“बोर्डीचे साने गुरुजी” – आप्पा साने सर! भाग पहिला

   बोर्डीचे सानेगुरुजी – कै.आप्पा साने सर (१६ एप्रिल १९०७ -१३ एप्रिल १९९७)

     “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” हा मानवतेचा मंत्र देणारे साने गुरुजी. समाजकारण, राजकारण, साहित्य निर्मिती, पत्रकारिता, सामाजिक तत्त्वज्ञान, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रांत भरीव व विधायक कामगिरी करून मातृत्व आणि क्षमाशीलता याचे नवे परिमाण स्वत:च्या उदाहरणाने जगासमोर ठेवणारे साने गुरूजी! साने गुरुजी नियतीची मानवतेला दिलेली अलौकिक देणगी होती! १८९९ मध्ये जन्माला आलेल्या साने गुरुजींनी वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षीच आपली जीवनयात्रा संपवली. पण त्यांच्या कर्तृत्वाच्या छटा आजही महाराष्ट्रातील पिढ्यांवर पाहायला मिळतात, ही त्यांची थोरवी.

    कै. साने गुरुजींचे शैक्षणिक मार्गदर्शन आम्हा बोर्डी हायस्कूलातील मुलांना मिळू शकले नाही. मात्र त्यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बोर्डी शाळा व शारदाश्रमाच्या प्रांगणात आम्हाला वावरता आले. ती पवित्र माती आम्ही भाली लाविली. साने गुरुजींहून आठ वर्षांनी लहान असलेले त्यांचे बंधू श्री. पुरुषोत्तम साने उर्फ आप्पा साने यांच्या वर्गात बसून इंग्रजी, गणित, भूगोल विषयाचे धडे आम्ही गिरविले. हे आमचे भाग्यही नसे थोडके!     

     आप्पा साने सर, बी एस सी, बी  टी, झाल्यावर बोर्डीत शिक्षक म्हणून रुजू होण्याआधी कै.साने गुरुजींचे वास्तव्य  कधीतरी बोर्डीस होत असावे . एक काँग्रेस कार्यकर्ता व आचार्य भिसे गुरुजींच्या प्रभावामुळे साने गुरुजी अधून मधून बोर्डीस येत. बोर्डी गाव त्यांना खूप आवडे. गुरुजींचे ‘आपण सारे भाऊ’ हे पुस्तक बोर्डीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेले आहे. आप्पांनी शिक्षकी पेशा स्वीकारण्याचे ठरविल्यावर त्यांना बोर्डी गावाची निवड करण्यात कदाचित गुरुजींचे बोर्डी वरील प्रेम व आचार्य भिसे – चित्रे यांच्याशी त्यांचा असलेला परिचय हे ही कारणीभूत असू शकतील .

       ‘आपण सारे भाऊ ‘ या पुस्तकात(पृष्ठ 51) गुरुजींनी केलेली बोर्डी गावाची प्रशंसा वाचून बोर्डी  गावावरील त्यांचे प्रेम दिसून येते. आम्हा बोर्डी-घोलवडकर मंडळींना त्या ओळी वाचून निश्चितच आनंद होईल म्हणून त्या खाली तशाच देत आहे. गुरुजींनी लिहिले आहे..

      ‘बोर्डी गाव अतिसुंदर आहे. समुद्रतीरावर तो वसला आहे. जमीन अती सुपीक आहे. बोर्डी आणि घोलवड दोन्ही जवळ जवळ गावे. बोर्डी घोलवडचे चिकू सा-या मुंबई प्रांतात प्रसिध्द आहेत. नद्या समुद्राला मिळायला आलेल्या आहेत. त्या नद्यांचा गाळ शेकडो वर्ष वाहत येऊन त्या गाळाने ही जमीन बनली आहे. त्यामुळे ती समृध्द आहे. उद्योगी लोकांनी येथे चिकूच्या प्रचंड वाड्या केल्या आहेत. लाखो रुपयांचे चिकू तेथून जातात आणि भाजीपालाही येथून मुंबई-अहमदाबादकडे जातो. तोंडल्याचा व्यापार करुन अनेक लोक येथे सुखी झाले. बोर्डीचे लोक मेहनती आहेत. नाना प्रयोग करणारे आहेत. आंब्यांचे शेकडो प्रकार त्यांनी लाविले आहेत.’

    ‘बोर्डी व घोलवड या दोन्ही गावांमध्ये इंग्रजी शाळा व तिचे शारदाश्रम या नावाने प्रसिध्द असलेले छात्रालय ही वसली आहेत. समोर अपार समुद्र रात्रंदिवस उचंबळत असतो. येथल्या समुद्रकिना-यासारखा समुद्र किनारा क्वचित कोठे असेल. जेव्हा ओहोटी असते, तेव्हा समुद्र मैलच्या मैल आत जातो आणि सारखे, सपाट असे ईश्वराचे विशाल अंगण तेथे दिसत असते. कोठे खाचखळगा नाही. वाळूचे ओलसर मैदान!’

 ‘शारदाश्रमा’समोर बोर्डीचा सुंदर सागर व विविध रंगांनी नटलेला समुद्रकिनारा.

     ‘आफ्रिकेतील हिंदी व्यापा-यांनी बांधून दिलेले ते समोरचे ‘ट्रान्सवाल हिंदी व्यायाममंदिर’, आणि व्यायाममंदिराच्या बाहेर मुलांसाठी ठेवलेली ती नानाविध क्रीडासाधने. तिकडे समुद्र नाचत असतो आणि इकडे मुले झोके घेत असतात! वारा त्यांना साथ देत असतो. अशा निसर्गरम्य स्थानी शारदाश्रम छात्रालय होते. लांबलांबची मुले त्या छात्रालयात राहात होती. आईबाप विश्वासाने मुले ठेवीत आणि घरच्यासारखी खरोखरच येथे त्यांची काळजी घेण्यात येई.’

आपला लहान भाऊ अशा बोर्डीतील विद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीतआहे,विशेषतः आचार्य भिसे, आचार्य चित्रे यांच्या सान्निध्यात, त्यांच्या मार्गदर्शनाने त्याच्या संपूर्ण जीवनाचे सार्थकच होईल हीच त्यांची भावना असावी .आप्पा साने सर 1937 सालच्या ऑगस्ट महिन्यात बोर्डीत रुजू झाले. त्यांच्या जीवनातील एक सुंदर नवे पर्व बोर्डीत सुरू झाले.

  शाळेतील आपल्या कार्यालयात कामात व्यग्र असलेले कै. आप्पा साने सर.

     मी 1955 साली बोर्डी  हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत  दाखल झालो तेव्हा  साने सर आम्हाला भूगोल विषय शिकवीत. मुख्याध्यापक असल्याने  काही ठराविक वर्गावरच ते तास घेत असत. मात्र त्यांच्या भूगोलाच्या पिरियडच्या वेळी  इंग्रजीचा  काव्यास्वादही आम्हाला मिळे. कारण इंग्रजी वाड्मयाचे  त्यांचे अफाट वाचन होते. तो विषय त्याच्या आवडीचा होता. वर्गात शिकवितांना त्यांची गाडी भूगोल विषयाचे रूळ बदलून इंग्रजी काव्याकडे कधी येई ते त्यांनाही समजत नसे व आम्हालाही!  जे काही शिकवीत  ते ऐकत रहावे असे वाटे. त्यांचे शिकवणे नेहमीच धीर गंभीरआवाजात तरीही विषयाशी तादात्म्य पावलेले असे. त्यांचा स्वभाव रोखठोक होता. व्यवहारी होते. अनेक बाबतीत ज्येष्ठ बंधू साने गुरुजींची त्यांचे साधर्म्य होते तरी काही बाबतीत गुरुजींपेक्षा ते वेगळे होते. साने गुरुजी उदार मानवतावादी, अति आदर्शवादी, तर आमचे साने सर व्यवहारी, स्पष्टवक्ते व तसे करताना कोणास दुखावले गेले तरी त्याची खंत न करता आपल्याला योग्य वाटेल तेच करणारे होते. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी कोणतेही सहाय्य करतांना तितकेच कनवाळूही  होते!

