द्रष्टे स्त्री-संघटक व चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे श्री मुकुंदराव सावे

                     कै. मुकुंदराव अनंत सावे     13 डिसेंबर 1879-16 सप्टें 1967

      “सर्व  समाज सुखी झाला पाहिजे. स्वातंत्र्य समता व बंधुभाव सर्वत्र उत्पन्न झाला पाहिजे. दास्यत्व व गुलामी पार नाहीशी झाली पाहिजे. प्रजा जेव्हा आपल्या समाज धर्मापासून व राष्ट्रधर्मापासून च्यूत होते त्यावेळी स्वतंत्र असलेली प्रजा परतंत्र होते. स्त्रिया जेव्हा शरीरनिष्ठ व देहभिमूख बनल्या तेव्हा साहजिकच त्या तत्त्व भ्रष्ट झाल्या व आपल्या स्वत्वाला व पराक्रमाला विसरल्या. त्यामुळे परदास्य म्हणजे गुलामी त्यांच्या नशिबी आली. स्त्रिया अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करतील तर आपणात असाधारण कर्तृत्व आहे याची त्यांना जाणीव होईल!

    ऊद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये कधी ।

   आत्माची आपला बंधू, आत्माची रिपू आपला।।

श्री गीताई ५-६

     अविद्येतून विद्येकडे व बंधनातून मुक्ती कडे जाण्याचे सामर्थ्य फक्त मनुष्य प्राण्यालाच निसर्गाने दिले आहे. या कामी निसर्गाने स्त्री-पुरुष हा भेद केला नाही. पुरुषाला संधी मिळाल्यामुळे त्याच्या बुद्धीचा विकास झाला. योग्य संधी अभावी स्त्री मागे पडली. आता काळ बदलला आहे. स्त्रियांना आपल्यावरील अन्यायाची जाणीव झाली आहे. बदलत्या जगाला थांबविण्याचे सामर्थ्य कोणत्याही शक्तीला यापुढे असणार नाही .नव्या जगात नव्या विचाराने व नव्या सामाजिक रचनेच्या कल्पना घेऊन स्त्रियांनी पुढे आले पाहिजे..”

     सुमारे 100 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील स्त्री वर्गाला आपल्या सत्वाची व सामर्थ्याची जाणीव करून घेऊन त्यांच्यात स्फुल्लिंग निर्माण करणारे कै. मुकुंदराव सावे हे आमच्या बोर्डी परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या त्या सुवर्ण काळातील एक आद्य समाजसेवक होते. एक  प्रगतिशील शेतकरी,  स्वातंत्र्य लढ्यातील धडाडीचे राष्ट्रसेवक व ठाणे जिल्ह्यातील महिला संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांनी गौरवास्पदलौकिक मिळविला. परवा तेरा डिसेंबर रोजी त्यांची 144 वी जयंती होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा हा प्रयत्न ..

  मुकुंदराव 1967साली  निवर्तले तेव्हा मी पंचविशीत होतो. त्यामुळे त्यांच्या दर्शनाचा व त्यांचे अमोघ वकृत्व ऐकण्याचे भाग्य मला मिळाले. आजही त्यांची आठवण झाली म्हणजे शरीर रोमांचित होते व त्या दृष्ट्या पुरुषाचे  शब्द आठवून  मान आदराने लवते!!

   पांढरे शुभ्र खादीचे धोतर त्यावर लांब हाताचा अंगरखा वर साधे उबदार जाकीट डोईवर शुभ्र गांधी टोपी, सफेद भरदार मिशा आणि तेजस्वी डोळ्यांमुळे दिसणारा रुबाबदार चेहरा, आणि या सर्वांमुळे तयार होणारे एक बाणेदार व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या बालवयांतीला स्मृती पटलावर उमटलेले मुकुंदरावांचे चित्र आहे! त्यांच्या वक्तृत्वाला एक वेगळीच धार असे. आवाज भरदार नसला तरी त्या आवाजामागे तळमळ व स्वतःच्या स्वदेशी आचरणाची जोड असल्याने बोलताना त्यांची वेगळीच छाप पडत असे.

  “ आधी केले मग सांगितले ..” हा त्यांच्या आयुष्याचा बाणा होता. 

     मुकुंदरावांचा जन्म बोर्डी येथे १३ डिसेंबर 1879 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आनू म्हणजेच अनंत होते व आईचे नाव वेणूबाई होते. त्या बोर्डी गावचे पोलीस पाटील रावजी हरी पाटील यांच्या कन्या होतं. सावे घराणे बोर्डीत प्रतिष्ठित गणले जाई. सावे म्हणजे साव..श्रीमंत घराणे. या सावे लोकांकडे मोठा जमीन जुमला होता परंतु अनंतराव मात्र  गरीब होते. ते एक कष्टाळू शेतकरी होते. गाई पालनाचा व दूध दूभत्याचा  त्यांचा व्यवसाय होता. आई वेणूबाई पतीला संसारात सर्व तऱ्हेची मदत करी. त्या धार्मिक विचारांच्या होत्या.नियमित उपवास व्रतवैकल्य करीत. मुकुंदराव म्हणत, त्यांच्या जीवनांतील आध्यात्मिक बैठकीला मुख्य कारण त्यांची आई होय!

             कै.मुकुंदराव सावे व  कै.सौ.भिवराबाई मुकुंदराव सावे.

    मुकुंदरावांना आंगी( मनुबाई )मोरेश्वर, हरी व सुकरी अशी चार भावंडे होती. मुकुंदरावांचे मराठी चौथीपर्यंतचे शिक्षण बोर्डी येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर त्यांना चिंचणीस पाठविले गेले. चिंचणीच्या शाळेत श्री परशराम धर्माजी चुरी हे मुकुंदरावांचे वर्ग बंधू होते. त्या दोघांची मोठी मैत्री होती. पुढे मुकुंदराव सहावी इयत्तेत असताना आजारी पडले व त्यामुळे नाईलाजाने त्यांना शाळा सोडावी लागली. मुकुंदरावांना आईच्या आजोळी चिंचणीस राहिल्याने अभ्यासाव्यतिरिक्तही पुष्कळ शिकावयास मिळाले. ते म्हणत, एकत्र कुटुंब पद्धतीचे संस्कार मला तेथूनच प्राप्त झाले जे माझ्या भावी आयुष्यात फार उपयोगी पडले. मुकुंद रावांचे लग्न बारा वर्षाचे असताना ठरविले गेले. त्यावेळी लहानपणी लग्न करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाई. त्यांच्या पत्नी सौ.भिवरा यांचे लग्नाच्या वेळी वय आठ ते नऊ वर्षाचे होते.

