माझी आज्जी, मोठी आई …१०१ नाबाद!
आजी म्हटली की आपसूक जाणवते ती भावना म्हणजे, “उबदार माया”. संध्याछाया हृदयाला भिववित असतांना शक्यतितकी संसार-गाड्यातून विरक्ती घेऊन, फक्त नातवंडामध्ये जीव रमविणारी, आयुष्यातील कडू गोड आठवणींच्या गाठोड्यात रमणारी मृदू व्यक्तिमत्त्व! इ. इ… थोडक्यात ,
” आजी म्हणजे काय? आजी म्हणजे दुधावरची साय!” अशी कल्पना.
पण सगळ्याच आज्या काही सारख्या नसतात . आजीला आम्ही ‘मोठीआई’ म्हणतो, तिला मात्र ही व्याख्या लागू पडत नाही ! अजूनही जीवनेच्छेने रसरसलेल्या माझ्या आजीच्या बाबतीत मात्र काहीतरी वेगळे अनुभावयास मिळते .. मला काहीतरी अनोखे दिसते …म्हणून माझ्या आजीसाठी मी म्हणेन..
“चालते वाकून काठी टेकून ,
हळूहळू आहे तिची चाल,
शंभरी गाठली असली,
तरी माझी आजी आहे एक ‘कमाल’!!”
तिच्या दीर्घायुष्याचे रहस्यसुद्धा या वेगळेपणातच सामावलेले आहे. आजही एखादा छान आंबा खाल्ल्यानंतर ती त्याचा बाठा(बी),कोणाच्या तरी हातात ठेवून म्हणेल ,”जा,वाडीत कुठेतरी लाव, थोड्याच वर्षात आपल्याला छान आंबे मिळतील!” हीच तर सकारात्मकता ! ती म्हणते,
“म्हातारी न मी इतुकी, अवघे एकशे-एक वयमान!”
हीच मानसिकता तिला भविष्याबाबत निराशा आणत नाही ,उलट वर्तमानात आनंदी, आशावादी बनवते. आपण नेहमी बरोबरच होतो हा तिला आत्मविश्वास. कुणा वृध्द व्यक्तिच्या मृत्यूचे वृत्त ऐकले तर ती व्यक्ती तिच्यापेक्षा मोठीच होती असे म्हणणार!!
अगदी पहिल्यापासून तिच्या खाण्याच्या आवडीनिवडीही, आधुनिक आहारतज्ञांनी प्रमाणित केल्यासारख्या. सगळ्या भाज्या, फळे रोजच्या आहारात असणारच. रोज जेवणात सॅलड पाहिजेच. कडू भाज्या ही नियमितपणे खाणार. पालेभाज्या हव्यातच . कुठलीच वस्तू अगदी आईस्क्रीम, चीज ,बटर देखील तिला वर्ज्य नाही .पण खाण्याचा अतिरेक नाही. अगदी आवडीचे मासे असले तरी! प्रत्येक पदार्थ कसा बनवावा यांच्या टिप्स आम्हाला अजूनही देत असते.
तिची आई म्हणजे आमची आक्कासुद्धा शतायुषी होती.मात्र तिचे वडील अल्पायुषी होते. वयाच्या चाळीशीतच ते गेले. तेव्हा सर्व भावंडात मोठी असलेली मोठीआई फक्त नऊ वर्षाची, तर सर्वांत लहान भाऊ काही महिन्यांचा . मोडक्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी तिला तिच्या आईच्या बरोबरीने कष्ट करावे लागले. बोर्डीपासून दहा मैला वरील उंबरगाव( आज गुजरातमध्ये आहे), येथे भाजी विक्रीसाठी आक्का जात असे. तेव्हा घरकाम आणि लहान भावंडांची जबाबदारी हिनेच उचलली. लग्नानंतरही आर्थिक स्थिति गरिबीचीच त्यामुळे संसाराला हातभार लावण्यासाठी दुस-यांच्या शेतात मजुरीही करावी लागली.
गरीबी आणि अशी अटीतटीची कौटुंबिक परिस्थिती त्यामुळे ती इयत्ता तिसरीच्या पुढे शालेय शिक्षण घेऊ शकली नाही.माझा आजोबा प्राथमिक शिक्षक होते. जात्याच हुशार असलेल्या मोठ्या आईची बुद्धिमत्ता आमच्या हाडाचे शिक्षक असलेल्या आजोबांनी हेरलीअसावी. त्यांनी तिला जुजबी शिक्षण दिले आणि वाचनाची आवड लावली. माझे वडील आणि दोन्ही काका यांच्याकडे स्वतःचा भरपूर पुस्तक संग्रह .त्यामुळे तिने नुसती देवादीकांचीच नाही तर गाजलेल्या कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे ,प्रवासवर्णने असे चौफेर वाचन केले. दृष्टी असेपर्यंत त्यावर मनन करून आमच्याशी चर्चाही ती करीत असे .तेव्हा ठीक पण आताही ती एखाद्या पुस्तकाविषयी बोलताना लेखक,विषय, सांगू शकतेअशी स्मरणशक्तीची देणगी तिला मिळालेली आहे. मला आठवते बाबा आमटे यांचे चरित्र वाचून ती भारावून गेली होती. पण तिची टिप्पणी होती,”हा माणूस थोर पण त्याला सांभाळणारी त्याची पत्नी ही किती महान!”
