“ज्योत ज्योतीला मिळून गेली” प्रमोद चुरी गेले!

आपल्या सो क्ष संघ फंड ट्रस्टचे माजी मुख्य विश्वस्त श्री. प्रमोद गजानन चुरी यांचे  दुःखद निधन झाल्याची बातमी सकाळीच कळली. आज मकर संक्रांतीचा शुभ दिवस! आज पासून सूर्यदेव उत्तरेकडील संक्रमण सुरू करतात. हा वृद्धिंगत तेजाचा शुभ काल समजला जातो. मात्र सर्व चुरी कुटुंबीय, समाज बांधव व इष्टमित्रांसाठी हा काळादिवस ठरला! एक समाजाभिमुख, कर्तृत्ववान, शांत, सौम्य, प्रेमळ परंतु तेजस्वी व्यक्तिमत्व पहाटे पहाटेच अस्तंगत झाले !

     प्रमोद चुरी म्हणजे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते. बुद्धिमत्तेने तेजतर्रार, सौम्य मवाळ बोलणे, अभ्यासूपणा, आक्रमकता नसली तरी आपले बोलणे योग्य वाटल्यास त्यासाठी आग्रही, सार्वजनिक जीवनात कोणालाही  न दुखविता आपले विचार सौम्य शब्दात धीर गंभीरपणे पटवून देऊन, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती. कोणताही उपक्रम हाती घेण्याआधी अभ्यासू वृत्तीने त्याचा सर्वांगीण विचार, व अत्यंत महत्त्वाचे म्हणजे  पारदर्शक आर्थिक व्यवहार, ही त्यांच्या कामाच्या पद्धतीची वैशिष्ट्ये! म्हणूनच समाजाच्या आरोग्यधामाचे संचालन व मुख्य विश्वस्त म्हणून फंड ट्रस्टचा कारभार पाहताना, अनेक समाजोपयोगी  उपक्रम पूर्ण करून ट्रस्ट  फंडाच्या आर्थिक व्यवहारात एक रुपयाचीही साशंकता  कधी निर्माण झाली नाही!!

   माझ्या व त्यांचा गेल्या 70 वर्षांचा परिचय. बालपणीपासूनचा एक मित्र, विद्यार्थी दशेत प्रेमळ मार्गदर्शक, आम्हा दोघांचे व्यवसाय वेगळे असले तरी माझा प्रेमळ सल्लागार, समाजकार्यात ,सो. क्ष. संघ फंड ट्रस्टमधील एक वरिष्ठ सहकारी! वैयक्तिक जीवनात एक उच्च पदस्थ व्यवस्थापक, ज्येष्ठतेमुळे आपल्या धाकट्या भावंडांना  प्रसंगानुरूप योग्य ते मार्गदर्शन व मदत करणारा मोठाभाऊ, आपल्या मुलांना त्यांच्या  गुणवत्तेनुसार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा पिता, असे त्यांच्या यशस्वी जीवनाचे अनेक पैलू मला जवळून पहावयास मिळाले. मला खूप काही शिकता आले. मात्र आपल्या कर्तृत्वाचा व यशाचा गाजा-वाजा त्यांनी कधीच केला नाही. सदैव प्रसिद्धीपासून दूर असलेल्या या माझ्या प्रिय मित्राचा सहवास प्रदीर्घ काळ मिळाला हे माझे भाग्य!! 

    प्रमोदचे आईकडील चुरी कुटुंबीय व वडीलांकडील चुरी कुटुंबीय, दोन्ही, समाजातील नावाजलेली, हुशार व कर्तृत्ववान कुटुंबे! या दोन्ही घराण्यांचा हुशारीचा वारसा प्रमोदकडे आल्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात कठोर परिश्रम ,बुद्धीचे सामर्थ्य व प्रांजल वृत्तीच्या जोरावर यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा व विपुल संपर्काचा फायदा समाजालाही  करून दिला.

     सुमारे 100 वर्षापूर्वी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन जर्मनीमध्ये उच्च प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेले त्यांचे  मामा, कै. रामकृष्ण चुरी( श्री जयंत, मकरंद, प्रफुल्ल यांचे पिताश्री) हे आपल्या समाजातील  पहिले इंजिनियर असावेत. ज्येष्ठ मामा कै .माधवराव चुरी( मुंबई महापालिका माजी नगरसेविका श्रीमती सुधा चुरी यांचे वडील) यांनी त्या कालखंडात मुंबईत येऊन गोरेगावला ‘चुरीवाडीत’ आपले साम्राज्य उभे केले. मामा कै.काशिनाथराव चुरी( कै श्रीनिवास चुरी यांचे वडील )यांनी बोर्डीतच राहून शेती व समाजकार्याने परिसरात नावलौकिक मिळवला. मामा कै. यादवराव चुरी(श्री रघुनंदन चुरी. श्री रमेश चुरी व डॉ.राजीव चुरी यांचे पिताजी) यांनी मुंबईच्या सायन इस्पितळात दीर्घ सेवा दिली. जुन्या काळातील आपले समाज बांधव त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय सेवेची आठवण अजूनही करतात. सर्वात धाकटे मामा कै भास्करराव चुरी श्री विवेकानंद चुरी यांचे वडील) तहसीलदार होते. त्यांच्या क्षेत्रातील सेवेचा, ज्ञानाचा उपयोग समाज बांधवांना होत असे. एकुलती मावशी कै. कमल  काशिनाथ पाटील या वसईत होत्या.

    प्रमोदचे आजोबा कै. कुशाबा चुरी  हे त्या काळातील एक सुशिक्षित, सालस शेतकरी. वडील कै.गजाभाऊ हे देखील हुशार विद्यार्थी. तत्कालीन मॅट्रिक परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण होऊन, सामान्य परिस्थितीमुळे उच्च शिक्षण न घेता नोकरी व्यवसायासाठी मुंबईत आले. एका परदेशी विमा कंपनीत काम सुरू करून  एल.आय.सी.या भारतीय आस्थापनातून सेवानिवृत्त झाले.  गिरगावात एका लहान चाळीतील दोन खोल्यात संसार करून आपल्या सर्व मुलांना त्यांनी उत्तम शिक्षण दिले . खडतर परिस्थितीतही मुलांचे उज्वल भवितव्य घडविले!.

