“बोर्डीचे साने गुरुजी” आप्पा साने सर! भाग दुसरा

श्रीमती सुधा बोडा-साने

डावीकडून,साने गुरुजी, कु सुधा साने, कै गजाननराव साने.
 मागे उभे श्री आप्पा साने व सौ सुशीला साने. एक दुर्मिळ छायाचित्र.

“मी दिगंबर राऊत बोलतोय, सुधाताई”, हा फोन मला अपेक्षितच होता. श्री. वसंत चव्हाणचा बोर्डीहून मला फोन येऊन गेला होता. खूप बरं वाटलं. त्यानेच, “श्री दिगंबर राऊतांचा फोन येईल”, असे सांगितले होते. श्री राऊत म्हणाले, “आपल्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूलच्या स्थापनेला 11 जानेवारी 2024 रोजी 103 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने  शाळेतील ज्या गुरुजनांनी शाळेच्या प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी जे योगदान दिले, त्यांतील माझ्या शिक्षण कालखंडातील काही गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी एक पुस्तक लिहीत आहे. कै. आप्पा साने सर हे त्यापैकी एक आहेत. काळाच्या ओघात या गुरुजनांचे काम व त्याग पुसला जाऊ नये अशी भावना त्यामागे आहे. हे माझे गुरुजन एक ‘कुटुंब प्रमुख’ म्हणून कसे होते त्याविषयी त्यांच्याच  कुटुंबीयांकडून काही माहिती मला हवी आहे. नाशिकची गोखले एज्युकेशन सोसायटी हे अक्षरधन प्रसिद्ध करणार आहे. आपण कै. पु. स. सानेसरांबद्दल लिहाल काय?

  मी “हो” म्हटले आणि भूतकाळात 80 वर्षे मागे केव्हा सरकले ते कळलेच नाही. सारे अनुभव व आठवणी मनात फेर धरून गोंधळ उडवीत होत्या. कोठून व कशी सुरुवात करू काय व किती लिहू ते कळत नव्हते..

    विद्यार्थ्यांचे साने सर उर्फ पुरुषोत्तम सदाशिव साने उर्फ कुटुंबाचे अप्पा आणि साने गुरुजींचे लाडके ‘पी’. होय, साने गुरुजींचे म्हणजे आमच्या अण्णांचे अप्पा हे सर्वात लहान भाऊ. माझे वडील गजानन सदाशिव साने हे सर्वात मोठे भाऊ. नंतर साने गुरुजी,पांडुरंग. त्यानंतरचे दोन भाऊ सदानंद व यशवंत लहान वयातच वारले. शेंडेफळ अप्पा. अप्पांच्या सर्वात मोठ्या भगिनी चंद्री उर्फ अक्का. असं आमचं अठरा विश्वे दारिद्र्य असलेलं कुटुंब. कोकणातलं गाव पालगड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी.. गावात मराठी शाळा सातवी पर्यंतच .इंग्रजी शिक्षणासाठी गाव सोडावं लागे. 1917 साली  आप्पांची आई वारली.  पत्नीचा मृत्यू, घरात दारिद्र्य. त्यामुळे वडील चिडचिडे झाले. एकट्या पडलेल्या आप्पांना आईची आठवण येत असे. त्यांनी अण्णांकडे हट्ट केला ” मला तुझ्या जवळ घेऊन जा”. अण्णा वयाने लहानच होते. तेच त्यांच्या मित्राच्या ,रामच्या घरी राहात होते. राम ही गरीब. परंतु रामने, “आप्पाला पुण्याला आण”, असे अण्णांना सांगितले. आणि आप्पा पुण्याला शिकावयास आले. वार लावून माधुकरी मागून अथवा चणे खाऊन पाणी पिऊन भूक भागवायची असे करीत अण्णांचे विद्यार्जन चालले होते. आप्पानाही तोच मार्ग चोखाळावा लागला असावा.