पुढे ‘समिधा’ हे साधना आमटेंचे पुस्तक वाचल्यानंतर त्यातील अनेक प्रसंगावर ती आजही भावुक होऊन बोलते. तिच्या आवडत्या पुस्तकांपैकी ते एक.
तिच्या पिढीतील अनेक लोकांप्रमाणे तिला गांधीजी वंदनीय आहेत. ‘अग्निपंख’, पुस्तक वाचल्यापासून ए पी जे अब्दुल कलाम सुद्धा तिला तितकेच आदरणीय वाटतात. सुधा मूर्ती तिच्या आवडत्या लेखिका. त्यांचे नवीन पुस्तक आले आहे का याची ती अजून चौकशी करते .या वाचनाचे संदर्भही तिच्या डोक्यात अगदी पक्के बसलेले असतात आणि कुठेही तो आला की पटकन व्यक्त करते.मी हुबळीला जाणार कळल्यावर ती पहिले वाक्य बोलली, “अरे वा, म्हणजे तू सुधा मूर्तीच्या गावाला जाणार तर !”ही गोष्ट इतर कोणाच्या जाऊद्या, माझ्याही लक्षात आली नव्हती.
आता तिला डोळ्यांनी दिसत नसल्याने वाचता येत नाही. पण रोजचा पेपर आणि पुस्तकाची काही पाने वाचून दाखविण्यासाठी एका व्यक्तिची नियुक्ती केली आहे.भारतातील राजकीय उलथापालथी, निवडणुका ,साथींचे आजार,काही विशेष घटना यांच्या नोंदी तिच्या स्मरणात नेहमी असतात. सर्व घडामोडींचा वेध ती रोज पेपर वाचनातून घेत असते .पुढे काय झाले हे जाणण्यासाठी दुसऱ्या दिवशी उत्सुक असते.
वाचनाप्रमाणेच तिची दुसरी आवड म्हणजे पर्यटन.निकोप प्रकृती आणि प्रवासातल्या धकाधकींचा बाऊ न करता केवळ आनंद घेण्याची वृत्ती. यामुळे ती आमच्याबरोबर भारतातील अनेक शहरें फिरली आहे. दरवर्षी ती माझ्याकडे ,”यंदा बाबा कुठे घेऊन जाणार,”, याची चौकशी करत असे. विमानातही, व्हील-चेअरची मदत न घेता सराईताप्रमाणे प्रवास करत असे. कुठे चढउताराचा प्रवास असला तरी हात धरलेलाही तिला आवडत नसे. ऐशी वर्षापर्यंत तिने असा प्रवास केलाय. प्रवासाच्या ठिकाणाची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती तिच्या वाचनात आलेली असेच, तरी जाण्याआधी आणि गेल्यावर, फिरताना आवर्जून उत्सुकतेने सर्व इतिहास जाणून घेई. डोळसपणे स्थलदर्शन करी. दिल्लीत फिरताना इंदिरा गांधींची ‘शक्तीस्थल’ पाहून तेथील थोडी माती ती घेऊन आली.अंदमानमध्ये सेल्युलर जेलमधील वीर सावरकरांच्या कोठडीतील धूळ कपाळी लावली. कलकत्त्याला बेलूर मठ आणि कन्याकुमारीला स्वामी विवेकानंद शिळा तिने भाऊकतेने पाहिल्या .चित्तोडगढ बघताना ती पद्मिनीच्या आठवणीने हळवी झाली. ही सारी ठिकाणे तिने मनःपटलावर कोरून ठेवली आहेत. आता डोळ्यासमोर अंधार असल्याने ती पाहिलेली ठिकाणे तिच्या मनःचक्षुसमोर निश्चित येत असावीत.मी ओरिसाला राहायला जाणार म्हटल्यावर ,तिकडची देवळे,त्यांचा इतिहास ,निसर्ग याचे तिने अगदी परवाच जाऊन आल्यासारखे वर्णन केले.जेथे जेथे जाऊन आलीय तिथे जे काही विशेष पाहिले किवा घडले असेल तेही ती सुसंगतपणे सांगत असते .एकदा आम्ही हिमाचल प्रदेश मध्ये फिरायला गेलो असताना आमच्या हॉटेलच्या खिडकीतून, तिचे वाळत घातलेले कपडे माकडाने पळवले.ते परत मिळवण्यासाठी आम्ही कोणीच मदत करत नाही हे पाहिल्यावर ही एकटीच खाली गेली. हॉटेलच्या गुरख्याला आपल्या मोडक्यातोडक्या हिंदीत काय झाले ते सांगून त्याला घेऊन बाजूच्या जंगलात शिरली. ते कपडे मिळऊनच परत आली. ती अशी धडाडीची आहे. डर हा शब्दच तिच्या शब्दकोशात नाही!
