आता, डर बाळगून तरीकाय होणार?व्हायचे तेच होणार, मग भीती कशाला? जो होगा सो होगा..” मन असे समजावत होते,…. आतला आवाज धीर देत होता..
पाऊस थोडा कमी झाला होता मात्र येतच होता .जोरदार गार वारा थांबत नव्हता. अंधारात,तासभर डोंगराच्या कडेचाआसरा घेत,आम्ही गारठून उभे होतो. आता हळूहळू पुढे गेलेल्या गाड्या मागे जाऊ लागल्या होत्या. तासाभरात आमच्या गाडीचाही प्रकाश दिसला. हात केला, गाडी उभी राहिली. आम्ही आत बसलो.खूप बरे वाटले. ड्रायव्हरला विचारले ,आता काय करायचे? तो म्हणाला थोडे पुढे गेल्यावर खालील दरीतील गावात जाणारा एक रस्ता आहे. त्या रस्त्यावरून पुढे एक ‘रिसोर्ट’, आहे. तिथेच आम्ही ड्रायव्हर लोक विश्रांती घेतो . या परिसरात आता दुसरी कोणतीही व्यवस्था नाही” तेथे काही व्यवस्था होते का बघूया.
अजून पुढे गेल्यास काही चांगली व्यवस्था होईल का तर, “त्यासाठी अजून तासभर पुढे जावे लागेल, मात्र रहदारी कधीही सुरू होईल, ती वेळ आपणास कळणे जरुरीचे आहे. येथे राहिलो तर रस्ता पुन्हा सुरू झाल्यास पटकन निघून जाता येईल”,हा गृहस्थ रात्री, कुठेतरी घेऊन जाणार, त्यापेक्षा या जवळच्या गावातच राहिलेले बरे,जो काही धोका असेल तो पुढील गावातही होता, मात्र रस्ता पुन्हा सुरू झाल्यास,येथून लवकर निघता आले असते.हा फायदा होता. म्हणून त्याचे म्हणणे मान्य केले. त्याचे बरोबर निघालो.
एका बांबूच्या झोपडीसमोर ड्रायव्हरने गाडी उभी केली. “हेच ते रिसॉर्ट”, ड्रायव्हर म्हणाला. बरीच ड्रायव्हर मंडळी आपल्या गाड्या पार्किंग करून,अंगणात टाकलेल्या मंडपात, शेकोट्या करून मद्यपानाचा आस्वाद घेत बसली होती. त्यांचे प्रवाशीही बहुतेक स्थानिकच होते. त्यामुळे त्यांना खोली प्रायव्हसी वगैरेची काही आवश्यकता वाटत नसावी. तेही त्या रंगारंग कार्यक्रमात शामिल झाले होते.
आम्ही गाडीतच बसून होतो. ड्रायव्हरने जाऊन काय रदबदली केली कोणास ठाऊक, मालकीण बाईंनी आम्हाला सामान घेऊन आत बोलाविले.आमची एकूण दशा व रूप पाहून,”आप बंबई के बाबू हो, तो आपको एक अच्छा कमरा, देती हूं,” असे म्हणून ड्रायव्हरला सामान वर नेण्यास सांगून ती परत अंतर्धान पावली. ती एक मध्यमवयीन, तिबेटीयन बाई होती. पैशाची काहीच बोलणी केली नाहीत. तिला माणुसकी असावी. ड्रायव्हरने आमचे सामान पहिल्या मजल्यावर खोलीत आणून टाकले. “आता मी माझ्या राहण्याची व खाण्याची सोय करतो. रस्ता सुरू झाल्याचा भोंगा झाला की मी येथे येतो, काळजी करू नका ..”असे सांगून,आमच्या परवानगीची वाटही न पाहता तो भला माणूस आपली गाडी घेऊन निघूनही गेला,
आमची ‘स्पेशल कमरा’, म्हणजे बांबूच्या चिपांनी तयार केलेल्या भिंती व बांबूच्याच पट्ट्या पासून केलेला सच्छिद्र पृष्ठभाग (Floor) असलेली व सर्वत्र लहान मोठी भोके असल्याने, नैसर्गिक वायुविजन देणारी एक खोली होती .एक बांबूचीच खाट होती. त्यावर एक गोधडी टाकून केलेला बिछाना. दोन फाटक्या उषा, व पांघरण्या साठी दोन कळकट चादर. खाटे लगत विना गजाची खिडकी होती त्याला कापडाचा पडदा हेचं तावदान. या सर्व परिसराला एक कुबट वास येत होता. खिडकीतून पावसाची झड व वारे येत असल्याने खाटेवर बसणेही मुश्किल होते, झोप येणे तर फार पुढची गोष्ट होती! .शेजारील खोलीत काही ड्रायव्हर लोकांचा अड्डा जमला होता.भिंती ही सच्छिद्र असल्याने तेथे दारू पिऊन चाललेला धिंगाणा व पेयाचा तीव्र दर्प येत होता.खाली कोणते तरी मांस भाजण्यासाठी विस्तवाचा जाळ केल्याने त्या अर्धवट जळक्या मांसाचा एक तीव्र दरवळ व त्याचे जोडीला नाका डोळ्यात शिरणारा पांढरा, झोंबरा धूर.. ते सर्व वातावरण व अनेक गंधांचे मिश्रण झाल्यामुळे तयार झालेला एक वेगळाच दर्प, शांतपणे शांतपणे बसून देत नव्हता. नाकाला रुमाल लाऊन आम्ही बसलो होतो..
