एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात..

शेवटचे अंडे माझे..

पशुपक्ष्यांनाही प्रेम कृतज्ञता भीती या भावना असतात का हो? असतात! त्यांना भविष्याची चाहूल लागते का? स्वतःच्या आयुष्याचे अंदाज कळतात काय? कळतात! बोलता येत नसले तरी अंतर्मनात त्यांना कुठेतरी ह्या जाणीवा होतं असल्या पाहिजेत. त्यामाणसापर्यंत पोहोचविण्याची त्यांची पद्धत आम्हाला समजली की, “शब्दा वाचून शब्दापलीकडचे समजण्याची आम्हालाही संवेदना प्राप्त होईल! काही दिवसापासून घोलवडच्या घरी घडत गेलेल्या घटनां क्रमावरून माझा हा ग्रह दृढ झाला आहे!!

   त्याचे असे झाले. घोलवडला आमच्या घरी असलेल्या नऊ कोंबड्या पैकी अंडी घालणाऱ्या कोंबड्या, नेहमीप्रमाणे करंड्यात वा पिंजऱ्यात अंडे न घालता आपल्या ओटीवर येऊन मोठी आईच्या खांटैवर अंडी घालण्यासाठी बसू लागल्या. विशेष म्हणजे कोंबडी खाटेवर वा खाटेखाली बसल्यास ढोल्या आणि बुळ्या कोंबडे आपापल्या मैत्रिणींना धीर देण्यासाठी त्यांच्या बरोबर येऊन समोर बसत.

  ”मी येथे आहे तू निश्चिंत अंडे घाल” हेच सांगण्यासाठीच जणू ते तसे  करीत असावे असे जाणवे!

   हे थोडेसे मला आगळेवेगळे वाटले. थोडे बारकाईने लक्ष देऊ लागलो . मध्येच कधीतरी त्यांचा किलबिलाट ..को..करे~को..क ~ ..ऐकू येई. आम्ही बाहेर निघून काय झाले पाहतो तो सर्व कोंबडी भितीग्रस्त होऊन झाडांच्या बुडाशी एकत्र येऊन एकमेकांच्या शेजारी स्तब्ध होऊन राहत. एकमेकांच्या चोची जवळ आणून कोणताही आवाज न करता जणू ती काहीतरी एकमेकांना सांगत आहेत अशा भास होत होई ! एक जण जणू दुसऱ्याला सांगत होता,” घाबरू नको आपण एकत्र आहोत, एकत्र  राहू.. एकत्र लढूया!

विशेष म्हणजे एरव्ही सर्वांना हुसकाऊन लावणारा ढोल्याही त्या कळपात सेनापती सारखा पुढे राहून त्यांना धीर देत होता..

      “डरो मत,मै हूॅ ना! ..”

काही वेळाने हा सर्व घोळका शांत होऊन आपापल्या मार्गाने चालू लागे. कुठे एकमेकात अंतर न पडू देता घोळका एकत्रच फिरे. ’कुठेतरी काहीतरी बिनसले आहे, कोणते तरी संकट आपणा सर्वांवर येऊ घातले आहे ..’अशी त्यांच्या अंतर्मनाची जाणीव आम्हाला समजत होती ,पण निश्चित काय झाले आहे ते कळत नव्हते?

   इतर कोंबड्या जरी  खाटेवर बसू लागल्या तरी आमची शुभ्र पांढरी ‘शुभदा’ कोंबडी माझ्या आराम खुर्चीवर बसू लागली. पहिल्यांदा मी ओटीवर नसताना हळूच येऊन बसून अंडे घालून जाई.मित्र बुळ्या  तिची राखण करे. पुढे मी ओटीवर बसलेलो असतानाही धीर करून ती खाटेवर खुर्चीत अंडे घालून जाई, .अगदी बिनधास्त.  त्या दिवशी तर अरुण भाई, सचिन बरोबर ओटीवर गप्पा मारत असताना सर्वान् देखत ही माझ्या खुर्चीवर बसली आणि हळूच कधी अंडे घालून माझ्या मांडीवर तिने उडी घेतली.अरुण भाईंना व सचिनला हे मोठे नवल वाटले .कोंबडी अशी माझ्या आरामखुर्चीत अंडे घालते व माझ्या जवळ येऊन लाड का करऊन  घेते ..?मी पण तिला गोंजारले ,पाठीवरून हात फिरवला व हवेत उंच सोडून दिले म्हटले,

   “आता जा, उद्या परत अंडे घालातला ये..”

   मलाही का कोणास ठाऊक तिचे खूप कौतुक वाटले अगदी प्रथमच तिने हा लडीवाळपणा केला होता.तिच्या संपूर्ण धवल रंगाचे गुणगान त्यांच्यासमोर करून,” हिच्या सर्व पांढऱ्या शुभ्र पिसार्या वर एक सुद्धा काळा डाग नाही .. जास्तीत जास्त अंडी हीच देते” ,अशी भलामण केली! 

   पाहुणे मंडळी गेल्यावर तिला खास बोलावून मी मुठभर गव्हाच्या दाण्यांची  मेजवानी तिला माझ्या हातून दिली. तीसुध्दा अगदी बिनधास्त माझ्या हातून खात राहिली. एरव्ही अशी एवढ्या जवळ कधीच येत नसे. पहिल्यांदाच तिने असे हातातून दाणे वेचले .दुसऱ्या दिवशी मी ओटीवर बसलो असताना ती प्रथम माझ्या मांडीवर बसली,

   “मला उचलून खुर्चीत बसवा ..”असे जणू सांगू लागली .

   मी तसे केले व माझ्या कामास निघून गेलो.

   थोड्यावेळाने खुर्चीत अंडे होते. शुभदा चराययला निघून गेली होती. सकाळचीच वेळ होती .अकरा साडेअकरा झाले असतील. आणि मोठ्याने कोंबड्यांचा गलबला सुरू झाला.पटकन आम्ही सर्व बाहेर आलो. दोन भटकी कुत्री आमच्या कंपाउंड मध्ये कशी कोणास ठाऊक, शिरून कोंबड्यांचा पाठलाग करत होती. कोंबड्या व दोन्ही कोंबडे, पुढे धावत होते व हे कुत्रे मागे पडले होते. आम्ही दगड मारीत होतो तरी पाठ सोडीत नव्हते. मला वाटते घराला एक वळसा झाला असावा आणि कस्टमच्या कंपाउंडला असलेल्या तारेच्या फटीतून ही चोरांची  गॅंग निसटली. जिथून ते शिरले होते ती जागा हेरून ठेवली.

    तोंडात कोंबडी धरून कुत्री पळाल्याचे दिसले नाही. जीव भांड्यात पडला.मात्र शंका नको म्हणून कोंबड्यांचा काउंट घेतला. पाहतो तर एक कोंबडी कमी दिसत होती. कोणती ते पटकन लक्षात येईना. आपल्या घराभोवती फिरताना  ओटीच्या उजवीकडील गल्लीत काही पांढरी पिसे दिसली.. मन सैरभर झाले … थोडे पुढे गेलो .. हो शंका खरी ठरली.. तगरीच्या फांद्यात  शुभदेचा निष्प्राण देह पडला होता… तिच्या शुभ्र पंखावर तगरीची चार शुभ्र ताजी फुले पडली होती…तिच्या नाजूक मानेवरच कुत्र्याने घाव घालून लचका तोडला होता. अलगदपणे ते कलेवर सुपात घेऊन मागच्या बाजूस खड्डा खणून तिला सद्गती दिली …. तांदळाचे दाणे व जास्वंदीची फुले ठेवून तिची क्षमा मागितली ..अगदी मनापासून प्रार्थना ना केली,    

        “परमेश्वरा या निष्पाप जीवाला सद्गती दे!!”

    काही दिवसांचा तो मागील घटनाक्रम आठवीत गेलो. अर्थ उलगडत गेला! एकमेकांना धीर देत एका ठिकाणी निस्तब्ध झालेल्या कोंबड्यांचा तो कळप ..अंडी घालण्यासाठी त्यांना हवी असलेली आमची ओटी.. शुभदाला मात्र हवी असलेली माझी खुर्ची. सर्वांना पळवून लावणारा पण गेले काही दिवस सर्वांना एकत्र आणणारा  ढोल्या.. “

   मग विचार करू लागलो ,त्यादिवशी मांडीवर बसून नंतरच खुर्चीत अंडे देणारी “शुभदा” मला काय सांगत होती? आजचा दिवस आणि आजचे हे अंडे शेवटची हेच तिला  सुचित करावयाचे होते का ?मला तिचे ते प्रेम त्यावेळी का नाही कळले?

   आम्हाला ती क्षमा करेल का? … आपल्या सर्व मित्र-मैत्रिणीवर आलेले संकट आपल्या जीवावर घेताना तिला काय वाटले असेल..? त्यांना सुद्धा तिने काही सांगितले असेल काय?

   आपले शेवटचे अंडे दिल्यावर पुन्हा माझ्या मांडीवर बसून, पंखावरून हात फिरवून घेऊन मी हवेत सोडल्यावर, झेप घेऊन गेलेली शुभदा  शेवटी सांगत असेल..

       “एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात ,

        आता, शेवटचे अंडे माझे तुझ्या अंगणात..!”

आता पुन्हा माझ्या आराम खुर्चीत बसून अंडे घालणारी ,टुण्णकन्  उडी मारून मांडीवर विसावणारी शुभदा दिसणार नाही… कध्धीच  नाही..

    शुभदा ,आम्हाला  माफ कर .तुझी व्यथा आम्ही नाही ओळखू शकलो. तुझे प्रेम आम्ही नाही ओळखू शकलो ..तुला नाही वाचवू शकलो!!

    “ जीवो जीवस्य जीवनम्.”.अंतीम सत्य!

  ही दोन पाने लिहिली व मन थोडे हलके झाले।