“देव तेथेची जाणावा” -आचार्य भिसे गुरुजी [भाग-1]

1971 सालचा तो एप्रील वा मे महिना असावा. संध्याकाळचे साडेपाच, सहा वाजले असतील. मी भायखळा स्टेशनवर लोकल गाडी पकडून दादर व तेथून विलेपार्ले येथे घरी जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभा होतो. नुकतीच नवीन नोकरी लागली असल्यामुळे कामावर जाण्या-येण्याचा वक्तशीरपणा पाळावा लागत होता. पार्ले, अंधेरी ते माझगाव, व्हाया भायखळा हे रोज दिव्य करावे लागत होते. माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही जेव्हा, एक खूप परिचित, वृद्ध व्यक्ती लगबगीने, तीच लोकलगाडी पकडण्यासाठी, येताना पाहिली. ती व्यक्ती मला ओळखत नव्हती. मी त्यांना, केवळ ओळखतच नव्हतो, तर माझ्यासाठी ते एक देवतुल्य व्यक्तिमत्व होते! मला खात्री होती, ही व्यक्तीदेखील आता माझ्या बरोबर पहिल्या वर्गाच्या डब्यात बसेल. पण मला आश्चर्याचा  धक्का बसला… ती व्यक्ती पहिल्या वर्गाच्या डब्यासमोर ऊभी न रहाता, दुसऱ्या वर्गाकडे गेली. मी देखील  त्यांच्या मागे जाऊन उभा राहिलो. थोड्याच वेळात गाडी आली. नेहमीप्रमाणे उतरणारे आणि चढणारे यांचा एकच गलका सुरू झाला. त्या व्यक्तीने त्याही परिस्थितीत दुसऱ्या वर्गाच्या त्या डब्यात कसाबसा प्रवेश मिळविला. मी देखील पाठोपाठच, अगदी जेमतेम त्याच डब्यात प्रवेश मिळविला. व्यक्तीचे वय व शुभ्र खादीचा साधा पोशाख पाहून एका भल्या माणसाने त्यांना आपली ‘चौथी जागा’ बसावयास देऊ केली, व स्वतः उभा राहिला. मात्र ह्या वृद्धाने नम्रपणे ,बसण्यास नकार देऊन,” मला  पुढच्या स्टेशनवर उतरावयाचे आहे ,आपणच बसा”,असे हळूवारपणे सांगत,  खिशातून रुमाल काढून, चेहरा पुसत ते गर्दीत  उभेच राहिले. मलाही  दादरला उतरायचे होते. आजूबाजूची बरीच माणसे त्या वृद्ध परंतु ‘वेगळ्या’, माणसाकडे थोडी तिरस्काराने बघत होती.

“आदमी तो अच्छा, भला दिखता है, इतनी उम्र हुवी है, सेकंड क्लास मे आने की क्या जरुरी है…” अशीच थोडी कुजबुज ऐकू येत होती.

मी सुद्धा त्या व्यक्तीला ओळखत असल्याने माझीही त्या वेळी तीच भावना झाली. दादर स्टेशनवर मी प्रथम उतरलो. (की, गर्दी मार्फत उतरविला गेलो??). ती व्यक्तीही मागील लोंढ्याचे धक्के खात कशीबशी उतरली.

मी अवसान गोळा केले. समोर जाऊन नमस्कार केला. दादर स्टेशनवर, संध्याकाळचे भर गर्दीच्या वेळी, घामाघूम झालेल्या अवस्थेत, जगासाठी ‘एक लोकल प्रवासी’, पण माझ्यासाठी एक, ‘देवतुल्य आचार्य’, असणाऱ्या त्या भल्या माणसाशी,माझे केवळ 3-4 मिनिटांचे संभाषण झाले ते असे: 

“सर, मी बोर्डीच्या हायस्कूलचा माजी विद्यार्थी, गाव बोर्डी”.

(माझ्या खांद्यावर हात, स्मितहास्य करीत), ”असं का, छान, इथे कुठे आलास?”

“सर मी पार्ल्याला  राहतो. आता दुसरी गाडी पकडून अंधेरीस जाईन.’

“सर, या गर्दीत, दुसऱ्या वर्गाने प्रवास करताना त्रास नाही का होत?’

“अजिबात नाही. मला आता याची  सवय झाली आहे.सरकारने दिलेला पहिल्या वर्गाचा पास हा काय खिशात आहे. अगदीच अशक्य झाल्यास  पहिल्या वर्गाने जातो.”

“सर ,आपण दमला आहात .काही कोल्ड ड्रिंक किंवा चहा घेऊ या काय?”

“बाळ, मला खूप उशीर झाला आहे.दादरच्या शारदाश्रमात महत्त्वाचे काम आहे. तेथेच  आता निघालो आहे . ते काम आटोपले की संध्याकाळी  बोर्डीस जायचे आहे.  शारदाश्रमात  कधीतरी ये , आपण बोलू.”

एवढे कसेबसे बोलून,त्या वेळी पंच्याहत्तरी ओलांडलेला तो साधू पुरुष  गर्दीची, ऊकाड्याची, चहाची, श्रमाची… कुणाची… कशा कश्याची ही पर्वा न करता आपल्याच ‘मिजाशीत’, शारदाश्रमकडे निघून गेला.

मी अगदी एखाद्या मंत्राने भारल्यागत त्या पाठमोर्‍या झालेल्या देवदूताकडे  बघत, तसाच पाचेक मिनिटे उभा होतो….

माझी अंधेरी गाडी, त्याच  प्लॅटफॉर्मवरून कधी निघून गेली ते कळलेही नाही…

होय तीच ती व्यक्ती.. आचार्य भिसे!! .त्यादिवशीचा तो, केवळ बारा-तेरा मिनिटांचा,अचानक घडलेला लोकलमधील सहप्रवास, प्लॅटफॉर्मवर झालेले ते लघु संभाषण ,बस्स.. माझ्यासाठी, आयुष्यातील हा दुर्मिळ, “गुरूपुष्यामृत” योग!! पन्नास वर्षे झाली तरी,आठवले की अंगावर रोमांच येतात, मान आदराने लवते… मन वेगळ्याच ऊन्मनी अवस्थेत जाते! अमृतानुभव म्हणतात तो हाच असावा काय?

आचार्यांचे बोर्डी हायस्कूल मधील अगदी स्थापनेपासूनचे योगदान, तेजस्वी स्वातंत्र्यसैनिक, निगर्वी, निस्पृही वृत्ती, मान-सन्मान, संपत्तिविषयी संपूर्ण वैराग्य, करारी, रोखठोक बाणा, दलित-वंचित अशा वनवासी आदिवासी विषयी अत्यंतिक कळवळा… मी खूप ऐकले होते. 

“कर्मण्येवाधिकारस्ते,मा फलेषु कदाचन!”

हे गीता तत्त्वज्ञान एवढ्या सहजरीत्या, रोजच्या व्यवहारात, जीवनभर आचरून, आपलं आयुष्य म्हणजे एक आदर्श वस्तुपाठ’, बनवून गेलेल्या आचार्य भिसे यांचं सर्व जीवनकार्य केवळ अफाट आणि अगाध!

आचार्यांवर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न  करीत आहे.

डॉ.जयंतराव पाटील यांचे, “सेवाव्रती आचार्य भिसे”, हे पुस्तक मित्रवर्य प्रि.प्रभाकर राऊत यांनी सांगितलेल्या आठवणी, दिलेली पत्रे व मला भेटलेली, ‘आचार्य भिसे ही एक व्यक्ती’, या सर्व सामग्रीवर आधारित, लिहिण्याचा हा प्रयत्न!

एका ऊत्तुंग, देवस्वरूप अफाट व्यक्तिमत्वाला, शब्दात पकडण्याचा, एका विद्यार्थ्यांचा, प्रामाणिक प्रयत्न!

स्वार्थ, अहंकार, लोभ, आत्मकेंद्रितता, व मानवी मूल्यांची झपाट्याने कमतरता जाणवणा-या  आजच्या जगात आचार्य भिसे यांची ही कहाणी म्हणजे एक अद्भुतकथा, परिकथा  ठरेल.  बोर्डी हायस्कूलच्या अभ्युदयासाठी पहिल्या दिवसापासून  श्रम, आदिवासी -वनवासी यांच्या उत्थापनासाठी अनेक उपक्रम, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगून सक्रीय सहभाग, एवढे कामाचे डोंगर ऊपसून, त्याचे श्रेय घेण्याची वेळ आल्यास त्या वेळी वैराग्य, विरक्तीचे प्रदर्शन!! 

प्रसिध्दीपरान्मुखता कीती? राज्यशासन,केंद्रशासन यांनी देऊ केलेले, अनेक पुरस्कार, सल्लागारपद, अगदी भारतासरकारचे शिक्षण मंत्रिपद, स्विकारण्यासही  नम्रपणे नकार.. NOTHING DOING, PLEASE!” हा निर्धार! 

भविष्यातील पिढ्यांनी, “अशी एक व्यक्ती होती, नव्हे, ती आमच्या बोर्डी गावातच राहत होती”, हा विश्वास ठेवावा, म्हणून हा लिखाणाचा प्रपंच!

 गुरुवर्य कृष्णराव चित्रे .आत्मारामपंत सावे, आचार्य शंकरराव भिसे,व गोविंदराव चूरी . बोर्डी हायस्कूलची  संस्थापक चौकडी.  या महामानवांना आमचे विनम्र अभिवादन. 

