मी मोठी आई बोलते, भाग १६ – विजय विहार व डॉक्टर काकांचे घर

मोठीआई आता आमच्यात नाही. पण मोठीआईची १०४ वर्षाची कहाणी तिच्याच शब्दात लिहिली होती, अनेकांच्या विनंतीनुसार त्याचे लेखांक चालू ठेवीत आहे.

म्हात्रे गुरुजींचा “विजय विहार”, बंगला, बोर्डी राम मंदिरा समोर.

       बोर्डीत आप्पांची तब्येत वारंवार बिघडत असे. मुख्यतः बोर्डीची हवा व मानसिक अस्वास्थ्य यामुळे त्यांना प्रकृती स्वास्थ्य नव्हते. आप्पा खूप हळव्या स्वभावाचे होते. त्यामुळे शारीरिक कष्टापेक्षा मानसिक तणाव त्यांना सहन होत नसे. विशेषतः हिवाळ्यात, पावसाळ्यात त्यांना खूप त्रास होई. शाळेत रजा होई. पगार कापला जाई. त्यामुळे त्यांचे एक सहकारी शिक्षक मित्र श्री महादेव म्हात्रे, म्हात्रे गुरुजी, यांना आप्पांच्या धावपळीची व शारीरिक त्रासाची पूर्ण कल्पना होती. त्यांना आप्पां बद्दल खूप सहानुभूती वाटे. ते एक सज्जन व प्रेमळ व्यक्तिमत्व होते. खरे मित्र होते. त्यांच्या सौभाग्यवती अंबुबाई देखील शिक्षिका होत्या. उभयतांना गावात खूप सन्मान होता. गुरुजींचे जेष्ठ चिरंजीव सतीश ची शिकवणी आप्पा घेत. कोणतीच शिकवणी फी घेत नसत. म्हात्रे गुरुजींनी बोर्डीत ‘विजय विहार’ हा बंगला बोर्डीतील  राम मंदिरासमोर बांधला होता. बंगल्याचे काम पूर्ण झाल्या झाल्या त्यांनी आप्पांना तेथे राहण्यासाठी जागा देऊ केली. आप्पांना असा बदल हवाच होता. आम्ही आनंदाने हा  पर्याय स्वीकारला. म्हात्रे गुरुजींच्या ‘विजय विहार’ बंगल्यात वरच्या माळ्यावर राहू लागलो. संपूर्ण पहिला मजला आमच्या ताब्यात होता. आम्ही रात्री निजण्यासाठी व  मुलांच्या अभ्यासासाठी या जागेचा वापर करीत असू. कोणतीच कटकट नसल्याने, भवताल ही स्वच्छ, सुंदर असल्याने आप्पांना व आम्हा सर्वांनाच हे निवासस्थान खूप आवडले. आप्पांची प्रकृती ही पण छान राहू लागली. त्यांच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांना गती मिळाली. त्यामुळे स्वभावाची चिडचिड कमी झाली. गुरुजींनी कोणतेच भाडे आमच्याकडून त्या काळात घेतले नाही.

   सर्व ठीक चालले होते. आप्पांची तब्येत ही सुधारू लागली होती. आता दिगू बाळू अरुणा यांच्या विद्यार्थी जीवनाचा कालखंड सुरू झाला होता. तिघेही शाळेत जाऊ लागले होते. मी स्वयंपाक,भोजन बोर्डीच्या घरीच करत असे. सर्वजण सकाळी व रात्री भोजनासाठी आमच्या घरीच एकत्र येत असू. जेवणे झाल्यावर सर्व आवरा आवर करून, घर बंद करून. “ विजय विहार “मध्ये निजण्यासाठी जात असू. 

 बाळू शालेय शिक्षण सोडून हायस्कूलात जाऊ लागला. अरुणा मराठीशाळेत जात होती. आमच्या  संसार वेलीवर  एक नवीन पुष्प  उगवले होते. नीलमचा नुकताच जन्म झाला होता. 

