चतुरस्त्र, बहू-आयामी आचार्य, कै.दामोदर ह. सावे सर
अतुल्या कल्याणी प्रकृतिरनघं वल्गु च वचो,
मनीषा निर्दोषा महितमविगीतं च चरितम् ।
अदूष्यं वैदुष्यं हृदयमपि येषामुरुदयं,
ध्रुवं तेषामेषामिह परिचिचीषापि शुभदा ॥
“ज्यांचा स्वभाव कल्याणकारी, ज्यांचे बोलणे खरे आणि गोड, विचारसरणी निर्दोष, वागणूक चांगली आणि प्रशंसनीय, विद्वत्ता निष्कलंक, हृदय सदैव करुणेने भरलेले, अशा माणसाचा परिचय करून घेणे सुखकारक असते” असे हे सुभाषित म्हणते.
कर्म धर्म संयोगाने अशी बहुआयामी व्यक्ती तुमच्या आयुष्यात कधीकाळी आली असेल आणि त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली काम करून त्यांची शाबासकी, आशीर्वाद मिळाले असतील तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच! मी असा एक भाग्यवान माणूस आहे!! त्या कल्याणकारी गुरुजनांची आठवण पुन्हा काढून त्या जुन्या स्मृतींना उजाळा देताना, इतरांनाही त्यांचा परिचय करून देणे म्हणजे त्यावेळी त्यांच्या सहवासाने मिळालेला तो अनुपम आनंद पुन्हा उपभोगण्यासारखे असते. यासाठीच आजच्या या लेखनाचा प्रपंच मी करतो आहे!
होय, 91 वर्षांच्या दीर्घायुष्यात विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवून तेथे आपला अमीट ठसा उमटवून आयुष्याचे सार्थक करून, नऊ वर्षांपूर्वी या नश्वर जगाचा निरोप घेतलेल्या कै. दामोदर ह. सावेसरांच्या विषयी मी बोलतो आहे.
केळवे येथील आदर्श विद्यामंदिर या माध्यमिक शाळेची स्थापना, या शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक ते शिपाई अशा सर्व भूमिका निभावणारे, केळवे गावचे नऊ वर्षे सरपंच, पालघर पंचायत समितीचे सदस्य, विद्या मंदिर शिक्षण मंडळाचे विश्वस्त, पालघर दांडेकर महाविद्यालयाचे माजी कार्यवाह, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, कबड्डी-व्हाॅलीबॉल या खेळांचे उत्तम पंच, श्री. शितलादेवी मंदिर व हनुमान मंदिर जीर्णोद्धार व विश्वस्त मंडळाचे आधारस्तंभ, एक उत्तम रंगकर्मी, केळवे गावातील वाचनालय, मिठागरे, पान व्यापारसंस्था इत्यादी संस्थांमध्ये मोलाचे योगदान. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या केळवे रोड येथील आरोग्यधाम व विश्राम धाम यासाठी महत्त्वाची सेवा देणारे, बोरिवली येथील समाज उन्नती शिक्षण संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा असणारे आणि आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे माजी कार्यवाह, उपाध्यक्ष, अध्यक्ष, विश्वस्त व मुख्य विश्वस्त ही सर्व पदे भूषविणारे आणि म्हणून समाजातर्फे अत्यंत महत्त्वाचा, मानाचा पहिला जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी! कै. दामोदर सावेसर… त्यांच्या कर्तृत्वाने उन्नत झालेल्या अशा किती संस्थांची नावे सांगावीत?
माझ्या सुदैवाने सावेसर समाजात अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून काम करीत असताना त्यांच्याशी माझा परिचय झाला होता. मात्र सन 1996 ते 2005 कालांत ते मुख्य विश्वस्त असताना, तीन वर्षे विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. सरांना जवळून पाहता आले. एक आदर्श शिक्षक, समाजसेवक ,राजकीय कार्यकर्ता इत्यादी त्यांच्या विविधांगी कर्तृत्वापेक्षा एक माणूस व मार्गदर्शक म्हणूनही ते किती मोठे होते याची जाणीव झाली. माझ्या आयुष्यातील तो एक अत्यंत उपयुक्त व सार्थकी लागलेला कालखंड ठरला !
