श्री दिगंबर राऊत यांना वैचारिक लेखन पुरस्कार

श्री पद्मनाभ शिष्य संप्रदाय श्री हरी मंदिर श्रीक्षेत्र माकुणसार या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व धार्मिक न्यासातर्फे शनिवार दिनांक 21 नोव्हेंबर 2026 रोजी 116 वा वार्षिक श्री हरी महोत्सव संपन्न झाला.
याप्रसंगी श्री दिगंबर वामन राऊत घोलवड बोर्डी यांना प्रथम श्रीहरी वैचारिक लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला .श्री दिगंबर राऊत हे रासायनिक तंत्रविज्ञान शाखेचे जाणकार व अभ्यासू व्यक्तिमत्व असून सामाजिक कार्यकर्ता लेखक म्हणून ही ओळखले जातात.
समाजासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या समाजसेवक व गुरुजनांचा उचित गौरव व्हावा व तो इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा या हेतूने त्यांनी लेखन केले आहे.
आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “तस्मै श्री गुरुवे नमः ” हा ग्रंथ तसेच ठाणे-पालघर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक सामाजिक कार्यकर्ते यांची माहिती मोठ्या मेहनतीने जमवून “पूजनीय आधारवड” हा ग्रंथ लिहिला आहे. सुप्रसिद्ध प्रकाशन संस्था ग्रंथाली यांनी हे दोन्ही ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत.
या साहित्य सेवेचा गौरव करण्यासाठी श्रीहरी मंदिर न्यासाने त्यांना प्रथम वैचारिक लेखन गौरव पुरस्कार प्रदान करून रोख रक्कम ,मानपत्र, गौरव चिन्ह देऊन सन्मान केला.
याप्रसंगी परमपूज्य पद्मनाभस्वामी संप्रदायातील स्थानिक, पुणे, मुंबई ,कोल्हापूर, सातारा, बेळगाव, बेंगलोर अशा विविध भागातील संत-महंत मंडळी उपस्थित होती.
माननीय श्री राजीव जी पाटील हे कार्यक्रम अध्यक्ष तर श्री सचिन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .या कार्यक्रमास लेखक, कवी ,साहित्यिक, पत्रकार वाचक ,कवी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
श्री रामकृष्ण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाची सुरेख नियोजनबद्ध आखणी केली. श्री दिगंबर राऊत यांनी आपल्या भाषणात ,लेखनाची पार्श्वभूमी व संदर्भ विशद करून, हा गौरव माझ्या गुरुजनांचा आहे ,असे विनम्रपणे विशद केले.
भाषणातून व्यक्त झालेले विचार:
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात श्री. दिगंबर राऊत यांनी आपल्या लेखनाची पार्श्वभूमी, प्रेरणा आणि या गौरवामागील हेतू विशद केला. आपण जे काही लिहिले, ते स्वतःच्या नावासाठी नसून आपल्या गुरुजनांच्या ऋणातील एक छोटासा हिशोब आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
श्री राऊत यांच्या भावना:
कृतज्ञता आणि “पहिला” पुरस्काराची जबाबदारी श्रीहरी मंदिराचे विश्वस्त मंडळ, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षा सौ. स्मिता पाटील, निमंत्रक श्री. रामकृष्ण यादव पाटील आणि समितीचे सर्व सदस्य यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. याच सोहळ्यात श्रीहरी लेखन गौरव पुरस्काराने गौरविले जाणारे ज्येष्ठ साहित्यिक श्री. वर्जेश सोलंकी आणि कवयित्री सौ. संगीता पाटील यांचेही त्यांनी अभिनंदन केले. यावर्षीपासून सुरू झालेल्या वैचारिक लेखन पुरस्काराचा पहिला मानकरी होणे हा सन्मान असला, तरी पुढील मानकऱ्यांसाठी हा पुरस्कार किती उंचीचा असावा, हे ठरवण्याची जबाबदारीही या सन्मानासोबत आली आहे.
