व्ही जे टी आय्, माझी अध्यापन क्षेत्रातील मुशाफिरी!

जगप्रसिद्ध  विक्टोरिया जुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट आज वीर माता  जिजाबाई तंत्रज्ञान महाविद्यालय(VJTI),

आयुष्यात  कधीतरी ‘शिक्षकी’ करण्याचा माझा विचार होता. वडील एक हाडाचे शिक्षक असल्यामुळे ‘ती’ माझ्या रक्तातच होती! शाळेत व शाळा सुटल्यानंतरही अवतीभवती फिरणारे त्यांचे विद्यार्थी, त्या शिष्यांकडून त्यांना मिळणारा सन्मान, “गुरुजी गुरुजी” करत आमचे घरी येऊन त्यांचा सल्ला घेणारे ज्येष्ठ गावकरी कनिष्ठ शिक्षक, हे सर्व पाहून मलाही त्यांचे प्रमाणे गुरुजी व्हावेसे वाटे! ते बालवय होते.  आपले वडीलच त्या वयात आपला ‘आयकॉन’असतात. म्हणून तसे वाटणे स्वाभाविकही होते! एकदा आप्पांच्या एका मित्रांनी,”दिगुला पुढे शिकवून काय करणार?” असा प्रश्न माझ्या देखतच आप्पांना  विचारला होता. क्षणाची ही उसंत न घेता आप्पांनी त्यावेळी दिलेले उत्तर माझ्या कायमचे स्मरणात राहून गेले ..”त्याला काहीही करायला सांगेन, पण शिक्षक होऊ देणार नाही!”, आयुष्यात स्वतःला आलेल्या काही कडुगोड अनुभवावरून त्यांची ती अगदी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.  त्या अजाणवयात, काय करावे यापेक्षा काय करू नये, एवढे माझ्या मनात कुठेतरी ठसून गेले. पुढे अनेक वर्षे त्या वाक्यावर विचार करीत होतो. उत्तर मिळाले नव्हते.मात्र  भारतातल्या एका नामवंत तांत्रिक महाविद्यालयांत काही काळ प्राध्यापकी केल्यावर त्याचे उत्तर मला मिळाले. आप्पा त्यावेळी  जिवंत होते. मला माझे उत्तर मिळाल्यावर मी  एके दिवशी ‘तो’ प्रश्न त्यांचे समोर काढला. त्यांना त्या प्रसंगाची आठवण होती. त्यांनी तसे का म्हटले होते, त्याचे उत्तर त्यांच्याकडून मला मिळाले तो प्रसंग पुढे येईलच .

    शिक्षकी पेशाच्या अनेक’ पोटजाती’ ही आहेत. जसे की, अंगणवाडी बालवाडीतील शिक्षक ,प्राथमिक शिक्षक ,माध्यमिक  शिक्षक,  महाविद्यालयातील शिक्षक, ग्रामीण शिक्षक, शहरांतील शिक्षक, विद्यापीठीय शिक्षक ई ई. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. मात्र आजही भारतीय समाजातील ‘शिक्षकां’ची प्रतिमा जेवढी आदरणीय असावयास हवी तेवढी नाही असे माझे  मत आहे. ते चुकीचेही असू शकेल.” शिक्षकांच बरं आहे,त्यांना घरबसल्या पगार मिळतो!, आयुष्यात भरपूर आराम आणि सुट्ट्या मिळवायच्या असतील तर शिक्षकच व्हावे..”असे टोमणे  ऐकावयास मिळतात. पेशाची खिल्ली ही उडविली जाते. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु..” ही केवळ प्रार्थनेतील ओळ राहिली आहे. शैक्षणिक कामाबरोबर बिगरशैक्षणिक कामांचाभार त्यांचेवरती असतो याची जाणीव समाजाला नसते.”आम्हाला मुलांना शिकवू द्या, वर्गातच राहू द्या”, अशी मागणी करत रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ  शिक्षकांवर आली आहे. 

    शिक्षणाच्या बाबतीत आपल्या भारत देशात प्रचंड असमानता आहे.सर्वसाधारण कोणताही  शिक्षक कोणत्याही परिस्थितीत, आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम ते द्यावं यासाठी प्रयत्न करीत असतो.चांगल्या आणि वाईट, कामसू -कामचुकार, अभ्यासू व अज्ञानात सुख मानणाऱ्या अशा प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात असतातच .शिक्षण क्षेत्रातही त्या आहेत, पण काही ठराविक घटनावरून एकंदरीतच सर्व शिक्षक समाजावर असे ताशेरे मारणे  योग्य वाटत नाही. माझ्या सुदैवाने अमेरिकेतील व युरोपातील काही उत्तम शिक्षण संस्था व येथील शिक्षक वर्ग अप्रत्यक्षरीत्या पाहण्याचा योग आला. नातवंडे लहान असताना त्यांना त्यांच्या वर्गात बसवून त्यांची सुट्टी होईपर्यंत आम्ही परिसरातच फिरत असू. पुढे प्राथमिक वर्गात व हायस्कूलातही  वारंवार शाळेला भेट देण्याच्या  संधी वारंवार मिळत. सध्या त्यांचेबरोबर कुतूहल म्हणून महाविद्यालयात जात असतो. माझ्या उत्सुकतेपोटी जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ एलीनाॅय शिकागो, ऑस्टीन युनिव्हर्सिटी,टेक्सास, अशा नामवंत विद्यापीठांना भेटी दिल्या. अगदी प्राथमिक बाल शिक्षणापासून ते उच्च महाविद्यालय शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच शिक्षका कडून मिळणारे मार्गदर्शन आणि शिक्षकांचा एकूणच समाजातील दर्जा याची थोडीफार तरी कल्पना आली. काही शिक्षकांशी संवाद साधताना त्यांना आपल्या देशाबद्दल असलेला अभिमान व त्यांना आपल्या विद्यार्थ्याच्या भवितव्याबद्दल असलेली जाणीव ही देखील प्रकर्षाने जाणवली.हे,पाहिल्यावर भारतातील एकूण सर्वच शिक्षणाक्षेत्राचा कसा खेळ-खंडोबा झाला आहे हे पटू लागले. याला जबाबदार कोण आहेत ती चर्चा करण्याची ही जागा नव्हे. मात्र कुठेतरी घोडे पेंड खात आहे आणि त्याचा त्रास सर्व समाजाला, विशेषतः आमच्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागला हे सत्य आहे.

  वीर-माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचा(VJTI) तळपणारा गोलघुमट तिची यशोगाथा सांगतो!

      माझ्या आयुष्यात मला लाभलेल्या अनेक आदर्श, वंदनीय गुरुजनांबद्दल मी खूप वेळा लिहिले आहे. माझी आजही शिक्षक व शिक्षकी पेशा याबद्दल अत्यंत आदराची भावना आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनप्रवासातला एक जाणकार सोबती असतो, तो तुम्हाला योग्यवाट दाखवू शकतो ..पण वाटचाल मात्र तुम्हालाच करावी लागते. एका इंग्रज शिक्षणतज्ञाचे हे वाक्य मला फार आवडते..

   “The best teachers are those who show you where to look but don’t tell you what to see ! खरा शिक्षक तुम्हाला कुठे बघायचे ते दाखवेल पण काय बघायचे ते नाही सांगणार. तो दृष्टिकोन देईल पण दृष्टी मात्र तुमचीच वापरावी,असे सांगेल. 

   हे सर्व तत्त्वज्ञान येथे सांगण्याचे कारण आयुष्याच्या एका टप्प्यावर मलाही शिक्षकी पेशा करावा लागला.ज्यावेळी गोदरेज कंपनी सोडून द्यायचा विचार पक्का झाला व पुढे काय करावे याचा विचार करू लागला तेव्हा पुढील ,पीएच डी पदवीचे शिक्षण करावे असे वाटू लागले.ते करताना इतर काही करण्यापेक्षा शिक्षकी करावी असे ही वाटले. कारण हा पीएचडी अभ्यास UDCTमध्ये करताना ,UDCT किंवा त्याच संस्थेच्या समोर  असलेले व्हीजेटीआय येथे मला प्राध्यापकी करण्याची संधी होती. शिक्षण व थोडी आर्थिक कमाई ही झालीअसती. ते आता आवश्यक ही होते .शिवाय धावपळ करण्याचा प्रश्न नव्हता. या दृष्टीने मी प्रयत्न करीत होतो..

      युडीसिटी मध्ये आमच्या “ऑईल्स” विभागात मला अशी प्राध्यापकि मिळू शकली असती तर  त्याला मी प्राधान्य दिले असते. मात्र त्यावेळी तशी संधी मला उपलब्ध होऊ शकली नाही. व्हीजेटीआय संस्थेत मला अशी जागा उपलब्ध असल्याची जाहिरात एके दिवशी पेपरात वाचली, आणि माझा ‘गोदरेज’सोडण्याचा विचारही पक्का झाला. युडीसिटी चे प्राध्यापक डॉ. व्ही व्ही आर सुब्रमण्यम यांच्या संपर्कात मी होतोच. त्यांनीही मला पीएच डी साठी आपला विद्यार्थी म्हणून स्वीकृत करण्याचे मान्य केले होते. त्यामुळे ही जाहिरात वाचल्यावर माझ्या आशा पल्लवीत झाल्या. रितसर अर्ज केल्यावर काही मुलाखती व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर माझी निवड झाली. गोदरेज कंपनीतील दोन वर्षाचा औद्योगिक प्रत्यक्ष अनुभव मला या कामी उपयोगी ठरला. मनासारखे  जुळून आल्याने मी स्वतःलाच खूप नशीबवान समजत होतो!

      व्ही जे टी आय (VICTORIA JUBILEE TECHNICAL INSTITUTE), ही मुंबईतील एक नामांकित अभियांत्रिकी शिक्षण संस्था आहे. हे महाविद्यालय मुंबईतील सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. त्याची स्थापना सन 1887 मध्ये झाली, तेव्हा “व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेचे नाव 26 जानेवारी 1997 रोजी बदलले गेले ते वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट असे झाले.(VEERMATA JIJABAI TECHNOLOGICAL INSTITUTE),.ही शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्त संस्था आहे .ती मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. या संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळते. सन 2004 साली संस्थेला शैक्षणिक व प्रशासकीय स्वायत्तता मिळाली. ही संस्था महाराष्ट्र राज्याची केंद्रीय तंत्रज्ञान संस्था आहे.प्रमाणपत्र, डिप्लोमा ,पदवी ,पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रशिक्षण मिळते.जागतीक कीर्तीचे अनेक नामवंत तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ या संस्थेने निर्माण केले. भारताचे सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे  या संस्थेचे माजी विद्यार्थी. यावरून संस्थेच्या गुणवत्तेची व दैदीप्यमान  गतकाळाची जाणीव व्हावी.

  आजच्या व्ही जे टीआय संस्थेतील वीरमाता जिजाबाई यांचे दर्शनी भागात लावलेले छायाचित्र.

      या संस्थेचा विद्यार्थी म्हणून नाही तरी अध्यापक म्हणून आयुष्यात काही काळ संबंध आला, हे माझ्या आयुष्यातील सदभाग्य होते. त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो.त्या  दोनएक वर्षाच्या लघु कालखंडातील काही  बऱ्या वाईट आठवणी!

      व्हीजेटीआय मध्ये LEE,, LME,LTM,LTC अशा प्रकारचे पदविका शिक्षणक्रम ही होते. त्यातील एल टी सी,एल टी एम, या पदविकासाठी ‘तांत्रिक रसायनशास्त्र'(Technical Chemistry),हा विषय आवश्यक होता. तो विषय शिकवण्यासाठी माझी नियुक्ती केली गेली होती. हे पदविका अभ्यासक्रम त्याकाळी उद्योग विश्वात खूपच लोकप्रिय होते. अशा पदवीधारकास रसायन-उद्योग धंद्यात खूप मागणी असे. माझे धाकटे बंधू श्रीकांत यांनी मी तेथे रुजू होण्या पूर्वी थोडीच वर्षे आधी व्हीजेटीआय मधूनच ,एल इ इ(L E E) हा इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग मधील पदविका अभ्यासक्रम उत्तमपणे पूर्ण केला होता.

     कॉलेजचे प्रिन्सिपल एक पारशी गृहस्थ होते. त्यांचे नाव मी मुद्दामच उघड करीत नाही याचे कारण पुढे कळेलच. परदेशात उच्च विद्या विभूषित हे गृहस्थ खरे तर शिक्षण क्षेत्रात कसे आले याचा मला अचंबा वाटे.  आमच्या तांत्रिक रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कालथोड हे अत्यंत विद्वान तसेच सालस व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. व्हॉइस प्रिन्सिपल या नात्याने कॉलेजचा संपूर्ण कारभार तेच  पहात असत. त्याचप्रमाणे प्राध्यापक डाॅ. शर्मा, प्रा. डाॅ.सावला ,प्रा. केरकर ही मंडळी ही आमच्या विभागात विविध जबाबदाऱ्या सांभाळीत. मी व प्रा डाॅ. प्रभू  दोघे एकाच वेळी या विभागात दाखल झालो होतो. मी व केरकर दोघेच ‘डॉक्टर’ पदवीधारक नव्हतो ,बाकी सर्व सहकारी

 डॉक्टर(Ph D) होते.मी व प्रभू ,केरकर यांच्या प्रशस्त केबिनमध्ये बसत असू. त्यामुळे आम्हा तिघांची विशेष सलगी होणे साहजिकच होते. केरकर हे गोव्याचे .साहजिकच मोठे रसिक व दिलदार व्यक्तिमत्त्वाचे गृहस्थ होते. आपला विषय तर उत्तम शिकवीतच पण त्याचबरोबर संपूर्ण कॉलेजात व्यायाम शिक्षक म्हणून ही विद्यार्थ्यात प्रिय होते. त्यांना स्वतःला बोलायला खूप आवडे.अनेक गप्पा व हास्यविनोदात त्यांचे केबिनमध्ये वेळ कसा  जाई ते समजत नसे. आमचे मनोरंजन करीत व ‘सामान्य ज्ञान’ वाढवीत!!

   कर्मधर्म संयोगाने  मराठीतील प्रसिद्ध विनोदी कथा लेखक कै. वि आ बुवा हे त्यावेळी आमच्याच तांत्रिक रसायन विभागात प्रयोगशाळेत असिस्टंट (Lab Assistnt)म्हणून काम करीत होते.त्यांचे नाव व विनोदी लेखक म्हणून ख्याती मी ऐकून होतो. त्यामुळे माझे ‘दुय्यम’ म्हणून काही कामे सांगताना संकोचल्यासारखे होई. मात्र बुवा खूप सालस समजूतदार व साधेपणाने वागत. विनोदी लेखक म्हणून ख्यातीचा कुठेही त्यांनी दिमाख दाखविला नाही. नियतीचा खेळ बघा,मराठीतील एक प्रसिद्ध विनोदी लेखकाला  तंत्रज्ञानासारख्या रूक्ष विषयात,विविध उपकरणांच्या नोंदी ठेवण्याचे काम आयुष्यभर करावे लागले! डोंबिवलीत एका साध्या चाळवजा घरात राहत. त्यांच्या घरी जाण्याचा योगही मला आला होता. आमच्या सो क्ष समाजाचे चिंचणी तील श्री कमळाकर सावे हे देखील अभियांत्रिकी कार्यशाळेत इन्स्ट्रक्टर म्हणून कामाला होते.  त्यांना मी भेटलो.त्यांनी अभिनंदन करून मला काही मौलीक सूचना केल्या. 

      मला तीन दिवस प्रत्येकी दोन लेक्चर्स व दोन दिवस दुपारी विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल्स घेणे असे काम होते.. कामाचा भार  विशेष नसला तरी नवीन सुरुवात व विद्यार्थ्यांच्या अपेक्षा मोठ्याअसल्याने अभ्यास करावा लागे. टिपणे काढावी लागत. मुलांना जास्तीत जास्त उपयुक्त माहिती कशी देता येईल ही माझी धडपड असे. वर्गांत शिकवल्यावर मुलांना पुस्तके वाचण्याची जरुरी पडू नये,या हेतुने मी विस्तृत टिपणे देत असे. या अभ्यासक्रमासाठी खास पाठ्यपुस्तके नव्हतीच..संस्थेत केवळ हुशार विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकत, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांचे समाधान करणे हे सोपे काम नसते. तसे झाले नाही तर हीच मुले प्राध्यापकांना वर्गातच ‘हूट-आउट’ करण्यास मागे पुढे पहात नसत. काही शिक्षकांचे बाबतीत येथे तसे झालेही होते.  मी नवीन असल्याने ही भीतीही मनात असे. मला वाटते माझी लेक्चर्स चांगली होत असावी.  समोर बसलेल्या विद्यार्थ्यांचे चेहरेच आपल्या कामाची पावती देत असतात. वर्गात  शांतता असे. मुलांचे प्रश्नांनाही मी व्यवस्थित उत्तरे देत असे.लेक्चर झाल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांचे कोंडाळे माझ्या भोवती जमत असे. त्यामुळे आनंदच होई. विद्यार्थ्यांना अनेक शंका उपस्थित होत याचा अर्थ  ती लेक्चर व्यवस्थित ऐकतात व त्यावर विचार करतात असे मला वाटे.

     ज्या दिवशी प्रॅक्टिकल्स असत त्यादिवशी भरपूर मोकळी असे. सकाळचा संपूर्ण वेळ तसेच दुपारी एकदा मुलांना विषय समजावून दिला की ती स्वतःच तीन तास प्रयोग करून नोंदी ठेवीत.अर्थातच त्यादिवशी मला डॉ.सुब्रमण्यम यांचे प्रयोगशाळेत जाऊन माझ्या पुढील कामा संबंधित चर्चा करता येई. पीएच डी चा अभ्यास सुरू करण्याआधी बरीच माहिती जमवावी लागते.त्यास  ‘लिटरेचर सर्वे’ असे म्हणतात. संशोधनासाठी आपला योग्य विषय निवडावयाचे आधी,त्या विषयासंबंधी ,जगात कोणी तसे किंवा त्याचे अनुषंगाने काही काम केले असल्यास तो विषय घेणे निरर्थक असते. हे खूप काळजीपूर्वक अभ्यासावे लागते, अथवा पुढे आपण केलेले सर्व काम निष्फळ ठरते. 

     ह्या सर्व गोष्टींचा माझ्यावर खूप ताणही पडे. वसतिगृहात राहणे ,बाहेर जेवणे, स्मारक मंदिर तसेच वर्तक हॉलच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण ठेवणे, विश्वस्तांना नियमित आर्थिक जमाखर्चाचे हिशोब देणे,कै.तात्यासाहेब चुरी  विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवून त्यांचे प्रश्न विश्वस्तांच्या सहाय्याने मार्गी लावणे, स्मारक मंदिरात होणाऱ्या संघाच्या सांस्कृतिक कार्यक्रमा साठी सहभाग देणे, लेक्चर्सची तयारी व टिपणे तयार करणे,व पीएचडीच्या कामासंबंधी वाचन चर्चा ,सर्व करताना रात्री खूप थकवा जाणवे.पटकन झोप लागून जाई. मात्र या कष्टातही एक आनंद होता. कोणत्याच प्रकारे नाराजी नव्हती. त्याकरता मी कधीही कॉलेजला दांडी मारणे, रजा घेणे असा प्रकार केला नाही. आपले ध्येय व स्वप्न साकार करण्यासाठी ही सर्व धडपड चालू होती. हळूहळू का असेना पण आपण त्या दिशेने पुढे जात आहोत ही कल्पनाच मला एक नवी ऊर्जा देत असे.  केलेल्या सर्व कामाचा थकवा त्यामुळे निघून जात असे. माझ्या या संपूर्ण शैक्षणिक कालखंडात एक दिवसही सर्दी-तापामुळे अथवा कोणत्या आजारामुळे फुकट गेला नाही, ही माझ्यावरील परमेश्वराची मोठी कृपा  समजतो.मध्ये लग्नाच्या गोष्टीही निघत.आप्पा त्याबाबत विचारीत. मात्र मी  जास्त उत्साह दाखवीत नसे. आप्पांशी माझे मनमोकळेपणाने  बोलणे होई. त्यांनाही माझे विचार पटत हे बरे होते.

      मी मागे म्हटल्याप्रमाणे आर्थिक नुकसान सहन करून मी ही कॉलेजमधील प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली होती.  एका निश्चित ध्येयासाठी मला काही वर्षे हे काम सांभाळून पुढील उच्च शिक्षण पूर्ण करून  पुढे जावयाचे होते. माझ्या बरोबरीने काम करणारी,माझ्यापेक्षाही सीनियर मंडळींचे  मासिक पगार पाहिल्यावर मला खूप वाईट वाटे. एवढ्या कमी पगारावर ही ‘डॉक्टरेट’ मंडळी अनेक वर्षे हे काम का करतात, एवढ्या उत्पन्नात मुंबईसारख्या शहरात ही मंडळी आपला मासिक ताळेबंद कसा जुळवीत असतील ,हे कोडे होते? त्याचे उत्तर मला मिळत नव्हते. मात्र काही दिवसांनी ते मिळाले.

मोठी मजेशीर कहाणी आहे ती! “दिव्याखाली अंधार” असतो याची सत्यता पटली.

      व्हीजेटीआय ही  एक नावाजलेली संस्था. त्यामुळे येथील रासायनिक प्रयोगशाळेत अनेक सुविधा उपलब्ध होत्या. या प्रयोगशाळेने प्रमाणित केलेले कोणतेही प्रॉडक्टस् उद्योग जगात मान्यता पावत. बाजारात दर्जा स्वीकृतीसाठी(Quality Acceptance) आमच्या संस्थेचे सर्टिफिकेट कामास येई. त्यामुळे अनेक कारखानदार, निर्यातदार त्यांचे औद्योगिक प्रोडक्टस् आमचे कडे सर्टिफिकेशन साठी घेऊन येत व त्याची रीतसर फी देत.ही किंमत कॉलेजने निर्धारित केली होती. ज्या प्राध्यापकामार्फत हे काम केले जाई, त्याला 80 टक्के व संस्थेला 20% अशी मिळालेल्या पैशाची विभागणी होई. प्राध्यापक मंडळी आपल्या विद्यार्थ्यांकडूनच हे सर्व तपासणीचे(Testing), काम करून घेत. काहीजण तर आलेल्या प्रॉडक्टची व्यवस्थित नोंद न करताच (Without Registration)त्याचे पृथक्करण(Analysis) करत, जेणेकरून संपूर्ण फी चा पैसा त्यांच्या खिशात जाईल . येणारे विविध प्रॉडक्ट्स हे ऑइलस्, पेंट्स ,डाईज,रंग रसायने, टेक्सटाईल केमिकल्स अशा अनेक प्रकारचे असत. त्या त्या विभागाच्या प्राध्यापकाने ते ते प्राॅडक्टस् सांभाळावे असा अलिखित नियम होता. त्या अनुषंगाने ऑइल विभागाचे सॅम्पल माझ्याकडे येणे जरुरी होते. मात्र सीनियर मंडळी  सर्वच सॅम्पलस् आपल्या कब्जात घेऊन एकाधिकारशाही करीत होते. सर्व मलिदा त्यांनाच मिळत होता. ही मंडळी बरीच जुनी असल्याने वर्षोनवर्षे हे चालले होते. मी व प्रा. प्रभू येथे रुजू झाल्यावर हा प्रकार आमच्या ध्यानात आला. माझ्या स्वभावानुसार याचा शहानिशा करून आम्हालाही थोडे काम मिळाले पाहिजे असे मला  वाटले. आम्ही  संबंधित प्राध्यापक मंडळींशी बोललो. आमच्या विषयाशी संबंधित नमुने आमच्याकडे पाठवा अशी विनंती केली. त्यांनीही याला संमती दिली. मात्र तरीही कोणी आमच्याकडे काम घेऊन येईना.चौकशी केल्यावर दबल्या आवाजात ही उद्योजक मंडळी, सीनियर प्राध्यापक मंडळीच्या दबावा संबंधी हळूच बोलत. “त्यांना न देता आपल्याला आम्ही प्रॉडक्टस् दिले तर आम्हाला हे लोक त्रास देतील, तुम्हालाही सुखासुखी काम करू देणार नाहीत..” असे  सांगत . या प्राध्यापकांचा दबदबा व वचक  एवढा जबरा होता. मिळकतीचा एवढा मोठा भाग ही मंडळी सहजासहजी कसा घालवतील? आम्हालाही एकंदर परिस्थितीची कल्पना आली. थोडे दिवस आपण आहोत, शांत राहिलेले बरे, पाण्यात राहून माश्याशी वैर करणे ठीक  नव्हे, असा शहाणपणाचा विचार आम्ही केला!!

      आमचे हे कॉलेज एक स्वायत्त व ‘डिम्-युनिव्हर्सिटी’ म्हणून गणले गेले होते. विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून त्यांचा अभ्यासक्रम ठरविणे, परीक्षेचे पेपर्स काढणे, तपासणे, मुलांचे रिझल्ट्स लावणे,असे अत्यंत महत्त्वाचे निर्णय  हीच मंडळी घेत असत. त्यामुळे मुलांचे संपूर्ण भवितव्य प्राध्यापकांच्या हाती होते म्हणून मुले व पालक प्राध्यापकांना वचकूनच  रहात.काही पालक तर पहिल्यापासूनच या मंडळीशी ‘फिल्डिंग’ लावून ठेवत.श्रीमंत पालक खूप पैसे देऊन वर्षभराच्या शिकवण्याही लावीत. पैसे मिळवण्याचे

अनेक मार्ग त्यांना उपलब्ध होते.त्याचा सर्रास उपयोग  बिनदिक्कतपणे ही मंडळी करीत. त्यामुळे अर्थातच त्यांचा मासिक पगार म्हणजे एक ‘पॉकेट मनी’ होता हे माझ्या हे लक्षात आले. शिक्षण क्षेत्र हे माझे काम नव्हे, हे जाणवले व आप्पांचे ‘ते’ शब्द आठवले!! एवढे ऊच्च शिक्षण घेऊन , भारतातल्या एका नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण-दान हे पवित्र कर्म करण्यासाठी आलेल्या प्राध्यापकांची ही स्थिती असेल, तर साध्या प्राथमिक शिक्षकाला किती मानहानी सोसावी लागत असेल ,याची मी कल्पना केली!साधारणतः आज पासून च्या पन्नास वर्षांपूर्वीच्या काळाबद्दल मी बोलतो आहे .आता काय परिस्थिती आहे मला माहित नाही ? एकंदरीतच भारतातील शिक्षण संस्था, महाविद्यालयीन शिक्षण, विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या समस्या याबद्दल ज्या बातम्या ऐकावयास मिळतात, ते वाचून ऐकून मन उदास होते. सुरुवातीलाच मी त्याबद्दल थोडे सांगितले ही आहे .आमच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल चिंता वाटते! मात्र ‘उडीदामाजी ही काळे गोरे’ असतातच.अजूनही सर्वच काही संपलेले नाही अशी आशाही आहे!!

       डॉ. कालथोड  एक सज्जन व प्रामाणिक गृहस्थ होते. आपल्या खात्याचा कारभार सुरळीत व्हावा, मुलांचे नुकसान होऊ नये याकडे त्यांचे लक्ष असे. त्यामुळे स्वतः जरी ते या ‘रॅट-रेस’मध्ये नव्हते तरी आपल्या सहकाऱ्यांना काही अपप्रवृत्ती पासून दूर करण्याचे धार्ष्ट्य  त्यांना नव्हते. त्यामुळे हे असले उद्योग, पाहून न पाहिल्यासारखे ते करीत. जेव्हा मी व डॉ.प्रभू या बाबतीत त्यांचेकडे बोलणी करण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला अत्यंत सौम्य शब्दात हे प्रकरण पुढे न वाढविण्याची विनंती केली. आम्हाला ते म्हणाले “राऊत तुम्हाला ही कामे करावयाची असतील तर मी माझ्या नावे सॅम्पल घेत जाईन, व तुमच्याकडे पाठवीत जाईन. आपणच तो मोबदला घ्या, मला  काही नको.” अर्थातच आम्हाला हे पटले नाही. एवढ्या मोठ्या व सज्जनगृहस्थास आमच्यामुळे काही दोष पत्करावा लागू नये ,अशीच आमची प्रामाणिक भावना होती. आम्ही तो विषय तेथेच संपविला!!

    प्रिन्सिपाॅल महाशया विषयी मी  मागे उल्लेख केला आहेच. हे गृहस्थ परदेशात ऊच्च पदव्या घेऊन आलेले खूपच विद्वान्  होते यात शंका नाही. एक प्राध्यापक म्हणून चांगले असले ,तरी व्यवहार शून्य होते. एका मान्यवर शिक्षण संस्थेचे प्रमुख म्हणून तर अगदीच कुचकामी होते.शिक्षणक्षेत्रात काम करणारा, तो प्राथमिक शिक्षक असो वा महाविद्यालयीन ऊच्च पदस्थ  असो,त्याला काही बंधने स्वतःवर लादावीच लागतात. कारण तोच आदर्श विद्यार्थी गिरवितात .त्यामुळे शिक्षकाचे स्वतःचे वर्तन हे मूल्याधिष्ठितच असले पाहिजे, हे माझे प्रामाणिक मत आहे. संस्थाप्रमुख म्हणून आपली प्रतिष्ठा,विद्यार्थ्यांमधील आपली प्रतिमा कशी उंच व्हावी याचे त्यांना अजिबात भान नव्हते.व्यसनाधीन  होते. कधीकधी ऑफिसला सकाळी येतानाच  आपला तोल सांभाळीत येत.  शक्यतो त्यांचे केबिनमध्ये कोणी प्राध्यापकत वा विद्यार्थी जात नसत. कधी कोणाचा कोणासमोर पाणउतारा करतील याचा भरोसा नसे. प्रो. कालथोड हेच प्रिन्सिपाॅल ची बरीच कामेही पाहत.

     एका 15 ऑगस्ट च्या दिवशी तर या प्रिन्सिपल महाशयांनी हद्द केली.आम्ही सर्व स्टाफ विद्यार्थी ,कर्मचारी कॉलेजच्या पटांगणात झेंडावंदनासाठी जमलो होतो. प्रिन्सि. महाशयांचे हस्ते हे झेंडावंदना वावयाचे होते.बराच वेळ वाट पाहूनही ते आपल्या दुसऱ्या मजल्यावरील केबिन मधून खाली येईनात ,तेव्हा प्रा. कालथोड त्यांना घेण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेले. त्यांचा आधार घेतच प्रिन्सि.साहेब ध्वजस्तंभा जवळ आले. धड उभे ही राहू शकत नव्हते. भारताचा तिरंगा हवेत फडकण्या आधीच  ही स्वारी हवेंत  तरंगू लागली होती. कसेबसे झेंडा गीत आटोपले व झेंडा फडकविण्यासाठी दोरी ओढण्यास उजवा हात पुढे करणार, तेवढ्यात त्यांना सिगरेट शिलगावण्याची जबरदस्त इच्छा झाली. पटकन तोंडात सिगरेट ढकलून ती पेटवून,डाव्या  हातात सिगरेट ऊजव्या हाताने तिरंग्याची दोरी ओढू लागले. शेजारीच उभ्या असलेल्या कालथोड सरांनी मदत देत प्रसंग निभावून नेला. राष्ट्रगीत होत असताना हे महाशय नाका तोंडातून धूर सोडीत ध्वजस्तंभाला पकडून कसेतरी उभे होते.ते दृश्यच किती किळसवाणे व अशोभनीय होते हे सांगावयाची गरज नाही. कारण आजही तो प्रसंग व ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले की मलाच कसेतरी वाटू लागते, म्हणूनच त्या साहेबांचे नाव मी घेतलेले नाही!

      हे सर्व पाहिल्यानंतर मला माझी चूक कळून आली. आर्थिक नुकसान सोसून काही निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण येथे आलेलो आहोत,  परंतु अशा परिस्थितीत येथे अध्यापन करून पुढील अभ्यास करता येईल,असे मला वाटेना. पीएच डी नाही मिळाली तरी चालेल पण अशा प्रकारची मानसिक कुचंबणा नको असे प्रकर्षाने वाटू लागले. आता पुन्हा नवा विचार करण्याची वेळ आली होती !

  व्हीजेटीआय संस्थेसमोरच माझे यु डी सी टी रासायनिक तंत्रज्ञान महाविद्यालय .

     औद्योगिक जगताची झलक ‘गोदरेज’ मध्ये मिळाली होती. त्याआधी बी एससी (टेक) पदवी घेतानाही दोन महिन्याची उमेदवारी(internship) टाटा ऑइल मिल्स, माझगाव मुंबई ,मध्ये करताना,” बडे लोगों की छोटी बाते”, पाहिली होती. येथील राजकारण, बढत्या-प्रमोशन साठी चाललेली धांदल त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांचा गळा कापून  वरच्या साहेबाची हाजी हाजी करणारे उच्चपदस्थ पाहिले. भरपूर पगार असूनही जास्त मिळविण्याच्या  हावेने लाचखोरी करण्यास मागेपुढे न पाहणारी मंडळी येथे दिसली. अशी बजबजपुरी  सोडून  शांत,सुंदर ,विद्या देवीची आराधना होत असलेल्या शिक्षण क्षेत्रात जावे ,चार पैसे कमी मिळाले तरी कामाचा आनंद उपभोगावा, मुलांचे सानिध्य मिळेल ,आशा भाबड्या कल्पना उराशी बाळगून मी शिक्षण क्षेत्रात आलो होतो. पण येथील अदाधुंदी पाहून हे सुद्धा आपले क्षेत्र नव्हे याची जाणीव झाली. आता दोन पर्याय उपलब्ध होते . एक  काही स्वतःचा उद्योग  सुरू करणे वा पुन्हा औद्योगिक जगतालाच सलाम करणे! माझ्या काही वर्गबंधूंनी पदवी घेता घेताच आपले लहान उद्योग सुरू केले होते.त्यांना घरच्यांचा आर्थिक पाठिंबा होता वा कोणीतरी मोठ्या उद्योग धंद्यांनी काही छोटी कामे त्यांना दिली होती. उद्योगधंदा करण्याची माझी मानसिकता नव्हती. कौटुंबिक परिस्थितीमुळे जोखीम घेणे मला परवडणारे नव्हते . त्यामुळे आता एकच पर्याय उरला होता, पुन्हा उद्योग जगतात नोकरी मिळविणे व परतीचे दोर कापून टाकून शेलारमामा प्रमाणे अखेर पर्यत  किल्ला लढवत विजयी होणे ! डॉ. सुब्रमण्यम यांना ही नाराज करावे लागणार होते. त्यांचे बाजूने त्यांनी मला सर्वच सवलती देऊ केल्या होत्या. छोटी शिष्यवृत्ती ही मिळाली असती मात्र तेवढ्याने मला कुटुंबास आर्थिक मदत करता आली नसती. 

    अनेक नवीन प्रश्न पुन्हा निर्माण होणार होते. माणूस करावयास जातो एक आणि निष्पन्न होते भलतेच. त्यामुळे काही लोकांचा देवावरील विश्वास कमी होतो. माझा मात्र अशावेळी देवावरील विश्वास दुणावतो .कितीही संकटे दाटून अंधारुन येऊ  दे, परमेश्वरी इच्छा असेल तर त्यातूनही योग्य, चांगली वाट सापडणार असा विश्वास बाळगला पाहिजे.

    मुद्दई लाख बुरा चाहे ,तो क्या होता है ?

   वही होता है जो मंजुरे खुदा होता है !!

   अजून पर्यंत तरी खुदा ने मला योग्य वेळी योग्य ‘मंजुरी’ दिलेली होती, आताही मिळेल याची खात्री वाटत होती . योग्य वेळ येई पर्यंत वाट पहावी लागणार होती!

      माझे सहकारी प्राध्यापक व माझ्याबरोबरच रुजू झालेले डाॅ. प्रभू एक वर्षाचे आतच कॉलेजला रामराम करून  बंगलोरला  रवाना झाले होते .त्यांनाही तेथेच एका ऊद्योगात काम  मिळाले होते.

     गोदरेज मध्ये काम करीत असतानाच कधीतरी एस्सो( ESSO),या त्यावेळीच्या जगातील एक नंबरच्या अमेरिकन कंपनीत दिलेली मुलाखत मी विसरून गेलो होतो. एस्सो ही त्यावेळी भारतातच नव्हे तर सर्व जगात,’ बेस्ट पे मास्टर’, उत्तम वेतन देणारी अशी कंपनी मानली जात होती. खरे तर त्यावेळी या कंपनीतून लोकांना कमी केले जात होते (Retrenchment).आपल्या कंपनी चे कदाचित राष्ट्रीयकरण( Nationalization)  होईल असा सुगावा त्यांना लागला असावा. तरी देखील काही विशिष्ट खास कामासाठी (Specialist jobs),त्यांनी केवळ सहा लोकांची नव्याने भरती करण्याचे 1970 साली ठरविले होते.भारतभर विविध पेपरामधून जाहिराती दिल्या होत्या. प्रतिसाद ही चांगला मिळून फक्त सुमारे 100 लोक मुलाखतीसाठी बोलविले होते.दोन जण अकाऊंटस्, दोन संशोधन आणि दोन जण उत्पादन खात्यासाठी अशी  सहा लोकांची गरज  होती. त्यामुळे तीन मुलाखती झाल्यावरही पुन्हा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने, मी आशा सोडून दिली होती. वर्षाचा कालावधी गेला होता.  मात्र कंपनीचे जनरल मॅनेजर श्री विजय राघवन साहेब मला विसरले नव्हते. त्यांनीच माझी अखेरची मुलाखत घेतली होती. असाच एके दिवशी मनाच्या उद्विग्न अवस्थेत  प्रा. केरकर यांच्या केबिनमध्ये एकटा बसलो असताना, तेथील फोन घणघणला. तेंव्हा मोबाईल फोन तर नाहीच पण हे जमिनीवरचे फोनही खूप कमी असत. हाच नंबर मी संपर्कासाठी दिला होता.श्री  राघवन यांनी मला विचारले,” तुला अजून  आमच्या कंपनीत नोकरीत करण्याची इच्छा आहे ?” मी “होय” म्हटल्यावर त्यांनी मला त्यांच्या चर्चगेट येथील ऑफिसमध्ये विशिष्ट दिवशी येण्याचे सुचविले. त्यावेळी मला नक्की काय वाटले हे आता सांगता येत नाही. मात्र एकदा दुधाने तोंड भाजल्यावर ताकही फुंकून प्यावेसे वाटते तसे काहीसे झाले. विशेष अपेक्षा न बाळगता मी त्यांना भेटावयास गेलो. विजय राघवन यांनी जे सांगितले ते ऐकून मला केवळ चक्कर येण्याचे बाकी होते. सहाही जणांची निवड झाली होती.मात्र माझ्या जागेसाठी ज्या डाॅ .नायर या गृहस्थांची (मागाहून मला कळले हे विजय राघवन यांचे गाववाले होते), निवड झाली होती त्यांना वैद्यकीय तपासणीत’ ‘रातांधळेपण’ असल्याने(Colour Blindness) नाकारले गेले होते.त्यामुळे विजय राघवन यांनी मला त्वरित मेडिकल टेस्ट साठी त्यांच्या वैद्यकीय खात्यात पाठवून रिपोर्ट घेऊन येण्यास सांगितले.मी थोडासा नर्वस अवस्थेतच वैद्यकीय तपासणीसाठी गेलो. हे  वैद्यकीय खातेही सुसज्ज व तळमजल्यावरच होते. माझ्या सर्व शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. विशेष करून, कलर ब्लाइंडनेस टेस्ट मध्येही मी पास झालो होतो. विजय राघवन यांच्या केबिन बाहेर येऊन बसलो.सेक्रेटरीला तसे सांगितले. थोड्याच वेळात श्री विजय राघवन स्वतः केविन बाहेर येऊन मला हात धरून त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले काय चालू आहे हे मला कळतच नव्हते अजूनही मी भांबावलेल्या अवस्थेतच होतो. मला खुर्चीवर बसविले.माझे अभिनंदन केले. “काँग्रॅच्युलेशन्स माय बॉय यु हॅव बीन अपॉईन्टेड ऑफिसर ऑफ दि ग्रेट एस्सो कंपनी ..गुड लक..”, म्हणून ते नेमणूक पत्र माझ्या हातात दिले ,ज्याची अनेक वर्षे मी प्र प्रतीक्षा करीत होतो. ज्या क्षणी मला माझे नेमणूक पत्र दिले ते वाचताना अक्षरशा माझ्या डोळ्यात आले. ते पाहून राघवननी मला, काय झाले म्हणून विचारले? चहा मागवला. मी हातानेच काही नाही असे दर्शवून त्यांना वंदन केले. थोडक्यात गेल्या वर्षातील माझ्या मनोवस्थेचे वर्णन केले. माझ्यासाठी हा चमत्कार झाला होता. काही क्षणापूर्वी मी आयुष्यात एका उद्विग्न अवस्थेत भरकटत जात होतो आणि तासाभरात सर्व चमत्कार होऊन जगातील एक नंबरच्या कंपनीचा ऑफिसर म्हणून नेमणूक पत्र माझ्या हातात आले होते! जशा नोकरीची मी स्वप्न पाहिली होती … आणि पगाराचा आकडा पाहून तर केवळ हर्षवायू होऊन वेड लागण्याचे बाकी होते!! त्यांच्या केबिन बाहेर येऊन थोडा वेळ शांतपणे बसलो.एक दैवी चमत्कार प्रत्यक्ष अनुभवत होतो  .आणि कधीतरी वाचलेल्या त्या ओळी माझ्या ओठावर आल्या …

  अगर कुछ चाहो और ना वो मिले तो समझलेना, 

  कुछ और अच्छा लिखा है तेरे तकदीर मे …!!

  माझी तकदीर  खुलली होती मी देवाचे मनोमन अनेक आभार मानले आंधळा मागतो एक डोळा देवाने मला दिले तीन डोळे अशीच माझी भावना झाली

जगप्रसिद्ध  विक्टोरिया जुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट आज वीर माता  जिजाबाई तंत्रज्ञान महाविद्यालय(VJTI),

       डॉ. सुब्रमण्यम यांच्याशीही मी याबाबतीत मन मोकळेपणाने बोललो. मला एस्सो कंपनीत नोकरी मिळाल्याचे ऐकून त्यांनाही आश्चर्य वाटले कारण एवढी सिटीतील काही विद्यार्थी त्यांचे इतर काही विद्यार्थी या नोकरीसाठी प्रयत्न करीत होते त्यांचा नंबर लागला नव्हता माझा कुठे वशिला आहे का असेही गमतीने डॉक्टर सुब्रमण्यम यांनी विचारले. मला हसू आले. मी त्यांना काय सांगू माझा ‘वशिलेदार’कोण आहे ते?त्यांच्याही मनात काहीच गैरसमज नव्हते. त्यांनीही मला व्ही जे  टी आय नोकरी व पीएचडी अभ्यास सोडून एस्सो मध्ये रुजू होण्याचा सल्ला व तेथे उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माझ्या विद्यार्थ्यांना खूप वाईट वाटले त्यांनीही मला प्रेमाने निरोप समारंभ दिला. त्यांना दुःख झाले होते पण इलाज नव्हता .नियतीचे दान पडेल ते स्वीकारावे हे तुम्हीही आयुष्यात लक्षात ठेवा, असेच मी त्यांना त्यावेळी सांगितले. काही माझे विद्यार्थी अनेक वर्ष माझ्या संपर्कात होते. एका नव्या जगात नव्या मनूचा उदय माझ्यासाठी होत होता त्याविषयी दुसऱ्या लेखात !!