   परिस्थितीच्या रेट्यामुळे मुकुंदरावांचे बंधू मराठी चौथीच्या पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत. बहिणींना तर शाळेचे दर्शनही होऊ शकले नाही. मुकुंदराव व त्यांची भावंडे आईबरोबर शेतावर काम करण्यास जात असत. मात्र त्यांना शेतीच्या मशागतीसाठी लागणारी अवजारे नसल्याने मामांनी आपली अवजारे त्यांना दिली. शेतीतील अवजारे उत्तम प्रतीची असली पाहिजेत असाच मुकुंदरावांचासदैव  आग्रह असे. अवजारे चांगली असली तरच शेतीची मशागत कार्यक्षमतेने होते असे ते म्हणत.

     मुकुंदरावांच्या कुटुंबाकडे उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसल्याने सर्वांचीच उपासमार होई. अन्नाप्रमाणेच वस्त्राची ही उणीव सर्वांना भासे. बालपणी त्यांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागले. मुकुंदरावांनी एक बैलगाडी विकत घेतली व त्या गाडीतून ते विटा चुना, किराणामाल यांची वाहतूक करीत.त्यातून मिळणाऱ्या भाड्यावर काही काळ आपला चरितार्थ चालविला.

त्यांनी जंगलातील लाकडाची वाहतूक करण्याचे कामही केले.मुकुंदरावांनी एका लाकूड व्यापाराकडे काही काळ नोकरी ही केली. मात्र त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला नोकरीची गुलामगिरी मानवली नाही.” आयुष्यात नोकरी कधीही करणार नाही..”,अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. शेती बागायत हा आपल्या समाजाचा मूळ व्यवसाय आहे हे जाणून आपल्या मित्राबरोबर थोडी जमीन मिळविली. एकत्रित बागायत करण्यास सुरुवात केली. या बागायतीत त्यांनी अतिशय परिश्रम केले व भाजीपाल्याच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळू लागले. शेतकऱ्याचे जीवन अत्यंत कष्टाचे हे आहे परंतु त्याला स्वाभिमानाने जगता येते!, याची त्यांना खात्री होती.

       बोर्डी येथील सत्कार समारंभात प्राचार्य टी ए  कुलकर्णी, मुकुंदराव सावे यांचा सत्कार करताना.

    वयाच्या 24-25 व्या वर्षी मुकुंदरावांच्या मनात संन्यस्त जीवन जगण्याची इच्छा बळावली. लहानपणीचे आईचे धार्मिक संस्कार व रामायण महाभारत भागवत यासारख्या ग्रंथांचे वाचन यामुळे त्यांना भौतिक संसाराचा त्याग करून संन्यासी व्हावे असे वाटले होते. आपले बोर्डीचे घर सोडून ते नाशिक येथे गेले. अनेक साधूंच्या आश्रमात निवास केला. तेथे त्यांना आढळून आले की हे कोणी साधुमहंत नसून, आध्यात्मिक साधने ऐवजी आराम व मिष्टान्ने खाण्यातच त्यांनाअतिशय रस आहे. मुकुंदराव पुन्हा बोर्डीत आले. आपल्या आईच्या पाया पडले. तिची क्षमा मागितली. मुकुंदरावांनी समाज सुधारण्याचे कार्य त्या वेळेपासून हाती घेतले ते अखेरपर्यंत. ”संन्याशी होऊन दीक्षा घेतल्याने केवळ आपल्या आत्म्याचे कल्याण होईल परंतु समाजसेवा केली  तर स्वतः बरोबर समाजाचे ही कल्याण करता येईल!” अशी  त्यांची धारणा बनली. आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च  – ऋग्वेद  

    मागे वर्णन केल्याप्रमाणे कौटुंबिक हलाखीची परिस्थिती असतानाही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. कुटुंबातील एक ज्येष्ठ मुलगा, स्वतःचे कुटुंब, पाठच्या भाऊ-बहिणींची जबाबदारी, वृद्ध आई, शेतीचा स्वकष्टाचा उद्योग ,अशा परिस्थितीतही मातृभूमीच्या स्वातंत्र्यलढ्यातस्वतःला पूर्णपणे झोकून देणाऱ्या मुकुंदरावांच्या या धाडसाचे व देशप्रेमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे! कदाचित तो काल महिमा होता. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यासारख्या नेत्यांनी तत्कालीन तरुणांवर स्वातंत्र्य प्रेमाचे जे गारुड केले होते त्यामुळेच बोर्डी घोलवड परिसरातील शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी त्यावेळी आपल्या कौटुंबिक परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली होती. लोकमान्यांचे केसरीतील अग्रलेख वाचून बोर्डी गावात स्वदेशीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकमान्य अमृतसर काँग्रेसला जाण्यासाठी ज्या गाडीने चालले होते ती गाडी डहाणू स्टेशनवर थांबली होती. बोर्डीचे सर्व कार्यकर्ते त्यांचे दर्शन घेण्यास डहाणू स्टेशनवर गेले होते. लोकमान्यांनी डब्या बाहेर येऊन प्लॅटफॉर्मवर जे भाषण केले त्यातूनच मुकुंदराव व बोर्डीच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र लढ्यात भाग घेण्याची स्फूर्ती मिळाली होती. “लोकमान्य टिळकांचे आम्हाला दर्शन झाले व त्यांचे भाषण ऐकण्याची आम्हा संधी लाभली हे आमचे परमभाग्य होते”, असे ते नेहमी म्हणत .

      1960 सालसे स्वदेशी व बहिष्काराची चळवळ पुढे होमरूल लीग चळवळ व अहमदाबाद येथील 1918 सालचे काँग्रेस अधिवेशन, मुकुंदराव प्रत्येक चळवळीत जातीने हजर होते. अहमदाबाद येथे त्यांना गांधी आश्रमात महात्माजींची भेट घेता आली. गांधीजींनी त्यांना शेजारी बसविले व तुम्हास होईल तेवढी देशाची सेवा करा, असा आदेश दिला. मुकुंदराव म्हणत “गांधीजींच्या बरोबर मला पंधरा-वीस मिनिटे बोलण्याची जी संधी मिळाली तो माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंग होता. जीवनाला कलाटणी  देणारा तो क्षण होता.” त्यानंतरच त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला पूर्णपणे वाहून घेतले होते.

     बोर्डी येथील सत्कार समारंभात आचार्य भिसे भाषण करताना..

