माझे शालेय सोबती, प्रभाकर व श्रीकांत
कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी जीवनाचे एक शाश्वत सत्य ,चिरंतन शब्दांमध्ये सांगितले आहे.
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ.
क्षणिक तेवी आहे बाळा,मेळ माणसांचा.
…….दोष ना कुणाचा.
साधारणतः अशाच अर्थाचा,
यथा काष्ठं च काष्ठंच, समेयातां महादधौ!
हा श्लोक रामायणात आहे. माणसाच्या जन्मापासून अखेरपर्यंत शेकडो लोक जीवनात येतात. दूरही जातात. त्यांना स्नेहबंधनात एकत्र जोडण्याचे माणसाचे प्रयत्नही चालू असतात. त्यातील काही यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात. म्हणूनच कुटुंब व समाजव्यवस्था आज हजारो वर्षापासून टिकून राहिल्या आहेत. प्रभू रामचंद्रांनी भरताला उद्देशून हा उपदेश केला होता. त्यांची 14 वर्षांनी पुन्हा भेट होणारच होती आणि ती झालीदेखील! आपल्या जीवनात आलेली काही माणसे, आयुष्याच्या एका कालखंडानंतर, दूर जातात ती कायमचीच. पुन्हा कधीच आपल्याला भेटत नाहीत. त्यातील काही ही मर्त्यभूमी सोडून अनंताचे प्रवासी झालेले असतात तर काही पृथ्वीच्या पाठीवर कोठेतरी असतात आणि क्वचितच दैवयोगाने पुन्हा भेटतात…म्हणून, “पुन्हा नाही भेट”… हे कधी कधी अर्धसत्य ठरते. त्यातीलच,अशीच एका अर्धसत्याची ही कहाणी…अद्भुत आणि खरी!!
आयुष्यातील शालेय जीवनाचा कालखंड मोठा गमतीदार प्रसंगांनी भरलेला. जीवनात मैत्री, नाते याची काहीच कल्पना नसताना जे बंध जुळतात ते अखेरपर्यंत टिकतात. शालेय जीवन आनंददायी उत्साही असतं. ते दिवस आठवले म्हणजे कधी नकळत गालावर हसू तर कधी डोळ्यांत आसू! शाळेत असताना अभ्यासासोबतच दंगा-मस्ती, शिक्षकांचा ओरडा हे समीकरण ठरलेलं असत. ते मंतरलेले दिवस डोळ्यासमोर तरळून जातात आणि मग मागे राहतात त्या फक्त गोड आठवणी .शाळेतल्या दिवसातील मैत्रीच्या.. मैत्री म्हणजे काय हे माहित नसतानाच शालेय जीवनापासूनच आपण मित्र मैत्रिणी बनवायला सुरुवात करतो. शाळेचे दिवस हा हा म्हणता निघून जातात .आणि मग चालू होते भविष्यासाठीची वाटचाल. या वाटचालीमध्ये हे शालेय जीवनातले मित्र, मैत्रिणी दुरावतात.कारण प्रत्येक जण या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी व टिकवलेल्या अस्तित्वाला एक वलय प्राप्त करण्यासाठी , धडपड सुरु करतो . आपल्यापासून दूर जातो. आठवणीत रहातो पण कधी भेटू शकत नाही. मैत्री झाली तर ती आयुष्यभर साथ देणारी असावी. रक्ताचं नातं नसलं तरी मैत्रीत प्रेम व जिव्हाळा असतो. दोस्ती नातेबंधा पेक्षाही सुखदायक असते. शालेय जीवनातील मित्रांची मैत्री ही वेगळीच चीज आहे. ती निर्व्याज्य ,पवित्र अशी भावना असते. कोणतीही अपेक्षा अथवा लाभ मिळावा अशी भावना अजिबात नसूनही, त्या सोबत्यांची आठवण सतावत असते. कधीतरी त्यांची भेट व्हावी… जुन्या शालेयआठवणींना उजाळा मिळावा… कालचक्र उलटे फिरून त्या निरागस जीवनात पुन्हा शिरता यावे यासाठी मन आतुर होते…कितीतरी शालेय सोबती दुरावतात ते पुन्हा कधीच न भेटण्यासाठी …त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाही… कारणे काहीही असोत, “एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट”…हेच सत्य ठरते !
काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती मैत्री असते, कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती मैत्री ! आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांचे जवळ शेअर करावीशी वाटते ती मैत्री असते. आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असतात, ती मैत्री असते. आणि मरेपर्यंत विसरता येत नाही ती मैत्री असते. बालमित्र आपल्या जीवनातील एक महत्वपूर्ण भाग आहेत. ते जवळ असोत नसोत त्यांचा संपर्कही कधीकाळी होत असो नसो त्यांना संपूर्णपणे विसरणे केवळ अशक्य! काही तरी कारणामुळे आपल्याला त्यांची आठवण येत राहते!!
संत श्रेष्ठ योगी तुकाराम महाराज म्हणून तर सांगून गेले,
“बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा”
आयुष्यातील सर्वोत्तम काळ म्हणजे बालपण. शालेय जीवन म्हणजे त्यांतील वसंत ऋतु. निराशा ,अपमान यांचे सावट नसते. निरागसता व निष्पापता या गुणांचा मिलाफ झालेला असतो. कामाच्या कटकटी नाहीत.प्रत्येक गोष्टीत नवलाई जिज्ञासू वृत्तीने पहावे ,आनंद घ्यावा ,अशा ‘फुलपाखरू’ अवस्थेत, बालपण संपून तारुण्य कधी सुरुवात होते ते कळत देखील नाही!!
बोर्डी मराठी शाळा, हायस्कूलमधील कालखंडात खूप मित्र मिळाले. त्या निरागस मैत्रीला जाती-पाती वा स्वार्थाचा कोणताच गंध नव्हता. निर्व्याज्य प्रेम, गमती, जमती एकमेकांच्या खोड्या करण्यातील आनंद, यावरच ही मैत्री होते. अजून आयुष्यातील खडतर वाटचाल सुरू झालेली नसते. स्वप्नांचे इमले बांधण्याचे ते दिवस. त्यामुळे मित्रही असेच त्या स्वप्नांचे साक्षीदार ! ही आयुष्याच्या उत्तम कालखंडांतील जीवाभावाची मंडळी शाळा संपली की बारा वाटांनी विखुरली जातात.. माझा तरी अनुभव तसाच. बोर्डी व बोर्डी बाहेरील थोडे अपवाद वगळता ,बहुतेकांचा संपर्क संपूर्ण तुटला आहे. नावे आठवतात, गमती आठवतात, तो दिवस आठवतो , पण तो मित्र आज जरी समोर आला तरी ओळखू शकणार नाही, कारण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे!!
सन 2009 साली, 1959 च्या एस एस सी वर्गातील आम्ही बोर्डीतील काही सहाध्यायी मित्रांनी, “सहजीवनाच्या सुवर्णमहोत्सवा”, निमित्ताने एकत्र येण्याचे ठरवले. बोर्डी परिसरातील मित्र-मैत्रिणी सहज संपर्कात आल्या. मात्र बोर्डी बाहेरील थोड्या मित्रांचा संपर्क होऊ शकला. त्यातीलही मोजकेच आले. कांही वर्गमित्रांचा संपर्कही होऊ शकला नाही मग त्यांच्या येण्याची वार्ताच सोडा! आमचे एक वर्गमित्र व सध्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे, पालघर जिल्हा झोनल सचिव प्रि. प्रभाकर राऊत, यांच्या पुढाकाराने, हे सर्व शक्य झाले. “मिलन संमेलन” छान झाले. आमच्या त्याकाळच्या, हयात गुरुजनांना बोलावून त्यांचाही आदर सत्कार केला. आशीर्वाद घेतले. मंडळी पन्नास वर्षांनंतर एकमेकास भेटत असल्याने खूपच बदलली होती ओळखणेही कठीण होत होते. मात्र एकदा ओळख पटली आणि, “अरे गोट्या, पक्या ..”अशी मजेशीर संभाषणे सूरू झाली. शाळेच्या दिवसात कपाळावर केसांची झुलपे बाळगणारे आता केसच हरवून बसले होते .शेवटच्या बाकावरून तीक्ष्ण नजरेने फळ्यावरील लिखाण वाचणाऱ्यांना, जाड भिंगाचे चष्मे लागले होते. त्यावेळच्या आमच्या रूपगर्विता वर्ग मैत्रिणींना, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पांढऱ्या केशसंभारात पाहतांना मनोमन दुःखही होत होते. प्रत्येकजण शारीरिक व मानसिक दृष्ट्या ही बदललेला होता. हा काल महिमा दुसरे काय? मात्र या दोन दिवसात पुन्हा एकदा बालपणीचा तो काळ अनुभवता आला, आनंद मिळाला… काही ओंडक्यांची, 50 वर्षांनी का असेना कालसागरात भेट झाली.आणि पुन्हा भेट देण्याच्या इराद्याने जे निरोप घेतले ते आजहि तसेच राहिले आहेत!
त्या पन्नास वर्षानंतरच्या पुनर्मीलनात, मागे सांगितल्याप्रमाणे, थोडे मित्र आले बरेच राहिले. त्यांच्या आठवणी जरूर निघाल्या. पण ते कधी भेटतील की नाही ही शंका सर्वांनाच व्यथीत करून गेली. या सर्व अनुपस्थितांत, दोन मित्रांची सर्वांनाच तीव्रतेने आठवण झाली. त्यांना संपर्क करण्याचा आम्ही खूप प्रयत्नही केला होता. पण जेथे संपर्क झाला नाही तिथे उपस्थितीची कशी अपेक्षा करणार? एवढ्या दीर्घ कालखंडानंतर ही या दोघांची गैरहजेरी विशेषतः मला का बरे सतावत होती? शालेय कालखंडातील , त्या दोघांचे वर्गातील अस्तित्व, हुशारी व त्यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व त्यावेळीही शाळेला व्यापून उरले होते व म्हणून आजही साठ वर्षानंतर त्यांच्या त्या अस्तित्वाचे गारुड मनावर तसेच आहे. ते तसेच राहणारही आहे! ते न भेटलेले ‘दोनओंडके’ होते, दोन वर्ग मित्र, एक प्रभाकर झोळ व दुसरा श्रीकांत सांब्राणी !!