येत्या मे महिन्यात (सन 2023) कै. सावे सरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या स्मरण-पत्रिकेत काही लिहावे अशी विनंती, सरांची नात कु. मानसी पाटील तसेच सरांची स्नुषा सौ. भारती चौधरी यांनी केली. मी ती तात्काळ मान्य केली. सावे सरांना अभिवादन करण्याची अशी संधी मलाही या निमित्ताने मिळते आहे..
मी विश्वस्त होण्याआधी 1963 ते 70 या काळात, कै. पूज्य तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहात विद्यार्थी व पुढे रेक्टर म्हणून काम करीत असताना केळवे येथील आदर्श विद्यामंदिर हायस्कूलचे अनेक माजी विद्यार्थी माझे सहाध्यायी होते. त्यांच्याकडून सावे सरांच्या, बहुरंगी व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूबद्दल भरभरून बोलताना ऐकले होते. सरांचे भाचे व पुढे सुप्रसिद्ध साई ट्रॅव्हलचे संयोजक असलेले श्री. वसंत चौधरी हे त्यापैकी एक. अशा व्यक्तिमत्त्वाशी आपलाही परिचय व्हावा अशी ओढ मला तेव्हाच लागली होती. संघाचे एक वरिष्ठ कार्यकर्ते म्हणून वरचेवर सरांची भेट दादरमधील आमच्या संघ कार्यालयात होई. मात्र तेव्हा विशेष संभाषण होत नसे. पुढे सर आमच्या संघ फंड ट्रस्टचे मुख्य विश्वस्त व मी विश्वस्त म्हणून काम करताना माझी ही इच्छा पूर्ण झाली व त्यांच्याकडून मौल्यवान मार्गदर्शन मिळाले त्याच्या या आठवणी.
माझे वडीलही एक प्राथमिक शिक्षक होते. त्या बालवयात बोर्डी शाळेत अनेक ध्येयवादी शिक्षक मंडळी भेटली. पुढे सु. पे. ह. हायस्कूलात आचार्य-भिसे–चित्रे–सावे यांचा परिसस्पर्श झाला. महाविद्यालयीन जगात कविवर्य पु. शी. रेगे, कर्मवीर भाऊराव पाटील, बॅरिस्टर पी. जी. पाटील, डॉक्टर जे. जी. काणे, डॉ. पद्मविभूषण मनमोहन शर्मा अशी अनेक विद्वान व विद्यार्थीनिष्ठ गुरूजन लाभले. यामुळे शिक्षक व शिक्षकीपेशा याबद्दल माझ्या मनात एक कायमचा आदरभाव व जिज्ञासू वृत्ती आजही आहे. इतर पेशांबद्दल समाज काहीही म्हणू देत, मात्र आजदेखील चांगल्या गुणी शिक्षकांबद्दल समाजात कायम आदराचे आणि सन्मानाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षकच योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वतः आयुष्यात नैतिक मूल्यांचे आचरण करून समाजासमोर आदर्श ठेवणारा एक शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडवीत असतो. आणि म्हणून समाजात शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक आहे असे मला वाटत आले आहे.सावे सरांनीही त्यांच्या जीवनकालांत अनेक उत्तम विद्यार्थी तयार केले. त्यांना भेटण्याचा योग मलाही आला. त्यांतीलच सरांच्या एका विद्यार्थ्याच्या आठवणी मी पुढे देणार आहे.
