कलासक्त समाजसेवक, रमेश चौधरी सर!

  श्री रमेश नारायण चौधरी सर.
(7 नव्हेंबर 1932 – 18 जुलै 2011)
 व्यक्तीची श्रीमंती समाजात भलेही पैशावरून मोजली जात असेल पण समाजाची श्रीमंती  चित्र नृत्य नाट्य शिल्प कवी लेखक अशा विविध सांस्कृतिक क्षेत्रांचा विचार करून व अशा क्षेत्रातील त्या समाजात जन्मलेल्या प्रतिभावंतांची संख्या आणि त्यांचे कलेसाठी व समाजासाठी योगदान यावरूनच ठरविली जाते! म्हणून कोणताही कलाकार हा त्या अर्थाने समाजाची खरी  संपत्ती आहे, वैभव आहे. प्रतिभासंपन्नता ही केवळ परमेश्वरी देणगी आहे. विविध क्षेत्रातील प्रतिभावान कलावंत ज्या समाजात विपुलतेने निर्माण होतात  तो समाज जगावर राज्य करतो. यासाठी इतिहासाचे किती दाखले द्यावेत? भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनीच अनेकदा म्हटले आहे “आम्ही आमचे राज्य देऊ पण आमचा ‘शेक्सपियर’ कोणाला देणार नाही!!..”

    कला कोणाचीही बटीक नसते आणि बटिक असते ती कला नसते. आणि म्हणून ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’,या वादाला अर्थ नसतो. कारण कला कलेसाठीही नाही आणि जीवनासाठीही नाही तर ती असते ज्ञानासाठी आणि आनंदासाठी!.ज्ञानात्मक कलाच जीवनाची वृद्धी करते आणि समाजाचे व जगाचे नेतृत्व करते!

   प्रत्येक कलावंताला ,कलाकाराला मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो, समाजाने जपले पाहिजे ,त्यांचे संवर्धन केले पाहिजे व त्यांचा सन्मान केला पाहिजे. असे उत्तुंग कलाकार ज्या समाजात जन्म घेतात तो समाज निश्चितपणे भाग्यवान म्हटला पाहिजे.

  आमच्याही सो क्ष समाजात असा एक महान कलावंत होता..त्याने आपली ज्ञानात्मक कला समाजासाठी, सर्वांसाठी मुक्तहस्ते ऊधळली, समाज-जीवन संपन्न केले! त्या कलावंताचे नाव होते नाट्यकर्मी कै. रमेश चौधरी सर!!  आपण या लेखात त्यांचा सर म्हणून उल्लेख करूया!!

    7 नोव्हेंबर 1932 साली जन्मलेले श्री रमेश चौधरी(सर) यांचे घराणे मूळ विरार जवळील नाळे या गावचे. त्यांचे आजोबा कै.लक्ष्मण विठोबा चौधरी हे इमारत बांधणे आणि कार्पेंटरीच्या व्यवसायासाठी मुंबईतल्या गिरगाव, खोताच्या वाडीत आले. तेथेच स्थिरावले. पुढील तीन पिढ्या  गिरगावात खोताच्या वाडीत गेल्यामुळे ते स्वतःला गिरगावकरच मानीत.

    सरांचे वडील नारायणराव चौधरी बांधकाम व्यवसायात तत्कालीन मुंबईत एक बडे प्रस्थ होते. त्यांचे मोठे काका कै.आत्माराम पंत चौधरी यांनी स्वतःच्या हिमतीवर मुंबईत फर्निचरचा उत्कृष्ट कारखाना काढला होता. धाकटे काका दत्ताराम चौधरी आपल्या मोठ्या भावाला फर्निचरच्या कारखान्यात मदत करीत असत. मधले काका कै. शंकरराव चौधरी हे उच्च शिक्षण घेऊन मंत्रालयात  पदोन्नती घेत  सचिव पदापर्यंत पोहोचले . मला वाटते आमच्या सो क्ष महाराष्ट्र सरकारच्या सचिव पदावर जाणारा पहिला समाज बांधव म्हणजे रमेश भाईंचे काका  कै.शंकरराव चौधरी हेच असावेत! मोठे काका आत्माराम पंत चौधरी यांच्या फर्निचर व्यवसायाचा एवढा गवगवा झाला होता मुंबईच्या तत्कालीन चार ते पाच गव्हर्नरनी आपले दिवाणखाने शंकररावाच्या फर्निचरनी सजविले होते. मला वाटते त्यांच्या कार्यकर्तृत्वाची व कौशल्याची याहून अधिक पावती कोणती ?

    गिरगावच्या केळेवाडीतील सेंट तेरेसाज हायस्कूल या शाळेची इमारत कै. नारायणराव चौधरी म्हणजे, नाना यांनी एकही पैसा मोबदला न घेता बांधून दिली होती. शाळेच्या उद्घाटन प्रसंगी मिशनरी प्रमुखांनी चांदीच्या तबकातून नानांना एक मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला होता. शिवाय त्यांचे नाव शाळेच्या दर्शनी भिंतीवर कोरले गेले ते कायमचेच ..”मिस्टर नारायण लक्ष्मण चौधरी” हे नाव त्या दर्शनी भिंतीवर आजही मौजूद आहे! .

   कै. नारायणरावांचे आजोळ वसई जवळ किरवली गाव. तेथील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी चाललेली होरपळ पाहून नानांनी किरवली गावात जागा विकत घेऊन एक शाळा बांधून दिली व शाळेला नाव त्यांच्या आईचे (रमेश सरांच्या आजीचे),”जानकी सदन”, असे दिले. पुढे शाळा व जमीन एका दानपत्रा द्वारे गावास  दान केली. गावातील जाखई देवी मंदिरालाही त्यांनी दिवाबत्तीसाठी देणगी दिली. आजही ती रक्कम देवळाला मिळत असते.

  नाना-नानी, पिताजी आणि मातोश्री ।१९३४

      

   सरांची आई कै. लक्ष्मी नारायण चौधरी ही माहेरची कु.तारा राऊत  माहेर मुंबईतील गिरगाव. त्या काळात मॅट्रिक पर्यंत शिकून पितृछत्र लवकरच हरपल्यामुळे तिने शाळेत शिक्षिकेची नोकरी करून घर चालवायला हातभार लावला. व्हायोलिन वाजवण्याच्या कलेचे तिने रीतसर शिक्षण घेतले होते. संगीताची उपजत आवड होती. वाचन भरपूर असे. स्वतःच्या लायब्ररी मधील पुस्तके तिने किरवलीच्या शाळेला भेट म्हणून दिली होती. आई-वडिलांचा विवाह हा प्रेमविवाह असल्यामुळे त्याकाळी चांगलाच गाजला होता. दोघांनाही आपापल्या घरून विरोध होता. नारायणराव(वडील) व तारा (आई),यांचा निश्चय पक्का होता. आपल्या पत्नीची कलासक्तता व धडाडीची वृत्ती नारायण रावांना आवडली होती म्हणूनच त्यांनी तिला सहधर्मचारिणी  म्हणून निवडले होते!