बोर्डी हायस्कूलमध्ये मी जेव्हा ईयत्ता आठवीत प्रवेश घेतला, तेव्हा आठवीचा वर्ग अ ब क ड अशा चार तुकड्यांत विभागला होता. आमची तुकडी होती “आठवी ड”. सर्व इतर तुकड्यांमधील मुले आम्हाला ” ढ” ,म्हणून चिडवत असत .गंमत म्हणजे या आठवी ड च्या वर्गातील विद्यार्थीच परीक्षेच्या निकालानंतर, आठवीच्या संपूर्ण वर्गातून सर्व तुकड्यांमधून पहिले, दुसरे व तिसरे येत असत. प्रभाकर राऊत, दिगंबर राऊत, मोहन बारी हीच नावे, तिमाही,सहामाही ,वार्षिक परीक्षांत, आलटून-पालटून , पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरात येत होती.
इयत्ता नववीमध्ये हे चित्र बदलले. प्रभाकर झोळ या नव्या शिलेदाराने, बोर्डी हायस्कूलात, नववी ड च्या वर्गात प्रवेश घेतला. परीक्षेतील निकालांत नंबर एक, प्रभाकर झोळ साठी रिझर्व झाला .बाकीचे 2,3,4 नंबरसाठी आम्हाला स्पर्धा करावी लागली.
पुढे इयत्ता दहावीत श्रीकांत सांब्राणी या ‘राजाधिराजा’ चा शारदाश्रम व बोर्डी शाळेत, दहावी ‘ड’ वर्गात प्रवेश झाला. समीकरणे पुन्हा बदलली. पुढील सर्व परीक्षांतील पहिला नंबर श्रीकांत साठी, Advance Booking करून राखून ठेवला गेला. दोन नंबर अर्थातच प्रभाकर झोळ आणि त्यापुढील नंबर साठी आम्हा बाकीच्या मुलांची स्पर्धा .
दोघेही जातिवंत, बुद्धिमान . मात्र दोघांच्याही हुशारीची जातकुळी वेगळी होती.
प्रभाकर हा प्रिं. रामचंद्र ना. झोळ यांचा ज्येष्ठ पुत्र. प्रि. झोळ हे ,बोर्डीतील ‘सरकारी प्राथमिक शिक्षक ट्रेनिंग कॉलेजचे’ प्रिन्सिपाल होते. एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ अशी त्यांची ख्याती होती. आज म्हात्रे कुटुंबीय बोर्डीस ज्या बंगल्यात वास्तव्यास आहेत, त्याचे शेजारील, मागच्या बाजूस असलेल्या बंगल्यात त्यांचे वास्तव्य असे. मा.झोळसाहेब, ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपल, त्याचप्रमाणे डाॅ.सुलभाताई पाणंदिकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या बी.टी कॉलेजमध्येही प्राध्यापक म्हणून योगदान देत असत. सुशिक्षित व ख्यातनाम कुटुंबातील प्रभाकरला निश्चितच निसर्गदत्त बुद्धिमत्ते बरोबरच सुसंस्कृत संस्कारांचीही पार्श्वभूमी होती. वडील प्रि. रा. ना. झोळ व काका प्रि. म. ना.झोळ हे दोघेही बंधू त्याकाळी महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात दैदिप्यमान तारे होते. दोघांनीही आपल्या आयुष्याची वाटचाल खूपच खडतर व गरीब परिस्थितीतून करून ते उच्चविद्याविभूषित झाले होते, असे आम्ही ऐकून होतो.
कॉलेजचे प्रमुख म्हणून झोळ साहेबांचे वास्तव्य एका टुमदार बंगल्यात होते. बंगल्यासमोर सुंदर सुरू वृक्षांची बाग व लागूनच समुद्रकिनारा असा हा निसर्गरम्य परिसर होता. शेजारीच ट्रेनिंग कॉलेजची इमारत व प्रशिक्षक विद्यार्थ्यांचे वसतिगृह होते. आज या वास्तूची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. कारण आता तेथे कोणाचा वावर नाही. एकेकाळी अतिशय देखणी असलेले हे सदन, सभोवताली फुललेल्या बागेमुळे व एका सुविद्य कुटुंबाच्या वास्तव्यामुळे खूपच प्रेक्षणीय होते. ट्रेनिंग कॉलेजमधील काही प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, माझ्या प्राथमिक शिक्षक असलेल्या वडिलांकडे, त्यांच्या पाठाची टिपणे दाखवून, सल्ला घेण्यासाठी येत असत. एक दिवशी श्री संखे या विद्यार्थी गुरुजींनी मला त्यांचे ट्रेनिंग कॉलेजमधील वसतिगृह दाखविण्यासाठी तेथे नेले. प्रभाकरचे घर शेजारीच असल्यामुळे सहाजिकच, मी प्रभाकरला भेटण्याची इच्छा प्रदर्शित करताच, त्याच्या वडिलांची (प्रि. झोळ), परवानगी घेऊन आम्ही पहिल्या मजल्यावरील, कोपर्यातील त्याच्या खोलीत गेलो. अचानक मला आलेला पाहून प्रभाकर थोडा भांबावला. मात्र त्यानंतर त्याने माझ्याशी अभ्यासाविषयी व त्याच्या अभ्यासाच्या पद्धतीविषयी मनापासून चर्चा केली. दहा-पंधरा मिनिटेच मी तेथे बसलो होतो. त्याचा अमूल्य वेळ घेणे मला प्रशस्त वाटत नव्हते. त्याच्या टेबलावर, समोर असलेला आरसा कशासाठी, असे मी त्याला विचारले? त्याने दिलेले उत्तर आजही माझ्या लक्षात आहे…
“वाचताना लक्ष विचलीत झाले तर, आरशाने ‘इशारा’ द्यावा व पुन्हा अभ्यासात एकाग्र असावे”, यासाठी आरश्यासमोर बसून तो अभ्यास करीत असे! या लेखाच्या शेवटी दिलेले कल्पित चित्र हे प्रभाकर चे आज माझ्या मनःचक्षु समोर असलेले ते दृष्य आहे!!
खरं सांगतो, त्यावेळी मला प्रभाकरचा खूप हेवा वाटला कारण आरसा जाऊ दे, माझ्याजवळ बसायला टेबल-खुर्ची पण नव्हती!
प्रभाकरने आपल्या अंगभूत बुद्धीमत्तेला कष्टाळूपणा, मेहनती वृत्तीची जोड दिली होती. बोलणे वागणे अत्यंत नीटनेटके, जेवढ्यास तेवढे असेच असे. स्वभावाने थोडासा एककल्ली, अबोल, उंच, गव्हाळवर्ण, सडपातळ शरीरयष्टी, बोलके डोळे, गंभीर तरी प्रसन्न चेहरा अशी त्याची साठ वर्षापूर्वीची छबी आजही माझ्या डोळ्यासमोर येते .आवाज थोडा बारीक. शक्यतो स्वतःहून कोणाशी न बोलणारा, वर्गात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्याचा हात उंच असे .उत्तरे देताना अगदी विस्तृत, स्पष्ट व आत्मविश्वासपूर्ण बोलत असे.कोणी मित्राने काही अडचण विचारली तर तीदेखील सोडवून देण्यासाठी तत्पर. खेळाच्या क्रिडांगणावर मात्र शक्यतो त्याची प्रेक्षकाची भूमिका असे. एक मित्र म्हणून खूपच चांगला, व ज्याच्याशी मैत्री करावीशी वाटावी, असंच त्याचं व्यक्तिमत्त्व होतं.
इयत्ता दहावीत आमच्या वर्गात श्रीकांत सांब्राणी आला. त्याच्या बुद्धिमत्तेची चमक वेगळीच होती. श्रीकांतने दहाव्या इयत्तेत आमच्या तुकडीत प्रवेश घेतला आणि आम्ही इतर सर्वजण पहिला नंबर कायमचा विसरून गेलो. अगदी अकरावी एस. एस .सी. परीक्षा होऊन आम्ही शाळा सोडेपर्यंत!
अंगकाठी अगदीच किरकोळ. उंची ही मध्यम. मात्र खूप बोलके डोळे, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेच तेज व आत्मविश्वास,थोडा मिश्किलही! संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी पटकन जवळीक साधणारा, नेहमी खेळीमेळीने वागगणारा. हुशारीची थोडीही दर्पोक्ती नसणारा असे हे ऊमदे व्यक्तिमत्व होते. शरीराच्या मानाने डोके व कान थोडेसे मोठे वाटत. अंगीभूत बुद्धी वैभवाची जणू निशाणी. बुद्धिदेवता श्रीगणेशाचा वरदहस्त असल्याची साक्ष! नेहमी आनंदी व उत्साही असे. त्याच्या कौटुंबिक परिस्थितीची काहीच माहिती तेव्हा नव्हती ,आजही नाही. त्याची पार्श्वभूमी सुसंस्कृत, शिक्षित व सधन असावी. मराठी इंग्रजी ,संस्कृत या भाषांबरोबरच शास्त्र व गणित या विषयातही तो अव्वल असे. विशेष म्हणजे वाचन स्पर्धा लेखन स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा अशा गोष्टीत तो हिरीरीने भाग घेई. मर्दानी खेळांत त्याला विशेष रस नव्हता. श्रीकांत म्हणजे जातिवंत, अस्सल बुद्धिमत्तेचा एक मूर्तिमंत नमुना होता !