सुप्रसिद्ध तत्त्ववेता जॉर्ज बर्नार्डशा याने एके ठिकाणी म्हटले आहे,” मुलांची स्वतः शिकण्याची इच्छा शिक्षकाने मारू नये. त्याने स्वतः सतत शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. काही ना काही शिकत राहायला पाहिजे. शिक्षकाने आयुष्याच्या अंतापर्यंत स्वतः विद्यार्थी म्हणूनच जगायला हवे. कै.सावेसरांनी आपल्या शिक्षकी पेशाव्यतिरिक्त वर उल्लेखलेल्या अनेक क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. ते स्वतः काहीतरी शिकतच राहिले. आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच जगले. मला नम्रतापूर्वक वाटते सावेसर ही केवळ व्यक्ती नव्हती तर ते एक संस्काराचे विद्यापीठ होते. खऱ्या अर्थाने “सृजनाचा साधक” होते. बहू आयामी व्यक्तिमत्वाचे सावेसर एक “समाज भूषण”ठरले. समाजाने त्यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव केला.
आमच्या सो. क्ष. संघ फंड ट्रस्टमध्ये सरांबरोबर काम करताना व त्यांच्या कामाची पद्धती पाहून मला एक गोष्ट निश्चितपणे जाणवली, ती म्हणजे सावेसरामधील नेतृत्व गुण! मात्र हे नेतृत्व राजकीय नेतृत्वासारखे नसून त्यांच्या सामाजिक संवेदनावर आधारित होते. समाजाभिमुख नेतृत्व होते. चारित्र्य, प्रभावी वक्तृत्व, शिस्त आणि इतरांकडून मिळत असलेला विश्वास आणि आदर यावर आधारित होते. निर्णयक्षमता व कामातील पारदर्शकता असल्याने ते इतर सामाजिक कार्यकर्त्याहून उजवे ठरले. त्यातीलच काही आठवणी मी सांगणार आहे.
कै. विनोबा भावेंनी शिक्षण व शिक्षक यावर भाष्य करताना फार मार्मिक सूत्र सांगितले आहे. ते म्हणतात,” शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे आणि समाज समतानिष्ठ असावा”. म्हणजेच एक शिक्षक जर विद्यार्थीनिष्ठ असेल तर उमलत्या कळ्यांचे फुलांत रूपांतर करू शकतो. सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकतो. एक चांगला शिक्षक , आपल्या सहवासातून, संवादातून ‘मनाची श्रीमंती’ असलेला कर्तबगार समाज घडवू शकतो. तो केवळ साक्षर मतदार निर्माण करीत नाही तर कर्तव्यदक्ष भावी नागरिक निर्माण करतो. सावेसरांना जवळून पाहिल्यावर मला वाटते, प्रथम ते एक उत्तम जातीवंत शिक्षक होते व नंतर समाजसेवक राजकारणी कलावंत इत्यादी. एक उत्तम गूरू म्हणून आपल्या चतुरस्त्र कलागुणांनी, त्यांनी केवळ सुशिक्षित विद्यार्थी नव्हे तर सुसंस्कृत, संस्कारसंपन्न नागरिक समाजात निर्माण केले. हे त्यांचे खरे कर्तृत्व आहे.
आपल्या विद्यार्थ्यांना शिस्तीचा उपदेश करणारे सावेसर आपल्या स्वतःच्या आयुष्यातही शिस्तीचे भोक्ते होते. आमच्या संघ फंड ट्रस्टचे मुख्य विश्वस्त असतांना (1996-2005) साधारणतः तीनेक महिन्यातून आमच्या तिमाही सभा पू.