     मला एक प्रसंग अगदी स्पष्ट आठवतो १९५६ साल होते व मेलबर्न ऑलिंपिक सामने ऑस्ट्रेलियात सुरू होते. भारतीयांना फक्त ऑलिंपिक हाॅकीचे एकमेव सुवर्णकप भारताला मिळते की नाही यातच गम्य होते. अंतीम  सामना भारत पाकिस्तान असा होता. पाकिस्तानी संघही तितकाच तुल्यबळ असल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली होती. ज्या दिवशी अंतिम  सामन्यात भारताने पाकिस्तानचा एकमेव गोलने पराभव करीत  हॉकीतील सुवर्णपदक मिळविले, त्या दिवशी दुपारी रेडिओवर तशी बातमी आली. ताबडतोब आमचे एस. आर. सावेसर शाळेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सर्व वर्गांत, वर्ग चालू असतानाच, प्रत्येक वर्गाबाहेर व्हरांड्यात उभे राहून ” भारताने पाकिस्तानचा एकमेव गोलने पराभव करून सुवर्णपदक जिंकले !” ही आनंदाची बातमी प्रत्येक वर्गाला सांगत, वाऱ्यासारखे धावत होते. सावे सर हाडाचे खेळाडू होते. ही आनंदाची बातमी मुलांना देताना उशीर का करावा ही त्यांची प्रामाणिक भावना होती. त्यावेळी आमच्या वर्गावर साने सर भूगोलाचा पिरियड घेत होते. सावेसरांनी ही  दोन वाक्ये बोलून पटकन दुसऱ्या वर्गाकडे कूच केले. मात्र सानेसर क्षणभर स्तब्ध झाले.”It’s a good news.. but ..he should have asked for my permission..”, असे काहीसे स्वतःशीच म्हणाले. नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पुढे कदाचित सावेसरांच्या कानावर  ही बातमी गेली असावी व त्यांनी सानेसरांची माफीही मागितली असेल, मला कल्पना नाही. दोघेही महान गुरु व मोठ्या मनाची माणसे होती. मात्र आपल्याला जे आवडले नाही ते स्पष्ट सांगण्याचे धरिष्ट्य सानेसरांजवळ होते हे त्या दिवशी आम्हाला जाणवले! मला सानेसर विशेष आठवणीत राहिले आहेत ते मी शाळा सोडल्यानंतर, सहा वर्षांनी शाळेत गेलो असता घडलेल्या एका प्रसंगामुळे! त्या दिवसात शिक्षण संपल्याने मी नोकरीच्या शोधात असताना शाळेत चित्रेसरांची भेट झाली. गुरुजींनी मला “गोदरेज  कंपनीचे जनरल मॅनेजर, आचार्य भिसेना भेटण्यास शाळेत आलेले आहेत .त्यांच्याकडे तू एक अर्ज लिहून दिल्यास तुझे काम होऊ शकेल” अशी सूचना केली. अर्ज लिहून मी आचार्यांच्या कडे गेलो असता, त्यांनी त्यावर नजर फिरवून मला सांगितले,”बाळ, हा अर्ज तू साने सरांना दाखवून त्यांचेकडून दुरुस्त करून, टाईप करून घे!”

        आचार्यांचा धीरगंभीर आवाज व निर्विकार चेहऱ्यावरून मी नक्कीच त्या अर्जात इंग्रजीची ‘ ऐशी की तैशी’ केली आहे हे मला जाणवले. घाबरत घाबरतच सानेसरांच्या खोलीत गेलो.  सेवानिवृत्त झाले असूनही सर नंतर काही काळ 1970 पर्यंत, सोसायटीच्या आग्रहामुळे सीनियर टीचर म्हणून शाळेत योगदान देत होते. काहीतरी टायपिंगचे काम करत बसले होते. ते उत्तम टायपिंग करीत व शाळेचा महत्त्वाचा पत्रव्यवहार स्वतः करीत.

   साने सरांकडे गेल्यावर त्यांना आचार्यांचा निरोप सांगून अर्ज त्यांच्या हाती दिला. मला अधिक काहीही न विचारता अर्ज टाईप करून दिला. अर्थातच सर्व चुका त्यांनी दुरुस्त केल्या होत्या. साने सर त्या काळात उत्तम टायपिंगही करीत असत. मला आज आठवतात  त्या त्यांच्या उंचावलेल्या भुवया व चेहऱ्यावरील भाव, जे मला सुचवित होते… “एवढी वर्षे मी तुला  इंग्रजी शिकवून शेवटी.. हेची फल काय  मम तपाला..”?

    त्या  दिवशी मला कळले, ‘इंग्रजी विषयाचे परिक्षेतील मार्क आणि त्या भाषेचा व्यवहारिक उपयोग यात खूप अंतर आहे .. हे आता शिकावे लागेल..’ मी पुढे तसे प्रयत्न केले.

     काहीही असो, मात्र साने सरांनी टाईप करून दिलेला अर्ज आचार्यांकडे दिला व त्यांच्या शिफारशीमुळे पुढे माझे काम झाले. माझ्या पहिल्या नोकरीत कै. साने सरांचाही असा वाटा आहे हे मी कृतज्ञतापूर्वक सांगू इच्छितो.

डावीकडून, श्री दुगल सर ,श्री साने सर, डॉ. पाठक श्री एस पी गोदरेज, डॉ.पद्मश्री हरिश्चंद्र पाटील. मागे, आचार्य भिसे व मुकुंदराव सावे. गोदरेज टेक्निकल स्कूल उद्घाटन

   सेवानिवृत्तीनंतर  सर बोर्डी सोडून मुंबईत गोरेगाव येथे राहावयास गेल्याचे कळले. त्यांचा संपर्क संपूर्णपणे तुटला. मलाही सानेसर बोर्डी सोडून मुंबईस गेल्यानंतर एकदाच मुंबईत गोरेगावमधे भेटले.

     मी अधून मधून गोरेगाव पूर्व येथील पांडुरंग वाडीत माझ्या मित्रांकडे जात असे. असेच एकदा गेलो असताना गोरेगाव पूर्वेस स्टेशनला समांतर रस्त्यावर मला साने सर भेटले. मला वाटते ते 1990 साल असावे . थकले होते मात्र स्मरणशक्ती छान होती . मी नमस्कार करून माझे नाव व बोर्डी गाव सांगितले.  त्यांनी टाईप करून दिलेल्या त्या अर्जाची आठवण करून दिली व मला त्वरित नोकरी कशी मिळाली हेही सांगितले. “अरे ते आचार्यांचे श्रेय आहे, त्यांनी तुला माझ्याकडे पाठवले होते ना?” असे पटकन म्हणाले. मलाही आश्चर्य वाटले. पांचेक मिनीटे काही गप्पा केल्या. सरांना वाकून नमस्कार केला. त्यांनी पाठीवर थाप मारून शाबासकी दिली. व निघालो.  त्यांची माझी हीच अखेरची भेट!  

     श्री. पुरुषोत्तम सदाशिव साने यांचा जन्म  रत्नागिरी जिल्ह्यातील  दापोली तालुक्यात पालगड गावी झाला. 16 एप्रिल 1907 हा त्यांचा जन्मदिवस! त्यांना त्यांचे आप्त, कुटुंबीय आप्पा म्हणत.हे साने कुटुंब त्या दिवसात खूप सुखी समाधानी होते. दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचा, सदाशिवराव यांचा  अकाली मृत्यू झाल्याने पुढे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. कै. पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरूजी हे त्यांचे ज्येष्ठ बंधू होत. आप्पांचे प्राथमिक शिक्षण पालगड या गावीच झाले .पुढे हायस्कूल शिक्षणासाठी त्यांना पुणे आणि बडोदा येथे जावे लागले. मॅट्रिक्युलेटची परीक्षा 1926 साली पास झाले. त्यानंतर त्यांनी इंटरमिजिएट सायन्स परीक्षा मुंबई युनिव्हर्सिटीतून 1928  साली उत्तीर्ण होऊन  ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात बी एससी अभ्यासक्रमासाठी दाखल झाले.  आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना कॉलेज सोडून द्यावे लागले. त्यांनी  मुंबईत भारत सरकारच्या हवामान खात्यात नोकरी पत्करली.

         आप्पांचे  ज्येष्ठ बंधू व ‘महाराष्ट्र-माऊली’ साने गुरुजी.

   1935 साली थोडी पैशाची जमवा जमव झाल्यावर ,त्यांनी ही नोकरी सोडून पुन्हा महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1937 साली ते पदवीधर होऊन त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात  बोर्डीच्या सुनाबाई पेस्तनजी  हकीमजी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले.  पुढे 1939 साली ते बी टी परिक्षा उत्तीर्ण झाले.

     त्यांच्या सुदैवाने या शाळेत त्यावेळी आचार्य भिसे ,आचार्य चित्रे यासारख्या दिग्गज शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. या दोन आचार्यांनीच त्यांच्या भावी आयुष्याचा पाया घातला असे ते नेहमी म्हणत. आपली सबंध शिक्षकी  कारकीर्द त्यांनी बोर्डी शाळेतच व्यतीत केली . त्यांना शिक्षकी पेशाची मनापासून आवड होती . सरकारी नोकरी सोडून आपण शिक्षक झालो याचा त्यांना आयुष्यात कधीही पश्चाताप झाला नाही. त्या काळी त्यांना सरकारी खात्यात वा इतर कोठेही चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकली असती. मात्र त्यांनी त्याचा मोह न धरता बोर्डी शाळेत या दोन आचार्यांच्या सहवासात आनंदाने काम केले. “मी अनेक उत्तम विद्यार्थी  निर्माण करू शकलो, हीच माझ्या आयुष्याची मोठी कमाई” असे त्यांना वाटे. आयुष्यभर  फक्त शिक्षणदानाचे कार्य चालू ठेवले याचा त्यांना गर्व होता. विशेषतः या भागातील अनेक दुर्बल व आदिवासी, अशिक्षित मुलांसाठी त्यांनी केलेले कार्य हे त्यांना नेहमी समाधान देई.

      साने सरांना मुलांच्या संगतीत राहणे खूपच आवडे. शारदाश्रमांतील विद्यार्थ्याबरोबर कधीकधी विविध खेळाचा आनंदही ते उपभोगीत. 

  चित्रे गुरुजींच्या सेवानिवृत्तीनंतर 1957 साली, साने सरांनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम केले . बोर्डी शाळेत अत्यंत निष्ठेने काम करून सानेसर 1962 साली सेवानिवृत्त झाले .

   आपले हायस्कूलमधील जबाबदारीचे काम सांभाळूनही  त्यांनी,’ ठाणे जिल्हा सेकंडरी टीचर्स असोसिएशन’चे सदस्य म्हणून  अनेक वर्षे काम केले .तसेच ‘मुंबई सेकंडरी टीचर्स असोसिएशन फेडरेशन’चेही ते कार्यकारिणी सदस्य होते. शारदाश्रमांतील आजारी विद्यार्थ्यांची सेवा सुश्रुषा करणे यात त्यांना खूप आनंद होई. ही मुले आपल्या आई-वडिलांपासून दूर असल्याने त्यांना आई-वडिलांची आठवण होऊ नये असे त्यांना नेहमी वाटे.

   सरांना  प्रवासाचीही खूप आवड होती. शारदाश्रमातर्फे जाणाऱ्या प्रत्येक सहलीत ते आत्मियतेने सहभागी होत. बहुतेक सर्व भारत त्यांनी फिरून पाहिला होता.

  त्यांचे विशेष आवडीचे विषय म्हणजे इतिहास, भूगोल, इंग्रजी आणि गणित हे होते. मात्र  खगोलशास्त्राची त्यांना आवड होती. काही वर्षे ते एस एस सी एक्झामिनेशन बोर्ड महाराष्ट्र राज्याचे निर्वाचित सदस्यही होते .

   घरासमोरील बोर्डीचा समुद्रकिनारा ,मागील पर्वतराजी आणि चिकू केळ्यांच्या बागा त्यांना खूप आवडत . बोर्डी गाव, बोर्डी शाळा आणि बोर्डीच्या निसर्गावर त्यांचे खूप प्रेम होते. कारण त्यांना येथे शांत आणि सुंदर जीवन जगण्यास मिळाले. आचार्य भिसें ,चित्रे गुरुजी तसेच प्रि.आत्माराम सावे या त्रिमूर्तीबद्दल त्यांच्या मनी सदैव आदरभाव होता.

             रत्नागिरीतील दापोली गावातील श्री. पुरुषोत्तम साने, जेष्ठ बंधू साने गुरुजी अमळनेर शाळेत शिक्षक असताना ,स्वतः बोर्डी शाळेत का व कसे आले? हा प्रवास किती खडतर होता आणि येथे आल्यानंतर त्यांना बोर्डी गाव, शाळा कशी वाटली? शेवटी बोर्डी सोडताना  “माझे जीवन सार्थकी लागले..” असे ते का म्हणाले, हे सर्व जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती मात्र ही माहिती कशी मिळवावी हा मोठा प्रश्न होता .सुदैवाने माझे मित्र श्री. वसंत चव्हाण, बोर्डी यांनी मला श्रीमती सुधाताई बोडा- साने, सानेसरांची पुतणी, यांचा दूरध्वनी  क्रमांक देऊन माझा मोठा प्रश्न सोडविला .सानेगुरूजींची सुधास लिहलेली,”सुंदरपत्रे”, आपल्याला माहित आहेत. त्या सुधाताई सध्या बडोद्यास असतात. वयाच्या नव्वदीत आहेत. मी वसंतरावांचा संदर्भ देऊन त्यांना फोन केला. सुदैवाने त्यांनी या वयातही कोणतेही आढेवेढे न घेता, त्यांना आठवत असलेली आपल्या आप्पांबद्दलची माहिती देण्याचे कबूल केले. शालेय जीवनातील चार वर्षे त्या आप्पांकडे राहिल्या .”त्याचे मुळेच आपल्याला बाह्य जगाचे दर्शन होऊ शकले” असे त्या  कृतज्ञतेने म्हणतात .त्यांच्या आठवणी , या लेखाचा दुसरा भाग म्हणून मी स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या आहेत. माझ्या प्रश्नांची उत्तरे सुधाताईंच्या या लेखात मिळतील.

कै.सानेसरांनी बोर्डी हायस्कूलमध्ये शिकविलेल्या त्या जुन्या पिढीतील त्यांचे फार थोडे विद्यार्थी आज हयात आहेत .त्यापैकी एक माझे मामा श्री. केसरीनाथ सावे, बोर्डी.  ते देखील आता वयाने नव्वदीच्या आसपास आहेत. मामांजवळ मी सानेसरांचा विषय काढला व त्यांच्या शालेय जीवनातील काही आठवणी सांगण्याची विनंती केली. बोर्डी हायस्कूल, सानेसरांचा विषय निघताच  मामांची कळी खुलली. नुकत्याच घडून गेलेल्या घटनेचे वर्णन ज्या तन्मयतेने करावे, तसे त्यांनी आपल्या गुरुवर्यांच्या आठवणी सांगितल्या…

     मामा हायस्कूलमध्ये असताना  9 व्या इयत्तेत वर्गशिक्षक सानेसर होते. मामा  हुशार, अभ्यासू आणि मेहनती विद्यार्थी होते. सानेसर शिकवीत असलेल्या इंग्रजी विषयांत त्यांना नेहमी चांगले गुण मिळत. मात्र त्यांची वर्गात हजेरी खूपच कमी असे. हे सानेसरांच्या लक्षात आले होते. त्यांनी मामांना बोलावून वर्गातील गैरहजेरीचे कारण विचारले. 

      “सर, मी मोठा मुलगा. माझी भावंडे लहान. वडिलांना त्यांच्या शेती व्यवसायात मला मदत करावी लागते. म्हणून कधी कधी  शाळेत येणे जमत नाही..” असे साधे सरळ व प्रांजल उत्तर त्यांनी दिले.

   “तुझ्या वडिलांना मला भेटण्यास सांग” असा निरोप सरांनी दिला. वडिलांना मामांनी हा निरोप दिला असता, साने सरांना भेटण्यास वडील धजावले नाहीत.  “मी एस आर-सावें सरांशी बोलतो, तू काळजी करू नकोस” असे सांगून वडिलांनी मामांची समजूत घातली. पुढे नक्की काय झाले मामांना माहित नाही. काही दिवसांनी पुन्हा साने सरांनी, “तू  मला घरी भेटण्यासाठी ये” असे मामांना सांगितले. आता मामा धास्तावले.  बहुतेक आता सरांकडून आपली ‘धुलाई’ होणार असेच मामांना वाटले. आपल्या काही मित्रांना त्यांनी ही गोष्ट सांगितली. मित्रांनी मामांना धीर दिला, “अरे अजिबात घाबरू नकोस, सानेसर जेव्हा कोणा विद्यार्थ्याला घरी बोलावतात ते शाबासकी देण्यासाठीच, ओरडण्यासाठी शिक्षा करण्यासाठी  नव्हे! तू खुशाल सरांना घरी जाऊन भेट”  

एके दिवशी घाबरत घाबरत मामा साने सरांच्या घरी पोहोचले. साने सर घरी होते. मामा म्हणतात, माझ्या पाठीवर हात ठेवत प्रेमाने सर जेव्हा म्हणाले “तू आलास, बरे केलेस…” माझी सर्व भीती पळाली.  मी स्वस्थ झालो. त्या दिवशी सरांनी सांगितलेले ते प्रेमाचे चार शब्द माझ्या अजूनही लक्षात आहेत.सर म्हणाले, “तू हुशार आहेस, तुझे इंग्रजी ज्ञान चांगले आहे. तेव्हा  शक्यतो शाळेत जास्तीत जास्त हजर राहण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे तुझा इंग्रजी विषय चांगला होऊन इंग्रजी विषयात व एकूणच मॅट्रिक परीक्षेत अधिक गुण मिळतील. . तुझ्या भावी आयुष्यात, नोकरी-उद्योगात तुला फायदाच होईल. वडिलांना त्याप्रमाणे तू समजावून सांग. शाळेतील उपस्थिती वाढव”.

   मामा म्हणतात,”त्या दिवसापासून  मी वडिलांना समजाविले. माझी वर्गातील उपस्थिती वाढवली, अभ्यासही केला आणि एस एस सी खूप चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो. विशेषतः इंग्रजीत वर्गात सर्वोच्च मार्क मिळविले. याचे श्रेय साने सरांनी त्या दिवशी मला केलेल्या समुपदेशनामुळेच शक्य झाले असे मला वाटते!”

      मामांच्या मनात आजही कै.सानेसरांविषयी एक हळवा कोपरा आहे. मामा एसएससी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले तरी परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत. मात्र इंग्रजी विषय पक्का झाल्याने स्पर्धात्मक परिक्षेत वरच्या नंबराने  उत्तीर्ण होऊन भारतीय रेल्वे खात्यात त्यांना त्वरीत  चांगली नोकरी  मिळाली. 

   त्यांची नेमणूक  दाहोद  या गुजरातमधील स्टेशनवर झाली. साने सरांना भारतातील एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून” राष्ट्रपती पदक” मिळाल्याचे मामांना  कळले होते. सरांचे  अभिनंदन करावे असे त्यांच्या मनात होते.  कर्मधर्म संयोगाने दिल्लीहून येणारी सरांची गाडी दाहोदला थांबणार होती. त्याप्रमाणे  मामांनी दाहोद स्टेशनवर सरांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पुष्पगुच्छ दिला. वंदन केले. साने सरांना आपल्या या हुशार व मेहनती विद्यार्थ्यांची आठवण होतीच. आपला माजी विद्यार्थी खास आठवण ठेवून, महाराष्ट्राबाहेर आपणास भेटण्यास येत आहे, याचे त्यांना खूप अप्रुप वाटले!!

नव्वदीतील  एका विद्यार्थ्याने 70, 75 वर्षांपूर्वी शाळेत घडलेली एक घटना स्मरणात ठेवून आपल्या प्रेमळ गुरूंची  आठवण जपावी हे त्या दोघांनाही भूषणावह आहे. सरांचे आज  हयात असलेले कित्येक विद्यार्थी त्यांनी शिकविलेले विषय व ते शिकविताना दिलेले प्रेम व संस्कार यांची आठवण ठेवून, कृतज्ञता व्यक्त करीत असतील!

      सर कधीही विद्यार्थ्याला शाळेत, ऑफिसमध्ये अथवा टीचर रूममध्ये न बोलाविता आपल्या घरीच  बोलवीत व जे काही सांगावयाचे ते एकट्याला सांगत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे खूप वेगळेपण आहे . जुने विद्यार्थी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करतात. 

    शिक्षकी व्यवसाय, पैसा कमविण्यासाठी अथवा दोन वेळच्या जेवणाची बेगमी होण्यासाठी त्यांनी स्विकारलेला नव्हता. त्याकाळी पारतंत्र्यात असलेल्या देशाला स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशीचा महामंत्र देण्यासाठीच आचार्य भिसे, आचार्य चित्रे व आप्पा साने यांसारख्या त्यांच्या अनेक सहका-यानी  विद्यादानाचे कार्य हाती घेतले होते. आप्पा सानेसरांसमोर तर त्यांचे जेष्ठ बंधू साने गुरुजी यांच्याही समाज कार्याचा आदर्श  होता. ते त्यांचे आयुष्याचे ‘मिशन’ होते!!

     आदर्श शिक्षकांच्या अंगी असावेत, असे सारे गुण आप्पा सानेसरांच्या ठायी होते. वर्गात शिकवताना गुरुजी कधीही खुर्चीत बसून शिकवत नसत. शिकवताना त्यांना पाठ्यपुस्तकाचीही गरज पडत नसे. कारण एखाद्या विद्यार्थ्यांप्रमाणे ते स्वतः वर्गात शिकवायच्या विषयाचा सखोल अभ्यास करून, अध्यापनाचे काम करीत.  सानेसरांवर आचार्य चित्रे गुरुजीबरोबर शारदाश्रमातील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करण्याची जबाबदारी काही काळ होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बराच वेळ शारदाश्रमातील विद्यार्थ्यांच्या सानिध्यात जात असे. ‘छात्रालयात विद्यार्थी खऱ्या अर्थाने घडविता येतो’ हे सत्य चित्रे गुरुजींनी त्यांना पटवून दिले होते. विषय शिकवतांना त्यांनी वेळेच्या आणि वेळापत्रकाच्या मर्यादेत स्वतःला मर्यादित करून घेतले नव्हते. एखादा विषय शिकवताना दुसर्‍या विषयाचा संदर्भ आला, तर ते त्या विषयावरही सर्वंकष चर्चा करीत. त्यांची माहिती व शिकवण्याची पद्धत इतकी अद्यावत असे, की विद्यार्थी तास न तास त्यांच्या शिकवण्यात मंत्रमुग्ध होत. सानेसरांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेले. सर्वांना त्यांची आठवण नक्कीच येत असेल.

  बोर्डीच्या विद्यालयात शिक्षण घेत असतांना, साने सरांप्रमाणे अनेक ध्येयवादी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला मिळाला. त्यांतील माझ्या काही शिक्षकांबद्दल मी स्वतंत्रपणे लिहिले आहे .शारदाश्रमात राहणारे आमचे मित्र खरेच खूप भाग्यवान. त्यांना चित्रे गुरुजी, साने सर, एस आर सावेसर अशा अनेक दिग्गज गुरुंचा  निकटचा सहवास मिळाला ! माझ्या या गुरुजनांच्या ज्ञानदानाच्या सेवेपासून प्रेरणा घेऊन ,उच्चशिक्षण झाल्यावर,  शिक्षण क्षेत्रातच, मलाही योगदान द्यावयाचे होते .  मुंबईतील व जगातील एक अग्रगण्य तंत्रज्ञान महाविद्यालयात शिकविण्याची संधी मिळाल्याने मी तशी सुरुवातही केली होती. ‘शिक्षणक्षेत्रातली माझी मुशाफिरी’ या लेखात त्यावर मी थोडे भाष्य केले आहे.

 कै. साने सरांच्या स्वाक्षरीने मला मिळालेले प्रशस्तीपत्र.अजूनही अभिमानाने व प्रेमाने जपून ठेवले आहे.
उद्योगपती एसपी गोदरेज यांच्या भेटी प्रसंगी ,डावीकडून डॉ. हरिश्चंद्र पाटील ,श्री शहा सर, डॉ. पाठक, श्री गोदरेज व साने सर, लाडका नातू सुधांशु बरोबर!

   या आमच्या गुरुजनांनी पाठ्यपुस्तकातील अभ्यासाबरोबरच स्वाभिमान, देशाभिमान, बंधुभाव या गोष्टी शिकविल्या. प्रेम देणाऱ्या शिक्षकाबद्दल विद्यार्थ्यांना आपुलकी ममता वाटली नाही तरच नवल . त्यामुळेच काही टारगट विद्यार्थ्यांच्या वर्तनात खूपच चांगला बदल घडून येत असे. आचार्य चित्रे-सावे-साने  गुरुजीनी शारदाश्रमात काम करताना दगडातून देव निर्माण करण्याचे चमत्कार केले आहेत! आमच्या वर्गातील ही अशा काही उडाणटप्पु मुलांच्या वर्तनात आमुलाग्र बदल होऊन आज ते खूप यशस्वी जीवन जगत असल्याचे माझ्या स्मरणात आहे!

     विद्यार्थ्यांशी सर्वार्थाने एकरूप झाला, तोच खरा शिक्षक. असे शिक्षक, आपल्या विद्यार्थ्यांचा आनंद, दुःख, अडचणी, आशा-आकांक्षा या आपल्याच आहेत असे मानतात. त्यावर होईल तेवढे उपायही करतात. नुसते पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा विद्यार्थ्याच्या भवितव्याला आकार देण्याचा ध्यास घेतलेल्या मोजक्या शिक्षकांपैकी एक कै.आप्पा सानेसर होते.  त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखल्या. त्या सोडविल्या. कुणाच्या शाळेची फी भरली. कुणाच्या पुस्तकांचा खर्च उचलला. अनेकांची प्रत्यक्ष सेवा केली. त्याचा कोठेही गवगवा केला नाही. यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चावर मर्यादा घातल्या. पोटाला चिमटा दिला.  त्यातही ते आनंदी राहत असत. त्यांचा आनंद भौतिक गोष्टींवर अवलंबून नव्हता. तो त्यांच्या स्वतःच्या मनाच्या निर्मळतेवर अवलंबून होता.

   मला प्रामाणिकपणे वाटते, माझ्या बोर्डी शाळेतील सर्व शिक्षक हे खऱ्या अर्थाने ‘धार्मिक’ होते! ‘धर्माचे सार’ साने गुरुजींनी अगदी थोड्या शब्दात एका काव्यात सांगितले आहे. गुरुजींच्या या धाकट्या भावाने आपले ज्येष्ठ बंधू  व बोर्डी शाळेतील आपले आदर्श आचार्य, यांच्याप्रमाणेच समर्पण बुद्धीने काम करीत आपल्या विद्यार्थ्यांना जे देता येईल ते, विद्या, वित्त, प्रेम सतत देत राहिले. भले त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित होते!

  सानेगुरुजींच्या त्या अमर काव्यातील चार ओळी उद्धृत करून ,माझ्या या महान गुरुवर्यांना मनोभावे नम्र वंदन करून हा लेख संपिवतो.

  “खरा तो एकची धर्म ,जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी, असे जे वित्त वा विद्या

सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे.

 असेहे सार-धर्माचे असे हे सार सत्याचे,

परार्थी प्राणही द्यावे

 जगाला प्रेम अर्पावे….”

  कै. पुरुषोत्तम सदाशिव साने उर्फ आमचे आप्पा सानेसर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन!!

  या लेखासाठी श्रीमती सुधाताई बोडा(साने), श्री मिहीर शहा व श्री. केसरीनाथ  सावे  यांनी पुरविलेल्या दुर्मिळ छायाचित्रे व अमूल्य माहितीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

                                         (भाग पाहिला समाप्त)