आमच्या बोर्डीची भूमी, एक वेगळीच भूमी आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. येथील निसर्गरमणीय वातावरणात राहून, तपस्या व साधना करून गेलेल्या, तापसांच्या पायाचे रजःकण, हजारो वर्षापासून या मातीत आजही विखुरले आहेत.  येथे,तत्त्वचिंतन ,अध्यात्म, आत्मसाक्षात्कार ,प्रेम, सेवा, त्याग या मूल्यांची रुजवण होत आली. ज्ञानपुष्पांच्या पाकळ्यांची पखरण  येथे सातत्याने झाली.  सत्य,शिव, मांगल्याचा महिमा गायला गेला. .’शिवभावे जीव सेवा’, या आचरणाशी,आमच्या बोर्डीची नाळ  जोडली गेली.  म्हणूनच गेल्या शंभर वर्षात, अनेक महर्षी, संत-महात्मे, कर्मयोगी, ज्ञानयोगी, भारताच्या नव्हे, जगाच्या कानाकोपऱ्यातून बोर्डीचा परिसर विचारुन, येथे वास्तव्यास आले… 

आचार्य शंकर रामचंद्र भिसे, त्या उज्वल परंपरेचे एक महान पाईक. आचार्य चित्रे, गुरुवर्य आत्माराम सावे, पद्मभूषण ताराबाई मोडक, पद्मश्री अनुताई वाघ, डॉ. सुलभाताई पाणंदीकर, आचार्य स्वामी आनंद, आचार्य काका कालेलकर, साने गुरुजी, कविवर्य ग. ह .पाटील, डॉ. हरिश्चंद्र पाटील, डॉ. जयंतराव पाटील अशी अनेक तेजस्वी रत्ने एकेकाळी या बोर्डीच्या नभांगणात एकाच वेळी चमकत होती! 

या महाभागांच्या रचनात्मक व दलितोद्धारक कामाची ख्याती ऐकून, राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ठक्करबाप्पा यांच्यासारखे अनेक नेते, राजकीय धुरीण, महान समाजसेवक तर अगणित येऊन गेले. त्यांचा नामोल्लेख पुढे होणार आहे या तेजांकीत विभूतींच्या, ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीमधील लखलखणारा शुक्रतारा म्हणजे, आचार्य शंकर रामचंद्र भिसे!

आचार्य भिसे म्हणजे, मी मागेच सांगितल्याप्रमाणे गीताई मधील निष्काम कर्मयोगाचा वस्तुपाठ! सुख-दुःख, थंडी ऊन्हाळा, राग-लोभ, जीत-हार, यश- अपयश, जीवन-मरण, भूत-भविष्य, स्तुती-निंदा, कशाचीही चिंता न करता आपल्या हाती घेतलेल्या कामात पूर्णपणे झोकून देऊन, ते, ईश्वरसेवा समजून करीत राहणे, असा निष्काम कर्मयोग आजीवन आचणारा योगी पुरूष!

योगा बद्दल गीता म्हणते “योगा: कर्मसु कौशलम्”

आपल्या कार्यातील कौशल्य, तल्लीनता, म्हणजेच योग! ‘कौशल्य’,  या शब्दात सत्यम, शिवम, सुंदरम हेच भाव आहेत. अशुभ कर्मांना त्यात स्थान नाही. कोणतेही सात्त्विक काम कौशल्याने, कर्तेपणाचा अभिमान न वाटता, कर्मफलाची आशा सोडून, अलिप्तपणे करीत राहणे हे कर्मयोग्याचे लक्षण. असा साधक रोजच्या व्यवहारात राहूनच, सामान्य माणसासोबत जीवन जगता जगताच, स्वर्गमुक्तीचा उच्चस्तरीय आनंद उपभोगतो.

आचार्य विनोबांनी या स्थितीचे अतिशय सुंदर वर्णन मध्ये केलेले आहे,

उद्योग करीतो सारे, काम संकल्प सोडूनी

ज्ञानाने जाळिले कर्मे, त्यास म्हणती पंडित।

   नित्य तृप्त निराधार, न राखे फल वासना।

गेला गढून कर्मात, तरी काही करीची ना।।

मिळे ते चि करी गोड, न जाणे द्वंद्व मत्सर, 

फळो,जळो जया ,एक करुनि ही न बांधीला।।

 1920 साली बोर्डीला आल्यापासून ते 1971 मध्ये आपली जीवनयात्रा  संपवून निजधामाला गेलेल्या आचार्यांचे समर्पित जीवन पाहिल्यानंतर, या प्रत्येक ओळीतील प्रत्येक शब्दाशी, त्यांच्या जीवन कार्याचा किती निकटचा संबंध आहे याची जाणीव होते. हा कर्मयोगी आमच्या बोर्डी गावात पन्नास वर्षे राहिला, आम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिले, त्यांच्या चरणाची धूळ मस्तकी लावली, खूप धन्यता वाटते!

तया सर्वात्मका ईश्वरा,स्वकर्म कुसुमांची वीरा,

पूजा केली होय अपारा, तोषालागी।

ज्ञानाधिष्ठित, ‘कर्म प्रधानभक्ती’ तत्वाचे सार ज्ञानेश्वरांनी या ओवीत सांगितले आहे. हातून घडणारे प्रत्येक कर्म, पूजा सामग्रीमधील फुले समजून, आपल्या भोवताली असलेल्या जनता-जनार्दनाला विश्वात्मकाचे प्रतीक मानून, त्याची जिवेभावे उपासना करतो. अशा उपासकाला त्या परतत्वाकडून प्राप्त होणारा प्रसाद म्हणजे वैराग्य! कर्माचा त्याग म्हणजे वैराग्य नव्हे. प्रापंचिक कामे आणि जबाबदाऱ्या उत्तमरितीने पार पाडल्यावर, साधकाच्या जीवनात आलेल्या वैराग्यामुळे, साधकाची तामस, राजसवृत्ती मावळून जाते. आयुष्याची वाटचाल सदैव शुद्ध व सात्विक होते. मला नम्रपणे असे वाटते. आचार्यांना आयुष्यात जो, “शुका परी, पूर्ण वैराग्याचा”, प्रसाद प्राप्त झाला. तो, त्यांनी आयुष्यभर, “जे का रंजले गांजले”, त्यांना आपले समजून केलेल्या सेवेचे फळ होते. असे वैराग्य सर्वांनाच प्राप्त होत नाही. ते देवदुर्लभ आहे कारण ते प्राप्त झालेला माणूस, मनाच्या एका वेगळ्या अवस्थेप्रत पोहोचलेला असतो. जेथे स्वार्थ, लबाडी, वासना, स्पर्धा, आकांक्षा यांना अजिबात थारा नसतो… असते ती एक सुंदर, भावातीत अवस्था. चिदानंद वृती… देऊ केलेले सर्व उच्च पुरस्कार,  मानाची पदे, सत्कार, धन, सर्व नम्रपणे नाकारतांना, ” मी हे काम अशा पदांसाठी केले नव्हते, ईदं न मम!”, Nothing Doing please ..,हे सांगण्याचे धारिष्ट्य त्यांना प्राप्त झाले होते!

आचार्यांच्या या वाटचालीची थोडक्यात माहिती करून घेतली तर, मला काय म्हणावयाचे आहे, हे लक्षात येईल.

रायगड जिल्ह्याच्या, साये या गावी 10 ऑक्टोबर 1894 रोजी त्यांचा जन्म झाला. बालपणीच पितृछत्र हरपले. त्यांच्या धीरोदात्त आईने मोठ्या कष्टाने, आपले तीन मुलगे व एका मुलीचे पालनपोषण केले. शिक्षणासाठी आचार्यांना ठाणे येथे जावे लागले. तेथे श्री. तात्यासाहेब खारकर या त्यांच्या नात्यातील गृहस्थांनी त्यांना आश्रय दिला. आचार्यांचे विनम्र वागणे व शिक्षणाविषयीचे प्रेम यामुळे तात्यासाहेबांना ‘शंकर’ बद्दल जिव्हाळा व आपुलकी वाटू लागली. आचार्य भिसे यांनी देखील, “आपल्या जीवनाच्या जडणघडणीत, तात्यासाहेब खारकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे”, असे म्हटले आहे. आचार्य म्हणत, “त्या काळातील अनेक सामाजिक परिषदांत स्वयंसेवक म्हणून काम करताना समाजातील वाईट रूढी आणि दुर्बल घटकावर होणारा अन्याय दूर कसा करता येईल यावर चर्चा होई, तिचा प्रभाव माझ्यावर पडला. तात्यासाहेब स्वतः,मला या सामाजिक परिषदांना घेऊन जात असत”.

तात्यासाहेबांनी आचार्यांना एक महत्त्वाची, मोलाची शिकवण दिली, “शंकर तू मोठा होऊन जातीपातीच्या सेवा संस्थेत पडू नकोस. यापेक्षा व्यापक असे सर्व समाजासाठी सर्वसमावेशक सेवाकार्य कर”, आचार्यांच्या जीवनाचा तो धृवतारा ठरला!

 1920 साली,गिरगाव की बोर्डी, हा प्रश्न आचार्यांचे मनात घोळत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत,पोलादपूर भागात आले असताना, आचार्य विसाव्यासाठी एका झाडाखाली बसले. तिथे एक थडगे त्यांना दिसले. त्या उपेक्षित थडग्याकडे ते कुतूहलाने गेले.पाश्चात्य संपन्न देशातून, हजारो मैल येऊन, कुष्ठसेवेत देह ठेवलेल्या एका मिशनऱ्यांचे ते थडगे होते. त्यांचे मन भरून आले.त्यांच्या मनाची दोलायमान अवस्था संपली. मनातला संदेह नाहीसा झाला. ते थडगे हेच त्यांचे एक स्फुर्तीस्थान बनले .

