‘एक विरक्त साधुपुरूष’, श्री.आर एम आरेकर सर
राजा भर्तृहरीचे नीतिशतक, वैराग्यशतक आणि शृंगारशतक हा संस्कृत काव्यातील विविध विचार प्रवाहाचा एक त्रिवेणी संगम आहे. हे व्यवहारनिती सांगणारे एक प्रभावी मुक्त काव्य आहे. त्यातील एक श्लोक फारच बोलका आणि वास्तववादी आहे.
‘‘शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी”
या काव्यश्लोकाचे वामनपंडितांनी केलेले भाष्य असे:
‘‘चंद्राला दिवसा प्रकाश नसणे ये कामिनीला जरा।
पद्मावीण तळे, निरक्षरमुखी जो नेटका गोजिरा||
दात्याला धनलोभ, नित्य वसते दारिद्र्य विद्वजनी।
दुष्टांचा पगडा महीपतीगृही, ही सात शल्ये मनी।|’’
भर्तुहरी सांगतो, दिवसा निस्तेज झालेला चंद्र, तारुण्य नष्ट झालेली कामिनी, कमलहीन सरोसर, निरक्षर सुंदर चेहरे, द्रव्यलोभी राजा, नेहमी संकटात अडकलेला सज्जन आणि राजगृहात दुर्जनांचा प्रवेश तसेच वावर, ही सात शल्ये माझ्या मनाला कायम लागून राहिली आहेत. सामाजिक आनंदाला पारख्या करणाऱ्या या सात उणिवा आहेत .त्या आजच्या काळालाही सुसंगत आहेत
‘आयुष्यभर सर्व समाज व इतरेजनासाठी होईल ती मदत करून, कृतार्थतेने जगलेल्या व्यक्तीला केवळ आपल्या अति चांगुलपणामुळे, आणि समाजातील स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तिंमुळे, कधीतरी, “हेचि फल काय मम तपाला ..?”असे म्हणण्याची पाळी यावी, हे आठवे शल्य आहे, असे मला वाटते. आज भर्तृहरी असता तर हे शल्यही त्याने त्याच प्रभावीपणे मांडले असते हे निश्चित!
आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास समाजात जन्म घेऊन,अत्यंत कष्टाने, बिकट परिस्थितीला तोंड देत, विद्यार्थी दशेतच पितृछत्र हरवूनही एल्फिन्स्टन महाविद्यालयासारख्या एका सुप्रसिद्ध संस्थेत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून, मोठ्या पगाराची सरकारी नोकरी सोडून, केवळ सेवाधर्म म्हणून आपल्या गावच्या शाळेत शिक्षकी पेशा स्विकारणे, आपल्या मांगेला समाजाबरोबरच सर्व इतरेजनांनीही उच्चशिक्षित व्हावे म्हणून मुलां-भावंडांबरोबरच त्यांनाही शिक्षणासाठी प्रवृत्त करणे, आपला आर्थिक भार हलका व्हावा म्हणून शिकवण्या करतांना शिष्यांकडून आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न धरता मिळेल त्यावर समाधान मानणे, नोकरीत कर्तृत्वाने व गुणवत्तेने उपलब्ध होत असलेली बढतीची संधी केवळ दुर्दैवामुळे न मिळणे, एवढेच काय पण मेहनत व व्यासंगाने लिहिलेला पी एच् डी या सर्वोच्च पदवीचा प्रबंध कोणीतरी सहज वाचण्यासाठी म्हणून नेऊन तो ‘गहाळ झाला’ सांगत चक्क आपल्या स्वार्थासाठी वापरणे आणि ..आणि .. आयुष्याच्या शेवटी,
“हा दैवाचा खेळ निराळा, नाही कुणाचा मेळ कुणा..”
या कवीवचनाचा प्रत्यय घेत आयुष्याची अखेरही अगदी अकल्पित, अचानक झालेल्या आमच्या कै. रघुनाथ महादेव उर्फ आर. एम. आरेकर सरांविषयी विचार करताना मला स्वतःला, त्या ‘आठव्या शल्ल्या’ची जाणीव होते!!
आचार्य भिसे, गुरुवर्य चित्रे, प्रिं. आत्माराम पंत सावे या त्रिमूर्तीला मोलाची साथ देत, बोर्डीच्या शाळेला आजचा लौकिक मिळवून देण्यासाठी ज्या दिग्गज, समर्पित शिक्षकांनी आपला जीवनाचा बहुमोल काल शाळेत अध्यापनासाठी व्यतीत केला, अनेक कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवून त्यांना उपकृत केले, त्यांतील एक कै. आर. एम. आरेकर सरांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मलाही चार वर्षे मिळाले आणि म्हणूनच त्या महान गुरुच्या काही आठवणी आज येथे लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. !
आर्. एम्. आरेकर म्हणजेच रघुनाथ महादेव आरेकर यांचे वडील कै.महादेवराव हे त्या काळी व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास होऊन शिक्षकी पेशात होते. डहाणू तालुक्यातील नवापूर शाळेत हेडमास्तर म्हणून काम करीत होते. त्यामुळे घरी गरीबीची स्थिती असली तरी शिक्षणाचा संस्कार त्यांना जन्मजात मिळाला. आई जानकीबाई जरी अशिक्षित होत्या तरी पाठांतरामुळे त्यांच्या तोंडी अनेक ओव्या,भजने असत.
” सकाळी उठोनि देवाशी भजावे, गुरुसी वंदावे जीवेभावे ..,जीवेभावे!”..
अशा ओळी ऐकतच बाल रघुनाथच्या मनावर शिक्षणाचे व सच्चारित्र्याचे संस्कार होत गेले. सर्व चारही भावंडांना नकळत असे सुसंस्कार मातेकडून मिळाले. बोर्डीतील मांगेलआळीत या कुटुंबाचे प्रशस्त घर होते ,ज्याला त्यावेळी ‘मोठे घर’ म्हणत असत. आजही हे घर जीर्ण अवस्थेत तेथे आहे . लेखासोबत दिलेल्या फोटोवरू घराच्या त्यावेळच्या भव्यतेची कल्पना आजही येते.
भावंडांच्या दुर्दैवाने, रघुनाथ केवळ अठरा वर्षांचा असतानाच कर्तृत्ववान वडिलांचे अचानक निधन झाले . 5 जून 1942 चा तो काळा दिवस. सर्व कुटुंबाला प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणे नशिबी आले. घरची थोडीफार शेती होती. मासेमारीचा व्यवसायही होता. अंगमेहनतीची ,कष्टाची कामे करीत, आईला मदतरूप होत , रघुनाथने आपले शिक्षण चालू ठेवले. भालचंद्र , सदाशिव आणि सुमती या आपल्या तीनही भावंडांना मार्गदर्शन करणे आता त्याचे कर्तव्य होते. आपल्या चारही अपत्यांच्या शिक्षणात खंड न पडू देता, त्यांना उच्चशिक्षित करण्यासाठी माता जानकीबाईने केलेल्या परिश्रमांना सीमा नाही. तत्कालीन सामाजिक परिस्थिती लक्षात घेता जानकीबाईंनी आपली मुले केवळ वाढविली असती तरीदेखील तो तिचा बहुमान ठरला असता. मात्र या माऊलीने आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले ! तिच्या कर्तृत्वाला शतदा सलाम!!
आपल्या आईची महती सांगताना सरांचे डोळे ओलावत. ते म्हणत,” केवळ ती आमची आई होती म्हणून बालपण निभावून गेले. तिच्या कष्टाला सीमा नाही.”
महादेव गुरुजींचे अकस्मात निधन झाले मात्र आपल्या परोपकारी व सेवाभावी स्वभावाने त्यांनी समाजात व समाजाबाहेरही अनेक मने जिंकली होती. त्यामुळे रघुनाथला एलफिस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेताना घरी खूप अडचणी आल्या तरी समाजातील काही सज्जनांनी त्याला सांभाळूनही घेतले . मुंबई -माहीम, गिरगाव येथील संबंधीतांच्या घरी रहाण्याची तात्पुरती व्यवस्था झाली. बी. ए ,बी. टी,एम एड् ,अशा तीन पदव्या उत्तम प्रकारे प्राप्त केल्या. एवढे शिक्षण प्राप्त केलेल्या तरुणाला त्या काळी सरकारी नोक-यांचा सुकाळ होता. महाराष्ट्र सरकारच्या सचिवालयात, मुंबईत चांगल्या प्रकारची नोकरी मिळत होती. ‘आपले कार्यक्षेत्र बोर्डी शाळा आहे, भिसे, चित्रे गुरुजींच्या नेतृत्वाखालीच काम करावयाचे आहे’, हे त्यांचे ध्येय ठरले होते . मुंबईस राम राम करीत त्याने बोर्डी गाठली व तेथील निवासी झाले ते शाळेतून निवृत्त होईपर्यंत.
कै. महादेव गुरुजींचे सातपाटी येथील श्री. भारत तरे व गंगुबाई तरे, श्री. शंकर दांडेकर व त्यांचे कुटुंबीय यांच्याशी चांगले स्नेह संबंध होते, येणे जाणे होते. सरांचीही त्यांच्याशी ओळख होती. वर्सोवा गावातील डॉक्टर व स्वातंत्र्य सैनिक डाॅ.लक्ष्मण रामचंद्र दांडेकर यांची कन्या कु.अनुसया हिच्याशी रघुनाथचे लग्न झाले. सासरची कुटुंबीय मंडळी देखील सुशिक्षित, स्वातंत्र्यप्रेमी व सेवाभावी वृत्तीची होती. पत्नी सौ.अनुसया ही देखील जात्याच हुषार , शिकलेली व हुरहुन्नरी होती. तिचीही काही स्वप्ने होती. आपल्या उच्च शिक्षित पतीला संसारात साथ देताना तिला आपले स्वतंत्र व्यक्तीमत्वसुद्धा जपावयाचे होते. मात्र ते होऊ शकले नाही. एकत्रित कुटुंबाचा गाडा हाकतांना स्वतःसाठी काही करण्याची सवड मिळाली नाही.. अनुसया बाईंची स्वप्ने तशीच राहिली! स्वप्नातल्या ‘कळ्यांची फुले’ झालीच नाहीत.. तिलाही बोर्डीत प्राथमिक शिक्षिकेची नोकरी मिळू शकत होती. पण एकत्र कुटुंबातील जबाबदाऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांनी नोकरी केली नाही .
