कै. वासुदेव काशिनाथ सावे, ती.भाऊ भाग ४
भाऊंना पर्यटनाची खूप आवड होती हे मी मागे नमूद केले आहे त्यामुळेच माझ्या प्रत्येक देशांतर्गत वा परदेशवारी नंतर माझ्याशी अतिशय आस्थापूर्वक चौकशी करीत आणि मलाही त्यांच्या या शंकांचे निरसन करण्यात व माझे अनुभव त्यांची शेअर करण्यात मजा येत असे. भाऊंना स्वतःला एकंदर कौटुंबिक व आर्थिक परिस्थितीमुळे जास्त पर्यटन करता आले नाही सहन 1977 मध्ये राजा ट्रॅव्हल्स या त्यावेळच्या प्रसिद्ध पर्यटन संस्थेमार्फत भाऊंनी उत्तर भारताची सफर केली राजाभाऊ पाटील यांनी सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या बांधवा करता सवलतीमध्ये एक स्पेशल ट्रीप आयोजित केली होती आणि आणि भाऊ व आई उभयतांनी ही सहल खूप मजेने केली. नगर येथून अमृतसर, चंदिगड ,दिल्ली आग्रा दिल्ली टू मुंबई अशी ही सहल होती . भाऊ या पहिल्याच लंब्या सफर मध्ये खूप भावुक झाले होते आणि सहलीला निघण्याआधी त्यांनी माझ्याशी बातचीत करून त्या परिसराची मला असलेली जुजबी माहिती त्यांनी घेतली होती. श्रीनगर येथून पाठवलेले एक पत्र मला नुकतेच सापडले ते मुद्दाम या लेखासोबत जोडीत आहे. काश्मीरमधील केशर व तलावांचे फुल बागांचे सृष्टीसौंदर्य पाहतांना हा हाडाचा शेतकरी येथील भात शेतीचे ही निरीक्षण करतो व येथील ग्रामीण शेतकरी अजूनही कसा हलाखीत आहे असे निरीक्षण नोंदवतो .त्यानंतर भाऊंनी केसरी ट्रीप प्रसिद्ध संस्थेबरोबर दुसरी नेपाळ यात्रा केली. योगायोगाने केसरी भाऊंनी सुरू केलेल्या आपल्या केसरी ट्रॅव्हल्स या संस्थेची ही पहिलीच सफर होती आणि त्यामुळे भाऊंच्या दृष्टीनेही ही पहिली परदेश वारी असल्याने भाऊ खूपच उत्साहित होते .त्यानंतर भाऊंनी माझ्याशी नेपाळ बद्दलही आपली निरीक्षणे नोंदवली आणि तेथेही ही डोंगरांमध्ये शेतकरी मक्याची लागवड कशी करतो याचा खास उल्लेख माझ्याकडे केला होता. भाऊंना अजूनही खूप करावयाचे होते विशेषतः अमेरिका या देशाविषयी त्यांची स्वप्ने होती. आपली नातवंडे तेथे हे कामासाठी ,शिक्षणासाठी गेली त्याचा त्यांना खूप अभिमान होता. मात्र येथे जाऊन आपल्या नातवंडा समवेत राहण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही याची आम्हाला खूप खंत वाटते. भाऊंनी अमेरिका देश व अमेरिकन शेतकरी त्याची शेती पाहिली असती तर काय वाटले असते व आल्यावर त्यांनी आपल्या शेतीत कोणते प्रयोग केले असते हे आता फक्त स्वप्नच राहिले.
भाऊंनी उत्कृष्ट शेतकरी बनून आपले बालपणी ते स्वप्न साकार केले आणि वासुदेव सावे हा आपला एक स्वतंत्र ब्रँड तयार केला मुंबई व गुजरात मधील शेतकरी वासुदेव सावे यांची तोंडली ,केळी विकणे म्हणजे स्वतःचा सन्मान समजत असत व आपल्या ग्राहकांना आम्ही वासुदेव सावे यांचा माल तारापूर हून मागवतो असे मोठ्या अभिमानाने सांगत असत. भाऊंना एवढे व्यावसायिक यश मिळण्याचे कारण शेतीमधील अतिशय सूक्ष्म अशा बारकाव्यांचा त्यांचा स्वतःचा अभ्यास होता. हे ज्ञान त्यांनी कुठे पुस्तकात वाचून मिळवले नव्हते. मात्र रोज रोजच्या निरीक्षणातून अनुभवातून त्यांनी हे आपले आडाखे तयार केले होते.त्यांची काही सूक्ष्म निरीक्षणे यांची उदाहरणे मी बालम भाई कडून ऐकली ती मुद्दाम देत आहे
सामान्यपणे शेतकरी पावसाआधी असताना जमीन तापलेली असताना राब करतात .राब म्हणजे जमिनीवर पालापाचोळा पसरून ते पेटवणे जेणेकरून जमिनीवरील व जमिनी आतील थरांमध्ये असलेले व निरुपयोगी बीज नष्ट होऊन पुढील पिकासाठी ते हानिकारक ठरू नयेत. भाऊ आपला राब जमीन थोडीशी थंड झाल्यावर रात्रीचे वेळी दव पडून थंड झाल्यावर पेटवत त्यामुळे हळूहळू ज्वलन होत असे आणि दीर्घ काल ते टिकून राहत असे जेणेकरून जमिनीला एकदम उष्णता न मिळता दीर्घकाल सतत थोडी थोडी उष्णता मिळून जमीन उत्तम प्रकारे भाजून निघत असे.
दुसरी त्यांची पद्धत म्हणजे पहिल्या पावसानंतर बांधावर कडेकपारीत लहान-लहान गवत उगवते हे सर्वसाधारणपणे शेतकरी उपटून टाकतो भाऊ म्हणत हेच तण कचरा म्हणून त्वरित काढू नये कारण थोडेच कालांतराने येणाऱ्या धुवांधार पावसामध्ये जमिनीची धूप होणार असते ती थांबवण्या मध्ये या प्रथमतः उगवणाऱ्या गवताची खूप मदत होते आणि जमिनीची धूप थांबते. उडीद पेरून हे काम करत .
भोकर या या फळाची भाऊंनी मुद्दामून व्यावसायिक दृष्ट्या केलेली लागवड म्हणजे एक अफलातून प्रयोग होता ज्यातून भाऊंच्या शेतीमधील आर्थिक गणित देखील खूपच यशस्वी झाले. साधारणतः शेतकरी भोकराची मुद्दाम लागवड न करता जमिनीवर कुठेतरी उगवलेल्या झाडापासून फळे काढून जे काही उत्पन्न मिळेल ते घेतात मात्र भाऊंच्या व्यापारी दृष्टीने त्यांनी गुजरातमध्ये असलेली भोकराची मागणी लक्ष्यात आली आणि ती व्यापारपेठ जर आपण काबीज करू शकलो तर त्यात मोठा आर्थिक लाभ आहे हे त्यांच्या लक्षात आले. मात्र भोकर या झाडाची कलमे कोणी करत नव्हते कारण अशक्य कोटीतील काम होते त्याचप्रमाणे फळातून झाडाखाली पडलेल्या बिया जर रोपासाठी वापरल्या आणि झाडे तयार केली तर त्यांना खूप उशिरा फलधारणा होत असे. भाऊंच्या निरीक्षणात असे आले की पक्षांनी खाल्लेल्या भोकर फळांच्या बिया व त्यांच्या विष्ठेतून झाडाखाली पडलेल्या दिसतात अशा बिया लागवड केल्यास खूप लवकर फळधारणा होण्यास मदत होते.भाऊंनी अशा रीतीने बिया जमवून त्यांच्या शेतीमध्ये भोकर झाडांची भरपूर लागवड केली ,अशा झाडांना फलधारणाही चांगल्या प्रकारे व अल्पकाळात होऊ लागली आणि भाऊंची भोकरे हंगामा च्या आधीच गुजरात मध्ये जाऊ लागल्याने त्यांना खूप आर्थिक लाभ झाला , सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे हे ज्वलंत उदाहरण म्हणायला हवे.
भाऊ एक जिगरबाज शेतकरी होते .एखादा नवा प्रयोग आपल्या शेतीमध्ये करायचे म्हटल्यानंतर कितीही प्रतिकूलता येवो भाऊ त्यासाठी कष्ट घेऊन निसंकोचपणे हे करून दाखवीत असत .त्याकाळी भाजीची केळी ही कलकत्ता केळी म्हणून ओळखली जाते व बंगालमध्ये ती तयार होत असत मात्र त्याचे रोप आमच्या भागात कुठेच मिळत नसे. चिंचणी वाणगाव भागातील एक प्रख्यात शेतकरी श्री. श्राॅफ यांचे मधील वाडीत त्यांनी ही लागवड केली होती व त्याचे त्यांना खूप आर्थिक लाभ होत. मात्र व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांनी या केळी ची रोपे कोणाला देण्यास टाळले होते .एकदा भाऊ वाणगाव स्टेशन वरून चिंचणी येताना रस्त्या लागत यांना श्रॉफ शेठ यांची व केळीची लागवड दिसली विशेष म्हणजे कुंपणा लगत काही फेकून दिलेली अशक्त रोगट अशी केळीची रोपे दिसली .भाऊंनी यातील मिळतील तेवढी चार-पाच रोपे आपल्या गाडीवाना मार्फत जमा केली व तारापूरला घेऊन आले. आपल्या या अनुभवातून स्वतःच्या प्रयोगातून भाऊंनी आपल्या पद्धतीने ती वाढविली आणि त्यापासून अनेक रोपे काही कालावधीत तयार केली थोड्या दिवसात खास कलकत्ता केळीचा एक पट्टा भाऊंच्या वाडीत तयार झाला आणि आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर भाऊंनी मागे वळून पाहिले नाही कलकत्ता केळी ऐवजी वासुदेव सावे यांची भाजीची केळी हा ब्रँड तयार झाला आणि मुंबई गुजरात मार्केटमध्ये त्यांना त्याचा मोठा पुरवठा करता आला. मात्र आपल्याला जे कष्ट लागवडीसाठी करावे लागले ते इतरांना करावे लागू नयेत म्हणून भाऊंनी आपल्या लागवडी मधील केळीचे बीच गरजू शेतकऱ्यांना आनंदाने दिले. ही उदार मनस्क वृत्ती व आपल्याबरोबर दुसऱ्यालाही बरोबर घेऊन जाण्याची प्रवृत्ती भाऊ सारख्या थोड्या शेतकऱ्यांजवळ त्यावेळी होती. आज बोर्डी पासून ते पुढे वसई आगाशी पर्यंत या केळीची लागवड अनेक शेतकरी बांधव करून आपल्या या शेती उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा त्यातून निर्माण झाला आहे खरेतर भाऊंनी या कामाला लागवडीला चालना दिलेली आहे मात्र भाऊंच्या या कामाचे श्रेय मिळावयास हवे तेवढे त्यांना मिळाले नाही असे मला खेदाने म्हणावेसे वाटते .
ज्या तोंडली लागवडीमध्ये भाऊंनी उत्तम यश मिळविले व आपला धबधबा मार्केटमध्ये निर्माण केला त्या तोंडलीची लागवड देखील भाऊंना सहजासहजी करता आली नाही .बोर्डीचे उद्यमशील शेतकरी कै.मुकुंदराव सावे यांनी महाराष्ट्रात प्रथम तोंडली यशस्वीपणे उत्पादन केली त्याचाही मोठा इतिहास आहे. मात्र त्याचे बियाणे ते फक्त आपल्या निकटवर्ती शेतकऱ्यास देत असत. भाऊंना त्यांचेकडून ते मिळणे दुरापास्त होते मात्र भाऊंचे साडू भाई श्री नारायणराव सावे यांना तोंडलीचे बियाणे मुकुंदराव यांनी दिले होते आणि त्यांनी सुद्धा काही प्रमाणात चिंचणी च्या बागेमध्ये तोंडली चे पीक घेण्यास सुरुवात केली होती. नारायणराव हे भाऊंचे स्नेही असल्यामुळे त्यांच्या नेहमी बैठकी नारायणरावांच्या घरी होत असत. एके दिवशी अशीच बैठक रंगली असताना भाऊंनी आपल्या विश्वासू नोकराला सांगून कडेचे 2 वेल गाडीत टाकून ठेवण्यास सांगितले. त्यानेही ते काम व्यवस्थित केले आणि भाऊंना मिळाले. एकदा चांगले बी मिळाल्यानंतर त्याचे उत्तम बियाणे तयार करून आपल्या स्वतंत्र तांत्रिक पद्धतीने त्याची उत्तम अशी व्यावसायिक लागवड करणे हे भाऊंचे खास वैशिष्ट्य होते आणि त्यांनी येथेही ते यश मिळवले. थोड्याच अवधीत भायखळा सुरत आमदाबाद मार्केटमध्ये भाऊंची तोंडली एक नंबरची ठरली यात काही शंका नाही. मात्र भाऊंचे बियाणे गावातील व परिसरातील इतर शेतकऱ्यांना विनासायास मिळत गेले हे सांगणे न लगे. भाऊंनी एखादे काम हाती घ्यायचे ठरविल्यानंतर तेथे साम-दाम-दंड-भेद या सर्व साधनांचा वापर करून आपले ध्येय हासिल केले आणि त्यामुळे कोणाचाही आर्थिक अथवा व्यावसायिक नुकसान होणार नाही हे पाहिले आणि स्वतः अशा एखाद्या नवीन तंत्रज्ञानात यश मिळवल्यानंतर आपल्या इतर सहकाऱ्यांना ,मित्रांना ते मुक्तहस्ते विनाअट देणे त्यांची खासियत होती.
आपल्या संपूर्ण आयुष्यात भाऊंनी काही पत्थे निश्चितपणे पाळली आणि त्यातले सर्वात प्रमुख म्हणजे आपल्या उत्पादनाचा खर्च कितीही होवो, भाव काहीही मिळो त्यासाठी कष्ट कितीही पडो, भाऊंनी आपल्या उत्पादन दर्जाबाबत कधीही तडजोड केली नाही .त्यामुळेच त्यांच्या काळात वासुदेव सावे हा एक ब्रँड तयार झाला. आपल्या मालाची बाजारपेठ निर्माण करताना त्यांनी कोणी एक व्यापारी इतरांपेक्षा जास्त पैसे देतो म्हणून सतत त्याचा पाठपुरावा केला नाही, तर मुंबई व गुजरात मधील अनेक व्यापा-यांची त्यांनी सतत आपला माल अनेक व्यक्तींना पाठविला जेणेकरून भाऊंना कधी व्यापाऱ्यांचे पाय धरावे लागले नाहीत .मात्र मुंबई गुजरातचे मोठमोठे व्यापारी भाऊंकडे विनंती करून आपला माल त्यांच्याकडे पाठवण्याबद्दल सांगत. आपले मालाचे बी बियाणे विनाअट खुल्या दिलाने त्यांनी गरजू शेतकऱ्यांना कुठलाही विशेष मोबदला न घेता दिले एवढेच नव्हे तर आपल्याला अवगत तंत्रज्ञान देखील त्यांनी आपल्या सहका-या बरोबर शेअर केले .भविष्यकाळात शेती हा एकमेव उद्योग शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार नाही त्यासाठी शेतीला पूरक असे अनेक उद्योग शेतकऱ्याने आपल्या कुवतीप्रमाणे निर्माण करून त्यातूनही आर्थिक सहाय्य मिळविले पाहिजे हे समजून स्वतः त्याचे प्रयोग केले त्यामुळे शेतीमालातील बाजारभावातील अनेक चढ-उतारांचा त्यांनी यशस्वीपणे सामना केला व आपले उत्पन्न नेहमी चालू ठेवले .शेतीत मिळणारा नफा भाजी अथवा इतर बिलासाठी न वापरता त्यांनी तो पैसा आपले नवीन प्रयोग व नवीन जमीन घेण्यासाठी वापरला. भाऊंचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आपल्या कामगार मजूर त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी ,कुटुंबाचा एक घटक अशी असे .एखादा कामगार पुरुष व स्त्री वृद्ध झाली तिला नेहमीचे कष्टाचे काम करवेनासे झाले तरी अशा कामगारांना भाऊ घरी न पाठवता हलके लहान काम, कचरा काढणे ,साफसफाई करणे ,असे काम देत व त्यालाही रोजीरोटी उपलब्ध व्हावी, एवढेच नव्हे तर अशा वृद्ध व तरुण माणसांना कधी मोठा आजार झाल्यास त्याला अगदी मुंबईतील इस्पितळात योग्य उपचार मिळावे याची देखील त्यांनी प्रसंगी व्यवस्था केलेली आहे.
मला वाटते भाऊंच्या कर्तृत्वाचा व शेतीमधील योगदानाचा योग्य सन्मान समाजाकडून व शासनाकडून व्हावा तेवढा झाला नाही .भाऊंना कोणतेच सरकारी मानसन्मान मिळाले नाहीत तरी त्यांच्या मनात त्याबद्दल कोणतीही कटुता नव्हती. आपले समाजाप्रती असणारे योगदान त्यांनी शेवटपर्यंत दिले .सोमवंशीय क्षत्रिय संघाच्या तारापूर शाखेमार्फत होणाऱ्या समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे. भाऊंनी बांधून दिलेल्या पिताश्री वासुदेव काशिनाथ सावे यांच्या स्मृति प्रित्यर्थ बांधलेल्या सभागृहात, शाखेचे व समाजाचे गावाचे अनेक कार्यक्रम शानदाररित्या होत असतात.
शासनाच्या आरोग्य केंद्रासाठी तारापूर गावात जागा मिळत नसताना भाऊंच्या अथक प्रयत्नाने एक छान जागा झाली व आज उभे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे भाऊंच्या प्रयत्नांशिवाय होऊ शकले नसते हे तारापूर वासीय जाणतात. येथील श्रीकृष्ण मंदिर व तसेच तारापूर एज्युकेशन सोसायटी चा आजवर झालेला विकास यात भाऊंनी भरघोस आर्थिक सहाय्य व योगदानदिले आहे .
त्यांच्या अखेरच्या दिवसात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उमेद व स्वप्ने खूप असूनही शरीराकडून साथ मिळत नसल्याने झपाटा कमी झाला होता .मधुमेहाने उचल खाल्ली होती व थकवा जाणवू लागल्याने इस्पितळातील फेऱ्या वाढल्या होत्या तरीदेखील त्या परिस्थितीत भाऊंचे भविष्य काळातील वेध घेणे सुरू होते. तारापूर परिसरातील कारखानदारीमुळे शेतीला पाण्याचा व हवेचे प्रदूषण याचा मोठा फटका बसत होता .भविष्यातील शेतीसाठी काहीतरी बदल करणे आवश्यक ठरणार होते व त्यासाठी भाऊंचे नियोजन सुरू होते .त्यांना मशरूम या भाजीची शेती करावयाची होती एवढेच नव्हे तर त्याचा दर्जा इतका उच्च ठेवावयाचा होता तिथे मशरूम त्यांना परदेशी निर्यात करावयाचे स्वप्न होते मात्र नियतीला ते मंजूर नसावे. मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांना डहाणू इस्पितळात दाखल व्हावे लागले होते. हृदयाची क्षमता खूपच कमी झाली होती ,मात्र डॉक्टरांनी काही तातडीचे उपचार करून घरी जायची परवानगी दिली होती. दोन-तीन दिवस इस्पितळात राहिल्यामुळे भाऊंना दूरदर्शन वरील बातम्या ऐकता आल्या नव्हत्या .तेव्हा संध्याकाळी त्यांनी बातम्या ऐकल्या, जेवण म्हणून काही फळे घेतली. बालमभाईंनी काळजी घेतली. झोपायला जाण्याअगोदर सर्वांशी मनसोक्त गप्पा मारून आपल्या इस्पितळातील वास्तव ,या बाबत काही गमतीजमती सांगितल्या व ते निद्राधीन झाले मात्र रात्री त्यांना जाग आली व लघवी साठी उठण्याचे व चालण्याचे निमित्त झाले. रवि बंधू यांना हळूहळू चालवत नेत असताना ते व्यवस्थित चालत गेले व अचानक रवीच्या खांद्यावर मान टाकून भाऊ निष्प्राण झाले .अगदी बोलता चालता म्हणतात त्याप्रमाणे ही घटना अवचित निमिषार्धात घडली आरती प्रभूंचे शब्द त्यांचे बाबतीत किती सार्थ ठरले पहा
” अखेरचा या वळणावरती मंद सुगंधी फुलोरा यावा थकले पाऊल हळूच उठावे आणि सरावा प्रवास सारा”…
एक कर्मयोगी जीवन अशा रीतीने निमाले. आपले जीवनकार्य आटोपून लहानपणी पाहिलेली एक उत्कृष्ट शेती करणारा शेतकरी, हे स्वप्न पूर्ण करून भाऊ देवाघरी गेले.
भाऊच्या जीवन कार्याचा आढावा घेताना आईबद्दल लिहावेच लागेल कारण तिचे भाऊंच्या जीवनात व एकूणच सावे कुटुंबियांच्या ऊत्थापनात फार मोठे स्थान आहे नव्हे कुटुंबीयांचे आजचे चित्र आहे ते आई ही भाऊंची साथीदार होती, म्हणूनच ! आईच्या समर्पित वृत्ती मुळेच भाऊंना आपला बिकट मार्ग यशस्वी पणे पार करता आला, आणि आयुष्यातील ईप्सित साध्य करता आले. भाऊंना यशोशिखरावर स्थानापन्न झालेले पाहतांना तिला आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता वाटली .
आ चे माहेरची नाव बीज. आमचे राष्ट्रीय फुल कमल चिखलामध्ये उगवते ,पाण्यामध्ये राहते ,दिसायला सुंदर असणारे विविधरंगी कमलपुष्प देवी लक्ष्मी च्या हातात दिसते मात्र ही कमल भाऊंच्या आयुष्यात लक्ष्मीच्या रूपाने आली आणि त्यांच्या बरोबरीने कष्ट उपसून एक दिवस तिने भाऊंना व पर्यायाने सावे कुटुंबाला वैभवाचे दिवस दाखविले. मानव परिस्थितीचा गुलाम आहे ही निराशाजनक विचारधारा भारतीय संस्कृतीला मान्य नाही. कितीही बिकट व विपरीत परिस्थिती प्राप्त झाली तरी मानव स्वतःचे ध्येय उच्च ठेवील आणि दृष्टी उन्नत ठेवील तर तो यशोशिखराकडेच वाटचाल करणार व एक दिवस आपले ध्येय प्राप्त करणार अशी आमच्या भारतीय संस्कृतीची धारणा. संपन्न घरातून येऊन भाऊंच्या संसार आपल्या कष्टाने, जिद्दीने आणि नेकीने करून तिने एक दिवस परिस्थितीवर मात केली व भाऊंच्या जीवनाचे व स्वतःच्या जीवनाचे ही सार्थक करून घेतले आहे. तिच्या संसारात त्या काळात तिचे भोजन भांडार नेहमीच समृद्ध राहिले आहे. कधीही वेळी-अवेळी भाऊंचे मित्र कामगार नातेवाईक जेवणाच्या वेळी आले तर दोन घास खाऊन जा अशी भाऊंची धारणा असे आणि त्या वेळी कोणतेही सबब पुढे न करता आलेल्या पाहुण्याला जेवण करून वाढणे तिचे कर्तव्य. त्या कर्तव्यात कधीही चुकली नाही, त्याबद्दल कोणतीच नाराजी व्यक्त केली नाही म्हणून भाऊ तिला प्रेमाने माझी अन्नपूर्णा असे म्हणत.
घरी आलेल्या पाहुण्यांच्या बाबतीत माहेरची माणसे सासरची माणसे असा भेदभाव कधीच नव्हता. समोरची व्यक्ती ही माझ्याकडे आलेली सन्माननीय पाहुणा आहे त्यामुळे तिचे योग्य ते आदरातिथ्य करणे हे माझे कर्तव्य याच भावनेने तिने हे सर्व केले .भाऊंना ह्या गोष्टीचे खूप कौतुक होते आणि ते तसे बोलूनही दाखवत. त्यांचे वडील मोरेश्वर राऊत ऊर्फ तात्या हे त्यावेळी चिंचणी गावाचे सरपंच होते आणि आजही त्यांचे नाव एक आदर्श सरपंच व समाजसेवक म्हणून परिसरात घेतले जाते. आपल्या गावातील कोणताही वादविवाद ,विकोपाला जाऊ नये हा त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे त्यांच्या ओटीवर अधून मधून ही गावकी ची सभा भरत असे व कोणत्याही कौटुंबिक भांडणाचा समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न असे .त्यावेळी गावातील अनेक ज्ञातीचे गावकरी जमत आणि त्यांचे संभाषण आपल्या बोलीभाषेत होत असे त्यावेळी छोट्या असलेल्या या बहिणी ते संभाषण ऐकत आणि सहाजिकच त्या वेळी त्यांचा या अनेक बोली भाषांशी परिचय होई. म्हणूनच आज आपल्या वाडवळी भाषेबरोबरच वारली, मांगेली ,डावरी गुजराती ,मुस्लिम अशा अनेक स्थानिक बोली भाषा ती अस्खलितपणे बोलू शकते, ऐकणारा चकित होतो आणि तिची खरी मातृभाषा कोणती म्हणून अचंबित होतो.
माणसाप्रमाणे आईला प्राणी, पशु, पक्षी यांचा ही खूप आवड .मांजरे, कुत्रे ,हरीण ,मोर राजहंस असे अनेक प्राणी पक्षी तिच्या संग्रहालयात एकेकाळी सुखेनैव नांदत. बैल, गाई, म्हशी या शेतकऱ्यांच्या आवश्यक पाळीव प्राण्यांना तर तिच्याकडून मोठा सन्मान मिळाला. ती जातीने लक्ष देई .प्रत्येकाला तिने नाव दिलेलं. लहान मुलांना घेऊन बरेचसे लोक हे पाहायला येत. हेच प्रेम झाडावेलीवरही. तिच्या प्रेमळ स्पर्शाची जाणीव त्यांना असेल म्हणूनच तिची वाडी, बाग फुलाफळानी बहरलेली असे. वाडीतील एखादा किंवा कामगार आजारी पडला तर त्याची वास्तपुस्त करणे व त्यासाठी आपल्याला काही करता येईल ते करणे, भाऊंचे मार्फत, त्याचे काम करून देणे हे देखील तिने अगदी सहजपणे केले आहे, आपल्या परिसरातील कितीतरी दुखी व अडचणीत सापडलेले संसार तिने उभे केलेले आहेत .
संसाराच्या सुरुवातीच्या काळात तिची परिस्थिती कठीण च असेल. मुलाबाळांचे लेंढार सांभाळत व मोठा भाऊ या नात्याने भाऊंच्या कर्तव्यात भाग घेत, भाऊंच्या जबर महत्त्वाकांक्षी वृत्तीला व कष्टाना साथ देत संसाराचा रहाट गाडा पुढे नेत असताना तिला आपली हौसमौज चांगले कपडे दागिने असे काहीच शौक करता आले नाहीत. पर्यटनाचे तर नावच नाही. मागे सांगितल्याप्रमाणे भाऊंचे बरोबर राजा ट्रॅव्हल मार्फत केलेली काश्मीर सफर ही तिच्या आयुष्यातली एक मोठे पर्यटन त्यानंतर रवि बंधुने एकदा कोल्हापूर पन्हाळा तिला करवली कारण तेच त्याचे सासरचे गाव.मात्र इतरांसाठी खस्ता खात असताना आपल्या आयुष्यात जरी काही शौक करता आले नाही तरी त्याची खंत तिला कधीच वाटली नाही व भाऊंसमोर त्याबाबतीत कधीही आपली नाराजी व्यक्त केली नाही .भाऊंच्या तापटस्वभावामुळे भाऊ जरी कधी रागवून बोलू लागले तरी ती शांतपणे ऐकून घेई व शेवटी एका वाक्यात त्या विवादाचा समारोप करी. भाऊंना या वाक्यावर शांत राहावे लागे. भाऊंच्या शेवटच्या आजारात आपले स्वतःचे आजारपण विसरून तिने त्यांची मनोभावे सेवा केली व कधीही कुरकुर केली नाही.
भाऊंच्या समोर कधी कौटुंबिक संसारीक व व्यवसायिक जीवनातील पेच उभा राहिला तर भाऊंचा शेवटचा सल्लागार असे कारण तिच्या चतुरस्त्र बुद्धीमुळे ती योग्य दिशा देई तिही कुठल्याही गोष्टीचा सहृदयपणे विचार करून ! लौकिक शिक्षण नसेल पण अफाट बुद्धिमत्तेची देणगी आणि सारासार विचार करण्याची क्षमता तिच्यात नक्कीच आहे. भाऊं सारख्या झंझावाताशी एकरूप होऊन संसार करण्याची क्षमता तिच्यापाशी होती.
कै .तात्यांच्या समृध्द कुटुंबात वाढलेली आई, भाऊंच्या संसारात आली त्या वेळी तात्यांनी भाऊंच्या सारख्या एका निष्कांचन तरुणाला मुलीचा हात देणे खूप मोठी गोष्ट होती. त्या वेळी लोकांनी त्यांना तसे सावध केलेही. त्यांचे म्हणणे असे की हा तरूण थोड्याच दिवसात काय करून दाखविल पहा. तात्यांनी काही निकष लावून आपली मुलगी भाऊंच्या सुपूर्त केली ते म्हणजे भाऊंची तडफदार , सुंदर व्यक्तिमत्व व त्यांना आलेला त्यांच्या भविष्याचा अंदाज आणि आपल्या कर्तृत्वाने तो विश्वास भाऊंनी सार्थ करून दाखवला. भाऊ सारख्या महत्त्वाकांक्षी झंझावाताला आयुष्यभर व्यवस्थितच सांभाळणे सोपे काम नव्हते पण तिने ते केले. भाऊ 2000 एक मध्ये स्वर्गवासी झाले. आपला शेवट जवळ आलेला त्यांना समजून चुकले होते. पण त्यांनी आईकडे इच्छा प्रदर्शित केली होती, आज पर्यंत आपण दोघांनी तारापूरचा हा मळा फुलविला माझ्या पश्चात तुला हे काम करावे लागेल.भाऊंची इच्छा त्यांचे पश्चात दहा-पंधरा वर्षे तिने काम करून ती पूर्ण केली. एकटीने वाडी सांभाळून ती बहरती ठेवली. आता वयाच्या नव्वदी पार केल्यावर प्रकृती साथ देत नसल्याने घोलवडला भाईकडे राहणे पसंत केले . मुक्काम जरी भाईकडे असला तरी तिचे लक्ष आपल्या कर्मभूमी कडे सतत असते .अनेक लहान मोठ्या आजारातून सहीसलामत बाहेर आली आहे.
वयोमानानुसार गात्र शिथिल झाली आहेत त्यांनी अगदी असहकार पुकारला आहे तरीआपल्या प्रसन्न वदनाने घरभर सतत समाधान आणि आनंद पसरवणारी आई भेटली की,आम्ही ही उत्साहीत होतो व थकलेल्या दोन्ही हातांच्या आशीर्वादासाठी मान झुकते.
भाऊंच्या दीर्घ कष्टप्रद प्रभावशाली आणि आदर्श अशा शेतकरी जीवनाचा धावता आलेख माझ्या मतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे .त्यात जरूर काही त्रुटी अपुरी माहिती वा काही उल्लेख राहून गेले असतील. मात्र माझ्या आयुष्यात साधारणतः 1970 नंतर आलेले भाऊ मला कसे दिसले ते प्रामाणिकपणे सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे .एका सामान्य परिस्थितीतील शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन आपले जीवनध्येय निश्चित करून स्वतःच्या हिमतीवर कष्टावर ते ध्येय गाठणाऱ्या काही भाग्यवंत लोकांमध्ये भाऊ आहेत असे मला वाटते कारण कितीतरी लोकांना अपार कष्ट करून देखील शेवटी आपले जीवनध्येय साध्य झालेले पाहता येत नाही .भाऊ निश्चितच नशीबवान की त्यांची जीवनसाथी त्यांच्या ध्येयाला आपले ध्येय म्हणून त्यासाठी खांद्याला खांदा लावून भाऊ बरोबर हा जीवनाचा गाडा सतत पुढे नेत राहिली .भाऊंच्या जीवनात निश्चित काही वैशिष्ट्ये आहेत आणि जन्मभर त्यांनी जपलेली काही पत्थेही आहेत . आपली उच्च जीवनाची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी नैतिकता कधी सोडली नाही .अंधश्रद्धा ,कर्मठपणा, दांभिकता यांना पूर्ण फाटा देऊन लोकसंग्रह आणि समाजाचा विचार प्रथम नजरेसमोर ठेवला. त्यांचे आचरण निर्भयता सहिष्णुता वृत्ती त्यांना कधीही सोडून पारख्या झाल्या नाही.
महाराष्ट्राचे संत शिरोमणी सावता माळी यांनीही आपला जन्म काळा मातीची सेवा करण्यात घालविला व सांगितले ही तीर्थ व्रत योग याग इत्यादी न करता ही आपला पोटापाण्यासाठी करीत असलेला शेतीचा उद्योग करून जीवनामध्ये ईश्वरप्राप्ती करता येते.
सावता म्हणत ,आमुची माळीयाची जात,शेत लावू बागाईत |
आम्हा हाती मोट नाडा,पाणी जाते फुल झाडा ||
शांती शेवंती फुलली, प्रेमे जाई-जुई व्याली|
सावता म्हणे, केला मळा, विठ्ठल देखिला डोळा, स्वकर्मा व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात||
आपल्या संचित कर्मानुसार मिळेल ते काम प्रेमाने निष्ठेने आनंदाने करावे हीच खरी ईश्वर सेवा आणि त्यानेच होते ईश्वरप्राप्ती म्हणून भाऊंनी आपल्या आयुष्यात ईश्वर पाहिला व भाऊ मोक्षधामास गेले असे मला प्रामाणिकपणे वाटते.