    1928 साली बारडोलीचा सत्याग्रह झाला. कै.वल्लभभाई पटेल यांनी त्याचे नेतृत्व केले. या सत्याग्रहात ही मुकुंदराव स्वयंसेवक म्हणून गेले होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मिठाच्या सत्याग्रहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस सुरुवात केली होती. मुकुंदराव सावे यांनाही एका तुकडीत सामील करून घेण्यात आले होते. धारासणा येथील  मिठागरावर हजारो सत्याग्रहींनी मोर्चा काढला होता. त्या सत्याग्रहींना घोड्याच्या टाचेखाली पोलिसांनी तुडविले. त्यांची सुश्रुषा करण्यासाठी बोर्डीहून गेलेल्या स्वयंसेवक पथकात मुकुंदराव ही सामील होते. बोर्डी येथे लालाजी चौकात मीठ तयार करण्यात आले होते. ‘आझाद मीठ”, म्हणून ते सर्वत्र विकण्यांत आले.

      धारासणा येथे सत्याग्रहीवर पाशवी अत्याचार करणारा पोलीस अधिकारी आंटीया हा बोर्डी येथे विश्रांतीसाठी आला असताना मुकुंदरावांनी गावात भाषण करून, ”आंटिया राष्ट्रद्रोही आहे त्याला गावात राहण्याचा अधिकार नाही”, असे ठणकावून सांगितले. सर्व गावाने आंटीयावर बहिष्कार घातला. त्यामुळ त्याला गाव सोडून निघून जावे लागले. परंतु सरकारने मुकुंदराव सावे, माधवराव राऊत, नाना मळेकर यांच्यावर खटले भरले. या खटल्यातून ते सर्वजण निर्दोष सुटले. या प्रसंगामुळे मुकुंदरावांचे शब्दाला बोर्डी  परिसरात किती अनन्यसाधारण महत्त्व होते याची जाणीव होते.

     स्वामी आनंद यांनी बोर्डीमध्ये गांधी-आश्रम स्थापन केला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी सैनिक तयार करणे व त्यांना विधायक कार्याचे शिक्षण देणे हा या आश्रमाचा उद्देश होता. त्याचे उद्घाटन ऑक्टोबर 1931 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते झाले.त्यावेळी बाबू राजेंद्र प्रसाद हे देखील उपस्थित होते. सरदार पटेल यांच्या कन्या मनीबेन पटेल याही होत्या. या आश्रमातील पहिल्या पाच सेवकांत श्री मुकुंदराव सावे श्री शामराव पाटील, जनुभाऊ सावे, पंढरीनाथ हरिश्चंद्र राऊत व विश्वनाथ खानोलकर ही मंडळी होती. मुकुंदराव या आश्रमाचे कुलपती म्हणून नियुक्त झाले होते. या मंडळींनी सभोवतालच्या खेड्यात जनजागृतीचे उत्तम कार्य चालविले होते.

   इंग्रज सरकारने हा आश्रम बेकायदेशीर ठरवून जप्त केला. येथील सेवकावरही कायदेशीर नोटीसा बजावण्यात आल्या. मुकुंदराव सावे यांनाही नोटीस मिळाली. एक वर्ष सक्त मुजरी व दोनशे रुपये दंड अशी शिक्षा झाली. मुकुंदरावांना नाशिक येथील कारागृहात पाठवण्यात आले. दंड वसूल करण्यासाठी मुकुंदरावांच्या घरांतील सर्व भांडी, बिछाने,शेतीची अवजारे, बैल जोडी, बैलगाडी जप्त करून लिलाव केला. घरात कोणतीही वस्तू शिल्लक राहिली नाही. याही परिस्थितीत मुकुंदरावांच्या सौभाग्यवतीनी दाखविलेले असामान्य धैर्य व  संकटाशी केलेला सामना पाहील्यावर त्या माऊली विषयी नितांत आदर वाटतो.कोण होती ही माणसे? कशासाठी त्यांनी हा छळवाद सोसला? आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना आला तरीदेखील  आपल्या पतीला पूर्ण सहकार्य देत त्या माऊलीने संसाराचा गाडा नेटाने पुढे रेटला ..सौ. भिवरा बाईंना त्रिवार वंदन!!

   कै. मुकुंदराव सावे यांचे ज्येष्ठ पुत्र कै.हिराजी व स्नुषा कै. सौ. रमाबाई.

   इकडे नाशिक तुरुंगात मुकुंदराव असताना, राजकीय कैद्यांना चांगली वागणूक मिळत नाही त्यांना मिळणारे अन्नही कदान्न असते म्हणून त्यांनी उपवास सुरू केला. उपवास सोडावा म्हणून त्यांना मारहाण होऊ लागली. तरीही ते बधेनात तेव्हा त्यांना जमिनीवर खाली पडून त्यांच्या अंगावर बुटांनी लाथा मारल्या गेल्या. मुकुंदराव रक्त ओकू लागले. तरीही त्या नरपशुनी त्यांचा छळ करणे चालूच ठेवले. तुरुंग अधिकाऱ्यांनाच शेवटी माघार घ्यावी लागली. कोणत्या धातू ने बनविली होती या सत्याग्रहींची शरीरे? निश्चितच ते रक्तच वेगळे होते, स्वातंत्र्य प्रेमाने भारलेले!

   तुरुंगातून सुटून आल्यावर मुकुंदरावांनी ठाणे जिल्हाभर फिरून  पुन्हा आपले सामाजिक व राजकीय काम पुढे सुरू केले. 1937 साली मुकुंदरावांनी, ”महाराष्ट्र राष्ट्रीय परिषद “, बोर्डी गावात आयोजित केली. आपल्या घरासमोर भव्य मंडप उभारला  त्या परिषदेत साऱ्या महाराष्ट्रातून प्रतिनिधी आले होते. कर्नाटक केसरी गंगाधरराव देशपांडे श्री.स का पाटील अशा नेत्यांनी  परिषदेत हजेरी लावली होती. एवढी भव्य परिषद बोर्डी सारख्या एका महाराष्ट्राच्या छोट्या गावात भरऊन ती यशस्वी करणारे मुकुंदराव खरेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या संघटना कौशल्यालाही दाद दिली पाहिजे!

   1942 रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंक मैदानावर भारतीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. मुकुंदराव त्या अधिवेशनाला उपस्थित होते. गांधीजींची “करो वा मरो”,” DO OR DIE.. “,ही गर्जना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी त्यांना मिळाली.  तीच ऊर्जा घेऊन त्यांनी उर्वरित समाजकार्य केले.

अशा रीतीने 1907 ते 1947 या चाळीस वर्षाच्या मुकुंदराव सावे यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिले. अगदी प्रत्यक्ष आघाडीवर राहून स्वतःच्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीची जराही परवा न करता व  अनेक शारीरिक यातना सोसूनही भारतीय  स्वातंत्र्य चळवळीशी ते एकनिष्ठ राहिले. !

    महात्मा गांधीना  स्त्री शक्तीची जाणीव झाली होती. त्यामुळेच आपल्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी स्त्रियांना सहभागी  केले होते.

