“अंतरी निर्मळ”, कै. मनोहर लोटलीकर!

               कै.मनोहर डी. लोटलीकर.
              (05/01/1926 – 10/04/2024)

आपले गुरु कोण? आयुष्याच्या पहिल्या चारएक वर्षात आपले आईवडील, नंतर शिक्षणकालात प्रत्येक टप्प्यावर शिक्षक, पुस्तके, मित्र, पुढे व्यवसाय उद्योगात कामाच्या ठिकाणी बॉस तर आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर मन शांतीसाठी अध्यात्मिक गुरु!

खरा गुरु हा छुपा रुस्तम असतो. तो सत्पुरुष असतो. सर्वसामान्य लोकांमध्ये तो असा मिसळलेला असतो की त्याला वेगळे  काढणे कठीण. प्रसिद्धी नको असल्यामुळे तो भगवी वस्त्रे वा गंध टिळा लावत नाही. आपल्या भोवती आसपास असणाऱ्या लोकांना जी काही मदत करता येईल ती करतो, त्यापासून कोणतेही अपेक्षा ठेवत नाही. अडल्या पिडलेल्यांना  मनापासून मदत करतांना कधीही पैशाची मागणी करत नाही. कोणत्याही दानासाठी हपापलेला नसतो. कोणत्याही प्रकारे प्रापंचिक अडचणी सोडवण्याकरता तो  मदत करीत नाही. मात्र अशा अडचणी जर अन्यायामुळे कोणाची मनःशांती घालवीत असतील, तर मात्र तो स्वतःची शक्ती वापरून, ज्यावर अन्याय होतो आहे त्याला मनःपूर्वक संरक्षण देतो, न्यायाची बाजू घेतो! भले तसे करताना स्वतःची हानी झाली तरी त्याची परवा करत नाही. कारण त्या पुरुषाचे ‘मी पण’, पक्व फळा प्रमाणे अगदी सहज गळून गेलेले असते.  

  “जीवन त्यांना कळले हो ..”,असे कविवर्य बोरकरांनी म्हटले आहे ते उगाच नाही!

  असा गुरु सहजासहजी मिळणे कठीण!

 बालपणी आईवडील, शिक्षण काळात शिक्षक,वयोवृद्ध गृहस्थ, व्यवसाय नोकरीत आपले वरिष्ठ साहेब, चांगले विचार असलेले सहकारी, प्रसंगी अगदी अडाणी मजूर सुद्धा आपले गुरु होऊ शकतात!

    माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर अनेक अडचणी आल्या .कोणाची तरी मदत घ्यावी लागली .ज्यांनी ज्यांनी त्यावेळी मला मदत केली मार्गदर्शन केले योग्य रस्ता दाखविला ,माझ्यासाठी स्वतःचेही नुकसान झाले तरी त्याची पर्वा केली नाही, अशा माणसांची मला नेहमीच आठवण येते.मी त्यांना खरोखर कधीही विसरणार नाही, विसरू शकत नाही !!

   ही एवढी सर्व प्रस्तावना करण्याचे कारण आज सकाळी ऐकलेली श्री. मनोहर लोटलीकर सर यांच्या निधनाची दुःखद बातमी! श्री लोटलीकर साहेब माझे कोण होते? ना माझ्या नात्यागोत्यातील अथवा ना माझ्या ज्ञातीतील. ज्यासरकारी आस्थापनात मी काम केले त्याच आस्थापनातील एक वरिष्ठ अधिकारी हाच त्यांचा माझा संबंध ! अशा हजारो माणसांचा त्याकाळी त्या आस्थापनात काम करताना माझ्याशी संबंध आला. श्री लोटलीकर यांना माझे गुरु,(Mentor) म्हणून त्यांचे विषयी आजही असलेला जिव्हाळा प्रेम आदर याला कारण त्यावेळी घडलेला एक प्रसंग! 

या प्रसंगात घडलेली कथा तंतोतंत सत्य असून फक्त मी काही  नावे त्यात मुद्दामहून घेतलेली नाहीत.

     ज्या सरकारी पेट्रोलियम आस्थापनातून मी सेवानिवृत्त झालो ते सुरुवातीला एक बहुराष्ट्रीय अमेरिकन आस्थापन होते. त्या आस्थापनात नोकरीची संधी मिळणे हे भाग्याचे समजले जाई कारण तेथे मिळणारे मासिक वेतन हे तत्कालीन इतर सर्व राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत भरघोस असे होते .आणि मी खरेच नशीबवान अशा एका चांगल्या कंपनीत  अत्यंत चुरशीच्या स्पर्धेनंतर माझी निवड झाली होती! कोणत्याही  वशिल्या शिवाय!

