तस्मै श्री गुरुवे नमः – पुस्तक प्रकाशन सोहळा

बसलेले डावीकडून श्री सुदेश हिंगलाजपूर कर डॉ. सिसीलिया कारव्हालो, दिगंबर राऊत,डॉक्टर शरद काळे प्रिन्सिपल प्रभाकर राऊत श्री नरेश भाई राऊत डॉक्टर अंजली पटवर्धन कुलकर्णी आणि प्रिन्सिपल बिनिता शहा

माझ्या ब्लॉगवर प्रकाशित झालेल्या काही लेखांचे प्रकाशन, “तस्मै श्री गुरुवे नमः” या पुस्तक रूपाने सुप्रसिद्ध प्रकाशक ‘ग्रंथाली’, यांच्यातर्फे तसेच गोखले एज्युकेशन सोसायटी, बोर्डी शाखा यांच्या सहकार्यातून, 12 डिसेंबर2023 रोजी झाले.
डॉ. डॉ.शरद काळे, डॉक्टर सीसीलिया कार्वेलो तसेच ग्रंथालीचे श्री सुदेश हिंगलाजपुरकर ,गोखले एज्युकेशन सोसायटीचे पालघर विभागाचे सचिव प्रि. प्रभाकर राऊत, व डॉक्टर अंजली पटवर्धन कुलकर्णी यांची उपस्थिती होती. बोर्डी परिसर व मुंबई ,पुणे येथील शाळेच्या माजी विद्यार्थ्यां ची उपस्थिती ही लक्षणीय होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे ग्रंथालीने केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग येथे सादर करण्यात आनंद होत आहे.

Granthali Watch पुस्तक प्रकाशन सोहळा

माझ्या शिक्षण-कालखंडातील १९५४-१९५९ हा काळ बोर्डीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूलमध्ये व्यतीत केलेला माध्यमिक- शालेय कालखंड. आचार्य भिसे-चित्रे-सावे ही महान त्रयी सेवानिवृत्त झाली होती. सानेगुरुजींचे कनिष्ठ बंधू पुरुषोत्तम साने उर्फ आप्पा साने आमचे मुख्याध्यापक होते. इतरही अनेक निष्ठावंत सहकाऱ्यांची त्यांना साथ होती. आचार्य भिसे यांचीच परंपरा ही मंडळीसुद्धा पुढे नेत होती. साधी व स्वावलंबी राहणी, उच्च विचारसरणी, राष्ट्रभक्ती या गुणांची जिवंत उदाहरणे म्हणजे ही आमची शिक्षकमंडळी होती. आमच्या संस्कारक्षम मनावर याचा निश्चितच चांगला परिणाम झाल्याशिवाय कसा राहणार? सत्याचे आचरण, वाईटाचे निर्गमन व शिक्षणाचे आचमन हीच आमच्या गुरुजनांनी शिकविलेली बोर्डी शाळेची परंपरा झाली आहे. म्हणूनच या शिक्षणसंस्थेतून बाहेर पडलेला प्रत्येक माजी विद्यार्थी जगात कुठेही गेला तरी तो वेगळाच वाटतो. हे वेगळेपण आम्ही जपले पाहिजे, नव्हे, पुढच्या पिढीत संक्रमित केले पाहिजे. हीच आमच्या या सर्व गुरुजनांना दिलेली खरी गुरुदक्षिणा ठरेल. माझ्या चार वर्षांच्या काळात या गुरुजनांनी दिलेले ज्ञान व संस्कार घेताना माझ्या फाटक्या झोळीत जे जमले, ते मी भावी आयुष्यात मिरविले. आज इतक्या वर्षांनंतर त्या गतस्मृतींच्या सुवर्णक्षणांची आठवण करून ते कागदावर उतरविण्याचा केलेला हा प्रयत्न, ‘तस्मै श्री गुरुवे नमः ‘

पुस्तक उपलब्ध आहे: https://www.amazon.in/dp/9356502447?ref=myi_title_dp 

ह्या सोहळ्यातील काही क्षणचित्रे –