माझे ठीक होते.मी मांसाहारी असल्याने तो ‘सुवास’, थोडाफार तरी सहन करू शकत होतो. मात्र आमचे मित्र दामले हे संपूर्ण शाकाहारी असल्याने, त्यांना तर ओकारीची भावना मळमळ होऊ लागली . त्यांनी तोंडावर नाकाला रुमाल लावून कसेतरी रोखून धरले.ओले भिजलेले अंग,आमच्याच टॉवेलने पुसून स्वच्छ केले. टॉयलेटची चौकशी केली तर ती व्यवस्थाही झोपडीच्या बाहेर काही अंतरावर, एका उंच अशा कड्याच्या टोकाशी केली होती. दोन फळकुटे, जमिनीत दाटलेल्या बांबूवर बांधून, फक्त समोर फाटक्या कापडाचा आडोसा करून, वर एक गळका पत्रा टाकला होता.बाकी तीन बाजू उघड्या होत्या. तेथे नैसर्गिक विधी करण्यापेक्षा विधी बंद करण्याचीच सोय जास्त होती! चुकून जर तोल गेला व फळकुटे सरकले तर सरळ मागच्या दरीत कपाळमोक्षच व्हायची सोय होती. त्या दुर्दैवी माणसाचा घाण भरलेल्या खोल दरीत ,शोध घेणे ही शक्य नव्हते. परत खोलीत आलो व काय करावे याचा विचार करीत बसलो!! .
माझे मित्र दामले यांना डायबिटीस व्याधी असल्याने व सकाळच्या नाश्त्यानंतर आम्ही काहीच खाल्लेले नसल्याने त्यांची रक्तातील शुगर-लेव्हलही कमी होऊ लागली होती. औषधे घेण्याआधी काहीतरी खाण्याची जरुरी होती. कुठे खाणार व काय खाणार? खिशात पैसे तर भरपूर होते पण अशावेळी पैसे थोडेच खाता येतात? अशा प्रसंगानेच,आयुष्यात, पैशाची,नोटांची मिजास किती निरर्थक आहे याची जाणीव होते. कुठेतरी पोटाची व्यवस्था करावी लागणारच होती. आमच्या खानावळीत दामलेंना काहीच खाणे अजिबात मान्य नव्हते. ते नेहमी आपल्याबरोबर एक ग्लुकोज पॅकेट बरोबर ठेवतात. साखर कमी झाल्यास ही पावडर खाल्ल्यास थोडा आराम मिळतो. त्यांनी आपल्या जवळील ग्लुकोज चे एक-दोन डोस घेतले ते बरे झाले,नाही तर त्यांना चक्करच आली असती. मोठा अनावस्था प्रसंग निर्माण झाला असता. मी येथे कोणती वैद्यकीय मदत देऊ शकणार होतो? …
एका भल्या माणसाने त्या आमच्या गेस्ट हाऊस पासून पंधरा मिनिटाचे अंतरावर पुढे मुख्य घाट रस्त्यावर, एक पेट्रोल पंप असल्याचे सांगितले. तेथे काहीतरी खाण्यास मिळेल असेही सांगितले. मात्र आता रात्रीचे 11 वाजत असल्याने ती शक्यताही धुसर झाली होती.तरी प्रयत्न करून बघा, असे म्हणाला.
आशेला अंकुर फुटला. कारण पेट्रोल पंप म्हटल्यावर, आम्हा पेट्रोलीयम कंपनीच्या लोकांना अडचणीचे प्रसंगी एक आशेचा किरण दिसतो. पेट्रोल कंपनीचे लोक म्हटल्यावर, पेट्रोल पंप मालक, निश्चितच करता येईल तेवढी मदत करतात, असा भारतभर फिरताना, माझा पूर्वीचा ही अनुभव होता.सर्व गात्रे शिथील झाली होती. विश्रामाची आवश्यकता होती. तरी पेट्रोल पंपापर्यंत चालत जाण्याचे ठरविले.मात्र तेथे जावयाचे कसे? पाऊस कमी होता, पण होता. वारेही जोरात,आमच्याकडे तर साधी बॅटरी देखील नव्हती. ते दुर्गम घाटातले रस्ते ही माहीत नव्हते. पण त्यादिवशी,नशीब आमचे बरोबर, लपंडाव खेळत होते, परीक्षा पाहत होते,याचा प्रत्यय आला!!
पाऊस थोडा कमी झाल्यावर रस्त्यावर आलो आणि.. रस्त्यातून बॅटरीचा उजेड पाडीत, कोणी व्यक्ती आमचे बाजूला येत असलेली दिसली.त्या अनोळखी व्यक्तीला,” आम्हाला पेट्रोल पंपावर जायचे आहे,मदत होईल का?”अशी विनंती केली. तो आमच्याविरुद्ध बाजूने जात होता, पण तो सीमा सुरक्षा दलाचा जवान होता .. देवदूत बनून तो आमच्यासाठी मार्ग दाखविण्यास आला होता. आमची हकीगत व स्थिती पाहून त्याला दया आली. “माझ्या मागून या”,अशी सूचना देऊन त्या भल्या जवानाने पुन्हा मागे फिरून, पंधरा मिनिटात, आम्हाला त्या पेट्रोल पंपावर पोहोचविले.” पंप बंद झालेला आहे मात्र तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा”.. अशी सूचना करून तो देवदूत, अंधारात लुप्त झाला, पुन्हा कधीच नभेटण्यासाठी!!
ऑफिस बंद होते पण आंत प्रकाश दिसत होता, म्हणून दारावर टकटक केले. थोडा वेळ थांबावे लागले . दार उघडले गेले.एक पन्नाशीचा माणूस आमचे समोर आला. बिछाने अंथरून त्याची झोपायची तयारी होती. आमचा अवतार आणि त्या अवेळी आम्हाला पाहून त्याला काय वाटत असावे हे त्याचे चेहऱ्यावरूनच आम्हाला कळले.आम्ही थोडक्यात आमची कहाणी त्याला सांगितली.विशेष म्हणजे, आम्ही भारताच्या हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनचे कर्मचारी आहोत,याची ओळखपत्रेही दाखविली. त्याचा परिणाम झाला. त्याने त्वरित बाजूची खोली उघडून आम्हाला येथे कोचावर बसविले.हिटर चालू करून खोली गरम केली. आम्ही, काही खाण्यासाठी मागायच्या आधी त्याने आपल्या नोकराला पैसे देऊन,मोटरसायकल वरून ,आमच्यासाठी काही तरी खाद्यपदार्थ आणण्यासाठी पिटाळले. खानावळ बंद असली तरी, त्यांच्याकडून रोटी-भाजीतरी घेऊन ये, हे सांगण्यासही तो विसरला नाही. बहुदा त्याच्या ओळखीच्या व्यक्तीचे ते हॉटेल असावे.
