“सेतू को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी”, ते मंतरलेले दिवस…
आपण समाजाशी काहीतरी केले पाहिजे ही भावना, मी, माझे वडील आप्पा, यांचे कडून घेतली. आपला शिक्षकी पेशा सांभाळून, आपल्या प्रकृतीची साथ नसतानाही गरीब मुलांच्या शिकवण्या, प्रौढशिक्षणवर्ग, आदिवासी रात्रशाळा यात त्यांचे, विनामोबदला ‘विनावेतन’, योगदान कधीही चुकले नाही. “शिक्षण हे पवित्र ज्ञानदान आहे, त्याचा पैसे कमावून धंदा करणे हे पाप आहे”, ही त्यांची अगदी पहिल्यापासून धारणा होती. स्वतःची म्हातारी आई, पाच मुले ,स्वतः आणि आमची आई असा आठ जणांचा संसार केवळ आणि केवळ आपल्या अल्प वेतनातच सांभाळणेही आमच्या आईसाठी तारेवरची कसरत होती..
“आता तरी मुलांकडून शिकवणीचे पैसे मागा”, अशी आईची सतत भुुणभुण असताना आप्पांनी कोणाही मुलाकडून कधीही पैशाची मागणी केली नाही.
1950 च्या त्या दशकात आपल्या प्रकृतीची साथ नसतानाही, आप्पा आदिवासी पाड्यावर जात व तेथे शिकवून झाल्यावर रात्री बारा वाजता येऊन मिळेल तेवढी झोप घेत.
“लष्कराच्या भाकऱ्या भाजून काही उपयोग आहे का, त्यापेक्षा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या या तिच्या प्रश्नाला,
” मी गेल्या जन्मी यांचा देणेकरी लागत असलो पाहिजे ते ऋण मला फेडू दे, मला त्यात आनंद मिळतो.” असे त्यांचे उत्तर असे.
..”आपण आपल्या भोवतालच्या समाजाचे कोठेतरी देणे लागत असतो… प्रत्येकाने सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे! जोपर्यंत तुमच्या कर्तुत्वाचा, संपत्तीचा उपयोग सर्वसामान्यांना होत नाही, समाजासाठी तुम्ही शून्य आहात !” कोवळ्या वयातच हे कुठेतरी कोरले गेले.
आज त्या गोष्टीची आठवण होण्याचे कारण ध्यानीमनी नसतानाही सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निर्माणात व विकासात माझा लहान हिस्सा! मग हे सर्व कसे घडत गेले त्या मंतरलेल्या दिवसांचा,थोडक्यात लेखाजोग,सेतूच्या हितैशी परिवारासाठी, आजच्या व उद्याच्या !!
दादरच्या,कै.अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिरात, विद्यार्थी म्हणून रुजू झाल्यापासून, त्यावेळी तेथे तन-मन-धनाने समाजासाठी काम करणाऱ्या, भाऊसाहेब वर्तक चिंतामणराव वर्तक, मामासाहेब ठाकूर दादासाहेब ठाकूर भाई राऊत ,रामभाऊ चुरी ,शांतारामजी पाटील,बाबुराव सावे व इतरही मंडळींचे काम, मी खूप जवळून पहात असल्याने, माझ्या त्या जाणिवा अधिक समृद्ध झाल्या.
कै अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिराचा व्यवस्थापक व कै पू. तात्यासाहेब विद्यार्थी वस्तीगृहाचा रेक्टर ,म्हणून काम करण्याची संधी देऊन तत्कालीन विश्वस्तांनी मला उपकृत केले. माझाही शिरकाव ,सामाजिक कार्यामध्ये झाला. पुढे विविध समित्यावर,विश्वस्त व कार्यकारी विश्वस्त म्हणून बारा वर्षे काम करून मी थोडीफार समाज सेवा, यथाशक्ति केली. माझ्या कामाचे मोल समाज किती मानतो, त्यातून कोणाला काय फायदा झाला मी काहीच सांगू शकणार नाही? मात्र त्या मुळे मला एक कृतज्ञतेची जाणीव सतत होत राहिली, हेच माझे समाधान होते..
सामाजिक काम करताना माझी काही मते होती.. त्यातील एक म्हणजे,आपले कार्यक्षेत्र ‘सोमवंशीय क्षत्रिय समाजापुरतेच मर्यादित असावे’,कारण, आपली नोकरी व्यवसाय सांभाळून, समाजकार्याचा परीघ विस्तारणे मला शक्यच नव्हते .माझ्या शिक्षण कालांत, या समाजाने मला आर्थिक मदत व वसतीगृहात निवासस्थान दिले. समाजाचे निश्चितच मी देणे लागत होतो. केवळ तज्ञतेच्या भावनेने मी माझे योगदान समाजासाठी देणे हे माझे कर्तव्य आहे हीच भावना सतत होती. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या विविध विभागां मध्ये योगदान देऊन मी समाधानी होतो
आर्थिक क्षेत्रातही आपण काही काम करू, अथवा अशा क्षेत्राशी कधी संबंधित होऊ असे कधीच वाटले नाही. कारण या विषयाचा माझा अभ्यास व अनुभव नव्हता. माझ्या नोकरीपेशा मध्ये, कामाच्या अनुषंगाने ज्या काही आर्थिक बाबी सांभाळाव्या लागल्या तेवढे अनुभवाने केले. माझा स्वतःचा आर्थिक ताळेबंद ही मला नीट लिहून ठेवणे जमले नाही !!
सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या स्थापनेमध्ये मी का व कसा सहभागी झालो आणि सोसायटीचा पहिला अध्यक्ष म्हणून कसे व्यवस्थापन पाहिले तो मोठा मजेशीर इतिहास आहे . ,आजही या सोसायटीच्या सल्लागार मंडळावर, कार्यरत असून समाधानी आहे . त्या दिवसांच्या आठवणी नोंदवून ठेवून या संस्थेच्या निर्माणापासून ते आजतागायत ज्या मित्रांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यांच्या कार्यकर्तुत्वाला दाद देत, तो ईतिहास येणाऱ्या पिढीसाठी लिहिण्याचा हा प्रपंच ! गतेतिहासाची जाणीव ठेवून भविष्यात वाटचाल करणार्या संस्था समाजात अग्रेसर राहतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे, म्हणून हे आवश्यक वाटले!!
1984 च्या साधारण मार्च-एप्रिल महिन्यात, मित्रवर्य श्री.गोपिनाथ वर्तक, यांनी एके दिवशी आम्हा 11 सहकाऱ्यांना, श्री. जयवंत म्हात्रे, यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी, काही चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले गोपीनाथरावांनी आपण कशासाठी जमत आहोत याचा थोडासा अंदाज दिला होता. मात्र आम्ही प्रत्यक्षात, ज्या दिवशी दुपारी,जयवंतराव म्हात्रे यांच्या घरी जमलो, त्यादिवशी गोपीनाथ स्वतः संपूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांनी एका, को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या स्थापनेचा, संपूर्ण आराखडा तयार करून आणला होता. त्या आराखड्यात,अगदी “सेतु “या क्रेडिट सोसायटीच्या नावापासून, किती व कोणत्या सरकारी मान्यता घ्याव्या लागतील, सोसायटीचे कार्यक्षेत्र, पुढील सर्व कामाची एकूण रूपरेषा, निधी जमविण्याची संकल्पना कर्ज वाटप, देणग्या व डिपॉझिट गोळा करण्याची मानके, सोसायटीची समाजाला सध्याची निकड तसेच उपस्थित प्रत्येक मित्रांने, काय योगदान देणे अपेक्षित आहे,अशा सर्व बाबींवर खोल विचार करून हे सर्व टिपणबद्ध केले होते. तो एक प्रोजेक्ट रिपोर्ट होता.. त्यासाठी त्यांनी स्वतः ,काही क्रेडिट सोसायट्यांच्या कार्यालयांना भेट देऊन व त्यांच्या निर्देशक ,अध्यक्ष ,आदी, उच्चपदस्थांना प्रत्यक्षात भेटून, त्यांच्या सूचना,माहिती चा विचार करून ,हे टिपण तयार केले होते .खूपच अभ्यासपूर्ण व नियोजनबद्ध काम पाहिल्यावर, आम्हाला त्यावर जास्त भाष्य करण्याची आवश्यकताच वाटली नाही. विशेष बाब म्हणजे,त्या सुमारास म्हणजे साधारणतः ऐंशीच्या दशकापर्यंत, आमच्या समाजातील एक तरुण बँकर,श्री. हेम॔त चौधरी ,यांच्या पुढाकाराने वसईमध्ये नुकतीच, “वसई विकास सहकारी बँक”, सहकार क्षेत्रात सुरु झाली होती. त्याच उपक्रमाला पूरक म्हणून ,अशी एखादी क्रेडीट सोसायटी निर्माण झाल्यास,आमच्या समाजातील गरजूंना,विशेषतः तरुण विद्यार्थी, व उद्योजकांना तसेच इतरही आर्थिक गरजा भागविण्या संबंधात आमच्याच नव्हे तर सर्वच समाज बांधवांना त्याचा भविष्यात कसा फायदा होणार आहे ,याबद्दल हे विवेचन होते.आमच्या विद्यार्थी दशेतील जाणवलेल्या आर्थिक अडचणी वरून आम्हाला या अशा संस्थेची गरज अधिकच जाणवली . त्या प्रस्तावाला विरोध करण्याचे कारणच नव्हते .सर्वांनी एकमताने अनुमोदन देऊन, या कामात झोकून देण्याचे ठरविले. गोपीनाथ भाईंना सर्वांनीच धन्यवाद दिले .एका चांगल्या कामाला सुरुवात होणार होती व आता आपण सर्वांनी या कामात झोकून देऊन ते यशस्वी कसे होईल एवढेच पाहायचे असे त्याच दिवशी ठरवले .
वयाच्या पस्तीशी- चाळीशीत असणार्या आम्ही सर्वांनी आपला उद्योग व्यवसाय, नोकरी, कुटुंब हे सर्व सांभाळून या कामाला वाहून घेतले. म्हणूनच सेतु क्रेडिट सोसायटीची नुसती स्थापना झाली नाही, तर सेतुचा विस्तार दिवसेंदिवस अधिकच होत गेला,जो अजूनही होतो आहे. सुट्टीच्या दिवशी, प्रत्येक रविवारी व कधी अगदी रात्री अपरात्रीही , घरोघरी फिरून, चर्चासत्रे आयोजित करून समाज बांधवांशी हितगुज करीत, एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून,काम करीत राहिलो .