 नीलम लहानपणी खूपच सुदृढ गोरी व गुटगुटीत होती.  नंतर दोन वर्षात पपीचाही जन्म झाला. आमच्या संसाराला पूर्णत्व आले. आम्ही आता सर्व बोर्डीत होतो व काटकसरीचा का असेना पण समाधानाचा संसार चालू होता. विजय विहार मध्ये आनंदाने दिवस चालले होते शेजाऱ्यांचाही वनवास नव्हता. 

  राजबिंडा, विजय महादेव म्हात्रे. याचे स्मरणार्थ मात्रे गुरुजींनी ,”विजय विहार” बंगला बांधला आहे.

    म्हात्रे गुरुजींनी ‘विजय विहार’हे  बंगल्याचे नाव आपल्या मृत सुपुत्राच्या स्मरणार्थ ठेवले होते. त्यांचा ज्येष्ठ पुत्र विजय केवळ वयाच्या सहाव्या वर्षी 1948 सालच्या अतिवृष्टीत अपघाताने विहिरीत पडून मरण पावला होता. तो दिगू चा पहिल्या इयत्तेत मित्र झाला होता.  काही दिवसाचा साथी होता. कारण त्याच वर्षी, 1948 साली, इयत्ता पहिलीत असतानाच, जून महिन्यात शाळेत दाखल झाला, आणि जुलै ऑगस्टमध्ये विजय देवाघरी गेला.

     ‘विजय विहार’ चे वास्तव्य आम्हा सर्वांना व विशेषतः आप्पांना त्यांच्या प्रकृती विश्वासाच्या दृष्टीने खूप चांगले ठरले. दिगू बाळू यांचा अभ्यासही चांगला सुरू झाला होता. दिगूला हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळाले होते. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात निवडल्या गेलेल्या फक्त पंधरा विद्यार्थ्यांत त्याची निवड झाली होती. ही परीक्षा त्यावेळी ठाणे केंद्रात जाऊन द्यावी लागे.आप्पांचे सहकारी शिक्षक पां मा पाटील गुरुजी यांनी सातवीतील काही मुलांकडून या परीक्षेचा अभ्यास करून घेतला होता. स्कॉलरशिपचा अभ्यास सातवीच्या अभ्यासापेक्षा वेगळा असतो. पाटील गुरुजींनी खूप मेहनत करून घेतली होती. त्यांनी स्वतः मुलांना ठाण्यास नेऊन तेथे सर्व व्यवस्था केली होती. दिगू वर प्रथमच परीक्षेसाठी बाहेरगावी जाण्याचा प्रसंग होता. दोन दिवसात भाषा गणित सामान्य विज्ञान असे तीन पेपर असत. दिगूने खूप हिम्मत केली होती.

  या यशामुळे दिगूला  महिना पाच रुपये स्कॉलरशिप मिळाली. आर्थिक लाभ होताच पण त्यापेक्षा त्याच्या हायस्कूल प्रवेशात खूप फायदा झाला. कारण ‘स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी’, म्हणून त्याच्याकडे शिक्षकांचे लक्ष वेधले गेले. विशेषता तत्कालीन मुख्याध्यापक चित्रे गुरुजींच्या ही गोष्ट ध्यानात आली. त्यांनी त्याला मनापासून अखेरपर्यंत मार्गदर्शन केले. त्याचा फायदा एस एस सी परीक्षा व पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याला झाला. 