   ज्यावेळी अशा मोक्याच्या जागी आपली बाहेरून निवड केली जाते त्यावेळी त्या आस्थापनातील जुनी मंडळी ज्यांचा त्या जागेवर डोळा असतो दुखावली जातात व साहजिकच ते आपला द्वेष करू लागतात. माझेही तसेच झाले. बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या काही जुन्या मंडळींना माझी  ऑफिसर म्हणून झालेली नेमणूक खुपू लागली .

    या संदर्भात दुसरी एक गोष्ट पार्श्वभूमी म्हणून सांगणे आवश्यक आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीत मी ज्या गुणवत्ता परिक्षण (क्वालिटी कंट्रोल) खात्यात काम करीत होतो त्या खात्यात आमची प्रयोगशाळा भारतात एक नावाजलेली होती. प्रायव्हेट कंपनीचे मालक आपले प्रॉडक्ट सॅम्पल आम्हाला अनेकदा तपासणीसाठी पाठवत. त्यांच्याकडे तेवढ्या सुसज्ज प्रयोगात शाळा नव्हत्या. आम्ही त्यांची कडून योग्य ती फी घेऊन त्यांना आमचे सर्टिफिकेट देत असू, व ते ग्राह्य धरले जात असे. 

 क्वालिटी कंट्रोल व संशोधन प्रयोगशाळा

    माझे वरिष्ठ साहेब असे खाजगी कंपन्याकडून आलेले सॅम्पल नोंद वहीत न (Registration) लिहिता परस्पर आमचे मार्फत तपासून त्यांचे पैसे स्वतःच्या खिशात घालत. माझा एक सहकारी याबाबतीत त्या वरिष्ठांना पूर्ण सहकार्य देऊन त्याचा थांग पत्ता कुणाला लागू देत नसे. हे वरिष्ठ साहेब कंपनीची इतरही काही गुप्त माहिती, फॉर्मुलेशन्स इत्यादी खाजगी कंपन्यांना भरपूर मोबदला घेऊन देेत व त्याचे पैसे कन्सल्टन्सी चार्जेस  या नावाखाली परस्पर खिशात टाकित असत हेही मला माहीत होते. मात्र मी याबाबतीत कोणाशीही काही बोलत नसे. ’ज्याचे त्याचे कर्म..’ ही माझी भावना असे! वरिष्ठसाहेबाला अशा प्रकारे मदत करीत असल्याने हा माझा सहकारी खूपच चढेल झाला होता व माझ्याशी नेहमी ऊर्मटपणे बोले. आधीच माझ्यामुळे प्रमोशन गेले या भावनेने माझ्यावर त्याचा रागही होता! मी शांतपणे माझे काम करीत राही. मात्र मनात एक खदखद सतत असे. या संशयास्पद वातावरणात काम करणे मला कधी कधी असह्य होई.

      आणि या दाबून ठेवलेल्या वाफेचा एक दिवशी स्फोट झाला. काम करताना एका उपकरणा वरून थोडी वादावादी झाली. या सहकाऱ्यांने मला, ”ही प्रयोगशाळा तुझ्या बापाची आहे का?” असे उद्गार काढले.

   तत्क्षणी राग अनावर होऊन मागचा पुढचा विचार न करता मी त्याच्या श्रीमुखात ठेवून दिली. त्यालाही त्याची चुकी कळली होती. त्यानेही ‘सॉरी’ म्हटले, मी देखील ‘सॉरी’, म्हटले खरे तर विषय संपला होता. मी माझे काम आटोपून संध्याकाळी घरी आलो. मात्र प्रकरण एवढ्यावर संपले नव्हते हे मला  दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेल्यावर कळले. माझ्या हितशत्रूंनी वरिष्ठ साहेबांना चर्चगेट येथील मुख्य कार्यालयात जाऊन  ही सर्व हकीगत रंगवून सांगितली.या सहकार्याला चर्चगेट कार्यालयात घेऊन गेले. या वरिष्ठांनी आमच्या HOD, मुख्य विभाग प्रमुखा कडे, हे प्रकरण नेऊन माझ्यावर तत्काल  कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानुसार मुख्य कार्यालयातील तीन सीनियर मॅनेजर्स चौकशीसाठी आमच्या माझगाव आस्थापनात आले होते.