     आप्पा 1926 साली मॅट्रिक झाले. इंटर सायन्स करून 1928 साली फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएससी साठी प्रवेश घेतला ,परंतु आर्थिक अडचणीमुळे कॉलेज सोडून नोकरी करावी लागली. 1935 मध्ये नोकरी सोडून कॉलेजात गेले व 1937 मध्ये ग्रॅज्युएट होऊन 1939 मध्ये बी टी झाले. त्यांचा हा शैक्षणिक प्रवास खूप जिकिरीचा आणि संघर्षमय राहिला असणार. ते काही काळ बडोद्याला त्यांच्या सखू मावशीकडे व इंदूरला शिकायला असल्याचे मी ऐकले होते.

    मी चार वर्षांची असताना माझी आई वारली. वडिलांनी मला एका हाती चार-पाच वर्षे सांभाळले. परंतु ते स्वतः पोटदुखीने आजारी पडले. ऑपरेशनची जरुरी होती. माझा मोठा भाऊ वसंता माझ्यापेक्षा 14-15 वर्षांनी मोठा होता. तो आयुर्वेदिक डॉक्टर होता. ऑपरेशन साठी त्याने दादांना पुण्याला न्यायचे ठरविले व मला बोर्डीला आप्पांकडे, असे माझे पाऊल बोर्डीच्या मातीवर पडले. 

    आप्पा गृहस्थाश्रमी होऊन त्यांच्या  संसाराची घडी नीट लागली होती. अशावेळी मी आप्पा व ताईंच्या (आप्पांची पत्नी व माझ्या काकू, सुशीला) जवळ राहायला व शिकायला आले. लवकरच त्यांच्यावर माझ्या आजारी वडिलांची जबाबदारी ही येऊन पडली. अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्याही होत्याच.  त्या पार पाडता पाडता त्यांची बरीच दमछाक झाली असणार!

डावीकडे कडून बसलेले: साने गुरुजी, बहिण अक्का-चंद्री ,आप्पा साने.
 खाली बसलेले डावीकडून: अक्काची मुलगी मनुताई व वसंता – दुर्मिळ कौटुंबिक फोटो

     माझी शाळा सुरू झाली. कुंदा कर्णीक, शालिनी पाटील सारख्या मैत्रिणी समुद्राच्या लाटांवर व वाळूत खेळायला मिळाल्या. शालिनीच्या वाडीत अभ्यासाला जायचं आणि अभ्यासाबरोबर चिकू खात बसायचो. सारी मजा होती. वडीलही ऑपरेशन करून बोर्डीला आले. ताईंच्या हातचं जेवण, आप्पांची सेवा यामुळे माझ्या दादांची प्रकृती सुधारू लागली. माझा भाऊ वसंता गोदावरी बाई परुळेकरां बरोबर तलासरीच्या आदिवासींमध्ये काम करू लागला.