माझे बाबा तिचे पहिले अपत्य. त्यामुळे गेली 80 वर्षे त्यांनी तिला अगदी जवळून पाहिले. त्यांच्या मते त्यांची आई एक अजब रसायन आहे.लहान वयात आणि विवाहानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत कराव्या लागलेल्या अस्तित्वासाठीच्या लढतीने तिच्यात धाडस आणि खंबीरपणा आलेला आहे. लहानपणी सुबत्ता नसली तरी घरात सौख्य होते !ते दिवस आठवले की या भावंडांना वाटते.
” राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली, त्या झोपडीत आमुच्या!!
तिचे विवाहानंतरचे दिवस देखील सोपे नव्हते.त्या चंद्रमौळी झोपडीतूनही या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी त्याकाळी काही लोक त्रास देत होते. त्यांच्यासमोर ही आपल्या हक्कांसाठी व मुलांच्या रक्षणासाठी कणखरपणे उभी राहिली. लढली. माझे आजोबा विरक्त व्यक्तिमत्व होते. अध्यात्माकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ऐहिक सुखाकडे त्यांनी पाठ फिरवलेली होती. अशा ‘संत तुकारामां’चा संसार चालवायला ‘आवली ‘ ला कणखर आणि लढाऊ व्हावेच लागले. पण पुढे तिच्या मुलांनी तिच्या सर्व हौस-मौजा पुरविल्या .तिला स्वतःच्या मोठ्या घरात राहावयास आणले. आपल्या उच्च शिक्षित मुला-नातवंडांचा तिला कोण अभिमान आहे.” मी खूप नशीबवान आहे”, असे ती नेहमी बोलून दाखविते.तीक्ष्ण बुद्धिमत्ता, वाचनाने व्यक्तिमत्त्वात आलेले चातुर्य,आयुष्यातील कडू गोड अनुभवामुळे आलेला आत्मविश्वास, स्वतःची धमक यातून तिचे एक प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण झाले आहे. अंध असूनही मनःचक्षुनी जग पाहणाऱ्या, तिच्या या अद्भुत व्यक्तिमत्त्वाबद्दल माझे काका, सेवानिवृत्त प्राचार्य प्रदीप राऊत म्हणतात,
“आजही शारीरिक दृष्ट्या अंध असलेल्या माझ्या आईचे आयुष्य एका डोळस माणसासारखे आहे.तिच्या वैचारिक संस्कारातून आम्हा भावंडांचे, कुटुंबीयांचे आयुष्य उजळून गेले आहे .हे तिचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही “..
वयाच्या आजच्या टप्प्यावर बरेच साथी सोबती पुढे निघून गेल्यावर, संवादासाठी एकटेपणा जाणवतो. मात्र तिचा स्वतःशीच अखंड संवाद चालू असतो. जे मनात तेच ओठावर असणार. ती सतत व्यक्त होत असते.नवीन जाणून घेत असते.कोणी भेटायला आले तर तिला खूप आवडते. प्रथम त्यांच्याबद्दल जाणून घेते आणि त्यांच्या सर्व नातेवाईकांची नावानिशी आत्मीयतेने चौकशी करते.अगदी दूरदूरची नातीही अचूक सांगते. ज्यामुळे समोरची व्यक्ती आश्चर्यचकित होते. ती व्यक्ती जर काही विशेष वेगळे करत असेल तर तेही ती कौतुकाने ऐकते, शाबासकी देते. इतरांना ते कौतुक सांगते. दूर दूर पसरलेल्या तिच्या नातवंडाबद्दल जाणून घेतांनाही त्यांच्या कौटुंबिक चौकशी बरोबर ती त्या प्रदेशाची, निसर्गाची व येथील हवामानाचीपण खबरबात घेते.तिच्या शतायुषी निरोगी आयुष्याचे गमक थोडक्यात सांगायचे तर स्वतःची सकारात्मक प्रतिमा बनवून तिने मनाची कवाडे सतत उघडी ठेवली आहेत. त्यातून नवीन ज्ञानाचा ,कुतूहलाचा, घेतलेला मोकळा श्वास तिला जगण्याची उर्मी देत राहतो. आयुष्याचे तत्त्वज्ञान वगैरे बोजड शब्दात ती अडकत नाही. पूर्वायुष्यातील संघर्षामुळे कटुता नसली तरी,
” दुनिया ने मुझको दिया क्या, हम सबकी परवा करे तो
सबने हमारा किया क्या ?”
अशीच आजही तिची बाणेदार व रोखठोक वृत्ती आहे.ती स्वतःला असहाय, बिच्चारी कधीच समजत नाही.” हेच तिच्या आयुष्याचे तत्त्वज्ञान !”वाघ म्हातारा झाला,दात पडले तरी गवत खात नाही !”,असे ती आजही आम्हाला ठणकावून सांगते.अंधत्व आले तरी ती हतबल झाली नाही.आजूबाजूला काय चाललेय याचा अंदाज घेत असतेच पण कुणी खोटे बोलण्याचा तिला फसविण्याचा प्रयत्न केला तरी असे काही प्रश्न विचारते की, उलट तपासणीतून खोटे बोलणा-याचे पितळ उघडे पडावे!