आम्ही गरम हवेची ऊब घेत असतानाच त्याने आमच्या हातात दोन विडे(पानाचे) खाण्यासाठी दिले.”पटकन चघळावयास सुरुवात करा”,म्हणाला.एका अनोळखी व्यक्तीकडून, सर्वस्वी अनोळखी परिसरात,रात्रीचे वेळी अशा प्रकारे विडे खाणे ,यात काय धोके असतात ते ऐकले होते. पण तेथे विचार करण्यास वेळ कोणाला होता? आम्ही सर्वस्वी देवावरच तर भार सोपवला होता .त्यामुळे ते विडे आम्ही चघळू लागलो. “तुम्हाला अंगात थोडी उब यावी, तरतरी वाटावी,म्हणून हे दिले आहेत” म्हणाला. खरोखरच मला थोड्याच वेळात,अंगातून एक उष्णतेची लहर वाहते आहे, ऊर्जेचा एक प्रवाह, शरीराबाहेर निघू पाहतो आहे,अशी भावना झाली. महेश भाई तर कोचवर डोके ठेवून अर्धवट बेशुद्धीतच गेले. साहजिक आहे, उपाशी होते व डायबिटीस मुळे शक्तीच राहिली नव्हती, त्यात एवढा जबरा, शक्तीडोस, मिळाल्यानंतर असेच होणार. त्यांनी एवढे साहस व मनोधैर्य तेथे येईपर्यंत दाखवले, त्याला शब्द नाहीत. केवळ जबरदस्त इच्छाशक्तीचा माणूसच एक व्याधी असताना,त्या कठीण प्रसंगी,उपाशीपोटी,एवढे करू शकतो.आजही मला त्यांचे खूप कौतुक आहे.दहा-पंधरा मिनिटात महेश व्यवस्थित उठून बसला. माझ्याही जीवात जीव आला. आता खूप हुशारी वाटू लागली होती. या थंड प्रदेशात ही माणसे,खायच्या पानांत,कवळ्या सुपारीचे खांडे टाकून,बनवलेला विडा चघळतात व त्यामुळे अंगात उब राहते,हे नंतर कळले.
तेवढ्यात तो गडी खाण्यासाठी काही घेऊन आला.भाकऱ्या आणि बटाट्याची रस्साभाजी होती. “अमृततुल्य जेवण”,म्हणजे काय असते त्याचा प्रत्यय त्या दिवशीचे, त्या परिस्थितीतले, ते जेवण खाताना वाटले!! आता आम्हाला खूपच बरे वाटू लागले होते. गृहस्थाचे आभार मानले. पैसे किती झाले म्हणून विचारले तर ,”तुम्ही मुंबईला गेल्यावर मी कळवीन”,असे हसत हसत हा भला माणूस म्हणाला. “तुम्ही लवकरात लवकर तुमच्या खानावळीत जाऊन राहा. रस्ता कधीही सुरू होईल,तेव्हा निघता आले पाहिजे.” असे सांगून त्यांनी आपल्या नोकराबरोबर आम्हाला त्वरित रवाना केले. त्या भल्या माणसाचे नाव ही आम्ही विचारू शकलो नाही. असेच असते ,आयुष्यात आपल्यावर खूप उपकार करून गेलेली माणसे बहुधा निनावीच राहतात !
आता ,त्या कुबटवासाच्या, गळक्या, चंद्रमौळी झोपडीत बसून विचार करीत असताना, मला इंद्राच्या महालात बसून सौख्य उपभोगीत असल्याचा आनंद झाला !कारण आता पोटाची चिंता मिटली होती. हुशारी वाटत होती. परिस्थिती व स्थान तेच, मात्र मनस्थितीत केवढा फरक पडला होता पहा. शेवटी सुख-सौख्य म्हणजे तरी काय? मन की मिजाज! मनाची- स्थितीच ना?
रस्ता सुरू झाल्याचा भोंगा ऐकण्यासाठी, कान आतुरले होते. काहीतरी अजब गजब विधिलिखित घडत होते. “पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा”, या कवीच्या ओळींचा प्रत्यय येत होता. पेट्रोल पंपच्या त्या मालकाला मनातल्या मनाचा लाख लाख दुवा दिले.
“दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, लेने वाले करोड, देने वाला एक राम!”
भरपेट जेवणावर ताव मारताना कधी परमेश्वराची आठवण येत नाही. मात्र त्या रात्री मिळालेल्या त्या दोन भाकऱ्यावर देवाने आमचेच नाव लिहूनच ठेवले होते.त्यामुळेआमच्या ऊपाशी पोटात दोन घास गेले. गेल्या काही तासापासून चालू असलेल्या घटना क्रमांचा अर्थ लावताना आणि अजून पुढे काय वाढून ठेवले असेल, याचाही विचार करीत होतो. शरीर थकलेले असूनही डोळे मिटण्यास तयार नव्हते. “महाराज गडावर पोचल्याचे”, चौघडे ऐकण्यासाठी, बाजीप्रभू ज्या जीवाच्या आकांताने त्या दिवशी लढले त्याच आकांताने, आम्ही आता “ऑल क्लिअर”चा भोंगा ऐकण्यासाठी ‘जीवाचे कान’, केले होते !
रात्रीचा दीड वाजत आला असेल, लक्ष त्या, लष्कराच्या’भोंग्याकडे लागले होते.”रस्ता लवकर सुरू होऊ दे”, हीच मनोमन प्रार्थना करिता होतो ..आणि खरोखर भोंग्याचा आवाज ऐकू आला … वाहतूक सुरू झाली होती .. त्या अंधाऱ्या रात्रीतही आशेचा किरण दिसला!!