     हे वर्ष होतं 1942/1943 ! देशभर स्वातंत्र्य आंदोलनातील सत्याग्रही तुरुंगात जात होते. बोर्डीसारख्या लहान गावातील  75 लोक तुरुंगात गेले. अण्णा, साने गुरुजी नाशिकच्या तुरुंगात होते. त्यांना भेटण्यासाठी आप्पांना नाशिकला जावं लागे. तो प्रवासही खूप त्रासाचा होता! आप्पा दिवसभर शाळेत शिकवित असत आणि वसतीगृहातील मुलांच्या अडचणी सोडविण्यासाठी, अभ्यास घेण्यासाठी सकाळी-रात्री वस्तीगृहात जात. त्यात दादा बिछान्यावर. त्यांचेही सारे करावे लागत असे. खूप व्यस्त असे त्यांचा दिवस. पण मुलांना शिकविणे असो वा दादांची सेवा असो, ते सारं आनंदाने करीत. परंतु नियती जणू आमची परीक्षाच घेत होती त्यांची.. भविष्यात काय वाढलेले आहे ते माहित नसतं तेच चांगलं, त्यामुळे वर्तमान तरी सुखात जगता येतो1944 चा डिसेंबर महिना अण्णांचं नाशिक तुरुंगात उपोषण चाललं होतं. अप्पा त्यांना भेटायला नाशिकला गेले होते. तेथून परत येत असताना त्यांना मुंबईला कळलं की वसंताला विषमज्वर झालेला आहे व तो ऑर्थर रोड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आप्पा त्याला भेटायला गेले. वसंताला हवी असलेली औषधे मिळत नव्हती. आप्पांनी खूप प्रयत्न करून ती मिळविली. ते हॉस्पिटलमध्ये औषधे घेऊन गेले तोवर वसंताचा मृत्यू झाला होता .तो दिवस 24 डिसेंबर 1944,अण्णांचा जन्म दिवसच(24 डिसेंबर,1899), होता. आप्पा पुरे खचले.  लाडक्या वसंताला, 24 वर्षाच्या पुतण्याला त्यांना अग्नी द्यावा लागला. या आघाताने थोडे हिंडू फिरू लागलेले आमचे दादा बिछान्याला खिळले ते उठलेच नाहीत. जानेवारी 1945 ला अण्णा तुरुंगातून सुटले व ते दादांचे सांत्वन ,सेवा करायला ,आप्पांना आधार द्यायला बोर्डीला आले. आप्पांना या काळात किती मानसिक ताण सहन करावा लागला असेल त्याची कल्पना केलेली बरी. आप्पांच्या जबाबदाऱ्या सतत वाढतच होत्या!

  सुधाताईंचे ज्येष्ठ बंधू, कै. डॉ. वसंत गजानन साने.

         अण्णा बरेच दिवस बोर्डीला दादांची सेवा करायला राहिले. पण ते बोर्डीला आले की अनेक लोक त्यांना भेटायला येत. त्यांचे सारे आप्पा-ताई हसतमुखाने करीत असत. काँग्रेसचे कार्यकर्ते अण्णांना सभा बैठकांसाठी बाहेरगावी बोलावीत. अशावेळी अण्णांच्या मनाची ओढाताण होई. एकीकडे भावाची सेवा तर दुसरीकडे समाजसेवा देशसेवा अशा वेळी त्यांना बाहेरगावी जावे लागे आणि दादांची सर्व सेवा आप्पांनाच करावी लागे. त्यांच्या मनावरचा व शरीरावरचा ताण मी आज समजू शकते. शेवटी 13 फेब्रुवारी 1946 रोजी दादा वारले. अण्णा आप्पांच्या सेवेला यश आले नाही. 

   दादा वारले त्यावेळी ताई गरोदर होत्या. थोड्याच महिन्यांनी ताईंनी मुलाला जन्म दिला. दुःखाच्या अंधारात सुखाचा किरण दिसतो न दिसतो तोच त्या गुटगुटीत बाळाचा चौथ्या दिवशीच मृत्यू झाला. आप्पा-ताई वर आभाळ कोसळले. दोन वर्षात कुटुंबात तीन मृत्यू झाले. त्यातही आपल्या बाळाचा मृत्यू. हे दुःख पचवायला अप्पा व ताईंना किती त्रास झाला असेल !

     1 मे 1947, पासून अण्णांनी पंढरपूरला प्राणांतिक उपोषण सुरू केले. अण्णांच्या जीवनामरणाचा तो प्रश्न होता. आप्पा पंढरपूरला अण्णाजवळ राहिले. सुदैवाने उपोषणाची सांगता चांगली झाली हे खरे, परंतु त्याच वेळी ताई गरोदर होत्या. आप्पांचा जीव दोन्हीकडे किती ओढला गेला असेल! 

