माझे गुरू आणि महागुरू – भाग पहिला
“While I was not pleased to receive the Professor JG Kane Memorial Award, I note that it carries with it a condition: the recipient must speak to this eminent body of scientists and technologists. That he must do so in a manner that meets the high standards of Professor J .G .Kane makes the task all the more humbling. Professor Kane was distinguished not only by his scientific achievements but by his dedication to India’s production and utilisation of oilseeds. As Dr. M. S. Swaminathan noted when he delivered this lecture some years ago, Professor Kane dreamt of India where the shortage of edible oils would be a problem of the past. He devoted his life to the realisation of this dream.”
डॉ. वर्गीस कुरीयन यांनी,डॉ. जे. जी. काणे स्मृती पारितोषिक स्विकारताना केलेल्या भाषणामधून वरील उतारा आहे.मी केलेला मराठी अनुवाद असा..
” डॉक्टर जे.जी.काणे स्मृती पारितोषिक स्विकारताना माझी मनस्थिती द्विधा झाली आहे. पारितोषिक विजेत्याने आपणासारख्या नामांकित शास्त्रज्ञासमोर दोन शब्द बोलावे अशी अट आहे. हे विचार मांडताना डॉक्टर काणे यांनी आयुष्यात, ज्या उच्च परंपरा व असामान्य दर्जा निर्माण केला, त्याला पूरक असेच भाषण व्हावे हीदेखील आयोजकांची नैसर्गिक अपेक्षा असणारच. त्यामुळेच माझे काम खूपच कठीण झाले आहे.”
डॉक्टर जे. जी. काणे हे भारतातील नव्हे, तर जगातील एक असामान्य शास्त्रज्ञ व्यक्तिमत्व होते. त्यांनी शास्त्रीय संशोधन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. “आपला भारत देश, तेलबिया व खाद्य तेल उत्पादन याबाबतीत आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी कसा होईल” हे त्यांच्या जीविताचे ध्येय होते. डॉ.एम. एस. स्वामीनाथन यांनी हेच पारितोषीक गतवर्षी स्विकारतांना जे म्हटले होते तेच मला ही सांगावेसे वाटते,..”हा देश खाद्य तेले उत्पादन व उपभोग (Production and Consumption), याबाबतीत ज्या दिवशी स्वयंपूर्ण होईल, त्याच दिवशी डॉ. काणे यांचे स्वप्न पूर्ण होईल. त्यासाठी आपण झटून प्रयत्न करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली.”
भारत देश दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावा म्हणून भारतात “धवलक्रांती”आणणाऱ्या डॉ. वर्गीस कुरीयन या भारतमातेच्या एका महान सुपुत्राने, आपला देश खाद्य व अखाद्य तेलाचे (Edible and Non edible Oils), बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी आयुष्यभर संशोधनकार्यात झोकून देणाऱ्या, भारताच्या दुसऱ्या एका महान शास्त्रज्ञाला दिलेली ही मानवंदना आहे. मला ती आवडली, भावली, कारण,
गुणी गुणम्वेक्ती न निर्गुण:
बली बलम्वेत्ति न निर्बलः.
पिकः वसंतस्य गुणम् न वायसः,
करीच सिंहस्य बलम् ,न मूषकः|
एक गुणवंतच विद्वत्तेची परीक्षा करू शकतो, बलवंत शक्तीची परीक्षा घेऊ शकतो. वसंताचे गुणगान करणे कोकिळेचे काम, कावळ्याचे नव्हे, मृगराज सिंहाची शक्ती जोखणे हत्तीचे काम, तेथे उंदराचे काय काम? महागुरू डॉ.काणे यांच्या थोरवीचे गुणगान करणे माझे काम नाही. मला सुदैवाने, चार वर्षे मिळालेल्या त्यांच्या सान्निध्यामुळे माझे महागुरू मला कसे दिसले, त्यांनी मला कसे उपकृत केले, याचे माझ्या अल्प बुद्धीने केलेले आकलन व आठवणी येथे सांगणे एवढाच माझा प्रामाणिक हेतू आहे. सुदैवाने माझे गुरु श्री. एन. जी. वागळे,सर तसेच डॉक्टर काणे यांचे, प्रथम विद्यार्थी (Ph D,पदवी साठी), डॉ.भट यांनी दिलेले श्रद्धांजलीपर टिपण व डॉक्टरांचे सुपुत्र श्री. त्रिविक्रम काणे यांनी सांगितलेल्या, आपल्या पित्याच्या संस्मरणीय आठवणी, या सर्व गोष्टी जमेस धरून हा लेख तयार करण्याचा माझा प्रयत्न कितपत यशस्वी झाला हे आपण ठरवावे. माझ्या गुरूंच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक प्रामाणिक, अल्प प्रयत्न आहे असे मी समजतो. त्यांच्या असामान्य, अद्वितीय, अद्भुत, व्यक्तिमत्वाला,माझ्यासारख्याने शब्दात पकडणे केवळ अशक्य. त्यांना ही माझी भावपूर्ण श्रद्धांजली आहे..केवळ माझ्या मनाच्या समाधाना साठी मी हे करतो आहे !
भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे,
ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, कूटस्थो विजितोन्द्रियः
युक्त इत्युच्यते योगी ,समलोष्टाश्मकांचनः|
ज्ञान आणि विज्ञान यांचा अनुभव पुरेपूर घेतल्यामुळे, ज्याचे अंतःकरण संपूर्ण समाधान पावले आहे असा जितेंद्रिय, मातीचे ढेकूळ काय वा सोन्याची रास काय, सर्व समभावानेच जोखतो. आमचे महागुरू डॉक्टर काणे हे असेच एक महान जितेंद्रिय, तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. ज्योतीने केलेली ही महातेजाची आरती आहे असे समजा!
यु डी सि टी (UDCT),म्हणजे आत्ताची आय सी टी (I CT), या भारतांतील विख्यात तंत्रशिक्षण संस्थेत, 55 वर्षापूर्वी शिक्षण घेत असताना, पदवी अभ्यासक्रमासाठी डॉ.काणे यांच्या ऑईलस्, फॅटस् ,वॅक्सेस (OFW), विभागात दोन वर्ष अभ्यास केला. पुढे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी, प्रत्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षे संशोधन केले. डॉ.काणे हे एक शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ म्हणून किती मोठे होते, हे जरी मला नाही सांगता आले, तरी एक माणूस म्हणून ही ते किती महान होते हाच सांगण्याचा माझा हा प्रयत्न!!
ज्या यु डी सि टी( आत्ताची आई सी टी) मध्ये डॉक्टर जे. जी. काणे यांनी आपले सर्व जीवन समर्पित केले आणि जेथे सौभाग्याने चार वर्षे मला अभ्यास करता आला त्या UDCT विषयी थोडे.
आमच्या वेळची युडीसिटी म्हणजे आत्ताची आई सी टी (INSTITUTE OFCHEMICAL TECHNOLOGY. ) ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील केमिकल इंजीनियरिंग आणि केमिकल टेक्नॉलॉजी या विषयांतील अभ्यासक्रम देणारी, स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा असणारी, मुंबईतील माटुंगा स्थित, एक नामांकित संस्था आहे. या संस्थेची स्थापना सन 1934 साली करण्यात आली. मुंबईतील काही प्रसिद्ध उद्योगपती व मान्यवर समाजसेवक यांच्या दूरदृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना झाली. शिक्षणसंस्था व उद्योगजगत यांच्यात खूप जवळचा सुसंवाद असावा आणि संशोधनातून निघालेले निष्कर्ष, प्रत्यक्ष उद्योगधंद्यात रूपांतरीत करून, त्याचा फायदा जनसामान्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी व्हावा हाच या संस्थेच्या स्थापनेमागील उदात्त हेतू होता ( It should be a role model for very active and rewarding interaction with industry and academic.). आज सुमारे 88 वर्षानंतर सिंहावलोकन केले असता निश्चितच त्या संस्थापकांनी दाखविलेली दूरदृष्टी योग्य होती, असेच म्हणावे लागेल.