    श्री. प्रमोद चुरी हे विल्सन हायस्कूलचे एक अत्यंत हुशार विद्यार्थी. माजी विश्वस्त कै.रमेश चौधरी तेथे त्यांचे ‘सर’. प्रमोद नेहमी रमेशजींना सर म्हणूनच संबोधित असे! विश्वस्त म्हणून रमेश भाई बरोबर ही  काम करण्याची संधी मला मिळाली. रमेशभाई   प्रमोदच्या हुशारीचे अनेक किस्से मला ऐकवीत. अगदी  थोड्या गुणांसाठी त्यावेळी त्यांचा एस. एस. सी. परीक्षेतील गुणवत्ता यादीतील नंबर हुकला . मात्र पुढे एल्फिन्स्टन महाविद्यालय व व्ही जे टी आय तंत्र महाविद्यालयसारख्या भारतातील  नामांकित   महाविद्यालयात प्रवेश मिळवून त्यांनी बी ई इलेक्ट्रिकल व बी ई.मेकॅनिकल या दोन्ही परीक्षामध्ये प्रथम वर्गात उत्तम यश मिळविले. असे यश मिळवणारे आपल्या समाजातील ते पहिले द्विपदवीधारक होत! आणि त्या शिक्षणकालादरम्यानचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे VJTI मधील  त्याचे सहाध्यायी मित्र, जागतिक ख्यातीचे, भारताचे अणु शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर  होते !! प्रमोदच्या गुणवत्तेचा दर्जा काय होता हे या गोष्टीवरून कळते ! डॉ.काकोडकरांच्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या अनेक सुरस गोष्टी प्रमोद मला सांगत असे.  पुढे क्रॉम्प्टन-ग्रीव्हज् व ब्लू-स्टार, सारख्या नामांकित जागतिक व्यवस्थापनात त्यांनी जनरल मॅनेजर/ व्हाईस प्रेसिडेंट (V P) अशा  उच्च पदावर काम केले.  येथून निवृत्त झाल्यावर आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.

      STAR COLLERS&CONDENSORS(INDO- BRITISH VENTURE) या त्यांच्या कंपनीचे आस्थापन सध्या जळगावमध्ये आहे . एका प्रसिद्ध ब्रिटिश कंपनीच्या सहकार्याने सुरू केलेले हे आस्थापन असून, विविध प्रकारच्या शीतगृहांची उभारणी हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. तो त्यांचा आवडीचा व खास हातखंडा विषय होता. भारतातील अनेक नामांकित शीतगृहे त्यांनी यशस्वीपणे उभारली जी आजही व्यवस्थित काम देतात. याविषयी ते स्वतःहून जास्त  बोलत नसत .आम्ही दादरला विश्वस्त कार्यालयात असताना, कधी मोकळा वेळ मिळाल्यास मी स्वतःहून चौकशी केल्यास ,ही माहिती मला मिळे. सर्व सामाजिक ,कौटुंबिक गडबडीतून  वेळ काढून ते भुसावळला महिन्यातून एकदा तरी आपल्या फॅक्टरीला भेट देत असत.

     कन्या सौ.संयोगिता  I A S परीक्षा उत्तीर्ण होऊन सन्मानित झालेली समाजातील पहिली मुलगी होय. सद्या ती अहमदाबाद येथे कमिशनर, इनकम टॅक्स म्हणून कार्यरत आहे. जावई श्री. मुदीत नागपाल हे देखील कमिशनर, इन्कम टॅक्स आहेत. चिरंजीव ऋषिकेश B.E.(COMPUTOR) असून अमेरिकेत कार्यरत आहे. स्वतःची IT  कंपनी असून इतर अनेक व्यवसायात त्याने यश मिळविले आहे. सुनबाई सौ.भावना सुद्धा  त्याच व्यवसायात अग्रेसर आहेत. 

        प्रमोदची धाकटी भावंडे ही त्याच्यासारखीच हुशार व कर्तबगार आहेत. धाकटे बंधू अरविंद  सुद्धा बी.ई.(इलेक्ट्रिकल),ऊत्तमरीत्या उत्तीर्ण होऊन त्यांनी ऊच्च पदावर नोकरी केली. अरविंद सध्या आपल्या उच्चविद्याविभूषित अमेरिकास्थित चिरंजीवाकडे असतात.दोन्ही भगिनी श्रीमती सुनंदा अशोक राऊत व सौ.लीना वसंत वर्तक या आपापल्या संसारात यशस्वी असून त्यांचीही मुले कर्तबगार आहेत. देशा परदेशात आपला व्यवसाय अथवा नोकरी करीत असतात. कै श्री अशोक राऊत हे वसई विद्यावर्धिनी कॉलेज चे प्रिन्सिपाल होते.दुर्दैवाने अकाली गेले.श्री वसंत वर्तक व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून समाजकारणात सक्रिय आहेत. या दोन्ही स्नेह्यांचा माझ्याशी जवळून संबंध आला.लहान बंधू सुधीर स्वतःचा व्यवसाय करतात. त्याचे चिरंजीव ऑस्ट्रेलियात ज्येष्ठपदस्थ आहेत. ही सर्वच भावंडांनी आपापल्या क्षेत्रात उज्वल यश मिळूऊन एक आदर्श कुटुंब म्हणून सामंजस्य व बंधुभावाचे  छान उदाहरण समाजा पुढे ठेवले आहे.