   चित्रे गुरुजींच्या मनाच्या मोठेपणाची गोष्ट येथे सांगावीशी वाटते. दिगुला ही मेरिट स्कॉलरशिप मिळाल्याने त्याला शाळेकडून मिळणारी Merit cum Means,(हुशारी व परिस्थिती) यासाठी मिळणारी शिष्यवृत्ती मिळू नये असा  घाट काही शिक्षकांनी मांडला. मात्र चित्रे गुरुजींनी, “या दोन शिष्यवृत्तांचा काहीही परस्पर संबंध नाही. एक शिष्यवृत्ती गुणवत्तेसाठी तर दुसरी आर्थिक परिस्थिती साठी असल्याने त्याला दोन्ही शिष्यवृत्ती देण्यास हरकत नाही” असे प्रतिपादन केले व त्याला दोन्ही शिष्यवृत्त्या शालेय जीवनात मिळवून दिल्या. अशी सडेतोड, निस्वार्थी शिक्षक मंडळी त्याकाळी आमच्या बोर्डी हायस्कूलात होती. त्यामुळेच शाळेचे नाव सबंध महाराष्ट्रात उज्वल झाले.

   ‘विजय विहार’ मध्ये राहण्यास आम्हाला निश्चित आवडत होते. पण गुरुजींची मेहरबानी किती दिवस घ्यावी यालाही काही मर्यादा होत्या. त्यामुळे आम्हीही शक्यतो “विजय विहार”सोडून पुन्हा घरी राहण्याचा विचार करीत होतो. दोन वर्षे झाली तरी  योग येत नव्हता. पुढे विजय विहार मध्ये तळमजल्यावर श्री व सौ मेहता हे हायस्कूलमध्ये शिक्षकी करणारे जोडपे राहावयास आले. आम्हालाही साथ मिळाली त्यांनाही आनंद झाला.

  कै महादेव वी म्हात्रे, म्हात्रे गुरुजी.

     धुळे व पुणे येथील प्रशिक्षणामुळे आप्पांना खूपच फायदा झाला होता. बोर्डी प्राथमिक शाळेत त्यांनी आपल्या या प्रशिक्षणाचा उपयोग करून शाळेतील शेतकी शाळेच्या बागेत काही प्रयोग सुरू केले होते. मेथी ,धणे, वांगी,काकड्या अशा पिकाचे मुलांकडून लहान प्रमाणात उत्पादन करून घेतले. मुलांनाही प्रशिक्षण झाले व शाळेलाही थोडे उत्पन्न मिळू लागले.बोर्डी शाळेत हा नवीन प्रयोग होता.शेतकऱ्याची मुले असल्याने त्यांनाही हे शेतीचे प्रयोग आवडत. कधी कधी सुट्टीचे दिवशीही आप्पा शेतकी शाळेत दिगुला घेऊन जात. बागेला पाणी देणे, साफसफाईची कामे करीत. एका वर्षी या उपक्रमातून पाचशे सहाशे रुपयांचे उत्पन्न शाळेला मिळाले. मुख्याध्यापकांनी आप्पांचे व मुलांचे कौतुक केले. विशेष म्हणजे वार्षिक शाळा तपासणीला येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनाही शाळेचा हा उपक्रम पाहून आनंद झाला. त्यांनी आप्पांचे, मुलांचे कौतुक केले. मुलांनी फुलविलेली बाग पाहिली.

  पुण्यातील सुतकताईचे, विणकामाचे प्रशिक्षण घेतल्याने त्याचेही प्रयोग सुरू झाले होते. शेतकी शाळेतील एका शेडमध्ये आप्पांनी हातमाग बसवून घेतला.मुलांनी चरख्यावर सुतकताई करून तयार केलेल्या सुतांच्या गुंड्या पासून  हातमागावर ताणाबाणा करण्याचे प्रशिक्षण दिले.त्यामुळे खादीचे विणकाम ही मुलांकडून सुरू झाले. ही मोठी नवलाची बाब प्रथमच प्राथमिक शाळेत घडली होती. मुलांनाही आपण स्वतः तयार केलेल्या सुतापासून विणलेले खादीचे कापड पाहून आनंद होई. हे कापड शाळेमार्फत कमी किमतीत विकले जाई. शाळेतील शिक्षकच ती खादी आपल्या स्वतःच्या वापरासाठी विकत घेत. जे प्रशिक्षण घेतले त्याचा उपयोग आप्पांनी प्रत्यक्ष शिक्षणात केला. हे प्रशिक्षण सुरू करण्याचा सरकारी उद्देश तोच होता व त्याचा  व्यवहारात उपयोग सुरू झाल्याने सरकारी अधिकारी देखील इतर ठाणे जिल्ह्यातील शाळांना बोर्डी शाळेचा आदर्श घेण्यास सांगत. 