सरांचे लहान भाऊ भालचंद्र हेदेखील पदवीधर झाल्यानंतर बी.डी.ओ. म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये होते. दुर्दैवाने एका दुर्धर आजारात त्यांचे वयाच्या चाळीशीत अकाली निधन झाले. समस्त आरेकर कुटुंबीयास हा मोठा आघात होता. आपल्या कर्तृत्ववान भावाचे सहकार्य मिळण्याऐवजी, त्याच्या कुटुंबालाच मदतीचा हात द्यावा लागला. वडिलांच्या अकाली निधनानंतर कमावत्या भावाचा असा मृत्यू होणे हा नियतीचा खेळ होता . मात्र तेही दिवस गेले. कै.भालचंद्र यांची मुले कर्तृत्ववान निघाली. आज त्यांची चारही मुले उच्च शिक्षित असून आयुष्याची वाटचाल सुखासमाधानाने करीत आहेत.
सर्वात धाकटे बंधू सदाशिव पदवीधर झाल्यावर सचिवालयात आर्थिक विभागात गॅजेटेड ऑफिसर म्हणून काम करीत होते. त्यांची मुलेही उच्चशिक्षित आहेत.
बहीण सुमती ही मुंबईत रेशनिंग ऑफिसर म्हणून कामाला होती. तिची मुलेही छान शिकली. मोठा मुलगा अभय हा डॉक्टर झाला आहे तर दुसरा मुलगा इंजिनियर आहे.
याबाबतीत संपूर्ण आरेकर कुटुंबीयास जेवढे धन्यवाद द्यावयास पाहिजेत तेवढे कमीच पडतील .कारण वडिलांच्या अकाली जाण्यानंतरही सर्व भावंडांनी आपले शिक्षण पूर्ण केले . आपल्या पुढील पिढीला योग्य मार्गदर्शन देऊन जीवनाची यशस्वी वाटचाल करण्याचे बळ दिले. कुटुंबाच्या या वाटचालीत मातोश्री जानकी व ज्येष्ठ बंधू रघुनाथ यांचा हातभार निश्चितच उल्लेखनीय होता. आपल्या जीवनात, सरांना हे खूप मोठे समाधान होते, त्याचा अभिमानही होता. त्यांच्या बोलण्यातून वर्गात कधीकधी याचा प्रत्यय आम्हा विद्यार्थ्यांना येई.
आरेकरसरांना तीन अपत्ये. मोठे चिरंजीव प्रवीण मुंबई महापालिकेतून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले .त्यांची दोन्ही मुले इंजिनियर आहेत व आपला व्यवसाय सांभाळत आहेत.
कन्या रेखा ताई स्वतः मुंबई महानगरपालिकेतून उपमुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या.त्यांचा मुलगा मनीष मुंबई महापालिकेतच इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. मनीषची उच्चशिक्षित पत्नी पल्लवी ही एम् एस सी (विथ मायक्रो बायोलॉजी) असून आपल्या व्यवसायात अग्रेसर आहे. रेखाताईंची कन्या मीनल देखील उच्चशिक्षित असून एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते आहे. दुर्दैवाने रेखाताईंच्या यजमानांचे काही वर्षांपूर्वी दुर्दैवी निधन झाले. तो देखील सरांना एक जबर धक्काच होता. या लेखाच्या निमित्ताने श्रीमती रेखाताईंनीच मला कौटुंबिक माहिती व छायाचित्रे पुरविली असून मदत केली आहे. सरांचे दुसरे चिरंजीव नितीन हेदेखील भारतीय रेल्वेत उत्तम प्रकारे सेवा देऊन आता सेवानिवृत्तीचे समाधानी जीवन जगत आहेत. त्यांनीही मला काही दुर्मिळ छायाचित्रे देऊन सहाय्य केले आहे. या उभयतांचा मी आभारी आहे.
आपल्या बाबांच्या आठवणी सांगताना रेखाताईंना बोर्डीतील बालपणीचे ते दिवस आठवतात. मोठे घर आठवते .त्या घरात होणारा तो गणेशोत्सव पुढे शारदाश्रमातील वास्तव्य , एकूणच बालपणीच्या त्या रम्य दिवसांविषयी सांगताना त्या म्हणतात..
” ..आमच्या घरी साजरा होणारा गणपती उत्सव केवळ अविस्मरणीय! नातेवाईक, आप्त, शेजारी यांनी आमचे घर गजबजून जाई. फुले व पत्री आणण्यासाठी आम्ही मान. वत्सलाबाई चुरमुऱ्यांच्याकडे जात असू. त्या स्वतः देखील पत्री काढून आम्हाला देत असत. दुर्वांची जुडी, फुलांचे हार बनविण्यासाठी आमची तारांबळ उडत असे . त्यावेळी बोर्डीचे सदानंद पुरंदरे गुरुजी आमच्या घरी पूजा सांगण्यास येत. सुग्रास व चमचमीत भोजन सर्वांना मिळे. जेवणाच्या पंगती उठत. रात्रभर जागरण करण्यासाठी मुले मुली येत. गाणी, फुगड्या, गरबे ,’महाराष्ट्राची लोकधारा’ तील कार्यक्रम आम्ही करीत असू. मोठी धमाल उडे. वयस्कर मंडळी सारीपाट खेळत.जागरण करण्यासाठी सर्वांना चहा, चिवडा व लाडू मिळत असे. म्हणून आई व दोन्ही काकू यांनाही जागरण करावे लागे. आमच्याकडे वेळी अवेळी कोणीही आले तरी त्यांना चहा व जेवण दिले जाई. मग तो शेतावरचा मजूर असो किंवा गणपतीची मूर्ती विसर्जन करणारे बाबू काका किंवा कुवरिया काका असोत आमच्या बाबांचा तसा दंडकच होता!”
“संध्याकाळची देवपूजा आटोपल्यावर बाबा आम्हाला घेऊन बसत. पाढे, सुविचार, गोष्टी, विनोबांची गीताई, संस्कृत सुभाषिते,भगवद्गीतेतील काही श्लोक व त्यांचा अर्थ समजावून सांगत .आकाशातील ग्रह तारे धूमकेतू आकाशगंगा ध्रुवतारा सप्तर्षी यांची माहिती देऊन आपल्या पुराणातील त्यांच्याशी संबंधित गोष्टीही सांगत. मिडल स्कूल स्कॉलरशिप परीक्षेत मला ओपन मेरिट स्कॉलरशिप मिळाली होती. सुदैवाने पुढे माझा मुलगा मनीष यालाही सातवीची हायस्कूल स्कॉलरशिप मिळाली. बाबा त्याला शिकवण्यासाठी अधून मधून माझ्या घरी येत असत. लहानपणी बाबा आम्हाला रामायण, महाभारत, इसापनीती, पंचतंत्र, राजा-राणीच्या जादूच्या गोष्टी व पुस्तके वाचनासाठी देत ,ज्यामुळे आम्हाला वाचनाची गोडी लागली. वाचन सुधारले. बाबा अकरावीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजीची शिकवणी घेत असत. पैसे न देणाऱ्यांना त्यांनी कधीही काही विचारले नाही. ज्यांनी पैसे दिले तेवढे त्यांनी घेतले. प्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक, अभिनेते श्री. अमोल पालेकर हे बाबांचे विद्यार्थी आहेत, हे समजल्यावर आम्हाला एक वेगळाच आनंद झाला. त्यांचे बरेच सिनेमे आम्ही अनेक वेळा पाहिले आहेत. 30 एप्रिल 1982 ला बाबा सु. पे. हायस्कूल मधून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर दोन वर्षे बाबांनी नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये शाळेत नोकरी केली. मग ते वसईला स्थाईक झाले. आमचा दहिसर येथील मित्र प्रकाश तामोरे यांच्या क्लासेस मध्येही काही काळ त्यांनी इंग्रजी शिकविले. दोन वर्षांनी तो क्लासही त्यांनी सोडला. आपले बोर्डीचे राहते घर बाबांना खूप आवडत असे. या घरावर त्यांचे निस्सीम प्रेम होते.
बाबांची तब्येत अखेरपर्यंत ठीक ठाक होती. 19 फेब्रुवारी 2019 रोजी ते मोरीत पडले हे निमित्त झाले. बाबांच्या डोक्याला थोडी जखम झाली होती, तेथेच त्यांचे निधन झाले.आमचे बाबा सोडून गेले मात्र त्यांच्या आयुष्याचे सार एका शब्दात सांगावयाचे झाल्यास,
“मनुष्य त्याच्या कर्तृत्वाने श्रेष्ठ ठरतो जन्माने नाही. बाबा आपल्या कर्तृत्वाने श्रेष्ठ ठरले!”
आजी,आजोबा, आई व बाबा यांना ,
‘मातृदेवो भव पितृ देवो भव आचार्य देवो भव’
या उक्ती द्वारे मी शतशः प्रणाम करते!”
रेखाताईंच्या या आठवणीतून आरेकर सर एक शिक्षक म्हणून तर मोठे होतेच पण एक कुटुंब प्रमुख व आदर्श पिता म्हणूनही किती संवेदनाशील व दक्ष होते याची प्रचिती येते.
