निष्ठावंत, जगावेगळा संसारी शिक्षक, कै. स. वा. आपटे सर

कै.सखाराम वामन आपटे सर.
9 Sept.1926-26th Jan.1985.

शमोदमस्तमः शौचं क्षान्तिरार्जवमेवचl

ज्ञानम् विज्ञानमास्तिक्यम् ब्रम्हकर्म स्वभावजम्ll

शांतीप्रियता, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहिष्णुता, सत्यनिष्ठा, ज्ञानविज्ञानाप्रती आवड आणि धार्मिकता हे सारे गुण अंगी असणे म्हणजे खऱ्या अर्थाने ब्राह्मण्य आहे. 

  आजच्याच नव्हे तर कोणत्याही काळात ही अशी व्यक्ती सापडणे महादुर्लभ! अशक्यप्राय!! परंतु यापैकी बहुतेक गुणसंचय अंगी असूनही, त्याचा जराही अभिमान न बाळगता आपल्या अंगभूत चांगुलपणाचा उपयोग स्वतःच्या वा कुटुंबाच्या भलाईसाठी न करता सर्व जीवनकाल केवळ आणि केवळ आपल्या विद्यार्थ्यांसाठी, संस्थेसाठी आणि समाजासाठी व्यतीत करणारी अशी एक व्यक्ती, आम्ही आमच्या आयुष्यात पाहिली. ती आमच्या बोर्डी हायस्कूलमध्ये होती. त्या व्यक्तीच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आम्हाला शालेय अभ्यासक्रमाबरोबरच जीवनातील काही सुंदर धडे  गिरविण्याचेही सद्भाग्य मिळाले. ते आम्हाला  बोर्डी हायस्कूलात गुरुवर्य म्हणून मिळाले होते! त्याच कै. सखाराम वामन आपटे उर्फ आपटे सर उर्फ  कुटुंबीयाचेे लाडके बापू .. त्यांच्याच आठवणी मी आज सांगणार आहे.

कै.आपटे सरांना गुरुस्थानी असलेले आचार्य भिसे व चित्रे  गुरुजी

       आपटे सरांचे सारे आयुष्य म्हणजे, अनेक अनाकलनीय घटना, सततची मेहनत आणि कष्ट, समर्पित वृत्तीने काम, त्यामुळे करून घेतलेली प्रकृतीची हेळसांड आणि या सर्वाचा परिपाक म्हणून केवळ 58 व्या वर्षी झालेला स्वर्गवास …त्यांचे सर्व जीवन म्हणजे  एक प्रेरणादायी गाथा आहे!!

   एका सुविद्य ब्राह्मण कुटुंबात जन्म ,आयुष्याला सुरुवात होते न होते तोच वडिलांचा अकिली मृत्यू , प्रेमळ मामांनी दिलेला आधार, त्यांनीच नातेसंबंधातील सधन कुटुंबात केलेले दत्तकविधान, येथेही  नशिबाने केलेली थट्टा ,तशाही परिस्थितीत पुण्याच्या एस. पी. कॉलेज मधून उच्चशिक्षण, सरकारी नोकरीत प्रवेश, कर्तव्य कठोर निर्णयामुळे  वरिष्ठांची खप्पा मर्जी, नोकरीला रामराम, विवंचना..कौटुंबिक समस्यांनीही पुरविलेला पिच्छा.. कर्म धर्म संयोगाने बोर्डीच्या भिसे गुरुजींशी गाठ, बोर्डीत वीस वर्षाची उत्तम सेवा झाल्यावर, स्थिरस्थावर होत असतानाच संस्थेच्या बोरीवली येथील संकुलात बदली, हा अन्याय न समजता ती मिळालेली एक  संधी मानून  तेथेही जीवाचे रान करून बोरिवली विभागाची केलेली भरभराट, संस्थेकडून  गौरव ,विद्यार्थी,पालक  व सहका-यांचे  मिळविलेले अलोट प्रेम, अनेक आव्हाने पूर्ण करण्याचे स्वप्न पहात असतानाच थकलेल्या शरीराने पुकारलेला असहकार स्विकारीत केवळ 58 व्या वर्षी, सारे श्रेय सहका-यांना  वाटून टाकीत निखळ आत्मसमाधान आपल्याबरोबर घेऊन जाणाऱ्या,

   सुखदुःखे समेकृत्वा,लाभा लाभौ जयाजयौ 

या सन्यस्त वृत्तीने आयुष्यभर जगलेल्या, आमच्या आपटे सरांची,  प्रिय बापूंची ही अफाट, अचाट, वेधक जीवन कहाणी  मोजक्या शब्दात सांगणे कठीण, तरीही हा माझा प्रयत्न !!.

   आयुष्यातले काही कर्मधर्म संयोग आपल्या चांगल्यासाठी जमून येतात कारण ते लाभदायक ठरतात, जीवनावर दूरगामी व योग्य परिणाम करतात. ज्यावर्षी  1955-56 साली  मी बोर्डी हायस्कूलात प्रवेश घेतला त्याच सुमारास जत- सांगलीचे श्री.सखाराम वामन आपटेसर आमच्या शाळेत दाखल झाले होते. पुढील चार वर्षे आम्हाला त्यांच्या विद्वत्तापूर्ण व प्रेमळ शिकवणुकीचा  लाभ मिळाला. सायन्स,गणित, हिंदी हे विषय त्यांनी आम्हाला शिकविले. नुसता अभ्यास शिकवण्यापेक्षा, आपल्या चरित्राने आणि चारित्र्याने त्यांनी  सुसंस्कार व शाश्वत जीवन मूल्यांची अनमोल शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांना  पुढील जीवनप्रवासासाठी बांधून दिली. ती आयुष्यभर पुरली, आजही वापरतो  आहोत.. 

    सांगली जिल्ह्यातील जतमध्ये राहणारे आपटे सर बोर्डीला का व कसे आले, हा इतिहास मोठा मनोरंजक व विस्मयजनक आहे! आपटे सरांच्या आयुष्यात, त्यांच्या समकालीन इतर शिक्षक सहका-याप्रमाणेच आचार्य भिसे-चित्रे या दोन ऋषितुल्य गुरूंचे स्थान खूप मोठे आहे. सरांनी स्वतः देखील ते नेहमीच अधोरेखित  केले आहे .

सरांचे  धाकटे चिरंजीव श्री. सुनील आपटे यांनी मला  दिलेल्या  माहितीवरून, त्यांचा पूर्वेतिहास कळला तो असा. कुटुंबीय त्यांना बापू असे संबोधित. सुनील म्हणतात. “श्री. सखाराम वामन आपटे हे बापूंचे दत्तकविधानानंतरचे नाव. त्यांचे मूळ नाव सखाराम विनायक पटवर्धन असे होते. कै. विनायकराव पटवर्धन व कै. सौ. गंगाबाई पटवर्धन यांना एक कन्या (अक्का)व कनिष्ठ पुत्र सखाराम अशी दोन मुले होती. दुर्दैवाने बापूंच्या वयाच्या केवळ सातव्या वर्षी वडील विनायकराव पटवर्धन यांचे निधन झाले.

कै.अक्का यांना एक मुलगी तिचे नाव सौ. कुसुम गोखले. (लग्नानंतरचे नाव). तिचा पुत्र म्हणजेच मराठी नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध नाट्य कलाकार कै. मोहन गोखले होत. म्हणजेच नटवर्य कै. मोहन गोखले हे बापूंचे नातू होत!!

पित्याच्या अकाली निधनामुळे अनाथ झालेल्या सखारामला व मातोश्री गंगाबाई पटवर्धन यांना बंधू (बापूंचे मामा) कै.केशवराव लिमये यांनी जत, जिल्हा सांगली, येथे आपल्या घरी आणून सांभाळले .कै.केशवराव लिमये हे त्यावेळी राजेसाहेब श्रीमान डफळे (जत संस्थान) यांचे दिवाण म्हणून काम बघत होते .पुढे ते राजगुरुनगर तालुका खेड, जिल्हा पुणे येथून सिव्हील जज्ज म्हणून रिटायर झाले. एका मोठ्या हुद्द्याच्या व मोठ्या मनाच्या सहृदयी मामांनी  लहानपणी दिलेले संस्कार सखारामला पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडले.