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील विश्वस्त कार्यालयात होत असत. वेळ दुपारी दोनच्या सुमारास असे. बाहेर गावाहून येणाऱ्या मंडळींना सकाळच्या रेल्वे गाडीने येऊन संध्याकाळच्या फ्लाईंग राणी अथवा बलसाड एक्सप्रेसने परत गावी जाणे सुलभ व्हावे हा उद्देश! सावेसर कोणत्याही परिस्थितीत आदले दिवशीच बोरिवलीस भाचा वसंत (चौधरी) कडे येत. दुसऱ्या दिवशी बरोबर दीड वाजताच्या सुमारास दादरला विश्वस्त कार्यालयात हजर होत. आल्या आल्या त्यांना एक ग्लास थंड पाणी व चहाचा कप लागे. ठरलेल्या वेळी मीटिंग सुरू होई. मात्र मीटिंग संपवण्याची घाई नसे. कारण त्यांचा त्या दिवशीही मुंबईतच मुक्काम असे. एवढ्या कामाच्या व्यापात सुमारे दोन दिवस ते या सभेसाठी देत व विद्यार्थी वसतिगृह, वर्तक हॉलचा व्यवहार, ट्रस्टचे उत्पन्न-खर्च, आरोग्यधाम समस्या, इत्यादी अनेक संबंधीत बाबींचा पूर्ण आढावा घेत. मुख्य विश्वस्त असल्याने कधीतरी त्यांच्या केळव्याचे घरी अथवा आमच्या आरोग्यधाम कार्यालयातही ते सभा घेऊ शकले असते. परंतु,”विश्वस्तांची सभा ही विश्वस्त कार्यालयातच झाली पाहिजे”, हा त्यांचा कटाक्ष असे. कधीतरी अन्य विश्वस्तांच्या सोयीसाठी, या संकेताला अपवाद करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. एकदा आमचे एक विश्वस्त श्री. रमेश चौधरी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे घराबाहेर पडू शकत नव्हते. तेव्हा सावेसरांनी नेहमीचा शिरस्ता मोडून, रमेश भाईंच्या सहभागासाठी त्यांचे दादर येथील घरी विश्वस्तांची सभा घेतली आहे. स्वतःच्या बाबतीत अत्यंत कटाक्षाने शिस्त व संकेत पाळणारे सर सहकाऱ्यांच्या सोयीसाठी थोडे लवचिक होत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. दिलदारपणा होता. “बोले तैसा चाले..” अशी त्यांची वागणूक होती.आणि म्हणूनच त्यांची “पावले वंदन करावीत” अशी झाली.
सावेसरांना आपल्या विद्यार्थ्यांस, भविष्यातील आव्हाने आणि समस्या यांना सामोरे जाण्यासाठी, सक्षम भावी नागरिक कसे बनविता येईल याचा ध्यास होता व त्याबाबत मनात अखंड चिंतन चालू असे . त्यांच्या विद्यार्थ्यांत अर्थात विद्यार्थिनीही होत्या. ते मुख्य विश्वस्त झाले तेंव्हा विद्यार्थिनी वसतिगृहाचा प्रश्न त्यांना सतावू लागला. मुलांसाठी दादरला पू. तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहाची सोय आहे. मात्र विद्यार्थिनी वसतीगृह प्रश्न अनेक वर्षे प्रयत्न करूनही प्रलंबित होता .महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी, निदान तात्पुरती तरी, सोय उपलब्ध करून दिली पाहिजे असे त्यांना वाटे. प्रत्येक विश्वस्त सभेत आम्हाला ते तसे बोलून दाखवीत. भाडेकरू तत्त्वावर मुंबई अथवा मुंबईलगत एक प्रशस्त सदनिका घेऊन, पंधराएक विद्यार्थिनींची आपण सोय करावी अशी त्यांची कल्पना होती. अगदी बोरिवली भागातही अशा सदनिकेसाठी भाडे खूपच असल्याने, विरार परिसरात अशा भाडेकरू तत्त्वावरील सदनिकेचा आम्ही शोध सुरू केला. विरारमधील एका समाज बांधवांनी अशा सदनिकेचा प्रस्ताव कार्यकारी विश्वस्तांकडे पाठविला. एका