नऊ, दहा व अकराव्या इयत्तेत सरांनी आम्हाला मराठी व इंग्रजी हे दोन विषय शिकविले.. त्यांच्या वर्गात नेहमी ‘पिन ड्राॅप सायलेन्स’ असे. अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टींची चर्चा वर्गात होऊ शकत नसे. क्वचित कधी एखाद्या विनोदाची पेरणी होत असे. सर स्वतःही केवळ विषयाच्या अनुषंगानेच माहिती आम्हाला देत. त्यांच्या अफाट वाचनाचा व स्वानुभवाने मिळविलेल्या ज्ञानाचा प्रत्यय वर्गात येई. सरांचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे वर्ग सुरू होण्याआधी काही मिनिटे आधीच ते वर्गाबाहेर येऊन राहत व चालू तास संपल्याबरोबर वर्गात प्रवेश करीत .तास संपल्याची घंटा झाल्यावर वर्गात जास्त थांबत नसत. शिस्त व वेळेचे पालन हा मला वाटते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंगीभूत गुण असावा.
वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना ” अहो ” याच आदरार्थी संज्ञेने संबोधित. आठवी नववी मधील अगदीच लहान, ज्ञानाने, शिक्षणाने त्यांचे समोर नगण्य असलेल्या आम्हा विद्यार्थ्यांना याचे मोठे नवल वाटे. गंमत ही वाटे. थोडे वयाने मोठे, नाठाळ विद्यार्थी या गोष्टीवरून सरांची कधीतरी गंमतही करीत. सरांना त्याचे देणे घेणे काहीच नव्हते. मला मात्र ‘ घरीदेखील आपल्या मुलांना, सर असेच अहो जाहो करीत असतील का?’ असे कुतूहल वाटत असे!!
मराठी विषय शिकवत असताना एकदा त्यांनी आम्हाला 9वी च्या वर्गात ” वरूण राजा, पुरेकर तुझी ही अतिवृष्टी!” या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितल्याचे स्मरते. माझ्या निबंधात मी, वरूण राजाला संबोधित करतांना लिहीलेली काही वचने व वाक्प्रचार त्यांना आवडली होती.. त्यांनी मला वर्गात शाबासकी दिली होती.
” वरूण राजा सर्वांना हवासा असतो. शेतकरी त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. तरी शेवटी ‘अतिपरिचयात अवज्ञा’, आणि ‘अति तेथे माती होते, म्हणून हे पर्जन्य राजा, तुझ्या स्वतःच्या सन्मानासाठी , योग्य तेवढेच बरसून आम्हाला आनंद व आशीर्वाद दे व तुझाही सन्मान ठेव .”…असे काहीसे लिहिलेले आठवते. सरांना ते आवडले असावे. म्हणून त्यांची शाबासकी मिळाली.
ही आठवण मुद्दाम सांगण्याचे कारण सरांनी त्या विषयाच्या अनुषंगाने आम्हाला दिलेली काही शास्त्रीय माहिती. पावसाशी संबंधित काही शास्त्रीय आडाखे व भाकिते सांगताना सरांनी त्यावेळी आम्हाला पशु, पक्षी व कीटक व एकंदरीतच निसर्गाकडून, पावसाआधी मिळणाऱ्या काही संकेतांविषयी खूप सुंदर व मनोरंजक माहिती दिल्याचेही माझ्या आठवणीत आहे. त्यांचे अफाट, विविधांगी वाचन व सूक्ष्म निरीक्षण याचे आज खूप कौतुक वाटते. सरांनी त्या दिवशी आम्हास दिलेली काही उदाहरणे आठवतात ती अशी..
- पावसाआधी ,तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. तुम्ही त्यांच्या मार्गाचे निरीक्षण करा. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकडय़ांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात.
- बिळांमध्ये दडून राहणारे, सरपटणारे जीव बिळाच्या बाहेर पडू लागले की ती हमखास पावसाची चाहूल समजावी. या प्राण्यांना पाऊस येणार असल्याचे अगोदरच कळलेले असते त्यामुळे बिळात पाणी शिरण्यापूर्वीच स्वत:च्या बचावासाठी ते उंच जागांचा आश्रय शोधू लागतात!
- हजारोंच्या संख्येने, काळ्या मुंग्या त्यांची पांढरी अंडी तोंडात धरून सुरक्षित जागी नेऊ लागल्यास पाऊस नक्की पडणार हे समजावे!! अत्यंत पुरातन काळापासून काळ्या मुंग्यांच्या हालचालींवरून पावसाचे अंदाज बांधले जात असत..
गंमत म्हणजे अजूनही ,गावी समुद्रावर फिरतांना, पावसाआधी, लाल खेकड्यांची रांग कुठे दिसते आहे का व ती कोणत्या दिशेष जात आहे ,त्याचप्रमाणे काळ्या मुंग्या आपल्या वारुळात अंडी घेऊन जाताना कोठे दिसतात का असे काहीतरी पाहण्याची जिज्ञासा मला आजही असते .. तसे काही आढळल्यास ,मी हळूच, भूतकालांतील, सरांच्या त्या ‘नववी ड’ च्या वर्गात जाऊन बसतो!.. एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांचे कुतुहल जागृत करून निसर्गसानिध्यात कसे घेऊन जातो याचे हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. अशा महान गुरूंचे मार्गदर्शन आम्हाला बोर्डी शाळेत मिळाले म्हणून धन्यता वाटते.
बोर्डी हायस्कूलातील त्या काळातील आम्ही विद्यार्थी खरेच भाग्यवान आहोत. अनेक प्रतिभासंपन्न, अभ्यासू व समर्पित वृत्तीच्या विद्यार्थीप्रिय शिक्षकांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले. मराठी हा माझा आवडीचा विषय व त्या अनुषंगाने वाचन ही होत असे.भाई मळेकर व आर. एम. आरेकर सरांच्या मराठी तासाचे वेळी त्यांचेकडून सहज उद्धृत होणारी अनेक सुभाषिते, वचने लिहून ठेवण्याचा मला छंद जडला होता. दुर्दैवाने आज ती नोंदवही उपलब्ध नाही. आरेकरसरांच्या वर्गात ऐकलेली काही सुवचने मला अजूनही आठवतात…
सरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन, ध्येयाने प्रेरित होऊन, शाळेत अध्यापनाचे काम केले होते. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन, विद्यार्थ्यांसमोर स्वतःचा आदर्श निर्माण केला होता. त्यांच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांना अनुभूतीची जोड होती. म्हणून ती वचने केवळ हवेचे बुडबुडे न राहता मनात कायमची ठसली आहेत. आजही लक्षात राहिली आहेत! त्यांतील काही …
” लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात… पण सरस्वतीला नाही… म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे…”
“फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो… माणसाची पारख ही रूपावरून करू नका… महत्त्वाचा असतो, तो त्याचा स्वभाव”…!”
“जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन संपते… पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन सुरू होते… आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच… स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका….“
” मुलांनो मोठी स्वप्ने पहा. जर तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तर तुमच्या कामाची पद्धत बदला… तुमचे तत्त्व नाही, कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही …”.
सरांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही प्रसंगाना या वाक्यांचा संदर्भ होता. वर्गांत अशा सुंदर विचारांवर उहापोह करतांना त्यांच्या रसवंतीला पूर येत असे व आम्ही विद्यार्थि त्यात न्हाऊन तृप्त होत असू यात नवल कसले?
विद्यार्थी दशेत हे सर्व ऐकताना, आपण काहीतरी वेगळे, भव्य दिव्य असे ऐकत आहोत ,एवढेच जाणवत असे. पूर्ण आकलन होत नसे. आज एवढ्या वर्षानंतर, आयुष्याचा दीर्घ प्रवास केल्यावर, या शिकवणीची महती कळते. संदर्भ लागतात. शिक्षणातील असे ‘शंभर नंबरी सोने’ या शिक्षकांनी आम्हाला त्या दिवसात दिले, योग्य वयात दिले, याचा अभिमान वाटतो. त्यांच्या आठवणीने मी नतमस्तक होतो!!
माझे मित्र व बोर्डीमधील आरेकर कुटुंबीयांचे शेजारी, सरांचे विद्यार्थी श्री. राजाभाऊ दमणकर यांनी मी सरांवर लिहितो आहे हे कळल्यावर, उत्स्फूर्तपणे काही आठवणी लिहून पाठविल्या. राजाभाऊंची तब्येत आता तेवढी ठीक नाही. विस्मरण होत असते. मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी आपल्या लेकीची मदत घेऊन, मला माहिती लिहून दिली. राजाभाऊ म्हणतात..
“आमचा मांगेला समाज आजही गरीब परिस्थितीत असून, समुद्रात जाऊन मासेमारी करून कित्येक कुटुंबे उपजीविका करीत असतात.आजही शिक्षणाचा अभाव असलेल्या या समाजात शंभर वर्षांपूर्वी शिक्षणाची प्रगती किती असेल याचा विचार करा? अशा बिकट सामाजिक, शैक्षणिक, परिस्थितीत आमच्या समाजातील सद्गृहस्थ कै. महादेव दाजी आरेकर यांनी कष्टाने शिक्षण घेऊन पुढे शिक्षकी पेशा स्विकारला. ते एक शिस्तप्रिय आणि हाडाचे शिक्षक होते. महादेव भाऊंच्या, प्लेगच्या साथीत झालेल्या अकाली निधनानंतरही, जानकीबाईंनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले व त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्या माऊलीच्या काबाडकष्टांना व हिमतीला दाद दिली पाहिजे.
सुप्रसिद्ध एलफिन्स्टन काॅलेजमधून पदवी शिक्षण घेऊन, सरकारी नोकरीचा हव्यास न करता त्यांनी आचार्य भिसे चित्रे यांच्या सोबत बोर्डी शाळेत आपले योगदान देण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने त्यांनी पुढेही बी एड व एम एड पदव्या उत्तम प्रकारे प्राप्त केल्या. विवाहानंतर त्यांच्या सुविध्य पत्नीने ही त्यांना पूर्ण साथ दिली.त्यांची तीनही अपत्ये, प्रवीण, नितीन व रेखा यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले..
सरांच्या हाताखाली शालेय शिक्षण घेऊन यथामती सामाजिक सेवा करण्याची आवड असलेला मीदेखील त्यांचा एक विद्यार्थी आहे. त्यांचे ऋण सदैव मानत असतो.