ज्या महागुरुंनी या संस्थेत अगदी पहिल्यापासून , आजतागायत शिक्षणदानाचे पवित्र कार्य केले, तसेच त्यांच्या या शिक्षणयज्ञातून , जे गुणवंत कर्तृत्ववंत विद्यार्थ्यांची एक मालिकाच तयार झाली, त्यातील वानगीदाखल थोडी नावे जरी ऐकली तरी मी काय म्हणतो याची कल्पना येईल.
प्रो. पद्मभूषण के वेंकटरामन, डॉ. पद्मभूषण जी. पी. काणे, डॉ.डायरेक्टर जे.जी काणे, पद्मविभूषण डॉ. मनमोहन शर्मा, पद्मभूषण डॉ. बाळ टिळक अशी प्राध्यापक मंडळी. डॉ. पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर (जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ), श्री. मुकेश अंबानी ( रिलायन्स इंडस्ट्रीज), डॉ. के. एच. घर्डा, (घर्डा केमिकल्स), पद्मविभूषण डाॅ. अंजी रेड्डी (डॉ. रेड्डीज लॅब), डाॅ. पद्मविभूषण होमी सेठना (अटाॅमिक एनर्जी कमिशन,अध्यक्ष) हे नमुन्यादाखल उल्लेखिलेले कांही नामवंत माजी विद्यार्थी. यावरून संस्थेच्या उंचीची, उच्च परंपरा आणि रासायनिक तंत्रविज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमात राखलेल्या उच्च दर्जाची कल्पना यावी. संस्थेने 19 पद्म पुरस्कृत शिक्षक व विद्यार्थी निर्माण केले. जागतिक किर्तीच्या शास्त्रज्ञांना मिळणारा, FRS,(FELLOW OF ROYAL SOCIETY), हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणारे, भारतातील,हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या, शास्त्रज्ञापैकी डॉ. माशेलकर व डाॅ. मनमोहन शर्मा हे माजी विद्यार्थी याच I C T चे!!
खरं सांगतो, वर लिहिलेली नावे अगदीच वानगीदाखल आहेत. मात्र मला मनापासून वाटते, आय सी टी चा प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेला, सन्माननीय व ख्यातनाम व्यक्ति आहे!!
माझ्या आधी यु डी सि टी मध्ये आमच्या बोर्डीतील केवळ दोनच विद्यार्थी तेथे शिक्षण घेऊन बाहेर पडले होते. त्यातील श्री. वसंतराव सावे हे भारतीय कापड उद्योगात एक प्रसिद्ध नाव होते. भारत व परदेशात त्यांनी आपली सेवा दिली.
दुसरे श्री रघुनंदन चुरी मला एक वर्ष सिनियर होते. रघुनंदन यांनीही टेक्स्टाईल विभागात, B Sc.Tech (Text), पदवी उत्तम प्रकारे घेतली. त्या वर्षी सबंध विद्यापीठात सर्व विभागातून दुसरा व आपल्या टेक्स्टाईल विभागात त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. ते, ‘बी आर लेंटीन’,प्राईज चे मानकरी ठरले. MSc.Tech (Res) हा शिक्षणक्रम पूर्ण करून “वुल रिसर्च इन्स्टिट्यूट”या प्रसिद्ध संशोधन संस्थेमार्फत, इंग्लंडमधील लीडस् विद्यापीठात त्यांनी M.Phil. ही पदवी घेतली. तेथे तीन वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन भारतात परतले. त्यांनी टेक्स्टाईल रसायने, तसेच वॉटर ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी सारख्या, अनेक विषयात पारंगतता मिळूवून मोठे नाव केले. त्यांचे अनेक संशोधनपर लेख ,विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. माझा त्यांचा नेहमी संपर्क असतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला UDCT मधील पहिले वर्ष खूप सोयीचे गेले हे मान्य केले पाहीजे.
योगायोगाने डाॅ.काणे सरांवर हा लेख लिहिण्यासाठी त्यांचे पहिले पीएचडी पदवी चे विद्यार्थी डॉ. भट यांचा संपर्क नंबर मला मिळवून देणारे, डॉ. राजीव हे रघुनंदन यांचे कनिष्ठ बंधू. डॉ. राजीव हे सुद्धा आमच्या आयसीटी मधूनच बीएस्सी टेक, एम एस सी (टेक), पी एच डी(टेक) पदव्यांचे मानकरी आहेत. डॉ. राजीव यांना शैक्षणिक,औद्योगिक व सामाजिक क्षेत्राशी संबंधित सुमारे पस्तीस वर्षाचा मौल्यवान अनुभव आहे. त्यात लुब्रीकेंट्स, एडिटीवज्, तेल उत्खनन क्षेत्राशी निगडित रसायने, औषधी रसायने अशा विविध क्षेत्रात त्यांनी उत्पादक वा सल्लागार म्हणून भारतात व परदेशांत योगदान दिले आहे. आजही देतआहेत. स्वतः एक प्रगतिशील उद्योजक आहेत. आजही ते I C T मथ्ये,VISITING FACULTY,म्हणून सेवा देतात. पदवीपूर्व,पदव्युत्तर व पी एच डी साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक, परीक्षक म्हणून मार्गदर्शन करतात. नाॅर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष,आईल टेक्नॉलॉजीस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया(OTA), चे उपाध्यक्ष, भारत सरकारच्या बी आय एस, (Bureau of Indian Standards) संस्थेत, अनेक समित्यांचे सभासद,अशा अनेक सरकारी व निमसरकारी संस्थांशी त्यांचा आजही संबंध आहे.
अनेक मानाच्या व सन्मानाच्या पुरस्कराबरोबरच अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या, डाॅ.जे.जी काणे पुरस्काराचे ते मानकरी आहेत. डाॅ.राजीव चुरी यांचे नाव आमच्या ऑइल इंडस्ट्रीत आज खूप सन्मानपूर्वक घेतले जाते. विधायक कार्यासाठी मदत देण्यास ते सदैव तत्पर असतात.
सन 2016 मध्ये झालेल्या एका पाहणीनुसार, केमिकल इंजीनियरिंग व केमिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम शिकविणाऱ्या भारतातील सर्व संस्थांमध्ये , ICT चा नंबर पहिला, तर जगातील सर्व तत्सम महाविद्यालयामध्ये चौथा नंबर होता. ही गोष्टदेखील या महाविद्यालयातील शिक्षणाच्या दर्जाची व उच्च परंपरांची स्पष्ट कल्पना येईल. आमच्या सारख्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यालाच नव्हे तर, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असेच या संस्थेचे काम आजवर झाले आहे.
डॉक्टरांच्या संग्रहातील युडीसिटी चे एक जुने छायाचित्र,1939. सौजन्य,श्री. त्रिविक्रम काणे. आणि आजची ICT, मुख्य प्रवेशद्वार .
एवढी विस्तृत प्रस्तावना करण्याचे कारण, ज्या संस्थेत आमचे महागुरु डाॅ.काणे यांनी आपले सर्व जीवन व्यतीत केले, त्यांच्या या महान कार्याची पार्श्वभूमी समजावी, एवढाच आहे.
मी ज्यावेळी U D CT मध्ये जून,1963 ला, BSc.Techपदवी. साठी प्रवेश घेतला, त्यावेळी एक गमतीचा प्रसंग घडला.
त्यावेळी बीएस्सी (टेक), या अभ्यासक्रमासाठी सर्व भारतातील विद्यापीठातून, व (काही परदेशातील विद्यापीठातून सुद्धा), केवळ,116 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असे. त्यात आमच्या ऑइल्स, फॅट, वॅक्सेस (OFW), या विभागात सोळा विद्यार्थी असत .मेरीट प्रमाणे विद्यार्थ्यांची निरनिराळ्या विभागांत विभागणी होई. माझ्या बीएस्सी परीक्षेतील गुणानुसार मला टेक्नॉलॉजी ऑफ प्लास्टिक्स अँड पॉलीमर्स या विभागात प्रवेश मिळणे अपेक्षित होते. मला त्या विभागात जाण्याची इच्छा होती. प्रत्यक्षात मला या विभागात प्रवेश मिळाला नाही. विचारपूस केल्यावर प्लास्टिक टेक्नॉलॉजी विभागातील काही विद्यार्थ्यांना माझ्यापेक्षा कमी मार्क आहेत हे कळले. U D C T चे सर्व काम अत्यंत निपक्षपातीपणे व पारदर्शक असते हे त्यावेळीही बोलले जात असे व आजही I C T चे बाबतीत तसेच म्हणतात. मी खूप विचाराअंती, त्यावेळचे असिस्टंट रजिस्ट्रार, श्री. गुप्ते यांना भेटावयास गेलो.
