“ज्योतीने तेजाची आरती”, कै.भास्करराव व कै.भालचंद्र पाटील.

कै.भास्करराव हरी पाटील 13 ऑगस्ट 1897 2 जुलै 1937.

  आयुष्य मोठं असो अथवा लहान, मानवी जीवन ही एक संधी मानून  या संधीच तुम्ही सोन करा. तुमच्या अल्प आयुष्याचेही सोने होईल.  समुद्र हा सर्वांसाठी सारखाच. काहीजण त्यातून मोती काढतात, काहीजण त्यातून मासे मारतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात. मिळालेल्या आयुष्यातून तुम्ही काय घेता हे महत्त्वाचे!

    आमच्या सोक्ष समाजाचे अगदी संघ स्थापनेपासूनचे  नेते  कै. भास्करराव हरी  पाटील यांच्या अल्पायुषी जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकल्यावर अगदी अल्पकाळात त्यांनी केलेल्या बहुविध कार्याची माहिती घेतल्यावर वरील विधानाची सत्यता पटते.

   भास्कर रावांचा जन्म 1897 सालचा. हे जग  सोडले 1937 साली. एकूण चाळीस वर्षे जगले. उमेदीची अशी केवळ पंधरा-वीस वर्षे त्यांना लाभली. एवढ्या अल्पकाळात गरुडाचे पंख घेऊन या माणसाने कर्तृत्वाची जी शिखरे काबीज केली त्याचा शोध आणि बोध आजच्या तरुणाने घ्यायला हवा. त्यांच्याकडे एक युवा नेता म्हणून पाहणे व त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणे आजच्या काळात जरूरी  आहे. आजच्या सामाजिक प्रदूषणाच्या काळातही त्यांनी त्यावेळी प्रस्तृत केलेले विचार किती कालसापेक्ष होते यावरून त्यांच्या दृष्टेपणाची झेप अजमावणे आजही उद्बोधक आहे.

     सायंकाळ होण्याआधीच हा तेजोभास्कर  भर मध्यांनीच अस्तंगत झाला.

  “माझे  अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण कोण करणार?”, ही त्यांची त्यावेळची खंत त्याच्या केवळ अडीच वर्षाच्या भाल’चंद्रा’ने त्या कोवळ्या वयात ही जाणली असावी. .

   “बाबा तुमचे अपुरे कार्य मी पुरे करण्याचा प्रयत्न करीन, काळजी करू नका. तुमचे आशीर्वाद आम्हापाठी असू देत….” अजाणत्या कोवळ्या वयात “शब्देविणू संवादू”, साधीत दिलेल्या वचनाला जागून त्यानेही आपल्या भावी जीवनात वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वार्थाने प्रयत्न केला. आपल्या सेवाभावीवृत्तीने अथक प्रयत्नांनी आपला काम धंदा व्यवसाय सांभाळीत समाजाची सेवा केली. ’पितृऋण’ खऱ्या अर्थाने फेडले. कै.भास्करराव-भालचंद्र  या अनोख्या पिता-पुत्राच्या जोडीबद्दल माझ्या कुवतीप्रमाणे मी काही  लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. 

   कै.भास्कर राव हे आपल्या आई-वडिलांचे सर्वात शेवटचे अपत्य. कै.भालचंद्र भाई हे देखील भास्करराव-जानकीबाईंचे ‘शेंडेफळ’ !   हा योगायोग असला तरी या पिता पुत्रांनी आमच्या सोक्ष समाजाच्या स्थापनेपासून  जे योगदान व विचारांचे धन आम्हाला दिले त्याचे ऋण मान्य करून ही त्यांना मानवंदना!

    भास्कररावांच्या कन्या कै. विजयाताई वर्तक यांनीही आपल्या पित्याचा समाजसेवेचा वसा स्वीकारला होता. त्यांच्याबद्दलही थोडे लिहीन.

      कै. भास्करराव हरी पाटील व कै. जानकीबाई भास्करराव पाटील

     कै.भास्करराव हिराजी पाटील यांचा जन्म इसवी सन 1897 सालच्या ऑगस्ट महिन्याच्या तेराव्या तारखेला झाला. त्यांच्या वडिलांची गणना सुखवस्तू शेतकऱ्यात केली जात असे. त्यांच्या वडिलांना तीन पुत्र व तीन कन्या अशी सहा अपत्ये झाली .भास्करराव हे सर्वात लहान त्यामुळे साहजिकच आपल्या आई-वडिलांचे अत्यंत आवडते होते. त्यामुळे त्यांचे बालपण सुखासमाधानात  गेले.

  भास्कर रावांचे प्राथमिक शिक्षण वसईत मराठी शाळेत झाले.  थॉमस बॅप्टीस्टा स्कूल येथे काही वर्षे काढल्यावर ते  त्यावेळी नवीनच स्थापन झालेल्या ‘वसई इंग्रजी शाळेत’ दाखल झाले . तेथून  इंग्रजी सहावी इयत्ता पास झाले.पुढे मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधून 1918 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले .महाविद्यालयीन अभ्यासासाठी प्रथम मुंबईच्या विल्सन कॉलेज यात आपले नाव दाखल केले. असहकारितेच्या चळवळीत त्यांनी काही दिवस आंग्ल व्यवस्थापनाखालील विल्सन कॉलेजला राम राम केला .व  पुण्याच्या टिळक महाविद्यालयासारख्या राष्ट्रीय संस्थेत शिक्षण घेतले. असहकार चळवळीच्या समाप्तीनंतर पुन्हा विल्सन कॉलेजमध्ये नाव दाखल केले व बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

   कॉलेजचे बहुतेक शिक्षण त्यांनी स्वावलंबनाने केले. त्यानंतर त्यांनी एल एल बी. च्या पहिल्या वर्षाची टर्म्स भरून ती परीक्षा उत्तीर्ण झाले. सेकंड एलएलबी चाही अभ्यास केला होता परंतु त्याचवेळी त्यांचे वडील बंधू वारल्यामुळे संसाराचा व कुटुंबाचा भार त्यांच्यावर पडला व परीक्षेत बसणे त्यांना जमले नाही .

 भास्कररावांचे महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे दीर्घोद्योग, चिकाटी व स्वावलंबन यांचा आदर्श वस्तूपाठच आहे.

   भास्कररावांचा विवाह तत्कालीन सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे ते केवळ तेरा वर्षाचे असताना झाला.  पत्नी जानकीबाई ह्या  विरारच्या चौधरी घराण्यातील व विवाह समई वय केवळ आठ वर्षाचे होते.  भास्करराव या बालविवाहाचे मोठ्या गमतीने वर्णन करीत असत.

                कै. यमुनाबाई हिराजी पाटील, काकू.

