मी सुद्धा अमेरिका पाहिली..

            “स्वातंत्र्य देवता” पुतळा.

“केल्याने देशाटन, जगात संचार होतो, पंडित मैत्री होते”… हे सर्व ठीक आहे! मात्र ते करण्यासाठी तुम्ही एक तर धनवान असायला हवे अथवा ज्या नोकरी व्यवसायात  असाल तेथे तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळावयास हवी. कालही हीच स्थिती होती आजही तीच आहे. नुसती परदेशगमनाची  स्वप्ने पाहण्यात  काय अर्थ आहे? पण तरी देखील स्वप्ने पहावीच लागतात. स्वप्ने असतील, प्रयत्न केले, नशिबाची साथ ही मिळाली तर कधी ना कधी त्या स्वप्नांची पूर्तता होते, हेही तितकेच खरे आहे!

  आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असताना म्हणजे साठीच्या दशकात, शिक्षणासाठी परदेशी जाणे विशेषत: अमेरिकेत जाणे हीअनेक  हुशार विद्यार्थ्यांची  महत्त्वाकांक्षा असे. त्याकाळी  हाताचे बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी भारतातून व आमच्या समाजातूनही परदेशी गेले. ही मंडळी बहुधा परदेशी विद्यापीठांची शिष्यवृत्ती मिळवून अथवा परदेशस्थित कोणी नातेवाईक, मित्र असल्याने त्यांची मदत घेऊन जात असत.आमच्या बोर्डीतूनही त्या काळात परदेशी शिक्षणासाठी गेलेली दोनतीन  नावे मला आठवतात. परदेशपर्यटन मात्र त्या दिवसात तेवढे प्रसिद्ध झाले नव्हते. 

    मला स्वतःला देखील, युडीसिटी(University Dept of Chemical Technology)) मधून द्वि पदवीधर झाल्यावर अमेरिकेत जाण्याची खूप इच्छा होती.मी  प्रयत्नही केले.  एक-दोन अमेरिकन विद्यापीठात प्रवेश मिळविण्यांत यशही मिळाले. काही कौटुंबिक समस्या व माझे वडील, आप्पांची तत्कालीन मानसिकता पाहून मी माझा परदेशी जाण्याचा  बेत रद्द केला होता. ही हकीकत मी माझ्या एका लेखात( माझे महागुरू डॉ.जे जी काणे), विस्तृतपणे लिहिली आहे. 

      त्या दिवसातील माझी मनस्थिती मी आज जेव्हां आठवतो तेव्हा मलाच माझे हसू येते. परदेशी जाण्याचा योग कोणाला आहे याचे भविष्य वर्तविण्यासाठी काही मित्र तळहातावरील हस्त-रेषा पाहत असत. डाव्या तळहातावरील खोलगट भागातून निघून खाली उंचवट्याकडे येणारी ‘भाग्य रेखा’  हाताचा ऊंचवटा 

आर पार छेदून  गेली असल्यास त्या  विद्यार्थ्याला ‘परदेश योग’आहे असे समजत. मी नेहमी माझा डावा तळहात रोज पहात असे. रेषा खोलगट भागाकडून पुढेच सरकत नव्हती.  उजव्या  अंगठ्याच्या टोकदार नखाने ती रेषा दाबून घासत मी ती पुढे वाढविण्याचा प्रयत्न करी, जेणेकरून  ठळकपणे दिसावी व पुढे सरकावी! 

पण ते काही त्यावेळी झाले नाही हे खरे!आता विश्वास ठेवा अगर नका ठेऊ  परंतु परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळूनही मी त्यावेळी अमेरिकेस जाऊ शकलो नाही हे सत्य आहे!!

    अमेरिकेत नाही पण परदेशी जाण्याचा योग सन 1989 साली,माझ्या ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन’तर्फे आला .त्यावेळी मी व माझे तीन सहकारी  फ्रान्स, इंग्लंड, दुबई या तीन देशांना व्यवसायानिमित्त भेट देऊन आलो .त्या प्रवासाचे विस्तृत लिखाण “माझी पहिली परदेश वारी”, या लेखात मी केले आहे.

पहिल्या अमेरिकन सफारी मध्ये सहकारी श्री अनिल भान  सोबत फ्रॅन्कफर्ट विमानतळ ,जर्मनी.1991.

    पुढे दोनच वर्षानी म्हणजे सन 1991 मध्ये  माझ्या हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीतर्फेच अमेरिकेत जाण्याचा योग आला. त्यावेळी मी कंपनीच्या संशोधन विभागात( R&D), काम करीत होतो. भारत सरकारचे एक शिष्ट मंडळ पेट्रोलियम खात्यातर्फे, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींना घेऊन अमेरिकेतील एस ए इ (Society of Automotive Engineers)या विख्यात संस्थेच्या वार्षिक सम्मेलना साठी(Annual Conference), पाठविले जाणार होते. आमच्या कंपनीतर्फे मी व माझे मित्र श्री अनिल भान ,जे त्यावेळी मार्केटिंग विभागात अधिकारी होते, दोघांची वर्णी लागली होती.त्या प्रवासाचीच ही हकीकत थोडक्यात सांगणार आहे .  

    आज इतक्या वर्षांनी सर्व तपशील नावगावा सकट,  आठवणे कठीण आहे. मात्र जेवढे आठवले ते लिहिले आहे. सुदैवाने माझ्या संग्रही आजही त्या अमेरिकन वारीचे फोटो,अल्बम मध्ये सापडले. त्यामुळे आठवणींना अधिक उजाळा मिळाला आहे.खरे तर मी माझ्या अनेक परदेशी प्रवासांचे वर्णन यापूर्वीच लिहिले आहे.ही पहिली अमेरिका वारी कशी राहून गेली कोण जाणे?.

    मी अमेरिकेत आजवर दहा-बारा वेळा तरी जाऊन आलो आहे ,मात्र या पहिल्या प्रवासाची मजा ,रंगत व औत्सुक्य  काही वेगळे होते! अगदी त्याकाळी देखील अमेरिकेत जाणे नवलाई होती!  शिक्षणासाठी जरी मला तेथे जाता आले नाही तरी व्यवसायानिमित्त मी  तेथे आठवडाभरासाठी जातो आहे व अमेरिका देश पाहणार आहे याचे मला खूप अप्रूप वाटले होते!! पासपोर्ट तयार होता मात्र युरोपियन विजाप्रमाणे अमेरिकन विजा मिळवणे तेवढे सोपे काम नव्हते. ती खूप मोठी प्रक्रिया होती. प्रथम तिकीटे खरेदी केल्याशिवाय विजा मिळणे शक्य नव्हते म्हणून प्रथम परतीची तिकिटे खरेदी केली. त्या दिवसातही मुंबईतील नेपियन सी रोडवरील अमेरिकन वकिलाती समोर पहाटेच्या वेळे पासूनच  लांबच लांब रांगा लावून ,मुलाखतीसाठी लोक उभे राहत असत. आम्हालाही तसेच करावे लागले होते. रांगेतून नंबर आल्यावर मामुली मुलाखत झाली. अमेरिकेत कशाला जात आहात , आमंत्रण आहे का,राहायची व्यवस्था कुठे करणार ?इत्यादी जुजबी प्रश्न विचारले. आम्ही कागदपत्रे नेली होती त्यामुळे प्रश्न आला नाही . दहा वर्षाचा अमेरिकन विजा मिळाला !