मात्र या लढवय्या स्त्रीमध्ये आई बरोबरच आमची आजी, म्हणून सर्व नातवंडासाठी एक हळुवार कोपरा निश्चित आहे. आपल्या सर्व नातवंडाबद्दल नात-सुना आणि नात-जावयाबद्दलही ती कौतुकाने भरभरून बोलते. पतवंडांचा आजूबाजूचा वावर तिला आज दिसत नसला तरी संवेदनांनी तिला तो खूप सुखावतो. ती त्यांच्याशी गप्पा मारत बसते.त्यांच्यात रमते, त्यांच्याशी संपर्क साधू शकते ! सर्वांची नावें, इयत्ता सारे तिला माहीत!!
माझा मुलगा लहानपणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. बातमी मोठ्याआईपर्यंत पोहोचली .ती असहायपणे देवाचा धावा करीत राहिली. तो बरा झाल्यानंतर जेव्हा मी त्याला घेऊन तिला भेटण्यासाठी गावी गेले, तेव्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवून पाणावल्या डोळ्यांनी ती म्हणाली,
“मी आंधळी काय करणार? येथूनच देवाला नवस बोलले होते. जा,आपल्या गावदेवी आणि झोटिंग देवाला नारळ वाहून ये!”
हे वाक्य आजही माझ्या काळजात घर करून आहे. आमच्या लेकरांसाठी आमची आजी तिच्या सुरकुतलेल्या हातांनी आणि थरथरत्या मानेनेे देवाजवळ प्रार्थना करते ही भावना केवढी सुखावणारी?
“या थाटल्या प्रपंचात, अहो झालो आम्हीच मायतात!”
तरीही हे शतकोत्तर वयोमानाचे, अमाप मायेचे, प्रेमळ छत्र आजही आमच्या डोक्यावर विराजते आहे! आम्ही खरेच किती भाग्यवान .हे भाग्य आम्हाला यापुढेही दीर्घकाळ लाभो, हीच त्या जगनियंत्यापुढे नम्र प्रार्थना .
…” आजीची माया असतेच अशी,
तूप रोटी साखर खावी जशी.
आजीची माया असतेच अशी,
मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी .. “
आम्ही सर्व नातवंडे,पतवंडे ,आमच्या भावी आयुष्यात ,
मोठी-आईच्या मायेच्या स्मृती, मनाच्या कुपीत तशाच कायमच्या जपून ठेवणार आहोत!
आमच्या मोठीआईला निरोगी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देते!!
दीप्ति प्रशांत चौधरी
ऑस्टीन,टेक्सास राज्य,
अमेरिका.
खूपच छान. आजीचे यथार्थ आणि अनुभव संपन्न वर्णन. आमची पण ती सख्खी मावशीच आहे.
दीप्ती खूप छान लिहिलंय.
तुमच्या मोठ्या आईला शतशः प्रणाम. आपण अतिशय सुंदर शब्दांत मोठीआई उलगडली आहे. खरंच आपण खूप नशीबवान आहात.आज आपणा सोबत ती आहे.पुण्यवान आहात. लेख वाचून खूप आनंद झाला.आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही.पुनश्च आईला शतशः प्रणाम.
तशी प्रत्येक आजीच्या मनात तिची नातवंडे व पतवंडे ह्यांच्यासाठी एक विशेष प्रेमाचा कोपरा राखून ठेवलेला असतो. पण ह्या मोठया आईचे रसायन खरोखर वेगळे आहे. अपुरे शिक्षण असूनही स्वतःला इतके up-to-date ठेवणे कौतुकास्पद आहे. वाचन, प्रवास, सामाजिक माहिती असणे आणि ती लक्षात ठेवणे हे वंदनीय आहे. विशेषतः दृष्टी अधू झाल्यानंतरही सर्व माहिती घेणे आणि ती लक्षात ठेवणे ही गोष्ट स्पृहणीय. मुख्य म्हणजे घरची परिस्थिती सुखकर नसतानाही आपल्या मुलांना उच्च विद्याविभुषित करुन मार्गी लावण्याचे महान कार्य करणाऱ्या ह्या विभूतीस साष्टांग नमस्कार.
Dear Digambar Waman Raut & family,
Very Interesting to read all informations related to your Mothi Aai.
She looks to be very bold, brilliant & to be after to achieve the goal very easily, which she decides which we come to know from her courage explained by you in detail in her above me mentitioned story.
Really Shatashah Pranam to your Mothi Aai.
Finasly to say that infornations very well written by Mrs Dipti & your family.
This is called the affection given by Aaji to you all.