मी थोडासा भाग्यवान. माझे व श्रीकांतचे संभाषण, चर्चा कधी तरी होई. वाचन, वक्तृत्वस्पर्धांतील दोघांच्या सहभागामुळे हे होत असे. सुदैवाने एकेवर्षी मी आणि श्रीकांत दोघांची आंतरशालेय वत्कृत्व स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. ही स्पर्धा उंबरगाव येथील हायस्कुलात होणार होती. आमचे एक शिक्षक, श्री. गजानन जोहारी सर यांचेवर आम्हा दोघांना त्यादिवशी उंबरगाव हायस्कूलमध्ये नेण्याचे काम दिले होते. त्या दिवशीचा छान योगायोग म्हणजे, शाळेचे माजी चित्रकला शिक्षक प्रसिद्ध चित्रकार श्री. मोहिते सर यांच्या घरीच आमची उतरायची व्यवस्था केली होती. सर काही वर्षापूर्वीच निवृत्त झाले होते. दुर्दैवाने आम्हाला त्यांचे वर्गात बसण्याचे भाग्य मिळाले नव्हते. शाळेच्या अगदी पहिल्या पिढीतील ते शिक्षक होते. स्वातंत्र्यसैनिक होते. चित्रकार व छायाचित्रकार फोटोग्राफर म्हणून ,खूप मोठे नाव त्यांनी केले होते. मोहिते सर एक उत्तम व्यासंगी शिक्षक होते. त्यांनी साध्या पेन्सिलने, हाताने काढलेली अनेक चित्रे व क्षणचित्रे (फोटो),आजही बोर्डी, घोलवड व परिसरांतील अनेक घरातील भिंतीवर दिमाखात लागलेली दिसतात. त्या दिवशी सरांचे आशीर्वाद मिळाले ही आम्हा दोघांनाही मिळालेल्या बक्षिसांपेक्षा मोठी दौलत होती. जाताना आम्ही सरांचा निरोप घेऊन गेलो. आम्ही स्पर्धेत यशस्वी झाल्याचा आनंद त्यांना झाला व त्यांनीही दोन गोष्टीची पुस्तके आम्हाला त्यांचेतर्फे भेट दिल्याचे आजही स्मरते. श्रीकांतची जास्त जवळून ओळख त्या दिवशी झाली. मी स्पर्धा होईपर्यंत थोडा नर्व्हस होतो, मात्र तो अगदी शांतपणे सोबत आणलेले इंग्रजी पुस्तक वाचत बसला होता. नाव पुकारल्यावर तितक्याच शांतपणे जाऊन भाषण केले व बक्षीस मिळविले. श्रीकांत माझ्या विशेष लक्षात राहण्याचे एक कारण, त्याचा असा बिनधास्त स्वभाव व अभ्यास एके अभ्यास, अशी इतर हुशार विद्यार्थ्यांसारखी नसणारी वृत्ती!
आमची 1959 सालची अकरावीची तुकडी खूप गुणी व अभ्यासू विद्यार्थ्यांनी भरलेली होती. विशेषतः प्रभाकर व श्रीकांतकडून हेडमास्तर श्री. साने सर (सानेगुरुजींचे लहान बंधू), यांच्या खूप अपेक्षा होत्या. कोणीतरी मेरिट लिस्टमध्ये येईल अशी त्यांची कल्पना होती. मित्रमंडळी व शिक्षकगण सर्वांचीच खात्री होती. दोघेही त्या पात्रतेचे निश्चित होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. अगदी थोड्या गुणांसाठी श्रीकांतची मेरिट लिस्ट चुकली. विशेष मार्गदर्शनाचा अभाव व त्याची स्वतःची कमी पडलेली इच्छाशक्ति, अपुरी मेहनत ह्या संभावित कारणा बरोबरच एक दुसरी ही वदंता या वेळी आम्ही ऐकत होतो. आणि ती म्हणजे एसएससी बोर्डातील काही उच्चपदस्थांची मानसिकता. बोर्डी, सारख्या एका खेडवळ गावातील शाळेतून कोणी विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊच कसा शकतो? ती मिरासदारी केवळ मुंबई पुण्यासारख्या शहरांतील विद्यार्थ्यांची होती! या तर्कात निश्चितच तथ्य होते ,कारण आमचे एक सर यावेळी एसएससी बोर्डात मॉडरेटर चे काम करीत. त्यांनी जातीने श्रीकांत चे पेपर पाहिले होते व आपल्या फक्त विश्वासू शिक्षक सहकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली होती. श्रीकांतला मिळालेले काही गुण पाहीले तर यात सत्यता असली पाहिजे हे समजते. ज्या हिंदी विषयात त्याला उत्तम गती होती त्यात 100 पैकी 68 गुण, शास्त्र विषयात कधीच 90 गुणांच्या खाली तो गेला नाही त्यात अवघे 75 गुण, गणितात मात्र स्वतःच्या अती आत्मविश्वासामुळे 93 गुण! गणिताच्या प्रश्न पत्रिकेतील सर्वच्या सर्व गणिते सोडवून परीक्षकांनी, ‘हवी की तपासावीत’, अशी त्याची पद्धत होती. मात्र एस एस सी परीक्षेत या सवयीचा फटका बसून, सर्वच्या सर्व गणिते सोडवताना 7मार्काचा सक्तिचा (कंपल्सरी )असलेला प्रश्न लिहायला वेळ अपुरा पडला.. मला आज असे वाटते, जर श्रीकांतला थोडी नशिबाची साथ तेव्हा मिळाली असती तर तो नुसत्या मेरिट लिस्ट नाही तर “टॉप ऑफ द मेरिट लिस्ट” आला असता, एवढी त्याची गुणवत्ता होती!
ह्या जर-तरच्या गोष्टी आहेत. मात्र आमच्या या दोन मित्रांचा व शाळेचा बहुमान त्या वर्षी होऊ शकला नाही. आज पर्यंत आमच्या शाळेला तो बहुमान कोणी मिळवून दिला नाही, हे कटू सत्य आहे, हे खरे.
एस. एस. सी. परिक्षा झाली आणि आम्ही एकमेकांचा व शाळेचाही निरोप घेतला. जीवनाच्या वेगवेगळ्या वाटा निवडून प्रत्येकाचा नवा प्रवास पुढील शिक्षणासाठी वा कामधंद्यासाठी सुरू झाला. काही थोडे मित्र संपर्कात राहिले. त्यांच्याशी संभाषण,भेट होई. अनेक सहाध्याई जवळजवळ विस्मरणात गेले. प्रभाकर व श्रीकांत महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात गेले असे कळले. प्रभाकरची हकीगत ,बोर्डीतील म्हात्रे कुटुंबीयांच्या मार्फत कळत असे कारण या दोन कुटुंबांच्या अनेक वर्षाच्या सहजीवनामुळे जरी झोळ कुटुंबीय बोर्डी सोडून गेले, तरी त्यांचा संपर्क होता. श्रीकांतची मात्र काही माहिती कळत नव्हती.
मागे उल्लेख केल्याप्रमाणे, सन 2009 साली आमच्या 1959 एस.एस.सी. इयत्तेचा पन्नासावा ‘वर्धापन दिन’ साजरा केला. जेवढ्या मित्रमंडळीशी संपर्क साधता येईल तेवढा साधून शक्य तेवढ्या मित्रांना एकत्र केले. काही वर्ग मित्रांच्या आनंद वार्ता, यशोगाथा तर काहींच्या दुःखभरल्या कहाण्याही समजल्या. त्यावेळी आम्हा सर्वांनाच या दोन हुषार मित्रांची आठवण झाली. दोघेही येऊ शकले नाहीत.
दुर्दैवाने त्याच सुमारास प्रभाकरचा अपघाती, अकाली अंत झाल्याचे बोर्डीच्या म्हात्रे कुटुंबियांमार्फत कळले. सर्वांना खूपच धक्का बसला.
मेकॅनिकल इंजीनियरिंगची पदवी (B.E.) सांगली मधील इंजिनिअरिंग कॉलेजमधून प्रथम वर्गात उत्तमरीत्या, उत्तीर्ण होऊन प्रभाकरने, पुण्यास एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत काम सुरू केले होते. विवाह होऊन त्याला दोन मुलेही होती.( एक मुलगा व एक मुलगी). दोन्हीही मुले वडिलांचा हुशारीचा कित्ता पुढे गिरवीत, शिक्षण कालात आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवीत होती, असेही कळले. नियतीला या निष्पाप माणसाचे त्याच्या चौकोनी सुखी कुटुंबाचे सौख्य पाहवले नाही. एके दिवशी संध्याकाळी कामावरून घरी येताना, रस्त्यावरील दुभाजकाला त्याची स्कूटर आदळून तो खाली पडला. जखमी झाला. वैद्यकीय उपचारांचा काहीही उपयोग न होता त्या अपघातात शेवटी त्याचे दुर्दैवी निधन झाले. ही माहिती त्याच्या मावस भगिनी डॉ. मंदाताई खांडगे यांनी मला दिली. त्यांचे दुसरे मावसबंधू डाॅ.अरुण साळुंखे यांचाही संपर्काचा पत्ता मंदाताईंनी मला दिला.त्यांच्याशी बोलून मला त्याच्या अखेरच्या क्षणांची करूण कहाणी कळली. मी माझ्या शालेय दिवसातील मित्रांच्या आठवणी लिहितो आहे, हे ऐकून डॉ. अरुण माझ्याशी खूप आत्मीयतेने बोलले. ते पुण्यातील एक प्रसिद्ध सर्जन आहेत. ते म्हणाले,
“प्रभाकर माझ्यापेक्षा वयाने मोठा. केवळ वयाने ज्येष्ठ म्हणून नव्हे तर एक आदर्श, सालस ज्येष्ठ बंधू व मार्गदर्शक म्हणून त्याचे आम्हा सर्वच भावंडांशी वागणे अतिशय जिव्हाळ्याचे असे. आम्हा सर्वांना तो आदर्श वाटे. त्याच्याप्रमाणे आपण व्हावे असे आम्हास त्यावेळी वाटे यातच आमच्या त्याचेप्रती काय भावना होत्या याची जाणीव होईल. आमच्यासाठी तो एक आयकाॅन होता. आम्ही भावंडे एकत्र आलो म्हणजे, खूप धांगडधिंगा ,मस्ती ,मजा करीत असू. त्यावेळी तो आपले वय व शिक्षण विसरून आमच्या खेळात मनापासून समरस होत असे. त्याचे वागणे, बोलणे नेहमीच सुसंस्कृत, सभ्य, सुसंस्कारीत वाटत असे. आम्हाला अभ्यासात व पुढील ध्येय धोरणे ठरविण्यात तो वेळोवेळी मार्गदर्शन करीत असे. त्यात त्याला मनापासून आनंद होई.”
