शालीन व सुसंस्कृत-कै. हरी नारायण उर्फ दादासाहेब ठाकूर

कै. हरी नारायण उर्फ दादासाहेब ठाकूर.
२९ऑगष्ट १९१३ – ३० जून १९९४

उच्च शिक्षणामुळे प्राप्त झालेली सुसंस्कृतता व शालीनता, अत्यंत संयमी पण कणखर वृत्ती, समाज संघटना व कै. लोकनेते अण्णासाहेब वर्तक, कै पद्मश्री. भाऊसाहेब वर्तक यांचे नेतृत्वाविषयी अविचल निष्ठा, अभ्यासू व विचारी वृत्ती, आतिथ्यशिलता, स्वभावात गोडवा, कोणाविषयीही मनात कटुता नाही, काळवेळ व परिस्थिती पाहून वागण्याची कसोटी, समाजाबाहेर देखील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती, राजकारण व राजकारणी व्यक्तींशी संबंध येऊनही त्या धबडग्यात  स्वत:च्या चरित्राला व चारित्र्याला जपणारा, कलांविषयी आवड असणारा, कलावंतांविषयी आदर व प्रेम बाळगणारा, पुढे जाणाराचे पाय मागे न ओढता त्यास पुढे जाण्यासाठी सहाय्य करणारा, निष्ठावान व ढोंगी यांची अचूक पारख करणारा, अधिकारपदे मिळाल्यावर देखील आपले गुण न सोडणारा, सत्तेचा ताठा न बाळगणारा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या नेत्याच्या निष्ठेपाई  ब्रिटिश सरकारने देऊ केलेली उच्च पदाची नोकरी झुगारून देऊन स्वदेशाभिमान जागविणारा असा हा नेता आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजाचा मुकुटमणी होता. आज त्यांचे नाव जरी विस्मृतीत गेले असले तरी त्यांची आठवण ठेवणे हे आमचे परम कर्तव्य आहे. ते नाव म्हणजे कै. पूज्य हरी नारायण ऊर्फ दादासाहेब ठाकूर!!!

हिंदू कॉलनी दादर मधील दादांचे जुने घर,”सिताराम निवास!”

    नोकरी व समाजसेवेची अवधाने सांभाळणारे दादासाहेब ठाकूर एक विचारवंत व उत्कृष्ट लेखक सुद्धा होते. मी कै. पूज्य तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहाचा विद्यार्थी होईतो,तेव्हा पासून, त्यांना पहात आलो. त्या काळात ते सो क्ष संघ कार्यालयात वारंवार येऊन आपल्यावर  सोपविलेल्या कामाची चर्चा तत्कालीन समाजनेत्यां बरोबर  करीत असत. त्यावेळी त्यांच्या बुद्धी कौशल्याचे, नेतृत्व गुणांचे व एकूणच त्यांच्या विशाल चतुरस्त व्यक्तिमत्त्वाचे अगदी जवळून दर्शन मला झाले. पुढे सुदैवाने व्यक्तीशः परिचय झाला. त्यांचे आशीर्वाद मला मिळाले .

   दादासाहेबांचे पिताजी कै. नारायणराव ठाकूर हे विरारला कै.अण्णासाहेब वर्तकांच्या आर्थिक व्यवहारांची देखभाल करण्यासाठी त्यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून कामाला होते. साहजिकच दादांचे बालपण विरारला गेले. सुदैवाने कै. अण्णासाहेब-भाऊसाहेब आणि सर्वच वर्तक कुटुंबीयांशी त्यांचे खूप जवळचे, कौटुंबिक संबंध जुळले. त्याच सुमारास कै. मामासाहेब ठाकूर यांचे पिताजी देखील आपल्या  मुंबईतील नोकरीसाठी सोयीस्कर व्हावे म्हणून दातीवरे गावाहून विरारला राहावयाचा आले होते. मामा-दादा-भाऊसाहेब या तिघांची जमलेली बालमैत्री  त्यांच्या अखेरपर्यंत टिकून राहिली. वर्तक व ठाकूर कुटुंबीयांचे हे ऋणानुबंध व्यक्तिशः या तिन्ही कुटुंबांना हितकारक ठरलेच पण आमच्या सो क्ष संघाची निर्मिती व त्यानंतर योग्य दिशेने झालेली वाटचाल, यासाठीही दिशादर्शक ठरले आहे. भाऊसाहेब, दादासाहेब व मामासाहेब या तीन बालमित्रांचे मैत्रेय हे आमच्या समाजधारणेला खूपच उपकारक झाले आहे. आमच्या समाजाच्या इतिहासातील ती ‘विकास-पर्वणी’ आहे.

    इंग्रजी-साहित्य या विषयात द्विपदवीधर असलेले दादासाहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या सल्लागार मंडळात होते (Personal Advisor). भविष्यातील अनेक सुखाच्या वाटा त्या नोकरीत खुणावीत होत्या. त्याचा मोह न धरता मान. भाऊसाहेबांनी केलेल्या आवाहनानुसार, “सरकारी नोकरीतील ऐषारामा पेक्षा आपल्या समाजाला माझी जास्त गरज आहे”, केवळ या एकाध्येयाने आपल्या सरकारी नोकरीचा त्याग करून ते समाजकार्यात आले.  त्यांना समाजाने अनेक अधिकारपदे दिली. मात्र त्याआधीही, कोणतेच अधिकारपद  नसतांना  संघाच्या अनेक कार्यक्रमांची आखणी, निधी संकलन, कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व पूज्य तात्यासाहेब चुरी वस्तीगृहाची उभारणी यांत महत्त्वाची भूमिका दादांनी निभावली. दादांचे संघ कार्यातील योगदान खालील प्रमाणे सांगता येईल..