       श्री.गजाभाऊंचे धाकटे बंधू श्री. विठ्ठल भाऊ हे देखील शासकीय उच्च पदस्थ अधिकारी होते.त्यांची दोन्ही मुले उल्हास व मिलिंद उच्च शिक्षित असून मिलिंदने सुद्धा आय आर एस ही (IRS), पदवी कामातील जेष्ठता व गुणवत्तेमुळे मिळऊन,ॲडिशनल इन्कम टॅक्स कमिशनर या मोठ्या पदावर काम करीत असतात. मातुल चुरी कुटुंबीय( आईकडील सर्व नातलग मंडळी) देखील विविध क्षेत्रात आपल्या यशोपताका झळकावीत आहेत.  एकुलती आत्या कै. शारदा रघुनाथ पाटील म्हणजेचकै. राजाभाऊ व  श्री केसरीभाऊ पाटील यांच्या मोठ्या वहिनी होत.

     या दोन्ही( आईकडील व वडिलांकडील), चुरी कुटुंबीयांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे .ही सर्व मंडळी  गुणवत्ताधारक, उच्चशिक्षित व आपल्या व्यवसाय धंद्यात खूप नामांकित आहेत. कोणत्याही समाजात असे एकाच कुटुंबातील सदस्यांनी पिढ्यान पिढ्या दाखविलेल्या गुणवत्तेचे दर्शन क्वचितच दिसत असेल. माझ्या सदभाग्याने या  दोन्ही कुटुंबीयांतील अनेक सदस्यांचा वैयक्तिक संबंध आल्याने मी प्रभावित झालो व  ही माहिती देऊ शकलो . खरे तर विस्तारभया मुळे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न आहे.त्यामुळे गैरसमज होऊ नये ही विनंती.दुर्दैवाने ही मंडळी प्रसिद्धीपासून दूर राहिल्याने त्यांच्या ज्ञानाचा,अनुभवाचा फायदा समाजाला हवा तेवढा होऊ शकला नाही.

     समाजाच्या विश्वस्त पदी पती-पत्नी उभयता सन्मानित होण्याचा सन्मान श्री. प्रमोद व सौ. कल्पलता चुरी या दाम्पत्यास मिळाला आहे. अशा रितीने आपल्या वैयक्तिक,कौटुंबिक, व्यावसायिक तसेच सामाजिक आयुष्यात प्रमोद भाईंनी आपले वेगळेपण निर्विवादपणे सिद्ध केले. मागे उल्लेख केल्याप्रमाणे यशाची एवढी उत्तुंग शिखरे पादाक्रांत करूनही याची प्रसिद्धी कधीच केली नाही. जवळचा मित्र म्हणून माझ्याशी कधीतरी ओझरता उल्लेख करीत. सहसा दृष्टोत्पत्तीस न येणारा हा  आगळा गुण आहे! नम्रपणातच माणसाचं मोठेपणा दडलेलं असतं ! ही नम्रताच माणसाला यशाची नवी नवी शिखरे दाखवीत असते आणि म्हणून नम्रतेला उंची असते,प्रतिष्ठा असते, स्वतःची ओळख असते. प्रमोद कडे हे सर्व होते!!

   अमृत महोत्सवी वाढदिवशी, सहल सम्राट श्री केसरी भाऊ पाटील, तत्कालीन अध्यक्ष सो क्ष संघ ,सत्कार करीत असताना.

    माझ्या सुदैवाने समाजातील व इतरही काही सभासमारंभा साठी जाताना त्यांची होंडा  गाडी व प्रमोद-लताताई यांचा सहवास, हे समीकरण ठरलेले असे.त्यांचा कमल ड्रायव्हरही  एक कुटुंबातीलच व्यक्ति होती. त्यालाही खूप सन्मानाची वागणूक मिळे. प्रवासामध्येच थोड्या वैयक्तिक गप्पा होत. जेवणाची वेळ असल्यास वाटेवरच कोणत्यातरी चांगल्या उपहारगृहात जेवण ही एकत्र घेत असू. ते दिवस आज आठवले म्हणजे… 

    “ते हि नो दिवसा गतः ..”ते सुखाचे, सुंदर दिवस आता संपले ,असे वाटून मन उदास होते.

       बोर्डीला त्यांचे घर (मोठेघर) व माझ्या मामाचे घर समोरासमोर, त्यामुळे प्रमोद, अरविंद ही  भावंडे सुट्टीत आल्यानंतर आम्हा मित्रांना ती पर्वणी असे. मी व माझा बोर्डीतील खास मित्र  श्रीकांत पाटील( प्रसिद्ध उद्योगपती श्री अशोक पाटील यांचे काका), आमच्या गप्पा व संध्याकाळी बोर्डी किनाऱ्यावर रपेट मोठी पर्वणी असे. क्वचित बोर्डीतील काही इतर मित्रही असत.अरविंद -प्रमोद यांचे अभ्यासू संभाषण आम्हाला खूप काही देऊन जाई. गावांतील अनेक जाणकार पालक आपल्या मुलांना,” प्रमोद-अरविंद सारखा अभ्यास करा” असा उपदेश देत ,हीच त्यांच्या बालपणापासूनच्या हुशारीची व कर्तृत्वाची पावती आहे! या लेखासाठी श्रीकांतने सुद्धा काही माहिती पुरविली आहे.

     पुढे  शिक्षणानुसार आमची कार्यक्षेत्रे, कार्यस्थले बदलली . माझा बहुतांश काल मुंबईतच गेला. प्रमोदला गुजरातेत भरूच येथे जावे लागले .पुढे तो मुंबईत आला. मात्र आमचा संपर्क असे. नोकरीच्या कालखंडातही आपल्या समाजाशी विशेष संपर्क नसला तरी रोटरी क्लबच्या माध्यमातून  समाजसेवा सुरू होती. मी कै. पूज्य तात्यासाहेब चुरी वसतिगृहाचा विद्यार्थी व नंतर रेक्टर-व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्याला त्याचे खूप कौतुक होते व ते बोलूनही दाखवी.