आपल्या सरळ ,सालस ,हुशार तरी निगर्वी ,जेष्ठभावाला परमेश्वराने असे अल्पायुषी करावे, याबद्दल डॉक्टरांनी खूप खेद व्यक्त केला.
मे महिन्याच्या सुट्टीत ही सर्व भावंडे बोर्डीला आपल्या मावशीकडे (प्रभाकरची आई) येत असत. बोर्डीत प्रभाकरला आपल्या या छोटे कंपनीसाठी काय करू आणि काय दाखऊ असे होऊन जाई. मावशीला आपल्या भाचेकंपनीसाठी, कोणते खाद्यपदार्थ करू आणि किती पाककृतींचा आस्वाद त्यांना देऊ असे होऊन जाई.
त्यांच्या बंगल्यासमोरील समुद्रकिनार्यावर जाऊन वाळूचे किल्ले बनवणे व भरतीच्या लाटांना ते किती प्रतिकार करतात हे पाहणे, हा सर्वांचा आवडता उद्योग असे. एकाद्या सुट्टीत ही भावंडे पुण्याला डॉ.साळुंखे यांच्या घरी येत. तेथेही सर्व जल्लोष होई.
“बोर्डीचा गाव, झोळ कुटुंबीयांचा बंगला, समोरील सुरुच्या बागेची शोभा आणि समुद्राच्या लाटांचा गाज असे दृश्य आजही आपल्या डोळ्यासमोर तरळते आणि प्रभाकरच्या आठवणीने मन गलबलते” असे डॉ. अरुण साळुंखे म्हणाले.
त्याच्या अपघाता संबंधी अधिक माहिती देतांना डॉक्टर साळुंखे म्हणाले ,”दुचाकी रस्त्यावरील विभाजकाला धडकून तो खाली पडला. डोक्याला खूप मार बसला व तशाच अवस्थेत त्याला पुण्यातील ससून इस्पितळात दाखल करण्यात आले . डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे कसोटीचे प्रयत्न केले डॉक्टर साळुंखे स्वतः त्यावेळी जातीने तेथे हजर होते. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत सर्वांनी प्रभाकरला वाचविण्याचे प्रयत्न केले पण शेवटी सर्वांचे प्रयत्न व प्रार्थना फोल ठरल्या .प्रभाकर देवाला प्रिय झाला. डॉक्टरांच्या मनात हे शल्य आजही आहे असे ते म्हणाले.. “तो सर्वांचाचआवडता होता. म्हणूनच असा अकाली गेला असेल काय?.. ,
जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला…”
प्रभाकरचे असे अचानक जाणे सर्व कुटुंबीय व मित्रांना धक्कादायक तर होतेच पण पत्नी सौ.स्नेहलता व दोन लहान मुलांना ही अस्मानी-सुलतानी होती. दोन्ही मुले अत्यंत हुशार व मेहनती निघाली. परिस्थितीशी दोन हात करत ,दोघांनीही उत्तम प्रकारे शिक्षण घेतले. आज दोघेही अमेरिकेत सुस्थितीत जीवन कंठीत आहेत असे मला कळले. स्नेहलता वहिनीशी माझा ‘व्हाट्सअप’ द्वारे संपर्क झाला. त्यांचेकडून काही विशेष माहिती मिळू शकली नाही. त्या लिहितात,
“नमस्कार .मी स्नेहलता प्रभाकर झोळ .सध्या बरेच दिवस झाले मी अमेरिकेत आहे व सध्यातरी भारतात येणे होइल असे वाटत नाही. असो. आपला मेसेज वाचला परंतु ह्यांचा शिकत असतानाच्या आठवणी मला माहिती नाहीत व पूर्वीचा, शालेय जीवनातील फोटो नाही. आमचा विवाह 1967 मध्ये झाला. त्यावेळी हे सर्व धुळे येथे होते व मी कायम पुणे येथे होते. धुळ्याचा परिचय तसा फारसा नव्हता. त्यामुळे पूर्वीचा फोटो व शालेय जीवनातील फोटो अथवा इतर काही माहिती उपलब्ध नाही.
कै प्रभाकर झोळ एक फार मोठ्या दुःखाचा चटका देवून गेले . त्यांच्या स्मृती आठवूनच काही कविता मी केल्या आहेत त्यातीलच एक पाठवत आहे. असो मी जेव्हा भारतात परत येईन त्यावेळी. आपल्याशी संपर्क साधेन.”
निश्चितच, श्रीमती स्नेहलता वहिनींकडून आणि काही आठवणी मिळाल्यास मी त्या निश्चितच या लेखात नंतर अंतर्भूत करीन. सध्या त्यांनी पाठविलेली,आपल्या पतीला संबोधून केलेली, स्वतःची कविता खाली देत आहे.अत्यंत हृदयस्पर्शी आणि एका विरहीणी च्या मनातील भावना आपल्यापर्यंत पोहोचविणा-या अशा ओळी आहेत. ..
श्रीमती स्नेहलता झोळ यांनी आपल्या प्रिय पतीला उद्देशून लिहिलेली स्वहस्ताक्षरातील ही भाऊक कविता.
माझा, प्रभाकर झोळचा शोध संपला!
मात्र श्रीकांत सांब्राणीचा शोध घेण्याचे माझे काम सुरू होते. 2009 मध्ये आमच्या एस. एस. सी .तुकडीच्या सुवर्ण महोत्सवी स्नेहसमारंभानंतर तो अधिक गतीमान झाला. अचानक मला यश मिळाले. ती कथा ही मोठी मनोरंजक आहे. म्हणतात ना A WILL WILL FIND A WAY.. मी जरी अंधारातच तीर मारत होतो. पण मनापासून करत असलेल्या गोष्टीला एक ना एक दिवस यश मिळते हा माझा पहिल्यापासून विश्वास आणि तसेच झाले!
श्रीकांतला मी शाळा सोडल्यानंतर शेवटचा भेटलो ते वर्ष होते 1960.आणि मे महिन्याचा दिवस असावा. मी व माझा मित्र अरूण, सातार्याहून, कॉलेजच्या सुट्टीत, बोर्डीला जाण्यासाठी पुण्याला आलो होतो. पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उभे. होतो कर्मधर्मसंयोगाने त्यावेळी त्याच प्लॅटफॉर्मवर श्रीकांत व त्याचे काही मित्र गप्पा करत ऊभे होते. आम्ही दोघांनी जवळ जाऊन त्या सर्वांना हाय हॅलो केले. पाच एक मिनिटे औपचारिक गप्पा केल्या. आम्हाला मुंबईची गाडी पकडावयाची असल्याने, दुसर्या प्लॅटफॉर्मवर जायचे होते. त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघून गेलो. बस्स, त्यानंतर कधीच आमची प्रत्यक्ष भेट झाली नाही वा कोणामार्फत काही हकीकत वा ख्याली खुशाली कळली नाही.
मागे सांगितल्याप्रमाणे 2009 साली आम्ही श्रीकांतचा पत्ता शोधण्याचा खूप प्रयत्न केला. त्याचा शारदाश्रम मधील खास मित्र सुरेश भाटलेकर (सध्या डॉ. भाटलेकर) यानेही त्याच्या परिचयाच्या लोकांमार्फत शिकस्त केली . मात्र काही उपयोग झाला नाही. मी स्वस्थ बसलो नव्हतो. त्यानंतरही माझे प्रयत्न चालू होते.
या कम्प्युटर युगात इंटरनेट या माध्यमावर खरेतर कोणतीही माहिती उपलब्ध असते. तेथेही मी प्रयत्न केले. मात्र माझ्या संगणक ज्ञानाला निश्चितच मर्यादा आहेत. म्हणून मी माझा मुलगा श्रीदत्त याची मदत घेण्याचे ठरविले. तो अमेरिकेत एक सॉफ्टवेअर तज्ञ म्हणून गेली अनेक वर्षे तेथील कंपन्यांना सल्ले (Consultations), देत असतो. तिथून काहीतरी धागा मिळेल आणि त्या धाग्याने मला “सुताने स्वर्ग गाठल्याचा”, आनंद मिळेल अशी खात्री होती. आणि माझा अंदाज खरा ठरला. त्याच्या नेहमीच्या कामाच्या धबडग्यात, वेळ काढून, महिन्याभरात त्याने मला एक व्हिडीओ पाठविला. त्या व्हिडिओने मला अत्यानंद झाला कारण मला माझा मित्र अनेक वर्षांनी फोटोमध्ये तरी दिसला होता. त्या छोट्या व्हिडिओमध्ये, INDIAN INSTITUTE OF RURAL MANAGEMENT, ANAND.( IRMA), या जगप्रसद्ध संस्थेशी तो निगडित असून त्याचे मार्गदर्शन संस्थेला वेळोवेळी मिळत असते एवढे कळले. मात्र त्याचा कोणताच संपर्काचा पत्ता ई-मेल, अथवा मोबाईल नंबर तेथे न मिळाल्याने काम अपुरेच राहिले.
त्या छोट्या चित्रफीती मध्ये दसणारा डॉ. श्रीकांत खूपच बदलला होता. सहाजिक आहे, खूप वर्षानंतर हे दर्शन होत होते. थोडी स्थूलता आली होती, ऊरलेले केस पांढरे झाले होते, व आवाजही बदलला होता. मात्र ती व्यक्ती, नक्कीच आमचा जुना मित्र श्रीकांतच होता एवढी माझी खात्री पटली.
ही माहिती मी मित्रवर्य डॉ. भाटलेकर यांना दिली. त्यांनी बडोद्यामधील काही मित्रांना फोन करून IRMA शी संपर्क करून काही निश्चित धागादोरा मिळतो का,असे प्रयत्न केले. आम्हाला संपर्क साधन मिळू शकले नाही. एव्हरेस्ट शिखर अगदी शेवटच्या टप्प्यात आले होते खरे. मात्र अजून माथा गाठावयाचा होता.