  •     सन 1978 ते 81  संघाचे उपाध्यक्ष.
  •     सन 1981 ते 87 संघाचे  अध्यक्षपद.
  •     सन 1990 ते 94 ट्रस्ट चे विश्वस्तपद. 

   त्यांच्या या  सेवाकाळातील ठळक घटना:

  •     संघाची खानेसुमारी 1979
  •     हीरक महोत्सव 1981
  •    अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर व तात्यासाहेब चुरी वस्तीगृहाचा रौप्य महोत्सव 1987
  •    केळवे येथे आयोजित परिषदेच्या अध्यक्षपदासाठीही त्यांची निवड 1988 साली झाली होती.
  • केळवे रोड येथील भूखंडाची मागणी करण्याचा ठराव ही त्यांच्या विश्वस्त पदाच्या कार्यकालांत झाला 1993.

   दादांचा सेवाकाल समाजाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक कालखंड होता. या काळात समाजाचे भविष्य ठरविणारे अनेक उपक्रम पार पडले आणि खऱ्या अर्थाने समाजोउन्नती झाली. आपले योगदान देतांना निगर्विपणा, निग्रह, मीतभाषण, आणि समर्पण वृत्ती दादांची वैशिष्ट्ये होती.

    दादांची विवेक-विचक्षण बुद्धी, निर्धारी परंतु भावूक मन, लोकसंग्राहक स्वभाव, धीरगंभीर वृत्ती व या सर्वातून प्रगट झालेले भारदस्त व्यक्तिमत्त्व त्यांच्या सहवासात येणा-याला आकर्षून घेणारे होते. बाहेरील किंवा समाजांतर्गत विरोधकांशी देखील ते तत्त्वासाठी भांडले पण कधी फटकून वागले नाहीत वा संबंध तोडून बसले नाहीत. सहिष्णुता व खिलाडू वृत्तीने त्यांनी आपले स्वतःचे व संपूर्ण समाजाचे जीवन निश्चितच समृद्ध बनविले. आपल्यापेक्षा मोठ्यांच्याबद्दल आदर व अदब बाळगत असतानाच आपल्यापेक्षा लहानांना त्यांनी नेहमीच सन्मानाने व औदार्याने वागविले. भाऊसाहेबांसारख्या तत्कालीन सर्वेसर्वा नेतृत्वाला ही विरोध करून ,त्यांनाआपली बाजू  समजावून देऊन त्याप्रमाणे त्यांचे मनः परिवर्तन घडविण्याचे कसब दादा साहेबांकडे होते. आम्हा  विद्यार्थ्यांशी वागताना मात्र ते अत्यंत मोकळेपणाने गप्पा करीत व गप्पांतून छान उपदेश करीत!

“श्रीहरी” दादांचे जुने वडिलोपार्जित निवासस्थान. आज नवीन स्वरूपात !

       मी वसतिगृह रेक्टर व अण्णासाहेब वर्तक समाज मंदिर व्यवस्थापक अशा  दोन्ही नात्याने 1965 ते 70 या कालादरम्यान काम केले. जरी मी संघाच्या कोणत्याही समितीचा सदस्य व पदाधिकारी नव्हतो तरी सांस्कृतिक समिती, शिक्षण समिती, पारितोषिक समिती. इत्यादी महत्त्वाच्या समित्यांच्या सभेला मला आमंत्रण असे. तरुण वर्गाचा प्रतिनिधी म्हणून माझेही मत जरूर भासल्यास  विचारले जाई. विशेषतः भाऊसाहेबांकडून तशी विचारणा झाल्याशिवाय मी सभेत बोलत नसे. मात्र विचारल्यानंतर माझे स्पष्ट मत मी योग्य त्या शब्दात सर्वांचा सन्मान राखून बोलत असे .त्यामुळेच माझ्या उपस्थितीला कोणाची ना नसे. मी नुकताच प्रसिद्ध यु डी सी टी( आत्ताची आई सी टी), संस्थेमधून द्वीपदवीधर होऊन बाहेर पडलो होतो व VJTI  महाविद्यालयात प्राध्यापक असल्याने माझ्या मताचा योग्य तो सन्मान राखला जाई. सर्वांचा सन्मान राखत तरीही स्पष्टपणे कोणताही शब्दछ्छल न करता मत प्रदर्शित करण्याची माझी वृत्ती असे.ते दादांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते.. कधीतरी ते देखील मला स्वतःहून माझे मत सांगण्याबद्दल सूचना करीत. अशा अनेक चर्चांमध्ये कित्येकदा दादांनी मला शाबासकी दिली आहे. दादांचा हा स्नेह व जिव्हाळा मला अनेक कठीण प्रसंगांतून निभाऊन नेण्यात कामास आला. त्यातील एक  प्रसंग सांगतो.

   ‘शैक्षणिक मदत समिती’च्या सभेदरम्यान, ‘आय टी आय’, सारखा सर्टिफिकेट कोर्स करणाऱ्या एक विद्यार्थ्यांच्या  अर्जावर चर्चा चालू होती.त्या काळात संघाची आर्थिक स्थिती विशेष चांगली नसल्याने फक्त काही ठराविक अभ्यासक्रमांना मदतीसाठी मान्यता दिली गेली होती. तेवढ्याच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वा विद्यार्थिनींना मदत मिळे..सर्वच समिती सदस्यांनी, सदरहू विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती गरीब असली तरी त्याचा शिक्षणक्रम ‘संघमान्य’ नसल्याने मदत देऊ नये .आज एक अपवाद केल्यास भविष्यात अनेक विद्यार्थी अशी मदत मागतील,असा त्यांचा आक्षेप होता. नियमाप्रमाणे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर होते. कै दादासाहेब एकमेव सदस्य होते की त्यांचे म्हणणे, सदरहू विद्यार्थ्याला नियमाचा अपवाद करून मदत द्यावी, कारण ती न दिल्यास त्याचे शिक्षण संपूर्णपणे थांबणार होते व तो त्या कुटुंबावर मोठा आघात ठरणार होता!