   अशाप्रकारे शेती प्रशिक्षण व मूलोद्योग प्रशिक्षण देणाऱ्या शाळा जिल्ह्यात खूपच कमी होता होत्या. आचार्य भिसे गुरुजींनाही हे काम खूप आवडले होते. त्यांनी एकदा शाळेत येऊन मुलांना, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना शाबासकी दिली होती. आप्पांना आपल्या शाळेत विद्यार्थ्यांचे सहकार्य घेऊन असे नवे नवे प्रयोग करणे नेहमीच आवडे व मोठे समाधान मिळे.

   बहुदा सरकारच्या योजना चांगल्या असल्या तरी त्या कागदावरच राहतात. मात्र बोर्डीची प्राथमिक शाळा ही अशी शाळा ठरली जिने सरकारी मूलोद्योग योजनांना  प्रत्यक्षात उपयोगात आणल्या. 

   शाळेचे खूप कौतुक झाले.आप्पांनाही खूप समाधान मिळाले.

   ‘विजय विहार’ मध्ये असतानाच दिगू-बाळू चे  हायस्कूल शिक्षण सुरू झाले होते. दोघांनाही हायस्कूलच्या नवीन जगात प्रवेश करताना आनंद झाला होता. अभ्यासाबरोबरच त्यांचा इतर चळवळीतही भाग असे.वकृत्व स्पर्धा लेखन स्पर्धा खेळ इत्यादी गोष्टीत भाग घेत.

    दिगूने आंतरशालेय वकृत्व स्पर्धेत बक्षीसे मिळविली. त्याला वक्तृत्व कलेची आवड निर्माण झाली. त्याला पुढील जीवनात त्याचा खूप उपयोग झाला. त्याचे एक शिक्षक श्री भाई मळेकर यांनी  त्याला वक्तृत्व स्पर्धांसाठी खूप मार्गदर्शन केले आहे. भाई आप्पांचे चांगले परिचित व स्नेही होते. आज योगायोगाने ज्या घोलवडच्या घरात आम्ही राहत आहोत त्याचे समोरच भाईंचे जुने निवासस्थान आहे.भाई जरी आज त्या वास्तूत नसले तरी स्मृतींच्या रूपाने त्यांचा सहनिवास आम्हाला तिथे जाणवतो. भाईंची आठवण येत असते.खूपच साधा सरळ आणि  निकोप वृत्तीचा असा आदर्श शिक्षक! अति संवेदनाशील असल्याने त्यांचे निधन अकालीच झाले.

  डॉक्टर काकांचे घर. पहिल्या मजल्यावर आमचे निवासस्थान होते.

      ‘विजय विहार’ मधील दोन वर्षे अगदी आनंदात मजेत गेली. त्याच सुमारास माझे काका डॉ. दिनानाथ चुरी यांनी आम्हाला त्यांचे वडीलोपार्जित घर, जे आक्काच्या घराशेजारीच होते, आम्हाला राहण्यासाठी देऊ केले. त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी झाली होती व काकांच्या वाट्याला जुन्या घराचा वरचा मजला आला होता. त्यांचे रहाते घर बोर्डीच्या विजयस्तंभा जवळ असल्याने हे गावातले घर रिकामी होते. त्या संपूर्ण पहिल्या मजल्याचा ताबा त्यांनी आम्हाला दिला. हे घर देखील विस्तृत होते. हवेशीर होते. आप्पांच्या प्रकृतीसाठी मुलांच्या अभ्यासासाठी खूप उपयुक्त होते. दिनू काका बोर्डीच्या शेतकरी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष होते. रोज सायंकाळी सोसायटीच्या कामाचा लेखाजोगा घेऊन झालेल्या व्यवहाराचा हिशोब घेत. या पहिल्या माळ्यावरील एका खोलीत त्यांनी आपले ऑफिस थाटले होते. ती खोली बंद असे. हिशोब तपासण्यासाठी कधीतरी रात्री त्या खोलीत बसत.