काही दिवस असेच गेले. सुमारे वर्षापूर्वी, जानेवारी 2021 मधील एके सुदिनी बोर्डी च्या बी .एन .मेहता कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सौ. प्रि.अंजली पटवर्धन कुलकर्णी, यांची कॉलेजमध्ये ,कामानिमित्त भेट झाली. डॉ. अंजली यांना मी बोलता बोलता, सहज बोर्डी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्याबद्दल, विशेषतः, माझे दोन सहाध्यायी, प्रभाकर झोळ व श्रीकांत सांब्राणी यांची माहिती दिली. श्रीकांतशी आमचा संपर्क अजून झालेला नाही असे सांगितले. ते IRMA शी संबंधीत आहेत अशी टीपही दिली. डॉ.अंजली भारतातील अनेक महाविद्यालये व शिक्षण संस्थाशी खूप जवळून संबंधित आहेत. व्यवसायानिमित्त व्याख्याने, संमेलने इ. करिता भारतभर त्यांचे दौरे सुरू असतात. मॅडमनी मला, “निश्चिंत रहा मी हे काम करते”, असे आत्मविश्वासपूर्वक आश्वासन दिले. मीही निश्चिंत झालो.
डॉ.कुलकर्णी यांनी मला आश्वासन तर दिले. मात्र मला थोडी शंका ही होती. गेली अनेक वर्षे आमचे प्रयत्न अपुरे पडले होते. आम्हाला यश मिळाले नव्हते. मग मॅडम अचानक कसा शोध घेणार? पण मॅडम कुलकर्णी यांच्या चिकाटीचा व घेतलेल्या कामात झोकून देण्याच्या वृत्तीचाअनुभव मी घेतला होता.
यावर्षीच्या, फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी मला कुलकर्णी मॅडम यांचा फोन आला. मला एक मोबाईल नंबर त्यांनी दिला व म्हणाल्या, “हा आपल्या मित्रांचा फोन नंबर आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगते. या नंबरवर फोन लावा आणि काय झाले ते मला सांगा”.
मला खूप आनंद झाला. थोडा घाबरलोही. कारण आता मला प्रत्यक्ष श्रीकांत सांब्राणीशी अनेक वर्षांच्या कालावधीनंतर बोलायचे होते. एव्हरेस्ट शिखरावर पोहोचलो होतो, मात्र उभे राहायला पाय लटपटत होते. मराठीतून बोलावे की इंग्रजीतून? सर म्हणून संबोधावे की डॉक्टर म्हणून? माझी ओळख पटेल की त्यासाठीही प्रयत्न करावे लागतील? श्रीकांत आता जुना वर्गमित्र श्रीकांत नाही, कर्तृत्ववान महान व्यक्ती झाला आहे! त्याला आता त्या जुन्या दिवसांच्या आठवणी असतील का? असे अनेक प्रश्न संदेह, मनात येऊ लागले. हातात ज्या फोन नंबर साठी एवढे वर्ष धडपड केली ,तो आता मिळाला असतांना फोन करू की नको, आत्ता करू की उद्या सावकाश करू, अशा भ्रमात पडलो होतो. पण मनाचा हिय्या केला. मी फोन लावला. आश्चर्य म्हणजे पटकन पलीकडून इंग्रजीतून प्रतिसाद मिळाला,
“hello I am Shreekant Sambrani here, who is there?”
मी म्हणालो,” D W Raut, here from Bordi!”
आणि जादू झाली… पुढील सर्व संभाषण मराठीतून, निःसंकोचपणे व्यवस्थित झाले. बोर्डी नावाची ही “यक्षिणीची कांडी” मी अनेक वेळेला अशा माझ्या संभ्रमित अवस्थेत वापरलेली आहे व मला जादुई परिणाम मिळाले आहेत . मी त्याला ‘डॉक्टर’ असे संबोधित होतो. त्याने त्वरीत, “नो डॉक्टर बिझीनेस,अरे आपण 60 वर्षांपूर्वीपासूनचे मित्र आहोत!” असे सांगून आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला. माझ्या मनावरील ताण ही खूप हलका झाला. मोबाईल फोन नंबर कसा मिळविला, जुने काही मित्र कुठे आहेत माझा मुक्काम सध्या कोठे अशा काही जुजबी गोष्टीवर चर्चा झाली व पुन्हा कधीतरी सावकाश बोलूया या आश्वासनाने ते पहिले संभाषण संपले. माझा त्याच्याविषयीचा असलेला आदर अधिकच दुणावला. मी स्वतःलाच धन्य मानले!
डॉ.अंजली मॅडम व मित्र प्रि. प्रभाकर यांनाही मी आनंद वार्ता सांगितली. त्यांनाही खूप समाधान झाले, आनंद वाटला. प्रभाकर राऊत यांनी त्वरीत, “श्रीकांतला कॉलेजच्या एखाद्या विशेष समारंभासाठी आमंत्रण देऊन, मुख्य अतिथी म्हणून बोलऊया!” अशी इच्छा प्रदर्शित केली. माझ्या पुढील संभाषणात मी श्रीकांतला तशी विनंती केली. त्यानेही ती मोठ्या आनंदाने स्वीकारली आहे. मात्र ,”सध्याचे कोवीड महामारी चे संकट थोडे निवळू द्या. कॉलेज वर्गही व्यवस्थित सुरू होऊ द्या, मी नक्कीच येईन”. असे आश्वासनही त्याच्याकडून मिळविले आहे. श्रीकांतला येथे बोलवण्यात आमचाच स्वार्थ अधिक आहे. कारण तो आज ग्रामीण, सहकारी उद्योग व्यवस्थापन, ग्रामीण अर्थ व्यवस्था, गरीबी व बेरोजगारी निर्मुलन, ई. उपक्रम राबविण्या करीता, भारत व जगातील अनेक देशांना सल्ले देत असतो. त्याबाबत विपुल लिखाण ही केलेले आहे . खाली थोडक्यात दिलेल्या जीवनाच्या आगदी संक्षिप्त आकृतीबंधा वरून (Short Bio Data) कामाची व्याप्ती व महत्त्व कळावे. श्रीकांतच्या बोर्डी भेटीचा योग लवकरात लवकर येउदे. प्रत्यक्ष त्याच्याशी संभाषण करण्याचे भाग्य आम्हास लवकर मिळो अशी प्रार्थना करणे एवढेच आज तरी आमच्या हातात आहे.
फोनवरील संभाषणा दरम्यान एक दुःखद बातमी ही मला त्याचेकडूनच कळली. त्याची सौभाग्यवती सौ रिटा, यांचे काही महिन्यांपूर्वीच दुःखद निधन झाले आहे. हा खूपच मोठा आघात आहे. हा नियतीचा कठोर घाव आहे. ज्या सहचारिणीची आजवर आयुष्यात तोलामोलाची साथ मिळाली ती,अशी अचानक सोडून गेल्यामुळे कोणालाही सावरणे खरेच खूप कठीण. त्याच्याशी बोलताना, हे अटळ वास्तव त्याने खूप सामंजस्य व स्थितप्रज्ञतेने घेतले आहे असे वाटले. माझ्या विनंतीवरून त्याने एक उभयतांचा व दुसरा सौ.रिटा यांचा असे दोन फोटो पाठविले आहेत. सौ.रिटाचा फोटो आजारीपणातील आहे. गंभीर आजाराच्या त्या कसोटीच्या दिवसात देखील त्यांचा चेहरा किती प्रफुल्लित व प्रसन्न आहे हे पाहून आपल्याला खरेच आश्चर्य वाटते.
मला पाठवलेली,आपल्या उज्वल, दैदिप्यमान शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीची, त्यानेच दिलेली माहिती मी इंग्रजीत तशीच खाली देतो आहे. माझ्या भाषांतरात, त्याच्या उज्ज्वल कामाला कोठे ही ठिगळ लागू नये म्हणून मी ही काळजी घेतो आहे.
Shreekant Sambrani took his B Tech (Chem Engg) degree from IIT Bombay..
Subsequently, he was awarded M S in Chemical Engineering by Northwestern University.
Ph D in economics by Cornell University.
After brief teaching assignments in the United States, he joined the faculty of the Centre for Management in Agriculture at Indian Institute of Management, Ahmedabad, in 1971.
Subsequently, he was the Chief of the Research Bureau of the Economic Times.
He was the Founder-Director of the new Institute of Rural Management at Anand.
Starting 1982 and until 2011, he headed his own management research and consultancy organisation.
He has extensively researched and published on the question of rural enterprise, poverty and unemployment in India, specific development programs aimed at increasing value-adding and income-generating possibilities in rural areas.
He has advised leading Indian and international companies on a variety of issues.
He has worked extensively on strategies in both pre- and post-liberalisation eras.
He has contributed to organisations attaining a level of comfort in the globalised environment, by acting as an effective interface between them and the new opportunities available.
या माहितीचा मराठी गोषवारा खालील प्रमाणे:
आय आय टी मुंबई येथून बी. टेक. केमिकल इंजीनियरिंग ,मधील पदवी.
अमेरिकेतील नाॅर्थवेस्टन युनिव्हर्सिटीमधून एम एस.
कॉर्नेल विद्यापीठातून, अर्थशास्त्र विषयात पीएचडी.
काही काल अमेरिकेत प्राध्यापकी.
भारतात आल्यावर (1971),इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद( I I M Ahmadabad) या जगप्रसिद्ध स्वायत्त संस्थेत, ‘शेती व्यवस्थापन’ या विभागात प्राध्यापक म्हणून रुजू.
‘इकॉनोमिक टाइम्स’ या दैनिक वर्तमानपत्रात, संशोधन प्रभागाचे मुख्य म्हणून काम.
आय आर एम ए (IRMA) आणंद, या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेमध्ये योगदान व तेथे निर्देशक (Director).
1982ते 2011 स्वतःच्या व्यवस्थापन सल्लागार कंपनीची स्थापना व कंपनीचे प्रमुख म्हणून काम. ग्रामीण उद्योग, गरिबी,आणि बेरोजगारी यासंबंधी मूलभूत स्वरूपात संशोधन व लिखाण. अनेक भारतीय व जागतिक नियतकालिकांतून लेखन प्रकाशित. विशेषतः ग्रामीण सहकारी उद्योगातील उत्पन्न, अल्प संसाधनाचा वापर करून कसे वाढविता येईल यावर खास संशोधन केले आहे.
अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या व्यावसायिक समस्यावर सल्ला दिला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेतील धोरणात्मक गोष्टी , उदारीकरणापूर्वी व उदारीकरणानंतर, यावर विपुल कार्य व लिखाण केले आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या ऊदारीकरण,वैश्वीकरणानंतर उपलब्ध असलेल्या, नवीन संधींचा उपयोग करून, आपल्या व्यवस्थापनात त्याचा कुशलतेने कसा उपयोग करता येईल व नफ्यात कशी वाढ करता येईल यावर अनेक कंपन्यांसाठी उपयुक्त सल्ले दिले आहेत.)
श्रीकांतच्या मनाचा मोठेपणा म्हणजे म्हणजे आपल्या महान कामाची अशी अगदी थोडक्यात माहिती दिल्यावर ,शेवटी लिहिले आहे,
“The attached word file has a brief sketch of what I have wasted my time on. Please feel free to use all or any part of it as you may see fit.”
निगर्वीता व शालीनता यालाच म्हणतात.
फोनवर बोलता बोलता त्याने मला त्याच्या शाळेतील अभ्यासाची पद्धत व स्वतःविषयी असलेला थोडा ज्यादाआत्मविश्वास याबद्दल मोकळेपणाने सांगितले. “बोर्डी शाळेत खरोखरच मला अभ्यास करावा असे वाटले नाही. स्पर्धा नव्हती. मात्र पुढे फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश केल्यावर आपल्या एवढी हुशार मुले असू शकतात याची जाणीव झाली. थोडा अभ्यासास लागलो. पुढे आय आय टी त गेल्यावर मात्र माझ्याहून हुशार मुलेही आहेत याची जाणीव झाली. भ्रम दूर झाले आणि निश्चितच मी अभ्यास केला. त्याच्या या स्पष्टोक्क्तीचे मला कौतुक वाटले. आणि असे पाय असे जमिनीवर असल्याशिवाय बुद्धिवंताला देखील अशी प्रचंड कामे करता येत नाहीत याचा प्रत्यय आला.
तो, IRMA,(INDIAN INSTITUTE OF RURAL MANAGEMENT, ANAND), या संस्थेचा पहिला संस्थापक, निर्देशक(Director). ग्रामीण सहकार क्षेत्रातील व्यवस्थापन गुरू, जग प्रसिद्ध डॉ .व्हर्गीस कुरियन यांच्या कल्पनेतील ही संस्था मूर्त स्वरूपात उभी करण्यासाठी, प्रारंभीचा सहभाग डॉक्टर श्रीकांत सांब्राणी यांचा! पद्मविभूषण डॉ.कुरीयन म्हणजे भारतातील धवल क्रांतीचे प्रणेते. सर्व जगात त्यांचे नाव रोशन आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF),चे संस्थापक अध्यक्ष, तसेच वर्ल्ड फूड प्राइज (WORLD FOOD PRIZE) व रेमन मॅगसेसे पुरस्कार अशा जागतीक सन्मानांचे मानकरी .या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबरोबर आयुष्यात काम करायची संधी मिळण्या साठी तेवढीच बुद्धिमत्तेची उंची हवी. अहमदाबाद येथील I I M,(INDIAN INSTITUTE OF MANAGEMENT) संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी भारतातल्या बुद्धीमंत विद्यार्थ्यांची चढाओढ लागते. तेथे प्राध्यापक म्हणून काम करण्यास किती अफाट कर्तृत्व लागत असेल? या एक दोन गोष्टीवरून श्रीकांतच्या प्रतिभेची उंची व कर्तृत्वाची प्रचिती यावी.
आज त्याला आपल्या दिवंगत पत्नीची सौ.रिटाची ऊणीव प्रकर्षाने भासत असणार. 5फेब्रुवारी 2020 रोजी तिचे दुःखद निधन झाले. नोव्हेंबर 2019 मध्ये ‘ओवेरियन कॅन्सर’ ची बाधा झाल्याचे समजले. तो दिवाळीचा दिवस होता. औषधोपचार व मनाचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे सौ.रिटा यांच्या प्रकृतीत सन 2020, च्या उत्तरार्धापर्यंत खूपच सुधार झाला. कॅन्सर आता, बाय-बाय करणार असे वाटत असतानाच, आजाराने पुन्हा उचल खाल्ली. श्रीकांतची प्रिय पत्नी त्याला 5 फेब्रुवारी,2021 रोजी, एवढ्या वर्षांची साथसंगत सोडून, देवाघरी गेली. त्यात समाधान एवढेच, जास्त दिवस खाटेत पडून रहावे लागले नाही. शेवटपर्यंत पूर्ण शुद्धीत होती.जाताना अंतीम क्षणी आपल्या कर्तृत्ववान प्रिय पतीचा हात हातात घेऊन, स्वतःच्या घरातच तिने जगाचा निरोप घेतला.
आज श्रीकांतला सौभाग्यवती रिटा ची साथ नाही.. निश्चितच आज त्याचेकडे सल्ले मागण्यासाठी, भारतातील व जगातील अनेक कंपन्या व संस्था येतच असतील. कार्यबाहुल्यामुळे वेळ अपुरा पडत असेल. पण जिने आयुष्यभर साथ दिली, त्या अर्धांगिनीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येऊ शकणार नाही. विरहयातना मानवी मनाला निश्चितच दुःखी करतात, व्यथित करतात.त्याचबरोबर संवेदनाशील व्यक्तिमत्वाला अशावेळी, जगाच्या मायापाशापासून दूर राहण्याची क्षमताही देतात . हा यातील सकारात्मक विचार आहे. निश्चितपणे श्रीकांत हा त्या सकारात्मक मुशीत घडलेला माणूस आहे. श्रीकांतला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. प्रत्यक्ष जेव्हा भेट होईल तेव्हा सर्व गोष्टींचा जास्त उलगडा होईल. तोपर्यंत मात्र आमच्या हाती आहे आतुरतेने त्याच्या बोर्डी आगमनाची वाट पाहणे.
मी भाग्यवान. मला शालेय जीवनात प्रभाकर ,श्रीकांत सारखे, हुशार कर्तृत्ववान मित्र भेटले. जीवनाच्या या संधिप्रकाशाच्या कालखंडात सर्वांची आठवण निश्चितच होते. विशेषकरून श्रीकांत व प्रभाकर या दोघांची आठवण मला सतत होती. कारण त्यांचे शालेय कर्तृत्व तसेच होते. त्यांच्यापुढे निश्चितच उज्ज्वल भविष्यकाळ आहे अशी माझी त्यावेळी खात्री होती. आणि म्हणून, ते आत्ता काय करत असतील, कोठे असतील, आपल्या यशाची किती व कोणती शिखरे त्यांनी पादाक्रांत केली हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती? त्या कुतूहलापोटी केलेल्या प्रामाणिक धडपडीचा मागोवा या लेखात घेतला. दुर्दैवाने मित्रवर्य प्रभाकर आम्हाला सोडून, परमेश्वराला प्रिय झाला आहे. एक सुंदर ऊमलते फुल पूर्ण उमलण्याआधीच कोमेजले. त्याच्याशी आता कधीच संपर्क होणार नाही, याची देही याची डोळा तो दिसणार नाही. डॉ. मंदा खांडगे, डॉ. साळुंखे, श्री प्रमोद झोळ, श्रीमती स्नेहलता झोळ यांचे सहकार्य मिळाले म्हणून त्याची एवढी माहिती व काही फोटो मिळाले. प्रभाकरची स्मृति आम्हा सर्वांच्या अंतकरणात कायमचीच राहणार.
श्रीकांतचा संपर्क उशिरा का असेना पण होऊ शकला. श्रीदत्तची सुरुवातीची मदत व डॉ. अंजली यांनी दिलेली पक्की माहीती मोलाची. त्यांचे श्रेय मोठे.श्रीकांतच्या अफाट कर्तृत्वाची जाणीव झाली. भविष्यातील ज्या दिवशी साक्षात डॉक्टर श्रीकांत सांब्राणी यांचे मुखातून त्यांची यशोगाथा आम्ही ऐकू व त्या कर्तृत्वाला सलाम करू,त्याच दिवशी खऱ्या अर्थाने माझ्या कामाची सांगता होईल. तोपर्यंत त्यांच्याशी फोनवर बोलून संपर्क करीत राहणे व त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहणे हेच आमच्या हातात आहे. आमच्या या मित्रालाही त्याची जाणीव आहे.
बोर्डी शाळेतील माझे सतत संपर्कात असलेल्या दोन मित्रांची उल्लेख केल्याशिवाय या लेखाला पूर्तता येणार नाही.खरे त्यांच्याही कर्तृत्वाचा मी थोडा ओझरता उल्लेख करतो.
सहाध्यायी कै. मोहन बारी असेच हुशार व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. भारतातील एक मोठा शेती शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी नाव कमावले. शेती विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन पुढील अभ्यासक्रमासाठी ते मनिला येथील भात संशोधन संस्थेत (Rice Research Institute), विशेष शिक्षण घेऊन भारतात परतले. अखेरपर्यंत त्यांनी कोसबाड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कोसबाड येथील ,कृषी विद्यालय व संशोधन केंद्रात मोठे योगदान दिले. राहुरी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. हरिश्चंद्र पाटील व नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. जयंतराव पाटील यांच्यानंतर त्यांनीच या कामाची धुरा अखेरपर्यंत वाहिली. दुर्दैवाने काही वर्षांपूर्वीचा त्याचे दुःखद निधन झाले.
दुसरे सहाध्यायी प्रि.प्रभाकर राऊत यांनी देखील आपल्या, पदव्युत्तर शिक्षणक्रमानंतर गोखले एज्युकेशन संस्थेच्या सेवेला वाहून घेतले. गेली अनेक वर्षे संस्थेच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळून बोर्डी हायस्कूलचे प्रिन्सिपल म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कामाची गुणवत्ता व क्षमता ओळखून संस्थेने त्यांना निवृत्तीनंतर, पालघर जिल्हा विभागीय सचिव ( Zonal Secretary),म्हणून महत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या या कारकिर्दीतच बोर्डीमध्ये, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग पॉलिटेक्निक, व आता होऊ घातलेले मरीन इंजीनियरिंग कॉलेज अशा विविध विषयांच्या विद्याशाखा सुरू झाल्या आहेत, होत आहेत. आज ऐंशीच्या घरात पोहचून देखील, या वाढत्या कामाचा व्याप ते सहजगत्या पेलत आहेत. माझ्या या लिखाण कामांमध्ये त्यांची प्रेरणा व मदत सतत असते. त्यांच्याही कार्याला सलाम.
खऱ्या मैत्रीची एक सोपी व्याख्याआहे. आठवण यावी असे काही नाही,रोज भेट व्हावी असं ही काही नाही. एवढंच कशाला रोज बोलणं पण नाही. तरी मी तुम्हाला विसरणार नाही,आणि तुम्हाला याची जाणीव असणे हीच झाली मैत्री. शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं हे महत्वाचं! ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण ओळखलं. माझ्या सर्व मित्रांना या निमित्ताने, मनापासून नमस्कार.
माझे मानस सफल करण्यात ज्यांनी सहकार्य दिले त्या सर्वांचे, डॉ. मंदाताई खांडगे,डॉ. साळुंखे ,श्री प्रमोद झोळ, श्रीमती स्नेहलता झोळ, श्रीदत्त, डॉ.सौ.अंजली कुलकर्णी, सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्रीकांत चे आभार मानणे त्याला आवडणार नाही. दिग्गज मित्राला भेटण्याची आतुरता आता लागून राहिली आहे तो दिवस ही परमेश्वर लवकरच आणील अशी अपेक्षा आहे तशी प्रार्थना आहे . कारण,
प्रेम, स्नेह, आदर, जिव्हाळा
हे शब्द आता फ़क्त शब्द कोशातच सापडतात
तरीही जुनी मित्र मंडळी भेटली
की तेवढ्या पुरते जीवंत होतात
म्हणून माझ्या सर्व सर्व जुन्या स्नेह्यांना, शाळूसोबत्यांना मनःपूर्वक नमस्कार…नमस्कार… नमस्कार
दिगंबर वा.राऊत.
माजी, डे. जनरल मॅनेजर (हिंदुस्थान पेट्रोलियम, आंतरराष्ट्रीय विक्री)
“वामनाई”,घोलवड
खूप छान लेख, सहज सुंदर लेखनशैली
Even at the cost of being immodest, I must say this is excellent. I compliment Digambar on his easy and fluid writing and humility. I, too, am greatly looking forward to visiting Bordi.
One last memory. Rita and I did stop in Bordi in the early 1980s (possibly 1981 or 1982). We were hosted by Save Sir who was still residing at Sharadashram. We had lunch with him and a delightful walk on the Bordi beach. Those two hours were well-etched in both our memories. Later on, I found that Mr Jahangir Parabia, now a very major transport contractor and fleet owner, was also a student at Bordi, one year behind us and was a resident of the Parsi Hostel. We made many plans to visit Bordi, but unfortunately, none of them materialised! I hope I can visit later this year.
Wonderful reminiscences narrated poignantly.
Thank u Sir.
लेख उत्तम झाला आहे.. इतरांनाही पाठवते आहे. तुमची लेखणी वाचन हे अतिशय चांगलं आहे. त्यामुळेच तुम्ही इतकं चांगलं लेखन करू शकत आहात .सहकार्य तर सगळ्यांचाच मिळतं पण ते कसदार शैलीत आणि अतिशय वेचक शब्दात गुंफणं अतिशय महत्त्वाचं .पुढच्या लेखासाठी शुभेच्छा.
Thank U ma,m.
जुन्या आठवणींना ऊजाळा देणयाचा स्तुत्य प्रयत्न .वरील सर्वांना मी पाहिले आहे. मी जेव्हा ईयतता आठवीत प्रवेश घेतला(१९५८ -१९५९) त्याचवेळी हे सर्व जण ११वी म्हणजे शेवटच्या वर्षांत शिकत होते. श्रीकांत अतिशय किरकोळ देहयषटीचा पण बुद्धीने तल्लख होता. वक्तृत्व स्पर्धेतून तो नेहमीच पुढे असायचा. झोळ अतिशय भिडसत पण नम्र होता. व्हालीबॅाल खेळण्यासाठी अधूनमधून तो गावात येत असे. प्रभाकर राऊत व मोहन बारी हे येथील स्थानिक असल्याने त्यांचा पुढे आजतागायत संपर्क राहिला. मोहन बारींचे काही वर्षा पूर्वीच सोडून गेला. शेवटी एकच महणावेसे वाटते, “ कसे कोठूनी येतो आपण कसे न कळता जातो गुंतून क्षणांत हसतो क्षणांत रूसतो , कधी आतूर कधी कातर। खेळ जुना हा युगायुगाचा रोज नव्याने खेळायाचा, डाव रंगता मनासारखा कसली हुरहुर कसले काहूर !”
वर्ग मित्रांच्या सहवासात राहून आपल्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या मित्रांची आठवण बंधूंनी अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केली आहे. किती छान असेल त्यांचा तो काळ. स्पर्धा होती पण निकोप. म्हणून तर मैत्री असावी तर अशी हे ह्या लेखातून स्पष्ट होते.. मित्रांच्या आठवणी सांगताना त्यांच्या विचारांची, वर्तनाची , सुद्धा ओळख झाली . मनापासून आवड असणाऱ्या मित्रांची माहिती म्हणूनच भावली…. खूप छान लेखन झाले आहे.
खूप छान लेख! मनापासून अभिनंदन!
लेख आवडला.शालेय सोबत्यांचे कौतुक मनापासून करण्यारा माणसाच्या मनाचे पण तेवढेच कौतुक करावेसे वाटले.तुमच्या मित्रांना आणि तुम्हाला पण सलाम.
*अतीव सुंदर लेखन शैली, मनोहर शालेय जीवनकाल, गंमती-जिव्हाळ्याच्या मैत्री बरोबरच सर्वांगीण प्रगतीच्या स्पर्धेची संस्कृति…! …विशेषतः त्या काळचे बोर्डीतील समाज सुधारकांच्या कार्याने भारलेले वातावरण…!!! खूप सखोल समाधानाचा अनुभव लाभला…!!!*
मनापासूनी सगेसोबती शोधले
ओघवती भाषेने वर्णन त्याचे केले
वाचतांना औत्सुक वाटे फार
शोधून मिळाला का हो मित्रपरिवार!
मैत्र भेटता जीवाशीवाचे
सांगता आपण बोल अनुभवाचे
आपुलाच वाटे मज हा
शोध मित्र- मैत्रीणीं चा
***
तुमचेच शब्द पुन्ह : पुन्हा वाचत बसले –
खऱ्या मैत्रीची सोपी व्याख्या
आठवण यावी असे काही नाही,
रोज भेट व्हावी असं ही नाही
एवढंच कशाला,
रोज बोलणं पण नाही
तरी मी तुम्हाला विसरणार नाही,
फक्त तुम्हाला याची जाणीव असणे
हीच झाली मैत्री.
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या
तरी गाठी बसणं हे महत्वाचं!
ज्यांनी हे जाणलं त्यांनी
माणसातलं माणूसपण ओळखलं!
***
शालेय जीवनातील मित्रांचा मनापासून घेतलेल्या शोधाचे फलस्वरूप मित्रांची भेट होणे यासारखा आनंद नाही .
नेहमीप्रमाणे तुमच्या ओघवत्या भाषेत जुन्या मित्रांचे हृद्य वर्णन वाचताना सर्व चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. खरं म्हणजे असे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येत असतात पण ते समर्पक शब्दात रेखाटणे हे चित्रकलेइतकेच कसब आहे. तुमचा तो हातखंडा आहे. धन्यवाद.
लेख वाचनीय आणि उत्तम झाला आहे. लेख वाचत असताना एखादा चित्रपट पाहिल्याचा भास झाला. सर आपली लेखन शैली खूप छान, ओघवी आहे.
असेच लेखन करीत रहा, पुस्तक रूपात प्रकाशित करा. खूप खूप शुभेच्छा. ?
लेख आवडला.कर्तुत्व वान मित्रांचे भरभरून कौतुक करणारा तुमचा सारखा मित्र वेगळाच. असेच लिहित राहा, वाचायलाही मजा येते
अतिशय सुंदर लेख! जुन्या आठवणीनाही उजाळा मिळाला.श्रीकांत सांब्राणी आणि प्रभाकर झोळ ही नावे माझे थोरले बंधू कै.अरूण सावे ह्यांच्या कडून नेहमी ऐकल्याचे आठवते.प्रभाकर झोळांचा धाकटा बंधू प्रमोद झोळ हा माझा वर्गबंधू.प्राथमिक शाळेत असतांना आमचे गुरुजी झोळसाहेबांच्या घरी लहान मुलांसाठी असलेले रेडिओवरचे कार्यक्रम ऐकायला नेहमी घेऊन जायचे हे पण आठवले.कवीवर्य ग.ह.पाटील हे प्रमोदचे मामा हे त्याच्या कडूनच आम्हाला कळले होते. प्रि.प्रभाकर राऊत सर आपल्या गावचेच असल्याने त्यांना तर अगदी लहानपणापासूनच मी ओळखतो.तलासरी हायस्कूल मध्ये एक वर्ष शिक्षक असतांना श्री.बारींशी पण स॔बंध आला होता. ???
संपूर्ण लेख वाचला.
पुणे हे जसे विद्येचे माहेर घर समजले जाते तद्वत बोर्डी हे ही विद्यार्जना साठी प्रसिद्ध होते.
आपल्या 1959 सालाच्या बॅच प्रमाणे बोर्डी अनेकांना विद्या विभूषित केले.
डॉ. श्रीकांत आणि प्रभाकर ह्यांच्या बुद्धीमत्तेला आणि मेहनतीला सलाम.
मला नमूद करायला आनंद वाटतो की त्यांच्याच पंक्तीत आमचे दिगंबर भाई ही होते.
तुमची लिखाण शैली कोणत्याही प्रतिथयश लेखकाच्या तोडीची आहे.