  पू.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संबोधितांना दादासाहेब .

   खूप भवती न भवती झाली. “ही मदत देऊ नये” असाच समितीचा निर्णय झाला..भाऊसाहेबांचे तसेच मत होते. दादांनी या निर्णयास विरोध दर्शवीला. विरोध करणाऱ्या सर्वच सभासदांना त्यांनी अनेक प्रकारे समजाविले तरी ते मानेनात.शेवटी, “एका गरीब समाज बांधवांसाठी इतकी त्या आवश्यक मदत व पुरोगामी विचारसरणी आम्ही दाखवू शकत नसू तर माझे या समितीत असणे खरोखरीच आवश्यक आहे काय?” असे निर्वाणीचे उद्गार दादांनी काढले. सभा स्तब्ध झाली. भाऊसाहेब हि काही क्षण स्तब्ध होते. त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकून माझे मत विचारले. माझ्यासाठी मोठा कसोटीचा क्षण होता. दादांचे विचार मला मान्य होते. मात्र त्या तणातणीच्या वातावरणात काही मत देणे सत्वपरीक्षा होती. मी माझे मत मांडताना दादांच्या मताला पूर्ण संमती देऊन “एका गरीब परंतु होतकरू मुलाला, अपवाद करून आपण मदत केली तर त्यामुळे एक संपूर्ण कुटुंबाचे पुनर्वसन होणार असून ते श्रेय आपण घ्यावे. मदत परतफेड असल्याने नक्कीच परत मिळेल” असेच मत मांडले. त्यावेळी विद्यार्थी वसतीगृहात अशी अनेक गरीब मुले विविध प्रकारचे शिक्षणक्रम घेत होती. त्यांना निश्चितपणे आर्थिक मदतीची गरज होती. मात्र काही नियमांमुळे प्रसंगी त्यांना वस्तीगृहात प्रवेश ही मिळू शकत नव्हता. सुदैवाने माझ्या स्पष्टीकरणानंतर भाऊसाहेबांनाही दादांचे मत पटले. सर्व सदस्यांनीही माना डोलाविल्या व तो मदतीचा प्रस्ताव पास झाला. एका गरीब कुटुंबाला योग्य वेळी मदत मिळू शकली याचा मलाही आनंद झाला. त्यावेळी दादांनी माझ्याकडे ज्या कौतुक भरल्या नजरेने कटाक्ष टाकला ते चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर येते. प्रसंग जरी  लहान होता, दादांच्या उदार मतवादी, निस्पृह, स्पष्ट, रोखठोक स्वभावाचे दर्शन त्यातून होते. त्या काळी तरी मान. भाऊसाहेबां समोर एवढे स्पष्टपणे विचार प्रदर्शन करू शकणारी जी एक दोन माणसे मी पाहिली होती त्यातील दादा एक होते! असे  वादविवादाचे व सखोल चर्चेचे अनेक प्रसंग मी पाहिले आहेत. या चर्चा अत्यंत सकारात्मक पद्धतीने होत असतं. मला स्वतःला त्यातून खूप काही शिकावयास मिळाले. भाऊसाहेब तेव्हा मुख्य विश्वस्त व अध्यक्ष अशी दोन्ही पदे सांभाळीत होते.त्यांच्या कार्य बाहुल्यामुळे कधी संघ कार्यालयात सभा न घेता त्यांच्या मंत्री म्हणून मिळालेल्या मुंबईच्या चौपाटीवरील विशेष सरकारी निवासस्थानी होत असे. तेथेही मी काही सभांना  उपस्थित राहिलो आहे. या दिग्गज नेतृत्व नेतेमंडळीच्या विचार मंथनांतून त्यावेळी खूप मौलिक चिंतन होईल व माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला त्यातून शिकावयास मिळे. 

    माझ्यासाठी  वरील प्रसंगाचे खूप महत्त्व होते.  कारण मी व दादा त्या प्रसंगाने अधिक जवळ आलो. दादा माझ्याशी अनेक गोष्टीवर मनमोकळेपणे चर्चा करू लागले. दादांची व माझी वेवलेंथ कुठेतरी जुळली होती. त्याचा फायदा दुसऱ्या एका कठीण प्रसंगात मला कसा झाला ते पुढे येणार आहे.

पूज्य कै.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वस्तीगृहात: डावीकडून बसलेले, कै. भालचंद्र भा पाटील,कै. रघुवीर पाटील,कै.शोभना अमृत राऊत,डॉ.सदानंद कवळी,कै. दादासाहेब ठाकूर,व कै.दामोदर सावे सर.

        सभेसमोर येणा-या प्रत्येक प्रश्नावर सखोल चर्चा होई. प्रत्येकाला आपले मत मांडण्यास वेळ मिळे. वेळ कमी आहे म्हणून ‘चर्चा लवकर आटोपा’ असे क्वचितच घडे. किंबहुना एखाद्या महत्त्वाच्या विषयावर कोणी बोलायचे राहिले तर कै. भाऊसाहेब त्यांचेही मत अजमावून घेत. अंती सर्वसंमतीने निर्णय घेतले जात. आपले मत आधी सांगण्याऐवजी सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर ते आपले मत देत. त्यांचे मतप्रदर्शन त्या प्रश्नावर अनेक बाजूंनी प्रकाश टाकणारे, ब-याचदा नावीन्यपूर्ण असे. त्यामुळे त्यांच्याबद्दल सहका-यांमध्ये आदरयुक्त प्रेम व आपुलकी सहजच निर्माण झाली होती. सभेचे निर्णय एकमताने होत. आजही त्या दिवसांची आठवण झाली की त्या सर्व धुरीणांच्या कार्य कर्तुत्वाची व मोठ्या मनाच्या त्या माणसांची आठवण होऊन माझी मान आदराने लवते. चर्चा फक्त विशिष्ट सामाजिक समस्ये संदर्भातच सीमित ठेवली जाई. प्रत्येकाचे वैयक्तिक राजकीय वा इतर विचारांचा त्यात संदर्भ नसे, हे त्याचे वैशिष्ट्य. प्रश्न गुंतागुंतीचे असले की चर्चेला एक नवी धार मिळे. मात्र सर्वांचे विचार समाजाला एक धोरणात्मक दिशा देणारे होते.