श्री. गुप्तेंनी माझी आस्थेने चौकशी केली. “अरे मीच तुला बोलावून घेणार होतो, पण कामाच्या रगाड्यात ते राहून गेले.” असे म्हणून व माझ्या वडिलांचे (आप्पा), आलेले एक पत्र मला वाचावयास दिले. आप्पांनी शुद्ध मराठीत एक पत्र रजिस्टार साहेबांच्या नावाने, वैयक्तीक रित्या पाठविले होते.आप्पांची ती नेहमीची सवय होती. मी साताऱ्यास प्रथम कॉलेजला गेलो तेव्हा प्रिन्सिपल बॅरिस्टर पी. जी. पाटील यांना, पुढे इस्माईल युसुफ कॉलेज मध्ये प्रिन्सिपल डॉ. पोद्दार यांना, आता UDCT मध्ये असि. रजिस्ट्रार श्री. गुप्ते साहेबांना, व त्यानंतरही मी एम. एस.सी. (टेक्)साठी डॉ. काणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले, तेव्हा त्यांनाही असेच एक वैयक्तिक पत्र पाठविले होते. आमची कौटुंबिक पार्श्वभूमी, स्वतःची शारीरिक मजबुरी तसेच मार्गदर्शन व संस्थेकडून मिळू शकल्यास शैक्षणिक, आर्थिक मदत, अशा स्वरूपाची विनंती पत्रात असे. या पत्रांनी त्या त्या वेळी मला खूप आधार दिला, मी काहीही न बोलता, माझी मोठी कामे ,आप्पांनी घर बसल्या ,एक साधे पोस्टकार्ड लिहून केली, ही सत्य परिस्थिती आहे.
श्री. गुप्ते हे एक अतिशय समंजस व विद्यार्थीहितैषी असे अधिकारी होते. गुप्ते सरांनी मला सांगितले “अरे, तुला प्लास्टिक विभागात शेवटच्या नंबराने प्रवेश देण्यापेक्षा ऑइलस्(OFW), विभागात पहिल्या नंबराने प्रवेश दिला आहे. त्यामुळे महिना पन्नास रुपयाची मेरीट शिष्यवृत्ती विद्यापीठाकडून मिळेल. चांगली आर्थिक मदत होईल”. सरांचे हे सांगणे अतिशय सयुक्तिक होते. मी त्यांचे आभार मानले. त्यानंतरही कितीदा मार्गदर्शनासाठी मी गुप्तेसरांना भेटत असे. माझ्या वडिलांच्या एका साध्या पोस्ट कार्डावरून केलेल्या विनंतीचा, सहानुभूतीपूर्वक विचार करून, मला आयुष्यभर उपकृत केलेल्या गुप्तेसरांची आजही मला कृतज्ञतापूर्वक आठवण आहे.
माझा अभ्यास सुरू झाला व आर्थिक चिंताही मिटल्या. आता अभ्यासात लक्ष एकाग्र करणे आवश्यक होते.
आमच्या OFW, या मुख्य विषयाशी संबंधित ईतर उपविषय,प्रा. डाॅ. काणे, प्रा.डाॅ. रिबेलो, हे दोघेजण स्वतंत्र वर्गात शिकवीत असत. कारण फक्त सोळा विद्यार्थी या विषयासाठी असत. मात्र इतर काही विषय,जे बी.एससी. टेक् (सर्व विभागांचे विद्यार्थी ),व केमिकल इंजिनिअरिंग (प्रथम वर्ष), यांना सारखे असत, त्यासाठी सर्वजण, सुमारे150,160विद्यार्थी ,मोठ्या मुख्य सभागृहात एकत्र बसत असू.
हे मुद्दाम लिहिण्याचे कारण असे की, त्याच वर्षी, 1963 साली, रघुनाथ नावाच्या एका विद्यार्थ्यांनेही केमिकल इंजीनियरिंगच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. तो देखील आम्हा बरोबरच या एकत्रीत तासांना बसत असे. त्यावेळी आम्ही किती भाग्यवान आहोत याची कल्पना आली नाही. हा त्यावेळचा आमचा सहाध्यायी रघुनाथ, म्हणजेच पुढे एक महान, जागतीक दर्र्जाचे शास्त्रज्ञ म्हणून उदयास आलेले आजचे,डॉ.रघुनाथ माशेलकर!! त्यांच्या बुद्धीचा व कर्तृत्वाचा डंका भारतवर्षातच नव्हे तर अखिल जगतात आजही दुमदुमतो आहे!! आम्ही, त्या वर्षीचे युडीसीटी विद्यार्थी खरेच भाग्यवान, अशा महान शास्त्रज्ञासमवेत काही तास का असेना, अभ्यास करण्याचे भाग्य मिळाले!
डॉ. काणेसर जेव्हा आमचे वर्गावर शिकविण्यास येत त्यावेळी त्यांचा पोषाख अगदी पूर्ण साहेबी. सुटाबुटात व डोक्यावर पनामा हॅट, अशा थाटात त्यांचे व्यक्तिमत्व खूपच उठावदार असे. शिकवतांना ते तल्लीनतेने, विषयाबाहेर काहीही न बोलता, मध्ये मध्ये काही हिंदी शब्दांचा वापर व विनोदाची पेरणी करीत शिकवत असत. तरी आम्हा विद्यार्थ्यांना त्यांची भीती वाटत असे. जास्त सलगी होऊ शकत नसे. डॉ. रीबेल्लो यांची वेगळी त-हा होती. उंचीने कमी असलेले रिबेलो, विद्यार्थ्यात, तरतमभाव बाळगीत. आम्ही काहीजण त्यांचे नावडते विद्यार्थी होतो. त्यामुळे त्यांच्याशी दिलखुलास वागण्याचा प्रश्न आला नाही. याउलट आमचे इतर शिक्षक श्री. पद्मनाभन, श्री. वागळे सर, श्री. डीकून्हा, यांच्याशी जवळीक लवकर झाली. पद्मनाभन हे एक साधे, सरळ व सदैव चेहऱ्यावर स्मित बाळगणारे असे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. डिकूना गंभीर व जेवढ्यास तेवढे बोलून आमच्याशी ठराविक अंतर राखून शिकवीत. वागळेसर सर्वांहून वेगळे होते. त्यांचेबद्दल आम्हा विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आमच्या विभागातील सर्वांनाच भितीयुक्त आदर वाटे. “त्यांनी आपला पीएचडीचा अभ्यासक्रम मध्येच सोडून दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शका(Guide) बरोबर काही तात्त्विक वाद झाले होते.” असे काही आमच्या कानावर येत असे. मात्र निश्चित काही कळत नव्हते. तरीदेखील वागळे सरांच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव, यांचे रोखठोक बोलणे, विद्यार्थ्यांची शिस्त व वर्तणूक याबाबतीत कोणतीही तडजोड न करण्याचा त्यांचा स्वभाव, यामुळे डॉ.काणे यांच्या खालोखाल वागळे सरांची आम्हाला आदरयुक्त भीती वाटे. त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल तेव्हा त्यांना विचारण्यास आमची हिंमत नव्हती. सरांचे शिकवणे अत्यंत आस्थापूर्वक व परिपूर्ण असे. विषयाचे संपूर्ण ज्ञान त्यांना आहे, याची जाणीव निश्चित होई. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या बुद्धिमत्तेचे वैभव जाणवत असे. वागळे सर म्हणजे, ‘नो नॉनसेन्स बिझनेस’, असे समीकरण त्यावेळी तरी होते. विद्यार्थ्यांबद्दल आस्था बाळगून, जसे प्रेम देत, त्याच बरोबर कोणी थोडेही वावगे वर्तन केल्यास त्याला तेथल्या तेथे ठेचण्यास मागेपुढे पाहत नसत!