   भास्कररावांना सार्वजनिक कार्याची अगदी लहानपणापासून आवड होती. मॅट्रिक परीक्षा पास झाल्यापासूनच ते सार्वजनिक कामास लागले होते. संघाच्या अगदी आरंभापासूनच्या कामात त्यांचे  योगदान होते. सोक्ष संघातर्फे निघणाऱ्या ‘क्षात्रसेवक’ या त्रैमासिकाच्या चालकापैकी ते एक प्रमुख होते . काही वर्षे ही जबाबदारी त्यांनी स्वतःच पार पाडली. हे पहा भास्कर रावांचे आपल्या सोक्ष संघासाठी दिलेले योगदान

  • 1919 मध्ये गावोगावी स्वयंसेवक मंडळी समाज जागृतीसाठी फिरत त्यावेळी वसईतून वयाच्या 22 व्या वर्षी स्वयंसेवक म्हणून निवड
  • 1920 मध्ये अण्णासाहेब वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेल्या कार्यकारी मंडळातील सदस्य.
  • 1924 मध्ये तात्यासाहेब चुरी यांनी सुरू केलेल्या ‘क्षात्रसेवक’ या त्रैमासिकाचे पाच वर्षे सहसंपादक 
  • 1928 मध्ये संघाने स्थापन केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. 
  • 1933 1933-ते 37 संघाच्या चिटणीस पदाची जबाबदारी.

   वसईत आपल्या ज्ञातीतर्फे होणाऱ्या प्रत्येक चळवळीचे भास्करराव हे आधारस्तंभ होते अगदी आपल्या अखेरच्या दिवसापर्यंत.

   कै. भास्करराव केवळ आपल्याच समाजाचे चळवळीत सहभागी असत असे नाही. वसई व पंचक्रोशीतील कोणत्याही सार्वजनिक चळवळीत ते प्रामुख्याने भाग घेत असत. शेतकरी असोत  किंवा पानव्यापारी, सर्वांच्या हितासंबंधी ज्या ज्या चळवळी होत त्यात ते प्रामुख्याने असत .भास्करराव मुंबई म्युनिसिपालिटीत कामाला  होते. सरकारी नोकरीच्या पेशामुळे ते उघडपणे राजकीय चळवळीत पडत नसत तरी त्यांची राष्ट्रीय वृत्ती प्रत्येक गोष्टीत दिसून येई. ते नेहमी स्वदेशी वस्तू वापरत. स्वदेशी वस्तूंच्या प्रचारासाठी वसईत होळी बाजारात एक दुकान ही त्यांनी काढले होते. असहकारितेच्या चळवळीच्या वेळी त्यांनी जी गांधी टोपी स्विकारली ती अखेरपर्यंत सोडली नाही.

   वसई म्युनिसिपालिटीचे ते सन 1932 ते 1935 पर्यंत सरकार नियुक्त सभासद होते. ते जरी सरकार नियुक्त  होते तरी त्यांनी आपला राष्ट्रीय बाणा तेव्हाही सोडला नाही. ह्याच राष्ट्रीय वृत्तीमुळे तीन वर्षाच्या मुदतीनंतर सरकारने त्यांना पुन्हा सभासद नियुक्त केले नाही.  भास्करराव मुनिसिपालिटीत आले नसते तर पालिकेत काही महत्त्वाच्या गोष्टी व्हायच्या राहून गेल्या असत्या. तीन वर्षाच्या कालावधीत भास्कररावांनी शहराची अमोल सेवा केली आहे.

वसईच्या मित्र मंडळाचे तर ते मुख्य आधारस्तंभ होते .अगदी आरंभापासून ते या संस्थेचे चिटणीस होते. वसईतील काही प्रमुख लोकांनी संध्याकाळी एकत्र जमून करमणूक करण्यासाठी एक सोशल क्लब स्थापित केला होता .भास्करराव त्या क्लबचे प्रमुख सभासद होते. त्यांचा स्वभाव खरोखरीच आनंदी होता. क्लबमध्ये असो अथवा बाहेर, आपल्या हास्यविनोदाने, आनंदी स्वभावाने ते आजूबाजूचे वातावरण प्रफुल्लित करीत असत.

    वसईतील  शारदा मंदिर शाळेच्या संस्थापकांत भास्कररावांची प्रामुख्याने गणना होते. ‘या संस्थेचे नाव शारदा मंदिर नसून ते कै. भास्करराव यांच्या कार्याचे यशोमंदिर व कीर्ती मंदिर आहे ‘ असे म्हटले जाते, एवढे बहुमोल योगदान भास्कररावांनी संस्थेसाठी अत्यंत अल्पावधीत दिले आहे.

  सर्व सार्वजनिक संस्थांत काम करताना भास्करराव आपल्या सर्व सहकाऱ्यांकडे  एक सन्मित्र म्हणूनच पहात असत. आपल्या सहकाऱ्यांशी त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. दुसऱ्याचे श्रेय न घेता उलट आपले श्रेय सहका-याला  देण्यात त्यांना आनंद होई. खऱ्या निर्व्याज मित्र प्रेमाचे लक्षण  त्यांच्या ठायी होते. ज्या लोकांनी भास्कररावांबरोबर सार्वजनिक कार्याबाबतीत मतविरोध केले त्या लोकांनासुद्धा त्यांच्याबद्दल प्रेम व आदर वाटत असे. खरोखर भास्कररावांसारखा उदार प्रेमळ व दिलदार सहकारी मित्र मिळणे केवळ दुर्लभ!

  समाजसेवा, जबाबदारीची नोकरी ,अशी तारेवरची कसरत करीत असतानाही भास्कर रावांनी आपली शेती बागायत व कौटुंबिक जबाबदारी ही उत्तमरित्या सांभाळली.   बालपणातच झालेले वडिलांचे निधन, कर्तासवर्ता जेष्ठ बंधू ही अकालीच निवर्तलेला, अशा परिस्थितीत त्यांनी हे सर्व कसे केले असेल याचा आज अचंबा वाटतो.

     शरीर कसदार, उंची मध्यम, नेसुचे धोतर लांब पोतीचे, लांबकोट, डोक्यावर खादीची पांढरी टोपी, हातात इंग्रजी वर्तमानपत्र, खाकेत कापडाची एक पिशवी, विशाल डोळे आणि चेहऱ्यावर शालीन स्मित! ते पहाटेस लवकर उठून आपल्या बागेत जात, वाडीतल्या मोगरा, कवठी चाफा रानफुलांचा मंद सुगंध घेत समाधानाने कामाला लागत. प्रसंगी हातात कुदळ घेऊन  खणायलाही लागत. वाडीतली नित्य कर्मे आटोपली की पुढे आपल्या ऑफिसच्या कामाला निघून जात .

