वसंत ‘बहार’ निमाला
वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव! निसर्ग एरवीही खूप सुंदर असतो, पण वसंतात त्याचे रूप काही वेगळेच. मानवी जीवनात ही तारुण्याचा काळ म्हणजे वसंत ऋतू. निसर्गातल्या सर्व ऋतूत वसंताचे गुणगान अनेक ऋषीमुनी, कवींनी खूप सुंदर रित्या केलेले आहे. वसंत म्हणजे आनंद, चैतन्य व समृद्धी.
पण ऋतुराज वसंताला ही एक दिवस या सृष्टीचा निरोप घ्यावाच लागतो. कारण हे ऋतुचक्र आहे, सृष्टीचा नियम आहे, त्याला ‘ॠतु वसंत’ देखील कसा अपवाद होईल? आमच्या राऊत कुटुंबात ही 84 वर्षापूर्वी असाच एक ‘वसंत’ आला. त्याने या कुटुंबात चैतन्य, नाविन्य, उत्साह आणि समृद्धी निर्माण केली. परिस्थितीने गांजलेल्या, जीवनाशी झगडा करणाऱ्या कुटुंबाला, अपरिमित कष्टांनी नवी दिशा दाखविली. उर्जितावस्था दिली. परवाच हा वसंतबहार, आम्हा सर्वांचा निरोप घेऊन पंचतत्वात विसर्जित झाला. देवाघरी गेला. होय मी आमच्या वसंतभाऊ बद्दलच बोलतो आहे. काही दिवसांपूर्वीच हा आमचा जेष्ठ बंधू, वसंत भाऊ कुटुंबासाठी सर्वकाही करून, भावंडांना, मुला नातवंडाना, मित्र आणि आप्तपरिवाराला सोडून, जगाच्या पाठीवर आपलेही एक स्थान निर्माण करून जीवन कार्य संपवून परमेश्वराला प्रिय झाला.
गेली ४ वर्षे या वसंताचे हास्य, तेज हळू हळू मंद होत होते. शरीराचा एक एक अवयव असहकार पुकार होता. ज्या पदलालित्य त्याने त्याने आपल्या उमेदीच्या काळात भलीभली कबड्डी ची क्रीडांगणे दणाणून सोडली, ज्या कणखर हातांनी वाॅली बॉल चेंडू असा ‘स्मॅश’ केला कि समोरील सहा खेळाडूंनाही तो कुठे पडला याचा पत्ता लागू नये, ज्या प्रेमळ, मृदुवाणीने आपली भावंडे इष्ट मित्र सगेसोयरे अगदी अपरिचित माणसांनाही न दुखावता आपलेसे केले, ज्या नेत्रकटाक्षानी संकटात, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना विश्वास पूर्ण दिलासा दिला, ते सर्व अवयव , हळूहळू असहकार पुकारून त्याला सर्वसामान्य माणसाचं जीवन अशक्य करीत होते. एकेकाळी जबरदस्त खेळाडू म्हणून पाहिलेल्या ‘त्या’ भाऊ चे रूप डोळ्यासमोर येई. शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्य नीट ठेवण्यासाठी कसून मेहनत घेतलेल्या आमच्या भाऊचे हे दर्शन आम्हाला अस्वस्थ करी. मनात विचार येत, ‘त्याला आज आपल्या भावना सांगता येत नसल्या तरी, त्याच्या मनाला किती यातना होत असतील? या खिलाडू, खेळाडू माणसाला हे असे भोग का यावेत?’
निसर्गातील वसंत नक्कीच सुख आणि दुःख याच्या पलीकडे आहे पण मानवी ‘वसंत’ निश्चित तसा नाही. तो सुखदुःखाच्या वेदना संवेदनांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. सांगता आले नाही, तरी चेहऱ्यावरील भावना अंतःरणातील वेदनांची जाणीव करून देतातच. त्याला या अवस्थेत पाहून निश्चितच कळवळा वाटत असे. मात्र आज तो कायमचा निघून गेल्यानंतर ह्या अवस्थेत का असेना ,त्याने थोडे दिवस तरी अजून असायला हवे होते, असेच वेडे मन म्हणते! जीवाभावाच्या व्यक्तीचे अस्तित्व कसे का असेना जोपर्यंत घरात असते, त्या थरथरत्या हाताचा स्पर्श कधीतरी होत असतो, वाणीचा एक हुंकार ऐकू येतो ,.. त्यावेळी त्याचे महत्त्व वाटत नाही, मात्र ती व्यक्ती एकदा कायमची निघून गेली, त्यानंतर एवढ्या समाधानाला देशील आपण अंतरतो. विरहाची जाडी सतत मनाला डंख करते.हा मानवी स्वभावच आहे . वेडे मन म्हणते, “भाऊ ने तसे का असेना ,पण आमच्यात थोडे दिवस राहायला हवे होते जायला नको होते..” ही आमच्या ही आमची स्वार्थी विचारसरणी. “अशा अवस्थेत खितपत पडण्यापेक्षा मरण परवडले हीच भाऊ सारख्या सच्च्या खेळाडूची आंतरिक इच्छा असेल.तेच त्याने पसंत केले.
वसंताच्या आगमनाने शिशिरातली पानगळी जाऊन निसर्गात एक उत्साहाची नवी पालवी फुटते. आशेचा नवा किरण दिसतो. वसंत भाऊ कुटुंबात आला आणि ऊर्जितावस्था सुरू झाली. निष्क्रियता, निराशा हद्दपार झाली. हळूहळू स्थिरता,समृद्धी वाढू लागली.आज ज्या उंचीवर सर्व भावंडे पोहोचली आहेत, येथे पोहोचण्यासाठी भाऊने घेतलेल्या श्रमकष्टाला सीमा नाही. आज ते सारे सारे आठवते… काही लोकांच्या बाबतीत म्हटले जाते, ‘नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा’, भाऊंचे बाबतीत आम्ही म्हणतो, ‘नाव वसंत आणि तो प्रत्येकाला पसंत ‘..
शालेय कालखंडापासून ते सेवानिवृत्तीनंतर, जो पर्यंत शरीराची साथ होती, त्याच्या कष्टाला सीमा नव्हती. त्याच्या सर्व आयुष्याचे प्रयोजनच अथक कष्ट आणि कष्टातून साफल्य हेच होते, ‘रम्य’ बालपणापासून हा प्रदीर्घ काल कसा पटकन गेला, हे कळलेच नाही. कालाय तस्मै नमः दुसरे काय?
ज्ञानोबा नि म्हटले आहे, “जे उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे!” आपले माणूस गेले कि दुःख तर होणार पण कुठेतरी मनाची समजूत कशी घालावी लागते .हा मानवी देह ,कधीतरी निर्माण होतो म्हणून त्यालाही कधीतरी शेवट आहे .ज्याला आरंभ त्याला शेवट, हाच या विश्वाचा तो नियम!