  माजी राष्ट्रपती कै.संजीव नीलम रेड्डी यांचे समवेत डावीकडून  पहिल्या कै. तारामाई वर्तक( माजी राज्यमंत्री महाराष्ट्र सरकार) दुसरे कै. दादासाहेब ठाकूर. उजवीकडून पहिले मामासाहेब ठाकूर दुसरे कै. चिंतामणराव वर्तक.

    ही सर्व मंडळी  स्वतः शुद्ध चारित्र्याची, निस्पृह वृत्तीची, आपला उद्योगधंदा पेशा सांभाळून समाजाला काहीतरी देण्याची इच्छा असलेली आणि  समाजातील  सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा या ध्येयाने झपाटलेली होती. आपल्या नेत्यावर अविचल निष्ठा ,अभ्यासू व विचारी वृत्ती आदित्यशीलता, स्वभावात गोडवा व विरोधका विषयीही अजिबात कटूता न ठेवता काळ वेळ परिस्थिती पाहून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची प्रवृत्ती होती. दादासाहेब त्या धुरीणांच्या मांदीयाळीतील एक सुसंस्कृत, सुशील, सुविद्य असे नेतृत्व होते. कसाही प्रसंग असला तरी भावनेच्या आहारी कधी न जाता योग्य वेळ आल्यावर आपले मत स्पष्टपणे मांडून कोणाचाही मुलाहिजा न ठेवता परिणामांची परवा न करणारे असे ते व्यक्तिमत्व होते. 

   प्रत्यक्ष राजकारणात नसले तरी प्रसंगी नोकरी व्यवसायानिमित्त राजकारण्यांबरोबर वावरणारे दादासाहेब रुक्ष वाटत नसत. त्यांना साहित्यात रस होता, शिक्षणात होता, तसा गायनातही होता. कै अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर शेजारील, ब्राह्मण सभेत गणेशोत्सवातील एका गायन कार्यक्रमात त्यांच्याबरोबर मी उपस्थिती लावली होती. त्या कार्यक्रमात दादासाहेब इतके तल्लीन झाले होते ते पाहून मी तर भारावलो. गायनात रमून गेलेले दादा मी प्रथमच पाहिले!

   दादांना चित्रकला आणि शिल्पकला यातही रूची होती. त्यांना चौफेर वाचनाची आवड होती. एखाद्या मुद्द्याचा सर्व अंगाने विचार करून आणि तो दुसऱ्यांना पटवून घेण्यासाठी लागणारी वकृत्वकला त्यांचेपाशी होती. फिक्कट रंगाचे, परीट घडीचे शर्ट पॅन्ट आणि त्यावर कोट हा त्यांचा नेहमी पोशाख असे. त्यावरूनही त्यांच्या उच्च अभिरुचीची साक्ष मिळते.  विख्यात चित्रकार व संघाचे माजी उपाध्यक्ष, कै हरीश राऊत हे प्रसंगानुरूप संघ कार्यालयात भेट देत. त्यावेळी त्यांच्याशी चित्रकला व तत्सम विषयावर दादांची होणारी चर्चा मी ऐकली आहे. त्यावरूनही त्यांना या विषयात असलेली रूची  व त्यांचा अभ्यास याची जाणीव होई. याच लेखांतील एका छायाचित्रात कै. हरीश राऊत दादां बरोबर पहावयास मिळतील

    एक हुशार व व्यासंगी लेखक म्हणून दादांचे काम समाजासाठी अजरामर आहे. ‘समाजदर्शन’ व ‘समाज परिवर्तन’ ही दोन पुस्तके त्यांनी संघाच्या निर्मिती व वाटचाली बाबत विशेष चिंतन करून लिहिली असून आपल्या समाजाच्या भावी पिढ्यांसाठी तो बहुमोल ठेवा आहे. त्यांनी, ’अण्णासाहेब वर्तक: व्यक्ती आणि कार्य’, हे चरित्रपर पुस्तक, ‘बाळ’ या नावाने लिहिले आहे. माननीय कै. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या भाषणांच्या ध्वनिफितींच्या आधारे त्यांनी ‘सह्याद्रीचे वारे’ आणि ‘युगांतर’ या पुस्तकाद्वारे  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मान. यशवंतरावांचे जीवन कार्य व  पुरोगामी विचार उलगडून दाखवले आहेत. एवढे असूनही त्यांनी स्वतःच्या नावाचा उल्लेख कुठेही येऊ दिला नाही. एवढी प्रसिद्धी पराड़मुखता दादां जवळ होती, यातूनही त्यांचे अलौकिकत्व सिद्ध होते!

   कै.पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या संबंधी ‘जीवनधारा’ हा संपादित ग्रंथ प्रकाशित केला. त्यात त्यांनी भाऊसाहेबांवर  एक सुंदर भाऊसाहेबांचे हा व्यक्तिमत्व दर्शन घडविणारा असा लेख लिहिला आहे. एक समर्थ नेतृत्व म्हणून त्यांनी मान. भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत.