   संध्याकाळी घरी आले की आपल्या गाई गुरांसोबत त्यांचे बोलणे होई. घरातली बालगोपाळ मंडळीही ओटीवर येऊन,” तात्या आले ..तात्या आले..” असा आरडाओरडा करीत . मुलांच्या निष्पाप निरागस प्रेमाने तात्यांच्या कामाचा आणि प्रवासाचा थकवा नाहीसा होत असे. मुलांची आणि गोठ्यातील जनावरांची चौकशी झाली की नंतरच ते घरात जात .रात्री जेवणे आटोपली की घरातल्या मंडळींची आस्थेने विचारपूस करीत. त्यानंतर रोजचा पत्रव्यवहार, जमाखर्च स्वतःच्या हाताने लिहीत. रात्री दहा ते साडेदहा पर्यंत त्यांचा असा नित्यक्रम होता!

    मुंबई विद्यापीठाची पदवी, सुखवस्तू  कौटुंबिक परिस्थिती आणि आपल्या  चांगल्या नोकरीतून मिळत असलेले आर्थिक स्थैर्य एवढे असतानाही भास्कररावांना अगदी तरुणावस्थेपासून समाजसेवा करावी असे का वाटले असेल? खरे तर ते समाजसेवेपेक्षा राजकारणात शिरले असते तर कदाचित त्यांना अधिक मानसन्मान व आर्थिक लाभही झाला असता . वसई पालिकेचे सरकार नियुक्त सदस्य म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना राजकारणाची द्वारे आपसूक उघडून दिली होती. पण त्यांनी तसे केले नाही. स्वतःविषयी व त्यावेळच्या एकूण सामाजिक स्थितीविषयी त्यांनी केलेले चिंतन पाहता, भास्कररावांनी खूप विचारांती आणि  आपल्या समाजाच्या आंतरिक प्रेमापोटी सामाजिक सेवेचे क्षेत्र निवडले. तेथे आजीवन अत्यंत एकनिष्ठेने काम केले. आपल्या लोकांप्रती समाजाप्रती आणि  देशाप्रती अत्यंत निष्ठा व आदर असलेली व्यक्तीच, उच्च विचारसरणी ठेवून असा स्वार्थत्याग करू शकते. भास्करराव हे एक आगळे वेगळे देशप्रेमी  व्यक्तिमत्व होते. त्यांनी स्वतः संबंधी एके ठिकाणी प्रकट केलेले विचार वाचले म्हणजे त्यांच्या तत्कालीन मनस्थितीची व दूरदृष्टीची कल्पना येते ..

   “अलीकडे आपल्या समाजाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मागच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीतील लोकांच्या हाती पैसा अधिक खेळताना दिसेल .पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना नेहमी पैशाची टंचाई भासत असलेली दृष्टीस पडेल. आजच्या पिढीवरच असा बिकट प्रसंग का यावा? याचे खरे कारण बदललेली परिस्थिती हे होय .परिस्थिती बदलली परंतु आम्ही मात्र मागचेच कायम राहिलो. गरजा वाढू लागल्या मात्र उत्पन्नाचे साधन एकच  राहिले. ‘वाढत्या गरजांचा वाढता खर्च भागविण्याची ताकद नसणे’ यालाच तर गरिबी असे म्हणतात !!

  माझ्या समाजाची स्थिती दिवसेंदिवस शोचनीय होत चालली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत आम्ही आमची सर्व भिस्त एकाच शेतीवर ठेवली आणि खर्च करण्याचे अनेक मार्ग आमच्यात शिरले. आता उत्पन्नाचे दुसरे मार्ग जर शोधून काढले नाहीत तर आपली आजची स्थितीसुद्धा कायम टिकेल का  याबद्दल मला शंका आहे!

  आपल्या समाजाचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती व बागायत यांचा विचार करू. आज पुष्कळांना विभक्त राहून स्वातंत्र्य उपभोगण्याची इच्छा असते. ही पद्धत बरी की वाईट याचा विचार सोडून दिला तरी समाजाचा कल मात्र विभक्तपणाकडे विशेष आहे आणि निर्विवाद आहे. अशा परिस्थितीत जमिनीचे कसकसे हाल होतात त्याचा मात्र आपण बारकाईने विचार केला पाहिजे.जमिनीच्या लहान लहान होत जाणाऱ्या तुकड्यामुळे  अनेक बाजूने नुकसान होते. आणि सर्वात मोठा तोटा म्हणजे थोडीशी परिस्थिती आल्याबरोबर मनुष्याला एखादा तुकडा सहजी विकण्याचीही बुद्धी होते. उलट पक्षी तीच जमीन जर त्याची एक गटाने असती तर त्यातून तुकडा विकणे त्याच्या जीवावर आले असते व आपली जमीन त्याने कायम राखली असती.आता अशा परिस्थितीत मध्यम स्थितीतील लोकांना आपली सामाजिक स्थिती कायम ठेवून दिवस काढणे जवळ जवळ अशक्य झाले आहे.”

    “आपला समाज आज कित्येक पिढ्यानपिढ्या ज्या  एकच धंद्याला चिकटून बसला आहे त्यातून बाहेर पडण्याची त्यास मुळीच ताकद नाही. ती शक्ती  शिक्षणाशिवाय येणे फार कठीण आहे. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन निर्माण केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत. ‘नोकरी म्हणजे शुद्ध गुलामगिरी आहे त्यापेक्षा उपाशी राहून मेलेले बरे ..’,वगैरे अनेक प्रकारचे पुस्तकी विचार आता सोडून द्यावे लागतील. या पोपटी  स्वातंत्र्याच्या नादी लागून एखाद्या सावकाराची जन्माची गुलामगिरी पत्करू नये. नाहीतर नोकरीची सहा तासाची गुलामगिरी टाळता टाळता सावकाराची जन्माची गुलामगिरी गळ्यात यायची!”

    “तुम्ही कोणत्याही रितीने आपले नैतिक अधःपतन होणार नाही असाच धंदा उचलला पाहिजे. शिक्षण घ्या व चाकोरीच्या बाहेर पडा.

   थोडी समाधानाची गोष्ट अशी की अलीकडे समाजाची दृष्टी या वस्तुस्थितीकडे वळत आहे. समाजाच्या विचारांचा ओघ पालटत चालला आहे. त्याप्रमाणेच तो संपूर्ण बदलून  समाजाची केवळ आर्थिक बाजूने नव्हे तर बौद्धिक व नैतिक बाजूने पण उन्नती होवो अशी त्या जगनियंत्र्याकडे प्रार्थना करतो!…”

    अगदी तरुण वयातील भास्करावांचे हे विचार आहेत. शिक्षण आत्मचिंतन आणि समाजाबद्दलचा  जिव्हाळा यातून हे विचाराचे स्फुल्लिंग निर्माण झाले आहे. ते विचार केवळ मनांत न ठेवता, समाज बांधवांना उपदेशाचे डोस न पाजता, आपल्या स्वतःपासून त्यांनी बदलाला सुरुवात केली. 

   When you want to change the system, you have to be the part of the system ..”