वास्तविक आमच्या स्वतःच्या व्यावसायिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या शिरावर असतानाच हे काम आम्ही करीत होतो . खऱ्या अर्थाने आयुष्याचा तो उत्तम कालखंड होता।.प्रसंगी कुटुंबाकडे, व्यवसायाकडेही दुर्लक्ष होत होते. तरी एक जाणीव मनाला सतत उभारी देत असे..
“समाजातील एका ऐतिहासिक कामाला प्रारंभ होत आहे.., हे काम यशस्वी केले तर,भविष्यातील आमचा समाज, शैक्षणिक ,औद्योगिक, सामाजिक, व आर्थिक क्षेत्रात, एक वेगळी ओळख इतरांपुढे ठेवणार आहे…आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, “न भुतो …”,अशा एका महान घटनेचे, आम्ही केवळ साक्षीदारच नव्हे, तर या त्यामागील घटनाकार असणार आहोत ..”,
या सतत मानसिक समाधान देणाऱ्या जाणिवेमुळेच कित्येकदा टीका व मानहानीचे प्रसंग घडले असतानाही आमची उमेद कधीही कमी झाले नाही! संसारिक ,कार्यालयीन, व सामाजिक विरोध अशा अडचणींचे अनेक डोंगर पार करताना, आम्ही मागे वळून पाहिले नाही!
1मे 1984 रोजी सेतु को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची रीतसर स्थापना करून सरकार दरबारी नोंद करण्यात आली…आणि” सेतु को.ऑ. क्रेडिट सोसायटी”.. नावाचे हे इवलेसे रोप ,आम्ही सोमवंशी क्षत्रिय समाज बांधवांच्या द्वारी लाविले ….
सुरुवातीला आम्ही अकरा सदस्यांनी मिळून ,दहा रुपयाच्या एका शेअर प्रमाणे,उभ्या केलेल्या,फक्त पंचवीस हजार रुपये भांडवलातून,आज 200कोटी रु.पेक्षा जास्त, उलाढाल करणारी सेतु को-ऑपरेटिव्ह सोसायटी ची भव्यता पाहिली की मन एका सात्विक समाधानाने भरून येते..”याच साठी केला होता अट्टाहास..” असे अंतरीचे बोल मनामध्ये आपोआप उमटतात ..
त्या सर्व सहकाऱ्यांची नावे व थोडक्यात ओळख मी पुढे करून देणारच आहे,
सेतू च्या गेल्या चाळीस वर्षांतील नेत्रदीपक वाटचालीची थोडक्यात, झलक अशी..
साल | सभासद | भाग भांडवल रु. | ठेवी.रु | नफा रू |
1984/85 | 422 | 1लाख | 25,000 | 2500 |
2019/20 | 10,234 | 5.1cr | 113cr | 1,2 Cr |
2023-24 | 12551 | 5.52cr | 132.8cr | 1.86cr |
गत आर्थिक वर्षात,’सेतू’चे खेळते भागभांडवल सुमारे 166 कोटी रुपयांच्या घरात असून, जवळ जवळ 95 करोड रुपयांचे कर्ज वाटप झालेले आहे., आणि एवढा भव्य कारभार असूनही ,सेतू क्रेडिट सोसायटीने, सुरुवातीपासून ते आजतागायत,”अ” हा लेखा परीक्षण वर्ग (Audit Remark ),कायम राखलेला आहे. ही खरोखरच स्पृहणीय अशी गोष्ट असून ,सेतूच्या सर्व सभासदांना ,आजी-माजी निर्देशक ,व अध्यक्षांना ही भूषणावह अशी बाब आहे.
आर्थिक पाठबळ, ही, आयुष्यात किती महत्त्वाची गोष्ट आहे, हे ज्यांनी,अत्यंत खडतर परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले ,त्यांना सांगावयास नको.आम्ही सर्व मित्रांनी अशा बिकट परिस्थितीचा मुकाबला एकेकाळी केला होता. ही प्रतिकुलता,आमच्या भावी पिढ्यांना सहन करावी लागू नये,हा ही एक प्रामाणिक हेतू, सेतु संस्थेची उभारणी करण्या मागे होता. आजच्या काळात,कोणत्याही शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक ,वा राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या, प्रगत समाजाकडे पाहिल्यानंतर, त्यांच्यामागे , एखाद्या आर्थिक आस्थापना चे भरपूर पाठबळ असते हे, प्रकर्षाने निदर्शनास येते. आमच्या मागील समाजधुरीणांनी अनेक चांगल्या समाजोपयोगी उपक्रमांना सुरुवात करून दिली होती मात्र अशा प्रकारचे एखादे आर्थिक आस्थापन ही निर्माण केले गेले असते,तर आपला समाजही औद्योगिक दृष्ट्या आज आहे त्याहून अधिक प्रगतीशील राहिला असता यात काही शंका नाही. विशेषतः शेती व शेतीला पूरक ,अशा काही जोडधंद्याचे निर्माण, आमच्या शेतकरी समाज बांधवांना करणे सोपे गेले असते, असे नम्रपणे वाटते.आर्थिक क्षेत्रात विशेषतः सहकारी आर्थिक क्षेत्रात,आज-काल बोकाळलेला भ्रष्टाचार पाहिल्यानंतर, मन नाराज होते. परंतु आजपर्यंत सेतुची वाटचाल व विस्तार पाहिल्यानंतर, कोठेतरी आशेचा किरण ही दिसतो.आपली ही पतपेढी, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये, एक आदर्श आर्थिक संस्था म्हणून नावाजली जावी अशी आम्हा संस्थापकांची मनिषा, सफल होत आहे, हे पाहून खूप समाधान वाटते. आजच्या युगात,सेवा, समर्पण,त्याग, या शब्दांचे संदर्भ बदललेले असताना, ही मुल्ये जपणाऱ्या एका संस्थेची स्थापना आपण करू शकलो व आजचे नेतृत्वही त्याच मार्गाने संस्थेला पुढे नेत आहे हे पाहिल्यावर आम्हा संस्थापकांचा ऊर निश्चितच अभिमानाने भरून येतो. आज सेतु ,केवळ एक आर्थिक उलाढाल करणारी क्रेडिट सोसायटी नसून एक मोठे कुटुंब बनले आहे!. विविध क्षेत्रांमधील गरजूंनी,सेतु मधून आर्थिक मदत घेऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. संस्थेबद्दल अत्यंत कृतज्ञतेने ही मंडळी बोलत असतात. वर्षातून एकदा साजरा होणाऱ्या स्नेहसंमेलनाला एकत्र येऊन सर्वांचे कौतुक होते.विचारांची देवाण-घेवाण होते व अशा रीतीने एका निरोगी समाज रचनेलाही हातभार लागतो हे सुद्धा सेतूचे सामाजिक क्षेत्रातील एक महान यश आहे ! अशा-संस्थेची समाजाला किती आवश्यकता होती हे सिद्ध होते.
गोपीनाथ भाईंच्या नेतृत्वाखाली, आम्ही सहकाऱ्यांनी ही अंधारात घेतलेली उडी नव्हती तर वर आकाशाकडे पाहत पूर्ण विचारांती घेतलेली ती एक गरुड झेप होती. मी या सर्व सहकाऱ्यांचा मनःपूर्वक आभारी आहे कारण त्यांनी मला या आर्थिक क्षेत्राशी कोणताही पूर्वानुभव नसताना त सामावून घेतले एवढेच नव्हे तर पहिली महत्त्वाची चार वर्षे अध्यक्ष म्हणून नेतृत्व ही माझ्याकडे दिले.
सन 1984ते 1988 अशी चार वर्षे मी सेतुचा पहिला अध्यक्ष, म्हणून काम पाहिले.माझे सहकारी श्री. गोपीनाथ वर्तक हे त्यावेळी, सेतुचे पहिले कार्यवाह,असल्याने,माझे काम खूपच सोपे झाले.संस्था अगदी बाल्यावस्थेतच असल्यामुळे आमचे दैनंदिन काम विशेष दिसत नव्हते.रोजचे कार्यालयीन काम जास्त नव्हते.सदस्य नोंदणी करणे,सेतु साठी डिपॉझिट जमविणे, त्याचप्रमाणे सरकार दरबारी काही नोंदी करणे, इत्यादी प्रारंभिक महत्त्वाची अशी कामे भरपूर होती. संस्थेच्या एकूणच कारभाराला ,पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ,काही निश्चित मानदंड तयार व्हावेत, ही देखील आमची महत्त्वाची जबाबदारी होती. एका मोठ्या सरकारी आस्थापनाचा वरीष्ठ अधिकारी म्हणून प्रत्यक्ष अनुभव हेच माझे शक्तिस्थान व त्यामुळे सेतुचे प्रारंभीचे एकूण व्यवस्थापन चोख ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी माझा हातभार लावला. आर्थिक व्यवहार करताना कोणतीच तडजोड केली जाणार नाही हे देखील कटाक्षाने पाहिले. त्यासाठी खालील तीन पथ्ये आम्ही सर्वांनीच पाळली.
एक-,सेतुकडून मिळणारी आर्थिक मदत ही ,खरोखरीच गरजवंत व होतकरू सदस्याला मिळावी. विशेषेकरून विद्यार्थ्यांना त्यात अधिक वाव असावा.
दोन- कर्जाचे वाटप करताना एखाद्या गरजवंताची विनंती, काही तांत्रिक बाबींची पूर्तता होऊ शकत नसल्याने, नाकारली जात असेल तर अशा सभासदांना ती तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मार्गदर्शन करावे ..
तीन -सेतु ही ,केवळ कर्जे वाटणारी व डिपॉझिट गोळा करणारी संस्था न राहता खऱ्या अर्थाने, आपल्या नावाप्रमाणे,समाजबांधवांची मने जोडून एक आदर्श व सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारा तो सेतु व्हावा अशा प्रकारचे, इतरही काही उपक्रम राबविणे.
सुदैवाने कार्यवाह, व माझे सर्व निर्देशक सहकारी यांचे याबाबत एकमत झाल्यामुळे,आम्ही ही धोरणे संपूर्णपणे व यशस्वी करू शकलो, हे नमूद करण्यात खूप आनंद वाटतो.सुरुवातीच्या सात-आठ वर्षा पासूनच सेतु सोसायटीने आपली आर्थिक उलाढाल वाढवित नेतांना चोख कारभार व उत्तम दर्जा ,यामुळेच, आपल्या कामाचा एक दबदबा निर्माण केला आहे.