– From Narendra H Raut / Om Sarvodaya Chs, Vile Parle East Mumbai, 400099
Deepti
Perfecct and ideal coverage about your Aajee – my Aatu. I rember your Panjee and her Sister who were together to groom all siblings.
Very good article. Keep writing as you all are blessed by Grandfather.
Rameshkaka.
अत्यंत छान शब्दांत व्यक्त केलेले मनोगत. वाचून आनंद झाला.
आजी ला शंभराव्या वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.DEd कॉलेज ला असताना आजीच्या सहवासात शिक्षण घेण्याचे भाग्य मलाही लाभले.अतिशय मनमिळाऊ स्वभावाने आजीने आम्हा विद्यार्थ्यांनाही लळा लावला आहे. दीर्घायु लाभो हीच प्रार्थना.
Dear Raut sir..
Wishing her all the best on this momentous day. Congratulations on reaching this impressive milestone. I hope her special day is filled with love and laughter.
Dipti has brought out her sketch so well.
She has a good knack of writing..
Rupert
Excellent Life Story of your Mother.Narreted so well..Best Wishes to her for a Blessed and Happy and Healthy Life ??????
प्रथमतः सौ. दीप्ती हीचे अभिनंदन!! अतिशय सुंदररीत्या आपल्या आवडत्या आजीचे शब्दचित्र ओघवत्या शब्दांमध्ये उभे केले आहे.
प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे स्री असते असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते परंतु इथे आवर्जून नमुद करावे असे वाटते तुम्हां सर्व राऊत कुटुंबीयांच्या यशस्वी वाटचालीमधे तुमच्या आजीचा वरदहस्त आहे.
नैमित्तिक काम करताना सुद्धा त्यांच्या अवांतर वाचनाच्या आवडीचा उल्लेख सद्यपरिस्थितीत भावून जातो. त्यांच्या अत्युच्च वैचारिक पातळीला शतशः नमन.
सर्वांनाच अशी मार्गदर्शक आजी मिळावी.
यानिमित्ताने आजींना शतक महोत्सवा निमित्त खूप खूप सार्या शुभेच्छा!!
दिलीप रा बिले
???? Best Wishes from entire Narvekar Family! We seek her blessings. We wish her the very best of health and well being!
I really appreciate the way Deepti has taken the pains to write this article in a beautiful language.
दिप्ती .. छान लिहीला आहेस लेख.
आजी नातीचं नातं तू खूप यथार्थ शब्दात वर्णन केले आहेस . तुझ्या मुलाच्या आजाराच्या काळजीने व्याकूळ झालेली आजी .. वाचताना मन हेलावले .
आपल्या शेतकरी कुटुंबात तिने जोपासलेला वाचनाचा छंद लक्षात घेण्यासारखा .
अभिनंदन .तुझे ..आजीचे अशा लेखाद्वारे अभिष्टचिंतन केल्याबद्दल. !
दीप्ती…खूपच छान शब्दात भावना व्यक्त केली आहे. तूझ्या आजीचे काही काही गुण तर मला माहित पण न्हवते.२ वर्षा पूर्वी मी माझ्या मोठ्या बहिणी बरोबर तिला भेटावयास गेले होते तर तिने आवाजावरून अचूक नावे सांगितली.तिच्या दीर्घायुष्याचे रहस्य जीवनातील प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेत राहणे हेच आहे. देव तिला उदंड आयुष्य देवो.
नमस्कार सौ. दिप्ती ताई
नाबाद101असलेल्या आजींबद्धल आपण अतिशय सुंदर आणि ह्रद्य मनोगत व्यक्त केले आहे. वडिलांप्रमाणेच तुमची लेखनशैली, भाषाशैली छान आहे. आजींचे सार्थ जीवनपट वाचतांना मला माझी मोठी आजी डोळ्यासमोर येत होती. ती सुध्दा चुलीवर,पाटा वरवंट्यावर वाटण करून 85माणसांचे जेवण करीत असे जात्यावर दळण दळून वाडीत अपार कष्ट करून सुध्दा लग्न,गौरी गणपती विविध प्रसंगी तालासुरात गाणी म्हणत असे.
या आपल्या आजींनी संघर्षमय जीवन जगूनच आपली पिढी घडविली आहे
या आजींवर नातवंडांचा गाढ विश्वास होता आधारवड होत्या त्या म्हणूनच.एका निरागस बालकाने आपल्या आजीला विचारले होते आजी,आजी,रामाला वनवासात पाठवले तेव्हा त्याची आजी त्याच्याजवळ नव्हती काग?
असो तुमच्या नव्हे नव्हे तर आपल्या या नाबाद101असलेल्या आजींना शतशत वंदन
आपली
सौ.हेमलता म. राऊत
किरवली वस ई???
खुपच सुंदर आणि यर्थात रचना दिप्ती ताई…. अंगाखांद्यावर खेळवते ती आजी.. छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनाचे सार सांगते ती आजी… खरच भाग्यवान आहात तुम्ही सर्व मुले, ज्यांना अशी प्रेमळ आजी मिळाली! आमच्या वतीनेही अशा प्रेमळ आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
मोठी आईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!???
आणि पुढील आयुष्य निरोगी जावो हि ईश्वर चरणी प्रार्थना !
दिप्ती यांनी छान शब्दशैली मधे भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यावरून मोठीआई यांचे व्यक्तीमत्व डोळ्यांसमोर उभे राहिले.
बंधू
लेख वाचला . मोठी आईच्या व्यक्तिमत्वाबद्दल यथार्थ वर्णन केले आहे .
मागे तुमच्या वडिलांविषयी दादांनी वर्तमानपत्रात लिहिलेला लेख वाचला होता .
असे आई वडील व आजी आजोबा मिळण्यास कुटुंबाची पूर्वजन्मीची पुण्याई असावी .
सौ दिप्तीने मोठी आईचे चित्र छोट्या छोट्या प्रसंगातून छान रंगवले आहे . तिची लेखन कला आवडली.
नात व आजीचे नातं असंच असतं .
आवडला लेख मला
तिचे अभिनंदन !
एप्रिल २०२२ मध्ये मी व हर्षा अॅास्टिनला एका classmate कडे जाऊन आलो . Colorado river च्या च्या डोंगरावर तिचे घर आहे . अतिशय रम्य वाटलं अॅास्टिन.
आपल्या मोठ्या आई साठी पाठवलेला संदेश फारच ह्रदय स्पर्शी आहे. आजीची माया ज्यांना अनुभवायला मिळते ते भाग्यवान असतात .आणी म्हणूनच सुंदर नात्याची गुंफण शब्दात वर्णन केली जाते .आपल्या या मोठ्या आजींना माझाही साष्टांग नमस्कार आहे .आपण सर्वच भाग्यवान आहात आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात व ते हि ईश्र्वर तुल्य कि त्यांचे प्रेम व मायेचा स्पर्श मिळतो.छान,खुपच छान.लेख.
लेख खूपच आवडला . आजीचे व्यक्तिमत्व सहजतेने उलगडत गेले. सर्व नातवंडांना वाटणारे आजीचे प्रेम पाहून मलाच खूप आनंद झाला . आजच्या जमान्यात असा जिव्हाळा क्वचितच आढळतो . मोठ्या आईंना सध्या तरी असाच नमस्कार
ऊत्कृष्ठ लेखना बद्दल दीप्ती ला धन्यवाद ।।
?????
आज आपल्या घोलवड मिञ परिवार गृप टाकलेला मेसेज वाचून खूप आनंद झालाय कारण १०१नाबाद शतकाचा वाढदिवस साजरा करून जो राऊत कुटुंबासाठी खूप मोठा क्षण प्रत्यक्षात अनुभव घेण्यास मिळाला.आई आपल्या जीवनातील प्रथम गुरू त्याचे आशीर्वादानेच आपल्यावर संस्कार घडवून आपली जीवन धन्य करणारी आई या दोन शब्दात संपूर्ण जग सामावून घेते….शतकवीर आईला कोटी कोटी प्रणाम व राऊत कुटुंबाना आईची सेवा करण्याची स्वभागय हे आपले नशीब
रवि बुजड ??????
Excellent write up. Compliments to Mrs Dipti. Also Compliments to your mother for successfully completing 100 years. Very rare feat.
Mr Sham Patil..Aurangabad
खूपच छान लिहिले आहे तू दिपी ताई .
मोठीआई ला निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
खूप छान express केलंयस दीप्ती. अगदी मनापासून आवडलं . तुझ्या मोठ्या आईला निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच सदीछ्या.
मातोश्री ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खर म्हणजे अशी आजी लाखात एकच. अशी आजी तुम्हाला लाभली ही तुमची पूर्व पुण्याईच. त्यामुळे तिची मुले, आणि पुढची पिढी जात्याच हुशार, तल्लख बुध्दीचे असणार यात शंका नाही. स्मरण शक्ती, वतकृत्व, वाचनाची आवड, उत्सुकता, आणि जाणून घेण्याची, त्यावर अभ्यास करण्याची प्रवृत्ती . हे सगळं उपजत तुम्हा सगळ्यांना लाभलं. धन्य मातोश्री आणि तिचा सर्व गोतावला.
सौ. दिप्ती अमेरिकेत अनुकूल परिस्थतीत राहून आपल्या आजीच्या शतकोत्तर वाढदिवसाच्या निमत्ताने आजीच्या मायेच्या जाणिवाची अगत्यपूर्व स्मरण करून ज्या भावना व्यक्त केल्या , तो लेख समाजात आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.खूप छान लिखाण.
आपला दिलीप काका,
चिंचणी, बलवाडी
मातोश्री ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं आरोग्य असच निरोगी ,उत्साही,प्रेमळ, अभ्यासू, राहो आणि उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
सौ. दिप्तीचे लेखन खूपच सुंदर .आजीचे शब्दचित्र अगदी हुबेहुब उभे केले आहे.
Good that you send this to me. I was not aware of the fact that your mom is such a capable woman .
Congrats to Deepti for bringing out the true Colors of her grandmother..
दिगूभाऊ,
दीप्तीने आजीविषयी लिहिलेला लेख वाचला. आजीचे व्यक्तिमत्व खूप सुंदर रेखाटले आहे. तिच्या गुणांचे हुबेहूब वर्णन केले आहे.तिची वाखाणावी अशी स्मरणशक्ती , त्यामुळे सर्वांशी सम्बन्ध जोडून आपुलकीने विचारपूस करणारी, कणखर पण तितकीच प्रेमळ. वृद्धावस्थेत आलेल्या अंधत्वावर
मात करून जीवन जगण्यातील तिची कमालीची सकारात्मक वृत्ती, निरनिराळ्या माध्यमातून ज्ञान मिळवण्याची वृत्तीच तिला उत्साही व आनंदी ठेवते असे वाटते. अश्या आमच्या ताईला वयाच्या शतकपूर्तीनन्तरही तशीच निरोगी, निरामय आयुष्य जगू दे. अशी प्रार्थना करते.
उज्ज्वला विवेक
चि. दीप्ती,
आजीबद्दल खूप छान लिहिले आहेस. मनातल्या भावना लेखणीत उतरवणे ही पण कला आहे. आणि ती कला तुला बाबा प्रमाणे
तुला छान साध्य झालेली दिसते . तुझे मनापासून अभिनंदन आणि कौतुक..
दीप्ती तू आजी हुबेहूब माझ्या डोळ्यासमोर उभी केलीस??
तुझ्या आजीशी माझाही संबंध आल्यामुळे मलाही तिचा सहवास लाभला माझी मावशी माधुरीची आई अशीच सोमू मावशी सारखी हुशारच आहे ती म्हणजे आमच्या जीवनातील एक अविभाज्य अशी जवळची आहे सोमू मावशीला माझ्या वाकून नमस्कार त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना?
खूप खूप आवडले, दिपी! छान शब्दांकन. मी जे तूझ्या मोठ्या आईला थोडे फार पाहिले आहे त्या वरून सांगतो, तू अतिशय नेमक्या शब्दात तिचे शब्दचित्र समर्थपणे उभे केले आहे.
मोठया आईचे आणि तिच्या नातीचे खूप कौतुक!
?❤️
खूप सुदंर वर्णन! डोळ्यासमोर व्यक्तिमत्त्व उभे राहते. तिला मनापासून नमस्कार! आणि तिचे अभिनंदन!???
तुम्हाला तुमच्या आईचा इतका दीर्घ सहवास लाभला त्याबद्दल तुमचे अभिनंदन तुमच्या मातोश्रींना यापुढे ही असेच आरोग्यदायी दीर्घायु लाभो.
दिप्तीने आपल्या आजीचे व्यक्तिमत्व खूप लाघवी पणे रेखाटले आहे. तिलाही धन्यवाद.
दीप्तीने आपल्या लेखात आजी – मोठी आई बद्दलच्या तीच्या बालपणापासूनच्या आठवणींचा खजिनाच सर्वांसमोर उघडा केला आहे. आजीचे नातवंडांवरील प्रेम माया आणि त्यांच्यातील अतूट नाते याचा प्रत्यय लेख वाचताना वेळोवेळी येतो. खूपच छान लेख.
आमच्या मोठ्या मावशीला शतकोत्तर उर्वरित आयुष्यासाठी उत्तम आरोग्य लाभो हिच प्रभू चरणी प्रार्थना.
दिप्तीने सोमुमावशी बद्दल खूपच छान लेख लिहिला आहे .लेख वाचताना तुझी आई डोळ्यासमोर उभी राहते एवढे छान हुबेहूब वर्णन केले आहे लिहण्याची कला तुझ्या पासून तिच्या कडे आलेली दिसते.सोमुमावशीला शतकोत्तर वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि तिचा प्रेमळ सहवास तुम्हा सर्वांना दीर्घकाळ लाभो ही सदिच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना
दीप्तीला अजून लिहण्याची विनंती.।।
??
Beautiful write-up. I think literary skill runs in your family. In today’s age where people don’t care about their parents it’s really heartwarming to know that there are some who celebrate their mother’s 100th birthday
नमस्कार दिगंबर बंधू
आजीआजोबा आणि नातवंडांच्या नात्यात जो जिव्हाळा आणि जे प्रेम आहे ते अन्य दुसर्या कोणत्याही नात्यात नाही. नातवंड म्हणजे दुधावरची साय ही उपमा एकदम सार्थ आहे. दीप्तीने आपल्या मोठ्या आईच्या म्हणजे आजीच्या सांगितलेल्या आठवणी अश्याच अगदी हृद्य आहेत. आपल्या आजीच्या जीवनाचा दीप्तीने अतिशय डोळसपणाने चौफेर आढावा घेतला आहे.
दीप्तीने वर्णन केल्याप्रमाणे आपली आई नुस्ते दिर्घच नाही तर अतिशय समृद्ध आयुष्य जगत आहे. ज्या काळातील आपल्या आईचा जन्म आहे त्याचा विचार करता हे अनोखे आहे. आपल्या कुटुंबाच्या जडणघडणीत तिचा मोठा वाटा आहे आणि आपल्या मुलाबाळांचे यश व कर्तृत्व पाहून तिला खूप समाधान लाभत असेल यात काही शंका नाही.
अशी मोठी आई मिळणं हे आपल्या सगळ्यांचे भाग्य आहे. मोठ्या आईला निरामय दिर्घायुष्य लाभो आणि तुम्हा सर्व मुलांना आणि नातवंडांना तिचा दीर्घ सहवास लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
लेख अत्ताच वाचून झाला.दीप्तीने आजीचे व्यक्तिमत्व खूप छान लिहीले आहे.त्यांचा प्राप्त आयुष्य आनंदात व्यतित करण्याचा स्वभाव ,वैचारिक बैठक, कुटुंबियांबद्दलचा जिव्हाळा इत्यादी गोष्टी मनाला भिडल्या.आजींना माझा सादर नमस्कार.
सौ.दिप्तीस
खुप छान आजीचे वर्णन केलेस
डोळ्या समोर मावशी उभी राहिली
जेवढी ती कडक स्वभावाची तेवढी ती हळवी हे तुझ्या मुलाच्या आजारातून बरा झाल्यावर किती हळवी होऊन देवाची आठवण करून दिली
ते तू वर्णनाने हळवा कोपरा छान लिहिलास
असेच लिहीत रहा आजीला नमस्कार
खुप छान ??
दिपी ताई, हुबेहुब वर्णन केले आहे. खूपच छान लेख.
आदरणीय राऊत साहेब,
सप्रेम नमस्कार
सौ. दिप्तीस अनेक आशिर्वाद
नातीने मोठ्या आईला ( आजीला) 101 वाढ दिवसा निमित्ताने दिलेली आदरांजली सुंदर, समर्पक आणि भावपूर्ण वाटली. असं सहज सुंदर आणि ओघवती भाषा शिकता येत नाही. ती नैसर्गिक देणगी आहे. तुम्ही दोघांनी ती बहाल केली आहे.
खाण तशी माती अस म्हणतात ते अगदी खरं आहे.स्वातीने ते आपल्या लिखाणातून सिद्ध केले आहे.
मी माझगाव टर्मिनल मध्ये आपल्या सोबत काम करीत असता एक दिवस कोसबाडच्या
फार्म हाऊस वर मुक्काम केला होता. तेव्हा बोर्डी- चिंचणी भेटीत तुमच्या आईची भेट झाली होती. पहाता क्षणी प्रेमात पडाव अस व्यक्तिमत्त्व. अतिशय
सोज्वळ, निरागस आणि खानदानी. आपल्या लेखात ते अचूक टिपले आहे.
आजी आणि नातीचे नातं जिवाभावाच्या मैत्रिणीचे असते.
मनातील कोमल भावना व्यक्त करण्यासाठी एक हक्काची जागा. हा लेख म्हणजे नातीने
आजीला दिलेली अप्रतिम आणि
अमूल्य भेट.
आजच्या व्यावहारिक जीवनात
कुटुंबातील नाती कृत्रिम बनत असताना राऊतांच्या घरात मात्र ती जिव्हाळ्याची राहिलेली दिसतात. हा आई- वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा परिणाम.
कोणालाही हेवा वाटावा असे घरातील वातावरण म्हणजे
घरातील जेष्ठ माणसांनी केलेल्या
निरपेक्ष, निस्वार्थी, निरामय आणि निरागस प्रेमाने दिलेला
आशीर्वादाच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
देव जगात आहे असे आपण मानतो. त्याचे अस्तित्व देखील अनुभवतो. पण प्रत्यक्षात त्याचे रूप पहिले नाही पण कधी दर्शन झालेच तर ते आई सारखे असणार ह्यात वाद नाही.
तुमच्या मोठ्या आईला माझ्या सर्व कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा आणि दीर्घायुष्य चिंतन.
?????
जगन्नाथ तुरे आणि कुटुंबीय
Dipi Tai ,very well you narrate about kaku Aaji….?
आजीला शंभराव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
सौ. दीप्तीने खूप छान शब्दांत आजी व नातीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपली मामा आजी डोळ्यासमोर आली. अशी आजी लाखात एकच असते. तुमची पुण्याई खूपच म्हणून अशी आई -आजी मिळाली.
आजींना उर्वरित आयुष्य आनंदी उत्साही व आरोग्यदायी जावो हीच प्रभूंच्या चरणी प्रार्थना
नमस्कार काका, नेहेमी सारखाच सुंदर लेख. सर्व आठवणी, भाषेवरील प्रभुत्व आणि व्यक्तिमत्वाची प्रभावी मांडणी यामुळे आजींच रूपच समोर उभे राहिले. आभारी आहे ,हा लेख मला पाठविल्याबद्दल. तसेच उशिरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व ?