मी मोठी आई बोलते, भाग १७- मुक्काम पोस्ट चिंचणी

मोठीआई आता आमच्यात नाही. पण मोठीआईची १०४ वर्षाची कहाणी तिच्याच शब्दात लिहिली होती, अनेकांच्या विनंतीनुसार त्याचे लेखांक चालू ठेवीत आहे.

डावीकडे दिगू ,मध्ये मी, बाळू ,आप्पा. उभी असलेली अरुणा..1948
हा आमच्या कुटुंबाचा अगदी पहिला फोटो आहे. दुर्दैवाने त्यानंतर सर्वांचा असा एकत्र फोटो उपलब्ध नाही. या फोटोत ममा व पपी नाहीत.

  मागच्या भागात आप्पांची स्वतः शिकण्याची व शिकविण्याची  तळमळ याबद्दल सांगितले. आचार्य भिसे गुरुजी वरील अढळ निष्ठे मुळे आप्पांनी आचार्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या प्रौढ आदिवासीं प्रशिक्षण वर्गात सक्रिय, विनावेतन सहभाग घेतला. रात्री शिकवण्या करुन आदिवासी पाड्यावर सेवा दिली. प्रौढ आदिवासींना साक्षर केले.

आज ते दिवस आठवले की मला आप्पांबद्दल असलेला अभिमान वृद्धिंगत होतो. प्रकृती, आर्थिक विवंचना, शेजाऱ्यांकडून जाच याची कोणतीही पर्वा न करता केवळ आपल्या गुरुजीं वरील निष्ठा व समाजाप्रती आपले देणे या भावनेने त्यांनी हे सर्व केले.

    आप्पांना मानसिक, शारीरिक त्रास होऊ नये याची मी काळजीपूर्वक दखल घेत असे. विशेषतः आमच्या शेजाऱ्याकडून होणारा जाच आम्हा सर्वांनाच खूप मनस्ताप देई. पण डॉक्टर काकांनी दिलेल्या घरामुळे सर्वांचाच त्रास खूपच कमी झाला होता. छान वातावरण मिळाले. आप्पांना व्यवस्थित झोप मिळू लागली. कामाला उत्साह आला. मुलांचा अभ्यास छान झाला.

   घरासमोरून वाहणाऱ्या गटार गंगेचा बंदोबस्त आप्पांनी सत्याग्रहाच्या मार्गाने सोडविला होता ते मागे सांगितलेच आहे.

   एस एस सी परीक्षा पास केल्याने आप्पांच्या पगारातही बऱ्यापैकी वाढ झाली होती.त्यानेही आमची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारली. खूप दिलासा मिळाला.

     दिवसा व रात्रीच्या शाळा, शिकवण्या, प्रौढ वर्ग मूलभूत शिक्षण,आजारपण, असूनही आप्पांनी आपले स्वतःचे कौशल्य व ज्ञान वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले होते. 

  साताऱ्याच्या महाविद्यालयात दिगू स्थिरस्थावर झाला होता. पहाटे लवकर उठून कॉलेज कडून मिळालेले श्रमदान काम करून थोडे पैसे मिळवी. दिवसभरात कॉलेज करी. रात्री लायब्ररीत जाऊन अभ्यास करी. त्याची कोणतीच तक्रार नव्हती.

  वर: छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा.
  खाली: कर्मवीर पद्मभूषण डॉ.कै.भाऊराव पाटील.

शास्त्र (Science) शाखेचा अभ्यास करून हे काम करणे थोडे कठीण होते. अरुण असल्याने आमची चिंता कमी झाली होती. अरुणचे राजा मामा( प्रसिद्ध राजाराणी टूर्स चे संस्थापक, मालक) हे मधून मधून साताऱ्यास जात. त्यांच्याकडून आम्हाला दोघांची खुशाली कळे. राजाभाऊ त्यावेळी रेल्वेच्या नोकरीत होते.

   दिगू आमच्यापासून खूप दूर रहाणार याची हुरहुर आम्हा सर्वांनाच होती. पण त्याला इलाज नव्हता. काही मिळवायचे तर काही कष्ट केलेच पाहिजेत, अशीच आप्पांची धारणा होती. ते निश्चिंत होते. अण्णा, अरुणाचे हायस्कूल शिक्षण नीलम, पपी यांचे प्राथमिक शालेय शिक्षण बोर्डीत चालू होते. जीवन स्थिरस्थावर होत होते..!

  … आणि तेवढ्यात दुसऱ्या बदलीचे वादळ आले …आप्पांची बदली बोर्डी शाळेतून चिंचणी जवळील देदाळे गावच्या मराठी शाळेत झाली ….!! नशीब सतत आमची कसोटी घेत होते. पण आम्हीही तितक्याच जिद्दीने परिस्थितीचा मुकाबला करीत होतो. 

  दोन मार्ग होते. एक तर आम्ही सर्वांनीच आप्पांबरोबर चिंचणीस जाऊन एकत्र राहावे अथवा आप्पांनी एकटे चिंचणीत राहून मी मुलांबरोबर बोर्डीत राहावे. नक्की काय करावे हे कळत नव्हते… आप्पांना चिंचणीस एकट्याने राहावे लागले तर त्यांच्या प्रकृतीचा प्रश्न आणि मुलांना बोर्डीत ठेवून मी चिंचणीत जावे तर त्यांच्या शाळेचा प्रश्न, काय करावे मलाच समजेना!?

   दिगू साताऱ्याला, आप्पा चिंचणीत आणि  मुलांबरोबर मी बोर्डीत अशी त्रिवेणी विभागणी करणे त्यातल्या त्यात सोईचे होणार होते!! 

आप्पानाही हे कळत होते. शेवटी आप्पांनी मार्ग सुचविला..

   “मी चिंचणीस एकटा राहीन. तुझ्याबरोबर अण्णा ,अरुणा ममा, पपी बोर्डीत राहतील!” त्यांचे शिक्षण हे महत्त्वाचे.  

  चिंचणीच्या बलावडीत राहणारी माझी धाकटी बहीण हिरू व तिचे यजमान भास्करराव यांनीही  सहकार्य केले. “आप्पांच्या राहण्याची, जेवणाची, प्रकृतीची देखभाल आम्ही करू. तू बोर्डीत राहा. काळजी करू नको“ असे मनापासून आश्वासन दिले. भास्करराव व हिरू यांनी त्यावेळी आम्हाला दिलेला हा भरोसा खूप मोठी गोष्ट होती. विशेष म्हणजे त्यावेळी भास्कर रावांची वयोवृद्ध आई ही त्यांचे सोबत होती.  हिरूला  सासू बरोबरच आप्पां साठीही कष्ट करावे लागणार होते. त्या उभयतांनी त्या दिवसात आम्हाला केलेली मदत मी कशी विसरू? 

कै. भास्करराव, हिरूचे जुने घर, चिंचणी. वरच्या माळ्यावर आप्पांची सोय होती. आजही हे घर आहे.

   त्यामुळे आता आप्पा चिंचणीत, मी ,बाळू, अरुणा, नीलम पपी  बोर्डीत राहावयाचे असे ठरले.

     त्याप्रमाणे पहिले वर्ष चिंचणीत व्यवस्थित गेले. आप्पांची देदाळे शाळा चिंचणी घरापासून पासून दोन अडीच किलोमीटरवर होती. शक्यतो आप्पा शाळेत चालत जात व चालत येत. व्यायाम होई. प्रकृतीस लाभदायक होई. 

  दिगुनेही पहिले वर्ष साताऱ्यात व्यवस्थित पार पाडले. आर्थिक कमाई केली, अभ्यास केला ,परीक्षेतही उत्तम यश मिळविले. अरुणची साथ असल्याने दोघांनी परिस्थितीचे भान ठेवून आपल्या गावापासून दूर एका अनोख्या शहरात, एका नव्या जीवनाला सुरुवात केली!

  छत्रपती शिवाजी कॉलेज हे कर्मवीर पद्मभूषण कै. भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय. भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून या महाविद्यालयाची चार-पाच वर्षांपूर्वीच स्थापना झाली  होती. बहुजन समाजाचा उद्धार व्हावयाचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून तळागाळातील समाजाला अल्प खर्चात उच्च शिक्षण मिळावे, या उद्दात्त हेतूने हे महाविद्यालय अण्णांनी स्थापना केले.. या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी शिकून पुढे विविध अधिकार पदावर कार्यरत झाले. त्या काळात महाराष्ट्रातील हे एकमेव कॉलेज होते, जेथे कोणत्याही विद्यार्थ्याला केवळ आर्थिक विवंचने मुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येऊ नये, अशी सोय होती. भाऊरावांचे सबंध महाराष्ट्रावर हे खूप मोठे उपकार आहेत. प्रत्यक्ष महात्मा गांधीजींनी त्यावेळी साताऱ्याची भेट देऊन कॉलेज वस्तीगृहाची पाहणी केली होती व भाऊरावांना धन्यवाद दिले होते.

   चिंचणी येथील जगन दादांचे घर.
   वर: पडवी व पहिला मजला.
    खाली: डावीकडे ,घराचे प्रवेशद्वार.

         हिरू आप्पांची काळजी घेत होती. पण तिला कष्ट देणे मला योग्य वाटत नव्हते. माझी आई आक्काला देखील माझी परिस्थिती कळत होती. मी चिंचणीत आप्पांजवळ जावे असे तिलाही वाटत होते. चिंचणीत स्वतंत्र घरासाठी शोध चालू होता. मनासारखे घर मिळत नव्हते. घर मिळाले की मी ममा, पपी बरोबर  चिंचणीस मुक्काम करणार होते. बाळू ,अरुणा यांच्या हायस्कूल  शिक्षणासाठी बोर्डीत त्यांना मदत करण्याचे आक्का, मावशीने मान्य केले होते. अडचणी आल्या पण अशी प्रेमाची माणसेही मिळत गेली. प्रश्न सुटत गेले.  समस्या येणे, त्यावर उपाय शोधणे आणि संसाराचे रहाट गाडगे पुढे ढकलित ठेवणे याची मला आता सवय झाली होती..! परमेश्वराची ही साथ होती.

   चिंचणी ला जगन भाऊ चुरी (दादा)यांनी बलावडी आळीतील आपले घर आम्हास देऊ केले. हिरूच्या घराजवळ ते घर होते. प्रशस्त होते. खाली स्वयंपाक घर, मोठा हॉल, बाजूला दोन खोल्या, वर विस्तृत माळा होता. संपूर्ण घर आमच्या ताब्यात दादांनी दिले. विशेष म्हणजे  या घराचे घरभाडे म्हणून एक रुपयाही कधी घेतला नाही. त्या बदल्यात  त्यांच्या मुलांची, सदू-बाळा-सुरेश, यांची शिकवणी आप्पांनी करावी ही त्यांची इच्छा होती. आप्पांनी तसे केले. पावसाळ्याचे दिवसात, अतिवृष्टी झाल्यास दादांची ही मुले आमच्या घरीच राहत. कारण दादांचे घर गावापासून दूर होते. मध्ये एक नाला होता. पावसाळ्यात तो भरून वाही. रस्ता चिखलाने भरत असल्याने चालत जाणे खूप कठीण असे. बाय (दादांची सौभाग्यवती), कमळी ताई, मला कधी तांदूळ भाजीपाला देत असे. खूप मदत होई. कष्ट होत पण समाधान असे. दादा व बाय यांनी आमच्या अडचणी समजून घेतल्या. धीर दिला व प्रसंगी रसोई पुरविली.

  मला वाटते आपण दुसऱ्याला जमेल तेवढी मदत देण्याची वृत्ती ठेवली तर आपल्या अडचणीत  मदत मिळते. कठीण प्रसंग निभावले जातात! त्या काळात अशी मनाने मोठी असलेली माणसे होती.

    1960 साली मे महिन्यात खंडू मामाचा विवाह झाला. दिगूही सुटीसाठी साताऱ्याहून बोर्डीस आला होता. त्यानेही खूप दिवसांनी कौटुंबिक जीवनाचा आनंद घेतला. पुढे जूनमध्ये तो साताऱ्यास आणि आम्ही चिंचणीस आलो. अण्णा, अरुणा हायस्कूल शिक्षणासाठी बोर्डीत राहिले.

   बोर्डीच्या  घरात आम्ही सर्व एकत्र राहत असू. घर लहान होते पण खूप आनंद समाधान होते. आमच्या जीवनातील मोठा आनंद होता. आपल्या कुटुंबाबरोबर सहजीवनाचा आनंद! चिंचणी चे  घर मोठे होते, सर्व मुले जवळ नव्हती. आम्हा चौघासाठी खूप ऐसपैस घरहोते.… सणासुदीला मुलांची आठवण येई. वाईटही वाटे पण त्याला इलाज नव्हता… “याला‘जीवन ऐसे नाव…” आणि आम्हा सर्वांना आता अशा जीवनाची सवय झाली होती.. 

  चिंचणीकर मंडळी आम्हाला सांभाळून घेत. आप्पांची शाळा देदाळ्यात असली तरी त्या शाळेत आप्पा आता हेडमास्तर असल्याने त्यांनाही जबाबदारी बरोबरच एक नवे आव्हान होते.. .

 कै. सौ कमळी ताई (बाय) व कै. जगन्नाथ मं.चुरी, (दादा)

   पपी-नीलमला, बंधू, अण्णा, अरुणाची नेहमी आठवण येई. त्यांच्याबरोबर खेळण्याची मजा आता संपली होती. अण्णा व अरुणा कधीतरी दोन दिवसाच्या सुट्टीत  चिंचणीत येऊन जात. तेवढाच त्यांनाही आनंद मिळे.आम्हालाही समाधान होई. दिगू साताऱ्याला असल्याने फक्त वर्षातून दोनदा घरी येई. मे महिना व दिवाळी सुट्टी. त्यामुळे त्याची आठवण पप्पी निलमला खूप येई. दोघेही त्याच्या येण्याच्या वाटेवर डोळे लावून बसत. तो महिनाभराचा काळ आम्हा सर्वांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी असे..!

    देदाळे शाळेत पहिली ते सातवीचे सर्व वर्ग होते. सात शिक्षक आप्पांबरोबर सहकारी होते . देदाळे गावचे तत्कालीन सरपंच अनंतराव चुरी (भाऊ) यांनी आप्पांना त्या काळात अनेक प्रकारे मदत केली आहे. भाऊ आप्पांना आपल्या वडील भावाप्रमाणे मान देत. स्वतःच्या घरचे गाईचे दूध आम्हाला पाठवीत. कधी भाजीपाला, आपल्या पोल्ट्रीतील कोंबड्यांची अंडी पाठवित. आप्पांचे सहकारी शिक्षक बाबरेकर गुरुजी, प्रभाकर सावे ,कस्तुरबाई, (मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांच्या मातोश्री) पाटील गुरुजी, खूप चांगली मंडळी होती. या सर्व टीमने त्या शाळेचे संपूर्ण स्वरूपच बदलले. आजूबाजूची पडीक जमीन साफ करून विद्यार्थ्यांच्या मदतीने काही भाजीपाला लागवड केली. बोर्डीच्या शाळेत केलेला शेतीचा प्रयोग आप्पांनी यशस्वीरीत्या देदाळ्याच्या शाळेतही केला. शाळेला एक उत्पन्नाचा स्त्रोत तयार झाला. पुढे शाळेच्या जुन्या भिंती दुरुस्त करून छान रंगरंगोटी ही केली. गावकरी व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे हे झाले. शाळेचा गौरव आसमंतात पसरला. शाळेची पटसंख्या वाढू लागली.

  कै.अनंतराव चुरी ,भाऊ.देदाळे

    या सर्व उपक्रमात देदाळे व परिसरातील गावकऱ्यांनी, शाळेतील शिक्षकांना मदत केली. विशेषतः अनंतराव भाऊ व होमी शेठ या देदाळे गावातील श्रीमंत व दानशूर पारशी  गृहस्थांनी शाळेच्या शैक्षणिक व बिन-शैक्षणिक उपक्रमात प्रसंगी स्वतः आर्थिक भार सोसून, शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न  केले. त्यामुळेच शाळेचा कायापालट झाला. आजूबाजूच्या पाड्यावरील विद्यार्थी  देदाळे शाळेत दाखल होऊ लागले. शाळेचा गावाचा लौकिक होऊ लागला.

     देदाळे मराठी शाळा, आजही दिमाखात उभी आहे.

    हे कार्य सरकारी अधिकाऱ्यांच्या नजरेत आले. अनंतराव भाऊंनी गावकऱ्यातर्फे शिफारस केली. आप्पांना ठाणे जिल्हा परिषदेचा “आदर्श शिक्षक” हा मानाचा पुरस्कार मिळाला. आप्पांनी पुरस्कारासाठी कधीच कोणतेही काम केले नाही. मात्र आप्पांच्या कष्टांना, कौशल्याला कुठेतरी सरकारी दाद मिळाली. सेवानिवृत्ती आधी दोन वर्षे आप्पांची बदली शासनाने मल्ल्याण-डहाणू शाळेत केली.  आप्पांना ती बदली हवी होती. कारण त्यावेळी डहाणू हे तालुक्याचे गाव म्हणून त्याला महत्त्व येत होते. पपी, नीलमच्या पुढील शिक्षणासाठीही डहाणू सोयीचे होते. मात्र अनंतराव होमी शेठ व गावकरी यांनी सरकारकडे रदबदली करून ही बदली रद्द करून घेतली. आप्पांचेही मन वळविले. आप्पांनी आपल्या बदलीचे बाबतीत कधीच कोणाचे ऐकले नव्हते. यावेळी त्यांनी अनंतरावांच्या विनंतीला मान दिला. बदली रद्द करू दिली. आप्पा देदाळे शाळेतच राहिले. तेथूनच सेवानिवृत्त झाले.

       आप्पा मोठ्या समाधानाने 1970 साली सेवानिवृत्त झाले. सर्व शिक्षकवृंद व गावकऱ्यांनी आप्पांना खूप भावपूर्वक निरोप दिला. मलाही सत्कार समारंभात बोलाविले. भेटी दिल्या. अनंतराव भाऊंची दोन्ही मुले राजा व अंजली आप्पांच्याच देदाळे शाळेत होती. आप्पा त्यांना शिकवणी  देत. भाऊंचा ज्येष्ठ चिरंजीव राजा आता वैद्यकीय पेशात असून चिंचणी देदाळे परिसरात मोठा मानलौकिक मिळवून आहे. एक बागायतदार म्हणून  शेती सुद्धा करीत असून आमच्या संपर्कात आहे. अंजली गृहिणी म्हणून आपला सुखी संसार करीत आहे. देदाळ्याचे श्री बबनराव चुरी हे आप्पांचे विद्यार्थी. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध असे आदर्श शेतकरी आहेत. समाजात तसेच समाजाबाहेरही त्यांचे मोठे नाव आहे. विशेषतः गुलाब पुष्पांची शेती, लागवड करण्यात त्यांचा हातखंड आहे .”गुलाब राजा” असेच त्यांना आदराने संबोधितात.  सुमारे 130 ते 140 प्रकारचे विविध गुलाब त्यांनी विकसित केले आहेत.

 वर: ’गुलाब राजा’, श्री बबनराव चुरी. खाली: त्यांची गुलाब लागवड.

     आप्पा देदाळ्याच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करीत असताना त्यांच्या निस्पृह व रोखठोक स्वभावाचे दर्शन घडविणारा एक प्रसंग घडला. आप्पांच्या स्वाभिमानी व स्पष्ट वक्तेपणामुळे काही मानभावी अधिकारी आप्पांवर डोळा ठेवून होते. आप्पा कसे अडचणीत येतील असे ते पहात.

    एके दिवशी आप्पा आपल्या मुख्याध्यापकाच्या कार्यालयात बसले असताना ठाण्याहून वाणगाव स्टेशनवर उतरून एक शिक्षणाधिकारी सरळ देदाळे शाळेत आले. आप्पांना कोणतीही कल्पना न देता एका वर्गात प्रवेश करून वर्गशिक्षकांकडून वर्गाचा ताबा घेतला. वर्गातील मुलांना काही प्रश्न विचारू लागले. वर्गशिक्षक गोंधळून गेले. गप्प राहून वर्गात उभे राहिले. मुख्याध्यापकांना याची कल्पना देण्याचेही त्यांना सुचले नाही. आप्पांना याची काहीच कल्पना नव्हती. खरे तर त्यां अधिकाऱ्यांनी आप्पांची परवानगी घेऊन नंतरच त्या वर्गात प्रवेश करणे आवश्यक होते. आप्पांच्या दुसऱ्या एका सहकाऱ्याने या प्रसंगाची आप्पांना कल्पना दिली. त्वरित आप्पा त्या वर्गात गेले. त्यांनी त्वरिष्ठ अधिकाऱ्यांना छेडले..

   “ साहेब, हा वर्ग घेण्याआधी आपण माझ्या कार्यालयात यावे. मी मुख्याध्यापक आहे. प्रथम आपल्या या भेटीचा उद्देश सांगून तपासणी करावी.” असे नम्र पण ठामपणे सांगितले.

   वरिष्ठांना हा प्रकार थोडा अपरिचित होता. एका शिक्षकांकडून त्यांना असा बाणेदारपणा अपेक्षित नव्हता. चूक त्यांची होती, त्यांचे लक्षात आली. त्या वर्गातून बाहेर येऊन आप्पांचे कार्यालयात आले. आप्पांची माफी मागितली. कोणताच वादविवाद न करता चार दोन गप्पा करून सरळ शाळेबाहेर पडले. ठाण्यास निघून गेले.

    पुढे हा प्रकार अनंतराव व होमी शेठ यांना कळला. त्यांनी या अधिकाऱ्यांची तक्रार शासनाकडे केली. वरिष्ठाकडून त्यांना फैलावर घेतले गेले. प्रकरण पुढे वाढले नाही हे नशीब. आपल्या तत्त्वाशी एकनिष्ठता आणि त्यासाठी कोणाचाही मुलाहीजा न ठेवता होणाऱ्या परिणामांची व रोष पत्करण्याची आप्पांची तयारी असे. असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात येऊन गेले आहेत.

    आप्पांचा एक दुसरा दंडक म्हणजे, “वर्गातील प्रत्येक मुलाने डोक्यावर खादीची गांधी टोपी घातलीच पाहिजे”, असा असे. तेथे कोणाचाही अपवाद त्यांना चालत नसे. ज्या ज्या शाळेत त्यांनी काम केले त्या प्रत्येक शाळेत हा नियम त्यांनी काटेकोरपणे पाळला. गावातील काही प्रतिष्ठितांच्या मुलांना त्यामुळे त्रास झाला.

 ’आमच्या मुलाचा अपवाद करा’, म्हणून गावातील काही नेते, धनवान लोक विनंती करीत, पण आप्पा त्याबाबतीत ठाम होते. त्यांनी स्वतः आमरण गांधी टोपी घातली व दिगुलाही हायस्कूलमध्ये असेपर्यंत टोपी घालावयास लावली. आपली भारतीय परंपरा व निष्ठा याचे गांधी टोपी हे प्रतिक आहे ,असे ते मानीत. टोपी घातल्याशिवाय ते घरा बाहेर पडत नसत. गांधी टोपीचा त्यांनी आजन्म सन्मान केला!!

  आज अनंतराव भाऊ नाहीत होमी शेठ नाहीत. आप्पांचे ते सर्व सहकारीही निवर्तले. आप्पांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी, प्रेमळ गावकऱ्यांनी नवे रूप दिलेली ती देदाळ्याची शाळा आजही गर्वाने उभी आहे. वाणगाव चिंचणी रस्त्यावरून जाताना, देदाळे गाव यैताच माझी नजर प्रथम त्या शाळेकडे जाते. मान आदराने लवते. त्या जुन्या आठवणी जाग्या होतात…. शाळे समोर आपोआप हात जोडले जातात !! अनंतराव भाऊ ,होमी शेठ आणि ते अनेक ह्यात अज्ञात विद्यार्थी गावकरी यांचे आदराने स्मरण होते ..!

   काही वर्षांपूर्वी माझ्या मुलांनी “वामनाई धर्मादाय शैक्षणिक ट्रस्ट”, तर्फे  शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम देदाळ्याच्या शाळेत केला. 

आप्पांच्या स्मरणार्थ गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत देण्यासाठी निर्माण केलेला वामनाई धर्मदाय ट्रस्ट ,एक न्यास होता. काही वर्षांपूर्वीच जाचक सरकारी नियमामुळे आम्ही तो विसर्जित केला. सर्व शिल्लक रक्कम बोर्डीच्या सु पे ह हायस्कूलला देणगी म्हणून दिली. 

 देदाळयाचा कार्यक्रम आप्पा त्यांचे जुने सहकारी शिक्षक, माजी विद्यार्थी ,गावकरी अशा सर्वांच्या आठवणी जागवण्याचा एक प्रयत्न होता. शाळेचे ,गावाचे व,गावकऱ्यांचे ऋण अंशतः फेडण्याची ती एक संधी होती.

  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या शैक्षणिक मदत व शाळेसाठी काही शालोपयोगी सामान दिले. सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. डॉ. राजा चुरी, बबनराव चुरी हे सन्माननीय कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले. सहकार्य, मार्गदर्शन केले. काही जुने विद्यार्थी  कार्यक्रमात उपस्थित होते. एक शानदार कार्यक्रम झाला. मी हजर राहू शकले नाही. मुलांनी मला कार्यक्रमाचा इतिवृत्तांत दिला होता. मला खूप समाधान झाले. चिंचणीतून मिलिंद,दिलीप, योगेश करवीर ही संबंधित परिचित  मंडळी आवर्जून कार्यक्रमाला आली होती .

  आता चिंचणी येथील निवास संपला होता. बोर्डीला जाण्याचे वेध लागले होते. तरीही आम्ही काही दिवस चिंचणीत राहिलो,कारण दादांचा आग्रह, चिंचणीकरांचे प्रेम व अगत्य. या दीर्घ वास्तव्यात आमचे जीवन समृद्ध करून गेलेल्या शेजाऱ्यांच्या व इतर प्रेमळ सज्जनांच्या काही मनोज्ञ, अविस्मरणीय आठवणी पुढील भागात सांगते….

लेखांकन

 दिगंबर राऊत.