     आपण स्वतः गांधीजींच्या अनेक सत्याग्रहात सामील झाल्यामुळे मुकुंदरावांनाही भारतीय नारी शक्तीची  पूर्ण कल्पना होती. त्यामुळे महाराष्ट्रात विशेषतः ठाणे जिल्ह्यात स्त्रियांच्या संघटनेसाठी त्यांनी पाऊले उचलली. ठाणेजिल्ह्यातील स्त्रियांत स्वातंत्र्यलढाची प्रेरणा निर्माण झाली होतीच. त्यांनी मिठाचा सत्याग्रह,सविनय कायदेभंग ,वैयक्तिक सत्याग्रहात 1942 चे भारत छोडो आंदोलन, यात भाग घेतला होता. त्यांना संघटित करण्याचे काम मुकुंदराव सावे यांनीच केले होते.

    कै.मुकुंदरावांचे सुपुत्र कै.शामराव व स्नुषा कै. सौ प्रभावती

  स्त्री संघटना करण्यामागे दारूबंदीचा प्रसार करण्याचे मुकुंदरावांचे ध्येय होते. ते म्हणत, ”दारूमुळे स्त्रियांनाच सर्वाधिक त्रास होतो.” त्यांचे प्रेरणेमुळे जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरी समोर स्त्रियांनी दारूचे लिलाव रद्द करण्यासाठी सत्याग्रह केला. त्यामुळे सरकारला हे लिलाव रद्द करावे लागले..

  महाराष्ट्र राज्य स्त्री संघटनेतर्फे अध्यक्षा कै. सौ वत्सलाबाई वसंतराव नाईक यांचे तर्फे कै.मुकुंदराव यांचा सत्कार.

स्त्री संघटना करण्यामागे मुकुंदरावांना ‘पडद्याची चाल’ही बंद करावयाची होती. त्याकरिता त्यांनी भारतातील अनेक स्त्री नेत्यांना आमंत्रित करून त्यांची व्याख्याने बोर्डी परिसरात आयोजित केली त्यात श्रीमती जानकी देवी बजाज, श्रीमती अवंतिका बाई गोखले, श्रीमती लीलावती मुन्शी ,या महान स्त्री कार्यकर्त्यांचा ही समावेश होता.त्यांच्या या कामामुळे स्त्रियांत असलेली ‘पडद्या’ची चाल बंद झाली.

   ठाणे जिल्ह्याच्या मनोर येथील स्त्री संघटना परिषदेचे अध्यक्ष तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री श्री बाळासाहेब खेर हे होते. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते,

  ”स्त्रियांचे स्थान पुरुषासमान नाही तर ते पुरुषां पेक्षा उच्च आहे. कारण स्त्री ही माता आहे”,

    या बाळासाहेबांच्या विधाना मुळे ठाणे जिल्ह्यातील स्त्रियांत मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांनी सामाजिक कार्यात रस घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र प्रांतीक काँग्रेस कमिटीने 1924 साली महाराष्ट्र राज्याच्या पातळीवर स्त्री- संघटना स्थापन केली . या संघटनेवर जिल्हा स्त्री संघटनांना प्रतिनिधित्व देण्यांत आले.ठाणे जिल्ह्यांतून श्री मुकुंदराव सावे ,श्रीमती सुमती बाई कीर्तने यांची प्रतिनिधी म्हणून निवड झाली. तेव्हापासून मुकुंदराव सर्व महाराष्ट्रात स्त्री संघटना मजबूत करण्याचे कार्य जोमात करू लागले. श्रीमती प्रेमाताई कंटक ,बनूताई देशपांडे यासारख्या विदुषी  नेत्या बोर्डीस येऊन मुकुंदराव सावे यांचे मार्गदर्शन घेत असत.मुकुंदरावांनी ,”नव्या युगातील स्त्री”,नावाची पुस्तिका लिहिली असून त्यातील विचार सद्यपरिस्थितीत देखील प्रस्तुत आहेत.  भारतातील स्त्री शक्तीचे प्रणेते म्हणून ज्योतिबा फुले, भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचेच पंक्तीत बोर्डीचे श्री मुकुंदराव सावे यांचेही स्थान आहे  असे मला प्रामाणिकपणे वाटते.

 कन्या कै.सुमन,कै. मनोरमा व नातवंडा सोबत कै. मुकुंदराव सावे.

     एक समाज सुधारक म्हणून देखील मुकुंदरावांचे कार्य खूपच मोठे आहे. त्यांना अस्पृश्यता हा हिंदू धर्म वरील कलंक आहे असे वाटे. तो कलंक काढून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या घरापासूनच सुरुवात केली. त्यांच्या घरात दलितांना मुक्त संचार असे. 1920 साली बोर्डी गावातील राम मंदिरात दलितांना प्रवेश देण्यात मुकुंदरावांनी पुढाकार घेतला होता.  तेव्हापासून बोर्डी गावात स्पृश्य-अस्पृश्य हा भेद कायमचा नाहीसा झाला. दरवर्षी मुकुंदराव दलित वस्तीत जाऊन सत्यनारायणाची पूजा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम करीत असत. गावात सलोख्याचे वातावरण निर्माण झाले.

    मद्यपानामुळे समाजाचा ऱ्हास होतो व त्याकरिता स्त्री शक्तीचा उपयोग करून मुकुंदरावांनी जिल्ह्यातील मद्यपरवानेच रद्द करून दारूची दुकानेही बंद पाडली होती. हे त्या काळात क्रांतिकारक पाऊल होते.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याकाळी बोर्डीस मे महिन्यात विश्रांतीसाठी येत. त्यांना  मुकुंदरावांच्या कार्याची जाणीव झाली होती. त्यांनी जातीने मुकुंदरावांचे कौतुक केले होते. मुकुंद रावांना त्याचे मोठे अप्रूप होते.

      तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या डहाणु,पालघर,वसई तालुक्यात सोमवंशी क्षत्रिय समाजाची वस्ती आहे .शेती हा या समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे .मात्र निरक्षरता व अंधश्रद्धा यामुळे हा समाज व्यसनाधीन झाला होता. त्या समाजाच्या कल्याणासाठी मुकुंदरावांनी आपल्या सहकार्यांसह पुढाकार घेतला. या भागात दौरे काढून समाज जागृतीचे कार्य सुरू केले. पुढे या कार्यांत त्यांना कै.अण्णासाहेब वर्तक, तात्यासाहेब चुरी यांचेही सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. या मंडळींनी मार्च 1920 मध्ये चिंचणी येथे सभा घेऊन त्यात “स्वयंसेवक मंडळा”ची स्थापना केली.सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या स्थापनेची ती मुहूर्तमेढ होती. मुकुंदरावांचे हे कार्य ऐतिहासिक ठरले आहे. आज 104 वर्षानंतर या लहान रोपट्याचा वटवृक्ष झाला असून आमचा समाज महाराष्ट्रातील एक प्रगतिशील समाज म्हणून गौरविला गेला आहे. मुकुंदरावांच्या दूरदृष्टीला मिळालेली ही पावतीच होय!