  ‘विजय विहार’प्रमाणे काकांची ही वास्तु देखील आम्हाला खूप लाभदायक ठरली. आम्ही रात्री झोपण्यासाठी व अभ्यासासाठी या जागेचा वापर करीत असू. दहावी अकरावीचा अभ्यास दिगुने येथे राहूनच केला .त्यावेळी वीज नसल्याने रॉकेलच्या कंदीलावरच अभ्यास करावा लागे.

    दिगू दहावीत असताना 1958 साली महाराष्ट्र सरकारने प्राथमिक शिक्षकांसाठी एक शैक्षणिक योजना आणली होती. त्या अनुषंगाने जे प्राथमिक शिक्षक एस एस सी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एक विशेष वेतनश्रेणी लागू होई. मोठा आर्थिक लाभ मासिक पगारात होई. त्यामुळे पेन्शनमध्येही फायदा होई. काही शिक्षकांनी बाहेरून एस एस सी परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. आप्पा आणि पा मा पाटील गुरुजी यशस्वी झाले. विशेषतः गणित शास्त्र सारखे विषय कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय घरी अभ्यास करून ती परीक्षा देणे कठीण होते .तरी आप्पांनी ते शिवधनुष्य उचलून यश मिळविल. त्यांच्या मेहनतीचा व  इच्छाशक्तीचा परिपाक होता. दिगू दहावीत असल्याने काही विषयात त्याचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. अभ्यासासाठी सकाळी चार वाजता उठून ते वाचन करीत.  पुढे आपली नित्य, नैमित्तिक कामे, शाळेतील वर्ग, शिकवण्या, प्रौढवर्ग हे देखील करीत. त्यांच्या प्रकृतीला कधी हे सर्व झेपत नसे तरीही त्यांनी आपले ध्येय सोडले  नाही. हेडमास्तर जोशी गुरुजी व सर्व सहकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

  पुढील वर्षी दिगू देखील एस एस सी पास झाला. त्याला 75 टक्के गुण मिळाले. त्या काळात एवढे गुण मिळवणे प्रशंसनीय बाब होती. आता त्यालाही  महाविद्यालयीन शिक्षणाचे वेध लागले होते. आमच्यासाठी सुद्धा ती एक मोठी कसोटी होती. त्याच्या महाविद्यालय शिक्षणाचा खर्च मुंबई पुण्या सारख्या शहरात राहून करणे आम्हाला शक्य नव्हते.

  डॉ. दिनानाथ चुरी काका व सौ. नर्मदा दि चुरी काकू..

    एस एस सी परीक्षेतील गुणामुळे त्याला मुंबई, पुण्यात चांगल्या महाविद्यालयात निश्चित प्रवेश मिळू शकला.असता मात्र आर्थिक दृष्ट्या आम्हाला ते शक्य नव्हते. एक तर कॉलेजची संपूर्ण फी त्याला भरावी लागणार होती जी त्यावेळेस सुमारे वार्षिक 800- 900 रुपये, होती. कॉलेज फी माफी साठी सरकारी उत्पन्न मर्यादा बाराशे रुपये होती. आप्पांचा वार्षिक एकूण पगार तेराशे रुपये  होता. त्यामुळे या सवलतीचा लाभ घेणे आम्हाला शक्य नव्हते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आप्पांना अर्ज करण्यास सांगितले.

  “ मी खास शिफारस पत्र देतो. आपले काम होईल.”

