“पुण्यपीयूष पूर्णाः “…गोंडूमावशी!

   

    परवा 11 सप्टेंबरला रात्री साडेआठ वाजता माधुरीचा फोन आला. आता ‘काहीतरी वाईट बातमी ‘ तर ऐकावयास मिळणार नाही ना? अशी भीती मनात निर्माण होते न होते तोवर पहिलेच वाक्य माधुरी म्हणाली, “दिगूबंधू खूप वाईट बातमी आहे…”  पुढचे वाक्य ती उच्चारण्याआधीच मी समजलो होतो, “आई आज संध्याकाळी गेली …”

    हे थोडेसे अपेक्षितच होते. गेल्या जानेवारी महिन्यातच मी व श्रीदत्त तिला पुण्यातील वृद्धाश्रमात भेटून आलो होतो. त्यावेळी का कोणास ठाऊक पण ‘बहुदा मावशी बरोबरची ही आमची शेवटचीच भेट ठरणार नाही ना?’ अशी भिती मनाला  स्पर्श करून गेली होती. आवडत्या मावशीची विकलांगावस्था पहावत नव्हती. कमरेत वाकली होती, ज्या डोळ्यातील स्नेहाची  नजर मायेचा  वर्षाव करी  ती नजर कुठेतरी हरवून गेली होती. पायाला थोडी सूज आली होती. विस्मृती होत होती.  मात्र जुन्या आठवणी शाबूत होत्या. मला तर तिने नीट  ओळखले पण आश्चर्य म्हणजे श्रीदत्तलाही ” बापू अमेरिकेहून कधी आलास? किती दिवस राहणार आहेस?” असा प्रश्न केला. आम्हाला आश्चर्य वाटले. पण नंतर उमगले, काही स्मृती मेंदूत नव्हे हृदयाच्या एका कप्प्यात तिने  जपून ठेवल्या आहेत. आणि  म्हणून त्या आजही  शाबूत आहेत!.. आमच्यासाठी ती एक मर्मबंधातली ठेव!! मावशीला चालण्याची सोडा, सरळ बसण्याची ही शक्ती नव्हती. कमरेतूनच वाकली होती. खुर्चीत  बसते करून ठेवावे लागे. आवाजावरून आम्हाला ओळखले होते.. जुन्या स्मृती आठवत होत्या. मात्र नुकत्याच घेतलेल्या चहाची आठवण नव्हती . त्यामुळे बोलण्यात विसंगती होती ..बोलता-बोलताना मधून स्वतःलाच विसरून तोंडाने देवाचा जप चालू होता. ती स्वतःलाच हरवून बसली होती. जणू या नश्वर जगाचा आणि स्वतःच्या पार्थिव देहाचा आता काही संबंध उरला नव्हता . सगळे भावबंध नातीगोती विसरून आता एका नव्या प्रवासाला निघण्याची जणू तयारी करीत होती. नेत्र पैलतीरी लागले होते, मात्र संध्याछाया भिववित नव्हत्या! आयुष्यातील अनेक चढ उतार सुखदुःखाचे अनेक पहाड  पार केल्यानंतर आता भिती कोणाची व कशासाठी? मनाची सर्व तयारी झाली होती. ते सांगत होते…

   ” विझवूनी दीप सारे मी चालले  निजाया, 

   इथल्या अशाश्वताची, आता मला न माया!!,,”

यावर्षी जानेवारी महिन्यात मी व श्रीदत्तने घेतलेली मावशीची भेट शेवटची ठरली .

    नेहमीप्रमाणे  हातात हात घेऊन, त्या स्पर्शातून खूप काही सांगणारी आणि डोक्यापासून पाठीपर्यंत हात फिरवीत “सुखात रहा ” असा तोंड भरून आशीर्वाद देणारी ती मावशी ही नव्हती…आम्हीच तिचा हात हातात घेऊन आमच्या डोक्यावर ठेवला ..तिचे आशीर्वाद मिळाल्याचे समाधान मिळाले… निरोप घेतला . नेहमी निघतांना  तोंडाने नाही पण नजरेने “पुन्हा असेच कधीतरी या..”सांगणारी मावशी नजर खाली करून शून्यात  डोळे लावून बसली होती. आम्ही आल्याची ना आतुरता होती, जातो म्हटल्यावर  आग्रह नव्हता ! काही दिवसापूर्वी ती खाटेतून उठताना पडल्याचे  कळले होते, काही विशेष जखम झाली नव्हती मात्र हे लक्षण ठीक नाही असे तेव्हाच वाटले ..  आणि परवा ती बातमी आलीच .. गेली अनेक वर्षे, देवघरातील पवित्र नंदादीपाप्रमाणे,  संसारातील अनेक वादळ वाऱ्यांशी सामना करीत, मंद परंतु चैतन्यभारित प्रकाशाने आपला भवताल उजळणारी एक समई  आता निमाली …कायमची..

   वृद्धाश्रमातील आमच्या अनेक भेटीतील काही क्षणचित्रे.

   अत्यंत सात्विक भाव जागृत करणारा एक पारदर्शक तेजस्वी चेहरा डोळ्यासमोर आला. आयुष्यात माझा आदर्श असलेली ही माझी  मावशी. मराठी भाषेतील सगळी चांगली विशेषणे  तिचे वर्णन करताना कमी पडतील अशी ही मावशी … व्यासांनी महाभारतात सज्जन माणसाची लक्षणे सांगताना ज्या दोन ओळी लिहिल्या  त्याप्रमाणे जीवन व्यतीत केले  तीच  मावशी, सुनंदा नारायण राऊत हे तिचे व्यवहारातील संपूर्ण नाव !… ..

   ‘अतीतेष्वनपेक्षा ये प्राप्तेष्वर्थेषु निर्ममाः ।

  शौचमेव परं तेषां येषां नोत्पद्यते स्पृहा ॥ “..१३.१०८.१०

  खूप द्रव्य मिळू दे वा सर्व द्रव्य नष्ट होऊ दे कोणत्याही परिस्थितीत जे सुखदुःखा पलीकडे असतात. मनाने अत्यंत शुचिर्भूत असल्यामुळे नशिबाची साथ व दुर्दैवाचे आघात आले तरी आपल्या मनाची शांती ढळू देत नाहीत अशी माणसे खऱ्या अर्थाने पावन होत..’

    आमच्या मावशीच्या साऱ्या जीवनाचे हे केवळ दोन ओळीतील सार ! आयुष्याचे सार्थक जर ते पावित्र्याने जगण्यात होत असेल, तर मावशी आपले 99 वर्षांचे दीर्घ आयुष्य सार्थकी लावून स्वर्गलोकी गेली असेच मी म्हणेन!!

   .कै. चिमणी बाई( आक्का) व कै देवजी बा चुरी. (आप्पा).मावशीचे आई-वडील आमचे आजी-आजोबा.

    एका कर्तबगार परंतु दुर्दैवी शेतकऱ्याच्या भरल्या घरात जन्म घेऊन, अल्पकाळ श्रीमंती पाहिली, अचानक झालेल्या आपल्या पित्याच्या निधनामुळे कधी दोन वेळ जेवणाचीही भ्रांत या भावंडांना पडली, प्रेमळ काकांनी संगोपन केले, त्यांच्या छत्रछायेखाली वाढली, मराठी सातवीपर्यंतचे (त्यावेळची फायनल परीक्षा)  प्राथमिक शिक्षणही घेतले, कालाच्या रितीरिवाजाप्रमाणे सातवी पास झाल्या झाल्या खूप लवकर लग्न झाले! सुंदर गोंडस रूप, फायनलपर्यंत  शिक्षण, इंग्रजी भाषेची तोंड ओळख, त्यामुळे (त्या वेळचे मॅट्रिक पास ) घरंदाज कुटुंबातील श्री. नारायण जयराम  राऊत (अण्णा) सारखा पती  मिळाला. अण्णांना मुंबईत एका परदेशी इन्शुरन्स कंपनीत चांगली नोकरी होती. विरारला छोटा संसार मांडला.  जीवनात पुन्हा आनंद आला. संसार वेलीवर  दोन सुंदर फुले उमलली. मोठा सुरेंद्र  हुशार व गुणी मुलगा. छोटी माधुरी, नावाप्रमाणे रूप व गुणात माधुर्य असलेली! आपल्या इन-मिन दोन खोल्यांच्या संसारातही दीर आणि भावांना आश्रय देऊन जराही त्रागा न करणारी. आता कुठे थोडे सुखाचे दिवस येत आहेत… तोच निर्घृण काळाने  सुरेंद्रला नेऊन हाती तोंडी आलेला घास हिरावून घेतला.. पुन्हा  वैफल्य,  नैराश्य..  पण तेही दिवस पार केले. अण्णांच्या  निवृत्तीनंतर विरारचा भरला संसार गुंडाळून, पुन्हा  आपल्या बोर्डी गावी नवा संसार उभारला.   झाडे पाने आणि वृक्ष-लता मध्ये आनंद शोधला. लेकीने मनाजोगता साथीदार निवडल्यावर  योग्य वेळी तिला सासरी रवाना करून, पतीसोबत निवांत जीवन सुरू होतं आहे ..तोच  काळाने  जीवनसाथीवर अचानक झडप घातल्याने  पतीच्या सहवासालाही कायमचे अंतरली. अगदी एकाकी, भकासपण  वाट्याला आले . कोणावर भारभूत न होता सत्संग आणि धार्मिक वाचनात वेळ घालवीत जीवनक्रम चालू ठेवला…पुढे शरीरच साथ देईना आणि स्वाभिमान सुटेना तेव्हा  वृद्धाश्रमाचा आश्रय घेऊन,   तेथेही आपल्या सोज्वळ सात्विक वागण्याने   तेधील कर्मचारी व सहनिवासी यांचे प्रेम संपादन करणारी…जन्मजात सोशिकता ठेऊन कोणताच खेद, खंत न करता त्या जीवनाशीही समरस झाली.. .. अगदी परवाच्या शेवटच्या घटकेपर्यंत…अखेरचा श्वास घेईपर्यंत… खाटेत  पडून राहून कोणाचीही सेवा न घेता शांतपणे लेक व जावयाच्या सानिध्यात अखेरचा निरोप घेऊन गेली.. तीच आमची गोंडू मावशी!!

     दैवाचे  किती आघात सोसले तीने ,पण मनाची शांती, सोशिकता आणि परमेश्वरावरची श्रद्धा कधीही ढळू दिली नाही. माणसांना तर नाहीच पण दैवाला आणि देवालाही कधी तिने दोष दिल्याचे मी ऐकले नाही . म्हणूनच महाभारतकारांनी म्हटल्याप्रमाणे सामान्य जीवनही असामान्यपणे जगून  पावन करता येते. सार्थकी लावता येते.. भले व्यवहारी जगाच्या दृष्टिकोनातून ते यशस्वी झाले म्हणता येत नसेल पण मानवी जीवनाचे अंतिम ध्येय  ‘जीवन सार्थक करणे’ हे असेल तर निश्चितपणे आमची मावशी तिचे साधे सामान्य जीवन असामान्यपणे जगली आणि आयुष्याचे  सार्थक करून गेली!!. 

“ती सुटली.. आता आम्ही तिघीच उरलो..” मावशीच्या निधना नंतर माझ्या आईची प्रतिक्रिया!     हिरु मावशी, आई, कमळी मावशी.( डावीकडून)

        अगदी बाल वयातच या सहा भावंडांचे वडील गेले .माझी आई सर्वात मोठी (जी आज वय वर्षे 102 ), ती आठ वर्षाची तर सर्वात लहान खंडू मामा केवळ काही महिन्यांचा. यामधील चार भावंडे दोन दोन वर्षाच्या अंतराने जन्मलेली. त्यातील एक भाऊ संपूर्ण बहिरा आणि मुका. जन्म आणि मृत्यू या संकल्पनाच ज्यांना अजून समजलेल्या नाहीत, त्या कोवळ्या निष्पाप निरागस बालकांना आपले वडील ‘गेले’ म्हणजे  नक्की काय झाले हे कसे व कोण समजावणार? त्या दिवसाची आठवण सांगताना माझी आई म्हणते ते ऐकून कोणाच्याही डोळ्यात अश्रू उभे राहतील ….

          “आम्ही दोघी  (आई व मावशी) प्राथमिक शाळेत दुसऱ्या तिसऱ्या  इयत्तेत शिकत होतो.   सकाळीच शाळेत गेलो होतो  क्रिडांगणावर खेळत मैत्रिणीबरोबर दंगामस्ती चालू होती. आमच्या शाळेसमोरून एक प्रेतयात्रा जात होती. त्यावेळी कोणीतरी मोठ्या जाणत्या मुलीने आम्हा दोघींना सांगितले “ती बघा, तुमच्या वडिलांची प्रेतयात्रा जाते आहे, बाबांना शेवटचा नमस्कार  करा”. देवाला जसा मनोभावे, मात्र निर्विकार मनाने नमस्कार करतात तसा, दोन्ही हात जोडून नमस्कार केला. कशासाठी हा नमस्कार ?  प्रेतयात्रा म्हणजे काय? काहीच समजले नव्हते. जणू काही घडलेच नाही तसे, सर्व विसरून, आम्ही दोघी  पुन्हा खिदळू लागलो.. घरी आल्यावर मात्र  काहीतरी विचित्र घडले आहे, कोणीच आमच्याशी का बोलत नाही, असे काय झाले आहे, तेही कळेना . छोटी कमळी हिरू, मुका हिरमुसली होऊन  कोपऱ्यात बसून होती. तान्हा  खंडू  हुंदके देत बसलेल्या आक्काच्या मांडीवर गाढ झोपला होता. आम्ही धावत जाऊन आकाच्या कुशीत शिरलो. तिचे हुंदके आणि वाढले .. दोन्ही हातांनी ती आम्हाला कुरवाळू लागली तिचा प्रेमळ हळुवार स्पर्श सांगत होता ,.” माझ्या लाडक्या लेकीनो, आता परमेश्वरच तुमचा वाली.” काहीतरी अघटित वाईट घडले आहे. याची थोडी जाणीव झाली.

     नंतर  मावशीने जवळ घेऊन आम्हा दोघींना,” आपले आप्पा देवाघरी गेले, आपल्याला ते पुन्हा कधीच भेटणार नाहीत” असे सांगितले. 

  आम्ही दोघींनी पटकन प्रश्न केला ,” मग आता उंबरगावच्या घरी कधी जायचे?”

 “आता कधीच नाही” मावशी म्हणाली. आणि आम्ही दोघींनी रडण्यास सुरुवात केली.. आप्पाही दिसणार नाहीत आणि उंबरगाव वाडीतही जायचे नाही याचा अर्थ आता आयुष्यातली सगळी गंमत गेली  एवढेच  बालमनाला समजले! पुढच्या खडतर भवितव्याची थोडी कल्पना आली.” ही आठवण ऐकून माझ्या डोळ्यात आलेले पाणी माझी अंध आई पाहू शकली नाही…

   मला वाटते देवाच्या दरबारात पोहोचल्यावर या अजाण मुलांच्या आप्पांनी  देवाला काय   विनवीले  असेल?

   “आता  माझ्या अजाण लेकरांची काळजी तूच घे..”

देवाने त्यांची ती अखेरची विनंती मान्य केली!

   ..आई आठ वर्षाची, मावशी सहा वर्षाची. माझी आई म्हणते, “लहानपणी ही छोटी बहीण इतकी सुंदर ,गोंडस दिसायची की  आप्पांनीच तिचं नाव गोंडू ठेवलं होतं! किती सुंदर आंणि गोड नाव! आजपावेतो दुसऱ्या कोणात्याही  लहान मुलीचं हे नाव असल्याचे माझ्या  ऐकिवात आलेले नाही! याच नावाने आपल्या आप्तगोतात आयुष्यभर  मावशी ओळखली गेली.   

इंदुमती (माझी आई ),चा सांभाळ करणारे नाना-नानी.

   कुटुंबावर कोसळलेल्या या आपत्तीचा सामना त्यांच्या काकांनी मोठ्या धैर्याने  केला. आपल्या मोठ्या भावाचे कुटुंब हे आपलेच कुटुंब आहे या भावनेने एक बंधू श्री. लक्ष्मण उर्फ नाना यांनी माझ्या आईचा स्वीकार केला तर दुसरे बंधू डॉ. दीनानाथ(भाऊ) यांनी गोंडू मावशीचा प्रतिपाळ करून दोघींचे विवाह होईपर्यंत त्यांना जपले. विवाहानंतरही त्यांचे लक्ष या दोघींच्या संसाराकडे होते हेही विशेष!

     आपल्या काकांच्या घरी घालविलेल्या त्या बालपणातील दिवसाबद्दल मला मावशी म्हणायची..

      ” अगदी लहान वयापासून, प्राथमिक शिक्षण व पुढे विवाह होईपर्यंत भाऊंनी  माझे प्रेमाने संगोपन केले. भाऊंनी त्या काळांत मला आश्रय दिला नसता, तर माझ्या आयुष्याचे मातेरे झाले असते! ‘मुलीला जन्म देणे हा आईचा व  तान्ह्या  बालीकेचाही ‘ घोर अपराध आहे’ अशा समजुतीच्या त्या कालखंडात ज्या दुर्दैवी मुलींचे पितृछत्रही हरपले त्या मुलींना आधार केवळ देवाचा. भाऊ व नाना देवाच्याच रुपाने आम्हाला भेटले. आपल्या मुलांपेक्षा भाऊंची बारीक नजर माझ्या अभ्यासावर, प्रकृतीवर असे. कारण मला वडील नव्हते. मी माझ्याच  घरांत राहते  असेच मला सदैव वाटले. संध्याकाळी, दवाखाना व इतर सार्वजनिक कामे संपवून व तेथून थकून भागून, घरी आलेले भाऊ आमच्याशी खूप हसत खेळत वागत असत. आमच्या खाण्यापिण्याची,अभ्यासाची, चौकशी करूनच झोपावयास जात. मी चांगल्या मार्काने  फायनल परीक्षा पास झाले. मला इंग्रजीचे शिक्षण हायस्कुलात न जाताही मिळाले याला कारण भाऊकाका  होते. भाऊ मला घरी इंग्रजी शिकवित असत. त्यामुळे मला शिक्षिकेची नोकरी  मिळाली. थोडे दिवस मी ती नोकरी केली मात्र त्या काळच्या चालीरितीप्रमाणे  लवकरच लग्न झाल्यामुळे ती नोकरी सोडली. मला भाऊंचा व त्यांच्या सर्व प्रेमळ कुटुंबाचा सहवासही सोडावा लागला. वसंत बंधू व रमेश दादा हे बालपणीचे माझे सवंगडी. सख्या बहिणीप्रमाणे त्यांनी मला आयुष्यभर मानले.” 

      डॉ.दीनानाथ बा.चुरी उर्फ भाऊ व सौ नर्मदा दि चुरी काकू. मावशीचा  सांभाळ केला.

    मावशीचे यजमान श्री. नारायणराव राऊत(अण्णा), मॅट्रिक पास झाले होते. त्या कालांतील हे मोठे शिक्षण होते. मुंबईत परदेशी विमा कंपनीत चांगल्या  नोकरीत होते. त्या काळातही मुंबईत स्वतःचे राहण्याचे निवासस्थान मिळविणे कठीणच होते. या दाम्पत्याची विरारमध्ये राहण्याची सोयही भाऊंच्यामुळेच झाली. ज्या ‘वर्तक विहार’  या परिसरात हे कुटुंब अखेर पर्यंत राहीले होते त्या इमारती कै.अण्णासाहेब वर्तक यांनी निर्माण केल्या होत्या. सामाजिक कार्यामुळे भाऊ व अण्णासाहेब यांची चांगली ओळख होती. केवळ भाऊंच्या शब्दाखातर अण्णासाहेबांनी तेथील एक खोली या नवविवाहित  दाम्पत्याला भाड्याने दिली. त्यावेळी आमच्या ज्ञातीतील, अनेक  कुटुंबे, वर्तक विहार परिसरात  निवासासाठी होती. कै. भाई मामा, पंड्या मामा( कै. पंढरीनाथ राऊत) ,कै.सखाराम म्हात्रे, कै.नानाजी राऊत, कै. जगन्नाथ राव चुरी, कै. विनायकराव चुरी ही आमच्या बोर्डी चिंचणी सफाळे परिसरातील मंडळी देखील वर्तक विहार मध्येच रहात. प्रत्येकाचे निवासस्थान वेगळे असले तरी प्रेम व जिव्हाळ्याच्या रेशमी धाग्यांनी  सर्व मंडळी एकमेकांशी जोडली गेली होती व तो एक आदर्श सहनिवास होता असे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो.

   त्या परिसरात पाच चाळी होत्या व प्रत्येक चाळीत आठ ते नऊ बि-हाडे  स्वतंत्रपणे राहात. प्रत्येकाला एक स्वयंपाकाची खोली व दुसरी बसण्याची खोली. समोर कॉमन व्हरांडा  एवढीच जागा होती. स्वयंपाक खोलीतच बाथरूम असे .पाण्यासाठी पूर्वेच्या टोकाला मोठी खोल विहीर व त्यापलीकडे सर्वांसाठी टॉयलेट्स होते. त्या दिवसात घरात नळ नसल्याने विहिरीचे पाणी शेंदून घरात भरून ठेवावे लागे. गृहिणीसाठी ही मोठी जिकिरीची बाब होती. त्यातही साधारणतः फेब्रुवारी मार्च महिन्यानंतर विहीरीतील पाणी अगदीच तळाला जाई, तेव्हा तर त्या बापड्या गृहिणींची  अवस्था काय होत असेल? या  परिस्थितीतही  मावशीच्या चौकोनी कुटुंबाखेरीज  नातलग मंडळी शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने, मुंबईत जागा नसल्याने मावशीच्या घरी मुक्कामास असत. आम्ही भाचे मंडळीही अधून मधून रविवारी तिच्याकडे जात असू .हा सर्व पसारा ती एकटी सांभाळत असे. त्यावेळी तिच्याकडे कोणी गडी माणूसही असलेले माझ्या लक्षात नाही. आज जेव्हा या सर्व परिस्थितीचा मी विचार करतो आणि या माऊलीने सर्वांसाठी उपसलेल्या कष्टांचा विचार करतो  तेव्हा माझी मान आदराने लवते ..”मावशी तू आम्हां सर्वांसाठी केलेल्या कष्टासाठी तुला आदराने  मनोमन नमस्कार .,”

       माझा पहिला रेल्वे प्रवास मी व अण्णा लहान भाऊ श्रीकांत अगदी लहान  असताना घडला  तो विरारपर्यंत. मुक्काम अर्थातच मावशीच्या विरारच्या घरी होता.नारू अण्णांना आप्पां विषयी खूप आदर वाटे. आम्ही कुटुंबीय त्या दिवसात ज्या बिकट परिस्थितीतून जात होतो त्याची संपूर्ण जाणीव त्यांना होती. त्याही परिस्थितीत आप्पांची निस्पृह व निरपेक्ष वृत्ती त्यांना भावत असे .आम्हा मुलांना बाहेर पडण्याची कोणतीच संधी नसल्याने, बाहेरील जगाची थोडी ओळख व्हावी या भावनेने, त्यांनी एका मे महिन्यात आप्पांना आम्हा दोघांस घेऊन चार दिवस विरारला येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांनी स्वतः दोन दिवस रजा घेऊन  आम्हाला  मुंबईत फिरवून राणीचा बाग व म्हातारीचा बूट दाखविल्याचे मला आठवते. त्या पहिल्या मुंबई भेटीची काही स्मरणचित्रे आजही माझ्या मनःपटलावर कोरलेली आहेत. कारण त्या बालवयात दिसलेला मुंबईचा भपका बोर्डीसारख्या  खेड्यात राहणाऱ्या आम्हा बालकांना खूप दिपवून गेला होता. ‘मुंबईत राहणारी असामी ही केवळ महान असली पाहिजे,त्याशिवाय मुंबईत राहणे शक्य नाही, आम्ही तर मुंबईत कधीच राहू शकणार नाही ..’,अशी काहीशी भावना त्यावेळी झाली होती. पुढे  कॉलेज शिक्षणासाठी मला बोर्डीबाहेर जाणे आवश्यक होते. त्याही वेळी मला आठवते, अण्णांनी आप्पांना एक पत्र पाठवून “तुमची इच्छा असेल तर दिगूला कॉलेज साठी  विरारला आमचे घरी ठेवा, मी सोय करीन ..”असे आश्वासनही दिले होते. मात्र आप्पांची तत्त्वे थोडी वेगळी होती . आपल्याकडून कोणाला त्रास होऊ नये या त्यांच्या धोरणाप्रमाणे त्यांनी मला सरळ साताऱ्याला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत कॉलेजला पाठविले होते. अण्णांची ती विनंती मान्य करता आली नाही. मात्र पुढे इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये वस्तीगृहात राहताना आम्हाला कधीतरी “आपले घर”, म्हणून पाहुणचार घेण्यासाठी दोनच घरे होती. आणि ती म्हणजे विरारच्या वर्तक विहारमधील मावशीचे घर व  भाई मामांचे घर. मागे म्हटल्याप्रमाणे तिच्या घरी गरजू आप्तेष्टांचा गोतावळा नेहमीच असे. पण त्याही परिस्थितीत मी कधी रविवारी सकाळी विरारला आलो तर सकाळचे मांसाहारी भोजन करून संध्याकाळी  निघताना मावशी स्वतः हाताला धरून विरार स्टेशनवर घेऊन जाई व  लोकलगाडीमध्ये  बसवून देई  . गाडीत बसतांना पाच रुपयाची नोट खिशात टाकीत असे. त्यावेळी जाताना रेल्वे रुळामधूनच वाट होती .त्यामुळे मावशीने कधीही मला एकटे जाऊ दिले नाही. त्या काळातही पाच रुपये खूप मोठी रक्कम होती पण त्या पैशाच्या किमतीपेक्षा मावशीचं प्रेम आणि जिव्हाळा लाख मोलाचा होता. मी हा जिव्हाळा  व प्रेम कधीच विसरलो नाही. पुढे बोर्डीत एकांतवासाचे जीवन जगत असताना आम्ही तिला भेटावयास जात असू व कृतज्ञता बुद्धी म्हणून काही पैसे हातावर ठेवीत असू. मात्र तिने त्याचा स्वतःहून कधीच स्विकार केला नाही. तेवढी ती स्वाभिमानी होती. कधीतरी जबरदस्तीने टेबलावरच पैसे सोडून येत असू. त्या पांच रुपयांच्या नोटांची आठवण करून दिल्यावर ती म्हणे..,

   ” अरे त्यात मी विशेष काय केले?तुम्ही शिक्षण घेत होतात, शिक्षणासाठी ती छोटी मदत होती..”

  आम्हा सर्वच भाचेकंपनीला तिच्याकडून अशी छोटी मदत प्रत्येक वेळी विरारला गेल्यावर मिळत असे. आम्हाला  आज कृतज्ञतापूर्वक  तिची आठवण येते. तिच्यासाठी आम्ही काहीच करू शकलो नाही ही खंत सतत राहील.

  कै.अण्णा व मावशी ,कै. भाई मामा व  मालती मामी यांचे लग्नाच्या 59 व्या वाढदिवस प्रसंगी अभिष्ट चिंतान करताना.

   कधी विरारला मुक्काम करावयाचा झाल्यास मावशीकडे गर्दी असल्याने मी भाई मामांच्या घरीही मुक्काम केल्याचे मला आठवते. भाई मामा व मालती-मामी खूप प्रेमळ माणसे होती. मामा म्हटले की माझ्या डोळ्यासमोर दोनच व्यक्ती डोळ्यासमोर येतात एक खंडू मामा दुसरे भाई मामा .प्रत्येक भाऊबीजेला या दोघांची बोर्डी फेरी हमखास होत असे. माझ्या आईकडून हे दोघेही भाऊ हमखास ओवाळून घेत. खंडू मामा दुर्दैवाने लवकर गेला आणि त्याच्याबरोबर  ‘भाऊबीज’ही गेली. मात्र भाई मामानी अगदी अखेरपर्यंत हा ‘बंधूधर्म’पाळला. शेवटी शेवटी त्यांना प्रवास करणे अशक्य झाले तेव्हा कोणामार्फत त्यांची भाऊबीज आईकडे येई! भाईमामा गेल्यानंतरच भाऊबीज संपली. आई लहानपणी नाना कडे ( भाई मामांचे वडील) राहिली असल्याने त्या दोघांचे बहीण-भावाचे नाते भाईमामांनी अखेरपर्यंत पाळले.. सख्या भावासारखे!!

वर..खंडूमामा,मामी(कडेवर छोटी प्रतीम),आक्का सह. खाली..खंडू मामा  ….दोन मुद्रा! 

      बहुदा सकाळी विरारला आल्यावर आमचे खेळ व मस्ती सुरू होई. सुरेंद्र व त्याची मित्रमंडळी विजय, प्रदीप, अवि-रवी, संजू ,राजू, हेमंत, विलास ( दुसऱ्याचे चेहरे डोळ्यासमोर येतात मात्र नावे आठवत नाहीत) जमा होत असे. कधी सकाळीच जीवदानी डोंगरावर चढाई करीत असू. जीवदानी मातेचे दर्शन घेऊन खाली उतरण हा एक मोठा विरंगुळा व आनंद होता. भूक लागलेली असे .त्यानंतर मावशीच्या हातचे सुग्रास जेवण घेणे ही तर मोठी मेजवानी होती.  आज सुरेंद्रही नाही व आमचे त्या दिवसातील काही सवंगडीही  कायमचे अंतरले आहेत. आहेत त्यांची भेटही क्वचित होते..

    असाच एके दिवशी मी सकाळी मावशीकडे आलो होतो. तिच्या स्वयंपाक खोलीच्या लगत मागील अंगणात, अण्णा  व त्यांच्या मित्रांचा पत्याचा (ब्रिज ) डाव रंगला होता.  रविवार असल्याने ‘ ड्रिंक’ चा आस्वादही मंडळी घेत होती. मला पाहून त्यांतील कोणीतरी अगदी सहज, गंमत म्हणून,” दिगू, आता तू कॉलेज कुमार झालास, ‘एक ग्लास’ पिऊन  बघायला हरकत नाही..” असे कांही म्हटले फक्त… आणि केवळ क्षणार्धात स्वयंपाक घरातून, दरवाजांत येऊन, चवताळलेल्या नागिणीने फणा उंच करून जोराचा फुत्कार टाकावा तशी मावशी म्हणाली ” खबरदार, पुन्हा त्याला असे विचारले तर.. त्याला अजून खूप अभ्यास करावयाचा आहे!” एवढे बोलून ती पटकन स्वयंपाक घरात निघूनही गेली. काही क्षण एकदम स्तब्धता पसरली.. ‘कम्प्लीट सायलेन्स’.. तेथेच सुरजी (सुरेंन्द्र) ही  होता. तो  म्हणाला  “आई कोणी गमतीत बोलले असतील ग, त्यात काय एवढे रागवायचे?..”

   त्याला गप्प करीत मावशी म्हणाली,”  गमतीतही असे विचारालेले  मला आवडणार नाही.  तू अजून लहान आहेस!!”

  आम्ही दोघेही त्वरित स्वयंपाक घरातून व्हरांड्यात निघून आलो.

 मावशीचे ते शब्द,”.. त्याला खूप अभ्यास करावयाचा आहे..”, का कोण जाणे माझ्या हृदयाला स्पर्श करून गेले. अंतःकरणावर कोरले गेले. माझा संपूर्ण अभ्यास पूर्ण होऊन  नोकरीस लागेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मद्याला मी स्पर्शही केला नाही. प्रलोभने येत मात्र तो प्रस॔ग व मावशीचे ते तळमळीचे शब्द आठवत… आपल्यावर मनापासून प्रेम करणारी ,आपले भले इच्छिणारी व्यक्ती  मोठा संस्कार किती  सहज करून जाते, याचे माझ्या आयुष्यातील हे बोलके उदाहरण.. हा प्रसंग  सुरजीच्याही (सुरेंन्द्र) कसा लक्षात राहिला  त्याचाही संदर्भ पुढे सांगणारच आहे.

                   सुरेंद्र व माधुरी. “बालपणीचा काल मजेचा..”

         सुरजी एक अत्यंत हुशार, लाघवी आणि प्रतिभावान मुलगा होता . त्याला खूप उज्वल भवितव्य होते. मला तो भावापेक्षा माझा खास मित्र म्हणून खूप जवळचा होता.  आमच्या वयात दोन तीन वर्षांचे अंतर असेल. मी विरारला गेल्यावर अथवा तो सुट्टीत बोर्डीस आल्यावर आमच्या भेटी होत.  गप्पा रंगत.1961 च्या ऑगस्ट महिन्यांत तो अचानक गेला. शालेय जीवनात अत्यंत हुशार म्हणून गणला गेलेला हा दोस्त थोडा आजारी झाला. अभ्यासाचे नुकसान झाले ते त्यांने जीवाला लावून घेतले असावे..  अचानक एक दिवस सर्वांना सोडून तो गेला.. पिंजऱ्यातून पक्षी कसा उडून गेला कुणालाच कळले नाही.  त्या दिवशी मी दादरच्या पूज्य तात्यासाहेब चुरी वसतिगृहात राहत होतो. ही बातमी कळण्यास मला उशीर झाला. मी त्याचे अंत्यदर्शनही घेऊ शकलो नाही. मावशीला भेटण्याचे धारिष्टही मला झाले नाही. बोर्डीला गेल्यावर  तिला भेटण्यास गेलो .तिचा आक्रोश पहावत नव्हता .तिचे सांत्वन कोण करू शकणार? मला गोविंदाग्रज   कवींच्या दोन ओळींची त्याप्रसंगी आठवण झाली..

   ” ते हृदय कसे आईचे,मी उगाच सांगत नाही!

     जे आनंदे ही रडते, दुःखात कसे ते होई?”

 लेकाचे कौतुक करतानाही जिच्या डोळ्यात पाणी येते, ते मातृहृदय लाडक्या लेकराच्या वियोगाने किती विदीर्ण  होत असेल?.. कवीलाही… शब्दप्रभू गोविंदाग्रजही त्याचे वर्णन करण्यास धजत नाहीत  तर आपण बापुडे  कोण? मी निशब्द बसून डोळे गाळीत थोडावेळ बसलो व  मावशी अण्णांना वंदन  करून बाहेर आलो.

   सर्व मानवी संवेदना बधीर करणारीच ती घटना  होती.   ‘काळ’ हेच त्यावर औषध!!

    मी माझ्या प्रेमळ मित्राचे अंत्यदर्शन नाही घेऊ शकलो. पण  मृत्यू आधी केवळ दोन महिने त्यावर्षीच्या मे महिन्यात त्याची व माझी भेट बोर्डीला झाली होती. ती भेट आधीच्या भेटीहून  अगदी वेगळी ठरली . त्या भेटीतील आम्हा दोघांमधील संभाषणाचे जेव्हा मी आज विश्लेषण करतो तेव्हा काही गोष्टींचा संदर्भ लागतो.थोड्याच दिवसांत  येणाऱ्या एका भीषण वास्तवाची चाहूल त्याच्या अंतर्मनाला लागली असावी असे वाटते! त्या मे महिन्यात तो बोर्डीस आला असता एके दिवशी संध्याकाळी खास वेळ काढून, मला समुद्रावर फिरण्यास घेऊन गेला.  नेहमी आम्ही समुद्रकिनारी चालता चालता गप्पा करीत असू. मात्र त्या दिवशी त्याने  मला किनाऱ्यावरील वाळूवर  बसवून “थोड्या गप्पा करूया” असा आग्रह केला. समोर सूर्यबिंब अस्तास जात होते. मात्र पुढच्या दोनच महिन्यात माझ्या शेजारीच बसलेला हा “मित्र” असाच अचानक अस्तंगत होणार आहे याची जाणीव मला नव्हती.. त्याला कुठेतरी ती असावी!!  बराच वेळ आम्ही मनापासून गप्पा केल्या. नेहमी काही हलक्या फुलक्या विषयावर बोलून वेळ घालवित असू. त्या दिवशी सुरेन खूपच गंभीर झाला होता. भविष्यातील घटनांची चाहुल घेत होता. त्याला एक मोठाआर्किटेक्ट व्हावयाचे होते. ते स्वप्ने कसे पूर्ण होणार याची त्याला  काळजी वाटत होती. प्रकृतीची साथ नव्हती. मनाने खचला होता. मात्र मला तो पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देत होता. नुकताच मी साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेतून,’काम करा आणि शिका’, या योजनेतून दोन वर्षे शिक्षण घेतले होते. पुढील शिक्षण ही तसेच कष्टमय असणार होते,याची जाणीव त्याला होती.

  ” काहीही झाले तरी पुढील शिक्षण सोडू नकोस. त्यादिवशी माझ्या आईने सांगितलेले वाक्य ” त्याला खूप शिकायचे आहे..” हे विसरू नकोस याची जाणीव  त्याने मला करून दिली. स्वतःचे  स्वप्न कसे पूर्ण करता येईल यापेक्षा माझे शिक्षण कसे अखंडित पुढे राहील याचीच त्याला चिंता वाटत होती. आज तो असे का बोलतो आहे याचाही मला थांग लागेना. हे काहीतरी वेगळेच चालले होते..मी त्याला धीर देत होतो.आणि  तो मला… त्यादिवशीचा सहज घडून गेलेला तो एक प्रसंग व मावशीचे तोंडून उत्स्फूर्तपणे निघालेले ते उद्गार , त्याच्या लक्षात का राहावेत हे मला त्या दिवशी जरी कळले नाही, तरी आता त्याचे संदर्भ लागतात … कारण दोनच महिन्यात तो हे जग सोडून माझ्यासाठी सद्भावना ठेवून गेला..!

   आम्ही  परतीच्या वाटेवर चालू लागलो.  सूर्य अस्ताला गेला होता. हळूहळू अंधार पडू लागला होता….. ती आमची शेवटची भेट ठरली.  सुरजीने मला दिलेल्या त्या शेवटच्या शुभेच्छा होत्या! अजूनही संपलेल्या नाहीत! अजूनही कधी बोर्डीच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरावयास गेलो तर एकटाच त्या जागी वाळूत बसून अस्ताचलाकडे जाणाऱ्या त्याच सूर्य बिंबाकडे पाहत मनातल्या कप्प्यातील आठवणी बाहेर काढत एकटाच त्याच्याशी बोलतो. तो आजूबाजूला नसतो पण त्याचे शब्द कानाशी रुंजी घालतात !!

  परमेश्वराने त्याला थोडे अधिक आयुष्य  द्यायला हवे होते. तो निश्चित एक ख्यातकीर्त वास्तुविशारद झाला असता.. पण देवाच्या दरबारी तो हवा होता.. कारण, 

“जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला!

 ..पायाखाली त्याच्यासाठी, देव अंथरी नीज हृदयाला..”

       सुरेन त्याच्या वयाच्या मानाने सर्वच बाबतीत खूपच प्रगल्भता दाखवी.  आम्ही इतर सर्व  मावसभावंडे बोर्डीत रहात असल्याने आमचा वावर नेहमीच आजोळी असे त्यामुळे आमचे कोणाला फार कौतुक नव्हते .पण सुरेंद्र-माधुरी आजोळापासून दूर असल्याने कधी सुट्टीत आल्यावर साहजिकच  त्यांचे खूप कौतुक होई, लाड होत. ते अगदी स्वाभाविकच होते. ही दोन मुले  खूप गुणी होती. घरी संपन्नता असल्याने त्यांना काही  ऊणे नव्हते .तृप्त असत. या उलट आम्ही आजीकडे आशाळभूतपणे पाहत असू. आक्का, मावशी त्यांच्यावर खूप प्रेम करीत. विशेषतः सुरेंद्र त्यांचा जीव की प्राण होता. तो सुट्टीत येणार आहे कळल्यावर त्याच्यासाठी  काय करावे किती करावे असे या दोघींना होई! मात्र एवढा लाडवलेला असूनही तो कधीही कोणाशी उद्धटपणे, ऊर्मटपणे वागल्याचे कोणालाही आठवणार नाही. त्याचे वागणे सर्वांशी सौजन्याचे व नम्रतेचे असे. त्या बालवयातही, आपल्याला मिळालेला खाऊ तेथे असलेल्या दुसऱ्या भावंडाबरोबर वाटून खाण्याचा त्याचा स्वभाव खूप वेगळा होता .वयाच्या मानाने खूपच प्रगल्भ होता . त्याचे जाणे मावशी-अण्णा साठी व आम्हा सर्व भावंडासाठीही नियतीचा एक जबर तडाखा होता. या गुणी नातवाचा विरह दोन्ही आजी-आजोबांनी, कसा सहन केला असेल परमेश्वरच जाणे.

      आमच्या आप्पांनी अण्णांना पाठवलेल्या सांत्वन  पत्राला उत्तर म्हणून अण्णांनी पाठवलेले पत्र माझ्या वाचनात आले होते. त्यांतील  एक ओळ मी विसरलेलो नाही.अण्णांनी लिहिले होते     “वामन भाऊजी, झाले ते वाईटच. मला सध्या  नीट झोप लागत नाही. मात्र संत वचनावर माझा विश्वास आहे,

     “ठेविले अनंते तैसेची रहावे…मी माझ्या एकुलत्या लाडक्या लेकाविना आयुष्यभर राहावे, अशीच  ईश्वरेच्छा असेल तर तसेच होऊ दे. मी तसे राहण्याचा प्रयत्न उर्वरित आयुष्यात करीन..” अण्णांच्या अध्यात्मिक उंचीची ओळख या वरून व्हावी. 

वर ..तेजा- माधुरी मावशी सोबत.
खाली.. (डावीकडे) तेजा ,(उजवीकडे) स्वाती या लाडक्या नातीं सोबत मावशी.

     दादा गेला पण कन्या माधुरीने मुलगा व मुलगी ही दोन्हीही नाती अत्यंत जबाबदारीने व कसोशीने पाळली. जामात शंकरराव थोरात यांनी माधुरीला आई-वडिलांप्रती सर्व  कर्तव्ये  पार पाडण्यास सर्वतोपरी, सर्व प्रकारचे सहाय्य केले. या उभयतांच्या संवेदनाशीलतेमुळेच मावशी आपले शेवटचे दिवस अत्यंत सुंदर सेवाभावी वातावरणात घालवू शकली. कधीही आम्ही गेलो तर शंकररावांना तोंड भरून आशीर्वाद देई. माधुरी म्हणजे गोंडू मावशीचे जणू प्रतिबिंब आहे. रूपानेही व गुणांनीही!! आई सारखाच  साधा, सरळ, सोशिक , सात्विक स्वभाव . कधीही आवश्यक तेवढेच व तेव्हाच बोलणारी मृदुभाषी. पण कोणी बोलावयास भाग पाडले तर तितक्याच तडफेने थोड्याच शब्दात समोरच्याला गप्प करणारी! परमेश्वराने एकुलता  मुलगा हिरावून घेऊन मावशीवर अन्यायाच केला.  मात्र अशी गुणी मुलगी पदरात टाकून  त्या अन्यायाचे थोडे परिमार्जनही केले, असे मला वाटते!.. तिच्या अमेरिका स्थित,उच्च विद्या विभूषित, दोन लेकींचेही( स्वाती व तेजा उर्फ बनी) आपल्या आजीवर जीवापाड प्रेम. भारतात आल्या असताना आजीशी होणारे त्यांचे संभाषण मी  ऐकले आहे. तिची धाकटी  लेक तेजाने या लेखातील काही सुंदर छायाचित्रे आठवणीने मला पाठविली आहेत.

    अरुणची (भाचा),लेक ओजस्वी च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना मावशी.

    मावशीच्या लाडक्या लेकीला माधुरीला, आपल्या आई बद्दल काय वाटते?.. ..

         ” माझी आई अतिशय प्रेमळ, मनमिळावू, कर्तव्यदक्ष आणि खूप जबाबदारीने वागणारी बाई होती. ती माझीच नाही तर वर्तक-विहार मधील सर्वांचीच आई होती. आईने आयुष्यभर कोणाचाच राग व मत्सर केला नाही. अण्णा घरातील सर्वात मोठे भाऊ असल्याने अण्णा-आईने लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात सर्व एकत्र कुटुंबांचे आनंदाने व जबाबदारीने केले. तिच्या माहेरच्या नात्यातील गरजू व्यक्तीसाठीही तिने आनंदाने मदत केली . मात्र कोणाकडूनही कसलीच अपेक्षा ठेवली नाही .मला माझ्या आई-अण्णांचा खूप अभिमान आहे. अण्णांच्या निधनानंतर आम्ही आईची काळजी घेत होतो. त्याचवेळी आम्ही बोर्डीस नवीन घर बांधले . थोड्या वर्षानंतर वृद्धापकाळमुळे तिला बोर्डीला एकटे ठेवणे आम्हाला कठीण वाटू लागले. आम्हाला आमच्या मुलीकडे परदेशात तसेच माझ्या सासरी, ओतूर, पुणे, येथे जावे लागायचे. त्यामुळे मी तिला माझ्या घरी ठेवू शकत नव्हते.  सारासार विचार करून व तिचीही  समजूत घालून,  तिला वृद्धाश्रमात ठेवायचे नक्की केले. आमच्या चांगल्या ओळखीची, माझी मैत्रीण असलेल्या स्मिता जोशी हिच्या वृद्धाश्रमात आम्ही तिला ठेवावयाचे ठरविले. तिचा पुण्यातील भूकूम या गावी ‘संजीवन वृद्धाश्रम’ आहे. तिथे उत्तम सोय करण्यात आली. जवळजवळ दहा वर्षे ती अतिशय आनंदाने समाधानाने तेथे राहिली. तेथील सर्व आया, मावश्या, डॉक्टर्स, नर्स तिची खूप काळजी घ्यायच्या.आम्ही पण नेहमी जात असू. स्वाती,बनी या माझ्या दोन्ही मुलींचे तिच्यावर खूप प्रेम होते. प्रत्येक वेळी अमेरिकेतून आल्यावर आजीला भेटणे व तिच्याबरोबर वेळ घालविणे हे दोघींचे ठरलेले असायचे. आपली प्रेमळ आजी आता भारतात गेल्यावर आपल्याला भेटणार नाही या कल्पनेने त्यांनाही खूप दुःख झाले आहे. पण शेवटी नियतीपुढे कोणाचे चालणार? अशी माझी अतिशय देवभोळी व धार्मिक आई होती. नेहमी तिच्या तोंडी देवाचे नाव असायचे. माझ्या प्रेमळ व समाधानी आईला 10 सप्टेंबरला शांतपणे वेदनारहित ,आम्ही दोघं तिच्याजवळ असताना मरण आले. खरोखरीच ती आनंदाने अनंतात विलीन झाली.आईची उणीव तर कायमच जाणवत राहील .तिच्या आत्म्याला शांती लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.”

   लाडक्या लेकीने अगदी थोड्या शब्दात आईचे केलेले वर्णन तिच्या पारदर्शक व सरळ स्वभावासारखेच सुंदर!

    आमची मावशी सरळसाधी, पापभिरू आणि सर्वांशीच आपलेपणाने वागणारी होती. आपल्या वैयक्तिक सुखदुःखांचा कोणालाही तिने त्रास होऊ दिला नाही. प्रत्येक प्रसंगी तिचा प्रतिसाद नेहमी सकारात्मक असे. अगदी हेतुरहित, स्वाभाविक असे तिचे वागणे बोलणे असे. असे वर्तन खूप कठीण असते. कारण ते हेतूरहित, निस्वार्थी असते. अशा माणसाच्या अंतःकरणात समाधानाचा एक सात्विक झरा नेहमी वाहत असतो. अशा वागण्याला ज्ञानदेवांनी ‘नैतिक’ संबोधले आहे.  

    ‘म्हणौनि जेजे उचित, 

  आणि अवसरे करुनी प्राप्त

  ते कर्म हेतुरहित, आचरे तू! 3/78 ‘

       ह्या उलट अण्णा  अगदी साधेसुधे व भोळ्या स्वभावाचे होते. व्यवहारी वागणे त्यांना जमले नाही. आपल्या भोवतालची सर्वच माणसे आपल्यासारखी साधीसुधी सरळ आहेत असेच गृहीत धरून त्यांचे व्यवहार असत. कोणीही त्यांना  चुकीचा सल्ला देऊन त्यांचे कडून सहज फायदा घेऊ शकत असे. त्यांच्या या वृत्तीमुळे दुर्दैवाने त्यांना स्वतःला व त्यांच्या कुटुंबाला पुढे खूप मनस्ताप सोसावा लागला . सर्वांचे भले  करण्यासाठी आयुष्यभर झगडलेल्या अण्णांच्या पदरी शेवटी निराशा आली. त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. शेक्सपियरने  एका काव्यात  म्हटल्याप्रमाणे,

   “The worst weather is not worse than being subjected to men’s falsehood and ingratitude”.. ज्यांच्यावर उपकार केले त्या मित्रांकडून फसविले जाणे यासारखे दुसरे दुःख माणसाला नाही. “

         या जगात निव्वळ चांगुलपणा उपयोगी नाही. त्याला व्यवहार चातुर्याची जोड हवी. शंभर टक्के शुद्ध सोने दागिने बनविण्यास कामास येत नाही. असो.

         परिस्थितीशी तडजोड करीत , प्राप्त परिस्थितीत समाधान मानीत, परमेश्वराचे गुणगान करीत त्याचा  कौल शिरोधार्य मानित मावशी जगली. तिच्या या अद्भुत मनोवृत्तीचा अनुभव माझ्या एका पुणे वृद्धाश्रम भेटीत आला.. …

आश्रमात वाचनासाठी मावशी जवळ जी धार्मिक पुस्तके होती, त्यात “औदुंबराची छाया”,आप्पांच्या(आमचे वडील)आठवणीवरील पुस्तकही होते. मोठ्या कौतुकाने ती आम्हाला त्यातील  गोष्टी सांगत असे!

     पुण्यातील हा वृद्धाश्रम महाराष्ट्रातील काही उत्तम आश्रमापैकी आहे असे मला वाटते .मावशी तेथे असेतोवर अनेक वेळा मी कधी सकाळी  दुपारी तर कधी  संध्याकाळी ही तिला भेटण्यास गेलो आहे. प्रत्येक वेळी तेथील सेवक वर्ग अत्यंत अगत्यशीलपणे स्वागत करीत व तेथील वृद्धांची देखील मनोभावे सेवा करीत असेच माझ्या निदर्शनास आले आहे .ती दुपारची  वेळ असावी.  उन्हे तापली होती. आणि कोंबड्याची बांग पलीकडून ऐकू आली. मला गंमत वाटली. मी मावशीला म्हटलं “मावशी हे आरवणे तुला बोर्डीची आठवण करून देत असेल नाही”? मावशीने काय सांगावे? म्हणाली,

    “अरे काय सांगू, हे कोंबड्याचे आरवणे मला आमच्या लहानपणीच्या वेवजी (उंबरगाव) च्या घराची आठवण करून देते. आमच्या घरी आप्पा-आक्काने खूप कोंबडी पाळली होती. आम्हाला घरचे मटण व अंडी खावयास मिळत.  पहाटेस कोंबड्याची बांग ऐकू येई.  आमचे आप्पा त्या पहाटेच्या सुमारास उठून वाडीत फेरी मारण्यासाठी तयार होत. आप्पा उठण्याची आम्ही दोघी मी व ताई, (माझीआई) वाट पाहत असू.  वाडीत फिरताना  आप्पा मला खांद्यावर घेऊन व ताईला हाताने धरून वाडीभर फिरवत.  येताना वाडीच्या एका टोकाला सुरू असलेल्या उसाच्या गुऱ्हाळात नेऊन एक ग्लास उसाचा गोड रस देत. त्याची आम्हाला एवढी चटक लागली होती की कोंबडा आरवतो कधी, आप्पा उठतात कधी, आणि आम्ही त्यांचे बरोबर त्या पहाटेच्या सुंदर  प्रशांत प्रसन्न वातावरणात त्यांच्या बरोबर बाहेर निघतो कधी,असे होई. खरंच सांगते, हा कोंबडा आरवला की डोळ्यासमोर ते वेवजीचे  छोटे पण टुमदार घर ,त्या निवांत निसर्ग रम्य खेड्यातील त्या सुंदर पहाट वेळा आठवतात .. आप्पांचं आम्हा दोघीवरील प्रेम आठवतं . “मी आता थोडे दिवसाचा सोबती आहे, नंतर माझी सहा लेकरं देवाच्या हवाली..” ही जाणीव त्यांच्या अंतर्मनाला कुठेतरी टोचत असणार.. “

     वयाच्या शंभरीत आलेल्या या वृद्धेला दुपारच्या वेळची एका कोंबड्याची बांग आपल्या बालपणीच्या रम्य दिवसांची आठवण करून देते, आपल्या लाडक्या अल्पायुषी पित्याच्या कडेवर बसून  निसर्ग सौंदर्याचा घेतलेला आस्वाद आठवतो…वृद्धाश्रमातील त्या एकांतवासात मनाला प्रसन्न ठेवण्याची जादूची कांडी तिला  प्राप्त होते.. खेद नाही खंत नाही..  याला काय म्हणणार ? सामान्य माणसाची  स्थितप्रज्ञता  ती हीच का? मावशी तू तुझ्या बालपणी रूपाने  गोंडस होतीस पण वृद्धपणी देखील तुझ्या मनोभावना किती सुंदर स्वच्छ निरामय होत्या ! आम्ही तुझी भाचरे खरेच भाग्यवान,अशी जगावेगळी मावशी आम्हाला मिळाली!!

हाच तो पुण्यातील आलिशान वृद्धाश्रम. इथेच मावशीने अंतिम श्वास घेतला..

    कै.  सखाराम म्हात्रे  व  कै. भीमाबाई म्हात्रे हे विरारला वर्तक विहार मध्ये मावशीचे सख्खे शेजारी.(आजचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ॲड.प्रदीप म्हात्रे यांचे माता पिता.) त्यांच्या कन्या  सौ. नंदिनी पाटील ,वसई यांना मावशीच्या कुटुंबाचा खूप जवळून परिचय झाला. मी सौ.नंदूताईला मावशीच्या काही आठवणी सांगण्याची विनंती केली. त्या सौ.नंदू ताईच्या शब्दात ..

        विरार पूर्व रेल्वे फाटकाजवळ वर्तक विहार ही आमची सुसज्ज ,विस्तीर्ण जागेतील आकर्षक चाळ( नव्हे सुसंस्कृत, सुशिक्षित, सर्व जाती धर्मीयांची वसाहत) होती. आम्ही मुले अशा सुंदर वातावरणात शिकलो मोठे झालो. ज्या क्षेत्रात कार्यरत झालो तेथे रमलो. मनापासून सेवा केली.

माझी आई भीमाताई , माधुरीची आई गोंडू मावशी, अवि-रवीची आई गंगू मावशी. आमची बिऱ्हाडे क्रमाने लागून होती. म्हणायला वेगळ्या खोल्या पण छत एकच!!

इथे मी पाहिलेली लाख मोलाची गोष्ट म्हणजे या तीन जीवाभावाच्या मैत्रिणींचे मैत्र!  त्यांच्यात कोणताच मतभेद झाला नाही, स्पर्धा नाही ,नाही हेवादावा!

गोंडू मावशी (डावीकडे), गंगू मावशी (उजवीकडे वर), भीमा मावशी (उजवीकडे खाली) . सात्विकतेचा त्रिवेणी संगम!

सदैव फुला पानांसारख्या एकजीव होऊन जगल्या .त्या काही साधू संत नव्हत्या. त्यांना हे कसे सहज हे साध्य झाले? याची  खरी जाणीव माझी आई गेली तेव्हा प्रकर्षाने झाली! मी त्यांच्या निरपेक्ष सहवासाची साक्षीदार होते.

या तिघींकडे येणाऱ्या प्रत्येकीच्या बहिणींनी ,भावांनी तिघींनाही तितकेच  प्रेम दिले. मावशीकडे खंडू मामा, कृष्णा काका, हे दोघे त्यांचे लग्न संसार सुरू होईपर्यंत राहत होते. अधून मधून भारत काका येत असे. मावशीच्या प्रेमाच्या आधारात त्यांना समाधान होते व त्यांचे करण्यात मावशीलाही आनंद मिळत होता. तिचे घर सुखात होते. पै पाहुणे तिच्याकडे सदैव चालू असायचे.

   एका प्रसन्न क्षणी अण्णा मावशी व छोटी माधुरी

‘वर्तक विहार’ चा मोठा परिवार मावशीने आपल्या स्नेहाने अवतीभवती जमा केला. जणू काही,’ मी तुम्हा सर्वांची, तुम्ही सर्व माझे’ !हे तिने कसे केले ? खरंच हे अवघड आहे!

संध्याकाळी सगळी मुले खेळून दमली भागली की मावशीच्या घरात त्यांना  पिण्यासाठी  स्वच्छ मडक्यातील थंड पाणी तयार असे. टेबलावर डब्यात पानगीचा खाऊ असे. प्रत्येक जण जाता येता सहज तोंडात एक तुकडा टाकत असत. नीला मामी, पंकज ची आई निर्धास्तपणे शाळेत जात असे.मावशी आणि सारा परिवार तिच्या मुलांची काळजी घेत.

होळीच्या दिवशी मोठ्या पटांगणात, आमच्या लांब सरळ ओटीवर सर्व सान थोर मंडळी एकत्र येत. सर्वांना कुटुंबाप्रमाणे जोडणारा मोठा दुवा म्हणजे माझी मावशी!

आम्ही मुली तुळशीचे लग्न मावशीच्या घरीच करत होतो. सर्व तयारी मावशीच करायची. प्रसाद, पूजेची तयारी, चहा पाणी ,मग मंगलाष्टके.. आनंदी आनंद गडे ..हे सारे मावशीच्या उत्साहाने प्रतिवर्षी साजरे होत असे.

आई आणि मावशी महिला मंडळात जात असत.सगळे कार्यक्रम सहली यात भाग घेत. जी सुधारणा आली ती त्यांनी स्वीकारली. पोशाख ही बदलला.नऊवारी साडी ऐवजी सुंदर पाचवारी नेसू लागल्या.

पण सुरेन दादाचं आजारपण आणि नंतर त्याचा मृत्यू हा तिच्या शांत सुंदर सात्विक जीवनावर मोठा आघात होता. माझ्या आईने तिला कसा किती धीर दिला आणि ती त्यातून कशी  सावरली अजूनही मला कळलेले नाही? मावशी संपूर्ण ‘वर्तक विहार परिवारा’ची प्रेमळ आई झाली. तिच्या दुःखाचा तिने आमच्यासमोर कधीही देखावा केला नाही. मुकाट सहन करीत राहिली. 

माझी मोठी बहीण कुमुद दीदी हिचे लग्न गावी झाले. मावशी, दादा गेल्यामुळे लग्नाला आली नाही. आमच्या घरी दीदी चे लग्न चालू असताना, इथे विरारला मावशी, देवासमोर दिवा लावून तिच्यासाठी प्रार्थना करत होती. आपले दुःख बाजूला ठेवून आमच्या सुखासाठी प्रार्थना करणारी मावशी आम्हाला मिळाली हे आमचे केवढे मोठे सदभाग्य?

           मावशीची देवभक्ती खूपच श्रेष्ठ होती. सर्वांच्या सौख्यासाठी ती देवाला आवाहन करी. त्यात प्रेम, सेवा, जिव्हाळा होता.

मावशी तुझ्या आठवणी

सोनचाफ्याच्या ,बकुळीच्या फुलासारख्या.. त्यांचा सुगंध

मनी सदैव दरवळतो..

श्रावण महिना– एकादशीच्या पवित्र दिवशी तू स्वर्गवासी झालीस.

एक खंत कायम मनात…..

तुझी वर्तक विहारची मुले तुझ्यापासून दूर राहिली. काहीच करू शकलो नाही..

मात्र एक समाधान आमच्या सर्व मुलांच्या मनात आहे. माधुरी आणि थोरात भाऊजींनी मावशीची खूप काळजी घेतली .माधुरीच्या संपूर्ण थोरात कुटुंबाने तिची प्रेमाने देखभाल केली. म्हणूनच तिला निरोगी दीर्घायुष्य लाभले.

माझ्या आदरणीय मावशीला श्रद्धापूर्वक भावसुमने अर्पण करते. मावशीच्या पवित्र स्मृतीला  विनम्र अभिवादन!”

       नंदू ताईंच्या या आठवणीतून मावशीच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूवर विशेषतः सर्व परिवारालाच आपले मानण्याच्या भावनेवर प्रकाश पडतो व त्याचबरोबर त्या काळांतील ‘ वर्तक विहार’ मधील ते सहजीवन आता पुन्हा कधीच पहावयास मिळणार नाही याची खंत ही होते!

  आमची आई, मावशी व  सासुबाई ‘आ’,आमच्या घरी एका आनंदाच्या क्षणी..

       वर्तक विहारमधील श्री. पंढरीनाथ काशिनाथ राऊत उर्फ आमचे पंड्या मामा, हे देखील मावशीचे आत्येभाऊ व शेजारी.  मामा महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक . परिस्थिती बेताची.  त्यामुळे ओढग्रस्तीचा संसार. मात्र आज या सर्व भावंडांनी (पाच मुलगे व एक कन्या) उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन सर्वजण( दुर्दैवाने मोठा संजू आज जगात नाही) आपापल्या क्षेत्रात सुस्थितीत आहेत.  माझा मित्र व मामांचा धाकटा  चिरंजीव ललित एसएससी परीक्षेत गुणवत्ता यादीत येऊन पुढे आयआयटी मुंबई मधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी उत्तम प्रकारे मिळवीत, आयआयएम कलकत्ता येथून एमबीए केले. ललितने देशात व परदेशात मोठ्या अधिकारी पदावर कामे करून सध्या तो कॅनडामध्ये निवृत्तीचे जीवन जगत आहे. त्यांची  बहिण सौ. चारुलता वासुदेव सावे ही देखील उच्चशिक्षित असून तिने मावशीच्या  दातृत्वगुणाचा व मातृतुल्य प्रेमाचा स्वतः अनुभव घेतला आहे. आठवणी लिहिल्या आहेत .त्यातील काही अंश तिच्या शब्दात देत आहे.. 

     “माझ्या लहानपणापासून बालमनावर ठसलेल्या “तीन देवीयाॅ” म्हणजे माझी आई शकुंतला, आमची रमा मामी व आमची वर्तक विहार मधील गोंडू आत्या. या तिघींचे ,निर्मळ मन ,संस्कारी वृत्ती, धार्मिक सात्विक आचरण अशा अनेक गुणांमुळे मला या बालपणीही आदर्श वाटल्या व आजही त्या माझ्या आदर्श आहेत. लहानपणी गरिबीमुळे माझ्या वडिलांनी मला बालवाडीसारख्या शाळेत घातले नाही. माझ्यापेक्षा लहान मुली बालवाडीत जात त्यावेळी मला वाईट वाटे. मग मी बहुतेक वेळ आत्याची मुलगी माधुरी हिच्या बरोबर खेळण्यात घालवी. कारण त्यावेळी  तिच्या घरी जायला कोणाची परवानगी वगैरे घ्यावी लागत नव्हती..

   तिच्या घरी गेलो तर ती घरातील चपातीचा तुकडा अथवा पानगी भाकरीचा तुकडा खाणार का असे आम्हाला विचारी आणि आम्हालाही गरज असल्याने आम्ही ‘हो’म्हणत असू.आमच्या घरी रोजच काही चपाती भाजी वरण भात होईलच असे नव्हते .तिलासुद्धा याची जाणीव होती. त्यामुळेच ती आम्हाला प्रेमाने काहीतरी खायला देत असे. कधी कधी  माझी आई तिच्याकडे अगदी चार आणेसुद्धा उधार मागायला जायची. ते पैसे पगार झाला की आई तिला परतफेड करीत असे. तिचा आईवर विश्वास होता. सख्ख्या नसल्या तरी नणंद भावजयीचे निकोप प्रेम होते. ललित आणि मी जेव्हा कधी आत्याकडे जायचो तेव्हा आमचे मोठे भाऊ आमची मस्करी करायची,”चालली ही दोघे आत्याकडे चपाती खायला… “.ललितला व माझ्या इतर भावांनासुद्धा आत्याबद्दल आदर, प्रेम होते. आजही आहे. परिस्थिती सुधारल्यावर आमच्या आईने आपल्या परीने तिचे उपकार फेडले. पण कोणाचेही उपकार ऋण कधीही विसरू नये याची शिकवण आम्हाला दिली. आत्याने चाळीतील लोकांवर नात्यांतील लोकांवर व नात्यात नसलेल्या लोकांवरही खूप काही उपकार केल्याचे आम्ही पाहिले आहे.

    आम्ही मोठे झालो. आपापल्या मार्गाला लागलो. अण्णा रिटायर्ड झाल्यावर वर्तक विहार सोडून बोर्डीला आपल्या गावच्या घरी राहायला गेले. संपर्क कमी झाला परंतु कधीही बोर्डीला गेल्यावर आत्याला भेटायला मी आवर्जून जात असे. तिला खाऊ साठी कधी पैसे देत असे.  ती नको म्हणे पण त्यामुळे मला समाधान व आनंद मिळे. असेच  एकदा बोलताना मी तिला म्हटले. “माझा मुलगा मैत्रेय नेहमी म्हणतो सुट्टीत त्याचे मित्र गावाला जातात आपल्याला गाव नाही का ?” आमचे गाव बोर्डी, माझ्या यजमानांचेही गाव बोर्डी.  परंतु काही अंतर्गत कुरबुरीमुळे आम्हाला  बोर्डीला राहणे अशक्य होते. ते ऐकून आत्याने मला दिलासा देत म्हटले ” तू माझ्या घरी बोर्डीला त्याला घेऊन ये. दोन चार दिवस खुशाल रहा. मात्र जेवण तुमचे तुम्ही करून खा, कारण माझे वय आता 80 च्या आसपास. जास्त काम जमत नाही ” त्यामुळे माझा मुलगा मैत्रेय लहान असताना दोन-तीन वेळा मी त्याला घेऊन तिच्याकडे राहिले. त्यालाही आनंद झाला व गोंडू आत्या विषयी एक आदर , प्रेम निर्माण झाले. आम्ही या गोष्टी मुलांच्या कानावर घालतो, त्यांनाही समजणे आवश्यक आहे .कधी कधी आपले जवळचे नातेवाईक दूर लोटतात पण अशी दैवयोगाने भेटलेली माणसे उपयोगी पडतात त्यांना जपले पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे ही जाणीव ठेवणे आवश्यक असते.

    मी आत्याला एकदा तिची जन्मतारीख विचारली तर तिने  सांगितले,”ज्या दिवशी तिचे काका म्हणजे माझ्या वडिलांचे मामा डॉक्टर दिनानाथ चुरी यांचे लग्न झाले त्याच दिवशी माझा जन्म झाला .त्यामुळे आमच्या आजीला  (वडिलांची आई),  माझा राग आला. कारण माझ्या जन्मामुळे ‘सुयेर’आले हे एक व दुसरे म्हणजे मला एक मोठी बहीण होती व मी दुसरी मुलगी आले.  आजीने माझ्या आईला, अक्काला ,सांगितले,” ही जन्माला आली नसती तर बरे झाले असते..”. माझ्या जन्माने त्यांना आनंद झाला नव्हता. आत्याला ही गोष्ट पुढे कळली होती .पण गंमत बघा  आक्काच्या या सर्व मुलींना दीर्घायुष्य लाभले. 90 च्या वर सर्वांचे वय गेले. आजही तिची मोठी बहीण 102 वर्षाची आहे..गोंडू आत्या  98/99 वर्षांची होऊन गेली. इतर दोघी बहिणीही 97 व 95 वर्षांच्या आहेत.

    दरवर्षी तिच्या वाढदिवसाला मी आवर्जून फोन करीत असे. माझी आई 70 व्या वर्षी  देवा घरी गेली. त्यावेळी आत्यासुद्धा 80 च्या घरात असून धडपडत तिच्या अंत्यदर्शनासाठी विरारहून  दहिसरला आली होती. या दोघींचे खरेच एकमेकांवर खूप प्रेम होते. आत्या माझ्या नानांची सख्खी बहीण नव्हती तरी दरवर्षी गोंडूआत्या कडून भाऊबीजेला नाना ओवाळून घ्यायचे.  आम्ही दहिसरला गेल्यावरही ते चालू राहिले. खरेच आमचा वर्तक विहार हे खूप वेगळे प्रकरण आहे. वर्तक विहारचा आत्मा म्हणजे आत्याचे घर होते, आमचे विश्रामधाम होते हे आम्ही विसरणार  नाही. आमची आत्या एक उत्तम माणुसकीचे दर्शन, अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हटले तर गैर ठरणार नाही. परमेश्वर माझ्या गोंडूआत्याच्या पवित्र आत्म्यास सद्गती व चीरशांती देवो ही माझी प्रार्थना व भावांजली.”

   चारूचे  प्रांजल प्रकटन वाचून मावशीच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचे दर्शन होते!”आमची आत्या म्हणजे वर्तक विहारचा आत्मा होती ..”या एका वाक्यातच सारे आले!

       ज्या मावशीने एकेकाळी मातृतुल्य प्रेम दिले त्या मावशीची सेवा तिच्या पडत्या काळात आपल्या हातून थोडी तरी घडावी या हेतूने आम्ही तिला आमच्या घोलवडच्या घरी  आमच्या आईसोबत राहण्यासाठी काही दिवस बोलाविले होते. सुदैवाने त्याच सुमारास एके दिवशी  माझ्या सासूबाई श्रीमती कमल सावे (आ) देखील आमच्या घरी आल्या होत्या. या  तिघी आनंदात  आपल्या जुन्या आठवणीत रंगून गेल्या. ते त्यांच्या चेह-यावरील समाधान  पाहून आम्हालाही खूप बरे वाटले.  जुन्या आठवणी  निघाल्या म्हणजे माणूस आपले वय,  आपल्या व्यथा व्याधी सर्व विसरून  अलगद त्या जुन्या कालांत शिरतो.  मावशीने अधिक दिवस राहावे अशी आमचीही इच्छा होती. तिलाही तसे वाटत असावे. परंतु ती माऊली आमच्या मातोश्रींच्या सेवेत होणारी आमची धावपळ बघून, आमचे मनापासुन कौतुक करीत,”तुम्ही तुमच्या प्रकृतीचीही काळजी घ्या, सर्व आनंदात रहा”, असा आशीर्वाद देत आपल्या घरी व तिथून पुढे वृद्धाश्रमात रवाना झाली.  तिची सेवा जास्त काळ करू शकलो नाही याची खंत  कधीच जाणार नाही!

   आमची आवडती गोंडू मावशी गेली. सगळ्यांना  खूप प्रेम वात्सल्य आधार देऊन गेली. नशिबाने जे जे तिला मिळाले होते ते दोन्ही हातांनी उधळीत, स्वतः साठी काहीही न ठेवता,ज्यांना जेव्हा जेवढी गरज होती त्यांना ते देत गेली. स्वतःचे हात रिकामीच राहिले. त्याची खंतखेद तिला कधीच वाटली नाही. उलट सदैव आत्मसमाधानी राहिली. नशिबाने दुर्दैवाचे जबर तडाखे दिले तरी ते प्राक्तनही स्विकारले. जे घडत गेले ते शांतपणे स्विकारत राहिली आणि  दुसऱ्यांच्या आनंदातही नेहमी सहभागी झाली ! 

  भर्तृहरी म्हणतो त्याप्रमाणे, स्वतः काया-वाचा-मनसा शुद्ध अमृताने भरलेले, भवतालच्या  सर्वांना आनंद देणारे, दुसऱ्याचा कणाएवढा गुणही पर्वताएवढा मोठा करून सांगताना ,आपल्या हृदयात आनंद विकसित करणारे सज्जन जगात किती असतात? अगदी थोडे…आमची मावशी तशीच होती म्हणून सतत वाटत राहते ती “पुण्यपीयूष पूर्णा” होती!

(डावीकडे).. मावशी आपल्या लाडक्या मुक्या भावाबरोबर. (उजवीकडे) वृद्धाश्रमात मावशी आपल्या लाडक्या लेकीसह !

  पण गोंडू मावशी शेवटी माणूसच होती.. हा “दैवाचा खेळ”चालला असताना हृदयातला एक दुखरा कोपरा निश्चितच मनांतून कधीतरी खंत करीत असणारच… आतल्या आत आक्रंदन करीत असणार.. तिच्या अव्यक्त मनाचा सल काय असेल?  मला नाही नीट सांगता येणार. कै. सुधीर भटांच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो .आपण समजून घ्या.. ..

“मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते, कुठेतरी मी उभीच होते, कुठेतरी दैव नेत होते…”

 “वसंत आला माझ्या दारी,तरीही सुगंध मी घेतलाच नाही, उगीच का ताटवे फुलांचे, मलाच शिव्या शाप देत होते…. मलाच शिव्या शाप देत होते..!!

 या आमच्या प्रेमळ मावशीच्या स्मृतीला अंतकरण पूर्वक अनेक अनेक विनम्र प्रणाम आणि प्रार्थना

  “तुझे आशीर्वाद असेच आम्हा सर्वांवर पुढेही राहू देत, कारण तुझ्यासारखे पुण्यात्मे  जिवंतपणी जे देतात, मृत्युनंतर त्याहूनही खूप खूप देतात …” ओमशांती.

 लेखासाठी आठवणी पाठणाऱ्या सौ.माधुरी, सौ.नंदिनी पाटील, सौ.चारूलता सावे  व छान दुर्मिळ फोटो पाठवून लेखास शोभा आणणाऱ्या श्री. अरुण चुरी, कु.तेजा थोरात,सपना चुरी  यांचे मनःपूर्वक आभार.

    दिगंबर वा राऊत.