माझ्या सुदैवाने भविष्यात याच वागळेसरांशी आमच्या व्यावसायिक क्षेत्रातील कामामुळे छान ओळख झाली. वरून कठोर व गंभीर वाटणाऱ्या या गुरूंचे अंतरंग किती सोज्वळ व प्रेमळ आहे याची जाणीव मला झाली. वागळे सरांचे एका वाक्यात वर्णन म्हणजे .. वज्रादपी कठोराणी, मृदूनी कुसुमादपि!
प्रसंगी वज्राप्रमाणे कठीण होणाऱ्या सरांचे मन हे इतर प्रसंगी मुलायम फुलासारखे ही होते. हे असे आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे, गुरु वागळे. त्यांच्याविषयीही मला खूप आठवणी सांगता येतील. आज महागुरुविषयी सांगताना, थोडे गुरुविषयीही सांगायचे आहे. सुदैवाने आज नव्वदीच्या घरात असणाऱ्या वागळेसरांची स्मरणशक्ती, विनोदबुद्धी आणि तल्लखता तेवढीच आहे जेवढी साठ वर्षांपूर्वी होती! डाॅ.काणे सरांविषयी मी आठवणीपर लेख लिहितो आहे हे समजल्यावर त्यांनी मला त्वरित, त्यासाठी उत्तेजन देऊन ,आपल्या स्वतःला, महागुरूंविषयी असलेली माहिती, त्यांच्या MSc Tech ,प्रबंधाचे काम,स्वतःवर त्या वेळी कसा अन्याय झाला याचाही रोखठोक लेखाजोगा, मला पाठविला. वर, आपल्या सडेतोड स्वभावानुसार “तुला ही माहिती जेथे वापरायची तेथे, हवी तेवढी वापर” अशी पूर्ण मुभाही दिली. यु डी सी टी सारख्या विख्यात संस्थेतही, अपवाद म्हणून, काही प्राध्यापक मंडळी, आपल्या अहंगंडापोटी, विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे बरबाद करीत, याचा प्रत्यय त्यावरून येईल. वागळे सरांच्या शब्दातच मी ते मुद्दाम देतो आहे. त्या प्रोफेसरांचे नाव गुलदस्तात ठेवतो आहे. आमच्या कॉलेजच्या दिवसात आम्हाला जी वदंता कानी येत होती, त्यामागील सत्यकथा मला आज कळली. सरांबद्दल असलेला आदर आणखी वाढला. श्री. वागळे सर लिहीतात,
“Unfortunately I was dubbed as ‘aggressive’ by Prof. Kane, compared to my submissive classmate whom I succeeded as Associate Lecturer in 1959, after my return from Delhi,(ISI, Directorate). I had a prolonged tiff with ‘Prof.R’, hence I was advised by Prof G.M. Nabar, then Director, through JGK, to seek employment elsewhere and avoid further conflict. I abruptly discontinued my PhD in 1964. Prof. K .K . Dole, who was my viva examination(1962), expressed that my M.Sc(Tech) thesis was fit for a doctorate, so deep investigation in the subject it was. My guide informed Prof. Dole that University V.C. had been fed antipathetic information about me as a “difficult” person. In Fact,’Prof.R’ saw to it that a job offer from HLL, be withdrawn. Yet I got a Chief Chemist’s post in a Swiss headquartered, quality/ quantity superintendence company of International repute,( now SGS India Pvt. Ltd).
No regrets, I expanded my Horizon as an Independent Consultant and to consumer activism.“
वरील निवेदनावरून वागळे सरांना डॉक्टर ‘आर’ यांच्या मानभावीपणामुळे किती त्रास सहन करावा लागला याची कल्पना येते. काही क्षुल्लक वादावादीनंतर डॉक्टर’ आर ‘यांनी सरांवर डूख धरून त्यांना अपमानीत करण्याची एकही संधी सोडली नाही. डॉ. काणे, त्यावेळचे डायरेक्टर डॉ. नाबर व युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.खानोलकर यांचेपर्यंत, “श्री.वागळे हे हाताळण्यास कठीण व्यक्तीमत्व आहे” अशा प्रकारची चुकीची व बदनामीकारक माहिती पुरवली गेली. वागळे सरांचा M.Sc.Tech.पदवी प्रबंध अत्यंत सखोल व परिपूर्ण होता. प्रबंधाचे परिक्षक डॉ. डोले यांनी खास शिफारस करून त्यांच्या प्रबंधास Ph.D Tech. ही वरची पदवी द्यावी अशी शिफारस केली होती. दुर्दैवाने डॉ.’आर’ यांच्या हेकेखोर वागणुकीने ते शक्य होऊ शकले नाही. वागळेसरांना आपले पी एच डी. प्रबंधाचे काम अर्ध्यावर सोडून नोकरीचाही राजीनामा द्यावा लागला. हिंदुस्तान लिव्हरकडून मिळत असलेली चांगली नोकरी त्यांना मिळू नये असा प्रयत्न डॉ. ‘आर’ यांनी केला. जात्याच हुशार व तडफदार असल्याने वागळेसरांना त्यावेळच्या ‘जनरल सुपरिंटेंडेन्स’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्विस कंपनीत चीफ केमिस्टची मानाची नोकरी मिळाली. पुढे त्यांनी नोकरीपेशा सोडून, सल्लागार म्हणून स्वतंत्र उद्योग सुरू केला. खूप मोठे नाव उद्योगक्षेत्रात कमावले. त्या वेळी मी जरी दुसर्या कंपनीत काम करत होतो, तरी वागळे सर ज्या कंपनीस सल्ला देत होते त्या कंपनीशी माझा संबंध आला व सर किती दुर्मीळ काम करत होते, त्याचे मूल्य मला कळले.
मला वाटते साधारणतः 1970, 71 सालात वागळे सरांनी आपला स्वतंत्र सल्लागार (कन्सल्टंट) म्हणून उद्योग सुरू केला. ‘वासू केमिकल्स’,या माझ्याच एका सहाध्यायी मित्राने सुरू केलेल्या आस्थापनात ते सल्लागार म्हणून त्याला मदत करीत होते. त्याचाही तो नवीनच सुरू केलेला उद्योग होता. या क्षेत्रात मित्राला काहीही माहिती नव्हती. वागळे सरांनी त्याला आपल्या अनुभव व ज्ञानाच्या बळावर काही अगदी नवीन प्राॅडक्टस् बनवून दिले. त्यांतील एका प्रॉडक्टला ऑइल इंडस्ट्रीमध्ये खूप मागणी होती. जी वंगणे (Cutting Oils) पाण्यात विरघळवून वापरावयाची असतात, त्यांना हवेतील जंतूंचा (Bacteria) संसर्ग होऊ नये व ती दीर्घ काल वापरता यावीत या हेतूने हे जंतूरोधक (INHIBITORS), आजही वापरले जाते. प्रचंड प्रमाणात त्याची मागणी असते. पहिल्यांदाच कंपनी हे देशी बनावटीचे रसायन वापरत होती. हे Import Substitute असल्याने, सहाजिकच काही तक्रारी, दर्जा नियंत्रणात, (QUALITY CONTROL) येत. प्रत्येक वेळी वागळे सर स्वतः आमच्या प्रयोगशाळेत येऊन त्या समस्येचे निराकरण करीत. कधीही त्यांनी याबाबतीत काही ‘शॉर्टकट’ मार्ग स्वीकारले नाहीत. त्यामुळे या रसायनाला आमच्याच कंपनीत नव्हे तर पुढे इतरही मोठ्या ऑईल कंपन्यात मान्यता मिळाली. त्याचा अफाट खप झाला, आजही होत आहे. “वासू केमिकल” ला केवळ करोडो रुपये फायदाच झाला नाही तर भारत सरकारकडून, ‘आयातीस पर्याय’ निर्माण करण्याबद्दल (IMPORT SUBSTITUTE) असलेले खास पारितोषिकही मिळाले. सरकार दरबारी नाव झाले. अर्थातच या मागे वागळे सरांची तिक्ष्ण बुद्धी, ज्ञान व दूरदृष्टी होती. मात्र ‘गरज सरो, वैद्य मरो’ या ऊक्तीचा अनुभव सरांना येथेही आला. पुन्हा कारण त्यांचा स्पष्टवक्तेपणा व निस्पृह वृत्ती. सरांना या कंपनीस रामराम करावा लागला. पण हे त्यांचे नव्हे तर त्या कंपनीचे दुर्दैव!