ड्रायव्हरला मोबाईल वर फोन करून पाहिला पण लागेना.आमच्या खानावळीतील बहुतेक मंडळी आपापल्या गाड्या घेऊन पसार झाली. आम्ही दोघेच तेथे राहिलो. परत निवांत सन्नाटा पसरला. मालकीण बाईला आमची दया आली असावी. स्वतः येऊन आमची चौकशी केली. आम्ही ड्रायव्हरची वाट पाहत आहोत असे सांगितले. एक तुच्छतेचा कटाक्ष टाकीत म्हणाली, तुम्ही अशा नालायक माणसावर अजून विश्वास ठेवता का? तो आता दारू पिऊन झोपला असेल, येणे शक्य नाही. तुम्ही वर जाऊन विश्रांती घ्या…”
आमच्या पोटात धस्सा झाले. नशीब खरेच सत्वपरीक्षा पाहत होते. आता रस्ता सुरू झाला आहे ,अजूनही निघालो तर आमचे सकाळचे विमान बागडोग्र्या हून कसेतरी पकडू शकत होतो. आता काय करायचे? एक एक मिनिट म्हणजे एक एक तास वाटू लागला …नशिबाला दोष देत खोलीत गप्प बसलो. ड्रायव्हर साहेब काही आले नाहीत.. सुरुवातीलाच भाड्याचे सर्व पैसे गिऱ्हेगाकडून घेण्याचा अर्थ आता कळला.
झुंजू मुंजू झाले खाली आलो. उगवत्या सूर्यकिरणाबरोबर,अंधारात लपलेला ड्रायव्हर दिसतोय का,म्हणत,ड्रायव्हरचा शोध घेऊ लागलो .. परत मालकीण बाई आल्या त्यांनी आम्हाला धीर दिला म्हणाल्या, “तुम्ही समोर असलेल्या एका पायवाटेने खाली उतरा.तेथे एक छोटे गाव आहे .तथे ड्रायव्हर लोकांचा अड्डा आहे.तुमचा ड्रायव्हर भेटला तर ठीक, नाहीतर दुसराही कोणी मिळेल, त्याला येथे घेऊन या.”
ही बाई देखील आम्हाला देवदूता सारखी, मार्ग दाखवत होती. प्रथम आम्ही आमच्या कलकत्ता कार्यालयाशी कसाबसा संपर्क साधला. सकाळची तिकिटे रद्द करून,पुन्हा दुपार अथवा संध्याकाळची तिकिटे काढा असा संदेश रवाना केला. विमान तिकिटे रद्द करण्यास सोपे असते. थोडे पैसे कापले जातात एवढेच. मात्र अशा गर्दीच्या सेक्टरवर त्वरित नवीन तिकिटे मिळणे मुश्किल असते. आमच्या कलकत्ता कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर आमचा विश्वास होता. ड्रायव्हरचा शोध अथवा नवीन टॅक्सी, मिळवण्याच्या कामाला लागलो.. पुन्हा विमाने चुकवूनअजिबात चालणार नव्हते ..
मुख्य रस्त्यावरून, खाली उतरत जाणारा कच्चा रस्ता,अरुंद व निसरडाही झाला होता. हळूहळू, बाजूच्या झुडपांचा आधार घेत, कसेबसे खाली उतरलो. गावात आलो. वीस पंचवीस झोपड्यांचे ते एक छोटेगाव होते. नाहीतरी हिमालयाच्या कुशीत दडलेल्या, या छोट्या गावाच्या पायवाटां वरून आम्ही आयुष्यात कधी फिरणार होतो? एका मोकळ्या जागेत , ड्रायव्हर लोकांनी आपल्या गाड्या उभ्या करून पत्त्याचा डाव मांडला होता. आमचा ड्रायव्हर कुठे दिसतो का तेही पाहिले, पण दिसला नाही. पुढे जात राहिलो.गावांतील लोक, विशेषतः मुले व बाया आपले दरवाजे किलकिले करून आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते . त्यांच्या या भूतानी खेड्यात, मुंबईचे पाहुणे कदाचित पहिल्यांदाच पाहत असतील? आम्हालाही असे फिरणे अवघडच वाटत होते. पण इलाज नव्हता. शेवटी एका घराजवळ एक मारूतीवॅन गाडी उभी असलेली दिसली. त्या घरात जाऊन मालकाचा शोध घेतला .त्याने आम्हाला भारत सीमेवर सोडण्याचे मान्य केले. पुन्हा वाटाघाटी,शर्तीअटी.हजार रुपये दर ठरला.या वेळेला मात्र हजार नाही, अकराशे घे पण पैसे प्रवास संपल्यावर सर्व देऊ, ही अट मान्य करून घेतली. ‘अनुभवातून माणूस शिकतो’, तो असा!! त्याला घेऊन मुख्य रस्त्यावरून आमच्या निवासस्थानावर आलो. मालकीण बाई आमची वाटच पाहत होती. काम झालेले पाहून तिलाही आनंद झाला. ड्रायव्हरला आम्ही बॅगा गाडीत भरण्यात सांगितले. आता आम्ही आमचे सामान भरून ,आमच्या त्या निवासस्थानाला व मालकीण बाईला, बाय-बाय करणार, तेवढ्यात…
….. रात्रभर गायब असलेला आमचा जुना ड्रायव्हर, त्याची गाडी, दोन मित्र घेऊन अचानक प्रगट झाला.आमच्या गाडीसमोर त्याने आपली गाडी आडवी घातली. भूतानी भाषेत चौघांचे भांडण सुरू झाले. जुन्या ड्रायव्हरलाच आम्हाला सीमेवर न्यावयाचे होते व ही नवीन सोय त्याला मान्य नव्हती. हा दोन माणसे घेऊन आला होता तर या नवीन ड्रायव्हरलाही गावातून आपले मित्र बोलवायचे होते. मोठा बाका प्रसंग होता .डोकी फुटली असती तर एक नवीनच समस्या आमच्यासमोर निर्माण झाली असती! त्याचे सर्व पैसे आधी मिळाले असताना त्याला आमची स्वारी सीमेपर्यंत का न्यावयाचीहे, आम्हाला कळत नव्हते. बरे न्यावयाचे आहे तर हे गृहस्थ रात्रीपासून कुठे बेपत्ता झाले होते? मालकीण बाईंनी हळूच सांगितले,” तेथून येताना यांना मोठे भाडे मिळते. त्यामुळे सर्वांनाच सिमेपर्यंत जायचे असते. येथील स्थानिक भाड्यापेक्षा सीमेपासूनचे भाडे भरपूर असते.म्हणून प्रत्येकाला ती ट्रीप हवी असते”.