   काही वर्षापासून मी, माझे काही जुने शिक्षक शालेय विद्यार्थी मित्र समाजातील समाजसेवक यांचेवर चरित्रात्मक लेखन करतो आहे याचे त्याला खूप कौतुक होते. माझे बोर्डी शाळेतील शिक्षक श्री. एस. आर. सावेसर व शाळेचे पहिले प्रिन्सिपॉल श्री. आत्माराम पंत सावे यांचे वरील लेख वाचल्यानंतर प्रमोदने मला दिलेली शाबासकी त्याच्याच शब्दात देत आहे

     “You have  presented S. R. Save sir’s life story in real form. Your writing style is amazing.Perhaps you would have been famous and popular Marathi writer, if you had continued your graduation in Arts and Literature instead of in Science. Lata also liked and felt that nobody else could have depicted Sir’s life as effectively as you did”. 

   शाळेचे पहिले मुख्याध्यापक व लता ताईंचे आजोबा कै. आत्माराम पंत सावे यांच्यावरील लेखात प्रमोदने म्हटले आहे,

   “Simply excellent ! Your idioms in describeing person’s  profile is commendable. We were trying to get you on phone to congratulate and thank you personally , but no response. Lata  also liked  this article very much.”

    मित्राच्या एवढ्याशा कामाचे असे कौतुक करण्यासाठीही मनाचा खूप दिलदारपणा लागतो. कोणाचाही एवढासा  गुण, पर्वता एवढा करून सांगणारी ‘दिल-दर्या’ माणसे आज खूप दुर्मिळ !. काय दैवयोग आहे पहा,  ज्याने इतर समाज धुरीणांवरील लेख वाचून  माझे कौतुक केले ,आज त्याच्यावरच हा स्मृती-लेख लिहिण्याची पाळी माझ्यावर आली! एवढ्या लवकर ती येईल असे वाटत नव्हते.

   मला खात्री आहे ,हा लेख वाचून नेहमीच्या नम्रतेने  पण  खट्याळपणे स्वर्गातूनही तो सांगेल,

  “अरे दिगंबर काय ,थट्टा करतोस कायरे माझी? एवढं मोठं मी काय केलं?  पण तू मांझी  आठवण केलीस ,कष्ट घेतलेस.. तुला धन्यवाद!!”

      2005 साली समाज बांधवांनी निवडलेल्या विश्वस्त मंडळात श्री. प्रमोद चुरी  मुख्य विश्वस्त,  मी कार्यकारी विश्वस्त, श्री. विलास बंधू चोरघे, श्री. सतीश वर्तक  व श्री. शांताराम जी ठाकूर विश्वस्त असे मंडळ निवडले. श्री. सतीशनानांच्या अकाली निधनानंतर श्री. भालचंद्र भाई पाटील हे विश्वस्त म्हणून निवडले गेले . विशेषतः विद्यार्थी वर्ग व वृद्ध-सेवा संबंधीत अनेक प्रकल्प प्रलंबित होते. समाज बांधवांनी मोठ्या अपेक्षांनी आम्हास कार्यभार सोपविला होता. मी खरोखर भाग्यवान. बालपणीच्या एका मित्राबरोबरच सामाजिक कार्यात योगदान देण्याचे भाग्य मला मिळाले. माझ्या आयुष्यातील तो एक अत्यंत सार्थकी लागलेला सुंदर कालखंड आहे .त्या गतकालाचा थोडक्यात लेखाजोगा दिला तर तो अवाजवी ठरू नये. प्रमोद चुरी यांच्या सर्वांगीण कर्तृत्वाचे दर्शन त्यातून होईल!

      अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेले गणगोत ,आनंदाने खुललेला प्रमोद..

         हा नऊ वर्षाचा कालखंड आमच्या सर्व विश्वस्तांसाठीच नव्हे, तर  सर्व समाजासाठी  विशेषतः  विद्यार्थी व वसतीगृह-विद्यार्थीवासीयासाठी  महत्त्वाचा, फलस्वरूप ठरला. समाज घडणीसाठी  व नियोजनातील काही महत्त्वाचे बदल, त्याच प्रमाणे वर्तमान  कालानुरूप काही  सुधारणा  आम्ही  घडवून आणण्याचा  प्रयत्न केला.  प्रमोदभाईंचे नेतृत्व सर्व विश्वस्तांची एकजूट व समाज बांधवांचे सक्रिय सहाय्य यामुळे बहुतांशी  यशस्वी ठरलो. या सर्व नवीन उपक्रमासाठी अर्थातच आर्थिक निधीची  खूप गरज होती. समाज बांधवांकडून जमविलेला निधी, ट्रस्ट फंडचे वाढलेले उत्पन्न व अत्यंत पारदर्शक कारभार यामुळे हे सर्व उपक्रम पूर्ण करूनदेखील, फंड ट्रस्ट निधीही आम्ही वाढवून दाखविला.  त्याचाच थोडक्यात लेखाजोगा मी खाली मांडत आहे.

    विद्यार्थी शैक्षणिक मदतीत वाढ..

आमचा सोक्ष संघ हा मूलतः विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन, समाजात शिक्षणाचा प्रसार सर्व स्तरात व्हावा या उद्देशाने स्थापला गेला. मात्र पुढे शिक्षणाचा खर्च जरी वाढत गेला तरी विद्यार्थी संख्याही वाढली गेल्याने अनेक वर्ष रुपये 500 एवढीच जास्तीत जास्त वार्षिक मदत प्रत्येक विद्यार्थ्यांला  दिली जात असे .श्री प्रमोद चुरी यांनी ही मदत वाढविण्याची कल्पना पुढे आणली . या योजनेची व्यावहारिक व अभ्यासपूर्ण आखणी करण्यासाठी  आम्ही दोघे सतत पाच महिने,  प्रत्येक शनिवार -रविवार ,बोरीगाव शाखेपासून ते अगदी दादर मुंबई शाखेपर्यंत, स्थानिक शाखा चिटणीसासहित  प्रत्यक्ष भेट देऊन हे अवघड परंतु समाधान देणारे काम केले. मदत घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी -विद्यार्थिनी, पालक तसेच स्थानिक समाज बांधवांशी चर्चा केली .अत्यंत उपयुक्त माहिती आम्हास मिळाली. श्री. प्रमोद चुरी  यांनी एक सर्वंकष आराखडा तयार करून तो सर्वसाधारण सभेकडून मंजूर करून घेतला. प्रत्येकी मदत रुपये पाचशे ऐवजी कमीत कमी रुपये पाच हजार पर्यंत करावी, अशी ही योजना होती. त्यामुळे दोन लक्ष रुपयापर्यंत होणारी एकूण शैक्षणिक मदत, रुपये दहा लक्ष पर्यंत मिळू लागली. होतकरू गरीब विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट होती. ट्रस्ट फंड व शिक्षण फंडातून वाढीव रक्कम मिळविली. आजही ही योजना संघ व्यवस्थापन व विश्वस्त मंडळाने उत्तम प्रकारे  चालू ठेवली आहे .

