व्यायाम विद्या व व्यायाम गुरु नाना मळेकर

सौजन्य: वैभव मळेकर

    आधुनिक जगात अनेक विद्याशाखांचा आपण अभ्यास करतो. पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय शास्त्र ,स्थापत्यशास्त्र, आजचे आधुनिक कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, खगोल शास्त्र, अंतराळ विज्ञान, क्षेपणास्त्र विज्ञान इत्यादी. परंतु जगात एक काळ असा होता ,ज्यावेळी व्यायाम विद्या खूप महत्त्वाची मानली जात होती. कारण ज्या शरीराच्या माध्यमातून ही सर्व शास्त्रे माणसाला शिकावी लागतात ते शरीर जर बलवान निकोप व सुदृढ नसेल, तर सर्व विद्या मधील पारंगतता निष्फळ ठरते. म्हणूनच तर ऊपनिषदांत म्हटले आहे ना, ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्!’ सर्वात पहिली आराधना ही बलवान शरिरासाठी केली गेली पाहिजे. शरीरच दुबळे राहिले तर आयुष्याचा सगळा डोलारा निष्फळ आहे. अगदी धर्म साधना सुद्धा शरीराच्या माध्यमातून होते म्हणून शरीर मजबूत बळकट असणे हे महत्त्वाचे.

    बोर्डी च्या आमच्या हायस्कूलात, आमचे त्यावेळचे व्यायाम गुरु म्हणजे नाना मळेकर उर्फ दत्तात्रय महादेव मळेकर !शाळेत व गावात ते नाना म्हणूनच प्रसिद्ध होते. त्यांचे दुसरे बंधू गजानन उर्फ भाई मळेकर हेदेखील आमच्याच हायस्कूलमध्ये मराठी विषयाचे शिक्षक होते. त्यांच्याबद्दल मला खूप सांगायचे आहे ते पुन्हा स्वतंत्रपणे नंतर सांगेन. सर्वात धाकटे तिसरे बंधू देखील शिक्षकच होते. ते मुंबईच्या हायस्कुलात आपली सेवा देत होते. नाना व त्यांच्ची बलोपासना, त्यांची शिकवण तसेच, त्यांचे आमच्या आयुष्यातील महत्त्व सांगण्याआधी, या व्यायाम विद्येबद्दल नाना जे सांगत ,त्यात थोडी अधिक भर घालून मी ही उपयुक्त व मनोरंजक अशी खालील माहिती देतो आहे.

      उपनिषदे  भारतात निर्माण झाली मात्र  व्यायाम विद्येचा उगम व मोठा प्रचार प्रथम युरोपात  झाला. व्यायाम हे शास्त्र म्हणून  प्रथमतः प्राचीन ग्रीस देशांमध्ये उदयाला आले .प्राचीन ग्रीस मध्ये व्यायाम शाळांसाठी खूप मोठ्या इमारती व किडा साधने ठेवलेली असत .मूळ ग्रीक शब्द ‘ जिम्नाॅस ‘ यापासून जिम्नॅस्टिक ,जिम्नॅशियम ,जिमखाना हे शब्द आले ‘जिम्नाॅस’ म्हणजे ग्रीक भाषेत अनावृत्तता ,उघडे शरीर. त्याकाळी उघड्या अंगाने हे लोक व्यायाम करीत.  उघड्या अंगाने  कसरत करावयाची जागा  म्हणजे जिम्नॅशियम .व त्यासाठी खूप स्वतंत्र विशाल अशी  मैदाने ठेवलेली होती. ग्रीक राज्यकर्त्यांनी, त्यांच्या तरुणांमध्ये व्यायामाचे व शरीरसौष्ठवाचे मोठे आकर्षण निर्माण करण्यासाठी या व्यायाम शाळा निर्माण केल्या होत्या . त्यांना हे तरुण लढण्यासाठी सैनिक म्हणून हवे होते. त्यावेळेच्या अथेन्स आणि स्पार्टा इत्यादी नगर राज्यांमध्ये अनेक वेळा युद्ध होत .एवढेच नव्हे तर त्यावेळचे  विद्वान, तेथे आपल्या सभा घेऊन आपले विचार लोकांत पसरवण्यासाठी या व्यायामशाळाचाच उपयोग करीत असत. तरुणांना आपले राष्ट्र कर्तव्य म्हणून भावी जीवनात उत्तम लढवय्ये व्हा,अशी भूमिका प्रभावीपणे मांडीत असत.

      आधुनिक धर्तीची व्यायामशाळा, सर्वप्रथम फ्रीड्रिख  या जर्मन शिक्षण तज्ञाने 1811 मधे बर्लिनमध्ये उभारली .त्यानंतर युरोपमध्ये या धर्तीवर अनेक व्यायामशाळा निर्माण झाल्या व जर्मन तरुणांमध्ये देखील प्रखर देशभक्ती व प्रतिकार सामर्थ्य निर्माण करणे हाच त्यांचाही उद्देश होता .पुढे याच धर्तीवर अमेरिका इंग्लंड इत्यादी अनेक राष्ट्रात असे व्यामाचे आखाडे निरनिराळ्या प्रकारे व नावांनी उघडण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या साधनसामुग्री व सोयी सुविधा तरुणांसाठी उपलब्ध केल्या गेल्या. प्रेक्षकांना बसण्यासाठी देखील आसन व्यवस्था  केली गेली.

