समाजभूषण कै. मामासाहेब ठाकूर
प्रेयस म्हणजे जे शरीराला सुख देते ते आणि श्रेयस म्हणजे जे शरीराच्याही पलीकडचे असते, त्यामुळे मनाला समाधान मिळते ते असा ढोबळ अर्थ सांगितला गेला आहे. मानवी जीवनात संततीच्या आगमनानंतर पती-पत्नीच्या एकमेकाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात श्रेयस प्रवेश करते असे म्हणतात. हाच श्रेयसाचा अनुबंध पुढे कुटुंब, गाव, समाज, प्रांत, देश असा वृद्धिंगत होतो. श्रेयस्कर कर्मे करणारी माणसे श्रेयस आणि प्रेयस यांचा जीवनात समतोल साधण्याचा प्रयत्न करतात आणि अंतीमतः आपले जीवन कृतार्थ करतात!
गीतेचे हे तत्त्वज्ञान येथे उद्धृत करण्याचे कारण माझ्या शिक्षण कालखंडात मला भेटलेले एक आदर्श व्यक्तिमत्व! आपले प्रेयस जतन करीत असतांनाच सतत श्रेयस् कर्मे करीत, कोणालाही पीडा न देता आपल्याला जे देता येईल ते प्रेमाने देऊन त्याचा कोणताही गाजावाजा न करता आपल्या जीवनाचे सार्थक करून गेलेले कै जगन्नाथ दादाजी ठाकूर उर्फ मामासाहेब ठाकूर हेच ते व्यक्तिमत्व होय!!
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशी प्रेयस व श्रेयस कर्मे करणारी दोन्ही प्रकारची माणसे येतात व जातात. आज मानवी संस्कृतीत श्रेयसाचा अंश खाली खाली जात असताना,आपल्या प्रेमळ व लाघवी स्वभावाने,जीवनाच्या त्या खडतर कष्टमय वाटचालीत धीर देत ,प्रसंगी दोन उपदेशाचे बोलही सुनावत, घरच्या आई वडिलांच्या सुखाला आसुसलेल्या आम्हा वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे ते दिवस सुखाचे कसे होतील, हे पाहणारे मामासाहेब ठाकूर म्हणूनच आज एवढ्या प्रदीर्घ कालखंडानंतर प्रकर्षाने मला आठवतात!
माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की,चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात.
दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले कि आनंदाची फुले आपल्या दारात पडतात. माणूसकी हा धर्म, सदाचार, सहृदयता, प्रेम, हीच जाती, हे सांगणे सोपे असले तरी ते तत्त्वज्ञान सहजपणे आपल्या आयुष्यात जगणारे कै. मामासाहेब हे खूप मोठे व्यक्तिमत्व होते, खऱ्या अर्थाने समाज भूषण होते!
दादरच्या कै.तात्यासाहेब चुरी स्मारक विद्यार्थी वसतीगृहात,प्रथम विद्यार्थी व पुढे वस्तीगृहाचा रेक्टर म्हणून सहा वर्षांच्या कालखंडात,मला अनेक विद्यार्थी मित्र ,समाज नेतृत्व व सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक महान व्यक्तिमत्त्वांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मिळाले . काहींचा निकट सहवासही लाभला. त्यांतील कै. मामासाहेब ठाकूर हे एक. त्यांचे त्यावेळचे सानिध्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आजही मला मोलाचे वाटतात. माझ्या आयुष्यातील मला लाभलेले ते भाग्याचे क्षण होते असे मनापासून वाटते. त्या प्रेमाचे अंशतः उतराई होण्यासाठी हा प्रपंच!
1965 ते 70 च्या त्या कालखंडात मामासाहेब आमच्या सो क्ष स संघाचे खजिनदार /अध्यक्ष होते. आपला मसाले उत्पादनाचा उद्योग उत्तमपणे सांभाळून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडीत, समाज सेवेतही मागे न राहता,
“जोडोनिया धन ऊत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी.” या आदर्श तत्त्वाप्रमाणे सुबत्तेत आपले जीवन व्यतीत करीत होते. मात्र समाजसेवा हा आपला फावल्या वेळेचा उद्योग अथवा आपल्या उद्योगपती म्हणून असलेल्या सामाजिक स्थानाला आणखी थोडी झळाळी यावी म्हणून वापरावयाचे साधन असे न समजता आपले कर्तव्य या भावनेने समाजसेवेशी ते निगडित झाले होते. खरे तर त्यांनी समाज सेवेत जाणारा वेळ त्यावेळी आपल्या उद्योगात केंद्रित केला असता तर त्यांच्या कुटुंबाला अधिक आर्थिक सुबत्ता आली असती. परंतु तसा विचार कधीही त्यांच्या मनी आला नाही. आपल्याला देवाने दिलेले दोन हात फक्त गोळा करावे म्हणून नाहीत तर एका हाताने घ्यावे आणि दुसऱ्या हाताने द्यावे यासाठी आहेत ,असा उदात्त विचार करीत निखळ समाधान आणि आनंदाचे धनी होते. खरे तर त्यांच्या ठाकूर कुटुंबायां कडून पूर्वापार वंशपरंपरागत मिळालेले संस्कारही याला कारणीभूत असले पाहिजेत. पूर्वजांनी उभारलेलो मंदिरे,सामाजिक संस्था व त्यांचे त्या काळातील योगदान पाहता ,मामांना धार्मिकता व समाजसेवा यांचा मोठा वारसा त्यांच्या मागच्या पिढ्यापासूनच मिळालेला होता. विशेष म्हणजे मामांनी तो वारसा चालविलाच पण त्यांची पुढील पिढीही आज त्या उज्वल परंपरा पुढे नेत आहै. असे भाग्य फारच थोड्या कुटुंबांना मिळते. आम्हा सर्व समाज बांधवांना त्यांचा खूप अभिमान आहे.
मामासाहेबांच्या निधनानंतर सुमारे 25 वर्षाचा कालखंड व्यतीत झाला आहे . त्यावेळी पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरातील कै.पू. तात्यासाहेब चुरी वसतीगृहात राहणारे आम्ही बहुतेक विद्यार्थी आता सत्तरी पलीकडे गेलो आहोत. मात्र आजही त्यावेळची आमची ज्येष्ठ मंडळी आठवली, विशेषतः मामांची स्मृती झाली की आठवतात ते त्यांचे निष्कपट प्रेमाचे बोल व सोप्या सरळ शब्दांचा वापर करीत मंद स्मिताने आपले विचार समजावून देण्याची त्यांची पद्धत !आमच्या विद्यार्थी वस्तीगृहातील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांची भाषणे अथवा समाजमंचावरील त्यांचे विचार असेच वैशिष्ट्यपूर्ण असत. सोप्या सरळ शब्दातूनही आशयघनपणे बोलता येते, ते कठीण असले तरी असाध्य नाही हेच त्यांच्या संभाषणातून आम्हाला जाणवले! विशेषतः कै.पूज्य अण्णासाहेब वर्तकांच्या पुण्यतिथी समारंभात ,जी दरवर्षी आमच्या वस्तीगृहात( 14 जुलै रोजी) मोठ्या भक्ती भावाने साजरी केली जाते, त्यांचे भाषण हे आपल्या गुरुप्रती असलेल्या प्रेम व समर्पणाचा नमुना असे.पू. अण्णासाहेबां प्रति असलेल्या अतीव भक्तीने भारलेल्या भावनांचा शब्दरूपी कल्लोळ असे .ते दिवस आठवले की डोळ्यासमोर मामांची ती सात्विक मुद्रा व त्यांच्या मुखातून बरसणारे अण्णासाहेबांचे शांत सौम्य शब्दतील भक्ति गान ऐकू येते.