असे एका विद्वानाचे  सुभाषित आहे. भास्कररावांनी तेच केले. अवघ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात एक मोठी क्रांती घडवून आणली! दुर्दैवाने त्यांना अल्प आयुष्य मिळाले ते जर थोडे अधिक जगते  तर न जाणे आमच्या समाजात त्याच वेळी काही मोठे व चांगले बदल घडून आले असते.

    आमचा ‘समाज-भास्कर’, असा मध्यानकाळी लोपला ही दुर्दैवाची गोष्ट खरी, मात्र त्याचवेळी त्याचा भाल’चंद्र’ नुकताच उदयाचली विराजमान झाला होता. तो त्या समयी  केवळ अडीच वर्षाचा होता…. हा केवळ योगायोग नव्हता. ती नियतीची योजना होती .आपले काम अर्धवट सोडून अस्तंगत पावणाऱ्या तेजो भास्कराला जणू, या सौम्यशीतल भाल’चंद्रा’ने  आपल्या अंतरात्म्यातून आश्वासन दिले,… “तात्या,तुम्ही चिंता करू नका, तुमचे अपुरे काम मी पूर्ण करीन..  तुमचे आशीर्वाद आम्हा सर्वांवर असेच असू द्या..”

  खरेच आपल्या पित्याला दिलेले हे वचन  पूर्ण करूनच हा ‘भालचंद्र’ देखील समाजावर शीतल सौम्य चांदण्याची पखरण करीत मावळताना सुखासमाधानाने  गेला …त्याचीही कहाणी थोडक्यात ..!

   कै.भास्कररावांच्या  निधनसमयी अगदी कोवळ्या वयात असणाऱ्या भालचंद्र व विजया या त्यांच्या दोन अपत्यांनी पिताजींचे ऋण समाजसेवेच्या रूपाने फेडले आहेत. मला भास्कररावांचे तर दर्शन ही होऊ शकले नाही मात्र त्यांच्या या दोन्ही अपत्यांबरोबर प्रत्यक्षात समाजकारण करण्याचा योग आला.  दोघांशीही व्यक्तिगत परिचय झाला हे माझे भाग्य!

विजयाताईना पहिल्यापासून समाजकार्याची आवड होती आणि त्यांनी संघ आणि समाजकार्याला पहिल्यापासूनच वाहून घेतले होते.

  • सन 1964 ते 70 या कालावधीत संघाच्या चिटणीस,
  • सन 1972 ते 76 या काळात अंतर्गत हिशोब तपासणीस 
  • संघाच्या सुवर्ण महोत्सव समितीच्या आणि सुवर्ण महोत्सवाच्या कार्यकारी समितीच्या चिटणीस म्हणून त्यांनी योगदान
  • सन1990 ते 96 या कालावधीत संघाचे उपाध्यक्षपद
  • सन 2002 2005 या काळात विश्वस्त पद भूषविले

याच विश्वस्त पदाचे काळात मी आणि विजयाताई विश्वस्त मंडळात सहकारी होतो. त्यामुळे त्यांच्याही कामाची पद्धत आणि दिलखुलास स्वभाव माझ्या परिचयाचा आहे. विजयाताईंच्या उपाध्यक्ष पदाच्या काळात त्यांच्या पुढाकाराने महिला मेळाव्यांची सुरुवात झाली होती. शंभर वर्षाच्या संघाच्या इतिहासात हिशोब तपासणीस, उपाध्यक्ष आणि विश्वस्त अशा तीन पदावर विजयाताई पहिल्या महिला ठरल्या आहेत. हेच त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होय!!

  आपण संघकार्याकडे का ओढले गेलो हे सांगताना विजयाताईंनी एके ठिकाणी म्हटले आहे ,

   “ वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रत्येक बक्षीस समारंभाला मी तात्यांबरोबर जात असे. त्यामुळे माझ्या मनात संघ कार्याबद्दल आस्था  निर्माण झाली. तात्यांच्या अपूर्ण राहिलेल्या आशाआकांक्षा  पूर्ण करण्याकरता आपण हातभार लावला पाहिजे, या भावनेने मी संघ कार्यात सामील झाले.,”

   जेष्ठ बंधू कै केशवराव(वर), भगिनी कै.भानुमती वासुदेव पाटील (मध्ये) व कै जयाबाई कृष्णाजी वर्तक (खाली).  

        कै. भास्कररावांचे सर्वात लहान अपत्य भालचंद्र पाटील म्हणजे आपणा सर्वांचे भाई! त्यांचा जन्म 12नोव्हेंबर 1934 साली झाला. ते केवळ अडीच वर्षांचे असतानाच माता पित्याचे छत्र हरपले होते..पाच बहिणी आणि दोन भावांचे हे कुटुंब. आकाशच कोसळले होते. पण परमेश्वर संकटाच्या निबीड अरण्यात सोडतो आणि त्यातून वाट दाखविणारा वाटाड्याही सोबत देतो!  यमुनाबाई या विधवा काकूंनी या सर्व सात भावंडांचा सांभाळ ,पालन पोषण मोठ्या हिकमतीने करून आई-बाबांची उणीव त्यांना होऊ दिली नाही. घराचा सर्व व्यवहार ,एकत्र कुटुंबांचा सांभाळ,  मुलांचे शिक्षण ,पानवेलीचा व्यापार हे सर्व सांभाळीत काकूंनी घरावर झालेले कर्जही फेडले.  या सातही भावंडांचे संसार मार्गी लागलेले पाहून 1957 साली त्यांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. खरेच यमुनाबाईंच्या कर्तृत्वाला व धीरोदात्त वर्तनाला तुलना नाही..!

    “तूच घडवीशी, तूच फोडीशी 

   कुरवाळीशी तू, तूच ताडीशी !

   नकळे यांतून काय जोडीशी?

    विठ्ठला, तू वेडा कुंभार…”

परमेश्वराला उद्देशून लिहिलेल्या कवीच्या या ओळी किती सार्थ वाटतात?

  भगिनी ,कै. सुशीला भालचंद्र राऊत (वर),कै. विजया महादेव वर्तक (मध्ये )व श्रीमती मालती गोपाळ सावे( खाली).

  भाईंचे एसएससी पर्यंतचे शिक्षण वसईतच झाले. मात्र पुढे त्यांना सायन्स विषयात  अभ्यास करावयाचा असल्याने त्यांनी रुईया कॉलेजात प्रवेश घेतला. वसईहून जाणे येणे व हा सायन्स अभ्यास जमले नाही. पहिल्या वर्षी अपयश आले. पुढे त्याच कॉलेजात आर्ट्सला प्रवेश घेतला व ज्युनियर बीए पर्यंत व्यवस्थित पुढे गेले.त्यानंतर रेल्वेत नोकरी आणि बी ए असा अभ्यास सुरू झाल्याने बी ए ला पहिल्या वर्षी यश मिळाले नाही. त्याचवेळी दादरमध्ये पू.तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतीगृह सुरू झाल्याने भाई वसतिगृहात दाखल झाले. नोकरी करीत बीएची परीक्षा चांगल्या रितीने उत्तीर्ण झाले. ते कै. पूज्य तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहाचे  पहिल्या बॅचचे (1960)भाई विद्यार्थी होते.