   आणि  शेवटी सुखाचे दिवस अप्पा-ताईंनी बघितले. ताईंनी मुलीला जन्म दिला. घरात आनंदी आनंद झाला. अण्णांनी ताईच हे बाळंतपण पुण्याच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये स्वतः ताईबरोबर राहून केलं. जणू ते ‘ताईची आई’ झाले होते! स्वातंत्र्याच्या अरुणोदय समयी, 12 ऑगस्ट 1947 रोजी मुलीचा जन्म झाला म्हणून तिचे नाव अण्णांनी ‘अरुणा’ ठेवले. अण्णांनी तिच्या बारशाला पाळणा लिहिला होता!अरुणाला घेऊन ताई बोर्डीला आल्या.अप्पांना तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. अण्णांना ‘मातृ हृदयी’साने गुरुजी म्हणत ,तसंच आप्पांच्या मधील लपलेलं मातृत्व अरुणाला अंगाई गीत म्हणत आंदुळताना, तिला न्हाऊ  घालताना,  गोष्टी सांगत जेऊ घालताना दिसून येत असे. अरुणा ,ताई-अप्पांच्या आयुष्यात आनंद घेऊन आली.

  श्रीमती सुधाताई बोडा, बहीण कै. अरुणा शहा-साने यांचे बरोबर.

  11 जून 1950 अण्णांचा ,महाराष्ट्राच्या साने गुरुजींचा अचानक मृत्यू झाला. साऱ्या महाराष्ट्रालाच तो मोठा धक्का होता. तर आम्हा कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल? आप्पांचा तर आधारच गेला. आप्पा खूप खचले. परंतु महिन्याच्या आतच 5 जुलै 1950 रोजी ताईंना मुलगा झाला .अजित .त्याच्या  जन्मामुळे अण्णांच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर पडायला आप्पांना मानसिक दृष्ट्या मदत झाली. अजित-अरुणा दोघं अप्पांची जीव की प्राण होती!

     बालपणात गरिबीमुळे भोगाव्या लागलेल्या यातना, शिक्षण घेत असताना आलेले अडथळे, कौटुंबिक जबाबदाऱ्या ,सतत घरात माणसांचा राबता आणि मर्यादित अर्थार्जन, एका मागून एक कुटुंबातील मृत्यू ,यामुळे अप्पांना खूप भोगावे लागले. या साऱ्यामुळे जीवनात त्यांना स्वस्थता लाभली नाही. त्यामुळे अप्पांचा स्वभाव थोडा रागीट व चिडचिडा झाला होता. परंतु अरूणा-अजितच्या जन्मानंतर ते खूपच हळवे झाले होते!

    आप्पांना आदर्श शिक्षकांना  दिल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रपती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास ते उत्कृष्ट शिकवित असत. आकाश निरभ्र असले की आम्हा मुलांना अंगणात नेऊन ताऱ्यांची माहिती व त्यांची मराठी, इंग्रजीतील नावे सांगत. त्यांना क्रिकेटची पण खूप आवड होती. कॉमेंट्री ऐकण्यात ते रमून जात.

    आप्पांना आपला विद्यार्थी चांगला शिकला, एखाद्या क्षेत्रात पुढे आला तर त्याचं कोण कौतुक वाटे ,अभिमान वाटे! ते विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागत .तसेच रोजच्या व्यवहारातील व्यक्तींशीही आपुलकीने वागत. मग ती घरात धुणी भांडी करणारी गोदावरी असो की मैला उचलून नेणारी पार्वती बाई असो, वसतिगृहाच्या स्वयंपाक घरात जेवण बनविणारे भिकूभाई असोत की सफाई करणारा गडी असो, सर्वांची चौकशी प्रेमाने करीत. अडीअडचणीला मदत ही करीत असत.

     अप्पा हेडमास्तर पदावरून 1962 साली निवृत्त झाले. मुंबईत गोरेगावला घेतलेल्या छोट्या घरात ते स्थायिक झाले. अरुणा बीए बीएड होऊन शिक्षिका झाली. तिचे पती श्री. विजय शहा बँक ऑफ इंडियात नोकरी करीत होते. अजितही बी कॉम झाला. महाराष्ट्र बँकेत तोही नोकरी करू लागला. अरुणाला गोड मुलगी झाली. तिचे नाव नम्रता. आप्पांची खूप लाडकी. तिला खेळवण्यात अप्पा-ताईंचे दिवस जात होते. परंतु हे सुख ही फार टिकावयाचे नव्हते. जीवन म्हणजे सुखदुःखांचा खेळच असतो. आयुष्यात कधी आजारी न पडलेल्या आप्पांना पॅनक्रियाचा कॅन्सर झाला, आणि त्यांची जीवनज्योत 13 एप्रील,1997 रोजी मावळली!आयुष्यभर धडपडत राहिलेल्या जीवाचा असा अंत झाला!