    दादासाहेब विशेष करून त्यांच्या सामाजिक व वैचारीक कार्याबद्दल खुलासेवार बोलत. मात्र स्वतःविषयी व कौटुंबिक आयुष्याबद्दल ते कधीच जास्त बोलत नसत.. तो त्यांचा स्वभाव असावा. मलाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची विचारणा करण्याचे कधी मनाचा आले नाही. दादांना एक भाऊ असल्याचे मला माहित होते.दादांच्या अखेरच्या दिवसात मी हिंदू कॉलनीतील “सितारामभुवन” या त्यांच्या निवासस्थानी  जात असे तेंव्हा दादां सोबत हे बंधू आणि त्यांच्या सौभाग्यवती भेटत.

 कै.दादांवर हा लेख लिहिताना माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबाची व कौटुंबिक पार्श्वभूमीची थोडी माहिती मला हवी होती. त्या दृष्टीने माझ्या परिचयांतील व दादांच्या  नातेसंबंधातील  काही मित्रांशी बोललो. 

 कोणाकडूनच विशेष माहिती मिळेना. सुदैवाने येथेही श्री दीपक भाई ठाकूर माझ्या मदतीस आले. त्यांनी मला दादर (सिताराम भुवन, आत्ता प्लाझापार्क)येथे राहणारे दादांचे भाचे श्री अशोक घरत व विरार येथे राहणारे दादांचे नातू श्री विराग वर्तक यांचेशी संपर्क करून दिला. सुदैवाने या दोघांनीही मला पूर्ण सहकार्य देऊन त्यांचे जवळ असलेली माहिती मला पुरविली. या दोघांनाही  मी खूप धन्यवाद देतो. श्री.अशोक घरत मुंबई महापालिकेतील निवृत्त अधिकारी असून 1994 साली  झालेल्या भारतीय जनगणनेत,त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने “राष्ट्रपती पदक” बहाल केले असून मोठा सन्मान केला आहे. त्यांचे बद्दलही दोन शब्द पुढे लिहिणार आहे. त्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही.

   प्लाझा पार्क ..दादांचे जुने निवासस्थान,’सिताराम भुवन ‘,हिंदू कॉलनी दादर.

   आपल्या मामांबद्दल सांगताना श्री अशोकजी म्हणतात,

    “माझे मामा हरि नारायण ठाकूर उर्फ दादा ठाकूर यांचे नावातच किती दैवी शक्ती आहे. भगवान श्रीकृष्ण आणि श्री विष्णूंची रूपे असलेली तीनही नावे त्यात एकत्रित आलेली आहेत. स्वातंत्र्य पूर्व काळातील उच्चविद्याविभूषित बहुआयामी व सामाजिक भान असणारे असे ते सोमवंशी क्षत्रिय समाजातील एक असामान्य व्यक्तिमत्व होते.

    दादांचा जन्म 29 ऑगस्ट 1913 रोजी विरार येथे झाला .त्यांचे शालेय शिक्षण दादर येथील छबीलदास हायस्कूलमध्ये झाले व उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला.एम ए ( इंग्रजी वांग्मय) या विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. आपली प्रतिभा आणि गुणवत्ता या परीक्षेत प्रथम वर्गात यश मिळवून सिद्ध केली.

   ब्रिटिशांची सत्ता असलेल्या त्या काळात त्या सरकारतर्फे  एकाउच्चस्तरीय सनदी पदाची निवृत्ती करण्यासाठी भारतातून फक्त आठ लोकांना आमंत्रित केले होते .त्यापैकी सात हे दक्षिणात्य होते. एकमेव मराठी माणूस होता तो म्हणजे  हरी नारायण ठाकूर! मुलाखतीसाठी पहिल्या क्रमांक दादांचा होता. मुलाखत घेणाऱ्या पॅनेल समोर दादा स्थानापन्न झाले. सर्व सदस्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. दादांनी त्यांची समर्पक उत्तरे दिली आणि त्यांचा इंटरव्यू संपला. पुढील ऊमेदवाऱाची इंटरव्यू घेण्याचे स्थगित केले गेले. “पुढच्या उमेदवारांचे इंटरव्यू घेण्याची आवश्यकता नाही, आम्हाला हवा तसा उमेदवार  मिळाला आहे”, असे पॅनेलने जाहीर केले.

    दादांना नेमणूक पत्र मिळाले मात्र पदभार घेण्याच्या वेळेस दादांना अप्रिय अशी एक घटना घडली. स्वातंत्र्यसंग्रामातील सहभागामुळे कै अण्णासाहेब वर्तकांना तत्कालीन ब्रिटिश सरकारने अटक केली. दादांना ते अजिबात पटले नाही. त्या अटकेचा निषेध म्हणून दादांनी ब्रिटिश सरकार तर्फे देण्यात आलेली ही उच्चपदाची नोकरी न स्वीकारताच धुडकावून लावली.आपल्या प्रिय नेत्यासाठी व आपल्या जाज्वल्य देशाभिमानासाठी त्यांनी केलेला हा मोठाच त्याग होता. दुर्दैवाने ही गोष्ट दादांच्या किती समाज बांधवांना ठाऊक आहे याची शंका वाटते?

   पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्री अण्णासाहेब वर्तक यांना त्यांच्या राजकारणामध्ये दादांनी सातत्याने मदत केली. त्याचबरोबर अत्यंत जागृतपणे व दूरदृष्टीने समाजसेवेचे कार्य देखील सुरू ठेवले. काही कालानंतर माननीय श्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांचे स्वीय सचिव म्हणूनही काम करण्याची जबाबदारी दादांवर सोपविण्यात आली. हे काम देखील त्यांनी अत्यंत जबाबदारीने सचोटीने केले .त्याचप्रमाणे त्या वेळचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री बाळासाहेब देसाई आणि मंत्रिमंडळ सदस्य गणपतराव तपासे यांच्यासोबतही दादांनी कार्यालयीन काम केले आहे.