     विद्यार्थी शिष्यवृत्ती फंड वाढ

   गुणवत्ताप्राप्त व हुशार विद्यार्थ्यांना द्यावयाच्या शिष्यवृत्तीची एकूण  रक्कम ही अनेक वर्षापासून रुपये 50 000 एवढीच होती. त्याबाबतीत देखील विश्वस्त मंडळाने पुढाकार घेऊन देणगीरूपाने भरीव रक्कम  जमवून ,हा फंड सुमारे पाच लाख रुपयापर्यंत वाढविला. होतकरू व  हुशार मुलांना  मोठी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून मिळू लागली.

      यामुळे संघाकडून होणाऱ्या ‘गुणगौरव सोहळ्याला’ अप्रत्यक्ष फायदा झाला. विद्यार्थी व पालकांची उपस्थिती वाढू लागली. हा सोहळा आज अत्यंत भव्य व लक्षणीय उपस्थितीत होत असतो.

     पूज्य कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर नूतनीकरण

     श्री. प्रमोद चुरी  यांनी विश्वस्त मंडळाचा पदभार स्विकारतेवेळी या स्मारक मंदिरास 45 वर्षे झाली होती. आम्ही सर्व समाज बांधव या वास्तूला ‘कामधेनु’ ,’दीपस्तंभ’,असे संबोधितो. आमच्या अनेक उपक्रमांचा आर्थिक कणा म्हणजे  हे स्मारक मंदिर आहे ! कालौघात अनेक प्रकारची झीज होऊन काही दुरुस्त्या करणे अत्यंत आवश्यक झाले होते. प्रथमतः एका विख्यात कंपनीकडून ‘ स्ट्रक्चरल ऑडिट’ करून घेतले व त्यांच्या सूचनेनुसार संपूर्ण इमारतीचे दुरुस्तीकरण जाणकार कंत्राटदाराकडून करून घेतले.   विशेष म्हणजे कालानुरूप आवश्यकता म्हणून, विविध सभा समारंभांना देण्यात येणाऱ्या सभागृहाचे वातानूकुलन (Air Conditioning ) करणेही आवश्यक होते. प्रमोदभाई   हे स्वतः त्यातले वाकबगार तंत्रज्ञ असल्याने अत्यंत अल्प खर्चात, वसईतील श्री.अशोक पाटील  या समाज बांधवाकडून  हे काम आम्ही  माफक दरात करून घेतले. आज गेली पंधरा वर्षे ही यंत्रणा समाधानकारकपणे सेवा देत आहे.

        पूज्य कै.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वस्तीगृह सुविधा .

    सन 1961 सालीसुरू झालेल्या आपल्या या वसतीगृहात 2005 सालापर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक टेबल, खुर्ची , बिछाना-पलंग  अशा मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. सकाळी चहा-नाश्त्याची सोयही नव्हती. अभ्यासाकरिता अत्यंत उपयुक्त अशा या सुविधासाठी मुख्य विश्वस्त प्रमोदभाईंनी पुढाकार घेऊन सर्व संबंधितांचे मन वळवून पैशाची व्यवस्था केली. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एक  आराखडा तयार केला. इंटरनेट सुविधासह प्रत्येक विद्यार्थ्यास आज ह्या  सुविधा मिळत आहेत. वसतिगृहवासीय विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.

   कै..सौ इंदुताई व पद्मश्री कै.भाऊसाहेब वर्तक विश्रामधाम उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब व इतर मान्यवरासहित,माजी अध्यक्ष श्री. सदानंद राऊत ,निधीसंकलन समिती अध्यक्ष व विश्वस्त श्री. विलास बंधू चोरघे , मा. मुख्य विश्वस्त श्री. प्रमोद चुरी, व माजी कार्यकारी विश्वस्त श्री. दिगंबर राऊत.

       कै. सौ. ईंदूताई व पद्मश्री कै.भाऊसाहेब वर्तक विश्रामधाम बांधणी 

       केळवे येथे आरोग्यधाम सुरू झाले होते मात्र सरकारला दिलेल्या आश्वासनानुसार तेथे वृद्ध सेवेसाठी विश्रामधाम तयार होणेही आवश्यक होते. मात्र आर्थिक उपलब्धता व नियोजन यामुळे हे काम रखडले होते. मुख्य अडथळा हा निधीचा होता. मात्र आमच्या सुदैवाने श्री. विलासबंधू चोरघे यांसारखे धडाडीचे सहकारी आम्हाला लाभले  होते. त्यांनी तात्काळ निधी संकलनाची  जबाबदारी शिरावर घेऊन एक महत्त्वाचे काम केले. या कामास गती आली. बंधूंनी आम्हा सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन, गावोगावी, प्रत्येक शाखेत  फिरून, सुमारे एक कोटी रुपयांचा निधी या विश्रामधाम प्रकल्पासाठी अल्पावधीत जमा केला. विश्वस्त फंडातून तेवढीच मदत घेऊन सुमारे दोन कोटी रुपयाचा हा प्रकल्प शेवटी मार्गी लावला व आपणास माहीत आहे, माननीय श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते या नूतन विश्रामधाम केंद्राचे उद्घाटन काही वर्षांपूर्वी अत्यंत दिमाखदारपणे झाले. आज या निसर्गरम्य परिसरात सुमारे 25 वृद्ध आपले उर्वरित जीवन सुखनैव  घालवीत आहेत.