श्री. रघुनाथ सरांना मात्र आपल्या आयुष्यात दुर्दैवाचे अनेक आघात सहन करावे लागले. आपल्या शिक्षकी पेशात गुणवत्ता असूनही पदोन्नती होऊ शकली नाहीं. याचा त्यांना त्रास झाला. तरीही त्यांनी त्याबाबत कोणतेही प्रदर्शन न करता, आपले व्रत चालू ठेवले. बोर्डी शाळेतूनच ते निवृत्त झाले. पुढे बोर्डीला रामराम करून अखेरचे निवृत्तीचे जीवन त्यांनी वसई येथे आपल्या मुलांचे निवासस्थानी घालविले.”
“मला स्वतःला, समाजातील मुलांचे शिक्षणासाठी काहीतरी काम करावयाचे होते. याबाबत सरांशी बोलणेही केले होते. बाहेर गावाहून बोर्डी शाळेत शिक्षणासाठी येणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी गावात एक वसतिगृह सुरू करून मुलांना शिक्षणासाठी राहण्याची सोय करून देण्याची माझी इच्छा होती. मी रघुनाथ सरांना विनंती करून त्यांचे ‘मोठेघर’ ,भाडेतत्त्वावर मागितले. त्यांनी मला कोणतेही आढेवेढे न घेता पाच वर्षाच्या भाडे कराराने आपले घर माझ्या हवाली करून वर मला शुभेच्छाही दिल्या! कधीही बोर्डीस आल्यावर ते माझ्या वस्तीगृहावर येत व माझ्या अडीअडचणीबाबत मला योग्य तो सल्ला देत. त्यामुळेच माझा व्यवसाय, कुटुंब सांभाळून, मी माझे सामाजिक ॠण अंशतः तरी फेडू शकलो याचे मला खूप समाधान आहे. हे केवळ माझे आदर्श गुरुवर्य श्री. आर. एम. आरेकरसरांच्यामुळे होऊ शकले. हे सरांचे माझ्यावरील उपकार होत. त्याचे विस्मरण मी कधीच होऊ देणार नाही. अशा आमच्या समाजसेवी, निष्ठावंत व परोपकारी शिक्षक श्री. रघुनाथ आरेकर सर यांना मी मानाचा मुजरा करतो!”
श्री. राजाभाऊ दमणकर हे स्वतःदेखील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कोसबाड येथील हायस्कूलमध्ये एक उत्तम शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे बोर्डी गावात वसतिगृहाची स्थापना करून, अनेक विद्यार्थ्यांना अत्यंत माफक पैशात राहण्याची उत्तम सोय करून दिलेली आहे. त्यांचे विद्यार्थी अजूनही त्यांची आठवण करतात व ऋण मान्य करतात. श्री. राजाभाऊ यांनी बोर्डी शाळेचा ‘ माजी विद्यार्थी संघ’ व ‘मांगेला समाज संघटनेत’ही आपले यथोचित योगदान दिले आहे.
एका विद्यार्थ्याच्या या आठवणी वाचल्यावर सरांमधील माणुसकी ही कशी जागृत होती याचे दर्शन होते.
बोर्डी शाळेतून निवृत्ती घेतल्यावर वसई येथे शांततापूर्ण निवृत्ती जीवन जगत असताना एक दिवस कसे कोण जाणे अचानक श्री. आरेकर सर माझ्या विलेपार्ले येथील निवासस्थानी आले. मला तो मोठा आश्चर्याचा धक्का होता .बोर्डीत मला ते क्वचितच भेटत मात्र माझ्या बोर्डीतील सहाध्यायांमार्फत माझी चौकशी अवश्य करीत असत. माझे मित्र मला तसे सांगत.
ते 1990 साल असावे, सर नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. मी पेट्रोलियम खात्याच्या सरकारी आस्थापनात मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) म्हणून मुंबईतील मोठ्या कारखान्याची जबाबदारी सांभाळीत होतो. ती पदोन्नती होती. त्याच सुमारास मी व्यवसायानिमित्त फ्रान्स, इंग्लंड या युरोपियन देशांचा दौरा करून आलो होतो. ही माहिती गावातील काही मित्रांकडून सरांना कळलेली असावी. माझा मुंबईतील पत्ता मिळवून, माझे अभिनंदन करण्यासाठी ते वसईहून पार्ल्यास आले होते. तो माझ्यासाठी सुखद आश्चर्याचा धक्का होता. त्यांच्या बोलण्यातून व चेहऱ्यावरील प्रसन्नतेवरून त्यांच्या अंतःकरणातील आनंद माझ्यापर्यंत पोहोचला. नेहमीप्रमाणेच त्यांचे बोलणे थोडक्यात व आटोपशीर असेच होते. मला धन्य झाले. त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करून मी त्यांचा निरोप घेतला. बाहेर रिक्षात बसवून दिले . त्यादिवशी माझा निरोप घेण्याआधी त्यांनी मला केलेला एक प्रश्न आजही आठवतो व संभ्रमित करतो …रिक्षात बसण्याआधी सर मला म्हणाले होते,
“राऊत, (शाळेत विद्यार्थी असतानाही ते मला असेच हाक मारीत )आता मी निवृत्त झालो आहे, माझ्यायोग्य असे काही काम असल्यास मला जरूर सांग..!”
सरांकडून असा प्रश्न मला अगदीच अनपेक्षित होता. त्यामुळे त्यावेळी मी त्यांना कोणतेच ठोस उत्तर देऊ शकलो नाही.
“सर बघूया..पहातो”.. असे काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेली. त्यानंतर सरांना गोखले एज्युकेशन संस्थेनेच त्यांच्या नाशिक येथील हायस्कूलात शिक्षकाचे काम दिल्याचे कळले. बरे वाटले. मी त्यांना माझ्या संबंधितांकडून काही काम निश्चित देऊ शकलो असतो मात्र मला तसे करावयाचे नव्हते. ते माझे आदरणीय सर होते. कामाच्या ठिकाणी त्यांचा झालेला थोडाही अवमान सहन करणे मला अशक्य होते. ज्यांनी आयुष्यभर मोत्ये वेचली, त्यांना मी गोव-या वेचण्याचे काम कसे देऊ? त्यादिवशी मी सरांचे समाधान करण्यात कुठेतरी कमी पडलो हे खरे !त्याची खंत मला आजवर लागून आहे. त्यानंतर क्वचितच सर बोर्डीस एक दोनदा भेटले. थोडा वार्तालाप होई पण हा विषय कधी पुन्हा निघाला नाही. सरांचा त्यादिवशीचा तो प्रश्न आणि माझी त्या वेळची माझी मानसिक हतबलता आजही मला अस्वस्थ करते!
एक योगायोग म्हणजे सरांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रवीण आमच्या घरी आप्पांकडे (माझे वडील) शिकवणीसाठी येत असत हे मला नंतर कळले. माझे वडील आप्पा व सरांचा खूप चांगला परिचय होता . मी शाळेत असताना कधीतरी सरांनी मला तसे सांगितले होते.. दोघांच्याही आयुष्यात अनेक साम्य स्थळे होती व त्यामुळे ही कदाचित त्यांना माझ्याविषयी आत्मीयता वाटत असावी !
19 फेब्रुवारी 2019 रोजी सरांनी हे जग सोडले. आर. एम. आरेकरसर हे आमच्या इतर सर्व शिक्षकांपेक्षा खूप वेगळे व्यक्तिमत्व होते असे मला आजही वाटते. त्यांच्या विद्वत्तापूर्ण, शिस्तबद्ध, काटेकोर आयुष्याला एक कारूण्याची झालर होती असे वाटते. माझ्याशी झालेल्या भेटीत मला त्यांच्या मनीचा सल कुठेतरी जाणवला. त्यांना काही सांगावयाचे होते का, ते मनात तसेच राहून गेले असेल का, माझे काही चुकले का अशा अनेक प्रश्नांचा गुंता आजही मनात आहे आणि तो आता सुटणे ही शक्य नाही!!
सरांचे कर्तृत्ववान नातू व श्रीमती रेखा ताईंचे चिरंजीव मनीष यांच्या आठवणी मी पुढे दिल्या आहेत. त्यातून माझ्या मनातील काही प्रश्नांना उत्तरे मिळाली…
बालपणीच झालेला वडिलांचा मृत्यू, अकाली गेलेला पाठचा हुषार भाऊ हे आघात त्यांना अस्वस्थ करीत होते का?आपल्या सुशील, सुशिक्षित, हुरहुन्नरी पत्नीला कौटुंबिक परिस्थितीमुळे योग्य तो न्याय आपण देऊ शकलो नाही ही खंत त्यांना असेल काय? आपली सुशिक्षित गुणवान कन्या दैवयोगाने अकाली विधवा झालेली पाहणे नशिबी आले, हा खेद त्यांच्या मनी असेल काय? आयुष्यात अनेकांना उपयोगी पडूनही ,प्रसंगी मी एकटा पडलो काय..?…की आणखी काही सल त्यांच्या मनी होता?.. ..आता काहीच समजू शकणार नाही..!
मानवी जीवनातील कितीतरी सुंदर गोष्टी मागील बोचरे सत्य आपल्या ध्यानात कधी येत नाही. वरून आनंदी, समाधानी दिसणारी व्यक्ती आंतरिक दृष्ट्या कोणत्यातरी विचाराने, व्यथेने पीडित असू शकते . ना ती व्यक्ती व्यक्त होत, ना कोणी इतर ते समजू शकत ! तीच तर मानवी जीवनाची खरी गंमत आहे!!ज्या गुरुजनांनीच आम्हाला हे धडे दिले, त्यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात नक्कीच ते आचरणात आणले असणार?