   कै अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर उद्घाटन प्रसंगी, तत्कालीन मुख्यमंत्री कै. मान. यशवंतराव चव्हाण व इतर नेत्यां सोबत कै मुकुंदराव सावे.

  पुढे अण्णासाहेब वर्तकांच्या स्मरणार्थ एक स्मारक मंदिर बांधण्याचे ठरले .समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी  मुकुंदराव सावे यांना देण्यात आली.जागेचा भूखंड विकत घेण्यापासून ते शेवटी इमारत तयार होईपर्यंत संपूर्ण कार्याला मुकुंदरावांनी वाहून घेतले होते .त्यांच्या समवेत त्यांचे जावई श्री रामचंद्र दामोदर चुरी व श्री भालचंद्र मोरोबा राऊत हे सतत असत. मोठ्या चिकाटीने त्यांनी हे काम पूर्णत्वास नेले. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर उभारणीत समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागला आहे, याचा मुकुंदरावांना मोठा अभिमान वाटे.

   दिनांक 31 मे 1959 रोजी  तत्कालीन केंद्रीय दळणवळण मंत्री श्री स का पाटील यांच्या शुभहस्ते शिलान्यास कार्यक्रम पार पडला.  11 जून 1961 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते स्मारक मंदिराचे उद्घाटन झाले .

मुकुंदराव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाचा मोठा गौरव करण्यात आला .

  पुढे या स्मारक मंदिराचा विस्तार करण्यात येऊन जून 1968 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन  मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते ‘कै. तात्यासाहेब चुरी स्मारक वस्तीगृहाचे’,उद्घाटन करण्यात आले. मुकुंदराव त्यावेळी हयात नव्हते परंतु त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल अनेकांनी गौरवोद्गार काढले!

   कै.तात्यासाहेब चुरी स्मारक वस्तीगृहामुळे समाजांतील ग्रामीण भागांतील सर्वसामान्य विद्यार्थ्यालाही उच्च शिक्षण मिळू लागले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेण्याची व तेथे नोकरी व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झालीआहे. “आपण ज्या समाजाकडून मदत घेतली त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो,ते आपले कर्तव्य आहे..”, या भावनेने वसतीगृहाच्या  विद्यार्थ्यांनी ‘माजी विद्यार्थी संघाची‘,स्थापन करून त्याद्वारे समाजसेवेचे काम आज गेली कित्येक वर्षे चालू ठेवले आहे. कै तात्यासाहेब चुरी  स्मारक विद्यार्थी वसतिगृहाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा मी आद्य संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केले व आजही या संस्थेची मी संबंधित आहे.

   मी स्वतः या वस्तीगृहा चा एक माजी विद्यार्थी असून 1965 ते 1970अशी सहा वर्षे वसतीगृहाचा व स्मारक मंदिराचा व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. माझ्या परीने समाजाकडून मिळालेल्या मदती ची अंशतः परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे ,हे नमूद करण्यास मला आनंद होतो!!

    कै. मुकुंदराव सावे व तत्कालीन समाजधुरीणांनी भविष्याची चाहूल घेऊन त्याकाळी उभारलेले हे वसतिगृह आमच्या समाजाला एक वरदान ठरले असून त्यासाठी  मुकुंदराव व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा समाज सदैव ऋणी राहील.

   एक समाजसुधारक म्हणून मुकुंदरावांनी आमच्या समाजातील पोटजातींचे  एकत्रीकरण घडवून आणण्यात केलेले महत्त्वाचे कार्य विसरता कामा नये. ‘चालना’,कार अरविंद राऊत यांनी या कामास प्रारंभ केला होता .ते बोर्डीत असताना मुकुंदरावांच्या घरातच राहात असत. त्यातूनच ‘क्षात्रैक्यपरिषद’,नावाची संघटना स्थापना करण्यात आली .मुकुंदराव हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते .

  अशा रीतीने कै.मुकुंदराव सावे यांनी समाजसेवेच्या विविध अंगांनी मनापासून सेवा दिली असून त्यांचे हे मोलाचे कार्य काळाच्या पुढे असणारे आहे .त्याचे श्रेय मुकुंदरावांना व  सहकारी समाजसुधारकांना दिलेच पाहिजे.

   आपल्या कल्पकतेने कै. मुकुंदराव यांनी तयार केलेला एक बैलाचा नांगर ते स्वतः हाकारताना.

   भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय योगदान देऊन स्त्री संघटना, समाज सुधारणा या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कार्य केले. मात्र शेती हा आपला पिढीजात उद्योगधंद्या कडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ते एक हाडाचे शेतकरी होते. त्यांनी शेतीत केलेले प्रयोग हे आजही अभ्यासनीय ठरतात. त्यांची आभोळे येथील जमीन पडीक होती. जमिनीची प्रचंड धूप झाली होती. खाच खळगे होते. या जमिनीवर फक्त गवत होत असे. तरीही या जमिनीमध्ये मुकुंदरावांनी प्रथम भात शेती केली नंतर भाजीपाल्याची लागवड  करून दाखविली. पुढे त्यांनी या जमिनीत तोंडलीची लागवड सुरू केली.तोंडली चे वेल त्यांनी गुजरात मधून मिळविले. मोठ्या प्रयत्नांनी आमच्या जिल्ह्यात व गावात प्रथमतः ही लागवड यशस्वी करून  दाखविण्याचे संपूर्ण श्रेय मुकुंदरावंचे आहे. तोंडली पिकापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. मुकुंदराव नेहमी म्हणत असत की आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तोंडली पीक कारणीभूत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हे पीक जणू वरदान ठरले आहे. आपल्या आभोळे येथील जमिनीत मुकुंदरावांनी चिकू या झाडाची कलमे लावून चुनखडीच्या जमिनीत आंतरपीक म्हणून तोंडली व मुख्य पीक म्हणून चिकू अशी लागवड केली. त्यातून चिकूची सुंदर बाग तयार केली. चुनखडीच्या जमिनीतून चिकूचे उत्पादन घेणारे मुकुंदराव सावे हे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी ठरले आहेत.