     पाश्चिमात्य धर्तीवर भारतात देखील आधुनिक व्यायाम शाळा अनेक  ठिकाणी आढळतात. तथापि आपल्या भारतात विशेषतः उत्तर भारत व महाराष्ट्रात देशी व्यायाम शाळा म्हणजे कुस्तीच्या आखाड्याची परंपराही फार प्राचीन आहे. आखाड्याची बांधणी एका ठराविक प्रकारे केलेली असते. एका कोपऱ्यात कुस्तीचा चौकोन असतो व त्यात तांबडी माती असते. त्या मातीची मशागत एका विशिष्ट पद्धतीने केली जाते.आखाड्यात अनेक साधन सुविधाही असतात. उचलण्यासाठी दगडी गोळे, लहान-मोठ्या वजनाचे वर्तुळाकार दगडी नाल ,मल्लखांब ,जोड लेझीम इत्यादी .भारतात रामायण महाभारत काळात ही व्यायाम शाळा होत्या व त्यात कुस्ती प्रमाणेच दुसरेही काही क्रीडाप्रकार गुरूंच्या कडून शिकवले जात .याचा उल्लेख आपल्याला रामायण महाभारतात मिळतो .महाराष्ट्रात व्यायामशाळा यांचा विशेष प्रसार शिवाजी महाराजांच्या काळात झाला .गावाबाहेर वीर मारुतीचे मंदिर स्थापन करून त्या भोवती समर्थ रामदासांनी, महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतात खेडोपाडी बलोपसनेस चालना देण्याचा प्रयत्न केला .तालमीत मारुती शक्तीचे प्रतीक म्हणून गदाधारी किंवा द्रोणागिरी उचललेला दाखवलेला असतो .पेशव्यांच्या काळात ही युद्ध शिक्षण व कुस्ती  शिकवणारे अनेक उस्ताद गुरु होते. आजही महाराष्ट्रात कोल्हापूर,मिरज ,सांगली ,सातारा, बडोदा इत्यादी अनेक शहरात आखाडे व तालमी चालू आहेत. मी साताऱ्याला शिक्षणासाठी गेलो असताना सातारा मधील काही नावाजलेले आखाडे पाहिले आहेत .कुस्ती काही खेळलो नाही. मात्र नामवंत मल्ल खाशाबा जाधव यांची व्यायामशाळा पाहण्याचा योग आला होता.

      बडोदे संस्थानात राजरत्न माणिकराव यांनी सन 1914 मध्ये बडोद्या मधील,एका  प्रसिद्ध आखाड्याचे रुपांतर व्यायाम मंदिरात केले. त्यांनी व्यायाम आणि अनेक क्रीडाप्रकार नियमबद्ध व सूत्रबद्ध करून, अशा प्रमाणित, केलेल्या व्यायाम शाळा, आधुनिक  स्वरूपात गुजरात आणि भारतातील ही अनेक गावात स्थापन केल्या. म्हणूनच माणिकरावांना भारतीय व्यायाम विद्येचे भीष्माचार्य असे म्हटले जाते .त्यांच्यामुळे भारतीय सैन्यातील ‘ अटेंशन ,राईट अन् लेफ्ट अबाउट ‘ हे शब्द प्रयोग जाऊन त्याऐवजी ‘ सावधान ,विश्राम ,दहिने -बाये मूड ‘,या सारख्या देशी भाषिक आज्ञा तयार झाल्या व आजही भारतीय सैन्यच नव्हे तर कोणत्याही कवायत संचलनात ह्याच आज्ञा प्रचलित आहेत !

