सर्वांचे आवडते, -एस् आर् सावे सर
एस् पी. एच् . हायस्कूल सोडल्यानंतर आणि घोलवड गावी निवास झाल्यानंतर, आजपावेतो कित्येक वेळा,घोलवड हून, बोर्डीला काहीना काही कामासाठी जाणे होतेच. मात्र प्रत्येक वेळी जाताना, उजवीकडील हाताला, “शारदा आश्रमाचे” मुख्य द्वार आले की,नजर डावीकडील त्या, बंद खिडकीकडे जाते.आज ती खिडकी बंद आहे. एकेकाळी, त्या खोलीची खिडकीच नव्हे ,तर त्या खोलीचे द्वार देखील, सदैव उघडेच असे. मला वाटते ते द्वार अगदी रात्री देखील उघडेच असे… .कोणासाठीही…. शारदाश्रमांतील विद्यार्थी असोत, बोर्डी हायस्कूलचे विद्यार्थी असोत, माजी विद्यार्थी असोत, वा विद्यार्थ्यांचे पालक असोत, हे द्वार सर्वांसाठी सदैव उघडे असे ..कारण ज्या खोलीला हे द्वार होते,ती दारे खिडक्या,आज बंदअसलेली,ही खोली, एके काळी, आमचे परमप्रिय, चैतन्य मूर्ती गुरु, एस् आर् सावे सर यांची होती. शारदाश्रमात त्यांनी,सतत 42 वर्षे दिलेल्या सेवेमध्ये ,त्या खोलीने, त्यांची साथ कधीच सोडली नाही.रस्त्याकडील, बाहेरच्या जगाचा, सतत संपर्क ठेवणारी,ती खिडकी होती. आज ती बंद पाहताना सहज मनामध्ये विचार आला…. खिडकीला गवाक्ष म्हणतात. अक्ष म्हणजे डोळा… सरांनी शारदाश्रम सोडले की त्यांना सोडावे लागले….माहिती नाही…,आणि, जिने बेचाळीस वर्षे सतत,त्यांना साथ दिली, त्या जीवनासाथी कक्षाला ,कायमचा निरोप दिला, आणि सर ,आपल्या बोर्डी येथील निवासस्थानी रहावयास गेले.. त्या विरहाच्या दुःखामुळेच असेल का.?.. त्या कक्षाच्या, “गवाक्षा’ ने आपले अक्ष ही कायमचे मिटून घेतले..,ते, आजतागायत.

एस आर सावे सर, म्हणजे आमच्या बोर्डीच्या हायस्कूला तील श्री.सखाराम रामचंद्र सावे, मुळगाव बोर्डी ,शिक्षण मॅट्रिक व सीपीएड, एस टी सी ,हायस्कूलमध्ये शिक्षक,सन 1943 पासून 1974 पर्यंत ,शाळेचे आणि संस्थेचे एकनिष्ठ सेवक, माजी विद्यार्थी संघाचे संस्थापक व कार्यवाह,शिबिर निवास व विश्रामधाम चे व्यवस्थापक, आजन्म ब्रह्मचारी, विद्यार्थ्यांचे लाडके ,मुलांवर प्रेम करणारे, चैतन्य मूर्ती … एस आर सावे सर म्हणजे फक्त एस आर सावेच!!
कै. गोटू भाऊ यांचे चिरंजीव म्हणजेच, प्रताप सावे सर. त्यांनी देखील बोर्डी हायस्कूल मोठी सेवा दिली. त्यांचे अकाली निधन झाले. बोर्डीच्या हायस्कूलचे एक आद्य संस्थापक कै.आत्माराम पंत सावे यांच्या कन्या मालतीबाई ,यादेखील बोर्डी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्या. मालतीबाई या आमच्या “आठवी ड”या इयत्तेच्या व माझ्या वर्गशिक्षिका होत्या. माझेही ते हायस्कूलांतील पहिलेच वर्ष आणि बाईही त्याचवर्षी शाळेत शिक्षका म्हणून प्रथमच, रुजू झाल्या होत्या. माझा इयत्ता आठवी ते अकरावी व पुढे साताऱ्याला ,छत्रपती शिवाजी कॉलेजांत, दोन वर्षे सहाध्यायी असलेला, अरुण गोपाळ सावे , याने देखील आमच्या बोर्डी हायस्कूलमध्ये , शिक्षक म्हणून खुपच मोठी सेवा दिली आहे.दुर्दैवाने अरुण ही अकालीच गेला, आणि एक उमलते,व्यासंगी ,व्यक्तिमत्व अचानक अस्तंगत झाले. अशा रीतीने या सावे कुटुंबातील,अनेकांनी, बोर्डी हायस्कूलात, ज्ञानदानाचे, मोठे योगदान दिले आहे. गजू भाऊ यांचा आणि माझा 1965 -70 या कालखंडात खूपच जवळून संबंध आला.तेव्हा मी वसतिगृहात प्रथम विद्यार्थी, व नंतर रेक्टर म्हणून कार्यरत होतो, व गजूभाऊ आमच्या सोक्ष संघाशी खूप जवळीक ठेवून होते. कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्याशी त्यांचे जवळचे व मित्रत्वाचे व संबंध असल्यामुळे ते संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात, सभेस हजर असत, व प्रत्येक वेळी सभेला प्रबोधनही करीत.त्या काळात अमेरिकेत दीर्घकाळ वास्तव्य करून,बहुतेक सारा अमेरिका देश, फिरून आलेले, आमच्या समाजातील अगदी थोड्या व्यक्तीपैकी, गजू भाऊ एक होते ,आणि त्यांना’ मी पाहिलेली अमेरिका…’,आपल्या ज्ञाती बांधवांना सांगण्याची,खूप आवड होती.मी बोर्डीचा विद्यार्थी ,म्हणून माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलत असत. त्यांची कन्या डॉक्टर प्रतिभा सावे या त्या काळातील समाजांतील एक प्रतिथयश व प्रसिद्ध डॉक्टर होत्या.त्यांचे यजमान देखील, अमेरिकेत ,डॉक्टर की पेशात होते.तेथे त्यांनी मोठे नाव कमावले आहे. आज हे दोघेही हयात नाहीत सरांचे कोणतेच बंधूहीआज हयात नाहीत.

सरांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी बद्दल मला विशेष माहिती नाही मात्र मला जी थोडीफार माहिती आहे ती एवढीच की हे सर्व चार बंधू त्यांतील कै.गोटू भाऊ हे ज्येष्ठ बंधू,त्यानंतर गजू भाऊ दुसरे बंधू, सावे सर आणि खंडू भाऊ असे हे चार बंधू होते. मला वाटते सरांना दोन बहिणीही होत्या त्यांतील एक विलेपार्ल्यात राहात असे . सर सणासुदीला आपल्या बहिणीच्या घरी पार्ल्यातव एत असत. त्यांची दुसरी भगिनी वसईस राहत असे. असेच एकदा भेट झाल्यानंतर,सरांना ,मी मुंबईत विलेपार्ले येथे राहतो असे कळले. आपल्या बहिणीकडे आले असता, त्यांनी मला फोन करून माझ्या घरी येत आहे असे कळविले. आणि खरोखरीच त्या दिवशी संध्याकाळी, सर माझ्या मुंबईतील निवासस्थानी येऊन आपली पायधूळ झाडून गेले.या गोष्टीचे खूप खूप अप्रूप आजही मला आहे..