     कै बाळासाहेब देसाई व कै.गणपतराव तपासे या मंत्री महोदया बरोबर काम करण्याच्या अनुभवांचे किस्से दादा अत्यंत मजेदारपणे सांगत असत. हे किस्से सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव प्रकर्षाने जाणवत. हे संभाषण अगदी साभिनय सादर करीत. माननीय कै. यशवंतराव चव्हाणांबाबत दादांच्या मनात नितांत आदराची भावना होती.कै.चव्हाण साहेबांच्या कर्तुत्वाचे त्यांना फार कौतुक होते. चव्हाण साहेब भारताचे संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी मुंबईहून दिल्लीस रवाना झाले. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील मंत्रालयाच्या कार्यालयाचा चार्ज दिल्यावर आपल्या तीनही सेक्रेटरींना बोलावून घेतले आणि विचारले की तुमच्या काही अडचणी आहेत का, तसेच तुम्हाला काही हवे आहे का? यावरून चव्हाण साहेबांच्या  आपल्या सहकार्यांबरोबरच्या आपुलकीच्या भावना आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा सिद्ध करतात . कै.यशवंतरावांच्या अशा कितीतरी आठवणी गप्पांच्या ओघात दादा सांगत असत.

          पुढे श्री गणपतराव तपासे यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. हरियाणा हे शेतीप्रधान, कृषी क्षेत्रात अग्रगण्य असलेले राज्य .तिथल्या प्रगत कृषी तंत्रज्ञानाची आपल्याकडील वसई विरार पालघर डहाणु येथील शेतकऱ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने दादासाहेबांनी श्री तपासे साहेबां बरोबर संधान बांधून तेथील शेती बाबत अभ्यास करण्यासाठी सोमवंशी क्षत्रिय संघाच्या साधारणपणे पन्नास हुन अधिक लोकांचे एक पथक हरियाणाला नेले होते. या दौऱ्यामुळेआमच्या शेतकऱ्यांना हरियाणातील आधुनिक तंत्रज्ञान व तेथील कृषी उत्पादनाविषयी सविस्तर माहिती मिळाली. समाज बांधवांना त्याचा मोठा फायदा झाला.हरियाणा येथे गेलेल्या या पथकातील सदस्यांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था श्री तपासे साहेबांनी स्वतःहून जातीने केली होती. आवश्यक ती सेवा पुरविली होती. केवळ दादांच्या बरोबर त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळेच हे शक्य झाले.

 कै.विजयाताई वर्तक यांचे सोबत कै.दादासाहेब ठाकूर.

     दादासाहेबांना वाचनाचा दांडगा छंद होता. दैनंदिन वृत्तपत्रे आणि नियतकालिके ते वाचित असतंच पण विविध विषयावरील पुस्तके वाचण्याचीही त्यांना आवड होती. क्रिकेट आणि लॉनटेनिस या खेळामध्ये त्यांना विशेष रुची होती. क्रिकेटमधील विजय हजारे ,विजय मर्चंट, विनू मंकड अशा अनेक नामांकित क्रिकेटर्स विषयी आणि त्यांच्या रेकॉर्ड विषयी त्यांच्याकडे परिपूर्ण माहिती असायची.दादासाहेब स्वतः क्रिकेट किंवा टेनिस खेळले नाहीत पण या खेळाची प्रचंड आवड असल्याने खेळाच्या बारीक सारीक घटना त्यांना माहिती होत्या आणि त्या खेळामध्ये झालेले विक्रम व विक्रमादित्य खेळाडूंची नावे त्यांना तोंड पाठवत होती.

    दादासाहेबांचा अफाट अनुभव व बुद्धिमत्ता व कर्तुत्व लक्षात घेऊन आपल्या समाजातील कै भाऊसाहेब वर्तक कै तारामाई वर्तक मंत्री पदावर असतानाही, स्वतः दादांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेत. तसेच कै यशवंतराव चव्हाण श्री शरद पवार इत्यादी महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज मंडळी ही त्यांची भेट घेऊन विचार विनिमय करण्यासाठी त्यांचे घरी आलेली आम्ही लहानपणी पाहिली आहेत. 

    दादांना मोरेश्वर हे बंधू व वासंती ही भगिनी  अशी दोन भावंडे होती.  दादा स्वतः अविवाहित होते. मोरेश्वर यांचा विवाह सौ.शारदा राऊत ,होळी बाजार- राऊतवाडी ,वसई यांचे बरोबर झाला होता.सौ.वासंती यांचा विवाह दिगंबर घरत,वसई यांचे बरोबर झाला होता. वासंती या माझ्या मातोश्री म्हणजेच दादा ठाकूर हे माझे सखे मामा होतं. दादांनी आपल्या समाजातील कित्येक तरुणांना आयुष्यात पुढे येण्यासाठी विविध प्रकारे मदत केली आहे. मी तर त्यांचा सख्खा भाचा होतो त्यांनी माझ्यावर पुत्रवत माया केली आणि मला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले आहे. माझ्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीमध्ये दादांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच मी बी ए, एल एल बी, एल एस जी डी, आणि एल जी एस या पदव्या प्राप्त करू शकलो. मी मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करीत असताना दादांचा सल्ला नेहमी घेत असे.