असेही आश्वासन दिले. आप्पांचा कागदावर एकूण पगार तेराशे रुपये असला तरी प्रकृती अस्वास्थ व रजांमुळे प्रत्यक्ष पगार अकराशे रुपये मिळाला होता. म्हणून मुख्याध्यापकांनी ही विनंती केली. मात्र आप्पांनी तसे करण्यास नम्रपणे नकार दिला. कारण कोणताही सरकारी नियम भंग करणे आप्पांच्या स्वभावात नव्हते.

  दिगूला मिळालेल्या गोरेगावच्या पांडुरंग म्हात्रे शिष्यवृत्ती मुळे आमचा आर्थिक भार बराच कमी झाला होता. तरी भोजन खर्च व इतर खर्च जो महिन्याला किमान पन्नास रुपये तरी होता, तो करणे शक्य नव्हते.

   साताऱ्याच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेले महाविद्यालय ‘कमवा आणि शिका’(Earn  and Learn) या योजनेखाली मुलांना काही लहान हलक्या मजुरीची कामे देई. त्या बदल्यात पैसे मिळत. दिगूने साताऱ्याला त्या योजनेखाली काम केले. आर्थिक लाभ मिळविला. व शिक्षण घेतले. सारे त्याने कसे केले ते त्याच्याकडूनच ऐकावे लागेल. आम्हाला त्याची कल्पना कशी असणार? मात्र शास्त्र शाखेचा अभ्यासक्रम , शारीरिक कामाचा ताण, भोजनाची अव्यवस्था सहन करीत त्याला हे करावे लागले.  त्याने ते यशस्वीपणे करून दाखविले! चित्रे गुरुजी, आमच्या शुभेच्छा व दत्तगुरूंची कृपा यामुळे हे झाले.

   दिगूला साताऱ्याला पाठवण्याचा निर्णय आप्पांनी तो दहावीत असतानाच घेतला होता. त्यासाठी बोर्डीच्या दोन विद्यार्थ्यांशी,जे साताऱ्यात शिक्षण घेत होते, चर्चा केली होती. चित्रे गुरुजींचाही सल्ला घेतला होता. दिगूला ही संपूर्ण कल्पना दिली होती. त्याची काम करण्याची तयारी आहे हे जाणून घेतल्यानंतर तो निर्णय पक्का केला होता…आणि शिक्षण घ्यायचे असेल तर त्या परिस्थितीत आम्हाला तोच एक उपलब्ध मार्ग होता. 

   दिगू साताऱ्यास जाणार या कल्पनेने आम्ही  खूप अस्वस्थ होतो.. अजून घराबाहेर कधीच न राहिलेला  मुलगा दूरच्या प्रदेशात जाणार, येथे कोणीही ओळखीचे, नात्याचे नाही, तो प्रदेश ही विषम हवामानाचा, तेथील भोजनही आपल्यापेक्षा अगदीच वेगळे, ते देखील वेळेवर मिळेल किंवा नाही ही चिंता, नवीन अभ्यासाची जोखीम, प्रकृती स्वास्थ्य कसे राहील.. त्याला आर्थिक कमाई साठी शारीरिक कष्ट करावे लागणार होते सर्व काही अनिश्चित होते? पण निर्णय घेतला होता. नेहमीप्रमाणे देवावर भरवसा ठेवून! मित्र अरुण त्याच्याबरोबर साताऱ्याला जाणार होता हीच एक समाधानाची गोष्ट होती.

    दिगू चे साताऱ्यातील दोन वर्षाचे वास्तव्य ही खूपच मोठी कहाणी आहे. अनेक खडतर प्रसंगांतून त्याला जावे लागले. काम, अभ्यास व दुरस्थ वास्तव्य यातून हे सर्व करावे लागले. सकाळी पाचला उठून तो कॉलेजने दिलेल्या कामासाठी तेथे हजर होई. तेथील काम आटोपल्यावर वस्तीगृहावर येऊन नऊ वाजता तयारी करून कॉलेजला जाई.  दिवसभर कॉलेजची लेक्चर्स प्रॅक्टिकल्स  केल्यावर संध्याकाळी 