  मामा केशवराव लिमये यांनीच आपल्या नात्यातल्या कै. गंगाबाई वामन आपटे नावाच्या विधवा आत्याला सखारामचे दत्तक विधान केले. दुर्दैवाने गंगाबाई वामन आपटे या दत्तक विधानानंतर लवकरच वारल्या. त्यांचे नावे कर्नाटक मधील रामदुर्ग येथे असलेली सुमारे पन्नास एकर जमीन सखारामचे नावे झाली. पण लगेचच आलेल्या कुळ कायद्यामुळे सर्व जमीन कुळांना वाटली गेली.

  त्याही परिस्थितीत छोट्या सखारामने जत मधील रामराव हायस्कूल मधून मॅट्रिक, एस पी कॉलेज पुणे येथून बीएससी ,कोल्हापूर येथून बी.टी, व परत पुण्याहून एम एड् आणि हिंदी राष्ट्रभाषा पंडित ,असे उच्च शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्याच्या चिकाटीची व मेहनतीची ही फळे होती.

    शिक्षण झाल्या झाल्याच 1952 साली पहिले लग्न सौ. निर्मला आपटे (माहेरच्या  करंदीकर ,पंढरपूर )यांचे बरोबर झाले. या लग्नापासून त्यांना सुधीर व मीना अशी दोन अपत्ये झाली. मीनाच्या जन्मानंतर तीन ते चार महिन्यांच्या आत सौ. निर्मला यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. कदाचित ती आत्महत्या असावी असा संशय आहे!

दुर्दैवाने आज सुधीर हयात नाहीत व मीनाताई अमेरिकेत त्यांच्या कन्येकडे राहात आहेत. सुनील मुळे माझा मीनाताईंशी अमेरिकेत संपर्क झाला असून ती हकीकत पुढे येणार आहे. या घटनेनंतर सौ. निर्मला यांच्या माहेरच्या लोकांनी बापूं वर वैयक्तिक आरोप करून त्यांना प्रचंड त्रासही दिला. ती वेगळी कहाणी!

  छोटी मीना सहा महिन्यांची असताना, त्या वेळी जी टी हॉस्पिटल, फोर्ट मुंबई येथे नर्सिंगचे ट्रेनिंग संपवून मेटरन् सिस्टरच्या कोर्ससाठी लंडनला जाण्याच्या तयारीत असलेल्या कु.सुशीला दाते यांच्याशी बापूंचा दुसरा विवाह झाला. हीच माझी आई.  सुहास व मी अशी दोन अपत्ये या विवाहा पासून आहेत.”

  या लेखासाठी मिळालेली बरीच  माहिती, सम्पर्क, फोटो हे सुनीलच्या सहकार्याने मिळालेले आहेत हे नमूद करण्यास मला खूप आनंद होतो. सुनील व  सर्व भावंडाविषयी थोडी माहिती मी पुढे देणारच आहे.

   पुढील दोन वर्ष 1951-53 या काळात, सरांनी एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून नोकरी केली.  एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेतील काही गैरव्यवहार उघडकीस आणल्यामुळे त्यांचेवर राजकीय व सामाजिक दबाव आणण्यात आला. आपल्या रोखठोक व न्यायनिष्ठुर स्वभावाला अनुसरून त्यांनी आपल्या मूल्यांशी तडजोड करण्यापेक्षा  नोकरीचा राजीनामा दिला.  त्यांच्या सहाध्यायी श्रीमती रूपा नाईक,ज्या पुढे महाराष्ट्र राज्याच्या डायरेक्टर ऑफ एज्युकेशन झाल्या, त्यांनी सरांना आचार्य भिसे गुरुजींचा पत्ता देऊन त्यांस भेटण्यास सांगितले. आणि…  आपटे सरांच्या जीवनात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली..

     1954 साली आपटे सर आपल्या कुटुंबासह बोर्डीस आले. सुरुवातीला हे कुटुंब श्री. बर्वे यांचे चाळीत राहत होते .पुढे 1962 मध्ये आपटे सरांना गोखले एज्युकेशन सोसायटीने आजीव सदस्यत्व दिल्याने, हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली.  त्यांना कै.साने सरांच्या शेजारील बंगला राहण्यासाठी मिळाला. दिवस आनंदात व कर्तव्यपूर्तीच्या समाधानात जात होते.

    पुढे  भिसे गुरुजींच्या निधनानंतर ,गोखले सोसायटीत  निर्माण झालेल्या काही अंतर्गत वादामुळे 1975 साली आपटे सरांची बदली संस्थेच्याच बोरिवली विभागात  करण्यात आली. त्यांच्या आयुष्यातील एक दैदिप्यमान कालखंडाचा शेवट झाला. या बदलीबाबत जराही खंत न करता त्यांनी बोरिवली विभागात झालेली बदली हे एक नवीन आव्हान समजून ते बोरीवलीत रुजू झाले .संधीचे सोने केले. कार्यकौशल्य, अफाटमेहनत, शिक्षक- सहकारी-पालक यांचे उत्तम सहकार्य यामुळे बोरिवली विभागाचा कायापालट सरांनी कसा केला, तो इतिहास ही जाणून घेण्याजोगा आहे !!

         सरांच्या सुविध्य द्वितीय पत्नी सौ सुशीला आपटे यांनी बोर्डीत पाऊल ठेवताना त्या पहिल्या दिवसाचे केलेले वर्णन त्यांच्या संवेदनाशील मनाचे दर्शन घडविते, तत्कालीन बोर्डीचे त्यांच्या मनावर ठसलेले चित्र दर्शविते..

     पत्नी कै.सौ.सुशीला व कै.स. वा. आपटे सर 

  “19 नोव्हेंबर 1955 सकाळची वेळ .गाडी घोलवड स्टेशन मध्ये उभी. आमच्या स्वाऱ्या सावकाश उतरल्या .जरा इकडे तिकडे चौकशी करेपर्यंत बोर्डीस जाणारे सर्व टांगे निघून गेले. सकाळी 10:30 वाजता गाडी आली, आणि अकरा वाजले तरी आम्ही स्टेशनवरच उभे. चौकशी अंती कळले की माननीय चित्रे गुरुजींनी आमच्यासाठी ‘पाड्याची गाडी’ (रेडे जुंपलेली गाडी), पाठविली होती. कारण आम्ही प्रथमच बोर्डीस येत होतो. बरोबर घरचे सामान सुमान बॅगा वगैरे होते. मुलांना गाडीत सामानावर बसविले. मी व आपटे सर मागून चालत निघालो. नोव्हेंबर महिना असला तरी ऊन मी म्हणत होते. दोन दिवसांच्या प्रवासाचा कंटाळा आला होता. घोलवड ते बोर्डी शारदाश्रम पर्यंत रस्ता दुतर्फा झाडीने, नारळ चिकूच्या बागांनी, भरलेला होता. पार्शी लोकांच्या बंगल्यासमोर सुंदर फुलांचे बगीचे होते. एका बाजूस खळाळणारा ,फेसाळणारा समुद्र आणि दुसऱ्या बाजूस हिरवे सौंदर्य प्रथमदर्शनी तरी आम्हाला गाव आवडले. अशा गावात राहायला मिळणार म्हणून  आम्ही खूप खूप सुखावलो!!”

