मी मोठी आई बोलते, भाग १८ – चिंचणी, अलभ्य शेजारी व अविस्मरणीय आठवणी!
मोठीआई आता आमच्यात नाही. पण मोठीआईची १०४ वर्षाची कहाणी तिच्याच शब्दात लिहिली होती, अनेकांच्या विनंतीनुसार त्याचे लेखांक चालू ठेवीत आहे.

चिंचणी मधील आमचे घर प्रशस्त होते हे मागे सांगितलेच आहे. चिंचणीतील प्रसिद्ध चुरी कुटुंबीयांचा तो वाडा होता. पुढे वाढत्या कुटुंब संख्येनुसार त्याचे विभाग होतो गेले. दादा म्हणजे जगन्नाथ मंगळ्या चुरी, कुटुंबाच्या भागात आम्ही राहत होतो. चार भागात वेगवेगळी कुटुंब राहत होती.
आमच्या घरालगत गाळ्यात वसईचे श्री के के वर्तक गुरुजी राहत असत. त्यांच्या पत्नी सौ गौरीताई व ज्योती-श्रीनंद ही मुले असे कुटुंब होते. पपी,नीलमचे बालमित्र होते. वर्तक गुरुजी चिंचणी च्या शाळेत शिक्षक होते.अतिशय बुद्धिमान अभ्यासू व रोखठोक सभावाचे वर्तक गुरुजी आम्हाला मोठा आधार होते. सेवानिवृत्तीनंतर ते सहकुटुंब वसईस रवाना झाले. मात्र त्यानंतरही आमचे व्यक्तिगत संबंध अनेक वर्ष होते. आमच्या उषामाईचे सासर मुळगाव-वसई, काका वर्तकांचेही तेथेच वास्तव्य असल्याने माईच्या मार्फत आम्हाला एकमेकांची खुशाली समजत असे. आज काका व गौरीताई निवर्तले आहेत. मात्र गौरी व श्रीनंद आमच्याशी संपर्कात आहेत.
चिंचणी येथील वास्तव्यात एक विचित्र, धोकादायक प्रसंग वर्तक कुटुंबावर आला होता. रविवारी दुपारी लपंडाव खेळताना सातआठ वर्षाची गौरी मागीलदारच्या विहिरीत अचानक पडली. नुकताच पाऊस पडून गेल्याने विहीरही तुडुंब भरली होती. सुदैवाने काका घरी असल्याने त्यांनी विना विलंब विहिरीत उडी घेऊन गौरीला आधार दिला, बाहेर काढले. त्यादिवशी काका घरी नसते तर… ?? हा विचार आजही मनाचा थरकाप करतो? पण सर्वांचे नशीब थोर. गौरी वाचली. आज ती आनंदात आपले सेवानिवृत्तीचे आयुष्य घालवित आहे. श्रीनंद भारताच्या एक नंबरच्या पेट्रोलियम उद्योगात अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाला व वसईत असतो. संपर्कात असतो. त्याच्या सौजन्याने काका, गौरीताई चे छायाचित्र मिळाले आहे. या लेखाची शोभा वाढली आहे.
काकांच्या शेजारील गाळ्यात श्री पाटील गुरुजी राहत होते. शिक्षकी पेशा निमित्त चिंचणीत रहात. अविवाहित होते. त्यामुळे त्यांचा कोणाशी विशेष संबंध नसे. मात्र दिगू बाळू सुट्टीत आले की त्यांच्याशी खूप गप्पा करित. पुढे निवृत्तीनंतर ते आपल्या गावी निघून गेले .ते घर रिकामीच राहिले.
काका वर्तक गुरुजी सेवानिवृत्त होऊन वसईत स्थायिक झाल्यावर त्यांच्या गाळ्यात श्री जोशी गुरुजी राहू लागले. जोशी गुरुजी हे के डी हायस्कूलमध्ये संस्कृतचे शिक्षक होते. अविवाहित होते. व आर एस एस (संघाचे )स्वयंसेवक म्हणून ही काम करीत. चिंचणी गावात त्यांनी संघाची शाखा सुरू केली होती .शाळेतील मुलांना संध्याकाळी एकत्र करून मार्गदर्शन करीत. अतिशय शिस्तप्रिय, कोणाच्याही अडीअडचणीत मदतीस धावून जाणारे असे ते उमदे व्यक्तिमत्व होते .संघाचे संस्कार झाल्यामुळे त्यांचे वागणे बोलणे नेहमी संयमी आदर्शवत असे.. दिगू बाळू वस्तीगृहावर दादरला राहत असल्याने जोशी गुरुजी कधी मुंबईत गेल्यास आम्ही दिलेला खाऊ त्यांचे पर्यंत पोहोचवीत. त्यांची खुशाली आम्हाला सांगत. त्याकाळी फोन मोबाईल इत्यादी साधने नसल्याने प्रत्यक्ष भेटीतूनच खुशाली कळे. चिंचणी गावातील लोकांशी व शेजार्याशी कामापुरती संबंध ठेवणारे जोशी सर आमच्याशी खूप मोकळेपणे वागत. अरुणाचे लग्न त्याच काळात चिंचणीस झाले. जोशी गुरुजींनी आपले संपूर्ण घर तीन दिवस आम्हाला वापरावयाला देऊन लग्नाचे दिवशी खूप मदत केली. पुढे हायस्कूलातील नोकरी सोडून संघाचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी ते पुन्हा मुंबईत गेले .आमचा संपर्क कायमचा तुटला. एके दिवशी भायखळा स्टेशनवर दिगूला भेटले होते. पार्ल्यातील आपल्या घराचा पत्ताही त्यांनी दिला होता. मात्र त्यांचा संपर्क पुन्हा झाला नाही. विशेष म्हणजे त्या दिवसात 1967-68 साली ,जोशी गुरुजीं कडे एक लहान ट्रांजिस्टर रेडिओ होता. त्या रेडिओ मुळे संध्याकाळ चे काही कार्यक्रम व बातम्या ऐकणे आप्पांना खूप आवडत असे.
जोशी गुरुजी नंतर त्या घरात शेजारी म्हणून वरोरचे श्री पाटील गुरुजी व सौ वासंती पाटील बाई हे शिक्षक जोडपे राहावयास आले .हे पाटील गुरुजी आप्पांचे बोर्डी शाळेतील सहकारी पा मा पाटील गुरुजी यांचे कनिष्ठ बंधू .त्यांची तीन मुले आनंद सिद्धार्थ व कपिल. कपिल सर्वात लहान होता .प्रकृतीने ही त्यावेळी थोडा नाजूक होता. त्यामुळे स्वभाव थोडा किरकिरा झाला होता. रात्री झोपताना रडत असे. त्यावेळी वासंती बाई आप्पांची व माझी मदत घेत .कधी कधी आप्पा त्याला कडेवर घेऊन बाहेर अंगणात फिरवीत . तो आप्पांच्या खांद्यावर झोपी जाई. त्या वेळचा तो लहानगा कपिल म्हणजेच आजचा आमदार, शिक्षक भारती पक्षाचा संस्थापक ,कपिल पाटील होय ! “औदुंबराची छाया “या आप्पांच्या आठवणीं वरील पुस्तकाचे प्रकाशन बोर्डीत झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणा म्हणून आम्ही आमदार कपिल पाटील यांना बोलावलं होते. ते आवर्जून आले. आपल्या भाषणात त्यांच्या आईने चिंचणी वास्तव्यातील सांगितलेल्या आठवणी कथन केल्या. आप्पांच्या विषयी खूप जिव्हाळा ,आदर व्यक्त केला.

वासंती बाईची बदली झाल्यावर त्या घरात रामलाल हा कांदे बटाट्याचा घाऊक व्यापार करणारा व विविध प्रकारची शीतपेये विक्री करणारा व्यापारी आमच्या शेजारी राहण्यास आला. हा दहावी पास होता चांगले वाचन होते . हा व्यवसाय करून बऱ्यापैकी कमाई करी.. खूप प्रामाणिक कष्टाळू व बडबड्या होता. रामलाल भैया आल्यानंतर काही महिन्यातच आम्ही चिंचणी सोडली. बोर्डीस आलो.तरी रामलालने आमची आठवण ठेवली होती. त्याचा मुलगा
बी एस सी पदवीपर्यंत शिकल्याने त्याला दिगू कडून मार्गदर्शन हवे असे. तो अधून मधून तो घोलवडला आम्हास भेटण्यासाठी येई. आमच्या नीलम चे लग्न घोलवडला झाले. त्यावेळी लग्नाआधी दोन दिवस घोलवडला येऊन काही सुंदर सरबतांची द्रावणे आम्हाला तयार करून दिली. लग्नात अल्पौपहारा बरोबर ते मधुर सरबत सर्वांना खूप आवडले. रामलाल ने अखेर पर्यंत आमचेशी संपर्क ठेवला होता. त्याच्या मुलाला नोकरी मिळवून देण्यात मार्गदर्शन केल्याने दिगूला खूप मानीत होता. दुर्दैवाने हा साधा सरळ माणूस चिंचणी तारापूर रस्त्यावर अपघातात अचानक मरण पावला. त्याच्या कुटुंबाशी आज कोणताच संपर्क नाही. .
कोण कुठली ही माणसे ?आमच्या छोट्या वास्तव्यात संपर्कात आली, जीव लावून गेली. आता कोठे असतील? आमची आठवण त्यांना असेल काय ?आम्ही मात्र त्यांना कधीच विसरणार नाही..!!
“कुठे कुणाच्या घडल्या भेटी.. गीत एक मोहरले ओठी.. त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजूनही गाती.. सूर अजूनही गाती… अशी पाखरे येती!!. ..”
आमच्या घराला लागून असलेल्या छोट्या पडवीत माझे आतेबंधू नारायण, नारू मामा रहात. नारूमामा व सुमन ला एकच कन्या होती. मनीषा .त्यांचा शेजार आम्हाला खूप आधार होता. नारू मामांनीच रदबदली केल्याने जगन भाऊंनी आम्हाला ते घर दिले होते. आम्ही तेथे रहावयास आल्यावर आल्यावर काही दिवसातच नारू मामांची बदली झाली व ते चिंचणी सोडून गेले. मनीषा लग्न होऊन आता आपल्या संसारात असते …!
नारू मामा नंतर त्या छोट्या पडवीत छोटालाल पुरोहित हे वृद्ध गृहस्थ, सून कपिला व नात शीला असे तिघेजण राहावयास आले. छोटाभाई हे पूर्वी चिंचणी व परिसरात एक चांगले स्वयंपाकी म्हणून प्रसिद्ध होते . लग्नात स्वयंपाक बनविण्याचा त्यांचा व्यवसाय होता . अतिशय उत्तम शाकाहारी स्वयंपाक बनवीत. लग्न समारंभ इत्यादी कार्यक्रमांचे आमंत्रण घेऊन त्याप्रमाणे लोकांना सेवा देत . त्यांचा एकुलता मुलगा विष्णू उच्च शिक्षणानंतर दुर्गापूर पोलाद कारखान्यात कामाला होता. तेथे त्याला निवासस्थान उपलब्ध होत नव्हते. म्हणून तो एकटा दुर्गापुरला राही. पत्नी कपिला व कन्या शीला चिंचणीत आमच्या शेजारी रहात. संध्याकाळी छोटा भाई आमच्या ओटीवर नात शिलाला घेऊन तिच्याबरोबर खेळत. दिगू बाळू रजेवर आले असल्यास त्यांच्याकडून संध्याकाळी पेपर वाचून घेत. जुन्या आठवणी सांगत. छोटी शीला आपल्या दुरस्थ पित्याची नेहमी आठवण करी. चार-पाच वर्षाचं ते लहान बाळ वडील या संकल्पनेची केवळ कल्पना करित असणार?आप्पा तिला खेळवत व गाणी गोष्टी सांगत. शिलाला आप्पांचा एवढा लळा होता की आम्ही कधी चिंचणी हून बोर्डीस जावयास निघालो की शीला रडत असे. आमच्याबरोबर येण्याचा हट्ट करी . बापाविना वाढणाऱ्या त्या लहान जीवाची अवस्था बघून आप्पांना खूप दुःख होई. कपिला भाभी खूप समंजस समाधानी बाई होती. सुशिक्षित होती. पतीविना संसार करीत असूनही वृद्ध सासरे, व लहान शीलाचा छान सांभाळ करी. सुदैवाने आम्ही तेथे असतानाच काही महिन्यांनी विष्णूला दुर्गापुरात घर मिळाले. पिताश्री बापूजी सह आपल्या कुटुंबाला घेऊन तो तेथे गेला. बापूजींना खरे तर चिंचणी गाव सोडणे जीवावर आले होते. पण इलाज नव्हता. बापूजींच्या पूर्वीच्या स्वयंपाक बनवण्याच्या व्यवसायामुळे त्यांचे कडे अनेक जुनी भांडी आमच्या माडीवर पडली होती. जाण्याचा दिवस आला तेव्हा बापूजी पुन्हा पुन्हा माडीवर जाऊन त्या भांड्यांचे दर्शन घेऊन खिन्न चेहऱ्याने खाली उतरत. ही भांडी टाकून जाणे त्यांच्या जीवावर येत होते ,पण घेऊन जाणे ही शक्य नव्हते .. सर्व शेजाऱ्यांना काही ना काही भांडी भेट देऊन बाकीची भांडी तशीच सोडून गेले. प्रत्येक म्हणून केलेल्या त्या भांड्या भोवती छोटा भाईंच्या किती आठवणी गुंफल्या असतील ? एक एक भांडे विकत घेताना त्यांना किती कष्ट झाले असतील? पण शेवटी सर्व तसेच सोडून ते निघून गेले. आयुष्य असेच असते का…? जीव लावून जमविलेली माणसेही एक दिवशी अशीच अचानक आपल्याला ती हवीहवीशी असताना सोडून जातात. पुन्हा कधीच न भेटण्यासाठी!!
छोटालाल बापूजींनी मला आठवण म्हणून दिलेली एक तांब्याची कळशी माझ्याकडे अजून आहे. खूप जपून ठेवली आहे. चिंचणी सोडल्यानंतर काही महिन्यांनी बापूजींचा दुर्गापुर-बंगाल मध्ये शेवट झाल्याची बातमी चिंचणी येथील नातेवाईकांना आली. सर्वांनाच खूप वाईट वाटले. कपिला भाभी ,छोटी शीला आता कुठे असतील? शीला तर आता संसारी गृहिणी झाली असेल? कदाचित आजी सुद्धा झाली असेल? आपल्या नातवंडांना चिंचणीच्या रम्य आठवणी सांगत असेल का? आप्पांची आठवण तिला येत असेल का ?कुठेही कशीही असू दे. आमचे प्रेमळ आशीर्वाद तिच्या मागे सदैव असतीलं!
अगदी शेवटच्या गाळ्यात शांती मावशी चे कुटुंब राहत होते. तिचे यजमान दादा, मुली बेबी-माली-शाली व चिरंजीव भगवान-अमृत-जय व रम्या असे मोठे कुटुंब होते. भगवान मुंबईत नोकरी करीत होता एक उत्तम ‘डायमेकर’म्हणून त्याचे नाव होते. क्वचित घरी येई. शांती मावशी व या तीन मुली चिंचणी बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत . बऱ्यापैकी कमाई होई.त्यावरच कुटुंबाचा निर्वाह चाले. अमृत, जय देखील गावातच कोणाकडे तरी ‘डाय कारागीर’ म्हणून मदतनीसाचे काम करीत. रम्या थोडासा डोक्याने कमी असला तरी आईला भाजी विक्रीच्या कामात मदत करी. कुटुंब गरीब असले तरी स्वाभिमानाने राहत होते. दुर्दैवाने मोठा भगवान मुंबईत दारूच्या आहारी गेल्याने लवकरच गेला. अतिशय मेहनती व कष्ट करीत आनंदाने जीवन जगणारे असे हे कुटुंब होते . पुरुष अल्पायुषी ठरले. मुली विवाहानंतर आपापले घरी गेल्या. दादांना दम्याचा विकार असल्याने तेही साठीतच निवर्तले. शांती मावशी मात्र मेहनत करीत होती. पुढे आम्ही बोर्डीत आलो व संपर्क तुटला. शांती मावशीची एक सून अमृत भाऊंची पत्नी शालिनीताई,, बोर्डीची असल्याने अजूनही संपर्कात आहे. तेथे आता बहुमजली इमारत झाल्याने मुलासह फ्लॅटमध्ये राहते.
आमच्या घरासमोरच भागू मावशी ही कर्तृत्ववान बाई राहत होती .तिची मुलगी चंपू ताई व घरजावई तात्या तिच्याबरोबरच राहत. तात्या एकेकाळी भारतीय कस्टम खात्यात अधिकारी होते. इंग्रजी भाषा उत्तम प्रकारे बोलत. वडिलोपार्जित वाडी करीत.हंगामात आम्हाला आंबे फणस केळी देत. चंपू ताईचे ज्येष्ठ चिरंजीव नरेंद्र भाई उर्फ बाब्या भाऊ त्यावेळी ऊच्च शिक्षण , बी ए, एल एल बी. झाले होते.मुंबईत बी इ एस टी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते..त्यांची पत्नी गीता ताई ही गोरेगावच्या प्रसिद्ध म्हात्रे कुटुंबातून,( म्हात्रे वाडीचे मालक ) आली होती. कोणताही गर्व अभिमान नव्हता. बहुदा मुंबईत असे पण कधी चिंचणीस आल्यावर आम्हाला अवश्य भेटून जाई. त्यांची पुढील पिढी आता कोठे आहे काय करतात काही कल्पना नाही . बाब्या भाऊंचे दोन कनिष्ठ बंधू देखील लवकरच निधन पावले . चिंचणी येथील त्यांचे आमच्या घरा समोरील प्रशस्त घर आज ओस पडले आहे..!
भागू ताईची खुप आठवण येते .अतिशय हुशार कर्तबगार अशी ही बाई होती . पुढच्या पिढीला तिने उच्च शिक्षण देऊन चांगले संस्कार दिले. कर्तबगार बनविले .
भागू मावशीच्या शेजारीच सखाराम गुरुजींचे कुटुंब होते.ते देखील शिक्षक होते. त्यांची मुले सुजाता,अजित ,बाळा दिलीप आमच्या नीलम पपीचे मित्र. एकत्र खेळत.सखाराम गुरुजींची मुले आप्पांकडे शिकवणीस येत. आज अजित आपला डाय मेकिंग व शेती वाडीचा उद्योग सांभाळून आहे. प्रकाश उर्फ बाळा ही मुंबईत ऊच्चशिक्षण घेऊन अधिकारी पदावर नोकरी करीत होता. आता सेवानिवृत्तीनंतर चिंचणीतच असतो. पुढील पिढीही उत्तम शिक्षण घेऊन देशा परदेशात वास्तव्यात आहेत.

खाली: सौ. व श्री योगेश दिलीप करवीर.
आमच्या बलावडी आळीत शिरताना सुरुवातीस ऊजवीकडे करवीर कुटुंब राहत होते. आज तेथे दिलीप करवीर हा आप्पांचा विद्यार्थी राहत असतो. त्यांचाही डाय मेकिंगचा उद्योग होता.त्यांच्या डाईज देशपरदेशात जात असत. दिलीपने आता निवृत्ती घेतली आहे. दिलीपचा चिरंजीव योगेश व धाकटा बंधू अमित पुण्यात असतात.योगेश इंजीनियरिंग मध्ये द्वि पदवीधर (ME),असून मोठ्या कंपनीत वरच्या हुद्द्यावर आहे. आमच्या संपर्कात असतो. सुट्टीत कधी सहकुटुंब घोलवडला येऊन जातो.
आमच्या समोरील लहान टपरी वजा घरात पार्वती मावशी व तिची मुले जनु, किशोर बबन हे तिघे भाऊ आपल्या तीन बहिणीसह राहत. यजमान तरुणपणीच गेल्याने पार्वती काकू खूप कठीण परिस्थितीतून कुटुंबाचा सांभाळ करीत होती. बिकट परिस्थितीतून मार्ग काढीत होती..जनुभाऊ अत्यंत मेहनती कष्टाळू तसेच उत्कृष्ट डायमेकर होते. आज या कुटुंबातील सर्वजण चिंचणी सोडून गेले आहेत. घर ओस पडले आहे. मात्र जनुभाऊ च्या चिरंजीवांनी ठाण्यामध्ये स्वतःचा उद्योग सुरू केल्याचे कळले. खूप आनंद झाला
आमच्या या शेजाऱ्याविषयी थोडे विस्तृत लिहिण्याचे कारण या सर्वांनी त्यावेळी आम्हाला दिलेले प्रेम व जिव्हाळा. त्यामुळेच आज इतक्या वर्षानंतर या सर्वांची तीव्रतेने आठवण होते. विशेष म्हणजे बलावडी आळीतील दुसऱ्या पिढीने शिक्षणात व उद्योगात मिळविलेले दैदीप्यमान यश ! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत या मुलांनी शिक्षण घेतले व नोकरी पेशातच नव्हे तर स्वतःच्या धंद्यातही चांगले नाव कमविले आहे म्हणून त्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते.
छोटालाल पुत्र विष्णू बरोबर कलकत्त्याला निघून गेल्यावर काही दिवस ते घर रिकामी होते.त्यानंतर तेथे श्री. नायर , पत्नी लक्ष्मी अम्मा व मुलगी राधा हे दक्षिणात्य कुटुंब राहावयास आले. नायर एका वाहतूक कंपनीत ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. पत्नी लक्ष्मी अम्मा घरकाम सांभाळी. मुलगी राधा ही तिची पहिल्या विवाहापासून झालेली कन्या, हायस्कूलात शिकत होती. इतर सर्वसाधारण ड्रायव्हरप्रमाणे नायर कधीही रात्री बेरात्री घरी दारूच्या धुंदीत असे.बायकोशी भांडण सुरू करून तिला मारहाण करी. भररात्री सर्वांना त्रास होई. पण कोणी लक्ष देत नसे. दारूच्या धुंदीत बेभान होऊन तो खूप हिंसक बनत असे. आप्पांनाच मध्यस्थी करून हे भांडण सोडवावे लागे.
एके दिवशी असेच जोर जोराने भांडण सुरू झाले . लक्ष्मी व राधा मदतीसाठी आक्रोश करीत होत्या. आप्पा जाऊन पाहतात तर, नायर हातात चाकू घेऊन बेधुंद अवस्थेत दोघींना इजा करण्याच्या इराद्याने उभा होता. बेभान झाला होता. आप्पाना,”आमचे भांडणात पडू नका..” म्हणून बरळत होता. मात्र आप्पांनी त्याचे काही न ऐकता त्याच्या हातून तो चाकू काढून घेतला. त्याच्या डोळ्याला डोळे भिडवता म्हटले, “आता गप्प नाही झालाच तर पोलीसला बोलवीन..” अशी धमकी दिल्यावर गप्प झाला. त्यानंतर एके दिवशी शुद्धीत असताना आप्पांनी त्याला नीट समजावले. काय चमत्कार झाला कळत नाही, नायरने दारूही सोडली व मारणे ही बंद झाले. एके दिवशी लक्ष्मी व राधा फुले, पेढे घेऊन आल्या. आप्पांच्या पायावर फुले वाहिली व सर्वांचे तोंड गोड करून डोळ्यांतील आसवांनी आप्पांचे आभार मानले. तो एक चमत्कार होता. सर्व शेजाऱ्यांना हे कसे झाले कळले नाही? सदसद विवेक बुद्धी व दुःखिता विषयी कणव असली की मिळणारी ऊर्जा कितीही बलवंताला नामकरण करू शकते!! … अशा धोकेबाज प्रसंगांत आप्पांनी न डगमगता अगदी अविचलितपणे उभे राहून अनेकांना आधार दिला आहे .
पुढे काही महिन्यातच नायर आपल्या कबिल्यासह गावी गेला. तेथे या दोन निराधार ,अबला स्त्रियांचे भवितव्यात काय लिहिले होते ते परमेश्वराच जाणे!! त्यानंतर या कुटुंबाची काहीच खबरबात मिळाली नाही?
चिंचणीने आम्हाला खूप काही दिले. आमच्या घरातील पहिले दोन विवाह चिंचणीत झाले.. माझा नातू चिंचणीच्या घरातच पहिल्यांदा रांगत फिरला मुलांचेशिक्षण झालो, कामधंद्यासलागली, आणि विशेष म्हणजे दादा, काका वर्तक करवीर, अशा शेजारी कुटुंबियांशी नाती जडली ती आज पळावत टिकून आहेत कुटुंबाशी नाती जोडली गेली जी आज पावे तो टिकून आहेत !
त्यां चांगल्या दिवसांच्या सुंदर आठवणी आजही येत असतात. ते प्रेमळ लोक आठवतात .त्यांचे विषयी पूज्य भाव मनी दाटून येतो! मनात प्रार्थना करते,
“ ही मंडळी आज कोठेही असू दे ,देवा त्यांना समाधान सुखात ठेव .”
जीवन म्हणजे तरी काय…?
“ दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही भेट… पुन्हा नाही भेट.!!”
चिंचणीतील थोड्या आठवणी अजून आहेत. त्या पुढील लेखात सांगायला आवडेल.
शब्दांकन: दिगंबर राऊत