त्यामुळेच मामासाहेब संवादातून समोरच्या माणसाचे मन आनंदीत करून ते जिंकून घेत. हळू, नम्र स्वरातील प्रांजल बोलण्याने ऐकणाऱ्याच्या मनात प्रेम निर्माण करीत.शेवटी प्रेम म्हणजे तरी काय, दुसऱ्याबद्दल आपल्या मनात असलेली निर्हेतुक आपुलकीची भावना! मामासाहेब आम्हा विद्यार्थ्यांवर तसे प्रेम करीत. विशेषतः माझ्या वसतीगृह कालखंडात मामानी मला अनेक अडचणीच्या प्रसंगी सांभाळून घेतले. प्रेम देऊन उपकृत केले आहे. त्या गोष्टी पुढे येतीलच.
मामांच्या व्यक्तिमत्त्वातील दुसरे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निष्कपट प्रेमभावना. ते सर्वांशी संदोदित निर्मळ नितळ प्रेम भावनेने वागले.. कोणाकडून काही चूक झाल्यास त्याला चारसौघासमोर तसे न सांगता बाहेर एकांतात विश्वासात घेऊन समजावीत. मामासाहेबांचे ‘निष्कपट मन’ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते.. ती खूप दुर्लभ गोष्ट आहे. परमेश्वराची महान देणगी आहे.
कै अण्णासाहेब वर्तक हे मामांचे दैवत तर बालपणीचे मित्र भाऊसाहेब हे त्यांचे श्रद्धेय!मामांची कै भाऊसाहेब वर्तकांवर निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. कोणाचीही निरपेक्ष निर्व्याज भक्ती करणे ही देखील सोपी गोष्ट नाही.भक्ती करणारालाच सर्वाधिक परीक्षेला तोंड द्यावे लागते. ज्याच्या निष्ठा स्थिर आहेत तोच अखेर तेथे टिकतो. मामा व भाऊसाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध शेवटपर्यंत टिकले याला कारण मामांच्या श्रद्धा स्थिर होत्या.!
मामांचा जन्म 9 एप्रिल 1915 साली झाला. त्यांचे वडील श्री दादाजी हरिश्चंद्र ठाकूर हे त्यावेळी दातीवरे गावात राहत होते. ते एक निष्णात सर्व्हेयर आणि उत्कृष्ट ड्राफ्ट्समन होते. अंगी भूत कौशल्य व हुषारी या गुणांमुळे त्यांच्या ब्रिटिश कंपनीने त्यांना आर्किटेक्ट् चे काम दिले होते. ARCHITECTS COSTELING CHAMBERS AND FRITGSLAY असे त्यांच्या तत्कालीन ब्रिटिश कंपनीचे नाव होते. या नोकरीमुळे त्यांनी दातीवरे सोडून विरार येथे वास्तव्य केले. मुंबईचा प्रवास सोपा जावा हाच त्यामागे एकमेव उद्देश होता. आर्किटेक्ट म्हणून ते वापरत असलेली मोजमापाची हत्यारे(SCALES) त्यांचे नातू श्री दीपक ठाकूर यांच्याकडे आजही मौजूद आहेत. इंग्लंडमधील तत्कालीन प्रसिद्ध STANLAY कंपनीची असून सुमारे दीडशे वर्षा पूर्वी, ब्रिटिश बनावटीची ही हत्यारे वापरणारे दादाजी ठाकूर निश्चितच एक हुशार व गुणी स्थापत्य विशारद असले पाहिजेत. त्यांचे आर्किटेक्ट नातू श्री दीपक भाई ती हत्यारे आजही वापरीत असून आपल्या आजोबांचा हा ठेवा त्यांची साधने व व्यवसाय रूपानेही सांभाळीत त्यांचा आदर्श पुढे नेत आहेत .हा देखील एक अलौकिक योगायोगच म्हणावा लागेल.
मामांचे बालपण विरारला गेले .पुढील माध्यमिक शिक्षणासाठी मामा आर्यन हायस्कूल, ऑपेरा हाऊस, मुंबई येथे दाखल झाले. तेथे त्यांची बहीण सौ.मंजुळा म्हात्रे आपल्या कुटुंबासमवेत राहत असे. अर्थातच अकरावीपर्यंतचे वास्तव्य ऑपेरा हाऊस येथे झाले. याच हायस्कूल मधून मामा मॅट्रिक ची परीक्षा चांगल्या रीतीने उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी एका इन्शुरन्स कंपनीत काही काळ नोकरी केली.
नोकरी उद्योगाच्या अडचणीमुळे मामांचे पिताश्री दादाजी दातीवरे सोडून विरारला आले, मात्र त्यांना या विरार-वास्तव्यामुळे एक अनपेक्षित लाभ झाला, ज्याने मामांचे पुढील सर्व आयुष्यच बदलून गेले.विरारमधील वास्तव्यात त्यांना कै.अण्णासाहेब वर्तक व भाऊसाहेब वर्तक या पिता पुत्रांचे निकट साहचर्य मिळाले. अण्णा साहेबांचा या ठाकूर कुटुंबीयाशी नातेसंबंध तर होताच पण विरार मधील निवासा मुळे मामां-भाऊसाहेबांची मैत्र्य निर्माण झाले .योगायोगाने त्याच कालखंडात दादासाहेब ठाकूर यांचेही वडील कै अण्णा साहेबांकडे कामास असल्याने मामा, भाऊसाहेब व दादा या तीन समवयस्क मित्रांचे त्रिकूट तयार झाले. या त्रिमूर्तीने पुढे सामाजिक इतिहास घडविला. विशेषतः आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नति संघाची स्थापना, जडणघडण व विकास यात खूप मोलाचे योगदान दिले आहे. ही मैत्री अखेरपर्यंत टिकून होती. दादासाहेब व मामासाहेब यांनी कै. भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली फार मौलिक समाजसेवा केली. मैत्रीचा व समाजसेवेचा एक सुंदर आदर्श निर्माण केलेला आहे. त्या बालवयात तिघांनाही कै. अण्णासाहेब वर्तक यांचे मार्गदर्शन आशीर्वाद मिळाले त्यामुळेच ते शक्य झाले आहे.
तत्कालीन रीतीरिवाजा नुसार ,मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होऊन एका इन्शुरन्स कंपनीत नोकरी करीत असतानाच मामांचा विवाह कु. विमल घनश्याम ठाकूर यांच्याशी झाला. त्यांचे श्वशूर श्री घनश्यामजी ठाकूर यांचा मसाले उत्पादनाचा व्यवसाय होता व त्यांची स्वतःची गिरणी मुंबईतच होती. ‘श्रीविष्णू मसाले मिल’, असे त्यांच्या कारखान्याचे नाव होते . लग्नानंतर या मसाला उत्पादन व्यवसायात मामांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली. नोकरी सोडून दिली .या मिलची स्थापना त्यांच्या श्वशुरांनी 1912 साली केली होती. सुमारे शंभर वर्षापेक्षा जास्त काळापूर्वी मुंबईत आपला मसाले उत्पादनाचा व्यवसाय करण्यासाठी स्वतःच्या कारखान्याद्वारे त्यांचे उत्पादन करून, एक उत्तम उद्योजक म्हणून नाव कमावणाऱ्या कै घनश्यामजी ठाकूर या आपल्या ज्ञाती बांधवाच्या दूरदृष्टीचे व धाडसाचे कौतुकच व्हावयास हवे!
त्याच सुमारास(सन 1939), दुसरे महायुद्ध चालू झाले. एकूणच सर्व उद्योग धंद्यावर मंदीची लाट आली .त्यातून मसाले उत्पादन कसे सुटणार ?उत्पादन खर्च व विक्रीचा हिशोब बरोबर लागेना .व्यवसायाचेआर्थिक गणित चुकू लागले.उत्पादन कमी होऊ लागले.उत्पादनक्षमता(Production Capacity) ओस पडू लागली. मामा एक धूर्त व्यावसायिक होते.आपल्या कारखान्यातील अनुत्पादित क्षमता(Surplus capacity), दुसऱ्या कोणत्या उत्पादनासाठी वापरता येईल याचा त्वरित अभ्यास करून त्यांनी ही क्षमता घोड्यांसाठी लागणाऱ्या खाद्यान्ना साठी वापरायावयाचे ठरविले. दुसऱ्या महायुद्धात सैन्याला घोड्यासाठी हे खाद्य हवे होते. घोड्यांचे खाद्य ही मसाल्याबरोबर तयार होऊ लागले.आर्थिक गणित जमू लागले. तो मंदीचा काळ निभावून नेला.
पुढे मसालानिर्माण उद्योगाला उर्जित अवस्था आल्यावर मामांनी आपल्या मसाला-मिलचे नूतनिकरण केले. धातूच्या चक्क्या(Wheels), ऐवजी दगडी चक्क्या टाकल्या .त्यामुळे मिरची मसाल्यांचा रंग व अस्सल चव बदलत नसे.काही वर्षांनी नवीन मशीनरी मार्केटमध्ये आल्यावर त्याचाही उपयोग मामांनी आपल्या व्यवसायात कौशल्याने करून आपल्या उत्पादनाचा दर्जा व किंमत यांची उत्कृष्ट सांगड घातली. मुंबईतील एक उत्कृष्ट मसाला उत्पादक म्हणून त्यांच्या उत्पादनांची ख्याती झाली. व्ही पी बेडेकर, के टी कुबल,एव्हरेस्ट मसाले असे नावाजलेले लोणची उत्पादक विष्णू मसाल्यांचे उपभोक्ते होते. यावरून त्यांच्या उत्पादनाच्या दर्जाची कल्पना यावी. या विष्णुमिलची जमीन 99 वर्षे लिजवर असल्यामुळे ती संपताच मिल बंद करण्यात आली. सन 1975 ते 95 या वीस वर्षाचे कालखंडात मामांचे तृतीय पुत्र श्री किशोर यांनी हा उद्योग अत्यंत यशस्वीपणे सांभाळून मामांना साथ दिली.
सो क्ष संघाच्या स्थापनेचा तो काळ होता. कै अण्णासाहेब वर्तक कै. तात्यासाहेब चुरी व त्यांच्या काही साथीदारांनी मिळून सोक्ष संघ नुकताच स्थापन केला होता.साहजिकच कै.अण्णासाहेब वर्तक भाऊसाहेब वर्तक यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधामुळे मामा तरुणपणीच संघकार्यात ओढले गेले.
मामासाहेबांच्या सुमारे 40 वर्षाच्या समाजसेवा कालांत(1960-2000) त्यांनी विविध पदावरून दिलेले सामाजिक योगदान पाहिले की त्यांच्या चिकाटीची, दीर्घ सेवेची कल्पना येते .या सामाजिक सेवेतील महत्त्वाचे कालखंड अभ्यासल्यानंतर मामांचे योगदान किती महत्त्वपूर्ण व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी किती महत्त्वपूर्ण होते याचीही कल्पना येते.
- सन 1960 ते 65 या काळात संघाचे उपाध्यक्ष पद .
- 1962 ते 1970 या काळात खजिनदार पद.
- 1970 ते 1978 या काळात सोक्षसंघाचे अध्यक्ष पद .
हा समाजाच्या वाटचालीचा महत्त्वाचा कालखंड होता. याच सेवा काळात पू.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर सभागृह, आणि कै. तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृह कार्यान्वित झाले. या काळात मामांनी पूज्य तात्यासाहेब चुरी स्मारक समितीच्या खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळली. 1970 साली संघाचा सुवर्ण महोत्सव झाला. या सुवर्ण महोत्सव समितीच्या कार्याध्यक्ष पदाचा अतिरिक्त भार ही त्यांनी सांभाळला.
- 1977 ते 87 या काळात संघाच्या विश्वस्त पदाची जबाबदारी
- 19 87 ते 2000 या कालावधीत कार्यकारी विश्वस्ताची धुरा त्यांनी सांभाळली. संघाच्या हीरक महोत्सवात सुद्धा त्यांनी उद्योग व्यवसाय समितीच्या प्रमुख पदावरून योगदान दिले.
मामांच्याच सेवा कालांत संघाच्या तीन परिषदा आणि सो क्ष संघ समाजाच्या तीन खानेसुमारी झाल्या. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांच्या विश्वस्त पदाच्या कालखंडातच केळवे रोड येथील भूखंडाची खरेदी झाली व तेथे कै इंदुताई व पद्मश्री कै भाऊसाहेब वर्तक आरोग्यधामाची योजना कार्यान्वित झाली. ज्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली समाज सेवा केली, त्या नेतृत्वाला मानवंदना देण्यासाठी व त्यांचे कायमस्वरूपी स्मारक उभारण्यासाठी योजना मामांच्याच विश्वस्त कालखंडात व्हावी केवळ योगायोग नसून मामांची आपल्या नेत्यावरील श्रद्धा, सद्भावना व आदराचे ते मूर्तीमंत प्रतीक आहे.
आज या आरोग्यधामात परिसरातील सर्व गोरगरिबांना आरोग्य सेवेचा अत्यंत अल्प दरात परंतु उत्तम सेवेचा लाभ मिळत आहे .भाऊसाहेबांच्या स्वप्नातील हा प्रकल्प मूर्त स्वरूपात आणण्यासाठी सुरुवात कै.मामासाहेब करून गेले हे नमूद करण्यास मला खूप आनंद होतो..
कै. मामासाहेबांच्या कारकीर्दीत आमच्या सो क्ष समाजातील अत्यंत महत्त्वाचे तीन प्रकल्प कार्यान्वित झाले. त्यापैकी,कै. पूज्य अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व कै पूज्य तात्यासाहेब चुरी स्मारक विद्यार्थी वस्तीगृह दादर, हे दोन प्रकल्प कार्यान्वित होऊन पूर्णत्वास गेले. या सर्व कामगिरीत, संघाचे खजिनदार, उपाध्यक्ष, अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त म्हणून मामांचे योगदान मोठे आहे. त्या बद्दल समाज त्यांचा सदैव ऋणी राहील.
केळवे येथील आरोग्यधाम प्रकल्पा साठी जमीन भाऊसाहेबांच्या मंत्री म्हणून सरकार दरबारी असलेल्या ख्यातीमुळे मिळाली. मात्र त्यासाठी करावयाचे प्रयत्न तत्कालीन मुख्य विश्वस्त कै.चिंतामणराव वर्तक कै.मामासाहेब व त्यांच्या अनेक सहकार्यांनी केली. आमचे एक ज्ञाती बांधव व महाराष्ट्र शासनातील उच्चाधिकारी कै रामभाऊ वर्तक यांचीही या कामी खूप मौलीक मदत झाली हेही नमूद करावयास हवे.
आरोग्यधाम बांधणी व कार्यान्वित करण्यासाठी पुढे कै. डॉ.बळवंतराव पाटील ,डॉ. सदानंद कवळी,कै.प्रमोदभाई चुरी यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. कै. चिंतामणराव वर्तका वरील लेखात मी याचा सविस्तर उल्लेख केला आहे.
. विशेषतः अण्णासाहेब वर्तक स्मारक व तात्यासाहेब चुरी वस्तीगृह यामुळे समाजातील तरुण वर्गाला मुंबईत राहण्याचे एक हक्काचे निवासी स्थान निर्माण झाले. उच्च शिक्षणाची द्वारे खुली झाली. या समाजाचा तरुण आज उच्चशिक्षित होऊन देश-विदेशात आपली व समाजाच्या कर्तृत्वाची ध्वजा मोठ्या मानाने फडकावीत आहे.
आज कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचा पुनर्निर्माण प्रकल्प चालू असून पुढील एक दोन वर्षातच हे समाज मंदिर भव्य दिव्य स्वरूपात आकार घेईल व आमच्या पूर्व सुरींनी पाहिलेली समाज उन्नतीची व शिक्षणप्रसाराची भव्यस्वप्ने पूर्णत्वास नेण्यास मदत करील यात शंका नाही.
मामाहेब-चिंतामणराव या दुकलीच्या कार्यकालीन खंडात समाज बांधवांना,विशेषतः शेतकरी बांधवांना ,’किसान यात्रे’ मार्फत देशभ्रमण करता आले. व भारतीय किसान आपापल्या राज्यात कशा रीतीने प्रगती पथावर आहे याचे दर्शन घेता आले. त्याचबरोबर तत्कालीन भारतीय पंतप्रधान, राष्ट्रपती यांचशी प्रत्यक्ष चर्चा करता आली ,त्यांचे जवळून दर्शन घेता आले. या यात्रांचे आयोजन करण्यात आमचे समाच बंधू “सहलसम्राट”, कै.राजाभाऊ पाटील व श्री. केसरी भाऊ पाटील यांचाही मोठा सहभाग होता. मला वाटते हे आमच्या समाजात प्रथमच होत होते. त्यासाठी चिंतामणराव,मामासाहेब तारामाई वर्तक दादासाहेब ठाकूर, शांतारामजी पाटील बाबुराव सावे भाई राऊत रामभाऊ चुरी या तत्कालीन संघ नेतृत्वाला धन्यवादच दिले पाहिजेत!
या किसान यात्रेतील काही दुर्मिळ व महत्त्वाची छायाचित्रे लेखात दिली आहेत.
आपल्या ज्ञाती बांधवांना आर्थिक व सामाजिक मदत करीत असताना मामा इतर सामाजिक संघटना मध्ये देखील तेवढेच सक्रिय होते. ज्या भायखळा-माझगाव परिसरात त्यांची विष्णू मिल होती तो परिसर ही औद्योगिक दृष्ट्या गजबजलेला असून अनेक प्रकारचे प्रमुख उद्योग येथे कार्यरत आहेत.तेथील व्यापारी मित्र मंडळात व संघटनेत ही मामांनी खूप योगदान दिले होते.
आपला व्यवसाय सांभाळीत, समाज सेवेतही योगदान देताना मामासाहेबांनी आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या धर्म कार्याचा वसाही सोडला नाही .ते शिरगाव ,तालुका पालघर येथील श्री विठ्ठल मंदिराचे व गिरगाव -मुंबई येथील श्री शिव मंदिराचे विश्वस्त होते. ही मंदिरे त्यांच्याच पूर्वजांनी या गावी उभारण्यास पुढाकार घेतला होता.
मला आठवते मी या वसतिगृहात विद्यार्थी(1963-65) व वसतीगृह रेक्टर( 1965 ते1971), या कालखंडात मामांचे काम अगदी जवळून पाहिले. मला वाटते असा एखादाच दिवस उगवला असेल ज्यादिवशी मामांनी स्मारक मंदिराला भेट दिली नाही. ‘मामा व वर्तक स्मारक मंदिर’ हे समीकरणच त्या दिवसात तयार झाले होते . विद्यार्थ्यांच्या सोयी-गैरसोई, हॉलमधील व्यवस्था,भोजनाच्या सुविधा, साफसफाई,,विद्यार्थि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सुविधा, सर्वाचा पाठपुरावा केला जाई. त्यामुळे आमच्या वस्तीगृहातील विद्यार्थी व सर्व कर्मचारी आनंदी असत. संघाचा प्रत्येक उपक्रम यशस्वी होण्यासाठी मामांचे मार्गदर्शन मिळे. सन 2000 या आपल्या अखेरच्या वर्षापर्यंत मामांनी या समाजाची निरलसपणे सतत सेवे केली आहे, याचा विसर समाज बांधवांना पडतात कामा नये.’माझा समाज हे माझे कुटुंब आहे व माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी स्वीकारून समाजॠणाची परतफेड करतो आहे’, ही भावना असल्याशिवाय अशी जिव्हाळ्याने कामे होत नसतात !
सो क्ष संघाने सन 2020 साली संघाचा शताब्दी महोत्सव साजरा करताना, तत्कालीन संघाध्यक्ष श्री अजय भाई ठाकूर यांनी एक मौलिक पुस्तिका ,”सोक्षश्री” या नावाने प्रकाशित केली आहे. मामांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेतांना म्हटले आहे
“श्री मामासाहेबाच्या संघ सेवेची विशेष नोंद आपला समाज घेईलच परंतु त्यांनी संघाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे त्यांचे सुपुत्र श्री दीपक भाई ठाकूर! श्री मामासाहेबांचे संघ कार्य श्री दीपक भाईंच्या माध्यमातून आजही पुढे चालत आहे असेच वाटते. श्री दीपक भाई हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत संघाच्या विविध प्रोजेक्टमध्ये विनामोबदला ते देत असलेल्या योगदानाचे श्रेय त्यांच्याबरोबर कै. श्री मामासाहेबांनाही द्यावे लागेल, कारण श्री दीपक भाईंना समाजसेवेची आवड आणि संघहित आहेच पण त्याच बरोबर वडिलांची इच्छापूर्ती आणि त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी ही सेवा ते निष्ठापूर्वक आणि सहर्ष देत आहेत. संघ विकासात श्री मामासाहेबांच्या निरलस सेवेने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे हे निश्चित!”
वरील विधानांत तसुभर ही अतिशयोक्ति नसून ती वस्तुस्थिती आहे. श्री दीपक भाई आपल्या प्रकृती अस्वास्थ्यात ही देत असलेली समाजसेवा म्हणजे आपल्या पित्याच्या उज्वल कीर्तीवर ‘चारचांद’ लावून ती अधिक अधोरेखित करणारी आहे! दीपकभाई वर मी एक विस्तृत लेख त्यांना समाजाने दिलेल्या “जीवन गौरव “,प्रसंगी काढलेल्या विशेषांकात यांची विस्तृत माहिती दिली आहे.
दीपक ना आपले पिताजी मामासाहेब यांचे बद्दल काय वाटते वाचा:
“ इदम न मम”.. या तीन शब्दात मामासाहेबांच्या सर्व जीवनाचा सारांश देता येईल. आज मामासाहेबांची आठवण झाली की आजही माझे मन मन भावनांनी भरून येते. मामा म्हणजे आमचे वडील आणि मामी म्हणजे आमची आई. त्यांची जीवनयात्रा जवळून पाहिल्यामुळे आठवणींचा कल्लोळ निर्माण होतो. मामा साहेबांना नऊ बहिणी मामा या सर्व ठाकूर कुटुंबीयांचाचा आधारस्तंभ होते. मामा सर्व भावंडात लहान होते मी माझ्या सर्व आत्यांना पाहिलेही नाही मला माहित असलेल्या आत्या म्हणजे मंजुळा आत्या प्रार्थना समाज, रंगूआत्या वाळकेश्वर, बेन बाय आत्या खोताची वाडी गुलाब आत्या दत्तपाडा बोरिवली!
आपल्या मुलांनी आपल्या सर्व नातेवाईकांची ओळख ठेवली पाहिजे अशी मामांची इच्छा असे. महिन्या दोन महिन्यातून ते आम्हाला त्यांच्याकडे नेत असत. मात्र गणपतीमध्ये आमच्याकडे पर्वणी असायची. सर्वच नातेवाईक ,भाचे मंडळी आमचेकडे गणपती दर्शनाला यायचे. आम्ही धमाल करायचो मामाही सर्वात मिळून मिसळून आनंदात सामील व्हायचे.
मात्र वेळात वेळ काढून कधीतरी शनिवारी रविवारी आम्हास मुंबई दर्शन करावयास घेऊन जात. आम्हाला मामांचा भीतीयुक्त आदर वाटे. मामासाहेब मोटार गाड्यांचे शौकीन होते. त्यांच्याकडे आस्टीन, हिल्मन, ॲम्बेसिडर अशा गाड्या होत्या. या गाड्यातूनच आम्ही दरवर्षी लोणावळा माथेरान पंचगणी महाबळेश्वर पुणे शिर्डी असे अनेक ठिकाणी फिरायला व राहायला जात होतो. त्यावेळी आमच्याकडे बॉक्स कॅमेरा होता त्यातून आम्ही फोटो काढत असू. मामांनी राजा ट्रॅव्हल बरोबर किसान यात्रा तसेच जपान देशाची सफर ही केली होती. तेथून त्यांनी याशिका हा भारी कॅमेरा आणला होता.
मामांनी आपल्या भाच्यांनाही व्यवसाय कसा करावा याचे प्रत्यक्ष शिक्षण दिले. त्याचे उदाहरण म्हणजे आमची मंजुळा आत्याचा मुलगा रामदत्त याला साध्या व्यवसायातून मसाल्याचा व्यापार करायला शिकविले आणि त्यातून त्यांनी वरळी मार्केटमध्ये, ”म्हात्रे मसाले” हे दुकान उघडले व ते प्रसिद्धीस आणले.
मामा आपल्या अडीअडचणीतील नातेवाईकांना हरप्रकारे मदत करून सांभाळून घेत. त्याचे एक उदाहरण मुद्दाम येथे सांगतो. त्यांची एक बहीण बाळंतपणात मृत्यू पावली. सहा महिन्याचे बाळ आईविना कसे राहणार ,तेव्हा मामांनी ते बाळ ठाकूरद्वार वरून विरारला आणले. त्याचे संगोपन केले. मोठे करून मुलाचे लग्न लावून दिले.हा मुलगा ही दुर्दैवी निघाला. पद्माकर सावे यांचे लग्नानंतर केवळ दोन वर्षात निधन झाले. मामानी त्यांच्या पत्नीची व एक वर्षाच्या लहान बाळाची ही जबाबदारी घेतली. तो मुलगा आमच्या दादरच्या घरी वाढला. श्रीराज सावे हे त्याचे नाव. त्याचे योग्य वयात लग्न लावून दिले.आता श्रीराज सावे हे रायपूर येथे कष्टम खात्यामध्ये असिस्टंट कमिशनर पोलीस म्हणून रुजू झाले आहेत.
मामा मुंबईला 1950 सालीआले. वर्तक हॉलचे बांधकाम 1960 साली सुरू झाले होते .त्यावेळी पूज्य भाऊसाहेब वर्तकांनी मामांना वर्तक हॉलच्या बांधकामाची पाहणी करण्यास सांगितले. मामांची वर्तक हॉलवर रोज फेरी असे. 1967 68 साली मी आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असताना, मे महिन्यात मलाही कामाची माहिती व्हावी म्हणून वर्तक हाॅलच्या बांधकामावर देखरेखी साठी पाठवले होते.
1995-96 मध्ये एकदा मी व मामा वर्तक हॉलवर असताना आमची डॉ. बळवंतराव पाटील यांची भेट झाली. त्यांनी मला केळवे रोड आरोग्यधाम येथेही कामाची पाहणी करण्यासाठी बोलाविले. मामांनी मला अवश्य जा म्हणून परवानगी दिली. मात्र, संघाचे काम करताना कोणताही मोबदला किंवा प्रवास खर्च घ्यायचा नाही हे तत्व त्या दिवशी सांगितले. मी आजतागायत हे तत्व पाळतो आहे. दादासाहेब ठाकूर व आमच्या संपूर्ण कुटुंबाचा घरोबा होता. मामासाहेबांना कोणत्याही सामाजिक अथवा कौटुंबिक समस्या असल्यास ते दादासाहेबांचा सल्ला घेत असत. दादा व मामा यांनी योगाभ्यासाचे धडे निंबाळकरांच्या योगशाळेत घेतले होते.मामासाहेब शेवटपर्यंत योगा करीत होते. आमच्या घरी कित्येक वेळा संघाच्या व विश्वस्तांच्या सभा होत असत. मामा साहेबांनी घालून दिलेले धडे व सांगितलेली तत्त्वे पाळतच मी आजपर्यंत माझी वाटचाल पुढे चालू ठेवली आहे. मला त्यांची हिंदुजा हॉस्पिटल मधील शेवटची भेट ही आठवते. शेवटच्या दिवशी माझ्याशी झालेले बोलणे अजून आठवते. मामासाहेब जग सोडून गेले आणि त्यांचा माझा या जीवनातील ऐहिक संबंध संपला. मात्र स्मृती रूपाने आजही आम्ही एकमेकांशी जोडलेले आहोत.“
दीपकजींच्या या हृद्य आठवणी वाजल्यानंतर समाजसेवेचे व्रत घेतलेले मामासाहेब आपल्या स्वतःच्या व बहिणींच्या कुटुंबासाठीही किती आत्मीयता दाखवीत असत याची जाणीव होते व मन भरून येते.
विशेषतः 1965 ते 1971 या माझ्या वसतिगृहाचा व्यवस्थापक म्हणून असलेल्या कालखंडात मला मामांच्या नम्र शांत सौम्य स्वभावाबरोबरच त्यांचे कणखर व आपल्या विचारावर दृढ असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन झाले. आमच्या वस्तीगृहात एक विद्यार्थी जाणून बुजून हेतुतः शिस्तीचे नियम पाळण्यात टाळाटाळ करीत होता. रात्री उशिरा येणे सांस्कृतिक कार्यक्रम मासिकसभांना उपस्थित न रहाणे, खोलीतील इतर सहकाऱ्यांना चिथावणे असे त्याचे उद्योग होते. कदाचित व्यक्तीशः माझ्या वरील राग गैरसमजामुळे तो असे करीत असावा असे मला वाटले. याबाबतीत मी दोन-तीन वेळा त्याला प्रत्यक्ष समजावून देखील विशेष फरक वागण्यात होईना. मी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली तेव्हा हे गृहस्थ समाजातील एका संपन्न कुटुंबातून आले होते. तसेच तत्कालीन संघ नेतृत्वातील एका सन्माननीय व्यक्तिचे जवळचे नातलग होते असे कळले. वसतीगृहातील काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे तोंडी तक्रारी करून बेशिस्तीवर काही इलाज करण्याची विनंती केली होती. प्रकरण मोठे नाजूक होते. माझ्या नेहमीची आचार संहिता मी येथे लागू न करता मामांशी याबाबतीत बोललो.
बेशिस्तेने वागणाऱ्या मुलाला मी प्रथम माझ्या ऑफिसात बोलावून त्याच्याशी चर्चा करी, त्याने काम नाही झाले तर पालकांना फोन करून त्यांच्याकडून पाल्याला समज देववी शेवटी विश्वस्तांकडे तक्रार देऊन कार्यकारी विश्वस्त सांगतील त्याप्रमाणे कारवाई होई. अगदी क्वचित प्रसंगी विश्वस्तांची मदत घेतअसे.
या केस मध्ये मामांनी मला शांत राहण्यास सांगितले. “मी काय ते बघून घेतो“ असे आश्वासन दिले. एका आठवड्याच्या आत मामा सदर विद्यार्थ्याच्या एक मान्यवर, उद्योगपती पालकांना घेऊनच वस्तीगृहात आले. विद्यार्थ्याला कार्यालयात बोलवून आम्हा दोघांसमोर त्याची चांगलीच कान उघडणे केली. ”यापुढे रेक्टरांच्या सूचना न पाळल्यास तुझा वस्तीगृहप्रवेश मीच रद्द करीन”, अशी तंबी घेऊन ते निघून गेले.
पुढच्या दिवसापासूनच हे महाशय शिस्तीत वागू लागले हे सांगणे नलगे. आज आपल्या पिताजींचा उद्योग यशस्वीपणे पुढे नेत ते देखील एक यशस्वी उद्योजक आहेत. कधीतरी आमची प्रसंगानुरूप भेट होते व कोणतीही कटूता न राहता जुन्या आठवणी निघतात.
मामांनी या प्रसंगी दाखविलेली हुशारी निस्पृहता व कर्तव्य कठोरता प्रत्येक सामाजीक कार्यकर्त्यासाठी उत्तम उदाहरण आहे. आमचे वस्तीगृह हे वैशिष्ट्यपूर्ण असून ते कुटुंबाचेच विस्तारित स्वरूप आहे. तेथील प्रत्येक विद्यार्थी, व्यवस्थापक तसेच विश्वस्त मंडळातील सभासदांचे एकमेकांशी कोणत्या कोणत्या स्वरूपात प्रत्यक्ष नातेसंबंध असतातच.अशी प्रकरणे खूप काळजीपूर्वक व हाताळावी लागतात. त्यामुळे कोणावर बेशिस्त ची कारवाई झाल्यास ते वृत्त समाजभर पसरण्यास वेळ लागत नाही. संबंधीत विद्यार्थ्यांची कायमची बदनामी होते व रेक्टरना ही दूषण मिळू शकते. माझ्या कारकीर्दीत अशी काही प्रकरणे मला हाताळावी लागली. सुदैवाने मी स्वतः तर कधी मामांसारख्यांच्या मार्गदर्शनाने ती यशस्वीपणे हाताळली, हे सांगण्यास मला आनंद वाटतो .
वज्रादपी कठोराणी।मृदुनी कुसुमादपी
असे मामांचे लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. सहसा ते कठोर होत नसत. कोमल संभाषणानेच आपला कार्यभाग साधून घेत. मात्र भाग पाडले तर रूद्रावतार धारण करून आपले कर्तव्य पार पाडीत .
अशाच दुसर्या एका गमतीशीर प्रसंगाची आठवण मला या संबंधात होत आहे. भाऊसाहेब वर्तक एकदा आमच्या वस्तीगृहातील मुलांना संबोधित करताना म्हणाले होते, ”आमच्या विधानसभेचे सभापती बाळासाहेब भारदे हे अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत तुम्ही त्यांचे भाषण कधी ऐकले तर तुमचे मन संतृप्त होईल तुम्ही जेवायचे ही विसराल!! “
सर्व विद्यार्थ्यांना त्यातील मतितार्थ जरी कळला होता. त्याकाळी आमच्या वस्तीगृहात भोजनालयाची व्यवस्था नसल्याने दोन तीन चेष्टेखोर विद्यार्थ्यांनी माझ्याकडे येऊन,” बाळासाहेब भारदे ना एखाद्या कार्यक्रमासाठी बोलावून त्यांचे भाषण आम्हाला ऐकवा, आमची एका दिवसाची जेवणाची सोय होईल..”, अशी ऊपहासात्मक विनंती केली! आम्हा सर्वांनाच बाळासाहेबांचे भाषण ऐकण्याची खूप उत्सुकता होती. मात्र या मस्तीखोर विद्यार्थ्यांच्या विनंतीत थोडा चेष्टेचा वा माझी परीक्षा पाहण्याचा ही हेतू असावा. भाऊसाहेबांसमोर हा प्रस्ताव मांडणे मला योग्य वाटले नाही, मी मामांच्या मदतीने बाळासाहेबांना वसतीगृहात आमंत्रित करावयाचे ठरविले. त्या वर्षीच्या विद्यार्थी सत्कार समारोहात बाळासाहेब भारदे आले व त्यांनी उत्कृष्ट भाषण केले. त्यांचे त्यादिवशी चे भाषण अगदी साध्या सोप्या शब्दात (कारण बाळासाहेब पूर्वाश्रमीच्या जीवनात उत्कृष्ट कीर्तनकार ही होते), इतके सुंदर झाले की पुढील अनेक दिवसांची वैचारिक शिदोरीच त्यांनी आम्हाला दिली. चेष्टेखोर विद्यार्थ्यांची तोंडे जरी बंद झाली तरी “मामा काण्यांच्या खानावळीत आता एक दिवस तरी जाऊ नका ..“,असे उपहासाचे बोल पुढील कितीतरी दिवस त्यांना ऐकावे लागले “.