” एस आर सावे” हे नाव आज,त्यांच्या कोणत्याही माजी विद्यार्थ्यांच्या ओठावर आले की,पहिला उद्गार निघतो ..”अरे वा,आमचे लाडके सावेसर..”..खरंच, सर एवढे विद्यार्थीप्रिय का झाले? शिक्षणशास्त्रातील वा इतरही कोणत्याच पदव्या नसताना,केवळ मॅट्रिक आणि सीपीएड एसटीसी या गुणवत्तेवर, सरांनी त्यावेळेचे आमच्या हायस्कूल मधील ,अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक असा लौकिक मिळविला!! सर आम्हा विद्यार्थ्यांना खूप जवळचे लाडके होते मात्र यांच्याविषयी आमच्या मनी सदैव एक आदरयुक्त प्रेम राहिले. विद्यार्थी व शिक्षक यांतील, आवश्यक तेवढे अंतर ठेवूनच,हा आदर व्यक्त होत असे.कधीही,आम्ही त्यांच्याशी असलेल्या सलगी चा, गैरफायदा घेतला नाही व सरांनी ही तो घेऊ दिला नसता, एवढे ते चाणाक्षही होते.
त्यांचे शिकवणे एका वेगळ्याच धाटणीचे होते. वर्गात शिकविताना,कोणताच मोठा आविर्भाव न आणता, अगदी हसत खेळत, विषयाची मांडणी करीत आणि त्यावेळी त्यांचे व्यक्तिमत्त्वातील मिश्किल स्वभाव,उत्तम विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा, आणि सदैव आनंदी राहण्याची वृत्ती,यांचा प्रत्यय येई.सरांचा तास म्हणजे ज्ञान,मनोरंजन व चैतन्य याचा अनोखा मिलाफ,त्यामुळे मुलांना तो कधीच चुकवावा वाटला नाही. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होते, तारुण्यात एक चांगले खेळाडू असल्यामुळे शरीरयष्टी ही कमावलेली होती, लालसर गौरवर्ण, भारदस्त व स्पष्ट असा आवाज, हसतमुख चेहरा,शुद्ध उच्चार आणि लिहिताना कागदावर वा फळ्यावर काढलेले टपोरे अगदी, शेवटच्या बाकावरील विद्यार्थ्याला दिसेल असे अक्षर,यामुळे त्यांच्या तासाची आम्ही नेहमीच वाट पहात असू.
शिक्षक विद्यार्थी प्रिय का होतो ,याचे मानसशास्त्रीय अथवा शिक्षण शास्त्रीय स्पष्टीकरण मला माहीत नाही. केवळ अनुभवाने मी सांगू शकतो कि …ज्या विद्यार्थ्याला घडविण्याचे आपल्या नशिबी आले ,तो केवळ विद्यार्थी नसून,आपला पाल्य आहे, मुलगा आहे, ही मातृप्रेमाची भावना, जेव्हा शिक्षकाच्या मनी वसत असते, तेव्हां ती,वात्सल्याची स्पंदने, विद्यार्थ्यांना ही आपोआप जाणवतात,आणि त्यांची ही,प्रतिक्रिया आपल्या त्या शिक्षका प्रति ,नैसर्गिक आपुलकीची होते. सावे सरांच्या व्यक्तिमत्त्वातच ही प्रेममयता , करुणामयता ओतप्रोत भरली होती. एखाद्याला मदत दिल्यावर, आपण काहीतरी परोपकार करीत आहोत,असे त्यांना कधीच वाटले नाही, कारण उपकार हा शब्द त्यांच्या कोशात नव्हताच मुळी ! समोरचा मुलगा बोर्डीचा, घोलवडचा की,शारदाश्रमातील असो,कोणत्याही जाती धर्माचा असो, गरीब असो श्रीमंत असो,हुशार असो थोडासा अभ्यासात मागे ही असो, हा मुलगा माझा आहे.. माझा विद्यार्थी आहे. याला माझी कुठे तरी गरज भासते आहे… हा प्रेमा,त्यांचे मनी सदैव वसत असे,आणि मुलांनाही तो,जाणवत असे, म्हणूनच ते विद्यार्थीप्रिय झाले, त्यावेळीही होते, आज त्यांच्या मृत्यूनंतरही आम्हाला ते तेवढेच प्रिय आहेत!!
आम्हा, गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा संबंध सरांशी शिकवण्या अथवा खेळण्या पुरता असे.मात्र शारदाश्रमांतील विद्यार्थी 24 तास त्यांचे संपर्कात असत. देशाच्या विविध प्रदेशातून आलेली, विविध भाषिक, अनेक जाती-धर्माची, वेगवेगळ्या बौद्धिक कुवतिची ही मुले सांभाळणे तसे सोपे काम नव्हते. मात्र तरीसुद्धा भिसे,चित्रे,सावे या त्रयीने, ज्या ममतेने ,ही मुले सांभाळली, नुसती सांभाळली नाही तर त्यांना भावी आयुष्यात उपयोगी पडतील असे अनेक उत्तम संस्कारही दिले,त्यांची थोरवी काय वर्णावी!! खरे म्हणजे आई-बाबांनाही जी मुले सांभाळता आली नाहीत, अशीही कित्येक मुले यांनी सांभाळली व ते त्यांचे कायमचे आई-बाबाच झाले. चित्रे गुरुजी सारख्या सांदिपनी ऋषी च्या सहवासात, सर खूप वर्षे राहिले,त्यामुळे ,त्यांच्या उपजत विद्यार्थी प्रेमाला, समर्पणाचे एक वेगळे परिमाण प्राप्त झाले.शारदाश्रमा मुळे, बोर्डी हायस्कूल चे नाव मोठे झाले व बोर्डीच्या हायस्कूल मुळे शारदा श्रमाचे नाव भारतात प्रसिद्ध झाले,असा हा परस्परावलंबी कारभार होता आणि यात सावे सरांचा मोठा वाटा होता हे मान्य करावे लागेल.