   1960 हे वर्ष भाईंच्या आयुष्यात आव्हानात्मक असे वर्ष ठरले. त्याच वर्षी बी ए झाल्याबरोबर त्यांना  मुंबई गृहनिर्माण मंडळात बांधकाम विभागात चांगली नोकरी मिळाली. आगाशीच्या प्रसिद्ध कवळी घराण्यातील कु.मंजुळा सखाराम कवळी हिच्याशी वांड़निश्चय झाला. पुढे 1962 साली दोघे  विवाहबद्ध झाले. कु.मंजुळा  कवळी, सौ शीला भालचंद्र पाटील झाली. भाईंच्या कौटुंबिक आयुष्याला पूर्णता आली एक नवा अध्याय आयुष्यात सुरू झाला.

    अंगभूत हुशारी, प्रामाणिकता व आपल्या कामाची जाण या गुणावर भाईंनी गृहनिर्माण मंडळात बढत्या घेत घेत बांधकाम अकाउंटस्,  स्टोअर्स इस्टेट मॅनेजमेंट इत्यादी विविध विभाग  उत्तम रित्या काम सांभाळले . 1992 साली ते डेप्युटी डायरेक्टर, वर्ग एक, या उच्चपदावरून सेवानिवृत्त झाले.

      भाईंची तीन अपत्ये, वर्षा( 15 एप्रिल 1963) प्रज्ञा( 22 ऑक्टोबर 1968)आणि पराग (17 ऑगस्ट 1972),ही  उच्च विद्या विभूषित असून आज आपापल्या संसारात सुखाने रमलेली आहेत.

(वर).कन्या सौ वर्षा, नातू अनिमिष, व जावई श्री अभिजीत. (खाली) कन्या सौ प्रज्ञा, नात सानिका ,व जावई श्री विनय.

  प्रस्तुत लेखासाठी श्री पराग यांनीच मला सर्वतोपरी सहाय्य करून ही उपयुक्त माहिती पुरविली आहे.

  विशेष म्हणजे या तिन्ही भावंडांनी माझ्या विनंतीवरून आपल्या आदरणीय पित्याबद्दल आपल्या आठवणी व संस्मरणे मला पाठविली..अगदी वाचनीय व भाईंच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारी..!

   “आमचे भाई म्हणजे आमचे वडील कै. भालचंद्र भास्करराव पाटील यांच्याविषयी त्यांच्या पश्चात भावना व्यक्त करणे हे आम्हा मुलांसाठी क्लेशकारक आहे परंतु जे घडले ते आता बदलता येणार नाही आलेली परिस्थिती स्वीकारणे भाग आहे.

    अगदी बालपणापासून आम्ही भाईंकडून असंख्य गोष्टी शिकलो. ते आमचे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक तर होतेच पण भक्कम आधारही होते. कोणत्याही परिस्थितीत धीर न सोडता न डगमगता आलेल्या परिस्थितीला शांतपणे सामोरे जाणे, ती स्विकारणे आणि त्यातून व्यवहार्य मार्ग काढणे अशा स्वभाव वैशिष्ट्यामुळे भाईंनी स्वतःचे, लग्ना पर्यंतचे खडतर आयुष्य सुसह्य केले आहे. वाईटातील वाईट परिणामासाठी मनाची तयारी केल्यास येणारी परिस्थिती हाताळणे तुलनेने सोपे होते ,असे ते नेहमी सांगत. त्यामुळेच भाई आयुष्यात कधीही विचलित झाले नाहीत आणि खंबीरपणे त्यांनी परिस्थिती हाताळली आणि त्यातून यशस्वी सुवर्णमध्य साध्य केले!

  भाई ,पत्नी सौ.शीला, सून सौ.तेजश्री, नातू चि .शर्व, नात चि मिहीका, मुलगा पराग.

     भाईंनी कधीही बाहेरचे कार्यालयीन किंवा सामाजिक ताणतणाव घरात आणले नाहीत.आम्ही लहान असताना आमची आई वाडीतून आणि भाई ऑफिसमधून घरी आल्यानंतर रात्रीचे एकत्र जेवण हे आमच्यासाठी मोठे आनंदनिधान होते.दिवसभरातील आईच्या वाडीतील घडामोडी ,आमच्या शाळेतील घटना, भाईंचे प्रवासातले अनुभव आणि ऑफिसमधले किस्से आणि त्यावरील मार्मिक टिप्पण्या यामुळे आमचे जेवण हसत खेळत पार पडत असे!

   भाई दरवर्षी सुट्टीत आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये नेत. नंतर तेथून मुंबईतील निरनिराळी ठिकाणे दाखवीत. वसईत कोणतीही सर्कस आली कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असले की ते आम्हाला आवर्जून घेऊन जातं. त्या वेळच्या प्रभात चित्रमंदिरमध्ये लागणारे अनेक दर्जेदार मराठी चित्रपट आम्ही शनिवारी रात्री एकत्र पहात असू आणि घरी परत आल्यावर त्यावर चर्चाही करत असू!

     लहानपणी रेडिओ हा आमच्या घराचा अविभाज्य घटक होता. रेडिओची ही सोबत आम्ही मुलांनी अगदी आजतागायत कायम ठेवली आहे. त्यामुळे लहानपणापासूनच रोजच्या बातम्या ऐकणे, निरनिराळ्या विषयावरच्या चर्चा किंवा संवाद, अभ्यासपूर्ण माहिती ऐकणे भावगीते चित्रपट गीते ऐकणे, यासारख्या गोष्टींमुळे आमचे सांस्कृतिक विश्व समृद्ध होत गेले. त्याकाळी ‘गीतरामायणा’च्या बारा कॅसेटचा संच भाईंनी विकत घेतला होता. पुढील अनेक वर्षे त्यांची असंख्य पारायणे आमच्या घरात झाली!

     चांगले खाणे या गोष्टीवर भाईंचा नेहमीच कटाक्ष असे. त्यामुळे आम्ही खाण्याच्या बाबतीत टंगळमंगळ केली वा कधी आम्हापैकी कोणी आजारी पडल्यास ते अस्वस्थ होत.  मग चांगल्या खाण्याचे आणि उत्तम प्रकृतीचे महत्त्व आम्हाला सांगत. आम्ही केलेल्या कोणत्याही नावीन्यपूर्ण गोष्टीचे, आम्ही मिळविलेल्या यशाचे त्यांना कौतुक असे आणि ते त्याबद्दल अभिमानाने बोलत!

