एक ऊमदा समाजसेवक, कै. सतीश नाना वर्तक!

         कै.सतीश लक्ष्मण(नाना) वर्तक, वसई
          (29 सप्टेंबर 1955 – 24 नव्हेंबर 2010)

  योगशास्त्राच्या नियमानुसार योग साधना केल्यावर योग्याच्या शरीरात सुक्तावस्थेत असलेली कुंडलिनी जागृत होते. तिचा प्रवास मुलाधार चक्रापासून निरनिराळ्या चक्राद्वारे फिरत सर्वात वरच्या चक्रापर्यंत पोहोचतो. या बदलामुळे मनो-देहावर होणारे विविध परिणाम ज्ञानोबारायांनी अत्यंत अद्भुत व खिळवून टाकणाऱ्या शब्दात केले आहेत.

  त्यातील काही ओळी अशा आहेत ..

 “  …..हो का जे शारदेची ये बोले, चंद्रबिंब पाल्हेले 

          का तेजची मूर्त बैसले, आसनावरी…”

   “या अशा पुरुषाचे रूप म्हणजे जणू रत्नाचे बीज रुजून त्याला अंकुर फुटला आहे अशी त्याच्या कांतीची शोभा दिसते, किंवा सायंकाळच्या आकाशाचा लाल रक्तीमा काढून हे शरीर रंगवले की काय असा भास होतो. हे शरीर म्हणजे मूर्तीमंत शांतीच आहे असे वाटू लागते. तो देह म्हणजे जणू सोनचाफ्याची मोठी कळी, अमृताचा पुतळा वा जणू कोमलतेचा बहर आलेला मळाच होऊन जातो. शरद ऋतुच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब, जणू प्रत्यक्ष तेज मूर्त होऊन सिंहासनावर बसले आहे असे वाटू लागते…”

     सतीश नानांना मी ज्यावेळी पहिल्यांदा भेटलो त्यावेळी त्यांच्या एकूणच सर्वांग सुंदर व्यक्तिमत्वाचे दर्शन झाल्यावर माझ्या मनात अशाच काही भावनांचे कल्लोळ निर्माण झाले. मला ते शब्दरूपात मांडणे शक्य नव्हते म्हणून घेतली ज्ञानोबांची मदत!!

        देखणे रूप, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि याच्याच जोडीला भावस्पर्शी बोलणे असा दुर्मिळ त्रिवेणी संगम असलेले, सामाजिक, राजकीय व कलाक्रिडा क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून सतीश नाना वर्तक एक देवदुर्लभ असे गृहस्थ होते. आमच्या सो. क्ष. समाजातच नव्हे तर ज्या ज्या विविध क्षेत्रात त्यांनी काम केले त्या सर्वांनाच ते हवेहवेसे वाटत होते.   

            सन 1993 पासून सोमवंशीय क्षत्रिय समाज खुंतोडी या मंडळाचे सक्रिय कार्यकारी मंडळ सदस्य, सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळात कार्यकारिणी सदस्य खजिनदार,  वसई समाज मंदिर ट्रस्टचे सन 2004 ते 2009 पर्यंत विश्वस्त व त्यानंतर मॅनेजिंग ट्रस्टी, वसई  विकास सहकारी बँकेचे 1996 ते 1999 पर्यंत चेअरमन व त्यानंतर संचालक, सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नति संघाच्या  व्यवस्थापक मंडळाचे सदस्य,  संघ फंड ट्रस्टचे 2006 पासून अखेरपर्यंत विश्वस्त,   वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे दोन वर्षे अध्यक्ष, वसई तालुका पीपल्स मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराचे कार्यकारी मंडळ सदस्य, वसई तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून सभापती, तालुक्यांतील सामाजिक, शैक्षणिक, सहकार,कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय ,अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करून आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने अगदी अल्प आयुष्यात भरीव कामगिरी करून अकाली गेलेल्या कै. सतीश नाना यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आजचा हा लेख प्रपंच!

सेतू को ऑ क्रेडिट सोसायटीच्या बोरीवलीतील नवीन कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी हजर असलेले कै.सतीश नाना वर्तक. बाजूला श्री सदानंद म्हात्रे व श्री श्रीकांत राऊत

     आमच्या सो क्ष संघ फंड ट्रस्टचे ते सन 2006 ते 2010 ,त्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत विश्वस्त होते. माझ्या सदभाग्याने याच कालखंडात विश्वस्त मंडळात आम्ही दोघे सहकारी होतो आणि तेथेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप माझ्यावर पडली. मी त्यांना अगदी जवळून पाहिले.त्याआधी मी आमच्या सेतू सहकारी क्रेडिट सोसायटीचा अध्यक्ष असताना ,नव्वदीच्या दशकात नानांना आम्ही आमच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मुख्य पाहुणे म्हणून बोलाविले होते.  त्या प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणातील काही वाक्ये आजही माझ्या स्मृतीत आहेत. नाना त्या तरूण वयांत वसई विकास सह. बँकेचे अध्यक्ष होते. आमच्या तरुण कार्यकर्त्यांना केलेल्या संबोधनातील त्यांनी प्रकट केलेले काही काही विचार माझ्या आजही स्मरणात आहेत ते म्हणाले होते ,

    “ समाजातील दुःखी लोकांची आसवे पुसली पाहिजेत असे सभेत सांगणे म्हणजे ती नुसती सहानुभूती. त्यासाठी प्रत्यक्षात काहीतरी करून दाखविणे ही झाली संवेदना. संवेदना जागृत होण्यासाठी प्रेम भावना आणि प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता असते. सेतू को क्रेडिट सोसायटी स्थापन करून आपण समाजाप्रती आपली  संवेदना जागृत केलेली आहे.  म्हणून आपणास शाबासकी..” 

   त्यांनी सेतूच्या सुरुवातीच्या कामाची प्रशंसा करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले होते.

   वसई विकास बँकेच्या स्थापनेत मोठा वाटा असलेले नाना अशा आर्थिक संस्थांची समाजातील उद्योजक व विद्यार्थी वर्गाला असणारी जरुरी ओळखून होते . त्यासाठीच मनापासून त्यांनी आमच्या सेतू को-ऑपरेटिव्ह सोसायटीची भलामण करून त्यानंतरही, आम्हाला प्रत्यक्ष आमच्या कार्यालयात येऊन अथवा वसईत बोलावून घेऊन मार्गदर्शन केलेले आहे.

     वसईतील एका सुसंस्कृत आणि सधन घराण्यांत जन्मलेले नाना कॉमर्सचे पदवीधर झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरीचा विचार करण्याची गरज नव्हती. कारण वडिलोपार्जित उद्योगात त्यांना सहभागी व्हावयाचे होते.  त्यांचा मूळ पिंडच समाजसेवेचा असल्याने आपल्या आजोबांचा आणि कै. गणपतराव वर्तक या दोघांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता. खुंतोडी गावातील ग्रामस्थ मंडळापासूनच त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली.

   19 85 सालच्या सुमारास वसई विकास सहकारी बँकेची स्थापना झाली होती आणि बँकेच्या पहिल्या निवडणुकीतच नानांनी आपल्या विभागातून उमेदवारी अर्ज भरला. मात्र त्याकाळी काही अनुभवी कार्यकर्त्यांनीही अर्ज त्यांच्या शाखेतून भरले होते. आपण ज्या संस्थेची निवडणूक लढवत आहोत तेथे आपले काहीतरी योगदान असणे आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली आणि म्हणूनच आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांसाठी नानांनी आपला अर्ज मागे घेतला. मात्र वसई बँकेच्या पुढील निवडणुकी आधी त्यांनी कामात लक्ष घातले, बँकेतील ठेवी वाढविण्यासाठी आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सूचना करीत राहिले आणि 19 96 च्या बँकेच्या निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडून आले. एवढेच नव्हे तर त्यांची अध्यक्षपदीही बिनविरोध निवड झाली. बँकेचे माजी पदाधिकारी, संचालक व आपले सहकारी या सर्वांना बरोबर घेऊन बँकेच्या प्रगतीला नानांनी गती दिली. बँकेचे अध्यक्षपद सोडल्यानंतरही नानांनी कोणतेही महत्त्वाचे पद न घेता सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका सातत्याने बजावली.आज वसई बँकेच्या प्रगतीमध्ये नानांचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे हे निश्चित!

  माजी केंद्रीय मंत्री कै. गोपीनाथ मुंडे (वर).
  व श्री.शरदचंद्र पवार(डावीकडे), यांचे कडून सत्कार.
  वसई विकास बँकेचे  प्रथम अध्यक्ष श्री. हेमंत चौधरी बरोबर चर्चा.

     सतीश नानांचे सामाजिक कार्यातील सहकारी व बँकेचे माजी अध्यक्ष श्री. जगदीश आबाजी राऊत यांनी नानांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले होते …

   “ समाजकारणात नानांनी भरीव काम केले. मात्र राजकारण हा देखील नानांचा अतिशय आवडीचा विषय होता. 1985 पासून वसई काँग्रेस कमिटीच्या सभेस ते हजर राहू लागले.आपली मते मोजक्या शब्दांत व्यक्त करताना ते पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेत असत. पक्षश्रेष्ठींबरोबर संपूर्ण तालुक्यांतील गाव खेडी आणि पाड्याबरोबरच येथील कार्यकर्त्यांशी नानांचे एक अतूट नाते त्यांच्या बेरजेच्या राजकारणामुळे जडले गेले. नाना वसई काँग्रेसचे खजीनदार व सचिव झाले. पुढे वसई विकास मंडळ व बहुजन विकास आघाडी या पक्षाचे ते एक श्रेष्ठी झाले. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या एका विश्वासू सहका-यात त्यांची गणना होऊ लागली.  कुठलीही निवडणूक न लढविता व कुठलेही मानाचे पद न घेता पक्षाचे काम निःस्पृह व प्रामाणिक निष्ठेने कसे करता येते, याचे सुंदर उदाहरण म्हणजे नाना! राजकारणातील  कामे करीत असतानाच समाजकारणात सुद्धा ज्या सेवाभावी संस्थांना त्यांच्या मार्गदर्शनाची व सहकार्याची गरज भासत असे त्या त्यावेळी नाना हातातील कामे दूर सारून त्या संस्थेत निरपेक्ष वृत्तीने जात असत.

     कामाचा एवढा व्याप असूनही नानांनी आपली संगीत नाट्य कलेची  आवडही सतत जपली. वसईत सुगम संगीत, नाट्यसंगीत, नाटकांचे प्रयोग अमरकला मंडळ ,वसई कला भारती व इतर संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जातात. संगीताचा व कलेचा छंद असलेले नाना या प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित असत. वसई कला अकादमीच्या स्थापनेत व त्याच्या आठ वर्षाच्या यशस्वी वाटचालीत नानांचे मोलाचे मार्गदर्शनात व सहभाग होता..त्यांचे विस्मरण रसिकांना कधीही होणार नाही!”

     श्री जगदीश राऊत यांच्या सारख्या कै. नानांच्या बरोबर काम केलेल्या व एक सन्मित्र म्हणून त्यांचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवन अगदी जवळून पाहिलेल्या मित्राची ही श्रद्धांजली खूपच बोलकी आहे.

    पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागात ‘बहुजन विकास आघाडीची’ दमदार यशस्वी वाटचाल होत आहे. लोकनेते श्री. हितेंद्र ठाकूर यांच्या आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यापैकी सतीश वर्तक हे एक होते. ग्रामपंचायतपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत निवडणुकीतील जबाबदाऱ्या नाना उत्तम रीतीने पार पाडीत. राजकारणात  देखील  त्यांना रस होता.  बहुजन विकास आघाडी पक्षामुळे  त्यांना योग्य ती संंधी मिळाली.  सर्व निवडणुकांसाठी पक्ष यंत्रणा राबविणे, प्रचार यंत्रणा राबविणे, निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरताना ते बाद होणार नाहीत अशी प्रशासकीय कामे करणे यात नानांचा हातखंडा होता. पक्षीय राजकारणात काम करताना नानांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची काम करण्याची पद्धत, सर्व कार्यकर्त्यांशी व आपल्या नेतृत्वाशी समन्वय साधून प्रत्येक वेळी आपली जबाबदारी उत्तम रितीने पार पाडणे हे नानांचे वैशिष्ट्य होते.

      वसईतील तरखड ,सांडोर, वसई होळी, बंगली, देव तलाव, गिरीज परिसरातील राजकारण, समाजकारण ,सहकारी संस्था, ग्रामपंचायत, वसई नगरपरिषद, वसई विकास सहकारी बँक आणि वसई तालुका कला क्रीडा महोत्सव हे नानांचे कार्यक्षेत्र होते. समाजकारण,राजकारणात असूनही  सर्व क्षेत्रांशी  निगडित राहून आपल्या कार्यातून ,वर्तनातून मानवी मूल्यांची जपणूक करण्याची नानांची वृत्ती होती.  सतत हसतमुख आणि सर्वांशी जवळीक साधणारा मैत्री करणारा असा त्यांचा स्वभाव होता. त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होती. त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधकांच्या मनात ही नानाविषयी नेहमी आदर असे. पक्षीय निवडणूका असल्या तरी नानांची निवडणूक प्रचारातील भाषण-शैली  विलक्षण होती. विरोधी पक्षावर किंवा विरोधी कार्यकर्त्यांवर टीकेची झोड न उठविता घणाघाती हल्ला करणे वा  कमरेखाली वार न करणे हे त्यांच्या वक्तृत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे आपल्या कृतीतून सहकाऱ्यांना नानांचे मार्गदर्शन होत असे .आपल्या दैनंदिन जीवनात देखील नानांनी आपला उद्योग व्यवसाय, समाजकारण  आणि कौटुंबिक जीवन याचे आगळे वेगळे संतुलन ठेवले होते!!

     आपल्या पक्षाच्या निवडणुकीसाठी ठाणे व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जव्हार ,वाडा, विक्रमगड, मोखाडा या भागात प्रत्यक्ष जाऊन नानांनी निवडणुकीचे काम केले. नानांनी आपल्या कोणत्याही कामात कधीही कंटाळा केला नाही. काम कोणतेही असो व्यवसाय,समाजकार्य, राजकारणात स्थीर वृत्ती राखत त्यांनी आपले निष्कलंक चारित्र्य जपले .त्यामुळेच ते एका जेष्ठ कार्यकर्त्याची उंची गाठू शकले.

    सुरुवातीच्या काळात नानांनी काँग्रेस पक्षात चिटणीस म्हणून ही काम केले होते . त्यानंतर वीस वर्षे त्यांनी आमदार श्री. हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर,स्नेहाचे संबंध जुळल्याने त्यांच्या पक्षाचे काम केले . राजकीय व सामाजिक क्षेत्रातील या कामामुळे नाना तालुक्याच्या गावागावात खेड्यापर्यंत पोहोचले होते त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते .नानांचा लोकसंग्रह अफाट होता. आपल्या मित्रांच्या व कार्यकर्त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी ते हमखास त्यांचे घरी आपली हजेरी लावीत. हा वारसा नानांना त्यांचे आजोबा कै.गणपतराव वर्तक यांचे कडून मिळाला होता. आपल्या कार्यकर्त्यांना शक्य होईल ती प्रत्येक प्रकारची  मदतही त्यांनी केलेली आहे.

       सामाजिक क्षेत्रातही  नानांनी भरपूर काम केले.  वसई विकास सहकारी बँक, वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी देवतलाव, वसई तालुका मध्यवर्ती ग्राहक भांडार वसई ,कृषी उत्पन्न बाजार समिती वसई ,अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, ,नवभारत अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, अशा अनेक संस्थांशी  नानांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.या विविध संस्थांवर नाना कुठे अध्यक्ष तर कुठे संचालक म्हणून कार्यरत होते. या सर्व संस्था आजही नानांचे योगदान आपल्या विकास कार्यात किती महत्त्वाचे होते हे आदराने सांगतात .

  गेली वीस वर्षे नाना  वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात एक कुशल संघटक म्हणून काम करीत होते .या क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या  जबाबदाऱ्या ते पार पाडीत होते. विशेषतः निधी संकलन व कला विभागाच्या कार्यक्रमाचे नियोजन करताना त्यांना अनेक कार्यकर्त्यांशी समन्वय करावा लागे. अनेक क्रीडा प्रकारांचे, कला प्रकारांचे, दिलेल्या मुदतीत संयोजन करून उद्घाटन व बक्षीस समारंभ सोहळे कोणाचेही मन न दुखविता करावे लागे. सर्वांना बरोबर घेऊन हसतमुखाने सौजन्याने ते वागत .नाना दिवसभर धावपळ करूनही थकलेले नसत. आपल्या कष्टांची त्यांनी कधीच  तमा बाळगली नाही. या सर्व क्रिडा महोत्सवाची पूर्वतयारी म्हणून त्यांना दोन महिने आधीच बैठका घेऊन कार्यकर्त्यामार्फत नियोजनाच्या कामास लागावे लागे. याबाबतीत ते अत्यंत दक्ष असतं

      तीच गोष्ट नृत्य, चित्रकला,नाट्यकला, गायन स्पर्धा यांचे आयोजनाच्या बाबतीत देखील असे. त्याही आपल्या आवडत्या कला असल्याने नाना आपल्या इतर सर्व चळवळीबरोबर या गोष्टी देखील हसतमुखाने करीत. या आवडीतूनच नानांनी वसई कला अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्या अकादमीच्या वाटचालीत गेल्या काही वर्षात नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून त्यांच्या आयुष्यात एक वेगळे क्षेत्र मिळाले आहे.

      नानांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप सर्वावर पडत असे. राजकीय सामाजिक आर्थिक क्षेत्रातील सर्वच निवडणुका नानांच्या मदतीशिवाय होऊ शकत नसत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नानांची लोकप्रियता आणि जनमानसात त्यांचेविषयी असलेला आदर पहावयास मिळे. नानांचा संपर्क घरातील ‘किचन’ पर्यंत असे त्यामुळेच सर्व कार्यकर्ते नानांबरोबर निःसंकोच पणे काम करू शकत  असत .  त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांनाही खूप आदर व आधार वाटे.

   नानांच्या सौभाग्यवती श्रीमती शुभांगी वर्तक यांना, नानांबद्दल काही आठवणी लिहण्याची मी विनंती केली. एवढ्या विविध क्षेत्रात मुशाफिरी करणा-या  नानांचा कुटुंबातील सहभाग कसा होता, याविषयी त्यांनी दिलेल्या आठवणी खूपच रोचक आणि नानांच्या एका वेगळ्या पैलू वर प्रकाश टाकतात.  शुभांगी म्हणतात,

     “ नानांना जाऊन आज तेरा वर्षे झाली .नानांबद्दल लिहिताना अनेक आठवणी जाग्या झाल्या. नानांचा जन्म 29 सप्टेंबर 1955 साली तर्खंडच्या वर्तक कुटुंबात झाला. खानदानी घराण्यातील भारतदस्त व्यक्तिमत्व असलेले वर्तक कुटुंबाचे आधारस्तंभ व त्यांचे चुलत आजोबा, कै. गणपतराव वर्तक हे सोमवंशीय क्षत्रिय समाजातील मोठे पुढारी होते. अशा कुटुंबात जन्मलेल्या नानांनी गणपतराव वर्तक यांचे बरेच गुण आत्मसात केले होते. त्याचा त्यांना खूप अभिमानही होता. त्यांच्या पाकिटात आजोबांचा फोटो नेहमीच असे. नानांचे आपल्या कुटुंबावरही खूप प्रेम होते. सर्वांचाच ते आदर करीत असत. त्यांना कधीही राग येत नसे. कोणाचा मत्सरही केला नाही.

कै.नानांचे पिताजी कै.लक्ष्मणराव वर्तक व मातोश्री श्रीमती सुधा वर्तक.
नानांचे आदर्श- कै.गणपतराव वर्तक( डावीकडे )व आजी आजोबा (उजवीकडे)

      नानांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होई. तो रात्री अकरा वाजता संपे. समाजकार्यात ते इतके मग्न असायचे की त्यांना आपल्या घराची, दोन मुलींचीही आठवण करून द्यावी लागे. मुलींना ते कधी कधी दिवसभर भेटत नसत. कधीही कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नसत, मग ते घरातील असो वा सामाजिक !

एका निवांत क्षणी सतीश नाना आपल्या दोन लेकीं बरोबर!

    आमच्या तर्खड गावात इंग्रजी माध्यमाची शाळा बांधण्यात येणार होती. परंतु गावकऱ्यांनी त्या शाळेला कडाडून विरोध केला .त्या शाळेच्या मुख्य सिस्टर नानांना भेटण्यास आल्या व सत्य परिस्थितीची जाणीव करून मध्यस्थी करण्याची विनंती केली. नानांनी गावकऱ्यांची समजूत घातली. शाळा उभारणीस स्वतः प्रोत्साहन दिले. आज आमच्या गावात ही शाळा दिमाखाने उभी आहे. मात्र त्यावेळी गावकऱ्यांनी नानांच्या शब्दाला मान दिला. नानांची समजूत घालण्याची पद्धतच वेगळी होती. कोणीही त्यांना ‘नाही’ म्हणूच शकत नसे. नानांच्या शब्दाला गावात, समाजात व आमच्या कुटुंबात खूप मान होता! 

     मराठी भाषेचे व्याकरणकार कै. रावबहादुर दादोबा पांडुरंग तरखडकर हे आमच्याच तरखड गावाचे. नानांना हे समजल्याबरोबर त्यांचे स्मारक आपल्या गावात व्हायलाच हवे हे त्यांच्या मनात आले. त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले. ते स्मारक गावात उभे केले. त्यामुळे आज आम्ही दिमाखाने म्हणू शकतो, “आम्हीही तर्खडकर आहोत!”

   वसई क्रीडा महोत्सव हा त्यांच्यासाठी एक सोहळाच असायचा. त्याची पूर्वतयारी करून तो पार पडेपर्यंत  त्यांना चैन पडत नसे. त्यांचा उत्साह पाहून सर्व कार्यकर्ते त्याच उत्साहाने काम करू लागत. घरातून निघाले की रस्त्याला जाणारे सर्वच त्यांना हात करीत असत. आपण विचारले तर, ’तो माझा मित्र’ म्हणून सांगत. त्यांना मित्रही खूप होते. त्यांच्यासाठी ते नेहमीच वेळ देत व गरज भासल्यास मदत करीत. त्यांना मित्रांबरोबर फिरण्याचीही खूप आवड होती.

    नाना आठवणीचे पक्के होते. त्यांना कोणतीही गोष्ट कधीही विचारा ती त्यांना ठाऊक असे .त्यांचे जनरल नॉलेज खूप चांगले होते. लहानापासून ते थोरापर्यंत सगळ्यांमध्ये मिसळत असत. कोणावरही कसलाही प्रसंग आला तर ते धावून गेले नाहीत असे कधीही घडले नाही .नाना देवभोळे नव्हते. पण देवाचे करण्यास त्यांनी कधीही विरोध केला नाही. मग गणपती, नवरात्र असो किंवा कोणत्याही देव-देवीची जत्रा असो, त्यात ते उत्साहाने सहभागी होत असत. नानांच्या लोकप्रियतेचे आणखी एक कारण म्हणजे नानांजवळ गरीब-श्रीमंत, जातपात असा भेदभाव नसे. कोणीही त्यांना जेवणास, नाश्त्यासाठी बोलाविले तर ते आनंदाने जात असत. प्रेमाने जे देतील ते खात असत. श्रीमंतीचा  देखावा केलेला त्यांना आवडत नसे. आम्हा तिघींना (मी व माझ्या दोन मुली) त्यांनी साधी राहणी शिकविली. आज त्याचा आम्हाला खूप फायदा होतो आहे.

           नाना-सौ.शुभांगी – लेकी,  निवांत क्षणी!

   नाना बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे. मात्र लिहिताना त्यांच्या आठवणीमुळे डोळे व हात काम करीत नाहीत सॉरी!…”

    बरोबर आहे शुभांगीताई, नाना तर तुमचे जन्माचे साथीदार होते. अकाली गेले. आमच्या सारख्यांना थोडा सहवास देऊन गेले असले तरीही त्यांची आठवण आली की डोळे पाणावतात!!

    आमच्या  सोमवंशी क्षत्रिय समाजाचे आत्ताच्या पालघर व ठाणे जिल्ह्यात तसेच मुंबईतही खूप मोठे कार्य आहे.  नाना आमच्या या समाजाचे देखील  सक्रिय आणि महत्त्वाचा कार्यकर्ता होते. हा समाज समाजकारणा बरोबरच राजकारणातही अग्रेसर राहिला आहे. तसेच कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण यातही त्यांचे मोठे कार्य आहे. सोमवंशी क्षत्रिय समाजोंन्नती संघाचे वसई येथील महामंडळ  आणि सहकारी बँक या सर्वच ठिकाणी नाना एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करीत होते.

    नाना आमच्या सो क्ष संघ फंड ट्रस्टचे विश्वस्त होते. त्याचवेळी, 2005-2010 मी ट्रस्टचा कार्यकारी विश्वस्त असल्याने नानांबरोबर अगदी जवळून काम करता आले. माझ्या आयुष्यातील काही इष्ट योगायोगांपैकी नानांबरोबर या ट्रस्ट मध्ये सतत सहा वर्षे केलेले काम हा माझ्यासाठी मोठा शुभ योग होता.

                क्रिकेट क्रीडांगणावर नाना

            नानांचा दिलदार स्वभाव, मन मोकळे वागणे, कोणालाही मदतीसाठी  सदैव तत्पर असणे, अशा अष्टपैलू कर्तृत्वाच्या अनेक कथा मी ऐकल्या होत्या. त्यांच्या विश्वस्त मंडळात येण्याने आमचाही हुरूप वाढला होता. नानांनी त्यांच्या अपुऱ्या कार्यकालांत आमच्या कडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या.

  मला आठवते, आमच्या पहिल्याच मासीक सभेच्या दिवशी, नानांनी विश्वस्त कार्यालयातील आमचे सर्व रेकॉर्ड कपाटातून काढून त्याची अगदी विगतवार मांडणी केली होती. एका स्वतंत्र कप्प्यात अगदी सनावारीप्रमाणे उपलब्ध असलेले कागद नीट रचून ठेवले होते. सर्व फाईलींची एका कागदावर यादीही केली, जेणेकरून तो कागद  पाहिला असता कुठल्या वर्षाची फाईल आपणास कुठे सापडेल हे त्वरित कळावे! विश्वस्तांच्या मासिक सभेसाठी असलेले हजेरीचे रजिस्टर नव्याने मागवून त्यातील माहिती परिपूर्ण असण्यासाठी  ते स्वहस्ते तयार केले. प्रत्येक सभेच्या वेळी ते सभेतील चर्चेचे मुद्दे स्वतः नोंद करून ठेवीत व इतिवृत्त फायनल करताना  त्याप्रमाणे सुधारणा करीत .

    सभेत होणाऱ्या चर्चेत अगदी आवश्यक तेवढा त्यांचा सहभाग असे. ज्यावेळी ते बोलत तेव्हा अतिशय मुद्देसूद व अभ्यासपूर्ण असे त्यांचे विवेचन असे. तेव्हा त्यांचा अनेक क्षेत्रांतील अनुभव, ज्ञान व समाज बांधवाविषयी असलेली कणव यांची जाणीव होई.

     आमच्या त्या विश्वस्त मंडळाचे कालखंडात हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना ना परतफेडीच्या तत्त्वावर आर्थिक मदत करण्याची योजना पहिल्यांदाच तयार केली गेली. अत्यंत उपयुक्त ठरलेली व सध्या चालू असलेली ‘विद्यार्थी दत्तक योजना” ही तीच होय. आमचे तत्कालीन मुख्य विश्वस्त प्रमोदभाई चुरी व कार्यकारी विश्वस्त म्हणून मी अशा आम्ही दोघांनी आमच्या समाजाच्या प्रत्येक शाखेला, बोरीगाव (डहाणू तालुका), पालघर तालुका, वसई तालुका, ते मुंबईतील सर्व शाखांतील प्रत्येक आर्थिक मदत प्राप्त विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन, पालकासहित विद्यार्थ्यांची भेट घेऊन, त्यातून झालेल्या चर्चेतून मिळालेल्या माहितीनुसार ही योजना तयार केली गेली. त्यामुळे अगदी पहिल्यापासूनच योजना अतिशय पारदर्शक व काटेकोरपणे तयार झाली.

   या विद्यार्थी दत्तक योजनेचे मूलभूत आराखडा आमचे मुख्य विश्वस्त कै. प्रमोद चुरी यांनी तयार करून विश्वस्त अध्यक्ष व कार्यकारी मंडळ यांच्याशी चर्चा करून तिला अंतिम स्वरूप दिले. मात्र आर्थिक नियोजनासाठी नानांनी आपल्या समाजाचे मागील ताळेबंद अभ्यासून जास्तीत जास्त किती आर्थिक मदत विद्यार्थ्यांना बिना परतफेडीच्या मार्गे देता येईल याचा अभ्यास केला. तसेच आवश्यक असलेला अधिक आर्थिक निधी कशा रितीने उभारता येईल यासाठी उपयुक्त सूचना केल्या. एवढेच नव्हे तर ज्या वसई विकास सहकारी बँकेचे ते संचालक होते त्यातूनही आम्हाला  निधी उपलब्ध करून दिला होता. आज वाईट एकाच गोष्टीचे वाटते की तो विश्वस्त पदाचा कालखंड पूर्ण होण्याआधीच (2010) दुर्दैवाने नानां अकाली गेले! 

      प्रत्येक शैक्षणिक वर्षाचे सुरुवातीस, पूज्य तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहांत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी साधारणतः मे महिन्यात वसतिगृह प्रवेशासाठी  आलेल्या प्रवेश अर्जांची छाननी करून आम्ही विश्वस्त चर्चा करीत असू. आलेल्या अर्जांतून  विद्यार्थ्यांची निवड झाल्यावर, त्यांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावण्यात येई. त्यावेळी विद्यार्थ्यांचे पालक देखील हजर राहत. सुरुवातीच्या प्रारंभिक संबोधनांत ,विद्यार्थी  व पालकांना निवडीसाठी वापरलेल्या निष्कर्षांबाबत माहिती दिली जाई. त्यावर प्रश्नोत्तरे होत व सर्वांचे समाधान केले जाई. त्यानंतर प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे मुलाखत घेऊन त्याला वसतिगृहाचे नियम परंपरा आदीची माहिती देऊन त्यांचेकडून पहिल्या सहामाहीची फी व नवीन विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम जमा केली जाई. जुन्या  विद्यार्थ्यांच्या बाबतीत  वसतिगृहाच्या रेक्टरकडून आलेला वर्तणूकीचा  अहवाल त्यांना सांगण्यात येई. त्या अनुसार योग्य त्या सूचना दिल्या जात. हा सर्व कार्यक्रम साधारणतः अर्धा दिवस चाले. मुलांना पालकांना भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता होत असे.

   सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे नाना विश्वस्त असले तरी त्यांनी पूर्णवेळ हजर राहणे अत्यावश्यक नसताना सर्व प्रक्रियेत मोठ्या  आनंदाने सहभागी होत. आपला बहुमूल्य  वेळ देऊन  सर्व प्रकारचे सहकार्य करीत. प्रत्यक्ष मुलाखतीचे दिवशीही दिवसभर ते सर्वांबरोबर असंत. कोणाही होतकरू गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेशापासून वंचित होऊ नये म्हणून त्यांची धडपड असे. 

  त्यासाठी प्रसंगी नियमांना थोडी बगल देऊनही अशा विद्यार्थ्याला  प्रवेश देण्यासंबंधी शिफारस करीत. असे करताना रीतसर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यावरही अन्याय होणार नाही हेही पहात. त्या वेळी वसतिगृहात एकूण प्रवेशांची क्षमता साधारणता 70 विद्यार्थ्यांची असे व प्रवेशासाठी आलेल्या अर्जांची संख्या 100 पर्यंत होई. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शीपणा ठेवून  तसेच कोणाही होतकरू मुलाला प्रवेशापासून वंचित न ठेवता हे सर्व काम करणे मोठी कठीण गोष्ट होती. पण आम्ही सर्व विश्वस्त अध्यक्ष व कार्यकारी मंडळ याबाबतीत अत्यंत समजूतीने व्यवहारी व योग्य तेच निर्णय घेत असू त्यामुळे एखाद्या खोलीत मुलांची संख्या क्षमतेपेक्षा थोडी वाढे.  मात्र मुलांचा अभ्यासक्रम त्यांचे परस्परांशी नातेसंबंध याचा विचार करून असा निर्णय होई. त्यामुळे समाजांतून कोणतीच तक्रार या प्रवेशांबाबत आली नाही हे आम्ही आज अभिमानाने सांगू शकतो.

  तर्खड, वसई येथील वर्तक कुटुंबीय.. नाना शिवाय!!

   खालील प्रत्यक्ष घडलेल्या एका प्रसंगावरून ,नाना प्रत्येक वर्षी प्रवेश प्रक्रियेत मनापासून सहभाग का देत हे कळेल…

     एका वर्षी  दोन सख्या भावांना वस्तीगृहात प्रवेश हवा होता. विद्यार्थी वसईचे होते. त्यांचा तांत्रिक अभ्यासक्रम पदविका, पदवी असा नव्हता. आय टी आय या कोर्ससाठी त्यांना प्रवेश हवा होता. त्यावर्षी अर्जांची संख्या जास्त असल्याने त्यांना प्रवेश नाकारला असता तरी कोणी दोष दिला नसता. नाना त्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना ओळखत होते. त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीची त्यांना जाणीव होती. त्यांच्या शिफारशी मुळे आम्ही दोघांनाही प्रवेश दिला. मात्र सहामाही संपत आली तरी दोघांनीही आपल्या प्रवेश फीची पूर्तता केली नव्हती. एका मासिक सभेत आम्ही नानांना याची कल्पना दिली. अपवादात्मक बाब म्हणून त्यांची फी आम्ही माफ करू शकत होतो. मात्र नानांनी तात्काळ दोघांचीही सबंध वर्षाची फी तेथेच भरून टाकली. काही दिवसानंतर दोघेही भाऊ आपल्या फीचे पैसे घेऊन कार्यालयात आले. त्यांना व्यवस्थापनाने ही गोष्ट सांगून आता वर्षभराची फी भरण्याची जरुरी नाही हे सांगितले.. अर्थातच त्या दोघांनीही नानांचे पाय धरून त्यांना कृतज्ञतेने अभिवादन केले .. मात्र त्यादिवशी दोघांच्याही चेहऱ्यावर कृतज्ञतेने उमटलेले समाधानाचे हसू  माझ्या नजरेसमोरून कधीच जाणार नाही.. नाना त्या विषयावर कधीच जास्त बोलत नसत.

 नानांच्या, “कळवळ्याची ही अशी जाती, लाभावीण करी प्रीती!”

        सतीश नाना जरी आमच्या विश्वस्त मंडळात विश्वस्त होते तरी त्यांची इतरही सामाजिक कामे  त्या वेळी चालू असत आणि वसईत अथवा वसई बाहेरही कोणता चांगला सांस्कृतिक अथवा वैचारिक कार्यक्रम असल्यास आम्हाला आवर्जून त्याचे आमंत्रण देत. मोठ्या सन्मानाने आमची ओळख आयोजकांना करून देत. असा हा मोठ्या मनाचा दिलदार  माणूस होता.

इतर क्षेत्रांतील त्यांच्या सर्वच सहका-याना अशी मदत त्यांच्याकडून होत असे. त्यांच्या अनेक आख्यायिका मी ऐकल्या आहेत.

    पैसे मिळविण्यासाठी कर्तृत्व हवे हे खरे पण  दान करायला दिलदारपणा लागतो!! 

      नानांनी कधीही आपल्या मिळालेल्या सत्तेचा वा पदाचा गर्व केला नाही. सर्वांशी मिळून मिसळून वागणे असे .आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सर्वांशी अतिशय माणुसकीचे,  प्रेमाचे व सलोख्याचे संबंध त्यांनी राखले होते. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे कार्यकर्ते नानाना जवळून परिचित होते. सार्वजनिक जीवनातील प्रसिद्धी माध्यमांचे महत्त्व ओळखून नानांनी तालुक्यांतील सर्व पत्रकारांशी देखील सलोख्याचे संबंध ठेवले होते .ते त्यांच्या अडीअडचणींना मदतही करीत असत. तालुक्यातील सर्व कार्यक्रमांना आमंत्रित करणे व आपल्या पक्षाच्या कार्याची वेळोवेळी ओळख करून देणे, यशापयशायाची बाजू मांडणे, त्यांना योग्य तो आदर सन्मान देणे ही सर्व कामे नाना आपल्या हातखंडा पद्धतीने करीत असत.

        नानाच्या घरी वसईत दरवर्षी गणेशोत्सव व इतर सांस्कृतिक उत्सव होत असत. त्यावेळी येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत होई. पत्नी सौ.शुभांगी व दोन मुलींत रममाण होऊन कौटुंबिक आनंद घेण्यासाठी नानासाठी तेवढाच अवसर होता. संपूर्ण आयुष्य समाजकार्य राजकारण व अशाच अनेक क्षेत्रात योगदान देत नानांनी  घालविले. आपले निष्कलंक चारित्र्य हीच त्यांच्या अंगीभूत सामर्थ्याची ठेव होती. तीदेखील मोठी कमाई होती. सर्वांशी चांगुलपणा हेच त्यांचे जीवन वैशिष्ट्य होते. म्हणूनच ते एवढे कामे करू शकले.  ‘सर्वांना हवाहवेसे’, असलेले नाना सतत लोकांतच असायचे. हसतमुख, आपल्या संयमी सुसंस्कृत वागण्याने त्यानी आपले व्यक्तिमत्व लोभस बनविले होते! त्यांच्या असण्याला मानवी जीवनाचा सर्वांगीण स्पर्श होता. त्याच्या सहवासात जीवनाच्या  मैत्रीचा सुगंध दरवळत होता .त्याच्या विविध क्षेत्रातील कार्याची पाऊलवाट आज इतरांसाठी वहिवाट आहे. जीवननिष्ठा, पक्षनिष्ठा, विविध कर्तृत्व याचा सुंदर मिलाफ म्हणजे सतीश नाना होते !!

 मृत्युदिनी म्हणजे 24 नोव्हेंबर 2010 रोजी मी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यास घरी गेलो होतो. त्याआधीही एकदा त्यांचे वसईचे घरी आजारी असताना मी भेटून आलो होतो. नाना एवढ्या लवकर जातील असे आम्हाला कधीच वाटले नाही. या आजारातूनही ते उठतील,अनेक मित्रांचे ,सुहृदांचे,कार्यकर्त्यांचे,आशीर्वाद व सदिच्छा मागे असलेला हा माणूस पूर्ववत आपल्या समाजकार्यात रुजू होईल अशीच आमची भाबडी कल्पना होती. समाजाला त्याचप्रमाणे कुटुंबाला, पत्नीला व दोन  मुलींना त्यांची खूप जरुरी होती..मात्र परमेश्वराला त्याच्या दरबारात नानांसारखी अष्टपैलू माणसे लवकर हवी होती.. म्हणूनच त्याने नानांना लवकर बोलावून घेतले असेल का…. ?

     सर्व क्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या या प्रामाणिक कार्यकर्त्याने काय मिळविले या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या अंतयात्रेत सापडले. प्रत्येकाला आपले दुःख मोठे वाटत होते. जमलेल्या असंख्य दुःखीजनांची हळहळ पाहताना, नाना शरीराने जरी आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या कार्याने, वागण्याने आणि त्यांनी दिलेल्या योगदानाने त्यांची स्मृती सदैव वसईकरांना दीपस्तंभासारखी मार्गदर्शक राहील. त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

    दिनांक 4 डिसेंबर  2010 रोजी नानांच्या निधनानिमित्त झालेल्या शोकसभेतही मला उपस्थित राहण्याचा व नानांना श्रद्धांजली देण्याची संधी मिळाली. माझ्या या दिवंगत सहका-याला मी त्यादिवशी मनापासून आदरांजली वाहिली. 

   एका कवीने म्हटलेले खरे आहे ,

  “जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला ..:पण देवालासुद्धा  नानांना असे अकाली बोलावणे खटकत असले पाहिजे.पण देवाचाही नाईलाज होता .कारण त्याने म्हटल्याप्रमाणे

  प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते।

“गत जन्मी योगमार्ग आचरताना काही उरलेले काम करण्यासाठी योगी लोकांना  पुण्यवान व सधन कुटुंबात अल्पकाळासाठीच जन्म मिळतो“ नाना अल्पकाळासाठीच येथे वास्तव्यास आले होते.

     त्यांच्या अकाली जाण्याचे मी तरी एवढेच समाधान मानू शकतो!

 नानाच्या विविधांगी, अष्टपैलू  कर्तृत्वाला सलाम  त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!!

  हा लेख लिहिण्यासाठी कै.नानांच्या सुविद्य पत्नी श्रीमती शुभांगी सतीश वर्तक यांनी छायाचित्रे व आठवणी लिहून दिल्या. श्री जगदीश राऊत यांच्या लेखातून माहिती मिळाली. दोघांचेही मनःपूर्वक आभार!