     कै.पूज्य अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम, 

     अगदी प्रथमपासून डाॅ.बळवंत पाटील व डॉ .सदानंद कवळी या जोडीने आरोग्यधामाची घडी घालून दिली होती. श्री. प्रमोद चुरी स्वतःही आरोग्यधामाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. आमच्या विश्वस्त मंडळ कार्यकालात श्री. अरविंद वर्तक हे एक धडाडीचे सेवाभावी समाजबंधू आरोग्य धामाचे  प्रमुख होते. मधल्या काळात बंद झालेल्या काही आरोग्यविषयक सेवा व सुविधांचे  त्यांनी पुनःनिर्माण करून, उपलब्ध सुविधांचे नूतनीकरण केले.  आरोग्यधाम  अल्प का असेना, फायद्यात चालू लागले.  मी व मुख्य विश्वस्त प्रमोदभाई साधारणपणे महिन्यातून एकदा तरी  केळवे येथील आरोग्यधामास त्यावेळी भेट देत असू व संबंधितांशी चर्चा करून अडचणींचे निराकरण करीत असू. डाॅ.रघुवंशी या सेवाभावी वैद्यकाची  मधल्या काळात खंडित झालेली सेवा आम्ही  पुन्हा सुरू केली. एक मोठी उपलब्धी आरोग्यधामास मिळाली .या कालखंडात आरोग्यधामाने एक नवी वाटचाल सुरू केली हे निश्चित !

           1

  विश्रामधाम उद्घाटन सोहळ्या निमित्ताने झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात, सौ.  ऊल्का विलास चोरघे, माजी मुख्य विश्वस्त श्री प्रमोद चुरी यांज कडून पुरस्कार स्वीकारताना.

      कृतज्ञता

  आमच्या सो क्ष समाजातील माजी व मयत विश्वस्त व  जुन्या निष्ठावंत व निरलस सेवा दिलेल्या कार्यकर्त्यांची तसबीर वर्तक हॉलच्या दर्शनी भिंतीवर लावावी असे संकेत आहेत. मात्र कै खासदार मोरेश्वर सावे, कै.डॉ.जयंतराव पाटील माजी सदस्य केंद्रीय नियोजन मंडळ व कै. शांतारामजी पाटील माजी मुख्य चिटणीस ,यांच्या तसबीरी त्यांचे मृत्यू पश्चात बरीच वर्षे लावल्या गेल्या नव्हत्या.आम्हा सर्वांनाच हे खटकत होते. मुख्य विश्वस्त श्री. प्रमोद चुरी यांची आग्रही भूमिका  व श्री. विलास बंधू चोरघे यांच्या अथक प्रयत्नामुळे या तीन मान्यवर कार्यकर्त्यांच्या तस्वीरी आम्ही वर्तक हॉलमध्ये प्रदर्शित करू शकलो. तो दिवस आम्हा सर्व समाज बांधवांसाठी खूप कृतज्ञतेचा व समाधानाचा होता.

           ट्रस्ट फंड निधीमध्ये वाढ

       श्री प्रमोद चुरी  हे पेशाने जरी तंत्रज्ञ असले तरी त्यांच्या व्यापक व्यवस्थापकीय अनुभवामुळे त्यांनी अर्थशास्त्राचेही आवश्यक तेवढे ज्ञान मिळविले होते. नवीन उपक्रम सुरू करताना त्याची  आर्थिक बाजू तपासून , पैशाची उपलब्धता कशी करता येईल हे ते पहात. वरील प्रमाणे अनेक उपक्रम यशस्वी करतांना योग्य तेथे उपलब्ध विविध फंडांचा वापर करीत. त्यांचे आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोर तरीही पारदर्शक असे .आमच्या विश्वस्त मंडळाच्या कारकिर्दीत अनेक उपयुक्त उपक्रम राबवून देखील  काही लाखात असलेला ट्रस्ट फंड दोन कोटी रुपयांपर्यंत वाढला हे निश्चितच त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे व स्वच्छ कारभाराचे द्योतक आहे.

    पू. कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराच्या पुनर्बांधणीचे कामाबाबतही , प्रमोद चुरी, विलास बंधू व मी (विश्वस्तांनी)एक कच्चा आराखडा तयार केला होता. त्याप्रमाणे सुमारे 14 कोटीचा निधी आम्हास जमवावयाचा होता. सतीश नाना दीर्घकाळ आजारी होते. दुर्दैवाने सतीशनानांचे दुःखद अकाली निधन झाले व तदनंतर थोड्याच अवधीत आमचा कार्यकाल ही संपल्याने या कामास गती देऊ शकलो नाही ही आमची खंत आहे.

    मुख्य विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळत असताना श्री. प्रमोद भाईनी, आपल्या प्रत्येक सहकारी विश्वस्ताचा अनुभव व कसब ओळखून त्याचा  ऊपयोग  करून घेतला. सो. क्ष. संघातील माझे काम, विशेषतः वसतिगृह रेक्टर व व्यवस्थापक म्हणून अनुभव ,श्री विलास बंधू चोरघें  यांचा लोकसंग्रह, राजकारणी व समाजकारणी म्हणून व्यासंग, तसेच रोखठोक धडाकेबाज वक्तृत्व, श्री शांतारामजी ठाकूर यांचे शिक्षण क्षेत्रातील महान योगदान श्री.सतीश नाना यांची सहकार क्षेत्रातील विशेषतः  सहकारी बँकिंग मधील दीर्घ कारकीर्द, आणि श्री. भालचंद्रभाई पाटील यांचा सो. क्ष. संघ इतिहास, लिखित-अलिखित परंपरा व जुन्या संदर्भांचे ज्ञान या सर्वांचा सुंदर मेळ जमवून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसही कामाचे समाधान दिले. इतकेच नव्हे तर तत्कालीन संघ अध्यक्ष व संघाचे सर्व पदाधिकारी यांनाही सहभागी करून सर्वांच्या सहमतीने कामे केली. ट्रस्टने व संघाने “एकमेका सहाय्य करू…” या न्यायाने सुपंथाकडे वाटचाल केली .