खरेतर या जुन्या ड्रायव्हरला फटके मारून हाकलावयास हवे होते. मुंबईत आम्ही ते केले असते. पण येथे आम्ही नवखे होतो. त्यांची दादागिरी होती. व आम्हाला प्रकरण खूप सावधतेने हाताळावयाचे होते.. आम्ही शांततेने सर्व पाहत होतो.
मोठा गलकासुरू झाला. फुकटचा तमाशा पाहण्यासाठी आपल्या मुंबई प्रमाणेच इथेही गर्दीला तोटा नव्हता..समस्या आमची पाठ सोडायला तयार नव्हत्या. मात्र मालकीण बाईंनी तंटा सोडवला. नवीन ड्रायव्हरला शंभर रुपये बक्षीस देण्यास सांगितले. जुन्या ड्रायव्हरला व्यवस्थित तंबी दिली. “आता, या पाहुण्यांना काही त्रास झाला, तर गाठ माझ्याशी आहे,हे लक्षात ठेव! तुझे नाव पत्ता मी मिळविला आहे.” आमच्या ड्रायव्हरची मान शरमेने खाली झाली. ते पाहून आम्हाला मात्र धीर आला.. हेगृहस्थ आता आमच्याशी जास्त पंगे घेणार नाहीत, असे कुठेतरी वाटले. त्या अशिक्षित खेडवळ बाईंनी आमच्या करिता त्या परक्या माणसाशी घेतलेले पाहून तिलाही आम्ही मनोमन प्रणाम केला!
आम्हीही काही जास्त चौकशा न करता पुनश्चः मार्गस्थ झालो. सकाळचे नऊ- झाले असतील. आता ,काल बुक केलेली, बागडोग्रा -कलकत्ता व कलकत्ता- मुंबई तिकीटे पुन्हा रद्द करून, संध्याकाळसाठी दोन्ही तिकीटे तिसऱ्यांदा बुक करावयाची होती. आमच्या कलकत्ता कार्यालयास सांगण्यास संकोच वाटत होता. मात्र त्यांनाही आमची अवस्था कळली होती. ” तुम्ही कोणतीही काळजी करू नका, जे काही करावयाचे, ते निर्धास्तपणे आम्हास सांगा”, असा भरोसा त्यांनी दिल्याने आमचाही संकोच कमी झाला. कारण हे खूपच अति होत होते.आम्ही स्वतःलाच,’ शुभास्ते संतुपंथानः’ अशा शुभेच्छा दिल्या मात्र दुर्दैवा चे दशातार अजून ही संपलेले नाहीत,याची आम्हाला तरी कुठे जाणीव होती??
कालच्याच त्या मार्गावर थोडेसे पुढे जातो तोच आमच्या पुढील काही गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. प्रथम वाटले एकादी गाडी बंद पडली असावी. ड्रायव्हर साहेबांनी उतरून चौकशी केली.
“काल दुरुस्त केलेल्या रस्ताच थोडा पुन्हा खचला आहे. मात्र काम विशेष नाही. तासाभरात होईल” अशी खुशखबर त्यांनी आणली!! आम्हीही उतरून प्रत्यक्ष पाहणी करून आलो.काम मोठे नव्हते व लष्कराचे जवान कामास लागले होते. आता गाडीतून उतरायचे नाही. कितीही उशीर होऊ दे, येथेच यावयाचे व काम झाल्यावर पुढे निघायचे असे ठरविले. एकदा मनात असाही विचार आला की, बॅगा घेऊन हळूहळू दरीतून चालत पलीकडे जावे ,व तेथून दुसरी टॅक्सी करून बागडोग्रा गाठावे. थोडे पैसे अधिक केले असते पण आता पैशाची फिकीरच आम्ही सोडून दिली होती. पाई चालत,बॅगासहित, दरी ओलांडणे मोठे धार्ष्ट्य होते. तो विचार सोडून दिला.
दैव आपली जास्त परीक्षा पाहणार नाही,असे कुठेतरी वाटले. तासाभरात रस्ता, रहदारी हळूहळू पुन्हा सुरू झाली..”चलो एक बार फिर से.. सैर शुरू करो “… आता हिम्मत हरायची नाही व बागडोग्रा नक्कीच गाठू ,असे वाटू लागले. पण तसे खरेच होणार होते काय….?? हा दैवाचा खेळ निराळा..हेच खरे!
दोन दिवसाच्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. चिखल होता. काही ठिकाणी माती छोटे दगड रस्त्यावर वाहून आल्याने रस्ताही निर्धोक नव्हता. मिलिटरीच्या गाड्यांची ही वाहतूक चालू असल्याने,आमच्या गाडीला बाजूला जाऊन त्यांना वाट द्यावी लागत होती. तेथेही जीव मुठीत धरून, डोळे बंद करावे लागत होते. निसरड्या रस्त्यावरून गाडीचे एक चाक जरी थोडे घसरले, तर सरळ बागडोग्रा ऐवजी ‘वैकुंठ यात्रा’च घडायची!! मात्र परमेश्वरी कृपेने,या महाशयांनी शेवटी आम्हाला भारतीय सीमेवर आणून सोडले. तो नवीन गिऱ्हाईकाच्या शोधात निघून गेला.. बक्षीसी घेण्यास विसरला नाही! आम्ही थोडासा चहा नाश्ता करून नवीन सीमा ते बागडोगऱ्यापर्यंत जाण्यासाठी दुसरी नवी टॅक्सी ठरविली. पुन्हा भाड्यासाठी घासाघाशी, ड्रायव्हरची भांडणे .. तोच मागचा तमाशा.मात्र शेवटी एक करार झाला व आम्ही बागडोग्रया कडे प्रस्थान केले. विमान दुपारचे 4.वा.असल्याने तसा आता अवधी होता. प्रवास दोनेक तासाचा होता. आता बारा वाजले होते व तशी काळजी नाही असे आम्हाला वाटत होते…. पण ..??
