बुलीचे प्रसंगावधान!
तिचे शाळेतील नाव यशोदा असे होते मात्र घरची मंडळी प्रेमाने” बुली” म्हणून हाक मारीत,आम्ही देखील जरी तिच्यापेक्षा वयाने लहान होतो, तरीही तिला बुली असेच हाक मारीत असून त्या नावाला काय अर्थ होता होता ते माहित नाही, मात्र ते एक प्रेमाचे संबोधन होते एवढे खरे! तिचे घर, होळीवर आमच्या शेजारीच होते व तिची दोन लहान भावंडे बाबू आणि बनू,आमचे खास सवंगडी होते. त्यांचीहीवये, आमच्या वयाच्या आजूबाजूलाच असल्याने चांगली मैत्री व खेळगडी होते. माझे वयही त्यावेळी 13, 14 वर्षाचे असेल व मराठी शाळा सोडून नुकताच हायस्कुलात जात असल्याने घरातील थोडी-थोडी जबाबदारीही घेऊ लागलो होतो. आमचे बोर्डी गाव समुद्र किनारी व आम्हा लोकांना, माशाचे कालवण म्हणजे मेजवानी, मोठा मौल्यवान पदार्थ, आहारातील एक मुख्य घटक !जवळच झाई, हे मासेमारीसाठी बंदर असल्याने तेथे, मासेमारीच्या बोटी यांत्रिक पद्धतीने मासेमारी करीत .त्यामुळे माशांची ही कमतरता नव्हती. मात्र बाजारातून मासे आणण्यापेक्षा प्रत्यक्ष समुद्रात जाऊन त्या बोटीवरून मासे आणणे हे मोठे जोखमीचे काम होते, तरीसुद्धा आम्हाला ते आवडत असे, कारण त्यात धाडस होते गंमत होती ताजे तडफडते मासे घरच्या लोकास खायला घालण्याचा आनंद ही होता. त्यामुळे कधीमधी प्रत्यक्ष बंदरावरून बोटीत जाउन आम्ही मासे घेऊन येण्याचा कार्यक्रम करीत असू.शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आम्ही निघत असू आणि लांबून दिसणार्या यांत्रिक बोटी, बंदरात अंदाजे किती वेळात येतील याचा अंदाज घेऊन आम्ही समुद्रात जाऊन कंबरभर पाण्यात उभे राहत असू. थोड्याच वेळात बोट बंदराला लागे नांगर टाकला जाई, व बोटीवरील खलाशी मंडळी मोठ्या प्रेमाने हात देऊन आम्हाला बोटीवर घेत,
या कामासाठी, मासे भरण्याची पिशवी आणि आमचे कपडे स्पेशल होते.कारण त्यांचा दरवळणारा मत्स्यगंध, घरात देखील येत असल्याने, एका विशिष्ट जागी ठेवत असू आणि बंदरावर जायचे वेळी ते घालून आल्यावर पुन्हा पाण्यात बुडवून ठेवून, सुकवीत असू. बंदरावर जाताना या पिशवीतून, एखादी ताकाची बाटली चार आठ आाण्याची चिल्लर, एवढाच ऐवज असे.या कोळी बांधवांना चांगल्या ताकाची वा दह्याची खूप आवड असे.आणि त्यामुळे एका ताका च्या बाटली बदल्यात भरपूर मासे मिळत, व पैसे देण्याची जरुरी ही भासत नसे. त्यावेळची आमची होडके गॅंग, म्हणजे मी माझी चुलत बहिण संगु बुली आणि तिचा चुलत भाऊ श्याम असे चौकट असे. कधीकधी बुलीचा भाऊ शरद_बाबू हादेखील आम्हाला साथ करीत असे त्यामुळे आमची चांगली मैत्री झाली होती. आणि या मासे खरेदीच्या बाबतीत खूपच ज्ञान प्राप्त झाले होते. आम्ही घरून निघून समुद्रकिनारा गाठीत असू.व तेथून सरळ झाईचे खाडीपर्यंत चालत जाऊन ,खाडी ओलांडीत असू.खाडीत पाणी विशेष नसेच आणि झाईगावा चा किनारा लागला की येणाऱ्या बोटींचा अंदाज घेऊन पाण्यामध्ये शिरत असू. साधारणपणे कंबरभर पाण्यामध्ये व्यवस्थित उभे राहता येई. येणाऱ्या बोटींचा पडाव देखील त्याच भागामध्ये पडत असे. आम्ही लहान मुले पाहून व नेहमी जाण्याने ,ओळख ठेवून ,बोटीवरील खलाशी मंडळी आम्हाला मोठ्या प्रेमाने हात देऊन सरळ बोटीच्या धक्क्यावर घेत. बोटीच्या खोलगट भागात अनेक प्रकारच्या ताज्या तडफडत्या माशांचा ढीग पडलेला असे त्यात बोंबील मांदेली पापलेट सुरमई रावस,माकली, अशा प्रकारचे लहान लहान मासे असत. मात्र मोठी पापलेट किंवा सुरमय सारखे मासे मिळत नसत कारण या बोटी पहाटेस निघून उथळ पाण्यातच मासेमारी करून संध्याकाळचे वेळेस बंदरावर परत येत असत. पण त्यामुळे मासे लहान मिळाले तरी अगदी ताजे व चवदार मासे मिळत असत. बोटीवर प्रवेश मिळाल्या वर पटकन खाली असलेल्या माशांवर एक नजर फिरवून साधारणपणे कोणत्या भागात आपल्या आवडीचे मासे दिसत आहेत ते पाहून त्या भागात आम्ही खाली उतरत असू. आणि पटापट जे मासे हवेत ते ढीगा मधून अलग करून त्याचा एक स्वतंत्र लहान ढीग करत असू.खलाशांनी आपली नित्यकर्मे आटोपून ते रीकामी झाले की त्यातील एक दोघेजण आमच्या माशाच्या ढीगा कडे पाहून त्याची किंमत ठरवित. तशी ही मंडळी,कोळीन बायांच्या मनाने खूपच दानशूर असत व आम्ही काढलेले बहुतेक मासे आणलेल्या वस्तूंच्या बदल्यात देऊन टाकीत. जास्तच झाले तर मग थोडे पैसेही द्यावे लागतात म्हणजे साधारणपणे एक ते दीड किलो मासे आमच्या पिशवीत आम्ही भरून घेऊन येत असू व अजुनही आठवते चार ते आठ आण्याच्या पेक्षा जास्त पैसे दिलेले नाहीत.
एवढ्या वेळात समुद्रपाण्याची उंची देखील कमी कमी झालेली असे . हे मासे बोटीतून बंदरावर नेण्यासाठी बंदरावर बैलगाड्या असत आणि त्या गाड्या मोठ-मोठ्या हार् या मधून हे मासे झाई गावात घेऊन जात त्यामुळे कधीकधी एखादा प्रेमळ गाडीवाला आम्हाला गाडीत ही बसवून किनार्यापर्यंत घेऊन जाई.तेथून जलदीने चाल मांडत आम्ही बोर्डीच्या किनार्यावरून गावात येत असू.अंधार झालेला असल्यामुळे थोडीशी भीती वाटते मात्र रोजचा पायाखालचा रस्ता असल्याने विशेष वाटत नसे. घरी आल्या आल्या घरच्या लोकांना आणलेली कमाई दाखवून त्यांच्याकडून शाबासकी मिळाली की थोडे बरे वाटे.विशेषतः आप्पांना मुशी या नावाचा मासा आवडे कारण त्यांच्या प्रकृतीला तो झेपत असे व त्यांना कोणताही त्रास होत नसे. कारण त्यांच्या कफ कारी प्रकृतीमुळे त्यांना इतर मासे चालत नसत मात्र मुशी मासा ते मोठ्या आवडीने खात असत. त्यानंतर मग स्वच्छ आंघोळी करून आम्ही आणलेल्या माशांचा आस्वाद घेण्यासाठी तयार होत असू. खूपच मजेशीर दिवस आणि काहीतरी धाडसाचे काम केल्याचा आनंद या वयात मिळे.हे खरे आहे की त्या दिवसात खाल्लेल्या माशाप्रमाणे पुन्हा कधी तसे मासे खावयास मिळाले नाहीत आज आज त्या माशांची आठवण येते मात्र..त्या हून जास्त बुलीची प्रकर्षाने आठवण येते कारण एके दिवशी चा घडलेला तो प्रसंग….
एके दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही बंदरावर पोहोचलो मात्र त्या दिवशी आमचा अंदाज चुकला व बोटी थोड्या उशिरा येतील असे कळले आता काय करायचे रिकामा वेळ कसा घालणार तेव्हा श्यामच्या डोक्यातून एक सुपीक कल्पना निघाली. समोरच समुद्रात “हाथीणी” देवीचे मंदिर आहे हे मंदिर समुद्रात असून तो एक निसर्गाचा चमत्कार आहे.
हाथी नी म्हणजे हत्तीणी! हे देऊळ हत्ती या देवतेला अर्पित केले आहे. मला वाटते हत्ती या देवतेला अर्पण केलेले भारतातील तरी हे एकमेव मंदिर असावे. देवळास मानव निर्मित दरवाजे खिडक्या शिखर, असा कोणताही साज दिलेला.नाही मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे झालेल्या दगडांच्या विशिष्ट रचनेमुळे, प्रवेश द्वार व आत मध्ये देवीच्या प्रतिष्ठाना साठी एक लहान दगडाची हत्तीच्या पुसट आकाराची दगडाची देवीची मूर्ती, घुमटा सारखी वर दुसरी शीळा ,अशा अनेक दगडांच्या नैसर्गिक रचनेने येथे देवळाचा आकार मिळाला आहे, गंमत म्हणजे हे देऊळ सदैव पाण्यामध्येच असते ओहोटी झाली तरी येथे थोडे पाणी असतेच आणि कितीही भरती आली तरी सुद्धा देवळाचा कळस मात्र पाण्याचे वर दिसत असतो अगदी बोर्डी किनाऱ्यापासून सुद्धा या देवळाचे स्पष्ट दर्शन होते. आम्ही या पुरातन मंदिरा बद्दल ऐकून होतो आणि आज वेळ असल्यामुळे, आणि सगळ्यांची इच्छा असल्यामुळे, आम्हीही किनार्यावर उभे राहून वेळ घालवण्यापेक्षा समुद्रात शिरून हाथीणी देवीचे मंदिर जवळून पाहण्याचा मनोदय ठरवला.
या भागातील बरीच कोळी बांधव देवीला नवस करतात व ओहोटी च्या वेळी मंदिरात जाऊन नवसाची फेड करतात.आम्ही मंदिराकडे जात असताना काही मंडळी देवीचे दर्शन घेऊन नवसफेड करून परत येत होती.त्यांनी आम्हाला सूचनाही दिली,भरतीची वेळ आहे, त्यामुळे पटकन जाऊन पुन्हा या.आम्ही मंदिर पाहिले व पहिल्यांदाच पहात असल्यामुळे पुढून, मागून मंदिराची रचना ,निसर्गाचा चमत्कार पाहतांना थोडा वेळ झाला.पाणीही वाढू लागले होते.मात्र पुन्हा किनाऱ्यावर जाऊन आमच्या नेहमीच्या वाटेने बोटी थांबतात त्याजागी न जाता आम्ही सरळ किनाऱ्याला समांतर दिशेने पाण्यातून अंतर पार करू लागलो हे अंतर सुमारे एक फर्लांगभर असेल आणि आमच्या अंदाजानुसार आम्ही पटकन तेथे जाऊ असे वाटले मात्र हा अंदाज चुकला हा रस्ता नेहमीचा नसल्यामुळे तेथे असलेल्या चिखलाची, याला कादवी म्हणतात.. आम्हाला कल्पना आली नाही आणि आमचे पाय चिखलामध्ये सरकू लागले.पटपट चालता येईना. समुद्राच्या भरतीच्या लाटा जोरदार येत असल्यामुळे सरळ उभेही राहता येईना वास्तविक आम्ही पटकन समुद्राकडे निघून येण्याचा निर्णय घ्यायला हवा होता पण अति आत्मविश्वासामुळे तसे न करता,आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालू लागलो आणि तेथे फसलो. खूपच चिखलाचा थर सुरु झाला आणि पाउल खाली ठेवणे अशक्य होऊ लागले. कोणालाच धड पोहता येत नव्हते आणि छातीच्या वर पाणी गेले.. आणि आता मात्र आमची घाबरगुंडी उडाली.बुलीने ताबडतोब प्रसंगावधान राखून आम्हाला एकमेकांचे हात पकडण्यास सांगितले आम्ही दोघे बुलीच्या डावीकडे तर दोघे बुलीच्या उजवीकडे.अशारीतीने साखळी तयार करून ,हात घट्ट पकडून,चालत जाऊ लागलो. तरीही पाऊल टेकवणे व उभे राहणे कठीण होऊ लागले. आणि शाम ची उंची कमी असल्यामुळे तो तर आता तरंगू लागला होता. सगळे खूप घाबरलो आणि “मेलो मेलो वाचवा ..”अशा प्रकारच्या बोंबा आपोआप तोंडातून बाहेर आल्या.सुदैव असे की, आजूबाजूला काही मच्छिमार आपली लहान होडकी घेउन किनाऱ्यालगत मासेमारी करीत होते,त्यांनी आमचा आवाज ऐकला. ताबडतोब एका भल्या होडकी वाल्याने आपली लहान बोट आमच्या बाजूने वळवली, आणि थोडक्यासाठी आमची सुटका केली .आम्हाला आधार मिळला, आम्ही होडी वरती आलो. अगदी जीवा शिवाची गाठ होती, थोडा जरी उशीर मदतीसाठी झाला असता तर कदाचित काय अनर्थ ओढवला असता हे सांगता येत नाही.मात्र त्या दिवशी बुलीने आम्हा सगळ्यांची साखळी तयार करून दोन्ही हातांनी आम्हाला घट्ट धरून ठेवून जे प्रसंगावधान दाखवले आणि सतत धीर देत,सुखरूप काढले.अर्थात त्यादिवशी आम्हाला सरळ किनाराच दाखवण्यात आला आणि आम्ही इतके घाबरलो होतो की पुन्हा बोटीवर जाऊन मासे घेण्याचे जराही धैर्य उरले नव्हते. सरळ किनाऱ्यावरून बोर्डी चा रस्ता धरला. घरी आलो आणि थाप मारली “आज मासे मिळाले नाहीत,कारण बोटी खूप उशिरा येणार आहेत” घरी, लोकांना तेव्हातरी खरे वाटले असेल,मात्र खरी गोम काय होती, ते आम्हालाच माहीत!!काही दिवसांनी आमचे हे गुपित फुटलेच, आरडा खावा लागला. तरीही त्यानंतर,काही दिवसांनी, आमचा हा उद्योग पुन्हा,व्यवस्थित सुरू झाला. त्यादिवशी बुली आमच्याबरोबर नसती तर मग काही खरे नव्हते.. त्यादिवशी बुलीने आम्हाला दिलेल्या जीवदानाची आठवण सतत आहे आणि म्हणून बुलीची आठवण कृतज्ञता पूर्वक ,सतत येत राहणार.. मागे काही वर्षांपूर्वी बुलीची तारापूरला भेट झाली वयानुसार इतर गोष्टी जरी तिला आठवत नव्हत्या तरी हा प्रसंग मात्र तिलाही जसाच्या तसा आठवत होता आणि मोठी गंमत आली..
खूप छान, प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला !
बाका प्रसंग पण
तुम्ही सहज सोप्या शैलीने डोळ्यासमोर उभा केला
बुली धैर्यवान खरी
आणि त्या काळी ताजे मासे अशा पद्धतीने मिळवणे म्हणजे थरारक अनुभव
आता असे दिवस पुन्हा येणे नाही!!