   रमेश सरांच्या कुटुंबाचा तसेच त्यांच्या मातुल कुटुंबाचा मुद्दाम विस्तृत्वाने उल्लेख करण्याचे कारण, एवढ्या कर्तृत्ववान व कलासक्त आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या रमेशने आपल्या भावी जीवनात, पूर्वजापासून मिळालेल्या अनेक सद्गुणांचा सुंदर संगम घडवून, आपले आयुष्य एका वेगळ्या उंचीवर नेऊन कृतार्थ केले. रमेश सर म्हणत, “विचार, तत्त्व, मूल्ये यासाठी हट्टीपणाने अडून योग्य व न्याय्य तेच  घडावे हा माझा जीवनभरचा अट्टहास .तो माझ्या जन्मदात्याकडून मला मिळालेला उपजत वारसा आहे. व्हायोलिनवादक असणाऱ्या आईकडून मला कलेचा वारसा मिळाला आणि कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता केवळ अनुभवातून मिळालेल्या उत्कृष्ट आर्किटेक्टोरियल ज्ञानाच्या बळावर उत्तम इमारती बांधण्याचे कौशल्य कमावणाऱ्या वडीलाकडून आलेला कलाकुसरीचा वारसा, माझ्या पुढल्या काळातल्या गाजलेल्या प्रायोजित नाटकांच्या प्रयोगातून प्रकट होत राहिला आहे!”

     कै.सरांसह त्यांच्या कुटुंबात एकूण चार भावंडे .सर्वात मोठी बहीण हेमलता ठाकूर, तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेले मोठे बंधू सुरेश, त्यानंतर दोन वर्षांनी जन्मलेले रमेश आणि सर्वात लहान धाकटी बहीण लीना!

      सरांनी आपल्या आयुष्यात शिक्षक ,प्राध्यापक, नाट्यदिग्दर्शक, अभिनेता, नाट्य प्रशिक्षक राजकीय पक्ष कार्यकर्ता, दूरदर्शन कलाकार-,दिग्दर्शक ,सामाजिक कार्यकर्ता अशा अनेक भूमिका निभावल्या.  काही काळ एका केमिकल प्रोडक्शन फॅक्टरीचे  संचालक-मालकही होते. परंतु आपल्या वडिलांकडून मिळालेल्या,”मोडेन पण वाकणार नाही”, हा बाणा प्रत्येक ठिकाणी अखेरपर्यंत निष्ठेने वागवला. माझ्या सुदैवाने ते सोमवंशी क्षत्रिय संघात विश्वस्त म्हणून कार्यरत असताना तीन वर्षे,2002-2005, त्यांचे बरोबर सहकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या कालखंडाच्या आठवणी व त्यातून मला जाणवलेले रमेश चौधरी सर याबद्दल लिहिण्यासाठीच या लेखाचा प्रपंच! 

  कै.रमेश चौधरी आज मराठी कलाजगताला माहित आहे ते एक प्रसिद्ध रंगकर्मी म्हणूनच.आयुष्याची सुमारे 25 वर्षे त्यांनी या कलाक्षेत्रात भरघोस योगदान देत व्यतीत केली.प्रथम त्यांच्या रंगभूमीवरील कामाचा थोडक्यात आढावा घेणे जरुरीचे वाटते.

       सरांनी अगदी शालेय वयापासून इयत्ता चौथीत असतानाच केलेले पहिले नाटक म्हणजे ‘बेबंदशाही’ व त्यातील छोट्या संभाजीची भूमिका. पुढे व्यावसायिक ,प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी अनेक नाटके केली दिग्दर्शन केले तरी या आपल्या बालवयातील पहिल्या नाटकांंतील भूमिकेचा त्यांना कधी विसर पडला नाही .त्यावेळी झालेल्या गमती जमती ते खूप रंगवून सांगत. सरांनी  आयुष्यात अनेक उद्योग केले मात्र त्यांची ओळख ही एक ख्यातकीर्त  नाट्यकर्मी म्हणूनच आहे व राहील!

  शालेय जीवनानंतर 1948 ते 54 या  महाविद्यालयीन जीवनात  देखील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या नाटकात त्यांनी स्वतः काही नाटके लिहिली व दिग्दर्शित केली.  इतर नाटककारांची नाटके व एकांकिका देखील त्यांनी दिग्दर्शित केल्या. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’,या नाटकात प्रसिद्ध नाट्य लेखक कै.शं ना नवरे एक भूमिका करीत असत व त्याचे दिग्दर्शन सरांनी केले होते .त्या बक्षिसाला स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले .कै.मो ग रांगणेकर कै.आचार्य अत्रे अशा महान नाट्यलेखकांची अनेक नाटके त्यांनी या काळात दिग्दर्शित करून स्पर्धेतील अनेक पारितोषिके मिळविली .

 “जीवन त्यांना कळले हो ..”शेवटची भूमिका.

   पुढे सन 1954 साली कै.आत्माराम भेंडे यांच्या ‘कलाकार”या प्रायोगिक नाटक करणाऱ्या नाट्यसंस्थेत सर  दाखल झाले. या संस्थेत त्यावेळी माधव मनोहर, कुसुम कुलकर्णी,आशा भेंडे, श्याम आडारकर इत्यादी नावाजलेले कलाकार त्यांना साथीला  होते

    या संस्थेतर्फे ‘आई’ हे दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील नाटक खूपच परिणामकारक ठरले होते. त्याचबरोबर ‘झोपलेले नाग’, हे नाटक त्याच्या विषयामुळे( समलिंगी संबंध), खूप गाजले होते ‘कक्षा’, हे आणखी एक नाटक त्यांनी केले. या नाटकातील दिग्दर्शकीय आणि प्रकाश योजनेचा एक अभिनव प्रयोग त्यांनी केला होता. लोकांना तो आवडला होता.

लाल गुलाबांची भेट.. लेखक – रत्नाकर मतकरी.. संगीत – पं. अमीर खॉं.. निर्माता – दिग्दर्शक – याकूब सईद… जरुर पहा हा विशेष कार्यक्रम..

ती – कानन कौशल तो – सतीश रणदिवे मित्र – अरुण सरनाईक अण्णा – रमेश चौधरी मुका – समीर गुप्ते Social Media Operator : वनिता राऊत – मांजरेकर Producer Director : याकूब सईद

  ‘ इंडियन नॅशनल थिएटर’, या नाट्य संस्थेतर्फे सादर केलेला “झोपी गेलेला जागा झाला”, हा फार्स जेव्हा रंगमंचावर आला तेव्हा लोकांना तो प्रथम आवडेना. मात्र चिकाटीने त्याचे प्रयोग सुरू ठेवत शेवटी प्रयोगांची संख्या 100 पर्यंत गेली. त्यावेळी प्रसिद्ध सिने कलाकार राजा नेने हे त्यांचे नाटकातील एक सहकारी होते. सरांनी त्या नाटकांमध्ये केलेल्या भूमिकेचे नाव बबन प्रभू यांनी, ’सर रमेश चौधरी’, म्हणजे सरांचेच नाव दिले, एवढी त्यावेळी त्यांची भूमिका लोकप्रिय झाली होती.

    पुढे नाट्यसंपदा या प्रसिद्ध संस्थेतर्फे,’ ‘अमृत झाले जहराचे’, या नाटकाचे दिग्दर्शन त्यांना सोपविले गेले. तेव्हापासून सरांनी व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. ही नाट्य संस्था प्रसिद्ध रंगकर्मी प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या मालकीची होती. पुढे याच संस्थेच्या ‘मोहिनी’, या नाटकाचे प्रयोग दिग्दर्शित करताना त्यातील भूमिका केली..त्यात शंकर घाणेकर, आशा पोतदार, गुलाब कोरगावकर, बाळ कोल्हटकर अशी त्यावेळची महान मंडळी सहकारी होती. त्या नाटकाचे प्रयोगही खूप गाजले. पुढे ‘नाट्यसंपदे’ तर्फे ‘तो मी नव्हेच’, या गाजलेल्या नाटकात भूमिका करण्याची त्यांना  विनंती केली गैली व  त्यांनी ते काम केले. त्याचप्रमाणे ‘फोन नंबर 33333,’ या नाटकातही डिटेक्टिव्ह चे काम त्यांनी केले. लग्नाची बेडी नाटकात बबन प्रभू बरोबर काम करून तेथेही त्यांच्या कामाचा प्रभाव पडला.

   आपल्या आयुष्यातील या दीप्तीमान  कालखंडाविषयी सर म्हणत “तो काळच वेगळा होता. आम्ही नाटक मंडळीतले कलाकार एकोप्याने एका कुटुंबातले कुटुंबीय म्हणून वागत असू. हेवेदावे कलुषित वृत्ती हे पुढे जीव घेणी स्पर्धा माजली तेव्हा आले.”

  नाट्यसंपदा नंतरच्या काळात सरांनी “वेलकम थिएटर” या नाट्यसंस्थेसाठी ‘दो या तीन बस’, हे नाटक दिग्दर्शित केले त्या नाटकात अरुण सरनाईक यांनी भूमिका केली होती.

  पुढे 1965 साली सरिता पत्की लिखित ‘खून पहावा करून’, आणि विजय तेंडुलकर लिखित ‘मधल्या भिंती’, या महाराष्ट्र राज्य स्पर्धेतल्या नाटकांच्या दिग्दर्शनाच्या निमित्ताने सरांची ‘उदय कला केंद्र’ या नाट्यसंस्थेची नाळ जुळली. त्या संस्थेमार्फत वसंत कानेटकर लिखित ‘प्रेमा तुझा रंग कसा, ‘अ ब क’,’निखारे’, अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. महाराष्ट्र राज्य स्पर्धेत अनेक बक्षीसेही मिळविली.

   सन 1969 च्या नाट्य स्पर्धेसाठी उदय कला केंद्र मार्फत सरांनी दिग्दर्शित केलेले शं ना नवरे लिखित ‘ग्रॅड रीडक्शन सेल’ हे नाटक त्यावेळी खूप गाजले .शिक्षण क्षेत्रातील अधोगती हा या नाटकाचा विषय होता. हे नाटक पाहिल्यानंतर या क्षेत्रातील अनेक शिक्षण तज्ञ म्हणत,” इतका भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि ते माहीत असूनही आपण सगळे डोळ्यावर कातडे ओढून का दुर्लक्ष करतोय? हे थांबायला हवं ।”इतका परिणाम या नाटकाच्या प्रयोगांनंतर होत असे.

   या नाटकाच्या निर्मिती व प्रसिद्धी नंतर सर म्हणत,” एक प्रामाणिक रंगकर्मी म्हणून समाजाला वस्तुस्थितीची जाणीव करून देणे एवढेच माझं इति कर्तव्य होतं आणि मी ते पार पाडायचा प्रामाणिक प्रयत्न केला एवढेच!”

   पुढे ऊदयकला केंद्राच्या मार्फत सरांनी अनेक नामवंत लेखकांनी लिहिलेल्या नाटकांचे नाट्यप्रयोग सादर केले. महाभारत, पाचोळा जळत नाहीये, श्रीमंत पतीची राणी,वटवाघळे ही त्यातील काही नावे! 

  ‘वटवाघळे’, हे विजय मोंडकर लिखित (1976),व सरांनी दिग्दर्शित केलेले नाटक काळाच्या खूप पुढे होते. अनौरस संतती ह्या अगदी वेगळ्या विषयावर हे नाटक आधारित होते.प्रसिद्ध समीक्षक कै. माधव मनोहर यांनी या नाटकाबद्दल समीक्षा लिहिताना नाटक व दिग्दर्शकाची खूप प्रशस्ती केली होती.

  उदय कला केंद्राच्या नाट्यमहोत्सवानंतर 1975 साली वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी या नाट्यस्पर्धांच्या रिंगणातून दूर रहाण्याचे ठरविले. त्याला वयाबरोबरच नाट्य क्षेत्रातील सुरू झालेल्या काही अनिष्ट गोष्टीचे कारण होते .त्या काळात संस्थेच्या अनेक कलाकारांना अभिनयाची आणि तंत्रज्ञानाची अगणित बक्षिसे मिळाली. सरांचेही  नाव खूप मोठे झाले.

   शिवाय 1972 पासून ‘अमृत नाट्यभारती’, आणि महाराष्ट्र शासन आयोजित राज्य नाट्यस्पर्धेतल्या विजेत्या स्पर्धकासाठी नाट्यशिक्षण शिबिरांचा संचालक म्हणून ते कार्यरत राहिले.  राज्य नाट्यस्पर्धांच्या विविध केंद्रावर स्पर्धा निरीक्षक म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे  प्रत्यक्ष रंगभूमीवरील त्यांचे काम संपुष्टात आले.

  ‘नाट्य प्रशिक्षण शिबिर’, या नव्या प्रांतात त्यांचा प्रवेश झाला. 2002 ला हृदयविकाराचा झटका येईपर्यंत आपल्या कलाकारकिर्दीत, त्यांनी 35 शिक्षण शिबिरे संचलीत केली आहेत. आमच्या सोमवंशीय क्षत्रिय संघातील तरुण होतकरू नाट्यकर्मीसाठीही त्यांनी काही शिबिरे घेतली. त्याचा गोषवाराही पुढे देतो आहे.

   एक नाट्यकर्मी,लेखक,दिग्दर्शक,नाट्यप्रशिक्षक म्हणून त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे विश्लेषण करताना  आपण आश्चर्यचकित होतो. या दीर्घ कालखंडात आपला रोखठोक बाणा जपूनही, नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गजांना सांभाळून घेत, वादविवाद करीत प्रसंगी त्यांच्याशी मैत्री करीत सरांनी जे अभूतपूर्व काम केले  त्याला तोड नाही.

   बी ए, एम ए चे शिक्षण चालू असताना समाजवादी विचारसरणीने सरांना आकर्षित केले. सेवा दलाचे संस्कार होतेच! त्यामुळे समाजवादी पक्षाचा एक पक्षकार्यकर्ता म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. तो काळ मुंबईत जॉर्ज फर्नांडिस यांचा होता. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स का पाटील यांचा  पराभव करून ते निवडून आले होते. जॉर्ज फर्नांडिस संयुक्त समाजवादी पक्षाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष झाले, मृणाल गोरे कार्यवाह झाल्या, आणि त्यांचे बरोबर संयुक्त कार्यवाह म्हणून सरांनी कार्य केले. या पक्षकार्यामुळे फार मोठ्या व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला. अखिल भारतीय ख्यातीचे नेतृत्व राम मनोहर लोहिया, पक्षाचे अध्यक्ष एस एम जोशी,  पन्नालाल सुराणा, मधु दंडवते, बाळ दंडवते, नारायण फेणाणी, पत्रकार निळू दामले अशा अनेक मोठ्या व्यक्तीं बरोबरीने काम केले.  बेस्टच्या कामगारासाठी काही नाटकेही केली.

   समाजवादी पक्षातील या  श्रेष्ठतम व्यक्तींच्या तत्त्वनिष्ठ वागणूकीने भारावून जाऊन पुढे एम ए झाल्यावर समाजवादी पक्षाचा पूर्ण वेळ समर्पित कार्यकर्ता व्हायचे त्यांनी ठरविले होते. मात्र प्रांताध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांना, ”रमेश तुम्ही हा विचार सोडून द्या तो वेडेपणा ठरेल ..”असा आदेश दिला. सरांनी तो मानला .

    बी ए ची पदवी मिळाल्या बरोबर सरांनी आपल्याच गिरगाव मधील विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. तेथे ते मराठी आणि इंग्रजी दोन विषय शिकवीत असत. समाजवादी पक्षात कार्य करीत असतानाच ही नोकरी चालू होती. त्यामुळे ना ग गोरे, एस एम जोशी सदानंद वर्दे साने गुरुजी यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टी मुलांना विषय समजून सांगण्यात खूप उपयोगी पडत. मुलांनाही सरांचा तास कंटाळवाणा वाटत नसे. सरांना शिक्षकाची नोकरी करावयाची होती ती केवळ मुलांना शिकविण्यासाठीच नव्हे तर स्वतःही शिकण्याची आवड होती म्हणून. मिळणाऱ्या पगारांतून आपल्या आवश्यक गरजा भागविण्यापुरत्या वस्तू खरेदी केल्या की उरलेल्या पगारातील अर्धी तरी रक्कम  पुस्तके खरेदी करण्यासाठी वा कोणाची फी, पाठ्यपुस्तके,अशी विद्यार्थ्यांना होईल ती मदत करण्यासाठी खर्च करीत. संध्याकाळी विनामूल्य शिकवण्या घेत. शिकणाऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे हे त्यांच्या वडिलांचे (नारायणराव ), ध्येय   होते. वडिलांचा हा वारसा नकळत त्यांनी घेतला होता.बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक मदत केलीआहे. समारोपाचे  समारंभा वेळी ते विद्यार्थ्यांना परखडपणे सांगत  “मी काही मोठं करीत नाही. माझ्याकडे थोडे जास्तीचे पैसे होते म्हणून मी तुमच्यासाठी थोडंफार करू शकलो. पुढे तुम्ही देखील नोकरी व्यवसाय करताना  तुमचा तुम्हीच हिशोब करून ते पैसे मला परत करा. मला ते परत हवेत कारण माझे उपकार जन्मभर तुमच्या डोक्यावर राहू नयेत म्हणून !”.. इथेही त्यांचा रोखठोकपणा प्रत्ययास येतो.

   चौधरी सरांसारख्या एका उत्कृष्ट रंगकर्मीं कडून शाळेतील शिक्षणाचे धडे गिरवणारी ही मुले खरंच भाग्यवान होती कारण,असे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता ,शैक्षणिक कामगिरी सुधारण्यास मदतरूप होतात व आर्थिक मदत होते ती वेगळीच!अशा शिक्षकांच्या वर्गात सदैव एक  सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण होऊ शकते!

       त्या काळात शिक्षक होणे ही सर्वकाळ हंगामी नोकरी असे. शिवाय पगारही अल्प. शिक्षकाला थोडाफार मान असला तरी मरातब नव्हताच. त्यामुळे त्यांच्या शाळेने,बी एड करण्यासाठी पाठवायचा फतवा काढला तेव्हा सरांच्या एका सहकारी शिक्षकांनी प्रिन्सिपलना विनवून सांगितले, की रमेशला बी एड ला पाठवून मास्तर करून त्याच्या आयुष्याचे नुकसान करू नका”. त्यांनी  रमेश सरांना सांगितले, की याद राख बी.एड करू नकोस.अरे मास्तर झालास तर मुलगी देईल का कोणी?”

  रमेशनी धसका घेतला नाही, मात्र शिक्षकी पेशाला  रामराम केला. 

    आपल्या शिक्षकी पेशाने आपल्याला काय दिले, हे सांगताना सर म्हणत,

 “ माझे काही हुशार विद्यार्थी पुढे विख्यात सर्जन आणि स्पेशालिस्ट झाले. ते जेव्हा मला भेटत,तेव्हा मन आनंदून जाई. आपल्या विद्यार्थ्यांनी नाव यश कीर्ती मिळवली की शिक्षकाला किती आनंद होतो हे जातीवंत शिक्षकालाच ठाऊक!”

     सन 2002 मध्ये हृदयविकाराचा झटका येऊन नाट्य क्षेत्राला रामराम करण्यापूर्वी सरांनी नाट्यशिबिरा तून कलाप्रशिक्षणाच्या च्या क्षेत्रात ही मोठी मजल मारली. 1972 मध्ये अकोला युनिव्हर्सिटी येथील नाट्य शिबिर यशस्वी झाल्यावर त्यांनी पुढील बावीस वर्षे महाराष्ट्र शासनाची आणि खाजगी नाट्य संस्थांची  नाट्य शिबिरे घेतली. मुंबई बारामती नाशिक लातूर रत्नागिरी अशी भारतातील अनेक शहरात सुमारे 35 नाट्य शिबिरे त्यांनी केली व एक नाट्य प्रशिक्षक म्हणूनही मोठे नाव केले.

  षठ्यब्दीपूर्ती समारंभ। उजवीकडे श्री रमेश चौधरी सर व सौ कुंदाताई( डावीकडे)

    त्याच कालखंडात त्यांनी आमच्या सोमवंशी क्षत्रिय समाजातील सांस्कृतिक चळवळीच्या कामाची धुरा सांभाळूत वसई ते बोर्डी  या परिसरात तरुण-तरुणींचे अनेक मेळावे घेतले. त्यायोगाने नाट्य शिबिरेही आयोजित केली. आमच्या युवकयुवतीं साठी ही खूप मोठी संधी होती.  एवढ्या मोठ्या नाट्यकर्मी कडून प्रशिक्षण मिळाल्याने अनेकांनी भावी आयुष्यात त्याचा चांगला उपयोगही करून घेतला आहे.

         हे सर्व उद्योग करीत असताना 1972 ते 75 या काळात रमेश चौधरी सर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतही योगदान देत होते ते परिषदेचे कार्यवाह होते पुढे 17 वर्षे त्यांनी परिषदेचा कोषाध्यक्ष म्हणून अत्यंत पारदर्शक काम केले हिशोब ठेवला त्यामुळे या रोहा येथील अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा अध्यक्ष  होण्याचा बहुमान ही त्यांना मिळाला. मला वाटते आमच्या ज्ञातीतील कलाक्षेत्रातील एवढा उच्च बहुमान मिळवणारे रमेश चौधरी सर हे एकमात्र नाट्यकर्मी होते.

      पद्मश्री भाऊसाहेब वर्तक आणि कै. डॉ. ब.ज पाटील यांनी आग्रह करून रमेश सरांना सोमवंशी क्षत्रिय समाजातल्या सांस्कृतिक चळवळीची धुरा वाहण्यासाठी आमंत्रित केले आणि तेव्हापासून सरांची आमच्या संघाशी नाळ जुळली. त्यांनी युवक- युवती मेळावे, कलानुभव नाट्य शिबिरे या व्यतिरिक्तही संघाच्या इतर विभागात  मोठे योगदान दिले आहे. 

  •    सन 1993 ते 96 स्थायी समिती सदस्य,
  •    सन 1996 ते 99 शिक्षण समिती अध्यक्ष, 
  •    सन  1999 ते 2005 संघ फंड ट्रस्ट चे विश्वस्त,
  •    सन 2005 ते 2011 घटना समिती सदस्य.

       संघ फंड ट्रस्टचे विश्वस्त (2002-2005), या काळात मी देखील एक विश्वस्त म्हणून त्यांचा सहकारी होतो. त्यामुळे त्यांची माझी अगदी जवळून ओळख झाली, परिचय झाला व त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र सुरुवातीला रमेश सरांची रोखठोक वक्तव्ये, आमच्या ट्रस्टच्या  मासिक सभांत ऐकल्यानंतर, प्रथम दृष्टीत हा माणूस नकोसा वाटला. फटकळ, तोंडावर बोलणारा समोर स्तुती न करणारा असा वेगळा वाटला. पण थोड्या ओळखीनंतर  कळले की रमेश चौधरी ही व्यक्ती कशी वेगळी आहे! अनेकदा ते चिडत, रागावून बोलत, मात्र त्यांच्या मनात काही राहत नसे. कधी कधी तर त्यांनाच  दुसऱ्यावर चिडल्याचा पश्चाताप होई व ते हळहळत. एक तत्त्वनिष्ठ माणूस ज्याला आपण, ’मॅन ऑफ प्रिन्सिपल्स’, म्हणतो अशा तऱ्हेचे त्यांची प्रतिमा माझ्या मनांत जी कोरली गेली की आजतागायत!

      सरांना भाऊसाहेब वर्तक व डॉ. ब ज पाटील यांनी आमच्या संघात प्रथम संधी दिली हे बरोबर. मात्र त्यांना सन 1999 साली, आमच्या ट्रस्टचे विश्वस्त म्हणून जी संधी मिळाली ती पू.तात्यासाहेब साहेब चुरी विद्यार्थी वसतीगृह माजीविद्यार्थी संघामुळे. पद्मश्री भाऊ साहेबांच्या निधनामुळे विश्वस्ताची एक  जागा रिकामी झाली होती. त्यासाठी निवडणुक होणार होती . नेहमीच्या प्रथेप्रमाणे निवडणूक न होता नेमणुकीनेच अशा जागा त्याआधी भरल्या जात असत. मात्र यावेळी माजी विद्यार्थी संघाने आपला प्रतिनिधी विश्वस्त मंडळात असावा याची जोरदार मागणी केली व तत्कालीन संघ  नेतृत्वाने,” थोडे सबुरीने घ्या, पुढील विश्वस्त मंडळात आपणाला नक्की स्थान देऊ. यावेळी श्रीमती तारामाई वर्तक यांना संधी देऊया”,असे सुचविले. मान.तारामाईंच्या निवडीला माजी विद्यार्थी संघातील अनेक लोकांचा पाठिंबा होता. त्यांचे कार्यकर्तृत्व, समाजसेवा विशेषतः महाराष्ट्र मंत्रिमंडळातील त्यांचे योगदान खूप मोठे होते. माजी विद्यार्थ्यापैकी काही आक्रमक कार्यकर्त्यांना एक माजी विद्यार्थी प्रतिनिधीच हवा होता. दुर्दैवाने माईंच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून राहण्यास कोणीही तयार नव्हते. मला विनंती केली गेली. मी देखील ते नाकारले. कोणीतरी श्री रमेश चौधरी यांचे नाव सुचविले .आम्ही त्यांच्याशी बोलणे केले, व आश्चर्य म्हणजे चौधरी सरांनी माईंच्या समोर निवडणूक लढविण्यास तयारी दाखवली. खरे तर चौधरी सर व वर्तक कुटुंबीय यांचे खूप पूर्वापार स्नेहाचे व घरोब्याचे कौटुंबिक संबंध होते.माई व चौधरीसर हे देखील बालपणीचे मित्र. मात्र आपला ‘चौधरीबाणा’,त्यांना स्वस्त बसू देईना. “भले या निवडणुकीत एक मत पडले तरी चालेल,मी निवडणूक लढविणार!”

   अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. शेवटी त्या गाजलेल्या सभेचा दिवस उजाडला. दोन्ही बाजूकडून खूपच मंडळी हजर होती. दादरचे वर्तक स्मारक सभागृह तुडुंब भरले होते. अनेकांनी चौधरी सरांना  उमेदवारी मागे घेण्याबद्दल शेवटच्या  दिवशीही  विनविले. परंतु त्यांनी दाद दिली नाही. भोजनानंतर दुपारी दोन वाजता सुरू झालेली सभा संध्याकाळी सहा वाजले तरी निर्णयाप्रत येईना. सभेतील गोंधळाचे वातावरण व सामाजिक ऐक्याची जाणीव ठेवून माईंनी स्वतःहून आपली उमेदवारी मागे घेतली. रमेश चौधरी सर संघाचे विश्वस्त झाले. माईंनीही मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन केले. सर्वांची मने पुन्हा जुळली. कोणताच वाद दोन्ही गटात  राहिला नाही.

   या प्रसंगाने सन्मा. तारामाईंची, ’चांगल्या कामासाठी मोठ्या व्यक्तीने दोन पावले मागे येण्याची’, वृती सर्वांनाच आवडली.

      पुढे याच विश्वस्त मंडळातील श्री मामासाहेब ठाकूर व श्री चिंतामण वर्तक या ज्येष्ठतम विश्वस्तांचे मुदती आधी निधन झाले.  2002 साली दोन विश्वस्तांसाठी झालेल्या निवडणुकीत मी व श्रीमती विजयाताई वर्तक, यांना पुढील तीन वर्षे, सन 2005,पर्यंत काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा श्री चौधरी सर माझे  सहकारी विश्वस्त झाले.

       संघाचा चालता बोलता इतिहास असलेले मुख्य विश्वस्त श्री दामोदर सावे सर,  हुशार व्यासंगी तसेच सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवणारे कार्यकारी विश्वस्त डॉ. बळवंतराव पाटील, रामशास्त्री बाण्याचे रमेश चौधरी सर, सर्वांना सांभाळून घेऊन प्रसंगी मार्मिक विनोदाची पखरण करीत सभेत आनंदी वातावरण ठेवणाऱ्या विजयाताई, व सर्वात तरुण शिकाऊ ऊमेदवार मी, अशी एक चांगली टीम तयार झाली होती. खरोखरच खूप आवश्यक समाजोपयोगी कामे त्या वेळेला झाली. विशेषतः विद्यार्थी वस्तीगृहातील सांस्कृतिक चळवळीला जोर  आणि विद्यार्थिनी साठी वसतिगृहाची हंगामी सोय ही त्यातली महत्त्वाची कामे होत. माझ्यासाठी तर तो एक जेष्ठांकडून मार्गदर्शन घेण्याचा सुंदर अनुभव होता!

       वास्तविक डॉ. बळवंत पाटील हे चौधरी सरांचे खास मित्र. त्यांचे बोट धरूनच  सर संघकार्यात आले होते..तरीही प्रसंगी डॉक्टरांच्या प्रस्तावावर सरांना विरोध करावा वाटला तर तसे करण्यात ते मागेपुढे पाहत नसत. .एक प्रसंग मला अजून स्मरणात आहे.

  ..विद्यार्थीवसतीगृहात प्रवेश हा फक्त आमच्या ज्ञातीतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही नियंत्रित ठेवला आहे.. डॉक्टरांच्या ज्ञातीबाहेरील एका मित्रांना आपल्या नातेवाईकासाठी एका वर्षासाठी  प्रवेश हवा होता. त्यांनी ट्रस्टसाठी एक देणगीही देऊ केली होती. आम्हालाही त्यात काही वावगे वाटत नव्हते. मात्र चौधरी सरांनी त्यावेळी केलेल्या उत्स्फूर्त विरोधी मतप्रदर्शनाने आमची मते ही बदलली .. सर म्हणाले होते, “आज देणगी घेऊन अशा प्रकारे एका विद्यार्थ्याला प्रवेश देणे हे उद्या आपणास जड जाईल. तो नियम होईल. आणि नंतर हक्काने  पोटजातींतील काही  पालक आपल्या पाल्यां करिता  प्रवेश मागतील. त्यावेळी आपण त्यांना वसतीगृहप्रवेश नाकारू शकत नाही. अशी प्रथा सुरू होणे सध्याच्या काळात आपल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य वाटत नाही.. “.

   सरांचे म्हणणे खरे योग्य होते . इतर  समाजाकडूनही ,”काही राखीव जागा आम्हाला मिळाव्यात”, अशी मागणी कै.भाऊसाहेबांच्या काळापासून होत होती. मात्र भाऊसाहेबांनीही ती थोपवून ठेवली होती. आमच्याच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा अपुऱ्या पडत होत्या. खूप स्पर्धा होती. सरांच्या स्पष्टोक्तीचे शेवटी सर्वांनीच कौतुक केले !

       2005 साली आमच्या त्या विश्वस्त मंडळाची मुदत संपली. सर निवृत्त झाले. मात्र संघाच्या इतर कार्याशी ते संबंधित होतेच. त्यानिमित्ताने अधून मधून कार्यालयात त्यांची भेट होई. मी पुढे सन 2005  ते 2014 या कालखंडातील विश्वस्त मंडळातही कार्यकारी विश्वस्त म्हणून सदस्य होतो. त्यामुळे सर कार्यालयात येत. आम्हाला सल्ला देत. कधीकधी सर, मी व आमचे मुख्य विश्वस्त कै. प्रमोद चुरी (ते ही सरांचेच विल्सन हायस्कूल मधील विद्यार्थी), आमच्या कोणाच्यातरी घरी गप्पा मारण्यास जमत असू. खूप मनमोकळेपणाने बोलत असू. विशेषतः चौधरी सरांकडून  त्यांच्या नाट्यजीवनातील अनेक विविध, मजेशीर किस्से ऐकावयास मिळत..सर देखील अत्यंत दिलखुलासपणे त्या गमती आम्हाला सांगत. त्यावेळी त्यांचे व आमचे वयांतील अंतर गळून पडत असे, हे सांगणे नलगे!! माझ्या अंधेरीच्या घरीही आम्ही तिघांनी अनेक सुखद संध्याकाळी घालविल्या आहेत आता सर,प्रमोद चुरी नाहीत.. राहिल्या आहेत त्या केवळ आठवणी!!

     ‘जसं आठवतंय तसं’, या जीवनात गाथेच्या प्रकाशन प्रसंगी, मुख्य पाहुणे श्री मधु मंगेश कर्णिक व इष्टमित्रांसहित श्री चौधरी सरर व  सौ कुंदाताई

   पुढे त्यांचे “जसं आठवतंय तसं”, या पुस्तकाचे लिखाण करण्यासाठी त्यांनी आमच्या स्मारक मंदिरातील एक खोली काही दिवसासाठी मागितली. आम्ही आनंदाने त्यांना ती सोय करून दिली. ते  सर्व पुस्तक अवघ्या काही दिवसात त्यांनी एक टाकी लिहून काढले आहे.  पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांनी मला खास आमंत्रण दिले. आमच्या वर्तक  स्मारक सभागृहातच तो मोठा समारंभ झाला. अनेक नाट्यकर्मी व साहित्य क्षेत्रातील मोठी मंडळी आली होती. सरांनी मलाही दोन शब्द बोलण्याची संधी दिली होती. स्वतः स्वाक्षरी केलेले आपल्या आत्मचरित्राचे एक पुस्तक त्यांनी मला दिले आहे. मोठ्या कौतुकाने माझ्या  वैयक्तिक लायब्ररीत मी ते जपून ठेवले आहे!!

      1972 साली  मुंबईत दूरदर्शन युग सुरू झाल्यावर  या माध्यमातूनही  त्यांनी आपली कला सादर केली . तेथेही रंगभूमी क्षेत्रातील अनेक महान कलाकारांशी  त्यांचा जवळून संबंध आला. त्यांनी अनेक दूरदर्शन मालिकात काम केले व काही मालिका दिग्दर्शित ही केल्या. विशेषतः किलबिल ,कामगार विश्व या मालिकावर त्यांनी तत्कालीन अनेक ज्वलंत विषयावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.

    1983 साली मीना वैष्णवी या दूरदर्शन निर्मातीने भारतातील पहिली दूरदर्शन मालिका ‘श्वेतांबरा’, सादर केली.या मालिकेची संहिता पटकथा संवाद सरांनीच लिहिले होते. ही मालिका त्यावेळी दूरदर्शनवर खूप गाजली व सरांचाही बहुमान झाला. त्यावेळच्या दूरदर्शनवर त्त्यांनी सुहासिनी मुळगावकर, विजया जोगळेकर, किरण चित्रे, वसुंधरा पेंडसे या गाजलेल्या निर्मात्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या सर्वांचा ते खूप कृतज्ञतापूर्वक ऊल्लेख करीत.

मला अजून आठवते, त्यावेळी दूरदर्शनवरील आपल्या  सानिध्याचा लाभ घेऊन कै. डाॅ रखमाबाई राऊत, या आमल्च्या सो क्ष समाजातील, परदेशी शिक्षण घेऊन स्पेशालिस्ट म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या भारताच्या आद्य स्त्री डॉक्टर, यांच्यावर एक टीव्ही मालिका करावी असा त्यांचा मानस होता. त्यासाठी संघाकडून काही आर्थिक मदत मागण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला होता.  दुर्दैवाने त्यावेळी काही समाज बंधूंना तो प्रस्ताव मंजूर झाला नाही. सरांचे स्वप्न भंगले. सर्वांनीच एक महान ज्ञाती भगिनी व अग्रगण्य समाजसेविका डॉ. रखमाबाई राऊत यांच्या ऋणांतून अंशतः तरी मुक्त होण्याची संधी घालविली. 

     चौधरी सरांच्या विविध व्यवसायांचे अवधान राखून घरच्या संसारिक जबाबदाऱ्या,मुलांची शिक्षणे, आजारपण या आघाड्या  यशस्वीपणे सांभाळणार्या, त्यांच्या सौभाग्यवती कुंदाताई यांचा जर येथे ऊल्लेख मी  केला नाही तर तो ताईंवर अन्याय होईल. उच्चशिक्षित कुंदाताईनी सोशल कौन्सिलर, टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मेडिकल सोशल वर्कर, अशा मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत  घरची आघाडी यशस्वी केली. कुंदाताई बोर्डीच्या. त्यांचे मामाचे घर आमच्या घरासमोर. त्यामुळे बोर्डीत असताना त्यांची कधीतरी तोंड ओळख होती. मात्र त्यांची खरी ओळख टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये झाली. माझे वडील तेथे कॅन्सर वरील उपचारासाठी दाखल असताना मी त्यांच्या खोलीत वडिलांशी बोलत बसलो होतो. तेवढ्यात एक मॅडम,” मि. वामनराव राऊत याच खोलीत ऍडमिट आहेत का?” अशी चौकशी करीत आल्या. मी देखील त्यांना, होय ही त्यांचीच खोली”, म्हणून सांगितले. आम्ही बोर्डीचे आहोत  सांगितल्यावर सौ. कुंदाताईंनीही आपली ओळख दिली. सविस्तर बोलणे झाले. ”वडिलांना कोणतीही मदत, सहाय्य या हॉस्पिटलमध्ये लागल्यास मला जरूर सांग”, असे आश्वासन देऊन त्यांनी आपला फोन नंबरही मला दिला. अधून मधून एक दोनदा त्यांनी येऊन चौकशी केली, मार्गदर्शन केले. पुढे चौधरीसर  आमचे सहकारी विश्वस्त झाल्यावर कधीतरी त्यांचे घरी  विश्वस्त मंडळ मीटिंगसाठी जात असु, तेव्हा कुंदाताईशी परिचय दृढ झाला. सरांच्या निवृत्तीनंतरही त्यांच्या दादरच्या विकास वाडीत आम्ही गप्पा करण्यासाठी जात असू व कुंदा ताईंचे आदरातिथ्य मिळे. जुन्या आठवणी निघत. ताईंची  विद्वत्ता कामाचा अनुभव आणि शालिनता याचे दर्शन होई.

   सौ कुंदाताई व श्री रमेश चौधरी सर.

   आपल्या पत्नी विषयी सर म्हणत, “बायकोच्या बाबतीत मी अत्यंत नशीबवान आहे, असं माझ्या जन्मदात्यापासून अलम दुनियेचं ठाम मत आहे, आणि सगळे म्हणतात त्यात शंभर टक्के नव्हे हजार टक्के सत्य आहे! कुंदा मुळे माझा संसार उत्तम झाला. क्वचित प्रसंगी माझ्या विरोधात मतप्रदर्शन करायलाही तिने मागे पुढे पाहिले नाही. तिने संसाराच्या जबाबदारीतून मला सदैव मुक्त ठेवल्यामुळे नवनव्या प्रयोगांच्या दिशा मला धुंडाळता आल्या..”

    मला वाटते रमेश चौधरी सरांसारख्या ‘दुर्वासमुनींने’, शिघ्रकोपी पतीने दिलेल्या या शिफारस पत्रानंतर, त्यांना अन्य कोणत्या प्रशस्तीची गरज नाही. धन्य तुमची कुंदाताई!!

   चौधरी सरांनी आपले ,”जसं आठवतंय तसं “,ही जीवनगाथा,  आपली ‘प्रिय पत्नी कुंदास..’, सादर अर्पण केली आहे. 

  (वर) कविवर्य कुसुमाग्रजांचे स्वागत करताना.
 (खाली) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कडून सत्कार घेताना.

    चौधरी सरांच्या प्रदीर्घ व विविधांगी व्यापांचा संपूर्ण आलेख शब्दात पकडणे मला शक्य नाही. जेवढे शक्य होते ते मी लिहिले. त्यातही त्यांच्याच,’ जसं आठवतं तसं’, या जीवनगाथेचा मला उपयोग झाला. ते माझे विश्वस्त म्हणून सहकारी तर होतेच पण पुढे एक मित्र झाले आणि त्या मैत्रीच्या नात्यापुढे, त्यांच्याशी संवाद करताना कोणतीच बंधने आली नाहीत. आम्ही एकत्र काम केले, समाजात फिरलो, कसं जगायचं, जीवनातला आनंद कसा लुटायचा, हे रमेश चौधरी सरांनी मला शिकवले!.

   सरांचे चिरंजीव अमित आणि कन्या सौ.शोनाली यांना मी त्यांच्या बाबां बद्दल काही आठवणी सांगण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली या प्रतिभावान कलावंताच्या मुलांना आपल्या वडीला बद्दल काय सांगायचे आहे ते त्यांच्याच  शब्दात देतो..

       “मी अमित चौधरी आणि माझी धाकटी बहिण सौ. शोनाली नवलकर. श्री दिगंबर राऊत यांनी विनंती केली की तुमचे वडील कै. रमेश चौधरींविषयी लिहा, म्हणून हा शब्दप्रपंच.

  वास्तविक बाबांच्या आठवणींविषयी काय लिहावे हा प्रश्न पडला. कारण, खरं सांगायचं तर आमचे बाबा शिकवण्या (फुकट) करायचे, व्यावसायिक तसेच प्रायोगिक नाटके दिग्दर्शन व अभिनय करणे, विल्सन हायस्कूल, किंग जाॅर्ज हायस्कूल ईथं शिक्षक म्हणून नोकरी, नंतर स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, पाॅप्युलर प्रकाशन मधील नोकरी, तसेच संयुक्त समाजवादी पार्टीचे सचिव या प्रवासात बाबा आमच्या वाट्याला कमीच आले. लहानपणी या गोष्टीचा खूप राग यायचा, पण जसजसे मोठे होऊ लागलो तसंच कळायला लागलं की “बाबा” हे ‘सर्वव्यापी’ व्यक्तिमत्व आहे, कमी वेळ का होईना आपल्या वाट्याला आलेला “Quality Time” एन्जाॅय करायचा.

       बाबा १९५३ पासून आत्माराम भेंडे, बबन प्रभू यांच्या बरोबर “कलाकार” संस्थेत होते. नंतर आय. एन. टी आणि त्यांची गाजलेली नाटके झोपलेले नाग, अ ब आणि क, आई, इत्यादी नाटके, नंतर ऊदय केला केंद्रातर्फे सादर केलेली निखारे, का असंच का? ग्रॅंड रिडक्शन सेल, महाभारत अपूर्व पर्व, पाचोळा जळत नाहीये, मधल्या भिंती, श्रीमंत पतीची राणी, वटवाघळं ही नाटकं, तसेच माझगांव डाॅक, नेव्हल डाॅकयार्ड, मुंबई महानगर पालिका, अमृत नाट्य भारती, अनामिका या संस्थांसाठी दिगदर्शित केलेली नाटकं यादी खूप मोठी आहे. पण यातलं वटवाघळं हे नाटक सोडलं तर ईतर नाटकं आम्ही पाहू शकलो नाही, पण बाबांचे सहकारी आजही त्या आठवणी काढतात. 

      १९७६ साली ऊदय केला केंद्रातर्फे सादर केलेलं, विजय मोंडकर लिखित बाबांनी दिगदर्शित केलेलं “वटवाघळं” हे नाटक बाबांच्या नाट्यविषयक कारकीर्दीचा शिरपेच म्हणाला लागेल.

अनैतिक संबंधातून जन्माला आलेले जुळे बहिण भाऊ, अनौरस म्हणून रस्त्यावर वाढलेले. समाजाकडून वापरले, ठोकरले गेलेले, आईवडिलांचा सूड घ्यायचा ठरवतात. वटवाघळं नाटक हा सबंध ‘सूडाचा प्रवास’ आहे. तितकाच प्रक्षोभकही. ऊदय कला केंद्रात या नाटकासाठी काम करायला कोणी तयार होईल का, या भितीपोटी बाबांनी संस्थेबाहेरील कलाकार श्रीमती अनुया अमोल पालेकर व डाॅ. ज्योत्स्ना कार्येकर (सुलभा देशपांडे यांच्या भगिनी व यतीन कार्येकर यांच्या मातोश्री) यांना घेतले.

      ४८ वर्षांपूर्वी केलेलं नाटक हे खरंच काळाच्या खूप पुढचं होतं. कै. माधव मनोहर (कै. रत्नाकर मतकरींचे सासरे) व तत्कालिन थोर नाट्यसमीक्षक यांनी ‘सोबत’ मध्ये या नाटकावरील समीक्षेत लिहिलंय “रमेश चौधरी हा एक मोठा जादूगार आहे. आयत्या वेळी तो आपल्या पोतडीतून काय काढेल सांगता येत नाही” 

     कुठल्याही कलाकाराला अशा श्रेष्ठ नाट्समीक्षकाकडून मिळालेली ही मानवंदना आणि कामाची पावतीच आहे. असो.

बाबांचा ईतर नाट्य प्रवास काही लेखकांनी या अंकात दिला असल्याने विस्तारभयास्तव पुन्हा उल्लेख करत नाही. 

इतकं करून ही बाबांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. महाकवी कालीदास हा ऊत्तुंग प्रतिभेचा कविश्रेष्ठ. त्यांचं गुणवर्णन तत्कालिन कवीने खालील प्रमाणे केलं आहे.

“पुरा कविनां गणना प्रसंग

कनिष्ठिकाधिष्ठित कालीदास:

अद्यापि तत्तुल्य कवेर्अभावात

अनामिका सार्थवती बभूव !”

महाकवी कालीदास विक्रमादित्याचा शालक असूनही त्याच्या सारख्या महान कलावंतालाही सनातनी कर्मठ कंपूशहांची कारस्थानं मोडून काढता आली नाहीत, तेथे गतकालात निर्विवाद गुणवत्ता सिद्ध केलेले काही सरळमार्गी, पापभिरु, सज्जन रंगकर्मी ‘हेचि फल काय मम तपाला’ म्हणण्याखेरीज काय करू शकणार?

थोडक्यात आम्हाला लहानपणी ‘न कळलेले बाबा’ तारुण्यात हळूहळू कळायला लागले व त्यांच्या विषयी आदरभाव वाढला. परंतु एक खंत आमच्या दोघांच्याही मनात राहील ती म्हणजे बाबांच्या या ‘प्रवासात’ आमचा सक्रीय सहभाग राहीला नाही. 

या लेखाद्वारे आम्ही, मी व शोनाली, बाबांना आदरांजली वाहू देण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे  मनापासून आभार मानतो.”.. 

   अमित, शोनाली तुमची खंत आम्ही समजू शकतो. मात्र तुमच्या बाबांनी, नाट्य, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय  क्षेत्रात अभूतपूर्व  काम करून आपल्या कामाचा कायमचा ठसा समाज मानसावर उमटविला आहे. हा आपल्यासाठी खूप मोठा वारसा त्यांनी ठेवला! बाबांना त्यांच्या कामाचे श्रेय जेवढे मिळावयास हवे होते ते नाही मिळाले. ही आम्हा सर्वांची खंत आहे. पण असे दुर्दैव अनेक सरळमार्गी प्रतिभावंतांच्या पदरी येते हा इतिहासाचा दाखला आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख कुठेच खाली येत नाही!

    सरांनी देखील  शेवटी,  “हा आपल्या प्राक्तनाचाच भाग..”, असे समजून ते दुःख स्वीकारले. जीवन रसरसून  जगले.

    आपल्या विद्यार्थ्यांना तरुण नाट्यकर्मींना, “अल्पसंतुष्ट राहू नका, ज्ञानपीपासू समृद्ध व्हा, प्रगल्भ व्हा, सतत नाविन्याचा ध्यास घ्या. सन्मानाची अपेक्षा धरू नका” असा संदेश देत त्यांनी या जगाच्या रंगमंचावरून 18जुलै 2011 साली कायमची एक्झिट घेतली!

   त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

  श्री. दिगंबर वामन राऊत.

श्वेतांबरा विल्की कॉलिन्स यांच्या ‘ वुमन इन व्हाईट ‘ या कादंबरीवर आधारित रुपांतर – रमेश चौधरी