कै.साने सरांच्या सौभाग्यवती  सौ सुशीला ताई

     कालांतराने ताईही वारल्या .माझी बहीण अरुणा व भाऊ अजित, ज्यांना मी अंगा खांद्यावर खेळवले खूप प्रेम केले तेही काळाच्या पडद्याआड गेले. अरुणाचे पती बँकेत मॅनेजरच्या पदावरून निवृत्त झाले आहेत. तिची मुलगी नम्रता मोठ्या हुद्द्यावर नोकरी करीत आहे. मुलगा मिहीर याचा व्यवसाय आहे. आजही आमचा एकमेकावर खूप जीव आहे. आज मी इथवर पोहोचले आहे ती आप्पा मुळे! त्यांनी मला त्यांच्या घरी बोर्डीला शिक्षणासाठी ठेवून घेतले, माझे आई-वडील नसताना.  माझ्या अडीअडचणीत मला आधार दिला. ताई-आप्पांनी मला आई-वडिलांची उणीव भासू दिली नाही. मला माहेर दिले, माझे बाळंतपणा केले. माझा मुलगा सुधांशु वर त्या दोघांचा खूप जीव. त्या दोघांचा आधार नसता, मी बोर्डीला राहिले नसते, तर बाहेरच हे विशाल जग कधी दिसलंच नसतं. आप्पांनी जे काही माझ्यासाठी केलं त्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी आहे. कुटुंबप्रमुख म्हणून आप्पांना जीवनात ज्या ज्या जबाबदाऱ्या पेलाव्या लागल्या त्या त्या त्यांनी समर्थपणे ,कुटुंबप्रमुख म्हणून  मोठ्या ताकदीने पेलल्या. यातच त्यांचा मोठेपणा होता. आप्पांच्या स्मृतीला प्रणाम!!”

   बसलेले डावीकडून, सौ गुप्ते त्यांचे चिरंजीव , श्रीमती सुधाताई व कवियत्री शांता शेळके.   मागे श्री.गुप्ते ,सौ सुशीलाताई साने, साने सर अजित सोबत व चित्रे गुरुजी
(हे दुर्मिळ छायाचित्र आप्पा रहात असलेल्या घरांच्या पायऱ्यांवर घेतले आहे.)

    बोर्डी शाळेत इंग्रजी, भूगोल, गणित शिकविणारे ,आपल्या विद्यार्थ्यांना सुसंस्कार देणारे महाराष्ट्र माऊली साने गुरुजींचे धाकटे भाऊ, म्हणून कै. पु. स. साने सर आम्हाला माहित आहेत. मात्र आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस कष्ट करून ,ज्येष्ठ बंधू  दादा व अण्णा (साने गुरुजी )यांच्या आजारात, अडीअडचणीच्या प्रसंगी त्यांच्या मागे सावलीसारखे असणारे, आपली पुतणी सुधा हिच्या आई-वडिलांचे छत्र हरवल्यावर तिचा आपल्या पोटच्या पोरी प्रमाणे सांभाळ करणारे, कुटुंबप्रमुख  आप्पा साने सर हे व्यक्तिमत्व आम्हाला माहीत नव्हते. सुधाताईंच्या या लेखातून कै.आप्पा साने यांच्या अनेक वेगळ्या पैलूंचे  स्पष्ट दर्शन झाले. धन्यवाद सुधाताई!!

  दिगंबर राऊत, माजी विद्यार्थी सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल