शांताराम ठाकूर, एक सच्चे सकारात्मक व्यक्तिमत्व!
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र ते सर्वांना शक्य होत नाही. कारण त्यासाठी लागते प्रचंड मेहनत, पडेल ते काम करण्याची तयारी, मान अपमान झेलण्याची मानसिकता, जीवनात आलेल्या कोणत्याही बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देण्याची तयारी व जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन! त्यानंतरच आपले स्वतःचे एक वेगळे विश्व निर्माण करण्याची ताकद व्यक्तीमध्ये येते. अशा व्यक्ती अपयशाने खचत नाहीत. यश मिळेपर्यंत सतत हार न मानता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राहतात!
कोणत्याही यशस्वी माणसाचा जीवनपट पाहिल्यावर उमेदवारीच्या त्या काळात त्यांनी केलेले खडतर परिश्रम, झेललेली संकटे आणि त्यातून वाट काढत शेवटी प्राप्त केलेले यश असाच क्रम दिसून येतो.
दातिवरे सारख्या आडवळणी, दळणवळणाच्या काहीही सोयी नसलेल्या पिण्याच्या पाण्याची ही उपलब्धता नसलेल्या गावात जन्मलेल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने व्ह. फायनल ची परीक्षा उत्तम प्रकारे पास झाल्यावर पुढे माध्यमिक शिक्षणासाठी रोज पाच किलोमीटर कच्च्या रस्त्यावरून पायपीट करीत, शिक्षण चालू ठेवले, शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली, पुढील उच्च शिक्षणासाठी आवड व गुणवत्ता असतानाही मुंबईत जाणे शक्य नव्हते म्हणून वसईच्याच टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबई महापालिकेतून शिक्षकी पेशाचा श्री गणेशा केला, आपल्या गावाला न विसरता, भावी आयुष्यात गावात पिण्याचे पाणी, माध्यमिक शिक्षणाची सोय, असे गावासाठी जे करता येईल ते करण्याचा चंग बांधून आपले गाव व परिसर एका नवीन उंचीवर नेऊन ठेवला …
आपल्या मृत्यूनंतरही आपल्या अथक उज्वल कामाचा ठसा जनमानसावर कायमचा ठेवून गेलेल्या कै.शांताराम भाऊ ठाकूर यांच्या विषयी मी लिहितो आहे। ..
तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या दातिवरे गावात शांताराम भाऊंचा जन्म 7 जुलै 1936 रोजी झाला. वडील रामचंद्र भास्कर ठाकूर शेती व्यवसाय करीत. जोडीला सुतार कामाचा जोडधंदा होता. दुधाचाही व्यवसाय होता. रामचंद्रभाऊ हे जरी सामान्य शेतकरी होते तरी अत्यंत स्पष्टवक्ते व अन्यायाची चीड असलेले असे व्यक्तिमत्व होते. गावातील कोणताही तंटाबखेडा गावातच सोडविला गेला पाहिजे ही त्यांची धारणा होती. ते स्वतः असे न्याय निवाडे गावात करीत. त्यांच्या न्यायाने लोकांना समाधान मिळे. आई रामीबाई ही जरी अशिक्षित होती तरी अत्यंत कष्टाळू, प्रेमळ व परोपकारी असा तिचा स्वभाव होता. “कोणतीही गोष्ट लबाडीने मिळविता कामा नये आपल्या मेहनतीने काय ते मिळवा..” असे आपल्या मुलांना तिचे सांगणे असे.या दांपत्याला सात अपत्ये होती. मोठा मुलगा भालचंद्र व त्यानंतरचा गजानन वडिलांना शेतीमध्येच मदत करीत. त्यानंतरच्या दोन मोठ्या बहिणी हिरू बाई सावे (मुंबई )व जानकीबाई पाटील( मथाणे), लवकरच लग्न होऊन आपापल्या सासरी निघून गेल्या होत्या. त्यानंतरचा एक बंधू अकाली देवाघरी गेला. सहावे अपत्य शांताराम म्हणजे आपले नाना. नंतरचा लहान भाऊ मोरेश्वर शिक्षकी पेशामध्येच होता.
अशा मोठ्या कुटुंबात वाढल्यामुळे नानांवर जन्मजात सर्वांशी जमवून घेत आपल्यापेक्षा दुसऱ्याचे हित प्रथम पाहण्याचे संस्कार झाले. वडील रामचंद्र बाबा यांचा स्पष्टवक्तेपणा, सभाधीटपणा आणि कष्टाळू वृत्ती बरोबरच,’ सामाजिक हित प्रथम’ अशा विचारांचा प्रभाव होता. नाना नेहमी म्हणत, “माझ्या आयुष्यात वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव खूप होता व त्याचा मला खूप फायदाही झाला”. अशिक्षित आईकडून घेतलेला सचोटी व प्रामाणिकपणाचा संस्कार देखील नानांनी आयुष्यभर ‘दागिना’ म्हणून मिरविला.
नानांच्या मनांत समाजसेवेची व परोपकाराची उर्मी कशामुळे निर्माण झाली असेल? मला वाटते परिस्थिती हीच प्रसंगी माणसाचा गुरु होते, अंत:प्रेरणा देते आणि एखादा सामान्य कुवतीचा माणूसही अविश्वसनीय अफाट कामे करून जातो. नानांकडे गुणवत्ता होतीच,बरोबर बालपणात मिळालेले आई-वडिलांचे चांगले संस्कार होते, मात्र बिकट परिस्थितीने वेळोवेळी केलेले आघात नानांना, दुसऱ्यासाठी काहीतरी करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जगणे, हे शिकविले व त्यातूनच पुढे कामाचा प्रचंड डोंगर उभा झाला!
शालांत परीक्षा व माणिकपूर ट्रेनींगकॉलेजातून घेतलेला टीचर्स ट्रेनिंग अभ्यासक्रम पूर्ण करून नानांनी मुंबई महापालिकेत शिक्षक म्हणून व्यवसायिक जीवनाला सुरुवात केली हे तर खरे, पण मुंबईत राहूनही आपला शिक्षकी पेशा सांभाळत दातिवरे गावाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांच्या सामाजिक योगदानाची सुरुवात वयाच्या केवळ पंधराव्या वर्षापासूनच झाली होती. दातिवरे-एडवण रस्ता तयार करण्यासाठी गावकऱ्यांनी आरंभीरलेल्या श्रमदानात नानांनी कामातून रजा काढून सतत 35 दिवस ते काम केले होते. तो रस्ता पक्का करून गावकऱ्यांना एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांच्या सार्वजनिक कामाची गंगोत्री तेथूनच सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही .गावातील युवकांचे,’ तरुण मित्र मंडळ’, गुरचरण जमिनीचा शेतीसाठी उपयोग होण्यासाठी सरकार दरबारी विनंत्या, गावाभोवती खारबंधारे बांधून शेकडो एकर जमीन शेतीसाठी उपयोगात आणणे, गोड्या पाण्याचे प्रवाह प्रभावित करणे, दातिवरे अर्नाळा फेरी बोट सुरू करणे, गावात नळ पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पुढाकार,दातिवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, त्यामार्फत मिठागरांची निर्मिती, दातिवरे शिक्षण संस्थेतर्फे इंग्लिश स्कूलचे निर्माण, स्वतः अनेक वर्ष अध्यक्षपद स्विकारून शाळेला उर्जितावस्था, बोरिवली येथील समाजोन्नत्ती शिक्षण संस्थेतील अगदी प्राथमिक अवस्थेपासून महत्त्वाचे योगदान. अशी नुसती विविध उपक्रमांची झलक जरी पाहिली तरी आपला रोजी रोटीचा मुंबईतील शिक्षकी पेशा सांभाळीत गावासाठी नानांनी केलेली ही विकासकामे पाहून आपण नतमस्तक होतो!!
माणसाचा चेहरा व राहणीमान हा फक्त एक देखावा आहे. खरी ओळख तर त्याचे बोलणे व व्यवहार यामुळेच होते, असे म्हटले जाते ते सत्य आहे…बोलण्यातून व व्यवहारातून माणसाच्या अंतःकरणातील नम्रतेचे दर्शन होते व नम्रता हीच माणसाची खरी ओळख आहे! ओळख व खरी ओळख यात येथेच फरक होतो, माझेही नानांच्या बाबतीत तसेच झाले होते!
सो क्ष स॔घ फंडाच्या विश्वस्त पदी नानांची निवड होईपर्यंत मलाही, “मी नानांना ओळखतो..” असा गैरसमज होता. त्याआधी अनेक सामाजिक कार्यक्रमात नानांची माझी कित्येक व्यासपीठावर मुलाखत झाली होती. सो क्ष संघ, सेतू को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे उपक्रम, तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसती गृह माजी विद्यार्थी संघ,अशा अनेक निमित्ताने नाना मला भेटत. मात्र आम्ही दोघे सो क्ष संघ फंड ट्रस्ट मध्ये एकमेकांचे सहकारी म्हणून 2005 ते 2014 अशी सतत नऊ वर्षे काम केले आणि नानांची ‘खरी ओळख ‘मला झाली …वरून खूपच गंभीर,कठोर मितभाषी वाटणारे नाना प्रत्यक्षात तसे नाहीत याची पुरेपूर जाणीव झाली. कारण त्या नऊ वर्षात नानांची अन्यायाविरुद्धची चीड, स्वच्छ व पारदर्शक कारभाराची आवड, कितीही कामे केली तरी श्रेयाची अपेक्षा न करता ते श्रेय आपल्या सहकाऱ्यांना देऊन स्वतः आनंदी होणाऱ्या नानांच्या स्वभावाचे पैलू दिसले. नानांची खरी ओळख तीच होती! आमची मैत्री खऱ्या अर्थाने दृढ झाली ,नानांच्या अखेरच्या दिवसापर्यंत टिकली, आमच्या दीर्घ साहचर्यातील काही सुंदर आठवणीही पुढे सांगणारच आहे !
नानांच्या अमृत महोत्सवी वर्षात 2010साली त्यांच्या सूहृदांनी प्रसिद्ध केलेली स्मरणिका, ‘अमृतधारा’ आणि नानांची कन्या सौ. शोभा नितीन वर्तक यांनी लिहीलेले “नानावेध” हे वेधक आत्मचरित्र वाचल्यानंतर माझा नानांविषयी असलेला आदर द्विगुणित झाला यात शंका नाही व हे लेखन करण्यास मला उपयोग झाला!
या ‘गौरवग्रंथ स्मरणिकेत’,नानांच्या काही मित्रांनी, सहका-यांनी नातेवाईकांनी, त्यांच्या कार्याबद्दल काढलेले प्रशंसोद्गार वाचले म्हणजे आपल्याला नानांच्या अफाट कार्या बरोबरच त्यांनी आपले गावकरी समाज बांधव यांच्याकडून मिळविलेला आदर व प्रेम याचीही जाणीव होते ! समाजाच्या विविध क्षेत्रातील मंडळीनी नानांच्या कामाला दिलेली ती शाबासकीची पावती आहे हे पटते.निश्चित.
त्यापैकी काही सहकाऱ्यांनी केलेल्या गौरवाचा फक्त सारांश देतो आहे..
प्रसिद्ध उद्योजक व केसरी टूर्सचे सर्वेसर्वा श्री. केसरीभाऊ पाटील:
“शांताराम भाऊंच्या कार्याकडे पाहताना एक गोष्ट खास जाणवते, ती म्हणजे त्यांनी स्वीकारलेल्या कार्यात ते स्वतःला झोकून देतात व आपल्या सहकारी मित्रांना त्या कार्यात सामावून घेतात. आमच्या दातिवरे परिसरात दोन अत्यंत उपयुक्त गोष्टी नानांनी केल्या. एक म्हणजे दातिवरे शिक्षण संस्था चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केली आणि शाळेचा रिझल्ट 95% पर्यंत वाढवून दाखविला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दातिवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्यवस्थापनात सुधारणा करून त्याचे क्षेत्र एडवण, मथाणे, कोरेह उसरणी, डोंगरे या गावापर्यंत विस्तारित केले”.
दातिवरे गावाचे अमेरिका स्थित सुपुत्र डॉ. मधुकर ठाकूर:
“मी स्वतः या समारंभास उपस्थित राहू शकत नाही त्याबद्दल खेद व्यक्त करतो. आजचा दिवस दातिवरे व परिसरांतील गावाच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. प्रथम शांताराम भाऊ 75 वर्षे पूर्ण करीत आहेत व दुसरे त्यांनी आयुष्यभर केलेल्या कामाचा योग्य सत्कार आपण सर्व करीत आहात, यामुळे हा दिवस मला मोलाचा वाटतो! अमेरिकेतही मी शांताराम भाऊंनी आमच्या परिसरासाठी केलेल्या कामाची माहिती घेत असे”
सत्कार समितीचे सदस्य श्री सदानंद बा. राऊत:
“शांताराम भाऊंचा अमृत महोत्सव साजरा करावा अशी आम्हा सर्वांची मनोमन इच्छा होती. हितचिंतकांनी खूपच चांगला प्रतिसाद दिला. शांताराम भाऊंच्या कार्याची व्याप्ती व कार्यक्षेत्र खूप मोठे आहे.त्यांचे कार्य हे आपल्या गावापुरते मर्यादित नसून इतरही ठिकाणी दूरवर पसरले आहे. आपला शिक्षकी पेशा व जन्मजात शेती व्यवसाय सांभाळून त्यांनी हे कार्य केले आहे. 2010 साली मिळालेला राज्यस्तरीय प्रियदर्शनी कर्तृत्व गौरव पुरस्कार हे त्यांनी केलेल्या भरीव कामाची पावतीच आहे.”
दातिवरे शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह श्री. मनोहर मेहेर:
“श्री.ठाकूर स्वतः शिक्षक, शिक्षणप्रेमी व गावाच्या विकासाबाबत सतत जागृत असतात. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले असले तरी सामाजिक कार्याची आवड व सहकार क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव आहे. सामान्य माणसाबद्दल जिव्हाळा, अन्यायाविरुद्ध चीड ,आपल्या कर्तृत्वावर अढळ श्रद्धा, कठोर परिश्रम घेत काम करणे, धाडसी वृत्ती, स्पष्टवक्तेपणा ,सत्याची कास धरून चालणे व इतरांच्या गुणांची कदर करणारे असे त्यांचे ध्येयवादी व्यक्तिमत्व आहे.”
या विविध प्रशंसापत्रांतून नानांच्या जनमानसातील उज्ज्वल प्रतिमेचे दर्शन होते .
आयुष्याच्या दीर्घ वाटचाली बद्दल व आपल्या हातून घडलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल सांगताना अमृतमहोत्सवी वर्षातील नानांचे काय म्हणणे आहे ते पहा:
“माणूस परिस्थितीने घडतो हे वास्तव आहे. परिस्थितीची जाणीव होणे हे महत्त्वाचे.ती झाली म्हणजे अंतरंग फुलून उठते. ज्याला आपण अंतः प्रेरणा म्हणतो. मी जेथे जन्माला आलो ती भूमी संतमहंतांची आहे. पावित्र्याचा वारसा जपणारी आहे. तिनेच मला शिकविले.
..’कर्मण्येवाधिकारस्ते’… या न्यायाने आजपर्यंत मी माझे कर्तव्य करीत राहिलो आहे .आयुष्याच्या 75 वर्षे वाटचालीत अनेक लहान-मोठी पण ’ बहुजन हिताय’,अशी कामे झटून पार पाडली.खूप खस्ता खाल्ल्या पण थांबलो नाही. कारण मी माझ्या गावासाठी समाजासाठी काम करतो यावर माझा अढळ आत्मविश्वास होता. म्हणूनच हे सारे शक्य झाले आणि माझे विरोधक नमत राहिले. मी प्रामाणिकपणे वागलो. चारित्र्याला जपलो. कष्ट केले. आई-वडिलाप्रमाणे थोरामोठ्यांचा आदर्श सांभाळला ,इतरांच्या भावनांची कदर केली.. हीच माझी शिकवण..!
त्यातून माझे कुटुंब घडत गेले. माझी मुले शिक्षण घेऊन बांधकाम व्यवसायात प्रगतीपथावर आहेत. माझी मुलगी शोभा पदवीधर शिक्षण घेऊन सेवाभावी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. नातवंडे ही सर्वांच्या पावलावर पाऊल टाकून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमणा करीत आहेत. या सर्वांचे श्रेय माझी पत्नी सौ.लक्ष्मी कडे जाते. माझ्या यशात तिचा मोलाचा वाटा आहे. माझे कुटुंब आज सर्व दृष्टीने संपन्न आहे ,याहून मला दुसरे मोठे समाधान काय हवे?”
“समाजशिक्षण व सहकार क्षेत्रात मला बऱ्यापैकी कामे करता आली. दातिवरे गावांतर्गत रस्ते, गाव नळ पाणी पुरवठा योजना,या आपल्या गावाच्या दृष्टीने दैनंदिन अत्यावश्यक गरजा होत्या. अनेक अडथळे होते .ते दूर करण्याचा प्रयत्न केला.माध्यमिक शिक्षणाची झालेली आबाळ,दातिवरे शिक्षण संस्थेच्या इंग्लिश हायस्कूलच्या माध्यमातून दूर केली. शाळा प्रगतीपथावर नेली.सहकार क्षेत्रात दीर्घकाल बुडीत अवस्थेत असलेली शेतकरीसेवा सहकारी सोसायटीचे पुनरुज्जीवन केले. गावाभोवती खार बंधारे, प्रवासी जलवाहतूक योजना, यासारख्या कामाला गती दिली.मुंबईतील आंबोली सारख्या भागात शिक्षण रस्ते वीज पाणीपुरवठा या सुविधा स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने उपलब्ध करून दिल्या. अशी अनेक नोंद असलेली व नसलेली कामे परमेश्वर कृपेने माझ्या हातून घडली. हे परमेश्वराचे व आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत असे मी मानतो.”
आपल्या संपूर्ण सेवेचे श्रेय परमेश्वर , कुटुंबीय ,सहकारी यांना देऊन नानांनी आपल्या अंतकरणातील ऋजुता व नम्रता यांचे विलोभनीय दर्शन घडविले आहे!
संतांनी म्हटल्याप्रमाणे “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी..”,
अशी ही अवस्था आहे. कर्मफल ईश्वरचरणी अर्पण करण्याची भावना निर्माण झाली की मग कार्यकर्त्याच्या मनांतील फलप्राप्ती बद्दलचे राग, द्वेष, लोभ लोप पावतात. केवळ कर्मरत राहणे हीच जीवनाची खरी साधना वाटावयास लागते. नानांनी आपल्या आयुष्यात दातिवरे गावातील ‘हिरा डोंगरी’ वर बसून कधी अध्यात्मिक साधना केली असेल असे मला वाटत नाही. ‘कर्मफल ईश्वराला अर्पण करून काम करीत राहणे’ हीच त्यांची जीवन धारणा होती.
आमच्या संघ फंड ट्रस्टमध्ये एक सहकारी म्हणून सतत नऊ वर्षे नानांबरोबर केलेले काम माझ्यासाठीच नव्हे तर आमच्या सर्व सहकाऱ्यासाठी पथदर्शक होते. आमचे सहकारी म्हणून त्यांनी दिलेली सेवा तसेच इतर उपक्रमांमधून ते देत असलेले सर्व प्रकारचे योगदान, ‘स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी नव्हे तर सामाजिक ऋण फेडतो आहे’ या भावनेतून निर्माण झाले होते. त्याचे प्रत्यक्ष दर्शन आम्हाला त्यावेळी घडले.म्हणून नाना वेगळे वाटतात!
आमच्या विश्वस्त पदाच्या कालखंडातील कामाचा आढावा “आम्ही विश्वस्त“ या लेखात मी विस्तृतपणे घेतला आहे. त्याची पुनरुक्ती करू इच्छित नाही
नाना आमच्या दादर येथील कार्यालयात सभेच्या वेळेआधी कमीत कमी अर्धा तास तरी हजर होत. पंच्याहत्तरी झाली होती तरी बोरिवलीहून दादरला लोकल ट्रेनने येऊन तीन मजले चढून ते जेव्हा कार्यालयात हजर होत, शांतपणे आसनस्थ झाल्यावर त्यांच्या दोनच मागण्या असत. एक पेलाभर थंड पाणी व एक कप गरम चहा! कोणतीही त्रासिक, संतप्त भावना कधीही नसे.
अजेंड्याचा संपूर्ण अभ्यास व पार्श्वभूमी त्यांनी समजावून घेतलेली असे. झालेल्या कामाची माहिती, विश्वस्त खत, घटना यांचे सर्व संदर्भ समजावून घेऊन पुढील कामाविषयी ते आपले विचार मांडीत. त्याआधी आमच्याशी( मुख्य व कार्यकारी विश्वस्त) चर्चा करून नंतरच गरज भासल्यास आपले मत सर्वांसमोर मांडीत. मुद्देसूद विवेचन करीत.
विश्वस्त व संघ कार्यकारिणीच्या संयुक्त सभेतदेखील त्यांची अशीच स्पष्ट भूमिका असे. एखादा मुद्दा न पटल्यास त्याबाबत ते संघाध्यक्ष व इतर जेष्ठ कार्यकर्त्याबरोबर आधी चर्चा करून नंतरच आवश्यकता असल्यास बोलत.
आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही त्यांची सामंजस्याची भूमिका असे. विश्वस्तांचे कामात,विशेषतः आर्थिक बाबींवर भाष्य करताना कोणी संपूर्ण माहिती न घेता विनाकारण हेत्वारोप करीत असेल तर नानांचा संयम सुटे. व्यासपीठावर माझ्या शेजारीच बसत असत त्यामुळे तेथे सर्वासमक्ष उपस्थित सभासदांना काही बोलणे भाग पडल्यास, माझ्याशी हळू आवाजात चर्चा करून “विश्वस्तातर्फे मी आपली बाजू मांडू का?”, अशी संमती घेऊन भाष्य करण्यासाठी उभे राहत. अत्यंत मोजक्या शब्दात अभ्यासपूर्ण रित्या बाजू मांडून ते विरोधकांना गप्प करीत. सहसा त्यांच्या बोलण्यात कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा अथवा हेकेखोरपणे नसे. आपला स्पष्ट भरदार आवाज व आकर्षक वकृत्व शैलीने सर्वसामान्य सभासदांना मुद्दा पटवून देत. आम्हा विश्वस्तांचे काम खूप सोपे होई. सार्वजनिक कामांत नानांसारखा सहकारी मिळणे म्हणजे त्या संस्थेच्या निरोगी वाढीसाठी व यशस्वी वाटचालीसाठी निश्चित मोठा आधार असे!
नाना एकूणच सर्व सामाजिक कार्यातून, विश्वस्त मंडळातून, निवृत्त झाल्यानंतरही आवश्यकता वाटल्यास आम्ही त्यांना कधीतरी सर्वसाधारण सभेसाठी मुद्दाम आमंत्रित करीत असू. नानाही अशावेळी उपस्थित राहून मागच्या कामाचे संदर्भ देत उपस्थितांचे समाधान करीत!
नानांच्या सुविद्य व कर्तबगार कन्या सौ शोभा नितीन वर्तक यांनी आपल्या पिताजींच्या विविध पैलूवर आठवणींतून, “नानावेध” पुस्तक लिहिले आहे.सार्वजनिक कार्याबरोबरच, एक कुटुंबप्रमुख, मार्गदर्शक व प्रेरणास्थान म्हणून नानांचा परिचय करून दिला आहे. साधे, सरळ व जिव्हाळ्याने लिहिलेले हे पुस्तक मुळातून वाचण्यासारखे आहे. नानांचे तडफदार स्वाभिमानी प्रेमळ व तितकेच रोखठोक व्यक्तिमत्व बालपणीच्या व पुढील जीवनातील अनेक प्रसंगांतून दाखविले आहे. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी सुरु केलेल्या समाजकार्याला आपल्या जीवनाचे एक व्रत मानून ते आयुष्याच्या अखेरीपर्यंत चालू ठेऊन आपल्या कार्यसम्राट पित्याचे दर्शन त्यांनी घडविलेआहे.
नानांचे जेष्ठ पुत्र जगदीशनी मला पाठविलेल्या या पुस्तकाच्या वाचनाने मलाही ‘वेगळे नाना’ समजले. पुस्तक लिहिण्यामागे असलेल्या आपल्या भूमिकेबद्दल सांगताना सौ. शोभाताई म्हणतात, “नानांच्या ग्रामविकासातील भरीव योगदानामुळे दातिवरे गावकऱ्यांनी आणि दातिवरे शिक्षण संस्थेने त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार केला. त्यावेळी नानांवर एक छोटी पुस्तिका काढली होती .त्यानिमित्ताने मला नानांच्या कार्याचा जवळून अभ्यास करता आला व त्यातूनच या लेखनाची स्फूर्ती मिळाली”
नानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सकारात्मक विचारांनी व दूरदृष्टीने कशी यशस्वी वाटचाल केली,हे पुढील पिढ्यांना ज्ञात असले पाहिजे हाच त्यांच्या लेखनामागील मूलभूत हेतू होता.
नानांच्या कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याची महती सांगताना आई-वडिलांकडून मिळालेले संस्कार, पंधराव्या वर्षी केलेला समाजसेवेचा श्री गणेशा,दातिवरे ग्राम व परिसर विकासाचा त्यांचा ध्यास, त्यांना मिळालेली वक्तृत्वाची देणगी, मुंबईतील शिक्षकी पेशा सांभाळताना तेथील कार्यकर्तृत्व, शिक्षणाक्षेत्रातील नानांचे प्रयोग, प्रवाहाविरुद्ध जाण्याची त्यांची वृत्ती, शेतीतील त्यांचे विविध प्रयोग ,संघटना कौशल्य, दुर्दम्य इच्छाशक्ती सकारात्मक दृष्टिकोन, अचूक निर्णय क्षमता ,नानांचे कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व , विहंग-विहार कृषी पर्यटन केंद्र , प्रसंगी व्यापारी दृष्टिकोन आणि शेवटी या सर्व व्यापातूनही भावंडांना मिळालेले एक शिस्तप्रिय प्रेमळ वडील.. अशा विविध पैलूवर त्यांनी अत्यंत सोप्या व सुंदर भाषेत भाष्य केले आहे.
“नानांचा जीवनप्रवास हा माझ्या आईशिवाय पूर्णच होऊ शकत नाही” हे सांगताना सौ.शोभाने, “नानांसोबत सतत सावलीसारखी वावरणाऱी आपली आई हा एक स्वतंत्र अध्याय आहे”, असे सांगत आईचे कर्तृत्वदेखील नानांच्या एकूण कार्यास कसे पूरक होते हे दाखवून दिले आहे!
पुस्तक वाचल्यानंतर “नानावेध” हे पुस्तकास दिलेले शीर्षक अत्यंत समर्पक असल्याची खात्री पटते !
प्रत्येक लेकीसाठी पिता हा पहिला आदर्श असतो. सौ.शोभाची ही तीच भावना आहे .त्यांना एकदा विचारले गेले, “ तुमच्या वडिलांकडून तुम्ही काय शिकलात ?” त्यांनी पटकन उत्तर दिले होते,
“जीवनातील मूल्ये!”
त्या म्हणतात, ”आजही जेव्हा मला हा प्रश्न व मी दिलेले उत्तर आठवते, त्यावेळी माझा मलाच अभिमान वाटतो! मी किती भाग्यवान,माझ्या आई-नानांसारखे आई-वडील मला मिळाले. त्यांच्या वागण्या बोलण्यातून कृतीतूनच आम्ही जीवनातील ही मूल्ये केवळ शिकलो नाहीत तर अनुभवलो व जगलो!”
लेकीच्या या दोन ओळीच्या प्रशस्ती मधूनच केवळ वडील म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणूनही नाना किती महान होते याची जाणीव होते!!
2019 च्या 23 एप्रिल मध्ये नाना अगदी अल्प आजाराचे निमित्त होऊन जगातून निघून गेले.माझ्या दुर्दैवाने मी त्यावेळी भारतात नव्हतो. त्यांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही ही सल मनात आजही असली तरी, मन: पटलावर नानांची कोरली गेलेली ती हसरी, करारी, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची छबी कधीच पुसली जाणार नाही. त्यांच्याबरोबर सतत नऊ वर्षे एक सहकारी म्हणून घालविलेले ते दिवस म्हणजे माझ्या जीवनातील सुखद आठवणींचा ठेवा आहे. दातिवरेसारख्या एका आडवळणाच्या गावी, एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊनही माणसाने, ’कशासाठी जगावे, कसे जगावे आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी कशा रीतीने पुरुषार्थ गाजवावा’, हे आपल्या आयुष्यातून सिद्ध केले. असा एक मूर्तीमंत आदर्श म्हणजे शांताराम जी ठाकूर उर्फ आमचे नाना होतं!
मोठेपणा सहज मिळत नाही त्यासाठी प्रसंगी अग्नीकाष्ठ भक्षण करावे लागते. अनेक त्याग करावे लागतात.
”चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी साचे”, असे तुकाराम महाराज लिहून गेले. मात्र मानवी जीवनात या ओळींचा स्वतःच्या आयुष्यातून प्रत्यय देणारी किती माणसे निर्माण होतात? मला माहित नाही. मी पाहिलेले, अनुभवलेले, कै. शांतारामजी ठाकूर निश्चितच असे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व होते ज्यांनी आपल्या सच्च्या समर्पित सामाजिक सेवेतून ब्रह्मपद मिळविले आहे. मीही भाग्यवान की अशा एका सकारात्मक निष्पृह बाणेदार व्यक्तिमत्त्वाबरोबर एक सहकारी म्हणून काम करण्याचे सद्भाग्य मलाही मिळाले. शांताराम नानांच्या पवित्र स्मृतीस माझे प्रणाम!
या लेखासाठी श्री जगदीश भाई ठाकूर यांनी पुरविलेले साहित्य व सौ. शोभाताईंचे” नानावेध” पुस्तक याचा खूप उपयोग झाला. त्यांचेही मनःपूर्वक आभार!
आदरणीय श्री.दिगंबर वामन राऊत काका,
सप्रेम नमस्कार.
सोमवंशी क्षत्रिय संघाच्या स्थापनेपासून गेल्या शंभर वर्षांच्या जडणघडणीच्या काळात ज्या धुरिणींनी समाजासाठी दिलेले बहुमूल्य योगदान आत्ताच्या उदयोन्मुख तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचे काम करून पिढ्या-पिढ्यांमधील ‘ दुवा ‘ साधण्याची किमया आपण ‘पूजनीय आधारवड’ या पुस्तक लेखनाच्या माध्यमातून साधली आहे . याकरिता आपले मनःपूर्वक अभिनंदन.
या सर्व ज्येष्ठ समाजधुरिणींचे कार्य , त्यांचे योगदान आत्ताच्या समाजापर्यंत पोहोचवणे, ही खरोखरच काळाची एक गरज होती. आपले हे कार्य पुढील पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी व दिशादर्शक असणार आहे.
काका, काल झालेला ‘पूजनीय आधारवड’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अतिशय अप्रतिम होताच पण नेहमीच संस्मरणीय राहील. त्यानिमित्ताने अनेक नामवंतांचे विचार ऐकण्याची व तुम्हांला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला मिळाली.
‘पूजनीय आधारवड’ या आपल्या पुस्तकात समाजातील ज्या २१ समाजधुरीणींचे व्यक्तिचित्रण आपण केले आहे, त्यामध्ये आमच्या वडिलांचा म्हणजे नानांचा (स्वर्गीय शांताराम रामचंद्र ठाकूर यांचा) आपण समावेश केला आहे. त्यांचा जीवनप्रवास रेखाटताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन आपण केले आहे.
समाजाच्या जडणघडणीत बोर्डी, चिंचणी, केळवे, माहीम, वसई ही नावे नेहमीच अग्रणी आहेत, पण सफाळे गावातील अतिशय प्रतिकूल परिस्थिती असलेल्या ‘दातिवरे ‘ गावाचा कायापालट करून समाजाच्या जडणघडणीत तेवढ्यात हिरीरीने खारीचा वाटा उचलणाऱ्या नानांच्या विविध गुणांचा व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध तुमच्या दिव्यदृष्टीने बरोबर हेरला आणि या पुस्तकातून नानांच्या असामान्य कार्याला एक वेगळी ओळख दिलीत. हा नानांचा, त्यांच्या कार्याचा गौरव आहेच , परंतु तो संपूर्ण ‘दातिवरे ‘ गावाचा सन्मान आहे असे मला वाटते .
काका , त्याबद्दल तुम्हांला खरोखरच खूप-खूप धन्यवाद आहेतच, पण आम्ही सर्व नानांचे कुटुंबीय , स्नेही आणि संपूर्ण दातिवरे गाव याबद्दल आपले नेहमीच ऋणी राहील.
काका, तुमच्या हातून असेच लेखनकार्य घडत राहावे व पुढील अनेक पिढ्यांसाठी ते ‘दीपस्तंभ’ ठरावे ही मनःपूर्वक प्रार्थना व सदिच्छा व्यक्त करते .
धन्यवाद.