विशेषतः गृह खरेदी अथवा औद्योगिक आस्थापने,यां साठी,कर्जे मंजूर करताना,आम्हाला दक्ष राहावे लागे. त्याकाळी आणि आजही, आर्थिक संस्था डबघाईला येण्याचे एक मुख्य कारण म्हणजे दिलेली कर्ज वेळेत वसूल न होणे हेच असते . संस्थेचे पदाधिकारी आपल्याच मित्र नातेवाईकांना कर्ज देतात व वसुलीत ढीलाई करतात तेव्हा त्या संस्थेस निश्चितच उतरती कळा लागली आहे हे सांगण्यास कोणी भविष्यवेत्त्याची गरज नसते. मला नमूद करावयास खरोखर अभिमान वाटतो ,आमच्या सर्व सहकाऱ्यांनी याबाबतीत स्वतःच एक अलिखित नियम सदोदित पाळून कामाचा मानदंड निर्माण केला आहे, ज्याची आजही पालन होत असते . ज्या संस्थेत अधिकारावर असलेल्या व्यक्ती स्वतःवर मर्यादा व बंधने घालून कामाचे असे आदर्श निर्माण करतात व भविष्यकाळातही त्यांचे पालन होत राहते अशा सामाजिक आर्थिक व कोणत्याही क्षेत्रातील आस्थापनाला निश्चित उज्वल भविष्यकाळ आहे. सेतू याच प्रवर्गातील एक आर्थिक संस्था आहे अशी माझी खात्री आहे.
सेतु ही समाजातील एक बहुआयामी संस्था म्हणून नावारूपास यावी,या करीता सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक दृष्ट्या विचार करून त्याप्रमाणे संपूर्ण सहकार्य दिलेले आहे. पहिल्या वर्षापासून सुरू केलेला सेतुच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम, आजही मोठ्या दिमाखात ,दरवर्षी होत असतो.त्यादिवशी एक सांस्कृतिक कार्यक्रम ,समाजातील उत्तम यश संपादन करणाऱ्या विद्यार्थांचा सत्कार, विशेष कर्तृत्व दाखविणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान ,एखाद्या मान्यवरांकडून प्रबोधन अशा प्रकारचा तो कार्यक्रम असतो. या दरवर्षीच्या प्रथेमुळे, श्री. माधव गडकरी, त्यावेळी लोकसत्तेचे संपादक, श्री. सुधीर फडके प्रसिद्ध गायक संगीत दिग्दर्शक, श्री. गजाननराव पेंढारकर -विको वज्रदंती चे उत्पादक उद्योजक ,कवी शंकर वैद्य ,श्री .गजानन खातू व श्री .शिरीष देशपांडे, हे ग्राहक सहकारी चळवळीचे अध्वर्यु, डॉ. जाधव रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर व’माझा बाप आन मी’, या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक,कै..सतीश नाना वर्तक , सहकारी बँकिंग मधील अधिकारी व्यक्तिमत्व, अशी मला सहज आठवत असलेली काही विद्वान व कर्तृत्ववान मंडळी आमच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी होऊन आम्हाला प्रबोधन करून गेली. संमेलनात सहभाग देऊन गेली.एक सुंदर स्नेहसंमेलन होई, व नाटकाच्या तिकिट विक्रीमुळे आर्थिक हातभारही लागे.
सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून माझ्या प्रास्ताविक भाषणात , मी आर्थिक प्रगतीचा आढावा घेतानाच मुदत ठेवी करिता, जमलेल्या समाज बंधू भगिनींना आवाहन करीत असे. प्रसिद्ध उद्योगपती व सहल सम्राट के राजाभाऊ पाटील प्रथमतः माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एक मोठी रक्कम सेतूसाठी ठेव म्हणून जाहीर करीत. त्यांच्या दोन मिनिटांच्या रोखठोक स्फूर्तीदायक भाषणाने सभागृहात चैतन्यनिर्माण होई. त्यापासून स्फूर्ती घेऊन हजर असलेल्यांतील दानशूर समाजबांधव आपल्या देणग्या व,ठेवी जाहीर करीत. हे सर्व ठरवून केलेले असे. प्रत्येक कार्यक्रमाआधी राजाभाऊंच्या दादर शिवाजी पार्क येथील प्रशस्त व सुंदर कार्यालयात आमच्या बैठका होत. विचार विनिमय होई. नियोजन केले जाई. राजाभाऊ कार्यक्रमाच्या आखणी व प्रस्तुतीकरणात बहुमोल सूचना करीत. कार्यक्रमाचे दिवशी प्रत्यक्ष जातीने हजर रहात.राजाभाऊंची मला प्रेमाची सक्त ताकीद असे
” दिगंबर तुझे प्रास्तविक भाषण जोरदार झालेच पाहिजे. उपस्थितांची,एक सकारात्मक मानसिकता तयार होणे आपल्या ठेवी संकलनाच्या ऊद्देशाला आवश्यक आहे”.
आजचा सेतुचा व्याप व सुयश पाहून राजाभाऊंना निश्चितच खूप आनंद झाला असता. दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. मात्र आजच्या सेतुच्या वाटचालीत, सुरुवातीच्या त्या अवघड कालखंडातील आवाहनांशी सामना करीत असतांना राजाभाऊंचे खूप मोठे सहकार्य आम्हाला मिळत असे, हे मान्य करावे लागेल. त्या दिवसात सेतूला स्वतःचे ऑफिस नव्हते. आपले भव्य सुबक ऑफिस कधीही गरज असल्यास वापरू देण्याचे सौजन्य दाखवून राजाभाऊंनी आम्हाला उपकृत केले आहे.
कै. डाॅ. बळवंतराव पाटील, आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे माजी अध्यक्ष ,माजी कार्यकारी विश्वस्त त्यांनीही आम्हाला सेतुच्या सुरवातीचे काळांत खूप प्रोत्साहन दिले आहे. अनेक प्रसंगी, त्यांच्या पार्ले स्टेशन(पूर्व), जवळील दवाखान्यात, आमच्या बैठका, सभा झालेल्या आहेत. डॉ. पाटील एक द्रष्टे नेते होते . त्यांचा देखील ,सहकार व आर्थिक संस्थांमध्ये खूप अनुभव व अभ्यास होता. तेही आमच्या वार्षिक कार्यक्रमात जातीने हजर असत, आर्थिक मदत देत, अनेक उपयुक्त सूचना करीत व इतरही सामाजिक सभासमारंभात आमचे कौतुक,समाजाच्या व्यासपीठावरून करीत असत. राजाभाऊ व डॉ. बळवंतराव पाटील दोघांच्या स्मृतीला या निमित्ताने मी अभिवादन करतो.
संघाचे माजी अध्यक्ष व केसरी टूर्स चे सर्वेसर्वा सन्माननीय केसरीभाऊ पाटील यांचेही आमच्या सेतु सोसायटीच्या वाटचालीत मोठे योगदान आहे.आज केसरीभाऊ , प्रकृती अस्वास्थ्यामुळे,प्रत्यक्ष सहभाग देऊ शकत नसले, तरी गेली कित्येक वर्षे त्यांचे मौलिक मार्गदर्शन व मदत कोणत्या ना कोणत्या रूपाने सेतू संस्था व सेतू परिवारास सदैव होत असते. त्यांचाही येथे मी आदरपूर्वक नामोल्लेख करतो.
माजी शासकीय अधिकारी कै रामभाऊ वर्तक ,यांच्या शासकीय अनुभवाचाही सेतूला त्या काळात खूप उपयोग झाला आहे विशेषतः सरकारी परवानगी व दाखले मिळवण्यासाठी त्यांनी आम्हाला नुसते मार्गदर्शनच नव्हे तर प्रत्यक्ष आमच्याबरोबर स्वतः सरकार दरबारी उपस्थित राहीले, त्यामुळे कामे सुलभ झाली.
आमच्या समाजातील मालाड येथे राहणारे, उद्योगपती कै. वासुदेव राऊत यांनीही ,सेतुच्या प्रारंभीच्या काळात, संस्थेला आर्थिक पाठबळ मिळविण्याच्या दृष्टीने, मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांचीआठवण संस्था निश्चित ठेवील.
कै. माननीय डॉ.जयंतराव पाटील यांचाही या संदर्भात उल्लेख करणे मला आवश्यक वाटते . आमच्या सेतू संस्थेबद्दल त्यांना नेहमीच आपुलकी व आस्था होती . ज्या ज्या वेळी आम्ही त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असून,त्यांनी आम्हाला कधीही नाराज केलेले नाही . सेतूचे रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळी दादांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य दिले. दादा स्वतः दिल्ली व महाराष्ट्र सरकार शी आपल्या कामामुळे संबंधित होते व त्यांच्या परिचयाचा लाभ त्यांनी सर्वांना दिला आहे .जयंत दादांच्या स्मृतीलाही अभिवादन!
अशा एक ना दोन अनेक समाज व समाजाबाहेरीलही बांधवांनी त्या सुरुवातीच्या काळात दिलेल्या आर्थिक व नैतिक पाठिंब्याचे जोरावरच सेतू संस्था तग धरून राहिली व आजची ही यशस्वी वाटचाल करू शकली .त्या सर्वांचे स्मरण होत असले तरी प्रत्येकाचा नामोल्लेख करणे शक्य नाही. त्यांच्या सदभावनेला व सहकार्याला वंदन करून संस्था त्यांचे ऋणात सदैव असेल याची मला खात्री आहे.
माझी अध्यक्षीय कारकीर्द संपल्यानंतर मी सेतू को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या दैनंदिन कामापासून सर्वच धोरणात्मक निर्णय प्रक्रियेपासून दूर झालो. त्यानंतर आजपावेतो कोणतेच अधिकाराचे पद स्वीकारले नाही.