     भाईंच्या चौफेर वाचनामुळे ते कोणत्याही विषयावर अधिकार वाणीने लिहीत व बोलत. त्यामुळे लहानपणापासूनच वाचनाची आवड आम्हा मुलांमध्येही उतरली. त्यांच्यामुळेच उत्तम उत्तम पुस्तके विकत घेऊन संग्रहात ठेवण्याची सवय आम्हाला लागली. वाचन, संगीत, नाटक, सिनेमा, खेळ यांच्या बरोबरीने वाडी, ऑफिस, नातेवाईक आणि समाजकार्य या सर्वांमध्ये ते मनापासून रमत. घरात सतत चालणाऱ्या अनेक विविध विषयांवरील चर्चांमुळे भाईंकडील अचंबित करणारे विस्तृत ज्ञान आम्ही अनुभवात असू. तसेच एखाद्या विषयाकडे निरनिराळ्या कंगोऱ्यातून पाहण्याची व एकतर्फी निर्णय न घेण्याची सवयही भाईंमुळेच आम्हाला लागली. भाईंनी त्यांच्या विचार आणि आचारांनी आम्हाला सुशिक्षित तर केले पण सुसंस्कृतही केले.

          टापटीप नीटनेटकेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच होता.त्यांच्या सर्व वस्तू मग ते कपडे असोत की महत्त्वाची पुस्तके आणि कागदपत्रे, कायम व्यवस्थितरित्या ठेवलेली असत. विचारांतील आणि वागण्यांतील अस्ताव्यस्तपणा त्यांना आवडतही नसे आणि खपतही नसे.

          वेळेचे नियोजन आधीपासून केल्यास ती गोष्ट उत्तमरित्या यशस्वीपणे पार पडते हे आम्ही त्यांच्यामुळे शिकलो.  आमच्या लहानपणी घरात नातेवाईकांची वर्दळ असे आणि भाईंसाठी ती आनंद पर्वणी असे .त्यांच्या कोणत्याही वयोगटात सहज मिसळण्याच्या, नर्म विनोदी व गोष्टी वेल्हाळ स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह प्रचंड होता. निवृत्तीनंतर त्यात भरच पडली .

    आपली मते स्पष्टपणे व परखडपणे मांडण्याच्या स्वभावामुळे काही वेळेस भाईंना कटुताही पत्करावी लागली. मात्र कुणावरही अन्याय होऊ नये अशीच त्यांची कायम भूमिका असे. सत्याची कास धरलेली असल्यामुळे आपली मते ते निर्भीडपणे मांडत. पटणाऱ्या गोष्टीसाठी त्यांनी कधीही तडजोडी केल्या नाहीत किंवा मिंधेपणाही पत्करला नाही. प्रामाणिकपणा हा त्यांच्या आयुष्याचा स्थायीभाव होता. त्यामुळे आयुष्यभर विशेषतः नोकरी करताना कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता अत्यंत सचोटीने त्यांनी आपली सेवा पूर्ण केली. आयुष्यात त्यांना मिळालेले प्रेम आदर मानमरातब हे त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळविले व त्यामुळे त्यांचे आयुष्य झळाळून निघाले.

       एका कौटुंबिक कार्यक्रमात कै पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व सौ.इंदुताई वर्तक यांचे समवेत भाई व कुटुंबीय

      समाजसेवेचा वडिलोपार्जित वसा त्यांनी निर्धारपूर्वक शेवटपर्यंत जपला. आपण कै.भास्करराव पाटील यांचे पुत्र आहोत आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे आपले वर्तन असले पाहिजे ही भावना त्यांनी आयुष्यभर जपली .हीच जाणीव ते आम्हा मुलांनाही वारंवार करून देत असत.आमच्या आईच्या कष्टाळू निरपेक्ष आणि खंबीर साथीमुळे त्यांचे कौटुंबिक व सामाजिक ध्यास पर्व पूर्णत्वाला गेले. त्याबद्दलही ते समाधानी होते.

     सकारात्मक दृष्टिकोन, चांगले विचार, चांगले आचरण, चांगली भाषा, चांगली संगत, चांगले परिधान या सर्वांचा जाणीवपूर्वक अंगीकार करून ,एक अत्यंत शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष प्रेमळ व थोडेसे आग्रही स्वभावाचे वडील भाईंच्या रूपाने आम्हाला लाभले हे आमचे परमभाग्य आहे.आम्ही भाईंची मुले आहोत याचा अत्यंत सार्थ अभिमान आम्हाला आहे .मात्र भाईंचे जाणे-नसणे हा आमच्या आयुष्यभराचा सल आहे. भाईंनी संक्षिप्त रूपात आपली जीवनकहाणी लिहून ठेवली होती.आणि ती पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु ती इच्छा फलद्रूप होण्याआधीच दिनांक 27 मे 2016 रोजी अल्पशा आजाराने भाई हे जग सोडून गेले. त्यांची ही इच्छा,”माझी जीवन कहाणी”, या पुस्तकाच्या रूपाने आम्ही त्यांच्या मुलांनी पूर्ण करण्याचे ठरविले. हीच आमुची त्यांना श्रद्धांजली .

   आमच्या सर्व कामात सुरुवातीपासून आम्हाला मार्गदर्शन व मदत करणाऱ्या डॉ.मनीषा टिकेकर यांचेही मनःपूर्वक आभार. भाईंच्या स्मृतींना आमचे वंदन!”

    कै. भालचंद्र भाईंच्या या तिन्ही अपत्यांनी आपल्या कर्तबगार व प्रेमळ पित्याविषयी लिहिलेल्या या आठवणी वाचून त्यांच्यावर भाईंनी त्यांना बालपणी दिलेले संस्कार किती परिणामकारक  होते हे सांगावयाची गरज नाही. 

मी स्वतः भाईंबरोबर अनेक वर्षे संघात व ट्रस्टमध्ये काम केले असल्याने त्यांच्या मुलांनी भाईंचे केलेले वर्णन मला अगदी तंतोतंत पटते हे प्रामाणिकपणे कबूल करतो.

       पित्याप्रमाणेच समाजसेवेची आवड भाईंना अगदी शालेय वयापासूनच होती .शालेय वयात ते सेवादल कार्यकर्ते म्हणून शाखेत हजेरी लावीत. पुढे पदवीधर व्हायच्या आधी 1957 साली मांडलई शाखा चिटणीस झाले. पदवी मिळताच 1960 सालात ‘ऐक्य सेवावर्धक मंडळ’ मांडलई, या सामाजिक संस्थेची त्यांनी व सहकाऱ्यांनी स्थापना केली. परस्परांतील स्नेहवर्धन होऊन गरजूना शैक्षणिक ,आर्थिक रूग्ण सहाय्य व्हावे हा त्यामागील हेतू होता. पुढे या मंडळात मांडलई बरोबरच  इतरही  पंचक्रोशीतील शाखांना सहभागी करावे, अशी विनंती झाल्यामुळे,  15 ऑगस्ट 1965 रोजी ऐक्य सेवावर्धक  मंडळाचे  ‘सो क्ष समाज महामंडळ ,वसई’ या विशाल संस्थेत रूपांतर झाले. हे महामंडळ आमच्या सो क्ष संघाला पूरक कार्य करून  अनेक प्रकारे मदतरूप झाले आहे.

    भाईंच्या धोरणानुसार सामाजिक संस्थेत राजकीय विषय व्यर्ज असत. समाजाच्या सर्व अंगाला भिडणारे, उत्कर्षाकडे वाटचाल करणारे उपक्रम हाती घेतले जात. याच  उद्देशाने पुढे महामंडळाने आपले स्वतःचे समाज-मंदिर उभे केले.  त्यातूनच वसई विकास सहकारी बँकेचीही स्थापना झाली. समाज मंदिर ट्रस्ट उभारला. भाईंचे या प्रत्येक उपक्रमात मार्गदर्शन व सहभाग असे .भाईंनी वसई शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीतही योगदान दिले. 1993 ते 98 या वर्षात ते सोसायटीचे चेअरमन होते.

  त्यांच्या पिताजींनी स्थापन केलेल्या आमच्या सोक्ष स संघातील त्यांच्या योगदानाची ही दैदीप्यमान कारकिर्द पहा..

  •       सन 1970 ते 76 व 1978 ते 1984 ,संघचिटणीस
  •       सन 1987 ते 1990,सन 1996 ते 1999,व सन2002 ते 2005 या काळात उपाध्यक्ष.
  •       सन 1993 ते 1996 खजिनदार,
  •       सन 2005 ते 2008 या काळात अध्यक्ष.
  •       सन2011 ते 2014 या काळात विश्वस्त

 अशी सर्व महत्वपूर्ण पदे त्यांनी आपल्या 44 वर्षाच्या दीर्घ सेवाकालावधीत भूषविली.

   अमृत महोत्सवानिमित्त लोकसत्ताचे माजी संपादक अरुण टिकेकर यांच्या हस्ते सत्कार.

     भाईःच्या या अत्यंत उपयुक्त अशा सेवा कालखंडात समाजाला दिशादर्शक अशा अनेक  महत्त्वाचे उपक्रम सुरू झाले वा मार्गी लागले. जसे  समाजाची खानेसुमारी,    1979 संघाचा सुवर्ण-1970, हीरक-1981 आणि अमृत महोत्सव -1995 केळवे येथील दोन परिषदा सन1988 व 2005 ,अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर आणि तात्यासाहेब चुरी वस्तीगृह रौप्य महोत्सव 1987, वाडवळ साहित्य संमेलन 2007  इत्यादी. केळवे रोड येथील आरोग्यधाम, विश्राम धाम या प्रकल्पांची उभारणी झाली.

 एकाच व्यक्तीची विविध पदावर पुन्हा पुन्हा निवड होणे आणि त्याच्या कार्यकाळात एवढी विकास कामे  होतात त्यावरून त्यांच्या सेवेच्या दर्जाची आपल्याला कल्पना यावी.

नातू चि.अनिमिष बरोबर बागकाम करताना एका वेगळ्या मूड मध्ये भाई!

    सामाजिक कामांची एवढी व्यवधाने सांभाळीत असताना पिढीजात शेती बागायती  व्यवसायापासून भाई कधीही दुरावले नाहीत. मागे मुलांनी वर्णन केल्याप्रमाणे श्रीमती शीलाताईंनी शेती बागायती व मुलांची कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यामुळेच भाई एवढे समाजकार्य करू शकले.  निश्चितच शीलाताईंची  शैक्षणिक पात्रता असूनही आपली करियर गौण मानून  भाईंची व्यावसायिक,  सामाजिक कारकीर्द यशस्वी होण्यासाठी भक्कम आधार दिला हे मान्य केलेच पाहिजे! त्यांच्या कर्तुत्वाला व त्यागाला मनोभावे सलाम!

       सन 2002 ते 2005 या काळात भाई संघाचे उपाध्यक्ष,  2005 ते 2008 या काळात अध्यक्ष व पुढे सन 2011 ते 14 या काळात विश्वस्त या  पदावर कार्यरत  असताना,  एक सहकारी म्हणून त्यांचे बरोबर संघात काम करण्याचा संधी मला मिळाली. त्यादरम्यान मी संघ फंड ट्रस्टमध्ये विश्वस्त व कार्यकारी विश्वस्त म्हणून काम पाहत होतो. विशेषतः सन 2011 ते 14 या कालखंडात भाई विश्वस्त असताना मी विश्वस्त मंडळातच कार्यकारी विश्वस्त म्हणून कार्यरत असल्याने आम्ही अगदी निकटचे सहकारी म्हणून काम केले आणि त्यामुळे माझा भाईंशी आधीे असलेला परिचय अधिक दृढ झाला.

  सो क्ष संघ फंड ट्रस्ट चे विश्वस्त म्हणून सत्कार स्विकारताना, श्री शांताराम ठाकूर ,श्री विलास बंधू चोरघे व श्री जगन्नाथ पाटील.

     खरेतर त्या वेळी भाई, सतीश नाना, विलास बंधू, शांतारामजी वर्तक असे दिग्गज आमच्या विश्वस्त मंडळात होते. आपल्या  समाजाबाहेरही त्यांना अनेक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्राचा अनुभव होता. मी व मुख्य विश्वस्त श्री. प्रमोदभाई अगदीच नवखे होतो. विशेषतः  भाईंचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक सहकार क्षेत्रातील अनुभव तर खूप दांडगा होता. मात्र तरीही त्यांनी आम्हाला त्यांच्या ज्येष्ठतेची जाणीव करून दिली नाही. मुख्य विश्वस्त म्हणून श्री. प्रमोद भाई चुरी व कार्यकारी विश्वस्त म्हणून मला  योग्य तो सन्मान दिला. एक टीम  म्हणून आम्ही उत्कृष्ट काम केले.

    विश्वस्त मंडळांच्या मीटिंगमध्ये अनेक मुद्द्यावर दुमत होई, चर्चा होत, मात्र शेवटी भाई आपल्या अनुभव व ज्ञानाच्या जोरावर एखादा सर्वमान्य तोडगा काढून विषय संपवित. दुसरे म्हणजे ही चर्चा फक्त आमच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यालयापुरतीच मर्यादित राही. या उलट संघ पदाधिकारी, तिमाही सभा. वार्षिक सभेतील चर्चेत  कोणी विश्वस्त मंडळाशी संबंधित बाबींवर विनाकारण टीका केली तर आम्हाला बोलू न देता भाई, विलास बंधू व शांताराम जी परस्पर उत्तरे देऊन टीकाकारांची तोंडे बंद करीत. आमचे टीमवर्क दाखविणारी ही विशेष  गोष्ट होती. अशा सहकार्यामुळे व परस्पर विश्वासात्मक वातावरणामुळे काम करायला हुरूप येई.