  मी एकदम भांबावून गेलो होतो. अशाप्रसंगी कसे वागायचे ते माहित होते. मी माझी बाजू चौकशी अधिकाऱ्यासमोर स्पष्टपणे मांडली. गुन्हाही कबूल केला. मात्र त्याची पार्श्वभूमी सांगितली. परंतु कमिटीचा निर्णय आधीच ठरलेल्या असल्याने माझ्या म्हणण्याला काही अर्थ नव्हता .त्वरित दुपारी मला आमच्या चर्चगेट कार्यालयात बोलविण्यात आले. आमचे विभाग प्रमुख साहेब(HOD), सज्जन व पापभिरू होते. त्यांनाही मी जे घडले जसे घडले ते सांगितले. आमच्या वरिष्ठ साहेबांचे कारनामे ही त्यांच्या  कानावर घालण्यास मी विसरलो नाही.

   आमच्या एच ओ डी साहेबांनी मला ,”खरे तर आत्ताच मी तुला कामावरून कमी करू शकतो, मात्र एक संधी देतो. याच्यापुढे अशी चूक करू नकोस.” अशी तोंडी सूचना देऊन मला परत पाठविले . दुसरे दिवशी पासून नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात केली . माझे हे सहकारी व वरिष्ठ साहेब या जोडीचा अपेक्षाभंग झाला होता. ‘राऊत आता संपला..’ अपेक्षेचा भंग झाला होता. जरी आता ते मला प्रत्यक्ष काही बोलत नव्हते तरी त्यांची बोचरी तटस्थता मला जाणवत होती.

   परमेश्वराच्या या जगात ,”देर है अंधेर नही ..”,या म्हणीची  सत्यता मला पटली. पुढील काही काळातच माझ्या या वरिष्ठ साहेबांना एका दुसऱ्या भ्रष्टाचार प्रकरणात गोत्यात आल्यामुळे एस ओ डी, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी,(OSD), अशी नेमणूक झाली. ते आमच्या चेंबूर येथील रिफायनरीत टेबल खुर्ची घेऊन कामाशिवाय बसू लागले. आणि आमचा विभाग श्री लोटलीकर साहेबांच्या अधिपत्याखाली आला.

Sales Engineers conference 1979.  (Shree Lotlikar, sitting fourth from right.)

     या डिपार्टमेंटचा चार्ज घेतल्यावर थोडेच दिवसात साहेब आमच्या माजगाव येथील प्रयोगशाळेत, संशोधन खात्यात आले. सर्वांशी बोलून ओळख करून घेतली. प्रत्येकाच्या कामाची माहितीही घेतली. माझ्याशीही विस्तृतपणे चर्चा केली.

    विशेष म्हणजे त्यानंतर मला साहेबांचा फोन आला. एके दिवशी संध्याकाळी माहीम येथील गजानन कॉलनी च्या पत्त्यावर मला घरी येऊन भेटण्यास सांगितले. मलाही खूप आश्चर्य वाटले. भीतीही वाटली. एके दिवशी ऑफिस सुटल्यावर त्यांच्या घरी जाऊन मी दाखल झालो. सरांनी घरी बोलाविण्याचे कारण कळले नव्हते. धाकधूक होती. मात्र मोठ्या प्रेमाने त्यांनी मला जवळ बसविले व कामाची ऑफीसची जुजबी  चर्चा झाल्यावर विषयाला हात घातला. घरी बोलावण्याचे कारण सांगितले . पूर्वीच्या वरिष्ठांबरोबर झालेल्या त्या प्रकरणा नंतर जरी कंपनीने माझ्यावर कारवाई केली नव्हती  तरी त्या जुन्या वरिष्ठांनी माझ्या वैयक्तिक शेरेबुकात, (Confidentia Record), ज्या टिपण्या केल्या होत्या त्या अत्यंत हानिकारक व माझ्या पुढील प्रगतीस सर्वस्वी बाधा आणणाऱ्या अशा होत्या. लोटरीकर साहेबांनी माझ्याशी संबंधित इतर वरिष्ठांशी  बोलून, माझ्या कामाची, निष्ठेची चौकशीही केली होती व आमच्या प्रयोगशाळेला भेट देऊन प्रत्यक्ष माझ्याशी  बोलून मला अजमावले होते. कुठेतरी माझ्यावर अन्याय होतो आहे ही जाणीव झाल्यामुळेच, या जुन्या प्रकरणाशी त्यांचा कुठेही संबंध नसताना, मी त्यांचा कोणीही आप्त  नसताना हे सर्व केले होते.

  शेवटी साहेब म्हणाले, “जे रेकाॅर्ड मध्ये लिहिले गेले ते बदलता येणार नाही. मात्र या पुढे मी तुझे नुकसान होणार नाही याकडे लक्ष देईन. काळजी करू नको. भविष्यात आपल्या वरिष्ठा बरोबर कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होईल असे करू नको. कामाच्या ठिकाणी कोणताही प्रकारे कायदा हातात घेणे ठीक नाही. जरी तू बरोबर असलास व आपल्यावर अन्याय होतो आहे याची जाणीव असली तरी त्यावेळी शांत राहणे हेच शहाणपण!. शेवटी कार्यालयीन शिस्त ही महत्त्वाची आहे तेथे कायदे निराळे असतात ही जाणीव ठेव ….“.