      प्रमोद भाई आपल्या यशस्वी कारकिर्दीचे श्रेय देताना, श्री .जयवंत  वर्तक(आता निवृत्त) व श्री. दिलीप पाटील या दोन व्यवस्थापकांनाही विसरले  नाहीत. त्यांनी दिलेल्या प्रामाणिक व कसोटीच्या सेवेमुळे विश्वस्त मंडळाचे सर्व दप्तर, जमा खर्च नेहमी परिपूर्ण व काटेकोर असत. श्री दिलीप पाटील अजूनही आपली सेवा विश्वस्त मंडळास देत आहेत.

    त्या दिवशी माझ्या या प्रिय दिवंगत मित्राला श्रद्धांजली देताना, त्याच्या निश्चल ,शांत , देहाकडे पाहून बालपणीच्या अनेक आठवणीही जाग्या झाल्या होत्या. पुष्पमालांनी सजलेला तो देह  आता अंतिम यात्रेसाठी तयार झाला होता,  सुमनांजली देण्यासाठी वाहिलेल्या  फुलांचा दरवळणारा सुगंध अनेक गतस्मृतींच्या आठवणी घेऊन येत होता… मन हलके करावयाचे होते पण वेळेची बंधने होती. सकाळी विलास बंधूनीही मला आमच्या या “भाऊजी” बद्दल चार शब्द लिहिण्याची विनंती केली होती. मी त्याच दिवशी माझ्या मित्राला  अक्षर-सुमनांची श्रद्धांजली वाहण्याचे ठरविले… 

 ” मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे …??”

   तरी परंतु शब्दांची अक्षरे करून ती कागदावर उमटवली तर ती चिरंजीवी होतात.. म्हणून हा प्रयत्न करतो आहे.!!

    बोर्डीला सुट्टीमध्ये आल्यावर प्रमोद-अरविंद या दोन भावांच्या होणाऱ्या बौद्धिक चर्चा..आम्हा जूनियर मंडळीला प्रमोदने अभ्यासाबाबत आस्थापूर्वक केलेले मार्गदर्शन.. ..बोलता बोलता हळूच एखाद्याची उडविलेली टोपी..आणि असेच अनेक त्याच्या बुद्धिमत्तेची चमक दाखविणारे प्रसंग डोळ्यासमोर तरळले. प्रमोद जरी वरून शांत वाटत असला तरी त्यावेळी एक “अँग्री यंग मॅन” होता. आपणास कल्पना नसेल,त्या काळी साम्यवादी विचारसरणीचा पगडा  त्याचेवर होता. तत्कालीन ख्यातकीर्त   कामगार नेते  श्रीपाद अमृत डांगे यांच्याशी  तो संपर्कात होता. श्री. डांगे यांच्या लोकसभा निवडणुकीत एका मतदान केंद्रावर त्यांचा ‘पोलिंग एजंट’ होता, (कै. डांगे साहेबांचा त्या निवडणुकीत  विजयी झाला होता.) हे आज सांगून कोणाला पटणार नाही. कालौघात विवाहानंतर हे विचार पूर्ण बदलले, हे सांगण्यास नको.

   त्या काळी बोर्डीतच नव्हे तर आमच्या सर्व सोक्ष समाजात ,प्रमोद-लताताई विवाह एक दंतकथा ठरली होती. आमच्या वाडवळ भाषेत,” काय पाऊन पोरीला या घरा दिली??”( (एवढी  मोठ्या घरची लेक या गरीब कुटुंबात काय पाहून दिली, हा वेडेपणा आहे)

  अशी कुजबुज सर्रास सुरू होती. मात्र वर्तक कुटुंबियांचा, लताताईंचा व आम्हा सर्व मित्रांचा प्रमोदच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास होता. त्याने तो भावी आयुष्यात सार्थ करून दाखविला!!

       आपल्या प्रियजन व आप्तेष्टांच्या सहवासात अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करताना प्रमोद चुरी .

    प्रमोदच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवस समारंभास मला आग्रहाचे आमंत्रण होते.  मोजकी मंडळी होती. मा.केसरीभाऊ पाटील, डॉ. सदानंद कवळी, विलास बंधू ,मी अशी त्याची जवळची मंडळी हजर होतो. जल्लोषाचे व आनंदाचे वातावरण होते. त्यातीलच काही छायाचित्रे मी इथे मुद्दाम देत आहे. त्या दिवशी प्रमोदच्या चेहऱ्यावरील ते हास्य, समाधान व उत्साह  पाहून, जराही कल्पना आली नाही की पुढील केवळ पाच वर्षात हे  लोभस ,समाधानी व्यक्तिमत्व  अस्तंगत होणार आहे!

    त्यानंतर काही लहानसहान आजार ,डोळ्याचे विकार, पायाचे दुखणे सुरू झाले होते. मात्र वैद्यकीय उपचारांनी ते व्यवस्थीतही झाले. कधीतरी त्याबद्दल बोलताना प्रमोद  मला पटकन बोलून जाई,..” दिगंबर आता आपली किती वर्षे राहिली आहेत रे?..” त्यावेळी मी त्याला तसे न बोलण्याबद्दल प्रेमाने दटावीत असे.  तो हसून दाखवी!  माझा हा मित्र शेवटी आपले बोलणे अशा रितीने खरे करून दाखवील याची पुसटशी कल्पना मला तेव्हा आली नाही!