    त्या दिवसात मी व प्रमोद भाई आठवड्यातील दोन दिवस संघ कार्यालयात हमखास जात असू. त्यावेळी आम्ही इतर विश्वस्तांना येण्याची तसदी देत नसू. कधी मासिक-मिटींग असल्यास ही मंडळी आवर्जून येत व मनमोकळी चर्चा होई. आम्ही दोघांनी घेतलेल्या निर्णयांना नेहमी पाठिंबा दिला व कौतुक केले. आम्हाला त्यांनी भरपूर स्वातंत्र्य दिले होते. मात्र भाईंची एक सूचना आम्हाला होती.,

  “आपण चांगले काम करीत आहात.असेच काम  करा. मात्र कधीही कोणत्याही  कामामुळे संपूर्ण विश्वस्त मंडळाला खाली पाहण्याची वेळ येईल असे करू नका..”

   आमच्या संपूर्ण कार्यकाळात अशी वेळ आम्ही कधीच येऊ दिली नाही,  असे आज अभिमानाने सांगू शकतो.

     भाईंना माझे नेहमीच कौतुक असे . त्यांच्याप्रमाणेच मी देखील अगदी महाविद्यालयीन विद्यार्थी दशेतच समाज सेवेत भाग घेऊ लागलो होतो,, ज्या वस्तीगृहात भाईंनी विद्यार्थी म्हणून निवास केला त्या वस्तीगृहाचाच विद्यार्थी व पुढे  रेक्टर, पूज्य अण्णासाहेब वर्तक समाज मंदिराचा व्यवस्थापक, तसेच  विश्वस्त मंडळात, कार्यकारी विश्वस्त म्हणून सहकारी, अशी  कामे केली. त्यांनी मला नेहमीच प्रेम व जिव्हाळा दिला. काही चुकले असल्यास वैयक्तिक चर्चा करून समजावून दिले. मात्र जाहीर चर्चेत त्यांचा पूर्ण पाठिंबा व उत्तेजन  असे. मला कधीही ‘अहो जाहो’ न करता’ दिगंबर’, या एकेरी नावानेच हाक मारली. त्यातच मला त्यांचे  प्रेम जाणवे .

    मी विश्वस्त असतानाचे काळात वसई महामंडळ आयोजित  विद्यार्थी सत्कार  समारंभ प्रसंगी भाईंनी आग्रह करून मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलाविले होते. माझा सन्मान केला होता. त्या प्रसंगी भाईंनी स्वतः हस्ताक्षर केलेले नेताजी सुभाष चंद्र यांच्या जीवन चरित्रावरील ‘महानायक’ हे पुस्तक त्यांनी मला भेट दिले होते, जे आजही माझ्या संग्रहात मी मोठ्या कौतुकाने ठेवले आहे. कार्यक्रम संपल्यावर मी नको म्हणत असतानाही घरी घेऊन गेले. वाडी दाखवली. स्वतः नायगाव स्टेशनवर मला सोडावयास आले. तो दिवस व भाईंची ती कौतुकमिश्रित आनंदी चर्या मला आजही स्पष्टपणे आठवते.

     खुंतोडी शाखेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात भाषण करताना भाई ..त्यांचा हा कार्यक्रम अखेरचा ठरला!!

    दुर्दैवाने मे 2016 साली थोड्याशा आजाराचे निमित्त होऊन भाई गेले. त्यावेळी मी परदेशात होतो. या माझ्या मार्गदर्शक मित्राचे अंत्यदर्शन ही मी घेऊ शकलो नाही ही माझ्या मनातली खंत आहे.

 मला प्रामाणिकपणे वाटते भास्करराव वा भाई असामान्य बुद्धिवान नव्हते,अलौकीक प्रतिभा संपन्न नव्हते किंवा असाधारण पंडितही नव्हते. त्यांच्या सामान्यपणातच त्यांचे व्यक्तिमत्व सामावलेले होते. त्यामुळेच ते आपल्यापैकीच एक आहेत असा आपलेपणा त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या सहका-याना   वाटत आला.  त्यांच्या सामान्यपणाला सुधारणावादी विचारसरणी असल्याने  ते सर्वांना प्रिय झाले, त्यांच्या पिढीतल्या सुशिक्षित मंडळी बरोबर ते सहमत होऊ शकले .भावी पिढी व उगवती पिढी यांना जोडणारा एक मधला दुवा भास्करराव होते तर उगवत्या पिढीला नेतृत्व देऊन त्यांना भविष्य काळासाठी समर्थ बनविण्याचे कर्तृत्व भाईंनी केले!

   आपणास मिळालेल्या शिक्षणाचा लाभ अज्ञानरूपी अंधःकारात खितपत पडलेल्या आपल्या समाज बांधवांच्या नैतिक, धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नती करता आपण दिला पाहिजे अशी भावना हृदयात बाळगणारी माणसे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असलेल्या आजच्या काळात अशी उदात्तभावनेने प्रेरित होऊन,  तनमनधनाने समाजसेवा करणारे कै. भास्करराव व कै. भालचंद्रभाई सारखी माणसे अगदी विरळा होत. ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे..’ या न्यायाने दोघेही पिता-पुत्र आज आपल्या नश्वर देहाचा त्याग करून जरी आपणास सोडून ईहलोकांतून गेले असले तरी ते आपल्या कृतीने, विचाराने आपणांतच आहेत .त्यांचे अपुरे राहिलेले विचार व योजना पूर्ण करण्याची जबाबदारी आपणावर आहे. ती पुरी केल्या शिवाय त्यांच्या आत्म्यास समाधान वाटणार नाही!

 भास्करराव पाटील व कै.भालचंद्र भास्कर पाटील या  पिता पुत्रांची जोडी आमच्या सोक्ष समाजासाठी अवतरलेलो देवदुतांची जोडी आहे असे मला वाटते .एकाने अल्पकाळासाठी पृथ्वीवर जन्म येऊन आमच्या ‘सो क्ष समाज वृक्षाची’, लावणी करण्यात मोठे योगदान दिले  तर दुसर्याने आपल्या पित्याचे अधुरे राहिलेले स्वप्न  पूर्ण करण्यासाठी त्या  ‘समाजतरु’ला आपल्या उत्तम सेवेचे खतपाणी देऊन तो बहरलेला पाहिला!

       उमजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष जाहले!

आमच्या समाजासाठी भाग्य-पुरुष ठरवलेल्या या कर्तबगार पिता-पुत्रांच्या स्मृतीला त्रिवार वंदन!!

 – दिगंबर वा. राऊत 

मा. कार्यकारी विश्वस्त 

सो क्ष संघ फंड ट्रस्ट.