        ही प्रस्तावना मुद्दाम यासाठी केली की आमच्या बोर्डी हायस्कूलमधील आमचे व्यायाम विद्येचे गुरु, नाना मळेकर हे, प्रोफेसर राजरत्न,माणिकराव यांचे परमशिष्य होते आणि ही गोष्ट ते शाळेत आलेल्या प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांना, प्रथम तासालाच आवर्जून आणि अभिमानाने सांगत असत .कुठल्याही तुकडीचा पहिला व्यायाम पिरेड,  हा नाना आपल्या गुरुंना ,आदरांजली वाहून व त्यांच्याबद्दल माहिती देऊन करीत असत. त्यावेळी त्यांचा अभिमानाने  फुललेला चेहरा पाहणे म्हणजे एक मोठा आनंद होता .नानांनी बडोदे संस्थानात आपल्या तरुणपणी माणिकरावांच्या हाताखाली शिक्षण घेतले होते .त्या वेळेची एक आठवण देखील ते आवर्जून सांगत. सुरत काँग्रेसच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, सेवादल सैनिकांनी केलेल्या कवायतीचे वेळी “आज्ञा” देण्यासाठी खास माणिकरावांना पाचारण केले होते. यावेळी नाना व काही शिष्य मंडळी देखील उपस्थित होती. नाना व त्यांचे गुरु माणिकराव यांचा हा मोठा बहुमान होता. नाना मळेकर सर म्हणजे बोर्डी च्या सुनाबाई पेस्तनजी हायस्कूलमधील एक मोठे प्रस्थ होते .शाळेचे अध्वर्यु आचार्य भिसे , आचार्य चित्रे, साने  होते ,हे खरे ,मात्र नानांचा रुबाब काही वेगळाच. ट्रान्सवाल हिंदी व्यायाम मंदिर आणि त्या समोरील मोकळे पटांगण, ही नानांची वतनदारी होती. शाळेच्या कोणत्याही प्रार्थनेसह ,सभा ,समारंभ ,उत्सवात नाना क्वचितच हजर असत. त्यांचा मुक्काम ,शाळेत मस्टरवर सही करून झाली की , व्यायाम मंदिरांमध्ये असे. नाना शाळेच्या इतर भागात जात नसत, ना इतर कोणी नानांना भेटण्यासाठी त्यांच्या व्यायाम मंदिरातील ऑफिसमध्ये प्रवेश करत. ज्या वर्गाचा तास असेल त्या वर्गातील मुलांनी पाच मिनिटे तरी आधी ,व्यायाम मंदिरात प्रवेश करणे हा नानांचा दंडक होता. आणि तो पाळला न गेल्यास नानांचा ‘ गंगाराम ‘ हा प्रसाद देण्यात सदैव सिद्ध असे ! गंगाराम म्हणजे नानांच्या हातात सदैव असलेला तीन फुटी गुळगुळीत लाकडी रूळ ! त्याचा प्रसाद म्हणजे नानांची मर्जी खपा झाल्यावर पडणारे ,पाठीवरील  वा पायावरील फटके ! खाकी हाफ पॅन्ट , स्काऊटचा खाकी शर्ट आणि सफेद टोपी ,पायात मोज्यासकट बूट, असा नानांचा साधारण पेहराव असे. पॅन्टवर मिलिटरी टाईप एक पट्टा ही बांधलेला असे .आणि या सर्व पेहरावाला शोभून दिसेल असा, नानांचा रागीट आणि गंभीर  चेहरा, भेदक डोळे आणि खर्जातला आवाज, मुलांना दरदरून घाम न फोडील तरच आश्चर्य होते!  नाना तसे खूप कनवाळूही होते .या उग्र व्यक्तिमत्त्वामध्ये एक कर्तव्यदक्ष व व विद्यार्थ्यांना शिस्तीचे व व्यायामाचे महत्व सांगणारा, शिक्षकही दडला होता. पिरियड सुरु होण्याच्या आधी कोणा मुलाला व मुलीला काही प्रकृतीची तक्रार असेल तर त्याबद्दल नाना प्रथम विचारून घेत. त्या मुलाला अथवा मुलीला त्यादिवशी संपूर्ण विश्रांती मिळे . बाकीच्यांच्या कडून मात्र सक्त कवायत, पूर्ण तास  करून घेतली जाई. मात्र कधी कोणी पिटीचा तास चुकवण्यासाठी लबाडी केली तर मात्र गंगारामचा प्रसाद आणि संपूर्ण शाळेच्या मैदानाला दहा फेऱ्या ही शिक्षा चुकत नसे .

    नानांच्या पीटीच्या तासाला माझी खूपच कुचंबणा होत असे. याचे कारण आप्पांच्या सक्त नियमाप्रमाणे गांधीटोपी घालून मला हायस्कुलात जावे लागले. त्यावेळी संबंध हायस्कूलमध्ये मी व दुसरा एक करपे नावाचा विद्यार्थी अशी केवळ दोनच डोकी टोपीने आच्छादित दिसत .बाकी कोणतीच मुले टोपी घालीत नसत .त्यामुळे आम्ही “टोपीकर” या नावानेच जास्त प्रसिद्ध होतो. शाळेमध्ये सर्व तासांना वावरताना आमच्या नेहमीच्या, एकाच वर्गात बसावे लागे आणि कोणत्याही शिक्षकांची टोपीबद्दल काही तक्रार नव्हती . मात्र नानांच्या तासाला ट्रान्सवाल मंदिरात जाण्यास आम्ही निघालो की वर्गाच्या बाहेर पडता पडताच टोपी गुंडाळून मला खिशात ठेवावी लागे. कारण यदाकदाचित शाळेच्या गेट बाहेर पडून, रस्ता ओलांडून, शाळेच्या मैदानावर येताना, जर नाना मैदानावर असतील व त्यांनी माझी टोपी पाहिली तर गंगाराम चा प्रसाद निश्चित होता. म्हणून मी जाणीवपूर्वक  हे करीत असे !पटकन टोपी खिशात घालणे ही माझी प्रतिक्षिप्त क्रिया झाली होती. कारण दोनदा मला तसा प्रसाद मिळाला होता. नाना हे आप्पांचे ही व्यायाम शिक्षक होते हे मी मागे” नाना मास्तरां”वरील लेखात सांगितले आहे .कारण नानांनी सुरू केलेल्या” लालजी आखाड्यात” आप्पा व त्यांचे काही तरुण मित्र त्याकाळी व्यायाम प्रकार व योगासने शिकण्यासाठी जात असत . त्यामुळे आप्पांना देखील नानांच्या बद्दल खूप आदर होता व मी त्या लेखात सांगितल्याप्रमाणे नाना देखील आप्पांचा विषयी खूप अभिमान बाळगून होते . कारण  त्यांच्या कार्यक्रमात आप्पांची योगासनांची प्रात्यक्षिके, मोठे आकर्षण होते त्यामुळे मलाही नानांच्या कडून तसे प्रेम व मार्गदर्शन मिळाले. मात्र अशी टोपी घालून त्यांच्यासमोर गेल्यानंतर मी वामनचा मुलगा हे विसरून ते इतर सर्व सामान्य मुलाप्रमाणे मलाही ठोकून काढीत हे, आपणास देखील मी याबाबत एकदा सांगितले होते . मात्र आप्पांनी देखील या बाबतीत आपली हतबलता दाखवली व नानांचा नियम आहे तर तू त्यांच्यासमोर टोपी घालून जाऊ नकोस .त्याबाबतीत तुला माझी टोपी काढण्याची परवानगी आहे असे  सयुक्तिक उत्तर आप्पांनी त्या वेळी मला दिले होते. त्यामुळे अकरावी इयत्ता पास होईपर्यंत मी हायस्कूलमध्ये सतत टोपी वापरली.  शाळेच्या कंपाउंडमध्ये डोक्यावर टोपी ,शाळेच्या दरवाजा बाहेर पडताच मैदानावर खिशात टोपी, असा लपवाछपवीचा खेळ चालू ठेवला .

     वर उल्लेख केलेल्या नानांच्या लालजी आखाड्या बद्दलही थोडे सांगायलाच पाहिजे. माणिकरावांच्या कडून घेतलेली विद्या गावांतील तरुणांनाही ही मुक्तहस्ते देता यावी या एकमेव उद्देशाने नानांनी,कोणताही मोबदला अथवा फी न घेता बोर्डी च्या राम मंदिरासमोर असलेल्या पटांगणात हा प्रयोग सुरू केला होता.त्याचे नक्की स्वरूप मला माहीत नाही कारण आम्ही शाळेत जात असताना हा आखाडा बंद झाला होता. मात्र आप्पा व त्याप्रमाणे आमच्या खंडू मामाची पिढी यांच्याकडून मी या व्यायाम शाळेबद्दल ऐकलेले आहे.नानांची खरी आवड व्यायाम होती, नव्हे जणू ते त्यांच्या आयुष्याचे मिशन होते आणि त्यामुळे ज्या ज्या प्रकारे तरुणांना व्यायामाचे महत्त्व पटवता येईल आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडून शारीरिक कसरती करून घेऊन ,त्यांना बलिष्ठ शरीर कसे प्राप्त होईल ही त्यांची प्रांजळ इच्छा होती. त्यावेळी तेथे  जाणारी काही मंडळी , मिळणाऱ्या विविधांगी शिक्षणाबद्दल बोलत असत विशेषता आप्पां कडूनच मला ही माहिती मिळाली. योगासने, दांडपट्टा, तलवारबाजी, कुस्ती, मल्लखांब, लाठी इत्यादी विविध प्रकार नाना या तरुणांचे कडून करवून घेत असत आणि त्यात आप्पांची खासियत ही योगासने करण्यात होती. एक उत्कृष्ट योगपटू म्हणून त्यांनी आपल्या लहानपणी नानांची शाबासकी मिळवली होती व या तरुणांचा एक जथा गणपतीच्या मेळ्यात गावोगावी फिरून या विविध व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिके गणपतीच्या उत्सवात जमलेल्या  लोकांना करून दाखवीत असत आणि त्यात आप्पांचे योगासनाचे विविध प्रकार मोठे आकर्षण होते. गावोगावी व्यायामाचे महत्त्व लोकांना कळावे व भारताची भावी पिढी सशक्त बलवान आणि सत् चरित्र व्हावी हीच नानांचे मनोमन इच्छा होती आणि त्यासाठी त्यांना कोणत्याही मोबदल्याची देखील अपेक्षा नव्हती. म्हणूनच आज त्यांची,आठवण प्रकर्षाने होत आहे. नाना व त्यांच्या शिष्यांच्या व्यायामपटुत्वा ची झलक,देखील शाळेत पाचवीत असताना पासून ते पुढे हायस्कूलात जाऊ लागल्यानंतर मी अनुभवली आहे. विजयादशमीच्या दिवशी शारदा श्रमाच्या पटांगणात हे प्रात्यक्षिक होत असे त्यात जांबिया, कुस्ती, दांडपट्टा अशा अनेक खेळांचे प्रात्यक्षिक आम्ही पाहत असू. या सर्व व्यायाम प्रकारात लाठीचा व्यायाम प्रकार माझ्या अजूनही लक्षात आहे.चार बाजूला असणारे युवक आपली काठी गरगरा फिरवीत असताना, त्यामधून आर-पार जाणारे त्यावेळेचे नाना आम्हाला विस्मयचकीत करून टाकीत असत. त्यावेळी नानांनी वयाची पन्नाशी नक्कीच गाठली होती .तरी देखील त्यांचे चापल्य व बेडरपणा आम्हाला आश्चर्यचकित करीत असे व त्या खेळानंतरचा, टाळ्यांचा कडकडाट व नानांचा सार्थ अभिमानाने फुललेला घामाने डबडबलेला चेहरा नजरेसमोर येतो.

    तसे पाहिले तर हायस्कुलात इयत्ता आठवी मध्ये दाखल होण्यापूर्वीच माझी व नानांची ओळख चांगलीच झाली होती . याला कारण नानांच्या घरी साजरा होणारा गणेशोत्सव. त्या गणेशोत्सवात आपल्या घरच्या गणपतीसमोर देखील नानांचे करमणुकीचे कार्यक्रम होत असत .एखादे छोटे नाटुकले देखील शाळेत जाणार्‍या मुलांकडून बसवून घेऊन ते सादर केले जात असे .मी सातवीत असताना अशाच एका नाटकाचे  नाव हे मला अजून आठवते .’ चौकोनी खुंट्या ‘ नानांनी सादरीकरण करायचे ठरविले. आप्पांना सांगून त्यांनी मलाही या कलाकारांच्या टीममध्ये सहभागी करून घेतले . मला वाटते माझ्या बोलण्याच्या वक्तृत्व कलेची झलक यांच्या कानावर गेली होती. कारण सातवीपर्यंत शाळेतील सर्व वकृत्वस्पर्धा यात मी यशस्वीरित्या सहभागी झालो होतो . याच नाटकात नानांच्या शेजारील मोहन, दत्तू ,रामू व इतरही एक-दोन मुले होती. चार मुलांच्या स्वभाववैशिष्ट्यावर काही गमती निर्माण केल्या होत्या व या चार मुलांच्या मुख्य सहभागामुळे नाटकाला चौकोनी खुंट्या हे नाव दिले होते. मी, मोहन, दत्तू, रामू असे आम्ही चार मुख्य कलाकार होतो कोणत्याही मुलीचा त्यात सहभाग नव्हता आणि या अशाप्रकारे नाटकात भाग घेऊन आपले संभाषण पाठ करून ते हावभावासहित प्रस्तुत करणे हा माझाही पहिलाच अनुभव होता .नाटकाची तालीम नानांच्या घरासमोरील बाहेर अंगणातच होत असे . यासाठी शाळेतून आल्यावर संध्याकाळी सहा ते सात अशी काहीशी वेळ ठरलेली होती. अशीच एक दिवस नाटकाची तालीम चालू होती .नाना प्रत्येकाचे पाठांतर , शब्दोच्चार , हावभाव इत्यादी निरीक्षण करून आपल्या आवाजात सूचनाही देत होते. आम्ही सगळे घाबरुनच काम करीत असल्यामुळे नाटकातील हावभावापेक्षा नानांच्या धाकामुळे येणारा दबाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा .त्यामुळे नानाही आमच्या नाट्य कौशल्यावर विशेष खुश  नव्हते. नानांच्या आई श्रीमती माई त्यावेळी आमचा हा तालमीचा कार्यक्रम पाहण्यास येत. त्यावेळी  माईंचे वय  नव्वदीच्या  आसपास असावे. तरीसुद्धा  प्रकृतीची  तमा न बाळगता त्या  या नाटकाचा तालीम पाहण्यासाठी येत व प्रत्यक्ष नाटकाचे दिवशीही पहिल्या रांगेत बसून त्यांनी मनमुराद आनंद घेतला. मला नंतर कळले की हे नाटुकले नानांनी स्वतः लिहिले होते. नानांना अशी लहान नाटुकली,स्वतः लिहून, ती  मुलांकडून बसवून घेण्याचे एक वेड होते. हा छंद माईंच्या  नाटक वेड्या स्वभावातून त्यांचेकडे आला होता. त्याही तालीम चालू असताना, बाजूला एका खुर्चीत बसून शांतपणे निरीक्षण करीत. चौकोनी खुंट्या नाटक खूपच चांगले झाले  आणि आम्हाला लोकांच्या कडून, नानांच्या कडून शाबासकी देखील मिळाली. मात्र या रंगीत तालीम दरम्यान नानांच्या शिस्तप्रिय आणि  कोपिष्ट स्वभावाची झलक आम्हाला पहायला  मिळाली होती. त्यामुळे  तालमीला जाताना, मी थोडासा घाबरत घाबरतच जात असे.

       नानांच्या  स्वभावाचा अनुभव आधीच घेतल्यामुळे, हायस्कुलात दाखल झाल्यावर ही  नानांच्या व्यायाम तासाला मी थोडा टरकून असे. अर्थातच टोपी खिशामध्ये असे आणि नानांच्या आज्ञा होतील याप्रमाणे व्यायामाचे विविध हात आमच्याकडून होत. तसं कधी गांधी टोपी तर कधी साहेबी टोपी आणि बूट घालून फिरणारे नाना, त्यांचा” गंगाराम” हाती ठेवीत. त्यामुळे’ गंगाराम’ हातात असलेल्या नानांची मर्जी सांभाळून, त्यांच्या प्रसादापासून दूर राहणे एवढा एकच विचार त्या तासाभरात , विद्यार्थ्यांच्या मनात येत असे. नानांचे हिंदी देखील मोठे और होते .बाये मुड, दाये मूड हे सर्व ठीक ,मात्र त्याच्या अवांतर काही सूचना द्यावयाच्या असल्यास नानांचे हिंदी मोठे मजेशीर असे. त्यामुळे जरी काही विनोद निर्माण होत असेल, तरी हसण्याची सक्त बंदी होती.रांगेमध्ये कोणी सरळ पाय न ठेवता थोडेसे वाकलेले उभे असतील तर, ताबडतोब नाना त्या विद्यार्थ्याला  ‘ऊंटके माफिक क्या खडे आहे, ट॔गडा संभाल के खडा करो ‘ ,’ घर को टंगडी के साथ ठीक जाना हो तो टंगडा संभालो  ‘..अशा प्रकारचे स्वतःचा शिक्का असलेले, हिंदी वापरीत. त्यांच्या  शिक्षण कालात  त्यांनी  माणिकरावांच्या कडून  हिंदीतूनच  शिक्षण घेतले होते, असे आम्हाला कळले व आम्ही देखील शांतपणे त्याप्रमाणे सूचना अमलात आणून चुकीचे करीत नसू. एक दिवशी मात्र मोठी  गंमत झाली. हा प्रसंग मीच काय ,त्यादिवशी माझ्याबरोबर असलेले माझे सर्व मित्र व मैत्रिणी ही नक्कीच विसरल्या नसतील. त्यादिवशी आमच्या भाई मळेकर यांचा, म्हणजे नानांचे मोठे बंधू , यांचा तास थोडासा उशिरापर्यंत चालला आणि नानांच्या व्यायाम मंदिरात येईपर्यंत आम्हाला पाच सहा मिनिटे फक्त उशीर झाला. आम्ही  धावत धावत येत होतो. मी तर धावता-धावता खिशात टोपी घालून घाबरतच धावत होतो ,कारण पुढचे चित्र आम्हाला दिसत होते . बाहेरूनच आम्ही नानांना व्यायाम मंदिराच्या दरवाज्याशी उभे असलेले पाहिले व काही हुशार मुलांनी तेथूनच मागच्या मागे सुंबाल्या केला आम्ही मात्र आज्ञाधारकपणे व्यायाम मंदिराच्या दरवाजा समोर उभे राहिलो. नानांनी गंगाराम व हात आडवा धरून आम्हाला प्रवेशास मनाई केली व त्यांच्या विशिष्ट हिंदीमध्ये फर्मान सोडले .सब लोग यहां  खडे रहेंगे. आणि घाबरत घाबरतच लाईन लावली .यांच्याशी उंचीप्रमाणे पहिला सर्वात उंच, त्यानंतर प्रभाकर,  मी असे करता करता सगळ्यात शेवटी भारत चुरी उभा राहिला. मुलींच्या मध्येही तशीच रांग लागली. नानांनी ताबडतोब दुसऱ्यादा फर्मान सोडले. ऐसे नही….. कमी उंची वाले प्रथम, लंबी टांग वाले आखिरी नंबर लगाईये! झाले, भारत पहिला आणि हरिहर शेवटी! अशाप्रकारे लाईन लागली त्यानंतर नानांनी भारतला दरवाजा मध्ये बोलून प्रवेशासाठी मध्ये घेतला. मध्ये गेल्या गेल्या एक जोराचा धपाटा असा घातला की भारत, कोलमडून, पॅण्ट सांभाळून  व्यायाम  मंदिराच्या खाली मान घालून ऊभा राहीला. नशिबाने जास्त उंची मुळे माझा नंबर जरा शेवटी शेवटी असल्याने मला मनाची तयारी करायला थोडा वेळ मिळाला! कारण प्रत्येकाला त्याच्या तब्येतीप्रमाणे ,एकतर गंगाराम नाहीतर नानांचा उजवा हात असा प्रसाद मिळत होता. मुलींना मात्र नानांनी कोणत्याही प्रकारे प्रसाद व धपाटे न घालता, त्यांना एक लहान फेरी, व्यायाम शाळेभोवती धावत करण्यास सांगितले व त्यांची सुटका झाली. त्या दिवसाची आज आठवण आल्यावर आम्ही  मित्र मंडळी भरपेट हसतो. विशेषतः कमी उंचीवाल्या, भारत सारख्या आमच्या मित्रांनी त्यादिवशी पहिला “प्रसाद खाऊन”आम्हाला थोडी,मनाची तयारी करण्यास वाव दिला याबद्दल त्यांना धन्यवाद ही देतो. विशेषतः आम्हा 1959 सालच्या एसएससी बॅच त्याची आम्ही मित्रमंडळी एक 2019 शाली पुन्हा भेटलो ती जागा आमच्या व्यायाम शाळेच्या समोरील पटांगणात होते त्यामुळे जुनी आठवण प्रत्येकाला प्रकर्षाने झाली दुर्दैवाने नाना त्यावेळी या जगात नव्हते नाहीतर त्यांनाही आम्ही त्यादिवशी बोलावून त्यांचा हार्दिक सत्कार करून ही आठवण त्यांनाही सांगितली असती. आमच्या सर्व  गुरु जनांचा आम्ही त्यावेळी  खूप आदरपुर्वक  सन्मान केला होता. 

          नानांनी स्वतःचे एक लहानसे घरगुती विद्यार्थी वसतीगृह आपल्या घरी चालू केले होते. आठ दहा विद्यार्थी, त्यांच्या घरी राहून हायस्कूलचा अभ्यासक्रम पूर्ण करीत. माझे काही मित्र ही नानांच्या वसतीगृहात रहात व त्यांचे विषयी खूप आदराने बोलत. एरवी कणखर आणि रागीट वाटणारे नाना या मुलांचे बाबतीत, शाळेतून घरी आल्यावर, खूप प्रेमाने व खेळीमेळीने संवाद साधीत. एवढेच नव्हे तर काही गरजू मुलांना आर्थिक सवलती देऊनही,त्यांना आपल्याकडे ठेवून घेत असत. त्या मित्र॔ना,आम्ही जेव्हा त्यांचा अनुभव विचारीत असू तेव्हा ते अतिशय कौतुकाने नानांच्या बद्दल बोलत असत. त्यांच्या वस्तीगृहात  एकादे वर्षी प्रवेश मिळवणेही  कठीण जात असे .

       नानांचा मुलगा रवींद्र माझा चांगला मित्र होता .रवी एक छान गायक देखील होता व शाळेच्या व आंतरशालेय गायन स्पर्धेत देखील त्याचा नंबर येत. असे त्याचे आवडते गाणे ‘झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात ‘…अजूनही माझ्या कानात गुंजते. रवीचा गोड आवाज आजही आनंद देतो . दुर्दैवाने रवी आज या जगात नाही हे मला त्याच्या मृत्यूनंतर, नुकतेच,काही वर्षानंतर कळले. नानांच्या तीन अपत्यांपैकी सरोजताई व रविंद्र आज हयात नाहीत . मात्र  त्यांची एक कन्या  निर्मला हयात आहे. रवीचे चिरंजीव, श्री वैभव बरोबर, हा लेख लिहितानाच माझा परिचय झाला आणि त्याचीही मदत काही जुने फोटो व माहिती मिळवण्यात, मला झालेला आहे. वैभवचे मी आभार मानतो.

    1928 ते 1962 अशी 34 वर्षे बोर्डी हायस्कूलला उत्तम सेवा देऊन नाना वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्याने, सेवानिवृत्त झाले. कोणतेही मैदानी सामने असुदे, जिल्हा क्रीडा महोत्सव असो, विजयी संघ व विजयी खेळाडू सुनाबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल असणार हे ठरलेले! नाना खरोखरीच मैदान गाजवीत. येथील तरुण विद्यार्थ्यांची मानसिक ताकद  आचार्य भिसे गुरुजी,आचार्य चित्रे गुरुजी यांनी वाढवली, तर शारीरिक ताकद आमच्या नानांनी! नानांच्या बालपणाविषयी मला विशेष माहिती मिळाली नाही. मात्र त्यांचे बालपण खूप खडतर गेले एवढे कळले. खूप शिकण्याची इच्छा व गुणवत्ता असूनही नानांना जास्त शिक्षण घेता आले नाही. मात्र बालपणापासून शिक्षक होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा मात्र परमेश्वराने पूर्ण केली, हे आम्हा विद्यार्थ्यांचे सद्भाग्य !बडोद्याचे जागतिक कीर्तीचे व्यायामपटू राजरत्न माणिकराव  नानांचे आवडते शिक्षक, हे मी मागे सांगितलेच आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे नानांनी शारीरिक शिक्षणाला महत्त्व दिले व आयुष्यभर त्याचे महत्त्व लोकांनाही पटविले .नानांचा आवडता छंद म्हणजे छोटे नाट्य प्रवेश लिहून ते मुलांकडून करून घेणे, हेही सांगितले आहे तसेच कविता करणे हे देखील त्यांना चांगले जमत असे. आमच्या बोर्डी हायस्कूलच्या अनेक संघांची,’ संघ गीते’,नानांनी लिहून  दिलेली आहेत. नाना शिस्तीचे भोक्ते होते व इतरांकडून, थोडीही बेशिस्त त्यांना खपत नसे. आजही, आमच्या बोर्डी शाळेच्या उत्कृष्ट शिस्तीचा, व बोर्डीच्या शाळेतील आजी,माजी विद्यार्थ्यांनी शिस्तीचा वारसा जोपासण्यात, नानांचा फार मोठा वाटा आहे. नानांना हाडवैद्यकीचाही छंद होता. त्याही बाबतीत आजूबाजूच्या गरजू लोकांना त्यांनी सेवा दिलेली आहे. आचार्य भिसे, चित्रे या आपल्या वरिष्ठांचे बरोबर, त्यावेळी भारतात चालू असलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीत ही नानांनी आपले योगदान देऊन ठाण्याचे तुरुंगात तुरुंगवासही भोगलेला आहे. “आधी केले मग सांगितले”… नानांच्या शिस्तप्रिय जीवनाचा हाच संदेश आहे.

सेवानिवृत्तीनंतर नानांनी रवीच्या नोकरीनिमित्ताने मुंबईत बि-हाड केले आणि बोर्डी सोडली. अखेरपर्यंत त्यांचा मुक्काम बोरिवलीला होता . योगायोगाने ज्या वसाहतीमध्ये खंडू मामा राहात होते, त्याच बोरीवलीच्या, गोविंद नगर भागात रविनचेही निवासस्थान होते. त्यामुळे कधी खंडूमामाकडे गेल्यास, मी नानांची ही भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेत असे. प्रथम त्यांच्याकडे गेलो तेव्हा खूपच दबकत गेलो होतो, कारण मागच्या आठवणी काही विसरल्या जात नव्हत्या. मात्र सेवानिवृत्त झालेले, आपल्या मुलाकडे राहणारे नाना, मला अगदीच वेगळे वाटले. खूप बदलले होते व त्यांच्या एकंदर वागण्या बोलण्यातही खूपच आत्मीयता व आस्था जाणवत होती. जेंव्हा  नाना त्यांच्या बोरिवलीच्या घरी  अखेरचे आजारी पडले, त्यावेळी खंडू मामाने ही गोष्ट आप्पांना सांगितली व आप्पा खास नानांना भेटण्यासाठी मला घेऊन त्यांच्या बोरीवलीच्या घरी गेले होते. नाना त्यांच्या घरीच खाटेवर झोपले होते. आप्पांना पाहताच त्यांनी ‘वामन ये,’ अशी अगदी जेमतेम हाक मारली. आवाज मोठ्याने येत नव्हता. जास्त बोलण्याचे त्राणही उरले नव्हते, पण आप्पांचा हात हातात घेऊन फक्त डोळ्याने हे गुरु-शिष्य एकमेकांकडे नुसतेच पाहत होते. डोळ्यांतून येणारे अश्रू हेच त्यांचे शब्द झाले होते … “शब्दावाचुनि , शब्दांपलीकडील” काहीतरी दोघांनाही कळत होते. मी देखील नानांना  चरण स्पर्श करून नमस्कार केला. थोडा वेळ आम्ही तिथे बसलो. नानांना बोलण्याचेही श्रम होत होते. मलाही खूप वाईट वाटले. ज्या माणसाच्या एका डरकाळीने , विस्तीर्ण पटांगणावर असलेले आम्ही सर्व विद्यार्थी, ताबडतोब  अटेन्शन ‘ मध्ये उभे राहत असू ,व तेथे,”पीन ड्रॉप सायलेन्स”  निर्माण होत असे, त्या नानांना, हलके आवाज  काढण्याचेही कष्ट होताना पाहून काळाचा अगाध महिमा कसा असतो ते जाणवलं. काही दिवसांनी नाना गेल्याचे कळले. आप्पांनी त्या दिवशी संपूर्ण उपवास केला व त्यांच्या श्री दत्त गुरूची मनोभावे प्रार्थना म्हटली. त्यानी आपल्या गुरुजींना वाहिलेली  ही श्रद्धांजली होती. नानांचे  निधन झाल्यानंतर, काही काळाने रविंद्रने बोर्डी गावातच  जुनी बालवाडी होती, त्या भागात स्वतंत्र टुमदार घर विकत घेतले व सुट्टीच्या दिवशी अधून-मधून  मळेकर कुटुंबीय तेथे येऊन राहात असत. मीदेखील एकदा रवींद्रला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो. समुद्रकिनारी असल्यामुळे खूपच हवेशीर जागा आहे. मात्र आता अनेक वर्षात त्या भागात मी गेलो नसल्याने ते घर मळेकर कुटुंबीयांकडे अजून आहे किंवा कसे मला काहीच माहित नाही. त्यांची मुले कुठेही असोत, आनंदात असोत अशीच प्रार्थना मी करतो. कारण त्यांच्या नानांनी आम्हा शाळेच्या विद्यार्थ्यांना नव्हे तर आमच्या आधीच्या काळातील बोर्डीच्या पंचक्रोशीतील तरुण पिढीलाही व्यायामाचे धडे देऊन, एक बलिष्ठ व शिस्तप्रिय नवी पिढी घडविण्याचे महत्कार्य केले आहे.त्यामुळे आमच्या भावी आयुष्याची वाटचाल निश्चितच सुकर झाली .

     त्या दिवशी झालेल्या ,आप्पा आणि नाना यांच्या अखेरच्या भेटीचे कुतूहल अजुनही मिटलेले नाही. तेथे एक हि शब्द उमटला नाही. हृदयाची भाषा डोळ्यातील अश्रू,  बोलून दाखवीत होते. मी आणि रवींद्र एकमेकाकडे पहात त्या भाषेचा अन्वयार्थ लावून पाहत होतो आमच्या डोळ्यांच्या कडा ही भिजल्या होत्या. नाना आणि आप्पांना माहिती होते,आता ही शेवटचीच भेट.मला त्यावेळी नाही, पण नंतर कधीतरी आप्पांना त्या प्रसंगाबद्दल विचारावयाचे होते मात्र ते राहून गेले ..आज नानांच्या बद्दल दोन शब्द लिहीत असताना तो प्रसंग आणि ते कुतूहल पुन्हा जागे झाले.. एखाद्याचे अंतिम समयी शब्द नेमके काय असतात, याची आपल्याला अतिशय उत्सुकता लागलेली असते. एखाद्याचे वयोवृद्ध वडील गेले आणि जेव्हा नातेवाईक भेटायला येतात तेव्हा, काय म्हणाले हो ते जाताना? असे हमखास विचारले जाते.आयुष्याच्या अंतिम काळी माणूस जे बोलतो ते खरेखुरे असते ,त्यात दांभिकपणा, मीपणाचा लवलेशही नसतो. बरेच वेळा आपल्या आयुष्यातील काही चुकांची आठवण होऊन,पश्चातापाची भावना प्रकट होत असते. आयुष्यातले सर्व मुखवटे ,पुटे,गळून पडत असतात  आणि छोट्या बाळाची निरागसता  प्राप्त झालेली असते.त्यामुळे जे काही व्यक्त होते ते अगदी हृदयापासून सांगितलेले सत्य आणि सत्यच असते. नानांना त्यांच्या प्रिय शिष्याला शेवटी काय सांगावयाचे असेल ?..त्यांना नक्कीच ते जुने, आनंदमयी दिवस, ते मेळे, ते गणपती उत्सव, त्यात वामनचे योगासनाचे विविध प्रकार, इतरही अनेक शिष्योतमांनी केलेला क्रीडा नैपुण्याचा अविष्कार, लोकांचे मनोरंजन, नानांना मिळालेली शाबासकी…तर कधीतरी शिष्यांनी केलेल्या चुकांमुळे, अनावर झालेला संताप…असे सगळे सगळेच आठवले असेल…आणि वाटले असेल.. “माफ करा, वामन, आणि माझ्या प्रिय मित्रांनो, जे असे  काही झाले, ते ही तुम्हा सर्वांच्या प्रेमापोटी होते…भल्यासाठी होते …त्याचा राग मानू नका चांगल्या गोष्टींची आठवण ठेवा..  माझे तुम्हा सर्वांना आशीर्वाद….” ते अश्रू हीच मूक भाषा बोलत असतील का??

          नानांनी आम्हाला व्यायामाचे धडे हिंदी भाषेतून दिले. हिंदी, तोपर्यंत राष्ट्रभाषा झाली नव्हती .पण नाना हिंदीचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांच्या आवडत्या हिंदी भाषेतून नानांसाठी या दोन ओळींची  आदरपूर्वक श्रद्धांजली …

स्वस्थ  शरीर का महत्व, हमने आपसे ही जाना,  

आप ही को हमने गुरु है माना.

सिखा है बहुत कुछ आप ही से हमने,  

आपकी “तालीम” का मक्सद,  कभी भी,ना भूलेंगे, नाना. …

नानांच्या स्मृतीला मनापासून अभिवादन.???