हा पुरस्कार माझा नाही, माझ्या गुरूंचा आपल्या पहिल्या ग्रंथाचे नावच त्यांनी ‘तस्मै श्री गुरूवे नमः’ ठेवले आहे. आचार्य भिसे, चित्रे गुरुजी, आत्माराम पंत सावे — बोर्डीच्या शाळेचे तीन दीपस्तंभ — आणि त्यांच्याही आधी आपले आप्पा, वामन देवजी राऊत, हेच आपले पहिले गुरू आहेत. गुरूंच्या ऋणाचा हिशोब होऊ शकत नाही; आपण केवळ एका थेंबाने समुद्राला वंदन केले आहे, अशी विनम्र भावना त्यांनी व्यक्त केली.
बोर्डी आणि माकुणसार यांचा जुना ऋणानुबंध १९२१ मध्ये सोमवंशी क्षत्रिय संघाने समाजाची पहिली प्राथमिक शाळा १९ ऑगस्ट रोजी माकुणसार येथेच सुरू केली होती आणि त्या कामात बोर्डीचे आत्मारामपंत सावे यांचे मोठे योगदान होते. त्यामुळेच बोर्डीच्या एका विद्यार्थ्याचा माकुणसारमध्ये गौरव होणे हे शंभर वर्षांच्या नात्याचे वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटते, असे त्यांनी सांगितले.
लेखनाचा प्रवास — लिहायला वय लागत नाही. निवृत्ती म्हणजे थांबणे नाही. हिंदुस्थान पेट्रोलियममधून निवृत्त झाल्यानंतर, कोरोना लॉकडाउनच्या काळात घोलवडला आईची सेवा करताना शाळेतील गुरुजनांच्या आठवणी लिहायला सुरुवात झाली. मुलगा श्रीदत्त याने ब्लॉग उभा केला, जुन्या वर्गमित्रांनी देश-विदेशातून प्रतिसाद दिला आणि “अजून लिहा” असे आवाहन केल्यानंतर लेखांचे पुस्तक झाले. ग्रंथालीने ‘तस्मै श्री गुरवे नमः’ हे पुस्तक शाळेच्या स्थापना दिनी, ११ जानेवारी २०२४ रोजी प्रकाशित केले; त्याचा इंग्रजी अनुवाद ‘Revered Teachers of Bordi’ २०२५ मध्ये आला. ‘पूजनीय आधारवड’ या ग्रंथातून ठाणे-पालघर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक व समाजकार्यकर्त्यांची माहिती जपली. पत्नी सौ. मंदाकिनी या आपल्या लेखनाच्या “पहिल्या वाचक आणि पहिल्या टीकाकार” असल्याचे त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले आहे.
वैचारिक लेखन का महत्त्वाचे वैचारिक लेखन म्हणजे विस्मृतीत गेलेल्यांना पुन्हा उभे करणे, असे त्यांना वाटते – याचे उदाहरण म्हणजे माकुणसारच्याच स्वातंत्र्यसैनिक कै. यशवंत बारक्या पाटील उर्फ अण्णा यांचे स्मरण. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात दादरला पायी गोळी लागूनही ते पोलिसांच्या हाती सापडले नाहीत; मात्र स्वातंत्र्यानंतर ते विस्मृतीत गेले. २०२२ मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्यावर लेखन करण्याची संधी ब्लॉगमध्ये मिळाली. “ज्यांनी आपल्यासाठी शरीर दिले, त्यांना आपण विसरतो, हे कसे चालते?” हा प्रश्न आजही तितकाच संबंधित आहे. धनबाई, गोविंद चुरी, आचार्य भिसे, अण्णा पाटील यांच्यासारख्या माणसांचे कार्य नोंदवले नाही तर ते पुढील पिढीपर्यंत पोहोचणार नाही. लेखन म्हणजे केवळ गौरवगान नाही; कुटुंबीयांशी बोलणे, जुनी कागदपत्रे व छायाचित्रे शोधणे आणि तथ्यांवर आधारित लिहिणे, हेच खरे वैचारिक लेखन आहे अशी त्यांची प्रामाणिक भावना आहे.
समर्थ रामदासांच्या ओवीचा आधार घेतला तर
दिसामाजी काहीतरी ते लिहावें । प्रसंगीं अखंडित वाचीत जावें ॥
तरुणांना आवाहन: लेखणी कोणत्याही वयात हातात घेता येते, असा संदेश तरुणांना देत आपापल्या गावाचा इतिहास लिहिण्याचे त्यांचे आवाहन आहे. आई-वडील, शिक्षक आणि गावातील कर्तृत्ववान माणसे यांच्या आठवणी ज्येष्ठ हयात असतानाच नोंदवून ठेवाव्यात; ब्लॉग, मोबाईल व सोशल मीडिया ही माध्यमे लेखनासाठी वापरावीत आणि सुरुवात छोट्या लेखानेही होऊ शकते.
पद्मनाभ परंपरेचा लेखकीय वारसा: हे मंदिर ज्या पद्मनाभ परंपरेचे आहे, त्या परंपरेचे संस्थापक पूज्य सद्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी स्वतः लेखक होते. या परंपरेचे पुढे नेणारे त्यांचे गुरू — सद्गुरू देव मामलेदार. ते स्वतः सरकारी दरबारात मामलेदार होते; प्रपंच सांभाळून परमार्थ साधला. करिअर आणि अध्यात्म एकाच आयुष्यात साधता येतात, हे त्यांचं जीवनच सांगतं. आणि म्हणूनच, नोकरी करून निवृत्त झालेल्या एका माणसाला या मंदिरात लेखनासाठी गौरव मिळतो, तेव्हा ते सुसंगत वाटते.
मुंबईत करीरोडला, गिरणी कामगारांच्या वस्तीत, कातळाच्या शिळेवर बसून स्वामींनी साध्या भाषेत केलेला उपदेश आणि त्यातून झालेले समाजप्रबोधन याची आठवण येते. ‘जातवेद महावाक्यांग’, ‘वेदान्त कौमुदी’, हरिपाठ व ‘सुबोध भजनमाला’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले. ज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत पोहोचवणे, व्यसनमुक्ती, सद्विचार हाच या परंपरेचा धर्म आहे. त्यांचं खरं काम कुठं झालं, माहितीये? मुंबईत. करीरोडला. त्या काळी तिथं गिरणी कामगारांची वस्ती होती. दारूच्या गुत्या. ताडीची दुकानं. तिथं, एका कातळाच्या शिळेवर बसून ते रोज उपदेश करायचे. आणि काय सांगायचे?
“बाबानो, पोटासाठी मुंबईत आलात. पण या दारूने तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं काय होतंय, याचा विचार करा.”
साधी भाषा. कठीण शब्द नाहीत. शास्त्राचा दणका नाही. कष्टकरी माणसाच्या भाषेत, त्याच्याच दुःखातून बोलले.
आणि ते चाललं. लोक व्यसन सोडू लागले. गर्दी वाढली. ती जागा पुरेनाशी झाली. मग सुमारे १९०० साली त्यांनी ती जागा विकत घेतली आणि तिथं दत्त मंदिर उभं केलं. तिथूनच ‘श्री पद्मनाभस्वामी शिष्य संप्रदाय’ सुरू झाला.
१९०३ साली ते पालघर तालुक्यातही आले. आणि आज आपल्या जिल्ह्यात — टेंभोडे, पालघर इथं — त्यांचं समाधी मंदिर आहे. अध्यात्माबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात हिरिरीने सहभाग घेत असताना, बुजुर्ग व नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हे मंदिर दरवर्षी साहित्यिक पुरस्कार देते; यंदाचं हे दहावं वर्ष. म्हणूनच या मंदिराने लेखकाला पुरस्कार देऊन सन्मानित करणे हा योगायोग नाही, ती त्या परंपरेचीच पुढची पायरी आहे.