आपल्या यजमानांची समर्पित वृत्ती आणि सुरुवातीच्या काळात त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या अमाप कष्टांचे वर्णन करताना त्या म्हणतात, “त्या सुरुवातीच्या काळात सर सकाळी सात वाजता जे शाळेत जात ते जेवणापुरते घरी येत. रात्री 11 पर्यंत शाळेतच असत. त्यांनी पैशाची कधीच चिंता केली नाही. विद्यादान करणे हा त्यांचा मूळचा पिंड होता. शाळेतील वातावरण उत्साहवर्धक. पू. चित्रे गुरुजींसारखे मुख्याध्यापक, मग काय विचारता? भरीसभर म्हणून त्यावर्षी पाच हजार रुपये सायन्स हाॅल साठी ग्रँट मिळाली होती. मग तर स्वारी त्या कामात पूर्ण हरवून गेली. असेंब्ली हॉलच्या वरच्या सायन्स हॉलमध्ये मुक्काम असे. बाजूंनी सतत विद्यार्थ्यांचा गराडा. अशी पाच सहा वर्षे सहज निघून गेली

 पुढे 1962 साली त्यांना आजीव सदस्य म्हणून नियुक्त केले गेले आणि सर प्रिन्सिपाॅल म्हणून काम पाहू लागले. मात्र प्रिन्सिपाॅल व लाईफ मेंबर असूनही शाळेचे तास घेतच होते.1955 सालापासून ते1975 सालापर्यंत शनिवारी रविवारी देखील एक्स्ट्रा पिरियड्स कधी चुकविले नाहीत. नवीन नवीन कल्पना, लोकांशी विनयाचे व आदराचे वागणे यामुळे लोकांची मनेही जिंकली. बोर्डीच्या शाळेसाठी व संस्थेसाठी त्यांनी कित्येक नवीन गोष्टी केल्या. टेक्निकल विभाग, नवीन शेती विभाग चालू करण्यासाठी  बोर्डीतील राम मंदिराकडे असलेली जमीन मिळविली, मुख्य इमारतीच्या मागे पाच क्लास रूम्स बनविणे, लेडीज रूम्स, शेतीसाठी हॉलचे बाजूस बांधलेल्या क्लासरूम्स  व सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री. मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री असताना फॉरेस्ट खात्याची जमीन व त्यांच्या काही क्लासरूम्स मोठ्या मिनतवारीने मिळविल्या. सततचे प्रयत्न व कष्ट यांची ही फळे होती.

    1 मे 1975 रोजी आम्ही मुंबईस, बोरिवलीत आलो.1975 ते 85 हा दहा वर्षाचा काळ बोरीवली हायस्कूलचा उत्कर्ष होत असताना भुर्रकन उडून गेला”

      सरांची आपल्या कामावरील निष्ठा व यशाबद्दल निस्पृहता, त्यांच्या जीवननिष्ठा आणि अखेरच्या दिवसात, मृत्यूला सामोरे जाताना दाखवलेले धैर्य..त्यांच्या सहचरणीच्या शब्दातूनच ऐकायला हवे,

   ” 1976 साल मार्चमध्ये दशवार्षिक उत्सव साजरा होत होता. त्यांची काम करण्याची चिकाटी व जिद्दअतुलनीय! एकदा ठरविले की ते काम पूर्ण केल्याशिवाय राहत नसत. मात्र एक दुर्दैवी घटना  घडली .15 मार्च होळीच्या दिवशीच, संध्याकाळी सात वाजता सरांच्या मातोश्रींचे निधन झाल्याची बातमी आली . इकडे तर समारंभ चालू होता. केंद्रीय मंत्री नामदार गोखले मुख्य पाहुणे येणार होते, कार्यक्रम सोडूनही जाता येत नव्हते, जाणे जरूरी होते… शेवटी सरांनी व मी निर्णय घेतला.

       ‘आजच ही बातमी जाहीरपणे सांगावयाची नाही’. मनावर एक मोठे दडपण होते. एकुलता एक मुलगा आईच्या अंत्यदर्शनासाठीही जाऊ शकत नव्हता. शेवटी माझ्या मोठ्या मुलास जत येथे पाठविले. समारंभ संपल्यावर तीन दिवसांनी सरांनी ही गोष्ट सर्वांना सांगितली. ते तीन दिवस आम्ही कसे काढले ते आमचे आम्हासच माहीत !

    सुरुवातीला शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या फक्त अकराशे होती. ती चार हजार झाली. मिनी-केजी ते सिनियर कॉलेज निर्माण झाले .

   एखाद्या व्यक्तीचे जीवन केवळ कष्ट करण्यासाठीच असते की काय कोण जाणे? अतिशय भिडस्थ स्वभाव. दुसऱ्यांना दोष म्हणून कधी द्यावयाचा नाही. सर्व माणसे त्यांना नेहमी चांगलीच वाटत.त्यामुळे कित्येकांनी त्यांना फसविले आहे. शेवटी शेवटी, ते मला म्हणत ,

  ‘कोणालाही किंमत नसली तरी माझ्या मनाला एक समाधान आहे. मी शून्यातून वर येऊन मुंबईसारख्या ठिकाणी काहीतरी विशेष करू शकलो ! ‘

   अजूनही जगले असते, प्रकृतीने साथ दिली असती, तर कित्येक  योजना पार पाडू शकले असते. 

  स्टेट अवार्ड्स, नॅशनल अवार्ड्स ,त्यांनी नाकारली. दोन वर्षे विशेष दंडाधिकारी म्हणून ही त्यांनी काम पाहिले. कोणी समारंभास पाहुणे म्हणून त्यांना बोलाविले तर तो मान दुसऱ्यांना देत असत. ते स्वतः कधीच पुढे पुढे करीत नसत. आमचे घर सर्वांसाठी नेहमी खुले असे. आपल्या वेदना ते कधीही कोणाजवळ सांगत नसत. उलट दुसऱ्यांची चौकशी आस्थेने करीत. 

   शेवटचे दोन चार महिने अगदीच वाईट गेले. अंथरुणावरून हलताही येत नव्हते. तरी जरा बरे वाटले की ऑफिसात जात.विद्यार्थी, शाळा ,सोसायटी शेवटपर्यंत त्यांच्या डोक्यात होते. श्वास घ्यायला त्रास पडे तरी आपले काम आपणच करायचा प्रयत्न करीत. जमत नसे. शेवटी केईएमला नेले. मी जवळ राहू शकले नाही याची मला खूप खंत वाटते. जन्मभर कष्ट करून शिणलेले शरीर व आत्मा 26 जानेवारी 1985 रोजी वसंत पंचमीला अनंतात विलीन झाला. तीस वर्षे काळाच्या उदरात गडप झाली. एक जगा वेगळा संसार संपुष्टात आला. शाळा हाच त्यांचा खरा संसार. सर्व शारीरिक यातना संपल्या. त्यांचा आत्मा अजूनही या शाळेभोवती भिरभिरत असेल, आणि नवीन काही योजनांचा विचार करीत असेल…”

   दुर्दैवाने सुशीला ताई ही आज या जगात नाहीत. मात्र आपल्या पतीचे व आपल्या तीस वर्षाच्या जगावेगळ्या संसाराचे सार अत्यंत मार्मिक व अंतकरणाला स्पर्श करणाऱ्या शब्दात त्यांनी सांगितले. त्यांचे शब्द हृदयाला स्पर्श करतात ,आपटे सरांच्या कर्तृत्वाला एक वेगळी झळाळी देतात. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक कर्तबगार स्त्री असते, याचा  प्रत्यय येतो .या दोघांच्या जगावेगळ्या आदर्श संसाराला सलाम!

बोरिवली संकुलात प्राचार्य एन. जी. जोशी, परळ संस्थेचे प्रमुख )व प्राचार्य गुजराती( डावीकडे) यांचे समवेत  कै. स. वा. आपटे सर  .

    आपटे सरांशी माझा संबंध ‘माझे शिक्षक’ म्हणून मी 1955 मध्ये हायस्कूलात  प्रवेश घेतल्यापासून आला. त्याआधी त्यांचा परिचय सुमारे वर्षापूर्वी,एका प्रसंगातून झाला होता.. 

 .. त्याचे असे झाले की माझे वडील(आप्पा) आणि श्री. आपटेसर एका सरकारी( जिल्हा परिषद विधानसभा सारखी) निवडणुकीच्या निमित्ताने ,बोर्डीतील एका मतदान केंद्रावर एकत्र काम करीत होते. त्याकाळी आणि आजही शिक्षक वर्ग मग तो  सरकारी शाळेतील असो वा इतर, अशा कामासाठी सरकारला ‘हक्काचा सेवक’ वाटतो.  मला आठवते बोर्डीच्या शेतकी शाळेत ते मतदान केंद्र होते .आमचे घर शाळेजवळच असल्याने व आप्पांना चहा खूप आवडत असल्याने, आईने भरून दिलेला चहाचा तांब्या (त्या दिवसात थर्मास नव्हते) घेऊन जाण्याची जबाबदारी माझी होती  आपटे सर आप्पांच्या शेजारीच बसले होते. माझी ओळख आप्पांनी,” हा आमचा मोठा मुलगा दिगंबर,पुढच्या वर्षी आपल्या हायस्कूलमध्ये येईल “,अशी ओळख करून दिली.अर्थातच त्यादिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी असा तीन वेळा दोघांनाही चहा पोहोचवण्याचे काम मी केले. कुठेतरी सरांच्या लक्षात मी राहिलो.  पुढे शाळेत आल्यावर ” मला चहा पाजणारा तूच का?”,  अशी गमतीने माझी फिरकी पहिल्याच भेटीत त्यांनी घेतलेली चांगली आठवते. 