दुसऱ्या एका कंपनीसाठी सरांनी ऑइल इंडस्ट्रीत प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या एडीटीव् (Additives) या घटकाच्या निर्मितीस मदत केली. खरेतर हे तंत्रज्ञान अजूनही भारतात संपूर्णपणे विकसित झालेले नाही. आजही सुमारे 80 टक्के एडीटीव्ह परदेशातून आयात होत आहेत. ज्या कंपनीला सरांनी ही Additives बनवण्यासाठी मदत केली ती कंपनीदेखील आज ही रसायने भारतात व भारताबाहेरही मोठ्या प्रमाणावर पाठवून करोडो रुपयाचा फायदा करीत आहे. कारण येथे खूप किफायतशीर दरात ती बनवता येतात. सरांच्या कृपेमुळे मलाही पुढे या कंपनीत दर्जा नियंत्रण विभागात, (QUALITY CONTROL) सल्लागार म्हणून काम मिळाले. या कंपनीत तयार होणाऱ्या विविध प्राॅडक्टस् ची तपासणी व गुणवत्ता नियंत्रणासाठी लागणारी उपकरणे, साधने, विविध रसायने (standard chemicals) मिळवून प्रयोगशाळा सुसज्ज करणे तसेच त्यांच्या एडिटीवज् साठी ग्राहकांना मार्गदर्शक पुस्तिका तयार करणे, (Product Application Data), असे काम मला करावयाचे होते. खरे तर भारतातील हे एक अद्वितीय असे संशोधन होते. सरांनी, विशेष काही संसाधने हाताशी नसताना या एडिटीवज् ची निर्मिती करण्यासाठी त्यांना मोलाचा सल्ला दिला होता. या प्राॅडक्सलादेखील भारतात व भारताबाहेर खूप मागणी होती. हीदेखील आयात पदार्थांची पर्यायी व्यवस्था निर्माण झाली होती. तेथेही त्यांना मागचाच अनुभव आला असावा. कारण काही दिवसांनी या कंपनीलाही त्यांनी राम राम ठोकला. सहाजिकच आहे..” वागळे की दुनिया बहोत ऊंचे पसंद वाले लोगों की थी ..” तेथे या बुटक्या लिल्लीपुटीयन्सना वाव नव्हता. या बुटक्यांच्या दुनियेत स्वाभिमानाची, कर्तृत्वाची उंची राखणारा नापास ठरविला जातो!
सरांनी भारतीय ग्राहक हक्क संवर्धन करणाऱ्या,CONSUMER GUIDANCE SOCIETY OF INDIA (CGSI), या देशाच्या सर्वोच्च ग्राहक सेवाभावी संस्थेत विनामूल्य सेवा दिली.एवढेच नव्हे तर ग्राहकांच्या हक्क संवर्धनासाठी जागतिक पातळीवरही त्यांनी योगदान दिले आहे. “किमत”, या CGSIच्या मासिकाचे संपादक, कंजूमर कंप्लेंट कौन्सिल(CCA) चे सभासद ,ॲडव्हर्टायझिंग स्टॅंडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया(ASCI), असोसिएशन फार कंजूमर ॲक्शन ऑन सेफ्टी अँड हेल्थ, (ACASH), अशा बहुविध पदावर त्यांनी काम केले. 2005 साली या संस्थेतून निवृत्त होताना तेव्हाचे सेक्रेटरी जनरल ,यांनी सरांच्या कार्याचा गौरव करताना उद्गार काढले.
“श्री.वागळे साहेबांनी गेल्या दहा वर्षात आमच्या या सेवाभावी संस्थेसाठी शेकडों सभांना उपस्थिती लावली आणि हजारो तक्रारींचे निवारण, ग्राहकांना समाधान देत केले. त्यांच्या सेवेचे मोजमाप आम्ही करू शकत नाही..” मला वाटते सरांच्या CGSI, मधील कामाला मिळालेली ही मानवंदना आहे.
वागळे सरांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सामाजिक सेवेला तोड नाही खरेतर ह्या बहुआयामी बहुमुल्य कामाच्या मूल्यमापनासाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.
आपल्या निस्वार्थी व निष्पक्ष सेवेबद्दल सर काय म्हणतात?
“I am happy that I contributed to the values to generate social good, which was shown by my Mahaguru with his students and perhaps by me, to my disciples in turn..”
चतुरस्त्र बुद्धी, कल्पनेची ऊंच झेप, निसंदिग्ध विचारांची बैठक, मूल्यांशी तडजोड न करता व संभाव्य परिणामांची जाणीव ठेवून, आपला स्वाभिमान न सोडता राहणारा अतिशय हुशार पण रोखठोक माणूस हेच थोडक्यात सरांचे वर्णन!!
या लेखात दिलेली महागुरु डॉक्टर काणे यांची दोन छायाचित्रे व महागुरूंच्या आमच्या खाद्य तेले क्षेत्रातील कामाची माहिती वागळे सरानीच मला दिली आहे.
आम्हा सर्वांचेच महागुरु डॉ. काणे यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण अगदीच वेगळी. सौम्य, शांत प्रवृत्ती, मितभाषी, चेहेऱ्यावर मंदहास्य, इतर सहकारी प्राध्यापक काहीही टीकात्मक बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावरील लक्ष जराही विचलित न करता पुढे जात राहणे. अगदी प्रसंगी कोणी उपरोधिक बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष करून, मनाची शांती जराही न ढळू देणारे आमचे महागुरू हे एक वेगळेच रसायन होते.
मी मागे म्हटल्याप्रमाणे मी जेव्हा OFW विभागात प्रवेश घेतला, तेव्हा मला, डॉक्टरांची कौटुंबिक माहिती अजिबात नव्हती. त्या वेळी ती करून घेणे समर्पक वाटले नव्हते. पुढे मी गोदरेज कंपनीत काम करीत असताना माझे एक सहकारी सरांच्या गावाकडचे होते. खरे म्हणजे डॉक्टरांच्या शिफारशीमुळे त्यांना या कंपनीत नोकरी मिळाली होती. त्यांच्याशी बोलण्यावरुन डॉक्टरांचे गाव हे पुण्याजवळील भोर होते एवढे कळले होते. विसाव्या शतकाच्या अगदी प्रारंभी कालात डॉक्टरांनी देशात उच्च शिक्षण कसे घेतले व पुढे परदेशात, विशेष ज्ञानासाठी कसे गेले, तेथे नक्की काय शिक्षण घेतले वगैरे माहिती मला जरूर हवी होती पण त्या वेळी मी प्रयत्न केले नाहीत.
स्वातंत्र्यपूर्व कालात ,भारतातील घटक राज्यात औंध व भोर या दोन संस्थानातील अधिपती हे “स्वदेशी व स्वराज्य” या लोकमान्य टिळकांच्या मंत्राने भारलेले होते. या अधिपतींचा तो जिव्हाळ्याचा विषय होता. भोर संस्थांनाची माती, महाराष्ट्राच्या इतिहासातील दैदिप्यमान शिवशाहीतील अनेक घटनांची साक्षीदार आहे. प्रत्यक्ष बाल शिवरायांच्या पावन चरणांचा स्पर्श तिथे झाला आहे. शिवरायांच्या अनेक साथीदारांनी आपले स्वराज्यस्थापनेचे मनसुबे या परिसरातील दगडधोंड्यात फिरून, आपले अनेक मनसुबे रचून, येथील दुर्गम परिसर पिंजून काढला आहे. मराठी वीरांच्या शौर्याचा गंध आजही या आसमंतात ओतप्रोत भरला आहे. इतिहास आणि निसर्ग सौंदर्य यांचे मिलन म्हणजे हा भोरचा प्रदेश. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्मारक येथे आहे. तोरणा किल्ला घेण्यासाठी शिवराय व त्यांच्या मावळ्यांनी जेथे खलबते केली, तेथे हे “स्वराज्याचे स्मारक” आजही डौलाने उभे आहे. डॉ. काणे यांच्या व्यक्तिमत्त्वातील मातृभूमीचे प्रेम, स्वदेशीचे आकर्षण, साधी राहणी व उच्च विचारसरणी हे जीवनभर अंगिकारलेले तत्वज्ञान व त्यासाठी दिलेले योगदान पाहिल्यानंतर त्यासाठी कुठेतरी त्यांच्या बालपणीच्या दिवसांतील या काळ्या ‘भोर’ मातीच्या संस्कारांची व जाणिवांची स्मृति कारणीभूत असावी असे मला वाटते.
पहिल्या वर्षाच्या सुरुवातीला एके दिवशी झालेली गंमत. गंमत कसली फजिती! अजूनही लक्षांत आहे. मी व माझा सहाध्यायी, सुधीर नार्वेकर (आज तो या जगात नाही), कॉलेजच्या वाचनालयात काही अभ्यासाचे संदर्भ शोधीत होतो.
I C T ची ही लायब्ररी म्हणजे केमिकल तंत्रज्ञान अभ्यासासाठी संपूर्ण भारतात अनेक संदर्भग्रंथ व नियतकालिकांनी परिपूर्ण असा श्रीशारदेचा खजिना आहे. लिहिता लिहिताच, आमचे बोलणे मराठीत सुरू होते. आजूबाजूच्या लोकांना ते समजू नये, अशी अपेक्षा होती. डॉ.काणे वर्गात तास घेण्यासाठी पूर्ण सुटा बुटात टाय लावून येत. बहुधा डोक्यावर “पनामा हॅट”, असे. त्याचे आम्हाला कुतूहल होते. इतर प्राध्यापकही विलायती पोषाखांत असले तरी बोडखे असत. सरांचे इंग्रजी बोलणे साधे, समजणारे. आपला तास ते नेहमीच मनोरंजक करीत. त्या ‘हॅट’ वर आमची मल्लीनाथी चालू होती… कुजबुज सुरु होती. आणि…समोरच्या बाजूने, मराठीतून, सौम्यआवाजातील प्रश्न आला “आपण डॉक्टर काणेविषयी बोलत आहात काय?” शेल्फवरील पुस्तकांच्या पडद्यामुळे समोरील व्यक्ती स्पष्ट दिसत नव्हती. आम्ही उभे राहिलो. बोलणाऱ्या व्यक्तीकडे दृष्टिक्षेप केला. सफेद धोतर, अंगात सदरा, कोट, डोक्यावर काळी टोपी, अशा साध्या वेशातील ही व्यक्ती आमच्याकडे सस्मित पहात होती. आमच्या भांबावलेल्या चेहर्याकडे पहात, त्या व्यक्तीने सांगितले,” अरे मला सांगा ना, काय सांगावयाचे आहे,काणे ना, मीच तो डॉक्टर काणे..” शेवटचे दोन शब्द कसेबसे कानावर पडतात न पडतात, आमच्या वह्या-पुस्तके घेण्याची शुद्धही आम्हाला राहिली नाही. मागच्या मागेच आम्ही सुंबाल्या करत तळमजल्यावरील कॅन्टीन गाठले,दोन ग्लास पाणी प्यालो. अंगाला घाम सुटला होता. ‘आपली बी.एस.सी. टेक् डिग्री आता विसरा…’ हीच भावना झाली. पुढील कांही दिवस सरांच्या वर्गात शेवटच्या बाकावर बसून मानही वर केली नाही! डॉक्टरांच्या अर्थातच हे लक्षात आले होते. त्या भल्या गृहस्थांनी कधीही त्या प्रसंगानंतर आम्हाला छेडले वा काही विचारले नाही. सहजपणे त्यांनी त्या दिवशी आम्हाला माफ केले तेवढ्याच खेळकरपणे ते सर्व विसरूनही गेले.
डॉ.काणे व लेखात वर उल्लेखलेले, डाॅ. ‘आर’ या दोघांमध्ये हाच मूलभूत फरक होता. त्या प्रसंगी डाॅ.काणे ऐवजी डाॅ.’आर’ असते तर निश्चितच आमचे ‘ना-पदवीदान’ त्याच दिवशी झाले असते, यात जराही संशय नाही!
कॉलेजात वर्गावर येतांना नखशिखांत पाश्चिमात्य पोशाख परिधान करणारे आमचे महागुरू, घरी गेल्याबरोबर हा लवाजमा उतरवून ठेऊन धोतर,कोट, डोक्यावर काळी टोपी पायात वहाणा या पारंपारिक वेषातच फिरत असत. कॉलेजची लायब्ररी असो कोणताही कौटुंबिक समारंभ असो, हाच पोषाख असे. श्री. वागळे सरांच्या लग्नसमारंभातील छायाचित्रात याच पारंपारिक वेशात ते दिसत आहेत. महागुरू, म्हणजे साधेपणा, सोज्ज्वळता व विद्वत्ता यांचे एकवटलेले मूर्तीमंत स्वरूप होते.
मी बी एस्सी टेक, पदवी परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झालो. आता माझ्यापुढे तीन पर्याय होते .एक, एम एस्सी टेक्.(M .Sc Tech) हा पुढील अभ्यासक्रम चालू ठेवणे. दोन, त्यावेळी नवीनच सुरू झालेल्या एम बी ए (M B A),अभ्यासक्रमासाठी मुंबईतील जमनादास बजाज कॉलेजात प्रवेश घेणे . तीन, नोकरी पेशा स्विकारणे. एकूण कौटुंबिक परिस्थिती पाहता, नोकरी करणे मला योग्य वाटत होते. मी आप्पांना तसे सांगितले देखील. मात्र त्यांचा आग्रह, मी पुढे शिक्षण चालू ठेवावे असे होते. “माझी नोकरी अजून तीन-चार वर्षे असल्याने, तू आमची काळजी करू नको..” असे त्यांचे म्हणणे. एम एस सी टेक ची तिसरी पदवी घ्यावी असे मी ठरविले. मागे वळून पाहता आप्पांनी दिलेला सल्ला बरोबर होता असेच मला आज वाटते .
या अभ्यासक्रमासाठी तेव्हां, विद्यापीठमान्य प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली(Guide), प्रबंध लिहावा लागत असे व त्यासाठी यूजीसी (University Grants Commission), या भारत सरकारच्या विद्यापीठ अनुदान संस्थेची अडीचशे रुपये महिना शिष्यवृत्ती मिळत असे. अर्थातच त्यासाठी डॉ.काणे हेच मला मार्गदर्शक हवे होते. सुदैवाने त्यांनी मला मान्यता दिली. आणि मी हा अभ्यासक्रम सुरू केला. आप्पांच्या (वडील), नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, जेव्हा त्यांना डॉ.काणे हेच माझे मार्गदर्शक आहेत, असे समजले तेव्हा त्यांना आभाराचे व मार्गदर्शनाची विनंती करणारे वैयक्तिक पत्र पाठविले. सरांनी मला बोलवून त्या पत्रासंबंधी माहिती दिली. “तू मेहनत घेतली पाहिजे, प्रकल्पावर पूर्ण लक्ष केंद्रित कर. जमेल तशी आर्थिक मदत देण्याचा मी प्रयत्न करीन “डॉ. काणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम स्विकारणे म्हणजे, प्रबंध दोन वर्षात होईल अथवा चार पाच वर्षेही लागू शकतात. ही माझी खात्री होती त्यामुळे डॉक्टरांच्या तेवढ्या आश्वासनाने ही मी निर्धास्त झालो व कामावर लक्ष केंद्रित केले.” मला खूप समाधान वाटले. माझ्या एकंदर कौटुंबिक पार्श्वभूमीची कल्पना त्यांना आली असावी.
डॉक्टरांचे औदार्य व सहानुभूतीचा प्रत्यय त्वरित आला. यूजीसी शिष्यवृत्ती दर महिन्यास मिळत नसे. चार-पाच महिन्यांनी एकदम रक्कम मिळे. हे जाणून पहिल्यांदा त्यांनी मला ‘मराठी विज्ञान परिषद,मुंबई’ या संस्थेमार्फत, त्यांच्या’ विज्ञान पत्रिका’, या मासिकासाठी इंग्रजीतील लेखांचे मराठी भाषांतर करणे, प्रुफे तपासणे, अशा प्रकारचे साधे काम दिले. .” तुला हे जमेल का “अशीही प्रेमाने चौकशी केली . ह्या कामामुळे महिन्यातून अगदी चाळीस ,पन्नास,रुपयांची कमाई होऊ लागली. एवढी रक्कम त्या दिवसात माझ्यासाठी महत्वाची होती. याबाबतीत कोणाशी मी बोलू नये अशी त्यांची अपेक्षा होती. मी त्यांची सूचना पाळली. मदत अल्प होती. मात्र त्यामागे माझ्या महागुरुंची सद्भावना, प्रेम व आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. आजही आहेत .
पुढे तर सरांनी मला आश्चर्याचा गोड धक्काच दिला. यु जी सी ऐवजी माझी शिफारस त्यांनी सी एस आय आर (Council of Scientific and Industrial Research.) या भारत सरकारच्या केंद्रीय संस्थेकडे करून मला अडीचशे ऐवजी मासिक चारशे रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली. डॉ.काणे यांच्याकडून अशी खास शिफारस एखाद्याला मिळणे केवळ नशिबाचा भाग असे. मला त्यावेळी सरांच्या या मेहरबानीबद्दल काय वाटले , ते खरेच आजही सांगता येत नाही मात्र संत तुकारामांच्या एका ओळीची आठवण झाली..
“अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें.”
महागुरु जेव्हा तुमचा शिष्य म्हणून स्विकार करतात तेव्हा तो शिष्य कसाही असला तरी त्याचे भलेच करतात !
डॉक्टरांनी मला माझ्या या प्रबंधासाठी ,”स्टडीज ऑन द बिल्ट सोपस्” (STUDIES ON THE BUILT SOAPS), असा विषय दिला होता .अगदी सुरुवातीला डॉक्टर कुरियन यांच्या भाषणातील जी वाक्ये उद्धृत केली आहेत त्याप्रमाणे भारत देशाला खाद्य तेलांचे बाबतीत आत्मनिर्भर करणे हे डॉ. काणे यांच्या जीवनाचे ध्येय होते .त्याच ध्येयाने त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना, ह्या धोरणाशी सुसंगत संशोधन प्रकल्प देऊन पाठपुरावा केलेला दिसेल. या प्रकारचा प्रकल्प देऊन कचऱ्यातून सोने कसे काढावे याचे शिक्षण दिले .माझ्या या प्रब॔धाच्या विषयात धुण्याच्या साबणात (Laundry Soap), वापरल्या जाणाऱ्या वनस्पती तेलाचे (खाद्य व अखाद्य) प्रमाण शक्य तेवढे कमी करून , त्या ऐवजी पर्यायी सेंद्रिय व असेंद्रिय रसायने वापरून,(Organic,Inorganic Fillers), साबणाची गुणवत्ता खाली न येऊ देता, कसे करता येईल, याचा अभ्यास करावयाचा होता. भारतामध्ये आजही लाखो टन वनस्पती तेलांचा उपयोग साबण बनविण्यात होत असतो. अगदी 2-3 टक्के जरी तेलाचे प्रमाण कमी करून,अशी फिलर्स वापरून साबण बनविले गेले तरी हजारो टन तेले, खाद्य, वा इतर उपयोगासाठी वापरता येईल. त्यातून आयात कमी करण्यास व देशाचे मौल्यवान परदेशी चलन वाचविण्यास मदत होऊ शकणार होती. साठ वर्षापूर्वीच नव्हे तर आजही भारत, वनस्पती तेलांचे बाबतीत,’ पक्का आयातदार,(Net Importer),’ आहे हे सत्य आहे.
विषय तसा सोपा होता . मात्र निव्वळ साबणाचे नमुने (Neat Soap),व त्यात फिलर्स घातल्यानंतर तयार होणाऱ्या साबणाची (Built Soaps),क्षमता मोजणीसाठी, ‘मानद घाणेरडे कापड’ (Standard Dirty Cloth) तयार करावयाचा प्रश्न होता. त्यावेळी ही वस्तू परदेशातून आयात होत असे. ते आपण न करता आपल्या प्रयोगशाळेत असा कपडा तयार करावा, अशी त्यांची सूचना होती. सुदैवाने हे काम जरी खूप किचकट होते तरी तो प्रश्न मी सोडवला. त्यासाठी खूप मेहनत व कल्पनाशक्ती वापरावी लागली. अनेक संदर्भही धुंडाळावे लागले. एकदा असे कापड बनविल्यानंतर पुढील भाग सोपा झाला.
स्वच्छ कपड्याचे,’स्टॅंडर्ड’, मला माहित होते पण घाणेरड्या कपड्याला ही स्टॅंडर्ड असते हे तेव्हा कळले, गंमत वाटली! UDCT मध्ये, संशोधन करणाऱ्या ,विविध विभागांतील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या, कांचेच्या उपकरणांची निर्मिती व दुरुस्ती करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग तळघरात होता. त्या विभागाचे मुख्य व निष्णात कांचतज्ञ श्री.घैसास यांची मला खूप मदत मिळाली. त्यांची मुद्दाम आठवण येथे केली. एका काचेच्या टबमध्ये, विविध घटकांनी बनविलेली ही कृत्रिम ,द्रवरूपातील घाण, संतुलित ठेवून त्या द्रावणाचे विभाजन न होऊ देणे हे कठीण काम होते . (Keeping the suspension of the solid ingredients, with the Solvent, in the homogeneous form.)
मानांकित केलेले स्वच्छ कापड ,एका विशिष्ट वेगाने ,यांत्रिकरित्या त्या द्रावणात बुडवून हळूहळू बाहेर काढणे ही प्रक्रिया खूप कौशल्य वापरून करावी लागे. तसे न झाल्यास कपड्यावर घाण सर्वत्र समान बसण्याऐवजी असमतोल होत असे. तो कपडा प्रयोगासाठी बिनकामाचा ठरे. मी तयार केलेले असे मानांकित कापड त्यावर विविध ठिकाणी मोजमाप करून जेव्हा’ परीक्षा पास झाले’, डॉक्टरांना खूप आनंद झाला, त्यांनी शाबासकी दिली. आयात पर्यायी असलेला तो घाणेरडा कपडा मी माझ्या सर्व प्रयोगासाठी वापरला. हे उपकरण , रासायनिक घटक प्रमाण व प्रक्रियेचे पेटंट घ्यावे असेही डॉक्टरांनी सुचविले होते .मात्र ते राहिले ते तेव्हा राहून गेले ते आजवर.
ज्यावेळी मी हा अभ्यासक्रम करीत होतो, त्याच वेळी अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचा व्यवस्थापक व तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहाचा रेक्टर हीदेखील जबाबदारी माझ्यावर होती . वसतिगृहातच राहत असल्याने व आमच्या सोमवंशी क्षत्रिय संघाने मला अनेक प्रकारे केलेल्या मदतीतून उतराई होण्याचा तो एक अल्प प्रयत्न होता. त्यामुळे माझा रोजचा दैनंदिन कार्यक्रम खूपच काटेकोर असे .जराही कुठे करमणुकीसाठी वा नाटक, सिनेमा साठी वेळ मिळत नसे. सकाळी साडेपाच वाजता उठून माझा दैनंदिन कार्यक्रम सुरू होई. वसतिगृह तसेच अण्णासाहेब वर्तक सभागृह यांची दैनंदिन व्यवस्था लावून दिल्यानंतर मी कॉलेजला जाई. कॉलेजमध्येही साधारणपणे प्रयोग शाळेतील काम, वाचनालयातील संदर्भ जमा करणे, मार्गदर्शक डॉ.काणे यांच्याशी, झालेल्या कामाबाबत चर्चा करून पुढील कामाची आखणी करणे अशी कामे असत. कधी काही साधने अथवा रसायने मिळविण्यासाठी इतर प्रयोगशाळा किंवा इतर आस्थापनात भेटही द्यावी लागे.साडेपाच वाजता येथील सर्व कामे आटोपून पुन्हा सातच्या सुमारास वसतिगृहावर येई.येथील कामे सुरू होत. कधी हॉलवर लग्नाचा दिवस असल्यास खूपच धावपळ असे. डॉक्टरांनाही मी दिनक्रमाची पूर्ण कल्पना दिली होती. ते जातीने कधीतरी संध्याकाळी ऑईल विभागाच्या विविध प्रयोगशाळांत काय चालले आहे याची पाहणी करण्यासाठी संध्याकाळी साडेसहा, सात नंतर येत असत. असेच एके दिवशी मला काही खूप आवश्यक काम प्रयोगशाळेत असल्याने मी सात वाजेपर्यंत प्रयोग शाळेत होतो. एवढ्या मोठ्या प्रयोगशाळेत मी एकटाच काम करीत होतो. अचानक डॉक्टरांना आलेले पाहून माझी थोडी तारांबळ झाली. मात्र एवढ्या उशिरापर्यंत मी थांबलेला पाहून सरांना वाटलेले आश्चर्य व आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसले. सरांनी माझे कौतुक केले . ही गोष्ट सहज झाली होती. पुढे केवळ दीड वर्षात संशोधनाचे काम पूर्ण करून, माझे मार्गदर्शक डॉ. काणे यांची मान्यता घेऊन दोन वर्षात MSc Tech. मिळवणारा मी डॉक्टर काणे यांचा एक भाग्यवान विद्यार्थी ठरलो. त्या दिवशीचा ‘तो’ योगायोग देखील काही अंशी याला कारणीभूत असावा असे मला आज वाटते.
भाग पहिला समाप्त
Only one word to describe the article, GREAT?
Excellent! You have done really great work with great persons . Hats off to You! Patil Ravindra , Vashi Navimumbai
Read about your writing on Dr Kane, Dr *R*…
YOU have knack of effective writing. Keep it up.
About standard dirty fabric, this is a common problem in textile processing and there is a process called padding which gives you uniform coating even with non homogeneous solutions.
Anyway you could overcome the problem yourself with ingenuity.
I had practically no opportunity in later years for working on my own research concepts and lot many ideas remained on papers. Many provisional patents lapsed.
Great work by U.
Raghunandan Churi.
B.Sc,,BSc Tech,,MSc Tech M.Phil(Leeds,UK).
Raut Sahib..
. I hv read part 1. Excellent
Teachers then were dedicated..
By the way which year you passed out B.Tech from BUDCT, which was very close to my VJTI. I was a student there from 1954 to 57.
2. Are you the writer of both parts. What a quality of professors then.
3. I bow with heartfelt respects to them then.
4. I am missing your company, but some day it was to happen. Let’s keep WhatsApp contact.
6.God bless you and your fmly best health all through and a long peaceful life.
Great, good memories of UDCT now ICT
Pl keep writing.
महागुरू म्हणून लाभलेल्या डॉ काणे सरांचा सहवास बंधूंना लाभला. जणू त्यांना देव भेटला कारण त्याकाळी त्यांनी मिळवून दिलेली स्कॉलरशिप, गाईड म्हणून केलेली मदत ही जणू दैवी देणगी.
डॉ काणेंचा जीवनपट वाचताना डॉ वागळे सराना मिळालेली डॉ आर कडून वागणूक, त्यांची मानहानी वाचून आश्चर्य वाटते, मन हळहळले. पण त्यांनी त्या परिस्थितीशी केलेला संघर्ष वाचून त्यांना सलाम करावा लागेल.
डॉ काणें सोबत काम करत असताना बंधूंना आलेल्या अडचणी बंधूंनी दाखवलेली चिकाटी, बौद्धिक काम, बंधूंना पदवी प्राप्त करताना काय काय करावे लागले होते हेही समजले. वाचता वाचता आप्पांच्या पत्र लेखनाची जादू सुद्धा समजली.
खरोखर, जीवनात एका वळणावर चांगले गुरु, महागुरू, भेटणे भेटणे ही जणू सार्थकता जर असेल तर बंधू चे जगणे सार्थकी लागले आहे, म्हणूनच त्या लाभलेल्या डॉ काणे, डॉ वागळे ह्यांची पूजा त्यांनी लेख लिहून पूर्ण केली. बंधूंना त्या बद्दल धन्यवाद. दुसऱ्या भागाची उस्तुकता नक्कीच बंधू पुर्ण करतील ही अपेक्षा.
I have just finished reading your article . I want to tell you how much I appreciated your clearly written and thought-provoking article.
While much has been written on this topic, your article expresses both the positive and negative aspects of once feelings, without taking an emotional stance on either side of the issue.
Congratulations !!! for your thorough research and clear writing.
Amazing article.
Keep it up.
You are multitalented..
Excellent work done.Your feeling towards guru’s,you have explained in very proper words.
Very Nice write up. I am very proud to be his grand daughter. He passed away when i was in 4th, but he taught us many good things. मी करीन आणी करुन दाखवीन, Never ever give up, ‘ try hard’ was the mantra taught to us by our grand parents. We all are proud of his achievements and honors he has received. It was really nice to know about his life as Dr. J. G. Kane with his students and staff . of UDCT. Thank you
Amazing Article
Some points I really like in this are
– Great teachers, massive respect for them and at the same time, massive respect for you for the gratefulness you have shown to your teachers and elders in every phase of your life
– When genuine efforts, intelligence and elder’s blessings(Specially Aappa) come together, God also creates miracles to help you in different ways, like when you met Kane Sir and Wagale Sir.
अतिशय सुंदर, समर्पक शब्दात तुमच्या गुरूंचे केलेले वर्णन त्यांच्याबद्दल बरेच काही सांगून जाते. असे गुरु आणि तुमच्यासारखे शिष्य मिळायला दोघांचेही भाग्य लागते. तुमच्या लेखन कौशल्याची मला आता पूर्ण जाण आहे त्यामुळे त्याबद्दल काही लिहिणे मला संयुक्तिक वाटत नाही. खूप छान लेख. वाचण्याचा आनंद मिळाला. धन्य ते गुरुशिष्य
विद्येचे निस्सिम उपासक असलेले आपले प्रिय वडिल, आपणांस लाभलेला संस्कारक्षम आणि सर्वगुणसंपन्न असा मित्रपरिवार आणि महागुरु डॉक्टर काणे यांचे सारखे आपले गुरूजन, ह्या सर्वांच्या सृजनशीलतेचे आपणावर झालेले मौलिक संस्कार ह्या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या ठाई आपल्या गुरुजन आणि मित्रांप्रती वसत असलेली कृतज्ञतेची अनमोल भावना ! जात्याच बुद्धिमान आणि अभ्यासू वृत्तीच्या आपण ती अगदी निगुतीने जतन करून सतत वृद्धिंगत होईल ह्याची काळजी घेतली आहे. हॅट्स ऑफ टू यू, बंधू ! ???
Sir
I am Rohini Gorey youngest daughter of Dr Jagannath Govind Kane. I have three elder sisters and one brother Trivikram whom you had an interaction. I will be commenting on behalf of us all sisters
We are proud of to be children of our father
Dr JG Kane. He never spoke about his work and achievements. we came to know about his different aspect of his work through your write up. He was great father and truly family person “विद्या विनयेन शोभते “truly applies to him
Thank you so much for sharing his memories this helped us to respect him more.
Waiting for the next part.
Thank you
Usha Patwardhan
Lalita Bhagwat
Seema Patwardhan
Rohini Gorey
(Daughters of Dr Kane)
माझे गुरू आणि महागुरू — भाग पहिला व दुसरा दोन्ही वाचले. श्री. राऊत सर यांना UDCT मधे शिकत असताना सहवास लाभलेल्या महान व्यक्तिमत्वांची नावे नुसती वाचून देखील ते किती भाग्यवान आहेत याची कल्पना आली. काॅलेज आणि त्यांचे महागुरू डाॅ. काणे यांच्याबद्दल त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असे लेखन केले आहे ज्यामधून त्यांच्याविषयी असणारे प्रेम आणि आदर शब्दाशब्दामधून दिसते आहे. आपल्या शिष्यांवर योग्य संस्कार करून त्यांना जीवनात राष्ट्रभक्ति आणि कामाविषयी प्रामाणिक तळमळ यांनी समृद्ध कलेल्या महागुरूंना व त्याबद्दल आयुष्यभर कृतज्ञता बाळगलेल्या राऊत सरांना सादर नमस्कार! ???
डाॅ. काणे यांच्या कार्याविषयी आणि एकूण त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप बारकाईने अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत लिहीले आहे. ???