तिमाही सभेत त्यावर सांगोपांग चर्चा झाली. विरारमधील ती सदनिका घेण्याचे जवळजवळ निश्चितच झाले. माझ्या मनात काही शंका होत्या. त्या कालांत वसई-विरार प्राधिकरणाचे नियम डावलून काही धनिक बांधकाम व्यावसायिक अवैध काम करीत. समाजासाठी विशेषतः विद्यार्थिनींसाठी ही सदनिका घेत असल्याने, सामाजिक कर्तव्य व सुरक्षितता या दृष्टीने सर्व संबंधित कागदपत्रांची वैधता तपासून घ्यावी त्यानंतरच ही जिम्मेदारी ट्रस्टने घ्यावी असे मी सुचविले. क्षणभर शांतता पसरली. मी अगदीच नवा व अननुभवी विश्वस्त असल्याने माझ्या सूचनेला किती महत्व मिळेल याबाबत मीच साशंक होतो. थोडा वेळ शांतता झाली. सर्व विश्वस्त, सावेसर आता काय निर्णय देतात हे पाहू लागले. मीही अस्वस्थ झालो. आपण उगीच तर ही शंका काढली नाही ना असेही क्षणभर वाटून गेले. मात्र तेथे मुख्य विश्वस्त सावेसर होते!! त्यांनी त्वरीत आमचे कार्यालयीन मॅनेजर श्री. जयवंत वर्तकांना, कायदे विषयक सल्लागार अॅड. प्रदीप म्हात्रे यांना फोन लावण्यास सांगितले. त्यांना सदनिकेसंबंधी सर्व माहिती व पार्श्वभूमी सांगून सदरहू प्रकरणाची संपूर्ण वैधानिक सत्यता तपासून पाहण्यास सांगितले. मला व श्रीमती विजयाताईंना अॅड. म्हात्रे यांना भेटण्याची विनंती केली. मला आश्चर्य वाटले, सर एवढ्या पटकन असा निर्णय घेऊन प्रस्ताव प्रलंबित ठेवतील अशी कल्पना नव्हती. मला समाधानही झाले. एके दिवशी अॅड.प्रदीप म्हात्रे यांनी आम्हाला दुपारी प्रत्यक्ष इमारतीच्या जागेवरच येण्याची विनंती केली. म्हात्रेसाहेब सर्व कागदपत्रे घेऊन आले होते. आश्चर्य म्हणजे त्यांनी भेटताक्षणीच आमचे अभिनंदन करून आपण योग्य काम केले अशी भलामण केली. ती इमारत बांधताना कायद्याचे उल्लंघन मोठ्या शिताफीने करण्यात आले होते . तळमजला हा बेसमेंट म्हणून दाखवून वर पाच मजले होते, कारण इमारतीची परवानगी पाच मजल्यासाठीच होती. म्हणजे पाचवा मजला हा खरे तर सहावा मजला होता जो अधिकृत नव्हता आणि त्याच मजल्यावर ती सदनिका होती. आम्ही सर्व एका मोठ्या संकटातून वाचलो होतो. आम्ही अॅड. म्हात्रे यांच्या कार्यालयातूनच सावेसरांना फोन केला. सत्य परिस्थिती सांगितली. श्री. म्हात्रेही त्यांच्याशी बोलले. त्यांनीही सावेसरांना धन्यवाद दिले, कारण केवळ समाजाच्या प्रतिष्ठेचाच नव्हे तर आमच्या समाजभगिनींच्या सुरक्षिततेचाही तो एक प्रश्न होऊ शकला असता. त्या प्रसंगापासून सावेसर माझेही गुरु झाले! सामाजिक जीवनात एवढी पारदर्शकता, निर्णयक्षमता व प्रसंगावधान असणे जरुरीचे असते. सरांनी ते दाखवले. समाजकार्यात विश्वस्त म्हणून काम करताना कसे वागावे हा धडा मलाही मिळाला. पुढे सर समाजकारणापासून जरी निवृत्त झाले होते तरी मला भेट झाल्यावर मार्गदर्शन करीत. या प्रकरणात विश्वस्तांचा कोणताच दोष नव्हता. ज्या गृहस्थांनी हा प्रस्ताव विश्वस्तांकडे पाठविला त्यांनी पूर्ण चौकशी केली नव्हती जी आम्ही केली.
शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशक किंवा दिशादर्शकाचे असते. कै. सावे सरांनी एक गुरु म्हणून हेच काम आयुष्यभर केले. सरांचे, केळवे आदर्श विद्यामंदिरातील एक आवडते विद्यार्थी व पू. तात्यासाहेब चुरी माजी विद्यार्थी संघ तसेच सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील माझे एक जवळचे सहकारी, श्री नरेंद्र वर्तक यांनी आपल्या सन्माननीय व आवडत्या सरांबद्दल बोलताना काही सुंदर आठवणी मला सांगितल्या. त्या येथे मुद्दाम उद्धृत करीत आहे. श्री. नरेंद्र वर्तक हे नुकतेच भारतीय रिझर्व बँकेतून उच्च व्यवस्थापकीय सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. ते म्हणतात. “आजच्या केळवे गावाच्या विकासात कै. दा. ह. सावे उर्फ सावेसर यांचा फार मोठा वाटा आहे. 1960 च्या सुमारास केळव्यातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षणासाठी शेजारच्या माहीम गावात, तीन ते चार किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागत असे. काही प्रसंगी खाडीच्या भरती ओहोटीचा सामना करावा लागे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणा नंतर गावातील अगदी मोजक्या कुटुंबातील मुलें माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊ शकत. यावेळी गावातील तत्कालीन सुधारकांच्या खांद्याला खांदा लावून सावेसर उभे राहिले. केळवे गावातील आजची नावारुपाला आलेली ‘नूतन विद्या विकास मंडळा’च्या शिक्षण संस्थेची, “आदर्श विद्यामंदिर” ही शाळा सुरू झाली. हे काम टप्प्याटप्प्याने झाले. सुरुवातीला शाळेची घंटा मारण्यापासून मुख्याध्यापकापर्यंतची सर्व कामे सावेसरांनी केलेली आहेत. आज केळवे गावात 100% साक्षरता आहे. विशेष म्हणजे दहावी-अकरावी पास असलेले 80 ते 90% नागरिक केळव्यात आहेत. यात सावे सरांचा वाटा खूप मोठा आहे. सुरुवातीला सावेसर शारिरिक शिक्षणाचे धडे आम्हाला देत. पुढे मराठी व इंग्रजी हे विषय मोठ्या ताकदीने शिकऊ लागले. सरांचे मराठी, ईंग्रजी भाषेवरील वरील प्रभुत्व जबरदस्त होते. विषय शिकविताना ते आम्हाला भाषेच्या सौंदर्याचे बारकावे व भाषेचे व्याकरण ही समजावून सांगत असत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भाषेचा पाया मजबूत होत असे. इंग्रजी शिकविताना केवळ शब्दाचे अर्थ सांगून शिकवीत नसत, प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष कृती करून ते आम्हाला सांगत. त्यामुळे त्यांनी शिकविलेले इंग्रजी शब्दाचे अर्थ कायमचे लक्षात राहत. crawling या शब्दाचा अर्थ वर्गात प्रत्यक्ष रांगून दाखवून सरांनी आम्हाला शिकविला आहे. अशाचप्रकारे अनेक इंग्रजी शब्दांचे अर्थ सरांनी आम्हाला प्रात्यक्षिकाद्वारे शिकविले. आमच्या डोक्यात ते अर्थ कायमचे ठसले”
“आमचे सावेसर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते !जीवनाच्या अनेक क्षेत्रात त्यांनी लिलया मुशाफिरी केली. अनेक वर्षे ते आमच्या केळवे गावचे सरपंच होते. पुढे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून त्यांनी जिल्हा पंचायतीमध्येही काम केले. ते एक उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू म्हणून राज्यस्तरीय स्पर्धेत खेळले होते. पुढे या खेळातील एक नावाजलेले पंच म्हणून त्यांनी कामगिरी केली. हे करतानाच अभिनयाचे धडेसुद्धा त्यांनी गिरविले. शाळेच्या आर्थिक मदतीसाठी गावांतील तत्कालीन तरुणांना सोबतीस घेऊन त्यांनी “दुरितांचे तिमीर जावो” या गाजलेल्या नाटकाचे प्रयोग केलेले आहेत. एक उत्कृष्ट नाट्यकर्मी म्हणून आमचे गाव त्यांना आजही ओळखते. सरांबद्दल आम्हा विद्यार्थ्यांना आदरयुक्त भीती असे. शाळेतच काय गावातील रस्त्यावरही सावेसर येत आहेत असे दिसले की मुले आदराने नमस्कार करूनच पुढे जात. सरांनी शाळेत कोणास छडी मारली नाही की कान पिरगळला नाही. त्यांचे केवळ वाक्बाण व भेदक नजर वर्गात दंगेखोर विद्यार्थ्यांना शांत करी. भाषेवरील प्रभुत्व, वळणदार अक्षर व शब्द संपत्तीचे भांडार यामुळे अनेक सभा संमेलनांचे इतिवृत्त लेखन व सरकार दरबारी करावयाचा पत्रव्यवहार त्यांचे विना होऊ शकत नसे. सरांचे व्यक्तिमत्व प्रसन्न होते. ते नेहमी शाळेत येताना आपल्या सायकलवरून येत. पांढऱ्या रंगाचा नीटनेटका पेहराव असे. विद्यार्थ्यांनीही तसेच नेटके राहावे असा त्यांचा आग्रह असे. पुढे सन 1994-95 च्या सुमारास बोरीवलीत स्थापन झालेल्या समाजोन्नती शिक्षण संस्थेच्या उभारणीत सरांचा मोठा वाटा आहे. अशा एका अष्टपैलू व आदर्श शिक्षकांचे मार्गदर्शन माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना लाभल्यामुळे आम्ही आयुष्याची वाटचाल यशस्वीपणे करू शकलो, असे कृतज्ञतापूर्वक मी नमूद करतो. माझ्या वंदनीय सावेसरांच्या स्मृतीला प्रणाम करतो.”
नरेंद्रप्रमाणेच सरांचा प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा गौरव करतो. आयुष्यात आपण मिळवलेल्या यशात सरांचाही किती मोठा वाटा आहे हे आवर्जून सांगतो. ही एक प्रातिनिधिक आदरांजली आहे.
सन 2005 साली मुख्य विश्वस्त म्हणून सेवाकाल संपल्यावर त्यांनी आपल्या गावीच निवास करून सामाजिक कार्यातून निवृत्ती घेतली. वयोमानानुसार थकले होते. मात्र समाजात काय चालले आहे याकडे त्यांचे लक्ष जरूर असे. विशेषतः आमच्या ट्रस्टच्या कारभाराची नेहमी चौकशी करीत. माझ्या संपर्कात ते अखेरपर्यंत राहिले. नुकतेच निवर्तलेले, तत्कालीन मुख्य विश्वस्त श्री. प्रमोद चुरी व मी केळवे येथील आरोग्यधामात महिन्यातून एकदा जात असू. तेव्हा सावे सरांनाही आवर्जून त्यांच्या घरी भेटत असू. तेही मोठ्या जिज्ञासेने सामाजिक वार्ता जाणून घेण्याचा ऊत्साह दाखवीत. त्यांचा सल्ला घेत असू. “विश्वस्त मंडळाची एकादीै बैठक भूषणच्या( सरांचे चिरंजीव), रिसॉर्ट मध्येही घ्या” अशी त्यांची आग्रहाची विनंती असे. दुर्दैवाने केळव्यात विश्वस्त मंडळाची बैठक घेण्याचा योग जुळून आला नाही याची मला खंत आहे. 2013 साली सावेसरांना सो. क्ष. संघाने सर्वोच्च असा “जीवनगौरव” पुरस्कार दिला. त्याप्रसंगी केळवे येथे झालेल्या दिमाखदार समारंभास मी आवर्जून गेलो होतो. कार्यकारी विश्वस्त या नात्याने त्यांचा गौरव शुभचिंतन करण्यासाठी बोलण्याची संधीही मिळाली. सर थकले होते पण चेहऱ्यावरील तेज ,प्रसन्नता व स्मितहास्य तसेच होते. नेहमीचाच शुभ्र पायजमा-सदरा गांधी टोपी होती. बोलण्याचा बाज तोच होता. त्यांचे ऐकलेले ते भाषण शेवटचेच ठरले. त्या भाषणातील काही वाक्ये आजही माझ्या स्मरणात आहेत.