वस्तीगृहावर परते. संध्याकाळचे भोजन कधी मिळे तर कधी मिळत नसे. रात्री कॉलेजच्या लायब्ररीत अभ्यासासाठी जाई. वस्तीगृहात वीज नव्हती. कॉलेजच्या वाचनालयात ती सोय होती. म्हणून विद्यार्थी रात्री वाचनालयात जाऊन अभ्यास करीत. खूपच आव्हानात्मक असे जीवन होते. पहिल्या वर्षाची कॉलेज परीक्षा विद्यापीठांवर होत असे त्यामुळे परीक्षेतील चांगले यश मिळवणे आवश्यक होते. स्कॉलरशिप  टिकवायची होती.

  वर:कै. अरुण गोपाळ. सावे.
  खाली: कै. राजाभाऊ पाटील

   अरुणचे मामा राजाभाऊ पाटील (जगप्रसिद्ध राजा राणी टूर्सचे सर्वेसर्वा) अधून मधून  साताऱ्यास अरूणला भेटण्यासाठी जात. त्यावेळी ते रेल्वेत नोकरी करीत. त्यामुळे त्यांना जाणे शक्य होई. राजाभाऊ मुळे आम्हाला दोघांची खबरबात कळे. 

   या दोघांना साताऱ्यास पहिल्या वर्षी नेऊन ठेवण्याचे काम माझा भाऊ खंडू ने केले. ते त्याचे आमच्यावर मोठे उपकार झाले. आप्पा बाहेर जाऊ शकत नव्हते. कोणीतरी घरच्या माणसाने मुलांना तेथे नेऊन त्या परिसराची प्रत्यक्ष पाहणे करणे जरुरी होते. खंडूने ते काम केले. दोन दिवस तिथे राहून दोघांना स्थिरस्थावर केले. तो दोन वर्षाचा कालखंड खूपच महत्त्वाचा होता. शास्त्र शाखेचे शिक्षण घेणारी पाच  बोर्डीची मुले तेथे होती. काहीनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. फक्त अरुण चार वर्षे तेथे राहून पदवीधर होऊन सातारा कॉलेजातून बाहेर पडला. दिगू दोन वर्षांनी सातारा सोडून मुंबईतील महाविद्यालयात आला. यावरूनही तेथील सर्व कष्टप्रद परिस्थितीची जाणीव व्हावी.

   त्या सर्व खडतर जीवन प्रवासाची माहिती कधीतरी त्याचे कडूनच ऐकायला मिळेल.

   पुढे दिगू मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजात दाखल झाला. तेथे त्याने पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईतील यु डी सी टी मध्ये प्रवेश घेऊन तेथे बीएससी-टेक, एम एस सी-टेक अशा पदव्या घेतल्या. बाळूही मुंबईच्या प्रसिद्ध वी जे टी आय (VJTI), महाविद्यालयातून इंजिनिअरिंग पदवीका मिळवली. पुढे कालमानाप्रमाणे त्याविषयी थोडे अधिक सांगेन.

   एकंदरीत  म्हात्रे गुरुजींचा विजय विहार व डॉक्टर काकांचे घर आमच्यासाठी खूपच उपयोगी व सोयीस्कर ठरले. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने व आप्पांच्या स्वास्थ्यासाठी फायदा झाला. अभ्यासास लागणारे वातावरण व मन:शांती  मिळाली!! माझी मुले मार्गी लागली.

   ‘सर्व काही ठीक सुरू असतानाच काहीतरी वादळ निर्माण व्हावे आणि सुरळीत चाललेला जीवन प्रवाह एखाद्या प्रसंगांने खंडित व्हावा, जीवनाला वेगळे वळण मिळावे ..हे आता नेहमीच झाले होते …आताही तेच घडले!! पुन्हा आमच्या संसारी आयुष्यात एक वेगळे पर्व सुरू होणार होते..?ते कोणते..?? पुढील भागात सांगते.

   शब्दांकन: दिगंबर राऊत.