ओघवते आणि उत्कंठावर्धक लेखन झाले आहे. अभिनंदन.
मला हा सुंदर लेख वाचायला पाठवल्या बद्दल धन्यवाद.
असेच लिहत रहा.
परमेश्वर आपणास दीर्घायुरारोग्य देवो.
Real friends in your life.
Saute them from my own heart.
To get such friends we need luck which you have got
in your precious life.
Can not forget these events in my life too of your friends. –
From Narendra Raut
नमस्कार श्री. दिगंबर राऊत. आपण पाठविलेले संदेश “ माझा शालेय सोबती, प्रभाकर व श्रीकांत” लक्षपूर्वक वाचला. मनाला भावला. सद्य परिस्थितीत अशी माणसं भेटणे म्हणजे भाग्य लागते. सर्व तुम्ही अनुभवल आहे हे वाचुन मनाला फार आनंद झाला. तुम्ही सुद्धा चांगले विचारवंत, बुद्धीमान , उत्तम लेखक आणि मुद्देसूद भाषण करता हे आपल्या एकत्र सहवासाने मी अनुभवलं आहे. ही एक दैवी शक्ति व देणगी आहे. आणि ती तुम्ही वडलोपार्जित जोपासली आहे. देव तुमचं भलं करो. अशी मी साता समुद्रा पलिकडुन ईश्वर चरणी मनःपूर्वक प्रार्थना करतो.
शुभेचछुक, स्नेही व हितचिंतक,
वसंत हरिभाऊ राऊत.
ब्रामप्टन, कॅनडा.
Real friends in your life.
Saute them from my own heart.
To get such friends we need luck which you have gor
in your precious life.
Can not forget these events in my life too of your friends. –
From Narendra Raut
बंधू नी,
बालपणी काळ खुपच चांगल्याप्रकारे मांडला आहे. मित्रांन विषयी माहिती खुप माहिती पूर्ण अणि आदर युक्त लिहिली त. बोर्डी च हेही एक कौतुक!!
?? तुमच्या लिखाणातून खुप काही गोष्टी माहिती नसलेल्या वाचायला मिळतात.
धन्यवाद!!
: संपूर्ण लेख वाचला.
अप्रतिम आहे.
खूपच. सुंदर लेख आहे.
बंधू ची लेखनशैली खूपच छान आहे. यातूनच पुस्तक लिहायला घ्यायला हरकत नाही त्यासाठी आमच्या कडून शुभेच्छा?
सरोज शरद सावे कडून.
Raut saheb too good narrative of prestigious old classmates and humanity and personal belongings. Hats off saheb.I have personally experienced your through knowledge in each and every subject and commend over marathi language.
मा. दिगंबर बंधु एवढे रामायण तुमच्या भांडारात अजून कसेकाय जपून ठेवलेय ? खरोखरच तुमच्या कार्याला सलाम .।
खरोखर खूप सुंदर लिखाण आहे. आपण निघत रहा..
जय वाडवळ .। तुमचा पांडुरंग वर्तक . .
दिगंबर भाईंच्या लिखाणातील हातोटी वादातीत आहे. प्रत्येक व्यक्ती व प्रसंग जिवंत होऊन जातो. मात्र काहीतरी achieve करायचे आहे या विचाराने झपाटलेल्या त्यांच्या ssc वर्ग सोबत्यांच्या आठवणी वाचतानाच मी माझ्या ssc वर्गाशी नकळत तुलना करीत होतो. आम्हा सर्वांचे एकमेव ध्येय होते, ssc पास व्हायचे! त्यामुळे आमच्या शिक्षकांना पण merit वगैरेंची स्वप्न पाहण्याचा आम्ही त्रास नाही दिला.
45 वर्षाने काही मुलांनी पुढाकार घेऊन 1968 बॅच ला एकत्र आणले. मी आणि एक मुलगी फक्त कॉलेज graduation पर्यंत पोहोचलो होतो. (त्यात बंधूंच्या तुटपुंज्या कमाईतून केलेला खर्च मी एक वेळा नापास होऊन वाया घालवला होता!)
भाईंचे लिखाण आवडते त्यापासून स्फूर्ती घेत होतो.
बोर्डीतिल आपले वडील, दानशूर ग्रामस्थ, शिक्षक आणि आता शालेय सोबती या सर्व व्यक्ती वरील आपले लेखन म्हणजे त्यांच्यावरील श्रध्दा, निष्ठा आणि सार्थ अभिमान याचे उत्तम उदाहरण आहे. लेखांतील सर्व व्यक्तीनि स्थानिक समाज आणि राष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी केली आहे. बोर्डीतिल शिक्षण संस्थांची यादी त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
तुमचे लिखाण सुंदर, वेधक आणि बोधक आहे. पुस्तक लिहिण्याचा विचार नक्की करा.
मनापासून अभिनंदन.
लेख खूप छान आहे. शालेय जीवनातील मैत्रीचा एक हळुवार कोपरा मोकळा केला आहे. बालपणीच्या मंतरलेल्या दिवसांची आठवण आपल्याला सुख दुःखात मोठा दिलासा ठरते. शालेय जिवन संपल्यावर सर्वांचे मार्ग भिन्न होतात अनेकांची परत भेट देखील होत नाही. मग आपण ‘ अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती, दोन दिवसांची रंगत संगत दोन दिसांची नाती ‘ असे म्हणुन त्यांना विसरून देखील जातो.
तुम्ही मात्रं आपले दोन मित्र श्री प्रभाकर झोळ आणि श्रीकांत सांबराणी यांना महत् प्रयत्नाने शोधून काढले आणि त्यांच्या महान कार्याने बोर्डीतिल नामांकित व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केले. ???
नेहमी प्रमाणे लेख अतिशय सुंदर आणि वाचनीय आहे. पण तुमच्या कर्तृत्ववान मित्रांएवढेच तुमचेही कौतुक … कारण तुमच्या स्वतःच्या यशाचा आलेखही चढता असताना आपल्या बालपणीच्या मित्रांचे मनापासून कौतुक करणारा आणि त्याहीपुढे जाऊन अभिमानाने सांगणारा विरळाच!
खूप वर्षांपूर्वी मी आण्णद मध्ये असताना ह्या सांबरानी साहेबांबद्दल माहित होते. तेव्हाही त्यांची ओळख अतिशय हुशार, चोख पण शिस्तप्रिय अशी होती. ते बोर्डी स्कूल मधले हे माहित नव्हते. वाचून नवी माहिती मिळाली. धन्यवाद!
मी बोर्डी शाळेची विद्यार्थीनी आहे. ही विद्यार्थ्यांची नावे मी ऐकली आहेत, त्यांना पहिले सुद्धा असावे. पण ते आमच्या पुढे होते. शाळा सोडल्यावर मी बोर्डीला २-३ वेळा गेले असेल. आणि मागच्या ३५ वर्षात तर नाहीच. लेख वाचून बोर्डी परत एकदा पाहण्याची इच्छा झाली.
बोर्डी शाळेचा alumni असेल तर इथे कृपया माहिती द्या. आमच्या वर्गाचा मीलन समारंभ/get-together किंवा इतर काही कार्यक्रम असतील तर सहभागी व्हायला आवडेल.
साहेब,
मी तर तुमचा खूपच ज्युनियर सह कर्मयोगी.
मित्रांविषयी येवढं अप्रूप आसण आणि हे तुमच्या शब्द रचनेतून अनुभवल, सखोल आत्मचरित्रच वाचल्याचा आनंद देऊन गेलं.
आपली लेखणी ही कर्म निष्ठे एवढीच ताठ कण्याची आहे याचा आज साक्षात्कार झाला. अकोट प्रेम आणि असीम आदर असल्यावर, हे सहज जमुन येत.
सर, आणखी खुप वाचायला आवडेल तुमच्याकडून आणि वाट पाहीन..
सा. नमस्कार, तस भेटणं होत नाही, म्हणुन, वेगळं काही नाही….
लेखाची प्रतिक्रीया देण्यास उशीर होतो आहे क्षमस्व . लेख अगदी अप्रतीम आहे .येवढ्या वर्षा नंतर जुन्या शालेय मित्राची नाव लक्षात ठेवून, खूप परिश्रम घेऊन त्याच्याशी सम्पर्क केलास, त्याला काय उपमा देऊ हे समजत नाही.खरंच तुला माझ्या कडून सलाम. तुझ्याकडून अशाच खूप लिखाणाची अपेक्षा करतो. पुन्हा धन्यवाद.
I can talk with a friend
and walk with a friend
and share my umbrella
in the rain.
I can play with a friend
and stay with a friend
and learn with a friend
and explain.
I can eat with a friend
and compete with a friend
and even sometimes
disagree.
I can ride with a friend
and take pride with a friend.
A friend can mean
so much to me!
Very nice article. I have very few friends left from school day. But when I see them, it’s like I become a school kid again!~
मधुर वाणी गोड स्वभाव
विचारांची देवाणघेवाण ही व्हावी
आपली मैत्री अशीच
दिगंत चालावी
एके दिवशी मज आठवला
बालपणीचे गाव
सवंगड्यांचे पुसटसे चेहेरे
अन काहींचे नाव.!
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण!
कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मित्रांचा सहारा होता!!
श्रावणसरीही मित्रा आता
परक्यासारख्या वागतात
ऊनपावसाच्या मतलबी खेळात
आपल्याच डोळ्यातून धावतात!!
मैत्रीच्या या नात्या बद्दल
लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे!
धन्यवाद!!!
अतिशय सुंदर लेख.. आपल्या बरोबरच्या मित्रांबाबत असलेले सार्थ कौतुक आणि अभिमान लेखाच्या जागोजागी जाणवतो.
स्वतः अतिशय प्रज्ञावंत असूनही इतरांचे मोठेपण समाजासमोर आणणे यालाच ‘विज्ञा विनयेन शोभते’ हे सुभाषिताची प्रचिती येते.
एक विनंती आहे आपण या ब्लॉगवर अनेक प्रथितयश व्यक्तींचे सुंदर व्यक्तीचित्रण केले आहे, या सर्व लेखांचे संकलन पुस्तक स्वरुपात सर्वांसमोर आणावे.