     केंद्र सरकारच्या वतीने भारतीय जनगणना 1991साली करण्याचे जाहीर झाले. पालिकेच्या आरोग्य खात्याने हे काम करावयाचे होते. कामाची व्याप्ती व महत्त्व लक्षात घेऊन तत्कालीन जॉईंट कमिशनर श्री ए बी मांदुस्कर आणि कमिशनर श्री शरद काळे साहेब यांनी  नेहमीचे प्रोटोकॉल बाजूला ठेवून माझ्यावर( अशोक दिगंबर घरत), ही जबाबदारी सोपविली. माझे साठी ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. अथक परिश्रम करून सहकारी व कर्मचाऱ्याना बरोबर घेऊन, महापालीका-महाराष्ट्र सरकार-केंद्र सरकार यामध्ये समन्वय साधत, वेळोवेळी परिस्थितीजन्य अहवाल सादर करीत ,जनगणना कामाची पूर्तता माझ्या टीमने यशस्वीरित्या पूर्ण करून दाखविली.भारत सरकार तर्फे,भारताच्या राष्ट्रपती कडून,मला ब्रांझ पदक आणि सन्मानपत्र देण्यातआलेआहे.सन्मानपत्राची प्रत व पदकाचा फोटो मी येथे जोडला आहे. हा सन्मान मला मिळाल्याबद्दल जास्तीत जास्त आनंद माझे मामा म्हणजे दादा ठाकूर यांना झाला. त्यांनी माझे फार कौतुक केले आणि परिचितांना ही बातमी कळऊन आनंद व्यक्त केला. या कामाच्या व्याप्ती मध्ये व पूर्ती मध्ये मला दादांचेच मार्गदर्शन सतत मिळत होते. या मार्गदर्शनामुळेच मी हे काम दिलेल्या वेळेत व यशस्वीपणे करू शकलो.

     कै अण्णासाहेब वर्तक परिवाराबरोबर दादांच्या सर्वच कुटुंबीयांचे अत्यंत घरोब्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. हे दोन्ही परिवार एकच आहेत इतकी आपुलकी व जिव्हाळा या दोन्ही परिवारामध्ये होता.परिवारामध्ये दादा ठाकूर यांना आदराने  ‘दादा’असे संबोधले जाई. दादा अत्यंत संयमी शांत आणि कमी बोलणारे उत्तम प्रकृती स्वास्थ लाभलेले असे व्यक्तिमत्व होते. दिनांक 30 जून 1994 रोजी दादासाहेबांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे सोमवंशी क्षत्रिय समाजातील अनुभवी मार्गदर्शक आणि दिशा दाखविणारा एक दीपस्तंभ हरपला.”

   श्री अशोक भाई व श्री विराग भाई या दोघांनी दिलेल्या या सविस्तर माहिती नंतर दादांच्या अज्ञात अप्रकाशित अशा वेगळ्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश पडतो. स्वतः अविवाहित राहून आपल्या कुटुंबातील आप्तेष्ठांना शिक्षणासाठी व त्यांच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. या लेखनाचे  निमित्ताने श्री.अशोकजी व माझी पुनर्भेट झाली. कारण योगायोगाने, मी कै.तात्यासाहेब चुरी  वस्तीगृहाचा रेक्टर असतांना  ते तेथे विद्यार्थी होते.अर्थातच जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला !! दादर येथील दादांच्याच  हिंदू कॉलनी मधील ,सिताराम भुवन (आता पार्क प्लाझा)या निवासस्थानी सध्या त्यांचे वास्तव्य असून आपल्यापरीने समाजसेवेचे काम आजहीकरीत असतात.

  श्री.अशोक दि घरत यांना भारताच्या राष्ट्रपती कडून मिळालेले शिफारस पत्र.

       कै भाऊसाहेब वर्तकांनी ज्या विश्वासाने दादांना सरकारी नोकरी सोडून समाजसेवेसाठी बोलाविले तो त्यांचा विश्वास दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केला. एक उत्कृष्ट प्रशासक सिद्धग्रस्त लेखक, शांत आणि आपल्या  बांधवांप्रती प्रेम व जिव्हाळा असणारा असा थोर समाजसेवक त्यांच्या रूपाने समाजाला गवसला होता.

 मी स्वतः दादांचा अत्यंत कृतज्ञ आहे याला कारण त्याचं काळात घडलेला एक प्रसंग .त्यावेळी दादांनी मला अत्यंत सहृदयतेने आस्थेने मार्गदर्शन करून मला मोठा दिलासा दिला होता.

माझ्या वसतीगृहावरील वास्तव्याचे दरम्यान 1970 साली बोर्डी येथे संघाचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. आम्ही काही माजी विद्यार्थ्यांनी त्या दिवसात एकत्र येऊन आपलेही समाजासाठी काही योगदान असावे म्हणून ‘माजी-विद्यार्थी मंडळ’,स्थापन केले होते. ‘छात्रसेतू’नावाचे एक पाक्षिक तरुणांच्या विचारांची देवाण घेवाण व्हावी म्हणून चालू केले होते. जुन्या ‘क्षात्रसेवक’,नियतकालिकाला पुनर्जीवित करण्याचा तो प्रयत्न होता. सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात आम्हा विद्यार्थ्यांना तासभर देऊन  एक परीसंवाद आयोजित करावा अशी विनंती युवकांनी  केली. मान.भाऊसाहेबांनी मोठ्या आनंदाने ती मान्य करून, “त्या परिसंवादात आम्हालाही हजर राहण्याची परवानगी द्या”, अशी गमतीने टीपण्णी केली. परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध समाजसेवक व शिक्षणतज्ञ सन्माननीय कै भानुदासजी सावे होते.

वसतीगृहाचे काही आजीमाजी विद्यार्थी व समाजातील सुविद्य  तरुण अशा चार-पाच युवकांनी आपले समाजोन्नति विषयक विचार त्या परिसंवादात मांडले.  मलाही संधी मिळाली होती.तत्कालीन समाज धुरीण व समाजकार्याशी माझा जवळून संबंध आल्यामुळे माझ्या भाषणाविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. बोलण्याच्या ओघात व भावनेच्या भरात माझ्या भाषणात मी तत्कालीन समाज नेतृत्वावर जाहीरपणे टीका केली.