गेली काही वर्षे संचालकांच्या विनंतीवरून त्यांनी निर्माण केलेल्या ‘सल्लागार समितीचा’ एक सदस्य म्हणून मी संस्थेशी निगडित आहे. कोणाही सामाजिक, सार्वजनिक, शैक्षणिक संस्थेच्या संस्थापकानी, वा अधिकार्यांनी निश्चित कालमर्यादेनंतर आपल्या मूळ संस्थेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रणापासून दूर राहणे हे त्यांचेसाठी व संस्थेसाठी नेहमीच हितकारक असते. दुर्दैवाने आज खूप व्यक्ती व आस्थापने अशा चांगल्या परंपरा जोपासित नाहीत. कार्पोरेट जगतातील सन्माननीय रतन टाटा, नारायण मूर्ती,अशा व्यक्ति मला यासाठीच नेहमीच आदर्श वाटतात. नाहीतर आज सर्वत्र जुनी धेंडेचआपल्या खुर्चीला चिकटून राहून अखेर पर्यंत अधिकारपदाची हाव सोडू इच्छित नाहीत.
सन्मान. रतन टाटांचा एक विचार याबाबतीत सर्वांनी लक्षात ठेवण्याजोगा आहे..
“The business needs to go beyond the interest of the individuals and institutions to the community they serve!”
एका वाक्यात रतन टाटांनी ऊतम ा व्यवसायाचे मर्म सांगितले आहे.
माझ्या शिवाय ,ज्या दहा संस्थापक सदस्यांनी, एकत्र येऊन, मे 1984 साली, सेतु क्रेडिट सोसायटीची स्थापना केली ,त्या माझ्या प्रत्येक सहकारी मित्राबद्दल थोडक्यात माहिती देणे, मी उचित समजतो.
श्री गोपीनाथ जगन्नाथ वर्तक: मूळ गाव चटाळे ,बोरीवली. सेतु क्रेडिट सोसायटीचे प्रवर्तक,व ज्यांच्या विचारमंथनातून सेतुच्या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात झाली, ते, सेतुचे चे संस्थापक सदस्य. महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातून व्यवस्थापक ,या पदावरून निवृत्त झाले.आपल्या या परिसरांतील व परिसराबाहेरही, समाज बांधवांबद्दल असलेल्या तळमळीतून ,त्यांनी सेतु च्या स्थापनेचा पहिला आराखडा तयार केला. इतर 10 सहकाऱ्यांची निवड करून सेतुच्या निर्मिती कार्याला सुरुवात केली. 1984 पासून ते मधली काही वर्षे सोडता, आजतागायत ते संस्थेत कार्यवाह, अध्यक्ष सल्लागार, अशा कोणत्या ना कोणत्या ,रीतीने सतत संबंधित आहेत. काही कालापूर्वी आमच्या सो क्ष संघ फंड ट्रस्टचे मुख्य विश्वस्त म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. अजूनही आपल्या चटाळे गावच्या अनेक सामाजिक संस्थांचा कारभार पाहत असतात. सध्या त्यांचा मुक्काम आपल्या चटाळे गावीच आहे. श्री गोपीनाथ वर्तक म्हणजे एक सर्वस्वी समर्पित प्रामाणिक आणि स्पष्टवक्ता नेता त्यांच्या एकंदर सर्व क्षेत्रातील महान योगदानाला अभिवादन.
श्री सदानंद म्हात्रे: मूळ गाव केळवे,वास्तव्य गोरेगाव.महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातून, उपव्यवस्थापक पदावरून निवृत्त. सेतुचे संस्थापक सदस्य व संस्थेच्या अगदी सुरुवातीपासूच्या जडणघडणीत ,सहभागी. संचालक 1984 ते 88,उपाध्यक्ष 1988 ते 91,अध्यक्ष 1991 ते 96. सेतुच्या सुरुवातीपासून ते आजतागायत, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना भाग भांडवल व ठेवी गोळा करणे यात त्यांचे सदैव महत्त्वाचे योगदान .सेतुला जागा खरेदीसाठी बिनव्याजी आर्थिक मदत,व जाहिराती मिळवणे, यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सेतुच्या सुरुवातीच्या, अत्यंत बिकट अशा कालखंडात,आम्ही जमा केलेल्या सर्व आर्थिक शक्तीमध्ये, सदानंद भाईंचा एकट्याचा, पन्नास टक्क्याहून अधिक हिस्सा होता, हे सांगितल्यावर त्यांनी त्या वेळी केलेल्या कामाचा आवाका लक्षांत येईल. विशेष म्हणजे ,शारीरिक साथ नसतानाही, केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ,त्यांनी हे काम केलेले आहे. ते समाजोन्नती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष होते व तेथेही आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचेच अध्यक्षीय कालांत, बोरिवली पश्चिम येथील 51 व्या रस्त्याला, “लोकनेते अण्णासाहेब वर्तक मार्ग”, असे नामाभिधान करविण्यांत ,सदानंद भाईंचा सिंहाचा वाटा आहे ,हेही येथे मुद्दाम नमूद करतो. ते माझे एक चांगले मित्र व सहकारी. राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गुणवंतांशी ओळखी असलेले सदानंद भाई म्हणजे एक स्वतःला झोकून देऊन काम करणारे व्यक्तिमत्व आहे.
श्री जयवंत भाऊराव म्हात्रे, केळवे: भारतीय रिझर्व बँके मधून ,मुख्य महाप्रबंधक(CGM), पदावरून सेवानिवृत्त.सेतू चे संस्थापक सदस्य. सहकार्यवाह 1984 ते 1986, 2006 ते 2011अध्यक्ष.’समाजाचे आपण देणे लागतो’ या भावनेने ,निरपेक्षपणे काम करणारी एक व्यक्ती. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष. समाजोन्नती शिक्षण संस्था. उपाध्यक्ष. केळवा रोड विभागीय विकास समिती उपाध्यक्ष.सेतुच्या रौप्यमहोत्सवी समारंभात अध्यक्ष म्हणून मोठे योगदान.आजही सेतुची वाटचाल लोकशाही तंत्राने व्हावी, यासाठी सदोदीत प्रयत्नशील असतात. सल्लागार समितीचे समन्वयक म्हणून काम करतात.. आपल्या बँकेतील पदाचा त्यांनी सेतूच्या वाढीसाठी सुयोग्य उपयोग केला एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत राहूनही कोणताही अभिमान न बाळगता कार्यकर्त्यामध्ये समरस होऊन काम केले.
श्री बाबुराव शंकर राऊत, मूळ गाव एडवण: वास्तव्य वसई.भारतीय रिझर्व बँकेतून असिस्टंट मॅनेजर या पदावरून निवृत्त. सेतुचे संस्थापक सदस्य. संयुक्त कोषाध्यक्ष 1984 ते 88,कोषाध्यक्ष 1989 ते 96, उपाध्यक्ष 1996 ते 2001 .विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलून अध्यक्षपदावरून जून 2002मध्ये निवृत्त झाले. सल्लागार समिती सदस्य व सेतुच्या सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन महत्त्वाच्या विषयावर चर्चा व सल्लामसलत याद्वारे क्रियाशील . मितभाषी व समर्पक बोलणारे श्री बाबुराव हे आमच्या सेतूचे एक आधारस्तंभ व पट्टीचे कार्यकर्ते आहेत.
कै.दत्तात्रय सखाराम सावे: मूळ गाव केळवे. वास्तव्य बोरिवली. माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट,मधून ते सेवानिवृत्त झाले. सेतुच्या जडणघडणीत मार्गदर्शक, आधारस्तंभ म्हणून सदैव भूमिका निभावली. कोषाध्यक्ष 1984 ते 89 ,कार्यकारी सदस्य 1989 ते 91उपाध्यक्ष 1991ते 96 व अंतर्गत लेखापरीक्षक 96 ते 2002. अशी अठरा वर्षे विविध पदावरून,सेतुची आर्थिक घडी सांभाळण्याचे महत्त्वाचे योगदान.सल्लागार समितीचे सदस्य. सेतुचे कार्यालय होईपर्यंत, बहुतेक कार्र्मीक व्यवहारही त्यांच्या घरातूनच होत असत.पद असो वा नसो, सेतुचे हिशोब संकलन व तपासणी, याची जबाबदारी त्यांनी घेतली व तनमनधनाने ‘सेतुमय’ झालेले असे आमचे दत्ताभाऊ! आम्हा सर्वांना वडीलधारी असणारे दत्ताभाऊ नुकतेच कालवश झाले. मात्र आम्हा सगळ्यांना सांभाळून घेऊन उत्तम संतुलन ठेवणारे दत्ताभाऊ शेवटपर्यंत सेतुचे हित पाहण्यासाठी दक्ष होते.
श्री पंढरीनाथ का. सावे: मूळ गाव तारापूर. वास्तव्य बोरिवली. सेतुचे संस्थापक सदस्य व संचालक .1984 ते 1987 .स्वतःचा उद्योग’ मुंबई स्क्रीन प्रिंटिंग इन्स्टिट्यूट’, यशस्वीपणे चालविला.ऑल इंडिया स्क्रीन प्रिंटिंग असोसिएशनचे सदस्य. सेतुच्या सुरुवातीच्या वाटचालीत मोठे योगदान व सदैव सक्रिय पाठिंबा. मितभाषी असले तरी प्रसंगी स्पष्ट बोलून आपले विचार पटवून देणारे पंढरीनाथ आप्पा अजूनही सेतूच्या कामासाठी, बोलावणे आल्यास तत्पर असतात.
डॉ.देवराव हिराजी पाटील: मूळ गाव चिंचणी . सध्या वास्तव्य बोरिवली. सेतुचे संस्थापक सदस्य. ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री’ विषयात डॉक्टरेट. पार्ले कॉलेजमधून, रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून निवृत्त , काही काल पार्ले कॉलेजचे प्रिन्सिपाल म्हणून ही काम पाहिले.मुंबई युनिव्हर्सिटीचे माजी सिनेट सदस्य. पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे यशस्वी आयोजक.चिंचणी समाज ट्रस्टचे अध्यक्ष. समाजोन्नती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष .प्रिन्सिपल बी एम सावे शिक्षण संस्था व राऊत आयटीआय चिंचणी या संस्थांचे आद्य संस्थापक. ईशान्य भारताच्या विविध राज्यांतून मुलांना शैक्षणिक मदत करण्याचा वसा घेऊन ,कार्यरत आहेत. तीनशेहून अधिक नागा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता त्यांनी साधली. सेतुचे उपाध्यक्ष 1984 88,अध्यक्ष 1988 ते 1991, असे बहुआयामी व्यक्तिमत्व. अत्यंत मनमिळावू वृत्तीमुळे संस्थेचा लौकिक त्यांनी इतर समाजातही वाढविला.
