बोर्डीचा बिसू
आजही भारताच्या खेडवळ भागात मांत्रिक तांत्रिक वैदू भगत इत्यादी जादू विद्या व तंत्र मंत्र जाणाऱ्या लोकांचे अस्तित्व आहे व व त्यांचे वर गावातील लोकांचा जबर विश्वास देखील आहे मी तर म्हणेन भारताच्या ग्रामीण जीवनाच्या वैद्यकीय व सामाजिक परिस्थितीचा ही मंडळी एक अविभाज्य भाग आहे आजचे विज्ञान कितीही प्रगत झाले असले व , विशेषतः , वैद्यकीय शास्त्र खूप पुढे गेलेले असले, गावागावातून, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी अनेक मंडळी असली, सरकारी आरोग्य केंद्र असले, तरी खेड्यातील आया-बाया ,विशेषतः अशिक्षित वर्गातील लोक आपल्या लहान लेकराला वांत्या जुलाब होत असतील तर गावातील वैदू कडूनच काही जडीबुटीचे औषध, नाही तर गावातल्या भगताला बोलावून त्यांच्या अंगात येणाऱ्या देवीकडून, बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी आशीर्वाद मागतात,व त्यांनी सांगितलेली औषधे करतात. एवढेच कशाला अगदी शहरातील देखील सुशिक्षित मंडळी एवढ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध असताना, कधीकधी शेवटचा ,इलाज म्हणून या तांत्रिक-मांत्रिक मंडळीचे सहाय्य घेताना दिसतात. सुशिक्षित आजीबाई देखील आपल्या नातवाची दृष्ट काढून टाकण्यासाठी, हातात तांदळाचे दाणे घेऊन ,ते आपल्या नातवावरून ओवाळत,, एखादा मंत्र उच्चारीत, चुलीत ,गॅस वर टाकते व त्याचा ..फटफट ..असा आवाज आला म्हणजे भुताची बाधा गेली यावर विश्वास ठेवते.
साठ-सत्तर वर्षापूर्वीच्या आमच्या बोर्डी गावात देखील ही तंत्र-मंत्र जाणारी मंडळी होती गावातील रामा भगत नेहमी बोलावणे आल्यावर घरी जाईल संध्याकाळचे वेळी देवीचा वारा घेऊन म्हणजे देवीच्या नावाने होणाऱ्या गजरात बेभान होऊन नाचत असे यावेळी त्याला लोक काही प्रश्न विचारीत व त्यावेळी त्याने त्या धुंदीत दिलेली उत्तरे म्हणजे त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सांगितलेला उपाय असे .झिपऱ्या वैदू होता कावीळ अतिसार व बायकांच्या काही आजारावर जडीबुटीची अनेक जालीम औषधे त्याच्याकडे होती आणि विशेष म्हणजे औषधापेक्षा याचे वरील जबर आत्मविश्वासामुळे बरेचसे लोक ठणठणीत देखील होत आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो माझे आजोबा कैलासवासी देवजी बाबा हेदेखील एक जाणकार भगत त्यावेळी देहेरी या गावात होते त्यांच्या ही कथा आमच्या आई कडून व आजीकडून आम्ही ऐकले आहे ते एका पायाने थोडे अधू असून देखील त्यांचेही अंगात एका विशिष्ट दिवशी कालीमातेचा संचार होत असे ही काली माता पावागड वासिनी होती ,आणि त्या बेभान अवस्थेत आपल्या अधूपायाचा विचार न करता,त्यावर मात करून , ते एका पायावर देवीचा नाच करीत असत. त्यावेळी ते मनाच्या एका वेगळ्या अवस्थेत असत. व त्यांनी त्या अवस्थेत, लोकांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरे व त्यांच्या समस्यावर सांगितलेल्या उपाययोजनावर, लोकांचा विश्वास होता. दर शुक्रवारी त्यांचा, देवी अंगात येणे हा कार्यक्रम असे व आजूबाजूच्या खेड्यातील अनेक मंडळी आपल्या संसारीक ,आरोग्यविषयक अशा इतर अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी तिथे येऊन बसत व बहुतेक वेळा त्यांच्या समस्यांचे निराकरण देखील होईल.देवजी भगतांचे नाव आजही आमच्या बोर्डी व पंचक्रोशीतील जुनी मंडळी आदराने घेतात.
बिशू आमच्या बोर्डी मधील ,त्यावेळचा प्रसिद्ध मांत्रिक.विंचू ,साप,अशा विषारी जनावरांचे विष देखील मंत्रविद्येने उतरवून, घरात कधीही सरपटणारी, विषारी, बिनविषारी जनावरे आढळली तर त्यांना पकडून जंगलात नेऊन सोडणे हा त्याचा हातखंडा. त्याचे नाव होते विश्वनाथ मात्र त्याचे लघु नाम झाले ,विशू व अपभ्रंश झाला बिसू! त्याचा पोटापाण्याचा उद्योग शिंपी कामाचा होता. विशेषतः लेडीज कपडे चांगल्या रीतीने शिवत असे आणि मांत्रिकी, समाजसेवा होती.या तांत्रिक-मांत्रिक लोकांची कांही पथ्येअसतात.त्यांनी मांस,मासे, दारू प्राशन करायचे नसते, व कधीही अगदी, रात्रीच्या प्रहरी देखील कोणी बोलावल्यास त्याचे घरी जाऊन, कोणत्याही प्रकारचे मानधन घेणे निषिद्ध असते. आणि बिसू हे नियम काटेकोरपणे पाळत होता.
आपल्या वैदिक वांड्मयात या मंत्र तंत्र व जारण मारण विद्या बद्दल खूप विस्ताराने माहिती आहे असे आपण वाचतो मी काही ते कधी वाचले नाही पण लहानपणी पाहिलेल्या या मांत्रिकांची ही विद्या व त्यांनी काही व्यक्ती वर केलेले उपचार प्रत्यक्ष पाहिजे आहेत. एखाद्या व्यक्तीला झालेला दंश असल्यास हातात तांदळाचे काही दाणे घेऊन व कधी कानात दोन बारीक काड्या ठेवून तोंडाने काही मंत्रोच्चारण करीत ही मंडळी त्यावर उतारा करीत त्यांच्या उच्चारणा मध्येच काही जादू असावी मंत्र व शब्दांची शक्ती विष पुरविण्यात कामाला येत असावी.मात्र एक गोष्ट ही खरी आहे जवळजवळ 90 टक्के सरपटणारी जनावरे ही बिनविषारी असतात त्यामुळे त्यांचे विशेष लागत नाही परंतु विंचवाचे विष हे खूप वेदनाकारक असते आणि तेथे मात्र आम्ही अनुभवले आहे व पाहिले आहे की बिसू मांत्रिक कितीही जहरी विंचू असला तरी दंश झालेल्या व्यक्तीला मंत्र टाकल्यानंतर त्याला वेदना कमी होत व काही वेळात तो व्यवस्थित चालू लागे. त्यावेळी बोर्डी खूपच लहान खेडे होते त्यामुळे दिवसा रात्री कधीही विशू ला कोणाकडून बोलावणे आले तर आम्ही मंडळी देखील या सर्व तमाशा पाहण्यासाठी त्या घरी गोळा होत असू आणि गंमत म्हणून ,हा प्रकार पाहत असू. मला आज वाटते की या मांत्रीकांच्या नियमात वर सांगितल्याप्रमाणे, असेही होते कि, त्यांनी नेहमी सत्य व बोलावे, नेहमी सत्य वचन ठेवल्याने वाणीला निश्चितच एक धार व शक्ती प्राप्त होत असावी. आणि , बिसू, एक सत्यवचनी माणूस होता आणि त्याचे वागणे बोलणे चालणे ही आदर्श होते गावातील मंडळी त्याचे विषयी आदरानेच बोलत.
आज बिसुची आठवण का झाली ?तर त्यावेळी घडलेला एक प्रसंग! मे महिन्याचे दिवस ,मी हायस्कुलात आठवी नववी इयत्तेत असेल. परिक्षा आटोपल्या होत्या, रिझल्ट लागले होते, त्यामुळे दिवस धमालीत जाई. कधी बोटीवर जमून मासे घेऊन येणे हे उद्योगही चालू असत .आराम, मौजमजा हाच आम्हा मुलांचा उद्योग! त्याकाळी आम्ही सर्व मामाच्या ओटीवर रात्री बिछाने पसरून झोपत.असू पंखे पण नव्हते, तर एसी चा प्रश्नच नव्हता! समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्याने चांगली झोप लागे. दिवसा उठल्यावर बिछाने चादरी समोरच्या अंगणात वाळत टाकायचे व संध्याकाळी पुन्हा उचलून ओटीवर टाकून निजायचे. वाळत घातलेले बिछाने व चादरी झोपताना झटकून घेतल्या पाहिजेत तेवढेही कष्ट घेत नव्हतो. पुरुष मंडळी ,मुले सर्व बाहेर ओटीवर झोपत रात्री गप्पांचा फड रंगत असे.बोलता बोलता कधी झोपेच्या अधीन होत असू हे कळतही नसे. खूप सुखाचे दिवस होते ते!!
त्यादिवशी जेवणे आटोपून नेहमीप्रमाणे बिछाने टाकून आम्ही बिछान्यावर लवंडलो होतो रात्रीचा गारवा होता प्रसन्न वाटत होते मात्र बिछाने थोड्या उबदार वाटत असल्याने झोप येत नव्हती आप्पा खंडू मामा आणि शेजारी दादा मामा पिल्लू आप्पा यांच्या गप्पा ऐकत आम्ही झोप येण्याची वाट पहात होतो मला माझ्या पाठी खाली असलेल्या चादरी मधून काही वळवळल्या सारखी हालचाल जाणवली एखादी झुरळ सापडले असेल म्हणून मी कधी कुशी बदलली जेणेकरून त्याने निघून जावे थोड्यावेळाने पुन्हा तशीच वळवळ जोरात झालेली वाटली व पाठीला काहीतरी काट्यासारखे खरचटल्याप्रमाणे झाले. आता मी थोडा घाबरलो आणि उठून बसलो आप्पांना देखील काय होते याची जाणीव दिली आप्पांनी व इतर ज्येष्ठ मंडळींनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन पटकन दिसण्यावरून सादर उचलली आणि आप्पांनी आपली विजेरी निशाण्यावर पाडली त्या प्रकाशात भिंतीवर एक लहान 6 ते 8 इंचभरलांबीचे जनावर सरपटत गेल्याचे दिसले,भिंतीचे प्लास्टर सुट्टे झाल्याने धपकन खाली पडले व ते जनावर पटकन अंधारात पुढे नाहीसेही झाले .एवढे सारे काही क्षणार्धात झाले झोपलेली मंडळीदेखील जागी झाली बॅटरीच्या उजेडात माझी पाठ तपासली तर पाठीला थोडे सालपट निघाले होते मात्र कोठे रक्त दिसत नव्हते. अर्थातच कोठेही कुठल्यातरी छोट्या विषारी व बिनविषारी जनावराचा हा दात असावा असा सर्वांनी अंदाज केला कारण ते जनावर मात्र भिंतीवरून पडल्यानंतर अंधारात गायब झाले होते अर्थातच अशा वेळी सर्वांना विशू ची आठवण झाली व त्या काळात मोबाईल फोन वगैरे नसल्याने कोणीतरी त्याच्या घरी त्याला बोलण्यासाठी गेले दहा एक मिनिटात सायकलवर स्वार होऊन हजर झाला रात्रीचे दहा-साडेदहा झाले असते निरीक्षण करून,जनावराने दंश केलेला नाही आणि ते जनावर जर कमी लांबीचे असेल तर दातावरून ,ते फुरसे असावे असा अंदाज केला. तुम्ही एका मोठ्या संकटातून वाचले आहात. देवाचे आभार माना .असे सांगून बिसुभाऊ गेले देखिल . फुरसे एक छोटे, कमी लांबीचे व कमी जाडीचे असे जहाल विषारी जनावर आहे व त्याचा दंश झाल्यास त्वरित उपाययोजना न झाल्यास माणूस दगावू शकतो. म्हणून त्याचा दंश हा, सर्पदंशापेक्षा अतिजहाल मानला जातो. प्राण घातक मानला जातो. अप्पानी कोणत्यातरी घरगुती मलम पट्टी करून, माझ्या डोक्यावर हात ठेवला,श्री दत्त गुरूची त्यांची नेहमी ची प्रार्थना केली व मला शांतपणे झोपून जाण्यास सांगितले. उन्हात सुकत घातलेले बिछाने व चादरी झोपण्यासाठी अंथरताना व्यवस्थित न झटकल्याने, दिवसा च्या उन्हात त्रासून, सावलीसाठी, बिछानाखाली लपून राहिलेले, ते जहरी जनावर तसेच, रात्री चादरीखाली अडकले व माझ्या पाठी खाली आले.त्याचा उद्देश तेथून पळून जावे असावा, कदाचित चावा घेण्याचा प्रयत्नही केला असेल पण माझ्या शरीराच्या दाबामुळे त्याला तसे करता आले नसावे आणि म्हणून मी पाठ बदलल्यावर ते झटकन अंधारात नाहीसे झाले.. काहीहीअसो ,श्री गुरु दत्ताचे सुखरूप बचावलो . घाबरल्या ने मला झोप काही आली नाही, त्यानंतर गावातील ज्या ज्या नातेवाईकांना ही गोष्ट कळली त्यांनीही ही, केवळ दैवकृपेने आम्ही बजावल्याचे सांगितले .खरंच छोट्याच्या हलगर्जीपणामुळे केवढा मोठा अनर्थ,
प्राणावर बेतणारी गोष्ट होऊ शकते, हेच त्या प्रसंगातून मी आयुष्यात शिकलो आहे प्रसंग अजूनही डोळ्यासमोर तसाच येतो आणि विचार येतो जर त्याने दंश करण्याचा केलेला प्रयत्न किंचित जरी यशस्वी झाला असता,तर काय झाले असते???बिसुभाऊ पटकन आला सर्व व्यवस्थित पाहिले व सर्व ठीक असल्याचा निर्वाळा देऊन गेला त्यावेळी आम्हा सगळ्यांना खूपच शांत आणि हुश्श वाटले.या रात्रीच्या वेळी बीसूने आमच्यासाठी,खास घरी येऊन, काहीही अपेक्षा न ठेवता , आम्हाला दिलासा दिला व एका मोठ्या संकटातून आम्ही सुटल्याचे सांगितले.आमच्यासाठी तरी ही फार मोठी, आयुष्यभर लक्षात राहण्याजोगी गोष्ट आहे .विशेषता माझ्या आयुष्यात ज्या काही अशा जिवावरच् बेतलेल्या घटना घडल्या आहेत, त्यातील लहानपणीची ही एक घटना.. बिसू भाऊ त्याचा साक्षिदार म्हणून त्याची आठवण! बोर्डीत असेपर्यंत विशू भाऊची भेट होत असे, आदराने त्याला मी संबोधित असे .मात्र बोर्डी सोडली आणि संपर्क संपला.दुर्दैवाने आज विशुभाऊ आणि त्याच्या कुटुंबातील कोणीच हयात नाही त्याचे जुने घर ही आता कुणीतरी विकत घेऊन तेथे बंगली उभी केली आहे . बिसूच्या स्मृतीला खूप आदरपुर्वक प्रणाम.
काळ आला होता पण वेळ नव्हती आली
त्या काळातील जीवना चे यथार्थ चित्रण