  अशाप्रकारे मला त्यांनी उपयुक्त  समुपदेशन केले. माझ्यासारख्या एका नवख्या अधिकाऱ्याला त्यावेळी त्यांनी जे सांगितले त्याचा शब्द न शब्द आजही माझ्या लक्षात आहे. मी निश्चितच माझ्या पुढील आयुष्यात त्याचा उपयोग केला व त्याचा मला फायदाच झाला. त्यांनी त्या काळी जे केले ते केवळ असाधारण असे होते. कोणताही वरिष्ठ आपल्या हाताखालील अधिकाऱ्यासाठी  चाकोरी बाहेर जाऊन अशी मदत करेल हे केवळ असंभवनीय आहे. माझ्या बाबतीत साहेबांनी ते केले. मला कायमचे उपकृत केले. मला त्याचे अप्रुप तेव्हाही वाटले आजही आहे आणि शेवटपर्यंत राहील! आज साहेब गेल्याची बातमी आली त्या आठवणी जागरूक झाल्या आणि या महान विभूतीला माझी श्रद्धांजली देण्यासाठी हे थोडे लिहिले. ते माझे कर्तव्य आहे.

     त्यानंतर साहेबांबरोबर जिव्हाळ्याचे नाते जडले ते आज त्यांच्या अखेर पर्यंत. आमच्या आस्थापनातून सेवानिवृत्त होईपर्यंत (1983-84)मी  माहीमच्या घरी जाऊन त्यांना भेटत असे. सल्ला घेत असे. मध्ये काही काळ ते मुंबईहून बदली होऊन कलकत्ता येथील आमच्या रिजनल ऑफिस मध्ये  डिस्ट्रिक्ट मॅनेजर (DM), म्हणून रुजू झाले. दोन-तीन वर्षाच्या कालानंतर पुन्हा मुंबईत आमच्याच ल्यूब डिपार्टमेंटला आले..त्या काळात मी देखील माझगाव सोडून आमच्या मुंबईतील मार्केटिंग कार्यालयात रुजू झालो होतो. लोटलीकर साहेबच आमचे खाते प्रमुख होते. रोज सरांशी भेट होई. खरे तर एवढ्या विद्वान निस्पृह, प्रामाणिक काम करणाऱ्या अधिकाऱ्याला आमच्या आस्थापनाने निर्देशक(DIRECTOR) पदापर्यंत तरी बढतीची  संधी द्यावयास हवी होती. मात्र जे इतर आस्थापनात होते तसेच आमच्याकडेही झाले. एवढ्या कर्तुत्वान ,अनुभवी माणसाला केवळ डेप्युटी जनरल मॅनेजर (DY GEN.MANAGER) याच पदावरून सेवानिवृत्त व्हावे लागले. तो इतिहासही वेगळा आहे, दुर्दैवी आहे. एका कवीचे बोल त्यांच्या बाबतीत अगदी सार्थ वाटतात.

“ पतिव्रतेच्या माथी धोंडा, कुलटेचा सन्मान! विठ्ठला तू वेडा कुंभार!!”

     सर निवृत्त झाल्यावर देखील माझे सरांना नियमित भेटणे होई. त्यांच्या माहीम येथील घरी जाऊन मी भेटत असे. अनेकांना  त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा घेण्याची इच्छा होती. मात्र कोणाला सल्ला द्यावयाचा याबाबतीत त्यांचे निश्चित निष्कर्ष होते. ”माझ्या कंपनी च्या हिताला बाधा होईल अशा प्रकारचे काम नवीन आस्थापनात करावयाचे नाही ..” हा त्यांचा बाणा होता. तो त्यांनी पाळला. त्यामुळेच त्यांनी ,वापरलेली तेले पुनःशुद्धीकरण करणाऱ्या(Re refining of the used Oils) आस्थापनात काही काळ काम केले. त्यांचा नवीन कारखाना तारापूर एमआयडीसी मध्ये उभा करून दिला. स्वतःला कामात गुंतवून ठेवले.

      दुर्दैवाने त्याच कालखंडात त्यांच्या सौभाग्यवती एका दुर्धर आजारान अकालीच निधन पावल्या. सरांसाठी  तो खूप मोठा धक्का होता. मी जेव्हा त्यांच्या घरी जाई तेव्हा त्यांची भेट होई. सौभाग्यवती लोटलीकर मॅडम या खरेच अत्यंत सात्विक प्रवृत्तीच्या सुहास्यवदना व एक सुगरण अशा गृहिणी होत्या. मी ज्यावेळी त्यांच्या घरी जाई अतिशय प्रेमाने सौजन्याने त्या स्वागत करून त्यांनी स्वतः बनवलेले अनेक खाद्यपदार्थ प्रेमाने खायला देत. म्हणून हे मी खात्रीने सांगतो. स्वाती व नवनीत ही त्यांची शाळेत जाणारी मुले तेव्हा लहान होती.

Mrs. and Mr. M D Lotlikar…the Golden times!

   मी माझ्या आस्थापनांतील अनेक वरिष्ठांच्या घरी कोणत्यातरी कारणानिमित्त गेलेलो आहे. तेथील थाटमाट व उच्चभ्रू राहणीमान  पाहिल्यानंतर, लोटलीकर कुटुंबीयांच्या माहीम  गजानन कॉलनी मधील घरातील वातावरण पाहिल्यानंतर, एका सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबाचे दर्शन होत असे. एका मोठ्या आस्थापनात अत्यंत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या सरांचे हे कौटुंबिक जीवन निश्चितच एक आदर्शवत असे होते. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील मूल्यांची जाणीव त्यातून होत असे. खरे तर त्यांना पेडर रोड सारख्या उच्चभ्रू वस्तीत एक विशाल निवासस्थान कंपनीतर्फे देण्यात आले होते मात्र त्याला त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे आमचे लोटलीकर साहेब होते!

    सौभाग्यवतीच्या अकाली निधना नंतर सरांना एकटेपणा जाणवू लागला. मधल्या काळात मुलेही देशा परदेशात आपल्या मार्गाला लागली होती.  सरांनी,  राजा शिवाजी विद्यालय व इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या कामात लक्ष घालण्यास सुरुवात केली. रोज सकाळी आपला जेवणाचा डबा घेऊन बसने ते दादरला जात. आपल्या व्यवस्थापकीय अनुभवाचा लाभ त्यांनी त्या संस्थेला दिला.  तेथेही सर्वांची मने जिंकून घेतली. माझी त्यांच्याशी भेट कधीतरी होतच असे. ही इंडियन एज्युकेशन सोसायटी व हे राजा शिवाजी विद्यालय जुने किंग जॉर्ज हायस्कूल त्यांचेच जेष्ठ बंधू कै.माणिकराव लोटलीकर यांच्या योगदानामुळे निर्माण झाली आहे, ही माहिती कधीतरी सरांनी मला गप्पाच्या ओघात ही  दिली होती.

    सन 2002 सालापर्यंत सरांनी वयाची 75 वर्षे ओलांडली होती. शरीराच्या काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या. अमेरिकास्थित त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना तेथे बोलावून घेतले. तेव्हापासून माझा सरांशी असलेला वैयक्तिक संपर्क कायम तुटला. तो पुढे सन 2022 साली कसा प्रस्थापित झाला ती कहाणी पुढे सांगतोच!!

   श्री मनोहर डी लोटलीकर म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व. कुशाग्र  बुद्धिमत्ता व परोपकारी सहृदयता याचे मनोहरी मिश्रण! मी मागे म्हटल्याप्रमाणे स्वतःविषयी ,आपल्या मोठेपणाविषयी बालपणाविषयी, पुरस्कार ई. बद्दल कधीच काही बोलत नसत. त्यांच्या कधीकाळी बोलण्यातून समजलेल्या माहितीप्रमाणे ते शालेय वयापासूनच एक अत्यंत हुशार मेहनती विद्यार्थी होते. त्यांच्या वेळी मॅट्रिक परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. ही गुणवत्ता त्यांनी आपल्या बी इ इंजीनियरिंग पदवी या पदवी परीक्षेपर्यंत कायम टिकविणे त्यांची ही हुशारी पाहूनच त्यावेळची प्रख्यात अमेरिकन कंपनी स्टॅंनव्हॅकने अमेरिकेतूनच त्यांना आपल्या भारतातील आस्थापनासाठी निवड केली. नवीन अधिकाऱ्यांना खूप दुर्मिळ अशी संधी त्यांना अमेरिकन कंपनीने दिली. आपले जगभरातील लुब-प्लांट्स व शुद्धीकरण कारखाने बघण्यासाठी त्यांना’ ग्लोबल ट्रिप’, जगाची सफर, करविण्यात आली, जो त्यांच्यासाठी एक सन्मान व मोठा अनुभव होता. लोटलीकर सरांनी त्या अनुभवाचा व संधीचे सोने केले. भारतात रुजू झाल्यावर आपल्या कार्य कौशल्याने आमच्या लुब डिपार्टमेंटला खूप वैभवाचे दिवस दाखविले.’ एम डी लोटलीकर’ हे नाव त्याकाळी सबंध हिंदुस्थानातच नव्हे तर परदेशातही ल्यूब-क्षेत्रातील एक खणखणीत वाजणारे नाणे होते. पेट्रोलियम विश्वात त्यांना खूप मान होता, त्यांचा शब्द मानला जात असे. मार्केटिंग विषयात गती असणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्मिक व तांत्रिक विषयात(Techno Commercial), बाबींत जास्त रुची नसे. मात्र लोटलीकर साहेब असे व्यक्तिमत्व होते की मार्केटिंग हा त्यांचा व्यवसाय असूनही ,’टेक्नो कमर्शियल’ बाबतीतही ते तितकेच जाणकार होते. पेट्रोलियम इंडस्ट्रीत, एमडीएल, म्हणजे ‘डबल बॅरल’, असे त्यांचे विषयी कौतुकाने म्हटले जाई !!

    लोटलीकर सरांना त्यांचे परदेशस्थ, इतर कंपन्यातील सहकारी मित्रही किती मान देत होते व तरीही त्या विश्वासाचा गैर उपयोग वा  फायदा स्वतःसाठी न करता केवळ आपल्या कंपनीसाठीच त्यांनी कसा करून घेतला याबद्दल थोडक्यात एक गोष्ट सांगतो

 साधारणता सन 1980 च्या दशका पर्यंत भारतीय रेल्वे वाफेची इंजिने बहुतांशपणे वापरत होती. त्या इंजिनासाठी एक विशिष्ट प्रकारचे वंगण, लुब्रिकेटिंग ऑइल लागे. हे तेल भारतीय रेल्वे आयात करीत असे. खूप मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन भारतातून जात असे. इंडियन ऑइल कार्पोरेशन सारखी मोठी कंपनीही संशोधन व संसाधनांची रेलचेल असतानाही हे वंगण स्वदेशात तयार करू शकले नाहीत. कोणतेही वंगण तेल हे खनिज तेल व पुरके( Base Oils n Additives),) यांचे योग्य प्रमाणात मिश्रण असते. प्रसिद्ध अमेरिकन कंपनी लूब्रीझोल, Additives निर्माण करण्याच्या बाबतीत अग्रेसर असून भारतातही त्यांची शाखा आहे. मात्र या’ रेलरोड ऑइल’,साठी कोणती Additives  लागतात याची माहिती लुब्रीझोल कंपनी त्या वंगण निर्माण करणाऱ्या परदेशी कंपनीशिवाय कोणालाच देत नसे. भारतात आम्ही देखील याच लुब्रिझॉल कंपनीचे ग्राहक होतो. लोटलीकर साहेबांचे अमेरिकन कंपनीतील वरिष्ठांची चांगले संबंध होते. त्यांच्याशी बोलणी करून ते  विशिष्ट मिश्रण(Additives Package),  भारताततील कंपनी मार्फत आम्हाला द्यावे अशी त्यांनी विनंती केली. सुदैवाने  ती विनंती मान्य केली गेली. लोटलीकर साहेबांच्या शब्दाला मान व त्यांचे बद्दल असलेला आदर व विश्वास यामुळे हे होऊ शकले. कारण या माहितीचा दुरुपयोग करून कोणीही स्वतःचा खूप फायदा करून घेऊ शकले असते. लोटलीकर सरांनी त्या माहितीच्या आधारे आमच्या संशोधन विभागास मार्गदर्शन करून आपली भारतीय बेस ऑइल वापरीत स्वदेशी, ’रेल रोड ऑइल’ निर्माण केले. ते प्रयोगीक परीक्षण व फिल्ड टेस्ट (प्रत्यक्ष रेल्वे इंजिनामार्फत परीक्षण), अशा दोन्ही कसोट्यावर पास करून घेतले. या बाबतीत आरडीएसओ(TDSO) ही लखनऊ स्थित भारत सरकारची मोठी संशोधन संस्था स्वतः संपूर्ण तपासणी प्रक्रियेवर लक्ष ठेवते तेथेही आम्हाला खूप अडचणी आल्या. कारण या संस्थेवर इंडियन ऑइल कंपनीचा  प्रभाव असल्याने त्यांनाही आमचे तेल नापास व्हावे अशीच इच्छा होती!  शेवटी ती मान्यता आम्ही मिळवली. आमची कंपनी ही भारतातील रेल्वेला रेलरोड वंगण पुरवणारी भारतातील पहिली व त्या काळातील एकमेव कंपनी ठरली! कंपनीसाठी व श्री लोटलीकर साहेबांसाठी खूप मोठा बहुमान होता!

      लोटलीकर साहेब सन 2002 च्या सुमारास अमेरिकेत गेले. त्याच वेळेस मीही सेवानिवृत्त झालो होतो आणि माझेही दादर,माहीमला जाणे कमीच झाले होते. त्यामुळे सरांशी जो संपर्क तुटला तो अगदी पुढील वीस वर्षे पर्यंत! माझे प्रयत्न चालू होते मात्र यश येत नव्हते. सुदैवाने 2022 साली,मी अमेरिकेस जाण्याआधी माझे एक सहकारी श्री दिलीप सुळे, जे राजा शिवाजी हायस्कूलच्या शिक्षक वर्गाशी संबंधित होते, यांनी  मला एक ईमेल आयडी दिला. सरांचे चिरंजीव श्री नवनीत लोटलीकर यांचा तो ईमेल आयडी होता. अमेरिकेत आल्या आल्या मी त्यांना एक ईमेल पाठविले. आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांचे मला उत्तर आले. 

“आपण माझ्या वडिलांचशी बोलू इच्छित असाल तर उद्या मी आपणाला व्हिडिओ कॉल लावून देतो, मात्र त्यांना विस्मरणाचा त्रास सुरू झाला आहे”, असेही त्यांनी सांगितले.

  अर्थातच दुसरे दिवशी श्री नवनीत यांनी स्वतःहून व्हिडिओ कॉल करून माझी, फोनवर सरांशी गाठ घालून दिली! सरांना विस्मरण होत आहे हे मलाही जाणवले. एक दोन मिनिटांच्या प्रश्नोत्तरानंतर, ‘माझगावला काम करणारा राऊत’, हे सरांनी ओळखले. त्या जुन्या आठवणी  त्यांच्या स्मृतीत निश्चितच साठवून ठेवल्या होत्या! माझ्या वीस-बावीस वर्षाच्या कष्टांना फळ आले होते. माझा एक पण पूर्ण झाला होता. त्यानंतर अधून मधून मी नवनीत कडे सरांची चौकशी करीत असे. श्री नवनीत यांचा मोबाईल नंबर पत्ता, मी आमचे एक जेष्ठ  श्री मेहता सुरेश मेहता यांना दिला. त्यांनीही अमेरिकेत आल्यावर साहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली( ज्याचा फोटो मी  लेखात दिला आहे). त्यांची घ्यावी खुशाली माझ्यासारख्या साहेबांच्या अनेक चाहत्यांना कळविली.  सर्वांनाच खूप धन्य झाले.  

श्री.लोटलीकर साहेब, श्री सुरेश मेहता सोबत, 2023.

   या वर्षीच्या माझ्या अमेरिका भेटीत मलाही सरांना भेटण्याची खूप इच्छा होती. तसे प्लॅन तयार करीत होतो, तो परवा सरांच्या दुःखद निधनाची बातमी आली. लोटलीकर साहेब गेले… आता अमेरिकेतही ते भेटणार नाहीत!!  

    आमचे लोटलीकर साहेब म्हणजे खरेच एक दुर्मिळ असे व्यक्तिमत्व एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करूनही त्यांनी स्वतःचा उदो उदो करून घेतला नाही व दुसऱ्याचाही. वरिष्ठांचे लांगुलचालन स्वतःच्या फायद्यासाठी केले नाही. उलट आपल्या कनिष्ठांवर अन्याय होऊ नये म्हणून  संगीत स्वतःची  वैयक्तिक हानी करून त्यांनी इतरांना मदत केली. अशा सडेतोड वृत्तीचा निर्मळ मनाचा व निरपेक्ष वृत्तीने व्यवहार करणारा असा वरिष्ठ आयुष्यात कोणाला मिळणे हे केवळ ऋणानुबंध केवळ गतजन्मीची पुण्याई!

नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा।

शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः॥

आधी मनुष्याचा जन्म मिळणे कठीण, त्यातूनही शिक्षण मिळून विद्वान होणं अजूनच अवघड. त्यापेक्षाही चारित्र्य जोपासणे अधिकच कठीण आणि एवढं सर्व असूनही नम्रपणा, विनयशीलता अंगी असणं तर फारच विरळा.

कै.लोटलीकर साहेब हे असे एक दुर्मिळ गुणसंचय असलेले दुर्लभ व्यक्तिमत्व होते!

      मुंबईत असताना निवृत्तीनंतर पत्नी निधनानंतर मुले परदेशी गेल्यावर त्यांनी इंडियन एज्युकेशन सोसायटी मध्ये त्यांनी सेवा देणे सुरू केले व तेथेही खूप मोठे योगदान दिले. ही संस्था त्यांचे जेष्ठ बंधू कै माणिकराव लोटलीकर यांनी स्थापन केली होती व त्यांचे बद्दल ते नेहमी आदराने बोलत असत.

संत तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे

   अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नसो! आत्माअनुभवी चोखाळील्या वाटा, त्याचे माथा जटा असो नसो।”

अशाच माणसाला तुकोबांनी आत्मसाक्षात्कारी म्हटले आहे! अशा माणसाचे मीपण जाते व परोपकारी भावना वृद्धिंगत होते ! सरांचे संपूर्ण जीवन असेच होते.

The Moments of relaxation ..in USA.

लोटरीकर साहेबांनी माझ्या सुरुवातीच्या कार्यकाळात मला उपकृत केले आणि त्यांची हीच वृत्ती त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला अनुभवली अनुभवास आली आहे. आमच्या आस्थापनातील असा कोणी सहकारी नसेल जो लोटरीकर साहेबांच्या बरोबर काम करताना दुःखी झाला नाराज झाला. त्यांच्या परवाच्या निधनानंतर त्यांच्या काही माझी सहकाऱ्यांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली वाचून मी काय म्हणतो ते कळेल.

    Mr Shashi Inamdar: It you may look a little emotional but I must admit, I did miss a bit after knowing of the loss though we knew the writing on the wall, after our knowing his progressive dementia.

   Mr. Lotlikar was one of the rare breeds who is quite a rare to be found. Most of us who came across Mr. Lotlikar in person who would vouch for his qualities that made him unforgettable!

   Mr Mahesh Damle: Mr Lotlikar was amazing person. Lots of memories have flooded through my mind on hearing about his sad demise. He was extremely intelligent and knowledgeable in his field. May God Rest his soul in peace..

   Mr S.Venkat: Mr Lotlikar was a great man in all the respects! A unique personality!

   Mr SR Mehta: I am very sorry to hear about the sad news of Mr Lotlikar’s passing away. To those colleagues who had not worked with him or those who joined HPCL after he retired, it is extremely difficult to explain what he meant to the company or to many of his colleagues. He was an mentor extraordinary, a strict boss, and a hard taskmaster, a person ready to help even the newest entrant to the lubes group, with which he spent the major part of his career.

    On a personal note I had a very good guidance and encouragement from him.He was president of HP eMSA. He played Bridge with us during lunchtime at Hindustan Bhavan, and helped me in countless ways. I was fortunate to have met him in America last year. I had high tea with him and his family members at the hospice where he had been settled for the past year and a half. May his soul be blessed.

   Mr SN Pradhan: Mr Lorlikar was a great person. Though I had no opportunity to work under him but heard a lot about him as highly knowledgeable and expert! He was also a great human being. My condolences to his family members.

  Mr G Ramnath: MDL, kindles memories of a down-to-earth straight shooter! Informal with an open door policy on second floor at PH as HOD, I &C . Authority on Technical Services and Lube marketing .Moved to Calcutta as DM for a rotational stint. In Mumbai lived in a modest home in Mahim. Travelled by contract bus,  spoke his mind, was highly respected in the industry and parent organization,in the US(, Mobil). I had an opportunity to speak to MDL on phone last year. Like Ford tagline says,” they make no models like this, no more!” May his soul rest in peace.

Mr Motwani: I had a opportunity to interact with Mr Lotlikar  in the beginning of my career in the company when I joined in 19 79. I was a member of production planting grp.headed by Shri MDL. we used to meet once a month mostly at Mazgaon terminal. I was the youngest among the entire group but was treated very well given respect and full time to express my views on the issues. This was because of the real good leadership of Mr Lotlikar .He was very knowledgeable and a very good human being and a pleasant personality. May his soul get the Sadgati.

 कोणताही कृत्रिमतेचा भाव त्यांच्या आयुष्यात त्यांना स्पर्श करू शकला नाही. म्हटलं तर सर्वात सोपी आणि तरीही सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे आयुष्यातील हा सहजपणा. आपल जगणं ईतकं सहज, स्वाभाविक असेल तरच “विश्वाचे आर्त  माझ्या मनी प्रकाशले..” असे म्हणता येते. आणि तसे म्हणता आले की मग काही सिद्ध करावयाची धडपड राहत नाही!! लोटलीकर सरांना आयुष्यात काहीच सिद्ध करावयाचे नव्हते !!

सरांच्या स्मृतीला विनम्र वंदना!!

D W RAUT