 ठाण्याच्या बी. जे. हायस्कूल मधून शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, घरची अत्यंत गरिबी असूनही,  त्यांना उच्च शिक्षणाचे आपले ध्येय पूर्ण करावयाचे होते. यासाठी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात ते दाखल झाले. दिवसा महाविद्यालयाचे शिक्षण घेणे व रात्री शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करणे, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना शिक्षण घ्यावे लागले. रात्रीच्या शाळेतील विद्यार्थ्यांची, शिक्षणासाठी चाललेली धडपड पाहून आचार्यांना आपल्या परिस्थितीचे विशेष वाटत नसे. भविष्यात आपण अशा गरीब व कष्टाळू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काही तरी केले पाहिजे, असा त्यांचा संकल्प दृढ झाला. 1917 साली, ते बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

आचार्य भिसे यांचे गुरु, गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, कै. प्रिन्सिपल टी .ए .कुलकर्णी.

त्यांच्या आधी विल्सन मधूनच बी ए उत्तीर्ण झालेले प्रि. त्र्यंबक आप्पाजी कुलकर्णी यांनी, “आपल्या ज्ञानाचा उपयोग शिक्षण प्रसारासाठी झाला पाहिजे”, या उदात्त हेतूने एलफिस्टन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम सुरु केले होते. पण सरकारी नोकरी करावयाची नाही,  यासाठी त्यांनी तेथून राजीनामा देऊन 1912 साली, गिरगावातील माधव बागेत, ‘न्यू इंग्लिश स्कूल’, ही संस्था स्थापन केली. प्रि. कुलकर्णी मोठे समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय वृत्तीचे होते. त्यांनी परळ भागातील गिरणी कामगारांची सेवा करण्याच्या उद्देशाने, ‘सोशल सर्विस लीग’, नावाची संस्था सुरू केली आणि या संस्थेमार्फत कामगारांच्या कल्याणाचे अनेक उपक्रम राबविले.

आचार्यांनी जेव्हा प्रि. टी. ए. कुलकर्णी यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सेवा करण्याचा संकल्प केला. बी. ए. परिक्षा संपताच ते सरळ कुलकर्णी सरांना भेटण्यास गेले.  म्हणाले “आपणाबरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे”. प्रिं कुलकर्णी यांना हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांनी लगेच होकार दिला. आचार्य म्हणत ,”मला पहिल्याच दिवशी प्रि. कुलकर्णी यांचेकडून समाजसेवेची दीक्षा मिळाली !” .खरेतर त्या काळात पदवीधर तरुणांना मुंबई शहरात मोठ्या पगाराच्या व अधिकाराच्या नोकऱ्या मिळत असत. पण प्रि. कुलकर्णी,आचार्य भिसे, आत्माराम सावे, आचार्य चित्रे  गुरुजी,  यासारख्या ध्येयवादी तरुणांनी त्यावेळी मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांकडे पाठ फिरवून, ‘गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी,  शिक्षणासाठी, काही तरी करावे’,असा निश्चय करून आपले जीवन त्याच ध्यासाने व्यतीत केलेले आहे.असा धाडसी निर्णय म्हणजे, त्यांच्या जीवनातील अत्युच्च त्यागाचा क्षण होता….turning point!

प्राचार्य कुलकर्णी यांनी आपली न्यू इंग्लिश स्कूल ही संस्था ,त्यांनीच नव्याने स्थापन केलेल्या, गोखले एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्द केली .या सोसायटीची स्थापना त्यांनी 19फेब्रुवारी 1918 या दिवशी केली होती .ते स्वतः या सोसायटीचे अध्यक्ष व आचार्य भिसे हे चिटणीस झाले. त्यांना इतरही अनेक चांगले कार्यकर्ते त्यानंतर येऊन मिळाले व परळ भागात त्यांनी आपले हायस्कूल सुरू केले.

याच कालखंडात बोर्डी गावातील एक तरुण, गोविंदराव  गणेश चुरी यांनी बोर्डी येथे इंग्रजी शिकवण्याचे वर्ग सुरू केले होते .ते स्वतः मॅट्रिक सुद्धा पास नसताना केवळ रात्रशाळेत,मुंबईत शिक्षण घेऊन, “भारतीयांनी  इंग्रजी शिकलेच पाहिजे व त्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत”, या एका ध्येयाने प्रेरित होऊन या वर्गाची सुरुवात केली होती. त्यांच्या या कामाने प्रभावित होऊन ,त्यावेळी बोर्डीचे एक दुसरे पदवीधर तरुण आत्माराम पंत सावे  यांनी आपली मुंबईतील सुखाची,मानाची नोकरी सोडून  शिक्षणाच्या कामाला वाहून घ्यावे असे ठरविले होते.  तेही गोविंदरावांबरोबर इंग्रजी शिक्षणाच्या शिकवणी वर्गात सामील झाले होते.अशा रितीने बोर्डीला शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू झाला होता. बोर्डी हायस्कूलचे एक आद्य संस्थापक,कै. गोविंदराव चुरी, यांचेवर मी एक स्वतंत्र लेख लिहिला आहे.कै.आत्माराम पंत सावे, यांचे वरही स्वतंत्रपणे लिहीणार आहे ही खूप मोठी माणसे होती.

प्रि. कुलकर्णी ,बोर्डीला मदनराव राऊत यांचेकडे सुट्टीत येत असत. असेच एकदा आले असता, माधव राव, आत्माराम पंत सावे, मुकुंद राव सावे, गोपाळराव पाटील अशा घोलवड-बोर्डी मधील काही ग्रामस्थांनी, प्रि. कुलकर्णी यांची भेट घेतली. “आमची शाळा, गोखले एज्युकेशन सोसायटीने घ्यावी”, अशी त्यांना विनंती केली. सुदैवाने ती मान्य झाली. प्रिन्सिपल कुलकर्णी यांनी बोर्डीची शाळा गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात घेण्यास मान्यता दिली . 

  कामाला उत्साहात सुरुवात झाली. गावकऱ्यांनी सर्व नागरिकाकडून निधी गोळा केला. शाळेच्या कामाला अनपेक्षित यश येऊ लागले .घोलवड गावच्या एक उदार पारशी महिला,  श्रीमती धनबाई, यांनी ,आपल्या मातोश्री ,श्रीमती सुनाबाई पेस्तनजी हकीमजी, यांच्या नावे 50 हजार रुपयांची देणगी देण्याचे आश्वासन दिले. ठाण्याचे त्यावेळचे कलेक्टर श्री. कॅम्पबेल यांनी शाळेच्या इमारतीसाठी 41 गुंठे सरकारी जमीन मंजूर केली. अशा रितीने बोर्डी व घोलवड गावांना सोयीस्कर अशा ताडराईमध्ये, दोन्ही गावांचे सीमेवर, हायस्कूलसाठी जागा निवडण्यात आली .जानेवारी 1920 पासून बोर्डीचे हे हायस्कूल सुरू झाले.त्यावेळचे मुंबईचे शेरीफ सर पुरुषोत्तमदास ,यांनी 11 जानेवारी 1920  रोजी या हायस्कूलचे ऊद्घाटन  केले.  श्रीमती धनबाई यांनी दिलेल्या देणगीतून शाळेची सुंदर इमारत बांधण्यात आली .त्या इमारतीचे उद्घाटन 17 मार्च 1924 रोजी, मुंबईतील एक दानशूर गृहस्थ  ,सर कावसजी जहांगीर यांच्या शुभ हस्ते झाले.

    आचार्य भिसे  त्यावेळी श्री. कुलकर्णी यांचे परळ येथील शाळेत काम करीत असल्याने त्यांची हुषारी  व ध्येयनिष्ठा ,प्रि.कुलकर्णी यांचे नजरेस आली होती. प्रि. कुलकर्णी यांनी आचार्य भिसे यांना, ‘त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी या खेडेगावात,नव्याने सुरू झालेल्या हायस्कूलचे प्राचार्य पद स्वीकारावे’,अशी विनंती केली .परंतु ही विनंती आचार्यांना मान्य होईना. आचार्य म्हणाले,” माझे सर्व आयुष्य मुंबई शहरात गेले, त्यामुळे ,मी परळ येथील कामगार वस्तीत असलेल्या विद्यालयात, शिक्षण देण्याचे काम करू शकेन, पण बोर्डी सारख्या खेडेगावात जाऊ शकणार नाही.” मात्र प्रि. कुलकर्णी यांनी त्यांना विचार करण्यासाठी थोडा अवधी दिला.

     उन्हाळ्याच्या सुट्टीत आचार्य भिसे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड येथील आपल्या आजोळी गेले होते.मनात ,गिरगाव की बोर्डी हा संदेह होताच .एके दिवशी पोलादपूरला एक कुष्ठधाम त्यांच्या नजरेस पडले. काही ख्रिश्चन मिशनरी या रोग्यांची सेवा करीत असलेले पाहिले. आचार्य विसाव्यासाठी एका झाडाखाली बसले असताना, त्यांना एक  थडगे दिसले.  उपेक्षित अशा त्या थडग्याकडे आचार्य सहज चालत गेले .त्यावर लिहिलेल्या दोन ओळीतील माहितीवरून, हजारो मैल दूर अशा पाश्चात्त्य, संपन्न देशातून आलेल्या, मिशनऱ्याचे ते थडगे आहे, असे त्यांना कळले. त्या अनामिक मिशनऱ्याच्या, अलौकिक त्यागाची जाणीव होऊन , आचार्यांच्या मनात आपल्या कर्तव्याच्या जाणिवेची ठिणगी पडली.  ते थडगे हेच त्यांचे भविष्यातील स्फूर्तीस्थान बनले. बोर्डीस जाण्याचा निश्चय पक्का झाला !