    शेती करितांना कृषी अवजारे कार्यक्षम व्हावीत म्हणून मुकुंदरावांनी अनेक प्रयोग केले .एका बैलाने चालणारा लहान आकाराचा नांगर त्यांनी शोधून काढला. त्यामुळे तण काढणे सोपे झाले. अनेक मजुरांचे काम एक नांगर करू लागला. शेतीअतिशय कार्यक्षमतेने होऊ लागली.  2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मुकुंदराव आपल्या घरासमोर मोठा मंडप घालून त्यात चरखा नांगर व सर्व कृषी अवजारे ठेवून त्यांची पूजा करीत. गावातील सर्व नागरिकांना आमंत्रित करून अवजारांचे महत्त्व सांगत. मुकुंदराव सावे यांनी आपल्या शेतीत प्रयोग करून तिची उत्पादकता वाढविण्याचा जो मार्ग दाखविला आहे त्याचेच अनुकरण भविष्यात शेतकऱ्यांना करावे लागेल.

   आपल्या चरख्यावर सूतकाततांना कै. श्री मुकुंदराव सावे.

   कै. मुकुंदराव सावे यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भाग घेऊन अपार स्वार्थत्याग केला .स्त्री संघटना ,समाज सुधारणा, शेती अशा अनेक क्षेत्रात ही त्यांनी बहुमोल योगदान दिले. भारत स्वतंत्र झाला आणि मुकुंदरावांचे एक स्वप्न साकार झाले.त्यांना कसलीच अभिलाषा नव्हती .आपली शेती व समाजसेवेचे कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले. त्यांच्या या बहुमोल कामाचा सन्मान करण्यासाठी बोर्डी येथे 30 जून 1963 रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थान गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्राचार्य त्र्यंबकराव कुलकर्णी यांनी स्वीकारले होते. त्याप्रसंगी आचार्य भिसे- चित्रे गुरुजी, श्रीमती ताराबाई मोडक, डॉक्टर मोहनराव पाठक, शामराव पाटील, माधवराव राऊत व ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. याप्रसंगी आचार्य भिसे म्हणाले होते,

 “ मुकुंद रावांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जो अपार त्याग केला त्यामुळे बोर्डी गावाची माहिती सर्व महाराष्ट्राला झाली .स्त्रीसंघटना स्थापन करून त्यांनी स्त्रियांच्या उन्नतीचे जे कार्य केले ते अत्यंत दूरदृष्टीचे होते .ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर भारतातील समाजसेवकांना मुकुंदराव सावे यांचे कडून मोठी प्रेरणा मिळाली आहे”.

    मुकुंदरावांना जे मानपत्र दिले गेले ते कै. शामराव पाटील यांनी वाचून दाखविले .ते मानपत्र अत्यंत सविस्तर व हृद्य असून मुळातच वाचले पाहिजे. त्याचा थोडक्यात सारांश असा..

    “आपल्या वयाची 85 वर्षे यशस्वी रीतीने पार पाडून प्रगतिशील शेतकरी कळकळीचे समाजसेवक स्वातंत्र्य लढ्यातील धडाडीचे राष्ट्रसेवक व ठाणे जिल्ह्यातील महिला संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून गौरवस्पद लौकिक मिळविला आहे. त्याबद्दल आम्हाला आनंद व अभिमान आहे .

   अत्यंत गरिबीत व प्रतिकूल परिस्थितीत एका शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला.परंतु अशाही परिस्थितीवर आपण मात करून सतत साठ वर्षे समाजसेवा राष्ट्रसेवा करून भावी पिढी पुढे एक उदात्त आदर्श निर्माण केला आहे. स्वातंत्र्य लढ्यातील आपली प्रत्येक कामगिरी स्वार्थत्याग व अढळनिष्ठा यांनी भरलेली आहे.

  1940 सालच्या वैयक्तिक सत्याग्रहात आपणास सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली. तसेच 1942 सालच्या आंदोलनातही आपणास नाशिक जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले. आपल्या राष्ट्रसेवेचा उज्वल इतिहास आहे .

   सुमारे 40 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सोमवंशी क्षत्रिय समाजान्नती संघाच्या आद्य संस्थापकापैकी आपण एक आहात. समाज सुधारणेच्या इतिहासात आपला गौरवाने उल्लेख करावा अशीच आपली बहुमोल समाजसेवा आहे. कै.अण्णासाहेब वर्तक यांचे स्मारक उभारण्यासाठी सो क्ष समाजातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे आपण अध्यक्ष असताना,अविश्रांत कष्ट घेतले व अल्पावधीत मोठ्या निर्धाराने कै अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर दादर मुंबई येथे उभारले. या कामी आपण घेतलेले परिश्रम समाजाचे सदैव स्मरणात राहतील.

   आपल्या सेवा कार्यात आपल्या कुटुंबातील सर्व मंडळींचे व विशेषतः आपल्या सहधर्मचारिणी अखंड सौभाग्यवती स्व भिवराबाई यांचे सदैव सहकार्य मिळविण्याचे सद्भाग्य आपणास लाभले. त्यामुळेच एका स्वयंसेवकापासून नेते पदापर्यंत आपण यशस्वी वाटचाल करू शकलात.”

    वार्धक्यामुळे मुकुंदराव थकत चालले होते. 1933 साली नाशिक तुरुंगात असताना पोलिसांकडून त्यांना रक्त ओके पर्यंत मारहाण सहन करावी लागली होती. त्यामुळे शरीर प्रकृतीवर खूपच अनिष्ट परिणाम झाला होता. 1967 च्या सप्टेंबर महिन्यात त्यांची प्रकृती अधिकच क्षीण झाली. 16 सप्टेंबर 1967 या दिवशी पहाटे पाच वाजता मुकुंदरावांची जीवन ज्योत मालवली..

     मुकुंदरावांच्या अंतिम इच्छेप्रमाणे ते जे खादीचे कपडे व टोपी परिधान करीत ते त्यांच्या पार्थिवाला घालण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक समाजसेवक कार्यकर्ते आदिवासी व शेतकरी यांनी मुकुंदरावांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन आपली श्रद्धांजली अर्पण केली. आचार्य भिसे त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले ,

  “मुकुंदराव हे महान देशभक्त होते. त्यांच्या असिम त्यागामुळेच महाराष्ट्राला बोर्डी गाव परिचित झाले.  मुकुंदराव हे समाज सुधारक होते.मृत्यूनंतर श्राद्धकर्म अथवा अस्थी विसर्जन यावर आपण जो खर्च करतो तो त्यांना मान्य नव्हता. त्यामुळे हे विधी करण्यांत आले नाहीत. एक सच्चा देशभक्त हाडाचा  शेतकरी व  सुधारक अनंतात विलीन झाला .