माझे लेखाचे टाचण वाचून रेखा ताईंचे सुपुत्र श्री. मनीष राऊत यांना आपल्या आजोबांबद्दल काही आठवणी लिहिण्याची स्फूर्ती झाली . हुशार, कर्तृत्ववान नातवाने आपल्या आजोबाविषयी लिहिलेल्या या आठवणीतून, एका सरळ मार्गी, विद्वान परंतु एकांडी शिलेदारी करून व्यवहाराची तत्वाशी सांगड न घालू शकणाऱ्या ,विरक्त, प्रसिद्धी परांगमुख अशा आर. एम. आरेकर सरांच्या व्यक्तिमत्त्वातील एका वेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो.
मनीष लिहितात..
“19 फेब्रुवारीला इगतपुरी येथील विपश्यनेसाठी मी रात्री पत्नी पल्लवी सोबत पॅकिंग करत होतो आणि नितीन मामांचा फोन आला .मामाशी दिवसा फोनवर गप्पा होतात. एवढ्या रात्री तो फोन करत नाही, म्हणून थोडं चुकल्यासारखं झालं आणि.. आजोबा गेल्याची बातमी आली. डोंबिवलीवरून उशिरा रात्री निघून उत्तररात्री वसईला पोहोचलो. आजोबांच्या अनेक आठवणी मनांत गुंजी घालत होत्या..
त्यांची सगळ्यात जुनी आठवण म्हणजे बोर्डी येथील शारदाश्रम शाळेच्या आजोबांच्या प्रशस्त घरात आम्ही सुट्टीत जायचो तेव्हाची! पहिली दुसरीत असतानाची. दारांत समुद्रातील शंख शिंपल्यांची पखरण असलेलं वाळूचं अंगण आणि घरी 24 तास पाणी. अनुसया आजीच्या किचनमध्ये लिमलेटच्या गोळ्यांची बरणी असायची आणि नेहमी गेल्यावर ती आम्हाला गोळ्या द्यायची. पण आजोबांशी मात्र फारसं बोलणं झाल्याचं आठवत नाही.आजोबा बऱ्याचदा कामातच असत. भेटायचे नाहीत. भेटले तरी फार कमी बोलत असत.
1987-88 साली पाचवीत असताना मी आजी आजोबा मामाकडे वसईला राहायला काही महिने गेलो होतो. तेव्हा सुद्धा आजोबा मोजकच बोलत असत. ते बोलत तेव्हा खूप शांत आणि हळू आवाजात आणि मुद्देसूद. घरगुती कार्यक्रम ,सहली, समारंभ या सर्व कार्यक्रमात सुद्धा त्यांचा वावर शांत धीर गंभीर असे. एखाद्या ऋषी समान. त्यांच्या बोलण्यातील विषयांच्या संदर्भावरून त्यांच्या सखोल ज्ञानाचा आवाका लक्षात येई.
नंतर ते माझा इंग्रजीचा अभ्यास घेऊ लागले. आपण फर्डे इंग्रजी बोलू शकतो यांचा त्यांना कधीही अभिमान वाटला नाही. ते जुन्या काळातील एम एड होते. त्यांचा इंग्रजीचा व्यासंग माझ्यासाठी पर्वणी होती. माझं इंग्रजी व्याकरण पक्क होण्याचं श्रेय मी पूर्णपणे त्यांनाच देतो. स्कॉलरशिप, दहावी, बारावी परीक्षा पास झाल्यावर ते मला आणि मिनलला (बहिण) एकशे एक रुपयांचं पाकीट देत.. बक्षीस म्हणून न चुकता !
माझे आजोबा नेहमी टिपणे करीत असत. वेगवेगळ्या विषयावर, टीव्ही, वृत्तपत्र, चर्चा यांतील महत्त्वाचे मुद्दे ते लिहून ठेवत. वक्तशीरपणा आणि शिस्त हे त्यांचे गुण नेहमी लक्षात येत. ही शिस्त म्हणजे फक्त वेळेच्या बाबतीतच नव्हे तर खाण्यापिण्याच्या, बोलण्याच्या सवयी, या सर्वां बाबत. ते सर्व व्यवहारात आवर्जून मराठीचा वापर करीत. दुकानदार, वाणी ,भाजीवाले, दूधवाले ,रिक्षावाले, सर्वांशीच बोलताना मराठी असे. त्यात कुठेही भाषेचा दुराभिमान किंवा दुसऱ्याला खिजविण्याचा प्रकार नव्हता ,पण मराठीचा रास्त आग्रह होता.
आमच्या बोर्डीच्या घरावर त्यांचे विशेष प्रेम होते. सध्या हे घर बंद असते पण आजोबा असताना त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी ते स्वतः पुढाकार घेऊन धावपळ करीत असत,आमचा वावर तेथे असताना आम्हा सर्वांवर आधार-वडासारखी त्यांची सावली तेथे दिसून येई. हे घर म्हणजे आपल्या सर्व कुटुंब वृक्षाला बांधून ठेवणारा धागा आहे याची जाणीव त्यांना होती.
त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी अतिशय काटेकोर स्वभाव आणि नेमक्या होत्या हे त्यांच्या शरीर प्रकृतीवरून लक्षात येते. गावच्या शेती संदर्भात कोर्टात सुरू असलेल्या केससाठी ते वयाच्या 91 व्या वर्षी सुद्धा एकटे ट्रेनने वसई ते डहाणू अशी दगदग करून येत असत. आजी गेल्यावर ते थोडे थकले तरी 94 व्या वर्षी सुद्धा चालते फिरते होते. ते जायच्या थोडे आधी आम्ही नातवंडे त्यांच्या पतवंडांना (विश्वा,ईहा,आरुष) घेऊन गेलो असताना ते हरखून गेले होते. मुलांना मिठाई काढून दिली होती. स्वतः चहा बनवून आणला होता, खूप वेळ बोलत बसले होते.
त्यांच्या व्यवसायिक जीवनात अंतर्गत राजकारणाचे ते बळी ठरले. पात्रता असूनही पदोन्नती होऊ शकली नाही.अनेक लोकांनी त्यांच्या चांगुलपणाचा, दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याच्या स्वभावाचा गैर फायदा घेतला. त्यांनी कष्टाने तयार केलेला आणि विश्वासाने सोपविलेला पी एचडी चा प्रबंध चोरीला गेल्याचे सांगून त्याच विषयासाठी इतरांनी, पी. एचडी मिळविण्याचा प्रकार त्यांच्या बाबतीत झाल्याचे आईकडून लहानपणी कळले होते. या गोष्टीचे महत्त्व कळण्याचे आमचे वय तेव्हा नव्हते. मात्र त्या घटनेनंतर ते विमनस्क झाले होते. आजीने मोठ्या धीराने त्यांना सांभाळले.
विशेष नमूद करण्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची, कार्याची नेहमी जाणीव ठेवली. ते किती विद्यार्थी प्रिय होते हे त्यांच्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी केलेल्या स्मरणातून दिसून यायचं. त्यांचे जुने विद्यार्थी त्यांना भेटायला येत असतं. “आजोबा गेल्यावर सुद्धा खूप लांबून त्यांचे विद्यार्थी भेटायला येत असत” असं नितीन मामा कडून समजलं. त्यांचे एक शिष्योत्तम श्री. अमोल पालेकर यांच्या एका चित्रफिती मध्ये, त्यांच्या आवडत्या शिक्षकांमध्ये “आरे मारे कर” असा गमतीने त्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आठवतो. आजोबा असताना माझ्या चुलत मामाने त्यांची पालेकरांशी पुनर्भेट घडवून आणली होती. तो प्रसंग अजूनही माझ्या मनात ताजा आहे.
त्यांचा अजून एक महत्त्वाचा गुण किंवा दोष म्हणा, अति चांगुलपणा आणि सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची वृत्ती! एखाद्याच्या परिस्थितीनुरूप ,विनंती अनुसार, त्यांनी अनेकदा दानशूर कर्णासमान मदत केल्याचे प्रकार घडले आहेत. तेथे ते फारसा विचार करत नसत. सढळ हस्ते मदत करून मोकळे होत. ‘ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाण्याच्या’ लोकांच्या वृत्तीमुळे त्यांना जबरदस्त आर्थिक फटके बसल्याचे प्रसंग आलेले आहेत. परिवाराच्या सल्ल्याच्या पलीकडे जाऊन, त्यांचा रोष पत्करून त्यांनी हे बऱ्याचदा केले आहे. ज्या काळी वसईला सव्वा ते दीड लाखाच्या घरात फ्लॅट विकत घ्यावा लागे, त्याकाळी त्यांनी वैयक्तिक बचतीमधून चार लाखांची मदत इतरांना केल्याच्या आठवणी अजून आहेत.
भविष्याचा अंदाज घेऊन अनेक आर्थिक गुंतवणुकी त्यांनी केल्या. सामाजिक कार्यासाठी पैसे खर्च करताना, आपल्या परिवाराच्या वैयक्तिक गरजा, मुलांचे शिक्षण, यासाठी देखील त्यांनी तरतूद करून ठेवली होती. अनुसया आजीने या सर्व चौकटीच्या आत राहून आजोबांना साथ दिली. कित्येक घरगुती निर्णयाच्या वेळी, आजोबांचा आग्रह, काही प्रसंगी, गांधीजींच्या हट्टीपणासारखा एकाकी वाटे. पण ते आपल्या मतावर ठाम असत. कधी कधी वाटतं, काही व्यक्ती या समाजासाठी, ध्येयवादी कामासाठीच जन्माला आलेल्या असतात! त्यांच्याकडून वैयक्तिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या यासाठी टोकाच्या अपेक्षा करू नयेत. नपेक्षा त्यांच्या सामाजिक कार्यास न्याय देणे शक्य होणार नाही. हा विरोधाभास मान्य केल्याशिवाय माझ्या आजोबांचं योग्य आकलन होणं शक्य नाही.
ध्येयवादी, विद्यार्थी प्रिय शिक्षक, हाडाचा मेहनती, काबाडकष्ट करण्यास तत्पर, आर्थिक साक्षर किंबहुना आर्थिक निष्णात, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणारा विद्वान, शांत गंभीर ऋषितुल्य स्वभावाचे असे माझे आजोबा होते.
आज आम्ही नातवंडे जेव्हा निःपक्षपातीपणे त्यांचे आकलन करण्याचा विचार करतो तेव्हां त्यांच्या, त्यावेळी न समजलेल्या घटनांचा संदर्भ लागतो.
माझी पत्नी पल्लवीशी गप्पा मारताना, आम्हाला माहीत नसलेल्या अनेक जुन्या आठवणी त्यांनी काढल्या होत्या. पल्लवीकडून ते सगळं ऐकताना त्यांच्या मनाच्या हळव्या कोनाड्याचा थांगपत्ता कुठेतरी लागल्यासारखं वाटलं होतं. त्यांना बोलण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी, कोणीतरी हवं होतं असं आता राहून राहून वाटतं. सर्वांच्या आपापल्या व्यस्त दिनक्रमात, त्यांच्यासोबत बसून मोकळ्या गप्पा मारायच्या राहून गेल्यासारखे वाटते!
आजोबा आता नाहीत. ते असताना त्यांना समजून घेण्यात आम्ही कमी पडलो हे प्रांजळपणे कबूल करावेसे वाटते. त्यांनी केलेले कार्य, घेतलेले निर्णय, यांचे परिक्षण करण्याचा आता कितीही प्रयत्न केला तरी ते किती वस्तुनिष्ठ होईल हे ठामपणे सांगता येणार नाही ! हत्ती आणि आंधळ्यांच्या कथेतील आंधळ्याच्या वैयक्तिक आकलनाप्रमाणे ते एकांगी होण्याची शक्यताच जास्त आहे. त्यामुळे इथे थांबतो माझ्या आजोबांच्या स्मृतीला विनम्र वंदन करतो.”
मनीष बृहन-मुंबई महापालिकेत सहाय्यक अभियंता या जबाबदारीचे पदावर काम करीत असून डोंबिवलीत त्यांचे निवासस्थान आहे.
मनीषने वर्णन केल्याप्रमाणे आर. एम. आरेकर सरांसारख्या एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे यथार्थपणे आकलन करून ते शब्दात मांडणे तेवढे सोपे काम नाही. सरांबरोबर झालेल्या अखेरच्या भेटीदरम्यान मला झालेला संभ्रम, मार्मिक शब्दात लिहीलेल्या या आठवणाीतून दूर होतो.
“आजोबा आता नाहीत, ते असताना त्यांना समजून घेण्यात आम्ही कमी पडलो..” हे वाक्य खूप काही सांगून जाते.धन्यवाद मनीष ! (मनीषशी संपर्क साधण्यासाठी मोबा.नंबर..9137727891 असा आहे.)
थोडक्यात,आरेकर सरांचे जीवन म्हणजे,
“वानोत निन्दोत सुनितीमंत,
चळो असो वा कमला गृहात,
ये मृत्यो आजीच, घडो युगांती,
सन्मार्ग टाकोन भले न जाती..”
एका भल्या माणसाचे ते जीवन होते! आपली जीवनमूल्ये त्यांनी कधीच सोडली नाहीत. शेवटी या जगाचा निरोप घेतांना, मृत्यूलाही ताटकळत ठेवले नाही!सरांच्या आयुष्यात विरक्ती हा साधूपुरुषांचा गुण प्रकर्षाने दिसून येतो. संसारात असूनही ते विरक्त होते.!!
मधुर वाणी, उदारमन आणि विशाल बुद्धीच्या आमच्या आरेकर सरांनी ज्या निस्पृह वृत्तीने आम्हाला बोर्डी शाळेत ज्ञानदान केले त्यांची आठवण सदैव ठेऊन, आम्ही, त्यांचे विद्यार्थी, त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करू, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मला वाटते!
आर् एम् आरेकर सरांचे स्मृतीस त्रिवार वंदन!!!
दिगंबर राऊत,
आरेकर सरांच्या जीवन पटा वरून एक जातिवंत शिक्षकाची ओळख होते. निवृत होऊन बोर्डी येथे त्यांना कधी तरी पाहण्याचा योग येई.त्या वेळीही ते अतीशय शांत पणे चालत. व बोलत. इंग्रजी विषयावर प्रभुत्व, अथांग वाचन असणारे हे सर ज्यांना लाभले त्यांचे भाग्य थोर . त्यामुळे त्या शाळेची थोरवी गाणारे अनेक विद्यार्थी भेटतात.त्यांचे कार्य वाचून ,त्यांना आलेल्या अडचणी वाचून,मला त्यांच्या विषयी असणारा आदर दुप्पट होतो.त्यांच्या कार्याला सलाम. आ मचे बंधू त्यांचे विदयार्थी त्यांनी लेखातून आपल्या सरांची ओळख करून दिली म्हणून त्यांनाही धन्यवाद.
अतिशय सुंदर!येथे सरांच्या दोन आठवणी मलाही सांगाव्याश्या वाटतात. सर आम्हाला अकरावीला(तेव्हाची S.S.C.)मराठी शिकवला होते.त्यांची पहिली आठवण म्हणजे इतर शिक्षक विद्यार्थ्यांचा उल्लेख एकेरी नावाने म्हणजे ‘तू’ असा करीत त्यावेळी आरेकरसर आपल्या विद्यार्थ्यांना ‘आपण’ म्हणून संबोधीत करीत असत त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना खूप अवघडल्यासारखं व्हायचे.एक दिवस धीर धरून मी सरांन ह्या बाबतीत विचारले असतांना ते म्हणाले ‘आज तुम्ही लहान असलात तरी तुमच्यातूनच पुढे कोणी ना कोणी मोठे बनणार आहे कोण ते मी आज सांगू शकत नाही आणि म्हणूनच माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मी आपण असे संबोधत असतो.” दुसरी आठवण म्हणजे निबंधाच्या वह्या किंवा पेपर तपासतांना ते अतिशय काटेकोरपणे तपासीत असत.आम्हाला पहिला निबंध त्यांनी लिहायला दिला त्यात एका विद्यार्थ्याला त्यांनी दहा पैकी पाव मार्क दिला.तो वैतागून सरांना म्हणाला ‘हा पाव मार्क तरी कशाला दिलात त्याऐवजी मला शून्य मार्क द्या’.त्यावर सर म्हणाले ‘तुझ्या मेहनतीचे हे मूल्यमापन आहे ते मी बदलू शकत नाही.” पहिल्या निबंधात मला दहापैकी साडेतीन मार्क मिळाले आणि शेवटच्या निबंधात दहा पैकी नऊ मार्क मिळाले.S.S.C.चा त्यांचा शेवटचा तास होता त्यावेळी सरांनी माझी निबंधाची वही सर्वांना दाखवून माझे कौतुक केले. म्हणाले आयुष्यात स्वतःची सुधारणा सतत सुधारणा करीत राहिलात तर प्रगती पासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. आमचे अहो भाग्य की आम्हाला असे शिक्षक लाभले.?
रघुनाथ म आरेकर सर म्हणजे एक उतुंग व्यक्तिमत्व . हायस्कूल मध्ये ते आरमारेकर म्हणून संबोधिले जायचे .विद्यार्थ्यांशी बोलतांना देखील ते आदरार्थी शब्दांनी हाक मारीत जसे अहो , आपण .अतिशय सुसंस्कृत वागणं , बोलणे तसेच शांत स्वभाव . मी त्यांना कधीही रागावलेले वा चिडलेले पहिले नाही .
8 वीला त्यांनी मला इंग्रजी शिकविले तर एस एस सी ११ वीला मराठी शिकविले .ते शिकवीत असतांना त्यांनी वर्गांत challenge दिली होती की ज्या विद्यार्थ्यंला बोर्डाच्या परीक्षेत ७० टक्क्या पेक्षा ज्यास्त मार्क्स मिळतील त्याला माझ्यातर्फे १०० रुपयांचे बक्षीस दिले जाईल .मी ते स्वीकारा य चे ठरविले व त्या प्रमाणे विषयावर जोर देऊन अभ्यास केला . त्यावेळी मराठी ह्या विषयांत हुशार विद्यार्थ्यंना जेम तेम ६० टक्के मार्क्स मिळत .सुदैवाने नशिबाने साथ दिली .मला ७६ टक्के मार्क्स मिळाले व ते मिळवणारा मी batch मध्ये एकमेव होतो .त्याचा त्यांना इतका आनंद झाला होता की त्यांनी मला बोलावून घेऊन कौतुक तर केलेच पण पुढच्या एस एस सी वर्गांतल्या मुलासमोर माझ्या यशाचे खास कौतुक केले होते .
अशा ह्या निगर्वी व नेहमीच विद्यार्थ्यंना प्रोत्साहन देण्याऱ्या सरांना माझे लाख लाख प्रणाम .???
आरेकर सरांवरील लेख खूपच छान उतरला आहे. आम्हाला देखील नववी व अकरावीला आरेमारेकर सर इंग्रजी शिकवण्यास होते. त्यांना आम्ही आरेमारेकर सर असंच म्हणत असू.
बाकी जे तुम्ही लेखात सांगितले तोच अनुभव आमचा पण आहे.
एक आठवण आहे किंवा किस्सा म्हणा.
आरेकर सरांना बरोबर उत्तर दिल्यावर you are right, quite right असं म्हणायची सवय होती.
एकदा त्यांना मी प्रश्न विचारला होता आणि त्यांनी दिलेल्या उत्तरा नंतर मी त्यांना म्हणालो होतो you are right, quite right आणि माझ्या त्या वक्तव्यावर आरेमारेकर सर मनापासून हसले होते. आणि सगळा वर्ग देखील हसला होता.
बंधू ,
आपल्या लेखामुळे आरेमारेकर सरांच्या पुढच्या पिढ्या काय करताहेतत आणि कसे छान सेटल झाले आहेत याविषयी पण माहिती मिळाली.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अप्रतिम आणि माहितीपूर्ण लेख. आपल्या लौकिकाला साजेसा. असेच लिहित राहा.
नंदूभाई
अतिशय सुरेख असा हा लेख वाचून आपल्या गुरुजींना अभिवादन करतो, परत bordi chi आठवण झाली अणि मन bhutkalat गेले. आभारी आहे.
आपला लेख खूपच छान आहे. सरांची माहित नसलेली बरीच माहिती कळली अशा गुरूंना विनम्र वंदन..
दिगंबर राऊत..
आर एम आरेकर सरावरील लेखन छान आहे .इतका विद्वान माणूस तुम्हाला शिक्षक म्हणून लाभला आहे तुमचे भाग्यहोय.
दिगंबर जी ..
आपला आर एम आरेकर सरा॔वरील लेख उत्तम आहे..त्यांच्या स्मृतीस माझे वंदन..
मी हा लेख कालच वाचला खुप सुंदर लिहिले आहे. सरांचे पूर्ण जीवन चरित्र वर्णवले आहे.खरंच अप्रतिम लेखन.?
असे गुरू लाभणं हे महद्भाग्य! साष्टांग दंडवत! आपण वरून शाळेतील विद्यार्थी त्याबाबतीत खरेच खूप भाग्यवान आहात .आरेकर सरांबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती या लेखांमधून कळली
सन १९७२-७३ ते सन १९७६-७७ अशी ५ वर्षे मी सुनबाई पेस्तनजी हकीमजी हायस्कूल, बोर्डाचा मी “टेक्निकल” चा विद्यार्थी होतो. कोसबाड ते बोर्डी दररोज बसने ये-जा करणारे १०-१५ विद्यार्थ्यांमध्ये मी एक होतो.
१०वी शालांत आणि ११वी-२२ वी ची पहिलीच बॅच आमची. अमोल पालेकर यांनी सांगितल्या प्रमाणे “आरे मारे कर” सर म्हणुनच आम्ही “सरांना” ओळखत होतो. अतिशय मितभाषी, मृदू बोलणारे म्हणुनच त्यांची शाळेत ओळख होती. आम्हाला ११ वी मधे गेलो त्यावेळी स्वतंत्र शिक्षक नेमले नसल्याने सर्व अनुभवी ज्येष्ठ शिक्षकांमधे आर. एम. आरेकर सर इंग्रजी शिकवायला होते. वर्गात आल्यावर प्रथम रोज एक “सुविचार” -इंग्रजीत फळ्यावर लिहीत असत! त्यावर थोडावेळ चर्चा होत असे. एका सुविचारावर मला एक शंका उपस्थित करायची होती. “Only brave people from history are remembered” अशा आशयाचे वाक्य लिहिले होते. इंग्रजीचा तास असल्याने इंग्रजीतच विचारायला हवे म्हणुन मी माझी शंका प्रथम मनातल्या मनात घोळवली आणि हिय्या करुन विचारूनच टाकली. But sir, sometimes the cowards are also remembered! For example Duryodhan along with Bheem! यावर सर मंदस्मीत करुन हसले आणि म्हणाले, “We should try to be remembered as brave!” यापलीकडे सरांची खरी ओळख आज दिगंबर राऊत सरांमुळे, राजाभाऊ दमणकर सर, श्रीमती रेखाताई आणि नातू मनिष यांच्या मार्फत झाली. दिगंबर राऊत सरांचे विशेष आभार; त्यांनी सरांना शब्दबद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल!
मी हायस्कूलमध्ये असताना कै. आर एम आरेकर सर्वांबरोबर आमचा संपर्क फक्त अकरावीच्या वर्गापुरताच अल्प काळासाठी आला. मुळातच धीर गंभीर आणि अबोल वृत्ती असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत जुजबी परिचय त्याकाळी मला होता. परंतु आजचा लेख वाचून सरांच्या एकूण व्यक्तीमत्वाचा सर्वंकष परिचय झाला.
सरांचे धाकटे बंधू श्री. सदाशिव मंत्रालयात आमच्या डेअरी विभागात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते त्यावेळी मी मंत्रालयात बऱ्याच वेळा त्यांच्या कडे कामानिमित्त जात असे तसेच ते देखील आमच्या ऑफिसमध्ये मिटिंगसाठी यायचे तेव्हा हमखास बोर्डीचा विषय निघून जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे.तसेच सरांबाबत विचारणा होत असे.
आजचा लेख अत्यंत माहितीपूर्ण असून कै. आर एम आरेकर सरांच्या व्यक्तीमत्वाचे सर्व पैलू सविस्तर पणे उलगडून दाखवणारा आहे.
सुंदर लेख आहे
“सर्व प्रथम माफी असावी काका”
या महान गुरूवर्य ला ञिवार वंदन.
काका आपण असल्या गुरूवर्या वर
लिहिलेले लिखाण अथांग समुद्रातउडी मारून काढलेल्या विविध मोत्यासारखे आहे.
सरांचे विचार ,समाजिक
प्रेम,चिकाटी, शाळेवर असलेली निष्ठा
आचार्यावर असलेले प्रेम, याची जाणीव आपल्याला लेखातून होते .खूप मोलवान चरित्र आपण लिहिलय..
संपूर्ण वाचून खूप आनंद वाटतोय
‘या विरक्त साधुपुरूषास वंदन…….??
लेख फारच सुंदर व सविस्तर पणे लिहीला आहे
धन्यवाद!!
माझा व त्यांचा जास्त परीचय तसा नव्हता
एक प्रख्यात शिक्षक म्हणून मी ओळखत होतो
तूझा लेख वाचून त्यांच्या बरीच काही माहीती .
*धन्यवाद* ??
मी हायस्कूलमध्ये असताना कै. आर एम आरेकर सर्वांबरोबर आमचा संपर्क फक्त अकरावीच्या वर्गापुरताच अल्प काळासाठी आला. मुळातच धीर गंभीर आणि अबोल वृत्ती असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत जुजबी परिचय त्याकाळी मला होता. परंतु आजचा लेख वाचून सरांच्या एकूण व्यक्तीमत्वाचा सर्वंकष परिचय झाला.
सरांचे धाकटे बंधू श्री. सदाशिव मंत्रालयात आमच्या डेअरी विभागात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते त्यावेळी मी मंत्रालयात बऱ्याच वेळा त्यांच्या कडे कामानिमित्त जात असे तसेच ते देखील आमच्या ऑफिसमध्ये मिटिंगसाठी यायचे तेव्हा हमखास बोर्डीचा विषय निघून जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे.तसेच सरांबाबत विचारणा होत असे.
आजचा लेख अत्यंत माहितीपूर्ण असून कै. आर एम आरेकर सरांच्या व्यक्तीमत्वाचे सर्व पैलू सविस्तर पणे उलगडून दाखवणारा आहे.
सुंदर शब्दांजलि.
या लेखाने तुम्ही तुमच्या गुरूंना एक छान गुरुदक्षिणा दिली आहे.
माझे सर्व शालेय शिक्षण
वसईला झाले आहे.(Born वसईकर)
त्यामुळे माझे मामा (सावे सर) सोडून इतर टीचर्स विषयी फार काही माहिती नाही.
तुमच्या लेखामुळे ती कमतरता दूर होते. आरेकर सर किती मोठे होते हे लेखावरून कळते.
आरेकर सर ना प्रणाम आणि तुम्हाला धन्यवाद.?
Shree R.M.Arekar sir ह्यांच्या वर लिहलेले आर्टिकल खूपच छान आहे.लेख वाचताना त्यांचा चेहरा माझ्या समोर उभा राहिला .आत्ता बराचसा गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत परंतु घराचा फोटो पाहून पूर्ण मांगेल वाडा डोळ्या समोर उभा राहिला.. सराना भावपूर्ण श्रद्धांजली .मराठीच्या तासाला सरांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आठवतात.?
. ॥श्री॥
आदरणीय श्री. दिगंबरभाई,
सादर प्रणाम!
आपण आठवणीने पाठविलेले ‘ एक विरक्त साधुपुरुष ‘ हे आपल्या आदरणीय श्री. आरेकर सरांचे व्यक्तिमाहात्म्यचित्र मी वाचले. याआधी आपण लिहिलेली चरित्रचित्रेही मी मनापासून वाचली आहेत. आपले लेखन ज्याने वाचले तो अचंबित झाला नाही असे होणारच नाही. माझे वाचन कमीच आहे. पण काही मोजक्या थोर साहित्यिकांचे लेखन जे मी वाचले त्यांच्या तुलनेत कोठेही कमी न पडणारे आपले लेखन आहे.
शब्दचित्र कसे रेखाटावे हे आपणांकडून शिकावे. भर्तृहरी, वामन पंडित यासारख्या दिग्गजांच्या संस्कृत- मराठी काव्यपंक्ती उद्धृत करून आपल्या कल्पना त्यांना चपखल जोडण्यासाठीची आपली उंची मापता न येणारी आहे. सात शल्यांना दिलेल्या आठव्या शल्याची जोड खूप काही सांगून जाते.
आपण आजवर लिहिलेल्या चरित्रलेखांपैकी माझ्या वाचनात आलेल्या लेखांमध्ये एक समान धागा आहे. आपल्या मनातील आदरणीयांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा संपूर्ण अभ्यास केला आहे. स्वानुभवाबरोबर त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांची शक्य तितकी संपूर्ण माहिती आपण संकलित केली आहे. माहिती मिळविताना त्या मान्यवरांच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणारी माहितीच घेतली आहे. त्या मान्यवरांच्या पुढच्या पिढीकडून अशी माहिती मिळविणे आजच्या काळात खूप कठीण आहे. पण आपण त्यात यशस्वी झाला आहात. त्याला कारण आपली तळमळ आहे. आपल्या लेखनात आपल्या स्वानुभवाची आपण केलेली पखरण खूपच छान आहे. विशेष म्हणजे कोठेही आत्मस्तुती नाही. त्यामुळे लेखनाची उंची वाढली आहे. आपल्या लेखनातील सुयोग्य शब्दांकन, सलगता प्रशंसनीय आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या माणसांच्या लेखनातील आपणांसारखी भाषाशुद्धता अभावानेच आढळते. आपल्या लेखनाचा दर्जा आणि त्यातील भावनोत्कटता लाजवाब आहे.
खरे तर आजवर आपली अनेक पुस्तके प्रकाशित व्हायला हवी होती. आज मी आपणांस प्रेमाची एक विनंती करतो की, आपण आजवर रेखाटलेल्या चरित्रचित्रांचा संग्रह आपण प्रकाशित करावा. आज वाचनप्रेम कमी झाले असले तरी किमान स्वानंदासाठी तरी ते व्हावे असे वाटते.
आपण मला आपली साहित्यकृती पाठविली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार!
– नरेश हरिश्चंद्र सावे
आरेकर सराविषयीचा लेख उत्कृष्ट आहे. आम्हालाही सातवीत त्यानी इंग्लिश शिकवले आहे. अजूनही शांत, मृदू आवाजातील त्यांचे शिकवीणे कानी पडते.. लेखाचे नाव अगदी योग्य वाटले
: एक अतिशय विद्वान, मेहनती, शांत गंभीर, वक्तशीर, उदार व्यक्ती मत्व असणाऱ्या, खरोखरंच ऋषींतुल्य जीवन जगणाऱ्या आमच्या आरेकर सरांना विनम्र अभिवादन. ??
दिगूभाऊ, लेख छान लिहिल्याबद्दल तुला धन्यवाद. ?
सौ उज्वला चुरी माजी शिक्षिका पार्ले टिळक विद्यालय.
एक विरक्त सत्पुरुष श्री आर.एम.आरेकर यांस लाख लाख प्रणाम,तेथे कर माझे जुळतो.
आपल्या या लिखाणातून बोर्डी शाळेतील अशा महान शिक्षकांची माहिती आम्हाला कळते असे लिहित रहा
आपला लेख अप्रतिम आहे आम्ही जरी आरेकर सरांना ओळखत नसलो तरी त्यांच्या चांगुलपणाविषयी गोष्टी ऐकून धन्य झालो. असे शिक्षक आपल्याला मिळाले व तुम्हीही त्यांचे चांगले गुण घेतले ,हे तुमचे भाग्य म्हणावे लागेल!
मोहन चौधरी बोरीवली
आरेकर सरांबद्दल कोणतीही पूर्व कल्पना, माहिती किंवा त्यांचा अनुभव नसतानाही एका अनभिज्ञ वाचकाला सरांचा जीवन पटल उघडून दाखवण्याचे कसब तुमच्याकडे आहे ह्याचा मला चांगला अनुभव आला आहे. आठव शल्य आणि Ph.D. शोधनिबंधनाचे चौर्यकर्म करण्याची घटना हेलावून टाकणारी होती. सरांचे विचार, कर्तृत्व आणि जीवनशैली ह्याबद्दल बोलण्याची माझी पात्रता नाही. पण मागे एकदा लिहिल्याप्रमाणे बोर्डीला मिळालेल्या अनेक उत्तमोत्तम शिक्षक आमच्या वाटेला कधी आले नाही, त्याचे शल्य मात्र कायम टोचत रहाते. एका सुंदर लेखाबद्दल अभिनंदन.
? ?
माननीय श्री.दिगंबर राऊत यांसी सादर प्रणाम.
आपण माझे दिवंगत वडील आदरणीय श्रध्देय कै.श्री.रघुनाथ महादेव आरेकर , यांच्या संबंधी एक संक्षिप्त असा त्यांच्या एकंदरीत शिक्षकी जीवनावर
प्रकाशझोत टाकणारा आत्मचरित्ररुप लेख लिहीलेला आहे , तो सर्वपरीने यथातथ्य आणि योग्य वाटतो.
आपणास आरेकर परिवारातील कुणीही , कै.रघुनाथ म.आरेकर यांच्यावर हा लेख लिहायला सांगितलेला नाही.आपण माझ्या वडीलांच्या शिक्षकीपेशामध्ये त्यांनी दाखविलेली कार्य तत्परता, विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेले कष्ट ,तसेच विषय समजावून सांगण्याची त्यांची पध्दत , तसेच सर्वांशी सौम्य आणि मृदु भाषेत संभाषण करण्याची त्यांची सवय या तसेच त्यांच्या ठाई असलेल्या अनेक सद् गुणांचा आपण त्यांचे विद्यार्थी या नात्याने जवळून अनुभव घेतलेला असल्याने, आपण प्रेरीत होऊन स्वयंस्फुर्तीने हा लेख माझ्या वडीलांच्या जीवनचरित्रावर लिहीलेला आहे.
आपण आपल्या लेखात म्हटले आहे.
आपल्या आईची ( कै.जानकीबाई म. आरेकर ) महती सांगताना सरांचे डोळे ओलावत.ते म्हणत ” केवळ ती आमची आई होती म्हणून बालपण निभावून गेले.तिच्या कष्टाला सीमा नाही.”
येथे थोडा उल्लेख राहुन गेल्यासारखा वाटतो, तो खालील प्रमाणे.
आपल्या प्रिय आईबद्दल वरील प्रमाणे म्हणणारे सर
खरोखर आपल्या वृध्द आईची किती मनोभावे सेवा करीत होते.तिच्या आजारपणात डाॅक्टरांकडे नेऊन औषधोपचार करीत होते.तिच्याकडे अजिबात दुर्लक्ष करीत नव्हते.तिच्याशी सौम्य, मृदु शब्दात बोलायचे.सत्तरीच्या पुढे तिचे वय असताना देखील ती करीत असलेल्या शेतीच्या कामाचे तोंडभरून कौतुक करायचे. तळहातावरील फोडासारखे तिला ते जपायचे. हे सर्व पाहुन, अनुभवुन तिच्या डोळ्यांतून घळाघळा प्रेमाश्रु , आनंदाश्रु वाहात असत.इतके त्यांचे आपल्या आईवर नितांत प्रेम होते.
आपल्या आईच्या निधनानंतर ते कै.साने गुरूजींच्या ” श्यामची आई ” या चित्रपटातील ते प्रसिद्ध गीत ” प्रेमास्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई , बोलावु तुज आता, मी कोणत्या उपाई ” हे गीत ते अत्यंत भावूकपणे डोळ्यांत पाणी आणुन सतत गुणगुणत असायचे.एव्हढे ते निस्सीम मातृभक्त होते.
आम्ही आजीला वडीलांच्या वाढदिवसा विषयी विचारायचो. तेव्हा ती म्हणायची की त्यांचा जन्म हनुमान जयंतीच्या दिवशी झाला.कुठले साल ते तिला आठवत नसायचे.आणि वडीलांनी देखील स्वतःचा जन्मदिवस कधी साजरा केल्याचे आम्हाला आठवत नाही.
माझ्या वडीलांसमोर , आदरणीय , श्रध्देय आचार्य श्री.भिसेगुरुजी आणि आदरणीय , श्रध्देय श्री.चित्रेगुरुजी यांचा आदर्श होता.त्यामुळे वडीलांनी उभय गुरुवर्यांच्या विनंतीवजा आज्ञेचा मान राखत , पदवीप्राप्त केल्यानंतर ,मुंबई महानगरातील राज्य प्रशासनातील तत्कालीन मुख्यालय म्हणजे सचिवालयात मिळत असलेली उच्च पदावरील नोकरीचा स्विकार न करता , बोर्डी गावातील सु.पे.ह.हायस्कुल मध्ये , आपल्या गुरुंनी दिलेली शिक्षकाची नोकरी स्विकार करुन , शिक्षकाच्या माध्यमातून गावांतील विद्यार्थी- विद्यार्थीनींना ज्ञानदानाचे कार्य करण्याचा निर्णय घेतला.
परंतु त्यांनी शाळेसाठी , गावासाठी केलेल्या वरील स्वार्थत्यागाची, ना शाळेने , ना गावाने , ना समाजाने कोणतीच दखल घेतली नाही , असे खेदाने म्हणावे लागत आहे.
कारण आपल्या सेवेतील ठरावीक कालावधीनंतर मिळणारा पदोन्नतीचा लाभ त्यांना देण्यांत आला नाही.
या घटनेने त्यांना बराच मानसिक त्रास झाला.
माझ्या दिवंगत वडीलांचा उल्लेख आपण कै.श्री.आरेकरसर असा केला आहे. सर हा ईंग्रजी शब्द आहे.मराठीत सर म्हणजेच शिक्षक, म्हणजेच गुरु. गुरु या शब्दाची व्याख्या किंवा व्यापक अर्थ खालील प्रमाणे आहे.
” गु” म्हणजे गुह्य.
” रु” म्हणजे रुजविणारा.
आपल्या शिष्याच्या अंतःकरणांत गुह्य ज्ञानाचे बिजारोपण करणाऱ्याला गुरु असे म्हटलेले आहे.
आपण आपल्या जीवनांत ज्या ज्या गुरुवर्यांच्या संपर्कात, सहवासात आलात.ज्यांच्या योग्य मार्गदर्शनाने तसेच त्यांच्या व्यक्तिगत आचरणाने आपल्यावर विषेश प्रभाव पडला, त्या गुरुवर्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतुने वरील पुस्तक प्रकाशित करण्याचा आपला मनोदय आहे.आपल्या आगामी प्रकाशित होणाऱ्या ” माझे गुरुवर्य ” या पुस्तकात आपण माझ्या वडीलांच्या जीवनचरित्रावर लिहीलेल्या लेखाचा समावेश करणार आहात, त्याबद्दल सर्व आरेकर परिवाराकडून आपणास खुप खुप धन्यवाद.
आपण हाती घेतलेले हे पुस्तक लिखाणाचे/ प्रकाशनाचे काम लवकरात लवकर पुर्ण होवो , अशी ईश्वरश्रीचरणी मनःपुर्वक नम्र प्रार्थना.
( आपण बरेच परिश्रम घेऊन लिहुन, संकलीत करुन मला पाठविलेल्या, माझ्या वडीलांच्या जीवनचरित्रपर लेखावर , माझ्याकडून प्रतिक्रिया देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व. )