      लोकल बोर्डाच्या मराठी शाळेतून सातवी पास झाल्यावर हायस्कूलमध्ये प्रवेश धेणाऱ्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यावर त्यावेळी खूप दडपण येई. मराठी शाळेतूनच चौथी इयत्तेनंतर  हायस्कूलमध्ये जाणारे विद्यार्थी तसेच शारदाश्रमातील विद्यार्थी हे आम्हाला त्याच इयत्तेमध्ये ‘सीनियर ‘असत. त्यामुळेच एक प्रकारचा इंन्फिरीअटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड सुरुवातीला वाटत असे.  त्यातच आमचा वर्ग आठवी “ड” हा त्यावर्षी खास निर्माण केलेला वर्ग होता. आमच्या क्लास टीचर सौ. मालतीबाई चुरी, यांच्या नोकरीची सुरुवात प्रथमच होत होती. त्यांच्या करड्या शिस्तप्रिय स्वभावामुळे आम्ही मुले टरकून होतो. माझी अवस्था नदीतून समुद्रात आलेल्या छोट्या माशासारखी झाली होती .मराठी शाळेत एकच वर्गशिक्षक सर्व विषयांची शिकवणी करीत, त्यांच्याशी एक प्रकारचा जिव्हाळा निर्माण झालेला असे. मात्र येथे प्रत्येक विषयाला वेगळे वेगळे सर म्हटल्यावर थोडे अवघडल्यासारखेच होई. प्रत्येक सरांची आपली वेगळी त-हा होती. त्यामुळेच आपटे सरांचा वर्ग जरा वेगळा वाटे. त्यांचे हळुवार बोलणे, चेहऱ्यावरील लाघवी स्मितहास्य, बिन इस्त्रीचा सफेद लेहेंगा आणि अर्ध्या बाह्यांचा शर्ट, पायात चप्पल,असा साधा पेहेराव. विद्यार्थ्याविषयी असलेले प्रेम, आस्था त्यांच्या वागण्या बोलण्यातून सहज जाणवत असे. विद्यार्थ्यांची कोणतीही चूक झाली असेल तर त्याला ती समजावून देतांना,

” नाही, म्हणजे तशी तुझी चूक नाही,..” अशी वाक्याची सुरुवात करीत, त्यामुळे  त्यांच्याकडून काही समजावून घेताना किंवा आपली चूक कबूल करताना, कोणतेही दडपण नसे. 

     त्यांच्या शिकवण्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, शिकवणे फक्त वर्गातच नव्हे तर  वर्गा बाहेरही चालूच असे. वर्ग संपल्यानंतर काही समजले नसल्यास सायन्स हॉलमधील ‘मिनी वर्ग’  सुरूच असे. तेथे त्यांना भेटण्यासाठी कोणत्या परवानगीची वा आमंत्रणाची गरज नसे. एवढेच नव्हे तर सुट्टीच्या दिवशी, रविवारी  खास वर्ग घेऊन ते आम्हाला अभ्यासात गुंतवून ठेवीत. त्यांच्या शिकविण्याचे एक दुसरे महत्त्व म्हणजे  विषयाच्या सविस्तर नोट्स ते वर्गात देत ,त्या उतरवून घेण्यास सांगत. एकंदरीत आम्हा विद्यार्थ्यापेक्षा त्यांनाच आमचा पोर्शन पूर्ण करण्याची व विषय समजावून देण्याची काळजी असे. त्यासाठी ते स्वतःवर वेळेची कोणतीच बंधने लावून घेत नव्हते. शाळेतील हा एक वेगळाच शिक्षक आहे ही जाणीव विद्यार्थ्यांना त्वरित होई.

 जानेवारी 2023 मधील शाळेच्या वर्धापनदिनी  प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीकांत सांब्राणी यांनी शाळेतील विविध विभागांना भेट दिली.  
डावीकडून आय टी विभाग प्रमुख प्रा. सौ.बारी, उपप्रिन्सिपाल डॉ. निरगुडे, प्रिन्सिपाल प्रभाकर राऊत, डॉ.सांब्राणी, दिगंबर राऊत व कॉलेजचे प्रिन्सिपल डाॅ.गोगारी.

    आमच्या वर्गातील एक हुशार विद्यार्थी, श्रीकांत सांम्ब्राणीची हुशारी त्यांनी जोखली होती. ते त्याला म्हणत, “तू माझ्या वर्गात बसण्याचे कारण नाही. तुला काही अडचण आल्यास तू मला सायन्स हॉलमध्ये भेटत जा”. श्रीकांत त्यांना सायन्स हॉलमध्येही भेटे व वर्गात ही नियमित बसे, ही गोष्ट वेगळी!

     नुकत्याच जानेवारी 2023 मध्ये झालेल्या शाळेच्या 103 व्या वर्धापन दिन समारंभा निमित्त श्रीकांतला संस्थेने “मुख्यअतिथी”  म्हणून बोलाविले होते.ही आठवण त्या दिवशी आपल्या भाषणांत त्याने सांगितली. आणंदच्या IRMA (Institute of Rural Management Anand), या संस्थेचा एक संस्थापक निर्देशक, आय आय एम अहमदाबाद या जगप्रसिद्ध संस्थेचा माजी प्राध्यापक, विभाग प्रमुख, लेखक व जागतिक स्तरावरील व्यवस्थापन सल्लागार (कन्सल्टंट) एवढी त्याची ओळख त्याच्या हुशारीची व कर्तबगारीची ओळख पटवून देण्यास पुरेशी आहे. बोर्डी हायस्कूलमध्ये असे दिग्गज विद्यार्थी घडविण्यात आपटे सरांचा हातभार लागला आहे. श्रीकांत बरोबर वर्गात सहाध्यायी म्हणून बसणारे आम्ही त्याचे मित्र देखील भाग्यवान!!

आपल्या कार्यालयात कार्यमग्न आपटे सर

       11व्या ईयत्तेत त्या दिवसात ‘स्पेशल अंकगणित'(100 गुण)शिकवण्यासाठी कोणी शिक्षक नव्हते. आम्हा तीन चार विद्यार्थ्यांना अंकगणित हा विषय घेण्यास सरांनीच सांगितले. तो एक टक्केवारी वाढविण्यासाठी  चांगला विषय होता.

  ” काळजी करू नका, मी  हा विषय तुम्हाला शिकवीन” असे त्यांनी सांगितले . 100 मार्काच्या विषयासाठी कोणीही शिक्षक नसताना, तो विषय घेणे आमच्या करिता थोडे धोक्याचे होते. मात्र सरांनी आपले वचन पाळले. स्वतः खूप मेहनत घेतली. बोर्डाच्या सुमारे दहा वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिका त्यांनी जमविल्या.आमच्याकडून सोडवून घेतल्या. आम्ही प्रत्येकाने अंकगणित विषयात शंभर मार्क मिळवून, त्यांना उत्तम गुणांची ‘गुरुदक्षिणा’ दिली. श्रीकांत सांब्राणी अवघ्या काही गुणांमुळे मेरिट लिस्ट मध्ये येऊ शकला नाही, याचे श्रीकांत पेक्षा सरांनाच जास्त वाईट वाटले होते. शाळेचे वा संस्थेचे कोणतेही बंधन नसताना केवळ विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक आदर्श शिक्षक किती मेहनत व कष्ट घेऊन मुलांना प्रोत्साहित करू शकतो मुलांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवू शकतो याचे अखिल शिक्षण क्षेत्रातील  कै.स. वा. आपटेसर हे एक उत्तम उदाहरण ठरावे ,असे मला वाटते.

      आपली कामे वेळेत आटोपावीत या प्रवृत्तीमुळे सरांना शाळेतील कामे घरी न्यावी लागत असावीत. तेथेही जागरणे करून कामे  उरकित असावेत. यामुळे  त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी खूप कमी वेळ मिळत असावा . कामाचा ताण कुठेतरी त्यांना जाणवत असावा. कदाचित त्यामुळेच असेल, त्यांना धूम्रपानाची सवय होती .फक्त सायन्स हॉलमध्ये असतानाच ते धूम्रपान करीत. गमतीने विद्यार्थ्यांना म्हणत ” माझ्यापासून अभ्यास शिका, एवढे शिकू नका!!”.

   बोर्डी शाळेतील ते दिवस व आपटे सरांची आठवण झाली म्हणजे आठवतात ती  त्यांच्या सुंदर अक्षरात फळ्यावर सोडविलेली गणिते, अभ्यासपूर्वक केलेली विषयाची मांडणी, विशेषतः गणित व सायन्स विषयाची सोपी करून सांगितलेली उकल, शिकवण्यातील  शिस्त व विद्यार्थ्याप्रती प्रेमाची जोड डोळ्यासमोर येते , स्मितहास्य चेहऱ्यावर ठेवून ,साध्या ,सफेद लेंगा-शर्ट मधील सरांची हसरी भावुक मूर्ती !  स्वतः अत्यंत बिकट परिस्थितीतून शिक्षण घेतल्यामुळे, शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकडे ते विशेष लक्ष पुरवित असत. सत्कार, तिरस्कार यापासून ते सदैव दूरच राहिले. .

    मी बोर्डी शाळा व बोर्डी गाव एकाच वर्षी सन 1959 मध्ये सोडले. त्यामुळे सरांची भेट क्वचितच होई. एकदा योगायोगाने मी व अरूण (माझा वर्गमित्र कै.अरूण गो. सावे , पुढे बोर्डी शाळेत एक नावाजलेले शिक्षक ) साताऱ्यास आमच्या महाविद्यालयात जात असताना, मुंबई ते पुणे प्रवासात सरांची व आमची भेट झाली. रेल्वेचा  रात्रीचा प्रवास होता. बऱ्याच गप्पा केल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेत आम्ही, ‘कमवा आणि शिका’  या योजनेखाली शिक्षण घेत होतो. खूप कष्ट करीत  होतो याची त्यांना जाणीव होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यास उतरल्यावर सरांनी,”येथे कोठे चहाची टपरी दिसते का पहा”  म्हणून आम्हाला सूचना केली. स्वतःबरोबरच आम्हालाही चहा पाजला.आम्ही पैसे देऊ केले तर म्हणाले,

  “अरे तुम्ही अजूनही माझे विद्यार्थी आहात. जेव्हा पैसे कमवाल तेव्हा मला चहा पाजा!” दुर्दैवाने तो दिवस कधी आला नाही. मात्र सरांच्याबरोबर केलेला त्या रात्रीचा तो प्रवास व पुणे स्टेशनवरील एकमेव ‘चहा पार्टी’चे  विस्मरण कधीच होणे शक्य नाही.

     बोर्डीतील काही मित्रांनी सरांच्या बाबतीत घडलेला एक सत्यप्रसंग मला तेव्हा सांगितलेला होता. भिसे-चित्रेंचा गंडा बांधणे  म्हणजे काय, याचा प्रत्यय आणून देणारा हा प्रसंग मी कसा विसरणार?

   बोर्डीतील काही प्रतिष्ठित मंडळींनी, राष्ट्रपती पुरस्कारासाठी सरांच्या  नावे एक अर्ज भरून आणला होता.

  ” तुम्ही फक्त सही करा..” अशी विनंती केली. सरांचे उत्तर होते,

   “उत्कृष्ट शिक्षक म्हणून मला निवडा, अशी विनंती मी करणे मला पटत नाही”..

  एकदा नव्हे, तब्बल तीन वेळा हे झाले. मंडळी सरांचे मन वळवू शकली नाही. योग्यता असून ही राष्ट्रपतीपदकासाठी अर्जच केला नाही!! अशा गोष्टी आज केवळ दंतकथा ठरतील !

    एकदा एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यासाठी कार्यकर्ते आले. बोलून गेले “हा कार्यक्रम टीव्हीवर दाखवणार आहेत”.  झाले.. सरांचे उत्तर, “टीव्हीवर कार्यक्रम दाखवणार असाल तर मी अजिबात येणार नाही..”

    सर एस. इ. एम. (SEM) झाले. त्यांनी ही गोष्ट अगदी निकटवर्तीयांनाही सांगितली नाही. मित्रांनी तक्रार केली, “एवढी महत्त्वाची घटना आम्हाला का समजू दिली नाही?”

  सरांचे उत्तर ,एस इ एम झालो तर त्यात काय विशेष? लोकांची सेवा करण्याची एक छोटी संधी मिळाली, बस्स!”

     हे असे वर्तन  सहजासहजी घडत नाही. देशाच्या प्रत्यक्ष राष्ट्रपतींनी, “आपण दिल्लीत येऊन, भारत सरकारचे मानद सल्लागार म्हणून काम करू शकाल का?” केलेली विनंती सन्मानपूर्वक नाकारणाऱ्या, आचार्य भिसे यांचा आदर्शवाद जेव्हा रक्ताचे थेंबाथेंबात  भिनतो, तेव्हाच उक्ती आणि कृती यांचा असा मेळ व्यक्तिमत्त्वात दिसून येतो!

        सरांच्या बोर्डीतील व पुढे बोरिवलीतील कालखंडात अनेक हुशार, कर्तबगार विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शन घेऊन गेले. त्यांचे आशीर्वाद मिळवून गेले. त्यांचा प्रत्येक विद्यार्थी, तो गरीब असो श्रीमंत, बुद्धिवान वा साधारण, कोणीही असो, तो त्यांच्यासाठी एक खास विद्यार्थी होता. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला, “मीच सरांचा आवडता विद्यार्थी आहे” असे वाटत असे.. एका चांगल्या शिक्षकाची हीच तर खासियत असते !

   याच संदर्भात बोलतांना, सपुत्र सुनील यांनी स्वतः अनुभवलेली एक आठवण मला सांगितली. ती येथे  देण्याचा मला मोह होतो आहे.

 एके दिवशी सुनील आणि बापू काही कामासाठी मुंबईस निघाले होते. बॉम्बे सेंट्रल येथे ट्रेन मधून उतरून सरांना सचिवालयात जाण्यासाठी टॅक्सी पकडावयाची होती. बाप -लेक  स्टेशनबाहेर येऊन रस्त्यावर उभे राहिले न राहिले तोच समोरील येणाऱ्या एका टॅक्सीतून एका गृहस्थांनी बाहेर हात करून “आपटे सर.. आपटे सर” अशी साद घालीत टॅक्सी थांबवून  धावत सरांजवळ आले  व बापूंना चरण स्पर्श करू लागले. आपले गिर्हाईक अशा रितीने मध्येच टॅक्सी सोडून का पळते आहे याचा शोध घेण्यासाठी ट्रॅक्सी ड्रायव्हरने टॅक्सी तशीच रस्त्यात  सोडून तोही गिर्‍हाईकामागे धावला. बापूंच्या जवळ आल्यावर त्यालाही हे बोर्डीचे आपले आपटे सर असे जाणवले व भान विसरून सरांना वंदन करू लागला. हे सर्व होत असताना टॅक्सी रस्त्यात थांबल्यामुळे ट्रॅफिक जॅम झाली होती. ड्रायव्हरचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकारी सरांजवळ आला. गंमत म्हणजे “अरे हे तर माझे बोर्डीचे आपटे सर ” असे त्यालाही कळले. सुनील म्हणतात, “माझ्यासमोर हे सर्व नाट्य घडत होते आणि रस्त्यावरील लोकही चक्रावले होते. ट्रॅफिक पोलीस अधिकारी, टॅक्सी ड्रायव्हर, आणि टॅक्सीतील सन्माननीय गिऱ्हाईक ..तिघेही सरांचे विद्यार्थी ! एकमेकांना ओळखत नव्हते पण आपल्या गुरुमूर्तीला वंदन करण्यासाठी अशा अवघड ठिकाणी एकत्र आले होते!”

   बघ्यांची गर्दी वाढली होती. त्यावेळी बापूंची प्रतिक्रिया काय होती? ते या आपल्या तीनही शिष्योत्तमांना लटक्या रागाने म्हणाले,

“बाबांनो, पहिल्यांदा रस्त्यावर जमलेली ट्रॅफिक मोकळी करा आणि मग इकडे या !”…

 धन्य ते गुरु आणि धन्य त्यांचे ते शिष्य ! ही गोष्ट ऐकूताना  माझ्या अंगावर रोमांच आले,  सुनीलना हा प्रसंग पाहताना त्यावेळी किती धन्य धन्य झाले असेल? असे गुरु आणि असे  शिष्य!!

   सरांची स्वाक्षरी असलेले मला मिळालेले प्रशस्तीपत्रक..

     बोर्डी शाळा सोडल्यावर दहा वर्षांनी नोकरीसाठी मला शाळेचे ‘स्कूल  लिविंग सर्टिफिकेट’ हवे होते. सर त्या दिवसात शाळेचे प्रिन्सिपाॅल होते. जाऊन भेटलो आणि ते सर्टिफिकेट देण्याची विनंती केली. सर म्हणाले,” ठीक आहे उद्या सकाळी येऊन घेऊन जा”.

   माझ्या अभ्यासाची, शिक्षणाची, कुठे नोकरीसाठी प्रयत्न करतो आहे,  अशी विचारपूस झाली.  मी सरांचा जास्त वेळ न घेता बाहेर पडलो. दुसरे दिवशी सर्टिफिकेट घेण्यासाठी पुन्हा ऑफिसात गेलो. मला अपेक्षा होती, नेहमीचे,ठराविक साच्यातील, चार ओळीचे पत्र  मिळेल .मात्र सरांनी एवढ्या वर्षानंतर ही माझे ते शालेय दिवस व त्या दिवसातील मी मिळविलेल्या काही उल्लेखनीय गोष्टींची आठवण ठेवून  त्यांची नोंद केलेले  ते प्रमाणपत्र तयार ठेवलेले  पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले ! अभ्यासातील ‘प्रिन्सिपल प्राईज’,वकृत्व स्पर्धेतील पदके, खेळातील प्राविण्य, याची बरोबर आठवण ठेवून सरांनी त्याची नोंद केली होती. म्हणून आजही सरांच्या सहीचे ते पत्र माझ्या संग्रहात मी काळजीपूर्वक जपून ठेवले आहे. छायाचित्र वर दिले आहे.त्या कालखंडात सरांच्या हाताखालून हजारो विद्यार्थी गेले असतील. मी शाळेत विशेष नावाजलेला विद्यार्थीही नव्हतो. एका सर्वसामान्य विद्यार्थ्याची छोटी कर्तबगारी स्मरणात ठेवून, मोठ्या मनाने अशी शाबासकी देणारा शिक्षक मिळण्यासाठी  जन्मोजन्मीची पुण्याई लागते.  मी भाग्यवान आहे! त्यांचे सगळेच विद्यार्थी असे भाग्यवान आहेत!! 

   बोरिवली विभागातील प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षकासमवेत ( डावीकडे) व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासमवेत (ऊजवीकडे) कै. स. वा. आपटे सर.

     1975 साली सरांनी बोर्डी सोडले. संस्थेने त्यांची बोरीवली विभागात बदली केली. तो सरांना ,कुटुंबीयांना तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांना व सहका-यानाही एक अनपेक्षित धक्का होता. त्यांच्या स्नेह्यांनी, कुटुंबीयांनी “हेअसे का?” हा प्रश्न उपस्थित केला. ते तर्काला धरूनच होते. सर स्थितप्रज्ञ होते…. संस्थेच्या बोरिवली संकुलात हजर झाले. ‘एक नवीन संधी’  याच, दृष्टीने त्यांनी हा बदल स्विकारला ! ‘इवलेसे रोप’ असलेले त्यावेळचे बोरिवली हायस्कूल सरांच्या कारकिर्दीत सर्वांगांनी बहरले, फुलले ,त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले! केवळ संस्थेनेच आपटेसरांना शाबासकी दिली नाही तर विद्यार्थी ,पालक व समस्त बोरिवलीकरांच्या हृदयात त्यांनी एक आदराचे स्थान निर्माण केले. !

        श्रीमति शुभांगी फडणवीस (मीना आपटे) अटलांटा, अमेरीका. मी मागे म्हटल्याप्रमाणे सरांच्या पहिल्या विवाहापासून (कै.सौ.निर्मला), त्यांना दोन अपत्ये, सुधीर व मीना .दुर्दैवाने आज सुधीर हयात नाहीत.  मीनाताई अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपल्या कन्येकडे रहात असून सेवानिवृत्तीचे जीवन आनंदात व्यतीत  करीत आहेत. सुनीलच्या मदतीमुळे माझा त्यांच्या अमेरिकेत संपर्क होऊ शकला आणि खूप गप्पाही केल्या. मीनाताईंनी माझ्या विनंतीवरून आपल्या बापूविषयींच्या काही आठवणी मला लिहून पाठवल्या. त्याही मुद्दाम येथे देत आहे. मीनाताई लिहतात,

     “माझे वडील श्री. सखाराम वामन आपटे. आम्ही त्यांना घरात बापू असे म्हणायचो. ते बोर्डीला सु पे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले ते 1955साल असावे.1962 साली  बापू तेथेच प्रिन्सिपल म्हणून नियुक्त झाले. 1974 साली माझा विवाह झाला . मी मीना आपटे, श्रीमती शुभांगी शरद फडणवीस झाले. बालपणी आम्हाला घरात बापूंचा भरपूर धाक होता. बापू सकाळ संध्याकाळ शिकवण्या घेत. पैशासाठी नाही ,मुलांचा अभ्यास पूर्ण व्हावा म्हणून. त्यामुळे आमच्या वाट्याला कमी येत. रात्री बापू घरी येईपर्यंत मी झोपून गेलेली असे. माझ्या बालमनाला वाटे, “दुसरे बापू घरी येतात. सकाळी जातात तेच बापू रात्री येत नाहीत. जे येतात ते दुसरेच बापू !”

   सांगायचे म्हणजे, अपार कष्ट केले बापूंनी. त्यांना सर्वांनीच खूप शिकावे असे वाटे. कोणाला शिक्षण घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीला बापू सर्वतोपरी मदत करणारच. ते प्रिन्सिपाल असताना अनेक शिक्षकांना त्यांनी बी एड,डी एड  करा म्हणून प्रोत्साहन दिले. त्या अभ्यासक्रमाची पुस्तके शाळेच्या वाचनालयासाठी खरेदी व्हायची आणि त्या शिक्षकांना वापरावयास मिळावयाची. पुस्तकांचा खर्च त्या शिक्षकांना हलका व्हायचा. अभ्यासक्रमात पण शक्यतेवढी मदत बापू करायचे. शिक्षकांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्कात असायचे. पुढे बोरिवलीस गेल्यावर देखील बापूंचा हाच शिरस्ता होता. शिक्षण घेणारा बापूंच्या कौतुकाचा, अभिमानाचा हिस्सा होऊन जात असे!”

    मीनाताई सध्या अमेरिकेत आपल्या कन्येसोबत राहत असून त्यांची कन्या सुखदा ही शालेय जीवनापासूनच अत्यंत बुद्धिमान, विशेषतः गणिताची आवड असलेली विद्यार्थिनी होती. भारतात असताना आठव्या इयत्तेतच इंडियन मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड मध्ये सुवर्णपदक मिळवून आपल्या हुशारीची चूणूक दाखविली  होती. पुढे अमेरिकेतील नावाजलेल्या ,’CalTech’विद्यापीठात पदवीचे शिक्षण करताना तिने प्रतिष्ठेचे, ‘कारनेशन मेरिट अवॉर्ड'(CARNETION MERIT AWARD) मिळवून पूर्ण शिक्षण शिष्यवृत्ती द्वारे केले, नावाजलेल्या हार्वर्ड विद्यापीठात Benjamin Peirce Fellowship पटकावली आणि स्टॅनफर्ड विद्यापीठात डॉक्टरेट मिळवली. तिच्या या गणित प्रेमाविषयी व प्राविण्याबद्दल बोलताना शुभांगीताई म्हणतात “गणिताची आवड तिच्या रक्तातच आहे. माझे वडील गणिताचे शिक्षक होते आणि त्यांच्यापासूनच, तिला मिळालेली ही जन्मजात देणगी आहे.” सुखदा सध्या अमेरिकेत खूप मोठ्या मुद्द्यावर काम करीत आहे! 

    द्वितीय पत्नी कै.सुशीला यांचे पासून बापूंना दोन अपत्त्ये, ज्येष्ठ सुहास व कनिष्ठ चिरंजीव सुनील. (यांचा उल्लेख वर आलेला आहे).

  सुनीलची जीवन कहाणी मोठी दिलचस्प. बापूंची कथा सांगताना सुनीलची कहाणीही ऐकायलाच पाहिजे.

  सुनीलना  तरुणपणीच शिक्षण अर्धवट सोडावे लागले व घरातली किंमत देखील गमावली. परंतु त्यांनी जिद्द हरवली नाही. कष्ट, अंगभूत हुशारी आणि आई-वडिलांचे आशीर्वाद या बळावर, लहान कंपनीतील एका शिपायाच्या नोकरीपासून ते कार्पोरेट वर्तुळातील एका महत्त्वाच्या अधिकारी पदापर्यंत, त्यांचा प्रवास केवळ थक्क करणारा आहे. सुनील सध्या जगातील सर्वात जास्त लोकरी वस्त्रे निर्माण करणाऱ्या “रेमंड कंपनी” मध्ये अत्यंत मोक्याच्या पदावर काम करतात. कंपनीचे सर्वेसर्वा गौतम सिंघानियांचे ते एक्झिक्युटिव्ह असिस्टंट आहेत. एवढे सांगितल्यावर त्यांची महती कळते! परिस्थितीने त्यांना जगण्याची कला आणि जगण्याचे शास्त्र शिकविले होते. त्यांचा प्रवास केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठी ही बरेच काही शिकविणारा आदर्शवत असा आहे. सुनील च्या कर्तृत्वाचे वर्णन करण्यासाठी एक विस्तृत लेख लिहिता येईल!

   आनंद अवधानी लिखित, “मराठी कार्पोरेट क्षेत्रातील बिग बॉस”, या पुस्तकांत सुनील वरील लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. बापू वरील लिखाणाच्या  निमित्ताने, सुनीलशी माझी चर्चा  होत असते. अजून जरी प्रत्यक्ष समोरासमोर भेट झाली नसली तरी त्यांची धडाडी, चतुरस्त्र बुद्धी व जिंदादिल स्वभावाची झलक मला इतक्या दुरूनही जाणवते.

     सरांचे चिरंजीव सुहास यांची कहाणी देखील जगावेगळीच.सुहास  शालेय जीवनापासूनच  अत्यंत हुशार विद्यार्थी. सुहासने,देशातील १४ राज्यातील सैनिक शाळां पैकी, त्यावेळच्या सर्वांत नावाजलेल्या  सातारा सैनिक शाळेत, संपुर्ण देशभर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परिक्षेत पहिला येऊन, राष्ट्रीय शिष्यवृती घेऊन, प्रवेश मिळवला होता. (सन १९६४) .

एक प्रतिभावान विद्यार्थी म्हणून शाळेने त्याला सन्मान दिला.अत्यंत उत्तम गुणांनी आठवी इयत्ता पास झालेल्या सुहासला नवव्या इयत्तेची परीक्षा अपघातामुळे देता आली नाही. आणि नियमानुसार शाळेने त्याला काढून टाकले. नियतीचा दुर्दैवी खेळ सुरू झाला. त्याचे शिक्षणातून लक्ष उडाले. विमनस्कसता आली. त्याला काहीच करावेसे वाटेना. मात्र बापूच्या मायेने व मार्गदर्शनाने तो सावरला गेला. पुन्हा शिक्षण सुरू करून इंजिनिअरिंग पदवीका घेतली. नोकरी केली, आणि संसार केला. मात्र बापूंच्या व सर्व कुटुंबाच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत .. हे खरे. सुहास आता निवृत्तीचे जीवन घालवित आहेत.. 

   ज्येष्ठ चिरंजीव सुधीरची कहाणीही अशीच मनाला  चटका लावून जाणारी.. नाऊमेद करणारी! सुधीरदेखील प्रथमपासूनच एक बुद्धिमान विद्यार्थी. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, इंजिनिअरिंग पदवी  ऊत्तम प्रकारे मिळवून  त्याने मोठ्या पदावर काही वर्षे सरकारी नोकरी केली. सगळे व्यवस्थित चालू असतानाच  नोकरी सोडून त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. धंद्याचे काही आडाखे चुकून व्यवसायात खूप नुकसान झाले. धंदा बंद करावा लागला. अशा स्थितीत सर्वसाधारण माणूस करील तेच सुधीर ही करू लागला- व्यसन! अशातच एका असाध्य रोगाने  पछाडले. अकालीच गेला… अर्ध्यावरती डाव मोडला एक तेजस्वी कहाणी अधुरीच राहिली!!

  बापूंसाठी, कुटुंबासाठी हे नियतीचे जबरदस्त आघात होते. निश्चितच त्याचा परिणाम बापूंच्या प्रकृतीवर, जीवनमानावर झाला. बापू ही कुठेतरी आतून कोसळले असतील! बापूंच्या कुटुंबातील या कर्तुत्ववान बुद्धिमान मुलांच्या कहाण्या ऐकल्यानंतर, शेवटी “नियतीच्या मनात जे असेल तेच होते..” ,याचा प्रत्यय येतो! आपल्या शक्तिमान पंखांनी आकाशात ऊंच भरारी घेऊ शकणाऱ्या गरुडाच्या पायाला मणामणांचे ओझे बांधून त्याची झेप  सीमित करणारा परमेश्वर यातून काय मिळावितो, कोण जाणे??

   बोरिवली विभागातील पूर्व प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षकांसह (डावीकडे) व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासमवेत (उजवीकडे) कै. स. वा. आपटेसर.

आपटे सरांच्या बोरिवली विभागातील यशाचे मर्म सांगताना त्यांचे सहकारी म्हणतात “शाळेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येकाशी त्यांचे मायेचे नाते असे. मग ते के जी मधील एक छोटे मुल असो वा पी जी मधील प्रौढ विद्यार्थी असो. प्रत्येकासाठी त्यांना काहीतरी करावयाचे असे. “आधी केले मग सांगितले”  हा तर त्यांचा धर्म होता. ” केल्याने होत आहे रे..” हे त्यांचे तत्त्व होते…”

 सर नेहमी म्हणत, “केवळ गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थी संख्या वाढविण्यापेक्षा सर्वच विद्यार्थ्यांची गुणवत्ता पातळी वाढविणे ही शिक्षक व शिक्षणाची कसोटी असली पाहिजे !”

    ‘आचार्य-धर्म’ म्हणजे काय याचे आपटे सर हे एक उदाहरण होते. त्या काळांत त्यांचा कामाचा व्याप पाहिलेले त्यांचे सहकारी म्हणतात, “आपटे सर हे एक सजीव यंत्र झाले होते आणि यंत्राप्रमाणे त्यांचे अहो रात्र कष्ट चालू होते. रात्ररात्र जागून कामे केली. जीव ओतून कामे केली. अगदी मृत्यूशयेवर देखील शेवटपर्यंत त्यांच्या मनात कामाचेच विचार होते !”

   जणू मृत्यूला सामोरे जाण्याआधी, कार्यपूर्ती केल्यावर ते मृत्यूला म्हणाले असतील,

        “ये आता खुशाल मरणा, घे हास्य स्वागताचे.

          ध्येयार्थ वाहिलेल्या निर्माल्य या तनुचे!!!”

   कर्तव्य कठोरता म्हणतात ती हीच काय ? योजलेल्या कामाची  पूर्तता करताना, देहाचे निर्माल्य झाल्यावर, ते मृत्यूच्या हाती देत त्याचेही हसून स्वागत करणे , आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याची, कुटुंबाची वाताहत झालेली पहावी लागणे, जीवनात सदैव वादळे घेऊनच जगणे, आणि आपली संस्था हेच आपले घर मानून, जन्मदात्री आई आजारी असताना.. तिचा मृत्यू झालेला माहीत असताना शाळेच्या कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून, कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत ती बातमी देखील कोणाला न सांगणे.. याला कोणती उपमा देणार?? ही निष्ठावंताची  कर्तव्य कठोरता!!

   शाळेसाठी संस्थेसाठी एवढे बहुमान मिळवूनदेखील  स्वतःच्या नावलौकिकाबाबतीत ते नामानिराळे राहिले. स्वतःचा मोठेपणा मिरविण्याकरता कधीही धडपडले नाहीत.

  ” हे मी केले” असे कधीही म्हणत नसत. सरांनी इतरांच्या कामात कधीही  ढवळाढवळ केली नाही. खुर्चीवर असताना कधीही अधिकार गाजविला नाही.  ते नेहमी म्हणत,

  ” खुर्ची असतानासुद्धा अधिकार गाजवू नये व निवृत्त झाल्यावर तर अधिकारच राहत नाही. नाव गमावण्यापेक्षा नाव कमवावे. नावलौकिक मिळविता आला नाही तरी चालेल पण कोणाचे शिव्या शाप तळतळाट तरी घेऊ नयेत. आपल्या कर्तव्याला चुकू नये!”

    असे महान आजीव सेवक ज्या संस्थेला मिळतात त्या संस्थेचा नाव लौकिक होणे स्वाभाविकच असते. आज गोखले एज्युकेशनल सोसायटीचा झालेला जगभराचा लौकिक हा अशा सेवाभावी, कर्तव्य कठोर, प्रसिद्धीपरान्मुख  सेवकांमुळे झालेला आहे हे निश्चित ! प्राचार्य आपटे सरांचे निधन झाल्यावर संस्थेचे तत्कालीन  सेक्रेटरी डाॅ.मो. स. गोसावी व तत्कालीन अध्यक्ष कै. माननीय भाऊसाहेब वर्तक यांनी आपटे सरांना वाहिलेली श्रद्धांजली हेच सांगते..

    डॉक्टर  गोसावीसर म्हणतात,

   ” प्रिन्सिपाल स. वा. आपटे हे आमच्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे एक आजीव सदस्य तर होतेच  परंतु त्यापेक्षाही ते शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते व हाडाचे शिक्षक होते. शारीरिक अस्वास्थ्य असतानादेखील त्यांनी आपले शिक्षणविषयक कार्य अत्यंत निष्ठेने पार पाडले. आमच्या बोरिवली येथील युनिटचा विस्तार हे त्यांनी केलेल्या कार्याचे दृश्य स्वरूप आहे. त्यांच्यावर सोपविलेले कोणतेही कार्य त्यांनी चिकाटी दाखवून पूर्ण केले आहे. त्यांचे हस्ताक्षर हे विद्यार्थ्यांसमोर आदर्श-स्वरूप राहावे म्हणून संस्थेने, बोरिवली युनिटमध्ये विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थिनींच्या हस्ताक्षर स्पर्धा ‘प्रिन्सिपल आपटे’ यांच्या नावाने घेण्याचे ठरविले असून या स्पर्धांमुळे त्यांची स्मृती ही कायम स्वरूपात राहील. प्रि. आपटे यांनी बोर्डीप्रमाणेच बोरिवली येथेदेखील पालक-शिक्षक व विद्यार्थी वर्गाशी अत्यंत घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले व त्यातूनच संस्थेच्या नावलौकिकात भर टाकली. कै.आचार्य भिसे यांचे त्यांच्यावर संस्कार झाले होते.

   कै. आपटे यांच्या मृत्यूमुळे आमची संस्था एका सेवाभावी व चिकाटीच्या शिक्षकाला व कार्यकर्त्याला मुकली आहे .त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी अशी इच्छा व्यक्त करून त्यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो”

(हा लेख लिहीत असताना  नुकतीच बातमी आली आहे की डॉ. सर मो. स.  गोसावी यांचे 9 जुलै 2023 रोजी दुःखद निधन झाले आहे .गोखले एज्युकेशन सोसायटी एका निष्ठावंत आणि महान नेतृत्वाला पारखी झाली आहे.)

गोखले शिक्षण संस्थेचे मुख्य सचिव सर डॉ. मो.स. गोसावी.

   तत्कालीन अध्यक्ष कै. भाऊसाहेब वर्तक कै आपटे सरांना श्रद्धांजली वाहताना म्हणतात, 

   “प्राचार्य आपटे यांना मी बोर्डीच्या शाळेपासूनच ओळखत होतो. परंतु ते बोरिवलीला आल्यानंतर त्यांचे काम अधिक जवळून पाहता आले. त्यांना येथे विस्तृत कार्यक्षेत्र मिळाले होते. बोरिवली येथील संस्थेतील वातावरण बदलण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कामकाजांत  शिस्त आणली. संस्थेच्या नावलौकिकात भर घालण्याचा सतत प्रयत्न केला. त्यांना आपल्या जबाबदाऱ्यांची पूर्ण जाणीव होती असे मला नेहमीच जाणवले. कॉलेजसाठी बांधावयास घेतलेल्या इमारतीच्या कामकाजांचे वेळी हे पूर्ण प्रत्ययास आले.

त्यांना प्रकृतीने साथ दिली नाही पण त्यांनी कामाकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्यावर संस्थेने टाकलेली जबाबदारी पार पाडण्याचाच त्यांनी सतत चिकाटीने, कसोशीने प्रयत्न केला. संस्था एका तळमळीच्या कार्यकर्त्याला मुकली असून त्यांच्यासारखा ध्येयवादी व्यक्तीची उणीव  तीव्रतेने भासते.”

  एका मोठ्या संस्थेचे सरचिटणीस ,अध्यक्ष यांनी संस्थेच्या एका आजीव सदस्याला वाहिलेली श्रद्धांजली सरांच्या कर्तृत्वाविषयी खूप काही सांगून जाते.

     मी मुंबईत असताना आपटे सरांची बदली बोरिवलीस झाल्याचे कळले होते.. त्यांना भेटण्याची  खूप इच्छा होती. ‘मुंबईतच आहोत तेव्हा कधीही सहज भेटू शकतो’,या भ्रमातच राहिलो. 1980-85 चा तो काळ माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने खूपच व्यस्त होता. देशात परदेशात अनेक दौरे  चालू होते. सरांना भेटणे राहून गेले.    26 जानेवारी 1985 चा दिवसही माझ्या लक्षात आहे. कारण त्या दिवशी मी मुंबईत नव्हतो , सरांचे अंत्यदर्शनही घेऊ शकलो नाही. ही खंत आजवर आहे. मात्र सरांची आठवण  कायम राहील. आणि आपटे सर आठवले म्हणजे आठवतील  त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांसाठी घेतलेले अविरत कष्ट ,आठवेल ते त्यांचे सौम्य शांत बोलणे,  हसण्यातील निरागसता, अंतकरणाच्या गाभाऱ्यातून आलेले शब्द , वागण्यातील ॠजुता, त्यांची  प्रसिध्दीपरान्मुखता,  गुणग्राहकता, साधेपणा ,निरपेक्षवृत्ती शेवटच्या विद्यार्थ्यालाही ज्ञान देण्याची तळमळ .जणू काही एक विद्यार्थी नीट शिकला नाही तर आपल्या शिकिवण्यातच काही न्यून राहिले,  या भावनेने ते शिकवित राहिले…आपटे सर म्हणजे निष्ठा  आणि समर्पण या दोन गुणांचे मूर्तीमंत प्रतीक!! आमचे आपले सर म्हणजे,

    “संपन्न छात्र व्हावा, सामर्थ्ययुक्त व्हावा,हे एक ध्येय माझे, कर्तव्य हेच जीवा!”

 या तळमळीने झपाटलेला एक महान गुरू!! 

आपटे सरांच्या पावनस्मृतीला त्रिवार वंदन!!! 

 गुरुरादिरनादिश्च गुरुः,परमदैवतम ।।

 गुरोः परतरम, नास्ति,

 तस्मै श्री गुरवे नमः।।

गुरुतत्त्व हे अनादी अनंत आहे. गुरु हेच श्रेष्ठ दैवत आहे. गुरूंहून श्रेष्ठ दुसरे काही नाही कै. स. वा. आपटे सरांसह बोर्डी शाळेतील त्या आमच्या सर्व गुरूंना माझा नमस्कार, त्रिवारवंदन !!

  दिगंबर वा राऊत.