   येथेही मोठी धावपळ उडाली .कारण आम्हाला आठ दिवसासाठी जावयाचे असल्याने महिन्याभराचा विसा मिळाला असता तरी चालले असते .तेवढेच पैसे नेले होते. दहा वर्षाचा विजा मिळतो म्हटल्यावर नाही कशाला म्हणावे,  घेऊन टाकू असे ठरविले. धावपळ करून पैसे जमविले. सुमारे पंचवीस एक हजार रुपये कॅश दोघांसाठी हवी होती. मोठी रक्कम होती. सुदैवाने अनिल चे एक नातेवाईक त्याच भागात राहत असल्याने बरे झाले. काय आनंद झाला..?कोलंबसला ही  अमेरिका सापडल्यावर झाला  नसेल तेवढा !!

त्यानंतरच्या तयारीलाही केवढा उत्साह संचरला होता! सुटा बुटाची तयारी, थंडीसाठी खास थर्मल वियर खरेदी करणे,,डॉलर खरेदी अमेरिकेतून आणावयाच्या वस्तूंची यादी सर्व सोपस्कार आनंदाने केले!

    एस ए इ(SAE),ही अमेरिकन संस्था जगातील सर्व पेट्रोलियम व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व  करणारी असून पेट्रोलियम पदार्थांना मानांकन (Standardisation) करणारी आहे. विशेषतः दोन चाकी,चार चाकी वाहनांत जी वंगणे(Lubricants ), वापरली जातात त्यांचे SAE ने केलेले मानांकन मान्य झाल्यास ते त्या पदार्थाच्या विक्रीसाठी व वापरासाठी खूप सन्मानाचे समजले जाते . आपल्या देशात,ISO (Indian Standards Organisation),ही संस्था हेच काम करते.दर दोन वर्षांनी अमेरिका व इतर देशात ,SAEअशी चर्चा सत्रे घेत  असते..आजही होतात.

   भारत सरकारने हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन(2) भारत पेट्रोलियम कार्पोरेशन(2) व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन(4) या तीन सरकारी आस्थापनातून आठ लोकांची निवड केली होती .श्री आनंद भार्गव,(IOC), हे आमच्या शिष्टमंडळाचे नेते होते. त्याचप्रमाणे भारतातील इतरही प्रायव्हेट ऑइल कंपन्यांनी(Castrol,Tide Water Gulf Oil ई) आपले प्रतिनिधी पाठविले होते. आमचा खर्च कंपनी करणार होती. त्यात विमान भाडे व रोजचा भत्ता याचा समावेश होता. अमेरिकेत असताना विविध आस्थापनांना भेट  देण्यासाठी होणारा खर्च भारत सरकार-श्री भार्गव यांचे मार्फत करणार  होते. 

  सेॅनअँटोनियो मधील आमच्या मोटेल समोर.

अमेरिकेतील सॅन-अंतोनिओ (San-Antonio..SA)  येथे तीन दिवसाचे हे संम्मेलन आटोपल्यावर आम्हाला ‘लुब्रीझाॅल कार्पोरेशन’,( LUBRIZOL CORPORATION),या  मोठ्या अमेरिकन कंपनीच्या आस्थापनास क्लीव्हलॅन्ड (Cleveland)येथे  भेट द्यावयाची  होती. तिथून पुढे न्यूयार्क येथे येऊन आणखी एक दोन अमेरिकन कंपन्यात जावयाचे होते. न्यूयॉर्क शहर दर्शन व तेथून परत मुंबई असा आमचा आठ दिवसांचा  हा  प्रवास होता. 

     अमेरिकेत राहण्याची व्यवस्था आम्हालाच करावयाची होती .आमचे भारतातील एक मित्र व उद्योजक श्री ईश्वर भाई पटेल यांनी याबाबतीत आम्हाला खूप सहकार्य केले.  त्यांच्या खास  मित्राचे ,रमेश भाई पटेल यांचे ,सॅन अॅन्टोनीयो शहरात स्वतःचे मोटेल होते. तेथेच आमची रहावयाची व्यवस्था केली होती. रमेश भाई स्वतः विमानतळावर आम्हाला घेण्यासाठी येणार होते.त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. 

    मला वाटते 1991 च्या मे महिन्यातील एके रात्री मी व अनील ने मुंबई विमानतळावरून एअर इंडियाचे विमानाने प्रस्थान ठेवले . परदेश प्रवास आता मला नवीन नव्हता.पहिला टप्पा  फ्रॅकफर्ट, जर्मनी हा  खूपच आरामदायी व मजेत झाला. जर्मनी देशही प्रथमच पहात असल्याने विमानतळावरून जेवढे होईल तेवढे बाहेरील शहराचे दर्शन घेतले व विमानतळावरही बरेच फिरून घेतले. आमचे काही सह प्रवासी देखील येथे भेटले. तेथून पुढे न्यूयार्क पर्यंतचा सुमारे दहा तासाचा टप्पा ही व्यवस्थित पार पडला, आम्ही दुपारचे सुमारास न्यूयॉर्कच्या, ‘जे एफ केनडी’विमानतळावर उतरलो.हा जे एफ कॅनडी विमानतळ विमानांच्या मोठ्या रहदारीचा वाटला. जगातील सर्व विमान कंपन्यांची विमाने येथे उतरतात किंवा येथून ऊड्डाण घेतात. . खाली उभी असलेली शेकडो विमाने, वरून पाहताना खेळण्यातल्या विमानासारखी वाटत होती . एका रांगेत ऊभी असलेली विमाने एकापाठोपाठ एक अशी आकाशांत झेप घेत होती तर दुसऱ्या बाजूने एका मागोमाग एक अशी  विमानतळावर उतरत होती. ते दृश्य मोठे विलोभनीय वाटले. आजही जे एफ केनेडी विमानतळ हा जगातील एक जास्तीत जास्त विमान-रहदारीचा म्हणून गणला जातो! आकाशातून या भव्य विमानतळाचे घेतलेले दर्शन खूपच विलोभनीय होते.

जे एफ कॅनडी विमानतळावर आम्हाला भेटलेले दादाचे मित्र थिरू व शिवा.

  आम्ही  सामान घेऊन विमानतळा बाहेर येताच आम्हाला दादाचे (श्रीदत्त),मित्र थिरू व शिवा यांनी प्रेमाने मिठी मारली.वर्षापूर्वीच ते दोघे न्यूयॉर्क च्या एका उपनगरात व्यवसाया निमित्त राहात  होते.  मी येणार ही कल्पना त्यांना दादाने दिली होती. त्यामुळे मोठ्या कौतुकाने लांबचा प्रवास करीत दोघे तिथे आले होते. आम्हा दोघांचेही  स्वागत करून  प्रथम आम्हाला जवळच्याच एका उपहारगृहात छान पैकी पिझ्झा खाऊ घातला. आमच्या हॉटेलवर आणून सोडले. नंतरच ते आपल्या घरी गेले. मी मागे म्हटल्याप्रमाणे पुढे अमेरिकेत अनेक फेऱ्या झाल्या खूप माणसे भेटली मात्र पहिल्या पदार्पणात थिरू व शिवा यांनी जे अगत्य व प्रेम दिले त्याची आठवण मी कधीच विसरू शकत नाही. थिरू आजही अमेरिकेतच वास्तव्यास असून त्याने तेथे आपल्या व्यवसायात मोठी मजल मारली आहे. संपर्कात असतो . शिवा कुठे आहे ते माहित नाही.

  आमचे हे हॉटेल विमानतळा जवळच छोटेखानी पण  सुसज्ज असे होते. आम्हाला येथे फक्त एक रात्र (Transit)काढावयाची होती. व दुसऱ्या दिवशी सकाळी  विमानतळावरून San Ant. ला जावयाचे होते. अमेरिकेच्या प्रथमदर्शनाने थोडे चक्राऊन गेल्यासारखे  होतेच. त्यामुळे गेल्या गेल्या काय पाहू आणि काय नको असे नवख्या प्रवाशाला वाटते! थोडी विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळच्या वेळी मला खोलीत बसून कंटाळवाणे झाले. अनिल त्याच्या खोलीत झोपला होता. मी एकटाच माझ्या खोलीच्या खिडकी बाहेरून रस्त्यावरील रहदारी पाहत होतो. शेवटी हिम्मत करून हॉटेलच्या बाहेर निघालो. लगतच्या रस्त्यावर येऊन एका निवांत जागी उभे राहून शांतपणे मोटरींची वर्दळ पहात राहिलो. एकामागून एक मोटारींची रीघ लागली होती. रस्त्यावरून फक्त मोटारी धावत होत्या, माणूस औषधालाही दिसत नव्हता. आपल्याकडे हायवेवर ही दिसतात तसे गाई म्हशींचे ,भटक्या गुरांचे जथ्थे नाही पण एकही प्राणी रस्त्यावर दिसत नव्हता.आणि विशेष म्हणजे एवढी वर्दळ असूनही शांतता होती. सगळीकडे भव्यता, गंभीरता,सर्व आसमंतालाही जणू  एक रुबाबदार व्यक्तिमत्व लाभले होते!  ‘आपले दुसऱ्याशी काही देणे घेणे नाही’ अशाच प्रकारे सर्व चालले होते!.विमानतळ जवळ असल्याने होणारे विमानांचे कर्ण कर्कश आवाज, तेवढे परिसराला ला एक सजीवता  प्राप्त करून देत होते.!अमेरिकेचे हे प्रथम दर्शन मला खूपच अचंबित करणारे होते.एकट्यानेच असे न्यूयॉर्कच्या रस्त्यावर संध्याकाळचे वेळी फिरणे योग्य नव्हते.  मला ते कळत होते तरी येथून हलावेसे वाटत नव्हते ..हरवल्यासारखे वाटत होते. छोट्या तलावातून अचानक महासागरात शिरलेला मासा तेथील अफाट जलसंचय  व  आगळीवेगळी मत्स्य संपदा  पाहून जसा भांबावून जाईल तसेच माझे झाले होते!सगळं डोळ्यात  किती सामावून घ्यावे असे होत होते.

   संध्याकाळी हॉटेल वर येऊन अनिल बरोबर थोड्या गप्पा करून जेवण करून आम्ही झोपी गेलो.त्या दिवसात मोबाईल फोन व व्हाट्सअप अशी साधने नसल्याने हॉटेलमधूनच एस टी डी कॉल करून घरी खुशाली कळविली..  हॉटेल लहान होते मात्र या सर्व सुविधा उपलब्ध होत्या. विशेषतः आज उपलब्ध असलेल्या संपर्काच्या अनेक सुविधा त्याकाळी ही तेथे होत्या.

   दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा न्यूयॉर्क विमानतळावर आलो. मध्ये एक थांबा घेऊनहे विमान सरळ सॅन अँटोनियो ला जाणार होते.मला वाटते दुपारच्या वेळी आमच्या इप्सित विमानतळावर उतरलो. श्री रमेश पटेल आम्हाला विमानतळावर भेटण्यासाठी आले होते. त्यांच्याच गाडीतून आम्ही त्यांचे मोटेलमध्ये आलो.थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी श्री. पटेल यांनी आम्हाला आमच्या सभेचे स्थान व आसपासचे San Ant. शहर दर्शन घडविले “रमादा इन” असे या मोटेलचे नाव होते . सकाळचा नाश्ता व संध्याकाळ चे जेवण येथे मिळत होते. लहान असले तरी स्वच्छ टीप टॉप, व आदरातिथ्य  होते .

     भारतातील या पटेल लोकांनी अमेरिकेत आपले मोठेच प्रस्थ उभे केले आहे. संपूर्ण अमेरिकाभर अशा मोटेल्स ची साखळी या  मंडळींनी उभी केली आहे. इतरही असे लहान मोठे उद्योग  येथे करतात. एखादे किराणा मालाचे छोटे दुकान,भाजीपाला विक्रीचे केंद्र, एवढेच नव्हे तर अल्पशिक्षित बायका स्वयंपाक किंवा घरातील साफसफाईची कामे ही करतात .बऱ्यापैकी पैसे मिळवून एकमेकाला मदत करीत एक समुदाय म्हणून येथे राहतात. अमेरिकेत प्रवेश मिळवून येथील नागरिकत्व मिळविण्यासाठी ही मंडळी जे काही उद्योग करतात त्याचीही कल्पना मला माझ्या पुढील अमेरिकावारीत आली.तो एक स्वतंत्र लिखाणाचा विषय ठरावा!

   आता प्रश्न असा निर्माण होईल की सरकारी पाहुणे असूनही पंचतारांकित व्यवस्था न स्वीकारता आम्ही अशा साध्या हॉटेलात का राहायला गेलो? त्याचे कारण साधे होते. त्या काळी  सरकारी कर्मचारी, सरकारी कामासाठी परदेशी वारीवर गेल्यास,दरदिवशी तीनशे डॉलर असा भक्कम भत्ता देत असत. ही खूप मोठी रक्कम होती . कोणत्या हॉटेलात राहावे, कोणते जेवण घ्यावे,  टॅक्सीने फिरावे की पायी जावे हे अधिकार्याने  ठरवावयाचे होते. म्हणूनच पटेल यांच्या या माफक दराच्या मोटेलात राहून आमच्या डॉलर मधील भत्त्याची बरीच बचत होणार होती. त्यातून अमेरिकेतून खूप सारी खरेदी आम्ही करू शकणार होतो. अमेरिकेची पहिली वारी व अमेरिकन माला बद्दल भारतात असलेली उत्सुकता यामुळे मुलांनी ,पत्नीने ,मित्रांनी बरीच मोठी ‘शॉपिंग लिस्ट’दिली होती .खरेदी करूनही काही डॉलर शिल्लक राहिल्यास त्याचे भारतात गेल्यावर रुपयात रूपांतर करून आम्हाला आर्थिक लाभही होणार  होता. म्हणूनच त्या दिवसात सरकारी अधिकाऱ्याला परदेशवारी मिळणे म्हणजे,’एका दगडात अनेक पक्षी मारण्याची’ संधी होती. आणि म्हणून परदेशी वारी मिळण्यासाठी चढाओढ लागलेली असे.पुढे सरकारने हे नियम बदलून प्रत्यक्ष जेवढा खर्च होईल तेवढे पैसे देणे (On Actuals)अशी व्यवस्था आणली. पैसे वाचविणे शक्य झाले नाही.

 आमच्या शिष्टमंडळातील आम्ही काही सदस्य,”प्लॅनेट हॉलीवुड”, या आलिशान हॉटेलच्या हॉलमध्ये.

    कॉन्फरन्स साठी सभागृह जवळच होते. चालत जाता येत होते. सकाळचा नाष्टा व दुपारचे जेवण सभास्थानीच  होई. एकाच वेळी तीन वक्ते निरनिराळ्या सभागृहात आपला पेपर वाचून दाखवीत. ज्याला जिथे जावयाचे तेथे त्याने जाऊन बसावे अशी व्यवस्था होती. संध्याकाळचे अधिवेशन संपल्यानंतर मध्ये एक तासाची विश्रांती होती.  पुढे संध्याकाळी खानपान पार्टी(cocktails) होती.. एका मोठ्या आस्थापना मार्फत सर्व उपस्थितांना चांगल्या तारांकित हॉटेलमध्ये पार्टी झाली. मला वाटते पहिल्या दिवशीची पार्टी प्रसिद्ध “प्लॅनेट हॉलीवुड” या  San Ant. मधील  नामांकित हॉटेलमध्ये झाली. हॉलीवुड मधील अनेक मोठ्या कलाकारांनी एकत्र येऊन चालू केलेली ही हॉटेलची मालिका आता अमेरिकाभर पसरलेली आहे. आजकाल भारतातही याच्या शाखा उघडल्या आहेत असे ऐकतो.प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटांत, त्यावेळी नट-नट्यांनी वापरलेले कपडे ,त्यांची काही अवजारे,शस्त्रे, दुचाकी-चार चाकी वाहने, अशाअनेक वस्तूंचा संग्रह येथे पहावयास मिळतो.मला स्वतःला सिनेमे पाहणे व त्यात हॉलिवूडचे.. अजिबात आवड नसल्याने, त्यात विशेष रस नव्हता. आमचे अनेक साथीदार मद्याचे घुटके घेत घेत आपल्या मित्र-मैत्रिणींना हे सर्व प्रदर्शन मोठ्या उत्साहाने दाखवीत होते…

 “पलीकडे दिसणारा तो गाऊन एलिझाबेथ टेलरने अमक्या चित्रपटात घातला होता”,”  कॅरी ग्रँड ने तमक्या चित्रपटात घातलेला सूट तो हाच” . हेन्री फोंडा,  क्लार्क गॅबल, चार्ली चापलीन, इंन्ग्रीड बर्मन, ब्रिजीत बारदो,इत्यादी तत्कालीन प्रसिद्ध हाॅलीवूड नट नट्यांनी वापरलेल्या  वस्तू तेथे बघण्यात लोकांना खूप मजा येत होता. मी मात्र टेबलवर बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होतो.  पार्टी उशिरा पर्यंत चालू होती.अनेक देशातील विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती.विविध प्रकारची उंची मद्ये  ठेवली होती. ज्याला जे हवे,जेवढे हवे त्याप्रमाणे सर्वजण आस्वाद घेत होते. 

  संध्याकाळच्या नौकानयन सहलीत सामील झालेले भारतीय प्रतिनिधी व आपल्या पारंपारिक वेशात नावा वल्हविणारे नाविक.

  दुसऱ्या व समारोपाच्या दिवशी झालेला कार्यक्रम सुध्दा विशेष स्मरणात राहिला आहे. या शहरातून सॅनअँटोनियो नदी वाहत असते.  त्या नदीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नौकाविहार करीत, चांदण्या रात्री ही सफर आयोजित केली होती.  नावाडी त्यांच्या  जुन्या पारंपारिक वेशात सजून आले होते. होडी वल्हविताना  जुनी स्पॅनिश भाषेतील गाणी गात होते. बीयरचे  घुटके घेत, संथ वाहणाऱ्या नदीतून, नावाड्यांची न समजणारी पण मनालाआल्हाद देणारी गीते ऐकत, किनाऱ्यावरील विविध दृश्ये पहात ,त्या चांदण्या रात्री शहराचा संपूर्ण इतिहास ऊलगडून दाखविला जात होता. खूपच सुंदर व यादगार अशी ती संध्याकाळ होती. आम्ही सर्वच देशोदेशीचे प्रवाशांनी  त्यादिवशी एकत्रपणे एक आगळा असा नौका विहार केला.  आज इतक्या वर्षांनी त्या प्रसंगाची आठवण झाली तरी खूप आनंद होतो!!  

   ही नदीतील सफर करीत असताना अमेरिकन लोकांच्या कल्पकतेची व सौंदर्यदृष्टीची वाहवा करावी वाटली ! या नदीचा संपूर्ण शहराचे सुशोभीकरणासाठी केलेला कल्पक उपयोग केवळ लाजवाब. नदीला अनेक ठिकाणी छोटे छोटे कालवे काढून ते उंच इमारती, हॉटेल्स, सार्वजनिक सभागृहे ई किनाऱ्यावरील प्रमुख वास्तूमध्ये फिरवून छोट्या धबधब्यांच्या स्वरूपात पुन्हा नदीत सोडले आहेत. दोन्ही बाजूच्या किनाऱ्यावरील इमारतीतून नदीत पडताना  पाण्याच्या धारा खूप छान दिसतात. नदीच्या दोन्ही तीरावर लोकांना संध्याकाळचे वेळी बसून आराम करण्यासाठी छोटी उपवने तयार केली आहेत. नक्षीदार बाके बसण्यासाठी तर सुंदर लहान झोपाळे मुलांना झोके येण्यासाठी ठेवलेले आहेत. रंगीबेरंगी फुलझाडांची  सर्वत्र केलेली पखरण तर त्या आसमंताला एक वेगळाच आयाम देते.निसर्गाने दिलेल्या एका छोट्या देणगीचा आपले पर्यावरण सुंदर करण्यासाठी कसा उपयोग करता येतो ,याचे हे जगातील आदर्श  उदाहरण आहे. खरेच सांगतो त्या एवढ्या आनंदाचे प्रसंगी मला आठवली मुंबईतील आपली, मिठी नदी!! मुंबईकर व मुंबई महापालिका यांना  मिठीचा उपयोग आपले मुंबई शहर मिठ्ठास करण्यासाठी करता आला नसता का?… जाऊ द्या तो विषय वेगळा !

   या शानदार सफरीनंतर दोन दिवसाचा हा परिसंवाद संपला. अमेरिकेतील हा आमचा चौथा दिवस होता.रात्री ऊशीरा आम्ही हॉटेलवर आलो. दुसऱ्या दिवशी पटेल मंडळींनी आम्हा दोघांसाठी खास खमण ढोकळे-फाफडा  न्याहरी चा बेत ठेवला होता. त्यांचे आभार मानून इतर सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही सकाळी दहाचे सुमारास, सॅन अँन्टो. विमानतळावर परतीच्या प्रवासासासाठी आलो.

   आमचा पुढचा मुक्काम होता तो ‘बफेलो विमानतळ’.ओहायो राज्यातील क्लीवलँड या शहरात आम्हाला जावयाचे होते. तेथे लुब्रीझोल(LUBRIZOL CORPORATION) या मोठ्या अमेरीकन कंपनीचे प्रोडक्शन व  संशोधन विभागास आम्हास भेट द्यावयाची होती. भारतातील या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. दिलीप तेरेदेसाई यांच्या सौजन्यामुळे आम्हाला ही भेट शक्य झाली होती. येथील एक दिवसाचे वास्तव्यात आम्हाला खूप अनुभव मिळाला व सौजन्य दाखविले गेले. 

   मला वाटते सुमारे अडीच तासाचा हा विमान प्रवास असावा. बफेलो विमानतळ हा अमेरिकेतील  इतर विमानतळांचे मनाने तसा लहान विमानतळ आहे.आंतरराष्ट्रीय विमाने येथे येत नाहीत. दिवसातून ठराविक विमाने देशांतर्गत प्रवासासाठी येत असावी. आम्ही विमानतळा बाहेर आलो.येथे उतरलेले दहा-पंधरा प्रवासी आपापल्या मार्गाने निघून गेले. आम्हाला भेटण्यासाठी कंपनीचा कोणी अधिकारी येणार होता त्याचा शोध घेत आम्ही विमानतळा बाहेर फिरत राहीलो. मात्र कोणीच दिसेना. त्या दिवसात मोबाईल फोनची सोय ही नव्हती. परिसरात कुठे मोटर गाडीही दिसत नव्हती. एवढ्यात पांढऱ्या शुभ्र गणवेशातील ,नौसैनिका प्रमाणे दिसणारी एक व्यक्ती ,अमेरिकन इंग्रजीत आमच्या नावाची तोडमोड करीत आमच्या जवळ आली..” मिस्टर भांग आणि मिस्टर रूट आपणच का?” अशी चौकशी केल्यामुळे आम्हीच ते दोघे भाग्यवान गृहस्थ असे त्याला सांगितले.आमचे सामान त्याने स्वतः घेऊन एका जबरदस्त राजेशाही गाडी समोर तो आम्हाला घेऊन आला. ही गाडी आम्हाला विमान तळा  बाहेर आल्यापासून समोर दिसत तर होती.मात्र या गाडीला भारतात ‘लिमोझिन कार’ म्हणून आम्ही ओळखत होतो . भारताचे राष्ट्रपती ही गाडी वापरतात असे ऐकले होते. त्यामुळे ही गाडी आपणासाठी पाठविली असावी अशी जराशीही शंका आम्हाला आली नाही.त्या गाडीत बसल्यावर जे काही धन्य धन्य वाटले ते येथे शब्दांकित करणे कठीण आहे! या आलिशान गाडीत चार विभाग , प्रत्येक विभागात विविध सोयी होत्या. ज्या विभागात आम्ही दोघे बसलो होतो तेथे बसण्याच्या आरामदायी सुविधा बरोबरच टेलिव्हिजन ,फोन, मद्याचा बार, ओव्हन मध्ये गरम  विविध खाद्यपदार्थ फ्रिजमध्ये आईस्क्रीम्स .काय काय नव्हते? तसेच दोन्ही बाजूला असलेल्या काचा व  टपावरील काचे मधून संपूर्ण प्रवासात चारही बाजूने  भवतालचे दर्शन घेण्यासाठी फिरणाऱ्या खुर्च्या होत्या! आज ‘विस्टाडोम’गाडीत असते तशी सुविधा होती!

ही गाडी फक्त कंपनीचे चेअरमन अथवा कोणी खास पाहुणे आल्यास त्यांच्यासाठी वापरण्यात येते असे कळले .आम्ही  कंपनीचे खास सरकारी पाहुणे होतो तर!! तशी ट्रिप आजवर पुन्हा आयुष्यात झालेली नाही. त्यानंतर आजवर पुन्हा ‘लिमोझिन’ मध्ये बसण्याचा योगही आला नाही.

लुब्रीझाॅल कंपनीने आम्हा दोघांसाठी विमानतळावर पाठविलेली ऐषारामदायी लिमोजीन गाडी.

   कंपनीने त्यांच्याच एका आरामशीर गेस्ट हाऊस मध्ये एका रात्रीची राहण्याची सोय केली होती. संध्याकाळी झाली होती. कंपनीचे  मुख्यअधिकारी श्री बर्जर आम्हाला भेटण्यासाठी आमच्या अतिथीगृहात आले होते. त्यांचे बरोबर काही गप्पा केल्या. पुढील कार्यक्रमाची आखणी केली. विश्रांती घेऊन संध्याकाळी त्यांचे सोबतच भोजन घेतले.दुसऱ्या दिवशी पहाटे कंपनीचा संशोधन विभाग त्यानंतर त्यांचा उत्पादन विभाग आम्ही पाहिला .शेवटी त्यांच्या कॉन्फरन्स रूममध्ये संशोधना अधिकाऱ्यांनी आपापल्या विषयासंबंधी प्रेझेंटेशन केली. येथील संशोधन विभागाशिवाय कंपनीच्या जगातील इतर शाखांमध्ये  चालू असलेल्या संशोधना संबंधी ही आम्हाला माहिती देण्यात आली.  निरनिराळ्या देशांतील  चार-पाच लुबरीझॉल आस्थापनाशी आमचा संपर्क ‘वायफाय ‘यंत्रणेद्वारे करून दिला गेला.  त्या सर्व विविध भागातील अधिकाऱ्यांशी आम्ही बोलू शकलो.हे आमच्यासाठी नवल होते. कारण तोपर्यंत भारतात ही सुविधा (Video Conferencig)तंत्रज्ञान उपलब्ध झालेले नव्हते. या अमेरिकन कंपन्या संशोधनाचे बाबतीत जगात अव्वल स्थानी का आहे व त्याचा आर्थिक लाभ कसा घेत आहेत याचे कारण त्या भेटीमध्ये आम्हाला कळले. श्री मधु कुंभांनी हे भारतीय गृहस्थ  संशोधन विभागात काम करत होते. त्यांचे मुळे आम्हाला भरपूर माहिती मिळाली .

  डॉ. बर्जर व डॉ. डाॅन सर्बी सोबत.

या भेटीत ,भारतामध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन करणारे लुब्रीझाॅल-अमेरिका चे डॉ.डाॅन सर्बी यांच्याशी मुलाखत झाली.तसेच या संशोधन व विकास विभागाचे प्रमुख डाॅ बर्जर यांनाही भेटता आले. पुढे हेच डॉ. बर्जर लुब्रीझाॅल कार्पोरेशनचे चेअरमन झाले  व डॉ. मधु कुंभानी  लुब्रिझाल इंडियाचे प्रमुख झाले. येथे संपर्कात आल्यामुळे पुढे माझा या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगला संपर्क राहिला.

लुब्रीझाॅल कार्पोरेशन व हिंदुस्थान पेट्रोलियमचा असलेला व्यावसायिक संबंध याबद्दल थोडे सांगतो.

   जगातील कोणत्याही तेल शुद्धीकरण कारखान्यांना  तेलापासून वंगणे(Lubricants), बनविण्यासाठी काही रसायने तेलात टाकावी लागतात. आजच्याअत्याधुनीक यंत्रांना लागणारी वंगणे केवळ तेलापासून होऊ शकत नाहीत.  त्यात काही पुरके (Additives),टाकावी लागतात.  जगातील फक्त दोन तीन कंपन्याच ही पुरके   बनवतात. त्यातील Lubrizol  हे नाव सर्वात मोठे आहे.  आम्ही भारतातील सर्व तेल कंपन्या यांचे मोठे खरीददार आहोत. म्हणून ही म॔डळी आमच्याशी व्यवस्थित व्यावसायिक संबंध ठेवून असतात. आपल्या गिऱ्हाईकाशी कशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करावेत व त्यांना आपलेसे कसे करून घ्यावे हे या अमेरिकन लोकांपासून शिकण्यासारखे आहे.तीन अमेरिकन कंपन्यांची मक्तेदारी(LUBRIZOL CHEVRON,ETHYL) या Additives  व्यवसायातअसून जगातील सर्व  तेल कंपन्या केवळ या तिघांकडूनच आपली Additives  घेत असतात. आता भारतात व  इतरत्रही काही लहान कंपन्यांनी हा उद्योग सुरू केला असून त्यांचा हिस्सा  नगण्य आहे. 

  संशोधन केंद्राचे प्रमुख  डाॅ. बर्र्जर  यांच्यासोबत.

    लुब्रिझोल कंपनी व इतरही दोन कंपन्या आपल्या संशोधन विभागावर करोडो रुपयांचा खर्च करीत असतात.आपल्या एकूण उत्पन्नाच्या पाच ते सहा टक्के रक्कम ही संशोधन विभागासाठी खर्च केली जाते. आपल्या भारतात मोठ्यासरकारी कंपन्या देखील फारतर एक,दोन  टक्क्यापर्यंत ही रक्कम खर्च करतात. लुब्रीझाॅल कंपनी केवळ भारतात आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी येत्या दोन वर्षात सुमारे बाराशे कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. यावरून कंपनीच्या आर्थिक शक्तीची कल्पना यावी. 

   आमच्या या भेटीत आम्हाला उत्पादन, संशोधन,तांत्रिक सेवा इत्यादी अनेक विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असलेला दिसला. त्यामुळेच या कंपनीलाआपल्या ग्राहकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करणे शक्य होते. परिणामी कामेही जलद होतात व गिर्हाईक संतुष्ट राहते.

  नायगराला नेऊन आणणाऱ्या गाडीचे ड्रायव्हर,माजी प्राध्यापक होते. एक छंद म्हणून टॅक्सी चालवत होते.

  भेटीचा तिसरा दिवस हा आमच्या  मनोरंजनासाठी राखून ठेवला होता. जवळच म्हणजे सुमारे चार तासाच्या ड्राईव्ह वर असणारा नायगारा धबधबा पाहण्याचा कार्यक्रम होता. कंपनीने आम्हाला न सांगताच, surprise व्यवस्था केली होती. .त्यासाठी  एक स्वतंत्र कार ड्रायव्हर सकट दिली होती. सकाळी कंपनीच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांबरोबर चर्चासत्र होते. दुपारी जेऊन निघालो होतो.  बाजूचे द्राक्षाचे मळे पहात ,मध्ये मध्ये गाडी थांबवीतच आम्ही चाललो होतो. पहिल्यांदा अमेरिका पाहत होतो ना!ओहाओ हे राज्य द्राक्ष उत्पादन व त्यापासून वाईन बनविण्याच्या क्षेत्रात खूप अग्रेसर आहे .शेकडो एकराच्या द्राक्ष लागवडीत यंत्राद्वारे कामे कशी होतात, याचे प्रात्यक्षिक बघायला मिळत होते.आमच्या गप्पांमध्ये ड्रायव्हर साहेब ही शामील होत होते. त्यांनाही एकंदरीत अमेरिकन समाज जीवन तसेच जागतिक घडामोडींचे चांगले ज्ञान आहे असे आमच्या लक्षात आले. अमेरिकेत  ड्रायव्हर सुद्धा एवढे हुशार असतात असे वाटले! मात्र सत्य परिस्थिती काय होती हे पुढे कळले …!! 

रात्रीच्या वेळेस नायगरा सिटीत पोहोचलो. हॉटेलचे बुकिंग करून ठेवले होते त्यामुळे काही प्रश्न नव्हता. सामान हॉटेलवर ठेवले.

   “मला वाटते,आता तुम्ही लगेच नायगारा बघण्यासाठी निघा. तेथेच जवळपासच्या एखाद्या भारतीय हॉटेलात जेवण घ्या”,  असे आमच्या ड्रायव्हर साहेबांनी सुचविले . सूचना पसंत पडली. आम्ही रात्रीचा नायगरा पाहिला. खूपच छान रोषणाई दोन्ही बाजूंनी केली होती. हे नयन मनोहर दृश्य पाहून आपण क्षणभर पृथ्वीवर आहोत की आकाशात असा भास झाला? विशेष म्हणजे रात्रीच्या या प्रहरी ही निसर्ग निर्मित चमत्कृती  पाहण्यासाठी जगातील हजारो प्रवाशांनी तेथे गर्दी केली होती . कोठेही गोंधळ नव्हता. हा धबधबा एकच आहे मात्र अनेक दिशांनी वेगवेगळ्या कोनातून प्रत्येक वेळी वेगळा वाटतो. निराळा आनंद मिळतो. विशेषतः रात्री नायगरा दर्शन घेणे हा एक वेगळाच आनंद आहे. अनेक यात्रेकरू दिवसापेक्षा रात्री धबधबा पाहणे पसंत करतात.

  ड्रायव्हर महाशयांनी ‘ताजमहाल’ नामक  भारतीय रेस्टॉरंट मध्ये आम्हाला आणून सोडले .’नाव सोनूबाई हाती…’  असा प्रकार होता. एक साधे घरगुती  हॉटेल होते! सरदारजी मालक नुकताच हॉटेल बंद करून झोपायच्या तयारीत होता. आपल्या देशातून पाहुणेआले आहेत, तर त्यांना  नाही कसे म्हणायचे? त्यांने छान पैकी कोंबडी रस्सा आणि पुरीचा बेत ठरवून आम्हाला चमचमीत जेवण जेवू घातले.आमच्या ड्रायव्हर महाशयांनी मात्र नम्रतापूर्वक आमचे बरोबर भोजन घेण्यास  नकार दिला! आम्हाला आश्चर्य वाटले. अमेरीकन नागरीक  मग तो भारतातून अथवा  इतर देशातून येऊन येथे स्थाईक  झालेला असो, कायदा व शिस्त पालन त्याच्या अंगात भिनलेले असते. याचे एक उदाहरण आम्हाला येथे पाहावयास मिळाले. एवढ्या थंडीतोल  रात्री  असे जेवण घेताना  बिअरचे घुटके घेता आले तर बरे,असे अनिलला वाटले. सरदारजींकडे ,”बीयर-वाईन  ड्रिंक मिळू शकेल का?”अशी चौकशी केली.सरदारजी मालकांनी अत्यंत नम्रपणे आमच्या या विनंतीला नकार देत,”आम्हाला सरकारी परवाना नाही, आणि अमेरिकेत कायदा मोडून तसे करणे ठीक होणार नाही..” असे सांगितले.वाईट वाटले. मात्र त्याच्या शिस्तपालनाचे खूप कौतुक वाटले! बियर नसली तरी आपल्या भारतीय पाहुण्यांना जुन्या हिंदी चित्रपटांच्या गाण्यांची ‘नशीली मेजवानी’ देत त्याने आमची धुंदी वाढविली हे निश्चित ! खूप आस्थेने  त्याने आमच्यासाठी जेवण बनवून आमचा श्रम परिहार केला होता. .दोन भारतीय नागरिक परदेशात भेटल्यावर त्यांना एकमेकाबद्दलची जी आपुलकी,प्रेम वाटते ते पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. मात्र हेच  भारतात का वाटू नये असाही विचार मनांत आला!!

    त्यानंतर पुढेही अनेक वेळा अमेरिकेतील सामान्य नागरिक, ऊच्चपदस्थ, सरकारी अधिकारी, पोलीस, तेथील कायद्याचे किती कटाक्षतापूर्वक पालन करतात याची जाणीव झाली. देश मोठा होतो तो शिस्तीमुळेच, देशातील कायदे पाळल्यामुळे, हे अमेरिका पाहिल्यावर कोणाच्याही लक्षात येईल!! 

    पुढील दिवशी पहाटेस  हॉटेल सोडून आम्ही पुन्हा न्यूयॉर्कचे विमान पकडण्यासाठी बफेलो विमानतळावर हजर झालो. कालचेच ड्रायव्हर आम्हाला  विमानतळावर सोडण्यासाठी आपली गाडी घेऊन आले होते.

    या ड्रायव्हरला निरोप देताना एक गंमत झाली. या गृहस्थानीच  आम्हाला काल व्यवस्थित नायगरा  दाखवून आणला होता.आजही सेवा दिली. त्याचे वागणे बोलणे सगळेच व्यवस्थित सुसंस्कृत वाटले होते. ड्रायव्हर असूनही आमच्यासाठी जरूर पडेल तेव्हा हमालीचे काम ही त्यांनी केले होते. सबंध प्रवासात आवश्यक तेव्हा आवश्यक तेवढेच बोलण्याची त्यांची वृत्ती आमच्या नजरेस आली होती. त्यांच्याविषयी एक वेगळाच आदरभाव वाटू लागला होता. आम्ही त्याला दहा डॉलर टीप देऊ केली. ती त्यांनी आनंदाने घेतली. नंतर ते जे म्हणाले तो एक सुखद धक्का होता. ते म्हणाले,

  “मी येथील ओहायो विद्यापीठात राज्यशास्त्राचा प्राध्यापक होतो. काही वर्षांपूर्वी निवृत्त झालो . आणि निवृत्तीनंतर हा गाडी-भाड्याचा उद्योग करीत आहे. पैसे मिळवण्यापेक्षा कशात तरी गुंतून राहणे परदेशी पाहुण्यांची ओळख करून घेणे ही माझी आवड आहे. आणि म्हणून हे मी आनंदाने करतो आहे!”…आपला अमेरिकेतील पत्ता देत (त्यावेळी मोबाईल नव्हते)  पुन्हा अमेरिकेत आल्यास कळविण्याची विनंती केली. आम्हाला नायगारा प्रवासातील त्यांच्या बोलण्याचा संदर्भ लागला .अमेरिकन समाज हा श्रमाला किती प्रतिष्ठा देतो याचीही जाणीव झाली. अमेरिकेच्या या पहिल्या भेटीत एक चांगला धडा मिळाला होता!!

  नायगारा दर्शन व छोटी बोट.. ‘Mist Maid’.

           दुपारच्या वेळेस आम्ही न्यूयार्क विमानतळावर उतरलो हॉटेलमध्ये जाऊन थोडी विश्रांती घेतली. आमचे इतर सदस्यही त्यांचे कार्यक्रम आटोपून येथे जमले होते.  संध्याकाळी एक दुसरी अमेरिकन संशोधन कंपनी,’ साऊथ वेस्ट रिसर्च कार्पोरेशन,(SWR)’ यांचा संशोधन विभाग पहावयाचा होता. तो पाहिला. खूप मोठा संशोधन प्रकल्प आहे.यांचे संशोधन विशेषतः मोटर गाड्यांना लागणाऱ्या वंगणा(Automotive Lubricants) संबंधी होते. त्यांच्या,भंगार विभागात( scrap), जगातल्या नामवंत कार मॅन्युफॅक्चरर्स, जसे की होंडा, सुझुकी, निसान, मर्सिडीज बेंझ, अशा  गाड्यांची नवी इंजिने टेस्टिंग करून,तोडून फेकून दिलेली दिसली. संशोधनासाठी करीत असलेल्या अफाट खर्चाची कल्पना त्यावरून यावी. खरे तर दोन-तीन तासात हे असे मोठे प्रकल्प काय पाहणार?सर्व विभागातून  फिरता फिरता जे दर्शन होईल त्यातून काय ते पहावे,घ्यावे आणि दुसऱे म्हणजे ह्या कंपन्या आपल्या संशोधनाबद्दल जास्त खोलात जाऊन बोलावयास ही तयार नसतात!  “दॅट इज अवर सिक्रेट,,” एवढे बोलून गप्प करतात .पुढे नेहमीप्रमाणे विविध विभागांची तासभर प्रेझेंटेशन्स झाली. प्रश्नोत्तरे झाली.रात्री ‘रंगीत’ पार्टी झाली. खरे तर अशा रात्रीच्या पार्ट्या हा देखील  ऊद्योगधंद्याचा एक मोठा महत्वाचा भागच आहे! प्रत्यक्ष समोरासमोर बसून, एकावेगळ्या मानसिकतेत, अशा चर्चा होतात त्या फलदायी ठरतात,असाच बहुतेकांचा अनुभव असेल!!

  सफरीचा शेवटचा दिवस न्यूयॉर्क दर्शनाचा होता. या 

जग प्रसिद्ध शहरातील, ख्यातनाम स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, एम्पायर स्टेट बिल्र्डिंग, (त्यावेळची जगातली सर्वाधिक उंचीची इमारत), युनायटेड नेशन्स चे ऑफिस, अशी काही स्थळे पाहून झाल्यावर शेवटी काही वेळ ‘के मार्ट मॉल’,मध्ये खरेदीचा आनंद लुटला. भत्ता वाचऊन काही डॉलर शिल्लक होते. मनाप्रमाणे खरेदी करता आली. मुलांसाठी काही खेळणी व बायकोसाठी काही सौंदर्य प्रसाधने आम्ही दोघांनीही घेतली. संध्याकाळी हॉटेलवर येऊन सर्व बांधाबांध करून, रात्रीचे विमान पकडून भारतात यावयाचे होते. घाईघाईत परंतु व्यवस्थित सर्व कामे आटोपली. .न्यूयॉर्क- फ्रॅन्कफर्ट- मुंबई असा आरामदायी प्रवास झाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास भारताच्या मुंबई विमानतळावर उतरलो ..आणि पुन्हा नेहमीचे  जीवन सुरू झाले.नेमेची येतो मग पावसाळा….

  न्यू एम्पायर स्टेट ईमारती वरून दिसणारे न्यूयाॅराक शहराचे विरंगम दर्शन(वर)   खाली (डावीकडे) टैक्सास स्टेट युनिव्हर्सिटी.(उजवीकडे) के मार्ट मधील खरेदी.

   अशा रीतीने अमेरिका देशाचा हा पहिला प्रवास खूपच आनंददायी व माझ्या व्यावसायिक कामाच्या  दृष्टीनेही उपयुक्त असा झाला. या केवळ आठवडाभराच्या अमेरिका वारीमध्ये या देशाचे वैशिष्ट्य,व त्यांनी मिळविलेल्या भव्य दिव्य यशामागे कोणती कारणे असावीत याचा पुसटसा तरी अंदाजा आला. भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेली मंडळी तेथे किती प्रामाणिकपणे व कष्टाळूपणे राहतात त्याचेही दर्शन घडले. एकंदरीत सर्व  क्षेत्रात या देशाने मिळविलेली आघाडी ही विशेष करून त्यांच्या तांत्रिक शिक्षणातील प्राबलल्यामुळे व अध्यायावत यंत्रसामग्रीच्या वापरामुळे मिळालेली आहे.कोणत्याही देशाला प्रगतीपथावर जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावीच लागेल हे पटले.

   मी ज्या पेट्रोलियम शुद्धीकरण  व वंगण निर्मितीच्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात या देशातील शास्त्रज्ञांनी केलेली प्रगती खूप प्रभावी वाटते. उत्पादन पद्धती, मूल्यमापनाचे दंडक,व मानांकन देण्याचे बाबतीत अद्ययावत सुविधांचा वापर या मुळे हीमंडळी जगाच्या खूप पुढे आहेत. युरोप वगळता इतर देश त्यांचे अनुकरण करीत आहेत.

   मला वैयक्तिकरित्याही अमेरिका भेट व ही SAE कॉन्फरन्स यातील सहभागामुळे  खूप फायदा झाला . या क्षेत्रातील हुशार, नामवंत व्यक्तींशी ओळख झाली, निर्माण झालेले व्यावसायिक संबंध पुढेही टिकून राहिले.माझ्या व्यावसायिक जीवनात त्याचा उपयोग झाला.

   वरील चित्र, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, सांस्कृतिक केंद्र.  येथे सेमिनार झाला. ( खाली डावीकडे)Lubrizol संशोधन केंद्र(एकविभाग). (उजवीकडे) ,एस डब्ल्यू संशोधन केंद्र प्रयोगशाळा.

   न्यूयार्क विमान तळावरून एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले.मी विमानातूनच हात हलवून,”बाय बाय अमेरिका ..फिर मिलेंगे”..म्हणत अमेरिकेचा निरोप घेतला. तरी ,’पुन्हा या देशात भेट देण्याचा योग कधी येईल काय?’ ‘ त्याबद्दल साशंक होतो. माझ्या अनेक वाऱ्या भविष्यात येथे होणार आहेत, याची पुसटशी ही कल्पना तेव्हा आली नाही.  विधिलिखित कोणाला कळते का ? विमानतळावर भेटलेल्या थिरू ने,” श्री दत्तलाही अमेरिकेतच नोकरीसाठी पाठवा”, अशी प्रेमळ सूचना मला केली होती”. “ते माझ्या हातात कुठे आहे ..?”असे मी त्याला सांगितले तरी मलाही दादाने कामासाठी येथेच यावे असे वाटत होते. दादाही त्यावेळेस एका उत्तम भारतीय कंपनीत नोकरी करीत होता.त्याला भारताबाहेर जाण्याची इच्छा होती.अनेक देशांतून ऑफर्स येत होत्या.तरी अमेरिकेतच नोकरी करण्याची त्याची इच्छा होती.मनाप्रमाणे  योग जुळून येत नव्हता.  शेवटी या योगायोगाच्या गोष्टी. त्याला एकदाची  अमेरिकेतच मनासारखी नोकरी मिळाली. काही वर्षांनी लग्नानंतर पत्नी  डॉ.सौ.स्वातीलाही तो अमेरिकेत घेऊन गेला. ती देखील आता तेथे वैद्यकीय व्यवसायात चांगले काम करीत आहे.

    जावई प्रशांत देखील भारतातील  एका अमेरिकन कंपनीत काम करीत होता. दोन एक वर्षापूर्वी त्याला कंपनीने अमेरिकेत बोलावून घेऊन येथील काम पहावयास सांगितले. महिन्याभरातच सौ.दीप्ती व मुलेही तेथे रवाना झाली. चौधरी कुटुंबही आता अमेरिकेत स्थिरस्थावर होत आहे गतवर्षी आमची भाची क्षितीचा मुलगा मीत शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. हा लेख लिहिताना, पुतणी प्रीती वझे हीचा अद्वैत  परवा ऊच्च शिक्षणासाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. ज्या अमेरिकेच्या दर्शनासाठी एकेकाळी आम्ही आसुसलो होतो, त्या अमेरिकेचे दर्शन आता ‘किती घेशील दो नयनांनी..’असे झाले आहे.. काल महिमा दुसरे काय??

   विद्यार्थी दशेत असताना हातावरची भाग्यरेषा पाहत परदेशीवारी कधी घडेल याची स्वप्ने पाहीली? दैवयोगाने पुढे परदेश पाहिला. अमेरिकाही पाहिली.. अजून पाहत आहे! ही सर्व त्या दयाघनप्रभू ची कृपा!.याबद्दल त्याचेआभार मानावे तेवढे थोडेच!!