भाऊला अखेरच्या दिवसातील असहाय्य झालेले पाहून मला खेद होई असे वर म्हटले आहे. त्यावरही मी मनाची समजूत घालीत असे… मृत्यू कोणालाही, कधीही लवकर येत नाही अथवा उशिरा ही येत नाही. तो नेहमीच ज्यावेळी यायला पाहिजे त्याच वेळी येतो. या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यु हजर होतो. प्रारब्ध शब्दाला एक असहायतेची छटा आहे .पण त्याचा जास्त विचार करण्याची गरज नाही. प्रारब्ध हेही कुणाला कधीही चुकलेले नाही. मृत्यू म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त करण्यासाठी सुरू झालेली ही नवीन प्रक्रिया आहे. भाऊ चे ते प्रारब्ध होते. ते त्यालाही चुकले नाही व कोणालाच ते चुकणार नाही.ही माझ्या मनाची मीच घातलेली समजूत!
आज भाऊ विषयी थोडे काही सांगताना मला माझ्या पूर्वसुरींची ही आठवण होते आहे. त्यांचेही थोडे स्मरण करणे या घडीला मी योग्य समजतो. भाऊ चे वडील दादा, माझे वडील आप्पा, आणि त्यांची एक एकुलती बहीण आंगू अशी ही तीन भावंडे. फार श्रीमंती नव्हे पण सुस्थितीत जन्मलेली ही तीन मुले. आज गुजरात मध्ये असलेल्या देहरी या गावी वडील,देवजी विठ्ठल राऊत व आई जमिनी बाई यांचा सुखाचा संसार सुरू होता. बऱ्यापैकी जमिनीचे मालक असलेले एक कुटुंब. त्यात असलेली शेतीवाडी, व वडीलांचा सुतारी चा वडिलोपार्जित धंदा ,यावर कुटुंबाची गुजराण मजेत चालू होती. पण शेवटी नियती च्या मनात काही वेगळेच होते. देवजी बाबा एका पायाने थोडेसे अधू असले तरी त्यांच्या शेती व सुतारी कामात त्याची कोणतीच बाधा होत नसे.अत्यंत परोपकारी सरळमार्गी व देवभक्त असलेल्या आजोबांचा अचानक मृत्यू झाला. आजी व तीन लहान मुले निराधार झाली.त्यांच्या अशा अचानक जाण्याने इतरही काही कौटुंबिक कटकटी सुरू झाल्या. आमच्या आजीने देहरीचे घर, शेतीवाडी सर्व विकून, बोर्डीस जावे असा निर्णय घेतला तिचे भाऊ बोर्डीत होते. त्यांनीही तिला हा सल्ला आमची आजी जमनी बाई बोर्डीला आपल्या भावांच्या आश्रयाला आली. त्यांनी दिलेल्या लहान झोपडीत हे कुटुंब राहू लागले… एक नवा अध्याय सुरू झाला.प्रसंगी सोन्याच्या दागिन्यांनी सालंकृत होऊन मिरिवणारी जमनी लंकेची पार्वती झाली. दैवगती ही अशी असते. कवीने सांगितलेच आहे ना “पतिव्रतेच्या माथी धोंडा कुलटेला मणीहार..”
आजीला आपली सर्व संपत्ती विकून मिळालेले धन जे तिने आपल्या अगदी जवळच्या आप्तांकडे जतन करावयास दिले होते, त्याचे पुढे काय झाले? मुले मोठी झाल्यावर ,त्यांच्या संसारासाठी तिला परत मिळाले का?त्याचे काय झाले? या निराधार निष्कांचन कुटुंबाला कसे दिवस काढावे लागले, तो मोठा इतिहास येथे सांगण्याची गरज नाही. मात्र या असहाय भावंडांच्या आयुष्यातला एक कष्टमय नवा अध्याय बोर्डीला सुरू झाला हे खरे. आमच्या कुटुंबाचा पूर्वापार निवास असलेला तो देहरी चा वाडा, शेतजमीन,वाडी,आजोबांनी स्वतःहाताने बनवलेल्या काही वस्तू आम्ही नुकतेच देहरीस जाऊन पाहून आलो. त्या पवित्र भूमीला स्पर्श करून वंदन केले.ज्या परिसरात माझे वडील ,काका, आजोबा,आजी आणि त्यांचे पूर्वज पिढ्यानपिढ्या सुखाने नांदले ते सर्व पाहतांना मनाची स्थिती काय झाली असेल? सुखदुःख मिश्रित भावनांचे कल्लोळ मनात निर्माण करणारे असे ते अद्भुत क्षण होते. आजही डोळ्यासमोर ते घर ,परिसर, बाजूची नारळा,पोकळीची झाडे डोळ्यासमोर येतात. तेथील काही छायाचित्रे या लेखात समाविष्ट केली आहेत. आमच्या आत्ताच्या व भावी पिढ्यांना आपल्या इतिहासाची आठवण करताना त्याचा उपयोग होईल.
रिवाजाप्रमाणे लहान वयातच बहीण आंगू लग्न होऊन पतीगृही गेली. तिचा संसार सुरू झाला.वामन,परशुराम दोघे बंधूही विवाहानंतर स्वतंत्र झाले आप्पांच्या शिक्षकी पेशा मुळे लग्नानंतर त्यांची बदली उमरोळी या गावी झाली त्यामुळे बोर्डी चा संपर्क तुटला.
दादा बोर्डी गावात आपला वडिलोपार्जित सुतारीचा व्यवसाय सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळू लागले. दादा एक नामवंत व कसबी सुतार म्हणून ओळखले जात व आपल्या कामानिमित्त, रोजगारासाठी त्यांचा मुक्काम कधी कधी बोर्डी बाहेरील अगदी उंबरगाव,संजाण,अशा गावात होत असे. सुदृढ बांधा,भक्कम देहयष्टी व झुपकेदार मिशामुळे परशु मेस्त्री बोर्डी मध्ये नावाजले होते. एरवी कमी बोलणारे दादा तसे खूप मिश्कील ही होते. कधीतरी एखादाच शब्द, वाक्य बोलत आणि समोरच्याला गप्प करीत.
काकू ग॔गाबाई (बाय),दादांची पत्नी खूप सुस्थित माहेरातून आली होती. शिक्षण नसल्यामुळे तिनेही प्रसंगी मोल मजुरी व शेतीची कामे करून संसाराला हातभार लावला आहे .अतिशय प्रेमळ, मिठ्ठास व सतत हसतमुख असणारी आमची, ‘बाय’ एक आदर्श गृहिणी होती यात संशय नाही.
वसंत हा आमच्या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ बंधू. सर्वजण त्याला भाऊ म्हणत असू. त्याच्या पाठीवर पाच बहिणी आणि सर्वात लहान भाऊ राजेंद्र(बापू),. कमा, शालू, उषा, आशा आणि सुलु या भगिनी. आप्पांचे कुटुंबात मी ज्येष्ठ बंधू आणि श्रीकांत(अण्णा),अरूणा, नीलम(ममा), प्रदीप (पपी) अशी आम्ही पांच भावंडे. दुर्दैवाने शालिनी (संगू) व नीलम( ममा) अकालीच गेल्या. परवा वसंत भाऊही गेला.
मी पहिलीत दाखल होण्याच्या सुमारास आप्पांची बदली उमरोळी हून बोर्डीस झाली. त्यामुळे माझे व अण्णाचे शाळेत जाण्याआधी चे बालपण उमरोळीत गेले. पुढे मी शाळेत दाखल होण्याची वेळी आप्पांची बदली बोर्डी शाळेत झाली.आमचा चुलत भावंडांबरोबर सहनिवास सुरू झाला. या सर्व भावंडांबरोबरचे ते दिवस खूपच आनंदात गेले. बोर्डीच्या चंद्रमौळी झोपडीतील आमचे गरीबीचे दिवस,खूपच आनंदाचे, समाधानाचे व मजेचे होते. ‘बालपणीचा काळ मजेचा’ असेच आम्ही आजही म्हणतो.
सर्व भावंडांत,अण्णा (श्रीकांत),उषा अरूणा व त्यांची मैत्रीण बनू हेच बालपणीचे सवंगडी म्हणून आठवतात. त्यांच्याबरोबर केलेल्या अनेक गमतीजमती आणि उचापति ही आज सुद्धा स्मरणात आहेत. वाढते वय,’ पापी पेट का सवाल’ आणि परिस्थितीची बंधने यामुळे खाऊ साठी लहानसहान चोर् या करणे हा आमचा हातचा मळ झाला होता. त्या महान कहाण्या आहेत. स्वतंत्रपणेच लिहावे लागेल. आम्ही कारवीच्या झोपडीत राहिलो पण राजवाड्यातले सौख्य अनुभवले.
वसंत भाऊ व्यतिरिक्त देवजी आजोबा कोणी पाहिले नाहीत. मात्र आजी जमनी बाईचा खूप सहवास मिळाला. प्रेमळ आणि नातवंडावर अमाप माया करणारी आमची प्रेमळ आजी कितीतरी सुंदर स्मृती मागे ठेवून गेली आहे.जरी देवजी आजोबा पहाता आले नाही तरी आजी मात्र मी नऊ दहा वर्षाचा असेपर्यंत जिवंत होती. खूप प्रेमळ मायाळू आजीने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले होते. अकालीच वैधव्य आल्याने जीवनांत अनेक व्यक्ती, प्रकृतींचे अनुभव .रंगढंग तिने अनुभवले होते.,आपल्याच आप्त स्वकीयांचे स्वार्थी मतलबी स्वभाव तिला हतबल करून गेले मात्र तिने कधीच पकडून नाही.. आजी आमच्याच घरात असायची. ती माझ्या नजरे समोर येते. आजी म्हणजे गोरी, डोक्या वरील सर्व केस पिकलेली, चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक ,सरळ अंगकाठी, मात्र शेवट पर्यंत शाबूत असलेले दात आणि प्रेमळ डोळे आठवतात.
एक मात्र खरे की वर म्हटल्याप्रमाणे आमचा धांगडधिंगा,मस्ती आणि भानगडी मध्ये वसंत भाऊ कधीच सहभागी नसे. वयातील अंतर हे त्याला कारणीभूत नव्हते. शाळेत जाण्याआधी व शाळेतून आल्यानंतर तो आपली मावशी व आत्या(आतू) कडे त्यांच्या शेती कामात मदत करण्यास जाई. सुट्टीच्या दिवशीही तो कधी घरी दिसला नाही. अगदी खेळण्या-बागडण्याच्या वयात तो बालपण हरवून बसला होता. त्यामुळे निश्चितच घराला थोडीफार आर्थिक मदत होत होती. कुटुंबाच्या आर्थिक गरजेपोटी, आपण थोडे कष्ट केले पाहिजेत, मदत केली पाहिजे,ही समज या मुलाला अगदी शालेय वयात आली होती. ती अगदी शेवटपर्यंत! सर्व भावंडे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन मार्गाला लागली आणि त्याला स्वतःच्या संसाराकडे लक्ष देण्यासाठी फुरसत मिळाली. भाऊ बायचा(आई), खूप लाडका होता. त्याचेही आपल्या बाय वर अतिशय प्रेम होते. ते आम्हाला अनेक प्रसंगातून जाणवे. मला वाटते या प्रेमापोटीच, आईची होणारी कुतरओढ पाहून, त्याने हे शारीरिक कष्टाचे वाण अगदी लहानपणीच घेतले आणि अखेरपर्यंत निभावले.
म्हणूनच मी वर म्हटल्याप्रमाणे, हा वसंत नुसता नावाने ‘वसंत’ नव्हता. कधी शालेय वयातच ,कष्टाने, कर्तुत्वाने त्याने आपल्या कुटुंबात एक नवचैतन्य, नवी ऊर्जा व समृद्धी आणली. आज सर्व भावंडे मुले-नातवंडे यांनी शैक्षणिक,औद्योगिक व आर्थिक क्षेत्रात जी उंची गाठली, ती कुठेतरी,भाऊच्या त्या अथक परिश्रम व निर्व्याज्य कष्टांची परिणती आहे हे मानावे लागेल. परिस्थितीच्या या रेट्यामुळेच त्याला मात्रअकरावी एस एस सी नंतर पुढे शिक्षण घेणे, इच्छा असूनही त्याला जमले नाही.
आमच्या हायस्कूलमध्ये तो आचार्य भिसे व चित्रे गुरुजींचा एक आवडता विद्यार्थी होता. अभ्यासात जरी खूप गुण मिळत नसले, तरी शिक्षणाची आवड, खेळांतील प्राविण्य व अर्थार्जनासाठी ची धडपड, कष्ट त्यांच्या लक्षात आले होते. एके दिवशी चित्रे गुरुजींनी त्याचा व इतर तीन मुलांचा शाळेतील प्रार्थना सभेत गौरव केला होता. ईतर सर्व मुलांना, या आदर्श विद्यार्थ्यांचा परिचय करून देताना गुरुजींनाही खूप कौतुक वाटले होते. कारण हे चार विद्यार्थी आपल्या आई-वडिलांना अर्थार्जनात मदत करून आपलाशालेय अभ्यास सांभाळत होते. खेळातही प्रावीण्य मिळवत होते.
भाऊ व त्याच्या मित्रमंडळींनी त्यावेळी,’प्रभात स्पोर्टिंग क्लब’ ही संस्था क्रीडा व सांस्कृतिक कार्यासाठी स्थापन केल्याचे मला आठवते. या लहान क्लब मार्फत ही मंडळी बोर्डी व बाहेरगावी कबड्डी, हॉलीबॉलचे सामने खेळत असत. त्यांनी गावांतील सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी काही नाटकाचे प्रयोग ही बोर्डीत केले होते. तत्कालीन काही सामाजिक बंधनामुळे, स्थानिक मुली अशा नाटकात काम करण्यास तयार होत नसत म्हणून काही नट्या मुंबईहून बोर्डीस येत,व बिदागी घेऊन काम करत. ‘सुखाचा संसार’व ‘प्राणाचे दान’ अशी दोन नाटकांची नावे आठवतात . खुल्या मैदानातच मंडप बांधून तिकीट लावून ही नाटके झाली व मंडळीला पैसेही चांगल्यापैकी मिळाले. वसंत भाऊने या दोन्ही नाटकात महत्वाच्या भूमिका केल्या होत्या.त्याच्या अंगभूत नाट्य गुणांची कल्पना त्यावेळी कोणास आली नाही. तेव्हा घडलेला एक प्रसंग लक्षात राहिला आहे. नाटकात,सिगरेट पिऊन अभिनय करण्याचा भाऊवर प्रसंग होता. तो प्रसंग वठविण्यास नकार देताना भाऊने काय कारण दिले असेल? “मी आचार्य भिसे ,चित्रे गुरुजींचा विद्यार्थी आहे. सिगरेटला नुसता स्पर्श करणेही मला जमणार नाही. कृपा करून एक तरी ही भूमिका दुसऱ्याला द्या अथवा तेवढा प्रसंग काढून टाका..” शेवटी तो भाग गाळला गेला, ती भूमिका भाऊने उत्तम प्रकारे केली. एक आदर्श गुरु आपल्या विद्यार्थ्यांवर किती जबरदस्त सुसंस्कार करु शकतो,याचे हे एक ऊत्तम उदाहरण. धन्य ते गुरु, धन्य तो शिष्य! भाऊंनी उभ्या आयुष्यात कधीच धुम्रपान केले नाही.
त्याकाळी आमच्या शाळेत विविध संघांमध्ये, मुलांची विभागणी होई. आजही ही परंपरा चालू असावी.वर्षभर खेळ, नाट्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा चालत असत.विविध खेळ व क्रिडा प्रकारात जास्तीत जास्त चषक मिळविणाऱ्या संघाला ‘चंपियनशिप करंडक’ मिळत असे.मला आठवते,वसंत भाऊ च्या संघाने ती ट्राफी अनेक वर्षे जिंकली आहे. वॉलीबॉल कबड्डी हे त्याचे हातखंडा खेळ. महाविद्यालयीन शिक्षणाचा अभाव व योग्य मार्गदर्शन,या अभावी, महाराष्ट्र एका मोठ्या खेळाडूला मुकला असेच मला वाटते.
भाऊच्या मार्गदर्शनामुळेच मी देखील वॉलीबॉल हा खेळ चांगल्यापैकी खेळू शकलो. दसरा-दिवाळी, स्पर्धात, बोर्डीतील एका संघामधून खेळण्या एवढी प्रगती केली. त्यापेक्षा एक मैदानी खेळ म्हणून शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्याचा खूप उपयोग झाला.
आमचे बंधू राजेंद्र(बापू) व प्रदीप(पपी) यांनीदेखील या खेळात खूप कौशल्य मिळविले. दोघांनीही आपल्या महाविद्यालयातून, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजविल्या आहेत. विशेषत बापू ,एक नावाजलेला खेळाडू म्हणून ठाणे जिल्ह्यातमान्यता पावला आहे.
लहान भगिनी,आशा एक उत्कृष्ट खो-खोपटू व कबड्डीपटू म्हणून शालेय जीवनात चमकली . भावंडांना मिळालेले खेळातील ह्या प्राविण्याला वसंत भाऊ पासून मिळालेली प्रेरणा कारणीभूत आहे.
मागे सांगितल्याप्रमाणे भाऊला एसएससी झाल्यानंतर काहीतरी नोकरी करणे भाग होते. त्याकाळी एसएससी क्वालिफिकेशन नोकरीसाठी जरी पुरेसे होते, तरी कोठेतरी कोणाचे ‘आशीर्वाद’ असल्याशिवाय चांगली नोकरी पटकन मिळत नसे.त्याने सुरुवातीला, माझ्या माहितीप्रमाणे भाऊ ची पहिली नोकरी अगदी साधी होती. बोर्डी मध्ये नवीन सुरू झालेल्या निरा विक्री केंद्रात तो काम करू लागला. वर्षभर तिथे काम केल्यावर त्याला,’ भारतीय ताडगूळ विज्ञान व संशोधन केंद्र’ ह्या भारत सरकारच्या उपक्रमात नोकरी मिळाली. मला आठवते पांढऱ्या शुभ्र खादीकपड्या मध्ये रूबाबदार दिसणाऱ्या भाऊला गमतीने धर्मेंद्र असे म्हणत. पुढे दुर्देवाने हे केंद्र बंद पडले. भाऊला डहाणू मधील,’ स्वस्तिक इलेक्ट्रिकल्स’ या मोठ्या दुकानात विक्रेत्याची नोकरी करावी लागली. हा सर्व त्याच्या आयुष्यातील एक कठीण व सत्वपरीक्षेचा कालखंड होता. नियतीने त्याची कसोटी पाहीली.शेवटी तो या कसोटीला उतरला. त्याची नंतरची नोकरी ही ,’ठाणे जिल्हा सहकारी बँके’तील., कै.डाॅ.पद्मश्री हरिश्चंद्र पाटील यांच्या शिफारशीवरून त्याला ही नोकरी मिळाली. आयुष्यभर तो डॉ. हरिश्चंद्र पाटलांचे उपकार विसरला नाही. बँकेतच पदोन्नती घेत त्याने वरीष्ठ पदावर योगदान दिले. खूप आर्थिक जबाबदारीची कामे केली. बॅकींगव्यवहारांची कोणतीही पार्श्वभूमी वा शिक्षण नसताना केवळ अंगभूत मेहनत व प्रामाणिकपणा या जोरावर त्याने एक उत्कृष्ट ऑफिसर म्हणून नाव कमावले. मला अजूनही त्याचे काही सहकारी व वरिष्ठ आठवतात. श्री पाटील साहेब, श्री तांडेल साहेब, श्री वझे व जगदीश पाटील ही मंडळी त्याचे कामाशी संबंधित होती व त्यांचे कडून भाऊची बँकेच्या कामातील प्रशस्ती मी अनेक वेळा ऐकली आहे.
आमचे बिर्हाड ज्यावेळी चिंचणीत होते, त्याच वेळी भाऊची बदली चिंचणी येथील बँकेच्या शाखेत झाली.मी व अण्णा एखादे शनिवार-रविवारी मुंबईहून चिंचणीस येऊन आराम करीत असू. त्यावेळी आवर्जून भाऊ संध्याकाळी आमचे बरोबर गप्पा मारण्यास,भेटण्यास येत असे. कधीतरी मुक्कामही करी. त्यावेळी संध्याकाळी आमचा आवडता कार्यक्रम म्हणजे घरमालक जगन दादा यांचे वाडीतील, घरी पिकविलेल्या वालपापडी, तुरी अशा ‘शेंगांची उकडहंडी’ चा आस्वाद घेणे. दादा देखील आमच्या या बैठकीत वयाचे भान विसरून शामिल होत. ती संध्याकाळ खूपच आनंदात मजेत जाई. अशा कैक संध्याकाळी चिंचणीला दादांच्या शेतावर आम्ही घालविल्या आहेत. आता ऊरल्या केवळ आठवणी!
त्याच काळात भाऊ व आम्ही खूप जवळ आलो. भाऊ या नात्या पेक्षा मित्र हे नाते अधिक दृढ झाले. आम्ही विद्यार्थी होतो,घराबाहेर राहत होतो. मोठा भाऊ म्हणून त्याने अनेक पत्रातून योग्य ती समज दिली आहे.अनेक पत्रे माझे जवळ होती. आज त्यातील एक आज माझ्याजवळ आहे. ते या लेखात मुद्दाम दिलेले आहे. त्यावरून आमचे विषयी वाटणारा जिव्हाळा, आत्मीयता किती होती याची जाणीव व्हावी.
1965,च्या ऑक्टोबर महिन्यात, लिहिलेल्या या पत्रात आम्हा दोघा बद्दल खूप काळजी व्यक्त केली आहे. कारण त्यावेळी भारत-पाक युद्धाचे वारे घोंगावू लागले होते.
निवृत झाल्या नंतर,आप्पा बोर्डी मुक्कामी आले. आमचाही राबता बोर्डीत सुरु झाला. सुट्टीतील चिंचणी चे कार्यक्रम बोर्डीत हि सुरू झाले. गावात भाऊची मित्रमंडळी अनेक असल्याने, त्यांच्या शेतीवर, संध्याकाळी ‘उकडहंडी’चा आस्वाद घेण्यासाठी आम्हाला आमंत्रणे येत. आम्ही मोठ्या आनंदाने जात असू. विशेषतः ,शिणी अक्का व जयराम भाऊ यांचे शेतावरील अगत्य खूपच वेगळे.आठवून आजही जिभेला पाणी सुटते!
कोणतीही गोष्ट खूप आवडली की वसंत भाऊ चे एक वाक्य ठरलेले असे तो म्हणे, “बो फाईन लागते!..”पहिला वाडवळ शब्द, दुसरा इंग्रजी शब्द, व तिसरा मराठी शब्द.. त्याचा अर्थ, होता, “फार छान लागते”…ऊकडहंडी, असो वा ईतर काही खाद्यपदार्थ असो, छान आस्वाद घेतल्यावर हे वाक्य, हमखास ठरलेले! कधीकधी तो बोलण्या आधीच आम्ही त्याला, “बो फाईन लागते”, असे म्हणत असू. त्याला ही त्यातली गंमत वाटे. हास्यकल्लोळात वेळ निघून जाई. … ते मजेचे दिवस कसे भर्रकन गेले…
पुढे काम धंद्यानिमित्त आम्ही मुंबईतच स्थायिक झालो. सर्वच मजा संपली. भाऊ कधीकधी पार्ल्याच्या घरी येई, मात्र पूर्वीचा मजा येत नसे.
आज त्या दिवसांची आठवण झाली की, एकच वाक्य माझ्या तोंडी येते.. “कालाय तस्मै नमः “..ज्या सुखद् स्मृतींना काळ दरवळून सोडतो, कधीही आठवण झाली की त्या स्मृतींच्या आठवाने आनंद होतो ,तोच काळ, हळूहळू ती माणसे गेली ते मित्र गेले, ते दिवस संपले की, विरह वेदना वर फुंकरही घालतो.निसर्गाचे हे कालचक्र आहे.हे असेच चालू होते व पुढेही असेच चालू राहणार. दिवसामागून रात्र व रात्री मागून दिवस असे हे चक्र आहे. बालपण, तारुण्य, म्हातारपण हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे येतच राहणार. वर्तमानकाळ, भूतकाळ ,भविष्यकाळ हे प्रत्येक मानवाच्या जीवनाचा एक भागच आहे. जे सर्वांसाठी सत्य ते एकदास्विकार केल्यावर आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याने झालेले दुःख थोडे कमी होते.. आज भाऊच्या जाण्याने हे सर्व विचार मनात आले. काल पुरुषाला नमन करण्यासाठी हात आपोआप जोडले गेले आणि मन म्हणाले,”कालाय तस्मै नमः….”
भाऊ गेला पण कुटुंबासाठी,समाजासाठी जे योगदान देता आले तेवढे देऊन गेला. आजही बोर्डी व परिसरात त्याच्या मार्गदर्शनाखाली हॉलीबॉल व कबड्डी मध्ये प्राविण्य मिळवलेले खेळाडू त्याचे नाव काढतात,हीच त्याला समाजाकडून मिळालेली खरी श्रद्धांजली!
कौटुंबिक जबाबदारी नुसार आपल्या सर्व भावंडांसाठी भाऊने जेवढे काही करता येईल ते केले. त्यांना त्यांच्या आवडी व कुवती प्रमाणे शिक्षण दिले. मात्र आर्थिक परिस्थितीला मर्यादा होत्या, त्यामुळे इच्छा असूनही काही गोष्टी नाही करता आल्या त्याच्या त्याला खेद होता. बहिणींची लग्ने ही योग्य वयात करून दिली. सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य वेळी, योग्य प्रकारे पार पाडल्या. आज त्याची सर्व भावंडे आपापल्या संसारात सुखाने रममाण झालेली आहेत. सर्व जण भाऊने कुटुंबासाठी केलेल्या कष्टाची व सहाय्याची मनापासून जाणीव ठेवून आहेत.
भाऊंच्या आठवणी काढतांना मी माई व सुलु यांच्याशी फोनवर बोलत होतो त्याच्या प्रेमळ आठवणी सांगताना दोघींचाही आवाजातील कंप मला जाणवत होत. सुलु म्हणते ,”भाऊने आमच्यासाठी काय केले नाही असेच विचारावे लागेल? आम्हा सर्व बहिणींनी थोडेतरी शिक्षण घेतलेच पाहिजे हा त्याचा कटाक्ष होता. म्हणून उषा माई, आशा व सुलु या तिघींना त्याने पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या बाल शिक्षा केंद्रात डी.एड च्या अभ्यासक्रमासाठी पाठविले. त्याआधी शालिनीला याच केंद्रात पद्मश्री अनुताई वाघ यांच यांची मदतनीस म्हणून नोकरी मिळवून दिली. सूललुला खरेतर वैद्यकीय क्षेत्रात काम करावयाचे होते.परंतु वडील दादांना ते मान्य नसल्याने मनाची कुत्तर-ओढ चालू होती. भाऊला ते जाणवले व त्याने तिला नर्सिंगच्या कोर्सला प्रवेश मिळवून दिला. दादांच्या विरोधाला न जुमानता त्यांची समजूत घालून ,डी.एड शिक्षण रद्द करून तिला नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी पाठविले. आप्पा आणि शेजारचे नारायण राऊत, यांनी साक्षीदार म्हणून हमी घेतल्याने मोठी अडचण दूर झाली. भाऊच्या या निर्णयाने सुलुच्या आयुष्याला वेगळीच ऊत्तम,कलाटणी मिळाली. आमची ही लहान बहीण मुंबई महापालिकेत ‘चीफ मेट्रन’ पदावर काम करून निवृत्त झाली. अनेक गरजू, आजारी व्यक्तींना तिने मोफत वैद्यकीय सेवा मिळवून दिली आहे. “भाऊचे माझ्यावरचे उपकार कधी फिटणार नाहीत”, असे नम्रपणे कबूल करते.
सुलुने मला पुढे सांगितलेली हीआठवण भाऊच्या कुसुम कोमल अंतरंगाचे व भगिनींच्या प्रती असलेल्या प्रिती चे मूर्तिमंत उदाहरण आहे . “आमची मोठी बहीण कमाताई, त्यावेळी गरीब परिस्थितीत दिवस काढीत होती.प्रत्येक प्रत्येक दिवाळी आधी भाऊ एका लिफाफ्यात काही पैसे घालून ते दहिसर येथील आपले शेजारी दत्ताभाऊ यांच्या हातात देत असे. त्यांना ते पाकीट कमाताईस पोचविण्याची विनंती करी. दत्ताभाऊ मथाण्यास तिच्या घराशेजारी रहात. आपल्या गरीब बहिणीने दिवाळीसारख्या सणात काहीतरी गोडधोड करावे, मुलांना नवे कपडे द्यावे ही त्याची आंतरिक आंतरिक इच्छा. कोणालाही कळू न देता तो हे काम प्रत्येक दिवाळीत न चुकता करी.” ही आठवण ऐकून माझ्या ही डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. भाऊ च्या अशा अनेक औदार्य कथा सुलु सांगत होती. सामान्य परिस्थितीतील एका भावाने आपल्या पाच बहिणी साठी त्याकाळी आणखी काय करायला पाहिजे? मला, ‘एक भाऊ’ म्हणून भाऊंची ही सुंदरबाजू कळली. मी नतमस्तक झालो.
एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन, जेमतेम एसएससी पर्यंत शिक्षण घेऊन,नोकरीपेशात आयुष्य घालवलेल्या भाऊने आपल्या दोन्ही सुपुत्रांना उत्कृष्ट शिक्षण देऊन त्यांचे भवितव्य उज्वल केले. जे इच्छा असून त्याला करता आले नाही ते मुलां मार्फत त्याने साध्य केले.मोठा स्वप्निल हा अभियांत्रिकीत पदवीधर असून भारत सरकारच्या मालकीच्या, संगणक क्षेत्रातील संशोधन संस्थेत मोठ्या हुद्द्यावर काम करतो. धाकटा सलील हा वैद्यक शास्त्रात पदवीधर होऊन अमेरिकेत गेला. तेथे एम एस,व पी एचडी( M.S,Ph.D) पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात परतला आहे. तोदेखील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर काम करीत आहे. आपल्या एका मुलाने इंजिनियर तर दुसऱ्याने डॉक्टर व्हावे ही भाऊंची मनोमन इच्छा होती. जिद्द व कष्टाळू वृत्तीने त्याने हे स्वप्न सत्यात उतरलेले पाहिले. शेवटी मुलांचे कौतुक डोळ्यात साठवूनच त्याने जगाचा निरोप घेतला.पत्नी सौ विभा वहिनी स्वतः हस्तकला विषयातील तज्ञ असून महानगरपालिका शाळेत शिक्षिका होती. आपल्या पतीची अधुरी स्वप्ने व मुलांचे शिक्षण, पूर्ण होण्यासाठी तिने दिलेली साथ खूप मोलाची. सुरुवातीला मुंबईत आपल्या छोट्या जागेत दीर नंणंदांना सामावून घेऊन, त्यांच्या भवितव्याची जडणघडण करण्यात वहिनीचे भाऊला मिळालेले सहकार्य केवळ प्रशंसनीय. भाऊच्या यशस्वी संसारकथेत व आजच्या वैभवात,सौ वहिनींचा वाटा बहुमोल आहे.
डॉक्टर सलील अमेरिकेत असतांना दोन्ही भावांनी सहकुटुंब, भाऊ वहिनी समवेत अमेरिकेची सफर केली. खरेतर त्यावेळीही भाऊंची प्रकृती एवढी साथ देत नव्हती. मात्र, ज्या वडिलांच्या पुण्याइने आपण हे वैभवाचे दिवस पाहतो आहोत, त्यांना एकदा तरी अमेरिका वारी घडवून आणावी ही या बंधूंची मनोमन इच्छा होती आणि ती त्यांनी जिद्दीने पूर्ण केली. भाऊंना व्हील चेअर मधून का असेना पण पूर्ण अमेरिका फिरविली. विशेष म्हणजे सलिल शिकागो शहरातच वास्तव्यास असल्याने श्रीदत्त च्या शिकागो येथील घरी भाऊंचे पाय लागले. व्हिलचेअर ने फिरणारे भाऊ, त्यादिवशी स्वतः चालले. श्रीचे घर व पुढील मागील प्रशस्त पटांगण, कौतुकाने पाहीले. अगदी जीना देखील व्यवस्थित चढले. मनोमनी सुखावले. श्रीदत्त म्हणतो, घर पाहून झाल्यावर माझ्याकडे त्यांनी दोन क्षण टक लावून पाहिले. त्यांचे डोळे बोलत होते …”शाबास बापू, अभिनंदन. बोर्डीच्या चंद्रमौळी घरातून निघून आज आपले राऊत कुटुंबीय या वैभवशाली देशाच्या माया नगरीत नाव काढण्यासाठी आले आहेत, असेच पुढे जात राहा ….” हेच आशीर्वाद मला भाऊंनी त्या दिवशी दिले.
भाऊ, वडील व कुटुंब प्रमुख म्हणून कसे वाटतात याचे मोजक्या शब्दात स्वप्निल ने चित्रण केले आहे.खूपच सुंदर आहे.त्याने इंग्रजीतून दिलेले आपले प्रांजळ वर्णन तसेच देत आहे.स्वप्निल म्हणतो:
“His greatness was his simplicity and his life a saga of sacrifices. Being eldest of 7 siblings he had to ensure well being of everyone, from education to self sufficiency. Being a sports person his,” never say die”,attitude helped him scale new boundaries in every stage of his life. He fulfilled his dream of educating his sons, elder son as an engineer and younger one as a doctor. Completely attached to his family he was respected by one and all. We all had immense respect and gratification and took care of him till his last breathe. May God grant him moksha and let him rest in peace after all the struggles and victories…”
स्वप्निल अगदी योग्य वर्णन करतोय, एक खेळाडू म्हणून सतत प्रयत्नशील राहणे हे भाऊच्या रक्तातच होते.
“घडीने घडी काळ आयुष्य नेतो” असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे.काळ कोणासाठी थांबत नाही कोणी त्याला थांबवू शकत नाही . आपण सामान्य माणसांनी, मिळालेल्या आयुष्याचा काळ व त्यातील संधी या चांगल्या कामासाठी सार्थकी लावाव्यात हेच खरे.आपल्या भविष्यकाळाचे उत्कृष्ट नियोजन करणे म्हणजेच आयुष्य सार्थकी लावणे. भाऊने आपल्या आयुष्याचे असेच सुरेख नियोजन केले.अडचणी आल्या, कठीण प्रसंग आले ,सत्वपरीक्षा पाहिली गेली. साधी राहणी, मिठास वाणी आणि कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी प्रेमाची निगराणी, या साध्या आचरणातून सहीसलामत वाट चालत राहिला.संसाराचे एक सुंदर चित्र निर्माण झाले. आयुष्य सार्थकी लागले!!
जीवनाला प्रभू स्पर्श झाला, त्याचा हात फिरला तर आपले जीवनही संपूर्णपणे बदलून जाते.. जीवनात ‘वसंत,आला म्हणजे. दुःख, दैन्य, दारिद्र्य क्षणात दूर होतील. आमच्या राऊत कुटुंबातही 85 वर्षापूर्वी हा वसंत आला, आणि’ वसंतबहार’ सुरू झाला…परवाच तो निमाला..कायमचा..
पाऊस नसतानाही सृष्टीला नवपालवी फुटविण्याची ईश्वरी किमया वसंतातच साकार होते. म्हणूनच हा ‘वसंत’ ज्याच्या अंगी भिनला आहे, त्याचे आयुष्य कधीही निराशेने ग्रासले जाणार नाही. त्याच्या जीवनात कायम वसंत नांदत राहील.
भाऊ गेला. खूप सुखद स्मृती ,निर्व्याज्य प्रेमाचे क्षण आनंदाचे दिवस यांच्या आठवणी ठेऊन गेला. आम्हा सर्व कुटुंबीयांतर्फे त्याच्या स्मृतींना श्रद्धांजली आणि एक विनंती..
येशिल कधी परतून?
वाट पहावी किती ? कुठे दिसे ना, तुझी एकही खूण
उदास भासे सुंदर पिवळे श्रावणातले ऊन
येशिल कधी परतून ?
हिरवे सोने हे दसर्याचे हाति जाई सुकून.
भाऊबिजेचे हे निरांजन बघते वाट अजून,
ये लवकरी ये, भाऊराया, जाऊ नको विसरून !
येशिल कधी परतून ?
या लेखातील छायाचित्रे पुरविल्या बद्दल सलिल, आठवणी बद्दल उषामाई, सुलु चे आभार..
वसंत भाऊंबद्दलचा लेख वाचून बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.
वसंत भाऊ आणि इतर मित्र कामा धर्म शाळेच्या आवारात वॉलीबॉल खेळायचे त्यावेळी आम्ही छोटे कंपनी मैदानाबाहेर गेलेला चेंडू आणून देण्याचे काम करीत असू.आम्हाला त्यातच खूप मजा वाटे. बेस्ट ऑफ थ्री गेम खेळला जाई त्यावेळी हरणाऱ्या टीमने प्रत्येकी एक आणा याप्रमाणे सहा आण्याचे भाजलेले चणे आणायचे आणि ते सर्वानी वाटून खायचे आसा प्रघात होता. त्यावेळी आम्ही छोटे कंपनी तेथे हजर असल्यामुळे आम्हालाही चणे खायला मिळत असत. हा कार्यक्रम रोजच होत असे.
वसंत भाऊ आणि इतरांचा खेळ पाहून हळूहळू आम्ही पण वॉलीबॉल खेळायला शिकत होतो. सर्व जण जमा व्हायच्या आधी आम्हाला वसंत भाऊ थोडा वेळ वॉलीबॉल खेळायला शिकवत असे.
वसंत भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.???
Digamber Bhau, this is great Shradhanjali to late vadantrao.
We are not knowing all these history about yr. Family
Thank you very much .
भाऊंनी निभावलेली कुटूंबाची जबाबदारी आम्ही जवळून पाहीली आहे . खरंच भाऊ धन्य आणि महान.
आपण भाऊंचे अनेक पैलू छान ऊलगडून सांगितले आहेत.
भाऊ काकांच्या आयुष्यातील कुटुंब वत्सल आणि हळवी बाजू फार हृदयस्पर्शी आहे!
भाऊंशी मोठे दीर म्हणून नेहमीच संपर्क आला. मृदु व प्रेमळ स्वभाव व बोलण्याचा अनुभव सर्वांना येत असे. त्यांच्या विषयी लेख लिहून त्यांचे अनेक पैलू सर्वांना सांगितलेत. मोठ्या भावाला दिलेली आदरांजली मला महत्वाची वाटते. विभा वहिनी वहिनींना तसेच मुलांना त्यांच्या जाण्यामुळे झालेल्या दुःखावर ही हळुवार फुंकर.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ?
भाऊकाकांना लहानपणापासून नेहमी हसतमुखच पाहिले. अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत सर्व कुटुंबियांना प्रेमळ धाग्याने बांधून ठेवले होते त्यांनी. त्यांच्या स्मृतींना विनम्र प्रणाम ???
वसंत भाऊ बद्द्ल खुप गोष्टी नव्याने कळल्या. खुप वर्षानंतर त्यांना फोटोमध्ये पाहीले.
बंधुनी खुप छान भावना व्यक्त केल्या आहेत.
?
अत्यंत ऊद् बोधक ,वाचनिय व ऊत्कंठावर्धक ,सराईत लेखकाला लाजवेल असे चरित्र लेखन.बंधू ,आपल्यांत एक यशस्वी ,सराईत लेखक दललेला आहे हे ह्या चरित्र लेखावरुन सिध्द होते. आपण आपल्या चुलतभाऊ कै.वसंताचे केलेले चरित्र लेखन ,वसंत रुतुप्रमाणे बहरणारे वाटते.धन्यवाद .
लेख वाचला..
भाऊंची कर्तव्यनिष्ठता, मेहनत आणि कार्यतत्परता दिसली.
भाऊंच्या जाण्याने न भरून येणारी हानी राऊत कुटुंबाची झाली आहे..तरी या दुःखा च्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो..?
भावपूर्ण श्रद्धांजली?
वसंतभाऊंचे व्यक्तीमत्व खरोखरच वाखाणण्याजोगेच होते.
आपण त्यांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे केले. माझा त्यांचा विशेष परिचय नव्हता,मात्र आपल्या लेखामुळे त्यांची गुणवत्ता कळली. अश्या या आदरणीय वसंतभाऊंना आमची भावपूर्ण श्रद्धांजली.??
बंधू, सुंदर… ? 85 वर्षाचा लेखा जोखा लिहिला आहे. भाऊबंद्दलचा आदर दिसून आला.लेख वाचताना मला सुद्धा माझे पूर्वीचे दिवस आठवले आणि मी भूतकाळात गेलो. कारण मी सुद्धा हे दिवस अनुभवले आहेत.???
वसंत भाऊ म्हणजे एक दिलखुलास , बोलका स्वभाव व ऊमदे व्यक्तिमतव. हा लेख वाचताना त्याच्या अनेक आठवणींनी मन गहिवरून आले. त्या पैकी कांही.
चिंचणीला बॅंकेत असताना तो बोरडीहून अप-डाउन करीत असे. सकाळी आपल्या घरी रोज फेरी असे व बरयाच वेळी आप्पा व तो एकत्र जेऊन निघत असत.जेवलयाशिवाय आप्पा त्याला सोडीत नसत .
एकदा सकाळीच बॅंकेत गेल्या गेल्या त्या च्या पायाला विषारी किडा चावला व पाय सुजला. आप्पा एस्. टी. ची वाट पहात वाणगाव नाक्याजवळ उभे होते. भाऊंचा निरोप येताच त्यांनी मला घरून बोलाऊन घेतले. आमही दोघांनी सरकारी दवाखानयात नेले. औषधोपचार झाल्यावरच आप्पा शाळेत गेले, मी त्याच्या जवळ थांबलो. त्या रात्री आपल्याच चिंचणीचया घरी त्याला ठेऊन घेतला व रात्र भर मी व आप्पा आलटून पालटून त्याच्या जवळ बसून होतो.
मे महिना व दिवाळीचया सुट्टी त मी जेव्हा चिंचणीला येत असे तेव्हा तो मला वॅालीबॅाल खेळण्यासाठी घेऊन जात असे.
सदू वझे व तांडेल हे त्याचे मच्छीमार मित्र. एकदा सर्वांनी मिळून रात्र भर बोटीत बसून व खोल समुद्रात जाऊन मासे कसे पकडतात ते पहाण्यासाठी कार्य क्रम ठरविला. सर्व नक्की झाले. चिंचणीचया घरी रात्री जमले. व निघणार इतक्यात बोटीवरून वादळी वारे सुरू झाल्याचा निरोप आला व कार्य क्रम रद्द झाला. आमही हिरमुसलो पण त्या वेळी भाऊने सर्वांना धीर दिला व समजूत काढली.
मी त्या वेळी अ. वर्तक वसतीगृहांत दादरला शिकत होतो(१९६५ -६६). एकदा सकाळीच भाऊची स्वारी तिकडे आली व म्हणाली , “चल माझ्या बरोबर! सरप्राईज आहे मी सांगणार नाही. मला जबरदस्तीने कबुतरखानयाजवळचया एका गल्लीमधये घेऊन गेला. पत्ता दाखविण्याचे काम मीच केले. तेथे माझी ओळख करून दिली. मी गोंधळलो होतो. नंतर सर्व मामला लक्षांत आला. मुलगी बघणयाचा कार्य क्रम होता. चहा पाणी काहीही भाऊने घेतले नाही. साधा कार्य क्रम करण्या विषयी भाऊने तशी अटच घातली होती हे नंतर कळले. वासंती वहिनींची ती पहिलीच भेट.
वसंत भाऊ हे आमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व. स्वभाव आणि वागणं लाघवी. बोलता बोलता एखाद्याची थट्टा मस्करी करणं हे वैशिष्ट. बो फाईन हा शब्द प्रयोग त्यानेच रूढ केला. हॉलिबॉल खेळाची त्याची आवड आम्ही अनुभवली होती. नाटकाची सुद्धा आवड होती हे बंधूंच्या लिखाणातून समजले. चिंचणी येथील वास्तव्यात तो भेटत असे. रात्री मुक्काम असेल तर मग तो आणि आप्पा (वडील) गप्पा मारीत. पुणे वास्तव्याला गेल्या पासून त्याची भेट दुरावली. वसंत भाऊच्या निधनाने एक लोभस व्यक्तिमत्त्व हरवले आहे. बंधूंच्या लेखनातून त्याच्या अनेक गुणधर्मांचा परिचय नक्की सर्वांना होईल. वसंत भाऊना भावपूर्ण श्रद्धांजली.
वसंत भाऊ म्हणजे एक दिलखुलास, बोलके व ऊमदे व्यक्तिमतव. वरील लेख वाचतांना गतसमृतीचया अनेक आठवणी गहिवरून आल्या.
चिंचणीला बॅंकेत असताना तो बोरडीहून अप- डाऊन करीत असे. आप्पांचा मुक्काम चिंचणीलाच होता. तो बहुधा रोज सकाळ/ संध्याकाळी घरी वळत असे. सकाळी आप्पा जबरदस्तीने जेवायला बसवत व बोलत बोलत वाणगाव नाक्याजवळ चालत जात. पुढे एस्.टी. ने आप्पा शाळेत जात व भाऊ समोरच असलेल्या बॅंकेत. एकदा भाऊला बॅंकेत विषारी कीडा चावला. पाय खुप सुजला. चालता येईना. आप्पांची बस आली नवहती. भाऊंचा निरोप आल्याने ते बॅंकेत गेले. मी घरी असल्याने मलाही बोलाऊन घेतले. आमही दोघांनीही त्याला सरकारी दवाखानयांत नेले. औषधोपचार झाल्या नंतर आप्पा शाळेत गेले. मी तेथेच थांबलो व बरे वाटलयावर त्याला घरी घेउन आलो. त्या रात्री आप्पा नी त्याला घरीच ठेऊन घेतले व रात्र भर जागून काढली
मी तेंव्हा अ. वर्तक वसतीगृहात (१९६५-६६) दादरला राहत होतो. सकाळीच भाऊची स्वारी दारांत हजर. मला म्हणा ली एके ठिकाणी जायचे आहे . माझ्या बरोबर चल व मला ते ठिकाण दाखव. मी विचारले कोठे? म्हणाला ते सरप्राईज आहे. तुला कळलेच .कबुतरखानयासमोर एका चाळीत मी त्याला ठिकाण दाखविले. मला आंत घेऊन गेला , ओळख करून दिली. मुलगी बघणयाचा कार्य क्रम होता. चहापाणी घेतले नाही. भाऊने तशी आधीच सूचना देऊन ठेवली होती कार्य क्रम साध्या पध्दतीने करण्याची . वासंतीवहिनींची ती माझी पहिली भेट.
वसंत बहार वाचताना बहार आली. नात्यांची रेशीमगाठ उलगडताना उत्सव मूर्ती भोवती विषय केंद्रित केलाय आणि त्याचवेळी तुमच्या बंधुचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, जीवनाचा दृष्टिकोन, घरच्यांची जबाबदारी आणि शिवाय मुलांचे करिअर घडवणे इत्यादी मल्टिटास्क कामे सहज करुन शिवाय आनंदी राहून दीर्घायुष्य भोगणे हे सर्व तुम्ही लिलया दाखवले आहे. एक ऑइल एक्स्पर्ट असून तुमचे लेखन प्रभावित करते.
वसंत भाऊ बद्धल लेखात तुमची लेखणी खरोखर बंधुप्रेम, आदर आणि आपुलकी याने ओतप्रोत भरलेली आहे. वडील वारल्या नंतर थोरला भाऊ म्हणुन
स्वतःचे भविष्य बाजूला सारून कुटुंबातील इतरांचे भविष्य घडविण्यासाठी झटणारी पिढी आता अस्त होत चालली आहे.
वसंत भाऊंनी आपल्या निरपेक्ष, निरागस आणि कुटुंब वत्सल् स्वभावाने आपल्या घरी वसंताचा बहर निर्माण केला.
अशी किमया क्रिडा कौशल्य असणारा एक उत्तम खेळाडूच
करू शकतो. अशा एका उमद्या व्यक्तिमत्वला माझा सादर प्रणाम ???