  “समाजातील तरुण वर्गाला समाजकार्यात पुरेसा वाव दिला जात नाही.विविध पदाधिकाऱ्यांत व समित्यांत क्वचितच तरुण वर्ग दिसतो.योग्य संधीविना तरुण वर्ग समाजाकडे कसा आकर्षिला जाईल.?..”, असे काही माझे मुद्दे होते. समोर मान.भाऊसाहेब वर्तकांसारखी अनेक अग्रगण्य मंडळी बसली आहेत याचे भान असतानाही माझ्याकडून अशी विधाने झाली हे खरे .परिसंवादाध्यक्ष भानुदास जी यांनी माझी बाजू सांभाळून घेऊन आपल्या अध्यक्षीय भाषणात, “तरुणांचे विचार जास्त संवेदनाशिलतेने घेऊ नका त्यांना जास्त संधी कशी मिळेल याचा विचार करूया..”असे सांगितले. दादासाहेब ही सन्माननीय प्रेक्षकांमध्ये होते ज्या ज्या वेळी माननीय भाऊसाहेब आमच्या वस्तीगृहास भेट देत त्यावेळी ते आवर्जून माझ्याशी एकंदर कामाची चर्चा करीत. मात्र त्या परिसंवादानंतर भाऊसाहेबांनी माझ्याशी बोलणे टाळले, यावरून गंभीर परिस्थितीची कल्पना मला आली. दादांना मीही कल्पना दिली. दादांना तसे होणार याची कल्पना बोर्डीलाच आली होती. दादा माझा स्पष्टवक्तेपणा जाणत होते मात्र कोणत्या प्रसंगी कोणा व्यक्तीसमोर कसे बोलावे याची त्यांनी मला जाणीव करून दिली. “चूक झाली आहे, तू काळजी करू नकोस, मी काय करावयाचे ते बघतो”, असे सांगत त्यांनी मला धीर दिला.

    भाऊसाहेबांच्या पुढील दादर भेटीत दादा स्वतः विश्वस्त कार्यालयात आले व मलाही बोलाविले. दादांनी भाऊ साहेबासमोर मला दोन शब्द सुनावले!  भाऊसाहेबांना,म्हणाले,” दिगंबरला समजून घ्या. त्यालाही झाल्या गोष्टीचा खेद होतो आहे. त्याच्याकडून  भविष्यात संघ कार्यासाठी योगदानाची अपेक्षा आहे..”.दादांनी माझी थोडी भलामणही केली..

  कै. भाऊसाहेबांचो समजूत पटली. त्यांनी हसून माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. हस्तांदोलन केले. मला उपदेशाचे दोन शब्द सांगून ”भविष्यातील संघाचे काम तुम्हा युवकांनाच करावयाचे आहे. संधी हवी तर सर्व लोकांसमोर भाषण करण्याची गरज काय? माझ्याशी बोलता आले नसते का?” .. मलाही दोन शब्द सुनावले.

 मी शांतपणे ऐकून घेतले.

  पूज्य तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वस्तीगृहातील मुलांसोबत सहभोजन. उभे असलेले  तत्कालीन रेक्टर डाॅ. सदानंद कवळी.

   एका कटू अवघड प्रसंगांतून दादांनी माझी सुटका केली होती. कै. भाऊसाहेबांसारख्या उच्चपदस्थ व संघाच्या सर्वेसर्वा नेतृत्वाचे मनातील माझ्या बद्दलचे गैरसमज सामंजस्याने दूर करून मला खूप धीर दिला होता!

  कै.भाऊसाहेबांचा माझ्याशी संवाद नेहमीप्रमाणे सुरू झाला. कै.पद्मश्री भाऊसाहेब हे दूर दृष्टी ठेवून समाज नेतृत्व करणारे नेते होते. त्या परिसंवादागतील काही उपयुक्त विचार त्यांनी त्वरित अमलातही आणले. अनेक संघ समित्यावर तरुण वर्गाला प्रतिनिधित्व दिले .युवकांचा समावेश संघकार्यात होऊ लागला. मलाही एक-दोन समित्याच स्थान मिळाले. माझी विश्वस्त मंडळावरील निवड व पुढे कार्यकारी विश्वस्त म्हणून मिळालेल्या  संधीचे श्रेय, मला सांभाळून घेऊन तत्कालीन सर्व धुरीणांनी मला ज्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यातच आहे. त्या सर्व सन्माननीय नेत्यांचे स्मरण मला सतत असते!

      मानवी जीवनाची यशस्वीता अथवा अयशस्वीता कशात आहे, यावर अनेक वादप्रवाद असू शकतात. मात्र “अंतरात्म्याने बऱ्या वाईटाबद्दल स्वतःच्या मनाला दिलेला कौल आपण मानतो की नाही, यावर जीवनाचे मूल्यमापन अवलंबून असते”, ही आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाची बैठक आहे. आपल्या जीवननिष्ठेशी  प्रतारणा न करता सर्व जीवन आनंदाने मानाने जगून स्वतःला पटले तेच सांगितले व जे सांगितले तसे आचरले हे साधे सरळ तत्त्वज्ञान आयुष्यभर जगणाऱ्या दादांचे जीवन निश्चितच यशस्वी झाले. अशी व्यक्तिमत्वे आज केवळ दुर्मिळ!  आमच्या भाग्यवान  पिढीने अशी दुर्लभ व्यक्तिमत्व पाहिली. मला तर त्यांचे मार्गदर्शन मिळाले, हे केवळ ऋणानुबंध!!

   दादांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन!

या लेखासाठी मान्यवर श्री अशोक घरात, श्री विराग वर्तक यांनी दिलेली माहिती, माजी मुख्य विश्वस्त डॉ.सदानंद कवळी यांनी दिलेली वसतीगृहातील जुन्या आठवणींची छायाचित्रे, व सोक्षश्री शताब्दी गौरव ग्रंथातील माहितीचा उपयोग झाला आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार.

दिगम्बर वा राऊत

माजी कार्यकारी विश्वस्त

सो क्ष संघ फंडट्रस्ट.