   आपल्या बोर्डी जन्मगावी आपले एक छोटेसे, स्वतंत्र निवासस्थान असावे, कधीतरी फुरसतीत मुंबईहून मुक्काम तेथे करावा, ही त्याची अखेरच्या दिवसातील मनापासूनची इच्छा होती. बोर्डीतील आपल्या मूळ, ‘मोठेघर’ वाड्यात एक सामायिक इमारत बांधून प्रत्येक मूळ-निवासी कुटुंबास स्वतंत्र जागा देऊन पुन्हा सर्वांनी एकत्र यावे अशी त्याची तळमळ होती. त्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. मात्र ते सफल झाले नाहीत. तेव्हा बोर्डी घोलवडमध्ये स्वतंत्र जागा घेऊन तेथे,”घरटे अपुले छान..” असावे अशी त्याची आंतरिक इच्छा होती. आयुष्याचे उर्वरित दिवस दोघांनीही सुखा समाधानात निवांतपणे घालवावे अशी प्रमोद व लताताईंचे स्वप्न होते. मला तसे वारंवार बोलून दाखवीत. बोर्डीचे, संघाचे माजी उपाध्यक्ष श्री. राजन चुरी जवळचे नातेवाईक. राजाने पुढाकार घेऊन घोलवडला , छान वस्तीतील, ऊत्तम जमिनीचा तुकडा दोन वर्षांपूर्वी विकत घेऊन दिला . विशेष म्हणजे हे घर माझ्या घरा समोरच होणार होते. मलाही कोण आनंद झाला! करोनामुळे घर बांधणीस खूप विलंब झाला … आता या नवीन वर्षात नवीन घराची पायाभरणी होण्याचे संकेत  होते …. आता तेथे घर तर होईल, मात्र माझा मित्र तिथे मला भेटणार नाही.. कधीच दिसणार नाही.. शेवटी ,ईश्वरेच्छा बलीयसी ,..दुसरे काय..??

 ” मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते ,

   कुठेतरी मी उभाच होतो ,कुठेतरी दैव नेत होते…”

 .. दैव दुर्विलास म्हणतात तो हाचअसतो का??

तो दयाघन ,करुणामय ईश्वर एवढा कठोरही का होतो??

      आपल्या संस्कृतीत माता पिता ,गुरुजन, मातृभूमी, याप्रमाणे समाजाचेही  ऋण मानले जाते . प्रत्येक व्यक्तीने भोवतालच्या समाजातील गरजू व्यक्तीला यथाशक्ती मदत करावी अशी शिकवण ही संस्कृती देते. कोणतीही अपेक्षा न करता, लाभाचा विचार न करता, मदत करावी, असा व्यापक विचार करणारी आपली भारतीय संस्कृती म्हणूनच जगांत गौरविली गेली आहे. अनेक सामाजिक संस्था, निस्पृहपणे काम करीत असतात. गेली शंभरहून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या, आमच्या  सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ व सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ फ॔डट्रस्ट  या संस्था आहेत. या त्यांचे माध्यमातून आम्हाला अल्प का असेना, समाजासाठी योगदान देता आले.  माझे मित्र व वरिष्ठ सहकारी प्रमोद भाई तसेच सहकारी विश्वस्त अध्यक्ष व कार्यकारी मंडळ यांच्या सहवासातील  तो काल आनंदात गेला व सार्थकी लागला असे वाटते. आमच्या ज्या अनेक धुरिणांनी ही विश्वस्तांची पदे गतकालांत भूषविली त्यांच्या कार्याचे वारसदार होऊन  त्यांना अभिवादन करण्याचेही भाग्य मिळाले.

  बालपणापासून ते परवाचे त्याचे अंतीमदर्शन घेईपर्यंत प्रमोद बरोबर घालवलेला तो काळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. सच्च्या, प्रामाणिक व निरपेक्ष मैत्रीचे दिवस असेच पटकन् हातातील वाळूच्या कणासारखे निसटून जातात !!

        समोरच्या त्या निश्चेष्ट निर्जीव शरीरा कडे पाहताना त्याच्या चेहऱ्यावर मात्र..,’.माझे आयुष्य सार्थकी लावून मी आता निघालो आहे..’ याचे समाधान दिसत होते. शांत चेहरा प्रसन्न वाटत होता. मला एका संस्कृत सुभाषिताची आठवण  झाली..

    ” वदनम् प्रसाद सदनम् सदयम् हृदयम् सुधामुचो वाचः,

     करणं परोपकरणम् येषाम् केषाम न ते वंदयाः”

शेवटी,माणसाच्या वृत्तीचे व कृतीचे प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर उमटत असते. सदैव दयाळू आणि मधुर बोलून जो पररोपकारीही असतो अशा व्यक्तीच्या चेहऱ्यावर मृत्यूनंतर ही प्रसन्नता असणारच, त्यामुळेच तर ते सर्वांसाठी वंदनीय होतात !

         प्रमोद चुरी गेले ,लता ताईंचा जीवनसाथी, संयोगिता-हर्षवर्धनचे बाबा, त्यांच्या छोट्यांचे “आज्जू” एक निर्मळ,  यशस्वी, तेजस्वी जीवन-ज्योत निमाली ,पण नष्ट झाली नाही ! एक तेज ब्रम्हांडाच्या महान तेजात सामाऊन गेले.. महान कवी गोविंद यांच्या शब्दात माझ्या मित्राला आदरांजली वाहून  ही श्रद्धांजली पूर्ण करतो …

          “ज्योत ज्योतिला मिळुनी गेली, माती  मातीलाही

            कृष्णाकांठी कुंडल आतां पहिलें उरलें नाही “

जिवलग मित्रवर्य  प्रमोदच्या प्रेमळ स्मृतींना त्रिवार प्रणाम..???

(या लेखासाठी कल्पलताताई, विलासबंधू चोरघे व श्रीकांत पाटील, यांनी उपयुक्त माहिती व दुर्मिळ फोटो  दिले त्यांचे मनःपूर्वक आभार)

 दिगंबर वा राऊत.

माजी कार्यकारी विश्वस्त,सो. क्ष. संघ फंड ट्रस्ट.

घोलवड(विलेपार्ले).