सर म्हणाले होते, “स्वतःच्या आयुष्यात काही मूल्यांचे आचरण करून समाजासमोर आदर्श ठेवणारे शिक्षक कायम सन्मान व आदरास पात्र होतात. मी शिकवण्यापेक्षा सतत शिकत राहण्याचे काम जास्त केले. आमच्या सो. क्ष. समाजाने आता आपल्या समाजसेवेच्या कक्षा रुंदावून ‘बहुजन समाजा’स सुद्धा सेवा द्यावी अशी मी विनंती करतो”.
त्यानंतर सरांची भेट कधीच झाली नाही. पुढच्याच वर्षी सन2014 मध्ये सावेसरांनी या जगाचा निरोप घेतला. एक बहुआयामी व्यक्तिमत्व अंतर्धान पावले. माझे भाग्य म्हणून मला त्यांच्या सहवासाचा लाभ काही काळ मिळाला, त्यांचे प्रेम आशीर्वाद मिळाले !
शिक्षणदान हा जरी त्यांचा ध्यास व श्वास होता तरी त्यांनी त्यांच्या व्यवसायाचा धंदा होऊ दिला नाही. डॉक्टर राधाकृष्णन यांनी म्हटल्याप्रमाणे,” जो फक्त पुस्तकातील शिकवतो तो शिक्षक, जो पुस्तकाबाहेरील ज्ञान देतो तो गुरु आणि जो विद्यार्थ्याला जगायचे कसे शिकवतो, त्यासाठी लायक बनवतो तो आचार्य !!”आमचे कै.दामोदर हरी सावेसर, नक्कीच आचार्य पदापर्यंत पोहोचले होते. विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवितांना कसे जगावे हे त्यांनी शिकविले. विविधांगी समृद्ध जीवन ते स्वतःजगले.
सरांच्या एकूण आयुष्याचा विचार करता मला कै. मंगेश पाडगावकर यांच्या चार ओळी आठवतात. कविवर्यांनी म्हटल्याप्रमाणे ,ज्ञान विद्वत्ता आणि कर्म यांचा सुंदर मिलाफ जीवनात व्हावा. ज्ञान आणि कर्म हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत . ज्ञानाने कर्मशील व्हावे, आणि कर्मानं ज्ञानवान व्हावं, असा संदेश आमची गीताई देते. सर्व ज्ञानमंदिरांमधील ज्ञानसाधना कर्ममार्गानं झाली व कर्ममार्गावर ज्ञानामृताचे झरे असले, तरच ज्ञानाचा जीवनाच्या उभारणीसाठी उपयोग होईल. हेच आमचे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. मला वाटते सावेसर त्याच भारतीय संस्कृतीचे पाईक होते!!.
“पुण्यमयी दे आम्हा अक्षर वरदान
ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान।”
मानवतेच्या मंदिराची उभारणी करायची असेल, तर ‘ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान’ हा संदेश सर्व विद्यामंदिरांनी ब्रीदवाक्यासारखा समोर ठेवून त्यांचा मूल्यसंस्कार आपल्या शिक्षण प्रक्रियेत घडवून आणला पाहिजे. कै. सावेसरांना समाजाने खऱ्या अर्थाने अर्पण केलेली हीच श्रद्धांजली असेल!
सावेसरांच्या पावन स्मृतीस आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विनम्र प्रणाम.
लेखासाठी सौ भारती व मित्रवर्य नरेंद्र वर्तक यांनी दिलेल्या उपयुक्त माहितीबद्दल त्यांना धन्यवाद. आदर्श विद्या मंदिर शाळेचे माजी प्रिन्सिपाॅल व कै तात्यासाहेब चुरी वसतिगृहातील माझे सहकारी मित्रवर्य हरिहर पाटील यांनी या लेखातील काही दुर्मिळ छायाचित्रे मला मिळवून दिली, त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.
दिगंबर वा राऊत, मा.कार्यकारी विश्वस्त,
सो क्ष संघ फंड ट्रस्ट.