मोठीआई-आप्पा वार्षिक स्मृतिदिन

दिनांक, 01 नोव्हेंबर 2026.

  एक नोव्हेंबर हा दिवस आम्ही सर्वच कुटुंबीय आप्पांचा स्मृतिदिन म्हणून घोलवडला दरवर्षी साजरा करतो. यावर्षी या दिवसाला  एक महत्त्व प्राप्त झाले. मोठी आईचा पहिला स्मृती दिनही याच दिवशी आम्ही साजरा केला. या वर्षीच्या  नोव्हेंबर मध्ये तिला जाऊन 11 महिने झाले .

 भविष्यातही आता या दोघांचे स्मृतिदिन एक नोव्हेंबरलाच साजरे होत राहतील.

   आमच्या नात्यातील, जवळच्या आप्तांना आमंत्रण दिले होते. मुंबई ,घोलवड, बोर्डीहून सुमारे 50 मंडळी उपस्थित होती. प्रीती खास या कार्यक्रमासाठी बहारीनहून घोलवडला आली होती. दादा दीप्तीने अमेरिकेतून आपले संदेश पाठवून भावना व्यक्त केल्या. त्या दिवसाचा हा संक्षिप्त वृत्तांत .

   एक नोव्हेंबरला सकाळी दहा वाजेपर्यंत मंडळी घोलवड च्या घरी येत होती. संतोष मिस्त्रींच्या इडली सांबार फराळाने सर्वांना तृप्त केले. 

   हर्षुताईने कार्यक्रमाची सूत्रे हातात घेतली. प्रथम आप्पा मोठी आईच्या प्रतिमेसमोर बसून आम्ही आप्पांच्या नेहमीच्या प्रार्थनांचे पठण केले. त्यानंतर हर्षु बरोबर सर्वांनी गीताई चा बाराव्या अध्यायाचे उच्चारण केले.

  अतिशय ऊदात आणि पवित्र वातावरणात दिवसाला सुरुवात झाली.

   पुढे घरासमोर घातलेल्या मंडपात सर्वांनी एकत्र येऊन आठवणींचा जागर केला .आप्पा मोठी आई व इतरही सर्व पूर्वजांच्या आठवणींचे स्मरण केले. चा जागर केला हर्षूने सर्वांना बोलते केले. तिनेच त्या आठवणींचा गोषवारा पाठविला आहे. 

    अरुण भाई, यांनी  आठवणी सांगताना मोठी आईंचा त्यांचे वर असलेला विश्वास किती जबरदस्त होता याबद्दल सांगितले. कोणतीही शारीरिक तक्रार असल्यास प्रथम ती त्यांनाच बोलावणे पाठवीत असे.  अरुण भाई मोठा आधार वाटत असे.तिच्या खोलीत वस्तू ठेवण्यासाठी एक कपाट हवे होते. त्या सूचनेकडे कोणी लक्ष देत नाही हे पाहून तिने अरुण भाईंना कपाट आणायला सांगितले .ते नक्की आणतील हा तिचा विश्वास. भाई ते आणण्यास तयार होते पण घरच्या मंडळींना ते आवडले नसते. त्यांनी मोठी आईला समजावून सांगितले .मोठी आई शांत झाली.

  श्री रमेश चुरी (बाळू) :

मावशीला वाचनाची खूप आवड होती. डोळ्यांनी दिसेनासे झाल्यावर तिला रोजचा पेपर वाचून दाखवावा लागे.  खूप लक्षपूर्वक ऐकत असे.  जगातील घडामोडीची नोंद ठेवी. मला एकदा तिने ,”मोदीजी परदेशात गेले होते ,ते परत आले का?”, असा प्रश्न केला आणि मी अचंबित झालो. या वयात एव्हरी स्मरणशक्ती व कुतुहूल असणे खरेच आश्चर्यकारक!

  राजेंद्र राऊत (बापस):

  लहानपणी आमची परिस्थिती हलाखीची होती. आजच्यासारखे मुलांसाठी खाऊ भरून ठेवलेला नसे. मला भूक लागली की मी काकू कडे जात असे.तिला लाडीगोडी लावत असे. काकूच्याही ते लक्षात येई. एखादी भाकरी किंवा चपाती मला देत असे.त्यावेळी त्या भाकरीचे खूप महत्त्व होते.

  शाळेत असताना एकदा पायाला जखम झाली होती.लवकर बरी होईना.  पिकल्यामुळे पू झाला होता. अप्पांनी रोज धुवून बँडेज बांधून हळूहळू ती जखम बरी केली. पुढे अनेक दिवस त्या जखमेचा वण माझ्या पायावर होता .या दोन्ही ही प्रेमळ काका काकूंनी मला प्रेम दिले आहे.

  गीता पाटील:

   सर्वांनी आपणास भेटावयास यावे ,अशी मावशीची खूप इच्छा असे. आम्ही क्वचितच जात असू . त्यामुळे मावशी आमचे घरी कधी आली तरआम्हाला खडसावत असे न सांगे “तुम्ही माझ्याकडे भेटायला का येत नाहीत ?”

 जरी रागावून सांगत असे तरी अंतःकरणात प्रेम असे.  

प्रणोती राऊत:

  बोर्डीला आले की मी आत्याला अवश्य भेटत असे .तिलाही खूप आनंद होई.आम्हा सगळ्यांची मनापासून चौकशी करी.  आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाबद्दल ,त्यांच्या लग्नाबद्दल तिला खूप जिज्ञासा. तिची स्मरणशक्ती अफाट होती. त्यामुळे’ कोणाचे कोण ‘ही नाती तिच्या चांगली लक्षात असायची.

   दिनेश महाले:

 (घोलवडच्या घरी शिक्षणासाठी बरीच वर्ष राहिले. उच्च शिक्षण घेतले .आई गरीब व वडील नसल्याने त्यांना कष्टात दिवस काढावे लागले .मात्र घोलवडला राहिल्याने त्यांना खूप मदत झाली. आज उच्च पदावर काम करतात)

  आम्ही घोलवडला पहिल्या दिवशी राहावयास आलो तेव्हा रात्री आमच्या खोलीत गडबड चालू होती. आवाज आजीच्या कानी गेला. तिने बाहेर येऊन आम्हाला खडसावले .शांतपणे झोपी जा असे बजावले. आम्ही झोपी गेलो. सकाळी उठल्यावर आजीने आमच्यासाठी चहा तयार ठेवला होता. प्रेमाने चहा पाजला .पुढे रोजच सकाळी ती आम्हाला चहा देत असे. घोलवडला राऊत कुटुंबाच्या सानिध्यात आम्हाला खूप काही शिकावयास मिळाले. सर्वांनी खूप प्रेम दिले. मला आजी नसल्याने आजीचे प्रेम येथेच मिळाले.

हर्षला राऊत:

  लहानपणी मी शाळेत जाण्याआधी खूप दिवस बोर्डी घोलवडला मोठीआई-आप्पां बरोबर राहिली आहे.. खूप आठवणी आहेत. एकदा बोर्डीच्या घरी मला खूप ताप आला. आप्पांनी डॉक्टरचे औषध आणले पण मोठी आईने प्रेमापोटी, तिच्या रीतीनुसार माझी दृष्ट काढली.

   थंडीत चुलीजवळ शेकताना चुलीच्या फार जवळ बसू देत नसे. म्हणे जास्त शेकही बरा नाही.

 “चोरी कधी करू नये ,

खोटे कधी बोलू नये ,कोणा संगे भांडू नये ..’

 अशा लहान लहान गाण्यातून आम्हाला शिकवण देई. स्वतः खूप रुचकर जेवण बनवीत असे . चांगले खाणे आवडे.दुसऱ्यांनी बनवलेले जेवण चांगले झाल्यास स्तुती कडरी. पण नाही आवडले तरी स्पष्टपणे तसे सांगत असे. स्वतःची ठाम मते असत.स्मरणशक्ती शेवटपर्यंत मजबूत होती. वाचनाची व पर्यटनाची तिला भारी हौस होती. तिची हौस तिच्या मुलांनी पुरविली .

  आजी आजोबा साठी,

  नातवंडे दुधावरची साय असतात तर नातवंडासाठी आजी आजोबा मायाळू माय असतात!

  चारू, मनाली, मनीषा, राजू ,अरुण चुरी स्वाती, प्रीती सर्वांनी छान छान आठवणी सांगितल्या .

 आईची अखेरच्या काळात सेवा करणाऱ्या सेविका सरस्वती व प्रतिभा यांचाही यथोचित गौरव केला गेला.

शेवटी आशुतोषच्या सुंदर, नादमधुर गायनाच्या कार्यक्रमाने शेवट झाला.

 श्रीदत्त (बापू) व  दिप्ती यांनी अमेरिकेहून पाठविलेले आठवणींचे संदेश ही वाचून दाखवण्यात आले. 

  प्रीती:

दादांने पाठविलेला संदेश आम्हा सर्व भावंडांचा प्रतिनिधिक आहे असे वाटते. घोलवड घरात शिरताना मोठी आई आहेच अशी नेहमी जाणीव होई. आज तिची रिकामी खोली पाहताना मन भरून येते. अशी मोठी आई सर्वांना मिळो हीच प्रार्थना. ….

 मोठी आईच्या आठवणीवर मी एक लेख मालिका लिहीत आहे. याप्रसंगी थोडक्यात शब्दांजली वाहण्यासाठी एक कविता केली आहे ती खालील प्रमाणे..

शतायुषी माऊली – “मोठी आई”.

 पहिल्या स्मृतीदिनी मोठी आईला काव्यांजली..1 नोव्हेंबर 2006.

वय फक्त एकशे चार, तुझा दरारा अपरंपार,

  आमची मोठी आई, होती मायेचा आधार।

डोळ्यांपुढे जरी अंधार, तरी सृष्टी प्रकाशमान,

 होती स्पर्शातून पाहणारी “हेलन केलर”महान!

   नऊ वर्षांची असताना, पितृछत्र हरपले,

दुःखाच्या डोंगराखाली, बालपण करपले।

ती थोरली, पाठीशी तीन बहिणी, भाऊ दोन,

आक्काने भाजी विकुन, राखली संसाराची शान

     शिक्षण फक्त पाचवी, पण वाचन अफाट,

ग्रंथ-वाचन, पाठांतर, स्मरणशक्ती बेफाट।

अखेरच्या श्वासापर्यंत, आठवणी जशाच्या तशा,

संगणकास ही लाजवेल,अशी तीक्ष्ण बुद्धी-दशा

 षोडश वर्षी विवाह झाला, आप्पांनी हात धरला,

काटकसरीने, गरिबीतही दोघांनी संसार फुलविला।

आम्हा पांच लेकरां दिले जीवन-शिक्षण थोर,

अंधारातून प्रकाशाकडे नेले, उजळ वाटेवर।

   तुम्ही सोसले कष्ट सारे, आम्हा ठेवले वैभवात, 

आम्हासाठी तुम्हीच झालात, “दैवते ही मायतात!”

देशी-विदेशी नातवंडे तुझी, अभिमान तुझा गगनी।

चेहरे त्यांचे पाहिलेस तू, हळुवार स्पर्शातूनी.

‘माझीच लेकरं’ म्हणताना, आनंद तुझ्या वदनी .

   कथा त्यांच्या सांगताना सुधारस पाझरे वाणींतूनी.

     विमानातून भारतभ्रमण, तीर्थयात्रा घडविल्या,

प्रत्येक इच्छा लेकरांनी, देवाज्ञा मानल्या।

    वृद्धाश्रम नाही, घर हेच तुझे मंदिर,

आपल्या सदनी तू रमलीस, शांत, सुधीर। शतक-महोत्सव तुझा आम्ही आनंदे सजविला,

  तुझ्या वत्सल नयनांनी तो वदनी फुलविला. 

‘डोळे असूनी आंधळ्यां’च्या या जगतात,

अंध असूनही  होतीस ‘डोळस’ संसारात।

चक्षुं नी नाही तरी, स्पर्शाने जग जोखले,

कधी शब्दांनी कधी मौनातूनी आम्हाला छेडले.

  डिसेंबर मासी तू प्रकाशांत विलीन झाली,

आशीर्वच तव  आम्हा साठी ठेवून गेली।

पहिल्या स्मृतीदिनी,आम्ही तुज प्रति नतमस्तक,

अगे माऊली तूच आमची डोळस हितचिंतक।

शय्या कक्ष तुझा, आता वाटे  उदास शांत

  प्रतिभा सरस्वतीच्या पदरवांनी सोडली साथ .

 तरीही  तेथून आजही येतो प्रतीध्वनी सतत,…

“. .मी नसले तरी जपून ठेवा आठवणी सतत..

 आठवणी सतत..”

दिगंबर राऊत.  

—

 मोठी आईच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त दीप्तीने लिहिलेल्या  “माझी आज्जी मोठी आई, 101 नाबाद !”  या लेखातील काही उतारे वाचून दाखविण्यात आले. ते येथे देत नाही .कारण तो सबंध लेख पुढे ” मी मोठी आई बोलते ..” पुस्तकात येणार आहे.

दादाचा संदेश खालील प्रमाणे:

आज १ नोव्हेंबर. आप्पांची पुण्यतिथी आणि मोठीआईचे स्मरण या निमित्ताने घोलवडच्या आपल्या वास्तूत जमलेल्या सर्व आदरणीय वडीलधाऱ्यांना, आप्तेष्टांना आणि बंधू-भगिनींना माझा सस्नेह नमस्कार. जरी मी आज प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहू शकलो नाही, तरी माझे विचार घोलवडच्या त्या प्रांगणात, तुम्हा सर्वांच्या सोबत आहेत. त्यांच्या आठवणी सांगताना मनात सर्वांत मोठी भावना आहे ती कृतज्ञतेची. त्यांचा नातू म्हणून जन्माला आलो, त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले—हे माझे मोठे भाग्य!

माझ्या मनात एक नोव्हेंबरची एक आठवण कायमची कोरली आहे.
खूप वर्षांपूर्वी, याच दिवशी, मी आप्पांना भेटायला गेलो होतो. ते डहाणूला नीलमआत्याकडे होते. त्यांना पाहिले आणि क्षणभर ओळखताच आले नाही. आजारपणामुळे ते इतके कृश झाले होते. मी लहान होतो. आजूबाजूला नेमके काय घडत आहे, त्याचे गांभीर्य काय आहे, हे समजण्याचे माझे वय नव्हते.
आई मला म्हणाली होती, “आप्पांना सांग, आप्पा, तुम्ही लवकर बरे व्हाल आणि पुन्हा आमच्याबरोबर खेळाल.”
मी त्यांना तसे सांगितले.
‘बापू’ हे नाव त्यांनीच मला दिले होते. त्या दिवशी मात्र आप्पांना बोलता येत नव्हते. तरीही त्यांच्या डोळ्यांत एक उत्तर होते; नजरेत एक शांत नकार होता. आज वाटते, परतीच्या प्रवासाची घटिका समीप आल्याची ती निशब्द जाणीव होती! या जगाचा आणि त्यांच्या सर्वात मोठ्या नातवाचा निरोप घेताना ते खूप भावुक झाले होते.
त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. खूप, खूप वेळ तो हात तसाच माझ्या माथ्यावर विसावला होता. नंतर मला कोणीतरी त्या खोलीतून बाहेर नेले. आज त्या स्पर्शाची आठवण झाली की वाटते—आपल्या अंतःकरणातले सारे प्रेम, सारी माया आणि उर्वरित सर्व आत्मिक बळ ते त्या हातातून मला देत होते.
तो निरोप होता, हे त्या लहान मुलाला समजले नाही. पण तो आशीर्वाद होता, हे आजचा मी मनापासून मानतो. आप्पांनी त्या दिवशी डोक्यावर ठेवलेला तो हात आजही माझ्या माथ्यावर अदृश्य रूपाने अखंड छत्र धरून उभा आहे.

आप्पा आणि मोठीआई—या दोन जीवांचा विचार करताना भगवंताच्या गूढ लीलेचे मनस्वी आश्चर्य वाटते. आप्पांचे आयुष्य सुमारे पासष्ट वर्षांचे; मोठीआईचे तब्बल एकशेचार वर्षांचे. वर्षांची संख्या वेगळी, स्वभाव वेगळे, जगण्याची रीत वेगळी!
मी पाहिलेले आप्पा अध्यात्माकडे वळलेले, प्रार्थनेत रमणारे, वृत्तीने विरक्त होते. आप्पांची ओढ अंतर्मुखतेकडे होती. आप्पांचा महाराष्ट्राबाहेर फारसा प्रवास झाला नाही. याउलट आपली मोठीआई! मोठीआईला मी देवासमोर बसून पूजा करताना पाहिले नाही. पण म्हणून तिच्या जगण्यात श्रद्धा नव्हती, असे मला वाटत नाही. तिची श्रद्धा वेगळ्या रूपात व्यक्त होत होती—जगण्याशी असलेल्या तिच्या घट्ट विणीतून. मोठीआईने उत्साहाने भारतभर प्रवास केला. तिला संसारातील वस्तूंची हौस होती, उत्तम खाद्यपदार्थांची आणि खाण्यापिण्याची आवड होती. मोठीआईचा घरात एक वेगळाच दरारा होता. स्वतःची मते ठामपणे मांडताना किंवा प्रसंगी सुनांशी दोन हात करताना तिने कधी मागेपुढे पाहिले नाही. एका बाजूला आप्पांची निवृत्ती, तर दुसऱ्या बाजूला मोठीआईची प्रवृत्ती! एकाचा प्रवास जणू अंतर्मनाचा वेध घेणारा, तर दुसरीचा बाहेरचे जग अनुभवत पुढे जाणारा! आज वाटते, या दोन्ही वाटांकडून शिकण्यासारखे किती आहे. आप्पांकडून अलिप्त राहण्याची दृष्टी, तर मोठीआईकडून आयुष्याला मनापासून कवटाळण्याची ओढ.
मोठीआईच्या प्रकृतीचे तर सर्वाना नेहमीच आश्चर्य वाटते. अखेरच्या दिवसांपर्यंत लाभलेले तिचे उत्तम आरोग्य—त्याचे रहस्य काय होते? आपण सगळ्यांनी तिला इतकी वर्षे पाहिले आहे. प्रत्येकाला त्याचे काही वेगळे उत्तर सुचेल. मला मात्र तिची जगण्यातली हौस आठवते आणि स्वतःला एक प्रश्न विचारावासा वाटतो: आपण आयुष्य केवळ निभावून नेतो आहोत, की त्यात खरोखर मनापासून रस घेतो आहोत? तिच्या दीर्घायुष्याचे रहस्य काहीही असो, तिच्याकडून घेण्यासारखा हा एक सुंदर विचार नक्कीच आहे.

आता दोघांचे पुण्यस्मरण एकाच दिवशी होत आहे. इतकी भिन्न माणसे, आणि आठवणीं जगवण्यासाठी पुन्हा एकच दिवस! भगवंताची योजना किती अगम्य असते.
मनात कधी विचार येतो—कदाचित हे दोन जीव एकमेकांकडून काही शिकण्यासाठीच एकत्र आले असतील. एकाने दुसऱ्याला अलिप्ततेचे मौन शिकवले असेल, तर दुसरीने पहिल्याला जगण्यात रमण्याचे चैतन्य दिले असेल.

जीवात्म्याचा प्रवास मृत्यूनंतर पुढेही चालू राहतो, अशी आपली भारतीय श्रद्धा आहे. त्यांच्या पुढच्या प्रवासाचे स्वरूप कोणाला ठाऊक? मात्र त्यांच्या सहवासाने आपले सर्वांचे आयुष्य किती समृद्ध झाले, हे आपल्याला नक्की ठाऊक आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात त्यांचे स्थान मोठे आहे. त्यांनी ३ सुपुत्र आणि २ कन्यांचे हे सुंदर कुटुंब उभे केले. आज नातवंडे, पतवंडे आपापल्या आयुष्यात उत्तम वाटचाल करत आहेत; हे कुटुंब बहरत आहे. आपल्या पिढीला आज ज्या काही संधी आणि स्थैर्य लाभले आहे, त्यामागे त्यांच्या पिढीचे अपार कष्ट आणि त्याग आहेत, याची कृतज्ञ जाणीव आपण सर्वांनी नेहमी जपूया.
आपल्या पूर्वजांचा हा अनमोल ठेवा, घोलवडची मुळे आणि आप्पा-मोठीआईंच्या व्यापक जीवनाचा संघर्ष बाबांनी आपल्या dwraut.com या संकेतस्थळावर अत्यंत भावपूर्ण शब्दांत शब्दबद्ध करून ठेवला आहे. पुढची पिढी जेव्हा ते वाचेल, तेव्हा तिलाही उमजेल की आजी-आजोबा या नात्यापलीकडे त्यांचे किती व्यापक आयुष्य होते—जबाबदाऱ्या होत्या, संघर्ष होते आणि इतरांसाठी केलेले काम होते. हा वारसा शब्दांत जपल्याबद्दल बाबांचेही मनापासून आभार.

संत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध ओळी आहेत—
हें चि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥
देवाला केलेल्या या प्रार्थनेचा भाव मनात ठेवून आज एवढेच मागावेसे वाटते—आप्पा आणि मोठीआईचा, त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या ऋणाचा आणि या साऱ्यामागे असलेल्या भगवंताच्या कृपेचा आम्हाला कधी विसर पडू नये.

आप्पा, तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवलेला आशीर्वादाचा हात असाच सदैव माझ्या पाठीशी राहो; आणि मोठीआई, तुझा जगण्याचा अखंड उत्साह सात्त्विकतेने आमच्या नसानसांत वाहत राहो, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना.
आम्हाला एक सुसंस्कृत कुटुंब दिल्याबद्दल, दीपस्तंभासारख्या मार्गदर्शक आठवणी दिल्याबद्दल आणि पुढील प्रवासासाठी प्रेमाची अखंड शिदोरी दिल्याबद्दल तुम्हा दोघांचे आभार.
माझा नमस्कार.

— तुमचा नातू, बापू