      मी कै. अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील कै.तात्यासाहेब चुरी स्मारक विद्यार्थी वसतिगृहाचा विद्यार्थी व पुढे रेक्टर म्हणून आठ वर्षे राहिलो.  त्या कालखंडात या वास्तूच्या उभारणीस ललामभूत  ठरलेल्या सर्व समाजधुरीणांचा परिचय झाला. तो इतिहास म्हणजे आमच्या समाजाच्या शैक्षणिक इतिहासातील एक सोनेरी पान आहे याची जाणीव झाली. कै. मुकुंदराव सावे यांचे बद्दल माझा आदर द्विगुणित झाला. मुकुंद रावांचे जावई कै.रामभाऊ चुरी व त्यांचे सहकारी कै. भालचंद्र मोरेश्वर राऊत उर्फ भाई राऊत वारंवार स्मारक मंदिरास व वस्तीगृहास भेट देत. त्यांचे कडून आम्हाला मुकुंदराव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होई. तो इतिहास विद्यार्थ्यांना माहित होई. त्याचा आमच्या मनावर खूपच परिणाम होई. आपण  समाजॠण  अंशतः तरी फेडून समाजाच्याच्या उपकारातून  मुक्त झाले पाहिजे, असे मनापासून वाटे.

     पुढे आमच्या कुटुंबाचा मुक्काम चिंचणीस असताना आमच्या घराशेजारीच कै.रामभाऊ चुरी यांचे घर होते. त्यांच्या पत्नी रमाताई  म्हणजेच मुकुंदरावांच्या ज्येष्ठ कन्या मनोरमा होत. आपल्या बालपणातील अनेक कथा त्या आम्हास ऐकवित. आपल्या भाऊंची कल्पकता, त्यांनी शेतीमध्ये लावलेले शोध वाढविलेली उत्पादकता , त्यांनी तयार केलेला एक बैलाचा नांगर, विहिरीतील माती काढण्यासाठी केलेला कप्पीचा उपयोग, तसेच नवीन पिके आणून ती रुजविणे व त्याची व्यापारी तत्त्वावर लागवड करणे याबद्दल सांगत असत.

                  जामात कै. रामभाऊ चुरी ,चिंचणी.

     भाऊंची नात सौ.भारती वसंत चौधरी( पूर्वाश्रमीची स्वाती  सावे) ही भाऊंचे जेष्ठ सुपुत्र कै.हिराजी यांची कन्या. आमच्या सो क्ष समाज संघात काम करताना भारती व मी अनेक वर्षे एकत्र काम केले. “माझ्या कामातील तडफ व धीटाई ही  आजोबा कडून आली आहे..” ,असे ती गौरवाने सांगे. भारती ही पर्यटन क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजक असून आज समाधानाने  निवृत्तीचे ऊर्वरीत  जीवन जगत आहे. आपल्या आजोबा बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना तिने म्हटले आहे ,

 “भाऊंना स्वच्छतेची खूप आवड होती. ते स्वतः घरासमोरील सर्व केरकचरा झाडून गोळा करीत. एका खड्ड्यात टाकीत. ते पाहून आमच्या भाट आळींतील सर्व भगिनी देखील दररोज आपले अंगण स्वच्छ करू लागल्या व आमची आळी स्वच्छ दिसू लागली. भाऊंना स्वच्छतेचे संस्कार गांधीजींच्या आश्रमात मिळाले होते. गांधीजींच्या आश्रमात एक वाक्य लिहीले होते 

  “ Cleanliness is next to Godliness.. स्वच्छता म्हणजे ईश्वर भक्ती ..भाऊनी तेच केले . भाऊंची खादीवरही अपार भक्ती होती. रोज नित्यनेमाने चरख्यावर सूत कातीत व त्यापासून खादी बनवून खादीचेच कपडे ते सतत वापरत असत.   खादीची वस्त्रे परिधान करूनच भाऊंनी जगाचा निरोप घेतला .असे व्रतस्थ होते आमचे भाऊ…”

   भाऊंच्या धाकट्या नातीने सांगितलेल्या बालपणीच्या आठवणीतून त्यांच्या व्रतस्थ जीवनाची कल्पना येते.

   कै. मुकुंदराव सावे यांनी, ”नव्या युगातील स्त्री”, हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक त्यांच्या भारतीय स्त्री विषयीच्या आत्मचिंतनातून निर्माण झालेल्या विचार तरंगांचे दर्शन आहे. या पुस्तकाला आचारी भिसे यांनी पुरस्कार दिला आहे. तसेच महर्षी अण्णासाहेब कर्वे व प्रेमाबाई कंटक व ताराबाई मोडक यांनी अभिप्राय दिले आहेत.

 त्यातील काही विचार थोडक्यात येथे देत आहे त्यामुळे कै. मुकुंदराव सावे यांच्या चिंतनाची शक्ती व विचारांची खोली दिसून येईल. आजच्या 21 व्या शतकातील हे विचार किती अनुरूप आहेत याची जाणीव होईल,

    *महात्मा गांधीजींच्या बरोबर दांडी यात्रा करण्याचे भाग्य मला मिळाले. दांडी पर्यंत मार्गक्रमणा करीत असताना गांधीजी लोकांना उपदेश करीत. स्त्रियांकडे वळून ते म्हणत, ”माझ्या सत्य व अहिंसा तत्त्वाप्रमाणे या लढ्यात भाग घेण्यास तुम्ही समर्थ आहात. तुमची नारीशक्ती जागृत झाली म्हणजे जे सामर्थ्य तुमच्यात येईल त्या सामर्थ्याने या देशात जी परकीय सत्ता आपल्या इच्छेविरुद्ध जुलमाने आपल्यावर राज्य करीत आहे ती नाहीशी झाल्या वाचून राहणार नाही. देशाचे भवितव्य तुमच्या हातात आहे. पुरुषांच्या बरोबरीने कार्य करण्याची किंबहुना पुरुषापेक्षा अधिक निष्ठेने कार्य करण्याची शक्ती तुमच्यात आहे. मला गांधीजींचे विचार व त्याचे महत्त्व पटू लागले. आपणही स्त्री संघटनेच्या क्षेत्रात काम करावे असे वाटू लागले.

      *समाज या नात्याने स्त्रिया पुरुषाप्रमाणे स्वतंत्रपणे जगण्यास लायक आहेत. सध्या त्यांना पुरुषांच्या मेहरबानीवर जगावे लागते. जीवन ही दान दिली जाणारी वस्तू नाही. स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार पुरुषांना आहे तसा स्त्रियांनाही आहे .परंतु आजची समाज रचना त्याच्या उलट आहे.पुरुषाप्रमाणे स्त्रियांचाही व्यक्ती विकास झाला पाहिजे. स्त्रियांचे रक्षण पुरुषाकडून आतापर्यंत झाले नाही व पुढेही होणार नाही. स्त्रियांची अब्रू येणारा कोण तर पुरुषच?तात्विक दृष्ट्या संरक्षण हे ज्याचे त्यांनीच केले पाहिजे

      *कर्तुत्व व ध्येयवादाच्या दृष्टीने स्त्रिया पुरुषापेक्षा कमी नसून त्यांना योग्य संधी मिळाली तर त्या आपले सामर्थ्य दाखवितील पण त्यांना संधी मिळत नाही. अधिकार सूत्रे पुरुषांकडे असल्यामुळे व स्त्रियांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कमीपणाची असल्यामुळे स्त्रियांना पराक्रम दाखविण्यास वावं मिळाला नाही. मैत्रेयी, गार्गी, कात्यायनी वगैरे प्राचीन स्त्रिया व श्रीमती सरोजनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, वगैरे अर्वाचीन स्त्रियांचे अपवाद सोडले तर स्त्रिया तत्त्वनिष्ठ न होता शरीरनिष्ट बनल्या. त्यांनी सर्वस्वी व सर्व प्रकारे शरीर हाच आत्मा मानला. म्हणून आत्तापर्यंत स्त्री मागे राहिली व दास्यात अडकली.

  *भीती व प्रीती या परस्पर विरोधी भावना आहेत. त्यांचे मिलन कधीच होऊ शकणार नाही. स्त्री घरात थोडी बहुत मालकीण असेल परंतु घराबाहेर तिला स्थान नसते. स्त्रियांनी भीत भीत दुसऱ्याच्या आधाराने जगावयाची की निर्भय होऊन स्वपराक्रमाने व माणुसकीने जगावयाचे हा प्रश्न स्त्रियांनीच आता सोडविला पाहिजे!

     *स्त्रीने विवाहबद्ध झालेच पाहिजे अशी कोणालाही सक्ती करता येणार नाही. तशी सक्ती करावयाची असेल तर कायदा करावा लागेल. स्त्री-पुरुषांनी पुढील आयुष्या करिता आपले निश्चित ध्येय ठरविले पाहिजे. अविवाहित राहून आजन्म ब्रह्मचर्य पाळून समाजाशी व राष्ट्राशी संबंध जोडून सेवाकार्य करणारे स्त्री पुरुष मोठ्या संख्येने पुढे आले पाहिजेत.

   *प्रसूती हा विशेष धर्म स्त्रीला प्राप्त झाला आहे. त्या धर्माचे पालन स्त्रीला कर्तव्य म्हणून करावयाचे आहे. स्त्री-पुरुषांत निसर्गाने याच कारणाकरिता भेद निर्माण केला आहे. सध्याच्या परिस्थितीकडे पाहिले तर स्त्रीवर प्रज्योत्पादनाची जबाबदारी तिला न झोपण्या एवढ्या प्रमाणात टाकली जाते असे स्पष्टपणे दिसून येते.त्यामुळे कुटुंब संस्था अधोगतीकडे जात आहे. म्हणून समाजाचा विकास होण्याकरिता स्त्रीवर आज पडत असलेली प्रज्योत्पत्ती ची जबाबदारी कमी झाली पाहिजे.

   * स्त्रीने आपला जडदेह शृंगारणे हे दूषण असताना भूषण मानले आहे. शरीराला नटविणे हे खरे उद्दिष्ट नव्हे. पुरुषाला पराक्रम तसेच स्त्रीला सौंदर्य ही व्याख्या समाजात रूढ झाली आहे. नाकात कानात हातात पायांत गळ्यांत केसांत सर्व ठिकाणी दागिने अडकविले गेले. जरूर तेथे शरीराला भोके पाडून सुद्धा व्यवस्था केली गेली. दागिने ही सौंदर्य प्रतीके नसून गुलामगिरीची ज्योतके आहेत हे त्यांना कळत नाही!!

   *स्वातंत्र्यानंतर लोकशाही पद्धतीचे सरकार आले म्हणजे आपली सर्व दुःखे नाहीशी होऊन आपण पुरुषांच्या दास्यातून मुक्त होऊ असे स्वप्न स्त्रियांनी बाळगणे व्यर्थ आहे. त्याकरिता स्त्रियांनी आपल्यातील शक्ती चेतविली पाहिजे! पुरुष मोकळा त्याप्रमाणे स्त्रिया ही आपापली मर्यादा सांभाळून मोकळ्या झाल्या पाहिजेत.

      *जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी ही म्हण स्त्रियांनी सार्थ केली पाहिजे. पुरुष स्त्रीपासून जन्मास आला असल्यामुळे प्रत्येक स्त्री-पुरुषाची जननी माता आहे व प्रत्येक स्त्रीचा जनकपुरुष आहे. याप्रमाणे स्त्री-पुरुषांनी आपापली भूमिका समजावून घेतली तर कमीअधिक पणाचा प्रश्न निर्माण होणार नाही!

  “ नव्या युगातील स्त्री”,या कै. मुकुंदराव सावे लिखीत  पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ. 

   गीतेने मनुष्य स्वभावाचे दोन प्रकार सांगितले एक दैवी व दुसरा आसुरी.दैवीसंपत्ती युक्त मनुष्य आपले हित समाजकार्यात असलेले पाहून समाज हितार्थ सुखदुःखाची पर्वा न करता  समाजाच्या अभ्युदयासाठी झटत असतो. तो मनुष्य धन्य व वंदनीय होय. तो निवर्तला तरी अमर आहे असे समजावे.मनुष्याने समाजसेवा केल्याशिवाय तो कधीही मुक्त होणार नाही. 

     मनुस्मृति तर म्हणते

 यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता,

  यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः।।

“जेथे स्त्रियांचा सन्मान होतो तेथेच देवतांचा वास असतो. जेथे स्त्रियांचा उपमर्द होतो, तेथे कितीही पुण्य कर्मे करा  ती शून्यवत्  होत!!

    मुकुंदरावांनी आयुष्यभर समाजसेवा ही केली आणि स्त्रियांना सन्मान मिळवून दिला,म्हणून ते दैवी संपत्तीचे मालक ठरतात व  पावन झालेले मुक्तात्मा आहेत असे नम्रतेने म्हणावेसे वाटते.

   कै. मुकुंदराव अनंतराव  सावे यांच्या स्मृतीला अनंत प्रणाम!!

    (हा लेख लिहिताना मान.कै. जयंतराव पाटील यांच्या “थोर स्वातंत्र्य सैनिक कै.मुकुंदराव सावे”,या पुस्तकाचा व सौ भारती चौधरी यांनी दिलेल्या दुर्मिळ छायाचित्रांचा मला उपयोग झाला आहे हे कृतज्ञतापूर्वक नमूद करतो.)

दिगंबर वा राऊत.