मी जेव्हा 54 झाली शाळेत आलो तेव्हापासून मला सावे सरांची शिकवणी मिळाली.सरांनी आम्हाला इतिहास, भूगोल हे विषय शिकविले विशेषतः इतिहास त्यांचा हातखंडा व आवडता विषय .इतिहास शिकवताना ते जणू स्वतः त्या कालखंडात जात आणि आम्हालाही त्या कालखंडाचे जणू साक्षीदार करीत!! याचे कारण स्वतः , इतिहास जगले होते.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या सरांनी आपला प्रत्यक्ष सहभाग देऊन तुरुंगवास ही भोगलेला होता. त्यामुळे त्यांच्याकडून इतिहास शिकणे मोठी पर्वणी असे.याशिवाय आमच्या एनसीसी या राष्ट्रीय संस्थेचे देखील प्रमुख म्हणून काम पहात. खेळ व व्यायाम या तासांचे वेळी नाना मळेकर सरांचे बरोबर ,त्यांचा सहभाग असे. शाळेच्या सर्व सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात सावे सरांचा भाग असेच.आपण खूप उच्चशिक्षित नाही, ही जाणीव, त्यांना होती आणि त्यामुळेच आपल्या त्या शैक्षणिक पात्रतेचा, कोणताही न्यूनगंड मनात न ठेवता,त्यांनी समरसतेने शिकविले व आपल्या मुलांवर भरभरून प्रेम करून अभ्यासाव्यतिरिक्त ही, त्यांच्याकडे आलेल्या कोणत्याही गरजू मुलाला, त्यांनी नाराज करून पाठविले नाही. म्हणूनच, सदैव, मुलांना ते हवेहवेसे वाटत. आदर्श आणि विद्यार्थीप्रिय शिक्षकडे,दुसरा ,एक गुण म्हणजे,आपल्या शिक्षकाला भेटण्यासाठी विद्यार्थ्यास कोणतेही वेळी ,निसंकोचपणे, सहजगत्या भेटता यावे, आणि त्यावेळी आपल्या मनातील कोणतीही अडचण,अगदी वैयक्तिक बाब देखील, कोणताही आडपडदा न ठेवता,निसंकोचपणे सांगता येणे. या बाबतीत ही ,आमचे सावे सर शंभर टक्के कसोटीस उतरले.आम्हा मुलांना कधीही,त्यांना भेटून, आमची अडचण सांगण्यात काहीही भीड वाटली नाही .म्हणूनच मी वर म्हटले आहे, अगदी रात्री देखील त्यांचे दरवाजे मुलांसाठी सदैव उघडे असत. असे अनुभव, शारदाश्रम मधील अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले आहेत. त्यावेळी बोर्डी गावात आम्हाला खेळण्यासाठी मैदाने होती, पण वॉलीबॉल, क्रिकेट अशा महागड्या खेळाचे साहित्य मात्र आम्ही विकत घेऊ शकत नव्हतो. आम्ही धर्मशाळेच्या वा होळी वरील मराठी शाळेच्या पटांगणात व्हॉलीबॉल खेळत असू. आमची टीम दरवर्षी दसरा-दिवाळीच्या सामन्यात सामील होत असे. सर तेव्हा आम्हाला खेळताना पहात असत. आणि म्हणून, कधीतरी जेव्हा आम्ही त्यांना शाळेत अथवा गावांचं भेटत असू, ते स्वतःहून चौकशी करीत ..”अरे काही नेट, बॉलची गरज आहे का..?” आणि खरोखरच आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर, आमची अडचण समजून, काहीही न विचारता, सरळ आम्हाला जवाहर ब्लॉग च्या मागील, स्टोअर रूम मध्ये घेऊन जात व किल्लीने कुलूप उघडून.. “यातून तुम्हाला काय हवे ते निवडा..” एवढेच सांगून आम्हाला हवे ते व हवे तेवढे खेळाचे सामान त्यातून देत असत. हे सामान शारदाश्रमांतील विद्यार्थ्यां नी थोडेसे वापरलेले असल्याने जुने असे,मात्र आमच्या वापरासाठी अगदी उत्तम असे होते. शालेय जीवनात आम्हा विद्यार्थ्यांना, क्रिकेट,हॉलीबॉल चे सामान कधीच विकत घ्यावे लागले नाही,आणि ते जर विकत घ्यावे लागले असते, तर आम्हाला हे खेळ खेळताच आले नसते हे ही खरे आहे. आम्ही फार मोठे खेळाडू होऊ शकलो नाही हे खरे, मात्र त्या काळात या विदेशी खेळांची हौस पुरवू शकलो आणि त्यामुळेच तंदुरुस्त राहण्यास मदत झाली, याचे श्रेय आमच्या सावे सरांनाच द्यावे लागेल. कदाचित त्यांच्या शालेय व उमेदीच्या जीवनात,खेळाची खूप आवड असूनही, असे खेळ, प्रतिकूल परिस्थितीमुळे व साहित्या अभावी ,खेळता नआल्याने, आम्हा गरीब मुलांना खेळतांना पाहण्यात त्यांना खूप आनंद वाटत असावा .
त्याकाळी बोर्डी शारदा आश्रमांत मुंबई पुणे कोल्हापूर सुरत बडोदा अहमदनगर वगैरे महाराष्ट्राच्या व भारताच्या विविध भागांतून मुले येत असत. शारदा आश्रमांत सर्वांना प्रवेश मिळणे कठीण असे. पालकांच्या अडचणींचा विचार करून प्रवेश दिला जाई. उनाड मस्ती खोर मुलांनादेखील प्रवेश दिला जाई. अशी मुले येथे आल्यानंतर भिसे, चित्रे, सावे या त्रिमूर्ती च्या मार्गदर्शनाखाली जीवनाचा एक नवीन कालखंड सुरू करीत. ही खात्री पालकांना असे आणि म्हणूनच अशा विद्यार्थ्यांचे पालक मुद्दाम त्यांना शारदाश्रमात पाठवीत. विजय नावाचा एक मुलगा ,जेव्हा प्रथमच शारदा आश्रमात दाखल झाला तेव्हा, अभ्यासाव्यतिरिक्त बाकी सर्व गोष्टी, विशेषतः खेळ, आणि खेळातही क्रिकेट खेळ सतत खेळत असे. अगदी नेहमीची बॅट न मिळाल्यास, नारळाच्या झावळी पासून बनविलेली बॅट ही त्याला चालत असे. हाच विजय पुढे ‘विजय मांजरेकर’ या नावाने भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात, क्रिकेटच्या क्षेत्रात, प्रसिद्धीला आला .त्याच्या कथा एकाव्या सरांच्यातोंडून!त्याच्या या उज्वल यशाचे मोठे श्रेय निश्चितपणे, शारदाश्रमांतील त्या वेळच्या, या तीन मार्गदर्शकांना आहे. असे अनेक ‘विजय’ या त्रिमूर्ती ने, आपल्या मायेने, प्रेमाने, आणि स्वतःच्या आदर्श वागणूकीने मिळविले.प्रवेशासाठी,फर्स्ट कम फर्स्ट ही पद्धत होती .तरी एक गोष्ट विशेष ध्यानात घेतली पाहिजे,ती म्हणजे, या व्यवस्थापकांनी प्रवेश देताना ,आई नसलेल्या मुलांचा प्रथम विचार केला, ही गोष्ट खूप काही सांगून जाते. आई किंवा बाबा अथवा दोन्हीही नसणाऱ्या मुलांना, येथे आई-बाबा मिळाले, त्यामुळेच अशी मुले पुढच्या आयुष्यात शारदाश्रमाशी, विशेषतः चित्रे, सावे सरांच्या सतत संपर्कात राहिली.