मी 1971 झाली वर्तक स्मारक मंदिर सोडले. मामांचे समाजकार्य चालूच होते. त्या काळात ते समाजाचे अध्यक्ष व पुढे विश्वस्त/ कार्यकारी विश्वस्त म्हणून त्यांचे योगदान होते. कोणत्या सभासमारंभाचे निमित्ताने मामांची गाठ पडल्यास ते माझी अगदी अगत्याने सर्व चौकशी करून मला ”आपल्या समाजाच्या कार्यात काहीतरी योगदान देत रहा..” असे प्रेमाने समजावीत. त्यांचा तो हक्कच होता. मला संघाच्या पारितोषिक समिती, वसतिगृह समिती अशा समित्यावर काम करण्याची संधी मिळाली, दिली. पुढे 2000 साली मामांचे दुःखद निधन झाल्यावर सन 2002 मध्ये निवडल्या केलेल्या संघ फंड ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात माझी निवड झाली. त्यावेळी श्री. केसरीभाऊ पाटील संघाचे अध्यक्ष होते व कै दामोदर सावे सर मुख्य विश्वस्त व कै. डॉ.बळवंतराव पाटील कार्यकारी विश्वस्त होते. या सर्वांबरोबर काम करण्यात मला एक वेगळाच आनंद व अनुभव मिळाला.
आपल्या व्यवसायाचा, समाजाचा, त्याचप्रमाणे औद्योगिक जगतातील कार्याचा व्याप सांभाळताना मामांनी आपल्या कुटुंबाकडे ही तितकेच लक्ष दिले आहे. दीपक भाई तर मामांचे चिरंजीव परंतु सौ. गीतांजली ताई या दुसऱ्या कुटुंबातून आलेल्या.त्यांच्या स्नुषा. त्यांनाही मामांचे व्यक्तिमत्व किती वेगळे व आदर्श वाटले ते त्यांच्या शब्दात वाचा..
“तीर्थरूप जगन्नाथ दादाजी ठाकूर लोकांसाठी ते मामासाहेब पण माझ्यासाठी ते लेकीवर वात्सल्य करणारे सासरे कमी आणि पिता जास्त होते.त्यांचा तिसरा पुत्र किशोर यांच्याशी माझा विवाह 1985 ला झाला आणि मी कु. घरत ची सौ.ठाकूर झाले. आम्ही त्यावेळी दादरपूर्व येथील घरात राहात होतो. अजूनही आम्ही तिथेच राहत आहोत. वसईच्या मोठ्या घरातून मुंबईच्या फ्लॅटमध्ये राहायला आले पण मला त्यांनी कधीच जागेची उणीव भासून दिली नाही.
खरे तर आम्ही सुना त्यांना आबा म्हणून संबोधत असू. पण त्यांची तिन्ही मुले त्यांना मामा म्हणून हाक मारत. मी जेव्हा प्रथमच ते ऐकले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले की कोणी आपल्या वडिलांना मामा असे कसे हाक मारत असतील? पण मला हळूहळू त्याच्या उलगडा होऊ लागला. मामासाहेब नऊ बहिणींच्या पाठीवर झालेले एकच पुत्र होते, त्यामुळे त्यांना त्यांच्यापेक्षा मोठे असलेली भाचे मंडळी भरपूर होती. सगळ्यांचे एकुलते एक लाडके मामा झाले होते. त्यामुळे भाचे मंडळी जसा हाक मारीत, तेच मुलं ही हाक मारू लागली. अशी त्यामागची गंमत होती.
ठाकूर मंडळींचे कोणतेही प्रश्न असले की सर्वजण मामांकडेच उत्तरासाठी यायचे आणि त्यांना ती मदत मिळत असे. आमच्या सासूबाई, सौ विमल ताई मामांच्या पाठी खंबीरपणे उभ्या असायच्या. कोणतीही आर्थिक अडचण असो कुटुंबातील कलह असो पुढील शिक्षणाबाबतीत मार्गदर्शन असो सर्वांना एकच आधार फक्त “मामा”! माझे ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्यांचा मला खूप पाठिंबा होता. कित्येक संस्थांचे सामाजिक कार्यकर्ते मामांकडे मदतीसाठी यायचे ते कधीच हात हलवत जायचे नाहीत. आमच्या आईचा त्यात जास्त पुढाकार असे. अगदी मामांच्या खांद्याला खांदा लावून तिने सहकार्य दिले. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते याचे जिवंत उदाहरण म्हणजे आमचे आबा व आमची आई! याचा प्रत्यय मी अनेक वेळा घेतला आहे.
मामांची सर्व कामे वेळापत्रकानुसार चालत असतं मामा नेहमी त्यांचे खाणे पिणे योगासने करणे बँकेची कामे मिलची कामे व वर्तक हॉलची कामे वेळच्यावेळी करायचे ते आपली दिनचर्या लिहून ठेवायचे त्यांनी खूप चांगल्या सवयी आपल्या अंगी बाळगल्या होत्या त्यांना कसलेही व्यसन अजिबात नव्हते वयोमानानुसार आरोग्याच्या काही तक्रारी सोडल्या तर बाकी तक्रारी काहीच नव्हत्या
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ते अनेक वर्षे मेंबर होते. त्यांना वाचनाची आवड होती. रोज टाईम्स ऑफ इंडिया व मराठी वर्तमानपत्र वाचत असत. मामांनी फक्त आपल्या सोमवंशी क्षत्रिय समाजापुरता काम केले असे नाही तर नाना पालकर संस्था तसेच माजगाव इंडस्ट्रियल इस्टेट अशा संस्थांमध्येही त्यांचे मोठे योगदान होते. गिरगाव येथील चंद्रेश्वर मंदिर, शिरगाव येथील विठ्ठल मंदिर येथेही त्यांची सेवा रुजू झालेली आहे. भक्ती बरोबर निस्वार्थ सेवा कशी करावी हे त्यांच्याकडूनच शिकावे
भविष्यकालीन आर्थिक तजवीज कशी करावी याचे उत्तम ज्ञान मामांच्याकडे होते .त्याचा फायदा त्यांनी आपल्या कुटुंबापर्यंत मर्यादित न ठेवता जिथे जिथे ते सेवा करत येथील संस्थाननाही मिळवून दिला.आपल्या समाजाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या निधीसाठी ते गावोगावी फिरले आहेत याची आपणा सर्वांना आहे आम्ही.
त्यावेळी दादरच्या घरात 13 जण एकत्र राहायचो, तेरावी व्यक्ती म्हणजे आमचा ‘पपी’ कुत्रा .त्याला नेहमी फॅमिली मेंबर अशीच वागणूक मिळे.
मामांची देवावर फार भक्ती व श्रद्धा होती. गगनगिरी महाराज व सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू हे त्यांचे श्रद्धास्थान होते. ते स्वतः वर्तक हॉलवरून चालत येताना दादरच्या फुल मार्केट मधून देव पूजेसाठी फुले घेऊन यायचे. मी जेव्हा नवविवाहित होते तेव्हा माझा एकही सण फुले व गजरे केसात माळल्याशिवाय गेलेला नाही. मामा व सासूबाईंनी नातेवाईकांशी खूप चांगले संबंध ठेवले होते. ते वरचेवर आपल्या सर्व नातेवाईकांना भेटायला जात. कोणाचे काही दुखले खुपले की लगेच दोघेही त्यांना भेटायला जात व जी मदत हवी असेल ती करीत. अशी प्रेमळ माणसे आज पाहायला मिळणे खूप विरळा आहे. कोणी अभ्यासात चांगले यश मिळविले की लगेच त्याचे भेटवस्तू देऊन कौतुक होत असे.अष्टपैलू,प्रेमळ कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व असलेले मामासाहेब पितृतुल्य सासरे म्हणून मला लाभले हेच आम्हा सर्वांचे भाग्य होय. त्यांच्या पवित्र स्मृतीला मी सादर प्रणाम करते.”
साध्या सरळ शब्दातून सौ.गीतांजली ताईंनी मामांचे ,एका आदर्श कुटुंब प्रमुख, वडीलधारी श्वशुर असे व्यक्तिमत्व किती यथार्थपणे रेखाटले आहे !एका निस्वार्थ समाजसेवकामागे दडलेले त्यांचे वेगळे रूप आपणास जाणवते.
मामांच्या अखेरच्या दिवसात ते मुंबईतील इस्पितळात उपचार घेत असताना मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र त्यावेळी मामा शुद्धी- बेशुद्धी अशा अवस्थेत आपल्या शय्येवर होते. मी,“मामा..साहेब …”अशी हाक मारल्यानंतर पापण्यांचो थोडी हालचाल झाली. इतर कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. मुखकमला वर एक यथार्थ जीवन जगल्याची प्रभा होती. दीपक भाई तेधे होते. मी चरण स्पर्श करून वंदन केले व त्या थोर विभूती चा निरोप घेतला .
तेच माझ्यासाठी मामांचे अखेरचे दर्शन. कारण त्यानंतर थोडे दिवसांत मामा निवर्तल्याची बातमी आली, मी मुंबई बाहेर होतो.
एक सच्चा साधा सरळ मितभाषी वज्रनिश्चयी समाजसेवक चोख व्यव व्यवहार करणारा आदर्श व्यावसायिक आणि तितकाच कुटुंब वत्सल साधा माणूस आमच्यातून कायमचा निघून गेला. दोन वर्षातच मामांच्या जाण्याची रौप्य जयंती साजरी होईल.
मामांच्या निधनानंतर अनेक मान्यवर नेत्यांनी व नियतकालिकांनी, दैनिकांनी त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजली तून मामांची लोकप्रियता व समाज कार्य सर्व किती मौलीक होते याची जाणीव होते .
दैनिक नवशक्ती, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकसत्ता या वृत्तपत्रांनी मामासाहेबांच्या निरलस व निष्पृह समाजसेवेचा गौरव करून त्यांना आदरांजली वाहिली आहे. पत्रकार कै.प्रभाकर पानसरे यांनी मामांच्या चार तपाहून अधिक विविध सामाजिक कार्याचा आढावा घेऊन आदरांजलीत म्हटले आहे.
“मामासाहेबांच्या चार तपाहून अधिक काळात दिलेल्या प्रदीर्घ प्रवासामध्ये त्यांचे व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन यांतील सीमारेषा केव्हाच पुसल्या गेल्या होत्या.विचारांची शुद्धता चारित्र्यसंपन्नचा ,तंत्रविज्ञान व्यावसायिकता ,व्यवहार निपुणता आणि संघ विकसित कार्यक्रम त्यांनी जीवनभर राबविले. समाजहिताच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन सातत्याने कार्य करण्याची प्रेरणा त्यांना लोकनेते अण्णासाहेब वर्तक पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या ओजस्वी आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वातून मिळाली .मातृऋण पितृऋण आणि समाजऋण अशा त्रिवेणी संगमाचा सोनस्पर्श त्यांच्या जीवनाला लाभला होता. त्याग आणि सेवा ही संस्थापकांच्या तत्त्वज्ञानातील महान तत्वे त्यांनी आयुष्यभर जोपासली. संघाच्या रौप्य महोत्सवी समारंभात मामासाहेबांच्या सत्कार प्रसंगी भाऊसाहेब वर्तकांनी असे उद्गार काढले की ,”मामासाहेब ज्यांना ज्यांना भेटले त्यांना त्यांना त्यांनी आपलेसे केले…” हे उद्गार आजही बोलके वाटतात. त्यांच्या स्वभावांतील ऋजुता निर्भय वृत्ती प्रेमळपणा शिस्तप्रियता निस्वार्थीपणा आदी गुण वाखाणण्यासारखे होते. .!
वृद्धाश्रम म्हणजे म्हणजे ज्ञान विज्ञान अध्यात्म व मनोरंजन यांचा मिलाफ घडवून आणणारे एक सांस्कृतिक केंद्र व्हावे अशी भाऊसाहेब आणि इंदुताई यांची धारणा होती. मामासाहेबांनी आपल्या सहकार्या समवेत पद्मश्री भाऊसाहेब वर्तक आणि इंदिरावर्तक स्मारक वृद्धाश्रम योजना आखली आहे. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व श्रीमती इंदुताई वर्तक समारक वृद्धाश्रम योजना साकार करणे हीच मामासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.”
भावी पिढीतील कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमाच्या अमूर्त कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन आजच्या घडीला केळवा रोड येथे हा वृद्धाश्रम सुरु झाला आहे.कै. सौ. इंदुताई व कै पद्मश्री भाऊसाहेब वर्तक तसेच मामासाहेबांच्या स्मृतीला ती चिरकालीन मानवंदनाच आहे.
या वृद्धाश्रमाचे उभारणीत तत्कालीन अध्यक्ष श्री सदानंद राऊत व त्यांचे सहकारी तसेच विश्वस्त मंडळातील मुख्य विश्वस्त कै प्रमोद भाई चुरी, कार्यकारी विश्वस्त दिगंबर राऊत व सर्व विश्वस्त मंडळाचे प्रयत्न कारणीभूत आहे. मात्र तत्कालीन विश्वस्त व आमच्या समाजातील धडाडीचे व्यक्तिमत्व, माजी अध्यक्ष श्री विलास बंधू चोरघे (सध्या सोक्ष संघ फंड ट्रस्ट चे विश्वस्त) यांच्या भरीव योगदानाशिवाय विश्रामधाम उभारणीचे काम होणे कठीण होते.
कै मामांसारखी माणसे आयुष्यात योग्य वळणावर केवळ ऋणानुबंधानेच मिळतात. त्या ऋणानुबंधाच्या गाठी पडल्यावर “भेटीत तुष्टता मोठी..’असणे सहाजिकच आहे. माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्याला ती तुष्टता देणाऱ्या मामांना जाऊन एवढी वर्षे झाल्यानंतरही त्या भेटींच्या आठपणी स्मृतीचे मोहोळ उठवितात! कधी समृद्धता प्रसन्नता तर कधी कधी अस्वस्थताही देतात.कारण अशी व्यक्तिमत्वे आता दुर्लभ होत चालली आहेत म्हणून!
मी पहिल्यांदाच सांगितलं त्याप्रमाणे आपले प्रेयस् जतन करीत असतानाही श्रेयस करता करता, कोणालाही पीडा न देता जे देता येईल ते सर्वांना प्रेमाने देऊन त्याचा कोणताही गाजावाजा न करता जीवनाचे सार्थक करून घेणारे मामा साहेबां सारखे लोक हे खरे समाजभूषण आहेत.
“भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात !
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे!..”
साने गुरुजी
असेच त्यांचे आयुष्यभराचे कार्य असते.
कै.मामासाहेबांच्या पवित्र स्मृतीला विनम्र प्रणाम करून हे लिखाण संपवतो.
दिगंबर वा राऊत.
मा. कार्यकारी विश्वस्त, सो क्ष संघ फंड ट्रस्ट.
One thought on “ समाजभूषण कै. मामासाहेब ठाकूर”