     प्राचार्य कुलकर्णी यांना आचार्यांनी आपला निश्चय सांगितला.प्रि.कुलकर्णींना फार आनंद झाला. त्यांनी ,आचार्यांना गोखले एज्युकेशन सोसायटीमार्फत, सर्व तऱ्हेची मदत व मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. प्राचार्य कुलकर्णी यांचे आशीर्वाद घेऊन आचार्य भिसे 1920 साली बोर्डीला आले . नव्याने सुरू झालेल्या हायस्कूलच्या प्राचार्यपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यानंतर आचार्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे त्यांना कृष्णराव चित्रे या दुसऱ्या कर्मवीरांची साथ मिळाली, ‘सावे, भिसे चित्रे’, या त्रयीने आपल्या प्रभावाने,  बोर्डी, घोलवड व सारा परिसर एका दिव्य ज्ञानयज्ञाच्या तेजाने उजळून टाकला ! बोर्डी आणि “आचार्य भिसे-चित्रे” हे अद्वैत अजरामर झाले.एक नवा इतिहास या परिसरात घडला, जो  सर्व जगाला आता ज्ञात आहे… त्याचीच ही थोडक्यात कहाणी.

     त्यावेळची शाळा बोर्डीच्या पारशी अग्यारी समोरील, एका लहानशा भाड्याच्या घरात भरत असे. फक्त 70 ते 75 विद्यार्थी शाळेत होते. जवळच्याच एका घरात वसतिगृह होते व त्यात अंदाजे पंधरा विद्यार्थी होते .या दोन्ही कुटुंबांचे, ‘चैतन्य व प्राण’,गुरुवर्य आचार्य भिसे व आत्माराम सावे सर होते. तो एका महान ज्ञान गंगोत्रीचा उगम होता .आज या ज्ञानगंगेचा विस्तार व भव्यपणा पाहिल्यानंतर त्या उगमाच्या सूक्ष्मतेचा व त्या काळात या गुरुवर्यांनी दिलेल्या योगदानाची कल्पना ,आजच्या पिढीला येणार नाही.केवळ पुस्तकी धडे शिकवणारे शिक्षण देण्यापेक्षा,  समाजशिक्षण व लोकजागृतीचे कार्य करून, आपले क्षेत्र बोर्डी घोलवड पुरते मर्यादित न ठेवता, आसपासच्या  खेड्यातील उपेक्षित समाजापर्यंत ते पोहोचले पाहिजे,असेच ध्येय या शिक्षण संस्थेने व गुरूजनांनी ठेवले.  त्यामुळेच आजही,जनमानसातील प्रेमाचे व आदराचे स्थान या त्रयीला  मिळाले आहे .फार थोड्या लोकांच्या वाट्याला असे भाग्य येते !

       1920 साली सुरू झालेल्या या शाळेच्या ,पहिल्या दिवशी हजर असलेले त्यावेळचे वसतिगृहातील विद्यार्थी, कै. प्राध्यापक नागले यांनी आपल्या आठवणीत, काय लिहिले आहे ते पहा..

  “माझ्या या बोर्डीतील  वास्तव्याबद्दल मी विचार करू लागलो की अनेक सुखद आठवणी मनात गर्दी करून सोडतात. पारंपारिक शाळांतून दिसून येणारा शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दुरावा, मुख्याध्यापकाबद्दल वाटणारी भीती ,या गोष्टींचा येथे पूर्णपणे अभाव होता. मुलांच्या सुख-दुःखाची वैयक्तिक चौकशी करणारे ,त्यांच्या प्रत्येक प्रश्नात सहभागी होणारे प्रेमळ शिक्षक आम्हाला लाभले होते .एक प्रकारचा कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता. सर्व कामे एकमताने ,एकदिलाने ,शिक्षकांना व विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन पार पाडली जात असत. अभ्यासातील व कौटुंबिक अडचणी सोडवून घेण्यासाठी आम्ही भिसे सर व इतर गुरुजनांना केव्हाही भेटत असू. शाळा व वसतिगृह आपलेच आहे ही भावना असल्यामुळे येथील सर्व कार्यक्रमांत,गावातील मुलें मोठ्या प्रेमाने सहभागी होत. भिसे सर ,सावे सर, पाटणकर सर ,व इतर शिक्षक मुलांशी समरस झाल्याचे दृश्य पाहून आपण एखाद्या प्राचीन कालीन ऋषीमुनींच्या आश्रमातच आहोत की काय असे वाटे. या सर्व गोष्टींचा आमच्या मनावर परिणाम होऊन आमच्या भावना उल्हासित झाल्याशिवाय रहात नसत .साधी व स्वावलंबी राहणी, उच्च विचार, राष्ट्रभक्ती या गुणांची जीवंत उदाहरणे आमच्या गुरुजींच्या रूपाने आमच्या समोर उभी होती ! एक प्रकारच्या निर्मळ व सोज्वळ वातावरणात आम्ही वावरत होतो याचा परिणाम आमच्या संस्कारक्षम मनावर झाल्याशिवाय कसा राहणार?”

              .

  श्रीयुत कमलाकर कर्णिक हे देखील बोर्डी शाळेतील पहिल्या बॅचचे विद्यार्थी,वस्तीगृहातील प्रथम तीन विद्यार्थ्यांतील एक. त्यांनी आपल्या आठवणीत म्हटले आहे,…

       ” मुंबईसारख्या शहरातून मी खेडेगावात आकस्मिकपणे गेलो. तोच माझ्या आयुष्यातील यशोबिंदू ठरला. बोर्डीस रहावयाची माझी कल्पना ,म्हणजे लहानसे टुमदार शहर असेल,शाळा व वस्तीगृहाच्या, मुलांनी गजबजलेल्या भव्य इमारती असतील ,विस्तीर्ण पटांगण असेल, असे डोळ्यासमोर होते .पण घोलवड स्टेशनवर उतरल्यापासून या कल्पनेला तडे जाऊ लागले.आमची ती शाळा व वस्तीगृह म्हणजे जुनाट रंग-रूपहीन इमारती होत्या.वसतिगृहात प्रथम आम्ही तिघेच. मी, प्रभाकर वाघ व त्याचा धाकटा भाऊ. सोबतीला आचार्य भिसे ,एक स्वयंपाकी व एक वारली गडी. मन उदास झाले पण हळू हळू विचार पालटू लागले. सकाळचे शांत वातावरण, आल्हाददायक हवा, समोर दिसणाऱ्या सागराचे खळखळणारे चैतन्य स्वरूप पाहून मन सुखावले. आचार्य भिसे यांचा आनंदी, उत्साही व प्रेमळ सहवास.त्यामुळे तेथे मी ताबडतोब रमलो. अनेक विद्यार्थी अनेक ठिकाणाहून येऊ लागले. नवे चेहरे दिसू लागले. थोड्याच दिवसात दिसावयास कठोर, पण अंतर्यामी मृदु अंतःकरणाचे चित्रे गुरुजी आमच्यात आले व आमच्या बरोबरच राहू लागले.सहजीवनाचा धडा आम्ही तेथे गिरविला.आचार्य  भिसे व चित्रे हे दोघे आमच्यात अहोरात्र असल्यामुळे त्यांच्याशीच आमचा सहवास जास्त झाला.त्यांचे स्वभाव दर्शन जवळून झाले. दोघेही शीलवान ,चारित्र्यसंपन्न ,प्रेमळ परंतु शिस्तप्रिय व शिक्षणतज्ज्ञ. उत्तम नागरिक तयार करणे हेच ध्येय व हाच त्यांचा ध्यास! त्यांच्या सहवासात हळुवारपणे, मुग्ध कळ्यांची फुले उमलून त्याचा सुगंध महाराष्ट्रातच काय पण महाराष्ट्राबाहेर देखील दरवळला.ज्या नैतिक मूल्यांनी माझे जीवन  तेथे घडविले, ती मुल्ये मी जीवापाड जतन करून ठेवली आहेत. धकाधकीच्या जीवनात मला त्याचा फार उपयोग झाला. बोर्डीच्या जादू नगरीतील ती स्वप्ने आजही घोळवीत असतो !

  शाळेच्या अगदी सुरुवातीच्या काळात, साहित्यसम्राट न. चि. केळकर यांनी शाळेला भेट दिली. साहित्य सम्राटांच्या उजव्या बाजूस आचार्य भिसे व डाव्या बाजूस गुरूवर्य आत्माराम .वि.सावे. 

  बोर्डी हायस्कूलच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या वसतिगृहाचे जीवन अनुभवणाऱ्या या दोन विद्यार्थ्यांचे मनोगत वाचल्यानंतर, या शाळेचा, ‘कीर्ती दरवळ’, अगदी थोड्याच अवधीत, महाराष्ट्रातच काय पण महाराष्ट्राबाहेर देखील का दरवळला, याचे इंगीत कळेल. ‘बोर्डी’ या नावाला वलय प्राप्त झाले व गावाला इतिहास मिळाला. बोर्डीची शाळा म्हणजे ‘आदर्श शिक्षण संस्था’ ,’ज्ञान पंढरी ‘, ही व्याख्या रूढ झाली ! 

     शिक्षण शास्त्रातील नविन नविन कल्पना घेऊनच भिसे सर बोर्डीला आले होते. याबाबत प्रिं. कुलकर्णी त्यांचे मार्गदर्शक होते. त्या कल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी त्यांचे प्रयत्न आता सुरू झाले.बोर्डीची भूमी त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त सुपीक वाटली.  आपल्या सर्व कल्पनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी हा परिसर खूप उपयुक्त आहे, याची त्यांना जाणीव झाली. राष्ट्रप्रेम व समाजसेवा यांचे खतपाणी घालून या भूमीची मशागत सुरू झाली. या कार्यासाठी, ध्येयवादाने भरलेल्या अनेक सहकाऱ्यांची  त्यांना एकामागून एक येऊन साथ मिळत गेली .सहकाऱ्यांची योग्य निवड करून त्यांची योग्य ठिकाणी योजना करण्याची आचार्यांची हातोटी विलक्षण होती. म्हणूनच आदर्श कार्यकर्ते निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले .विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेत पास होण्यासाठी मदत करणे एवढाच मर्यादीत हेतू त्यांच्यापुढे नव्हता. त्यांना आपल्या कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी चारित्र्यवान नागरिक बनविणे व त्यासाठी पोषक अशा चांगल्या सवयी व निष्ठा त्यांच्या अंगी कशा बाणवता येतील ,याचे धडे देणे हा त्यांचा प्रमुख हेतू होता. बहुतेक विद्यार्थी शेतकरी समाजांतून आलेले असल्याने त्यांनी आपल्या शेतीचा विकास करावा, आपल्या सुखात भर घालून समाजाच्या व देशाच्या उन्नतीला हातभार लावावा हेच त्यांचे अंतिम उद्दीष्ट होते.म्हणून शाळेमध्ये कृषी शिक्षण व जोडीला विणकामाचे शिक्षण देण्याची व्यवस्था शाळेच्या स्थापनेपासूनच झाली होती. 

   आचार्यांनी बोर्डी शाळेतील आपले विद्यार्थी घडविताना त्यांना देशाभिमान व स्वावलंबनाचे धडे दिले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा तो काळ होता.  आचार्यांनी स्वतः 1940 मधील वैयक्तिक सत्याग्रह व 1942 चे भारत छोडो आंदोलन यात भाग घेऊन कारावास पत्करला होता. त्यांच्या संस्थेतील अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांनी  भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय भाग घेतला होता.म्हणूनच बोर्डीची शाळा ही ‘ राष्ट्रीय शाळा’,म्हणून गणली जाई. बोर्डीच्या शाळेतील शिक्षक हे व्रतस्थ होते. बहुतेक शिक्षक त्या वेळेचा राष्ट्रीय पोशाख म्हणजे खादीचे कपडे वापरीत .राहणी अतिशय साधी असे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांबद्दल अत्यंत आदर वाटे.भारतात गुरुकुलाची जी संस्कृती एकेकाळी नांदत होती ,तिचे दर्शन बोर्डी येथील आचार्य भिसे यांच्या शिक्षण संस्थेत त्या काळी पहावयास मिळत असे.

   या संस्थेतील अनेक शिक्षकांनी  1942 च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्यामुळे कारावास भोगला होता. ब्रिटिश सरकारची कडवी नजर शाळेवर व सर्व शिक्षकांवर होती. त्यामुळे संस्थेचे अनुदान बंद करण्यात आले होते. अशा कठीण प्रसंगी आचार्य चित्रे गुरुजी दर शनिवार-रविवारी मुंबईस जात व देणग्या गोळा करीत. त्यातून जो पैसा मिळे,तो शाळेचा दैनंदिन खर्च व शिक्षकांचे वेतन यासाठी दिला जाई. संस्थेत नोकरी करणाऱ्या एका शिक्षकाने,आपल्या शाळेच्या खर्चासाठी व सहकाऱ्यांच्या पगारासाठी स्वतःच्या वेतनाचा विचार न करता, वणवण भटकून,देणग्या जमवून, सर्व खर्च भागविल्याचे उदाहरण, जगाच्या इतिहासात कुठे सापडेल काय ?

    स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, बोर्डी हायस्कूलमध्ये घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख, बोर्डीचे एक स्वातंत्र्यसेनानी व माजी मंत्री, शामराव पाटील यांनी आपल्या आठवणीत नमूद केलेला आहे, त्याचा उल्लेख येथे करावासा वाटतो. त्यावेळी ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर श्री. एम्. डी. भट हे गृहस्थ होते. त्यांनी एकदा हायस्कूलच्या सभागृहात राजनिष्ठ लोकांचा दरबार भरविला व सभेची व्यवस्था, आचार्य भिसे यांना करण्यास सांगितले. प्रत्यक्ष कलेक्टर साहेबांचे आमंत्रण जाताच जिल्ह्यातील अनेक राजनिष्ठ मंडळी बोर्डीला आली. दरबार सुरू झाला .श्री. भट यांनी आपल्या भाषणात,”लोक चुकीच्या मार्गाने जाऊन आपले व देशाचे कसे नुकसान करीत आहेत.” असे  सांगून लोकांना कायदेभंगाच्या मार्गापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले. त्यानंतर काही राजनिष्ठ मंडळींची भाषणे झाली. ही भाषणे म्हणजे पोकळ वल्गना व सरकारच्या स्तुतीची मुक्ताफळे होती. आचार्य देखील या विशेष सभेत बसले होते. कलेक्टर साहेबांनी त्यांना बोलण्यास पाचारण केले. आचार्यांनी आपल्या भाषणात सांगितले,”सरकारने गांधीजी व पुढारी यांना पकडून तुरुंगात टाकण्यात चूक केली आहे. ही दडपशाही आहे.त्यामुळे लोकमत दडपले जाणार नाही.सरकारने आपली चूक दुरुस्त केली पाहिजे. त्याशिवाय देशात शांतता व सुव्यवस्था स्थापन होणार नाही.” कलेक्टर साहेबांनी आचार्य भिसे यांना मध्येच विचारले,”मि. भिसे, तुम्ही आपली जबाबदारी ओळखून बोलत आहात ना?”.आचार्यांनी लगेच उत्तर दिले, “होय,सर मी जबाबदारीची व त्याच्या परिणामाची जाणीव ठेवूनच बोलत आहे. मी आपले स्पष्ट व सत्य मत सांगितले नाही तर तो राष्ट्रद्रोह होईल.”

  कलेक्टर साहेबांनी सभा बरखास्त करुन समारोप केला. राजनिष्ठ लोकात मोठी घबराट पसरली की, आता आचार्य भिसे यांचे काय होणार ? मात्र आचार्यांच्या बाणेदार उत्तराने व भाषणाने, धोरणी व विचारी कलेक्टर भट यांचा,त्यांचे विषयी आदर वाढला. आचार्यांचा स्पष्टवक्तेपणा, तडफ व आपल्या तत्वावरील निष्ठा यांचा ज्वलंत प्रत्यय या दिवशी उपस्थित लोकांना आला. सरकारी रोषामुळे शिक्षण संस्था नष्ट होण्याची पाळी येऊन ठेपली होती. तरीदेखील आचार्य व त्यांचे सहकारी यांनी आंदोलनात उडी घेऊन एक नवा तेजस्वी आदर्श इतर शिक्षण संस्थांपुढे व इतर गावापुढे ठेवला. कृषीविकास व ,’उपेक्षित आदिवासींची उन्नती’, या कामाला वाहून घेतलेले अनेक सेवाभावी कार्यकर्ते त्यातून निर्माण झाले.

         आदिवासींच्या झोपडी समूहाला, जंगलातील,’ पाडा’, असे म्हणतात वरील चित्रात असाच हा आदिवासींचा पाडा आहे.आजही असे पाडे ,जंगलात दिसतात.

       आचार्य जेव्हा बोर्डीस आले त्यावेळी बोर्डी सारख्या, स्टेशन लगत असलेल्या एका गावात शिक्षणाची कोणतीच सुविधा नव्हती.मग अत्यंत दुर्लक्षित अशा आदिवासी प्रदेशांत शिक्षणाची कोणती सुविधा असणार? तेथे तर सर्वत्र निरक्षरता ,वाहतूक व रस्तेही नाहीत अशी अवस्था होती .आदिवासी गावांचा जगाशी संपूर्ण संबंध तुटला होता. साथीचे रोग व आजार यामुळे शेकडो माणसे मृत्युमुखी पडत होती. सर्वत्र उपासमारीचे व कुपोषणाचे थैमान होते.या भागातील जमीनदार, सावकार, जंगल ठेकेदार आदिवासींचे प्रचंड शोषण करीत असत. अज्ञानी व दुर्लक्षित असल्यामुळे या लोकांचा आवाज सरकार दरबारी पोहोचत नव्हता. त्यांच्या जमिनी सक्तीने काढून घेतल्या जात. ज्या जमिनीवर आदिवासी वर्षभर श्रम करून काही उत्पादन घेत, त्यातील अर्धा वाटा सावकारांना द्यावा लागे.आदिवासींना दिलेल्या कर्जाच्या बदल्यात आदिवासींना वर्षानुवर्षे सावकाराकडे मजुरी करावी लागे. आदिवासींना दिलेल्या कर्जाच्या  बदल्यात एखादे कुटुंब वर्षोनुवर्षे, पिढ्यानपिढ्या, जमीनदाराची सेवा करत राही. अशी वेठबिगारी व पालेमोड पद्धत त्यावेळी ठाणे जिल्ह्यात सर्रास चालू होती. या भागातील जंगल ठेकेदार वृक्षतोड करून, कोळसा पाडणे अशी कामे अगदी कमी मजुरीत करून घेत.गरीब मजुरांना ते जंगल कूपात डांबून ठेवीत.त्यांच्या महिलांवर अत्याचार करत.कधीकधी तर एखाद्या मजुराची चूक झाली तर त्याला कोळशाच्या भट्टीत जिवंत जाळून टाकीत. ‘आदिवासी वरील हा अन्याय दूर करावयाचा असेल तर त्यांची निरक्षरता दूर केली पाहिजे व शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे’, हे आचार्य भिसे यांनी ओळखले होते. म्हणूनच बोर्डीच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांनी बोर्डीच्या परिसरातील आदिवासी भागात प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केले. हे वर्ग रात्रीच्या वेळी भरवले जात.कारण आदिवासींना दिवसा शेतीची कामे असत. समाजसेवकांच्या मदतीने, आदिवासीतील प्रौढ साक्षरता वर्गाची चळवळ अशा रितीने त्यांनी सुरू केली. 

  मला आठवते’ आचार्य भिसे यांच्या हाकेला ओ देऊन, त्या काळी, माझे वडील व त्यांचे सहकारी शिक्षक कै. हिराजी भा. सावे दोघेही, बोर्डीतील बाभळे पाडा या आदिवासी वस्तीत, रात्री असे प्रौढ साक्षरता वर्ग ,विनाशुल्क ,घेत असत.

  माझे वडील आप्पा, शिक्षक होते. त्यांची,आचार्य भिसे सरांवर नितांत भक्ती होती. आप्पा आणि हिराजी गुरुजी या सारख्या सामान्य प्राथमिक शिक्षकांना सुद्धा ,आचार्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने,प्रेमाने, आणि राष्ट्रभक्तीने, कसे भारून टाकले होते,त्याचे हे उदाहरण मुद्दाम सांगत आहे. आप्पांना दम्याचा त्रास असल्याने कधीकधी संध्याकाळी शाळेतून आल्यावर ते थोडी विश्रांती घेत. त्या दिवशी कपभर गरम चहा हेच त्यांचे,’ संध्याकाळचे जेवण’असे.  शिकवणीसाठी( विनामोबदला), बरीच मुले घरी जमलेली असत. घरी बसण्यासाठी तेवढी जागा नसल्याने, समोरच्या मोकळ्या वाड्यातील जमिनीवर, फाटक्या गोणपाटाचे आसन करून, ही शिकवणीची ‘मैफिल’ रंगत  असे. एका रॉकेलच्या कंदीलावर  सुमारे दहा-बारा मुलांची शिकवणी( मुलेही पाचवी सहावी व सातव्या इयत्तेची मिळून असत )अशा शिकवणीची  मोठी गमतीशीर कथा, ती पुढे केव्हा तरी) होई.. पावसाळी          वा थंडीच्या दिवसात, आप्पांचा दम्याचा विकार बळावून येई . त्यांना बोलणे ही शक्य होत नसे. न बोलता ,खुणेने सर्व अध्यापन  होई. मात्र शिकवणीत खंड पडत नसे .अशा दिवशी देखील, हिराजी मामा आपली टोणग्याची गाडी घेऊन आले की कोणतीही  सबब न सांगता, त्या गाडीत बसून आप्पा रात्री बाभळे पाड्यावर प्रौढ साक्षरता वर्ग घेण्यासाठी जात. तेथून सुमारे बारा वाजता आल्यावर,  झोप मिळाली तरी ठीक, अथवा रात्र जागून काढत व  दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या शाळेतील वर्गावर हजर होत. दम्यामुळे शाळा , शिकवणी व प्रौढ वर्ग कधीही चुकल्याचे मला आठवत नाही. प्रौढ शिक्षणासाठी त्यावेळी शिक्षकांना कोणताही अधिक मेहनताना मिळत नव्हता.  मी स्वतः या घटनांचा साक्षीदार होतो .तिसरी-चौथीत होतो .पण  समज आली होती .यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही. इथे ही गोष्ट मुद्दाम अशासाठी नमूद केली की, या दोन सामान्य शिक्षकांची,आचार्य भिसे यांच्यावरील निष्ठा किती असाधारण होती, हे कळावे. आमच्या बोर्डी , घोलवड व सर्व परिसरात, आचार्य भिसेना असाच आदर मिळत होता. त्यांचा शब्द प्रमाण होता. नेता  शुद्ध धवल चारित्र्याचा असतो ,तेव्हाच त्याला असे अनुयायीही मिळतात. आज्ञा शिरसावंद्य मानून कार्यकर्ते, कामे यशस्वी करून दाखवितात.

  आचार्य भिसे यांनी आदिवासींना, जुलम, अत्याचार, शोषण मुक्त करून त्यांना साक्षर बनवून, सरकारी कायद्यांचे त्यांना ज्ञान व्हावे व त्यांचा योग्य तो फायदा त्यांना मिळावा , आदिवासी मुलामुलींना शिक्षण ,आरोग्य व शेतीविषयी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,  अशा अनेक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, जे बहुविध उपक्रम निर्माण केले, यशस्वी करून आदिवासी कार्यकर्त्यांच्या हवाली केले,त्याची नुसती ओझरती ओळख करून घेतली तरी, आचार्यांनी आपल्या आयुष्यात कामाचे किती प्रचंड डोंगर उभे केले याची कल्पना येईल .

      *ठाणे जिल्हा आदिवासी विकास मंडळ,1930

      *सरकारी कुळ कायदा काय आहे त्याची माहिती आदिवासींना देण्यासाठी भ्रमंती.1938.

      *सरकारी कायद्यानुसार ,गाव पातळीवर आदिवासी विकास मंडळांची स्थापना.उद्देश, आदिवासी वरील अत्याचाराला त्वरित वाचा फुटावी .1940.

      *’जंगल कामगार सहकारी सोसायटी निर्माण कायद्याप्रमाणे ,सहकारी सोसायट्या स्थापन होऊ लागल्या, त्यामुळे आदिवासींमध्ये, विधायक कार्य करण्याची वृत्ती निर्माण झाली.1944.

       *सहकारी सोसायट्यांच्या धर्तीवर, सहकारी धान्य कोठारे, सहकारी पतपेढ्या ई. सामाजिक उपक्रमाची सुरुवात .1945.

       * ‘एकशिक्षकी’ शाळा निर्माण करण्याच्या, सरकारी कायद्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आचार्यांवर सोपविली.  त्या अनुषंगाने काही ठिकाणी आदिवासी मुला-मुलीसाठी छात्रालये वसतिगृह स्थापन करणे.1946.

        * पुढे याच शाळांचे बहुशिक्षकीय शाळेत रूपांतर करणे.

        *  शाळा, वसतिगृह स्वतंत्र न ठेवता एकत्रित करणे ,हीच ‘ आश्रम शाळा’ .पहिली आश्रमशाळा जव्हार जवळ तलवाडा येथे स्थापन झाली.पुढे अशा अनेक आश्रम शाळा स्थापन करण्यात येऊन,आश्रम शाळेला जोडून आरोग्य केंद्रही सुरू झाले. या सर्व आयोजनाची व्यवस्था आदिवासींनी करावयाची असे ,त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्वगुणाला वाव मिळत गेला .1954.

         *जिल्हावार ‘कृषी विद्यालय’,स्थापन करण्याच्या सरकारी निर्णयानुसार ठाणे जिल्ह्याचे कृषी विद्यालय, गोखले एज्युकेशन सोसायटी व आचार्य भिसे यांचे मार्फत चालावे हे शासनाने ठरविले. त्याप्रमाणे प्रथम बोर्डी शाळेत सुरू झालेले हे विद्यालय पुढे कोसबाड येथील 265 एकर जमिनीवर हलविण्यात आले…1947.

     पुढे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू झालेले डॉ. हरिश्चंद्र पाटील हे या विद्यालयाचे प्रथम प्रिन्सिपल होते.त्यानंतर भारताच्या नियोजन मंडळाचे सदस्य झालेले डॉ. जयंतराव पाटील यांनी या विद्यालयाची धुरा सांभाळली. आदिवासींमध्ये प्रत्यक्ष फिरून त्यांना भात, गहू व मूग या पिकाचे उत्पादन;एका वर्षात कसे घेता येईल याचे शिक्षण देण्यात आले.या  विद्यालयाचे कार्य पाहून,पुणे शेतकी विद्यापीठाने येथे पदव्युत्तर शिक्षणाची मान्यता दिली व एम. एस .सी ( कृषी )ही पदवी येथे प्राप्त करणे, विद्यार्थ्यांना शक्य झाले .

   पहिल्या इयत्तेपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे, ,गरीब आदिवासी मुलाला येथे शक्य झाले, याला कारण त्यामागे असलेली आचार्य भिसे यांची तपश्चर्या व दूरदृष्टी कारणीभूत आहे.

      *तत्कालीन ,आदिवासी कल्याण मंत्र्यांना,आचार्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे ,’महात्मा गांधी जनता विद्यालयाची’, स्थापना झाली.येथे आदिवासी मुलांच्या राहण्याची त्याचप्रमाणे कर्मचार्‍यांसाठी  निवासस्थानाची सोय केली गेली.शेती, पशु संगोपन,वनसंवर्धन व ग्रामोद्योग या प्रमुख विषयांचे प्रशिक्षण देण्यात येत असे.बरोबर प्रात्यक्षिक शिक्षण ही दिले जाई. त्याकाळी अखंड भारतात,आदिवासी युवकांना शेती शिक्षण देणारी ही एकमेव संस्था होती. 1960.

     *’कोसबाड आश्रम शाळेची’ स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर चिंतामणराव देशमुख, माजी अर्थमंत्री भारत सरकार ,यांच्या हस्ते झाले .  त्यावेळी डॉक्टर दुर्गाबाई देशमुख ही हजर…1958.

     *कोसबाड येथे माध्यमिक विद्यालयाची स्थापना 1965.

     * कोसबाड येथे ग्रामपंचायत प्रशिक्षण व सर्वोदय विद्यालय  स्थापन झाले.यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू झाले. सर्वोदय विद्यालयात गांधीजींच्या सर्वोदय तत्त्वप्रणालीवर श्रद्धा असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येई.

      *  कोसबाड येथे पंचायत राज्य प्रशिक्षण केंद्र सुरू.येथे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशिक्षणासाठी येत असत…

      *तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या विनंतीनुसार कोसबाड येथे,’ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राची’स्थापना.जबाबदारी आचार्यांवर सोपविली. डॉ. जयंतराव पाटील यांची या विद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्ती. ग्राम नियोजन, कृषी, पशु संगोपन ,दुग्ध व्यवसाय, सहकार ,आरोग्य हे विषय शिकवले जात.

 भारत सरकारचे माजी अर्थमंत्री,डाॅ.चिंतामणराव देशमुख व आचार्य भिसे,  सुवर्ण महोत्सव जयंती प्रसंगी.

एक सच्चा, निष्ठावान, ध्येयवादी कार्यकर्ता केवळ आपल्या जिद्दीच्या बळावर,स्वतः जवळ, आर्थिक पाठबळ नसताना, आपले सहकारी व शासनाची  मदत या भांडवलावर दुर्गम,ओसाड, दलीत वस्तीमध्ये’ केवळ लोक कल्याणाकारी,  उदंड कामे करून सचोटी व सामाजिक सेवेचा एक मानदंड कसा  प्रस्थापित करू शकतो, याचे भारतातीलच नव्हे तर जगातील हे एक दुर्मिळ उदाहरण आहे ! 

   दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व कामात काही ठिकाणी सरकारी अनुदान घेऊन देखील, सरकारी लेखपालांची,वा ईतर कोणत्याही तपास यंत्रणेची, कधीही विचारणा,चौकशी  झालेली नाही. सहकाऱ्यांच्या,टीकाकारांच्या   मनात शंकेची पाल चुकचुकली नाही ,सर्व व्यवहार कसे चोख व पारदर्शक! सार्वजनिक उपक्रम निर्माण करावयचा, वाढवावयचा, , व आपण योग्य वेळी नामानिराळे होऊन, केवळ एक निरीक्षक म्हणून लक्ष ठेवावयचे ,कोणताही अधिकार स्वतःकडे न ठेवता.. खरेच, आचार्य, तुम्हाला मानाचा मुजरा!! आज सहकारी क्षेत्रात, सार्वजनिक उपक्रमात चालू असलेला आर्थिक गोंधळ पाहता आचार्यांचे जीवन म्हणजे एक आदर्श वस्तुपाठ आहे!

सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे.

परंतु तेथे भगवंताचे ,अधिष्ठान पाहिजे.

 समर्थांची ही ऊक्ती आचार्यांनी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सार्थ करून दाखवली!

आचार्यांच्या  सुंदर व समर्पित कामाच्या कीर्तीचा दरवळ भारतात तर पसरला ..परंतु सातासमुद्रापलिकडे अमेरिकेतही  गेला.अमेरिकन शासनाने आचार्यांच्या कामाची नोंद घेतली. त्यावेळच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने, त्यांच्या,’शांती सैनिकांचे’,(Peace Corp) प्रशिक्षण कोसबाड येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात व्हावे अशी इच्छा प्रदर्शित केली. विशेषतः आदिवासी व आदिवासी विकास या बाबतीत कोसबाड येथे चाललेल्या कामाचा त्यांना विशेष आदर होता.  या बाबतीत दोन महिन्याचे प्रशिक्षण त्यांच्या,’ शांती सैनिकांना’,मिळावे अशी अमेरिकन सरकारची इच्छा होती. दोन महिन्यांचे प्रशिक्षण कोसबाड येथे पूर्ण झाल्यावर ही मंडळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात आपल्या कार्यक्षेत्रात, दोन वर्षे राहून अमेरिकेत परत जाणार होती.

    या शांती सैनिकांनी महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रात दोन वर्षे फार उपयुक्त कार्य केले.त्याची माहिती अमेरिकन सरकारला अर्थातच समजली. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार, श्री जोसेफ ब्लॅचफोर्ड  हे भारतात आले. त्यांनी कोसबाड कृषी संस्थेला भेट दिली.  कोसबाड संस्था व आचार्य भिसे यांचा खास गौरव केला.  डिसेंबर 1970 मध्ये दोन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर, शांती सैनिक अमेरिकेत परत जाण्यापूर्वी, ज्या कोसबाड टेकडीवर आचार्यांनी आदिवासी साठी अनेक उपक्रम सुरु केले, त्या कोसबाड टेकडी वरून परिसराचे दिसणारे हे आजचे विहंगम  चित्र.

त्यांचा निरोप समारंभ कोसबाड कृषी संस्थेत  करण्यात आला. त्यासाठी भारतातील अमेरिकेचे राजदूत श्री केनेथ किटिंग मुद्दाम दिल्लीहून कोसबाड येथे आले. त्यांनी संस्थेला मोठे धन्यवाद दिले. श्री.किटींग यांनी आचार्य भिसे यांनी केलेल्या आदिवासी सेवेचा मोठा गौरव केला.ते म्हणाले,” आचार्यांचे सेवा कार्य पाहूनच आमच्या शांती सैनिकांना आदिवासीत राहून, त्यांची दोन वर्षे सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. एका महान राष्ट्राच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून आचार्यांना मिळालेले हे मोठे प्रशस्तीपत्र  होते !!

      आचार्यांच्या प्रेरणेने कोसबाड येथे 1948 मध्ये कृषी शिक्षण संस्था स्थापन झाली. या संस्थेने गेल्या सत्तर वर्षात कृषी क्षेत्रात आणि आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले अभूतपूर्व काम ,केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता पावले .अनेक पाश्चिमात्य देशांचे उच्च अधिकारी, राष्ट्राध्यक्षांचे प्रतिनिधी, राजदूत येथील कामाची पाहणी करून, प्रशस्ती पत्रके देऊन गेले आहेत.त्यातील श्री.गुंथर डील हे पश्चिम जर्मनीचे राजदूत, यांची भेट उल्लेखनीय होती. त्यानीआचार्यांच्या कामाची प्रशंसा करून प्रत्यक्ष आदिवासी शेतीची पाहणी केली होती. दुसरे ऑक्सफाम कम्युनिटी एड अब्रोड (OXFAM COMMUNITY AID ABROAD) ,या संस्थेचा उल्लेख करावा लागेल . कृषी विकासाचे जे अनेक प्रकल्प चालू होते त्यासाठी, फलोत्पादन व रोपवाटिका तयार करण्यासाठी लागणाऱ्या विहिरी व पंप यांसाठी आर्थिक  मदत,या जगप्रसिद्ध संस्थेने केली आहे. 

         बुद्धी व प्रतिभा ही ईश्वरी देणगी खरी ,परंतु जे काही परमेश्वराने दिले त्याचा उपयोग करून माणसाला घडविणे,  माणुसकी जागवून,गुणसंपन्न करून ,आयुष्याला सामोरे जाण्यास तयार करणे ही गुरुची कर्तबगारी ! खाणीतील हिऱ्याला किंमत नसते पण त्याला पैलू पाडले तर तो अमूल्य ठरतो. आचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी बोर्डीच्या शाळेत विद्यार्थी घडविताना हाच कित्ता गिरवला.अनेक प्रतिभावान विद्यार्थी तयार केले .

   एवढ्यावरच न थांबता आचार्यांनी आजूबाजूच्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी  अहर्निश ,प्रामाणिक  जिवापाड मेहनत घेऊन  हाच कित्ता गिरवत, शोषित, दलित आदिवासीना  सावकारशाहीच्या जोखडातून मुक्त करीत, शिक्षण व सहकाराचे पैलू पाडून ‘नव्या मनूचा नवा आदिवासी’,नागरिक निर्माण केला.या कामाला तोड नाही !

     मी मागे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कार्याचा,  धवल कीर्तीचा परिमळ अगदी सातासमुद्रापार गेला. विशेष म्हणजे ,आचार्यांनी कधीही आपले दिंडीम वाजवावे लागले नाहीत की सरकार दरबारी खेटे घालावे लागले नाहीत, आर्थिक मदतीसाठी, सरकार वा ईतर कोणाची विनवणी करावी लागली नाही. शासनाचे व सरकारचे प्रतिनिधी,मंत्री जातीने आचार्यांकडे बोर्डीला येऊन ,एकाद्या नव्या सरकारी योजनेची जबाबदारी घेण्याची विनंती करत .आचार्यांचा प्रामाणिकपणा व निरलस वृत्तीने काम करण्याच्या प्रवृत्तीला ही मानवंदनाच होती !

   याचे एक उत्तम उदाहरण, वाकी,डहाणू येथील फलोत्पादन रोपवाटिका प्रकल्प व  आश्रम शाळा होय.ती कहाणी मोठी अद्भुत आहे!!

    त्या काळातील महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्रीयुत बाळासाहेब देसाई यांचे कानावर,,  कोसबाड व आचार्य भिसे यांच्या महान कार्याची कीर्ती, आली होती. आचार्यांच्या या कामाला शासनाकडून काही भरीव मदत करावी या हेतूने त्यांनी, तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर श्री .गोखले यांना,योग्य सरकारी जमिनीची पाहणी करून,कोसबाड संस्थेला भेट देऊन ,एक शिफारसवजा अहवाल तयार करण्यास पाठविले होते.गोखले साहेबांच्या अहवालानुसार कोसबाड संस्थेच्या बाजूस असलेल्या वाकी येथील प्रकरणातील,  35 एकर जमिनीपैकी, वीस एकर जमीन कृषी संस्थेस मंजूर करावी अशी शिफारस  होती. त्याप्रमाणे एके दिवशी आचार्य व डॉ. जयंतराव पाटील ,यांना बाळासाहेबांकडून त्यांच्या कार्यालयात भेट देण्याचे निमंत्रण आले.भेटीत ,मंत्री महोदय त्यांना म्हणाले “आपणा दोघांचेही कार्य मला माहित आहे.  आपल्या संस्थेला काही जमीन द्यावी व तिचा उपयोग आदिवासींच्या कृषी व शैक्षणिक विकासासाठी व्हावा अशी माझी इच्छा आहे.” कलेक्टरांच्या फाईलवर बाळासाहेब सुमारे दहा मिनिटे काही शेरा लिहीत होते.,ती फाईल आचार्य भिसे यांच्या हातात देत म्हणाले,”कलेक्टरांनी एकूण 35 एकर जमिनीपैकी 20 एकर जमीन आपणास द्यावी अशी शिफारस केली आहे. माझ्या अखत्यारीत ही संपूर्ण 35 एकर जमीन, आपल्या या समाजोपयोगी,कार्यासाठी शासनाकडून मदत ,म्हणून देत आहे”. 

    याच जमिनीवर पुढे वाकीची प्रसिद्ध फलोत्पादन वाटिका तयार झाली .कालांतराने एक बालवाडी व पाळणाघरासहित,एक सुंदर आश्रम शाळादेखील सुरू करण्यात आली. आदिवासी महिला मजुरीवर जाताना आपली तान्ही बाळे  या पाळणाघरात ठेवतात. त्यामुळे त्यांच्या मोठ्या भावंडांना बालवाडीत जाऊन शिक्षण घेता येते. या रोपवाटिकेतील रोपे,लहान मुलांसाठी  पाळणाघर,आश्रम शाळेमुळे डहाणू , बोर्डी, घोलवड परिसरांतील किती तरी आदिवासी कुटुंबांचे कल्याण झाले.हा प्रकल्प येथील दलीत,गरीब समाजासाठी एक परमेश्‍वरी वरदहस्त ठरला.

 सरकार दरबारी,अगदी,ऊच्च पातळीवर,आचार्यांच्या  प्रतिष्ठेचा, सचोटीचा किती सन्मान होत असे याचे हे अगदी दुर्मिळ उदाहरण !

 वाकी येथील या आश्रमशाळेचे व पाळणाघराचे कार्य पाहण्यासाठी देशभरातून अनेक मोठे पाहुणे येत असतात. विशेष म्हणजे त्यासाठी एकदा ,श्री. विश्वनाथ प्रताप सिंग व श्री. चिंतामणी पाणिग्रही जे त्यावेळी  खासदार होते, कोसबाड येथे येऊन गेले .श्री. विश्वनाथ प्रताप सिंग हे त्यानंतर भारताचे पंतप्रधान  झाले. हे कार्य बघून ते अत्यंत प्रभावित झाले .त्यांनी आचार्य भिसे यांच्या सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला.उदात्त व पवित्र कार्यासाठी मदत कशी व कुठून उपलब्ध होते, कोणतीच अपेक्षा नसताना,सरकार दरबारी नोंद घेतली जाऊन, गरजेपेक्षाही जास्त मदत मिळून,अशा कार्याला परमेश्‍वरी चालना कशी मिळते,…सारेच अगम्य,अविश्वसनीय!

भारताचे माजी संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कै.यशवंतराव चव्हाण यांचेबरोबर आचार्य भिसे आणि बोर्डी चे कार्यकर्ते कै.ठाकोरभाई शहा, कै.शामराव पाटील व कै.दीनानाथ चुरी.

 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर 27 गावे असलेला नवीन तलासरी तालुका महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर निर्माण झाला. या आदिवासीबहुल तालुक्यात एकही माध्यमिक विद्यालय नव्हते. आचार्य भिसे यांनी 1961 साली, तेथे माध्यमिक विद्यालय स्थापन केले. विद्यालयास इमारत नव्हती. आचार्यांनी तलासरी येथील आपल्या आश्रमातील जागा उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांना वसतिगृहाची आवश्यकता होती. तेथेही आचार्यांनी वसतिगृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. या विद्यालयाचे व्यवस्थापन देखील गोखले एज्युकेशन सोसायटीचे बोर्डी केंद्र करीत असे. या तालुक्यातील हे पहिले माध्यमिक विद्यालय असल्याने, आचार्य भिसे यांनी ते आदर्श करण्याचे ठरविले. राष्ट्रीय महामार्गालगत जी शासकीय जमीन होती ती विद्यालयाच्या इमारती व क्रीडांगण यासाठी मंजूर करण्यात यावी, अशी महाराष्ट्र शासनाला विनंती केली. शासनातील काही अधिकाऱ्यांची, अशी ‘मौल्यवान जमीन, विद्यालयासाठी दान देण्यास विरोध होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री, श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या कानावर ही गोष्ट जाताच, यशवंतरावांनी आचार्यांची ही विनंती मान्य करून ही जमीन मंजूर केली. आचार्यांच्या निरलस व निर्मळ कामाला, सरकारकडून पुन्हा एकदा मिळालेली ही पावती होती.या विद्यालयास,”ठक्कर बाप्पा विद्यालय”, असे नाव दिले गेले.ठक्करबाप्पा हे भारतातील आदिवासींचे पितामह म्हणून गणले जातात. आपले सारे जीवन यांनी आदिवासी सेवेसाठी समर्पित केले होते. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत (एन सी सी),मुंबईतील अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थी ,ग्रामविकासाचे व श्रमदानाचे काम करण्यासाठी तलासरी येथे येत असत. त्यांच्या निवासाची व्यवस्था ठक्करबाप्पा विद्यालयात होत असे. या विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांतून विधायक नेतृत्व निर्माण झाले आहे. येथे शिक्षण घेतलेल्या ,अनेक आदिवासी तरुणांनी,पदवी प्राप्त केल्यानंतर ,शहरात न जाता, आदिवासी सेवेस वाहून घेतले आहे. त्यापैकी काही भारतीय संसदेत,महाराष्ट्र विधानसभेत,पंचायत समित्या, जिल्हा परिषद, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योगदान दिले.समाजाच्या अनेक क्षेत्रात पुढे येऊन आपले व आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.त्यापैकी श्री चिंतामण वनगा या, माजी विद्यार्थ्याचा, मुद्दाम उल्लेख करावा लागेल. त्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर शहरात न जाता आदिवासी सेवेस वाहून घेतले व पुढे भारतीय संसदेत खासदार म्हणून ते निवडून आले.

आचार्य विनोबा भावे यांनी 1951 मध्ये आंध्रप्रदेशात भूदान चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. पुढे त्यांनी देशात भूदान पदयात्रा करून सुमारे चाळीस लाख एकर जमीन दान मिळविली. भारतात हा एक चमत्कार होता. विनोबांच्या भूदान ग्रामदान चळवळीद्वारे ठाणे जिल्ह्यातील आदिवासींचा विकास होऊ शकेल या विचाराने आचार्य भिसे यांनी ठाणे जिल्ह्यात भूदान ग्रामदान पदयात्रेला प्रारंभ केला. या पदयात्रेत त्यांना खूप छान प्रतिसाद मिळाला.अनेकांनी आपल्या जमिनी अनुदानात अर्पण केल्या. आचार्य भिसे यांनी या जमिनीचे भूमिहीन आदिवासींना वाटप केले. त्यांच्या उत्पन्नाचे ते एक साधन झाले. विनोबाजींना जेव्हा हे समजले तेव्हा  त्यांना मोठा आनंद झाला आणि आचार्यांचे हे काम पाहण्यासाठी देशपातळीवरील अनेक सर्वोदय नेत्यांना त्यांनी आचार्यांकडे पाठविले. त्यात श्री .जयप्रकाश नारायण ,श्रीमती प्रभावती नारायण, श्री .शंकरराव देव ,आचार्य दादा धर्माधिकारी ,इत्यादी महान नेते होते.महाराष्ट्रातील भूदान, ग्रामदान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून आचार्य भिसे यांनी बोर्डी येथे सर्वोदय संमेलने आयोजित केली होती. एका संमेलनात लोकनायक जयप्रकाश नारायण स्वतः आले होते. त्यांनी आचार्य भिसे यांच्या ग्रामदान कार्याचे कौतुक करुन त्यांना धन्यवाद दिले.

भाग -२ पुढे…