ही प्रेमाची शिदोरी आयुष्यभर त्यांचे उपयोगाला आली .एका मुलाने यासंदर्भात काढलेले उद्गार हे किती समर्पक आहेत पहा.. त्या मुलाने एका स्मरणिकेत लिहिले आहे .. “ज्या ज्या वेळी, आम्ही मुंबईहून, शारदा आश्रमात, पुनःभेटीसाठी येत असतो, तेव्हां,..” सासरी गेलेल्या मुलीला, आपल्या माहेरी आल्यावर, जो आनंद होईल तसा आनंद आम्हाला होतो ..” ..अगदी नेमक्या शब्दात त्याने सर्वच शारदाश्रमीय वासियांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सरांना स्वतःचा संसार कुटुंब करता आले नाही मात्र या शाळेचे,व विशेषतः शारदाश्रमाचे विद्यार्थी म्हणजे ,त्यांची मुलेच जणू, अशा तऱ्हेने त्यांनी मुलांना,वागणूक दिली. शारदा श्रमाचे भोजनालयात फक्त शाकाहारी भोजन मिळे. चित्रे गुरुजी या बाबतीत खूपच आग्रही होते. त्यामुळे काही मांसाहार घेणाऱ्या मुलांना कधीतरी चोरून,बाहेरून ते खावे लागे. ही त्यांची निवड ओळखून सावे सरांनी, चित्रे गुरूचीं ना विनंती करून,या मुलांना, वर्षातून एक दिवस,सामीष भोजन मिळावे,अशी विनंती केली. त्यांची विनंती चित्रे सरांनी एका अटीवर मान्य केली, “हे भोजन शारदा श्रमाचे भोजनालयात न बनविता, शारदाश्रमा बाहेर तयार व्हावेे, व तेथेच मुलांनी तो आहार घ्यावा” ही ती अट होती. सावे सरांनीच या बाबतीत पुढाकार घेऊन ,नजीकच रहात असलेल्या ,पाटील कुटुंबीयांना विनंती करून, त्यांचेच परिसरात, हा सामिष भोजनाचा कार्यक्रम, वर्षातून एकदा होत असे.सर ,दिवसभर मुलाशी थट्टा ,विनोद करीत त्यांचे बरोबरच तो दिवस मोठ्या आनंदाने चालवीत. कित्येक मुलांच्या स्मरणात अनेक वर्षांनंतर आजही ही, ह्या दिवसाच्या आठवणी आहेत आणि ,त्याबाबत मी स्वतः माझ्या शारदा आश्रमात राहणाऱ्या मित्रांकडून ऐकले आहे.
सर एक विद्यार्थी प्रिय शिक्षक तर होतेच ,पण मागे सांगितल्याप्रमाणे, स्वतः एक खेळाडू ही होते. खेळ खेळतो, तो खेळाडू हे खरे,मात्र सच्चा खेळाडू तो, ज्याच्या अंगात खिलाडूवृत्ती ही,भिनलेली असते. सरांच्या रोमारोमांत खिलाडू वृत्ती भिनलेली होती. त्यांच्या खोलीत एक रेडिओ होता. त्याकाळी(1955-56) बोर्डी घोलवड पंचक्रोशीत, केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांच्याकडे रेडिओ ची सुविधा उपलब्ध होती. दूरदर्शन तर अजून बरीच वर्षे लांब होते.त्यामुळे क्रिकेट च्या मोसमात, कॉमेंट्री ऐकण्यासाठी,आम्हा विद्यार्थ्यांचा घोळका सरांच्या खोलीत व अवतीभवती राहून कॉमेंट्री ऐकत असे.तेथे कोणालाही मज्जाव नव्हता. अगदी काही मित्र तर, पीरियड ला दांडी मारून, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्यासाठी,तथे गर्दीं करीत. मात्र सरांनी कधीही” तुझा पिरियड ऑफ आहे ,की तू दांडी मारली आहेस ?”अशी चौकशी केली नाही. आपला वर्ग आटोपून,ते खोलीवर आले की ,प्रथम ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारून स्वतःला अपडेट करून घेत ,व मग स्वतःही आमच्या आनंदात सहभागी होत .एक खिलाडू वृत्तीचा शिक्षकच असे वागू शकतो .दूसरा एक प्रसंग अगदी डोळ्यासमोर येतो तो असा.. आम्ही नववीत होतो. आणि 1956 चे “समरऑलिंपिक”, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे चालू होते. भारताला एकमेव सुवर्णपदकाची अपेक्षा होती, ती म्हणजे नेहमीप्रमाणे हाॅकि च्या खेळामधील. त्या दिवशी दुपारी भारत विरुद्ध पाकिस्तान हॉकी चा, अंतिम सामना होणार होता. भारत-पाकिस्तान असल्यामुळे तो खूपच चुरशीचा सामना होणार होता, तोपर्यंत भारताने सर्व सामने जिंकले होते व विशेष म्हणजे आपल्या वर एकही गोल घेतला नव्हता.आम्ही दुपारी वर्गात बसलो होतो. सरांच्या खोलीत या सामान्याचे समालोचन सुरू होते .मात्र साने सरांचा पिरियड असल्यामुळे आम्हाला वर्गात बसणे आवश्यक होते.साने सर शिकवत होते.. मात्र आमचे सर्व लक्ष सामन्याच्या निकालाकडे लागले होते ..भारत सुवर्णपदक मिळविल का?.. पाकिस्तानला हरवेल का ? असे अनेक विचार मनात हेलकावत होते, उत्सुकताही शिगेला पोहोचली होती.. आणि तेवढ्यात सावे सर पटकन वर्गांमध्ये शिरले.. साने सरांना विनंती करून एक मिनिट मागितले.. आणि भारत या सामन्यात एकमेव गोल करून जिंकल्याची आनंदाची बातमी त्यांनी वर्गाला दिली.. वर्गाचा मूडच पालटून गेला, मुलांनी टाळ्यांच्या गजरात त्या सुंदर बातमीचे स्वागत केले!! त्या क्षणापासून ते 1956 चे ऑलिम्पिक तो हॉकीसामना ,एकमेव गोल करून भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा बलबीर सिंग, हे नाव माझ्या कायमचे लक्षात आहे, त्या दिवशी सरांचा तो उत्साह आणि आनंदाने, फुलून गेलेला तेजस्वी चेहरा आठवण झाली की डोळ्यासमोर तस्सा येतो. साने सर त्यावेळी हेडमास्तर होते आणि त्यांचा तापट स्वभावही सर्वांना माहीत होता तरीही अभ्यासाशी काही संबंध नसलेली, अशी वार्ता ,आग॔तुका प्रमाणे, वर्ग चालू असताना, वर्गात येऊन, अभ्यासाशी असंबंधित घोषणा करणे, हे फक्त सावे सरच करू शकत होते. कारण त्यासाठी आवश्यक अशी खिलाडू वृत्ती आणि आपले राष्ट्र व राष्ट्रीय संघावरील निष्ठा , त्यांचे जवळ होती.
माझ्या स्वतःच्या बाबतीत सावे सरांच्या खूपच छान आठवणी आहेत. एक थोडीशी हृद्य व आमच्या त्यावेळेच्या गरीब परिस्थिती शी संबंधित आठवण मुद्दाम सांगतो. आम्ही एनसीसीमध्ये सावे सरांच्या मार्गदर्शनाखाली कवायती करीत असू व कधीतरी गावात श्रमदानाचे ही काम ही आम्ही कॅडेट्स करीत असू. असेच एकदा बाभळे तलावावर, श्रमदानासाठी आम्ही परेड ने चाललो होतो .अर्थातच होळी वरून, कोंडीया तलाव मार्गे, आमची परेड जात असताना माझे घर उजवीकडे लागले. त्यावेळचे आमचे ते घर म्हणजे कुडाची ,कारवी ने बांधलेली अशी चंद्रमौळी झोपडी होती. कशी कुणास ठाऊक पण एका खट्याळ मित्राने चालता चालता पटकन उद्गार काढले,”अरे उजवीकडे ,आपल्या,डी व्ही राऊत चे घर बरे का !”..त्यावेळी,आम्ही मुले एकमेकांना अशी इंग्रजी आद्याक्क्षराने संबोधित असु.अरुणचा ए जी, प्रभाकर चा पी ए,अशी संबोधने होत. सरांनी हे ऐकले होते, मात्र तेव्हा ते काहीच बोलले नाहीत. मधल्या जेवणाच्या सुट्टीत, सरांनी मला व त्या मित्राला बोलावले. विचारले ,”काय रे याच्या घरासमोर तू काय बोललास?” मुलाला आपली चूक कळली होती ,त्याने खाली मान घातली ,काहीच बोलला नाही. सरांनी त्यावेळी उच्चारलेले एक वाक्य, माझ्या मनात कायमचे कोरले गेलेआहे. सर त्याला म्हणाले हे ,, “बघ दिगंबर च्या घराची तू काही काळजी करू नकोस ,तू जशा घरात राहतोस,तशा घरात हा आज राहू शकत नाही, मात्र भविष्यात, दिगंबर ज्या कॉलेजमध्ये शिकेल,त्याच्या प्रवेशद्वारात ही तुला प्रवेश मिळणार नाही हे लक्षात ठेव!”.. मला ते मला हा प्रसंग थोडासा चटका लावूनच गेला कारण, परिस्थितीची दुखरी जखम कोठेतरी ऊघडी झाली होती .मात्र सरांनी मला दिलेला हा मोठा आशीर्वाद आहे, त्यांच्यासारख्या पापभिरू पवित्र, प्रेमळ गुरुने दिलेला हा आशीर्वाद, एक दिवस तरी नक्कीच फळाला येईल अशी मनोमन खात्री ही वाटली! ही उमेद ही खूप काही देऊन गेली, कारण मला तर कॉलेजला जाणे ही मुश्कील होते…ज्या दिवशी सातारचे छत्रपती शिवाजी कॉलेज, जोगेश्वरीचे ईस्माईल कॉलेज, ओलांडून मी,त्यावेळी केवळ भारतातीलच नाही तर , जगप्रसिद्ध अशा ,U D CT, (आत्ताची I C T) ..युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी..या संस्थेत प्रवेश घेतला, त्या दिवशी मला माझ्या सरांचे ते वाक्य आठवले आणि , B.Sc.(Tech), या पदव्युत्तर शिक्षणक्रमासाठी प्रवेश मिळाल्यावर, प्रवेद्वारांतून प्रथम प्रवेश करताना, डोळ्यात पाणी आले . सावे सरांचे आशीर्वाद त्यादिवशी खरे ठरले होते .दुर्दैवाने माझा तो मित्र, एसएससी नंतर आपल्या घरच्या दुकानात पुड्या बांधू लागला होता हेही आठवले.त्याचेही वाईट वाटले. गंमत म्हणजे हा अभ्यासक्रम करीत असतांना कधीतरी मी सरांना बोर्डी गावात भेटलो होतो, आणि ही आठवण त्यांना सांगितली. एन सी सी मधील, तो प्रसंग सरांच्या हि लक्षात होता.त्यांनी आपले नेहमीचे दिलखुलास हास्य केले.
वास्तविक शाळेतून व शारदाश्रमातून ,सरांच्या संपर्कात , 42 वर्षाचे सेवेत, शेकडो हजारो,विद्यार्थी घेऊन गेले .प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांची आठवण पण आजही असणार मात्र सरांनीही अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या नावासहित आठवणीत ठेवले. मी त्यातील एक सुदैवी विद्यार्थी. माझ्या, शाळा सोडल्या नंतरच्या वाटचालीची ,सरांनी नेहमी नोंद घेतली. मी कधी भेटल्यास माझ्याकडेचौकशी करीत ,वा आमचे मित्र राजाभाऊ दमणकर, यांचेकडे ही,ते माझी चौकशी करीत.राजाभाऊंच्या कडून मला ते कळत असे. एकदिवस,अचानक,त्यांचे सुंदर ,टपोऱ्या अक्षरातील पत्र, माझ्या पार्ल्याच्या पत्त्यावर आले.नुसते अक्षर बघूनच मी ओळखले हे पत्र सावे सरांचे आहे . माझी उत्सुकता शिगेस पोहोचली . पत्र उघडून वाची पर्यंत मला काहीच अर्थबोध होत नव्हता. त्या पत्रातून सरांनी माझे अभिनंदन केले होते कारण माझ्या कंपनीत, एका मोठ्या,जबाबदारी च्या जागेवर माझी नेमणूक झाली होती. राजाभाऊ माझ्या ऑफिसमध्ये येऊन ते पाहून गेल्यावर,त्यांनी सरांना ही हकीगत सांगितली होती. आणि म्हणून माझ्या गुरुजींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.. किती नैसर्गिक प्रतिक्रिया.. यालाच वात्सल्य म्हणत असतील का?माझे अभिनंदन करताना सरांनी लिहिले होते ..”आपण, आपल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहात व फॅक्टरीचे चीफ मॅनेजर झाला आहात, हे कळले व याचा मला खूप आनंद व अभिमान आहे ,असेच पुढे जात राहा.,” एवढ्या चार ओळींचे ते पत्र,ते वाचल्यावर डोळ्यातून आनंदाश्रू टपकले. आजही या दिलदार, पितृतुल्य गुरुजींच्या स्नेहा ची आठवण झाली की आदराने मान लवते.
सरांनी आपल्या विद्यार्थ्याचे बाबतीत,संपर्क ठेवला पण आम्ही कुटुंबीय एवढे भाग्यवान ही आमच्या पुढील पिढी बाबत ही सरांनी खूप आस्था दाखविली. माझी पुतणी स्वाती ,म्हणजे बंधू, श्रीकांत ची ज्येष्ठ कन्या,एस एस सी बोर्ड मेरीट लिस्ट मध्ये आल्यावर श्रीकांतच्या गोरेगाव येथील पत्त्यावर,अभिनंदनाचे पत्र पाठविण्यात सावे सर विसरले नाहीत.खरोखरच गतजन्मीच्या, काही पुण्याईमुळे असे सत्वशील शिक्षक विद्यार्थ्यांना मिळतात .आमची सुद्धा हीच पुण्याई, हेच भाग्य,हीच संपत्ती!!

गोखले एज्युकेशन सोसायटीचे पालघर विभागाचे सचिव, व माझे बालमित्र, श्री प्रभाकर राऊत यांनी, सरांच्या दिलदार स्वभावाची वआपल्या विद्यार्थ्यावर असलेल्या त्यांच्या , अकृत्रिम प्रेमाचे दर्शन घडविणारी गोष्ट ही खूप बोलकी आहे. प्रभाकर सर ज्यावेळी नाशिक हून, बोर्डी हायस्कूल वर, मुख्याध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी, जूनमध्ये बोर्डी स आले ,त्यादिवशी च, सर प्रभाकर ना भेटण्यासाठी, खास ,आपल्या चाफा वाडीतील निवासस्थानापासून चालत प्रभाकर च्या घरी आले. त्यांचे अभिनंदन केले. म्हणाले “छान झाले,खूप बरे वाटले.एक माजी विद्यार्थी, आता शाळेची सर्व सूत्रे हाती घेतो आहे. मला खात्री आहे ,आपल्या नेतृत्वाखाली ,शाळेची व संस्थेची खूप प्रगती होईल. तुम्हाला माझ्या सर्व शुभेच्छा!!” सरांनी घराबाहेर उभ्याउभ्या च, अभिनंदन करून ,चहाही न घेता, निघून गेले आणि पुढे काही महिन्यातच सरांचे निधन झाले. एका महान गुरूने ,आपल्या शिष्या वर असा विश्वास प्रकट केला होता, नव्हे त्याला आशीर्वादच दिला होता आणि हा शिष्यही असा कर्तुत्ववान की जाने खरोखरच पुढे शाळेचा व संस्थेचा भव्य विकास करून दाखविला आपल्या गुरुचे शब्द खरे करून दाखविले.
मला त्यांचे पत्र मिळाल्यावर, त्यांना अभिवादन करण्यासाठी ,मी व राजाभाऊ त्यांच्या चाफा वाडीतील घरी भेटावयास गेलो.त्यावेळेस सरांचे वर्गमित्र असलेले एक स्नेही खास आफ्रिकेहून त्यांना भेटावयास आले होते .मोठे उद्योगपती होते व त्यांनी बरीच संपत्ती तेथे जमविली होती. सरांनीच,आम्हाला ही माहिती दिली, माझीही ओळख आपल्या मित्रांना करुन दिली. माझी तोंड भरून स्तुती केली. मला लाजल्या सारखे झाले.माझ्या पाठीवर शाबासकी देऊन,सरांनी माझ्या यशाचे मनापासून कौतुक केले.माझ्या नवीन कामाची ही आस्थेने चौकशी केली.त्यादिवशी कुठेतरी ,सर मला , नेहमीचे सावे सर , वाटले नाहीत. कुठेतरी काहीतरी हरवल्यासारखे सारखे वाटले…सर्व काही ठीक होते,मात्र ते दिलखुलास हसणे हरवले होते, चैतन्याला ग्रहण लागले होते का?” सरांचे घरून निघताना त्यांना अभिवादन करून आशीर्वाद घेतल्याचे समाधान होते मात्र एक खंत मनाशी होती, नेहमीचे सावे सर आम्हाला कां भेटले नाहीत? चित्रे गुरुजी नुकतेच निवर्तले होते त्यांचा वियोग सह झाला असेल का ही शारदा आश्रमापासून ताटातूट मिळाल्याने मन व्यथित झाले असेल काही कळत नव्हते अनेक तर्क वितर्कांनी मन बेचैन झाले. तसेच आम्ही घरी आलो. थोड्याच महिन्यात, सरांचा दुःखद अंत झाल्याचे कळले. रात्री सर झोपले ते पुन्हा न उठण्यासाठी.अगदी अलगद,मृत्युने घाला घातला , एक महान चैतन्य ,कायमचे अंतर्धान पावले .एक आदर्श शिक्षक, स्वातंत्र्यसैनिक , देशभक्त, विद्यार्थ्यांना हवेहवेसे चैतन्य, विद्यार्थ्यांच्या यशात व वैभवात,आपले सुख ,समाधान व आनंद मानणारा एक सच्चा गुरु , आमच्यातून कायमचा निघून गेला होता.
सर आमच्यातून गेले मात्र त्यांचे स्थान त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात कायमचेच आहे.ज्या आम्हा विद्यार्थ्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम करून आम्हाला किशोर वयात आधार दिला, त्यांचे ऋण तर कधीच भेटणार नाहीत. माजी विद्यार्थ्यांनी,” शिबिर निवासाला” त्यांचे नाव घेऊन ते” एस् आर सावे सर कॅम्पिंग ग्राउंड”.. असे केले. त्या परिसरात , सरांचा एक अर्धपुतळा उभारून, त्यांचे उचित स्मारक केले आहे .सरांचे उपकार, अंशतः तरी फेडण्याचा हा माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम.
सर गेले , आम्हा विद्यार्थ्यांच्या अगदी लहान गुणांचे,,खूप खूप कौतुक करुन, त्यांना मार्गदर्शन,व प्रसंगी मदत,प्रोत्साहन आणि,पाठीवर हात ठेवून “असाच पुढे जात राहा..” हे आपल्या सद्भावनेने सांगणारा, एक प्रिय शिक्षक, आमच्या साठी शुभाशीर्वाद रुपी पुण्य व हृद्य आठवणीं चा मोठा साठा मागे ठेऊन गेला. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हृदयात त्यांचे स्थान अमर आहे. संस्कृत सुभाषितात सांगितल्याप्रमाणे..
“ज्याचे मन, वाणी व काया,आपल्या, सत्कर्मरूपी अमृताने पूर्ण भरली आहे, ज्याने अनेकांना, अनेक प्रकारे,उपकृत केले आहे, दुसऱ्याचे थोडेसेही गुण, सर्वदा, पर्वता एवढे करून सांगितले व हे करतांना, आपल्या हृदयात ,सतत, प्रसन्नता अनुभवली,असा सत्पुरुष जगात खूपखूप दुर्मिळ …”
“मनसी, वचसी काये, पुण्य पियुष पूर्णा .
त्रिभुवनमुपकार, श्रेणीभीः प्रीणयन्तः,
परगूण, परमाणुन्, पर्वतीकृत्य नित्य॔,
निजहृदी विकसन्ति,संती संता कियंतः?….”
नीतिशतकम् ५३/२२१
जगात खूप दुर्मिळ असलेल्या,अशा एका सत्पुरुषाचा गुरुजन म्हणून, आम्हाला, लाभ झाला. त्या आमच्या आवडत्या चैतन्य मूर्ती एस् आर सावे सरांच्या पवित्र स्मृतीला मनोभावे अभिवादन!!

बंधू
आतिशय सुंदर.सुदैवाने आम्हालाही सावे सरांचा सहवास लाभला. आपण जे अनुभवले तसेच सावे सर आम्हाला मिळाले हे आमचे परमभाग्य. आपण केलेल्या वर्णनाने त्या काळात नेऊन ठेवले. आम्हाला पण त्यांनी व्हॉलीबॉल आणि नेट दिली होती. अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही देखील दांडी मारून कॉमेंट्री ऐकायला गेलो होतो.
सावे सर जसे होते तेच चित्र तुम्ही उभं केलं.
पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद।
S R Save mhanaje ek chalate bolate chaitanya. Most popular and loving personality almost all among the students. The technique of his teaching was unique , we never used to know when his period gets ended. I remember he came to Khandumama’s house for condolence after Aka’s(our grandmother) death and very next day he had an attack and died. My tributes to my loving teacher. ???
Liked so much.Save sir was my favorite teacher,nicely written, my tributes to him
अगदी थोड्या कालावधीतच आपण एक अप्रतिम लिखाण केले आहे. सरांबद्दल त्यांच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना अतिशय आदर होता आणि आजही आहे.ते अजातशत्रू होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. माझ्या विनंतीस मान देऊन आपण एक सुंदर व्यक्तीमत्व साकारले आहे त्याबद्दल आपले हार्दिकअभिनंदन. मी आपला अत्यंत आभारी आहे. आपणास आणखीन एक विनम्र विनंती आहे की आपल्या गावातील आणखीन काही व्यक्तींबाबतीत आपण लिहावं आणि पुस्तक रूपाने ही माहिती प्रसिद्ध करावी. दिपावली आणि येणार्या नवीन वर्षाच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा! ???
नाना मळेकर आणि पाठोपाठ सद्गुरु भाई मळेकर ह्यांच्या अतुलनीय अशा विद्यादानाच्या कार्यात झपाटलेल्या बुद्धिवंतांच्या पाठोपाठ सावे सरांवरील लेख मला संभ्रमात टाकतो. सावे सरांचे कार्यही तितक्याच तोडीचे आहे. मला भावली ती त्यांच्या पालकत्वाची कल्पना. नुसते शिक्षण देणारे शिक्षक बरेच भेटतात पण विद्यार्थ्यांशी असे नाते कायम स्वरूपी निभावणे हे अप्रूप. माझे आता ठाम मत झाले आहे की बोर्डीच्या पाण्यात आणि मातीत असे काहीतरी खास आहे की ज्यामुळे असे हिरे तिथे जन्माला येतात आणि पुढल्या पिढ्या घडवतात. धन्य ते शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी.
आपल्या महाराष्ट्राला एका मागोमाग एक असा संतपरंपरेचा दैदिप्यमान सुवर्णकाळ लाभला होता. त्या विशुद्ध संतसंस्कारावर आपसूक पोसला गेलेला ‘ महाराष्ट्र ‘ म्हणूनच आज अवघ्या देशात विलक्षण तेजाने तळपतो आहे. तद्वतच, तुम्हां मंडळींचा बोर्डी-घोलवड हा परिसर, त्या विशिष्ट कालखंडात, अध्यापनावर निस्सिम प्रेमाचा अंगिभूत ओलावा असणाऱ्या, अपार संवेदनशील तसेच करूणा-जिज्ञासेची मुर्ती असणाऱ्या शिक्षकांचा संच — भिसे-चित्रे आणि एस.आर.सावेसर.ह्या त्रयींच्या रूपाने, त्या वेळच्या तुम्हां विद्यार्थ्यांना लाभल्यामुळेच बंधू, आपल्यासारखे मुदत: शिक्षणाची आंच असणारे सर्वजण, सुयोग्य दिशेने घडविले गेले. त्या विशिष्ट कालखंडात अशा गुरूजनांचा एकसंघ लाभ तुम्हां विद्यार्थ्यांना मिळणे हा खरंतर भाग्ययोगच — जो तुम्हांला लाभला. धन्य ते शिक्षक आणि त्यांच्या शिक्षणविषयक अद्वितीय विचार-सरणीने बहुआयामी व्यक्तिमत्त्वे घडविले गेलेले-आपण सर्वजण !
आपल्या महाराष्ट्राला एका मागोमाग एक असा संतपरंपरेचा दैदिप्यमान सुवर्णकाळ लाभला होता. त्या विशुद्ध संतसंस्कारावर आपसूक पोसला गेलेला ‘ महाराष्ट्र ‘ म्हणूनच आज अवघ्या देशात विलक्षण तेजाने तळपतो आहे. तद्वतच, तुम्हां मंडळींचा बोर्डी-घोलवड हा परिसर, त्या विशिष्ट कालखंडात, अध्यापनावर निस्सिम प्रेमाचा अंगिभूत ओलावा असणाऱ्या, अपार संवेदनशील तसेच करूणा-जिज्ञासेची मुर्ती असणाऱ्या शिक्षकांचा संच — भिसे-चित्रे आणि एस.आर.सावेसर.ह्या त्रयींच्या रूपाने, त्या वेळच्या तुम्हां विद्यार्थ्यांना लाभल्यामुळेच बंधू, आपल्यासारखे मुदत: शिक्षणाची आंच असणारे सर्वजण, सुयोग्य दिशेने घडविले गेले. त्या विशिष्ट कालखंडात अशा गुरूजनांचा एकसंघ लाभ तुम्हां विद्यार्थ्यांना मिळणे हा खरंतर भाग्ययोगच — जो तुम्हांला लाभला. धन्य ते शिक्षक आणि त्यांच्या शिक्षणविषयक अद्वितीय विचार-सरणीने बहुआयामी व्यक्तिमत्त्वे घडविले गेलेले-आपण सर्वजण !
[23/11, 09:40] Save Prakash Hiraji: आताच, सावे सरांन विषयी लिहलेला लेख वाचला,शाळेतल्या जून्या आठवणी समोर आल्या.
१९६६ते १९७० पर्यंत शाळेत होतो, सावे सरांनी१९६५ साली झालेल्याभारत पाक युध्दा विषयी रोमांच कारक बोलले होते,ते सॅलुट फार छान! देत.मी NCC त होतो.कोडिंया तलावावर वाॅलीबोल क्लब होता सरांनी वाॅलीबाॅल दिले होते.
खुप छान वाटले.??
[23/11, 09:40] Save Prakash Hiraji: प्रकाश सावे.
i m from Gholwad Asha Nagre when i was in10 th stander Save sir use to take my class i & all my classmates use to be v happy cheerful when he use to take class i was group leader that time heuse to guide v much i really missed him yet all valuables memories r with me once again salam sir to u
बंधू, फारच छान लेख.लेख वाचून सरांच्या आठवणींना उजाळा मिळाला.आम्हालाही सरांकडून असेच प्रेम मिळाले.सरांचे रुबाबदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज,स्पष्टवक्तेपणा,प्रेमळ स्वभाव आज इतक्या वर्षांनंतरही सर्व विद्यार्थ्यांच्या स्मरणात आहे यांतच सरांचे मोठेपण आहे. सरांवर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
एका संवेदनशील व सुंदर व्यक्तीमत्वाचे तितकेच हृदय व्यक्ती चित्रण!
नमस्कार
खूपच सुंदर लेख व हृदयस्पर्शी आठवणी, मनाला भावून गेल्या
मी शारदाश्रम हॉस्टेलमध्ये 1973 ते 1975 इतका काळ चित्रे सर व एस आर सावे सर यांच्या पवित्र आशीर्वादा खाली वास्तव्य केले.
1975 नवीन एसएससी म्हणजे नवीन दहावी ची पहिली बॅच. आम्ही खूप खूप दडपणाखाली होतो पण चित्रे सर सावळे सर आणि एन के पाटील सर यांनी आम्हाला खूप धीर दिला व अभ्यासासाठी प्रवृत्त केले
आज मी मुंबईत माझे स्वतःचे केरळी आयुर्वेदिक क्लिनिक विलेपार्ले पूर्व येथे चालवत आहे
आमच्या अनेक सरां पैकी आमचे खूप लाडके हरिहर चोरी सर माझ्याकडे त्यांच्या स्वास्थ्यरक्षणासाठी आजही येतात व त्या निमित्ताने बोर्डीच्या सुंदर आठवणी जागृत होतात
मी अकरावी व बारावी पास झाल्यानंतर आशीर्वादासाठी चित्रे सरांना पत्र लिहिले होते ते त्यांनी त्यांच्या त्या वयातही मला त्वरित आशीर्वाद पत्रात लिहून पाठविले होते आजही चित्रे सरांचे ते पत्र माझ्या संग्रही आहे
सदतीस वर्षानंतर आमची दहावीची बॅच गुरुकृपा हॉलमध्ये भेटली होती व त्यानंतर व्हाट्सअप ग्रुप तयार झाला व आम्ही पुन्हा एकत्र आलो.
शाळेच्या मित्रांबरोबर सदैव आनंदी असतो व दैनंदिन आनंद उपभोगत असतो हे सर्व शारदाश्रम होस्टेल व एस पी एच हायस्कूल मधील संस्कारामुळे शक्य झाले आहे
आम्ही खरंच भाग्यवान समजतो की असे आदरणीय गुरुजन आम्हास लाभले
सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा
डॉक्टर रमेश देशमुख
डायरेक्टर अंड चीफ फिजिशियन
केरला आयुर्वेदिक क्लीनिक
नवसमाज सोसायटी,
नेहरु रोड विलेपार्ले पूर्व मुंबई 57
9870024262
Shri Digamber Bhau I have read all the past History of shri S R Save on your Sanket Web side I am very much pleased by reading their dedicated life towards the students and school I am proud of our Native Place where such tallented and genrous minded teachers are working in school I SAIUTE THEM FOREEVER
क्षमस्व, लेख उशिरा वाचला. दिगंबरभाई, तुमच्या लेखा विषयी प्रश्नच नाही. तुम्ही प्रत्यक्ष त्या व्यक्तीला डोळ्यासमोर उभे करता . S. R. Save सर, माझे काका, आम्ही त्यांना बाबूकाका म्हणायचो.मी घरात लहान आणि मुंबईला वास्तव असल्याने त्यान्च्या सर ह्या बाजूबद्दल खूप माहित नव्हते.तुमच्या लेखामुळे खूप माहिती मिळाली. ते जरी शारदाश्रम येथे रहात असले तरी ते चाफावाडीत नियमित येत असत, आणि माझ्या आजीची व काकूंची (तारामाईची आई ) काळजी घेत असत. आजीची तब्बेत बरी नसेल तर आधी डॉ. रमेश चुरी कडून औषधं आणून मग तिच्या तब्बेती विषयी त्यांच्या मोती सारख्या अक्षरांत आम्हाला पोस्ट कार्ड येई. मुंबईला आले की खांद्यावर झोळी लावून आमच्या घरी येणे नियमित, जेवायलाच थांबत असत त्यामुळे भरपूर गप्पा रंगत. आमची अभ्यासातील प्रगती जाणून घेत.
काही वर्षा पूर्वी पू. बाबूकाकांनची जन्म शताब्दी आम्हा सावे कुटुंबाने साजरी केली, त्यावेळेस ते मला खरे समजले. आपला लेख वाचून मन भरून आले. धन्यवाद.
Thank you Mami
बंधू आपला कैसे SRSave, सर यांचे आठवणीच्या लेख, मी व माझ्या महिलामंडळातील खूप मैत्रिणीनी वाचला..अगदी अति सुंदर. असे सर मिळण्याचे भाग्य आम्हाला मिळाले, याचा मैत्रिणीनी हेवा केला. आपण असेच लिहून मला लेख पाठवाल,ही विनंती.. .स्मिता गोलतकर ..
You have presented Save Sir’s life story in real form . Your writing style is amazing, perhaps you would have been famous and popular Marathi writer if you had continued your graduation in Arts and Literature instead of in Science. Lata(she belongs to Save sir’s family ,in Birdi)also liked and felt that nobody else could have depicted Sir’s life as effective as you did.
All the best
फारच छान लिहिले आहेत सावे सरांच्या बद्धल,खूप प्रामाणिक भावना असल्याने त्यातले लिखाण मनाला अतिशय भावते?
?अश्या लोकोत्तर शिक्षकांच्या जीवन कथा खूप प्रेरणा देतात,
बोर्डी ही खरंतर पुण्यभूमी आहे?
सरांच्या हस्ताक्षरातले पत्र असेल का तुमच्या संग्रही?
बोर्डीला या सगळ्या अतुलनीय व्यक्तींच्या आठवणींचे एक संग्रहालय असावे आणि या इतिहासाचे दृकश्राव्य माध्यमातून निदान संस्थेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विध्यार्थी व शिक्षक आणि कर्मचारी याना परीचय करून द्यावा असे खूपदा सुचवले मी,त्यासाठी लागणारे संकलनाचे काम कारायचीही तयारी आहे
पण प्रोजेक्ट पुढे जात नाही.
सगळयांच्या जगण्यात बदल करून आणि वेगवेगळे प्रश्न निर्माण करून 2020 हे वर्ष आता संपत आले आहे. ह्या वर्षात बराचसा काळ बऱ्याच जणांना बंदिवासात काढावा लागला आहे .दिगंबर तू मात्र ह्या वेळेचा छान सदुपयोग करून घेतला आहेस. ह्या काळात तुझ्या कडून आदरणीय गुरुजनांचे उत्कृष्ट चरित्र लेख तेवढाच उत्कृष्ट लेखन शैलीत लिहून झाले आणि आम्हाला वाचायला मिळाले. ह्या पूर्वीच्या लेखा प्रमाणेच सावे सरांवरील लेख अप्रतिम आहे.तू लिहिल्या प्रमाणे ते खरोखरच चैत्यनमूर्ती होते. नेहमीच हसतमुख आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रोसाहन आणि शाबासकी देणारे. कुठलीही अतिशयोक्ती न करता सविस्तर पणे त्यांच्या शाळेतील आणि शरदाश्रमातील जीवनप्रवास पूर्णपणे प्रगट केला आहेस.तुझ्या लेखात सर्वच एवढे सविस्तर वर्णन आहे की आणखी काही लिहायला नको.सुदैवाने मला पण त्यांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य लाभले.आठवणींना उजाळा देण्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा. येण्यारा नवीन वर्षात तुझ्याकडून असेच छान छान लेख वाचायला मिळतील ही अपेक्षा. परत एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा. S.LPatil.