अर्धा पाऊण तास प्रवास झाला असेल, आणि रस्त्यात ठिकठिकाणी लोकांचे जमाव,जिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणा देत असलेले दिसले. त्यातील काही भल्या लोकांनी आमची गाडी उभी करून ,ड्रायव्हरला गाडी पुढे न घेऊन जाण्याविषयी ही सूचना केली. कारण पुढील मार्ग सत्याग्रही लोकांनी अडवून ठेवला होता. रात्री काही नक्षलवादी गुंडांनी गावातील दोन-तीन घरे फोडून लोकांना मारहाण केली होती व त्याचा निषेध म्हणून हा संप पश्चिम बंगालमधील माओवादी पुढाऱ्यांनी या परिसरात पुकारला होता. हे येथे नेहमीचेच संकट होते.सुभाष घेशींग या पुढाऱ्याचे त्या भागात वर्चस्व होते. त्याच्याच पार्टीने हे आंदोलन पुकारले होते.झाले ..परत डोळ्यापुढे काजवे चमकू लागले .आता रस्ताच बंद असेल तर पुढे जाणार कसे? कधी निसर्ग रस्ता बंद करत होता तर कधी मानवनिर्मित संकटे रस्ता अडवित होती.. जायचा प्रयत्न केला, गाडीवर दगड मारले, काचा फोडल्या तर काय करायचे?? नक्की काय करावे सुचत नव्हते.
मनाच्या त्या अवस्थेतही, अनेक वर्षांपूर्वी बोर्डीच्या शाळेतील आमच्या बि.डी.शहा सरांनी शिकविलेला एक संस्कृत श्लोक मला आठवला. त्यावेळीही मला आवडला होता म्हणून तो लक्षात आहे .. आज आठवण्याचे कारण, चालू असलेला हा नशिबाचा खेळ..
खल्वाटो दिवसेश्वरस्य किरणैः संतापिते मस्तके,
गच्छन्देशमनातपं विधिशात्तालस्य मूलं गतः
तत्रापस्य महाफलेन पतता भग्नं सशब्दं शिरः
प्रायो गचाछति यत्रभाग्यरहितस्तत्रैव यान्तापदःll
“उन्हाचा ताप वाचविण्यासाठी डोक्यावर टक्कल असलेला माणूस एका ताडाच्या सावलीत उभा राहिला . हाय रे दैवा ,वरून एक ताडाचे फळ डोक्यावर पडून, त्याचा कपाळमोक्ष झाला. बरोबर आहे,ज्याला नशिबाची साथ नाही, तो कुठेही गेला तरी विपत्ती त्याची साथ सोडत नाहीत…”. पण आम्हाला मनाची खात्री होती कुठेतरी आम्हाला नशिबाची साथ मिळेल, देव आमच्या हाकेला हो देईल!
आता हिम्मत हरायची नव्हती. ” हिम्मत मर्दा तर मदत खुदा..” हे ऐकले होते. आता त्याप्रमाणे वागून दाखवायची वेळ आली होती. आमच्या नवीन ड्रायव्हर भाऊंना आम्ही, दोन दिवस सहन करत असलेली हडेलहप्पीची हकीकत सांगितली. आमच्या पुढील प्रवास व्यवस्थेचीही सर्व माहिती दिली. त्यालाही आमचे प्रश्न कळावेत व ,” कम व्हॉट मे”, या ऊक्ती प्रमाणे, आलेल्या प्रसंगातून मार्ग काढणे, त्याचेही कर्तव्य आहे, हे त्याला पटवावयाचे होते. त्याचे सहकार्य ही आमच्यासाठी मोलाचे होते.… आमच्या बोलण्याचा कुठेतरी परिणाम निश्चित झाला असावा. एका झाडाखाली ,गाडी बाजूला लावून, तो खाली उतरला . काही लोकांशी,स्थानिक भाषेत,बातचीत करून पुन्हा आमच्याकडे आला . आम्हाला धीर देत म्हणाला,” या लोकांनी मला दुसरा रस्ता सांगितला आहे. तो लांबचा आहे,आडवळणाचा आहे. तो रस्ता सुरू असावा असे हे लोक म्हणतात.आपण प्रयत्न करू व तेथून जाऊ,” शेवटी त्याने,” एवढी रिस्क घेतोय तर मला काही बक्षीस जरूर द्या”, असे सांगावयास विसरला नाही. ते मान्य करण्याशिवाय आमच्याकडे काय इलाज होता. शेवटी,”अडला नारायण ही गाढवाचे पाय धरी”,.., तर आम्ही कोण?
ड्रायव्हरने थोडे मागे जाऊन आडवळणाचा,लांबचा ,दुसरा रस्ता पकडला. हेही मोठे आव्हानच होते. कुठे घेऊन जाईल, तिथे जाणे भाग हो.त्यांची भाषा आम्हाला येत नव्हती, त्यामुळे काय संभाषण झाले आणि कुठे दुसऱ्या संकटात तर हा घालणार नाही ना, ही शंका सतावत होती, ‘मनचिंती ते वैरी न चिंती’, या म्हणीचा प्रत्यय येत होता… पण जाणे भाग होते. अजून भागदौड होतीच. पुढेही बंदचे असे लोण पसरून रस्ता अडकवून ठेवला असेल, तर ..तर.. पुढचा विचार आत्ता जाऊ दे. आपण लवकरात लवकर विमानतळ गाठण्याचा प्रयत्न करूया .आता हत्ती गेला आहे शेपूट राहिले आहे, त्याची वळवळ ही नक्कीच थांबेल.प्रयत्न करीत राहणे,आमच्या हातात आहे, असेच मनाला समजावीत होतो.’पुनश्च हरी ओम’,करीत निघालो..
सुमारे अर्ध्या तासात त्या नवीन रस्त्याला लागलो तेथून पुढे जातो तर तेथेही तुरळक ठिकाणी लोक जमलेले दिसले. बापरे मनात पुन्हा शंका येऊ लागल्या. ड्रायव्हरला जोरात गाडी हाकण्यास सांगून आम्ही देवाचा धावा करीत होतो. पण अजूनही दुर्दैव पाठ सोडण्यास तयार नव्हते.. एका ठिकाणी दगडाच्या राशी ठेवून रस्ता अडवलेला होता. काही टारगट मुले दोन रस्त्याच्या दोन बाजूला खुर्च्यावर बसली होती. थोड्या अंतरावर गर्दी ही होती कदाचित त्यातीलच काही पुढार्यांनी यांना तिथे बसविले असावे. ड्रायव्हरलाच,’ सर्वाधिकार बहाल’, करून पाठविले. तो काहीतरी मार्ग काढून येईल ही आशा होती.ड्रायव्हरने रद्दबदली करून ,”मुले शंभर रुपये वर्गणी मागतात, देऊन टाकूया”,असा प्रस्ताव आणला. मी त्वरित खाली उतरलो. शंभर रुपये प्रत्येकाच्या हातावर ठेवले. मुले खुश झाली.. एकजण म्हणाला, “चला मी तुमच्या गाडीत बसून बरोबर येतो, पुढेही कोणी तुम्हाला त्रास देणार नाही हे बघतो”.. सुझाव चांगला होता .पण एवढ्या अनुभवानंतर मन थोडे शंकीत झाले.होते . हे कारटे, गाडीत बसून थोडे पुढे गेल्यावर ,”वाचवा, वाचवा..” असे काही बोंबलले तर …?आम्हाला ,’मुले पळवणारी टोळी’,म्हणून मार द्यायलाही हे लोक कमी करणार नाहीत …नुसती शंका.. पण आता आम्हाला जास्त विचार करायला वेळ तरी कुठे होता? त्याला गाडीत घेतले. ड्रायव्हर शेजारी बसविले. गाडी जोरात हाणली. आता मात्र आम्ही अगदी निश्चिंत झालो होतो.थोड्याच वेळात बागडोग्रा विमानतळाच्या परिसरात आलो.. सुदैवाने आम्हाला आलेल्या शंकेप्रमाणे, या मुलाने काही गडबड केली नाही . बागडोग्रा विमानतळा थोडे आधी,मुलाने आमची रजा घेतली.आम्ही त्याला वर पन्नास रुपये आणखी बक्षीस दिले….. मनात म्हटले सुटलो एकदाचे.., पुढे अर्ध्या तासात आम्ही ईच्छित स्थळी, अजून पर्यंत स्वप्नवत वाटणाऱ्या, बागडोग्रा विमानतळाच्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचलो. आपण बागडोग्रा विमानतळ पाहिला, हे खरेच वाटत नव्हते.. परमेश्वराचे आभार मानले.
महाराज गडावर पोहोचल्यावर तोफांचे आवाज ऐकून स्वर्गीय बाजीप्रभूंना जो आनंद झाला असेल,तसा आनंद झाला!! बाजी धारातीर्थी पडले होते,आम्ही सही सलामत होतो!
एक विमान चुकले तरी दुपारचे बागडोगरा -कलकत्ता विमान मिळणार होते. पुढे कलकत्ता-मुंबई विमानास काही प्रश्न येणार नव्हता.. आशा निराशेचा लपंडाव संपला होता.आम्ही रात्री कलकत्त्याहून मुंबईत व्यवस्थित पोहोचलो. मध्यरात्र असून मुंबई विमानतळावर उतरल्यावर जो आनंद झाला, तो काय वर्णावा? आदल्या दिवशीची ती मध्यरात्र आठवली आणि आपण आपल्या थोड्याच वेळात घरी पोहोचणार हे खरे वाटत नव्हते!!
बरेच पैसे, शारीरिक कष्ट व मानसिक स्वास्थ्य घालविले होते, पण कंपनीसाठी केलेल्या यशस्वी कामाची पावती,एक साहसी अनुभव, अत्यंत बिकट अशा परिस्थितीत आम्हाला मार्ग दाखवणाऱ्या व संकटातून बाहेर काढणाऱ्या दयाघन प्रभु चे आशीर्वाद ही आमची कमाई होती…. अर्थातच पुढील दोन दिवस घरच्यांना ह्या सर्व ,’युद्धस्य कथा रम्या’, सांगताना जो मजा आला तो आत्ताही येतो आहे!!
खरंतर आता अनेक वर्ष होऊन गेल्यानंतर, फुरसतीच्या वेळात मी या आठवणी लिहितो आहे. जेव्हा हे रामायण घडत होते, फक्त समोरील, ‘संकट रुपी रावणाला’,संपऊन मुंबई गाठणे, एवढाच आमचा प्रयत्न होता .घरी आलो आणि दैनंदिन जीवनाच्या धावपळीत सर्व विसरून गेलो.
या भूतान दौऱ्याचा आज मी विचार करतो, अनेक प्रश्नांची दंगल मनात सुरू होते. आज त्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करतो
संकटे आपल्या मानवी आयुष्याचा एक अविभाज्य भागच आहेत. जीवन आहे संकटे सुद्धा अनिवार्य आहेत. संकटापासून दूर पळणे किंवा संकटांना समर्थपणे सामोरे जाणे, हे दोनच मार्ग असतात.पळून जाणे हा खरा पुरुषार्थाचा मार्ग नाही. आम्ही ज्या प्रकारच्या प्रसंगात होतो आम्हाला तर पळून जाणे शक्यच नव्हते आमच्यासाठी दोन मार्ग होते एक तर संकटांना सामोरे जाऊन त्यातून सुटका करून घेणे अथवा सर्वस्वी हतबल होऊन नामशेष होणे..
संकटांशी दोन हात करून आपण यशस्वी होतो, तेव्हा हीच संकटे आपल्याला काहीतरी शिकवून जातात. आपल्या अनुभवात मोलाची भर टाकतात. म्हणून मला तरी वाटते,संकटांना प्रत्येकाने संधी म्हणूनच पाहिले पाहिजे. जीवनात संकटे नाहीत तर जीवनाला काही मजाही नाही. आपली बुद्धी, सहनशक्ती, हुशारी या सर्वांचा संकटकाली कस लागतो. देवाची ही आठवण तर संकटकाळीच होते ना?
मानवी आयुष्यात संकटे दोन प्रकारची, एक ‘अस्मानी सुलतानी’ तर दुसरी, माणसाच्या स्वार्थी बुद्धीचा परिपाक म्हणून निर्माण झालेली.. निसर्गाने निर्मिलेल्या, संकटांना तोंड देताना कोणाला दोष देणार? खरे तर तो दोषही माणसांचाच असतो.
निसर्ग कधीच मानव जातीवर जाणून बुजून संकटे आणित नाही. त्यामागे निश्चितच मानवी चुकांची परंपरा असते. मात्र मानवनिर्मित संकटे का निर्माण व्हावीत याचा विचार करू लागलो आणि त्याचीही थोडी संगती लागली .
त्या पहिल्या टॅक्सीवाल्यांनी आम्हाला का फसवावे?त्या असहाय परिस्थितीत आम्हाला तसे सोडून का जावे? रहदारी सुरू झाल्यानंतर त्वरित न येता आम्ही दुसरी पर्यायी व्यवस्था केल्यावर, त्यांनी येऊन आमच्याशी का वाद घालावा? त्या खानावळीवाल्या, एका अपरिचित,अशिक्षित महिलेने आमच्याविषयी एवढी आस्था का दाखवावी? तिलाही आमच्याकडून पैसे कमवावेत असे का वाटले नाही? अपरात्री आम्ही त्यांच्या दारात उभे राहिलो असतानाही,त्या पेट्रोलपंप मालकाने आमचे प्रेमाने स्वागत करून,दोन घास खायला देऊन आमच्या स्वास्थ्याची काळजी करून,नया पैशाची अपेक्षा न करता, पुन्हा आम्हाला व्यवस्थित आमच्या निवासस्थानी का पोहोचवावे?
हे सर्वच प्रश्न आज मी स्वतःला विचारतो. माणूस तर एकच.काही ठिकाणी त्याची पाशवी वृत्ती जागृत होते तर क्वचित प्रसंगी त्याला सात्विकता आठवते.. . असे का होत असावे? अतिवृष्टी,अवर्षण, भूस्खलन, तापमान बदल, अगम्य रोगांच्या साथी,हे सर्व माणसाच्या अती लोभातूनच निष्पन्न होत आहेत ना?
माणूस कधी देवासारखा भेटतो तर तोच कधी राक्षसासारखा भासतो, असं का होत असावं?
आम्हा दोघांना त्या भीषण रात्री,भयग्रस्त अवस्थेत सोडून,पळून जाणाऱ्या टॅक्सी वाल्याच्या मनात आले असेल, ” मला काय, माझे पैसे तर मिळाले आहेत ! दुसरे भाडे मिळत असेल तर बघूया, आजच चान्स आहे! मरेत ना का हे दोघे”
पेट्रोल पंप मालकाने मनात म्हटलं असेल,” अरे ही दुर्दैवी माणसे या अपघातात कुठे सापडली? माझ्यावर अशी पाळी कधी आली तर ? यांची मुलेबाळे, पत्नी त्यांची वाट पाहत काळजीत असतील. यांना मदत करणे हे माझे कर्तव्यच आहे!”
मानव जातीच्या व्यवहारातील सर्व अनिष्टे ज्या प्रवृत्ती मधून उत्पन्न होतात तेच खलत्व. माणसाची ही खलप्रवृत्ती व्यक्तिगत व सांघिक स्वरूपात कार्य करीत असते. सर्व- मंगलाची स्थापना व्हावी असे वाटत असेल ,तर हे खलत्व नष्टच व्हायला हवे, हेच ज्ञानोबांनी आपल्या विश्व प्रार्थनेतं,पसायदानात म्हटले आहे. ही खलप्रवृत्ती निसर्ग दत्त नसून परिस्थितीजन्य आहे. माणसाची वृत्ती ही एक सचेतन शक्ती आहे. तिला योग्य कार्य मिळायला हवे. त्यासाठी खलत्व नाहीसे व्हायला हवे. तेव्हाच निस्वार्थी, सर्व व्यापी प्रेम हे मानवी जीवनाचे ,मानवी संस्कृतीचे ,आधारभूत सूत्र होईल .इतिहासातील सर्व प्रेषितांनी आणि संतांनी हाच संदेश जगाला दिला आहे .दुष्कर्म नाहीसे होवो आणि सर्व विश्व आपापल्या कर्तव्याच्या जाणिवेने कार्यरत होवो,हेच त्यांनाही अपेक्षित आहे.
सुदैवाने आजही विश्वव्यापी प्रेमाची वृत्ती माणसांमध्ये जिवंत असली तरी आसुरी वृत्तीच जास्त प्रबल ठरत असल्याचे दिसत आहे.ज्या दिवशी मानवी मनातील दैवीशक्ती, राक्षसीवृत्तीवर विजय मिळविल, त्या दिवशीच पृथ्वीवरील समस्त मानव जात सुखी होईल.
भगवद्गीते गीतेतील,
ऊद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनःl
हे तत्व तरी तेच सांगते. अरे माणसा तू स्वतःलाच एवढा मोठा कर, या जगातील कोणतीच शक्ती तुला कधीही पराभूत करू शकणार नाही. आणि तसं होण्यासाठी,”आपण स्वतःच आपला मित्र व आपणच आपला परमशत्रू आहोत”, हे सूत्र विरू नकोस..
या प्रवासातून मी हे शिकलो. तो अनुभव माझ्या पुढील अनेक प्रवासात उपयोगी पडला. माझ्या वाचकांनीही त्यातून थोडाफार बोध घ्यावा व आपले हित साधावे हीच विनंती. धन्यवाद.
फिरतीच्या कामात मलाही बरेच अनपेक्षित अनुभव आले पण तुमचा हा महानुभव म्हणजे निसर्ग कोपाने आलेला जीवन मरणाचा प्रसंग होता. केवळ देवाच्या कृपेने, प्रसंग हाताळण्याच्या तुमच्या कौशल्याने आणि तुम्हाला भेटलेले ते देवदूत, पेट्रोल पंपावरील आणि त्या बाई ज्यांनी तुम्हाला त्यांच्या कुवतीप्रमाणे तुमच्या स्टेटस प्रमाणे सोय करण्यासाठी केलेली मदत, ड्राइव्हरला भरलेला दम ह्यामुळे तुम्ही सही सलामत बाहेर निघालात. आपल्या सहकार्यांची घेतलेली काळजी तुमच्या सहृदय स्वभावाची ग्वाही देते. तुमच्या ह्या अनुभवाचा उपयोग तुम्हाला पुढील आयुष्यात नक्कीच झाला असेल. पण तरुण वाचक जे अशा प्रकारचे जॉब घेतील त्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतील ह्यात वाद नाही. Bravo Sir. Salute.