डॉ.अशोक नारायण वर्तक: मूळ गाव माहीम, वास्तव्य विरार. सेतुचे संस्थापक सदस्य.भाभा अणुकेंद्र मुंबई ,येथून सेवानिवृत्त. सेतुच्या पायाभरणी च्या काळात, संचालकाच्या भूमिकेतून, 1984 ते 1987 कालखंडात, भागभांडवल व ठेवी संकलनात ,सेतुच्या सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग दिला.
श्री.महादेव जीवन वर्तक: मूळ गाव एडवण. वास्तव्य बोरिवली ,मुंबई.महानगरपालिकेतून उपमुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. समाजकार्याची मनापासून खूप आवड,त्यामुळे आपल्या गावातील व पंचक्रोशीतील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे.सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे बारा वर्षे चिटणीस म्हणून काम केले. क्षात्र्यैक्य परिषदेचे, माजीअध्यक्ष .निधी संकलनासाठी त्यांची खूप मदत झाली. मनमिळाऊ स्वभाव, अत्यंत वक्तशीर आणि काटेकोरपणा, ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. सेतुच्या संचालक पदावरून 1984 ते 87 या काळात, ठेवी संकलन, सभासद नोंदणी, इमारत निधी संकलन इत्यादी सर्व उपक्रमातून त्यांनी सेतूची सेवा केली आहे. उत्कृष्ट वक्ता असणारे महादेवजी लोकसंग्रह भरपूर आहे.
कै.रवींद्र भास्करराव ठाकूर: ,मूळ गाव शिरगाव. वास्तव्य विरारला असे. वसतिगृह सहनिवासापासून माझे अतिशय चांगले मित्र आणि तात्यासाहेब चुरी वसतिगृहात माझे सहाध्यायी. मी तेथे रेक्टर असताना, मला दिलेली साथ व मोलाचा सल्ला,कायम स्मरणात आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित,मधून व्यवस्थापक या वरीष्ठ पदावरून सेवानिवृत्त झाले.सेतुच्या स्थापनेच्या विचार प्रक्रियेत, ते सहभागी होते.संचालक या नात्याने 1984 ते 1987,सर्व बाबतीत मोलाचे सक्रीय सहकार्य. सेतुचे माजी उपाध्यक्ष, शिरगाव शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य, सेतुच्या वाटचालीत, आमरण ,त्यांनी तत्परतेने सहभाग दिला. एक स्पष्टवक्ता, रोखठोक विचार मांडणारा, कार्यकर्ता म्हणून कै. रवींद्र ठाकूर यांची नेहमी आठवण येत राहील. आपला स्पष्टवक्तेपणा व समतोल वागणे यामुळे रवींद्रनाथ हे आम्हा सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा दुवा होते!
या सुरुवातीच्या संस्थापक सदस्या व्यतिरिक्त पुढील कालखंडात अध्यक्ष या नात्याने सेतुची उत्तम प्रकारे सेवा करणाऱ्या माजी/आजी अध्यक्षांचा थोडक्यात परिचय करून दिला पाहिजे,
श्री. प्रमोद जगन्नाथ पाटील: बोर्डी,-बोरीवली.बी.कॉम. पर्यंत शिक्षण झाल्यानंतर, प्रमोद भाईंनी बँकिंग क्षेत्राची निवड केली. या क्षेत्रातील एक जाणकार म्हणून समाजात त्यांचे नाव आहे.सेतु सोसायटीच्या पहिल्या कार्यकारी मंडळात, अंतर्गत लेखा परीक्षक म्हणून अतिशय उत्तमपणे प्रमोद भाईंनी काम केलेले आहे . सन 2001 ते 2006 ,सेतुचे अध्यक्ष होते. आजही ते सेतुच्या संचालक मंडळात असून अगदी स्थापनेपासून सेतुसाठी त्यांचे योगदान वादातीत व अतिशय मोलाचे असे आहे. त्यांच्याच अध्यक्षीय कालांत ,बोर्डी चिंचणी या महत्त्वाच्या शाखा उघडण्यात आल्या व यशस्वीपणे कार्यरत झाल्या. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड,M S E B., बिलांचा भरणा करण्याचे काम ,सेतुच्या विविध शाखांतून, त्यांनीच सुरू केले.त्यामुळे सोसायटीला एक नवीन उत्पन्नाची बाब निर्माण झाली व काही समाज युवक-युवतींना नोकऱ्याही मिळू शकल्या. अत्यंत मीतभाषी, मात्र गरज पडल्यास अगदी स्पष्ट व सडेतोडपणे आपले विचार मांडणारे. अध्यक्ष कोणीही असो मनापासून साथ देणारे संचालक म्हणजे श्री प्रमोद भाई ! आमच्या कै.तात्यासाहेब चुरी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व सो क्ष स संघाच्या खजिनदार पदाची जबाबदारी तितक्याच तोलामोलाने सांभाळत आहेत.
श्री. जगन्नाथ म्हात्रे, केळवे: सध्या वास्तव्य बोरिवली. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मधून सेवानिवृत्त. सेतु क्रेडिट सोसायटीशी प्रारंभापासून निगडित असून, निष्ठेने काम केले आहे. 2011-2016, या कालखंडात सेतुचे अध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केली. जयवंत म्हात्रे व जगन्नाथ म्हात्रे या बंधुद्वयानी, सेतु सोसायटीचे इतिहासात अजोड अध्यक्षीय कामगिरी करून, विक्रम केला आहे.
श्री पुरुषोत्तम विठोबा वर्तक: केळवे-माहीम ,बोरिवली. मुंबई महापालिकेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त. ‘महानगरपालिका शिक्षण विभाग बँकेत’ पदाधिकारी, म्हणून अनेक वर्षे कामाचा अनुभव.सेतुशी त्यांचा पहिल्यापासून संबंध असून अनेक प्रकारे त्यांनी सेतुची सेवा केली . ‘सेतु क्रे.सोसायटीचे उपाध्यक्ष,असतांना तत्कालीन अध्यक्षांच्या अकाली राजीनाम्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आपल्या सहकाऱ्यां कडून उत्तम प्रकारे सहकार्य मिळवून,, हंगामी अध्यक्ष म्हणून सेतुची धुरा खांद्यावर घेतली पुढे अध्यक्ष म्हणून ही अतिशय चांगल्या प्रकारे काम केले. विशेषतः कोरोना महामारीमुळे अनुभवलेल्या परिस्थितीत संस्थेचे कोणतेही नुकसान न होऊ देता उत्पन्नात वाढ करून दाखविली. गतवर्षी झालेल्या सेतु संचालक निवडणुकीत मोलाची कामगिरी करून एक उत्तम पायंडा संस्थेसाठी घालून दिला.उत्तम वक्ते व सर्व समावेशक स्वभाव यामुळे एक हवासा चांगला कार्यकर्ता आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिका, “आदर्श शिक्षक, महापौर पुरस्कार”, तसेच’ महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक’,राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
वाचक हो सेतूच्या आजवरच्या 40 वर्षाच्या यशस्वी वाटचालीमध्ये एकूण आठ संचालक मंडळे कार्यरत होती आज श्री प्रकाश काशिनाथ वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली सेतूचे नवे संचालक मंडळ कार्यरत आहे यापूर्वी आपण सेतू परिवार सर्वसंमतीने सर्व समावेशक व्यक्तींचा सहभाग असलेली संचालक मंडळ बिनविरोध निवडून देत होतो या वेळेला सेतू ने स्थापन केलेल्या माननीय समन्वयीस समितीच्या आणि मान्यवरांच्या प्रयत्नानंतरही दोन उमेदवारांनी उमेदवारी मागे न घेतल्यामुळे आपल्याला निवडणुकीला सामोरे जावे लागले सेतूला आर्थिक भुर्दंड सोसावा लागला मात्र समन्वयक समितीने नेमलेल्या सहकार पॅनलचे सर्व उमेदवार भरघोस मताधिक्याने निवडून आले ही निवडणूक प्रक्रिया दिनांक सात एक 2024 रोजी माननीय सौ अंजली वाघमारे यांच्या अधिकार कक्षेत पार पडली नव्या मंडळांनी दिनांक 12 2 24 पासून पदभार स्वीकारलेला आहे सेतूचे विद्यमान अध्यक्ष श्री प्रकाश काशिनाथ वर्तक हे बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त जनरल मॅनेजर असून त्यांना बँकिंग क्षेत्राचा प्रचंड अनुभव आहे त्याचा फायदा आज सेतू पतसंस्थेला होत आहे
विद्यमान संचालक मंडळा मंडळात आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा समावेश आहे. वेगवेगळ्या आस्थापनामध्ये जबाबदार पदावर कार्य केलेले दीर्घानुभवी संचालक लाभले आहेत.श्री चिंतामणभाऊ ठाकूर एक ज्येष्ठ अनुभवी कार्यकर्ते उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत या सर्व बाबींचे अवलोकन केले असता सेतूचे भवितव्य उज्वल आहे याची खात्री पटते आज सेतू आर्थिक दृष्ट्या यशस्वी वाटचाल करीत आहे आज रोजी सेतूची संपत्ती स्थिती खालील प्रमाणे आहे कोणत्याही आर्थिक संस्थेचे यशस्वीतेचे जे जे घटक आहेत तेथे सेतू ने उत्तम प्रकारे पार पाडले आहेत.
या सर्व 40 वर्षातील सेतूचा वाढता व्याप व विस्तार लक्षात घेता सेतूचा भविष्यकाळ उज्वल असल्याची खात्री पटते म्हणूनच चाळीस वर्षांपूर्वी भविष्य काळाचा वेध घेऊन ज्या कार्यकर्त्यांनी सेतूचे रोपटे लावले त्यांच्या श्रमाचे चीज झाले आहे असे मनापासून वाटते.
सेतुच्या आजपावेतो सर्व कार्यकारी मंडळातील प्रत्येक संचालक, विविध समित्या वरील सभासद ,कर्मचारी वर्ग यांचा सेतूच्या वाटचालीत निश्चितच मोठा सहभाग आहे. कोणत्याच प्रकारचे अधिकारी पद,सेवक पद नसतानाही आमच्या संस्थेबद्दल जिव्हाळा प्रेम आणि आत्मीयता बाळगणाऱ्या अनेक समाज बांधवांचाही या संस्थेच्या विकासात मोठा वाटा आहे. सर्वांचा उल्लेख करता आला नाही तरी त्यांच्या कार्याचे मोल कधीच कमी होणार नाही.. सर्वांच्या सहकार्य,मदतीशिवाय सेतूला आजचे भव्य स्वरूप प्राप्त होऊ शकले नसते. सेतू परिवारातील ज्ञात अज्ञात सर्व कार्यकर्त्यांना अभिवादन करणे माझे कर्तव्य ठरते.
वरील सर्व संस्थापक सदस्यांची त्रोटक माहिती वाचल्यानंतर, ज्या समाजबांधवांचा त्यांच्याशी कधीतरी संबंध आला असेल ,ते निश्चितपणे जाणतील की, ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रात अग्रेसर,, अनुभवी, ज्ञानी तर होतीच पण विशेष म्हणजे, प्रामाणिक आणि समाजाविषयी कळवळा असलेली होती .त्यामुळेच, मला सुरुवातीलाच अध्यक्षपद पेलताना खूप मदत झाली . प्रारंभिक काळात संस्थेला एक नैतिक अधिष्ठान देण्यात,माझ्या या सर्व सहकार्यांनी मोलाचे काम केले. त्यामुळे उत्तरोत्तर सेतु ची प्रगती होतच राहिली.पुढे आलेल्या सर्व अध्यक्ष व संस्था संचालकांनी त्या चांगल्या परंपरा चालू ठेवल्या विकास गती वाढविली
दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी सेतुच्या एका शाखेत, काही आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण झाली. काही सभासदांना विशेष बाब म्हणून त्यांना मदत करण्यासाठी कर्ज वाटप झाले.त्यामुळे संस्थेचे आर्थिक नुकसान झाले.मला अजुनही असे वाटते की तो एक अपघात होता. संबंधितांनी मुद्दाम नियोजन करून संस्थेचे काही आर्थिक नुकसान करण्याचा हेतू नसूनही तो प्रकार घडला .काही गरजू सभासदांना अडचणीत आर्थिक मदत दिली गेली. नियमांचे काटेकोर पालन झाले नाही ,मात्र त्या उपकारांची जाणीव न ठेवता मदत घेणारांनी मदत करणारांनाच अडचणीत आणले . “हिंदीमध्ये ,“होम करते हात जला”, अशा प्रकारची एक म्हण आहे. काहीतरी कोणासाठी चांगले करावयास जावे पण ते आपल्याच अंगलट यावे असाच प्रकार झाला. प्रत्येक आर्थिक संस्थेला अशा संकटातून कधी ना कधी जावे लागते. सुदैवाने आज सर्व आर्थिक नुकसान भरून निघाले असून शाखेचा कारभार व्यवस्थित सुरू आहे .अशा घटनांचा धडा घेऊन पुढील कालांत असे होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. संस्था उभारण्यास अनेकांचे कित्येक वर्षांचे श्रम असतात. मात्र संस्था नेस्तनाबूत करण्यास जास्त वेळ लागत नाही!
सुरुवातीच्या काळात विशेषतः 1984 ते 88मध्ये, जेव्हा माझ्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी होती, माझ्या व्यवसायातही मला वरिष्ठ प्रबंधक म्हणून जबाबदारी होती. ,भारत सरकारच्या,’ जागतीक ,फाॅरच्यून 500’, तेल शुद्धीकरण, आस्थापनांमध्ये, काम करतानाच खूप दमछाक होई. मुंबईतील ऑफिस सुटल्यावर सेतुच्या बोरिवली कार्यालयात येऊन इतर संचालक मित्रां बरोबर कामाची आखणी करणे, सभासद नोंदणी मुदत ठेवी साठी फिरणे जड जात असे. शिवाय शनिवार रविवारी देखील भ्रमंती होई ती वेगळीच .कौटुंबिक जबाबदाऱ्याही त्या काळात वाढलेल्याच होत्या. पण आपण करीत असलेल्या कामाचे महत्त्व कळत होते व ते एक ऐतिहासिक काम आहे याची जाणीव होती. त्यामुळे सर्वजण आपापल्या व्यवसाया तील कामांना व कौटुंबिक जबाबदाऱ्यांनाही प्रसंगी बाजूस ठेवून हे काम करीत असू!. आजचा सेतुचा व्याप व समाजाप्रती सेतू संस्थेचे योगदान पाहताना त्या दिवसांत केलेल्या कष्टांचे ,समाधान वाटते.
सल्लागार म्हणून आजही योगदान देत आहे. यावर्षी 2024-29 साठी पुढील पाच वर्षासाठी झालेल्या सेतू च्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी प्रथमच नेहमीचा ‘सिलेक्शन’ हा निकष न वापरता ‘इलेक्शन’ घ्यावी लागली.संस्थेच्या इतिहासात हे प्रथमच घडत होते. सल्लागार संचालक कर्मचारी सर्व सेतू हितेशी मंडळींनी हे आव्हान स्वीकारून ते यशस्वीपणे पार पाडले. तत्कालीन अध्यक्ष श्री पुरुषोत्तम वर्तक यांच्या नेतृत्वाखाली हे काम यशस्वीपणे पार पडले. आमचे एक कर्मचारी श्री मनीष वर्तकयांनीही खूप मेहनत घेतली. सर्वांनाच एक छान अनुभव आला .
.बघता बघता ,’सेतु को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे’ , लावलेले इवलेसे रोपटे आज 40 वर्षानंतर खूपच फोफावले आहे. सुरुवातीच्या त्या कालखंडात सेतु आमचे सर्वांचेच एक तीर्थक्षेत्र बनले होते, व आजही आमच्या भावना त्याच आहेत. तीन तपांहून अधिक काळ परिश्रमांचा हा मूर्त,मनोहारी, अविष्कार पाहतांना, कुठेतरी, सार्थकतेची भावना सुखावते.समाजाची, एक मोठी निकड,अल्पांषाने का असेना, पूर्ण करण्यात आपला हातभार लागला ही आयुष्यातील निश्चितच कृतार्थतेची भावना आहे याची धन्यता वाटते.
सुरुवातीची ही खडतर भ्रमंती चालू असताना अनेक समाजबांधवांच्या ओळखी नव्याने झाल्या .काही होत्या त्या अधिक घट्ट झाल्या. स्वार्थी तसेच निरपेक्ष वृत्तीच्या अनेक लोकांचे दर्शनही झाले. समाजजीवनाची जवळून ओळख झाली. एका गृहस्थांचे घरी आम्ही वर्गणी व सभासद नोंदणीच्या निमित्ताने गेलो होतो. गृहस्थ सुखवस्तू होते. सेवानिवृत्तीनंतर आरामाचे जीवन जगत होते. मुले बाळही चांगल्या उच्चपदी होती. मात्र त्यांनी,सेतुचे सभासद होण्यासच नकार दिला .ठेव देणे तर बाजूलाच! आम्हाला स्पष्ट शब्दांत समज मिळाली ..” मी आपणास ओळखतच नाही, तर माझे पैसे तुमच्याकडे कसे ठेवू??”.. खरोखरच त्या भल्या माणसाने, आम्हाला रिकाम्या हाताने , जड अंतःकरणाने परत पाठविले!! मात्र त्यांनी आम्हाला एक सुंदर धडा शिकविला,
“तुम्ही भले “आम्ही समाजोपयोगी काम करतो..” असे समजत असाल, म्हणून प्रत्येकानेच तुम्हाला मदत करावी हे गृहीत धरू नका…अपमानास्पद वागणूक ही संयमाने घ्यायला शिका.. आपल्या ध्येयाप्रत वाटचाल चालू ठेवा!”
याउलट दुसरा एक माणुसकीचा गहिवर अनुभवलेला प्रसंग. एका निवृत्त गिरणी कामगाराच्या घरी आम्ही गेलो होतो. गृहस्थ नुकतेच सेवानिवृत्त होऊन, प्राॅ.फंडाचे व ग्रॅच्युएटिचे सर्व पैसे त्यांना मिळाले होते .या सद्गृहस्थांनी ,काही लाखाचे ते सर्व पैसे ,दीर्घ मुदतीची ठेव म्हणून आमच्याकडून सुपूर्द केली. एकच विनंती केली
, “ महिन्याला, माझ्या घरखर्चासाठी म्हणून,व्याजाचे जेवढे पैसे होतील तेवढे देत जा!”..
समाज बांधिलकीच्या गोष्टी आपण सर्वजण करीत असतो,मात्र अशाप्रकारे कोणताच बडेजाव न करता,आपण,खूप मोठी सामाजिक बांधिलकी दाखवत आहोत याचा जराही अविर्भाव न आणता, एका निवृत्त कामगाराने त्या काळात आम्हाला दिलेली मदत ही अमोल आहे . त्यांचे नाव श्री. बाबुराव पाटील. अशा लोकांमुळेच कुठेतरी कोणासाठी कष्ट करण्यात खस्ता खाण्यात आनंद मिळतो. श्री. पाटील यांचा आम्ही एका कार्यक्रमात आवर्जून सत्कार केला होता .
सेतुवर असेच प्रेम करणाऱ्या कै. दत्ताभाऊ राऊत बोर्डी, गोरेगाव यांचे देखील उदाहरण लक्षात ठेवण्या सारखे आहे. दत्ताभाऊंना ज्या दिवशी मुंबईच्या महापौरांकडून, “आदर्श शिक्षक “म्हणून पारितोषिक मिळाले, ते हजार रुपये, लिफाफाही न उघडता, त्यांनी सेतु कार्यालयात आणून,देणगी म्हणून सुपूर्द केले. ते केवळ एक हजार रुपये नव्हते तर त्याला बिलगलेले दत्ताभाऊंचे सेतू संस्थेवरील प्रेम हे शंभर नंबरी सोने होते. अशा लोकांच्या निस्सीम प्रेमामुळेच हेतू अजूनही पुढे जात आहे व अशीच पुढेही वाटचाल करीत राहील!
सेतुच्या पायाभरणीत व उभारणीत ,आजच्या वाढत्या वैभवात माझे योगदान किती ते मला माहित नाही ,मात्र ते जरी नगण्य असले तरी त्यामुळे मला एक सात्विक समाधान निश्चित मिळाले .माझा समाज मला जवळून पाहता आला .अनेक मित्रांशी कायमची नाती जडली. या अनुभवाचा उपयोग पुढे, सो.क्ष संघ फंड ट्रस्टचा, कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करण्यात मला खूप उपयोगी पडला . बोर्डीमधील सहकारी पतपेढीचे, सेतुमध्ये विलीनीकरण घडवून आणण्यात, माझाही थोडा हातभार त्या काळांत लागला, हीदेखील खूप आनंददायी घटना.आम्ही भरपूर भटकंती केली,फिरलो, सभा मिटिंगज्, घेतल्या. मात्र त्या पहिल्या आठ दहा वर्षाच्या कालखंडात, आम्ही सर्व सहकाऱ्यांनी , एकही पैशाचा विनियोग, चहापाणी ,प्रवासभत्ता वा इतर कोणत्याही वैयक्तिक लाभासाठी खर्च केला नाही. यावरूनच जाणकारांनी काय ते जाणावे….परमेश्वराची पूजा म्हणजे तरी काय असते? आपल्या स्वकर्म कुसुमांची पूजाच,देवाला अधिक भावते. तीच कर्मपुष्पे, ईश्वरचरणी रुजू होतात,आणि त्यामुळेच भवतालाला चैतन्य प्राप्त होत असते., …या ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दातच या लेखाचा समारोप करतो.
तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा,
पूजा केली होय अपारा, तशा लागी.!
आमच्या सेतू को-ऑपरेटिव्ह क्रे.सोसायटीचा भविष्य काल ही असाच दिवसेंदिवस उज्वल होतं जावो हीच त्या सर्वात्मकाकडे विनम्र प्रार्थना!!
दिगंबर राऊत,
माजीअध्यक्ष, सेतु. को-ऑ. क्रे. सो. लि.
गेले ते दिन गेले , पण गत स्मृतींचा सुंदर खजिना . सेवाभावी तरुण कार्यकर्त्यास नक्कीच प्रेरणादायी ठरावा असा एक अनमोल नजराणा .
अतिशय सुंदर लेख. सेतूच्या कार्याचा उत्तमच आढावा तसेच कार्यकर्त्यांची माहिती यामधे आली आहे.
सेतू च्या या गोवर्धन पर्वता एवढ्या कार्यात अनेकांचा हातभार लागला आहे….
अनेक वार्षिक कार्यक्रम, संपन्न झाले..
गावोगाव चे लोक येत. अशाप्रकारे माणसे जोडली गेली..
काही काळापूर्वी आर्थिक सहाय्य ही खरोखरच
अपूर्वाई ची गोष्ट होती जी सेतूने केली.. अप्रतिम लेखासाठी श्री.दिगंबर राऊत यांना मनःपूर्वक धन्यवाद .
डाॅ. देवराव पाटील आणि डाॅ. नीला पाटील
मी साधारणतः 1980 च्या सुमारास पुज्य तात्यासाहेब चूरी वसती गृहामध्ये राहायला होतो. मी ठाणा येथे सिविल ड्रॉफ्समन,आयटीआय पूर्ण करून मुंबईला अंधेरी येथे एका आर्किटेक असोसिएट्स ऑफिसला कार्यरत होतो. त्यावेळी वलसाड टू बलसाड असे केळवे मुंबई जा ये करत होतो. त्यावेळी आमचे गाडीतील सहकारी श्री जगन्नाथ म्हात्रे, श्री जयवंत म्हात्रे, श्री नरेंद्र दाजी वर्तक आदी सेतूसाठी काम करणारे आमच्याबरोबर बोरिवली मुंबई पर्यंत बलसाडने जा ये करीत होते.
यांनीच मला आणि बल्साड ने रोज अप डाऊन करणाऱ्या सोक्ष समाजाच्या नोकरी धंदा करणाऱ्या लोकांना सेतूचे मेंबर केले. त्यावेळेला कामावरून परतल्यावर संध्याकाळी बलसाड ने बोरिवलीला उतरल्यानंतर तहान भूक विसरून श्री नरेंद्र वर्तक श्री जगन्नाथ म्हात्रे श्री जयवंत म्हात्रे सेतू मध्ये जात असत. सेतूसाठी या लोकांनी जीवन वाहून घेतले होते.
यां सर्वांच्या पत्नी समजून घेत असत, की आपले पती … एक समाजाच मोठा काम करीत असल्यामुळे पतीचे घरी उशिरा येण्याचे सहन करत असत .
बलसाडने आम्ही केळवेकर घरी जाताना आम्ही केळव्यामध्ये साडेआठला घरी पोहोचत. त्यावेळी सुद्धा वरील लोक सेतूच्या ऑफिसमध्ये बोरिवलीला रात्री काम करीत असत. ही एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. अशी समाज समाजहितासाठी पछाडलेली माणसं फक्त सोमवंशी क्षत्रिय समाजातच आहेत असं मला वाटतं. वरील व्यक्ती व्यतिरिक्त माझ्या अनुभवातील मुंबईत स्थायिक असलेले तुम्ही स्वतः व श्री हरिश्चंद्र मुकुंद चौधरी (बालम), श्री सदानंद म्हात्रे, श्री गोपीनाथ वर्तक, श्री प्रमोद जगन्नाथ पाटील, श्री पुरुषोत्तम वर्तक आधी अनेक लोकही सेतूसाठी तन-मन-धन-काळ-वेळ देऊन काम करत होते. त्यामुळे आज सेतूला चांगले दिवस आलेले आहेत. आपण सर्वांनी हा इतिहास रचला आहे. तुम्हाला सर्वांना सलाम.
भाई, आपल्या समाज्याच्या प्रमुख दोन अर्थवाहिन्या आहेत. एक वसई विकास सहकारी बँक. तर दुसरी सेतू को -ऑपरेटीव्ह क्रिडीत सोसायटी. आज आपण सेतू क्रिडीत सोसायटीला स्पर्श केला. त्यामुळे ज्यांनी भरभरून योगदान दिले त्यांची ओळख या आपल्या महत्वपूर्ण लेखाने समजले. भाई आपण कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण लेखन करता. ते पण सुंदर भाषाशैलीने. खरेतर आपण एखाद्या प्रमुख वृतपत्राचे संपादक असायला हवे होते. असो.सदानंद म्हात्रे तथा भाईंना मी माझ्या बालपणा पासून अनुभवले आहे. त्यांची शिस्त, त्यांचा टापटीपपणा, वेळेला प्राधान्य या सर्व गोष्टी त्यांच्यात उपजत होत्या. कारण त्यांचे शिक्षण माहीम येथे त्यांच्या मामा कडेच झाले. म्हणजे माझ्या शेजारीच. माझे काका कै. भालचंद्र चौधरी म्हणजेच तुमचे साडू हे दोघे जिवलग मित्र होते. त्या काळात पत्र व्यवहाराने ते एकमेकांना खुशाली कळवत. या निमित्ताने का होईना भाई विषयी मला लिहण्याची संधी मिळाली. अशाच आपल्या लेखनाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
सेतु को.ऑप.क्रे.सो.लि.साठी प्रथम संचालक मंडळांनी((संचालकांनी) तन,मन,धन, वेळ खर्च करून सामान्य सभासदांच्या (आर्थिक गरजूंसाठी) हितासाठी आपले योगदान दिले.त्यांचे यथार्थ अभिनंदन! श्री दिगंबर राऊत यांनी मेहनत घेऊन केलेल्या या लेखनाबद्दल अभिनंदन व आभार आभार!
नमस्कार मित्रांनो बिल्कुल सही मी आपल्या मताशी सहमत आहे कर्ता करविता परमेश्वर आहे आपण फक्त निमित्त
सेतू को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची
मोठी बॅंक झालेली मला बघायची आहे
माझा कडून खूप खूप शुभेच्छा ओम शांति जय हिंद जय वाडवळ सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास श्री हरेश्वर भा चौधरी वसईकर शाखाध्यक्ष अंधेरी
9137554399
खूप छान माहिती मिळाली आहे .
ही माहिती एक ऐतिहासिक दस्तावेज आहे ।
खूप गोष्टी नव्याने कळल्या .धन्यवाद
तेथे कर माझे जुळती
I am] Deepali Sanjesh:
Thank you so much, Kaka, for writing this one!
You are doing a good job for our society.
सेतू को. ऑप.क्रे.सोसायटी च्यां स्थापना आणि भरभराटी करीता ज्यांनी ज्यांनी आपला अमूल्य वेळ आणि योगदान दिले आहे त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार
आपले लेख नेहमीच अभ्यासू वृत्तीने लिहिलेले व माहितीपूर्ण असतात मला आवडतात.
सेतुवरील लेख खूपच अर्थपूर्ण आहे .
आपण नेहमीच अशी नवीन माहिती देत असतात,त्याबद्दल धन्यवाद
सेतू को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या स्थापनेमागे एवढा मोठा इतिहास असेल हे माहीत नव्हते सर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक धन्यवाद..
यावर्षीच मला सेतू को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा निर्देशक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सेतूचा इतिहास जरी मला माहीत असला तरी या लेखामुळे नवीन माहिती मिळाली.
सेतूच्या यशासाठी सर्व प्रयत्न करू.
बंधू, सेतूचा निर्माण-इतिहास एवढ्या विस्तृतपणे देऊन तुम्ही मोठे काम केले .मी सेतु सोसायटीचा सभासद असलो तरी ही पार्श्वभूमी माहीत नव्हती. आपले धन्यवाद
बंधू नमस्कार ,
तुमची गोष्ट खरी आहे, कोणतेही चांगले काम (समाज प्रबोधनाचे) तोच करवीतो त्याचाच ईश स्पर्श असतो म्हणूनच असल्या कामाने ऐक मानसिक समाधान व आनंद असतो. परंतु त्यात आपण स्वतःची बौद्धिक निपूणता अर्पण करण्यासाठी निमित्त बनण्यात हिम्मत लागते!
ती आपण दाखवीत आहात. त्या साठी नमस्कार.
Bandhu,
Hats off to you for detailed article on Setu.
One suggestion about full name of Late Shree Ravi Thakur (Balu bhai).
He always insisted for his full name as – Ravindranath BhaskarraoThakur.
मामा, मी तुमचे लेख नेहमीच वाचते .
आज एका मोठ्या संस्थेचा परिचय तुम्ही करून दिलात .सेतुचे नाव ऐकत होते मात्र हा इतिहास अनभिज्ञ होता।
आपल्याला धन्यवाद.
*Heartiest congratulations for your new book*
I am a member of the Setu society and many times visit the main office at Borivali. I always get very respectful and prompt attention from the staff .Thank you for your detailed information on Setu CCsociety.
तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी
व
संग्रही ठेवlवी अशी उपयुक्त्त माहिति.
आभार आणि अभिनंदन
काका लेखक म्हणून तुम्ही आम्हाला माहित आहेतच ,मात्र सध्या अमेरिकेत ही वेळ काढून अशी छान माहिती आम्हाला पाठवीत असता, आपल्याला धन्यवाद व आपले .आभार सर्व समाजासाठी आपले काम स्तुत्य आहे ..
रवी बुजड,सरपंच घोलवड.
*बंधू, नमस्कार !*
*सेतु चे एक सुंदर शिल्प ऊभारून तुम्ही आमच्या हाती सोपवले आहे.*त्या मधे अनेकविध रंग भरून ते अधिकाधिक उजळ करण्याचे प्रयत्न आमचे असतील!*
*आपले आशिर्वाद आमच्या पाठीशी असु ध्यात!
सेतुचा आठवणी वजा इतिहास अतिशय मोजक्या आणि यथायोग्य भाषेत तुम्ही वाचकांपर्यंत पोहोचवला आहे.
आपणांस त्रिवार, धन्यवाद!
धन्यवाद।
सेतूच्या पुढील वाटचालीसाठी सर्व शुभेच्छा
जगन्नाथ पाटील ,वार्ताहर ,माजी चिटणीस सो क्ष संघ
बंधू, आपला सेतू क्रेडिट सोसायटी वरील लेख मनापासून वाचला. खूपच वाचनीय व माहितीपूर्ण वाटला .
आपले सर्व लेख वाचत असतो. नवीन पुस्तकास शुभेच्छा
प्रिय दिगंबरभाई,
नमस्कार.
‘सेतू’च्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून तुम्ही सेतूच्या उगमाची, विस्ताराची कथा फार उत्तमपणे मांडली आहे. जाता जाता समाजासाठी मोठं योगदान देणाऱ्या अनेक समाजरत्नांचाही परामर्ष घेतला आहे.
तुमचं मूळ प्रेरणास्थान म्हणजे तुमचे वडील हे तुमचं म्हणणं अगदी खरं. शिक्षकत्व त्यांच्या रोमारोमांत भिनलेलं. त्यानां पाहण्याचा योग आला नाही पण माझ्या लहानपणापासून त्यांच्याविषयी खूप काही कानावर यायचं.
पुढील आयुष्याचं कार्यक्षेत्र निवडताना ते सोमवंशी क्षत्रिय समाजापुरतं असावं असा नियम स्वतःसाठी घालून घेतला असं तुम्ही म्हटलं आहे. जगाच्या पाठीवर असंख्य समाज आपापल्या धारणा, भौतिक स्थिती इत्यादीसह निर्वाह करीत आहेत. आपला सो. क्ष. समाज -वाडवळ समाज- हा त्या समाजांच्या तुलनेत संख्याबळातं पाहता अति अल्प, लहानशा जमीन परिघात वास्तव्य करून असलेला. भौतिक आणि तथाकथित प्रागतिकतेची परिमाणं लावली तर जागतिक स्तरावर तसा नगण्यच. पण वैचारिक धारणा, आचरण इत्यादींचा विचार केला तर असा गौरवशाली समाज अन्यत्र सापडणं दुर्मिळच. या समाजात जन्म घेणं परमभाग्याचं असं मला वाटतं.
या समाजाचं जगणं धरणीमातेशी जोडलेलं. जमिनीशी घट्ट नातं. एकूणच जगणं श्रम- मेहनतीचं. झाडं पानं, गाय, बैल, गुरं……. ही कुटुंबाची सदस्यमंडळी. पाण्याशीही घट्ट नातं. वाडी शिंपताना रोजच वाहत्या पाण्याशी संबंध.
घरात स्त्रीचं महत्व मोठं. रीतीरिवाजाचं मोठं अवडंबर नाही. लग्नात हुंड्यासारख्या जाचक रीतीचा विचारही केला जात नाही.आणि अशा कितीतरी गोष्टी…. काळानुसार बदल होताहेत पण त्याकडे ‘कालाय् तस्मै नमः। ‘ या अर्थानच पाहावं लागेल.
चाळीस वर्षांपूर्वी लावलेलं सेतूचं रोपटं चांगलंच फोफावलं आहे. त्यात अनेकांनी लावलेल्या हातभाराचा तुम्ही आवर्जून उल्लेख केला आहे. सेतूच्या ऑफिसमध्ये प्रवेश केल्यावर आणि तिथं असेपर्यंत एका चांगल्या ‘कल्चर’चा अनुभव ग्राहकांना आणि भेट देणाऱ्याला येतो. सेतूच्या कर्मचारीवृंदाचं हे श्रेय उल्लेखनीय आहे.
तुमचं हे लेखन एकूणच उत्तम समाजप्रबोधनाचं आहे. ते वर्धिष्णू व्हावं यासाठी शुभेच्छा!
-अप्पा
(पंढरीनाथ सावे)
११ में २०२४
बंधू लेख चांगला आहे. मी सेतूला 1989-90 ला अंतर्गत हिशोब तपासनीस ते विकास समितीचे सदस्य व दोन टर्म कार्यवाह व एक टर्म उपाध्यक्ष होतो. नंतर पुन्हा सल्लागार समिती चा निमंत्रित सल्लागार होतो व आता 1923 साली तुम्ही व गोपीनाथ भाई आग्रही होते म्हणून पुन्हा एकदा डायरेक्टर म्हणून कमिटीत आलो. 1989-90 ते 2015 व 2017 ते 2022 निमंत्रित सल्लागार व पुन्हा 2023 ला व्यवस्थापक मंडळात आहे. सर्वांचे नावे घेणे शक्य नाही हे खरे . पण विविध पाटील यांनी दखल घेतली . तुमच्या माहितीसाठी
मी सेतूचा सदस्य अगदी सुरवातीपासून होतो. आता जेष्ठ नागरिक म्हणून ठेवीवर ७% अधिक व्याजदर मिळवत आहे. हा दर देणाऱ्या फार संस्था नाहीत, तेव्हा सेतूचे आभार! सुरवातीच्या काळात अनेक लोकांनी सेतूला मदत केली. काही नावे इथे आहेत, इतरही काही लोकांचा नुसता उल्लेख केला असता तर बरे झाले असते. अशी नुसती यादी दिली तरी त्याने आभार प्रदर्शन होते. मला अनेक नावे माहित आहेत पण देत नाही कारण त्यामुळे तुमच्या उत्तम लेखाला कमीपणा नको.
सेतूचे संकेतस्थळ https://setuco-opcredit.com/ आहे. त्यात्तर संस्थापकांची आणि संस्थापनची काहीच माहिती नाही! अनेक समाजबांधवांनी सेतूचा लाभ घेतला त्यांना त्यामागचा इतिहास, लोकांचे कष्ट याची कल्पना नाही आणि सेतूने ते सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. समाजासाठी असे संकल्प करून ते तडीस नेणाऱ्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार!
नमस्कार बंधू, सेतू ची अगदी सुरुवातीपासून ची सविस्तर माहिती मिळाली.आपले खूप मोठे योगदान आहे. समाजसेवेचा वसा घेतलेली माणसे च असे चांगले काम करू शकतात. मलाही माझ्या मुलाला परदेशी शिक्षण घेण्यासाठी सेतूचा खूप मोठा आधार मिळाला आहे. धन्यवाद .
बंधू नमस्कार बंधू तुम्ही कोणत्याही विषयावर खूप छान व अभ्यासपूर्ण लेखन करतात ते देखील सुंदर भाषण भाषाशैलित त्यामुळे तो एक लेख एक एक संग्रही ठेवावा असा ठेवा असतो त्या सर्व लेखा प्रमाणे हा देखील अपवाद त्याला अपवाद नाही आहे. काही आठवण करून देण्याजोग्या गोष्टी
सुरुवातीचा कर्मचारी वर्ग अनिल राऊत केळवे किरण चौधरी माकुंणसार अरविंद राऊत बोर्डी प्रभाकर मांडवकर दहिसर यांनी त्यावेळी अल्प अशा पगारावर सकाळी साडेअकरा ते रात्री आठ पर्यंत सेवा दिली त्यात प्रभाकर मांडवकर हा पार्ट टाइम कामावर येत होता व तो बऱ्याचदा काही राहिलेले काम घरी नेऊन पूर्ण करत असे.
त्याचप्रमाणे श्री जयवंत प पाटील दहिसर चिंचणी श्री यशवंत म्हात्रे बोरीवली मांकुंसार जुने सेतूचे काही पदाधिकारी यांचा उल्लेख हवा होता. तसेच आपल्या सेतूची सुरुवात श्री जयवंत म्हात्रे केळवे बोरिवली यांच्या घरातून झाली व नंतर श्री कै दत्तात्रय स सावे केळवे बोरिवली यांच्या घरी आल्यानंतर नवीन जागा घेण्यात चा निर्णय झाला. त्यानंतर स्वर्गीय श्री रामभाऊ वर्तक यांच्या प्रेसची जागा रू पंधरा ते सोळा हजार रुपयाला घेण्याचे निश्चित झाले. हा निधी जमा करण्यासाठी दिनानाथ मंगेशकर ला एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी मी बिनीलॉन लॅब या औषधी कंपनीची रुपये 5000 ची स्पॉन्सरशिप मिळवून दिली व रुपये 2500 च्या इतर जाहिराती मिळवून दिल्या एकूण रुपये 7500 सेतूला मिळवून दिल्यामुळे माझा त्याच कार्यक्रमात मुख्य पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता. तसेच मी 12 ते 14 वर्षे सहकार्यवाह, कार्यवाह व कोषाध्यक्ष म्हणून सेवा दिली आहे. त्याकाळी माझ्याकडे स्कूटर होती व ती मी स्कूटर इतर पदाधिकारी यांना घेऊन कधी कधी ठेवीदाराकडे तर कधी कर्ज वसुलीसाठी कर्जदाराकडे जात असू. पण मी कधीही पेट्रोल खर्च मागितलेला नाही.
माहितीपूर्ण लेख आवडला.
चाळीस वर्षांपूर्वी लावलेल्या सेतू नामक रोपट्याचे आज एका बहरलेल्या वृक्षात झालेले रुपांतर पाहणं सर्व आद्य संस्थापक सदस्यांसाठी खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन.
सेतूची पुढील काळात अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा.